रविवार, मे 11, 2025
Home Blog Page 945

विशेष संक्षिप्त पुनरिक्षण सुधारित कार्यक्रम जाहीर

ठाणे, दि.28(जिमाका) :- मा. भारत निवडणूक आयोगाकडील निर्देशानुसार दि. ०१ जानेवारी, २०२४ या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदारयादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम घोषित करण्यात आलेला आहे. या कार्यक्रमामध्ये मा. भारत निवडणूक आयोगाने विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांच्या तारखांमध्ये बदल करण्यात आलेला आहे.
विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम :-
1. एकत्रीकृत प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करणे -कालावधी -27 ऑक्टोबर (शुक्रवार).
2. दावे व हरकती स्विकारण्याचा कालावधी – दि.२७ ऑक्टोबर २०२३ (शुक्रवार) ते दि.०९ डिसेंबर २०२३
(शनिवार).
3. विशेष मोहिमांचा कालाधी – दि.०४ नोव्हेंबर २०२३ (पहिला शनिवार) व दि.०५ नोव्हेंबर २०२३ (पहिला
रविवार) तसेच दि. २५ नोव्हेंबर २०२३ (चौथा शनिवार) व दि. २६ नोव्हेंबर २०२३ (चौथा रविवार)
4. दावे व हरकती निकालात काढणे – कालावधी – दि. 26 डिसेंबर २०२३ (मंगळवार)
5. अंतिम प्रसिद्धी साठी आयोगाची परवानगी मागणे डाटाबेस अद्यावत करणे आणि पुरवणी – कालावधी –
दि.०१ जानेवारी २०२४ (सोमवार)
6. मतदारयादीची अंतिम प्रसिद्धी करणे- कालावधी- ०५ जानेवारी २०२४ (शुक्रवार)
एकत्रिकृत प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्याबाबत मा. भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार ठाणे जिल्हयात दि.२७ ऑक्टोबर २०२३ रोजी ठाणे जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघाची एकत्रिकृत प्रारूप मतदारयादी जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी यांचे कार्यालय, संबंधित मतदार नोंदणी अधिकारी यांचे मध्यवर्ती कार्यालय (CPS), सहायक मतदार नोंदणी अधिकारी यांचे कार्यालय तसेच सर्व मतदान केंद्रावर मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्यामार्फत प्रसिद्ध केली जाणार आहे.

ठाणे जिल्ह्यातील मतदारयादी मधील मा.भारत निवडणूक निश्चित करण्यात आलेली वैशिष्ट्ये :-
ठाणे जिल्ह्यातील मतदारयादीमध्ये दि. ५ जानेवारी, २०२३ ते दि. २७ ऑक्टोबर, २०२३ दरम्यान एकूण १ लाख २९ हजार ३७२ इतक्या मतदारांची वाढ झालेली आहे. यामध्ये पुरूष – ६५ हजार ६७२, स्त्री – ६३ हजार ६८१ व इतर १९ इतकी वाढ झालेली असून दि. २७ ऑक्टोबर २०२३ रोजी पुरूष – ३४ लाख ३२ हजार ७९२, स्त्री- २९ लाख १० हजार, इतर- १ हजार ९७ अशी एकूण मतदारांची संख्या ६३ लाख ४३ हजार ८८९ इतकी आहे.
मतदान केंद्रांच्या सुसूत्रीकरणादरम्यान १३३ मतदान केंद्र नव्याने तयार करण्यात आलेले असून त्यामध्ये ३६ मतदान केंद्र ही गृहनिर्माण सोयायटी मधील क्लब हाऊस हॉल मध्ये घेण्यात आलेली आहेत.
जिल्ह्यातील महिलांचे प्रमाण (Gender Ratio) यामध्ये एकूण ३ ने वाढ झालेली आहे. दि.०५ जानेवारी, २०२३ रोजी महिलांचे प्रमाण (Gender Ratio) – ८४५ होते. दि. २७ ऑक्टोबर २०२३ रोजी महिलांचे प्रमाण (Gender Ratio) – ८४८ इतका झालेला आहे.
जिल्ह्यातील लोकसंख्येच्या प्रमाणात मतदार नोंदणीचे गुणोत्तर (EP Ratio) ६५.४०% इतके झाले आहे. जिल्ह्यातील १८-१९ वयोगटातील मतदारांमध्ये एकूण २९ हजार १२४ इतकी वाढ झालेली आहे. दि.२७ ऑक्टोबर, २०२३ रोजी – १८-१९ वयोगटातील एकूण मतदार ७५ हजार २२३ इतके आहेत.
दिव्यांग मतदार नोंदणी मध्ये एकूण – १ हजार २०६ इतकी वाढ झालेली आहे. आज रोजी जिल्ह्यात एकूण – ३३ हजार ३३८ इतके दिव्यांग मतदार आहेत.
जिल्ह्यात एकूण १२ हजार ५७२ देह विक्रय करणाऱ्या महिला (FSW) मतदारांची मतदार नोंदणी करण्यात आलेली आहे.
तसेच ४ हजार ३३१ इतक्या असंरक्षित आदिवासी गटातील (PVTG) मतदारांची नोंदणी करण्यात आलेली आहे.
दि.०६ जानेवारी, २०२३ पासून ते २७ ऑक्टोबर २०२३ एकत्रिकृत प्रारूप यादी प्रसिद्ध होईपर्यंत ठाणे जिल्ह्यात एकूण १लाख ७६ हजार २४० इतके नमुना अर्ज – ६,७ व ८ एकत्रितरित्या प्राप्त झाले.
मा. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे घरोघरी भेटी देवून मतदारांच्या पडताळणी दरम्यान ठाणे जिल्ह्यातील अंदाजे १५ लाख १६ हजार ८५३ इतक्या घरांना मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्यामार्फत भेटी देण्यात आलेल्या आहे. या भेटीदरम्यान एकूण मयत मतदार – ४७ हजार ७०९ व एकूण कायमस्वरूपी स्थलांतरित मतदार ४७ हजार ९३३ असल्याचे आढळून आलेले आहेत. या मयत व कायस्वरूपी स्थलांतरित मतदारांबाबत सध्या सुरू असलेल्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमादरम्यान मा. भारत निवडणूक आयोगाच्या दि. ११ ऑगस्ट २०२३ रोजीच्या पत्रात दिलेल्या निर्देशाचे पालन करून वगळणी करण्यात येणार आहे.
आगामी निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमामध्ये १) १८-१९ वयोगटातील मतदारांची नोंदणी, २) लक्षित घटकांची (तृतीय पंथी, FSW, PVTG, बेघर, दिव्यांग मतदार) मतदार नोंदणी, ३) महिला मतदारांची नोंदणी विशेष करून भिवंडी व ऐरोली विधानसभा मतदारसंघामध्ये व इतर सर्व मतदारसंघामध्ये मतदार नोंदणीसाठी विशेष शिबिरे घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी श्री. अशोक शिनगारे व उप जिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम यांनी सर्व मतदारांना आवाहन केले आहे की, आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ पूर्वीच्या या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमामध्ये सर्वांनी सक्रिय सहभाग नोंदवून जास्तीत जास्त पात्र मतदारांची नोंदणी करून घ्यावी.
000000000

