गुरूवार, मे 15, 2025
Home Blog Page 938

दिवाळी फराळ व सजावट साहित्याच्या स्टॉलचे मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते मंत्रालयात उद्घाटन

मुंबई, दि.७ : महिला बचत गटांनी तयार केलेले दिवाळीसाठीचे सजावट साहित्य, फराळ, सेंद्रिय शेतमाल उत्पादनाच्या साहित्यांच्या विविध स्टॉलचे मंत्रालयात महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी उद्घाटन केले.

महिलांना औद्योगिक आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यास सहकार्य करण्यासाठी राज्य शासन महिला बचत गटांना प्रोत्साहन देत असल्याचे मंत्री तटकरे यांनी यावेळी सांगितले. कु. तटकरे यांनी यावेळी दिवाळी फराळाचा आस्वाद घेतला आणि महिलांशी संवाद साधत त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.

मंत्रालय त्रिमुर्ती प्रांगणात दिवाळी  निमित्त महिला व बालविकास विभागातंर्गत  ६ ते १० नोव्हेंबर या कालावधीत राज्यातील विविध महिला बचतगटांमार्फत बनविण्यात आलेल्या उत्पादनांची प्रदर्शन व विक्री करण्यात येत आहे. यावेळी महिला आर्थिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक इंदू जाखड उपस्थित होत्या.

क्षितीज सीएमआरसी, मुंबई जिल्ह्याचा दिवाळी फराळ, स्वाभिमान प्रोजेक्ट सीएमआरसी, मुंबई जिल्ह्याचा दिवाळी सजावट साहित्य, दीपिका गृह उद्योग, ठाणे जिल्ह्याचा रुरल मार्ट, तनिष्का सीएमआरसी , मुंबई जिल्ह्याचा लोकरीच्या हस्तकला तोरण, लेदर वर्क आणि बुक, घे भरारी सीएमआरसी, मुंबई जिल्ह्याचा ज्वेलरी आणि दिवाळी फराळ, उन्नती बचत गट, मुंबई जिल्ह्याचा चॉकलेट आणि पणत्या, नवतेजस्विनी कला दालन, पुणे जिल्ह्याचा ज्यूट प्रोडक्ट,  संकल्प आणि खुशिया सीएमआरसी, चंद्रपूर जिल्ह्याचे कार्पेट व बांबू आर्ट, चेतना सीएमआरसी आणि राणीकाजल सीएमआरसी, नंदुरबार जिल्ह्याचे मिलेट, धूपबत्ती उत्पादने, ओवी शेतकरी उत्पादक कंपनी, जालना जिल्ह्याचे सेंद्रिय शेतमाल उत्पादने प्रदर्शन व विक्रीसाठी मंत्रालयात उपलब्ध आहेत.

०००

संध्या गरवारे/विसंअ/

भूतानचे राजे जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक यांचे मुंबईत आगमन

मुंबई दि. ७ :  भूतानचे राजे जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक यांचे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबई येथे भारतीय वायू सेनेच्या विमानातून सकाळी आगमन झाले.

उपमुख्यमंत्री तथा राजशिष्टाचार मंत्री देवेंद्र फडणवीस, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर,  कौशल्य विकास व पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी राजे वांगचुक यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले.        यावेळी मुख्य सचिव मनोज सौनिक, मुख्य राजशिष्टाचार अधिकारी तथा अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर, पोलीस आयुक्त  विवेक फणसळकर, मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ.सुधाकर शिंदे, उपमुख्यमंत्री यांचे सचिव डॉ. श्रीकर परदेशी यांच्यासह पोलीस व राजशिष्टाचार विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

०००

भारत-पाक नियंत्रण रेषेजवळील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सैनिकांना प्रेरणादायी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. ७: काश्मिरमधील कुपवाडा येथील भारत-पाक नियंत्रण रेषेजवळ उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकांना प्रेरणादायी, उर्जादायी ठरेल, असे सांगतानाच  छत्रपतींचा हा पुतळा आपल्या देशाचा तिरंगा ध्वज शत्रूच्या छातीवर फडकवण्यासाठी नेहमीच जवानांना प्रेरणा देईल. त्यांचे मनोबल उंचावत राहील, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज कुपवाडा येथे व्यक्त केला. पुतळा अनावरणाच्या निमित्ताने काश्मीर खोऱ्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष दुमदुमला.

आम्ही पुणेकर संस्था, ४१ राष्ट्रीय रायफल मराठा बटालियन यांच्या माध्यमातून कुपवाडा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसविण्यात आला आहे. त्याचे अनावरण आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते झाले. यावेळी  जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा, महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार, महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, आम्ही पुणेकर संस्थेचे विश्वस्त अभयसिंह शिरोळे, हेमंत जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांनी भाषणाची सुरूवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाने केली. समोरच्या पर्वंतरांगापलिकडे असलेल्या पाकिस्तामनध्ये हा जयघोष पोहोचला पाहिजे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.

