मंगळवार, एप्रिल 29, 2025
Home Blog Page 8

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या लोकशाही मूल्यांवरच भारतीय समाजव्यवस्था उभी – सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट

मुंबई, दि. 25 : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या लोकशाही मूल्यांवरच भारतीय समाजव्यवस्थेची भक्कम रचना उभी असल्याचे प्रतिपादन सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी केले. लंडनमध्ये  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ‘न्याय, समानता आणि लोकशाहीची पूर्वकल्पना- जागतिक दृष्टिकोन’ या आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले. यावेळी केंद्रीय माहिती व प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन उपस्थित होते.

ही आंतरराष्ट्रीय परिषद बार्टी, ग्रेस इन सोसायटी, लंडन, मुंबई विद्यापीठ आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर सोसायटी, लंडन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली. या परिषदेमध्ये जगभरातील नामवंत अभ्यासकांनी सहभाग घेतला.या परिषदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्यावर संशोधन करणाऱ्या संशोधकांचे संशोधन प्रबंध प्रसिध्द करण्यात आले.  यावेळी सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव डॉ.हर्षदीप कांबळे उपस्थित होते.

000000

शैलजा पाटील/विसंअ

 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते बावधन पोलीस ठाण्याच्या नूतन इमारतीचे लोकार्पण

पुणे, दि.२५: उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाअंतर्गत असलेल्या बावधन पोलीस ठाण्याच्या नूतन इमारतीचे लोकार्पण करण्यात आले. राज्य शासन पोलीस विभागाला आवश्यक त्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देत आहे, असे ते यावेळी म्हणाले.
यावेळी विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, आमदार भीमराव तापकीर, शंकर मांडेकर, पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड, सहायक पोलीस आयुक्त सुनील कुराडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल विभुते आदी उपस्थित होते.

या नवीन वास्तूच्या कामाबाबत समाधान व्यक्त करत, पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या वास्तूमधून पारदर्शक कारभार करुन येणाऱ्या नागरिकांना समाधानकारक सेवा देण्याचे काम करावे, असेही श्री. पवार म्हणाले.

श्री. चौबे यांनी पोलीस ठाण्याविषयी माहिती दिली.
0000

२३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान पोहोचले; आतापर्यंत ८०० पर्यटक परतले, पुढच्या प्रवासासाठी बसेसची सोय

मुंबई, २५ एप्रिल : महाराष्ट्रातील पाकिस्तानी नागरिकांची यादी प्राप्त केली असून, त्यांना परत पाठविण्याची कार्यवाही युद्धपातळीवर सुरु आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधताना दिली. दरम्यान, पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मिरातील पर्यटकांना परत महाराष्ट्रात आणण्यासाठी राज्य सरकारने केलेले तिसरे विशेष विमान 232 प्रवाशांना घेऊन मुंबईत दाखल झाले. सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यावेळी उपस्थित होते. यातील अकोला, अमरावती येथील प्रवाशांच्या पुढच्या प्रवासासाठी बसेसची व्यवस्था सुद्धा करण्यात आली. आतापर्यंत सुमारे 800 पर्यटक महाराष्ट्रात परतले आहेत.

माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्रातील पाकिस्तानी नागरिकांची यादी प्राप्त केली असून, महाराष्ट्रात प्रत्येक पोलिस स्थानकाला त्याची सूचना दिली जात आहे. कोणताही पाकिस्तानी नागरिक 48 तासांपेक्षा अधिक काळ महाराष्ट्रात राहू नये, याची काळजी घेतली जात आहे. या संपूर्ण प्रक्रियेवर देखरेख ठेवली जात असून, जो कुणी अधिक काळ वास्तव्य करताना आढळेल, त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा झाली असून, त्यांनी दिलेल्या दिशानिर्देशानुसारच ही कारवाई होईल.

