गुरूवार, मे 15, 2025
Home Blog Page 940

महापरिनिर्वाण दिनासाठी सुविधांबाबत सूक्ष्म नियोजन करून अंमलबजावणी करावी – मुख्य सचिव मनोज सौनिक

मुंबई, दि. ६ : दादर येथील चैत्यभूमीवर ६ डिसेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त लाखो अनुयायी अभिवादन करण्यासाठी येत असतात.  देशभरातून अनुयायी १ डिसेंबरपासूनच चैत्यभूमीकडे येतात. त्यामुळे चैत्यभूमी व शिवाजी पार्क येथे अनुयायांसाठी उत्तम व्यवस्था करावी. त्यासाठी सूक्ष्म नियोजन करून अंमलबजावणी करावी,  अशा सूचना मुख्य सचिव मनोज सौनिक यांनी आज दिल्या.

मुख्य सचिव कार्यालयाच्या समिती कक्षात महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने चैत्यभूमी व शिवाजी पार्क येथे मुंबई महानगरपालिकेच्या वतीने पुरविण्यात येणाऱ्या सुविधांबाबत मुख्य सचिव श्री.सौनिक यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी पुरविण्यात येणाऱ्या सुविधांचा आढावा घेताना मुख्य सचिव श्री. सौनिक बोलत होते. बैठकीस मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी, मुंबईचे विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे प्रधान सचिव आशिष शर्मा, जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर, महानगर पालिकेचे उपायुक्त श्री. बिरादार, महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचे उपाध्यक्ष महेंद्र साळवे, सरचिटणीस नागसेन कांबळे आदी उपस्थित होते.

महापरिनिर्वाण दिनाला येणाऱ्या अनुयायांकरिता पिण्याचे पाणी, शौचालय आदींची सुविधा सज्ज करण्याचे निर्देश देत मुख्य सचिव श्री. सौनिक म्हणाले की, मागील वर्षापेक्षा जास्त सुविधा देण्यात याव्यात. शौचालये ही पारंपरिक पद्धतीची न वापरता केमिकल पद्धतीची उपयोगात आणावी. गर्दीची ठिकाणे चिन्हांकित करून तेथे आधुनिक धूळ नियंत्रण यंत्रांचा उपयोग करून धूळ नियंत्रित करावी. चैत्यभूमी येथील संरक्षक भिंतीचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने पूर्ण करावे. चैत्यभूमी परिसरात वॉटरप्रूफ मंडप टाकण्यात यावा. प्रत्येक विभागाने आपल्याला दिलेली जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडावी. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची संख्या वाढवून कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील, याची दक्षता घ्यावी.

बैठकीत महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीच्या वतीने श्री. कांबळे यांनी विविध मागण्या मांडल्या. याप्रसंगी उपायुक्त श्री. बिरादार यांनी पुरविण्यात येणाऱ्या सुविधांची सादरीकरणाद्वारे माहिती दिली. बैठकीला संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

००००

नीलेश तायडे/विसंअ

 

उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचे मुंबईत आगमन

मुंबई, दि. ६ : उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय  विमानतळावर आज सायंकाळी भारतीय वायू सेनेच्या विमानाने आगमन झाले.

राज्यपाल रमेश बैस, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, कौशल्य विकास व पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.

यावेळी मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर, अतिरिक्त पोलीस महासंचालक निखिल गुप्ता, दिव्यांग विभागाचे सचिव अभय महाजन, पोलीस व राजशिष्टाचार विभागाचे  वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते लाभधारकांना प्रातिनिधीक स्वरूपात ‘आनंदाचा शिधा’ वाटप

कोल्हापूर, दि. 6 (जिमाका) : जिल्ह्यात सुमारे ५ लाख ७६ हजार ६४४ कुटुंबांना ‘आनंदाचा शिधा’ वितरीत केला जाणार आहे. यामध्ये एक किलो साखर, एक लिटर खाद्यतेल तर प्रत्येकी अर्धा किलोची रवा, चणाडाळ, मैदा आणि पोह्याची पाकिटं असे एकूण सहा जिन्नस प्रति शिधापत्रिकास ई-पॉस प्रणालीद्वारे प्रति संच शंभर रुपये या दराने वितरीत करण्यात येणार आहेत. या अनुषंगाने पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरूपात १० पात्र लाभधारकांना जिल्हास्तरावर ‘आनंदाचा शिधा’ वाटप करण्यात आला. यावेळी खासदार धनंजय महाडिक, खासदार धैर्यशील माने, जिल्हाधिकारी राहूल रेखावार, मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण उपस्थित होत्या.

