रविवार, मे 25, 2025
Home Blog Page 9

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती उत्सवाचे राष्ट्रपतींना निमंत्रण : विधानपरिषद सभापती प्रा.राम शिंदे

नवी दिल्ली, दि. 21 : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती उत्सवाचे निमंत्रण राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना देण्यात आल्याची माहिती विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

दरवर्षी 31 मे रोजी अहिल्यादेवी होळकर यांची जन्म जयंती साजरी केली जाते. यंदा अहिल्यादेवी होळकर यांची  300 वी जयंती त्यांच्या जन्म गावी अहिल्यानगर येथील जामखेड तालुक्यातील चौंडी येथे भव्य स्वरूपात होणार आहे. त्याचे निमंत्रण राष्ट्रपती यांना देण्यासाठी आज श्री. शिंदे आले असून राष्ट्रपती श्रीमती मुर्मू यांच्या भेटीनंतर त्यांनी महाराष्ट्र सदन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.  यावेळी सांगली महानगर पालिकेच्या महापौर संगिता खोत, ॲड. वीणा सोनवलकर, डॉ. उज्वला हाके, डॉ. स्मिता काळे, मानिका गहानवर या उपस्थित होत्या.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य महान आहे. त्या काळात समाजातील रूढी पंरपरेला झुगारून त्यांनी धर्माचे, संस्कृतीचे रक्षण केले. देशभरातील 12 ज्योर्तिलिंगांचा जीर्णोध्दार त्यांनी केला. काशी विश्वनाथ मंदिराची पुर्नबांधणी, अनेक ऐतिहासीक धार्मिक स्थळांवरील घाटांचे निर्माण, विहीरींचे बांधकाम, रस्त्यांच्या कडेवरील वृक्षारोपण असे अनेक कामे त्यांच्या हातुन घडलीत, अशी माहिती श्री शिंदे यांनी यावेळी सांगितली. चौंडी या त्यांच्या जन्मगावी होणाऱ्या जयंती महोत्सवाच्या कार्यक्रामात यापुर्वी राष्ट्रपती शंकरदयाळ शर्मा, लोकसभा सभापती सुमित्रा महाजन, राज्याचे मुख्यमंत्री, अनेक केंद्रीय मंत्री आल्याचे त्यांनी यावेळी सांग‍ितले.

याच महिन्यात 6 मे 2025  रोजी अहिल्यानगर येथे मंत्रीमंडळाची विशेष बैठक आयोजित करण्यात आली असल्याची माहिती देत श्री शिंदे यांनी सांगितले, या मंत्री मंडळाच्या बैठकीत  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सहकारी सूत गिरणी व मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत चौंडी ते निमगाव डाकू रस्त्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हस्ते भूमिपूजन करण्यात आले होते. चौंडी शिवारात उभारण्यात येत असलेल्या या सूतगिरणीसाठी ९१ कोटी रुपये निधीची तरतूद करण्यात आलेली आहे.  चौंडी ते निमगाव डाकू २.७०० किमी लांबीचा रस्ता होणार आहे. राज्य शासनाने ३ कोटी ९४ लक्ष एवढ्या खर्चास मान्यता दिलेली आहे.

00000

राजधानीत ‘दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिना’निमित्त शपथ कार्यक्रम

नवी दिल्ली दि. २१ : माजी प्रधानमंत्री राजीव गांधी यांच्या ३४ व्या स्मृतीदिनी ‘दहशतवाद व हिंसाचार विरोधी’ दिनानिमित्त, महाराष्ट्र सदन व महाराष्ट्र परिचय केंद्रात आज शपथ घेण्यात आली.