दरम्यान, काल दोन विशेष विमानांनी 184 प्रवासी महाराष्ट्रात परतल्यानंतर तिसरे विशेष विमान 232 प्रवाशांना घेऊन महाराष्ट्रात पोहोचले. ही तीन विमाने मिळून महाराष्ट्रातील 416 पर्यटक परत आले, तर अन्य माध्यमातून आतापर्यंत सुमारे 800 प्रवासी परत आले आहेत. याशिवाय, सुमारे 60 ते 70 आणखी पर्यटकांच्या विनंती प्राप्त झाल्या असून, त्यांच्या प्रवासाची व्यवस्था राज्य सरकारतर्फे करून देण्यात येत आहे. जसजशा विनंती प्राप्त होतील, तसे त्या पर्यटकांना परत आणण्याची व्यवस्था राज्य सरकारतर्फे करण्यात येत आहे.

००००

पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या चऱ्होली आणि माण ई-बस डेपोचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन

पुणे, दि. २५ : पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या ताफ्यात लवकरच दीड हजार बसेस दाखल होणार आहेत. मेट्रो मार्गांचा विस्तार, बाह्य वर्तुळ मार्ग, बससेवांचा विस्तार आदी माध्यमांतून येथील वाहतूक व्यवस्था बळकट करण्यासह नागरिकांना उत्तम सेवा देण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केले.

पुणे महानगर परिवहन महामंडळ लि. (पीएमपीएमएल) च्या चऱ्होली बु. येथील ई- बस डेपोचे तसेच माण ई- बस डेपोचे (ऑनलाइन पद्धतीने) उद्घाटन व लोकार्पण उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या हस्ते झाले. त्यावेळीते बोलत होते. कार्यक्रमास विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, आमदार बापूसाहेब पठारे, पुणे महानगरपालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, पीएमपीएमएलच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक दीपा मुधोळ – मुंडे, पिंपरी चिंचवड महानगर पालिकेचे आयुक्त शेखर सिंह, पीएमपीएमएलचे सह व्यवस्थापकीय संचालक नितीन नार्वेकर आदी उपस्थित होते.

माण डेपोला ३० ई- बसेस, चऱ्होली डेपोला ६० ई- बसेस ग्रॉस कॉस्ट कॉन्ट्रॅक्ट (जीसीसी) तत्त्वावर उपलब्ध होणार आहेत असे सांगून उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले, पीएमपीएमएलला बसेस घेण्यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) २३० कोटी रुपये रक्कम दिली असून त्यातून लवकरात लवकर ५०० सीएनजी बसेस घेण्याची प्रक्रिया पूर्ण करावी. तसेच पुणे महानगरपालिकेला १५० कोटी आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने १०० कोटी रुपये द्यावेत त्यातून अजून ५०० सीएनजी बसेस घेण्यात येतील. त्याव्यतिरिक्त अजून ५०० इलेक्ट्रिक बसेस जीसीसी तत्त्वावर घेण्यात येणार आहेत. अजूनही टप्प्या-टप्प्याने बसेस घेण्यात येतील. या ई-डेपोच्या माध्यमातून राज्य शासनाचा ग्रीन महाराष्ट्र हा दृष्टीकोन समोर येतो, असेही श्री. पवार यांनी सांगितले.

श्री. पवार यांनी पुढे माहिती दिली, शहरातील वाहतुकीला चालना आणि वाहतूक कोंडीवर उपाययोजनेसाठी महाराष्ट्र राज्य् रस्ते विकास महामंडळामार्फत बाह्य वर्तुळ मार्गाचे काम सुरू असून पीएमआरडीकडूनही आतील वर्तुळ मार्गाचे काम लवकरच सुरू होईल. याशिवाय मेट्रो मार्गांचा विस्तार करण्यात येत आहे. प्रत्येकी २० टक्के रक्कम केंद्र व राज्य शासन, पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका १० टक्के रक्कम आणि उर्वरित ५० टक्के रक्कम वित्तीय संस्थांमार्फत उभी करून दोन्ही शहरात मेट्रो मार्गाचे जाळे उभारण्यात येणार आहे. स्वारगेट ते कात्रज मेट्रोला केंद्र शासनाने मान्यता दिली आहे. खडकवासला- स्वारगेट- हडपसर- खराडी आणि नळ स्टॉप्- वारजे- माणिकबाग मेट्रोसाठीही केंद्र शासनाकडे मान्यतेचा प्रस्ताव पाठविला आहे, असेही ते म्हणाले.

