बुधवार, मे 14, 2025
Home Blog Page 941

ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात कुणबी, मराठा कुणबी व कुणबी मराठा जातीचे पुरावे तपासणी मोहीम युद्धपातळीवर सुरू

ठाणे,दि.४- मराठवाड्यात ‘कुणबी’ नोंदी शोधण्यासाठी जी मोहीम राबविण्यात आली त्याप्रमाणे आता संपूर्ण राज्यभर ही प्रक्रिया मिशन मोडवर राबविण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. यासाठी विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये यासंदर्भात “स्वतंत्र कक्ष” स्थापन करण्याचे निर्देश देण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यात सर्व उपविभागीय अधिकारी, तहसिलदार यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील मराठा- कुणबी नोंदी शोधण्यासाठी आजपासूनच विशेष मोहीम हाती घेतली असून यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात “विशेष कक्ष” कार्यान्वित करण्यात आला आहे.

तपासणी केलेली कागदपत्रे व नोंदी मिळालेली कागदपत्रे याची निर्दोष यादी तयार करण्यासाठी संपूर्ण ठाणे महसूल प्रशासन जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, अप्पर जिल्हाधिकारी मनिषा जायभाये-धुळे, निवासी उपजिल्हाधिकारी सुदाम परदेशी, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) गोपीनाथ ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्य सर्व उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, नायब तहसिलदार आणि महसूल कर्मचारी युद्धपातळीवर काम करीत आहेत. याबाबत जिल्हाधिकारी श्री.शिनगारे या कामावर लक्ष ठेवून आहेत.

राज्यभरातील या कामाच्या सनियंत्रणासाठी मंत्रालयस्तरावर देखील अपर मुख्य सचिव दर्जाच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

निवृत्त न्यायाधीश संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील समितीची कार्यकक्षा आता राज्यभर वाढविण्यात आली आहे. त्याचबरोबर मागासवर्ग आयोगाला इम्पॅरिकल डेटासाठी आवश्यक ती माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी युद्धपातळीवर कार्यवाही करून महिन्याभरात उपलब्ध करून द्यावी, असे निर्देशही मुख्यमंत्री श्री.शिंदे दिले आहेत.

राज्य शासन मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात गांभीर्याने कार्यवाही करीत आहे. मराठवाड्यासह उर्वरित जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी स्वत:हून कुणबी नोंदी तपासण्यासाठी युद्धपातळीवर मोहीम हाती घ्यावी,त्यासाठी उपजिल्हाधिकारी दर्जाचा अधिकारी आणि त्यांच्या नियंत्रणाखाली  कर्मचाऱ्यांची उपलब्धता करून द्यावी. त्यांना आवश्यक ते मनुष्यबळ, साधनसामुग्री देखील तातडीने उपलब्ध करून देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

मंत्रालयस्तरावर अपर मुख्य सचिव नितीन गद्रे, मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव विकास खारगे, विभागीय स्तरावर विभागीय आयुक्त आणि जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी याबाबत संनियंत्रण करीत आहेत.

 

कुणबी मराठा, मराठा कुणबी प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही गतिमान

निवृत्त न्यायाधीश शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील समितीची कार्यकक्षा संपूर्ण राज्यभर वाढविण्यात आली असून ज्या पद्धतीने मराठवाड्यात नोंदी तपासण्यात आल्या तशीच कार्यपद्धती राज्यभर राबवावी असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. मराठवाड्यात शिंदे समितीने शिफारस केलेल्या पुराव्यांच्या आधारे कुणबी मराठा, मराठा कुणबी प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही गतिमान करावी त्याचबरोबर प्रांत अधिकारी, तहसिलदार व जातपडताळणी समित्यांमधील अधिकारी, कर्मचारी यांना संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी प्रशिक्षण द्यावे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.

 

मराठा आरक्षणासंदर्भात प्रशासनाचे दोन पातळीवर काम सुरू

मराठा आरक्षणासंदर्भात प्रशासन दोन पातळीवर काम करीत असून राज्यभर कुणबी नोंदी तपासण्याची कार्यवाही सुरू करतानाच दुसरीकडे राज्य मागासवर्ग आयोगाला “इम्पॅरिकल डेटा” जमा करण्यासाठी आवश्यक ती माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने सादर करावी, असेही मुख्यमंत्री श्री.शिंदे सांगितले आहे. “इम्पॅरिकल डेटा” गोळा करण्यासाठी टाटा सामाजिक विज्ञान संस्था, गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पॉप्युलेशन स्टडीज या नामवंत संस्थांची मदत घेण्यात येत आहे.

0000000

कुणबी मराठा, मराठा कुणबी नोंदी तपासणीस जिल्हा प्रशासन सज्ज – जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी

  • नोंदी तपासणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष कक्ष स्थापन
  •  नागरिकांनी त्यांच्याकडील कागदोपत्री पुरावे तालुका कक्षास सादर करावेत