            राज्य सरकारकडून दिवाळीनिमित्त वाटप करण्यात येणारा आनंदाचा शिधा सर्व तालुक्यातील सर्व पात्र लाभार्थ्यांना मिळेल याची दक्षता घ्यावी अशा सूचना पालकमंत्री यांनी पुरवठा विभागाला दिल्या. ते पुढे म्हणाले, आनंदाचा शिधा व इतर धान्य योजनांचा लाभ सर्व पात्र लाभार्थ्यांना मिळावा, यासाठी जे शिधापत्रिका धारक ऑनलाइन नाहीत त्यांना तत्काळ ऑनलाइन करून घ्यावे. दिवाळीत राज्यातल्या नागरिकांना १०० रुपयांमध्ये आनंदाचा शिधा दिला जात आहे. राज्यातील सर्व अंत्योदय अन्न योजना आणि प्राधान्य कुटुंब शिधापत्रिकाधारकांना हा आनंदाचा शिधा मिळणार आहे.

कोल्हापूर जिल्ह‌्यातील ‘आनंदाचा शिधा’ तालुकानिहाय पात्र लाभार्थी संख्या

आजरा – २१८६४, भुदरगड – २५८२४, चंदगड – २९२९०, गडहिंग्लज- ३४०८०, गगनबावडा- ५८३१, हातकणंगले – ६६६५५, इचलकरंजी शहर- ३९०१८, कागल – ३९९९८, करवीर- ७१९७१, कोल्हापूर शहर- ७३६६८, पन्हाळा-४४३८९, राधानगरी-३४७९१, शाहूवाडी- २९९२३, शिरोळ – ५९३४२.

****

कारागिरांनो… प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजनेचा घ्या लाभ

देशाचे प्रधानमंत्री मा. श्री. नरेंद्र मोदी यांनी गावातील बलुतेदारांना त्यांच्या श्रमाचे योग्य मूल्य मिळावे, त्यांचे कौशल्य आणखी वाढावे, यासाठी प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना सुरू करण्याची घोषणा केली होती. कारागिरांच्या विकासासाठी ही नवीन योजना सुरू करण्यात आली आहे. देशातील बेरोजगारी कमी करणे आणि गरीब कारागिरांना अधिक रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देऊन त्यांची आर्थिक स्थिती सुधारणे हा या योजनेचा उद्देश आहे. ही योजना पारंपारिक कौशल्य असलेल्या लोकांना त्यांचा व्यवसाय उभारण्यास मदत करेल. या योजनेत लोकांना केवळ कर्जच मिळणार नाही तर कौशल्य प्रशिक्षणही मिळणार आहे. लोहार, सोनार, कुंभार, सुतार आणि मोची यांसारखी पारंपारिक कौशल्ये असलेल्या लोकांना पंतप्रधान विश्वकर्मा योजनेचा लाभ मिळेल. अशा 18 पारंपरिक कामांचा या योजनेत समावेश करण्यात आला आहे.

या योजनेंतर्गत कारागिरांना आधुनिक साधनांचे प्रशिक्षण दिले जाईल आणि या प्रशिक्षणादरम्यान 500 रुपये भत्ता दिला जाईल. यासोबतच, प्रशिक्षण पूर्ण केल्यावर, उपकरणे खरेदी करण्यासाठी 15 हजार रुपयांपर्यंतची मदत देखील दिली जाणार आहे.

पीएम विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजनेचे फायदे

  • आर्थिक मदत
  • जगभरातील बाजारपेठांमध्ये प्रवेश असेल
  • वाणिज्य आणि उद्योजकता मंत्रालयाशी संबंधित
  • नवीनतम तांत्रिक प्रगतीमध्ये प्रवेश
  • प्रगत कौशल्य प्रशिक्षण

प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजनेसाठी पात्रता

स्वंयरोजगाराच्या आधारावर असंघटीत क्षेत्रात हात आणि साधनांनी काम करणारा आणि योजनेतील 18 व्यवसायापैकी कुटुंब आधारित पारंपारिक कारागिर नोंदणीसाठी पात्र असेल. प्रत्येक कुटुंबातील एका सदस्यालाच लाभ मिळेल. कुटुंब म्हणजे पती, पत्नी आणि अविवाहित मुले होय. लाभार्थीचे वय नोंदणीच्या तारखेला 18 वर्षे किंवा त्याहून अधिक असावे.