मुख्यमंत्री श्री. शिंदे यावेळी म्हणाले, अश्वारुढ पुतळ्यावरील छत्रपती शिवाजी महाराज पाकिस्तानच्या दिशेने बघत आहेत. त्यांच्या हातात तलवार आहे. महाराज येथे असल्याने शत्रू येथे पाऊल ठेवण्यास धजावणार नाही. हा पुतळा पाहून दहशतवादीही काश्मीरमध्ये घुसखोरी करण्याची हिंमत करणार नाही. ज्या ठिकाणी हा पुतळा बसवला आहे त्या ठिकाणी काही दिवसांपूर्वी मोठा खड्डा पडला होता. तेव्हा जवानांनी सुमारे १८०० ट्रक माती भरून त्याठिकाणी पुतळ्यासाठी भक्कम पाया करण्यात आला. याचा उल्लेख करून मुख्यमंत्र्यांनी मराठा बटालियनच्या जवानांचे कौतुक केले. सातारा येथील मेजर संतोष महाडीक यांना अभिवादन करीत त्यांच्या बलिदानाची आठवण यावेळी त्यांनी सांगितली.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला ३५० वर्ष पूर्ण झाली. त्यानिमित्त राज्य शासन आणि सांस्कृतिक विभागाने विविध उपक्रम राबवले. याच कालावधीत कुपवाड्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आला याला मोठे महत्त्व आहे. याठिकाणी स्मारक करण्यात येत आहे. त्यासाठी आवश्यक ते सहकार्य राज्य शासन करेल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे भारतात आणण्याचा करार करण्यात आला असून ही अभिमानाची बाब आहे. वाघनखे राज्यात आणल्यानंतर ठिकठिकाणी दर्शनासाठी ठेवली जातील, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काश्मीरमधील कलम ३७० हटवण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. त्यानंतर आता काश्मीरच्या विकासाचा नवा अध्याय सुरू झाला आहे.  केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या मार्गदर्शनाखाली नायब राज्यपाल श्री. सिन्हा यांनी गेल्या महिन्यात काश्मिर येथे जी २० परिषद घेतली, असेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यावेळी म्हणाले. कुपवाडा येथे असलेले हे स्मारक जम्मू-काश्मीरला भेट देणाऱ्या देशातील लोकांसाठी एक प्रेरणास्थान बनेल.  आपल्या सर्वांसाठी प्रेरणास्रोत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात आला आहे. हे स्मारक महाराष्ट्र आणि काश्मीरमधील संबंध अधिक दृढ करण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

आता दरवर्षी कुपवाडा येथे शिवाजी महाराज पर्व- नायब राज्यपाल मनोज सिन्हा

आज कुपवाडा येथे नव्या परंपरेला सुरूवात झाली असून यापुढे प्रत्येक वर्षी कुपवाडा येथे ७ नोव्हेंबरला शिवाजी महाराज पर्व साजरे करण्यात यावे, असे आवाहन नायब राज्यपाल श्री. सिन्हा यांनी जवानांना केले. ‘स्वत:वर विश्वास ठेवा, मी नेहमी तुमच्या सोबत असेन’ शिवाजी महाराजांनी शुरवीरांना दिलेला हा संदेश मराठीतून वाचत श्री. सिन्हा यांनी विविध इतिहासकार आणि कवींनी लिहिलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रम गाथांना उजाळा दिला.

शिवाजी महाराजांचे विचार दिशादर्शक- मंत्री सुधीर मुनगंटीवार

छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावातच शक्ती आहे. उर्जा आहे, असे सांस्कृतिक कार्यमंत्री श्री. मुनगंटीवार यांनी यावेळी सांगितले. दैनंदिन जिवनातील प्रत्येक समस्येवर मार्ग दाखविण्यासाठी शिवाजी महाराजांचे विचार दिशादर्शक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे भारतात आणण्यासाठी लंडनमध्ये करार करण्यात आला. राज्यासाठी ही अभिमानाची बाब असल्याचे मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी सांगितले.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पुजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरूवात राष्ट्रगीताने झाली. यावेळी संस्थेचे विश्वस्त श्री. शिरोळे, मेजर जनरल गिरीष कालिया यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी मराठा बटालियनचे जवान, लष्करी अधिकारी आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांनी साजरी केली जवानांसोबत दिवाळी

दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर पुतळा अनावरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या ठिकाणी मराठा बटालियन असल्याने मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी जवानांसोबत दिवाळी साजरी करण्याचा आनंद घेतला. त्यांच्यासोबत फराळाचा आस्वाद घेत मुख्यमंत्र्यांनी जवानांना आणि त्यांच्या कुटुंबियांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. तुम्ही रात्रं दिवस सीमेवर प्राणांची बाजी लावून देशाचे रक्षण करतात. त्यामुळे आम्ही सर्व सण उत्सव आनंदाने साजरे करू शकतो, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी जवानांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

०००

सीमेवरील कुपवाडा येथे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मंगळवारी स्थापित होणार छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळा; संकल्प पूर्णत्वास येतोय याचा अभिमान : सुधीर मुनगंटीवार

