बुधवार, एप्रिल 30, 2025
Home Blog Page 958

मुंबई (पूर्व) प्रादेशिक परिवहन कार्यालयात दुचाकी वाहनांच्या नोंदणीसाठी नवीन मालिका

मुंबई, दि. ५ : प्रादेशिक परिवहन कार्यालय, मुंबई (पूर्व) येथे दुचाकी वाहनांसाठी असलेली एमएच०३इएच (MH03EH) ही मालिका संपत आहे. त्यामुळे दुचाकी वाहनांसाठी एमएच०३इजे (MH03EJ) नोंदणी क्रमांकाची नवीन मालिका सुरू करण्यात येणार आहे.

ज्या वाहन धारकांना आपल्या वाहनांसाठी या नवीन क्रमाकांच्या मालिकेतून आकर्षक अथवा पसंतीचा नोंदणी क्रमांक आरक्षित करावयाचा असेल, त्यांनी विहीत नमुन्यातील अर्ज, पत्त्याचा पुरावा, छायाचित्र ओळखपत्र, पॅनकार्ड आणि पसंतीच्या क्रमांकासाठीच्या प्रादेशिक परिवहन कार्यालय, मुंबई (पूर्व) (REGIONAL TRANSPORT OFFICE MUMBAI (EAST)) किंवा RTO MUMBAI (EAST)  यांच्या नावे काढलेल्या विहीत शुल्काचा राष्ट्रीयकृत बँकेच्या धनाकर्षासह 9 ऑक्टोंबर 2023 रोजी दुपारी 2 वाजेपर्यंत प्रादेशिक परिवहन कार्यालय, मुंबई (पूर्व) कार्यालयात सादर करावा.

एकाच नोंदणी क्रमांकासाठी एकापेक्षा जास्त अर्ज आल्यास राज्य शासनाच्या 8 मे 2016 च्या अधिसुचनेनुसार नियमित शुल्का व्यतिरिक्त सर्वात जास्त रकमेच्या धनाकर्ष सादर करणाऱ्यास सदर नोंदणी क्रमांक देण्यात येणार आहे. आकर्षक व पसंतीचा नोंदणी क्रमांक देण्यासाठीची कार्यपद्धती कार्यालयाच्या सूचना फलकावर लावण्यात आलेली आहे. अनधिकृत व्यक्तीकडून होणारी फसवणूक टाळण्यासाठी वाहन धारकांनी स्वत: कार्यालयात अर्ज करावे, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी विनय अहिरे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

००००

नीलेश तायडे/विसंअ/

विधानपरिषदेच्या शतक महोत्सवानिमित्त आजी-माजी सदस्यांचा स्नेहमेळावा आणि परिसंवाद

मुंबई, दि. ५ : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त विद्यमान आणि विधानपरिषदेच्या माजी सदस्यांसाठी परिसंवाद आणि स्नेहमेळावा लवकरच आयोजित करण्यात येणार आहे. महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली विधानपरिषदेतील गटनेते आणि सदस्यांची आज बैठक झाली. यावेळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री तसेच अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत या परिसंवाद आणि स्नेहमेळाव्याचे उद्घाटन सत्र व्हावे, असे निश्चित करण्यात आले.

या बैठकीत विधानपरिषद शतक महोत्सवानिमित्त प्रकाशित करावयाच्या संदर्भसमृद्ध ग्रंथांच्या कामाचा आढावा देखील घेण्यात आला. विधानपरिषद या दुसऱ्या सभागृहाचे महत्त्व आणि वैशिष्ट्य, गत १०० वर्षातील महत्वपूर्ण विधेयके, ठराव, विधानपरिषदेमध्ये लोकहिताच्या महत्वाच्या प्रश्नांवर, विषयांवर झालेल्या चर्चा, शंभर वर्षे शंभर भाषणे आणि छायाचित्रांचे संकलन असलेले कॉफी टेबल बुक अशी पाच प्रकाशने प्रस्तावित असून त्यात कोणकोणते महत्वाचे संदर्भ समाविष्ट करण्यात यावेत यावर उपस्थित मान्यवरांनी महत्वपूर्ण सूचना या बैठकीत केल्या.