जर एखाद्याला योजनेचा लाभ घ्यावयाचा असल्यास त्याला त्याच व्यवसायात काम करावे लागेल, ज्यामध्ये त्याने नोंदणीवेळी व्यवसाय करण्याची माहिती दिली होती. मागील 5 वर्षात स्वंयरोजगार तथा व्यवसाय विकासासाठी इतर योजनांतर्गत कर्ज घेतले नसावे. (उदा. केंद्र, सरकार किंवा राज्य सरकारचे पीएमईजीपी / सीएमईजीपी तथापी मुद्रा ) पीएम स्वनिधीचे लाभार्थी ज्यांनी त्यांच्या कर्जाची परतफेड केली आहे, ते प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेंतर्गत पात्र असतील. सरकारी सेवेत कार्यरत असलेले लोक आणि त्यांचे कुटुंबीय या योजनेंतर्गत पात्र असणार नाहीत.

प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजनेचे लाभ/ फायदे

यशस्वी नोंदणी आणि पडताळणीनंतर लाभार्थीला पीएम विश्वकर्मा प्रमाणपत्र आणि ओळखपत्र दिले जाईल. कौशल्य पडताळणीनंतर पाच दिवसीय बेसिक प्रशिक्षण व 15 दिवसीय प्रगत प्रशिक्षण दिले जाणार आहे. प्रशिक्षण कालावधीत दररोज प्रत्येक प्रशिक्षणार्थीना 500 रुपये विद्यावेतन मिळणार आहे. त्यानंतर प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या कारागिरांना टूलकिट (व्यवसाय साहित्य) खरेदीसाठी 15 हजार रुपयांचे ई-व्हाऊचर दिले जाईल. मूलभूत कौशल्य प्रशिक्षणानंतर लाभार्थी योजनेच्या लाभासाठी पात्र होईल. पहिल्या टप्प्यात 5 टक्के व्याजासह 18 महिन्यांच्या परतफेडीच्या कालावधीसह 1 लाखापर्यंतचे तारणमुक्त कर्ज मिळेल. दुसऱ्या टप्प्यात प्रगत कौशल्य प्रशिक्षण घेतलेल्या, तसेच डिजिटल व्यवहार स्वीकारलेल्या कारागिरांना 18 महिन्यांच्या परतफेडीच्या कालावधीसह 2 लाखापर्यंत तारणमुक्त कर्ज मिळेल. डिजिटल व्यवहारास प्रोत्साहन, लाभार्थीना जास्तीत जास्त 100 व्यवहारांसाठी मासिक प्रती व्यवहार एक रुपया प्रोत्साहनपर मिळेल. मार्केटिंग सहाय्य प्रचार-प्रसिध्दी, गुणवत्ता प्रमाणीकरण, ब्रँडिंग व प्रदर्शने यासाठी त्यांना वेगवेगळ्या शासकीय यंत्रणांचे सहकार्य लाभेल.

या कारागिरांचा योजनेत समावेश

सुतार,  होड्या बनवणारे,  हत्यारे बनवणारे,  लोहार,  टाळा बनवणारे,  हातोडा आणि टूलकिट बनविणारे, सोनार, कुंभार,  मूर्तीकार, चांभार, मेस्त्री, चटई आणि झाडू बनवणारे, पारंपारिक बाहुल्या आणि खेळणी बनविणारे, न्हावी, हार बनविणारे, धोबी, शिंपी, माशाचे जाळे या कारागिरांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.

 अशी करा नोंदणी

ग्रामीण भागातील सुविधा केंद्रावर (सीएससी) आपली माहिती भरून नोंदणी करावी. ही माहिती गावाचे सरपंच तपासून योग्य असलेल्या उमेदवारांची माहिती व अर्ज जिल्हा समितीकडे पाठवितात. जिल्हास्तरीय समिती या यादीतील कारागिरांना प्रशिक्षणासाठी निवड केली जाते.

 जास्तीत जास्त कारागिरांनी योजनेचा लाभ घ्यावा – जिल्हाधिकारी

ठाणे जिल्ह्यातील खेड्यापाड्यातील कारागिरांनी प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेचा लाभ घेऊन आपले कौशल्य विकसित करावे. आपले जीवनमान उंचावून कौशल्य विकसित करावे. जिल्ह्यातून मोठ्या संख्येने विश्वकर्मा कारागीर निर्माण व्हावे, यासाठी जास्तीत जास्त कारागिरांनी सामूहिक सुविधा केंद्रावर नोंदणी करावी, असे आवाहन ठाणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी केले आहे.

