बुधवार, जुलै 2, 2025
Home Blog Page 89

सहकार चळवळीच्या वाढीसाठी पूर्ण सहकार्य – उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ग्वाही 

  • शेतकऱ्यांच्या योजनांसाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही
  • लाडकी बहीण योजना सुरु राहणार
  • शेतीत एआय तंत्रज्ञानाच्या वापरातून शेतकऱ्यांनी प्रगती साधावी
  • काळम्मावाडी धरणाची गळती थांबवण्यासाठी आवश्यक निधीची तरतूद

कोल्हापूर, दि.23 (जिमाका): राज्याच्या आणि देशाच्या विकासात सहकार क्षेत्राचा मोठा वाटा आहे. स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी सहकार क्षेत्रातही काळानुसार बदल करणे आवश्यक असून सहकार चळवळ टिकण्यासाठी आणि वाढण्यासाठी आवश्यक सहकार्य करु, अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील विश्वनाथराव पाटील मुरगूड सहकारी बँकेच्या 75 व्या अमृत महोत्सवी वर्ष सोहळा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, बँकेचे चेअरमन प्रवीणसिंह विश्वनाथराव पाटील, माजी आमदार व बिद्री साखर कारखान्याचे चेअरमन के.पी. पाटील, माजी आमदार व अन्नपूर्णा शुगर फॅक्टरीचे चेअरमन संजयबाबा घाटगे, गोकुळ दूध संघाचे चेअरमन अरुण डोंगळे, शेतकरी संघाचे चेअरमन बाबासाहेब शिंदे, गोकुळ दूध संघाचे संचालक युवराज पाटील, केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्या माने, बिद्री सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन मनोजभाऊ फराकटे, विश्वनाथराव पाटील मुरगूड बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वास चौगले, बाबासाहेब पाटील – आसुर्लेकर, अविनाश जोशी व अन्य मान्यवर उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, शेतकरी, महिला व सर्वसामान्यांच्या विकासासाठी शासन अनेक योजना राबवित आहे. शेतकऱ्यांना मोफत वीज पुरवठा, महिलांना दरमहा पंधराशे रुपये अर्थसहाय्य देण्यासाठी लाडकी बहिण योजना अशा अनेक योजना राबवण्यात येत आहेत. राज्यातील शेतकऱ्यांना शेतीपूरक उद्योगांसाठी दरवर्षी अनुदान देण्यात येत आहे. शेतकऱ्यांसाठीच्या योजना राबवण्यासाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही, त्याचबरोबर महिलांच्या सक्षमीकरणासाठी राबवण्यात येणारी मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना सुरु राहील, कोल्हापूर जिल्ह्यातील काळम्मावाडी धरणाची गळती रोखण्यासाठी आवश्यक तो निधी देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

कोल्हापुरातील समृद्ध शेती आणि ऊस क्षेत्र पाहता इथल्या शेतकऱ्यांनी एआय तंत्रज्ञानाचा वापर करुन शेतीचा विकास साधावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी सहकार क्षेत्रासाठी खूप मोठे योगदान दिले आहे. सहकार क्षेत्राच्या विकासासाठी या क्षेत्रात काही आवश्यक ते बदल, परवानग्या किंवा निर्णय घ्यावयाचे असतील तर आवर्जून सांगावेत, सहकार क्षेत्राच्या विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल. सहकारी तत्त्वावर बँकेची उभारणी करुन विश्वनाथराव अण्णांनी सर्वसामान्य शेतकरी, छोट्या व्यावसायिकांना सक्षम करण्याचे काम केले आहे. या बँकेची वाटचाल वाखाण्याजोगी असून बँकेबरोबरच साखर कारखान्यांसाठीही त्यांनी योगदान दिले आहे. सहकाराच्या माध्यमातून या भागाची सामाजिक, आर्थिक व ग्राम विकासाची घडी त्यांनी बसवली आहे. या बँकेच्या वाटचालीत अनेक पिढ्यांनी योगदान दिल्याचा उल्लेख करुन शेतकऱ्यांना 50 लाखापर्यंत कर्ज पुरवठा करण्याबाबत बँकेने विचार करावा, असे आवाहन करुन बँकेच्या शतक महोत्सवासाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या.

उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांनी जात- पात भेदभाव न करता सर्वांना सोबत घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. फुले, शाहू, आंबेडकर यांच्यासह सर्व महामानवांनी दिलेली समतेची शिकवण आणि त्यांचे विचार अंगीकारुन आपण वाटचाल करणे गरजेचे आहे. पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे. ऑपरेशन सिंदूर यशस्वीपणे राबवून ‘दहशतवादाचा नायनाट केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही,’ हा संदेश प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिला आहे. त्याचबरोबर सैन्यदलाची आणि भारतीयांची एकजूट यातून दिसून आली असून दहशतवादाची पाळेमुळे नष्ट करण्यासाठी यापुढेही अशी ऑपरेशन राबवण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.

वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, सहकार क्षेत्रात विश्वनाथराव पाटील यांनी मोठे योगदान दिले आहे. विश्वनाथराव पाटील बँकेने तब्बल 77 वर्ष पूर्ण केले असून या बँकेची वाटचाल अत्यंत चांगल्या प्रकारे सुरु आहे.