प्रस्तावित प्रकाशने आणि परिसंवाद यासंदर्भात ज्येष्ठ विद्यमान आणि माजी सदस्य, ज्येष्ठ पत्रकार, राजकीय अभ्यासकांना काही सूचना करावयाच्या असल्यास त्यांनी लेखी स्वरूपात आपले मत विधानमंडळाकडे अवश्य कळवावे, असे आवाहन विधानपरिषद उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी केले आहे. हा परिसंवाद आणि स्नेहमेळावा सर्वांनी मिळून यशस्वी करावा आणि ज्येष्ठांचे सभागृह असा लौकिक प्राप्त झालेल्या विधानपरिषदेच्या शतक महोत्सव सुवर्णक्षणांचे साक्षीदार व्हावे, असे उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी म्हटले आहे.

याबैठकीस माजी मंत्री ॲड. अनिल परब, सदस्य कपिल पाटील, सत्यजित तांबे, विधानमंडळ सचिवालयाचे सचिव २ विलास आठवले, उपसभापती यांचे खासगी सचिव रवींद्र खेबुडकर, विशेष कार्य अधिकारी अविनाश रणखांब, विधिमंडळाचे जनसंपर्क अधिकारी नीलेश मदाने, ग्रंथपाल आणि उपग्रंथपाल अनुक्रमे नीलेश वडनेरकर आणि शत्रुघ्न मुळे उपस्थित होते.

००००

 

महिला घरेलू कामगारांच्या प्रश्नावर राज्य शासन सकारात्मक निर्णय घेईल – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

मुंबई, दि. 5 : महिला घरेलू कामगारांची नोंदणी करणे, वेतन विषयक विविध प्रश्न, जनश्री विमा योजना लागू करणे या विविध प्रश्नांसाठी कामगार विभाग यांच्या समन्वयातून  महिला घरेलू कामगारांच्या प्रश्नावर शासन सकारात्मक निर्णय घेईल, असे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले.

महाराष्ट्र राज्य घरेलु कामगार समन्वय समितीची बैठक आज मंत्रालयात आयोजित केली होती. त्यावेळी त्या बोलत होत्या.

मंत्री कु. तटकरे म्हणाल्या की, उच्च न्यायालय यांनी दिलेल्या निर्णयानुसार मंडळाच्या त्रिपक्षीय मंडळाची स्थापना करणे, किमान वेतन, घरेलू महिला कामगारांना जनश्री विमा योजना लागू करणे, ५५ वर्षांवरील महिला घरेलू कामगारांचे वेतनविषयक इतर प्रश्नांबाबत कामगार विभागाशी चर्चा करून याबाबत शासन सकारात्मक निर्णय घेईल.

यावेळी राष्ट्रीय घरेलू कामगार चळवळ, महाराष्ट्र राज्य सर्व श्रमिक महासंघ, कामगार एकता युनियन, विदर्भ मोलकरीण संघटना, महाराष्ट्र महिला परिषद, महामाया समाज विकास ट्रस्ट, जनकल्याण सोशल फाऊंडेशन, सावित्रीबाई फुले घरेलू कामगार संघटन,  सीएफटीयूआय, महाराष्ट्र घरकामगार विकास संघटन, घर हक्क संघर्ष समिती, कष्टकरी घरकामगार संघटना, निर्माण मजदूर, श्रमजिवी संघटना, विश्वशांती महिला विकास मंडळ, आनंद आधार घरेलु कामगार संघटना, श्रमिक किमयागार संघटना, महाराष्ट्र फेरीवाला महासंघ, महाराष्ट्र असंघटित कामगार संघटना, घर कामगार मोलकरीण संगठना, कष्टकरी संघर्ष महासंग, सर्व श्रमिक संघटना, ओएचएससी, मोलकरीण घरेलू कामगार संघ, गृहकार्य सेवा श्रमिक संघटना, महाराष्ट्र राज्य घरेलू कामगार संघटना, महाराष्ट्र कष्टकरी घरकामगार संघटना, मोलकरीण पंचायत, श्रमजीवी संघटना, घरकुल संघर्ष समिती, एआटीयूसी, सुराज्य श्रमिक सेना, भाकर फाऊंडेशनचे सदस्य उपस्थित होते.

