मंगळवार, एप्रिल 29, 2025
Home Blog Page 7

यशदा येथे ग्रामविकास विभागाच्या दोन दिवसीय कार्यशाळेला सुरुवात

पुणे, दि. २६: ग्रामविकास विभाग प्रगतीपथावर घेऊन जाण्यामध्ये जिल्हा परिषद हा महत्त्वाचा घटक असून ग्रामविकासाला अधिक चालना देण्यासाठी व विकसित महाराष्ट्र घडविण्यासाठी जिल्हा परिषदेने महत्त्वपूर्ण योगदान द्यावे, असे आवाहन ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांनी केले.

ग्रामविकास विभागाच्यावतीने यशदा येथे आयोजित दोन दिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळेला सुरुवात झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी ग्रामविकास विभागाचे राज्यमंत्री योगेश कदम, प्रधान सचिव एकनाथ डवले, यशदाचे महासंचालक निरंजन सुधांशू, उपमहासंचालक डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी, राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, मुख्य कार्यकारी अधिकारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच प्रकल्प संचालक उपस्थित होते.

मंत्री श्री. गोरे म्हणाले, विचारांची देवाणघेवाण करुन चर्चेतून प्रचंड वेगाने प्रशासन प्रगतीपथावर गेले पाहिजे ही शासनाची भूमिका आहे. शासनाच्या योजना, निर्णय, धोरणे ग्रामस्तरावर पोहोचविण्याची जिल्हा परिषदेची मोठी जबाबदारी आहे. त्यामुळे जिल्हा परिषद यंत्रणांनी सकारात्मक भूमिका ठेवून काम करावे व यंत्रणेबद्दल विश्वास निर्माण करावा. त्यासाठी आवश्यक असल्यास कामकाज व्यवस्थेत बदल करावा. शासन निर्णयांची अंमलबजावणी करताना नियमांचे उल्लंघन होणार नाही याची काळजी घ्यावी, अशा सूचना त्यांनी दिल्या.

ते म्हणाले, ग्रामविकास विभागामार्फत सर्वांसाठी घरे योजना राबविण्यात येत आहे. प्रधानमंत्री आवास योजनेत २० लाख घरांचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले असून उर्वरित १० लाख घरांना लवकरच मान्यता मिळेल.ही घरकुल योजना परिणामकारक नागरिकांपर्यंत पोहोचवणे ही सर्वांची जबाबदारी आहे. घरकुलासाठी पात्र लाभार्थ्याचे सर्व्हेक्षण तातडीने पूर्ण करावे, घरकुलांच्या जागेसाठी गायरान, गावठाण येथे जागा उपलब्ध करुन देण्याच्या कामाला विभागीय आयुक्तांनी प्राधान्य द्यावे. राज्यात गतीने व परिणामकारक कामाच्या दृष्टीने १०० दिवसांचा कृती आराखडा राबविण्यात येत आहे. त्यातही ग्रामविकास विभाग आघाडीवर आहे. प्रत्येक जिल्ह्याने नवीन संकल्पना राबवाव्यात. बचत गटाच्या महिलांच्या उत्पादनाला बाजारपेठ उपलब्ध करुन देण्यासाठी ‘वूमन मॉल’ बनविण्याचे प्रस्ताव तातडीने सादर करावेत असे सांगून अर्थसंकल्पात यासाठी तरतूद करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यमंत्री श्री. कदम म्हणाले, नवीन संकल्पनांची देवाण-घेवाण व्हावी या उद्देशाने ही कार्यशाळा आयोजित केली आहे. सर्व अधिकाऱ्यांनी ग्रामविकासासाठी संवेदनशीलतेने काम करावे. क्षेत्रीय स्तरावर पोहोचून योजनांना गती द्यावी. जिल्हा परिषदेने विविध कल्पना राबवाव्यात. यासाठी शासन पाठीशी राहील. शासन आणि प्रशासन एकत्र आल्यास प्रगती निश्चित होईल. ही, कार्यशाळा सर्वांसाठी उर्जादायी ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी हे व्यासपीठ असून समांतर पातळीवर विचारांची देवाण घेवाण होणे हा कार्यशाळा आयोजनामागचा उद्देश असल्याचे श्री. डवले यांनी प्रास्ताविकात सांगितले.

