रविवार, एप्रिल 20, 2025
Home Blog Page 8

आद्यकवी मुकुंदराज यांचे जन्मस्थान अंबाजोगाई होणार कवितेचे गाव – मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांची घोषणा

बीड, दि.16 (जि. मा. का) : आद्यकवी मुकुंदराज यांचे जन्मस्थान असलेल्या अंबाजोगाईला कवितेचे गाव म्हणून जाहीर करण्यात येईल, अशी घोषणा उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी आज येथे केली.

येत्या 2 महिन्यात याबाबतची कार्यवाही पूर्ण केली जाईल. खोलेश्वर महाविद्यालय, योगेश्वरी महाविद्यालय, कवी मुकुंदराज समाधी स्थळ, शासकीय महाविद्यालय आणि अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय या पाच ठिकाणी या कवितांच्या गावातील दालन सुरू करण्यात येतील, असे श्री. सामंत सांगितले.

आज श्री.सामंत यांनी जिल्ह्यातील साहित्यकांशी संवाद साधला यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी खासदार संदिपान भुमरे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सचिन मुळूक तसेच अनिल जगताप यांची या पत्रकार परिषदेत उपस्थिती होती.

आजच्या साहित्यिक संवादात श्रीमती दीपा क्षीरसागर, विवेक निरगणे, संजय पाटील देवळाणकर, आनंद कराड, प्रभाकर साळेगावकर, सतीश साळुंके, बाळासाहेब पठारे, महेश वाघमारे, राजकिशोर मोदी तसेच अतुल कुलकर्णी आदींनी सहभाग घेतला.

आद्यकवी मुकुंदराज यांनी लिहिलेला विवेक सिंधू हा ग्रंथ सध्या मुद्रित स्वरूपात उपलब्ध नाही तो उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी साहित्यिकांनी केली. त्यावर हा ग्रंथ उपलब्ध करून देण्याचे आश्वासन मंत्री महोदयांनी दिले.

समन्वय अधिकारी नियुक्त

श्री.सामंत यांनी कवितेचे गाव ही संकल्पना घोषित केल्यावर ती यथाशिघ्र पूर्ण व्हावी यासाठी जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी त्वरित आदेश जारी केले.

या उपक्रमाच्या पूर्ततेसाठी अपर जिल्हाधिकारी अंबाजोगाई यांना समन्वय अधिकारी म्हणून तर, उपविभागीय अधिकारी अंबाजोगाई हे सहसमन्वयक म्हणून नियुक्त करण्यात आले आहेत.

इंदू मिल येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाची राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्याकडून पाहणी

Oplus_131072

मुंबई, दि.१६  : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यकर्तृत्वाने तरुणांमध्ये एक वेगळी ऊर्जा निर्माण होते. त्यांचे शैक्षणिक व सामाजिक कार्य पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा, असे निर्देश राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिले.

सामाजिक न्याय राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी इंदू मिल येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाची प्रत्यक्ष पाहणी केली आणि कामकाजाचा आढावा घेतला. चैत्यभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतिस्थळाला भेट देऊन त्यांना वंदन केले.

यावेळी आमदार भाई गिरकर, सहसचिव सोमनाथ बागुल, सह आयुक्त प्रसाद खैरनार, कार्यकारी अभियंता प्रदीप अहिरे, नगरसेविका समिता कांबळे, माजी नगरसेवक शरद कांबळे, राहुल कांबळे, अशोक कांबळे आदीसह, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, मुंबई महानगरपालिका, सामाजिक न्याय विभागाचे अधिकारी व लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

राज्यमंत्री श्रीमती मिसाळ म्हणाल्या की,  स्मारकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा शैक्षणिक आणि सामाजिक इतिहास प्रभावीपणे मांडण्यासाठी डिजिटल तंत्रज्ञान, ऑडिओ-विज्युअल माध्यमे, इंटरेक्टिव्ह डिस्प्ले, लेझर शो इत्यादी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा. जगातील आणि देशातील विविध स्मारकाचा अभ्यास करून आपला इतिहास आंतरराष्ट्रीय पर्यटकांपर्यंत कसा पोहोचवता येईल यासाठी नियोजन करावे.

तसेच, स्मारकाच्या मार्गिका, स्वच्छता व सुरक्षा व्यवस्था यावरही लक्ष देण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. कामांची गुणवत्ता राखत, इलेक्ट्रॉनिक कामे समांतरपणे (फेजनुसार)  सुरू ठेवावी जेणेकरून स्मारक लवकरात लवकर पूर्ण होऊ शकेल, असेही त्यांनी सांगितले. स्मारकात उभारण्यात येणाऱ्या व्याख्यानगृह, ग्रंथालय, सभागृह, विपश्यना केंद्र अशा विविध सभागृहात स्वच्छता आणि सुरक्षा यास प्राधान्य देण्याच्या दृष्टीने नियोजन करावे.  सचिवांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या समितीमध्ये देखभाल दुरुस्तीसाठींच्या उपाययोजनांबाबत निर्णय घ्यावेत अशा सूचनाही राज्यमंत्री श्रीमती मिसाळ यांनी दिल्या.

यावेळी समितीतील सदस्य, कार्यकारी अभियंते आणि संबंधित अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून त्यांनी कामाची सद्यस्थिती जाणून घेतली व आवश्यक त्या सुधारणा सुचवल्या.