 सांगली, दि.4 (जि.मा.का.) :- मराठवाड्यात कुणबी नोंदी शोधण्यासाठी जी मोहीम राबविण्यात आली त्याप्रमाणे आता संपूर्ण राज्यभर ही प्रक्रिया मिशन मोडवर राबविण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. त्यानुसार सांगली जिल्ह्यातही कुणबी मराठा, मराठा कुणबी नोंदी तपासणीचे काम मिशन मोडवर करण्यासाठी  जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष कक्ष स्थापन करण्यात आला आहे. कुणबी मराठा, मराठा कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी कुणबी नोंदी युद्धपातळीवर तपासणीचे कार्य या कक्षामार्फत केले जाणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयात स्थापन करण्यात आलेल्या विशेष कक्षातील कामकाजासाठी नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांना कक्षाच्या कामकाजाबाबत जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी आज ‍माहिती दिली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील, तहसीलदार लीना खरात व संबधित कर्मचारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी सांगितले, उपजिल्हाधिकारी अजय पवार हे या कक्षाचे नोडल अधिकारी असून कक्षासाठी आवश्यक मनुष्यबळ व साधनसामुग्री उपलब्ध करून देण्यात आली आहे. विशेष कक्षाकडील आवश्यक प्रशिक्षण दिले जाणार आहे. या कक्षामार्फत सांगली जिल्ह्यात कुणबी मराठा, मराठा कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी कुणबी नोंदी युद्धपातळीवर तपासून प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही गतिमान करण्यात येईल. प्रत्येक विभाग प्रमुख तालुकास्तरावर एक नोडल अधिकारी व त्यांच्या मदतीला आवश्यक कर्मचारी नियुक्त करून तालुका स्तरावर एक कक्ष स्थापन करण्यात येऊन सर्व अभिलेख्यांची पडताळणी करून कुणबी-मराठा, मराठा-कुणबी जातीची नोंद असलेले अभिलेखे शोधण्यात येतील. अभिलेखे मोडी, कन्नड वा उर्दू भाषेत असतील तर त्याचे भाषांतर करून ते प्रमाणित करण्यात येतील.

विशेष कक्षामार्फत व प्रत्येक विभागाच्या कक्षामार्फत तालुका स्तरावरील सनियंत्रण समितीकडे व तेथून तालुकास्तरावरील तपासलेल्या अभिलेख्यांचे एकत्रीकरण करून त्याचे डीजीटायझेशन करून सर्व अभिलेखे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात येतील. नागरिकांही त्यांच्याकडे कुणबी-मराठा, मराठा-कुणबी जातीची नोंद असलेले काही कागदोपत्री पुरावे असल्यास ते त्यांनी तालुकास्तरावरील  कक्षाकडे सादर करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी  केले.

तसेच, ३ नोव्हेंबर रोजी जिल्ह्यातील विभाग प्रमुखांची दूरदृष्य प्रणालीद्वारे बैठक घेण्यात येऊन उपविभागीय अधिकारी व तहसिलदार यांना कुणबी जात प्रमाणपत्र मिळण्याकरिता प्राप्त अर्जावर त्वरित निर्णय घेण्याबाबत, त्याकरिता आवश्यक ते अभिलेखे उपलब्ध करून देण्याबाबत, तसेच ‘मराठा-कुणबी’, ‘कुणबी मराठा’ प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही गतिमान पद्धतीने करण्याबाबत सूचना देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

०००००

तालुक्यातील १५ गटातील ५ हजार महिलांच्या हाताला देणार काम – आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित

नंदुरबार, दिनांक 4 नोव्हेंबर 2023 (जिमाका वृत्त): आदिवासी विकास विभाग व शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाच्या माध्यमातून आदिवासी महिला भगिनींना आत्मनिर्भर करण्याचा शासनाचा मानस असून, बचतगटांच्या माध्यमातून शहादा तालुक्यात केळी, पपई व कापसावरील प्रक्रिया उद्योग सुरू करून तालुक्यातील 15 गटातील 5 हजार महिलांच्या हाताला काम देणार असल्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी केले आहे.

 ते आज शहादा येथे आदिवासी विकास विभागाच्या वतीने आयोजित महिला बचत गटांच्या शेळी गट निवड पत्र वितरणाच्या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित, खासदार डॉ. हिना गावित, शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक लीना बनसोड, नंदुरबार एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प संचालक चंद्रकांत पावार, जि.प.च्या कृषि सभापती हेमलता शितोळे, सामाजिक कार्यकर्ते डॉ. कांतीलाल टाटीया, जिजाबाई ठाकरे, रजनी नाईक, धनराज पाटील, राजेश जाधव, नानाभाऊ निकम, के.डी. नाईक व महिला बचतगटांच्या प्रमुख व परिसरातील अधिकारी, पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना ते म्हणाले, शहादा तालुक्यात कृषिपुरक उद्योगांना मोठा वाव आहे. त्यामुळे या तालुक्यातील 15 गटातील 5 हजार महिलांना बचत गटाच्या माध्यमातून प्रशिक्षित केले जाईल. त्यातील प्रत्येक महिलेच्या हाताला काम देण्याबरोबरच त्यांना आत्मनिर्भर करण्यासाठी प्रत्नशील असल्याचे सांगून केळी, पपई, कापूस या कृषि उत्पादनांसाठी बचत गटांच्या माध्यमातून प्रक्रिया उद्योगांना प्रत्साहन देण्यात येईल. आदिवासी बांधव हे अतिदुर्गम भागात झोपड्यांमध्ये किंवा तात्पुरत्या तयार केलेल्या घरात राहतात, त्यांना हक्कांचे व कायमस्वरूपी पक्के घर मिळावे यासाठी शबरी घरकुल योजना आदिवासी विकास विभागामार्फत राबविली जाते. त्यासाठी भरीव निधी वितरीत करण्यात आला आहे. योजनेकरीता सन 2023-24 या आर्थिक वर्षाकरीता मागेल त्याला घरुकुलांचे उद्दिष्ट आहे. तसेच गरजू ओबीसी बांधवांसाठी प्रधानमंत्री मोदी घरकुल योजनेच्या माध्यमातून हक्काचा निवारा दिला जाईल.