सुरुवातीला पहलगाम येथे मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

0000

राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत भारती विद्यापीठाला प्रथम क्रमांकावर आणण्याकरीता प्रयत्न करावे – वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

पुणे, दि.२६: शैक्षणिक क्षेत्रातील कामगिरीच्या मूल्यांकनाकरीता राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर स्पर्धा आयोजित करण्यात येतात; या स्पर्धेत भारती विद्यापीठाला प्रथम क्रमांकावर आणण्याकरीता सर्वांनी मिळून प्रयत्न करावे, याकरीता राज्य शासनाच्यावतीने सहकार्य करण्यात येईल, असे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.

भारती विद्यापीठ शैक्षणिक संकुल, धनकवडी येथे आयोजित भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाचा ३० वा स्थापना दिन समारंभप्रसंगी ते बोलत होते. यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाचे कुलपती डॉ. शिवाजीराव कदम, आमदार तथा भारती विद्यापीठाचे कार्यवाह डॉ. विश्वजीत कदम, भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाचे कुलगुरू डॉ. विवेक सावजी, ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ.तारा भवाळकर, आरोग्य विज्ञान शाखेच्या कार्यकारी संचालिका डॉ. अस्मिता जगताप, कार्याध्यक्ष आनंदराव पाटील आदी उपस्थित होते.

श्री. मुश्रीफ म्हणाले, भारती विद्यापिठाच्या स्थापनेपासून शिक्षणाचा दर्जा उत्तम ठेवण्यात आला आहे, विद्यापीठाने संस्थेच्या विस्तारीकरण आणि विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर भर दिला आहे.  भारती विद्यापीठाला अभिमत विद्यापीठाला दर्जा मिळाला असून संस्थेला सर्व प्रकारचे अधिकार मिळाले आहेत.

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर डॉ.तारा भवाळकर यांच्या अध्यक्षतेखाली ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नवी दिल्ली येथे पार पडले. या कार्यक्रमात त्यांचे भाषण ऐकूण मंत्रमुग्ध झालो, असेही श्री. मुश्रीम म्हणाले.

यावेळी विचार व्यक्त करतांना त्यांनी भारती विद्यापीठाचे संस्थापक अध्यक्ष स्व. डॉ. पतंगराव कदम यांच्या आठवणींना उजाळा दिला.

भारती विद्यापीठात कौशल्य विकासाचे शिक्षण सुरु करण्यासाठी प्रयत्न करावे मंत्री मंगलप्रभात लोढा

मंत्री श्री. लोढा म्हणाले, भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालय हे खऱ्या अर्थाने ‘डायमंड युनिव्हर्सिटी’ आहे, काळाची गरज ओळखून याठिकाणी कौशल्य विकासाचे शिक्षण सुरु करण्यासाठी प्रयत्न करावे, या कामी राज्यशासनाच्यावतीने सहकार्य करण्यात येईल.

भारती विद्यापीठाचे संस्थापक अध्यक्ष स्व. डॉ. पतंगराव कदम यांच्या अंगी साधेपणा, प्रमाणिकपणा, मनमिळाऊ, ज्ञानजिज्ञासा वृत्ती होती, त्यांनी सर्वांना सोबत घेऊन पुढे जाण्याची शिकवण दिली. ते आपल्याकरीता प्रेरणादायी व्यक्तीमत्व होते. कदम परिवाराने या विद्यापीठाच्या माध्यमातून हा वारसा पुढे नेण्याचे काम करावे, असेही श्री. कदम म्हणाले.

भारती विद्यापीठाच्या वाटचालीबाबत माहिती देऊन आमदार श्री.कदम म्हणाले, भारती विद्यापीठाला राष्ट्रीय अधिस्वीकृती परिषदेकडून सलग चार वेळेस ए++ शैक्षणिक दर्जा मिळाला आहे. विद्यापीठात उच्च शिक्षणासोबतच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यात येत आहे,असे श्री. कदम म्हणाले.

कुलपती श्री. कदम म्हणाले, शिक्षणातून चारित्र्यसंपन्न पिढी निर्माण करण्यासोबतच समाजाला उपयोगी पडणारे शिक्षण देण्यासाठी प्रयत्न करावे. काळाची गरज ओळखून शैक्षणिक क्षेत्रात संशोधनाला महत्व देण्याची गरज आहे, असेही श्री. कदम म्हणाले.

श्रीमती तारा भवाळकर यांनी आपले विचार व्यक्त केले.

कार्यक्रमात ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ.तारा भवाळकर यांना भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालय जीवनसाधना गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाच्या वार्षिक अहवाल २०२३-२४ चे प्रकाशन करण्यात आले.

डॉ. सावजी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.

