बुधवार, एप्रिल 30, 2025
Home Blog Page 957

पाटण शहराचा पाणीपुरवठा सुरळीत रहावा यासाठी उपाययोजना तात्काळ सुरू करा – पालकमंत्री शंभुराज देसाई

सातारा दि.6 (जिमाका) : सद्याचा पाणीप्रश्न तात्काळ सोडविण्याकरिता नव्याने स्थापन केलेल्या नगरपंचायतीना नागरी सुविधा पुरविण्यासाठी सहाय्य योजनेमधून पाटण नगरपंचायतीला 1 कोटी रु. निधी मंजूर करणेत आलेला आहे. एका महिन्यात कामाची सुरवात करण्याचे व जिल्हा वार्षिक योजनेतून मंजूर करण्यात आलेला 60 लक्ष रुपयांचे जल शुद्धीकरण केंद्राचे काम तात्काळ सुरु करण्याचे निर्देश पालकमंत्री शंभुराज देसाई यांनी पाटणच्या मुख्याधिकारी यांना दिले आहेत.

पालकमंत्री शंभुराज देसाई म्हणाले पाटणचा पाणी पुरवठा सुरळीत रहावा यासाठी कायमस्वरुपी उपाययोजना कराव्यात. आधुनिक तंत्रज्ञानाचा त्यासाठी वापर करावा.

केंद्र पुरस्कृत अमृत 2.0 योजनेमधून पाटण नगरपंचायतीने शहरासाठी रुपये 21 कोटी रुपये इतक्या रकमेची नवीन पाणी पुरवठा योजना प्रस्तावित केलेली आहे. केंद्र शासन स्तरावर सदर योजनेंतर्गतचा प्रस्ताव मंजुरीच्या स्तरावर असून लवकरच मान्यता मिळविण्यासाठी पाठपुरावा करु. केंद्र शासनाकडून मंजुरी मिळाल्यानंतर राज्य शासनाकडून तातडीने प्रशासकीय मान्यता मिळेल व एक महिन्यात काम सुरू करण्यात येईल. प्रस्तावित योजनेमधून शासकीय मानकांनुसार प्रती माणसी 135 लिटर इतका पाणी पुरवठा केला जाणार असून योजनेमधून महिन्यात शहरात पाणीपुरवठा करण्याकरिता 28.6 किमी. इतक्या लांबीच्या वितरण प्रणालीचे जाळे असणार आहे, असेही यावेळी त्यांनी सांगितले.

या प्रकल्पांतर्गत जलशुद्धीकरण केंद्राची दुरुस्ती प्रस्तावित असून त्याची जलशुद्धीकरण क्षमता 5 MLD इतकी होणार आहे. तसेच नविन 2 उंच टाकी प्रस्तावित असून त्याची क्षमता अनुक्रमे 2.55 लक्ष लिटर व 3.46 लक्ष लिटर इतकी आहे. तसेच एक बैठी टाकी प्रस्तावित असून त्याची क्षमता 1.80 लक्ष लिटर असणार आहे. सदर योजनेमुळे पाटण शहराची सन 2054 पर्यंतची चोवीस हजार सातशे बावन्न इतक्या अंदाजित लोकसंख्येची पाण्याची मागणी पूर्ण होणार असून या योजनेमधून चार हजार चारशे बेचाळीस नवीन नळ जोडण्या प्रस्तावित आहेत. या योजनेमुळे पाटण शहराला शुद्ध पाणीपुरवठा होणार असून सदर योजना शहरास 24 X 7 पाणीपुरवठा करण्याच्या दृष्टीने महत्वाचे पाऊल असणार आहे.

000

लोकसेवा हमी कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्व यंत्रणांनी काम करावे – राज्य आयुक्त दिलीप शिंदे

सातारा दि. 6, (जि.मा.का.) – लोकांना शासकीय कार्यालयांमधून देण्यात येणाऱ्या सेवा काल मर्यादेत दिल्या जाव्यात या हेतून लोक सेवा हमी अधिनियम 2015 अस्तित्वात आला आहे. या कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्व यंत्रणांनी काम करावे अशा सूचना लोक सेवा हक्क आयोगाचे राज्य आयुक्त दिलीप शिंदे यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे लोक सेवा हक्क अधिनियम बाबत बैठक संपन्न झाली. यावेळी अपर जिल्हाधिकारी जीवन गलांडे, महसूल शाखेचे उपजिल्हाधिकारी प्रशांत आवटे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

लोकांना कालमर्यादेमध्ये सेवा देणे आपले कर्तव्य असल्याचे सांगून राज्य आयुक्त श्री. शिंदे म्हणाले, या कायद्यामध्ये सर्व कार्यालयांचा समावेश होतो. राज्य शासनाच्या आपले सरकार पोर्टलवर या कायद्याविषयी सर्व माहिती देण्यात आली आहे. तसेच या पोर्टलवर अधिसूचित केलेल्या सेवा व त्या द्यावयाचा कालावधी ही उपलब्‌ध आहे. याची माहिती सर्व कार्यालय प्रमुखांनी करून घ्यावी व त्या प्रमाणे कार्यवाही करावी. या कायद्यातील तरतुदीनुसार अधिसूचित केलेली सेवा विहित मुदतीत न दिल्यास दंड करण्याची तरतूद आहे, याची गांभिर्याने नोंद घ्यावी. तसेच या कायद्यानुसार चांगले काम करणारे अधिकारी व कर्मचारी यांचा सन्मान करण्याची तरतूद असणारा हा राज्यातील एकमेव कायदा असल्याचेही त्यांनी सांगितले.