आदिवासी भागातील कुपोषण निर्मूलनासह स्थलांतर आणि रोजगार निर्मितीवर भर देण्याबरोबरच योजनांचा लाभ शेवटच्या आदिवासी बांधवाला मिळावा यासाठी कालबद्ध कार्यक्रम आखण्यात आला असून आदिवासी समाज सक्षम होण्यासाठी शासन म्हणून नेहमीच प्रयत्नरत असल्याचे सांगताना ते म्हणाले, जिल्ह्यातील रस्त्यांसाठी भरघोस निधिंची तरतूद करण्यात आली असून भगवान बिरसा मुंडा सारख्या योजनांच्या माध्यमातून जिल्ह्यातील एकही गाव, पाडा, आरोग्य केंद्र, आश्रमशाळा वंचित राहणार नाही याबाबत बचनबद्ध असल्याचेही आदिवासी विकास मंत्री डॉ. गावित यांनी सांगितले.

यावेळी जि. प. अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित, खासदार डॉ. हिना गावित, लीना बनसोड यांनी समयोचित मनोगत व्यक्त केले.

०००००

जिल्ह्याच्या पर्यटन विकासासाठी आवश्यक तेवढा निधी देणार – केंद्रीय पर्यटन मंत्री श्रीपाद नाईक

  • जिल्ह्यातील पर्यटन स्थळांच्या जतन व संवर्धनाचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे सादर होणार

  • जिल्ह्यातील पर्यटन स्थळांच्या विकासावर भर -पालकमंत्री हसन मुश्रीफ

कोल्हापूर, दि.4 : कोल्हापूर हा पर्यटनाच्या दृष्टीने समृद्ध जिल्हा आहे. जिल्ह्यातील पर्यटन स्थळांची दुरुस्ती, जतन व संवर्धन करुन जिल्ह्याचा पर्यटनदृष्ट्या विकास साधण्यासाठी निधी मागणीचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे सादर करावा. यासाठी भरीव निधीची तरतूद करण्यात येईल, अशी ग्वाही केंद्रीय बंदरे, जलमार्ग व पर्यटन मंत्री श्रीपाद नाईक यांनी दिली.

  पुरातत्व विभागाकडे असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील महत्त्वाच्या पर्यटन स्थळांसाठी ९०० कोटी रुपयांचा आराखडा पुरातत्व विभागाने तयार केला आहे. जिल्ह्याच्या पर्यटन विकासासाठी पुरातत्व विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, वन विभाग, महानगरपालिका आदी विभागांनी तयार केलेल्या आराखड्याबाबत आज केंद्रीय पर्यटन मंत्री श्रीपाद नाईक यांच्या अध्यक्षतेखाली व पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या प्रमुख उपस्थितीत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली. बैठकीला आमदार प्रकाश आवाडे, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, माजी आमदार अमल महाडिक, माजी नगरसेवक सत्यजित कदम, जिल्हा नियोजन अधिकारी विजय पवार, कोल्हापूर महानगरपालिकेचे शहर अभियंता हर्षजित घाटगे, पुरातत्व विभागाचे सहायक संचालक डॉ.विलास वाहने, कार्यकारी अभियंता श्री आयरेकर, पुरातत्व विभागाच्या वास्तुविशारद कासार पाटील (नाशिक), अंजली कलमदानी(पुणे), आभा लांबा (मुंबई),  पूनम ठाकूर (मुंबई) तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पर्यटनासाठी पोषक वातावरण आहे. येथील अनेक ठिकाणांचे ऐतिहासिक महत्व आहे. केंद्र सरकारच्या पर्यटन मंत्रालयाच्या वतीने जास्तीत जास्त निधी उपलब्ध करुन देण्यात येईल. यासाठी जिल्ह्यातील पर्यटन स्थळांची दुरुस्ती, जतन व संवर्धनाचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे सादर करा, असे सांगून गोव्याचा असल्यामुळे कोल्हापूरशी माझी जवळीकता असल्याने जिल्ह्याच्या विकासासाठी निश्चितच प्रयत्न करण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.

केंद्राकडे असलेल्या व पुरातत्व विभागाकडून संवर्धन होत असलेल्या या ठिकाणांचा संवर्धन आराखडा तयार केल्याचे सांगून मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, पुरातत्व विभागाकडून यासाठी वास्तुविशारद यांची नेमणुक करण्यात आली आहे. ते म्हणाले, पर्यटन मंत्री श्रीपाद नाईक हे गोवा येथील असल्यामुळे त्यांची कोल्हापूरशी नाळ जुळलेली आहे. पर्यटन विकासासाठी ते निश्चित निधी देतील. जिल्ह्यात अनेक पर्यटन स्थळे असून त्यांच्या विकासासाठी निधीची आवश्यकता आहे. जिल्ह्यातील पर्यटन स्थळांच्या विकासासाठी आवश्यक निधी मागणीचा प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर करा. हा निधी मंजूर होण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. यामुळे जिल्ह्यातील सर्व पर्यटन स्थळांचा विकास होवून पर्यटनाच्या माध्यमातून जिल्ह्याचा सर्वांगीण विकास होईल, असे प्रतिपादन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.

मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, जोतिबा मंदिर डोंगर ते पन्हाळा किल्ला यादरम्यान प्रस्तावित रोप वे चे सर्वेक्षण करुन अंदाजपत्रक सादर करा. तसेच किल्ल्यांचा विकास आराखडा करताना किल्ल्याच्या आजूबाजूच्या परिसराचाही विकास होईल, याकडे लक्ष द्यावे. पन्हाळा ते विशाळगड दरम्यान ट्रेकींग मार्गावर आवश्यक त्या सोयी-सुविधा व दिशादर्शक फलक लावण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.

जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी जिल्ह्यातील विविध पर्यटन स्थळांची माहिती देवून राज्य शासनाकडे पाठविण्यात येत असलेल्या व जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेल्या निधीची माहिती दिली. जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत राज्य संरक्षित स्मारकांच्या जतन व दुरुस्तीसाठी १३.५२ कोटी रुपयांना तांत्रिक मंजूरीची कार्यवाही अंतिम टप्प्यात आहे, असे त्यांनी सांगितले.