0000

 

जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याकडून पानशेत व वरसगाव धरणाची पाहणी

oplus_0

पुणे, दि.२६: गाळ साचल्यामुळे धरणातील पाणी साठवण क्षमता कमी होते. त्यामुळे पानशेत व वरसगाव धरणातील गाळाच्या प्रमाणाचे सर्वेक्षण करून गाळ काढण्याच्या अनुषंगाने पुढील कार्यवाही करावी, असे निर्देश जलसंपदा मंत्री (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिले.

पानशेत व वरसगाव धरणांच्या पाहणी प्रसंगी त्यांनी अधिकाऱ्यांना निर्देश दिले. यावेळी आमदार राहुल कुल, महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले, मुख्य अभियंता हनुमंत गुणाले, अधीक्षक अभियंता पृथ्वीराज फाळके, जलसंपदा यांत्रिकी विभागाचे अधीक्षक अभियंता प्रकाश भोसले, पानशेत व वरसगाव प्रकल्पाचे उपअभियंता मोहन भदाणे, पानशेत प्रकल्पाचे शाखाधिकारी अनुराग मारके आदी उपस्थित होते.

oplus_0

पानशेत व वरसगाव धरणासाठी संपादित जमिनीचा फेरआढावा घेऊन अतिरिक्त संपादित जमिनीचा अहवाल सादर करावा, अशा सूचना देऊन मंत्री श्री. विखे- पाटील म्हणाले, पानशेत व वरसगाव येथील महानिर्मिती कंपनीमार्फत कार्यान्वित असलेले जलविद्युत निर्मिती प्रकल्पाबाबत नव्याने अभ्यास करून अतिरिक्त क्षमता वाढविण्यात येईल किंवा कसे याबाबत पाहणी करावी. वरसगाव धरणाची गळती कमी करण्याच्या उपाययोजनेबाबत सविस्तर अंदाजपत्रक करून कार्यवाही करावी, असेही ते म्हणाले.

oplus_0

यावेळी मंत्री श्री. विखे- पाटील यांनी वीर बाजी पासलकर यांच्या पुतळ्याचे दर्शन घेतले. वीर बाजी पासलकर यांच्या पुतळ्याचे, परिसराचा सुशोभीकरणाचा आराखडा करून त्याचे उत्कृष्ट काम करावे, अशाही सूचना त्यांनी दिल्या.

श्री. कपोले, श्री. गुणाले यांनी या धरण प्रकल्पांच्या बाबत त्यांचे बांधकामाचे वर्ष, बांधकामाचा प्रकार, साठवण क्षमता, जलविद्युत निर्मिती प्रकल्पांची वीजनिर्मिती क्षमता आदींच्या अनुषंगाने माहिती दिली. तसेच पानशेत मधील गाळ काढण्याचे काम  नाम फाउंडेशनच्या माध्यमातून सुरू असल्याचे सांगितले. दोन लाख घन मीटर गाळ काढण्याचे नियोजन असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

oplus_0

0000

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते दापोडी पोलिस ठाण्याच्या नवीन इमारतीचे उद्घाटन

पुणे, दि. 25:  पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीतील दापोडी पोलीस ठाण्याच्या नवीन इमारतीचे उद्घाटन उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री  अजित पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी  श्री. पवार यांनी नवीन इमारतीची पाहणी केली.

यावेळी अधिकारी कक्ष, आवक जावक बारनिशी, सी.सी.टीव्हि, वायरलेस, डे-बुक, मुद्देमाल कारकून कक्ष,तपास पथक कक्ष, हिरकणी कक्ष, पुरुष व महिला विश्रांती कक्ष, खेळाचे मैदान, बैठक कक्ष, प्रसाधन गृह, आदी कक्षांची पाहणी करून माहिती जाणून घेतली. यावेळी कार्यक्रमात मुख्यमंत्री सात कलमी कार्यक्रमाचे सादरीकरण दाखविण्यात आले. तसेच पिंपरी चिंचवड आयुक्तालयाच्या अंतर्गत करण्यात आलेल्या नवीन विकासकामांची माहिती देण्यात आली.

यावेळी विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, आमदार अमित गोरखे,  पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह, पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे, अप्पर पोलिस आयुक्त वसंत परदेशी, पोलिस उप आयुक्त श्रीमती स्वप्ना गोरे, सहायक पोलीस आयुक्त सचिन हिरे, पोलीस अधिकारी, कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.