००००

संध्या गरवारे/विसंअ/

शासकीय योजनांचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी ‘आयटी’ उपक्रम प्रभावीपणे राबवावा – कृषिमंत्री धनंजय मुंडे

मुंबई, दि. 5 : राज्यातील शेतकऱ्यांना राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ थेट पोहोचवण्याच्या प्रक्रियेत माहिती तंत्रज्ञान विभागाचा वाटा लक्षणीय असून शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत लाभ पोहोचवण्यासाठी कृषी आणि माहिती तंत्रज्ञान विभागाने समन्वयाने काम करावे, अशा सूचना कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी केल्या.

कृषी विभागामार्फत कार्यान्वित आयटी उपक्रमांचा आढावा घेण्यासाठी मंत्रालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव अनुपकुमार, माहिती तंत्रज्ञान विभागाच्या (महा आयटी) व्यवस्थापकीय संचालक जयश्री भोज, कृषी विभागाच्या सहसचिव सरिता बांदेकर, फलोत्पादन विभागाचे संचालक कैलास मोते यांची उपस्थिती होती.

कृषी विभागाच्या विविध 27 योजना महाडीबीटी पोर्टलमार्फत सुरू असून आतापर्यंत 34 लाख शेतकऱ्यांनी नोंदणी करून विविध योजनांसाठी एक कोटी दोन लाख अर्ज केले आहेत. या माध्यमातून शासनाकडे शेतकऱ्यांची व त्यांच्या जमीन आणि पीक प्रक्रियेची माहिती संकलित झाली आहे.

कृषी विभागाच्या महाडीबीटी पोर्टल, महाकृषी मोबाईल ॲप्लिकेशन व वेब पोर्टल, क्रॉपसॅप, क्रॉपवॉच, कृषी निविष्ठा विक्री परवाना वितरण कार्यप्रणाली, फार्मर डेटाबेस, महाॲग्रीटेक, पर्जन्यमापन आणि विश्लेषण, ई-ठिबक, ई- सॉईल ३.००, नमो शेतकरी महा सन्मान निधी या योजनेअंतर्गत सुरू असलेला तांत्रिक प्रक्रियेचा आढावा यावेळी कृषी मंत्री श्री. मुंडे यांनी घेतला. तसेच प्राप्त अर्जांच्या तुलनेत लाभार्थींची संख्या वाढवण्याची महत्त्वपूर्ण सूचना कृषी विभागाला केली.

शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या लाभांची प्राथमिकता ठरविण्यात यावी. तांत्रिक बाबतीत सुधारणा करण्यात यावी, प्रथम येणाऱ्या अर्जाला प्रथम प्राधान्य देण्यात यावे. संपूर्ण पूर्तता करून आलेले सर्व अर्ज मंजूर करून उपलब्ध निधीनुसार लाभ देण्यात यावा. लॉटरी पद्धत बंद करण्याबाबत तातडीने कार्यवाही व्हावी, शेतकऱ्यांना लाभ देण्यासाठी सुधारित एसओपी तयार करण्यात यावी, अशा सूचना मंत्री श्री. मुंडे यांनी दिल्या.

००००

राजू धोत्रे/विसंअ/

राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार २०२३ करिता केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने मागविले अर्ज

नवी दिल्ली 5 : केंद्र सरकारच्या युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार 2023 करिता पात्र खेळाडू/ प्रशिक्षक/ संस्था/ विद्यापीठांकडून अर्ज मागविले आहेत. संबंधित पोर्टलवर फक्त ऑनलाई पद्धतीने अर्ज करता येतील.