 नंदकुमार वाघमारे

माहिती अधिकारीजिल्हा माहिती कार्यालय, ठाणे

कुपवाड्यातील भारत-पाक सीमेवर छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्या अनावरण

मुंबई, दि. ६: काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यातील भारत-पाकिस्तान सीमेनजीकच्या ४१ राष्ट्रीय रायफल (मराठा एलआय) या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा बसविण्यात आला आहे. या पुतळ्याचे लोकार्पण उद्या मंगळवार दि. ७ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. याप्रसंगी सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवारदेखील उपस्थित राहणार आहे. यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे जवानांसोबत दिवाळी फराळाचा आनंद देखील घेणार आहेत.

आम्ही पुणेकर या संस्थेच्या पुढाकाराने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा काश्मीरमधील कुपवाडा येथे बसविण्यासाठी आला आहे. २० ऑक्टोबर २०२३ रोजी मुंबई राजभवन येथून समारंभात छत्रपती शिवाजी महाराजांच्या या अश्वारुढ पुतळ्याचे ढोल ताशांच्या गजरात आणि जय भवानी जय शिवाजीच्या जयघोषात स्वागत करण्यात आले. तेथून राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी हिरवी झेंडी दाखवून कुपवाडाकडे हा पुतळा मार्गस्थ करण्यात आला होता.

महाराष्ट्रातून सुरु झालेला हा प्रवास सुमारे २२०० किमी अंतर पार करीत एका आठवड्यात कुपवाडा येथे पोहोचला. रस्त्यातील महत्त्वाच्या शहरांमधील ऐतिहासिक स्थळांच्या ठिकाणी या पुतळ्याचे पूजन करतानाच स्वागतही करण्यात आले. उद्या ७ नोव्हेंबर रोजी सकाळी दहाच्या सुमारास या पुतळ्याचे लोकार्पण मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते होणार असून यावेळी जम्मू -काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा, महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

कुपवाडा येथील भारतीय सैन्याच्या छावणीत या पुतळ्याच्या स्थानाचे भूमिपूजन यंदाच्या पाडव्याच्या दिवशीच करण्यात आले. त्यासाठी शिवनेरी, तोरणा, राजगड, प्रतापगड आणि रायगड या पाच किल्ल्यांवरील माती आणि पाणी आणण्यात आले होती. हा पुतळा साडेदहा फूट उंचीचा असून जमिनीपासून जवळपास तितक्याच उंचीच्या आणि ७ बाय ३ या आकाराच्या चौथऱ्यावर उभारण्यात येणार आहे. याठिकाणी पुतळ्याच्या मागे उंच भगवा ध्वज लावण्यात आला आहे.

पुतळ्याच्या समोरच्या दिशेने असलेल्या पर्वंतरांगांच्या पलीकडे पाकिस्तान आहे. अश्वारूढ पुतळ्यावरील शिवाजी महाराजांचे मुख आणि तलवार पाकिस्तानच्या दिशेने असावे अशा पद्धतीने पुतळा बसविण्यात आला आहे. त्यासाठी सुमारे १८०० ट्रक माती टाकून भराव करण्यात आला. शिवाय या भागातील हवामान, भूस्खलन याबाबी पाहता पक्के बांधकाम करून पाया तयार करण्यात आला आहे.

कळंबा कारागृहातील कैद्यांनी बनवलेल्या वस्तू विक्री केंद्राचा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते शुभारंभ

कोल्हापूर, दि. (जिमाका) : कळंबा कारागृहातील कैद्यांनी बनवलेल्या विविध वस्तू, फराळ, पणत्या व आकाश कंदील भव्य प्रदर्शन व विक्री केंद्राचा शुभारंभ वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आला.

दिवाळी मेळावा २०२३ या कार्यक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले की, काही कारागृह पोलिसांची अलीकडच्या काळात मलीन झालेली प्रतिमा प्रामाणिकपणाने काम करून बदलावी लागेल. आज जरी कारागृहात शिक्षा भोगणारे कैदी असले तरी ती हाडामासाची, मन, भावना आणि हृदय असलेली माणसेच आहेत. तेव्हा त्यांच्यात वर्तन बदल होईल ही भावना समोर ठेवून प्रयत्न करायला हवेत. कारागृहात बंदींना वस्तू, फराळ, विविध वस्तू बनविण्यासाठी मिळणारे हे प्रशिक्षण, शिक्षा संपल्यानंतर बाहेर जाऊन उर्वरित आयुष्याच्या पुनर्वसनासाठी उपयुक्त ठरेल. महाराष्ट्रात विविध कारागृहातील बंदीजणांनी बनवलेल्या वस्तूंना बाजारात ग्राहकांकडून मोठी मागणी असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