कुपवाड शहरातील विकास कामांना अधिकचा निधी देऊ – पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे

सांगली, दि. 28 (जि. मा. का.) :- कुपवाड शहरातील विकास कामांना अधिकचा निधी मिळवून दिला जाईल, अशी ग्वाही पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी कुपवाड येथील विकास कामांच्या शुभारंभ प्रसंगी दिली.

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधारणा योजनेतंर्गत कुपवाडमधील सिद्धार्थनगर येथील अंतर्गत रस्ते कॉक्रिटीकरण करणे, मेघजीभाईवाडी येथील अंतर्गत रस्ते कॉक्रिटीकरण करणे आणि पार्श्वनाथ नगर येथील कदम बंगला ते स्मशानभूमीपर्यंत फुल्ल राऊंड गटार करणे या कामांचा शुभारंभ पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या हस्ते आज करण्यात आले. यावेळी कुपवाड व परिसरातील मान्यवर पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.

कुपवाड शहर व परिसरातील वस्त्यांमध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजनेअंतर्गत विकासाची कामे करण्यात येत आहेत. याबरोबरच या भागातील विकास कामासाठी नगरविकास, आमदार निधी आणि नगरोत्थान मधूनही निधी देऊन या भागातील विकास कामे केली जातील, अशी ग्वाही पालकमंत्री डॉ. खाडे यांनी यावेळी दिली.

०००

राजधानीत महर्षी वाल्मिकी जयंती साजरी

नवी दिल्ली, 28: महर्षी वाल्मिकी यांची जयंती महाराष्ट्र सदन येथे आज साजरी करण्यात आली. कोपर्निकस मार्गस्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात निवासी आयुक्त तथा प्रधान सचिव रुपिंदर सिंह यांनी महर्षी वाल्मिकी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

या वेळी  सहायक निवासी आयुक्त  स्मिता शेलार उपस्थित होत्या. या प्रसंगी उपस्थित सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी महर्षी वाल्मिकी यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

0 0 0 0 0

महर्षी वाल्मिकी यांची जयंती मंत्रालयात साजरी  

मुंबईदि. २८ महर्षी वाल्मिकी यांची जयंती मंत्रालयात साजरी करण्यात आली. याप्रसंगी सामान्य प्रशासन विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी महर्षी वाल्मिकी यांच्या प्रतिमेस पुष्पहार व गुलाबपुष्प अर्पण करून अभिवादन केले.

0000

देशात प्रथमच कार्बन क्रेडिट, ब्लॉक चेन तंत्रज्ञानावर सामंजस्य करार; सामाजिक न्याय विभागाचा पुढाकार

            मुंबई, दि.27 : जगाला भेडसावणाऱ्या कार्बन उत्सर्जनावर नियंत्रण, ब्लॉक चेन तंत्रज्ञानाचा वापर करून प्रक्रियांमध्ये पारदर्शकता आणण्याच्या हेतूने सामाजिक न्याय विभागाने पुढाकार घेतला असून देशात प्रथमच महत्त्वपूर्ण अशा सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या आहेत. सामाजिक न्याय विभागांतर्गत स्थापन करण्यात आलेली ‘महाप्रीत’ ही राज्य शासनाची कंपनी असून या कंपनीच्या माध्यमातून हा करार करण्यात आला आहे. महाप्रीत कंपनीच्या माध्यमातून अनुसूचित जाती संवर्गातील लाभार्थींसाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत असून येणाऱ्या काळात राज्यातील 10 लाख लाभार्थींना मोफत पर्यावरण पूरक निधूर चुलीचेही वाटप करण्यात येणार असल्याचे  सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे यांनी यावेळी सांगितले.

            अणुऊर्जा तंत्रज्ञानाच्या आधारावर शेतकऱ्यांच्या कृषी मालाचा दर्जा वाढवून  त्यांच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी कार्यरत असणारी ‘हिंदुस्थान ऍग्रो को-ऑपरेटिव्ह लिमिटेड तसेच जागतिक स्तरावर कार्बन क्रेडिट निर्माण करणारी सर्कुलॅरिटी  इनओव्हएशन हब  आणि देशांमध्ये ब्लॉक चेन तंत्रज्ञानाचा वापर करून पारदर्शकता आणण्यासाठी कार्यरत इमरटेक सोल्युशन या संस्थांमध्ये हा सामंजस्य करार करण्यात आला आहे.

            बदलत्या हवामानानुसार जगामध्ये कार्बन क्रेडिट निर्माण करण्याचा कल बघता तसेच शेतकऱ्यांना प्रोत्साहित करून त्यांना कार्बन क्रेडिट प्राप्त करून देण्यासाठी जागतिक पातळीवर कार्यरत असणारे जोएल मायकल हे इंग्लंड येथून ऑनलाईन पद्धतीने उपस्थित होते. सफाई कामगारांबरोबरच शेतकऱ्यांनाही सामाजिक न्याय विभागाच्या सोबत काम करून आर्थिक पाठबळ येणाऱ्या काळात देण्यात येईल असे जोएल यांनी यावेळी सांगितले.

             प्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांच्या अणुउर्जा तंत्रज्ञानाचा वापर करून त्यांच्या मार्गदर्शनाखाली शेतमालाचा दर्जा व टिकवण क्षमता वाढवण्यासाठी गेल्या अनेक वर्षापासून काम करत असलेले हिंदुस्थान ऍग्रो को ऑपरेटिव्हचे डॉ.भारत ढोकणे पाटील यांनी या कराराच्या माध्यमातून सामाजिक न्याय विभाग अंतर्गत येणाऱ्या लाभार्थींना संधी निर्माण होणार असल्याचे सांगितले.