०००

श्रद्धा मेश्राम/विसंअ

जिल्ह्यात उद्योगासाठी पोषक वातावरण तयार करण्याच्या दृष्टीने काम करा – उद्योग मंत्री उदय सामंत

जिल्हा गुंतवणूक परिषदेला उत्तम प्रतिसाद; ९३० कोटींचे सामंजस्य करार

बीड, दि.16 (जि. मा. का) बीड जिल्ह्यात अधिक गुंतवणूक व्हावी यासाठी उद्योग विभागाने प्रयत्न करावेत तसेच मुख्यमंत्री रोजगार योजनेचे उद्दिष्ट पूर्ण होईल यासाठी काम करावे, असे प्रतिपादन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेत केले. आज त्यांच्या उपस्थितीत 930 कोटी 11 लाख रुपयांचे करार झाले.

उद्योग संचालनालय, जिल्हा उद्योग केंद्र तसेच महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, मैत्री आणि जिल्हा प्रशासनाने संयुक्तरीत्या या परिषदेचे आयोजन केले होते. येथील ग्रॅड यशोदा हॉटेलमध्ये ही परिषद झाली.

जिल्ह्यातील 74 उद्योजकांनी केलेल्या या करारामुळे थेट तसेच अप्रत्यक्षरित्या 6036 जणांना रोजगार प्राप्त होणार आहेत.

दीप प्रज्ज्वलनाने या परिषदेची सुरुवात झाली. यावेळी व्यासपीठावर खासदार सांदिपान भुमरे, जिल्हाधिकारी अविनाश पाठक, एमआयडीसीचे मुख्य अभियंता गावंडे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सचिन मुळूक तसेच अनिल जगताप, राजेश देशमुख, उद्योग सहसंचालक बी. टी. यशवंते, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक किरण जाधव, व्यवस्थापक विजय काकड, जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी डी.व्ही. फताटे आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महादेव इनकर व विश्वमाला इनकर यांनी केले.

पालकमंत्री अजित पवार यांच्या घोषणेनंतर दोन आठवड्यांतच बीड जिल्ह्यात १९१ कोटींची ‘सीआयआयआयटी’ स्थापनेचा निर्णय

‘टाटा टेक्नॉलॉजी’कडून उपमुख्यमंत्री अजित पवारांना पत्र; बीड जिल्ह्यात १९१ कोटींची ‘सीआयआयआयटी’ स्थापन करणार

मुंबई, दि. 16 :- बीड जिल्ह्यातील विद्यार्थी, युवकांना औद्योगिक प्रशिक्षण, तांत्रिक कौशल्य विकासाच्या माध्यमातून उद्योगक्षम बनविण्यासह रोजगार, स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करुन देण्यासाठी ‘सेंटर फॉर इन्व्हेंशन, इनोव्हेशन, इक्युबेशन अॅन्ड ट्रेनिंग’ अर्थात (सीआयआयआयटी) स्थापन करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री तथा बीडचे पालकमंत्री अजित पवार यांनी केल्यानंतर अवघ्या दोन आठवड्यांच्या आतच ‘टाटा टेक्नॉलॉजी’ कंपनीने बीड जिल्ह्यासाठी 191 कोटी रुपये खर्चून नवीन ‘सीआयआयटी’ स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. तशा आशयाचे पत्र कंपनीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पाठविले आहे. नव्या सेंटरमधून दरवर्षी 7 हजार युवकांना प्रशिक्षित केले जाईल, त्यातून बीड जिल्ह्यात उद्योगपूरक वातावरण निर्माण होण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

पालकमंत्री म्हणून आजित पवार यांनी 2 एप्रिल 2025 रोजी केलेल्या बीड जिल्ह्याचा दौऱ्यात बीड जिल्ह्यातील युवकांसाठी उद्योग क्षेत्राच्या मदतीने ‘सेंटर फॉर इन्व्हेंशन, इनोव्हेशन, इक्युबेशन अॅन्ड ट्रेनिंग’ (सीआयआयआयटी) स्थापन करण्याची घोषणा केली होती. त्या अनुषंगाने त्यांनी ‘टाटा टेक्नॉलॉजी’ कंपनीला पत्र लिहून सहकार्य करण्याचे आवाहन केले होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्राला ‘टाटा टेक्नॉलॉजी’ कंपनीने सकारात्मक प्रतिसाद दिला असून बीड जिल्ह्यासाठी 191 कोटी रुपये खर्चून नवीन ‘सीआयआयटी’ स्थापन करण्याची तयारी दर्शविली आहे. 191 कोटींपैकी 15 टक्के म्हणजे 33 कोटी रुपयांचा खर्च बीड जिल्हा प्रशासन करणार असून उर्वरित खर्च ‘टाटा टेक्नॉलॉजी’ आणि त्यांच्या भागीदार कंपन्या, संस्था उचलणार आहेत. ‘टाटा टेक्नॉलॉजी’ कंपनीने ‘सीआयआयआयटी’ स्थापन केल्यानंतर दरवर्षी सुमारे 7 हजार युवकांना उद्योगांच्या (4.0) गरजेनुसार आवश्यक जागतिक दर्जाचे औद्योगिक, तांत्रिक प्रशिक्षण दिले जाणार आहे. यामुळे उद्योगांना त्यांच्या गरजेनुसार प्रशिक्षित मनुष्यबळ मिळेल तसेच युवकांना त्यांच्या इच्छेप्रमाणे रोजगार मिळवणे, स्वयंरोजगार करणे शक्य होणार आहे.