कॉपरनिकस मार्गस्थित महाराष्ट्र सदनात आयोजित कार्यक्रमात सचिव तथा  निवासी आयुक्त आर. विमला यांनी माजी प्रधानमंत्री राजीव गांधी यांच्या स्मृतीदिनी उपस्थित अधिकारी-कर्मचा-यांना,  “आम्ही, भारताचे नागरिक, आपल्या देशाच्या अहिंसा व सहिष्णूतेच्या परंपरेविषयी दृढ निष्ठा बाळगून याद्वारे सर्व प्रकारच्या दहशतवादाचा व हिंसाचाराचा आमच्या सर्व शक्तीनिशी मुकाबला करण्याची गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करत आहोत. आम्ही प्रतिज्ञा करतो की, आम्ही सर्व मानवजातीमध्ये शांती, सामाजिक एकोपा आणि सामंजस्य टिकवू व वर्धिष्णू करु, तसेच मानवी जिवीत मूल्ये धोक्यात आणणाऱ्या विघटनकारी शक्तींचा प्रतिकार करु”अशी शपथ दिली. यावेळी सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश आडपावार, स्मिता शेलार यांच्यासह अन्य अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

महाराष्ट्र परिचय केंद्रात ‘दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिनानिमित्त शपथ

महाराष्ट्र परिचय केंद्रात ‘दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिनानिमित्त परिचय केंद्राच्या प्रभारी उपसंचालक अमरज्योत कौर अरोरा यांनी माजी प्रधानमंत्री राजीव गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पअर्पण करुन अभिवादन केले. उपस्थित कर्मचाऱ्यांना ‘दहशतवाद व हिंसाचार विरोधी’ दिनानिमित्त शपथ देण्यात आली.

000

अमरज्योत कौर अरोरा/ वृत्त क्र.114

 

शिष्यवृत्ती लाभार्थी संख्येत वाढीसाठी प्रस्ताव सादर करावा – शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

मुंबई, दि. २१ : अनेक वर्षांपासून शिष्यवृत्तीच्या संच संख्येत कोणतीही वाढ किंवा बदल करण्यात आलेला नाही. गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांपर्यंत शिष्यवृत्तीचा लाभ पोहचविण्यासाठी शिष्यवृत्तीच्या संख्येत वाढ करण्याचा प्रस्ताव सादर करावा, असे निर्देश शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी दिले.

मंत्रालयात विविध शिष्यवृत्तींबाबत व शिष्यवृत्ती योजनांच्या लाभार्थी संख्येत वाढ करण्याबाबत आढावा बैठक झाली. यावेळी शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजित सिंग देओल, उपसचिव समीर सावंत, शिक्षण संचालनालयाचे (योजना) संचालक महेश पालकर व संबंधित विभागाचे अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

शालेय शिक्षण मंत्री श्री. भुसे म्हणाले, सध्या इयत्ता पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी अनुक्रमे उच्च प्राथमिक आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा घेतल्या जातात. उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता चौथीमध्ये व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता सातवीमध्ये घेण्याचा मानस आहे. या बदलामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळू शकेल व त्यांचे पुढील शिक्षण सुलभ होईल. पुढील शिक्षण घेण्यास विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढेल. या कामाला गती देण्यात यावी. जेणेकरून येत्या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना त्याचा लाभ होईल. यासाठी संबंधित विभागांनी सविस्तर प्रस्ताव शासनास सादर करावा.

छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्ती योजनेंतर्गत शिक्षणासाठी आर्थिक साहाय्य, मार्गदर्शन व विविध प्रकारची मदत दिली जाते. इतर मागास प्रवर्ग, अनुसूचित जाती-जमाती आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांनाही अशीच मदत करण्याबाबत प्रस्ताव संबंधित विभागाने सादर करावा, असेही शालेय शिक्षण मंत्री श्री. भुसे यांनी यावेळी सांगितले.

0000

मोहिनी राणे/ससं/

 

इंदू मिल येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नियोजित स्मारक जगाला प्रेरणा देणारे ठरेल – विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे

मुंबई, दि. २१ : दादर येथील इंदू मिल येथे उभारण्यात येत असलेले भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक केवळ भारतासाठीच नव्हे, तर संपूर्ण जगासाठी प्रेरणा देणारे ठरेल, असा विश्वास विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी व्यक्त केला. तसेच डिसेंबर २०२६ पर्यंत या स्मारकाचे अनावरण करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी इंदू मिल येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाची व स्मारकाच्या प्रतिकृतीची पाहणी केली आणि कामकाजाचा आढावा घेतला.