कारागृह अधीक्षक पांडुरंग भुसारे म्हणाले की, गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कारागृह विभागाचे पोलीस महासंचालक अमिताभ गुप्ता, जालिंदर सुपेकर, पोलीस महानिरीक्षक स्वाती शेळके यांच्या प्रोत्साहनातून महाराष्ट्रभर असे उपक्रम सुरू आहेत. अशा प्रयोगांमधून कारागृहात शिक्षा भोगत असलेले बंदीजन आणि समाजामध्ये सलोखा रहावा, असा आमचा प्रयत्न आहे. बंदीजणांनी रात्रंदिवस राबून मोठ्या परिश्रमाने या वस्तू तयार केल्या आहेत.

कार्यक्रमास कारागृह अधीक्षक पांडुरंग भुसारे, उपअधीक्षक साहेबराव आडे, वरिष्ठ तुरुंग अधिकारी सतीश कदम, वरिष्ठ तुरुंग अधिकारी सोमनाथ मस्के, कारखाना व्यवस्थापक शैला वाघ, वरिष्ठ तुरुंग अधिकारी चंद्रशेखर देवकर, कारखाना तुरुंग अधिकारी प्रवीण आंधेकर, तुरुंग अधिकारी अविनाश भोई, तुरुंग अधिकारी विठ्ठल शिंदे, प्रा. मधुकर पाटील, कोल्हापूर बाजार समितीचे संचालक सूर्यकांत पाटील, बिद्री कारखान्याचे संचालक प्रवीणसिंह भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.

दिवाळीसाठी लागणाऱ्या विविध वस्तूंचे विक्री प्रदर्शन १९ नोव्हेंबरपर्यंत सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत सर्वांसाठी खुले राहणार आहे. कळंबा कारागृह आवारात भरवण्यात आलेल्या या विक्री प्रदर्शनाचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन यावेळी कारागृहाच्या वतीने करण्यात आले.

०००

मुनावळे येथील पर्यटन स्थळाच्या जागेची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी

सातारा, दि. ५ : सातारा जिल्ह्यातील जावली तालुक्यातील मुनावळे येथे अत्याधुनिक व सर्व सोयींनी युक्त असे अंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटन स्थळ विकसित करण्यात येत आहे. या माध्यमातून १०५ गावातील स्थानिकांना रोजगाराच्या प्रचंड संधी निर्माण होणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

मुख्यमंत्री श्री शिंदे यांनी मुनावळे पर्यटन स्थळाच्या जागेची पाहणी केली व ग्रामस्थांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, पुर्षोत्तम जाधव यांच्यासह प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

स्थानिकांना रोजगार मिळाला पाहिजे असे सांगून मुख्यमंत्री श्री शिंदे म्हणाले, स्थानिकांनी ही सुरू होत असलेल्या या पर्यटन स्थळाचा आर्थिक उन्नतीसाठी वापर करावा. हे पर्यटन स्थळ विकसित करताना स्थानिकांना त्या मध्ये सामावून घ्यावे. या परिसरात पर्यटनाच्या मोठ्या संधी आहेत. त्यामुळे कांदाटी खोऱ्यातील आणखी पर्यटन प्रकल्प उभारण्यात येणार आहे. त्यातून स्थानिकांना त्यांच्या घरा जवळ रोजगार मिळणार आहे. याचा फायदा स्थानिक व येणारे पर्यटक यांनाही होणार असल्याचे मुख्यमंत्री श्री शिंदे यांनी सांगितले.

मुख्यमंत्री श्री शिंदे पुढे म्हणाले, मुनावळे येथे स्कुबा डायव्हिंग, बनाना राईड, जेट स्की, हाऊस बोट, बोट क्लब यांसारख्या पर्यटकांसाठी अत्याधुनिक सुविधा उभारण्यात येत आहेत. तसेच यामध्ये सुरक्षेचा विचार करण्यात आला आहे. त्यासाठी निरीक्षण मनोरा, पर्यटकांसाठी चेंजिंग रूम या सोयी ही असणार आहेत.

ग्रामस्थांच्या प्रश्नावर बोलताना मुख्यमंत्री श्री शिंदे म्हणाले, मासेमारीसाठी परवानगी देण्यात यावी, जलाशयामध्ये मत्स्यबीज सोडावे. अतिरिक्त भू संपादन झालेल्या जमिनींचा प्रश्न जिल्हाधिकारी यांनी विशेष शिबिर घेऊन मार्गी लावावा, अशा सूचना त्यांनी केल्या.