प्रास्ताविकातून प्रविणसिंह पाटील यांनी बँकेच्या वाटचालीबाबत माहिती दिली.

०००००

मान्सून काळात आपत्तीवर सर्व विभागांनी समन्वयाने मात करावी; नागरिकांना दिलासा देण्यासाठी सर्व सुविधा पुरविण्याचे नियोजन करा – विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे

पुणे, दि. २३: गेल्या काही दिवसांपासून मान्सूनपूर्व पाऊस मोठ्या प्रमाणात होत आहे. तसेच आगामी मान्सूनमधील पावसाचा अंदाज पाहता पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेसोबत सर्वच संबंधित विभागांनी समन्वय ठेऊन आपत्तीवर मात करण्यासाठी काम करावे. आपत्तीबाधित नागरिकांना दिलासा देण्यासाठी सर्व सुविधा पुरविण्याचे नियोजन करावे, असे निर्देश विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी दिले.

पिंपरी- चिंचवड महानगरपालिकेत आयोजित मान्सूनपूर्व आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी मनपा आयुक्त शेखर सिंह, अतिरिक्त पोलीस आयुक्त सारंग आव्हाड, पोलीस उपायुक्त बापू बांगर, उपजिल्हाधिकारी नामदेव टिळेकर आदी यावेळी उपस्थित होते.

आगामी काळातही सरासरीइतका किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस राहण्याची हवामान विभागाची माहिती पाहता महानगरपालिकेने कोणत्याही आपत्तीला सामोरे जाण्यासाठी पूर्वतयारी करावी. नालेसफाईची उर्वरित कामे गतीने पूर्ण करावीत. पावसादरम्यान ज्या ठिकाणी पाणी साचते असे नागरी भाग व झोपडपट्ट्यांची माहिती महानगरपालिकेकडे असते. आपत्तीकाळात व पूरस्थितीमध्ये बाधितांना सुरक्षित जागी हलविण्यासाठी निवारा केंद्रांची व्यवस्था करावी.

निवारा केंद्रात नागरिकांना हलवण्याबाबतचे योग्य नियोजन करावे. त्या ठिकाणी हलविण्यात येणाऱ्या नागरिकांना अन्न, निवास व्यवस्थेसह अंथरून पांघरून आदी सोई- सुविधा व्यवस्थितपणे मिळाल्या पाहिजेत. भविष्यात या नागरिकांच्या कायमस्वरुपी पुनर्वसनासाठी झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांना गती देणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले.

कोणतीही जीवितहानी होऊ नये म्हणून सर्व ती दक्षता घेण्यात यावी. नागरिकांची घरे, इतर मालमत्ता आदींचे नुकसान झाल्यास महसूल विभागाने तात्काळ पंचनामे करावेत तसेच बाधितांना १०० टक्के मदत मिळेल याची दक्षता घ्यावी.

धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याबाबत जलसंपदा विभागाने पुरेशी आधीच माहिती द्यावी. आपत्ती काळात पावसाचे, पूरस्थितीच्या इशाऱ्यांवर लक्ष ठेऊन ते नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रभावीपणे काम करावे. वाहतुकीसाठी पर्यायी मार्गांची तयारी करावी. वाहतूक कोंडी होणार नाही आणि रहदारी सुरळीत राहील यासाठी पोलीस प्रशासनाने काम करावे. मनपा हद्दीतील सीसीटीव्ही कॅमेरे सुरू राहतील याची काळजी घ्यावी. बचाव कार्यासाठी एनडीआरएफ पथकाच्या सतत संपर्कात रहावे. तसेच बोटी, मदत साठा आदी तयार ठेवावे, असेही ते म्हणाले.

शहरातून पवना, मुळा आणि इंद्रायणी नद्या वाहतात. या नद्यांच्या लगतच्या झोपडपट्ट्यात पुराचे पाणी येऊ नये म्हणून नदी सुधार प्रकल्पांना गती देणे आवश्यक असून भविष्यात सीमाभिंतींचे काम हाती घेणे गरजेचे आहे, आदी सूचनाही त्यांनी दिल्या.

आयुक्त श्री. सिंह यांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे माहिती दिली. महानगरपालिकेचा पूर नियंत्रण कक्ष, जलसंपदा विभागाचा कक्ष, आपत्ती व्यवस्थापन कक्ष १ जूनपासून २४ तास ७ तास तत्त्वावर कार्यान्वित करण्यात येणार आहे. वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग, अग्निशमन बाबत फायर क्रू अशी नवीन संकल्पना सुरू केली आहे. हवामान विभागाचा इशारा नागरिकांपर्यंत पोहोचविण्याची व्यवस्था केली आहे. तात्पुरते निवारा केंद्र निश्चित केली असून असून तेथे आवश्यक त्या सुविधा, अन्न, निवास व्यवस्थेसाठी अंथरूण, पांघरूण पुरविण्याचे नियोजन केले आहे. पूरपरिस्थिती असलेल्या काळात तेथील रहिवाशांना बाहेर काढण्यासाठी स्थानिक लोकप्रतींनी सहकार्य करावे, असे आवाहन मनपा आयुक्त श्री. सिंह यांनी केले.