“आम्ही पुणेकर” सामाजिक संस्था आणि आरआर-४१च्या जवानांचा पुढाकार

मुंबई / चंद्रपूर, दि. 6 : जन्म देणाऱ्या मातेला आणि ज्या मातीत जन्माला आलो त्या मातीला आपला अभिमान वाटावा, असे कार्य जीवनात व्हावे, असा माझा सातत्याने प्रयत्न असतो ; जम्मू काश्मीर मध्ये नियंत्रण रेषेजवळ कुपवाडा येथे आमचे आराध्य दैवत, आमचा स्वाभिमान असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यासाठी “आम्ही पुणेकर” या सामाजिक संस्थेला पूर्ण सहकार्य करुन महाराजांचा पुतळा कुपवाडा येथे उभारण्याचा केलेला संकल्प पूर्ण होत असल्याचा अभिमान असून  राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते, जम्मू- काश्मीर चे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांच्या उपस्थितीत मंगळवारी, दिनांक 7 नोव्हेंबर रोजी  सकाळी  10.30 वाजता हा अनावरण समारंभ संपन्न होणार आहे, अशी माहिती राज्याचे वने, सांस्कृतिक कार्ये व मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे.

कुपवाडा येथे होत असलेल्या या कार्यक्रमात वीर पत्नींना सन्मानित करण्यात येणार असून वीर शहीद कर्नल संतोष महाडिक यांना अभिवादन करण्यात येईल. विशेष म्हणजे या कार्यक्रमासाठी राष्ट्रीय रायफल्स-41 चे जवान अतिशय उत्साहित असून हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी झटत आहेत. मागील आठवड्यात हा पुतळा जेव्हा या परिसरात दखल झाला तेव्हा जवानांनी ढोल ताशे आणि झांज वाजवून जल्लोषात स्वागत केले.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या या  अश्वारूढ पुतळ्याचे पूजन महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते व   मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सांस्कृतिक कार्ये मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत  दि. २० ऑक्टोबर रोजी राजभवन येथे झाल्यानंतर  हा पुतळा कुपवाडाच्या दिशेने रवाना झाला होता.

सांस्कृतिक कार्य मंत्री श्री सुधीर मुनगंटीवार तसेच महाराष्ट्र शासन यांच्या सहकार्यातून “आम्ही पुणेकर” या संस्थेतर्फे हा पुतळा उभारण्यात येत आहे.  “आम्ही पुणेकर” संस्थेचे अध्यक्ष हेमंत जाधव आणि विश्वस्त अभयराज शिरोळे हे यांच्यासह त्यांच्या सदस्यांनी यासाठी परिश्रम घेतले आहेत.

कुपवाडा येथील भारतीय सैन्याच्या छावणीत उभारण्यात येणारा हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा साडे दहा फुट उंचीचा असून जमिनीपासून जवळपास तितक्याच उंचीच्या आणि ७ x ३ या आकाराच्या चौथऱ्यावर उभारण्यात येणार आहे. या उपक्रमाला सर्वतोपरी सहाय्य केले जाईल, असे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जाहीर केले होते.

कुपवाडा येथील भारतीय सैन्याच्या छावणीत या पुतळ्याच्या स्थानाचे भूमीपूजन भारतीय सेनेच्या राष्ट्रीय रायफल्स च्या ४१ व्या बटालीयनचे (मराठा लाईट इन्फ्रंटरी) कमांडिंग ऑफीसर कर्नल नवलगट्टी आणि छत्रपती शिवाजी स्मारक समितीचे अध्यक्ष अभयराज शिरोळे यांच्या हस्ते दि. २० मार्च २०२३ रोजी पार पडले होते. नवीन तंत्रज्ञानाने बनविलेला छत्रपतींचा हा पुतळा जम्मू काश्मीर मधील प्रतिकूल हवामानात दीर्घकाळ तग धरेल, असा बनवला गेला आहे. सदर संस्थेतर्फे कुपवाडा येथे भारतीय सैन्यासोबत विविध दीर्घकालीन उपक्रम प्रस्तावित आहेत.

00000

महाराष्ट्र राज्य विकास कर्ज, २०२३ ची ९.३७ टक्के दराने परतफेड

मुंबई, दि. ५ : वित्त विभागाच्या अधिसूचना क्र.एलएनएफ-१०.१३/प्र.क्र.३४/अर्थोपाय २९ नोव्हेंबर, २०१३ अनुसार ९.३७ टक्के दराने महाराष्ट्र राज्य विकास कर्ज, २०२३ अदत्त शिल्लक रकमेची ३ डिसेंबर, २०२३ पर्यंत देय असलेल्या व्याजासह ४ डिसेंबर, २०२३ रोजी सममूल्याने परतफेड करण्यात येणार असल्याचे वित्त विभागाच्या सचिव शैला ए. (वित्तीय सुधारणा) यांनी प्रसिद्धीपत्राद्वारे कळविले आहे.

“परक्राम्य संलेख अधिनियम, १८८१” अन्वये महाराष्ट्र शासनाने उपरोक्त दिनांकास सुटी जाहीर केल्यास, राज्यातील अधिदान: कार्यालय, कर्जाची परतफेड अगोदरच्या कामाच्या दिवशी असेल. या कर्जावर ४ डिसेंबर, २०२३ पासून व त्यानंतर कोणतेही व्याज अदा करण्यात येणार नाही, असेही प्रसिद्धीपत्रात नमूद आहे.