बैठकीमध्ये जिल्हाधिकारी श्री. डूडी यांनी प्रकल्पाची सविस्तर माहिती दिली.

यापूर्वी मुख्यमंत्री श्री शिंदे यांनी हेलिकॉप्टर मधून वासोटा किल्ला, नागेश्वर मंदिर, अहिरे पुल, बामणोली परिसराची हवाई पाहणी केली.

००००

कुणबी जातीचे पुरावे तपासणीसाठी जिल्हा व तालुकास्तरावर समिती गठीत

नाशिक दिनांक: 5 नोव्हेंबर, 2023 (जिमाका वृत्तसेवा) मराठवाड्यात कुणबी नोंदी शोधण्यासाठी जी मोहीम राबविण्यात आली त्याच धर्तीवर आता संपूर्ण राज्यभर ही प्रक्रिया मिशन मोडवर राबविण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यात सर्व उपविभागीय अधिकारी, तहसिलदार यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील मराठा-कुणबी नोंदी शोधण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली असून यासाठी जिल्हा व तालुकास्तरावर समित्या गठित करण्यात आल्या असून जिल्हाधिकारी कार्यालयात ‘विशेष कक्ष’ स्थापन करण्यात आला आहे.

या विशेष मोहिमेत तपासणी केलेली कागदपत्रे व नोंदी मिळालेली कागदपत्रे याची निर्दोष यादी तयार करण्यासाठी संपूर्ण नाशिक महसूल प्रशासन जिल्हाधिकारी जलज शर्मा, अप्पर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली अन्य सर्व उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, नायब तहसिलदार आणि महसूल कर्मचारी यांच्या समन्वयातून जलदगतीने होणार आहे.

राज्यभरातील या कामाच्या संनियत्रणासाठी राज्य शासनाने मंत्रालयस्तरावर देखील अपर मुख्य सचिव दर्जाच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. निवृत्त न्यायाधीश संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील समितीची कार्यकक्षा आता राज्यभर वाढविण्यात आली आहे.

त्याचबरोबर मागासवर्ग आयोगाला इम्पॅरिकल डेटासाठी आवश्यक ती माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी युद्धपातळीवर कार्यवाही करून उपलब्ध करून द्यावी. तसेच राज्य शासन मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात गांभीर्याने कार्यवाही करीत आहे. त्यासाठी आता मराठवाड्यासह राज्यातील उर्वरित जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी स्वत:हून कुणबी नोंदी तपासण्यासाठी युद्धपातळीवर मोहीम हाती घ्यावी, त्यासाठी उपजिल्हाधिकारी दर्जाचा अधिकारी आणि त्यांच्या नियंत्रणाखाली कर्मचाऱ्यांची उपलब्धता करून द्यावी. त्यांना आवश्यक ते मनुष्यबळ, साधनसामुग्री देखील तातडीने उपलब्ध करून देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

या अनुषंगाने नाशिक विभागीय आयुक्त राधकृष्ण गमे यांनी नाशिक विभागातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये यासंदर्भात स्वतंत्र कक्ष स्थापन करण्याचे निर्देश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यात जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, तहसिलदार यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील मराठा-कुणबी नोंदी शोधण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली असून यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात ‘विशेष कक्ष’ स्थापन करण्यात आला आहे. शासन निर्णय 31 ऑक्टोबर,

2023 मध्ये निर्देश दिल्याप्रमाणे तालुकास्तरावर विविध शासकीय विभागातील 1967 पूर्वीच्या कागदपत्रांची पडताळणी, तपासणी करणार आहे. त्यात कुणबी कागदपत्रे आढळल्यास त्याचे स्कॅनिंग करुन जतन करण्यात येणार आहे. तसेच तपासलेले कागदपत्रे व आढळलेल्या नोंदी यांची माहिती दैनंदिन स्वरुपात प्राप्त करुन घेऊन विभागीय समितीस तसेच जिल्ह्याच्या संकेतस्थळावर अद्ययावत करण्यात येणार आहेत. यासाठी जिल्हास्तरावर अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे यांच्या अध्यक्षतेखाली तर तालुकास्तरावर संबंधित उप विभागाचे उप विभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहेत.

अशी आहे जिल्हास्तरीय समिती

नाशिक जिल्ह्यात अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती गठीत करण्यात आली असून निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ हे

सदस्य सचिव, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत), शिक्षणाधिकारी (प्राथमिक), शिक्षणाधिकारी (माध्यमिक), जिल्हा सहआयुक्त, नगरपालिका, हे सदस्य असणार आहे.