काम करत असताना अधिकाऱ्यांनी सजगता आणवी अशा सूचना करून श्री. शिंदे पुढे म्हणाले, प्रत्येक कार्यालयाने त्यांच्या दर्शनी भागात या कायद्याचा बोर्ड लावणे अनिवार्य आहे. जिल्हा स्तरावर लोक सेवा हमीमध्ये झालेल्या कामांचा आढावा घेतला जावा. यामध्ये अधिसूचित केलेल्या सर्व सेवा या ऑनलाईन द्यावयाच्या आहेत. त्यामुळे कामकाजात पारदर्शकता राहणार आहे. तसेच या कामांसाठी आपण उत्तरदायी आहोत. वेळेत सेवा देणे हे महत्वाचे आहे. सर्व ग्रामपंचायतींमध्ये या अधिसूचनेची माहिती लावावी, याविषयी प्रशिक्षणाचे आयोजन करावे, प्रोत्साहन देण्यासाठी उपक्रम राबवावे, सर्व विभागांनी त्यांच्या संकेतस्थळावर याविषयी माहिती प्रसिद्ध करावी. तसेच याविषयीचे गुगल फॉर्म भरावेत अशा सूचनाही त्यांनी केल्या.

यावेळी या कायद्याची सविस्तर माहितीही देण्यात आली. तसेच अधिसूचित केलेल्या 500 सेवांविषयीच्या कामकाजाचा सविस्तर आढावाही घेण्यात आला.

000

लोकोपयोगी विकासाची कामे अविरत सुरु राहतील – पालकमंत्री संजय राठोड

यवतमाळ, दि. ६ (जिमाका) : दिग्रस तालुक्यातील कलगाव, कांदळी येथील एकूण ६ कोटी ६३ लाख रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी लोकोपयोगी विकासाची कामे अविरत सुरु राहतील, असे प्रतिपादन त्यांनी आयोजित कार्यक्रमात बोलतांना केले.

यावेळी कलगाव येथील आरोग्यवर्धीनी उपकेंद्राची नवीन इमारत लोकांच्या सेवेसाठी उपलब्ध झाली आहे. या दवाखान्याच्या माध्यमातून शासनाचे उपक्रम राबवून परिसरातील गोरगरिब, महिलांना आधार द्यावा, असे निर्देश पालकमंत्र्यांनी यावेळी दिले.

या भूमिपूजन व लोकार्पण कार्यक्रमाला तालुका आरोग्य अधिकारी डॅा. आशिष पवार, तहसिलदार सुधाकर राठोड, माहिती अधिकारी पवन राठोड, गटविकास अधिकारी खारोडे, विविध विभागाचे अधिकारी, कलगावच्या सरपंच आस्मीता मनवर, कांदळीच्या सरपंच शेवकाबाई राठोड, कलगावच्या उपसरपंच साजेपरवीन अलीमोद्दीन शेखआणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. राठोड म्हणाले, शहरी आणि ग्रामीण भागात रस्ते व पायाभूत सुविधा, आरोग्य सुविधा, पाणी पुरवठा यासह विविध विकासकामे केली जात आहेत. विकासाची ही कामे अविरत सुरु राहील. नागरिकांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी कटिबद्ध आहोत. होतकरू तरुणांसाठी ग्रामपंचायत तिथे अभ्यासिका, रोजगार मेळावे, आरोग्य शिबीर, विविध योजनांमधून घरकुल, वन्य प्राण्यांपासून संरक्षणासाठी झटका मशीन, मागेल त्याला विहिर अशा विविध योजना, उपक्रम राबविल्या जात आहे. त्यातून लोकांची कामे केली जात असल्याचे पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते कलगाव येथील तांदळी, आष्टा, कलगाव, वडगाव रत्यावरील पुलाचे बांधकाम, जल जीवन मिशनअंतर्गत पाणी पुरवठ्याचे काम, आरोग्यवर्धीनी उपकेंद्र नवीन इमारतीचे बांधकाम, श्री महादेव मंदिरासमोर सांस्कृतिक भवनाचे बांधकाम, पंचमाता मंदिरासमोर सभागृहाचे बांधकाम, संत सेवालाल महाराज व जगदंबा माता मंदिरासमोर सभागृहांचे बांधकाम, नळ जोडणी, अंगणवाडी, सिमेंट रस्ते, नवीन विद्युत रोहित्र आणि स्मशानभूमी संरक्षण भिंत बांधकाम असे ४ कोटी ६३ लाख रुपये आणि कांदळी गावाजवळ पुलाचे बांधकाम, जलजीवन मिशनअंतर्गत पाणी पुरवठा, सिमेंट रस्ता, नळ जोडणी, नवीन रोहित्र उभारणी अशा २ कोटी एक लाख रुपये असे एकूण ६ कोटी ६४ लाख रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण करण्यात आले.

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबियांची भेट

काही दिवसांपूर्वी कांदळी येथील शेतकरी गणेश प्रल्हाद चव्हाण यांनी आत्महत्या केली होती. या  आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबियांची पालकमंत्री संजय राठोड यांनी भेट घेवून त्यांचे सांत्वन केले. राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठिशी आहे. त्यांना शासनमार्फत योग्य ती मदत करण्यात येईल, असे आश्वस्त केले.