पीएमपीएमएलच्या कामगारांसाठीही चांगले निर्णय घेण्यात आले असून २०१५ साली वर्षभरात २४० दिवस नियमित कामावर असणाऱ्या १ हजार ४६७ बदली कामगारांना तसेच गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये १ हजार ७०० बदली कामगारांना नियमित करण्याचा निर्णय घेण्यात आला. सातव्या वेतन आयोगाची थकीत रक्कम चार टप्प्यात देण्याचा निर्णय घेण्यात आला, असेही त्यांनी सांगितले.

पुणे आणि पिंपरी चिंचवड दोन्ही शहरे स्मार्ट सिटी प्रगत, सुरक्षित आणि समतोल नागरी जीवनशैलीचे आदर्श प्रारुप बनावे यासाठी प्रशासन आणि शासनासोबत जनतेने काम करावे, असे आवाहन श्री. पवार यांनी केले.

पिंपरी चिंचवड शहराची लोकसंख्या २०४१ साली ६१ लाख होण्याचा अंदाज असून या लोकसंख्येला पाणी, रस्ते, मेट्रो, रेल्वे, वाहतूक सेवा चांगली प्रकारे मिळावी यासाठी नियोजन सुरू आहे. शहराला पवना आणि आंद्रा धरणाचे पाणी देण्यात येत असून ठोकरवाडी धरणाचे पाणीही मिळण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मुळशी धरणाचे पाणी शेतीसाठी मिळावे यासाठी शासन प्रयत्नशील आहे, असेही ते म्हणाले.

कामगार, कष्टकऱ्यांना अत्यल्प उत्पन्न गटातील (ईडब्ल्यूएस) कुटुंबांना घरकुले मिळावीत यासाठी प्रधानमंत्री आवास योजनेतून मोठ्या प्रमाणात घरकुलांची कामे हाती घेण्यात आली आहेत. पुणे व पिंपरी चिंचवड शहरात 30 हजार घरे तर ग्रामीण भागात ५ हजार घरांचे निर्माण होत आहे. हे करत असताना प्रधानमंत्री आवास योजनेतून २ लाख ५० हजार रुपये, बांधकाम कामगार असल्यास बांधकाम कामगार महामंडळाकडून २ लाख रुपये तसेच प्रत्येक घरासाठी सूर्यघर योजनेतून सौरवीजेसाठी ३० हजार रुपये दिले जाणार आहेत, असेही ते म्हणाले.

श्रीमती मुधोळ- मुंडे म्हणाल्या, महामंडळाच्या सेवेत १ हजार ९६७ बसेस असून रोज ३ लाख १० हजार कि.मी. धावतात. यातून दररोज सुमारे १२ लाख ५० हजार प्रवासी प्रवास करतात. सध्या १५ बसडेपो असून आज २ ई-बस डेपो सेवेत दाखल होत आहेत. महामंडळाच्या सेवेत मोठ्या प्रमाणात बसेस याव्यात यासाठी नियोजन सुरू आहे. आपली पीएमपीएमएल मोबाईल ॲपला नागरिकांचा चांगला प्रतिसाद आहे. डिजिटल पुढाकारांबद्दल राष्ट्रीय स्तरावरील दोन पुरस्कारही महामंडळाला मिळाले आहेत. भविष्यात कृत्रिम बुद्धीमत्तेचा वापर करुन स्मार्ट बस सिस्टीम ही कंडक्टर विरहीत सेवा सुरु करण्याचा मानस ठेवला असून सुरक्षितता आणि अपघातविरहीत सेवा हे ध्येय ठेऊन पीएमपीएमएल काम करत आहे, असेही त्या म्हणाल्या.