सरकारी प्रतिभूती विनियम, २००७ च्या उप-विनियम २४(२) व २४ (३) अनुसार, दुय्यम सर्वसाधारण खातेवही लेखा किंवा रोखे प्रमाणपत्र यांच्या स्वरुपातील शासकीय रोख्यांच्या नोंदणीकृत धारकाकडील मुदत समाप्ती उत्पन्नाचे प्रदान हे, इलेक्ट्रॉनिक माध्यमामार्फत जमा निधीची सुविधा असलेल्या कोणत्याही बँकेतील धारकाच्या खात्यात जमा करुन त्याच्या बँक खात्याचे संबंधित तपशिलासह प्रदानादेशाव्दारे करण्यात येईल. रोख्यांच्या बाबतीतील प्रदान करण्यासाठी, अशा रोख्यांचा मूळ वर्गणीदार किंवा यथास्थिती उत्तरवर्ती धारक, बँकेकडे किंवा कोषागाराकडे किंवा भारतीय स्टेट बँकेच्या शाखेच्या उप कोषागाराकडे किंवा यथास्थिती त्याच्या दुय्यम बँकाकडे जर त्यांना व्याज प्रदान करण्यासाठी मुखांकित करण्यात आले असल्यास त्यांची नोंदणी करण्यात आली असल्यास त्याच्याकडे, त्यांच्या बँक खात्याचा संबंधित तपशील सादर करतील.

तथापि, बँक खात्याच्या संबंधित तपशिलाच्या/ इलेक्ट्रॉनिक माध्यमामार्फत निधी जमा करण्याच्या आदेशाच्या अभावी, नियत दिनांकास परतफेड करणे सुलभ व्हावे, यासाठी, ९.३७ टक्के महाराष्ट्र राज्य विकास कर्ज, २०२३ च्या धारकांनी, लोक ऋण कार्यालयात २० दिवस अगोदर त्यांचे रोखे सादर करावेत. रोख्यांच्या मागील बाजूस  “प्रमाणपत्रावरील देय मुद्दलाची रक्कम मिळाली.” असे      यथोचितरीत्या नमूद करुन ते रोखे परतफेडीसाठी सादर करावेत.

भारतीय स्टेट बँकेच्या किंवा तिच्या कोणत्याही सहयोगी बँकांच्यामार्फत ज्या ठिकाणी कोषागाराचे काम केले जाते त्या ठिकाणी ते रोखे रोखा प्रमाणपत्राच्या स्वरुपात असल्यास, ते संबंधित बँकेच्या शाखेत सादर करावेत आणि ते कोषागार किंवा उपकोषागार येथे सादर करु नयेत, याची विशेष नोंद घ्यावी.

रोख्यांची रक्कम प्रदान करण्यासाठी जी ठिकाणे मुखांकित करण्यात आली असतील त्या ठिकाणांखेरीज अन्य ठिकाणी ज्या रोखेधारकांना, रक्कम स्वीकारायची असेल, त्या रोखेधारकांनी ते रोखे नोंदणीकृत व विमाबध्द डाकेने संबंधित लोक ऋण कार्यालयात यथोचितरित्या पाठवावेत. लोक ऋण कार्यालय हे, महाराष्ट्र राज्यात शासकीय कोषागाराचे काम करणा-या भारतीय स्टेट बँकेच्या किंवा तिच्या सहयोगी बँकेच्या कोणत्याही शाखेत कोषागारात/उपकोषागारात देय असलेल्या धनाकर्षाव्दारे त्याचे प्रदान करील,असे वित्त विभागामार्फत कळविण्यात आले आहे.

००००

वंदना थोरात/विसंअ

कार्तिकी यात्रेनिमित्त पंढरपूर येथे भाविकांना सोयी-सुविधा उपलब्ध कराव्यात – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

मुंबई, दि. 6 :- पंढरपूर (जि.सोलापूर) येथे कार्तिकी यात्रा 14 ते 27 नोव्हेंबर 2023 या कालावधीमध्ये होत आहे. या यात्रेसाठी पंढरपूर शहरात महाराष्ट्र राज्यासह व अन्य राज्यातून भाविक मोठ्या संख्येने येतात. या भाविकांना सोयी-सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. त्यासाठी आवश्यक असलेला निधी जिल्हा नियोजन समिती व सीएसआर फंडातून उपलब्ध करून देण्यात येईल, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.

यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील व्ही. सी. रूम येथून जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, पोलीस अधीक्षक शिरीश सरदेशपांडे, जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, अपर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब कांबळे, प्रांत अधिकारी तथा इन्सिडेंट कमांडर गजानन गुरव, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, पंढरपूर सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अमित निमकर, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शक्तीसागर ढोले, पंढरपूरचे तहसीलदार सुशील बेल्हेकर, पंढरपूर नगरपालिका मुख्याधिकारी प्रशांत जाधव यांच्यासह अन्य संबंधित विभाग प्रमुख उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले की, पंढरपूर येथे कार्तिकी यात्रेनिमित्त येणाऱ्या भाविकांना जिल्हा प्रशासन व मंदिर समिती यांच्याकडून देण्यात येणाऱ्या सोयी-सुविधा व्यतिरिक्त अन्य सोयी सुविधा तसेच विशेष बाब म्हणून खर्च करावयाच्या कामासाठी जिल्हा नियोजन समिती किंवा सीएसआर फंडातून निधी उपलब्ध करून दिला जाईल. येथे येणारा एकही भाविक पायाभूत सोयीसुविधा पासून वंचित राहणार नाही यासाठी विशेष दक्षता घ्यावी.