तर इमरटेक सोल्युशन चे  गौरव सोमवंशी यांनी ब्लॉक चेन तंत्रज्ञानाचा वापर करून प्रक्रियेमधील पारदर्शकता आणण्यासाठी सामाजिक न्याय विभागांतर्गत लाभार्थींसाठी त्यांचे हिताचे प्रकल्प राबवून त्यांचे आरोग्य सांभाळण्यांबरोबरच त्यांचे उपजीविकेचे साधन निर्माण करणे, शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वृद्धी करणे व पर्यावरण पूरक प्रकल्पांच्या अंमलबजावणीतून कार्बन क्रेडिट निर्माण करणे,प्लास्टिक क्रेडिट, ब्लॉक चेन संकल्पनांचा प्रत्यक्षात वापर करून जनहितार्थ प्रकल्प राबविण्यात येणार असल्याचे यावेळी सांगितले.

             महाप्रीत या कंपनीच्या माध्यमातून राज्यातील अनुसूचित जाती संवर्गातील लाभार्थींसाठी व्यापक उपक्रम हाती घेण्यात आले असून त्यातून रोजगार निर्मिती, आधुनिक प्रशिक्षण,आरोग्याची काळजी,आर्थिक संपन्नता व एकूणच मुख्य साखळी निर्माण करून सामाजिक न्याय विभागाने इतर विभागांसाठी पथदर्शी ठरणाऱ्या  सामंजस्य  करार घडवून आणला आहे. यावेळी सामाजिक न्याय विभागाचे सचिव  सुमंत भांगे, महाप्रीत कंपनीचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक बिपिन श्रीमाळी , तसेच कार्यकारी संचालक जितेंद्र देवकाते, इमरटेक सोल्युशनचे  गौरव सोमवंशी,हिंदुस्थान ऍग्रो को ऑपरेटिव्हचे  डॉ भारत ढोकणे  पाटील, तर जोएल मायकल हे इंग्लंड येथून ऑनलाइन पद्धतीने  उपस्थित होते.

००००

शैलजा पाटील/विसंअ

पदपथावरील आणि असुरक्षित बालकांच्या पुनर्वसनासाठीच्या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करणार – राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग अध्यक्ष प्रियंक कानूनगो

मुंबई, दि.27 : देशात रस्त्यावर राहणाऱ्या मुलांची समस्या मोठी आहे. त्यामुळे या मुलांचे पुनर्वसन, शिक्षण, आरोग्याची काळजी घेण्यासाठी देशात प्रथमच सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार यासाठी धोरण तयार करण्यात आले आहे.  महाराष्ट्रासह देशातील 22 राज्यांनी हे धोरण स्वीकारले असून आतापर्यंत 23 हजार रस्त्यावरील बालकांची सुटका केली आहे. त्यात महाराष्ट्रातील 4 हजार बालकांचा समावेश असल्याची माहिती राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाचे अध्यक्ष प्रियंक कानूनगो यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

श्री. कानूनगो म्हणाले की, रस्त्यावर राहणाऱ्या मुलांसंदर्भात विशेष करून कोणत्याही प्रकारचे धोरण आखले गेले नव्हते. एनटीपीसीआर आणि महाराष्ट्र शासन संयुक्तपणे बालकांची सुटका आणि पुनर्वसन  पोर्टलच्या माध्यमातून काम करीत आहे. रस्त्यावरील मुलांना देशात प्रथमच अशा पद्धतीचे हक्क त्यांना प्रदान करण्यात येत आहेत. आंतरराष्ट्रीय बाल दिवसाच्या अनुषंगाने राष्ट्रीय बाल हक्क आयोग या संदर्भातील बृहत कृती कार्यक्रम राबविणार आहे. कुटुंबात बालकांचे पुनर्वसन केल्यास त्यांचे सशक्तीकरण होऊ शकते हे ओळखून या मुलांना त्यांच्या पालकांचा शोध घेऊन त्यांना त्यांच्या स्वाधीन करण्यात येणार आहे.

राष्ट्रीय बाल हक्क आयोग बालकांचे हक्क आणि संरक्षण या संदर्भात काम करते. बालकांना  शारीरिक किंवा मानसिक हिंसा, इजा किंवा गैरवर्तन, दुर्लक्ष किंवा निष्काळजीपणा, दुवर्तन किंवा शोषण, लैंगिक गैरवर्तनासह सर्व बाबींपासून संरक्षण मिळविण्याचा हक्क आहे. प्रत्येक मूल सर्व प्रकारच्या लैंगिक शोषण, लैंगिक छळ आणि लैंगिक गैरवर्तनापासून कायद्याद्वारे संरक्षित आहे. मनोरंजन क्षेत्रातील बालकांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी देखील बालहक्क आयोग काम करत आहे. बालकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात बालकांना आणण्यासाठी  मान्यताप्राप्त मदरसे तसेच मान्यता नसलेले मदरसे यांचे मॅपिंग करणारे महाराष्ट्र हे उत्तर प्रदेश नंतर दुसरे राज्य आहे, असेही अध्यक्ष श्री. कानूनगो यांनी सांगितले.

यावेळी राष्ट्रीय बालहक्क आयोगाच्या सदस्य सचिव रुपाली बॅनर्जी, सदस्य प्रीती दलाल, महाराष्ट्र राज्य बाल विकास आयुक्तालयाचे उपायुक्त राहुल मोरे उपस्थित होते.

००००

श्रद्धा मेश्राम/स.सं

मुंबई शहराच्या २५२ कोटी रुपये खर्चाच्या प्रकल्प अहवालास मान्यता

मुंबई, दि. २७ :- मुंबई शहर महिला सुरक्षितता पुढाकार योजनेची उच्च शक्ती प्रदत्त समितीची बैठक आज अप्पर मुख्य सचिव (गृह) यांच्या दालनात झाली. बैठकीला अपर मुख्य सचिव (गृह) सुजाता सौनिक, पोलीस आयुक्त विवेक फणसळकर आदी उपस्थित होते. बैठकीत मुंबई शहरासाठी एकूण २५२ कोटी रुपये इतक्या खर्चाच्या प्रकल्प अहवालास मान्यता मिळाली आहे.