प्रारंभी जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील मृत नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

श्री. पवार यांच्या हस्ते बस डेपोंचे उद्घाटन व लोकार्पण झाल्यानंतर ई- बसेसचेही लोकार्पण त्यांनी केले, तसेच बसेसची पाहणी केली.

0000

 

गिरणी कामगारांना मुंबईत घरे उपलब्ध करून देण्याबाबत एनटीसीसमवेत तातडीने बैठक घेण्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

मुंबई, दि. 25 : गिरणी कामगारांनी मुंबईसाठी त्याग केला आहे. त्यामुळे या कामगारांना मुंबईत घरे देण्यास आमचे प्राधान्य आहे. जास्तीत जास्त कामगारांना घरे उपलब्ध करून देण्यासाठी ‘एनटीसी’समवेत तातडीने बैठक घेण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. याशिवाय शेलू आणि वांगणी येथील घरांच्या किंमती कशा कमी करता येतील यासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू असे आश्वासन उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी गिरणी कामगारांना दिले.

सह्याद्री अतिथीगृह येथे गिरणी कामगारांच्या घरांसंदर्भात शिष्टमंडळ उपमुख्यमंत्र्यांना भेटले. त्यावेळी झालेल्या बैठकीत उपमुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. उपमुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयाचे कामगारांनी स्वागत केले. बैठकीस राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, माजी मंत्री रामदास कदम, आमदार कालिदास कोळंबकर, माजी खासदार राहुल शेवाळे, उपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव नविन सोना, गृहनिर्माण विभागाच्या अपर मुख्य सचिव वल्सा नायर सिंह, म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल, म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद बोरीकर यांच्यासह गिरणी कामगार संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यावेळी म्हणाले, गिरणी कामगारांना मुंबईत घर मिळावे ही शासनाची प्रामाणिक भावना आहे. त्यासाठी मुंबईत किती जागा उपलब्ध होऊ शकते यासाठी एनटीसी सोबत बैठक घेण्यात येणार आहे. यासर्व बाबींचा विचार करून गिरणी कामगारांना घरे उपलब्ध करून देत आहोत. मुंबई महानगर प्रदेशात देखील घरे उपलब्ध करून देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. आतापर्यंत १५ हजार ८७० घरे गिरणी कामगारांना दिली. आजपर्यंत सुमारे एक लाख गिरणी कामगार पात्र असून त्यांना घरे उपलब्ध करून देण्यात येतील.

राज्य शासनाच्या माध्यमातून ‘एमएमआर’ परिसरात विविध पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. दळणवळण सुविधांचे जाळे भक्कम करण्यावर भर दिला जात आहे. अशा परिस्थितीत गिरणी कामगारांनी एमएमआर क्षेत्रात घरांना प्राधान्य द्यावे, असे आवाहनही यावेळी उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी केले.

यावेळी गिरणी कामगार संघटनांच्या काही प्रतिनीधींनी सेलू भागात बांधलेल्या घरांच्या किमती कमी करण्याची मागणी केली. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

००००

 

वेव्हज 2025 : भारताला कलात्मक भविष्याकडे नेणारा प्रकाशस्तंभ

भारतातील मीडिया आणि मनोरंजन क्षेत्र आज केवळ देशाच्या सांस्कृतिक प्रभावाचा एक भाग नाही, तर जागतिक स्तरावर प्रभाव टाकणारी एक शक्ती बनण्याच्या मार्गावर आहे. या पार्श्वभूमीवर भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेली WAVES 2025 (World Audio Visual & Entertainment Summit) ही परिषद अत्यंत महत्त्वाची ठरते. 1 ते 4 मे 2025 दरम्यान जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर, मुंबई येथे होणाऱ्या या परिषदेमुळे भारताची सर्जनशील क्षमता, तंत्रज्ञानातील प्रगती, आणि सांस्कृतिक समृद्धी यांचा संगम येथे एका जागतिक व्यासपीठावर सादर केला जाणार आहे.