‘सीआयआयआयटी’च्या स्थापनेनंतर पहिल्या तीन वर्षांसाठी प्रशिक्षणाचा खर्च ‘टाटा टेक्नॉलॉजी’ उचलणार आहे. त्यानंतर प्रशिक्षणाचा खर्च ‘टाटा टेक्नॉलॉजी’ आणि जिल्हा प्रशासन दरवर्षी प्रत्येकी पन्नास टक्क्यांप्रमाणे विभागून उचलणार आहेत. यामुळे बीड जिल्ह्यातील हजारो युवकांना उद्योगक्षेत्राच्या गरजेप्रमाणे औद्योगिक, तांत्रिक प्रशिक्षण मिळेल. त्यांची कौशल्यवृद्धी होईल. उद्योगांना त्यांच्या गरजेप्रमाणे प्रशिक्षित मनुष्यबळ मिळेल. यातून जिल्ह्यात उद्योगपुरक वातावरण निर्माण होण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

वेव्हज् : मनोरंजनाची सर्वसमावेशक चळवळ

मनोरंजन व्यवसायात योगदान देणाऱ्या विविध घटकांना एका मंचावर आणून त्यांना परस्पर सहकार्याची आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या देवाण-घेवाणीची संधी उपलब्ध करून देणाऱ्या वेव्हज शिखर परिषदेविषयी…

भारत हा मनोरंजन आणि माध्यम उद्योग जगतातला एक आघाडीचा आणि तितकाच महत्त्वाचा देश. भारतात या उद्योग क्षेत्राची प्रगतीही तितक्याच झपाट्याने होत आहे आणि त्यासोबतच या परिसंस्थेच्या अवकाशात सातत्याने होत असलेल्या बदलांसह हे क्षेत्रही तितक्याच सातत्यपूर्णतेने बहरत चालले आहे. आज या क्षेत्राकडे नीट पाहिले तर विविध व्यासपीठांवरच्या आशय निर्मितीनेही मोठी उसळी घेतल्याचे दिसते. यामागचे कारण म्हणजे देशातील वाढत्या डिजिटल प्रसारण सेवा, प्रादेशिक भाषांमधील आशय सामग्री निर्मिती आणि सातत्याने नव्या, खिळवून ठेवणाऱ्या, सर्वसमावेशकतेची जाणीव करून देणाऱ्या आशयाची वाढती मागणी करत असलेला देशातला तंत्रज्ञानस्नेही प्रेक्षक वर्ग. त्यामुळेच तर आता भारतासाठी हे क्षेत्र केवळ मनोरंजनाचे साधन म्हणून मर्यादित राहिलेले नसून, हे भारतासाठी सांस्कृतिक अभिव्यक्ती, आर्थिक विकास आणि जागतिक पटलावर आपला प्रभाव पाडण्याचे एक सामर्थ्यशाली माध्यम झाले आहे. लवकरच मुंबईत जागतिक दृकश्राव्य मनोरंजन शिखर परिषद (World Audio Visual & Entertainment Summit – WAVES) होणार आहे. येत्या १ ते ४ मे २०२५ दरम्यान महाराष्ट्रात, मुंबई इथे ही शिखर परिषद होणार आहे. महत्त्वाचे म्हणजे भारत सरकारनेच या परिषदेचे आयोजन केले आहे. ही परिषद जागतिक पटलावर भारताच्या वाढत्या महत्त्वाचे प्रतिबिंब असलेला एक मंच ठरणार आहे आणि वेव्हज बाजार हा या शिखर परिषदेअंतर्गतचाच एक अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. खरे तर गेल्या अनेक दशकांपासून मी या क्षेत्रातच जगतो, वावरतो आहे. या इतक्या प्रदीर्घ काळातील माझ्या स्वत:च्या अनुभवांवरून मी एक गोष्ट खात्रीने सांगू शकतो ती म्हणजे कथात्मक मांडणीत लोकांना एकत्र आणण्याची, त्यांना प्रेरित करण्याची आणि एकुणात परिवर्तन घडवून आणण्याची मोठी ताकद असते. याच पार्श्वभूमीवर वेव्हज आणि वेव्हज बाजाराच्या माध्यमातून भारताने जागतिक मनोरंजन क्षेत्रासाठी एका व्यापक सहकार्यपूर्ण भागीदारीचे आणि सर्वसमावेशक भविष्य घडवण्याच्या दिशेने पाऊल टाकले आहे.