देशात महिला सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना करण्याच्या अनुषंगाने केंद्र शासनातर्फे निर्भया निधी अंतर्गत विविध उपाययोजना राबविण्यात येतात. या निर्भया निधी अंतर्गत  ‘निर्भया – सेफ सिटी’ ही योजना देशातील ८ शहरात राबविली जात आहे. या केंद्र पुरस्कृत योजनेमध्ये राज्यातील बृहन्मुंबई शहराचा समावेश आहे.

उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या योजनेची अंमलबजावणी अधिक गतीने व परिणामकारकरित्या करण्याचे निर्देश दिले आहेत. बैठकीत मुंबई शहरात महिला सुरक्षिततेच्या अनुषंगाने पोलीस आयुक्त, मुंबई यांच्या स्तरावर झालेल्या निविदा प्रक्रियेच्या अनुषंगाने कार्यादेश देण्याचा निर्णय घेण्यात आला.

या मान्यतेमुळे मुंबई पोलिसांना गुन्ह्यांच्या तपासासाठी सायबर साहित्य उपलब्ध होईल. यामुळे महिलांवरील गुन्ह्यांच्या संदर्भात प्रतिसाद कालावधी कमी होईल. तसेच मुंबई पोलिसांना मोबाईल डाटा टर्मिनस व गुन्ह्याच्या स्थळांच्या चित्रीकरणासाठी साधने उपलब्ध होतील. जनतेच्या माहितीसाठी डिजिटल बोर्डच्या उभारणीस देखील बैठकीत मान्यता देण्यात आली. याव्यतिरिक्त पोलिसांना प्रशिक्षण व्यवस्था व वाहतूक पोलिसांनाही स्मार्टफोन देण्याचा बैठकीत निर्णय घेण्यात आला. अत्याधुनिक उपकरणे तसेच पोलिसांना प्रशिक्षणामुळे पोलीस प्रशासनातील क्षमता वृद्धिंगत होवून दोषसिध्दीचे प्रमाण वाढण्यास मदत होईल. या उपाययोजनांच्या माध्यमातून मुंबई शहर महिलांसाठी अधिक सुरक्षित होणार आहे, असा विश्वास यावेळी अपर मुख्य सचिव श्रीमती सौनिक यांनी व्यक्त केला.

००००

नीलेश तायडे/विसंअ

 

मराठा समाजास मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्रासंदर्भात गठित न्यायमूर्ती संदीप शिंदे (निवृत्त) यांच्या समितीला २४ डिसेंबर २०२३ पर्यंत मुदतवाढ

मुंबई, दि. 27 : मराठवाड्यातील मराठा समाजास मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र देण्‍याच्या प्रकियेमध्ये आवश्यक त्या अनिवार्य पुराव्यांची वैधानिक व प्रशासकीय तपासणी करण्याबाबत तसेच तपासणीअंती मराठा समाजास मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्र देण्याची कार्यपध्‍दती विहित करण्‍यासाठी न्‍यायमूर्ती संदीप शिंदे (निवृत्‍त) यांच्या अध्‍यक्षतेखाली गठित केलेल्या समितीस शाश्वत व आधारभूत कामकाज प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी दि.24 डिसेंबर 2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असल्याची माहिती, सामान्य प्रशासन विभागाचे (साविस) सचिव सुमंत भांगे यांनी दिली.

मराठवाड्यातील मराठा समाजास मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रियेमध्ये आवश्यक व अनिवार्य निजामकालिन पुरावे, वंशावळी, शैक्षणिक पुरावे, महसुली पुरावे, निजामकाळात झालेले करार, निजामकालिन संस्थानिकांना दिलेल्या सनदा, राष्ट्रीय दस्तावेज इत्यादी पुराव्यांची वैधानिक व प्रशासकीय तपासणी करण्याबाबत तसेच तपासणीअंती पात्र व्यक्तींना मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्र देण्याची कार्यपध्दती विहीत करण्‍याची जबाबदारी सोपविलेली आहे.

या समितीचे अध्‍यक्ष न्‍यायमूर्ती संदीप शिंदे (निवृत्‍त) असून विभागीय आयुक्‍त, छत्रपती संभाजीनगर हे या समितीचे सदस्‍य सचिव आहेत आणि अपर मुख्‍य सचिव (महसूल) व प्रधान सचिव, विधी व न्‍याय विभाग, मंत्रालय, मुंबई यांच्यासह मराठवाड्यातील आठ जिल्‍ह्यांचे जिल्‍हाधिकारी हे या समितीचे सदस्‍य आहेत.

समितीची पहिली बैठक दि. 11 सप्टेंबर 2023 रोजी मुंबईत झाली. या बैठकीमध्‍ये समितीच्‍या कार्यकक्षेबाबत सविस्‍तर चर्चा होऊन समितीच्‍या पुढील कामकाजाची दिशा ठरविण्‍यात आली. तसेच या पूर्वीच्‍या समितीने या विषयासंबंधाने निजामकालिन जुने महसुली अभिलेखे तपासण्‍यासाठी राज्‍य शासनाचे एक पथक हैदराबाद येथे अभिलेखांचा शोध व तपासाबाबत पाठविले होते. या पथकास निजामकालिन जुन्‍या अभिलेखातील सनदा, मूंतखब, करार, जनगणनेचे अभिलेखे इत्‍यादी तपासण्‍याबाबत सूचना देण्‍यात आल्‍या होत्‍या. त्‍यानुसार महाराष्‍ट्र राज्‍याच्‍या जमाबंदी आयुक्‍तांच्‍या अध्‍यक्षतेखाली त्‍यांच्‍या कार्यालयातील काही अधिकारी व विभागीय आयुक्‍त कार्यालय, छत्रपती संभाजीनगर कार्यालयातील अधिकारी यांच्‍या पथकाने हैदराबाद येथे भेट दिली. त्‍यांच्‍या सोबत मोडी लिपी व ऊर्दू भाषा जाणकार व्‍यक्‍तींचा समावेश करण्‍यात आला होता. या पथकाने दि. 14 सप्टेंबर 2023 रोजी हैदराबाद येथे भेट देऊन जुने निजामकालिन महसुली अभिलेखे, जनगणना अभिलेखे, अबकारी विभागाचे अभिलेखे व पुरातत्‍व विभागाकडील अभिलेखे, मूंतखब इत्‍यादींची पाहणी केली व पथकाने उपलब्‍ध मुंतखब अभिलेख्‍यांच्‍या प्रती स्‍कॅन करुन सोबत आणल्‍या. याबाबतची माहिती समितीच्‍या पहिल्‍या बैठकीत देण्‍यात आली.