आपत्ती व्यवस्थापनासाठी १ हजार कोटी रुपयांची मागणी केली असून त्यापैकी राज्य आपत्ती व्यवस्थापन निधीतून ५७० कोटी रुपये पवना नदी पूर शमन उपाययोजनांसाठी मिळावे म्हणून प्रस्ताव पाठविला आहे. यातून नैसर्गिक नाल्यांचे पुनुरूज्जीवन, पुराच्या धोका कमी करणे, नागरिकांच्या जीविताचे, मालमत्ता तसेच पायाभूत सुविधांचे संरक्षण, पर्जन्यजल वाहिन्या, सांडपाणी वाहिन्यांची सुधारणा करणे तसेच आदी समग्र पूरनियंत्रण उपाययोजना राबविण्यात येणार आहेत, असेही ते म्हणाले.

यावेळी अतिरिक्त पोलीस आयुक्त श्री. आव्हाड, उपायुक्त श्री. बांगर यांनी पोलीस विभागाच्यावतीने वाहतुकीच्या अनुषंगाने, पर्यायी मार्ग तसेच अन्य नियोजनाची माहिती दिली.

जलसंपदा विभागाने त्यांचेकडील पूरनियंत्रण कक्ष, पाणी सोडण्याबाबतचे नियोजन कसे करण्यात येते याची माहिती दिली. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्यावतीने नागरिकांच्या जीविताचे रक्षणाच्या अनुषंगाने करण्यात येणारी कार्यवाही व नियोजन आदींची माहिती दिली.

महानगरपालिकेतील उपायुक्तांनी त्यांच्या हद्दीतील नियोजनाची माहिती दिली. त्याचबरोबर विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी सादरीकरण केले.

0000

पुण्यश्र्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारकासाठी शासनाचे सहकार्य – वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे 

मुंबई,दि. २३ –  पुण्यश्र्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती वर्षानिमित्त महाराष्ट्रात विविध सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले जात आहे. याच पार्श्वभूमीवर, जालना शहरात पुण्यश्र्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे स्मारक उभारण्यात येत आहे. या स्मारकामुळे जालना शहर पर्यटन आणि सांस्कृतिक केंद्र म्हणूनही ओळखले जाईल, या स्मारकासाठी शासनस्तरावर सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही  वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी दिली.

जालना  शहरातील अंबड चौफुली परिसरात उभारण्यात येत असलेल्या राजमाता  पुण्यश्र्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारकाची  वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी पाहणी केली.  या प्रसंगी आमदार  नारायण कुचे, भास्कर आबा दानवे, बद्रीनाथ पठाडे, भगवान मात्रे, स्मारक समितीचे अध्यक्ष कपील दहेकर, सचिव शांतीलाल बनसोडे, कोषाध्यक्ष बाळासाहेब अबुज, सदस्य तुकाराम कोल्हे, एस. एस. दहेकर, प्रा. गणेश गुंजाळ, साहित्यिक पंडित तळेगावकर, श्री. कुरधने, श्री.काळे उपस्थित होते.

मंत्री संजय सावकारे म्हणाले, जालना शहराचा सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा समृद्ध करणारे 24 फूट उंचीचे हे स्मारक देशातील सर्वात उंच पुण्यश्र्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक ठरणार असून वैभवशाली इतिहासाची साक्ष देणारे आहे.  या स्मारकाच्या पार्श्वभूमीला ऐतिहासिक महेश्वर किल्ला आणि इंदूर राजवाड्याच्या संकल्पनेचा मिलाफ साधणारी 28 फूट उंच आणि 56 फूट रुंद दगडी भिंत उभारली जाणार आहे. ही भिंत स्मारकाचे विशेष आकर्षण ठरणारी आहे. या भव्य प्रकल्पासाठी व सुशोभीकरणासाठी  शासन सकारात्मक आहे.

स्मारक समितीचे अध्यक्ष कपील दहेकर म्हणाले, हे स्मारक  पुण्यश्र्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचा आणि त्यांच्या समाजसुधारणेच्या विचारांचा गौरव आहे. यामुळे जालना शहराचे सांस्कृतिक वैभव वाढेल आणि भावी पिढ्यांना प्रेरणा मिळेल.

00000

 

पुण्यश्र्लोक अहिल्यादेवी होळकर यांची त्रिशताब्दी जयंतीनिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

मुंबई, दि. २३ : पुण्यश्र्लोक अहिल्यादेवी होळकर यांची ३०० वी जयंती राज्यभर विविध ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरी होणार आहे. या निमित्ताने नाशिक, पुणे आणि नागपूर येथे विशेष सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. या त्रिशताब्दी सोहळ्यामध्ये महाराष्ट्राची संस्कृती, परंपरा आणि इतिहास यांचा गौरव करण्यासाठी उत्तम संधी आहे, असे प्रतिपादन सांस्कृतिक कार्य आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी केले.

राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्यावतीने आयोजित करण्यात येत असलेल्या हा कार्यक्रम मंत्री ॲड. शेलार, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव तथा सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे.

नागपूरमध्ये २५ मे, २०२५ रोजी सायंकाळी ५.३० वाजता कविवर्य सुरेश भट सभागृहात सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात पुण्यश्र्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनचरित्रावर आधारित पोवाडे, संगीत, नाट्य आणि इतर कलाविष्कार सादर केले जाणार आहेत.