वेव्हज 2025 ही केवळ एक परिषद नसून, ती भारताच्या ‘क्रिएट इन इंडिया’ अर्थात भारतात निर्माण करा या नवदृष्टीकोनाचा केंद्रबिंदू आहे. भारतातील कला, साहित्य, संगीत, चित्रपट, अ‍ॅनिमेशन, गेमिंग, वेबटून्स आणि अ‍ॅनिमे या सर्व क्षेत्रांतून निर्माण होणाऱ्या आशयाचे जागतिकीकरण करण्याचा प्रयत्न या परिषदेच्या माध्यमातून केला जात आहे. यामागील मुख्य उद्दिष्ट म्हणजे भारताला एका जागतिक कंटेंट हबमध्ये रूपांतरित करणे, जिथे केवळ सर्जनशीलता नाही, तर आधुनिक तंत्रज्ञान, व्यावसायिक क्षमता, आणि जागतिक स्पर्धा यांचाही प्रभाव दिसेल.

भारतीय समाजाची एक महत्त्वाची ओळख म्हणजे सांस्कृतिक विविधता. हीच विविधता मनोरंजनाच्या प्रत्येक माध्यमात दिसून येते. मग तो चित्रपट असो, संगीत, नाटक, लोककला, कथाकथन किंवा नव्या पिढीचे अ‍ॅनिमेशन आणि गेमिंग कंटेंट असो. वेव्हज 2025 मध्ये हाच सांस्कृतिक ठेवा जगासमोर मांडण्याचा प्रयत्न होणार आहे. परिषदेचा भर “क्रिएट इन इंडिया” या अभियानावर असून, हे अभियान भारतातील स्थानिक कलेला, प्रतिभेला, आणि नवकल्पनांना एक मोठं जागतिक व्यासपीठ देण्याचं काम करत आहे.

वेव्हज 2025 अंतर्गत क्रिएट इन इंडिया चॅलेंज – सीझन १ सुरू करण्यात आला आहे, ज्यामध्ये देशभरातील तरुण कलाकार, लेखक, अ‍ॅनिमेटर्स, गेम डेव्हलपर्स आणि संगीतकार यांना सहभागी होण्याची संधी आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून 25 विविध प्रकारांच्या स्पर्धा घेतल्या जात आहेत, जसे की वेबटून, मंगा, अ‍ॅनिमे, इलेक्ट्रॉनिक डान्स म्युझिक, गेम डिझाईन इत्यादी. या उपक्रमामुळे स्थानिक पातळीवर असलेल्या प्रतिभेला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मान्यता मिळण्याची दारे उघडली जात आहेत.

वेव्हज 2025 च्या अजेंडामध्ये फक्त सर्जनशीलतेचा गौरव नाही, तर आशयाच्या सुरक्षिततेवरही भर दिला जात आहे. आजच्या डिजिटल युगात कंटेंट चोरी किंवा पायरेसी ही एक मोठी समस्या आहे. यावर उपाय म्हणून फिंगरप्रिंटिंग, वॉटरमार्किंग, आणि एआय-आधारित ट्रॅकिंग तंत्रज्ञान वापरण्याची गरज ओळखण्यात आली आहे. या क्षेत्रातील तज्ज्ञ आणि संशोधक परिषदेच्या माध्यमातून एकत्र येऊन अशा समस्यांवर उपाययोजना मांडणार आहेत.

या परिषदेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे जगभरातील मीडिया क्षेत्रातील लीडर, निर्माते, दिग्दर्शक, आणि धोरणकर्ते एकत्र येऊन “WAVES Declaration 2025” तयार करणार आहेत. हे घोषणापत्र जागतिक मीडिया आणि मनोरंजन क्षेत्रातील सहकार्य, नियमावली, आणि नैतिकतेबाबत मार्गदर्शक ठरणार आहे. यामुळे भारताला या क्षेत्रातील जागतिक धोरणनिर्मितीत सहभाग घेण्याची संधी मिळेल.