यावेळी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे मुख्य अभियंता प्रकाश भांगरे, समाज कल्याण प्रादेशिक उपायुक्त बाळासाहेब सोळंकी,प्रकल्प व्यवस्थापक शशी प्रभु, भन्ते डॉ.राहूल बोधी महाथेरो, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाणदिन समन्वय समितीचे सरचिटणीस नागसेन कांबळे यांच्यासह मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, मुंबई महानगरपालिका, सामाजिक न्याय विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

उपाध्यक्ष अण्णा बनसोडे म्हणाले, सद्यस्थितीत स्मारक इमारतींचे काम ७० टक्के पूर्ण झाले असून पुतळ्याचे काम प्रगतीपथावर आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या कामासंदर्भात लवकरच दिल्ली येथे प्रसिद्ध शिल्पकार पद्मश्री राम सुतार यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य स्मारकाच्या कामासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. स्मारकाचे काम वेगाने व दर्जेदार रीतीने पूर्ण व्हावे यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करावे. स्मारकात उभारण्यात येणाऱ्या व्याख्यानगृह, ग्रंथालय, सभागृह, विपश्यना केंद्र अशा विविध सभागृहांसंदर्भात नागरिकांसाठी तेथे दिशादर्शक फलक लावण्यात यावेत. स्मारकामध्ये उभारण्यात येत असलेल्या सोयी-सुविधा तसेच तीव्र वादळांपासून स्मारकाचे संरक्षण करण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहितीही त्यांनी यावेळी घेतली. तसेच स्मारकाच्या कामाची सद्यस्थिती जाणून घेत आवश्यक त्या सूचना केल्या.

००००

शैलजा पाटील/विसंअ/

 

 

महिला लोकशाही दिनी होणार महिलांच्या तक्रारींचे निवारण

मुंबई, दि. २१ : प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी महिला लोकशाही दिनास महिलांनी आवर्जून उपस्थित राहून प्रश्न मांडण्याचे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी शोभा शेलार यांनी केले आहे.

मुंबई शहर येथील जिल्हाधिकारी कार्यालय येथे सकाळी ११ वाजता महिला लोकशाही दिन बैठकिचे आयोजन करण्यात आले आहे. महिला लोकशाही दिन बैठकीत आपल्या तक्रारीचे निवारण करण्याकरिता महिलांनी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, ११७ बीडीडी चाळ, पहिला मजला, वरळी,मुंबई ४०००१८ येथे अर्ज सादर करावा.

विहित नमुन्यात नसणारी व आवश्यक असणारी कागदपत्रे न जोडलेले अर्ज, सेवाविषयक आस्थापनाविषयक बाबी, तक्रार निवेदन वैयक्तिक स्वरूपाचे नसलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत याची नोंद घ्यावी, असे आवाहनही प्रसिद्धीपत्रकाद्वारे करण्यात आले आहे.

0000

 

श्रद्धा मेश्राम/विसंअ/

 

 

पशुधन विकास अधिकारी पाठोपाठ आता पशुसंवर्धन विभागातील सहायक आयुक्त पदाच्या ३११ जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू

मुंबई, दि. २१ : पशुसंवर्धन विभाग अधिक सक्षम होण्यासाठी पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी विविध ठोस निर्णय घेतले आहेत. पशुधन विकास अधिकारी संवर्गातील 2795 पदांपाठोपाठ आता सहायक आयुक्त, पशुसंवर्धन या संवर्गातील ३११ पदे भरण्याचा निर्णय घेण्यात आला असून या पदांसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) जाहिरात प्रसिद्ध करून प्रक्रिया सुरू केली आहे.