श्री अंबाबाई मंदिर, श्री जोतिबा मंदिर तसेच रांगणा, पन्हाळा, विशाळगड, व पारगड किल्ला या ठिकाणांचे जतन, संवर्धन, दुरुस्ती व परिसर विकासासाठी कामे केली जाणार आहेत. यासह जिल्ह्यातील अन्य पर्यटन स्थळांच्या विकास आराखड्याचे सादरीकरण त्या त्या विभाग प्रमुखांनी केले.

*****

 

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडील पाणी पुरवठा योजनांची कामे जलदगतीने पूर्ण करावीत :मंत्री छगन भुजबळ

नाशिक दि. 4: नोव्हेंबर, 2023 (जिमाका वृत्तसेवा): महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडील प्रादेशिक पाणी पुरवठा योजनांची कामे तसेच दुरूस्ती व इतर अनुषंगिक कामे जलदगतीने पूर्ण करावीत असे निर्देश राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले. आज भुजबळ फार्म नाशिक येथे लासलगाव विंचूरसह १६ गाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजना, येवला ३८ गाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजना, राजापूरसह ४१ गाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजना व धुळगाव व १६ गावे प्रादेशिक पाणी पुरवठा योजना यांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.  

या बैठकीस महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे अधिकारी, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, दिलीप खैरे, माजी जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर जगताप, ३८ गाव पाणी पुरवठा योजनेचे अध्यक्ष सचिन कळमकर, उपाध्यक्ष मोहन शेलार आदि उपस्थित होते.

यावेळी मंत्री छगन भुजबळ म्हणाले, येवला ३८ गाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेच्या दुरूस्तीचे प्रलंबित कामांसह पंपींग हाऊस मधील पंपाची कामे डिसेंबर पर्यंत तातडीने पूर्ण करण्यात यावीत. राजापूर सह ४१ गाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजनाची ४१ पाण्यांच्या टाक्यांपैकी २६ टाक्यांचे कामे प्रगतीपथावर आहेत. या योजनेची उर्वरित कामे कालमर्यादेत मे २०२४ अखेर करण्यात यावीत. लासलगाव विंचूरसह १६ गाव प्रादेशिक पाणी पुरवठा व धुळगाव व १६ गावे प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेच्या शिल्लक कामांचा आढावा घेण्यात आला. तसेच लासलगाव विंचूरसह सोळा गावे प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेच्या सौर प्रकल्पांच्या कामांसाठी आवश्यक निधी मंजूर झाला असून सौर प्रकल्पांची कामे तातडीने मार्गी लावण्यासाठी महवितरणला योजनेचा डि.पी.आर सह आवश्यक कागदपत्रे उपलब्ध

करून द्यावीत अशा सूचना मंत्री छगन भुजबळ यांनी बैठकीत दिल्या.

 

महाबोधी वृक्षाला फुटली नव पालवी; मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून बोधी वृक्षाची पाहणी

बैठकीपूर्वी शहरातील त्रिरश्मी बुद्ध लेणी येथील बुद्ध स्मारकाच्या परिसरात भगवान गौतम बुद्धाना ज्या महाबोधीवृक्षाखाली ज्ञानप्राप्ती झाली. त्या महाबोधीवृक्षाच्या फांदीचे विजयादशमीच्या दिवशी रोपण करण्यात आले. या महाबोधी वृक्षाला नवीन पालवी फुटली आहे. आज राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी याठिकाणी जाऊन पाहणी केली.

यावेळी आनंद सोनवने, भत्ने संघरत्न, भन्ते धम्मरक्षित, श्री. जेजूरकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. बोधीवृक्षाची पाहणी केल्यानंतर मंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत सामूहिक बोधीवृक्ष वंदना यावेळी घेण्यात आली.

000000

नशामुक्त समाज निर्मितीसाठी राज्य शासनाचे सर्वतोपरी सहाय्य – सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार

ठाणे, दि. ४ (जिमाका) : आचार्य श्री महाश्रमणजी व अनुव्रत विश्वभारती सोसायटीने सुरू केलेल्या नशामुक्त समाज निर्मितीच्या अभियानात राज्य शासन सर्वतोपरी सहकार्य करेल, असे प्रतिपादन सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज येथे केले.

अनुव्रत विश्वभारती सोसायटीच्यावतीने ठाण्यात आयोजित ‘से यस टू लाईफ, नो टू ड्रग्ज’ या नशामुक्ती राष्ट्रीय परिषदेत श्री. मुनगंटीवार बोलत होते.

यावेळी आचार्य श्री महाश्रमणजी, डॉ. गौतम भन्साली, मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्त मधुकर पांडे, अंमली पदार्थ विरोधी पथकाचे संजय कुमार, नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो चे सचिन जैन, डॉ. एस व्ही खानीलकर, लेखक, दिग्दर्शक मनोज मुंतशीर, जितो चे संस्थापक अध्यक्ष शांतीलाल कवाड, सी जी डांगी, यांच्यासह विविध मान्यवर, एनसीसी व एनएसएसचे विद्यार्थी, पोलीस अधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे समन्वयक अशोक कोठारी यांनी प्रास्ताविक केले.

श्री. मुनगंटीवार म्हणाले की, भारत देश हा संस्कारी देश आहे, या देशात सेवा व त्यागाची पूजा होते. आपल्या देशात आपल्या मनाला जिंकणारा सम्राट होतो. पण आज नशेमुळे वेगळी परिस्थिती निर्माण झाली आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी नशामुक्ती अभियान राबविणे आवश्यक आहे. या कामासाठी आपल्याला राज्य शासन सर्वतोपरी सहकार्य करेल.