न्‍यायमूर्ती संदीप शिंदे (निवृत्‍त) समितीची दुसरी बैठक 15 सप्टेंबर 2023 रोजी मुंबई येथे झाली. या बैठकीमध्‍ये मराठवाड्यातील जुने महसुली अभिलेखे, जन्‍म-मृत्‍यू नोंदीचे अभिलेखे, 1967 पूर्वीचे शैक्षणिक अभिलेखे, पोलिसांकडील गुन्‍हा नोंद रजिस्‍टर, अबकारी विभागाकडील अभिलेखे, वक्‍फ बोर्डाकडील अभिलेखे, सैनिक कल्‍याण विभागाचे अभिलेखे, कारागृह विभागाकडील नोंदी इत्‍यादींची तपासणी करण्‍याचे निश्चित करण्‍यात आले. तसेच यापूर्वी कुणबी जातीची दिलेली प्रमाणपत्रे, नाकारलेले अर्ज, जात वैधता पडताळणी समितीकडून वैध ठरविण्‍यात आलेली प्रकरणे, अवैध ठरविलेली प्रकरणे व अवैध ठरविण्‍याचे कारण याबाबत जिल्‍हानिहाय तपासणी करुन जिल्हाधिकारी यांनी अहवाल सादर करण्‍याचे बैठकीत निर्देश देण्‍यात आले.

समितीच्‍या 15 सप्टेंबर 2023 रोजीच्‍या बैठकीतील निर्देश विचारात घेऊन सर्व विभागांचा समन्‍वयन होऊन अभिलेखांची तपासणी सुलभतेने होण्‍याच्‍या दृष्‍टीने सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांमध्‍ये निवासी उपजिल्‍हाधिकारी यांच्या नियंत्रणात विशेष कक्ष स्‍थापन करण्‍यात आला. या कक्षामध्‍ये विविध 12 विभागांचे जिल्‍हास्‍तरीय अधिकारी नेमण्‍यात आले. जुन्‍या  अभिलेखांपैकी काही अभिलेखे मोडी लिपी, ऊर्दू भाषेत असल्‍यामुळे तपासणीसाठी ऊर्दू शाळेतील शिक्षक व मोडी लिपी जाणकारांची मदत घेण्‍याच्‍या सूचना देण्‍यात आल्‍या.

न्‍यायमूर्ती संदीप शिंदे (निवृत्‍त) समितीची तिसरी बैठक 22 सप्टेंबर 2023 रोजी मुंबई येथे झाली. या बैठकीमध्‍ये जिल्‍हानिहाय अभिलेख तपासणी कामाचा आढावा घेण्‍यात आला. तसेच तपासलेल्‍या नोंदी बाबत अहवाल सादर करण्‍यासाठी व त्‍यात सारखेपणा राहण्‍यासाठी विभागातील सर्व जिल्ह्यांसाठी एक नमुना तयार करण्‍याचे निर्देश समितीने दिले. त्‍यानुसार पुढीलप्रमाणे विभागनिहाय अभिलेख्‍यांची तपासणी करण्‍याचे निर्देश दिले.

1)        महसूली अभिलेखे, खसरा पत्रक, पाहणी पत्रक, क-पत्रक, कूळ नोंदवही, नागरिकांचे राष्‍ट्रीय रजिस्‍टर सन 1951, नमुना नं.1 हक्‍क नोंदपत्रक, नमुना नं.2 हक्‍क             नोंदपत्रक व 7/12 उतारे,

2)        जन्‍म-मृत्‍यू रजिस्‍टर (गाव नमुना नं.14)

3)        शैक्षणिक अभिलेखे-  प्रवेश निर्गम नोंदवही / जनरल रजिस्‍टर,

4)        राज्‍य उत्‍पादन शुल्‍क विभागाकडील अभिलेखे- अनुज्ञप्‍ती नोंदवह्या, मळी नोंदवही, ताडी नोंदवही, आस्‍थापना अभिलेख,

5)        कारागृह विभागाचे अभिलेखे- रजिस्‍टर ऑफ अंडर ट्रायल प्रीझनर, कच्‍चा कैद्यांची नोंदवही,

6)        पोलीस विभाग- गाववारी, गोपनीय रजिस्‍टर सी-1, सी-2, क्राइम रजिस्‍टर, अटक पंचनामे व एफ आय आर रजिस्‍टर

7)        सह जिल्‍हा निबंधक तथा मुद्रांक जिल्‍हाधिकारी- खरेदीखत नोंदणी रजिस्‍टर, डे बुक, करारखत, साठेखत, इसार पावती, भाडे चिठ्ठी, ठोकेपत्रक, बटाई पत्रक,                 दत्‍तक विधानपत्रक, मृत्‍यूपत्रक, इच्‍छापत्रक, तडजोडपत्रक, इतर दस्‍त,

8)        भूमी अभिलेख विभाग- पक्‍काबुक, शेतवारपत्रक, वसुली बाकी, ऊल्‍ला प्रतीबुक, रिव्हीजन प्रतीबुक, क्‍लासर रजिस्‍टर व हक्‍क नोंदणीपत्रक,

9)        जिल्‍हा सैनिक कल्‍याण अधिकारी- माजी सैनिकांच्‍या नोंदी,

10)      जिल्‍हा वफ्क अधिकारी- मूंतखब

11)      शासकीय कर्मचा-यांचा सेवा तपशील- सन 1967 पूर्वीचे कर्मचा-यांचा सेवा तपशील.

12)      जात प्रमाणपत्र पडताळणी समिती- वैध व अवैध प्रकरणांचा तपशील व कारणे.

याशिवाय हैदराबाद येथून प्राप्त करुन आणलेल्‍या ऊर्दू भाषेतील मूंतखब अभिलेखांच्‍या मराठी भाषेत भाषांतरीत नमुना दाखल प्रती पाठविण्‍याच्‍या समितीने सूचना दिल्‍या. सक्षम प्राधिकारी यांनी दिलेल्‍या जात प्रमाणपत्रांबाबत व जात पडताळणी समितीने घेतलेल्‍या निर्णयांच्‍या अनुषंगाने चर्चा होऊन जात पडताळणी समितीकडील वैध व अवैध प्रकरणांच्‍या नमूना दाखल आदेशाच्‍या प्रती सादर करण्‍याच्‍या समितीने सूचना दिल्‍या.