भारतातील मीडिया आणि मनोरंजन क्षेत्र हे सध्या सुमारे 2.3 लाख कोटींचे असून, येत्या काही वर्षांत हे क्षेत्र 4.3 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचेल, असा अंदाज आहे. WAVES 2025 सारख्या उपक्रमांमुळे रोजगार निर्मिती, नवउद्योगांचे निर्माण, आणि परकीय गुंतवणुकीला चालना मिळण्याची शक्यता आहे. हे क्षेत्र तरुणांसाठी संधींचा धमाका घडवून आणणार आहे. विशेषतः अ‍ॅनिमेशन, व्हीएफएक्स, गेम डिझाईन, स्क्रिप्ट राइटिंग आणि डिजिटल मार्केटिंगसारख्या नव्या उपशाखांमध्ये.

WAVES 2025 ही परिषद केवळ एक इव्हेंट नसून, भारताच्या मीडिया आणि मनोरंजन क्षेत्राचा जागतिक प्रवास सुरू करणारा एक ऐतिहासिक क्षण आहे. ‘क्रिएट इन इंडिया’ ही घोषणा आता केवळ नारा राहिलेली नाही, तर ती कृतीत उतरवण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. विविधतेने नटलेला भारत, आता जागतिक दर्जाचा कंटेंट तयार करणारा देश म्हणून उभा राहत आहे. ही परिषद भारताच्या सांस्कृतिक, आर्थिक आणि सर्जनशील सामर्थ्याची जागतिक ओळख निर्माण करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. WAVES 2025 भारताला कलात्मक भविष्याकडे नेणारा एक प्रकाशस्तंभ ठरणार आहे. त्यामुळे या परिषदेची नोंद केवळ मनोरंजन क्षेत्रातच नाही, तर भारताच्या विकासगाथेतही घेतली जाईल.

सचिन अडसूळ

जिल्हा माहिती अधिकारी, कोल्हापूर

पाणी वाटपाचे सुयोग्य नियोजन करुन जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावू – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

जिल्ह्यातील काही गावे वगळता पाण्याची मुबलक उपलब्धता; काटोल व नरखेड तालुक्यातील गावांसाठी पाणीप्रश्न सोडविण्यास दक्ष राहण्याचे निर्देश

नागपूर,दि. 25 : जिल्ह्याला मुबलक प्रमाणात पाण्याची उपलब्धता आहे. याला काटोल आणि नरखेड तालुक्यातील काही गावे अपवाद आहेत. या तालुक्यात सूमारे आठशे फुटांपेक्षा पाणी पातळी अधिक खोल गेली आहे. ज्या गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची दूर्भिक्षता आहे अशी गावे जिल्हा प्रशासनामार्फत निश्चित केली आहेत. या गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची उपलब्धता तत्परतेने करुन देण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जिल्हा प्रशासनास दिले.

पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जिल्ह्यातील पाणी टंचाईबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा घेतला. या बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, अतिरिक्त जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, निवासी उपजिल्हाधिकारी प्रविण महिरे व उपविभागीय अधिकारी उपस्थित होते.

जिल्ह्यातील पाणी टंचाई अंतर्गत ज्या काही उपाय योजना शासनाने सूचविल्या आहेत त्यावर भर देऊन नाला खोलीकरण व स्त्रोत बळकटीकरण करणे, टँकरग्रस्त गावात जलसंधारणाच्या कामावर भर देणे, अतिरिक्त पाणी नियोजन आराखडा तयार करणे यावर अधिक लक्ष देण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले.

पाणीटंचाईप्रश्नी अधिकाऱ्यांनी संवेदनशील राहावे – अन्न व औषध प्रशासन व विशेष सहाय मंत्री नरहरी झिरवाळ

पेठ तहसील कार्यालयात आढावा बैठक

नाशिक, दि. २५ : पेठ तालुक्यात पाणी टंचाई जाणवणाऱ्या गावातील टंचाई निवारण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संवेदनशील राहावे. पाणीटंचाईचे प्रस्ताव तातडीने सादर करावेत, अशा सूचना अन्न व औषध प्रशासन व विशेष सहाय मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिल्या.