नशामुक्ती ची सुरुवात माझ्या जिल्ह्यातून सुरुवात केली. 2014 रोजी चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी केली. ज्या व्यसनाने आपल्या आईच्या डोळ्यात पाणी येते ते फक्त अश्रू नसून ते तुम्हाला पापी बनविणारे मार्ग आहे. देशभक्तीची, समाज सेवेची, नशा असायला हवी.

समाजात नशामुक्ती करताना अनेक प्रश्न निर्माण होतात. हे अडथळे दूर करून नशामुक्त समाजासाठी एकत्र येऊन काम करू. आचार्य महाश्रमनजी यांच्या नशामुक्ती मिशनसाठी सर्वशक्तिनिशी राज्य शासन पाठीशी राहील. हे मिशन सज्जन शक्तीचे आहे, हे मिशन देशावर मनापासून प्रेम करणाऱ्या भाविकांचे आहे, असेही मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी सांगितले.

यावेळी श्री. पांडे, श्री. भन्साली यांनीही मनोगत व्यक्त केले.

0000

एरंडोल शहरात साकारतोय ‘पुस्तकांचा बगीचा’

वनस्पतीचे गार्डन आपण पाहतो, फुलांचा बगीचा पाहिला असेल. मात्र एरंडोल नगरपरिषदेने तब्बल ३३ गुठ्यांत पुस्तकाचा बगीचा साकारला आहे. वाचन संस्कृती वाढविण्याच्या दृष्टीने राज्यासाठी हा प्रयोग आदर्श ठरू शकणार आहे. राज्यातला अशा प्रकारचा पुस्तकांचा एकमेव बगीचा आहे हे विशेष !

आपण विविध प्रकारचे गार्डन पाहता, मात्र एरंडोल नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विकास नवाळे यांच्या संकल्पनेतून वाचन संस्कृती टिकून राहावी, त्यात वाढ व्हावी या उद्देशाने शहरात पुस्तकांच्या बगीच्याची निर्मिती केली आहे. हा बगीचा एरंडोल शहरात चर्चेचा विषय ठरला आहे.

 

३३ गुठ्यांत साकारणार पुस्तक बगीचा

शहरातील आनंद नगर भागात 33 गुंठे  म्हणजेच बीघा भर जागेत पुस्तकांचा बगीचा साकारला जातो आहे. या नाविन्यपूर्ण गार्डनमधे विविध प्रकारचे पुस्तक उपलध्द असणार आहेत. ठिकठिकाणी पुस्तकांचे बाॅक्स आहेत.  पुस्तक वाचनासाठी आठ वाचन कट्टे बांधले आहेत.

बगीच्यात पुर्णत: निसर्गरम्य वातावरणाची निर्मिती करण्यात आली आहे. गार्डन मधे प्रत्येक मोठ्या झाडाखाली पुस्तकाचा बॉक्स आहेत. तेथून पुस्तक काढून तुम्हांला ते झाडाखाली बांधण्यात आलेल्या ओट्यावर बसून पुस्तक वाचता येणार आहे.

बगीच्यात सर्वकाही

या पुस्तकांच्या बगीच्यात ग्रीन लाॅन व विविध सुगंधीत फुलझाड आहेत. त्यातुन वातावरण सुगंधीमय होणार आहे. भिंतीवर विचारवंताचे पुस्तकात व्यक्त केलेले विचार चित्रीत करण्यात आले आहेत. तर ठिकठिकाणी कवितांचे पोर्ट्रेट करण्यात आले आहे. ग्रीन जीमची ही

व्यवस्था करण्यात आली आहे. पुस्तक व वृक्ष यावर आधारीत भितीचित्र रंगविण्यात आले आहे. कवयित्री बहीणाबाईच्या कवितेसह पुस्तकांचे भव्य शिल्प उभारण्यात आले आहे. याबरोबरच पुस्तक प्रेमी वाचक प्रतीत करणारे पुतळे करण्यात आले आहे.

जेष्ठासाठी विशेष सोयी

म्हातारपणात माणस ही बगीच्यातच अधिक रमतात. त्यादृष्टीने पालिकेने नाना-नानी पार्क ची व्यवस्था करण्यात आली आहे. या गार्डन मधे लहानपासुन वयोवृद्धापर्यंत सर्वांच्या गरजा लक्षात घेण्यात आले आहे हे विशेष. कथा, कादंबरी, विविध चरित्र, कवितासंग्रह, विविध स्पर्धा परीक्षांचे पुस्तक येथे उपलध्द असणार आहे. याबरोबरच पुस्तकाचे सेल्फी पॉईंट ही तयार करण्यात आला आहे.

राज्यातला पहीलाच प्रयोग

एरंडोल नगरपरीषदेने साकारलेला पुस्तकांचा बगीचा हा राज्यातला पहीलाच प्रयोग आहे. हा नाविन्यपूर्ण बगीचा निश्चितच वाचन संस्कृती व संस्कारक्षम पिढी घडविण्यासाठी उपयोगी ठरणार आहे. या बागेची रचना ही सगळ्याच घटकांचा विचार करून करण्यात आली आहे. हा बगीचा राज्यासाठी आदर्श ठरणार आहे हे निश्चित! एरंडोल वासीयांसाठी हे गार्डन पर्वणीच ठरणार आहे. या बगीच्याचीच सर्वत्र चर्चा सध्या कानी पडत आहे.