खरे तर वेव्हज बाजार ही ऑनलाइन बाजारपेठेसाठी आखली गेलेली एक क्रांतिकारक संकल्पना आहे. ही ऑनलाइन बाजारपेठ म्हणजे जागतिक मनोरंजन परिसंस्थेअंतर्गतचे व्यावसायिक तज्ज्ञ, उद्योग – व्यवसाय, आणि कलाकारांना परस्परांसोबत जोडून देणारे माध्यम ठरणार आहे. या बाजारपेठेअंतर्गत या क्षेत्रातील परस्पर सहकार्य सुलभ करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवले गेले आहे. याद्वारे या क्षेत्रातील व्यावसायिक तज्ज्ञांना नव्या संधी शोधण्याची आणि सहकार्यपूर्ण भागीदारी स्थापित करण्याची संधी मिळणार आहे. या बाजारपेठेला माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रातील एक अभिनव व्यवसाय केंद्र म्हणून स्थान मिळवून देण्याचाच सरकारचा प्रयत्न आहे. भारताचे माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी 27 जानेवारी २०२५ रोजी या अभिनव बाजारपेठेचे औपचारिक उद्घाटन केले होते. आर्थिक क्षेत्रात दावोस शिखर परिषदेचे स्थान आहे, तेच मनोरंजन क्षेत्रात वेव्हज शिखर परिषदेला मिळवून देण्याचा दृष्टिकोन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडला होता. त्या दृष्टीने वेव्हज बाजार महत्त्वाचे साधन ठरणार आहे.

वेव्हज बाजाराच्या अधिकृत संकेतस्थळावर आतापर्यंत, माध्यम आणि मनोरंजन क्षेत्राशी संबंधित विविध क्षेत्रांमधील सुमारे ५५०० खरेदीदार, २००० पेक्षा जास्त विक्रेते आणि जवळपास १००० प्रकल्पांसाठी नोंदणी केली गेली आहे. भविष्यात या संकेतस्थळाला माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रासाठीच्या आशय सामग्रीची एक सर्वसमावेशक बाजारपेठ आणि परस्पर संपर्काच्या केंद्राचे स्वरूप प्राप्त करून देणे हा सरकारचा मानस आहे. त्या दृष्टीनेच संकेतस्थळाला कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित प्रोफाइलिंग म्हणजेच त्या त्या व्यक्तींची व्यावसायिक ओळख करून देण्याची तसेच मागणीनुसार जुळवणी करून देण्याच्या तंत्रज्ञानाचीही जोड दिली गेली आहे. या माध्यमातून ऑनलाइन संकल्पना मांडण्याचे सत्र, ऑनलाइन बीटूबी बैठका (विविध व्यावसायिक प्रतिनिधींच्या बैठका), वेबिनार या आणि अशाच प्रकारच्या इतर महत्त्वाच्या सत्रांचेही आयोजन केले जाणार आहे.

ही बाजारपेठ म्हणजे माध्यम आणि मनोरंजन क्षेत्राच्या अवकाशातील चित्रपट, दूरचित्रवाणी, अॅनिमेशन, गेमिंग, जाहिरात, वर्धित वास्तव (एक्स्टेंडेड रिअॅलिटी), संगीत, ध्वनी संयोजन, नभोवाणी या आणि अशा विविध क्षेत्रांमधील भागधारकांना एकत्र आणणारे एक महत्त्वाचे व्यासपीठ ठरणार आहे. हे व्यासपीठ विक्रेते आणि खरेदीदारांतील दुवा ठरेल आणि त्याद्वारे व्यावसायिकांना आपली कौशल्ये सुलभतेने सादर करण्याची, त्यांच्या संभाव्य ग्राहकांसोबत थेट संपर्क साधण्याची आणि उपयुक्त सहकार्यपूर्ण भागीदारीची संधी उपलब्ध करून देत राहील.

एखादा चित्रपट दिग्दर्शक आपल्या चित्रपटासाठी निर्मिती भागीदाराच्या शोधात असेल, एखादा जाहिरातदार योग्य व्यासपीठाच्या शोधात असेल, एखादा गेम डेव्हलपर गुंतवणूकदाराच्या शोधात असेल किंवा एखादा कलाकार आपल्या कलाकृतींना जागतिक स्तरावरील प्रेक्षकांसमोर सादर करू इच्छित असेल, तर अशा सर्वांसाठी वेव्हज बाजारपेठेचा हा मंच म्हणजे परस्पर संपर्क, सहकार्य आणि व्यवसायवृद्धीचे बहुआयामी व्यासपीठ उपलब्ध करून देणारी मोठी जागा किंवा बाजारपेठ असणार आहे.

एका अर्थाने वेव्हज बाजार ही एकप्रकारची समन्वित बीटूबी बैठकांची अभिनव बाजारपेठ आहे, जिने जागतिक मनोरंज क्षेत्रातील परस्पर संपर्क व्यवस्था, परस्पर सहकार्यपूर्ण भागीदारी व्यवस्था, आणि विकासाचा संपूर्ण चेहरामोहरा अगदी क्रांतिकारकरीत्या बदलला आहे. या बाजारपेठेने चित्रपट, दूरचित्रवाणी, संगीत, गेमिंग, अॅनिमेशन, जाहिरात तसेच वर्धित वास्तव (एक्स), आभासी वास्तव (व्हीआर) यांसारख्या जिवंत अनुभूती देणाऱ्या तंत्रज्ञानाशी संबंधित तज्ज्ञ व्यावसायिकांना एकत्र आणणारा मंच उपलब्ध करून दिला आहे. आणि याद्वारे विविध सर्जनशील क्षेत्रांसाठीच्या आशय सामग्रीचे सूचीकरण, त्याचा शोध आणि संबंधित व्यवहारांसाठीचाही एक व्यापक मंच उपलब्ध झाला आहे. चित्रपट वितरणासाठीचा मंचाच्या शोधात असलेले निर्माते, नव्या संकल्पना मांडू पाहणारे गेम डेव्हलपर किंवा लायसन्सिंग संधींच्या शोधात असलेले साऊंड डिझायनर अशा सगळ्यांसाठी वर्गवारीनुसार सूचीकरण, सुरक्षितपणे सादरीकरणे पाहण्याची दालने आणि संपर्क व्यवस्था उपलब्ध करून देत ही संपूर्ण प्रक्रिया सुलभ करणारी बाजारपेठ म्हणून वेव्हज बाजार उदयाला येणार आहे.