पाणंदरस्ते, शिवरस्ते खुले करण्याबाबत कालबद्ध कार्यक्रम राबविण्यात येणार-उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्न

पुणे, दि. : 25: जिल्ह्यातील पाणंदरस्ते, शिवरस्ते खुले करण्याबाबत कालबद्ध कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. तलाव आणि पाणीसाठ्यातील गाळ काढण्याचे कामही वेळेत पूर्ण करण्याचे नियोजन करावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिले. जिल्हा वार्षिक योजनेतील मंजूर कामांसाठी संबंधित यंत्रणांनी 31 मे पर्यंत प्रशासकीय मान्यता घेऊन डिसेंबरअखेर कामे पूर्ण करावीत, अशाही सूचना त्यांनी दिल्या.

विधानभवन येथे आयोजित जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधानसभेचे उपाध्यक्ष आण्णा बनसोडे, खासदार श्रीरंग बारणे, आमदार उमा खापरे, अमित गोरखे,  दिलीप वळसे पाटील, विजय शिवतारे, भीमराव तापकीर, राहुल कुल, सुनील कांबळे, सुनील शेळके, सिद्धार्थ शिरोळे, महेश लांडगे, शरद सोनवणे, ज्ञानेश्वर उर्फ माऊली आबा कटके, बापूसाहेब पठारे, बाबाजी काळे, शंकर मांडेकर, हेमंत रासणे, शंकर जगताप,  विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार,  पुणे मनपा आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, पिंपरी-चिंचवड मनपा आयुक्त शेखर सिंह, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, जिल्हा ग्रामीणचे अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता अतुल चव्हाण,  जिल्हा नियोजन अधिकारी किरण इंदलकर आदी यावेळी उपस्थित होते.

श्री. पवार म्हणाले, जिल्ह्यातील लोकप्रतिनिंधी विकास कामांची माहिती 15 मे पर्यंत प्रशासनाकडे सादर करावी. सर्व संबंधित यंत्रणांनी 31 मे अखेर प्रशासकीय मान्यता घेवून पुढील कार्यवाही डिसेंबरअखेर पूर्ण करावी. जिल्हा नियोजन समितीमध्ये मंजूर कामाचा आढावा घेतला जाणार असून संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी विकासकामे वेळेत, दर्जेदार, गुणवत्तापूर्वक होईल याकडे लक्ष द्यावे.  गडकिल्ले, पर्यटनस्थळे आदी ठिकाणे पर्यटकांना सुरक्षित वाटली पाहिजे, याकरीता आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात.

जिल्ह्यात पुणे मॉडेल स्कूल अर्थात आदर्श शाळांचा उपक्रम राबविण्याचे निर्देश देण्यात आले असून त्या अंतर्गत प्रत्येक तालुक्यातील केंद्र शाळा स्तरावर एका मोठ्या शाळेचा भौतिक तसेच दर्जात्मक विकास करण्यात येणार आहे. भौतिक सुविधांसोबतच शिक्षणाचा दर्जा कसा वाढेल याकडे लक्ष द्यावे.

नागरिकांना शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करुन द्यावे. लोकप्रतिनिधी सूचित केलेल्या सूचना, तक्रारीचे दखल घेत त्यांना विश्वासात घेवून त्या निकाली काढाव्यात. जिल्ह्यातील सर्व तालुक्यात एकसारखा निधी दिला जाईल, याबाबत दक्षता घ्यावी. रुग्णालयात विविध आजाराकरीता उपचारासाठीची लागणारी पुरेशी औषधे उपलब्ध ठेवावीत. धर्मादाय रुग्णालयांनी रुग्णांकडून अनामत रक्कम घेऊ नये असा निर्णय घेण्यात आला आहे.  या नियमांचे उल्लघंन करणाऱ्या रुग्णालयांवर कठोर कारवाई करण्यात येईल, याकामी जिल्हाप्रशासन, महानगरपालिका आयुक्त आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी लक्ष घालावे,असेही श्री. पवार म्हणाले.

यावेळी मंत्री श्री. पाटील, मंत्री श्री. भरणे, राज्यमंत्री श्रीमती मिसाळ, श्रीमती गोऱ्हे यांच्यासह आमदार यांनी विविध सूचना केल्या.

यावेळी जिल्ह्यासाठी सन २०२५- २६ च्या सर्वसाधारण योजनेसाठी १ हजार ३७९ कोटी रुपये, अनुसूचित जाती उपयोजनेसाठी १४५ कोटी रुपये आणि आदिवासी घटक कार्यक्रमासाठी ६५ कोटी ४६ लाख रुपये या प्रमाणे एकूण १ हजार ५८९ कोटी ४६ लाख रुपयांच्या जिल्हा वार्षिक योजना आराखड्यास राज्य शासनाने मान्यता दिली असल्याचे माहिती जिल्हाधिकारी श्री. डूडी यांनी दिली.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनीही प्रस्तावित योजना व तरतुदींच्या अनुषंगाने सादरीकरण केले.