न्‍यायमूर्ती संदीप शिंदे (निवृत्‍त) समितीची चौथी बैठक 30 सप्टेंबर 2023 रोजी मुंबई येथे झाली. या बैठकीमध्‍ये जिल्ह्यांनी त्‍यांना विहित करुन दिलेल्‍या विवरणपत्रातील माहितीच्‍या अनुषंगाने माहिती सादर केली. प्रत्‍येक जिल्ह्याने त्‍यांच्‍या जिल्ह्यातील बारा विभागांच्‍या 46 अभिलेख प्रकारांची तपासणी बाबतची प्रगती समिती मांडली. हा अभिलेख प्रकार कोणत्‍या कायद्याच्‍या / नियमांच्‍या तरतुदीनुसार ठेवले जात होते, याबाबत त्‍यांचे नमुना दाखल प्रतीसह समितीस माहिती दिली. या बैठकीत अध्‍यक्षांनी तपासलेल्‍या अभिलेखांचे 1948 पूर्वीचे (निजामकालीन) व 1948 ते 1967 (इतर मागास वर्गाचे प्रमाणपत्र देण्‍यासाठीचा अधिसूचित दिनांक 13 ऑक्टोबर 1967 असल्‍याने) अशा दोन कालावधीमध्‍ये माहिती देण्‍याचे निर्देश दिले व त्‍याची नोंद सर्व जिल्‍हाधिकाऱ्यांनी घेऊन त्‍याप्रमाणे त्‍या कालावधीची सर्व विभागांची अभिलेख तपासण्‍याची कार्यवाही सुरू करण्‍यात आली व त्‍यामध्‍ये आढळलेल्‍या कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी नोंदीची माहिती शासनास व समितीस देण्‍यात आली.

यानंतर समितीने छत्रपती संभाजीनगर विभागातील सर्व आठ जिल्‍ह्यांमध्‍ये जिल्‍हानिहाय बैठका घेण्‍याचे व सर्वसामान्य नागरिकांकडून कुणबी नोंदीसंबंधी पुरावे स्वीकारण्‍याचे ठरवून तसा समितीचा जिल्‍हानिहाय दौरा कार्यक्रम सर्व जिल्‍ह्यांना कळविण्‍यात आला. नागरिकांनाही याबाबत माहिती होण्‍यासाठी या कार्यक्रमास वर्तमानपत्रातून व्‍यापक प्रसिध्‍दी देण्‍यात आली.

न्‍यायमूर्ती संदीप शिंदे (निवृत्‍त) समितीची पाचवी बैठक 11 ऑक्टोबर 2023 रोजी विभागीय आयुक्‍त कार्यालय, छत्रपती संभाजीनगर येथे विभागीय आयुक्‍तालय व छत्रपती संभाजीनगर जिल्‍ह्याच्‍या कामकाजाबाबत झाली. या बैठकीमध्‍ये जिल्‍ह्याच्‍या अहवालाबाबत अभिलेख प्रकार व विभागनिहाय सविस्‍तर आढावा घेण्‍यात आला. या आढाव्‍यात निदर्शनास आल्‍याप्रमाणे या बैठकीत भूमी अभिलेख विभागाकडील नमुना 33 व 34, छत्रपती संभाजीनगर येथील सैन्‍य भरती कार्यालयाकडील सैन्‍य भरतीचे वेळी घेतलेल्‍या नोंदी, नगरपालिकेकडील जुने शेतवार तक्‍ता वसुली व आमदनी (अॅसेसमेंट रजिस्‍टर) हे अभिलेख प्रकार नव्‍याने समाविष्ट करण्‍याचे निर्देश दिले. समितीने ठरवून दिलेल्‍या दुपारी 2 ते 4 या वेळेत 18 नागरिक / शिष्‍टमंडळांनी समितीस पुरावे / निवेदने सादर केली.

याप्रमाणे न्‍यायमूर्ती संदीप शिंदे (निवृत्‍त) समितीची सहावी बैठक 12 ऑक्टोबर 2023 रोजी जालना येथे झाली. या बैठकीसाठी शासन पत्र 3 ऑक्टोबर 2023 व 6 ऑक्टोबर 2023 रोजी कळविल्‍यानुसार आंदोलनकर्त्‍यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.  त्‍यांनी बैठकीच्‍या कामकाजात सहभाग घेऊन आपल्‍या सूचना समिती समोर मांडल्‍या. समितीची सातवी बैठक 17 ऑक्टोबर 2023 रोजी हिंगोली येथे, आठवी बैठक 18 ऑक्टोबर 2023 रोजी नांदेड येथे व नववी बैठक 19 ऑक्टोबर 2023 रोजी परभणी येथे झाली. या वेळी  समितीने ठरवून दिलेल्‍या दुपारी 2 ते 4 या वेळेत अनुक्रमे 63, 29, 64 व 83 नागरिक /शिष्‍टमंडळांनी समितीस पुरावे /निवेदने सादर केली. अशाप्रकारे समितीने केलेल्‍या आवाहनास नागरिकांकडून या कार्यक्रमादरम्‍यान मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला व संबंधितांनी मा. अध्‍यक्ष व समिती सदस्‍यांच्‍या भेटी घेऊन, पुरावे / कागदपत्रे देऊन म्‍हणणे मांडले.

न्‍यायमूर्ती संदीप शिंदे (निवृत्‍त) समितीची लातूर येथे 26 ऑक्टोबर 2023 रोजी व धाराशिव येथे दि.27 ऑक्टोबर 2023 रोजी बैठक पार पडली. समितीची पुढील बैठक बीड येथे 28 ऑक्टोबर 2023 रोजी होणार आहे.  या दौऱ्यामध्‍ये समिती जिल्‍हा बैठका घेऊन नागरिकांकडून पुरावे स्वीकारण्‍याचे पूर्वीप्रमाणे कामकाज करणार आहे.