शहरात कोठेही अस्वच्छता राहणार नाही यासाठी दक्षता घ्यावी. यात्रेनिमित्त निर्माण करण्यात आलेल्या 5 नियंत्रण कक्षावर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्रीय नियंत्रण कक्ष तयार करावे. दर्शन रांग लांब जात असल्याने दर्शन रांगेत ठिकठिकाणी भाविकांना विसावा घेण्यासाठी जागा उपलब्ध करून द्यावी व त्या ठिकाणी त्यांच्यासाठी आवश्यक त्या सोयीसुविधा निर्माण कराव्यात. तसेच स्कायवाकच्या ठिकाणीही भाविकांसाठी बैठक व्यवस्था करावी, अशा सूचना पालकमंत्री श्री. पाटील यांनी दिल्या.

23 नोव्हेंबर 2023 रोजी शुद्ध कार्तिकी एकादशी असल्याने या दिवशी शासकीय महापूजा उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते होत असते. सर्व संबंधित विभागानी त्यांच्यावर सोपवलेली जबाबदारी परस्परात समन्वय ठेऊन चोखपणे पार पाडावी, अशी सूचना पालकमंत्री श्री. पाटील यांनी करून दि. 16 नोव्हेंबर 2023 रोजी जिल्हा प्रशासन व मंदिर समितीच्यावतीने भाविकांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या सोयी सुविधांची पाहणी पंढरपूर येथे येऊन करणार असल्याचेही सांगितले.

यात्रा कालावधीत पंढरपूर येथे जनावरांचा मेळावा भरत असतो, परंतु मागील एक दोन वर्षात लंपी आजारामुळे जनावरांचे मेळावे किंवा बाजार भरले नाहीत. त्या पार्श्वभूमीवर  जनावरांचा मेळावा घेण्याचे नियोजन असेल तर लंपीग्रस्त जनावरे या मेळाव्यास येणार नाहीत याबाबत पशुसंवर्धन विभागाने दक्षता घ्यावी, अशी सूचना पालकमंत्री श्री. पाटील यांनी केली. तसेच जिल्हाधिकारी यांनी पुढील एक-दोन दिवसात जिल्हास्तरावर या अनुषंगाने पशुसंवर्धन विभागाची बैठक घेऊन पंढरपूर येथे मेळावा घेऊ शकतो का याची खात्री करावी असेही त्यांनी सूचित केले.

प्रारंभी जिल्हाधिकारी श्री. आशीर्वाद यांनी कार्तिकी यात्रा 2023 साठी जिल्हा प्रशासन व मंदिर समितीच्या वतीने करण्यात येत असलेल्या सोयी सुविधांची माहिती दिली. पोलीस अधीक्षक श्री.  सरदेशपांडे यांनी पोलीस विभागाच्या वतीने भाविकांच्या सुरक्षेसाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. यावेळी प्रांताधिकारी श्री. गुरव व मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी श्री शेळके तसेच मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ औसेकर महाराज यांनीही बैठकीत केलेल्या कामकाजाची माहिती दिली.

0000

निलेश तायडे/विसंअ

मराठी भाषा विद्यापीठ पुढील वर्षी जूनपासून सुरू करण्याचे नियोजन -उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील

मुंबई, दि. ६ : रिद्धपूर (जि.अमरावती) येथील मराठी भाषा विद्यापीठासाठी विधिमंडळाच्या येत्या हिवाळी अधिवेशनात विधेयक मंजूर करून पुढील वर्षीच्या जूनपासून मराठी भाषा विद्यापीठ सुरू करण्याचे नियोजन करण्यात येईल, असे राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग, संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

रिद्धपूर (जि.अमरावती) येथील मराठी भाषा विद्यापीठ स्थापनेसाठी गठित करण्यात आलेल्या समितीने आज मंत्री श्री. पाटील यांच्या दालनात मराठी भाषा विद्यापीठ स्थापनेबाबतचा अहवाल सादर केला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी समितीचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, सदस्य प्राचार्य डॉ. दिलीप धोंडगे, डॉ. रमेश वरखेडे, डॉ. अविनाश आवलगावकर, श्री. कारंजेकर, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेश देवळाणकर आदी उपस्थित होते.

मंत्री श्री. पाटील म्हणाले की, मराठी भाषा विद्यापीठ सुरू व्हावे, अशी मागणी अनेक वर्षापासून होती. या मागणीचे महत्व लक्षात घेऊन शासनाने समितीचे गठन केले होते. समितीने दोन महिन्यांत आपला अहवाल पूर्ण केला आहे. हा अहवाल मंत्रिमंडळाच्या बैठकीत सादर करण्यात येईल. मराठी भाषा विद्यापीठ स्थापनेचे ऐतिहासिक काम मार्गी लावल्याबद्दल त्यांनी समितीच्या सदस्यांचे आभार मानले. तसेच या मसुदा समितीचे रूपांतर मराठी भाषा विद्यापीठाच्या सल्लागार समितीत करावे.