०००

मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्र देण्याच्या कार्यपद्धतीसाठी नेमलेली समिती ११ ऑक्टोबरपासून मराठवाड्याच्या दौऱ्यावर

मुंबई, दि.६ : मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र पात्र व्यक्तींना देण्याबाबतची कार्यपद्धती विहीत करण्यासाठी गठित केलेल्या समितीचे अध्यक्ष न्यायमूर्ती संदीप शिंदे (निवृत्त) व समिती सदस्य हे ११ ऑक्टोबर ते २३ ऑक्टोबर २०२३ याकालावधीत छत्रपती संभाजीनगर विभागाचा जिल्हानिहाय दौरा करणार आहे. सामान्य प्रशासन विभागाने यासंदर्भात विभागीय आयुक्तांना पत्र पाठवून समितीच्या जिल्हानिहाय दौऱ्याचे वेळापत्रक कळविले आहे.

या दौऱ्यादरम्यान, समितीचे अध्यक्ष व सदस्य कामकाजाच्या अनुषंगाने छत्रपती संभाजीनगर विभागातील (मराठवाडा) सर्व जिल्ह्यांमध्ये बैठक घेणार आहेत. जिल्ह्यातील नागरिकांनी त्यांच्याकडील उपलब्ध निजामकालीन पुरावे, वंशावळी, शैक्षणिक पुरावे, महसूली पुरावे, निजाम काळात झालेले करार, निजामकालीन संस्थानिकांनी दिलेल्या सनदी, राष्ट्रीय दस्तावेज इ. समितीस उपलब्ध करुन देण्यात यावीत, असे आवाहन देखील करण्यात आले आहे.

समितीच्या बैठकीचे वेळापत्रक असे :

समितीची पहिली बैठक छत्रपती संभाजीनगर येथे बुधवार दि. ११ ऑक्टोबर रोजी सकाळी ११.०० वाजता विभागीय आयुक्त कार्यालय येथे होणार आहे. त्यानंतर जालना येथे जिल्हाधिकारी कार्यालयात दि. १२ ऑक्टोबर रोजी सकाळी ११.०० वाजता बैठक घेण्यात येणार आहे. दि. १६ ऑक्टोबरला परभणी येथील जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी ११.०० वाजता समितीची बैठक होणार आहे. त्यानंतर हिंगोली येथे दि. १७ ऑक्टोबरला सकाळी  ११.०० वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे, नांदेड येथे दि. १८ ऑक्टोबरला जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी ११.०० वाजता ही बैठक होणार आहे. दि. २१ ऑक्टोबरला लातूर येथे जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी ११.०० वाजता, धाराशिव येथे दि.२२ ऑक्टोबरला सकाळी ११.०० वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे तर बीड येथे दि. २३ ऑक्टोबरला सकाळी ११.०० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात समितीची बैठक होणार आहे.

००००

विकासाच्या योजनांमुळे राज्यातील नक्षलग्रस्त भागाचा चेहरामोहरा बदलतोय; शहरी नक्षलवादास प्रतिबंधासाठी सक्षम यंत्रणा हवी

नवी दिल्ली, दि. ६ : एकीकडे नक्षलवाद्यांचा प्रतिबंध करताना दुसरीकडे गेल्या वर्षभरात नक्षलग्रस्त भागात विविध विकासाच्या योजना परिणामकारकपणे राबविणे सुरु असल्याने गडचिरोलीसारख्या भागातील नक्षलवाद पूर्णपणे संपवण्यात आम्ही लवकरच  यशस्वी होऊ, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

ते आज येथील विज्ञान भवनात गृह मंत्रालयाने आयोजित केलेल्या डाव्या विचारसरणीमुळे निर्माण झालेल्या उग्रवादाच्या परिस्थितीबाबत आयोजित बैठकीत बोलत होते. केंद्रीय गृह मंत्री अमित शाह बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. या बैठकीस राज्याचे उप मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्य सचिव मनोज सौनिक, पोलीस महासंचालक रजनीश सेठ, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव ब्रिजेश सिंह उपस्थित होते.

इंटरनेटच्या माध्यमातून समाज माध्यमांद्वारे शहरी नक्षलवाद फोफावत आहे, त्याला रोखण्यासाठी एक सक्षम यंत्रणा निर्माण करणे गरजेचे आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

दरवर्षी कोट्यवधी रुपये नक्षलवाद्यांना पाठवले जातात. या पैशाचा व्यवहार थांबवण्यासाठी ईडी, आयटी, तसेच वित्तीय गुप्तचर विभागांचा एक संयुक्त गट तयार करून याची सखोल चौकशी करावी, अशी विनंतीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.

रेल्वेचे जाळे आवश्यक

यावेळी बोलताना मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी नक्षल प्रभावित भागात रेल्वेचे जाळे पसरविण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले.  ते म्हणाले की, गडचिरोली, छत्तीसगड आणि तेलंगणा या सीमावर्ती भागात रेल्वेचे जाळे विकसित केले, तर त्याचा विकासासाठी खूप फायदा होईल. तेलंगणातील मंचेरियल ते सिरोंचा आणि पुढे छत्तीसगडमधील भोपाळपट्टणम ते जगदलपूरपर्यंत  त्याचप्रमाणे, अहेरी ते शिरपूर (कागजनगर) रेल्वे नेटवर्क विकसित केले, तर सूरजागडच्या पोलाद प्रकल्पाला आणि एकूणच विकासाला फायदा होईल.