या बाजारपेठेच्या माध्यमातून भौगोलिक मर्यादांच्या पलीकडे जात विक्रेते आणि खरेदीदारांना त्यांच्यासाठीचा योग्य भागीदार आणि संधी शोधण्याच्या दृष्टीने सक्षम करणाऱ्या सुविधांचा अंतर्भाव केला आहे. चित्रपट स्टुडिओ, अॅनिमेशन हाऊस, पॉडकास्ट निर्माते, मार्केटिंग यंत्रणा यांसारख्या विक्रेत्यांना आपल्या सेवा आणि त्यांच्याकडची आशय सामग्री जागतिक गुंतवणूकदार, वितरक आणि भागीदारांसमोर सादर करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. दुसरीकडे खरेदीदारांसाठीदेखील उच्च गुणवत्तेचे, आधुनिक काळाशी सुसंगत प्रकल्प या बाजारपेठेमुळे उपलब्ध होऊ लागले आहेत. त्याच वेळी गुंतवणूकदारांसाठीदेखील सहनिर्मितीच्या करारांची आणि व्यापक व्यावसायिक संधींची दारे खुली झाली आहेत. इथे आवर्जून उल्लेख करायला हवी अशी गोष्ट म्हणजे या व्यासपीठाला या उद्योग क्षेत्राशी संबंधित विशिष्ट उपक्रम, सादरीकरणे पाहण्याची दालने, गुंतवणूकदारांबरोबरच्या बैठका – चर्चा आणि कलाकृतींच्या थेट प्रक्षेपण सत्रांसारख्या लाइव्ह स्क्रीनिंगसारख्या उपक्रमांशी जोडले गेले आहे, यामुळे या व्यासपीठाच्या माध्यमातून केवळ आभासी संवादाच्या पलीकडे जात खऱ्या अर्थाने उपयुक्त असलेले करार आणि व्यवहार प्रत्यक्षात साकारले जातील याचीच सुनिश्चिती झाली आहे.

सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे येत्या १ ते ४ मे २०२५ दरम्यान मुंबईत वांद्रे-कुर्ला संकुलात वेव्हज शिखर परिषद होणार असून त्यावेळी हा वेव्हज बाजारही साकारला जाणार आहे. यानिमित्ताने उपलब्ध करून दिलेल्या डिजिटल बाजारपेठेवर नोंदणी केलेल्या काही निवडक प्रतिनिधींना या बाजारपेठेत आपल्या संकल्पना मांडण्याची, या उद्योग क्षेत्रातील विविध घटकांसोबत संपर्क प्रस्थापित करण्याची, आघाडीच्या भागधारकांसोबत प्रत्यक्ष करार आणि व्यवहार पूर्णत्वाला नेण्याची मोठी संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. अभिनव दृष्टिकोनामुळे वेव्हज बाजार केवळ एक व्यासपीठ म्हणून मर्यादित राहिलेले नाही, तर ते अधिक स्मार्ट, परस्परांशी अधिक जोडलेले आणि जागतिक पातळीवरील सर्वसमावेशक मनोरंजन क्षेत्राच्या दिशेने सुरू झालेली चळवळच ठरले आहे.

एक कलाकार म्हणून, आम्ही कायमच आव्हानात्मक, प्रेरणादायी आणि चौकटीपलीकडे जाऊन विचार करायला लावणाऱ्या अवकाशाच्या शोधात असतो. वेव्हज हा अशाच प्रकारच्या अवकाशाच्या निर्मितीचा प्रयत्न आहे. दूरदृष्टीने सुरू केलेल्या या वाटचालीचा आपणही एक भाग असल्याचा मला खरोखरच अभिमान वाटतो. ही परिषद आपल्या परस्परांशी संपर्काच्या, कलाकृतींच्या निर्मितीच्या आणि मांडणीच्या पद्धतींमध्ये क्रांतिकारक बदल घडवून आणेल. हा बदल केवळ भारतापुरता मर्यादित नसेल तर त्याचा प्रभाव अवघ्या जगात दिसेल. ही परिषद म्हणजे भारतासाठीचा ‘लगान’ क्षण आहे. जगभरातील माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रासाठी एकतेचा, धैर्याचा आणि एका अशा दृष्टिकोनाचा क्षण आहे, ज्याचा प्रतिध्वनी आपल्या सीमांच्याही पलीकडे ऐकू येत राहील.