नाशिक येथे २७ आणि २८ मे, २०२५ रोजी ‘गाथा अहिल्यादेवींची, आपल्या संस्कृतीची’ या नावाने दोन दिवसीय सांस्कृतिक महोत्सव आणि नाट्य प्रयोग आयोजित करण्यात आला आहे. तसेच २८ मे, २०२५ रोजी ‘राजयोगिनी अहिल्यादेवी’ या ऐतिहासिक नाटकाचे सादरीकरण होणार आहे. या दोन्ही दिवसांचे कार्यक्रम सायंकाळी ६.३० वाजता सुरू होतील.

पुणे येथील कार्यक्रम ३१ मे, २०२५ रोजी बालगंधर्व रंगमंदिर येथे सायंकाळी ६ वाजता होणार आहे. येथे शाहिरी पोवाडा, मर्दानी खेळ, भारूड, वासुदेव आणि पुण्यश्र्लोक महानाट्य अशा विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी सजलेला हा सोहळा रसिकांच्या मनात ठसा उमटवणार आहे.

तीनही जिल्ह्यात होणारे हे सांस्कृतिक कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य असून या सर्व कार्यक्रमांना नागरिकांनी उपस्थित राहून याचा आनंद घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक विभीषण चवरे यांनी केले आहे.

0000

संजय ओरके/विसंअ/

येवला बस डेपोतील नवीन बसेसचे मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते लोकार्पण

नाशिक, दि. २३ (जिमाका): शालेय विद्यार्थ्यांनी नवीन बसेसच्या सुविधांचा प्राधान्याने उपयोग करावा, असे प्रतिपादन मंत्री छगन भुजबळ यांनी केले. आज येवला शहरातील येवला बस डेपोस प्राप्त पहिल्या टप्प्यातील 5 नवीन बसेसच्या लोकार्पण प्रसंगी ते बोलत होते. यावेळी आगर व्यवस्थापक प्रवीण हिरे यांच्यासह अन्य अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

मंत्री भुजबळ म्हणाले की, नागरिक व शालेय विद्यार्थी यांना प्रवासासाठी बस अतिशय महत्त्वाची यंत्रणा आहे. डेपोला पहिल्या टप्प्यात पाच बसेस प्राप्त झाल्या असून पुढील महिन्यात दुसऱ्या टप्प्यात अजून पाच बस उपलब्ध होणार आहेत. सर्व बसेसचे योग्य नियोजन करून प्रवाशांना चांगल्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशा सूचना यावेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांनी दिल्या.

०००

इचलकरंजीसह परिसराच्या विकासासाठी सर्वतोपरी मदत करु – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

इचलकरंजी (कोल्हापूर) दि. २३ : शहरांच्या विकासाच्या योजनांसाठी राज्य शासन कटिबद्ध असून लोकप्रतिनिधींकडून आलेल्या सर्व प्रस्तावांना न्याय देण्याचे शासनाचे धोरण आहे. त्याअनुषंगाने इचलकरंजीच्याही विकासासाठी सर्वतोपरी मदत करु, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिले. त्यांच्या हस्ते इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील 713 कोटी रुपयांहून अधिक विविध विकास कामांचे उद्घाटन, शुभारंभ व लोकार्पण पार पडले.

यावेळी  सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री कोल्हापूर प्रकाश आबिटकर, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील, खासदार धनंजय महाडिक, खासदार धैर्यशील माने, आमदार राहुल आवाडे, आमदार अशोकराव माने, आमदार शिवाजीराव पाटील, माजी मंत्री प्रकाश आवाडे, विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. शशिकांत माहुरकर, जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कार्तिकेयन, इचलकरंजी महानगरपालिका आयुक्त पल्लवी पाटील, उप विभागीय अधिकारी इचलकरंजी मोसमी चौगुले उपस्थित होत्या. यावेळी पालकमंत्री व जिल्ह्याधिकाऱ्यांनी त्यांना करवीर निवासिनी श्री अंबाबाईची प्रतिमा भेट दिली.

यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शहापूर पोलीस स्टेशनच्या कोनशिलेचे अनावरण झाले, तसेच त्यांनी नूतन इमारतीची पाहणीही केली.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, इचलकरंजी व परिसराच्या विकासाबद्दल जे काही प्रस्ताव येतील त्याला तातडीने मान्यता देण्यात येईल. यावेळी इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील 713 कोटी रुपयांहून अधिक विविध विकास कामांचे ऑनलाईन उद्घाटन, शुभारंभ व लोकार्पण झाल्याची घोषणा त्यांनी केली.

यात 130.60 कोटी रुपयांच्या केंद्र सरकार पुरस्कृत लघु व मध्यम नगरांसाठी नागरी पायाभूत सुविधा विकास योजना (UIDSSMT) अंर्गत इचलकरंजी शहरातील वाढीव कबनूर व शहापूर भागासाठी भुयारी गटार योजना राबविणे व 18 द.ल.लि. क्षमतेच्या मलशुद्धीकरण केंद्राचे लोकार्पण, 488.67 कोटी रुपयांच्या नगरोत्थान महाभियान अंतर्गत अस्तित्वातील भुयारी गटार योजनेचे बळकटीकरण करणे व योजना विकसित करणे या कामाचे उद्घाटन, 31.37 कोटी रुपयांच्या महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत शहरात विविध ठिकाणी एकूण सहा पाण्याच्या टाक्या उभारणे, पंपिंग मशीन तसेच दाबनलिका टाकणे इ. कामांचे उद्घाटन, 59 कोटींच्या मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत 10 रस्ते कामांचे भूमिपूजन, 4 कोटींच्या शहापूर पोलीस स्टेशनचे उद्घाटन, तसेच इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयातील नर्सिंग कॉलेजचे उद्घाटन करण्यात आले.