“शहरातील नागरीकांमधे वाचन संस्कृती वृध्दिगंत व्हावी या उद्देशाने या पुस्तक बागेची निर्मिती करण्यात येत आहे. लहानांपासून

वृध्दांपर्यंत सर्व जण पुस्तक वाचन करू शकतील अशी पुस्तक व व्यवस्था करण्यात आलेली आहे. लवकरच हा बगीचा नागरिकांसाठी हे गार्डन खुले होणार आहे” – विकास नवाळे, मुख्याधिकारी एरंडोल नगरपरीषद

००००

-सुरेश पाटील,

माहिती अधिकारी,

जळगाव

 

पालकमंत्र्यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मनोज जरांगे पाटील यांना दिली शासन निर्णयाची प्रत; प्रकृतीची केली विचारपूस

छत्रपती संभाजीनगर,दि.४ (जिमाका)-  मराठवाड्यातील मराठा समाजास मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्र देण्यासाठी कार्यपद्धती विहित करण्यासाठी  निवृत्त न्यायमूर्ती शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या समितीची व्याप्ती आता संपूर्ण राज्यभरासाठी करण्यात आली आहे. तसा शासन निर्णय दि.३ नोव्हेंबर रोजी निर्गमित झाला आहे. या निर्णयाची प्रत आज शासनाच्या शिष्टमंडळाने मनोज जरांगे पाटील यांना प्रत्यक्ष भेटून दिली. तसेच त्यांच्या प्रकृतीची विचारपूसही केली.  जरांगे पाटील यांनी या शासन निर्णयाबाबत समाधान व्यक्त केले आहे. उपोषण संपल्यानंतर श्री. जरांगे पाटील हे येथील गॅलक्सी रुग्णालयात उपचार घेत आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार  रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संदिपान भुमरे, गृहनिर्माण मंत्री तथा जालना जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे, आ. नारायण कुचे, मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाचे विशेष कार्य अधिकारी मंगेश चिवटे यांच्या शिष्टमंडळाने आज मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील यांची आज घेतली. गॅलक्सी रुग्णालयात हे शिष्टमंडळ जरांगे पाटील यांना भेटले. शासनाने दि.३ रोजी जारी केलेल्या समितीची व्याप्ती राज्यभर वाढविण्यासंदर्भातील शासन निर्णयाची प्रत जरांगे पाटील यांना दिली.

  जरांगे पाटील यांनी या शासन निर्णयाबाबत समाधान व्यक्त केले. शासन आमच्या मागणीसंदर्भात गांर्भीर्याने काम करीत आहे. समितीची व्याप्ती संपूर्ण राज्यासाठी झाल्याने राज्यभरातील समाज बांधवांना न्याय मिळेल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. आपली प्रकृती आता चांगली असून मी लवकरच बरा होईन, असेही त्यांनी सांगितले.

पालकमंत्री संदिपान भुमरे म्हणाले की, ‘ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शासनाने तातडीने या समितीची व्याप्ती राज्यभर करण्याचा शासन निर्णय निर्गमित केल्याने विश्वास वाढला आहे. न्यायमूर्ती शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील समितीचे कामकाज सुरु आहे. मराठा समाजाला लवकरात लवकर न्याय देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. त्यादृष्टीने समितीही कामकाज करीत आहे.  शासनाच्या निर्णयाबाबत मनोज जरांगे पाटील हे सुद्धा समाधानी आहेत. त्यांनी आता आपल्या प्रकृतीची काळजी घ्यावी’, असे आवाहन भुमरे यांनी केले.

शासन निर्णयाबद्दल…

सामान्य प्रशासन विभागाच्या या शासन निर्णयानुसार, मराठवाड्यातील मराठा समाजास मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रियेमध्ये आवश्यक ते अनिवार्य दस्ताऐवज, पुराव्यांची वैधानिक व प्रशासकीय तपासणी  करण्याबाबत तसेच  तपासणीअंती  पात्र व्यक्तिंना तसे जात प्रमाणपत्र देण्याची  कार्यपद्धतीविहित करण्यासाठी निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली समिती  स्थापन करण्यात आली होती. त्या समितीची व्याप्ती  संपूर्ण राज्यासाठी वाढविण्यात आली आहे. तसेच या समितीने आपला अहवाल दि.२४ डिसेंबर २०२३ पर्यंत शासनास सादर करावा असे नमूद केले आहे.

समितीची रचना

शासन निर्णयानुसार समितीचे अध्यक्ष न्यायमूर्ती संदीप शिंदे (निवृत्त) असून  अपर मुख्य सचिव (महसूल), प्रधान सचिव विधी व न्याय विभाग, सर्व विभागीय आयुक्त, सर्व जिल्ह्याचे जिल्हाधिकारी हे सदस्य असून  सह सचिव सामान्य प्रशासन विभाग हे या समितीचे सदस्य सचिव आहेत.

०००००

आदिवासी बांधवांना कृषी व जोड धंद्यांसाठी करणार अर्थसहाय्य; बचत गटांच्या माध्यमातून प्रक्रिया उद्योगांना देणार प्रोत्साहन – आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित

नंदुरबार,दिनांक 4 नोव्हेंबर 2023 (जिमाका वृत्त) : आदिवासी बांधवांसाठी कृषी व कृषिपूरक जोडधंद्यांसाठी अर्थसहाय्याच्या विविध योजना, तसेच तसेच बचत गटांच्या माध्यमातून प्रक्रिया उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून कटीबद्ध असल्याचे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी केले आहे.

ते आदिवासी विकास विभागाच्या वतीने मोलगी व धनाजे येथे आयोजित महिला बचत गटांना शेळी गट निवड पत्र वाटपाच्या कार्यक्रमात बोलत होते.यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ.सुप्रिया गावित, खासदार डॉ. हिना गावित, शासनाच्या शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक लीना बनसोड (नाशिक), तसेच परिसरातील विविध यंत्रणांचे पदाधिकारी व अधिकारी यावेळी उपस्थित होते.