मराठी भाषा विद्यापीठाच्या स्थापनेसाठी समितीचे यापुढेही सहकार्य राहील, असा विश्वास व्यक्त करीत मंत्री श्री. पाटील म्हणाले की, रिद्धपूर येथे लीळा चरित्र लिहिण्याबरोबरच मराठी भाषेतील ग्रंथ निर्मितीचे केंद्रही राहिले आहे. विद्यापीठाच्या माध्यमातून मराठी भाषेचे जतन आणि संवर्धन होईल, असेही त्यांनी सांगितले.

मराठी भाषा विद्यापीठात विविध ज्ञानशाखा, शिक्षणक्रम आणि अभ्यासक्रम राबविताना विद्यार्थी रोजगारक्षम होतील याचाही विचार करण्यात आला आहे. पारंपरिक विद्यापीठांपेक्षा मराठी भाषा विद्यापीठ महाराष्ट्राची संस्कृती, परंपरा वेगळेपण केंद्रस्थानी ठेऊन अभ्यासक्रमांच्या माध्यमातून संस्कृतीचे संवर्धन आणि जतन करण्यात येईल, असे समितीचे अध्यक्ष डॉ. मोरे यांनी सांगितले.

‘सेल्फी विथ मेरी माटी’ अभियानाची गिनीज बुकमध्ये नोंद – उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील

मुंबई, दि. ६ : देशासाठी स्वातंत्र्य सैनिकांनी केलेला त्याग आणि बलिदानामुळे आजचे स्वातंत्र्याचे अमृतक्षण आपण अनुभवतो आहोत. राष्ट्राचे रक्षण करणाऱ्या वीरांना श्रध्दांजली अपर्ण करण्याच्या उद्देशाने देशभरात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी “मेरी माटी मेरा देश, मिट्टी को नमन, वीरो को वंदन’ हे अभियान जाहीर केले होते. याचाच एक भाग म्हणून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून “सेल्फी विथ मेरी माटी” अभियान राबविले. या अभियानाची गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद झाली आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात विश्वविक्रम अभियान  प्रमाणपत्र वितरण सोहळा पूर्व तयारीबाबत आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकास चंद्र रस्तोगी, उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

मंत्री श्री. पाटील म्हणाले की, प्रत्येक नागरिकाच्या मनात स्वदेश, स्वधर्म आणि स्वाभिमान असलाच पाहिजे. बलिदानाचे स्मरण करुन नव्हे तर त्यांची निष्ठा तरुणांपर्यंत पोहोचवली पाहिजे, याच उद्देशाने गेल्या एक ते दीड महिन्यांपासून “सेल्फी विथ मेरी माटी” राज्यातील सर्व विद्यापीठे, महाविद्यालये, उच्च शैक्षणिक संस्थांनी विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक व इतर सर्व संबंधितांनी हे अभियान यशस्वीपणे राबवून विश्वविक्रम केला आहे. ही अभिमानाची बाब आहे.

या उपक्रमाचा  प्रमाणपत्र वितरण सोहळा राज्य संपर्क कार्यालय राष्ट्रीय सेवा योजना, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, महाराष्ट्र शासन आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने दि. ९ नोव्हेंबर २०२३ रोजी दु.१.०० वाजता सर कावसजी जहांगीर दिक्षान्त सभागृह येथे होणार आहे.

0000

काशीबाई थोरात/विसंअ

‘कुणबी’ नोंदी शोधण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात विशेष कक्ष कार्यान्वित करावेत – निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे

मुंबई, दि. 6 : मराठा- कुणबी, कुणबी- मराठा जातीच्या पात्र व्यक्तींना राज्यात सक्षम अधिकाऱ्यांच्या माध्यमातून जात प्रमाणपत्र देण्याच्या अनुषंगाने कार्यपद्धती विहित करण्यासाठी गठित समितीचे कार्यक्षेत्र संपूर्ण राज्य करण्यात आले आहे. त्यानुसार राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांनी मराठवाड्याच्या धर्तीवर विशेष कक्ष स्थापन करून या कक्षाला मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावे, असे निर्देश निवृत्त न्यायमूर्ती तथा गठित समितीचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी दिले.

शासन निर्णय 3 नोव्हेंबर 2023 नुसार मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीच्या पात्र व्यक्तींना संपूर्ण महाराष्ट्रात सक्षम प्राधिकाऱ्यांमार्फत जात प्रमाणपत्र देण्याच्या अनुषंगाने कार्यपध्दती विहित करण्यासाठी गठित समितीचे कार्यक्षेत्र संपूर्ण महाराष्ट्र राज्य करण्यात आले आहे. या समितीची 13 वी बैठक आज न्यायमूर्ती संदीप शिंदे (निवृत्त) यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झाली. त्यावेळी ते बोलत होते.