एकलव्य शाळा

हेलीकॉप्टरसाठी रात्रीचे लँडिंग

माओवादग्रस्त भागातील ९ एकलव्य मॉडेल शाळांपैकी ३ सुरु आहेत. ४ शाळांचे बांधकाम सुरु आहे. कोरची आणि धानोरा येथील दोन शाळांसाठीचा जमिनीचा प्रश्न या महिन्यात निकाली निघाला आहे असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, नक्षल ऑपरेशनमध्ये जखमी पोलिसांना लवकरात लवकर वैद्यकीय उपचार मिळणे गरजेचे आहे. पण डीजीसीएच्या नियमांमुळे नाईट लँडिंगची तरतूद नाही. लष्कराप्रमाणेच, ऑपरेशन आणि बचाव कार्यादरम्यान आम्हाला रात्री हेलीकॉप्टर उतरविण्याची परवानगी मिळावी.

नक्षलग्रस्त भागात विशेष पायाभूत सुविधांसाठी ५७ कोटी ५० लाख निधीस मंजुरी दिल्याबद्दल केंद्राचे आभार मानून मुख्यमंत्री म्हणाले की, नक्षलवाद्यांची पकड खिळखिळी करण्यासाठी पुढील दोन वर्षांत अधिक तीव्रतेने ऑपरेशन करण्यात येईल.

नक्षलवाद्यांच्या मुसक्या आवळल्या

जी. एन. साईबाबाच्या सुटकेच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयातले राज्य शासनाचे अपील महाराष्ट्र पोलिसांच्या सततच्या प्रयत्नांमुळे आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भूमिकेमुळे सर्वोच्च न्यायालयाने मान्य केले. मर्दानटोला येथे मिलिंद तेलतुंबडेला चकमकीत मारण्यात आले. आज महाराष्ट्रात सक्रिय नक्षलवादी केडरपैकी ४९ टक्के छत्तीसगडमधील आहेत. महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवर ४ जॉइंट टास्क फोर्स कॅम्प तयार आहेत. छत्तीसगड शासनाला निर्देश दिल्यास त्यांच्याकडून देखील यात जवान तैनात होतील असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, नक्षलवाद्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी गृह मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत.

पोलीस पथकांना बळ देणे सुरु

स्पेशल टास्क फोर्स, स्पेशल इंटेलिजेंस ब्युरो, फोर्टिफाइड पोलीस स्टेशनसाठी विशेष पायाभूत सुविधा वाढविणे सुरु असून यासाठी  ६१ कोटी ३५ लाख रुपये खर्च केले आहेत. गडचिरोलीत २० फोर्टिफाइड पोलीस स्टेशन्स आहेत टास्क फोर्सची क्षमता वाढविण्यासाठी आम्ही १२ कोटी रुपये खर्च केल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली. मार्च २०२५ पर्यंत त्यांचे बांधकाम पूर्ण केले जाईल. नवीन पोलिस ठाण्यांसाठी २५ अधिकारी आणि ५०० कर्मचारी देखील मंजूर केले आहेत ही माहिती यावेळी मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी दिली.

पालकमंत्री असल्यापासून विकासाला गती

विकासाला नक्षलवाद्यांविरुद्ध पोलिस किंवा निमलष्करी कारवाईची जोड द्यावी लागेल. मी या जिल्ह्याचा पालकमंत्री असताना नक्षलवाद्यांविरुद्धच्या कारवाईबरोबरच तिथे पायाभूत सुविधाही निर्माण करण्यावर भर दिला आणि त्यामुळे रोजगार वाढला. शेती आणि उद्योग बळकट करण्यासाठी अनेक पावले उचलली गेली, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, जनता, शेतकरी, महिला, तरुण यांना मुख्य प्रवाहात कसे आणायचे यादृष्टीने आम्ही पाऊले टाकत आहोत.

रस्ते, पुलांची कामे वेगाने

नक्षलग्रस्त भागात ८८३ कोटी रुपये खर्चून ४६ रस्ते, १०८ पूल बांधण्यात येत असून या रस्त्यांची लांबी सुमारे ६२० किमी इतकी आहे. गेल्या एका वर्षात ४१५ किमी लांबीचे ३० नवीन रस्ते या भागात बांधण्यात आले. उर्वरित १६ रस्त्यांपैकी ८ रस्ते या वर्षाअखेरीस आणि आणखी ८ रस्ते पुढील वर्षी मार्चपर्यंत पूर्ण होतील. याशिवाय १०८ पुलांपैकी ९० पूल पूर्ण झाले असून १० पूल वर्ष अखेरीस पूर्ण होतील आणि आणखी ८ पूल मार्च २०२४ पर्यंत पूर्ण होतील. नक्षल भागात इंद्रावती नदी पलिकडे छत्तीसगड आणि महाराष्ट्र या दोन्ही भागांना जोडण्यासाठी ९१ कोटी रुपये खर्चून ४ पुलांचे काम लवकरच सुरू होईल, अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली.