याचबरोबर संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ राज्य निवृत्तीवेतन योजनेतील 4 हजार 200 लाभार्थ्यांना मंजुरीपत्राचे वाटप तर 5 हजार बांधकाम कामगारांना भांडी व इतर साहित्य वाटपाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी काही लाभार्थ्यांना प्रातिनिधीक स्वरुपात मंजुरी पत्राचे व साहित्याचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमानंतर शहरातील श्री आर्य चाणक्य नागरी सहकारी पतसंस्थेस सदिच्छा भेट दिली.

विमानतळावर स्वागत

तत्पूर्वी कोल्हापूर विमानतळावर उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, जैन अर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी, खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक, आमदार अशोकराव माने, आमदार राहुल आवाडे, आमदार शिवाजीराव पाटील, विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ.शशिकांत माहुरकर, जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कार्तिकेन, जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित आदी मान्यवरांनी त्यांचे स्वागत केले. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी कोल्हापूर पर्यटन पुस्तिका भेट देऊन मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले.

०००

तालुका फळरोपवाटिकेत उत्पादनक्षम रोपे आणि फळझाडांची लागवड करा-उपमुख्यमंत्री अजित पवार

बारामती, दि. २३: कन्हेरी येथील तालुका फळरोप वाटिकामध्ये शेतकऱ्यांना अधिकाधिक कलमे उपलब्ध होईल, यादृष्टीने उत्पादनक्षम रोपे आणि फळझाडांच्या रोपांची लागवड करावी तसेच गेल्या वर्षीच्या तुलनेत रोपे, कलमांच्या विक्रीमध्ये वाढ करण्याकरीता प्रयत्न करावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिले.

श्री. पवार यांनी बारामती परिसरातील कन्हेरी वन उद्यान, कन्हेरी शिवसृष्टी, महाराष्ट्र परिवहन महामंडळ कार्यशाळा येथील विकास कामांची पाहणी करुन संबंधित अधिकांऱ्याकडून माहिती घेतली.

तालुका फळरोप वाटिका कार्यालयाच्या छतावरील सोलर पॅनलचे परिसरातील नवीन होणाऱ्या वाहनतळाच्या छतावर (पार्किग शेड) स्थलांतर करावे. प्रक्षेत्रावर शिल्लक राहिलेल्या मोकळ्या जागेत नारळाच्या कलमांची लागवड करावी. फळबाग लागवडीकरीता प्रक्षेत्राचे सपाटीकरण करावे, अशा सूचना श्री. पवार यांनी दिल्या.

शिवसृष्टी प्रकल्प दोन टप्प्यांमध्ये पूर्ण केला जाणार असून सद्यस्थितीत पहिल्या टप्प्याचे काम सुरू आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास जगासमोर भव्यतेने प्रदर्शित होईल यादृष्टीने प्राचीन आणि आधुनिकतेचा संगम साधून बारामतीच्या वैभवात भर घालणारी भव्यदिव्य शिवसृष्टी उभारण्यात यावी.

कन्हेरी वनउद्यान परिसरामध्ये वड, उंबर, पिंपळ, पिंपरण, करंज, कडूनिंब आदी स्थानिक प्रजातीच्या रोपांची लागवड करावी. वनउद्यानात असलेल्या तळाच्या काठावर गवत प्रजाती (वाघनखे) लावावीत. उन्हाळ्यात सावली देणारी उंच वाढणारी अधिकाधिक वृक्षांची लागवड करावी.

परिवहन महामंडळ कार्यशाळेची कामे करताना अधिकारी व कर्मचाऱ्यांना पायाभूत सुविधा मिळाल्या पाहिजे. तसेच कामकाजाच्या अनुषंगाने त्यांच्या सूचनाही विचारात घ्याव्यात. परिसरातील जागेचे नीटपणे सपाटीकरण करुन घ्यावे, संरक्षण भितींचे आरेखन बस आगाराप्रमाणे करावे. तालुक्यातील विकासकामे गुणवत्तापूर्ण, दर्जेदार, टिकाऊ आणि वेळेत पूर्ण होतील याकडे लक्ष द्यावे, अशा सूचना पाहणीप्रसंगी श्री. पवार यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या.

यावेळी उपवनसंरक्षक तुषार चव्हाण, उप विभागीय अधिकारी वैभव नावडकर, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी हनुमंत पाटील, महावितरणचे मुख्य अभियंता धर्मराज पेठकर, सहायक वनसंरक्षक अतुल जैनक, उप विभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अमोल पवार, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता दिगंबर डुबल, गट विकास अधिकारी अनिल बागल, वन परिक्षेत्र अधिकारी आश्विनी शिंदे, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे बारामती आगार प्रमुख रवीराज घोगरे आदी उपस्थित होते.
0000

विभागीय आयुक्तांचा “वार्ड भेट समस्या समाधान अभियाना”च्या माध्यमातून नागरिकांशी संवाद; ७५ नगरपालिकेतून नागरिक सहभागी

छत्रपती संभाजीनगर, दि.22 एप्रिल, (विमाका) :-पीएम स्वनिधी, प्रधानमंत्री आवास योजना, पाणीपुरवठा तसेच नागरी क्षेत्रातील नागरिकांना येणाऱ्या अडचणीबाबत आज नागरिकांनी थेट विभागीय आयुक्तांशी संवाद साधला. विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी नागरिकांनी मांडलेल्या अडचणी तत्परतेने सोडवा, असे निर्देश यंत्रणेला दिले. प्रधानमंत्री आवास योजनेतून घरकुल मिळाल्याचा आनंद अनेक लाभार्थ्यांनी व्यक्त केला.

विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी नागरिकांशी ऑनलाइन वेबिनारद्वारे थेट संवाद साधण्यासाठीचा उपक्रम हाती घेतला आहे. नगरपालिका क्षेत्रात वार्ड भेट समस्या समाधान अभियाना”च्या माध्यमातून आज संवाद साधला. यावेळी विभागीय आयुक्त कार्यालयातून अपर आयुक्त विजयसिंह देशमुख, अपर आयुक्त खुशालसिंह परदेशी, सह आयुक्त देविदास टेकाळे, सहायक आयुक्त संजय केदार उपस्थित होते.

नगरविकास विभागाच्या योजना, अडचणी, योजनेच्या अंमलबजावणीचे धोरण तसेच प्रभागातील अडचणीबाबत नागरिकांनी संवाद साधला. नगरपालिका क्षेत्रातील अनेक लाभार्थी नागरिकांनी प्रधानमंत्री आवास योजना, शबरी आवास योजना, पीएम स्वनिधी अंतर्गत पहिले कर्ज मिळाले मात्र दुसऱ्या हफ्त्याचे कर्ज मिळाले नाही तसेच 50 हजारानंतर कर्जाची मर्यादा वाढवावी, अशी मागणी बहुतांश लाभार्थ्यांनी केली आहे. याबाबतचा परिपुर्ण मागणीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्याबाबत विभागीय आयुक्त श्री गावडे यांनी निर्देश दिले.

धाराशिव जिल्हयातील उमरगा येथे शहरात पंधरा दिवसाला पाणीपुरवठा होत असल्याचे महिलांनी सांगितले, त्यावर स्थानिक प्रशासनाने पाणीपुरवठ्याबाबत योग्य नियोजन करून पाणीपुरवठयातील अंतर कमी करावे व पाणीपुरवठा योजना गतीने पुर्ण करावी. तसेच पावसाळयाच्या अनुषंगाने स्वच्छ पाणीपुरठयाबाबत सर्वच नगरपालिका प्रशासनाने काळजी घ्यावी, असे निर्देश देण्यात आले.

गंगाखेड परिषदेअंतर्गत येत असलेल्या लाभार्थ्यानी पीएम विश्वकर्मा योजनेबाबत झालेल्या लाभाची माहिती दिली. धाराशिव नगरपालिका क्षेत्रात प्रधानमंत्री आवास योजनेची 95 टक्के काम पुर्ण झाल्याचे सांगण्यात आले असून याबाबत विभागीय आयुक्त श्री गावडे यांनी समाधान व्यक्त केले.

नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर येथील नागरी क्षेत्रातील महिलांनी पीएम स्वनिधी पोर्टल कधी सुरू होणार तसेच याबाबत कर्जाची मर्यादा वाढवावी, अशी मागणी केली, त्यावर प्रस्ताव पाठवा, धोरणात्मक निर्णयासाठी शासनाकडे पाठविण्यात येणार असल्याचे सह आयुक्त श्री टकाळे यांनी सांगितले.

मराठवाड्यातील नगरपालिका क्षेत्रातील नागरिकांनी ऐवढ्या मोठ्या संख्येत शांततेत व शिस्तबद्ध पध्दतीने सहभाग नोंदविल्याबद्दल विभागीय आयुक्त श्री.गावडे यांनी नागरिकांचे आभार मानले. तसेच ज्या नगर पालिका क्षेत्रातील नागरिकांशी आज संवाद होऊ शकला नाही त्यांच्याशी येत्या 15 दिवसात संवाद साधणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

यावेळी विभागातील आठही जिल्हयातील बहुतांश नगरपालिका क्षेत्रातील नागरिकांनी संवादात सहभाग घेतला. यावेळी जिल्हा निहाय नगरपालिकांच्या कार्याचाही आढावा घेण्यात आला.

००००००

विद्यार्थी हित लक्षात घेऊन नॅक मुल्यांकनासाठी महाविद्यालयांना ६ महिन्यांची मुदतवाढ

मुंबई,दि.२२ : राज्यातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेऊन विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी आणि महाविद्यालयांना संधी देण्यासाठी, महाविद्यालयांना नॅक (NAAC) मूल्यांकन किंवा पुनर्मूल्यांकन प्रक्रियेसाठी ६ महिन्यांची शिथिलता (मुदतवाढ) देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अशी घोषणा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केली.

