सोमवार, एप्रिल 28, 2025
Home Blog Page 970

राजधानीत पंडीत दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

नवी दिल्ली २५ : पंडीत दीनदयाळ उपाध्याय यांची जयंती महाराष्ट्र सदनात आज साजरी करण्यात आली.

कोपर्निकस मार्गस्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात निवासी आयुक्त तथा  प्रधान सचिव रुपिंदर सिंग यांनी पंडीत दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश अडपावार, सहायक निवासी आयुक्त स्मिता शेलार यांच्यासह महाराष्ट्र सदनाचे अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते. उपस्थितांनीही प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.

महाराष्ट्र परिचय केंद्रात पंडीत दीनदयाळ उपाध्याय यांना अभिवादन

महाराष्ट्र परिचय केंद्रात आयोजित कार्यक्रमात पंडीत दीनदयाळ उपाध्याय यांना अभिवादन करण्यात आले. परिचय केंद्राच्या प्रभारी उपसंचालक अमरज्योत कौर अरोरा यांनी पंडीत दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यावेळी मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्यकारी अधिकारी अभिषेक जाधव यांच्यासह उपस्थित कर्मचाऱ्‍यांनी  प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.

0000

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून आशियाई स्पर्धेत नेमबाजीमध्ये सुवर्ण वेध घेणाऱ्या भारतीय संघाचे अभिनंदन

मुंबई, दि. २५ : – आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय संघाने नेमबाजीमध्ये एअर रायफल्स प्रकारात देशाला या स्पर्धेतील पहिले सुवर्णपदक पटकावून दिले आहे. या सुवर्ण वेधासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भारतीय संघातील नेमबाज रुद्रांक्ष बाळासाहेब पाटील, दिव्यांश सिंह पनवर, ऐश्वर्य सिंह तोमर यांचे अभिनंदन केले आहे. या संघाने जागतिक चॅम्पियनशीप स्पर्धेतील विक्रमही मोडीत काढला आहे. याबद्दलही मुख्यमंत्र्यांनी या तिघांचे विशेष कौतुक केले आहे.

चीन मध्ये फुयांग (हांगजोऊ) येथे सुरु असलेल्या १९ व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय नेमबाजांच्या संघाने १० मीटर एअर रायफल्स प्रकारात चमकदार कामगिरी केली आहे. यात रुद्रांक्ष, ऐश्वर्य आणि दिव्यांश यांनी सुरुवातीपासूनच कामगिरीत सातत्य ठेवून गुणांची कमाई करत, संघाला सुवर्ण पदक मिळवून दिले आहे. रुद्रांक्ष पाटील हा ठाण्याचा खेळाडू आहे. त्याच्या नेमबाजीतील नैपुण्यासाठी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी पाठबळ दिले आहे.

मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी या तिघांचेही विशेष कौतुक करताना म्हटले आहे की, भारताने नेहमीच आशियाई क्रीडा स्पर्धेवर वर्चस्व राखले आहे. यंदाच्या या स्पर्धेत सुरुवातच या तिघांनी नेमबाजीत सुवर्ण पदकाचा वेध घेऊन केली आहे. यासाठी या खेळाडुंचे, त्यांच्या प्रशिक्षक-मार्गदर्शकांचे आणि त्यांना पाठबळ देणाऱ्या कुटुबियांचे देखील कौतुक करावे लागेल. अशा जिद्दी आणि मेहनती खेळाडुंच्या कामागिरीच्या जोरावरच भारताची यंदाच्या या स्पर्धेतील कामागिरी अशीच दिमाखदार राहील आणि आपला भारत या स्पर्धेत पदक तालिकेत अव्वल राहील, अशी अपेक्षाही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली आहे. या यशस्वीतेसाठी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी स्पर्धेत सहभागी भारतीय खेळाडुंच्या चमुला शुभेच्छा दिल्या आहेत.

0000

राज्यात जोमदार पाऊस पडू दे, बळीराजा सुखी होऊ दे – उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे दि.२५: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील मानाच्या गणपतींसह विविध गणेश मंडळांना भेट देऊन श्रींचे दर्शन घेतले. राज्यात ज्या भागात अजूनही पाऊस पडलेला नाही त्या भागातही जोमदार पाऊस पडू दे आणि शेतकरी, बळीराजा सुखी, समाधानी होऊ दे असे मागणे श्रीगणेशाकडे मागितल्याचे उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले.