यावेळी बोलताना मंत्री डॉ.गावित म्हणाले, राज्यातील आदिवासी बहुल भागात वनसंपत्ती विपुल प्रमाणात आहे. उपलब्ध वनसंपत्तीचा वापर करून प्रक्रिया उद्योगासाठी अनेक महिला बचतगट, उद्योग संस्था पुढे येत आहेत. शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळामार्फत या प्रक्रिया उद्योगांसाठी आदिवासी उद्योजकांना आवश्यक आर्थिक पाठबळ उपलब्ध करून दिले जाणार आहे. आदिवासी बांधवांना उद्योजकतेच्या प्रशिक्षणातून व्यवसाय उपलब्ध करून त्यांना आर्थिक सक्षम कसे करता येईल यादृष्टीने शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ कार्यरत आहे. येणाऱ्या काळात आदिवासी बांधवांनी प्रक्रिया उद्योगातून तयार केलेल्या उत्पादनाला बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करणार असून आदिवासी बांधवांच्या उत्पन्न वाढीच्या दृष्टिने ज्या आदिवासी व्यक्तीकडे जमिन आहे, त्यांना कृषि साहित्य, बि-बियाणे उपलब्ध करुन देणे, त्यांच्या शेतात विहिर बांधण्यासाठी अर्थ सहाय्य करणे या सारख्या योजना राबविण्यात येणार असून ज्या आदिवासी व्यक्तींना मच्छिमारी व्यवसाय करावयाचा असेल त्यांना केज फिशिंग सुविधा उपलब्ध करून देणे, ज्यांना जोड धंद्या म्हणून दुग्धव्यवसाय करावयाचा आहे, त्यांना दुधाळ जनावरे उपलब्ध करुन देणे, ज्यांना बकरी पालनाचा व्यवसाय करावयचा आहे, त्यांना बकरी उपलब्ध करुन देणे, कृषि व कृषि विषयाशी संबंधित विविध योजना, शासनाचे इतर विभाग व आदिवासी विभागामार्फत सुरू करण्यात आल्या असून आदिवासी बांधवांचे उत्पन्न वाढविणे हाच त्यामागचा उद्देश असल्याचेही यावेळी आदिवासी विकास मंत्री डॉ. गावित यांनी सांगितले.

ते म्हणाले, येणाऱ्या 15 नोव्हेंबरला आपण भगवान बिरसा मुंडा यांची जयंती देशभर जनजाती दिवस म्हणून साजरी करणार असून, या महान क्रांतीकारकांच्या नावाने आदिवासी वाडेपाडे जोड रस्त्यांच्या माध्यमातून जोडण्यासाठी बिरसा मुंडा जोडरस्ते ही नवी योजना आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून राज्यात पहिल्यांदा राबवली जाणार आहे. चालू वर्षाच्या अर्थसंकल्पात बिरसा मुंडा जोडरस्ते योजनांसाठी भरीव तरतूद केली असून या योजनेच्या माध्यमातून राज्यातील हजारो आदिवासी पाडे हे रस्त्यांच्या माध्यमातून जोडली जाणार आहेत.

यावेळी जि.प.अध्याक्षा डॉ.सुप्रिया गावित, खासदार डॉ.हिना गावित, शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाच्या वियवस्थापकीय संचालक लीना बनसोड यांनी आपले मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाल महिलांची उपस्थिती उल्लेखनीय होती.

 

लक्षणीय

◼आदिवासी बांधवांना कृषि व जोड धंद्यांसाठी करणार अर्थसहाय्य.

◼ बचत गटांच्या माध्यमातून प्रक्रिया उद्योगांना देणार प्रोत्साहन.

◼उपलब्ध वनसंपत्तीचा वापर करून प्रक्रिया उद्योगासाठी अनेक महिला बचतगट, उद्योग संस्था यांचा पुढाकार.

◼शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळामार्फत प्रक्रिया उद्योगांसाठी आर्थिक पाठबळ उपलब्ध करून दिले जाणार.

◼प्रशिक्षणाच्या माध्यमातून आदिवासी बांधवांच्या कौशल्य विकासाची क्षमता बांधणी व आर्थिकदृष्ट्या सक्षम करणार.

◼प्रक्रिया उद्योगांना बाजारपेठही उपलब्ध करून देणार.

◼आदिवासी वाड्यापाड्यांना जोडणाऱ्या भगवान बिरसा मुंडा जोडरस्ते योजनेतून दळणवळणाच्या सुविधा निर्माण करण्यासाठी अर्थसंकल्पात भरीव तरतूद.

◼कार्यक्रमात महिला भगिनींची उपस्थिती लक्षणीय.

 

0 0 0 0 0 0 0 0 0

कोयनेतील १२ टीएमसी अतिरिक्त पाणी उपलब्धतेची पालकमंत्र्यांची उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी

सांगलीदि. ३ (जि. मा. का.) – सांगली जिल्ह्यामधील अपुरे पर्जन्यमान व सहा तालुक्यांमधील दुष्काळसदृश्य परिस्थितीचा विचार करता पिण्याच्या व सिंचनाच्या पाण्यासाठी कोयना धरणामधील १२ टीएमसी अतिरीक्त पाण्याची मागणी कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी आज उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आज केली.

तसेच, टेंभू, ताकारी, म्हैसाळ उपसा सिंचन योजनांमधून सन 2023-24 मधील खरीप हंगामात टंचाई अंतर्गत सोडण्यात आलेल्या पाण्याच्या प्रलंबित 35.23 कोटी रूपयांच्या वीज देयकासाठी निधी उपलब्ध करून देण्याचीही मागणी यावेळी डॉ. खाडे यांनी केली. याबाबत सविस्तर तपशील देणारे निवेदन डॉ. खाडे यांनी आज प्रत्यक्ष भेटून उपमुख्यमंत्र्यांना सादर केले. यावेळी खासदार संजय पाटील उपस्थित होते.