या बैठकीस अपर मुख्य सचिव (सेवा) नितीन गद्रे, डॉ. राजगोपाल देवरा  अपर मुख्य सचिव (महसूल), मा. मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव विकास खारगे, विधी व न्याय विभागाचे सचिव अमोघ कलोती, इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सचिव वीरेंद्र सिंह, सामान्य प्रशासन विभागाचे सचिव सुमंत भांगे आदी उपस्थित होते. विभागीय आयुक्त, सर्व जिल्हाधिकारी यांच्यासह , मनोज जरांगे पाटील यांचे प्रतिनिधी जिल्हाधिकारी कार्यालय, जालना व छत्रपती संभाजीनगर येथून दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले होते.

यावेळी सर्व विभागीय आयुक्त व सर्व जिल्हाधिकारी यांनी मराठवाड्याच्या धर्तीवर प्रत्येक जिल्ह्यामध्ये विशेष कक्ष स्थापन करून त्या कक्षाला मनुष्यबळ पुरवण्यात यावे.  तसेच मराठवाडा विभागाने ज्या पद्धतीने काम केले आहे त्या पद्धतीने अभिलेख शोधण्याचे काम करावे.  सन 1967 पूर्वीचे अभिलेख तपासण्याच्या अनुषंगाने करावयाची कार्यवाही याबाबत चर्चा करण्यात आली.  विभागीय आयुक्त नाशिक, अमरावती आणि नागपूर यांनी यापूर्वी ‘कुणबी’ जातीचे प्रमाणपत्र देण्याच्या अनुषंगाने झालेली कार्यवाही याबाबत समितीस अवगत केले.  सक्षम प्राधिकारी यांनी मागील 5 वर्षातील दिलेली मराठा-कुणबी, कुणबी-मराठा या जात प्रमाणपत्रांची वर्षनिहाय माहिती विहित विवरणपत्रात उपलब्ध करुन देण्याबाबत सूचित करण्यात आले.  त्यामध्ये प्रामुख्याने जात प्रमाणपत्र मंजूर करताना ग्राह्य धरण्यात आलेले पुरावे, जात प्रमाणपत्र नामंजूर करताना नामंजुरीची कारणे याबाबतचा तपशील शुक्रवार 10 नोव्हेंबर 2023 रोजीपर्यंत सादर करण्याबाबत सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सूचित करण्यात आले.

न्यायमूर्ती श्री. शिंदे (निवृत्त) समितीने गेल्या महिन्याभरात मराठवाडा विभागात जिल्हानिहाय आढावा बैठक घेतलेली होती.  त्यानुषंगाने संबंधित जिल्हाधिकारी यांच्याकडून कागदपत्रे, अभिलेख तपासणीचे कामकाज प्रभावीपणे करण्यात आले.  मराठवाडा विभागात 1.74 कोटींपेक्षा जास्त नोंदींची तपासणी केली आहे. त्यामध्ये सद्य:स्थितीत 14,976 ‘कुणबी’ जातीच्या नोंदी आढळलेल्या आहेत.  त्यापैकी 50 टक्क्यांपेक्षा जास्त नोंदींचे स्कॅनिंग करण्याचे काम मराठवाडा विभागात झालेले आहे. शोधण्यात आलेली जुनी कागदपत्रे (मोडी / ऊर्दू / फारसी इ.) संबंधित भाषा तज्ञांकडून भाषांतरित करुन, डिजिटलाईजेशन तसेच प्रमाणिकरण करुन संकेतस्थळावर प्रसिध्द करण्याबाबत सूचित करण्यात आले.

महाराष्ट्र राज्यात स्वातंत्र्यपूर्व काळात जी संस्थाने होती, त्या संस्थांनांकडून ज्या अभिलेखात ‘कुणबी’ जातीच्या नोंदी आढळून येतील असे कायदेशीर अभिलेख उपलब्ध करुन देण्याबाबत संबंधित जिल्हाधिकारी यांना सूचना देण्यात आल्या.

उपलब्ध अभिलेखांशिवाय अन्य कोणत्या प्रकारच्या अभिलेखांत ‘कुणबी’ जातीच्या नोंदी आढळल्यास त्या अभिलेखांबाबत शुक्रवार  10 नोव्हेंबर, 2023 पर्यंत समितीस अवगत करण्याबाबत सूचना यावेळी देण्यात आल्या.

०००००

मराठा समाजातील मुला-मुलींसाठी वसतिगृहे सुरु करण्याची कार्यवाही करावी –   उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

मुंबई, दि. ५ : राज्यातील सर्व जिल्ह्यात मराठा समाजातील मुलांसाठी शंभर तसेच मुलींसाठी देखील शंभर निवासी क्षमतेचे वसतिगृह तातडीने सुरु करण्याच्या कार्यवाहीबाबत नियोजन विभागाने सर्व जिल्हाधिकारी यांना सूचित करावे. त्याच प्रमाणे याबाबतचा शासन निर्णय लवकर निर्गमित करावा, अशा सूचना उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी संबंधितांना दिल्या. त्यावेळी ते बोलत होते.

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मराठा आरक्षण आणि सुविधांसाठी गठित केलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक आज मंत्रालयात झाली.

यावेळी राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, नियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, सामान्य प्रशासन विभागाचे सचिव सुमंत भांगे, विधी व न्याय विभागाचे सचिव सतीश वाघोले, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मंगेश मोहिते यांच्यासह संबंधित उपस्थित होते.