मोबाईल कनेक्टिव्हिटी वाढली

मोबाईल कनेक्टिव्हिटी वाढविण्यासाठी ८८ टॉवरपैकी ६६ टॉवरचे काम सुरु असून ३२ टॉवर सुरू करण्यात आले आहेत. बीएसएनएलच्या ४ जी प्रकल्पात  नक्षलग्रस्त जिल्ह्यांतील ४०५ पैकी ७३ टॉवरचे काम प्रगतीपथावर आहे, १५ टॉवर सुरु झाले आहेत. सर्व टॉवरसाठी जमीन वाटपाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आकांक्षीत जिल्हा कार्यक्रमांतर्गत, तीन जिल्ह्यांमध्ये ३५० टॉवरपैकी ३६ टॉवर कार्यान्वित करण्यात आले आहेत, ९० टक्के प्रकरणांमध्ये जमिनीचे वाटप करण्यात आले आहे असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

गडचिरोलीत मोठी गुंतवणूक येणार

राज्याने गडचिरोली जिल्ह्यात खाणकामाला परवानगी दिली असून सूरजागड खाणीचे काम सुरू झाल्यामुळे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष ५ हजार लोकांना रोजगार उपलब्ध होत आहे. लॉयड मेटल्स लिमिटेडच्या माध्यमातून २० हजार कोटी खर्चून एकात्मिक स्टील प्लांट उभारला जात आहे, ज्यामुळे ७ हजार  लोकांना रोजगार मिळेल. याशिवाय गडचिरोली जिल्ह्यात १ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक येण्यास तयार आहे. नागपूरपुरता सीमित असलेला समृद्धी महामार्ग आम्ही भंडारा, गोंदिया आणि गडचिरोलीपर्यंत विस्तारत आहोत. गडचिरोलीमध्ये आता टाटा समूहासारखे उद्योग सीएसआरच्या माध्यमातून कौशल्य विकासात  सरकारला मदत करत आहेत. गडचिरोलीतील शेतकऱ्यांना त्यांचा शेतमाल व कृषी उत्पादने नागपूरसारख्या मोठ्या बाजारपेठेत नेण्यासाठी मदत करीत आहोत.  जिल्हा प्रशासन, पोलीस केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना “पोलीस दादलोरा खिर्डी” आणि “शासन आपल्या दारी” या उपक्रमातून समन्वयाने राबवत आहेत. जिल्ह्यातील जवळपास निम्म्या लोकसंख्येला म्हणजे ५ लाख लाभार्थींना गेल्या दोन वर्षात आधार कार्ड, जात प्रमाणपत्र, जॉब कार्ड, कौशल्य विकासाचा लाभ देण्यात आला आहे.

‘शासन आपल्या दारी’ मुळे लोकांचा विश्वास वाढला

‘शासन आपल्या दारी’ मोहिमेत गडचिरोली जिल्ह्यात ६ लाख ६७  हजार लाभार्थींची नोंदणी झाली आहे. तिथे झालेल्या पहिल्याच कार्यक्रमात २७ हजार लाभार्थींना विविध शासकीय योजनांचा लाभ देण्यात आला. यामुळे या नक्षल प्रभावित भागात सर्वसामान्यांचा प्रशासनावरील विश्वास वाढण्यास मदत झाली आहे, अशी माहितीही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिली.

प्रारंभी मुख्यमंत्र्यांनी आपल्या काश्मीर दौऱ्याचा उल्लेख केला. ते म्हणाले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त, मी श्रीनगर आणि कारगिलला गेलो होतो आणि त्याठिकाणी ज्या पद्धतीने लोकं मोकळा श्वास घेत आहेत त्याचप्रमाणे गडचिरोली सारख्या नक्षल भागात दहशतवाद संपवून आपल्याला नागरिकांना सुरक्षित वातावरण द्यायचे आहे.

0000

दिव्यांग मंत्रालय हा शासनाचा ऐतिहासिक निर्णय -ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू

????????????????????????????????????

बुलढाणा, दि. : राज्य शासनाने सकारात्मक विचाराने दिव्यांग मंत्रालय स्थापन केले आहे. संपूर्ण देशात सर्वप्रथम महाराष्ट्राने दिव्यांग मंत्रालय सुरू केले आहे. दिव्यांग मंत्रालय हा शासनाचा ऐतिहासिक निर्णय आहे. यामध्यमातून दिव्यांगांना सशक्त करण्यात येईल, असे प्रतिपादन दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी अभियानाचे अध्यक्ष व मुख्य मार्गदर्शक ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी केले.

????????????????????????????????????

दिव्यांग कल्याण विभागातर्फे आयोजित ‘दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी’ अभियान आज, दि. ६ ऑक्टोबर २०२३ रोजी सहकार विद्या मंदिराच्या सांस्कृतिक सभागृहात पार पडले. यावेळी आमदार संजय गायकवाड, जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते, समाज कल्याण प्रादेशिक उपायुक्त सुनिल वारे, समाज कल्याण सहायक आयुक्त डॉ. अनिता राठोड उपस्थित होते.

श्री. कडू म्हणाले की, दिव्यांगांच्या प्रश्नाकडे कायम दुर्लक्ष करण्यात आले आहे. दिव्यांग नोंद घेण्यात येत नसल्यामुळे त्यांची नेमकी संख्या माहिती नव्हती. मात्र शासनाच्या पुढाकार घेतल्याने दिव्यांग मंत्रालय स्थापन करण्यात आले. मात्र येत्या काळात या विभागाला निधी देऊन सशक्त करणे गरजेचे आहे. या विभागाची आता सुरवात झाली असून गेल्या काळात ८२ शासन निर्णय घेण्यात आले आहे. या निर्णयाची अंमलबजावणी होत आहे. विविध मदती आणि अनुदानाच्या राबविण्यात येत असल्यामुळे शासन आता दिव्यांगांच्या दारी पोहोचले आहे.

????????????????????????????????????