पुरस्कार मार्गदर्शक तत्त्वांनुसार पात्र असलेल्या अर्जदारांना अधिकारी/व्यक्तींच्या शिफारशीशिवाय केवळ dbtyas-sports.gov.in  या पोर्टलवर वैयक्तिकपणे ऑनलाइन अर्ज करण्याची परवानगी आहे. ऑनलाइन अर्ज करताना कोणतीही समस्या आली, तर अर्जदार क्रीडा विभागाशी sportsawards-moyas[at]gov[dot]in  या ई-मेल आयडीवर किंवा 011-23387432 या दूरध्वनीवर  कामकाजाच्या दिवशी सकाळी 9 ते सायंकाळी 5.30  पर्यंत किंवा टोल फ्री क्रमांक 1800-202-5155, 1800258-5155  (कोणत्याही कामाच्या दिवशी सकाळी 8 ते रात्री 8 दरम्यान) संपर्क साधू शकतात.

पुरस्कारासाठी पात्र खेळाडूंचे अर्ज dbtyas-sports.gov.in  या पोर्टलवर 2 नोव्हेंबर 2023 पर्यंत रात्री 11.59 वाजेपर्यंत सादर करणे आवश्यक आहे. अंतिम तारखेनंतर आलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही.

क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीची दखल घेत त्यांना सन्मानित  करण्यासाठी दरवर्षी हे पुरस्कार दिले जातात. चार वर्षांपेक्षा जास्त कालावधीत क्रीडा क्षेत्रातील नेत्रदीपक आणि उत्कृष्ट कामगिरीसाठी एखाद्या खेळाडूला मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार दिला जातो; चार वर्षांच्या सातत्यपूर्ण उत्कृष्ट कामगिरीसाठी अर्जुन पुरस्कार दिला जातो; प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये पदक विजेते घडवणाऱ्या  प्रशिक्षकांना द्रोणाचार्य पुरस्कार दिला जातो, तर ध्यानचंद पुरस्कार क्रीडा विकासासाठी आयुष्यभर केलेल्या योगदानासाठी दिला जातो. क्रीडा संवर्धन आणि विकासाच्या क्षेत्रात लक्षणीय भूमिका बजावलेल्या कॉर्पोरेट संस्था आणि व्यक्तींना राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार दिला जातो. मौलाना अबुल कलाम आझाद (माका) करंडक आंतर-विद्यापीठ स्पर्धांमध्ये एकूणात सर्वोच्च कामगिरी करणाऱ्या विद्यापीठाला दिली जाते.

केंद्र सरकारचे युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय दरवर्षी क्रीडा पुरस्कारांसाठी अर्ज मागविते. 2023 च्या या क्रीडा पुरस्कारांसाठी अर्ज मागवण्यासाठीच्या अधिसूचना www.yas.nic.in या संकेतस्थळावर मंत्रालयाने अपलोड केल्या आहेत. भारतीय ऑलिम्पिक संघटना/ भारतीय क्रीडा प्राधिकरण/ मान्यताप्राप्त राष्ट्रीय क्रीडा महासंघ/ क्रीडा प्रोत्साहन मंडळे /राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील सरकारे इत्यादींना त्यानुसार सूचित केले आहे.

00000000000

अमरज्योत कौर अरोरा /वृत्त वि. क्र.182  / दिनांक 05.10.2023

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवृत्त ३५० कर्मचाऱ्यांना मिळाला न्याय

मुंबई, दि. 5 : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या विविध आस्थापनांमधून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी आज मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या उपस्थितीत महानगरपालिकेच्या मुख्यालयात प्रथमच ‘पेन्शन अदालत’ चे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी मुंबई महानगरपालिकेच्या विविध आस्थापनांमधून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या पेन्शन संदर्भातील प्रश्नांचे निराकरण करण्यात आले. मुंबई महानगरपालिकेच्या २४ विभागांतून संबंधित प्रशासकीय अधिकारी, घनकचरा व्यवस्थापन ए ते टी विभागातील प्रशासकीय अधिकारी, के.इ.एम. राजावाडी, लोकमान्य टिळक रुग्णालय सायन, नायर रुग्णालय, कूपर रुग्णालय येथील प्रशासकीय अधिकारी, उपशिक्षणाधिकारी व इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.