 

लेखक : आमिर खान, अभिनेता आणि निर्माते

(सौजन्य: पीआयबी, मुंबई)

दर्गाह शरीफ शाह तजम्मुल शाह ऊर्फ पंखेवाले बाबा ट्रस्टच्या मिळकतीची फेरमोजणी करा – अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्री दत्तात्रय भरणे

मुंबई, दि. १६ : घाटकोपर येथील दर्गाह शरीफ शाह तजम्मुल शाह ऊर्फ पंखेवाले बाबा अ‍ॅण्ड मस्जिद ट्रस्टच्या मिळकतीमध्ये होत असलेल्या अनधिकृत बांधकामांबाबत तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर मिळकतीची फेरमोजणी करण्याच्या सूचना अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिल्या.

मंत्रालयात दर्गाह शरीफ शाह तजम्मुल शाह अलियास पंखेवाले बाबा अँण्ड मस्जिद ट्रस्ट, घाटकोपर, मुंबई यांच्या मिळकतीमध्ये होत असलेल्या अनाधिकृत बांधकामाबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी मंत्री श्री. भरणे बोलत होते. यावेळी अल्पसंख्याक विभागाचे सचिव रुचेश जयवंशी, उपसचिव मिलिंद शेनॉय, मुख्य कार्यकारी अधिकारी जुनेद सय्यद, दर्गाह शरीफ शाह तजम्मुल शाह अलियास पंखेवाले बाबा अँड मस्जिद ट्रस्टचे प्रतिनिधी उपस्थित होते.

मंत्री श्री. भरणे यावेळी म्हणाले की, फेरमोजणीदरम्यान दोषी आढळणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी,  असेही त्यांनी यावेळी सांगितले.

00000

मोहिनी राणे/स.सं

 

तमाशा व कलाकेंद्र कलावंतांच्या तक्रारी निवारणासाठी समिती गठित

मुंबई, दि. 16 : राज्यातील तमाशा आणि कलाकेंद्र कलावंतांच्या विविध तक्रारींचे निवारण करण्यासाठी दोन स्वतंत्र समित्यांच्या गठनाचा निर्णय सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी घेतला आहे.

या समित्या तमाशा आणि कलाकेंद्र क्षेत्रातील फड मालक, कलाकार, वादक यांच्यासमोरील समस्या समजून घेऊन, पारंपरिक लोककला टिकवून ठेवण्यासाठी उपाययोजना सुचवतील, अशी माहिती मंत्री ॲड.शेलार यांनी दिली.

तमाशा तक्रार निवारण समितीमध्ये सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक हे अध्यक्ष असणार असून, तमाशा फड मालक रघुवीर खेडकर, तमाशा फड मालक गोपाळ नाना शेषेराव, फड मालक संभाजी जाधव, कलाकार मंगलाताई बनसोडे, कलाकार अतांबर तात्या शिरढोणकर, अभ्यासक गणेश चंदनशिवे, अभ्यासक खंडुराज गायकवाड व सहसंचालक सदस्य म्हणून काम पाहतील.

कलाकेंद्र तक्रार निवारण समितीमध्ये संचालक सांस्कृतिक कार्य हे अध्यक्ष असणार असून, कलाकेंद्र मालक बाळासाहेब काळे, कलाकेंद्र मालक अभिजित काळे, कलाकार रेश्मा परितेकर, कलाकार सुरेखा पुणेकर, कलाकार प्रमिला लोदगेकर, कलाकार संघटनेचे धोंडीराम जावळे, अभ्यासक प्रकाश खांडगे व सहसंचालक हे सदस्य म्हणून काम पाहतील.

या समित्यांचा कार्यकाळ 30 दिवसांचा असून, आवश्यकतेनुसार या क्षेत्रातील इतर अभ्यासक, कलाकार आणि कलाकेंद्र चालक यांनाही पाचारण करण्यात येणार आहे. या समित्यांमार्फत प्राप्त होणाऱ्या शिफारसीनुसार शासनाकडून निर्णय घेतला जाणार आहे.

0000

संजय ओरके /विसंअ/

पंडित दीनदयाळ उपाध्याय एकात्म मानवदर्शन हीरक महोत्सवात विविध उपक्रम राबविणार – कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा

मुंबई दि.16: समाजातल्या शेवटच्या घटकांपर्यंत विकास पोहचला पाहिजे, खऱ्या अर्थाने अंत्योदयांच्या माध्यमानेच लोकशाहीच्या उदिष्टांची पूर्ती होईल, हा मौलिक विचार पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी मांडला. त्यांच्या विचारांवर आधारित पंडित दीनदयाळ उपाध्याय एकात्म मानवदर्शन हीरक महोत्सव राज्यभरात राबवण्यात येणार आहे. या महोत्सवात विविध उपक्रम राबवण्यात येणार आहे शासनाच्या सर्व  विभागांनी तसेच जिल्हास्तरावर हा कार्यक्रम यशस्वीपणे राबवावा असे कौशल्य विकास,उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी निर्देश दिले.

राज्यात 22 ते 25 एप्रिल2025 या कालावधीत पंडित दीनदयाळ उपाध्याय एकात्म मानवदर्शन हीरक महोत्सव राबवण्यात येणार आहे याबाबत मंत्रालयात मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्या दालनात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा बोलत होते. यावेळी  मुख्य सचिव सुजाता सौनिक, कौशल्य विकास विभागाच्या अपर सचिव मनीषा वर्मा, दिव्यांग कल्याण विभागाचे अपर मुख्य सचिव अनिल डिग्गीकर, पर्यटन विभागाचे प्रधान सचिव अतुल पाटणे, शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओल, महिला व बाल विकास विभागाचे सचिव अनुप कुमार यादव, आदिवासी विकास विभागाचे सचिव विजय वाघमारे, दीनदयाळ संशोधन संस्थेचे सचिव अतुल जैन  उपस्थित होते.