गेल्या अनेक वर्षापासून दिव्यांग वर्ग घराच्या लाभापासून वंचित आहे. त्यामुळे दिव्यांगांच्या घरासाठी स्वतंत्र घरकूल योजना व्हावी, यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्यात येईल. घराचे बांधकाम करण्यासाठी अनुदानाची रक्कम सव्वालाखावरून वाढविणे गरजेचे आहे. दिव्यांगांना घरकुलासोबत देण्यात येणारे सानुग्रह अनुदानही वेळेत मिळावे, यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. गेल्या अनेक वर्षांपासून दिव्यांगाचा अनुशेष आहे, हा विविध योजनांच्या माध्यमातून भरून काढावा लागणार आहे. यासाठी समाजमन बदलवावे लागणार आहे.

दिव्यांगचे प्रश्न घेऊन कायम लढा दिला आहे. येत्या काळातही दिव्यांगांची परिस्थिती सुधारावी, यासाठी प्रयत्न करणार आहे. प्राथमिक केंद्र आणि उपकेंद्र ही आपली शक्तीस्थळे आहेत. याठिकाणी चांगले कार्य करण्यात यावे. तसेच दिव्यांगांना अंत्योदय कार्ड वितरित करण्यासाठी पुढाकार घ्यावा, यामुळे दिव्यांगाना मदत देणे शक्य होईल. शासनाने कोतवाल भरती जाहिर केली आहे. यामुळे दिव्यांगांना आरक्षण नाही, मात्र जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेऊन कोतवाल आणि कंत्राटी भरतीमध्ये दिव्यांगाना सामावून घ्यावे.

आमदार श्री. गायकवाड यांनी या अभियानातून वंचित घटकाच्या उत्थानासाठी पुढाकार घेण्यात आला आहे. मेळाव्याच्या माध्यमातून योजना पोहोचविण्यात आल्या आहे. येत्या काळात केंद्र शासनातर्फे पाच हजार दिव्यांगाना सहायकारी उपकरणे देऊन मदत करण्यात येणार आहे. आमदार निधीतून दरवर्षी 30 लाख रूपयांचा निधी देण्यात येत आहे. समाजानेही या कामी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले.

जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांनी अभियानातील प्रत्येक निवेदनावर शेवटपर्यंत पाठपुरावा करण्यात येईल. धोरणात्मक बाबीवरही मार्ग काढण्यात येईल. वंचित घटकासोबत प्रशासन नेहमी राहील, दिव्यांगांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे सांगितले.

मेळाव्यापूर्वी श्री. कडू यांनी दिव्यांगांनी निर्मिती केलेल्या वस्तूंच्या दालनाचे उद्घाटन केले. यावेळी विविध घटकातील लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला. तसेच दिव्यांगांच्या योजनांचे विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब मोहन यांनी प्रास्ताविक केले. जिल्हा समाज कल्याण अधिकारी मनोज मेरत यांनी आभार मानले.

ताराबाई शिंदे यांच्या वाड्याला भेट

????????????????????????????????????

दरम्यान श्री. कडू यांनी सकाळी ‘स्त्री-पुरूष तुलना’ करणाऱ्या लेखिका ताराबाई शिंदे यांच्या वाड्याला भेट दिली. यावेळी श्री. कडू यांनी ताराबाई शिंदे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यांनी शिंदे कुटुंबियांशी संवाद साधून त्यांच्या कार्याची माहिती घेतली. शिंदे कुटुंबाच्या वतीने श्री. कडू यांचा शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

????????????????????????????????????

रौप्य महोत्सव, जनजाती दिनानिमित्त जिल्ह्यात विविध कार्यक्रम – मंत्री डॉ. विजयकुमार गावित

नंदुरबार दि. ६ (जिमाका): नोव्हेंबर महिन्यात भगवान बिरसा मुंडा जयंती व जनजाती दिवसाच्या निमित्ताने होणारा राज्यस्तरीय जनजाती महोत्सव, तसेच डिसेंबर महिन्यात जिल्ह्याच्या रौप्य महोत्सवानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जाणार असल्याची माहिती आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित रौप्य महोत्सव, जनजाती दिवसाच्या आयोजनासंदर्भात आयोजित बैठकीत मंत्री डॉ. गावित बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी मनीषा खत्री, जिल्हा पोलीस अधिक्षक पी. आर. पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सावन कुमार, सहाय्यक जिल्हाधिकारी मंदार पत्की, निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, उपजिल्हाधिकारी गोविंद दाणेज, जिल्हा नियोजन अधिकारी योगेंद्र चौधरी, नंदुरबार एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प संचालक चंद्रकांत पवार, तहसीलदार नितीन गर्जे (नंदुरबार), दिपक गिरासे (शहादा) सामाजिक कार्यकर्ते डॉ. कांतीलाल टाटीया, तसेच विविध यंत्रणांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

मंत्री डॉ. गावित म्हणाले की, १५ नोव्हेंबर रोजी देशभर भगवान बिरसा मुंडा यांची जयंती जनजाती दिवस म्हणून साजरा केली जाते. या जयंती निमित्त राज्यस्तरीय जनजाती दिवस महोत्सव १५ ते १७ नोव्हेंबर २०२३ या कालावधीत नंदुरबार येथे होणार आहे. या तीन दिवसांच्या कालावधीत विविध सासंकृतिक कार्यक्रम, आदिवासी लोकनृत्य, हस्तकला, आदिवासी बांधवांच्या विविध पारंपरिक वेशभुषा, आभूषणे यांचे प्रदर्शन आयोजित केले जाणार आहे.