पशुसंवर्धन विभागाने पूर्ण क्षमतेनेकाम करण्यासाठी पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी एकापाठोपाठ एक असे महत्वाचे निर्णय घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ठोस पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.

विभागातील रिक्त पदांमुळे पशुपालक, शेतकरी यांना सेवा देण्यास येणारी अडचण लक्षात घेऊन विभागातील आवश्यक पदे भरण्याचा निर्णय घेण्यात आला. यापूर्वी त्यांनी पशुसंवर्धन सेवा गट अ मधील पशुधन विकास अधिकारी संवर्गातील 2795 पदे भरण्यासंदर्भात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला मागणी पत्र सादर करण्यात आले.

त्यानंतर आता प्रशासकीय स्तरावर पाठपुरावा करून महाराष्ट्र पशुसंवर्धन सेवा गट अ या संवर्गातील सहायक आयुक्त, पशुसंवर्धन ही ३११ पदे भरण्याचा निर्णय घेण्यात आला असून तसे मागणीपत्र महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे पाठवले. या भरतीची प्रक्रिया वेगाने होण्यासाठी श्रीमती मुंडे यांनी पाठपुरावा केला.

एम.पी.एस.सी.ने सहाय्यक आयुक्त, पशुसंवर्धन या संवर्गातील ३११ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली असून २० जून २०२५ पर्यंत अर्ज मागविले आहेत.

कामास येणार गती

ही भरती प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करून पशुसंवर्धन विभागाला सक्षम आणि नवीन अभ्यासू अधिकारी मिळणार आहेत. त्यातून ग्रामीण भागातीलपशुसंवर्धन विभागाचे काम आणखी वेगाने व पूर्ण क्षमतेने होण्यास मदत होणार असून पशुपालकांना चांगल्या दर्जाची सेवा मिळणार असल्याचे पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितले.

0000

नंदकुमार वाघमारे/विसंअ/

 

ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांच्या पार्थिवाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अंत्यदर्शन

पुणे, दि. २१: जागतिक ख्यातीचे खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांच्या पार्थिवाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अंत्यदर्शन घेऊन पुष्पचक्र अर्पण केले.

आंतर विद्यापीठ खगोलशास्त्र आणि खगोल भौतिकशास्त्र केंद्र (आयुका) येथे याप्रसंगी पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, पुणे महानगरपालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, पुणे शहर सह पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा आदी उपस्थित होते.

याप्रसंगी अन्य मान्यवरांनीही पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी डॉ. नारळीकर यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले. याप्रसंगी पोलीस दलाने सलामी, शोकशस्त्र तसेच बाजूशस्त्र सलामी दिली. दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून डॉ. नारळीकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

०००

मंत्रालयात दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिनाची शपथ

VIRENDRA DHURI

मुंबई, दि. २१ : दहशतवाद व हिंसाचार विरोधीदिनानिमित क्रीडा व युवक कल्याण, अल्पसंख्याक मंत्री दत्तात्रय भरणे यांनी मंत्रालयात अधिकारी, कर्मचाऱ्यांना दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिनाची शपथ दिली.

VIRENDRA DHURI

यावेळी महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाचे अध्यक्ष समीर काझी, मुख्य सचिव सुजाता सौनिक, मुख्यमंत्री कार्यालयाचे अपर मुख्य सचिव तथा सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, गृह विभागाचे उपसचिव राजेंद्र भालवणे, सामान्य प्रशासन विभागाचे उपसचिव अरुण जोशी, उपसचिव दिनेश चव्हाण, सामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव सचिन कावळे, सहाय्यक कक्ष अधिकारी राजेंद्र बच्छाव, विजय शिंदे यांच्यासह मंत्रालयातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

VIRENDRA DHURI
VIRENDRA DHURI
VIRENDRA DHURI

०००

श्री.धोंडिराम अर्जुन/ससं/

राज्यपालांकडून अधिकारी, कर्मचारी यांना दहशतवाद विरोधी प्रतिज्ञा

मुंबई, दि. २१ : राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी दहशतवाद विरोधी दिनानिमित्त राजभवनातील अधिकारी व कर्मचारी यांना दहशतवाद विरोधी प्रतिज्ञा दिली. यावेळी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते.