निवेदनात म्हटले आहे कि, सांगली जिल्ह्यामध्ये पाणी वापराच्या नियोजनानुसार 47.5 टीएमसी पाणी उपलब्ध करणे आवश्यक आहे. अपुऱ्या पर्जन्यमानामुळे  सांगली जिल्ह्यातील जत, आटपाडी, तासगांव, कवठेमहांकाळ, विटा-खानापूर व मिरज तालुक्यातील पूर्व भागामध्ये दुष्काळसदृश्य परिस्थिती आहे. त्यामुळे पिण्याच्या व सिंचनाच्या पाण्यासाठी 12 टीएमसी अतिरीक्त पाण्याची आवश्यकता आहे.

कोयना धरणामधील पाणीसाठा, एकूण वार्षिक पाणी वापराचे नियोजन, अपेक्षित तूट, सिंचन व वीज निर्मितीसाठी वापरलेले पाणी वजा जाता सध्या 70 टीएमसी पाणी प्रत्यक्षात उपलब्ध आहे. त्यातील पश्चिमेकडील वीजनिर्मितीसाठी 35 टीएमसी व पूर्वेकडील सिंचन / बिगर सिंचनासाठी 35 टीएमसी पाणी वापर अपेक्षित आहे.

सांगली जिल्ह्यासाठी चालू वर्षामध्ये उपलब्ध पाणीसाठ्यामध्ये असणारी तूट, पाण्याचे होणारे संभाव्य बाष्पीभवन, टेंभू, ताकारी, म्हैसाळ या योजना प्रकल्प क्षेत्रामध्ये झालेली वाढ आणि संभाव्य दुष्काळसदृश्य परिस्थिती पाहता 12 टीएमसी पाणी हे कोयनेतून अतिरीक्त उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. कोयनेमध्ये वीज निर्मितीसाठी ठेवलेल्या 35 टीएमसी पाण्यामधून हे 12 टीएमसी पाणी सांगली जिल्ह्यासाठी पिण्यासाठी व सिंचनासाठी उपलब्ध करून द्यावे, अशी विनंती निवेदनात करण्यात आली आहे.

सांगली जिल्ह्यातील पाणी वापर नियोजनाप्रमाणे कोयना, वारणा, वांग, तारळी व पुनर्भरण याद्वारे उपलब्ध करावयाचे 47.05 टीएमसी पाणी व अतिरीक्त आवश्यक असणारे टेंभू, ताकारी, म्हैसाळ उपसा सिंचन योजना आणि कृष्णा नदीतून सोडण्यासाठी मागणी करण्यात आलेले आवश्यक पाणी 12 टीएमसी नियमितपणे व वेळोवेळी उपलब्ध करून द्यावे, असेही आवाहन त्यांनी यावेळी केले.

ऑक्टोबर महिन्यामध्ये वेळेत पाणी न सोडल्यामुळे कृष्णा नदी कोरडी पडल्याने पिण्याच्या व सिंचनाच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. नियोजनाप्रमाणे हे पाणी अखंडितपणे उपलब्ध होईल याची व्यवस्था करण्यात यावी, जेणेकरून नदी कोरडी पडणार नाही व पिण्याच्या व सिंचनाच्या पाण्याची टंचाई निर्माण होणार नाही. त्यासाठी आवश्यक त्या सूचना संबंधितांना देण्यात याव्यात. तसेच टेंभू, ताकारी, म्हैसाळ उपसा सिंचन योजनेमधून सन 2023-24 मधील खरीप हंगामात टंचाई अंतर्गत सोडण्यात आलेलया पाण्याचे वीज देयक रू. 35.23 कोटी इतके प्रलंबित आहेत्यासाठी निधी उपलब्ध करून देणेबाबत संबंधितांना आदेश व्हावेत, असेही निवेदनात म्हटले आहे.

000

ताज्या बातम्या

ज्ञान, पदवी, संशोधनाचा फायदा शेतकऱ्यांसाठी व्हावा – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

0
रत्नागिरी, दि.१४ (जिमाका):  विद्यार्थ्यांनी मिळालेल्या पदवी, ज्ञान, केलेल्या संशोधनाचा फायदा शेतकऱ्यांसाठी करून द्यावा. देशाच्या शेती उत्पादनात वाढ करण्याच्या दृष्टीकोनातून अधिक प्रात्यक्षिकांवर भर द्यावा, हे...

वाळवा तालुक्यातील ४८ गावांच्या डोंगरी उपगटाची निर्मिती करण्यासाठी पुनर्सर्वेक्षण करा – मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

0
मुंबई, दि. १४: शिराळा विधानसभा मतदारसंघातील वाळवा तालुक्यातील ४८ गावातील डोंगरी उपगटाची निर्मिती करण्यासाठी पुनर्सर्वेक्षण करावे आणि त्याचा अहवाल सादर करावा, असे निर्देश महसूल...

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातून खुंदलापूरसह परिसरातील गावे वगळण्याबाबत प्रस्ताव सादर करा – मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

0
मुंबई, दि. १४ : सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील खुंदलापूर येथील जमिनीवरील फेरफार क्रमांक ४६५ वरील भूसंपादनाचे शेरे कमी करण्याबाबत वन विभागाने सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातून...

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रीद्वयांच्या उपस्थितीत मेट्रो लाईन-९ च्या पहिल्या टप्प्याच्या ट्रायल रनला सुरुवात

0
ठाणे, दि.१४ (जिमाका): मुंबई महानगर प्रदेशासाठी (MMR) एक ऐतिहासिक क्षण ठरलेल्या आजच्या दिवशी, मेट्रो लाईन-9 च्या पहिल्या टप्प्याच्या ट्रायल रनला औपचारिकपणे सुरुवात झाली. या...

बांधकाम कामगारांच्या नोंदणीसाठी समिती गठीत करा -मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

0
मुंबई दि. १४: राज्यातील इमारत व इतर बांधकाम कामगारांच्या रोजगार, सेवाशर्तीचे नियमन करणे, त्यांची सुरक्षा, आरोग्य व कल्याणासाठी राज्य शासन सातत्याने उपाययोजना राबवित आहे....