पेठ तालुक्यातील पाणी टंचाईबाबत मंत्री श्री. झिरवाळ यांनी आज दुपारी तहसील कार्यालयात आढावा बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी दिंडोरीचे उपविभागीय अधिकारी आप्पासाहेब शिंदे, गटविकास अधिकारी श्री. सूर्यवंशी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, सरपंच, लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ आदी उपस्थित होते.

मंत्री श्री. झिरवाळ यांनी सांगितले की, पेठ तालुक्यातील काही गावांना एप्रिल, मे या दोन महिन्यांत पाणीटंचाईची जाणवते. टंचाई  निवारणार्थ सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करावे. वीज वितरण कंपनीने पाणीपुरवठा योजनांना तातडीने वीज जोडणी द्यावी. टंचाई काळात पाणीपुरवठा योजनांचा वीज पुरवठा खंडित करू नये. जलजीवन मिशन अंतर्गत साकारण्यात येणाऱ्या पाणी योजनांच्या कामांना गती द्यावी, असेही निर्देश त्यांनी दिले.

गटविकास अधिकारी श्री. सूर्यवंशी यांनी सांगितले की, पेठ तालुक्यात सद्यःस्थितीत तीन टँकर सुरू असून तीन गावांचे टँकरसाठी प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांना पाणी पुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. पाणीटंचाई निवारण्यासाठी पुरेश्या प्रमाणात निधीची उपलब्धता असल्याचे त्यांनी सांगितले.

वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी केली कवठेएकंदच्या रेशीम धागा निर्मिती केंद्राची पाहणी

सांगलीदि. 25 (जि. मा. का.) :  तासगाव तालुक्यातील कवठेएकंद येथील रेशीम धागा निर्मिती केंद्र येथे वस्त्रोद्योग मंत्री मा.ना.संजय सावकारे यांनी आज भेट देऊन पाहणी केली.

याप्रसंगी रेशीम विकास अधिकारी पी. एस. पाडवी, जिल्हा रेशीम कार्यालयाचे वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक सुनिल पाटील, वरिष्ठ क्षेत्र सहाय्यक बी.डी. माने, नायब तहसिलदार प्रकाश बुरूंगले, पोलीस पाटील सुरेश पाटील आदी उपस्थित होते.

रेशीम धागा निर्मिती केंद्र कवठेएकंद येथे 400 एन्ड चे 2 मशीन असून महिन्याला 20 हजार कि.ग्रॅ. कोषापासून रेशीम धागा निर्मिती केली जाते. या केंद्राच्या शेडचे 30 हजार चौ. फूट बांधकाम आहे. 18 हजार कि.ग्रॅ. कोषापासून 2800 कि.ग्रॅ. इतके सूत उत्पादन होवू शकते. म्हणजेच प्रतिवर्षी २१६ मे. टन. कोषांचे रिलींग करुन ३३.५० मे.टन कि.ग्रॅ. सूत उत्पादन होवू शकते, सुताची विक्री ही बंगळुरू येथील सिल्क एक्सचेंज, वाराणसी, तामिळनाडू, गुजरात इत्यादी राज्यामध्ये केली जात असून या सुतास प्रति किलो ५ हजार ४०० ते ५ हजार ५०० रूपये इतका दर मिळतो. महाराष्ट्र शासनाकडून सुत उत्पादनावर १५० रूपये प्रति किलो इतके अनुदान दिले जाते. या केंद्रावर दररोज ६० ते ७० इतके स्थानिक मजूर काम करीत असून त्यांना स्थानिक स्तरावर मोठ्या प्रमाणावर रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. या केंद्रामुळे शेजारील सातारा, कोल्हापूर व पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना रेशीम कोष बाजारपेठ उपलब्ध झाली आहे.