आतापर्यंत छत्रपती संभाजीनगर विभागातील सर्व जिल्ह्यांमध्‍ये विविध विभागांच्‍या अभिलेखांतील सुमारे दीड कोटी नोंदीची तपासणी करण्‍यात आली असून हे काम अजूनही प्रगतीपथावर आहे. जुने अभिलेखे अत्‍यंत जीर्ण अवस्‍थेत असून त्‍यांचे वाचन करुन नोंदी शोधणे जिकरीचे होत आहे. या प्रक्रियेस बराच वेळ लागत आहे. जुन्‍या अभिलेख्‍यातील बहुतांश नोंदी मोडी लिपी अथवा ऊर्दू भाषेतील आहेत व नोंदींचे प्रमाणिकरण फारशी भाषेतीलही आहे. त्‍याबाबतचे भाषा जाणकार सहजतेने उपलब्‍ध होत नसल्‍याचे निदर्शनास येते. त्‍याशिवाय मोडी लिपी जाणकार व्‍यक्‍तींची उपलब्‍धताही मर्यादित असून ऊर्दू व मोडीतील पुरावे / कागदपत्रे मोठ्या प्रमाणात भाषांतरीत करून घ्‍यावी लागत आहेत. त्‍यामुळे या अभिलेख्‍यांच्‍या तपासणीसाठी वेळ लागत आहे. याप्रमाणे कुणबी जातीच्‍या नोंदी शोधण्‍याची कार्यवाही पूर्ण करून अशा नोंदी असलेले अभिलेखे व्यवस्थित जतन करुन त्‍याच्‍या प्रती सार्वजनिक संकेतस्‍थळावर उपलब्‍ध करून देण्‍याचे नियोजित आहे. यामुळे मराठा समाजातील संबंधितांना या अभिलेखांच्‍या प्रमाणित प्रती संबंधित कार्यालयातून सुलभतेने उपलब्‍ध होऊ शकतील.

नागरिकांनी आतापर्यंत समितीस सादर केलेल्‍या व आगामी दौरा कार्यक्रमात सादर होणाऱ्या पुराव्‍यांचे भाषांतर करुन अभ्‍यास करणे, कायदेशीर आधाराशी पडताळणी करणे व त्‍यावर उचित निर्णय घेणे यासाठी देखील मोठा अवधी लागणार आहे. जिल्‍हानिहाय अभिलेखे तपासणी पूर्ण झाल्‍यानंतर प्राप्‍त होणाऱ्या अहवालाचे विश्‍लेषण करुन निष्‍कर्षापर्यंत पोहचणे आवश्‍यक आहे. यासाठी जिल्‍हानिहाय अंतिम अहवाल प्राप्‍त झाल्‍यानंतर काही कालावधी लागणार आहे. तसेच समितीस हैद्राबाद येथे भेट देऊन आणखी काही पुरातन अभिलेख्‍यांची तपासणी करावयाची आहे. सद्यःस्थितीत तेलगंणा राज्‍य विधानसभेच्‍या निवडणुकांची प्रक्रिया सुरू असून निवडणूकीची आदर्श आचारसंहिता लागू आहे. तेलगंणा राज्‍य शासनाचे अधिकारी निवडणूक विषयक कामकाजात व्‍यस्‍त असून त्‍यांच्‍या उपलब्‍धतेनुसार हा दौरा आयोजित करावा लागणार आहे. अपर मुख्य सचिव (महसूल), महाराष्ट्र शासन यांनी तेलंगणा राज्याचे प्रधान सचिव (महसूल) यांना पत्र पाठवून निजामकालिन अभिलेखे तपासणीसाठी उपलब्ध करुन देण्याबाबत विनंती केलेली आहे.

मराठवाड्यातील आतापर्यंतच्या 7 जिल्ह्यात घेतलेल्या बैठका त्या अनुषंगाने नागरिकांकडून समितीस सादर करण्यात आलेल्या विविध अनुषंगिक पुराव्यांचा विचार करता समितीच्या कुणबी-मराठा, मराठा-कुणबी यांचे प्रमाणिकरण करण्याच्या अनुषंगाने नागरिकांचे सहकार्य चांगल्या पद्धतीने मिळत आहे. याबाबत शासनाच्या ज्या विविध यंत्रणा आपल्याकडील जुनी कागदपत्रे ज्यामध्ये कुणबी, मराठा-कुणबी, कुणबी-मराठा अशा प्रकारचे नोंदी तपासण्याचे काम करत आहेत, त्यांचीही तपासणी प्रगतीपथावर आहे. बहुतांशी कागदपत्रे 1967 च्या पूर्वीचे आहेत. कागदपत्रांचे स्वरुप आणि तपासणीमधील विद्यमान अधिकारी/ कर्मचाऱ्यांचा अनुभव यामध्ये तसेच, कागदपत्रे ही मोडी, ऊर्दू आणि फारशी भाषेमध्ये आहेत. मोडी लिपी करिता पुराभिलेख विभागाने शासनाचे चार कर्मचारी आणि ज्यांनी मोडीचे प्रशिक्षण घेतलेली आहेत. असे काही पुणे, छत्रपती संभाजीनगर परिसरातील जाणकार यांच्या सेवा उपलब्ध करून देण्याबद्दल आदेश काढलेले आहेत. ज्या मोडी आणि उर्दू कागदपत्रांचा शोध घेणे गरजेचे आहे, त्याबद्दल या जाणकारांकडून तपासून घेण्याचे काम सुरू आहे. या नोंदी ऊर्दू आणि मोडी मध्ये अधिक चांगल्या प्रमाणात मिळत आहेत आणि तशी कुणबी जातीच्या नोंदींची आकडेवारी वाढत आहे

समितीस समाजातील विचारवंतांसोबत विचारविनिमय करावयाचा असून अभ्‍यासक, विधिज्ञ व तज्ञ व्‍यक्‍तींच्‍या सूचना व मते जाणून घेऊन त्‍याचा उपयोग समिती अहवाल तयार करताना करणार आहे.

समितीस निश्चित करुन दिलेल्‍या कार्यकक्षेनुसार परिपूर्ण व सविस्‍तर अहवाल तयार करण्‍यासाठी या सर्व बाबींचा विचार करता अधिकचा कालावधी कदाचित आणखी दोन महिन्‍यांचा लागणार आहे आणि याशिवाय आजू-बाजूंच्‍या राज्‍यात मराठा समाजाच्‍या आरक्षणाबाबत काय संविधानिक/कायदेशीर तरतुदींचे आधार घेण्‍यात आलेले आहेत त्‍याचे संदर्भ उपलब्‍ध करुन घेणे व या संबंधाने त्‍याची तपासणी करणे तसेच जुन्‍या हैद्राबाद संस्‍थानातून स्टेट गॅझेटीयरचे उपलब्‍ध असलेले आधारभूत अभिलेखे व तेथे उपलब्‍ध असलेल्‍या तेव्‍हाच्‍या जातनिहाय जनगणनेचे आधारभूत अभिलेखे प्राप्‍त करणे व अभ्‍यासणे आवश्‍यक ठरत असल्‍याने समितीने पार पाडत असलेल्‍या कामकाजास भविष्‍यातील कोणत्‍याही आव्‍हांनाच्‍या संभाव्‍यतेचा विचार करुन शाश्‍वत व आधारभूत कामकाज प्रक्रिया पूर्ण करण्‍यासाठी समितीस  दि.24 डिसेंबर, 2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, अशी माहिती सामान्य प्रशासन विभागाचे (साविस) सचिव श्री. भांगे यांनी दिली आहे.