यावेळी उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या उपस्थितीत पुणे जिल्हा परिषद आणि आयुका संस्थेत जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांना आयुका, नासा व इस्त्रो या संस्थेस भेटीबाबत मदत करण्यासोबतच तेथील कामकाजाबाबत माहिती व शास्त्रज्ञाच्या भेटीबाबत सामंजस्य करार करण्यात आला.  तसेच  पिंपरी-चिंचवड महानगरपालिका व युनिसेफ यांच्या संयुक्त विद्यमाने तयार करण्यात आलेल्या ‘वॉर्ड हेल्थ ॲक्शन प्लॅन’चे प्रकाशन करण्यात आले.

बैठकीत सन २०२४-२५ च्या जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत झालेल्या खर्चास मान्यता देण्यात आली.

बैठकीस जिल्हा नियोजन समितीचे सदस्य, विविध कार्यान्वयन यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

सामुहिक वनहक्क पट्टेधारकांना स्वतंत्र सातबारा द्या – आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके

आदिवासी उपयोजना आढावा बैठक

शेतकऱ्यांना बोअरवेल हा आपल्यासाठी सर्वोच्च प्राथमिकतेचा विषय – सहपालकमंत्री आशिष जयस्वाल

गडचिरोली, (जिमाका) दि.25: आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके आणि सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी आज गडचिरोली येथे जिल्हा नियोजन समितीच्या आदिवासी उपयोजनेअंतर्गत 2024-25 च्या खर्चाचा आढावा घेतला.

या बैठकीला जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, आदिवासी विभागाच्या अपर आयुक्त आयुषी सिंह, आमदार डॉ. मिलींद नरोटे, आमदार रामदास मसराम, प्रभारी पोलीस अधीक्षक आतिश देशमुख, सहायक जिल्हाधिकारी तथा एकात्मिक आदिवासी प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी रणजित यादव (गडचिरोली), कुशल जैन (अहेरी), नमन गोयल (भामरागड), जिल्हा नियोजन अधिकारी श्रीराम पाचखेडे, समाजकल्याणचे सहायक आयुक्त सचिन मडावी यांच्यासह विविध अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत मंत्री डॉ. अशोक उईके यांनी वनहक्क कायद्यानुसार सामुहिक वनहक्क पट्टेधारकांना स्वतंत्र सातबारा देण्याचा निर्णय घेण्याचे निर्देश दिले, जेणेकरून या पट्टाधारकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेता येईल. मंत्री अशोक उईके यांनी यावेळी सांगितले की ज्या गावात वीज नाही त्या प्रत्येक गावात वीज पोहचविण्याचे आमचे ध्येय आहे. मुख्यमंत्री वीज कनेक्शन योजना गडचिरोली जिल्ह्यापासून राबविण्याचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले. घरकुलाचा आढावा घेतांना त्यांनी प्रधानमंत्री जनमन योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे सांगितले. आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत मोफत उपचाराची सुविधा असलेल्या दवाखाण्याची माहिती नागरिकांपर्यंत पोहचविण्याचे व त्याच प्रचार प्रसार करण्याच्या सूचना मंत्री उईके यांनी आरोग्य विभागाला दिल्या. गडचिरोली जिल्ह्यचे पालकत्व मुख्यमंत्री महोदयांकडे आहे आणि या जिल्ह्यातील एकही गाव रस्त्यापासून वंचित राहू नये यासाठी लागेल तेवढा निधी उपलब्ध करून देवू असे ते म्हणाले.