अशी आहे तालुकास्तरीय समिती

जिल्ह्यात उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली 15 तालुक्यात तालुकास्तरीय समिती स्थापन करण्यात आली असून संबंधित तालुक्याचे तहसिलदार हे समितीचे सदस्य सचिव आहेत. उपायुक्त सामान्य प्रशासन (मनपा)/ मुख्याध्याकारी (नगरपालिका/नगर पंचायत), गटशिक्षण अधिकारी, उपअधिक्षक भूमी अभिलेख, पोलीस निरिक्षक, विस्तार अधिकारी (पंचायत) पंचायत समिती, सहदुय्यम निबंधक/दुय्यम निबंधक, नायब तसिलदार (प्रशासन) हे सदस्य असणार आहेत.

0000000

 

मराठा कुणबी जातीचे पुरावे तपासणीचे काम मिशन मोडवर करावे – अपर जिल्हाधिकारी देवदत्त केकाण

धुळे, दिनांक 5 नोव्हेंबर, 2023 (जिमाका वृत्त);  मराठवाड्यात कुणबी नोंदी शोधण्यासाठी जी मोहीम राबविण्यात आली त्याच धर्तीवर आता संपूर्ण राज्यभर ही प्रक्रिया मिशन मोडवर राबविण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विभागीय आयुक्त आणि सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. या पार्श्वभूमीवर धुळे जिल्ह्यात सर्व विभागांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील मराठा- कुणबी नोंदी शोधण्याचे काम मोहिमस्तरावर करावेत. अशा सूचना जिल्हास्तरीय समितीचे अध्यक्ष तथा अपर जिल्हाधिकारी देवदत्त केकाण यांनी संबंधित यंत्रणांना दिल्या आहेत.

मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने कुणबी, मराठा-कुणबी व कुणबी-मराठा जातीच्या नोंदी तपासण्यासाठी गठीत धुळे जिल्हास्तर व सर्व तालुकास्तरीय समितीची बैठक आज जिल्हास्तरीय समितीचे अध्यक्ष तथा अपर जिल्हाधिकारी देवदत्त केकाण यांच्या अध्यक्षतेखाली दुरदृष्यप्रणालीव्दारे संपन्न झाली. बैठकीस धुळे महापालिका आयुक्त अमिता दगडे-पाटील, राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक मनोज शेवरे, निवासी उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे, उपविभागीय अधिकारी राहुल जाधव, प्रमोद भामरे, रविंद्र शेळके, जिल्हा जात पडताळणी समितीचे उपायुक्त राकेश महाजन, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) मोहन देसले,  यांच्यासह जिल्ह्यातील सर्व तहसिलदार, सर्व नगरपालिकांचे मुख्याधिकारी आदी उपस्थित होते.

यावेळी अपर जिल्हाधिकारी श्री. केकाण म्हणाले की, मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने धुळे जिल्ह्यात सर्व उपविभागीय अधिकारी, तहसिलदार यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील मराठा-कुणबी नोंदी शोधण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली असून यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली “विशेष कक्ष” स्थापन करण्यात आला आहे. मराठा- कुणबी जातींच्या जुन्या नोंदी, अभिलेख, दस्ताऐवज, खरेदी खत, सातबारा उतारे, जुने गुन्हे दाखल नोंदी, कारागृहात अटक झालेल्या गुन्हेगाराच्या जुन्या नोंदी तसेच इतर माहिती संकलीत करण्यासाठी सर्व विभागांनी मोहिमस्तरावर काम करावे, महसुल विभाग, शिक्षण विभाग, नगरपालिका, महानगरपालिका, राज्य उत्पादन शुल्क विभाग, पोलीस विभाग, जिल्हा कारागृह, भुमी अभिलेख विभाग, जिल्हा उपनिबंधक विभागांनी त्यांच्याकडे असलेल्या 1967 पुर्वीच्या जुन्या नोंदी तपासून ते स्कॅन करुन तालुकास्तरावरुन  जिल्हास्तरावर सादर करावेत. या जुन्या नोंदी शोधण्यासाठी सर्व विभागाने आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करुन द्यावेत. तसेच उपविभागीय अधिकारी तसेच जात पडताळणी कार्यालयाने गेल्या पाच वर्षांत दिलेल्या कुणबी मराठा जात प्रमाणपत्राची माहिती संकलीत करावी. यासाठी सर्व जिल्हाप्रमुखांनी तालुकास्तरावर बैठकीचे आयोजन करावे. तालुकास्तरावर विशेष कक्षाची स्थापना करावी. जुने रेकॉर्ड व्यवस्थित हाताळणी करुन ते योग्यरित्या स्कॅन करुन दैनंदिन कामाचे विहित नमुन्यातील विवरणपत्र, माहिती सादर करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्यात.