भारताचे दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांची पुण्यतिथी दहशतवाद विरोधी दिवस म्हणून पाळण्यात येते. राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, उपसचिव एस. राममूर्ती यांसह राजभवनातील कर्मचारी व अधिकारी तसेच उपस्थित पोलीस अधिकारी व जवानांनी यावेळी दहशतवाद व हिंसाचार विरोधी प्रतिज्ञा घेतली.

अहिंसा व सहिष्णुतेच्या परंपरेविषयी दृढ निष्ठा बाळगून सर्व प्रकारच्या दहशतवादाचा व हिंसाचाराचा सर्व शक्तीनिशी मुकाबला करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

०००

‘भारत गौरव टुरीस्ट ट्रेन’च्या माध्यमातून छत्रपती शिवरायांचा जाज्वल्य इतिहास अनुभवण्याची सुवर्णसंधी

छत्रपती शिवाजी महाराजांच्या तेजस्वी इतिहासाशी निगडीत महाराष्ट्रातील विविध ऐतिहासिक स्थळांना भेटी देऊन शिवरायांचा जाज्वल्य इतिहास अनुभवण्याची सुवर्णसंधी ‘भारत गौरव टुरीस्ट ट्रेन’च्या माध्यमातून उपलब्ध झाली आहे. पर्यटन आणि इतिहासाची आवड असणाऱ्यांनी याचा लाभ घ्यावा. ‘भारत गौरव टुरिस्ट ट्रेन’ या योजनेची ही माहिती.      

भारतीय रेल्वे खानपान व पर्यटन महामंडळाने (आयआरसीटीसी), ऐतिहासिक व सांस्कृतिक वारशाला उजाळा देण्यासाठी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनकार्याचा अनुभव देण्यासाठी ‘छत्रपती शिवाजी महाराज सर्किट’ या एका विशेष ट्रेनची घोषणा केली आहे. ही यात्रा भारत गौरव टुरीस्ट ट्रेन (भारत गौरव टुरिस्ट ट्रेन) अंतर्गत ९ जून २०२५ पासून सुरू होत आहे.

या ५ दिवसांच्या विशेष टूरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनाशी संबंधित महत्त्वाच्या ऐतिहासिक स्थळांना भेट, इतिहासावर आधारीत कार्यक्रम असणार आहेत. या सहलीद्वारे महाराष्ट्रातील विविध ऐतिहासिक, धार्मिक व सांस्कृतिक महत्त्व असलेल्या ठिकाणांचा पर्यटकांना अनुभव घेता येणार आहे.

भारत गौरव ट्रेनच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तेजस्वी इतिहासाशी निगडीत धार्मिक आणि ऐतिहासिक स्थळांना व्यापक प्रसिद्धी मिळवून देण्याचा महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचा मानस आहे. याबाबत पर्यटनमंत्री शंभूराज देसाई व राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या नेतृत्वाखाली पर्यटन विभागाचे प्रधान सचिव डॉ. अतुल पाटणे, व्यवस्थापकीय संचालक मनोजकुमार सुर्यवंशी आणि पर्यटन संचालक बी. एन. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

ही केवळ एक यात्रा नसून, आपल्या वैभवशाली परंपरेचा, सांस्कृतिक वारशाचा आणि स्वाभिमानी इतिहासाचा साक्षात अनुभव घेण्याची सुवर्णसंधी आहे. भारतीय रेल्वे विभाग आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांनी ऐतिहासिक उपक्रमासाठी विविध अंगांनी सुसज्ज तयारी केली आहे. भारत गौरव ट्रेन ज्या-ज्या ठिकाणी पोहोचेल, त्या ठिकाणी असलेल्या पर्यटन स्थळांची सविस्तर माहिती पर्यटकांना देण्यात येणार आहे.