‘महापर्यटन उत्सव’ अंतर्गत सुरू असलेली कामे मुदतीत पूर्ण करावी – पालकमंत्री शंभूराज देसाई

सातारा दि.25- महापर्यटन उत्सव महाबळेश्वर आयोजन 2 ते 4 मे या कालावधीत करण्यात आले आहे. या अनुषंगाने सुरू असलेली कामे मुदतीत पूर्ण करावीत, असे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.
पालकमंत्री श्री. देसाई यांनी महापर्यटन उत्सव महाबळेश्वरच्या अनुषंगाने महाबळेश्वर मध्ये सुरू असलेल्या कामांची व स्थळांची पाहणी केली. याप्रसंगी प्रांताधिकारी राजेंद्र कचरे तहसीलदार तेजस्विनी पाटील, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी योगेश पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाची उपविभागीय अधिकारी अजय देशपांडे यांच्यासह तालुकास्तरीय विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
महापर्यटन उत्सव महाबळेश्वर अंतर्गत मधाचे गाव मांघर व पुस्तकांचे गाव भिलार या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यटक जातील या दृष्टीने काम करावे. महापर्यटन उत्सव कालावधीत  वाहतूक कोंडी होणार नाही याची दक्षता घ्यावी.
महापर्यटन उत्सवामध्ये स्थानिकांचाही सहभाग घ्यावा अशा सूचना करून पालकमंत्री श्री देसाई म्हणाले, सर्व विभागांनी स्थानिकांच्या मदतीने हा महोत्सव यशस्वी करावा. महाबळेश्वर मध्ये येणाऱ्या कोणत्याही  पर्यटकाची गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्यावी. या उत्सवाला जास्तीत जास्त पर्यटक कसे येतील हेही पाहावे. त्याचबरोबर विविध टीव्ही वाहिन्यांवरून महापर्यटन उत्सव महाबळेश्वराची प्रसिद्धी करावी, असे निर्देशही पालकमंत्री श्री. देसाई यांनी दिले

ताज्या बातम्या

प्रत्येक मंडळात महाराजस्व अभियान राबविणार -पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

0
अमरावती, दि. २८ : राज्य शासनाने पारदर्शी आणि गतीमान सरकारचे धोरण ठरविले आहे. शासकीय कार्यालयातील कामे सहजपणे आणि विनातक्रार होण्यासाठी यंत्रणा राबविण्यात येत आहे....

नाविण्यपूर्ण उपक्रम राबविणाऱ्या ग्राम महसूल अधिकाऱ्यांचा गौरव करणार – महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

0
धुळे, दि. २८ (जिमाका):  महसूल विभाग हा शासनाचा चेहरा असून सर्वसामान्य नागरिकांना न्याय देण्याची भूमिका राबविण्याबरोबर सर्वसामान्य नागरिकांचे जीवनमान सुकर होण्यासाठी विविध नाविण्यपूर्ण उपक्रम...

उद्योगांसाठी रावेर येथील २ हजार एकर जमीन उपलब्ध करुन देणार -महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

0
उद्योगांना सोईसुविधा व सवलती देण्यासाठी शासन कटिबद्ध गुंतवणूक परिषद ठरणार धुळे जिल्ह्यासाठी गेमचेंजर परिषदेमध्ये 8436 कोटींचे गुंतवणूक करार, 11506 रोजगार उपलब्ध होणार रोजगार...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांचा विशेष सन्मान

0
नांदेड दि. २८ :  महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमाची दशकपुर्ती आणि प्रथम सेवा हक्क दिनानिमित्त आज मुंबई येथे अतिथीगृहात आयोजित राज्यस्तरीय सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...

परोटी तांडा येथे माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांच्या पुतळ्याचे भूमिपूजन

0
नांदेड दि. २८: राज्याचे माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांच्या पुतळ्याचा भूमिपूजन समारंभ कार्यक्रम किनवट तालुक्यातील परोटीतांडा येथे उद्योग, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून),...