राज्यमंत्री ॲड. आशीष जयस्वाल यांनी आदिवासी मानसाच्या जीवणात बदल घडवणाऱ्या योजनांसाठीच आदिवासी उपयोजनेचा निधी मंजूर करण्याचे सांगितले. गडचिरोली जिल्ह्यात विशेष बाब म्हणून बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेअंतर्गत आठ हजार बोअरवेल सोलर सह देण्याचा शासनाचा मानस असून यासाठी कृषी विभागाने व्यापक प्रसिद्ध करण्याचे त्यांनी सांगितले. माझ्यासाठी हा विषय सवोच्च प्राथमिकतेचा असल्याचे ते म्हणाले. घरकुलाच्या लाभार्थ्यांना रेती मोफत देण्याचा शासनाचा निर्णय आहे, गटविकास अधिकाऱ्यांनी तहसिलदार यांना घरकुल लाभार्थ्यांची यादी द्यावी व प्रशासनाने लाभार्थ्यांना घरपोच रॉयल्टीची रेती पोहचवून द्यावी, ही प्रशासनाची जबाबदारी आहे. रेती नसल्याने घरकुलाचे काम थांबले तर प्रशासनाची जबाबदारी राहील असे त्यांनी सांगितले. जलजीवनच्या कामांच्या दर्जाबाबत प्रश्न उपस्थित होत असल्याचे सांगून मी आकस्मिक भेट देवून कामाची पाहणी करणार व अनियमितता आढळल्यास पोलीस एफ.आय.आर. दाखल करेल असे श्री जयस्वाल यांनी सांगितले.

यावेळी आमदार डॉ. मिलींद नरोटे यांनी नवीन वाळू धोरण अंमलबजावणीबाबत विचारणा करून आदिवासी शाळेत चांगले प्रसाधनगृह तयार करण्याचे तर आ. मसराम यांनी विद्यार्थ्यांना शाळेत जेवणासाठी शेड निर्माण करण्याची पिण्याचे पाणी उपलब्धतेसाठी मागणी केली

पत्रकार परिषदेत धान्य घोटाळ्याबाबत मंत्री अशोक उईके यांना विचारणा केली असता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हाधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना देवून याबाबत 30 एप्रिल च्या आत चौकशी अहवाल सादर करण्याचे सांगितले आहे, त्यानंतर योग्य ती कारवाई केली जाईल असे त्यांनी स्पष्ट केले.

बैठकीला संबंधीत विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

0000

दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांच्या कुटुंबियांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून सांत्वन

पुणे, दि.२५: जम्मू काश्मीरमधील पहेलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे या पर्यटकांच्या कुटुंबियांची राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. राज्यशासन आपल्या दुःखात सहभागी असून आपल्या पाठीशी ठामपणे उभे आहे, असा धीर त्यांनी दिला.

यावेळी स्व. संतोष जगदाळे यांच्या पत्नी प्रगती जगदाळे, मुलगी आशावरी जगदाळे, कौस्तुभ गणबोटे यांच्या पत्नी संगीता गणबोटे, मुलगा कुणाल गणबोटे आदी कुटुंबातील सदस्य उपस्थित होते.
0000

मुंबई उपनगर जिल्हा क्रीडा कार्यालयाच्यावतीने विविध खेळांची विनामूल्य उन्हाळी प्रशिक्षण शिबिरे

मुंबई दि. 25 :  मुंबई उपनगर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व विविध क्रीडा संस्थांच्या संयुक्त विद्यमाने दि. २८ एप्रिल ते ९ मे २०२५ या कालावधीत विविध खेळांची विनामूल्य उन्हाळी प्रशिक्षण शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत. या उपक्रमामध्ये हँडबॉल, बास्केटबॉल, वुशू, पॉवरलिफ्टिंग, वेटलिफ्टिंग आणि फुटबॉल या खेळांचा समावेश आहे. जास्तीत जास्त खेळाडूंनी यात सहभाग घ्यावा, असे आवाहन मुंबई उपनगराच्या जिल्हा क्रीडा अधिकारी भक्ती आंब्रे यांनी केले आहे.

प्रशिक्षण स्थळे आणि वेळा पुढीलप्रमाणे:

बास्केटबॉल: जिकेपी बास्केटबॉल कोर्ट, आचार्य अत्रे मैदान, पंतनगर, घाटकोपर (पूर्व) येथे सायंकाळी ४.४५ ते ६.००

हँडबॉल: विभागीय क्रीडा संकुल, चिकूवाडी, मुंबई पब्लिक स्कूलसमोर, सायंकाळी ४ ते ६

फुटबॉल: होली पब्लिक स्कूल, अंधेरी येथे सायंकाळी ४ ते ६

पॉवरलिफ्टिंग व वेटलिफ्टिंग: फिटनेस पॉईंट जिम, भांडूप पश्चिम येथे दुपारी ३ ते ६

वुशू: श्री नारायण गुरु हायस्कूल, चेंबूर व एस.आय.इ.एस., घाटकोपर येथे दुपारी १२.३० ते १.३०

शिबिरात सहभागी होणाऱ्या खेळाडूंना जिल्हा क्रीडा अधिकारी रश्मी आंबेडकर, भक्ती आंब्रे, क्रीडा कार्यकारी अधिकारी प्रीती टेमघरे व शिव छत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त मनिषा गारगोटे यांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक देऊन गौरवण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी  मनिषा गारगोटे – ८२०८३७२०३४, श्रीमती प्रीती टेमघरे – ९०२९०५०२६८ यांना संपर्क साधावा. असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाने केले आहे.