दूरदृश्य प्रणालीद्वारे राज्यातील सर्व जिल्हाधिकारी या बैठकीत सहभागी झाले होते. या महोत्सावासाठी शासनाने पंडित दीनदयाळ उपाध्याय एकात्म मानवदर्शन महोत्सव समिती स्थापन केली असून या समितीचे कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा अध्यक्ष आहेत. मानव कल्याण यासंदर्भातील  पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचे मौलिक विचार समाजात रुजावेत या उद्देशाने देशभरात पंडित दीनदयाळ उपाध्याय मानव एकात्म हीरक महोत्सव साजरा  होणार आहे. देशभरात या महोत्सवाला सुरुवात करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य असल्याची माहिती कौशल्य विकास मंत्री श्री. लोढा यांनी या बैठकीत दिली.

पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचे कार्य, विचार प्रणाली, एकात्म मानवदर्शन आदींबाबतची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहचावी यासाठी प्रत्येक जिल्ह्यात पंडितजींच्या विचारांवर आधारित एक लाख पुस्तिकांचे वितरण करण्यात येणार आहे. या महोत्सवात ग्रामीण भागात बचतगट, अंगणवाड्या आणि शाळांमध्ये कौशल्य विकासावर भर देण्यात येणार आहे. तसेच गावातील स्वच्छता विषयक उपक्रम, घनकचऱ्याची विल्हेवाट लावण्याबाबत योजना तयार करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत शासकीय  योजना पोहोचवण्यासाठी या महोत्सवात युद्धपातळीवर प्रयत्न करण्याच्या सूचना मंत्री श्री. लोढा यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. या महोत्सवात महिला व बाल विकास, शालेय शिक्षण, ग्रामविकास, सांस्कृतिक कार्य, आदिवासी विकास, पर्यावरण, पर्यटन या विभागाकडूनही या महोत्सवात विविध कार्यक्रमाद्वारे योगदान दिले जाणार आहे.

मुख्य सचिव सुजाता सौनिक म्हणाल्या की, शासनाच्या मार्गदर्शक सूचनाप्रमाणे जिल्हास्तरावर समिती स्थापन करून हा महोत्सव जिल्हाधिकारी यांनी  यशस्वी करावा, अशा सूचना यावेळी त्यांनी दिल्या.

0000

संध्या गरवारे/विसंअ/

 

महाराष्ट्र राज्य लॉटरीच्या मार्च महिन्यातील मासिक व साप्ताहिक सोडतीचा निकाल जाहीर

मुंबई, दि. १६ :- महाराष्ट्र राज्य लॉटरीतर्फे प्रत्येक महिन्यात मासिक सोडती तसेच साप्ताहिक सोडती काढल्या जातात. माहे मार्च २०२५ मध्ये २९ मार्च २०२५ रोजी महाराष्ट्र गुढीपाडवा (भव्यतम), ७ मार्च २०२५ रोजी महाराष्ट्र सहयाद्री, १२ मार्च २०२५ रोजी महाराष्ट्र गणेशलक्ष्मी होळी विशेष, १९ मार्च २०२५ रोजी महाराष्ट्र गौरव, २१ मार्च २०२५ रोजी महाराष्ट्र तेजस्विनी व २५मार्च २०२५ रोजी महाराष्ट्र गजराज या मासिक सोडती काढण्यात आले असल्याचे वाशी येथील महाराष्ट्र राज्य लॉटरी कार्यालयाचे उपसंचालक (वित्त व लेखा), यांनी प्रसिद्धीपत्राद्वारे कळवले आहे.

महाराष्ट्र गुढीपाडवा भव्यतम सोडत तिकीट क्रमांक GP-0५ / 19259 या महावीर लॉटरी सेंटर, कोल्हापूर यांचेकडून विक्री झालेल्या तिकीटास रक्कम रू. 50 लाखाचे प्रथम क्रमांकाचे एक बक्षीस जाहीर झाले आहे.

महाराष्ट्र गौरव तिकिट क्रमांक G 11 / 1590 या श्रीगणेश एंटरप्रायजेस, मुंबई यांचेकडून -विक्री झालेल्या तिकिटास रक्कम रु.३५ लाखाचे प्रथम क्रमांकाचे बक्षीस जाहिर झाले आहे.

तसेच महा. सागरलक्ष्मी ते महाराष्ट्रलक्ष्मी या साप्ताहिक सोडतीमधून रक्कम रू. ७ लाखाचे प्रथम क्रमांकाचे एकूण ५ बक्षिसे जाहीर झाली आहेत.

मार्च- २०२५ मध्ये मासिक व भव्यतम सोडतीतून १९३४८ तिकीटांना रू. १,६३,१३,५००/- व साप्ताहिक सोडतीतून ५५७०२ तिकीटांना रू. १,९९,७२,७००/- ची बक्षिसे जाहीर झाली आहेत.