गणेश मंडळांना भेटी व दर्शनाच्या प्रसंगी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती रुपाली चाकणकर, माजी उपमहापौर दीपक मानकर, गणेश मंडळाचे अध्यक्ष, पदाधिकारी आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी श्री कसबा गणपतीची आरती केली. तसेच भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळ, तांबडी जोगेश्वरी गणपती, लक्ष्मी मार्ग येथील गुरुजी तालिम मंडळ, तुळशीबाग येथील तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणेशोत्सव मंडळ, महात्मा फुले मंडई येथील अखिल मंडई गणेशोत्सव मंडळ, केसरीवाडा येथील लोकमान्य टिळक वाडा गणेशोत्सव मंडळ, सदाशिव पेठ येथील राजाराम मित्र मंडळ, साने गुरूजी तरुण मंडळ येथे दर्शन घेतले तसेच श्रीगणेशाची आरती केली. यावेळी त्यांचा मंडळांच्यावतीने सत्कार करण्यात आला.

०००

पंडीत दीनदयाळ उपाध्याय यांना मंत्री मंगलप्रभात लोढा यांचे अभिवादन

मुंबई, दि २५ : पंडीत दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस कौशल्य विकास, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी आज मंत्रालयात पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक, उपसचिव रोशनी कदम-पाटील, अवर सचिव रविंद्र पेटकर, विभागाचे कक्ष अधिकारी अर्जुन गिराम यांनीही पंडीत दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

०००

विघ्नहर्ता, सर्वांचे दु:ख दूर कर! – उपमुख्यमंत्र्यांची प्रार्थना

नागपूर दि. २४ : सर्वांच्या जीवनातील विघ्न दूर करून सर्वाना सुखी समृद्धी ठेवण्याची प्रार्थना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

श्री. फडणवीस यांनी आज शहरातील विविध सार्वजनिक गणेश मंडळांना भेट देऊन श्री गणेशाचे दर्शन घेतले. विविध गणेश मंडळांनी आकर्षक देखाव्याद्वारे  लोकोपयोगी योजना,  ‘माझी माती, माझा देश’ अंतर्गत  माती व तांदळे चा ‘अमृत कलश’ उपमुख्यमंत्री यांना भेट दिले.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी अभ्यंकर नगर बाल गणेश मंडळ, बजाज नगर  एन.आय.टी. कॉटर्स येथील श्री बाल गणेश उत्सव मंडळ, राणी लक्ष्मी नगर गणेश  मंडळ, तात्या टोपे नगर गणेश मंडळ, अत्रे लेआउट प्रताप नगर येथील साहस गणेशोत्सव मंडळ,  उस्मान लेआउट गोपाल नगर येथील युवा संकल्प गणेश उत्सव मंडळ व त्रिमूर्ती गणेशोत्सव मंडळ,  प्रताप नगर चौक येथील बाल गणेशोत्सव मंडळ,  लोकसेवा नगर येथील युवा गणेश उत्सव मंडळ, प्रियदर्शनी नगर येथील श्री विघ्नहर्ता बाल गणेशोत्सव मंडळ, त्रिमूर्ती नगर येथील युवक गणेश मंडळ, गुडलक सोसायटी जयताळा येथील नवयुवक गणेशोत्सव मंडळ, भेंडे लेआउट येथील श्री सिद्धिविनायक फाउंडेशन द्वारा संचालित श्री सार्वजनिक बाल गणेशोत्सव मंडळ, सोनेगाव एचबी ईस्टेट येथील श्री गणेश उत्सव मंडळ, गोविंद नगर व जयप्रकाश नगर येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, रामेश्वरी येथील सर्वोदय गणेशोत्सव मंडळ, भगवान नगर येथील युवा गणेशोत्सव मंडळ आदी गणेश मंडळांना भेट दिली व श्री गणेशाचे दर्शन घेवून आरती केली.

000

 

शालेय जीवनापासून विद्यार्थ्यांच्या क्रीडा गुणांना प्रोत्साहन देवून उत्तम खेळाडू निर्माण करावे – अन्न, नागरी पुरवठा व ग्राह‍क संरक्षण मंत्री छगन भुजबळ

नाशिक,दिनांक: 24 सप्टेबर, 2023 (जिमाका वृत्तसेवा) : विद्यार्थ्यांना खेळाची आवड निर्माण होण्यासाठी शाळांमध्ये विविध खेळांच्या स्पर्धांचे आयोजन केले जाते. शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांच्या क्रीडा गुणांना प्रोत्साहन दिले तर उत्तम खेळाडू निर्माण होतील. असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राह‍क संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले.