मंत्री चंद्रकांतदादा  पाटील म्हणाले, राज्यातील अकृषि विद्यापीठे व संलग्नित सर्व पात्र महाविद्यालयांना नॅक मूल्यांकन व पुनर्मुल्यांकन करणे अनिवार्य असून,नॅक मूल्यांकन हे महाविद्यालयाच्या गुणवत्तेचे मापदंड असून शैक्षणिक गुणवत्ता व दर्जा सुधारण्यासाठी दर पाच वर्षानी महाविद्यालयाचे मूल्यांकन/पुनर्मूल्यांकन करून घेणे बंधनकारक आहे. याबाबत महाराष्ट्र राज्य अग्रेसर असून नॅक मुल्यांकनात पहिल्या क्रमांकावर आहे.

सद्या नवीन दुहेरी मानांकन (Binary Accreditation) प्रणाली लागू करण्याच्या प्रक्रियेमुळे नॅक बंगलोरने पोर्टल अद्ययावत करण्याचे काम हाती घेतले आहे. पोर्टल कार्यान्वित होताच महाविद्यालयांनी त्वरीत नॅक मुल्यांकनाची प्रक्रिया सुरू करावी, असे निर्देशही  मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी दिले आहेत. तसेच याबाबत विद्यापीठांनी संबंधित महाविद्यालयांकडून लेखी हमीपत्र घेऊन, आवश्यक त्या कार्यवाहीस तातडीने सुरुवात करावी. अशा सूचनाही मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी  दिल्या आहेत.

000

आपला थक्क करणारा इतिहास मुलांना समजण्यासाठी बालसाहित्याची निर्मिती व्हावी- उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

पुणे, दि. 22: आपला थक्क करणारा इतिहास मुलांना समजण्याच्या दृष्टीकोनातून बालसाहित्याची निर्मिती झाली पाहिजे, असे मत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले. ‘पुणे बाल पुस्तक जत्रा’ सारख्या उपक्रमातून साहित्याचे संस्कार, ज्ञान आणि ज्ञानाची परंपरा आणि त्याचा अभिमान निर्माण होऊ शकतो, असेही ते म्हणाले.

राष्ट्रीय पुस्तक न्यास, पुणे महानगर पालिका, पुणे पुस्तक महोत्सव संवाद यांच्या संयुक्त विद्यमाने गणेश कला क्रीडा मंच येथे आयोजित ‘पुणे बाल पुस्तक जत्रा २०२५’ च्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी मराठी भाषा मंत्री उदय सामंत, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, राष्ट्रीय पुस्तक न्यासचे अध्यक्ष मिलिंद मराठे, संचालक तथा पुणे पुस्तक महोत्सवाचे मुख्य संयोजक राजेश पांडे, खडकी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कृष्ण कुमार गोयल, बुलढाणा अर्बन को- ऑप. क्रेडिट सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष देशपांडे, लेखक ल. म. कडू, लेखिका संगीता बर्वे, साहित्यिक राजीव तांबे, संवाद संस्थेचे संस्थापक संचालक सुनील महाजन, प्रसेनजीत फडणवीस आदी उपस्थित होते.

चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, आपला थक्क करणारा इतिहास नीट मांडला गेला नसल्याने आपल्या मनात न्यूनगंड निर्माण झाला. लहान मुलांची ग्रहण करण्याची क्षमता मोठी असल्याने हा इतिहास पोहोचवण्याचे मोठे माध्यम लहान मुले आहेत. जगातील पहिला शब्दकोश भारतात निर्माण झाला, पहिली शस्त्रक्रिया भारतात झाली, पहिले विद्यापीठ आपल्या इथे झाले. हे मुलांना समजले पाहिजे यासाठी छोट्या छोट्या पुस्तकांची निर्मिती झाली पाहिजे.

भारतीय खेळ हे मुलांना जास्त निरोगी बनवत होते, जास्त एकाग्रता निर्माण करतात. कोल्हापूर येथे खेळघर संकल्पना राबविली जात आहे. खेळाच्या माध्यमातून बुद्धीचा विकास करण्याचा प्रयत्न केला जातो आणि वाचायची सवय लावतो. हा उपक्रम राबविण्यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल मंत्री श्री. पाटील यांनी श्री. पांडे यांचे अभिनंदन केले.

बाल पुस्तक जत्रा राज्यभरात जिल्हास्तरावर व्हाव्यात- उदय सामंत

उदय सामंत म्हणाले, पुस्तकांची जत्रा हा अतिशय नाविन्यपूर्ण उपक्रम आहे. जे साहित्य निर्माण होते त्याच्या मागे शासन उभे करण्याची जबाबदारी आमची आहे. परंतु, पुस्तक महोत्सव भरविण्यासाठी पुणे शहराच्या बाहेरही पडले पाहिजे. अशा महोत्सवातून बाल पुस्तकांची चळवळ उभी राहील अशी आशा आहे. पुण्याला मराठीचा वारसा, सांस्कृतिक वारसा, शिक्षणाची पंढरी असून येथे जे काही मराठी भाषेत निर्माण होते त्याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटत असतात. त्यामुळे अशा बाल पुस्तकाच्या जत्रा जिल्हास्तरीय झाल्या पाहिजेत, यासाठी पुढाकार घेण्यात येईल. त्याचे संयोजन आणि नियोजनाची जबाबदारी पुणे पुस्तक महोत्सवाने घ्यावी, अशी अपेक्षा श्री. सामंत यांनी व्यक्त केली.