0000

श्रीमती श्रद्धा मेश्राम/विसंअ/

 

‘माहिती व जनसंपर्क’मधील नवनियुक्त उपसंचालकांचा प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह यांच्या हस्ते सत्कार

मुंबई दि 25 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयात पदोन्नतीने नियुक्त झालेल्या उपसंचालक (माहिती) यांचा प्रधान सचिव तथा माहिती व जनसंपर्क महासंचालनालय महासंचालक ब्रिजेश सिंह यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

कोकण विभागीय माहिती कार्यालयाचे उपसंचालक (माहिती) श्री. र.बा.गिते, उपसंचालक (माहिती) श्री. देवेंद्र लक्ष्मण पाटील, उपसंचालक (माहिती) श्रीमती मीनल शशिकांत जोगळेकर, उपसंचालक (माहिती) श्रीमती कीर्ती प्र. मोहरील-पांडे आणि उपसंचालक (माहिती) श्रीमती वर्षा संतोष आंधळे या नवनियुक्त उपसंचालकांचा माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

कोल्हापूर येथील विभागीय माहिती कार्यालयाचे उपसंचालक (माहिती) श्री. प्रविण टाके व पुणे येथील विभागीय माहिती कार्यालयाचे उपसंचालक (माहिती) पदावर श्री. किरण मोघे यांची नियुक्ती झाली आहे.

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह यांनी सर्व उपसंचालकपदी नवनियुक्त अधिकाऱ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या व संघभावनेने कार्य करून माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे कार्य अधिक बळकट करण्याचे आवाहन केले.

यावेळी संचालक (माहिती) (प्रशासन) हेमराज बागूल, संचालक (माहिती) किशोर गांगुर्डे, संचालक (माहिती) ( वृत्त व जनसंपर्क) डॉ. गणेश मुळे उपस्थित होते.

0000

‘वेव्हज २०२५’ :  माध्यम आणि मनोरंजन क्षेत्राच्या जागतिक परिवर्तनाचा प्रारंभ

देशातील माध्यम व मनोरंजन (Media & Entertainment) क्षेत्राच्या इतिहासातील सुवर्णक्षण ठरणाऱ्या ‘WAVES 2025’ या जागतिक परिषदेस मुंबईत भव्य सुरुवात होत आहे. १ मे रोजी, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जिओ वर्ल्ड सेंटर, मुंबई येथे या ऐतिहासिक परिषदेचे उद्घाटन होणार आहे. यावेळी केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत.

१ ते ४ मे दरम्यान होणारी ही परिषद भारत सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालय आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली असून, माध्यम आणि मनोरंजन उद्योगाच्या भविष्यासाठी दिशादर्शक ठरणार आहे.

महाराष्ट्र – ‘ग्लोबल क्रिएटर इकॉनॉमीकडे वाटचाल

बॉलीवूड, टीव्ही आणि ओटीटी इंडस्ट्री यांचे केंद्रस्थान असलेली मुंबई भारताच्या मनोरंजन क्षेत्रात नेहमीच आघाडीवर राहिली आहे. आता याच मुंबईला आणि महाराष्ट्राला जागतिक स्तरावर ‘क्रिएटर हब’ म्हणून प्रतिष्ठा मिळवून देण्याचा महत्त्वाकांक्षी प्रयत्न ‘WAVES 2025’ च्या माध्यमातून होतो आहे. ऑस्कर, कान्स आणि दावोससारख्या जागतिक परिषदेच्या धर्तीवर प्रथमच भारतात अशी परिषद आयोजित होत असून, जगभरातील 100 पेक्षा अधिक देशांतील प्रतिनिधी यात सहभागी होणार आहेत.

माध्यम आणि मनोरंजन क्षेत्राला दिशा देणारा मंच

‘WAVES 2025’ ही परिषद केवळ भारतातीलच नव्हे तर जागतिक माध्यम व मनोरंजन (M&E)  उद्योगाला एकत्र आणणारा, नवसृजनास चालना देणारा आणि गुंतवणुकीसाठी दरवाजे उघडणारा एक महत्त्वाचा मंच आहे. भारताचा समृद्ध सांस्कृतिक वारसा, तंत्रज्ञानातील कौशल्य आणि प्रतिभेचा संगम या परिषदेच्या केंद्रस्थानी असणार आहे.