आज येवला शहरातील भाऊलाल पहिलवान लोणारी क्रीडा संकुल येथे आयोजित विभागीय शालेय कुस्ती स्पर्धा उद्घाटन प्रसंगी मंत्री छगन भुजबळ बोलत होते. यावेळी येवला प्रांताधिकारी बाबासाहेब गाढवे, जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील, तहसिलदार आबा महाजन, येवला नगरपालिकेचे मुख्याधिकारी किरण देशमुख, यांच्यासह क्रिडा शिक्षक, प्रशिक्षक, स्पर्धक, विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मंत्री छगन भुजबळ म्हणाले, विभागीय शालेय कुस्ती स्पर्धेचा प्रथम मान येवला शहरास मिळाला ही बाब भूषणावह आहे. आज येथे होत असलेल्या विभागीय क्रीडा स्पर्धांमध्ये नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव जिल्हा तसेच नाशिक, मालेगाव, जळगाव, धुळे महानगरपालिका क्षेत्रातील विविध वयोगातील २४० हून अधिक विद्यार्थी सहभागी झाले आहे. फ्री स्टाईल व ग्रिकोरोमन या दोन प्रकारात कुस्ती स्पर्धा येथे होणार असून यात १४, १७ व १९ वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांचा सहभाग आहे. या स्पर्धेत विजयी होणा-या खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धांसाठी निवड केली जाणार आहे.

मंत्री श्री. भुजबळ पुढे म्हणाले की, येवला शहराला सुमारे शंभर ते दीडशे वर्षाहून अधिक काळापासून कुस्तीची परंपरा आहे. ‘घर तेथे पहिलवान’ अशी येवला शहराची ख्याती असून येवला शहर आणि तालुक्याने कुस्ती स्पर्धेत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. येवला शहरात फार जुने तालीम संघ आहे. त्यातून आजवर अनेक कुस्ती खेळाडू घडले आहे. येवल्यातील लोणारी कुटुंबाने तर सुमारे ५ पिढ्यापासून कुस्ती खेळाची परंपरा जोपासली आहे. येवला तालुक्यातील विद्यार्थ्यांना विविध खेळांमध्ये प्राविण्य मिळविण्यासाठी तालुका क्रीडा संकुलाची निर्मिती केली आहे. जलतरणासह विविध खेळांच्या सरावासाठी या क्रीडा संकुलात सेवा-सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहे. तालुक्यातील अनेक गावांमध्ये महिला व पुरूषांसाठी स्वंतंत्र व्यायामशाळा निर्माण करण्यात आलेल्या आहे. यापुढील काळातही खेळाला आधिक प्राधान्य देऊन त्यासाठी आवश्यक त्या सुविधा निर्माण करून देण्यासाठी सदैव प्रयत्नशील आहे. आज राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये येवल्यातील खेळाडूंनी सुवर्ण कामगिरी केली आहे. या पुढेही अशा विविध स्पर्धांच्या माध्यमातून चांगले खेळाडू पुढे येतील अशा विश्वास व्यक्त करीत मंत्री श्री. भुजबळ यांनी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.

उत्तम आरोग्य, ग्रंथ वाचन व सुसंवाद ही आंनदी आयुष्याची त्रिसूत्री – अन्न, नागरी पुरवठा व ग्राह‍क संरक्षण मंत्री छगन भुजबळ

नाशिक,दिनांक: 24 सप्टेबर, 2023 (जिमाका वृत्तसेवा) : ज्येष्ठ नागरिक होणे हा मानवी आयुष्याचा एक महत्वाचा टप्पा आहे. जीवनात उत्तम आरोग्य, ग्रंथ वाचन व एकमेकांशी सुसंवाद या त्रिसूत्रीचा अंगिकार केल्यास आपण आनंदी आयुष्य जगू शकतो. असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राह‍क संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले.

आज येवला येथे श्री. स्वामी समर्थ ज्येष्ठ नागरिक संघ सभामंडप लोकार्पण प्रसंगी मंत्री छगन भुजबळ बोलत होते. यावेळी येवला प्रांताधिकारी बाबासाहेब गाढवे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता अभिजीत शेलार, कनिष्ठ अभियंता अमोल शिंदे यांच्यासह श्री. स्वामी समर्थ ज्येष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी व ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.

मंत्री छगन भुजबळ यावेळी म्हणाले, वयाची साठी ओलांडल्यानंतर मनुष्यास ज्येष्ठत्व येते. वयाच्या या वळणावर प्रत्येकाने आपल्या दैनंदिन आयुष्यात योग्य बदल करून घेतले पाहिजेत. उत्तम आरोग्य हिच आपली संपत्ती आहे. यासाठी नियमित फिरणे, व्यायाम करणे, योगा करणे आणि आहारात आवश्यक बदल करणे हे तितकेच महत्वाचे आहे. चांगले ग्रंथ, पुस्तके, वर्तमानपत्र वाचन करणे, वयानुरूप खेळ खेळणे, मनोरंजनात्मक छंद जोपासणे हे गरजेचे असून यातून जगण्याची नवी दिशा मिळते. श्री. स्वामी समर्थ ज्येष्ठ नागरिक संघातील सदस्य येथे एकत्र येतात, एकमेकांशी सुसंवाद साधतात यातून सुख-दु:ख, एकमेकांचे विचार यांची देवाणघेवाण होते. यामुळे मन मोकळे होवून प्रफुल्लीत रहाते.