या अदालतीत ३५० पेक्षा जास्त निवृत्त कर्मचाऱ्यांच्या अडचणी पालकमंत्री श्री. लोढा यांनी समजून घेतल्या व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून पेन्शन वितरण संदर्भातील प्रशासकीय अडचणींवर तत्काळ तोडगा काढला. या पेन्शन अदालतमध्ये १२९ कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्षात सहभाग घेतला तसेच २५० तक्रारी ऑनलाईन माध्यमातून प्राप्त झाल्या होत्या. आज उपस्थित कर्मचाऱ्यांपैकी ५० टक्के कर्मचाऱ्यांचे  पेन्शन ऑनलाईन माध्यमातून वितरित करण्यात आले. येत्या १५ दिवसांत या सर्व लोकांना त्यांचे पेन्शन प्राप्त होईल याची व्यवस्था करण्याचे निर्देश पालकमंत्री श्री. लोढा यांनी दिले. उर्वरित कर्मचाऱ्यांच्या पेन्शन संदर्भातील अडचणी सोडवण्याचे आणि पुढील ३० ते ६० दिवसात सर्वांचे पेन्शन वितरित करावे, असेही निर्देश पालकमंत्री श्री. लोढा यांनी दिले.

पालकमंत्री श्री. लोढा म्हणाले की, “महानगरपालिकेच्या निवृत्त कर्मचाऱ्यांना त्यांच्या हक्काचे पेन्शन मिळावे म्हणून पेन्शन अदालत सुरु करण्याचा निर्णय घेतला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करून मुंबईतील किंबहुना संपूर्ण महाराष्ट्रातील प्रथम पेन्शन अदालत मुंबई महानगरपालिकेत आयोजित करण्यात आली. या पेन्शन अदालतच्या माध्यमातून सर्व कर्मचाऱ्यांच्या पेन्शन संदर्भातील समस्या कोणताही वेळ न दवडता सोडवण्याचा प्रयत्न आहे.

पेन्शन अदालत ६ ऑक्टोबर २०२३ रोजी देखील आयोजित करण्यात आली असून सकाळी १० वाजता या सभेची सुरुवात होईल आणि सायंकाळी ५ वाजता सभेचा समारोप होईल.

****

संध्या गरवारे/विसंअ/

 

‘दिलखुलास’ या कार्यक्रमात उद्या मंत्रिमंडळ निर्णयांची माहिती

मुंबई, दि. 5 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेल्या महत्त्वाच्या निर्णयांची माहिती देण्यात आली आहे. राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या ॲपवर उद्या शुक्रवार दि. 6 ऑक्टोबर, 2023 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत हा ‘दिलखुलास’ कार्यक्रम प्रसारित होईल.

वरिष्ठ सहायक संचालक देवेंद्र पाटील, निवेदक रिताली तपासे यांनी मं‍त्रिमंडळ निर्णयांची माहिती ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून दिली आहे.

0000

 

वन विभागाने वन पर्यटन अंतर्गत पूर्ण जिल्ह्याचा एकात्मिक आराखडा तयार करावा – उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील

पुणे, दि. 5: वनविभागाने वनपर्यटन अंतर्गत पूर्ण जिल्ह्याचा एकात्मिक आराखडा तयार करावा व त्यानुसार निधी उपलब्धतेचा विचार करुन प्राधान्यक्रमाची कामे हाती घ्यावीत, असे निर्देश उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले.

जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत राज्य स्तर यंत्रणेकडील 2022-23 मध्ये मंजूर कामांच्या प्रगतीचा आढावा उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आज घेतला. त्याअंतर्गत नगरपंचायत, नगरपरिषदेकडील महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान महा अभियान योजना, महावितरण यांच्याकडील विद्युत विकास, सार्वजनिक बांधकाम विभागाकडील इमारत बांधकाम, साकव बांधकाम, क्रीडा विभागांतर्गत व्यायामशाळा साहित्य, क्रीडा साहित्य खरेदी, वन विभागांतर्गत वनपर्यटन, वृक्षारोपन आदींचा यावेळी आढावा घेण्यात आला.

या बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, उपवनसंरक्षक महादेव मोहिते, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता बाप्पा बहीर, जिल्हा नियोजन अधिकारी किरण इंदलकर, समाजकल्याण सहायक आयुक्त विशाल लोंढे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

दलितवस्ती सुधारणाअंतर्गत कामे घेताना समाजकल्याण विभागाने तालुकास्तरीय यंत्रणेच्या सहकार्याने प्रत्यक्ष पाहणी करुन कामांची आवश्यकता व प्राधान्यक्रम ठरवून घ्यावा. साकव बांधकामाबाबतही यंत्रणांनी बृहद आराखडा करुन उपयुक्ततेनुसार कामे सुचवावीत, असे मंत्री श्री. पाटील म्हणाले.

नगरपरिषद हद्दीतील दलितवस्तीतील पायाभूत सुविधा विकासाच्या कामे झालेली असल्यास नवीन कामे हाती घेण्यास वाव नसल्यास वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी, महिला व पुरुषांच्या कौशल्यविकासासाठी निधी देता येईल का याबाबत विचार करण्याची गरज आहे, असेही मंत्री श्री. पाटील म्हणाले.

यावेळी महावितरण अंतर्गत बारामती मंडळ, पुणे ग्रामीण मंडळ, पुणे शहर अंतर्गत विद्युत विकाससाची कामांचा आढावा घेण्यात आला. नवीन खांब, वीजवाहिन्या, ट्रान्सफॉर्मर क्षमतावाढ याअनुषंगाने कामांना गती द्यावी. शहरातील कामे महापालिकेशी समन्वय साधत करावीत, असेही ते म्हणाले.

****

१६५ कोटी रुपयांच्या बनावट विक्री बिलांच्या प्रकरणी दोन जणांना अटक

मुंबई, दि. ५ : महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाने १६५.७८ कोटी रुपयांच्या बनावट विक्री बिलांच्या आधारे बोगस इनपुट टॅक्स क्रेडिट (ITC) संदर्भात शासनाची २७.७४ कोटी रुपयांच्या कर महसुलाची हानी करणाऱ्या दोन व्यक्तींना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती मुंबईच्या राज्यकर सहआयुक्त (अन्वेषण- अ) प्रेरणा देशभ्रतार यांच्यावतीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये देण्यात आली आहे.

मे. श्री समस्ता ट्रेडिंग प्रा. लि. व शरद क्लिअरिंग ॲण्ड फॉरवर्डिंग प्रा. लि. या व्यापाऱ्यांच्या विरोधात राज्य शासनाच्या वस्तू व सेवाकर विभागाकडून कर चोरी विरोधी विशेष अन्वेषण कारवाई सुरू करण्यात आली होती. या कारवाईदरम्यान बनावट कंपन्यांची स्थापना करून बोगस बिल देण्याचे काम सुरू असल्याचे निदर्शनास आले. यासंदर्भात वस्तू व सेवाकर विभागाकडून बोगस बिलासंदर्भात मोहीम राबवीत प्रमुख सूत्रधार राहुल अरविंद व्यास व विकी अशोक कंसारा यांना ४ ऑक्टोबर २०२३ रोजी अटक करण्यात आली. त्यांना महानगर दंडाधिकाऱ्यांनी १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

सर्व समावेशक नेटवर्क विश्लेषण साधनांचा वापर करून आणि इतर विभागांशी समन्वय साधून महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभाग कर चुकविणाऱ्या व्यापाऱ्यांचा शोध घेत आहे. बोगस व्यापार करून कर चुकवेगिरी करणाऱ्या व्यापाऱ्यांमुळे बाजारपेठेतील स्पर्धा नष्ट होऊन योग्य व्यवसाय करू इच्छिणाऱ्या व्यापाऱ्यांना नुकसान सहन करावे लागत आहे. मात्र, या दोन जणांच्या अटकेतून महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाने कर चुकवेगिरी करणाऱ्यांना इशारा दिला आहे, असेही प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

००००

गोपाळ साळुंखे/ससं/

समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांच्या दुसऱ्या प्रादेशिक परिषदेचे नाशिकला ६ व ७ ऑक्टोबर रोजी आयोजन

मुंबई, दि. 5 : ग्रामीणस्तरावर गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा पुरविण्यासाठी देशात सुमारे दीड लाखांहून अधिक समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांची भरती करण्यात आली आहे.  प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीया यांच्या केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाच्या निर्देशानुसार पश्चिम विभागातील समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांची (सीएचओ) दुसरी प्रादेशिक परिषद ६ आणि ७ ऑक्टोबर २०२३ असे दोन दिवस नाशिक येथे आयोजित करण्यात आली आहे.

केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाच्या राज्यमंत्री डॉ. भारती प्रवीण पवार, राज्यमंत्री एस. पी. सिंग बघेल तसेच राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत या परिषदेला सुरुवात होणार आहे.

महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, गोवा, दादरा-नगर हवेली, आणि दमण-दीव या सहभागी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील सुमारे २०० समुदाय आरोग्य अधिकारी या परिषदेत सहभागी होणार आहेत. आतापर्यंत देशात एकूण १ लाख ६१ हजारांपेक्षा अधिक आरोग्य सेवा केंद्रे कार्यान्वित झाली आहेत. प्रत्येक उपकेंद्रातील प्राथमिक आरोग्य पथकात एक महत्त्वाची भर म्हणून समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. देशात सुमारे १ लाख ३० हजारांहून अधिक समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांची भरती करण्यात आली आहे.

या परिषदेला सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाचे अधिकारी, आयुष मंत्रालयाचे अधिकारी, राज्य अधिकारी, राष्ट्रीय स्तरावरील तज्ज्ञ, आयुष्मान भारत आरोग्यवर्धिनी केंद्राला मदत करणाऱ्या संस्थांचे प्रतिनिधी तसेच विविध राज्यातील राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे संचालक, आयुष संचालक आदी उपस्थित राहणार आहेत.

००००

नीलेश तायडे/विसंअ/

ताज्या बातम्या

महाराष्ट्र दिनानिमित्त राज्यपालांचे वाणिज्यदूतांसाठी चहापान

0
मुंबई, दि. २९  : दिनांक १ मे रोजी साजरा होत असलेल्या महाराष्ट्र राज्य स्थापना दिनाचे औचित्य साधून राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत...

नागरिकांना वेळेत सुविधा मिळण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे – राज्यमंत्री माधुरी मिसाळ

0
पुणे महापालिकेत महाप्रितच्या सहकार्याने राबविण्यात येणाऱ्या प्रकल्पांचा आढावा मुंबई, २८: पुणे महानगरपालिका आणि महात्मा फुले नविनीकरणीय ऊर्जा व पायाभूत प्रौद्योगिकी महामंडळ (महाप्रित) यांच्या संयुक्त विद्यमाने...

खाडीत सोडण्यात येणाऱ्या प्रदूषित पाण्यामुळे मासेमारीवर होणाऱ्या परिणामासंदर्भात अभ्यास समिती स्थापन करावी – सभापती...

0
मुंबई दि. २९ :- राज्यातील मुंबई, ठाणे, बेलापूर, उलवे, तळोजा येथील खाड्यांमध्ये औद्योगिक क्षेत्रामधून सोडण्यात येणारे सांडपाणी आणि डंम्पिंग ग्राऊंडचा कचरा यामुळे प्रदूषण वाढत असून त्याचा फटका मासेमारी...

जिगाव प्रकल्पाच्या भूसंपादनाबाबत आठ दिवसात नव्याने प्रस्ताव सादर करावा – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

0
मुंबई दि. २९ : बुलढाणा जिल्ह्यातील जिगाव प्रकल्पाच्या भूसंपादनाबाबत शेतकऱ्यांनी 40 टक्के वाढीव मोबदला मागितला आहे. त्यामुळे 8 हजार 782 दावे प्रलंबित असून ते निकालात...

सुरक्षा रक्षक मंडळाच्या नोंदणीकृत कर्मचाऱ्यांचा खाकी गणवेश; १ मे पासून अंमलबजावणी – कामगार मंत्री ॲड.आकाश...

0
मुंबई, दि. 29 : राज्यातील नोंदणीकृत सुरक्षा कर्मचाऱ्यांसाठी खाकी रंगाच्या गणवेशास शासनाने मान्यता दिली. यामध्ये टोपी निळ्या रंगाची असून, त्यावर सुरक्षा रक्षक मंडळाचा लोगो...