यात्रेदरम्यान, सर्व प्रवाशांचा अनुभव सुखकर आणि संस्मरणीय व्हावा, यासाठी महामंडळाचे अधिकारी आयआरसीटीसीच्या समन्वयाने प्रत्येक टप्प्यावर मार्गदर्शन करतील. ५ दिवसांच्या या प्रवासात रेल्वेस्थानकांपासून ते गडकिल्ल्यांपर्यंत, प्रत्येक ठिकाणी इतिहासाच्या पाऊलखुणांचा वेध घेत, पर्यटकांना समृद्ध अनुभव दिला जाईल. प्रत्येक गडकोटावर, ऐतिहासिक स्थळी पर्यटन व्यवस्थेचे काटेकोर नियोजन केले जाईल. इतिहासावर आधारित कार्यक्रम, गाईड्स, तसेच स्थानिक शिवप्रेमी संघटनांच्या सहकार्याने ही यात्रा अधिक संस्मरणीय करण्यात येईल.

छत्रपती शिवाजी महाराज यांचा तेजोमयी इतिहास, महाराष्ट्राची शौर्यशाली परंपरा, आणि आपली समृद्ध संस्कृती जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचविण्याच्या शासनाच्या ध्यासाला महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ संपूर्ण समर्पणाने साथ देत आहे. या उपक्रमामुळे महाराष्ट्राच्या पर्यटनाला नवे क्षितिज गवसणार असून, प्रत्येक भारतीयाच्या हृदयात शिवप्रेमाची जाज्वल्य ज्वाला जागवली जाणार आहे. या प्रेरणादायी यात्रेत सहभागी होऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा वसा चालवावा, आपल्या संस्कृतीचा अभिमान बाळगावा, आणि नव्या पिढीला या इतिहासाचे दर्शन घडवावे, अशी अपेक्षा आहे.

सहल तपशील

सहलीचे नाव: छत्रपती शिवाजी महाराज सर्किट शुभारंभ दि. ९ जून २०२५ कालावधी: ५ दिवसांची यात्रा (सकाळी समाप्ती) प्रारंभ व समाप्ती स्थान: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी), मुंबई प्रवास सुरु व संपण्याचे स्थानक: दादर, ठाणे यात्रेचा प्रवासमार्ग- मुंबई (सीएसएमटी) – रायगड – पुणे – शिवनेरी – भीमाशंकर – प्रतापगड – कोल्हापूर – पन्हाळा – मुंबई.

प्रमुख स्थळांची माहिती: रायगड किल्ला – छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक येथे झाला व ही राजधानी होती. लाल महाल, पुणे – छत्रपती शिवाजी महाराज यांचे बालपण येथे गेले. कसबा गणपती व शिवसृष्टी, पुणे – पुण्याचे ग्रामदैवत व छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरील संग्रहालय. शिवनेरी किल्ला – छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थळ. भीमाशंकर ज्योतिर्लिंग–१२ ज्योतिर्लिंग पैकी एक प्रमुख धार्मिक स्थळ. प्रतापगड किल्ला–अफझल खानावरील ऐतिहासिक विजयाचे ठिकाण. कोल्हापूर–महालक्ष्मी मंदिर पन्हाळा किल्ला – बाजीप्रभू देशपांडे यांच्या शौर्याचे प्रतीक. पॅकेज शुल्क (प्रति व्यक्ती) उपरोक्त सहलीसाठी विविध पॅकेजेस तयार करण्यात आली असुन सोयीनुसार इकोनॉमी (एसएल), कम्फर्ट (३ एसी), सुपीरियर (२ एसी) अशा प्रकारच्या सुविधांची निवड करता येणार आहे. या पॅकेजबाबत सविस्तर माहिती (आयआरसीटी) च्या संकेतस्थळावर देण्यात आली आहे.