या परिषदेतील एक विशेष आकर्षण ‘WAVES बाजार

‘WAVES बाजार’ – एक इंटरॅक्टिव्ह व्यावसायिक व्यासपीठ असून जिथे खरेदीदार आणि विक्रेते थेट संवाद साधू शकतात. नव्या प्रकल्पांची ओळख, सर्जनशील कल्पना, आणि गुंतवणुकीच्या संधी येथे उपलब्ध होतील. विशेषतः, श्रेणीआधारित शोध प्रणाली आणि सुरक्षित मेसेजिंग सुविधांमुळे व्यवहार अधिक प्रभावी आणि विश्वासार्ह ठरतील.

परिषदेत काय असणार?

१. परिषद सत्रे – जागतिक उद्योग नेते, विचारवंत आणि नवोन्मेषक विविध विषयांवर मार्गदर्शन करतील.

२. मीडिया मार्केटप्लेस – भारताच्या माध्यम व मनोरंजन (M&E) क्षेत्रातील वैविध्य, क्षमता आणि नवकल्पनांचे आकर्षक प्रदर्शन.

३. तंत्रज्ञान प्रदर्शन – नवीन तंत्रज्ञान आणि सर्जनशील प्रकल्पांचे लाईव्ह डेमो.

४. सांस्कृतिक कार्यक्रम – भारताच्या समृद्ध कलासंपदेची झलक दाखवणारे बहारदार कार्यक्रम.

‘WAVES 2025’ : उद्योगाला बळकटी देणारी संजीवनी

माध्यम आणि मनोरंजन उद्योग सध्या मोठ्या परिवर्तनाच्या उंबरठ्यावर आहे. ‘WAVES 2025’ ही परिषद नव्या कल्पनांना दिशा देऊन, भारताला जागतिक M&E सुपरपॉवर बनवण्याचा पाया रचणार आहे. सर्जनशीलता, तंत्रज्ञान आणि धोरणात्मक भागीदारी यांचा मेळ घालून, भारताला ‘ग्लोबल कंटेंट डेस्टिनेशन’ बनवण्याचे स्वप्न या मंचाद्वारे प्रत्यक्षात उतरणार आहे. पंतप्रधान, केंद्रीय मंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत होणारी ही परिषद भारताच्या सृजनशील भविष्यासाठी नवी ऊर्जा आणि प्रेरणा देणारी ठरणार आहे.

००००

  • वर्षा फडके-आंधळे,उपसंचालक (वृत्त)

 

 

ताज्या बातम्या

प्रत्येक मंडळात महाराजस्व अभियान राबविणार -पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

0
अमरावती, दि. २८ : राज्य शासनाने पारदर्शी आणि गतीमान सरकारचे धोरण ठरविले आहे. शासकीय कार्यालयातील कामे सहजपणे आणि विनातक्रार होण्यासाठी यंत्रणा राबविण्यात येत आहे....

नाविण्यपूर्ण उपक्रम राबविणाऱ्या ग्राम महसूल अधिकाऱ्यांचा गौरव करणार – महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

0
धुळे, दि. २८ (जिमाका):  महसूल विभाग हा शासनाचा चेहरा असून सर्वसामान्य नागरिकांना न्याय देण्याची भूमिका राबविण्याबरोबर सर्वसामान्य नागरिकांचे जीवनमान सुकर होण्यासाठी विविध नाविण्यपूर्ण उपक्रम...

उद्योगांसाठी रावेर येथील २ हजार एकर जमीन उपलब्ध करुन देणार -महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

0
उद्योगांना सोईसुविधा व सवलती देण्यासाठी शासन कटिबद्ध गुंतवणूक परिषद ठरणार धुळे जिल्ह्यासाठी गेमचेंजर परिषदेमध्ये 8436 कोटींचे गुंतवणूक करार, 11506 रोजगार उपलब्ध होणार रोजगार...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांचा विशेष सन्मान

0
नांदेड दि. २८ :  महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमाची दशकपुर्ती आणि प्रथम सेवा हक्क दिनानिमित्त आज मुंबई येथे अतिथीगृहात आयोजित राज्यस्तरीय सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...

परोटी तांडा येथे माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांच्या पुतळ्याचे भूमिपूजन

0
नांदेड दि. २८: राज्याचे माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांच्या पुतळ्याचा भूमिपूजन समारंभ कार्यक्रम किनवट तालुक्यातील परोटीतांडा येथे उद्योग, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून),...