डॉ. गावित म्हणाले की, डिसेंबर २०२३ पासून जिल्ह्याच्या रौप्य महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित केले जाणार असून ९ डिसेंबर २०२३ ते २१ जानेवारी २०२४ या कालावधीत रौप्य महोत्सवानिमित्त प्रत्येक तालुकास्तरावर तसेच जिल्हा मुख्यालयात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. यात प्रमुख्याने स्थानिक व बाहेरील कलावंतांच्या सांस्कृतिक कार्यक्रमांसोबत माहितीपट व प्रदर्शनांचे आयोजन केले जाणार आहे. हा कार्यक्रम सर्वसमावेशक व नाविण्यपूर्ण व्हावा, यासाठी सर्व यंत्रणांनी आपल्या स्तरावर स्वतंत्र नियोजन करावे, अशाही सूचना यावेळी मंत्री डॉ. गावित यांनी केल्या.

यावेळी झालेल्या चर्चेत जिल्हाधिकारी मनीषा खत्री, जिल्हा पोलीस अधिक्षक पी. आर. पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सावन कुमार, सहाय्यक जिल्हाधिकारी मंदार पत्की, डॉ. कांतीलाल टाटीया यांनी सहभाग घेतला.

सामुहिक वनदावे उपयोगात आणावेत

वनपट्टे वाटपासंदर्भात झालेल्या बैठकीत मंत्री डॉ. गावित म्हणाले की, वन हक्क जमीन उपयोगात यावी म्हणून गाव समित्या  नेमल्या होत्या. या समित्यांनी एनजीओच्या माध्यमातून मोजणी करणे अपेक्षित होते परंतु अद्याप ते झालेले नाही आणि शेकडो एकर वन जमीन पडून आहे. सामायिक वनदावे उपयोगात आणले जाणे आवश्यक आहे. गावकऱ्यांनी ताबडतोब सामूहिक नियोजन करून त्या उपयोगात आणावे. वृक्ष लागवड सारखे उपक्रम राबवावेत. आदिवासी विकास विभागामार्फत सर्व सहकार्य दिले जाईल. बांबू, महू, तेंदू , डिंक यासारखी लागवड केल्यास पूर्वीप्रमाणे जंगल उत्पादन घेता येईल. त्या प्रत्येक गावाला रोजगार मिळेल. वनउपज घेता येईल तसेच त्यावर आधारित वस्तू उत्पादन वाढवता येईल. सामायिक वन हक्क क्षेत्र मोठे आहे आणि मोजणी करणारे मनुष्यबळ कमी आहे याविषयी मंत्रालय स्तरावर बैठक घेऊन निर्णय केला जाईल, असेही मंत्री डॉ. गावित यांनी यावेळी सांगितले.

०००

महाराष्ट्र राज्य विकास कर्ज २०२३ ची ९.३६ टक्के दराने परतफेड

मुंबई, दि. ६ : महाराष्ट्र शासनाने पूर्वी खुल्या बाजारातून उभारलेल्या ९.३६ टक्के कर्जरोखे २०२३ ची परतफेड ५ नोव्हेंबर पर्यंत देय असलेल्या व्याजासह ६ नोव्हेंबर २०२३ रोजी करण्यात येणार आहे, असे वित्त विभागाने कळविले आहे.

शासनाने उपरोक्त दिनांकास सुट्टी जाहीर केल्यास, राज्यातील अधिदान कार्यालय, कर्जाची परतफेड अगोदरच्या कामाच्या दिवशी करेल.

दुय्यम सर्वसाधारण खातेवही लेखा किंवा रोखे प्रमाणपत्र यांच्या स्वरुपातील शासकीय रोख्यांच्या नोंदणीकृत धारकाकडील मुदत समाप्ती उत्पन्नाचे प्रदान हे, इलेक्ट्रॉनिक माध्यमामार्फत जमा निधीची सुविधा असलेल्या कोणत्याही बँकेतील धारकाच्या खात्यात जमा करून त्याच्या बँक खात्याचे संबंधित तपशिलांसह प्रदानादेशाद्वारे करण्यात येईल. रोख्यांच्या बाबतीतील प्रदान करण्यासाठी अशा रोख्यांचा मूळ वर्गणीदार किंवा यथास्थिती उत्तरवर्ती धारक, बँकेकडे किंवा कोषागाराकडे किंवा भारतीय स्टेट बँकेच्या शाखेच्या उप-कोषागाराकडे किंवा यथास्थिती त्यांच्या दुय्यम बँकांकडे जर त्यांना व्याज प्रदान करण्यासाठी मुखांकित करण्यात आले असल्यास त्यांची नोंदणी करण्यात आली असल्यास त्याच्याकडे त्यांच्या बँक खात्याचा संबंधित तपशील सादर करतील.

तथापि, बँक खात्याच्या संबंधित तपशिलाच्या/इलेक्ट्रॉनिक माध्यमामार्फत निधी जमा करण्याच्या आदेशाच्या अभावी नियत दिनांकास परतफेड करणे सुलभ व्हावे यासाठी, ९.३६ टक्के महाराष्ट्र राज्य विकास कर्ज, २०२३ च्या धारकांनी, लोक ऋण कार्यालयात २० दिवस अगोदर त्यांचे रोखे सादर करावेत.