पॅकेजमध्ये समाविष्ट सेवा: भारत गौरव ट्रेनने प्रवास (एसएल/३एसी/२एसी/एसी/नॉन-एसी) हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था सर्व ठिकाणी स्थानिक वाहतूक व गाईड ऑनबोर्ड व ऑफबोर्ड शुद्ध शाकाहारी भोजन प्रवास विमा, सर्व प्रवेश शुल्क (किल्ले, मंदिरे, रोपवे, शिवसृष्टी इत्यादी), सुरक्षा व्यवस्था.

पॅकेजमध्ये नसलेल्या सेवा: – साहसी खेळ, बोटिंग इत्यादी. खोलीतील सेवांसाठी वेगळी रक्कम आकारली जाईल. इतर कोणताही वैयक्तिक खर्च. कोणतेही अतिरिक्त पर्यटन स्थळ.

दैनंदिन टूर कार्यक्रम (संक्षिप्त):– पहिला दिवस: मुंबई – रायगड – पुणे. दुसरा दिवस: पुणे (लाल महाल, शिवसृष्टी, कसबा गणपती). तिसरा दिवस: शिवनेरी – भीमाशंकर – पुणे. चौथा दिवस: प्रतापगड – कोल्हापूर. पाचवा दिवस: कोल्हापूर – महालक्ष्मी मंदिर – पन्हाळा किल्ला – मुंबई. सहावा दिवस: मुंबई (टूर समाप्त).

आरक्षण व अधिक माहितीसाठी संपर्क: – भारतीय रेल्वे खानपान व पर्यटन महामंडळाने (आयआरसीटीसी) वेबसाईट: www.irctctourism.com  अधिकृत संकेतस्थळाला भेट देणे उपयुक्त ठरेल.

०००

  • विभागीय माहिती कार्यालय, अमरावती.

ताज्या बातम्या

महाबीजकडून खरीप हंगामासाठी अडीच लाख क्विंटल प्रमाणित बियाण्यांचा पुरवठा

0
मुंबई, दि. २५ :- केंद्र सरकारच्या साथी पोर्टलच्या अंमलबजावणीत मोठी भूमिका बजावत महाबीज येत्या खरीप हंगामात "साथी" प्रणालीच्या क्यूआर (QR)कोडसह अडीच लाख क्विंटल प्रमाणित...

गुजरात, केरळ, पंजाब आणि पश्चिम बंगाल येथील पाच विधानसभा मतदारसंघांमध्ये पोटनिवडणुका जाहीर – निवडणूक...

0
मुंबई, दि. २५ : भारत निवडणूक आयोगाने गुजरात, केरळ, पंजाब आणि पश्चिम बंगाल येथील पाच विधानसभा मतदारसंघांमध्ये पोटनिवडणुका घेण्याचा निर्णय घेतला आहे. या मतदारसंघांमध्ये...

भारत चौथ्या क्रमांकाची जागतिक अर्थशक्ती

0
मुंबई, दि. 25: “भारताची अर्थव्यवस्था चार ट्रिलियन डॉलर्सच्या टप्प्यावर पोहोचली असून, आपला देश आज जगातील चौथ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थशक्ती ठरला आहे, ही बाब...

मान्सूनच्या प्रवासाची गती लवकरच कमी होणार असल्यामुळे राज्यात पावसात घट होणार

0
मुंबई, दि २५ : या वर्षी मान्सूनचा प्रवास वेगाने सुरु असल्यामुळे तो २५ मे रोजी दक्षिण कोकणात दाखल झाला आहे, जे सामान्य तारखेपेक्षा १०...

‘उडान’ मुळे नागपूर जिल्ह्यात मानसिक आरोग्य सेवांचे सशक्तीकरण – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
मुंबई, दि. २५ : ‘उडान’ या जिल्हास्तरीय मानसिक आरोग्य कार्यक्रमाने नागपूर जिल्ह्यात उल्लेखनीय यश मिळवले असून, या उपक्रमामुळे ग्रामीण भागात मानसिक आरोग्य सेवा अधिक...