निवासी उपजिल्हाधिकारी श्री. गावंडे म्हणाले की, मराठा आरक्षण देण्यासाठी नाशिक विभागीय आयुक्त राधकृष्ण गमे यांनी विभागातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयात यासंदर्भात स्वतंत्र कक्ष स्थापन करण्याचे निर्देश दिले आहेत. यापार्श्वभूमीवर धुळे जिल्ह्यात सर्व उपविभागीय अधिकारी, तहसिलदार यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील मराठा- कुणबी नोंदी शोधण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली असून यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात “विशेष कक्ष” स्थापन करण्यात आला आहे.  शासन निर्णय 31 ऑक्टोंबर, 2023 मध्ये निर्देश दिल्याप्रमाणे तालुकास्तरावर विविध शासकीय विभागातील 1967 पुर्वीच्या कागदपत्रांची पडताळणी, तपासणी करावी. त्यात कुणबी कागदपत्रे आढळल्यास त्याचे स्कॅनिंग करुन जतन करुन   तपासलेले कागदपत्रे व आढळलेल्या नोंदी यांची माहिती दैनंदिन स्वरुपात प्राप्त करुन जिल्ह्याच्या संकेतस्थळावर अद्ययावत करण्यासाठी सादर करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्यात.

अशी आहे जिल्हास्तरीय समिती

धुळे जिल्ह्यात अपर जिल्हाधिकारी देवदत्त केकाण यांच्या अध्यक्षतेखाली विशेष कक्ष स्थापन करण्यात आला असून निवासी उपजिल्हाधिकारी हे या समितीचे सदस्य सचिव आहेत. तर जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत), शिक्षणाधिकारी (प्राथमिक), शिक्षणाधिकारी (माध्यमिक), जिल्हा सहआयुक्त, नगरपालिका, जिल्हाधिकारी कार्यालय हे सदस्य असणार आहे.

0000000

 

ताज्या बातम्या

संत भोजाजी महाराज देवस्थानच्या पर्यटनस्थळाचा दर्जा उन्नतीसाठी प्रस्ताव करा- मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

0
मुंबई, दि. १४ : विदर्भाची पंढरी समजल्या जाणाऱ्या संत भोजाजी महाराज देवस्थानच्या पर्यटनस्थळाचा 'ब' दर्जा उन्नतीसाठी प्रस्ताव सादर करावा, असे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर...

उमरेड तालुक्यातील खाणपट्ट्यांची तपासणी करा – मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

0
मुंबई, दि. १४ : उमरेड तालुक्यातील शासकीय जागेवरील कोणतीही खाणपट्टी मंजूर करू नये. लीज संपलेल्या खाणपट्ट्यांची सोळा मुद्द्यांवर आधारित तपासणी करावी. खणलेल्या खाणपट्ट्यांच्या ठिकाणी...

महाराष्ट्र शासनाचे अधिकृत संकेतस्थळ तांत्रिक अद्ययावत करण्यासाठी १५ व १६ मे रोजी बंद

0
मुंबई, दि. १४: महाराष्ट्र राज्य शासनाचे अधिकृत संकेतस्थळ www.maharashtra.gov.in  व शासन निर्णय संकेतस्थळ www.gr.maharashtra.gov.in  हे पोर्टल नियमित देखभालीबरोबरच तांत्रिकदृष्ट्या अद्ययावत करण्यात येणार आहे, त्यासाठी...

प्रलंबित वनहक्क दावे निकाली काढण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम आखा – मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

0
मुंबई दि. १४ : प्रलंबित वनहक्क दावे निकाली काढण्यासाठी कालबद्ध कार्यक्रमाची आखणी करून राज्यात या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी नियोजन करावे. याचबरोबर सामुदायिक वनहक्क...

पालघर व ठाणे जिल्ह्यात मत्स्यव्यवसायाच्या नुकसान भरपाईसाठी सहकार्य – मंत्री मकरंद जाधव-पाटील

0
मुंबई, दि. १४ : अवकाळी पावसामुळे पालघर व ठाणे जिल्ह्यात मासेमारी बोटींचे, जाळी, सुकी मासळीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. नुकताच मत्स्य व्यवसायाला कृषी...