भारतीय स्टेट बँकेच्या किंवा तिच्या कोणत्याही सहयोगी बँकांच्यामार्फत ज्या ठिकाणी कोषागाराचे काम केले जाते त्या ठिकाणी ते रोखे रोखा प्रमाणपत्राच्या स्वरुपात असल्यास, ते संबंधित बँकेच्या शाखेत सादर करावेत आणि ते कोषागार किंवा उपकोषागार येथे सादर करू नयेत.

रोख्यांची रक्कम प्रदान करण्यासाठी ठिकाणे मुखांकित करण्यात आली असतील त्या ठिकाणांखेरीज अन्य ठिकाणी ज्या रोखेधारकांना रक्कम स्वीकारायची असेल, त्या रोखेधारकांनी ते रोखे नोंदणीकृत व विमाबद्ध डाकेने संबंधित लोक ऋण कार्यालयात यथोचितरित्या पाठवावेत, लोक ऋण कार्यालय हे, शासकीय कोषागाराचे काम करणाऱ्या भारतीय स्टेट बँकेच्या किंवा तिच्या सहयोगी बँकेच्या कोणत्याही शाखेत कोषागारात/उपकोषागारात देय असलेल्या धनाकर्षाद्वारे त्याचे प्रदान करील असे प्रसिद्धी पत्रकाद्वारे नमूद केले आहे.

०००

 

गोरेगाव आग दुर्घटनाग्रस्तांची पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्याकडून विचारपूस

मुंबई, दि. ६ : गोरेगाव (पश्चिम) उन्नत नगर येथील जय भवानी इमारतीला भीषण आग लागून या दुर्घटनेत काही जणांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी हिंदुहृयसम्राट बाळासाहेब ठाकरे रुग्णालयामध्ये जाऊन आगीतील जखमींची विचारपूस केली व त्यानंतर प्रत्यक्ष घटनास्थळाची पाहणी केली.

पालकमंत्री श्री. लोढा म्हणाले की, या आगीत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना ५ लाख रुपयांची मदत देण्यात येणार आहे. जखमी नागरिकांना उपचारासाठी हिंदुहृयसम्राट बाळासाहेब ठाकरे रूग्णालय, लाईफलाईन मेडीकल आणि कूपर रूग्णालयमध्ये दाखल करण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे या घटनेवर लक्ष असून, दुर्घटनाग्रस्तांवर वेळेत उपचार व मदतीसाठी शासन तत्पर असल्याचेही मंत्री श्री. लोढा यांनी सांगितले. यावेळी आमदार विद्या ठाकूर, मुंबई महापालिकेचे आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.

०००

गोरेगाव आग दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना ५ लाखांची मदत, जखमींवर शासकीय खर्चाने उपचार

मुंबई, दि. ६: गोरेगावच्या उन्नत नगर येथील एसआरएच्या जय भवानी इमारतीला भीषण आग लागून झालेल्या दुर्घटनेतील मृत व त्यांच्या कुटुंबियांप्रति मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहवेदना प्रकट केली आहे. तसेच या मृतांच्या कुटुंबियांना पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.

सहवेदना प्रकट करताना मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी म्हटले आहे की, या दुर्घटनेत काही नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. यात काही लहान मुलांचाही समावेश आहे. ही घटना अत्यंत दुर्दैवी असून त्यात जीव गमवावा लागलेल्या नागरिकांप्रति सहवेदना व्यक्त करतो. या आगीच्या घटनेबाबत मुंबई महानगरपालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्तांकडून वेळोवेळी माहिती घेण्यात येत आहे. मुंबईचे शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर तसेच मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांना घटनास्थळी भेट देण्याचे निर्देश दिले आहेत.

या दुर्घटनेतील मृतांच्या कुटूंबियांना ५ लाख रुपयांची मदत देण्यात यावी तसेच जखमींवरील उपचाराचा खर्च शासनाकडून करण्यात यावा, असेही निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

०००

ताज्या बातम्या

मुख्य न्यायदंडाधिकारी कार्यालयातील चार वाहनांची लिलावाद्वारे विक्री

0
मुंबई, दि. ३० : मुख्य न्यायदंडाधिकारी, मुंबई या कार्यालयातील मारूती इको (पेट्रोल) या चार वाहनांची जाहीर लिलाव पद्धतीने विक्री करण्यात येणार आहे. या वाहनाची...

महाराष्ट्र दिनानिमित्त राजधानीत विविध कार्यक्रम

0
नवी दिल्ली, दि. ३० : महाराष्ट्र राज्याचा ६६ वा स्थापना दिवस गुरूवारी १ मे रोजी साजरा होणार आहे या निमित्ताने राजधानी दिल्लीत विविध कार्यक्रम...

महाराष्ट्र दिनानिमित्त राज्यपालांचे कार्यक्रम

0
मुंबई, दि. ३० : महाराष्ट्र राज्याच्या ६६ व्या स्थापना दिनानिमित्त राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन गुरुवारी (दि. १ मे) छत्रपती शिवाजी महाराज मैदान, दादर, मुंबई...

महात्मा बसवेश्वर व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले अभिवादन

0
मुंबई, दि. ३० : महात्मा बसवेश्वर आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी सामान्य...

नागरिकांना वेळेत सुविधा मिळण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे- राज्यमंत्री माधुरी मिसाळ

0
मुंबई, दि. ३० : पुणे महानगरपालिका आणि महात्मा फुले नविनीकरणीय ऊर्जा व पायाभूत प्रौद्योगिकी महामंडळ (महाप्रित) यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे महापालिकेच्या हद्दीत राबविण्यात येणाऱ्या...