मंत्री श्री.पाटील यांनी मराठा समाजातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी राबवण्यात येत असलेल्या सर्व योजना गतिमानतेने राबवण्याचे सूचित करत सर्व जिल्ह्यात मराठा समाजातील मुला मुलींसाठी प्रत्येकी शंभर निवासी क्षमतेचे वसतिगृह सुरु करण्यात यावे. राज्यस्तरावर नियोजन विभागाने नोडल एजन्सी म्हणून काम पाहावे. तसेच ओबीसी व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुलींना शंभर टक्के शुल्क सवलत देण्याकरीता ही आवश्यक ती कार्यवाही करण्याबाबत सूचित केले.

तसेच अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या मार्फत ग्रामीण भागातील मराठा व इतर वर्गासाठी ट्रॅक्टर खरेदीसाठीच्या योजनेत ज्या ट्रॅक्टर कंपन्या शेतक-यांना खरेदी किमतीवर सवलत (सबसिडी) देण्यासाठी तयार असतील, अशा सर्व इच्छुक कंपन्यांसोबत  सामंजस्य करार करावा.  जेणेकरुन शेतक-यांना त्यांच्या इच्छेने हव्या त्या कंपनीचा ट्रॅक्टर खरेदी करता येईल, असेही सांगितले. त्याचप्रमाणे ‘सारथी’ तसेच अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ या दोन्ही संचालक मंडळावरील रिक्त जागा तातडीने भरण्यात याव्यात. दोन्ही महामंडळांनी कोणताही नवीन धोरणात्मक निर्णय घेण्यापूर्वी त्याबाबतच्या मसुद्याला मराठा आरक्षण आणि सुविधांसाठी गठित केलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत  मान्यता घेणे हे बंधनकारक आहे, असेही  मंत्री श्री.पाटील यांनी संगितले.

ओबीसी प्रवर्गासाठी नॉन क्रिमिलियर बाबत जे निकष आहेत ते निकष आर्थिकदृष्ट्या मागास (ई डब्ल्यूएस) समाजातील प्रवर्गासाठी लागू करण्यासंदर्भात जी संदिग्धता आहे ती दूर करण्यासाठी तातडीने शासन निर्णय निर्गमित करण्याचे त्यांनी आदेशित केले.

यावेळी मराठा कुणबी, कुणबी मराठा जातीचे जात प्रमाणपत्र पात्र व्यक्तींना देण्याबाबतची कार्यपद्धती विहित करण्यासाठी गठित न्या.शिंदे समितीच्या कामकाजाचा ही आढावा घेण्यात आला. या समितीचे मराठवाड्यातील काम जवळपास पूर्ण झाले असून राज्यभर या समितीची व्याप्ती वाढवण्यात आली आहे. सर्व जिल्ह्यात या समितीमार्फत कामकाज सुरु असून जिल्हाधिकारी कार्यालयात यासाठीचा विशेष कक्ष ही स्थापन करण्यात आला आहे.

०००००

वंदना थोरात/विसंअ

 

 

ताज्या बातम्या

संत भोजाजी महाराज देवस्थानच्या पर्यटनस्थळाचा दर्जा उन्नतीसाठी प्रस्ताव करा- मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

0
मुंबई, दि. १४ : विदर्भाची पंढरी समजल्या जाणाऱ्या संत भोजाजी महाराज देवस्थानच्या पर्यटनस्थळाचा 'ब' दर्जा उन्नतीसाठी प्रस्ताव सादर करावा, असे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर...

उमरेड तालुक्यातील खाणपट्ट्यांची तपासणी करा – मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

0
मुंबई, दि. १४ : उमरेड तालुक्यातील शासकीय जागेवरील कोणतीही खाणपट्टी मंजूर करू नये. लीज संपलेल्या खाणपट्ट्यांची सोळा मुद्द्यांवर आधारित तपासणी करावी. खणलेल्या खाणपट्ट्यांच्या ठिकाणी...

महाराष्ट्र शासनाचे अधिकृत संकेतस्थळ तांत्रिक अद्ययावत करण्यासाठी १५ व १६ मे रोजी बंद

0
मुंबई, दि. १४: महाराष्ट्र राज्य शासनाचे अधिकृत संकेतस्थळ www.maharashtra.gov.in  व शासन निर्णय संकेतस्थळ www.gr.maharashtra.gov.in  हे पोर्टल नियमित देखभालीबरोबरच तांत्रिकदृष्ट्या अद्ययावत करण्यात येणार आहे, त्यासाठी...

प्रलंबित वनहक्क दावे निकाली काढण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम आखा – मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

0
मुंबई दि. १४ : प्रलंबित वनहक्क दावे निकाली काढण्यासाठी कालबद्ध कार्यक्रमाची आखणी करून राज्यात या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी नियोजन करावे. याचबरोबर सामुदायिक वनहक्क...

पालघर व ठाणे जिल्ह्यात मत्स्यव्यवसायाच्या नुकसान भरपाईसाठी सहकार्य – मंत्री मकरंद जाधव-पाटील

0
मुंबई, दि. १४ : अवकाळी पावसामुळे पालघर व ठाणे जिल्ह्यात मासेमारी बोटींचे, जाळी, सुकी मासळीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. नुकताच मत्स्य व्यवसायाला कृषी...