०००००

काशीबाई थोरात/विसंअ

 

‘माझी माती, माझा देश’ उपक्रमांतर्गत अमृत कलश यात्रा दिल्लीकडे मार्गस्थ

मुंबई, दि. २७ – ‘मेरी माटी, मेरा देश’ अर्थात ‘माझी माती, माझा देश’ अभियानअंतर्गत महाराष्ट्रातील विविध गावांमधून मातीचे अमृत कलश जमा करण्यात आले आहेत. हे कलश घेऊन आलेल्या ८८१ स्वयंसेवकांची अमृत कलश यात्रा विशेष रेल्वे आज दिनांक २७ ऑक्टोबर २०२३ रोजी मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानक येथून राजधानी नवी दिल्लीकडे मार्गस्थ झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या विशेष रेल्वेला हिरवा झेंडा दाखवला.

यावेळी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर जिल्हा पालकमंत्री दीपक केसरकर, बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव तथा सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, नगर विकास विभागाचे प्रधान सचिव डॉ.के.एच.गोविंदराज, शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजित सिंह देओल, मुंबई शहर जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर, पश्चिम रेल्वेचे मुख्य महाव्यवस्थापक कुशल सिंह, विभागीय व्यवस्थापक नीरज वर्मा आदींची प्रमुख उपस्थिती होती

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मान्यवरांनी यावेळी स्वयंसेवकांशी संवाद साधून त्यांना शुभेच्छा दिल्या. देशभक्ती वाढीस लावणारा ‘माझी माती माझा देश’ कार्यक्रमाची सुरूवात ९ ऑगस्ट रोजी ऑगस्ट क्रांती मैदानातून झाली होती.

00000

दहावीच्या परीक्षेसाठी प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांचे अर्ज शाळांनी ऑनलाईन पद्धतीने भरावेत – मुंबई विभागीय मंडळ सचिव डॉ.सुभाष बोरसे

मुंबई, दि. 27 : सन 2024 मध्ये होणाऱ्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इयत्ता दहावी) परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांचे अर्ज प्रचलित ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहेत. यासाठी सर्व माध्यमिक शाळाप्रमुखांनी विद्यार्थ्यांचे अर्ज नियमित शुल्कासह सरल डाटाबेसवरून सोमवार 20 नोव्हेंबर 2023 पर्यंत भरावेत, असे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या मुंबई विभागीय मंडळाचे सचिव डॉ. सुभाष बोरसे यांनी कळविले आहे.

दहावीसाठी प्रवीष्ट होणारे नियमित विद्यार्थी, पुनर्परीक्षार्थी, यापूर्वी नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खासगी विद्यार्थी, श्रेणीसुधार योजनेअंतर्गत व तुरळक विषय घेऊन परीक्षेस प्रवीष्ट होणाऱ्या तसेच औद्योगिक प्रशिक्षण संस्थेद्वारे ट्रान्स्फर ऑफ क्रेडीट घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहेत.

कोणताही विद्यार्थी अर्ज भरण्यापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता मुख्याध्यापकांनी घ्यावी, असे आवाहन मंडळाचे सचिव डॉ.बोरसे यांनी केले आहे.

००००

बी.सी.झंवर/विसंअ

ताज्या बातम्या

जिल्हा खनिज प्रतिष्ठान अंतर्गत बाधित क्षेत्रासह आरोग्य व शाश्वत विकासाला प्राधान्य – पालकमंत्री चंद्रशेखर...

0
️नियामक परिषद बैठक संपन्न नागपूर, दि. १० : जिल्ह्यातील प्रत्यक्ष खाण बाधीत क्षेत्र व अप्रत्यक्ष खाण बाधित क्षेत्रात शासन निर्णयान्वये दिलेल्या निर्देशानुसार येत्या आर्थिक वर्षात...

गुणवत्तापूर्ण कामे करण्याला प्राधान्य द्यावे – सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

0
सार्वजनिक बांधकाम विभागाची आढावा बैठक सिंधुदुर्गनगरी, दि.10 (जिमाका) सार्वजनिक बांधकाम विभागाने कोणतीही तडजोड न करता कामे गुणवत्तापूर्ण आणि वेळेत पूर्ण करण्यावर भर द्यावा. कंत्राटदारांकडून योग्यप्रकारे कामे...

तणावाच्या परिस्थितीमुळे माहिती तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांचा दौरा रद्द

0
मुंबई, दि.10 : तणावपूर्ण परिस्थिती पाहता सांस्कृतिक कार्य आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी "आय.ओ.टी. सोल्यूशन वर्ल्ड काँग्रेस अँड बार्सिलोना सायबर सिक्युरिटी काँग्रेस...

विदर्भ, उत्तर महाराष्ट्रातील खारपाण पट्ट्याला ५.७८ लाख एकर सिंचन लाभ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
भोपाळ, दि. 10 : तापी मेगा रिचार्ज प्रकल्पाबाबत  महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश या दोन राज्यांमध्ये एका ऐतिहासिक करारावर स्वाक्षरी करण्यात आली. सुमारे 19,244 कोटींच्या या...

भारतीय सैन्य दलाच्या समर्थनार्थ सातारा जिल्ह्यात रविवारी तिरंगा रॅलीचे आयोजन – पालकमंत्री शंभूराज देसाई

0
सातारा दि.10  : भारत पाकिस्तान युद्धजन्य परिस्थिती अनुषंगाने भारतीय सैन्य दलाच्या समर्थनार्थ जिल्ह्यातील सर्व तालुक्यांच्या ठिकाणी तिरंगा रॅलीचे आयोजन करा, अशा सूचना पालकमंत्री शंभूराज...