माधुरी मिसाळ म्हणाल्या, पुणे हे शहर वाचनसंस्कृती आणि खाद्यसंस्कृती असलेले आहे. या जत्रेमध्ये येथे बालकांसाठी खेळ येथे पाहायला मिळाले. खेळांमुळे एकाग्रता वाढते, शारीरिक क्षमता वाढतात. आम्हाला आई वडिलांनी पुस्तकांची खूप आवड लावली. पुण्यात पुस्तकांना उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. वाचन संस्कृती कितीही पुढे गेली आणि आज लॅपटॉप, संगणक आदींवर पुस्तके वाचायला मिळत असली तरी पुस्तक हातात घेऊन वाचण्याचा, पुस्तकाचा स्पर्श हाताला होऊन ते वाचणे याच्यामध्ये खूप वेगळी मजा आहे, असे सांगून हा उपक्रम राबविल्याबद्दल श्रीमती मिसाळ यांनी श्री. पांडे यांचे अभिनंदन केले.

मिलिंद मराठे म्हणाले, येणाऱ्या काळात पुण्याच्या पुस्तक महोत्सवाच्या यशस्वीततेनंतर नागपूर आणि मुंबई येथे पुस्तक महोत्सव भरविण्यात येणार आहे. राष्ट्रीय पुस्तक न्यासामार्फत ग्रंथालयांचे जाळे (नेटवर्किंग ऑफ लायब्ररीज) निर्माण करणे आणि समुदाय ग्रंथालयांची सुरूवात (इनिशिएशन ऑफ कम्युनिटी लायब्ररीज) याचा एक कार्यक्रम सुरू करण्यात येणार आहे. संपूर्ण देशभरात कम्युनिटी लायब्ररीचे जाळे निर्माण करून त्यातून वाचन संस्कृती वाढावी असा प्रयत्न यातून होणार असल्याचे ते म्हणाले.

प्रास्ताविकात राजेश पांडे म्हणाले, आजकाल वचन कमी झाले आहे असे म्हटले जाते. मात्र, पुणे पुस्तक महोत्सवाला प्रचंड प्रतिसाद मिळाला. यातून पुण्याच्या आणि महाराष्ट्राच्या साहित्य जगताला, प्रकाशक जगताला अतिशय ऊर्जा मिळाली. दिल्लीतील राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या जागतिक पुस्तक प्रदर्शनाला मुलांचा प्रतिसाद पाहता पुण्यातही असा उपक्रम राबविण्याची संकल्पना समोर आली. त्यामुळे हा उपक्रम राबविण्यात येत असून कदाचित भारतातील पहिलाच असा बाल जत्रेचा उपक्रम असेल, असेही ते म्हणाले.

प्रारंभी मंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. त्यांनी प्रदर्शनातील विविध स्टॉलला भेटी देऊन पाहणी करून स्टॉलधारकांशी संवाद साधला. मुलांचे खेळ पाहतानाच स्वत: त्यांनी विटी-दांडू हाती घेऊन खेळाचा थोडा आनंद घेतला. राज्यमंत्री मिसाळ यांनी लगोरी खेळाचा आनंद लुटला.

यावेळी पालक, लहान मुले मोठ्या प्रमाणात उपस्थित होती. पुस्तके हातात घेताना होणारा आनंद बालकांच्या चेहऱ्यावर दिसत होता. खेळांचा आनंदही त्यांनी मनमुराद लुटला.
0000

ताज्या बातम्या

पंधराव्या वित्त आयोगाच्या माध्यमातून सुरु असलेले प्रकल्प पुढील शंभर वर्षांचा विचार करुन नियोजित वेळेत...

0
राज्याला मिळणाऱ्या निधीतील एक रुपयाही परत जाणार नाही याची दक्षता घ्यावी मुंबई, दि. 2 :- पंधराव्या वित्त आयोगाच्या माध्यमातून राज्यात सुरु असलेल्या विकासप्रकल्पांच्या उभारणीसाठी केंद्र...

हवामानाचा वेध आता आपल्या गावात

0
जगभरात हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर कृषी, आपत्ती व्यवस्थापन आणि धोरणनिर्मितीसाठी अचूक हवामान माहिती अत्यंत महत्त्वाची ठरली आहे. या संदर्भात भारत सरकारने “हवामान माहिती संकलन व विश्लेषण प्रणाली” (Weather...

विधानपरिषद इतर कामकाज

0
अन्नपदार्थांची घरपोच सेवा देणाऱ्या ऑनलाईन कंपन्यांबाबत तक्रारी दाखल करण्यासाठी लवकरच टोल फ्री क्रमांक - मंत्री नरहरी झिरवाळ मुंबई, दि. १ : राज्यात अन्नपदार्थांची घरपोच सेवा...

शेतीमध्ये नाविन्यपूर्ण संकल्पना शाश्वत विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरतील – कृषी आयुक्त सूरज मांढरे

0
मुंबई दि. १: शेतीमध्ये नाविन्यपूर्ण संकल्पना शाश्वत विकासासाठी हातभार लावणाऱ्या आहेत. 'महाकृषी एआय धोरण शेतीमध्ये अचूकता आणून शेतीची उत्पादकता ते विक्रीमध्ये आमूलाग्र बदल घडवेल,...

उत्तराखंडमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांना मिळाली मदत

0
एनडीआरएफच्या पथकांनी पर्यटकांना तत्काळ मदत करत सुरक्षित ठिकाणी हलवले मुंबई, दि. १: उत्तराखंडमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांच्या मदतीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपला मदतीचा हात...