सर्व खरेदीदारांनी महाराष्ट्र राज्य लॉटरीच्या संकेतस्थळावर नमूद प्रक्रिया पूर्ण करून रक्कम रू. १०,०००/- वरील बक्षिसाची मागणी उपसंचालक (वित्त व लेखा), महाराष्ट्र राज्य लॉटरी, वाशी या  कार्यालयाकडे सादर करावी. रक्कम रू. १०,०००/- च्या आतील बक्षीस रकमेची मागणी विक्रेत्यांकडून करण्यात यावी, असे उपसंचालक (वित्त व लेखा) यांनी प्रसिद्धीपत्राद्वारे कळवले आहे.

0000

वंदना थोरात/विसंअ

श्री क्षेत्र चौंडी विकास आराखड्यासंदर्भात तातडीने कार्यवाही करावी – विधानपरिषद सभापती प्रा.राम शिंदे

मुंबई, दि. 16 :  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची त्रिशताब्दी जयंती पुढील महिन्यात दिनांक 31 मे, 2025 रोजी येत आहे. त्यानिमित्त त्यांचे जन्मगाव चौंडी, ता.जामखेड, जि.अहिल्यानगर येथे देशभरातील पर्यटक आणि इतिहासप्रेमींना त्यांच्या कार्यकर्तृत्वाची माहिती  देणाऱ्या श्री क्षेत्र चौंडी विकास आराखड्या संदर्भातील कार्यवाही तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांनी दिले.

विधान भवन येथे सभापती श्री.शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली  झालेल्या बैठकीत त्यांनी संबंधितांना निर्दैशित केले. यावेळी  मुख्य सचिव श्रीमती सुजाता सौनिक यांची विशेष उपस्थिती होती. मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर तर दूरदृष्यप्रणालीद्वारे नाशिक विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम, अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया, जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता भरतकुमार बावीस्कर यांच्यासह सर्व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

श्री क्षेत्र चौंडी विकास आराखडा हा सर्व दृष्टीने परिपूर्ण असावा, तसेच जिल्हाधिकारी यांनी आपल्या स्तरावर सर्व संबंधित विभागांची चौंडी येथे बैठक घेऊन आराखड्याच्या कामास गती द्यावी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मस्थळाचे सुशोभीकरण करणे, त्यांनी संदेश दिलेल्या जलसंवर्धन, वृक्षसंवर्धन संकल्पनांची जपणूक करण्याच्या दृष्टीने या आराखड्यास प्राधान्य द्यावे.  चौंडी येथे देशभरातून येणाऱ्या पर्यटकांसाठी सुव्यवस्थित रस्ते, संग्रहालय, महादेव मंदिर आणि चौंडीश्वरी मंदिर जीर्णोद्वार, निवास व्यवस्था, सुसज्ज वाहनतळ, स्थानिक उत्पादने, खाद्यपदार्थ यांची बाजारपेठ या सोयीसुविधांना प्राधान्याने उपलब्ध करुन  देण्यात याव्या, याबाबतचा प्रस्ताव तत्परतेने सादर करण्याबाबत  सभापती प्रा.राम शिंदे आणि मुख्य सचिव श्रीमती सुजाता सौनिक यांनी सूचित केले. बैठकीत प्रस्तावित आराखड्याबाबत सादरीकरण करण्यात आले..

००००

वंदना थोरात/विसंअ

ताज्या बातम्या

पत्रकारांची लेखणी सत्याला आधार देणारी आणि समाजाला दिशा देणारी असावी – उपमुख्यमंत्री अजित पवार

0
सातारा, दि. 19: माध्यमांनी केवळ बातम्या देण्याचे काम करू नये तर समाजाचे प्रबोधन करण्याचेदेखील एक प्रभावी साधन तुम्ही आहात आणि तसे तुम्ही व्हावे.  तुमची...

ऊर्जा राज्यमंत्र्यांनी केली भटाळी कोळसा खाण प्रकल्पाची पाहणी

0
चंद्रपूर दि. 19 एप्रिल : ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे -बोर्डीकर यांनी आज (दि.19)  वेकोलि चंद्रपूर क्षेत्रातील भटाळी कोळसा खाण प्रकल्पाला भेट देऊन पाहणी केली....

पालकमंत्र्यांच्या हस्ते शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या खेळाडू आणि प्रशिक्षकांचा सन्मान

0
अहिल्यानगर दि.१९- विविध क्रीडा प्रकारात आपले नैपुण्य दाखून शिवछत्रपती पुरस्काराने सन्मानित झालेल्या खेळाडूमुळे क्रीडा क्षेत्रात जिल्ह्याचा नावलौकीक अधिकच उंचावला असल्याचे गौरवोद्गार जलसंपदा मंत्री तथा...

जिल्ह्यातील अवैध धंद्याविरोधात मोहीम सुरू करा-पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

0
अहिल्यानगर दि.१९- जिल्ह्यातील अवैध धंद्याविरोधात पोलिसांनी निर्भयपणे आणि मोहीम स्तरावर कारवाई सुरू करावी, असे निर्देश जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी...

महिलांच्या सक्षमीकरणासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज – विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे

0
अहिल्यानगर दि. १९-  ग्रामीण महिलांमध्ये आत्मविश्वास वाढवून त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविण्यावर केंद्र व राज्य शासन अधिक भर देत आहे. बचतगटांची ही संकल्पना सर्वदूर  रूजवून...