मंत्री श्री. भुजबळ पुढे म्हणाले, ज्येष्ठ नागरिक संघाच्या माध्यमातून एक कुटुंब निर्माण झाले आहे. येथे जात-पात, धर्म या गोष्टींना महत्व नसून सर्व स्त्री-पुरूष ज्येष्ठ नागरिक कुटुंबातील सदस्यांप्रमाणे एकत्र येवून वेगवेगळे उपक्रम राबवितात. त्यातून त्यांना जगण्याची नवी उर्जा मिळते आणि आपलेपणाच्या नात्यातील दृढता वाढते. असेही मंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी सांगितले. यावेळी श्री. स्वामी समर्थ ज्येष्ठ नागरिक संघास मंत्री छगन भुजबळ यांनी रूपये

२५ हजारांची देणगी जाहिर केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी नगरसेवक भोलानाथ लोणारी यांनी केले.

 

000

नवोदित आणि अनुभवी डॉक्टरांनी आदिवासी भागात सेवा द्यावी – आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित

नंदुरबार : दिनांक 24 सप्टेंबर 2023 (जिमाका वृत्तसेवा) – राज्यातील कुठल्याही आदिवासी भागात नवोदित आणि अनुभवी डॉक्टरांनी सेवा द्यावी, असे आवाहन आज राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी केले आहे.

ते आज नंदुरबार शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या वर्ष 2023-24 च्या नवीन विद्यार्थ्यांच्या तुकडीसाठी आयोजित स्वागत समारंभात संबोधित करताना बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित, खासदार डॉ. हिना गावित, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अरूण हुमणे व वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिकारी,शिक्षक, विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.

पालकमंत्री डॉ. गावित म्हणाले, आरोग्य आणि वैद्यकीय क्षेत्रातील बहुविध प्रकारचे रुग्ण,आजार आणि आरोग्य क्षेत्रातील खरी आव्हाने आदिवासी दुर्गम भागात पहावयास मिळतात. अशा ठिकाणी आपल्या करिअरची सुरूवात नवोदित डॉक्टरांनी केल्यास त्यांच्या भविष्यातील वाटतालीस हा दुर्गम भागातील अनुभव पाथ फाईंडर ठरू शकतो. शैक्षणिक कालखंडात जे शिकता येत नाही, जे शिकवले जात नाही असे वैविध्यपूर्ण व आजार आणि रुग्णांवर उपचार करण्याचे कृतीशील शिक्षण या भागात मनापासून काम करणाऱ्या डॉक्टरांना  मिळत असते. तसेच नवोदित डॉक्टरांच्या सोबत अनुभवी डॉक्टरांनी आपली सेवा दिल्यास जुन्यांचा अनुभव  आणि नव्यांच्या ज्ञानातुन  प्रभावी उपचारांची एक नवी साखळी आदिवासी, दुर्गम भागात आरोग्याच्या क्षेत्रात निर्माण होवू शकते व त्यातून या भागातील आरोग्याच्या प्रश्न जागेवरच सोडवण्यासाठी मदत होवू शकते. नंदुरबारचे वैद्यकीय महाविद्यालय नवोदित आणि अनुभवी डॉक्टरांच्या कार्यकर्तृत्वाचा सांधा बनेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

ते पुढे म्हणाले, आजच्या 25 वर्षांपूर्वी इथल्या आरोग्य आणि वैद्यकीय क्षेत्रातील समस्या वेगवेगळ्या होत्या.  धुळे हे जिल्ह्याचे मुख्यालय होते, तेथून धडगाव, मोलगी सारख्या भागात उपचारासाठी येणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना पोहचताना दळणवळणाच्या सुविधांअभावी संध्याकाळ अथवा रात्र होत असायची. पोहचल्यानंतर तिथे विद्युत प्रवाह असला तर ठिक, नाहीतर अंधारात जमेल त्या परिस्थितीत रुग्ण तपासावे लागत होते. आज मात्र, दळणवळण, वीज पुरवठा, आणि आरोग्य सेवेचे जाळे निर्माण करण्यात शासनाला मोठे यश लाभले आहे. या यशाचा पाया पंचवीस वर्षांपूर्वी जिल्हा निर्मितीच्या माध्यमातून शासनाने रचला आहे, वैद्यकीय महाविद्यालय आणि प्रत्येक शासकीय विभागाच्या निर्माण झालेल्या इमारती आणि त्यातून दिल्या जाणाऱ्या सुविधा हा त्याचा कळस आहे, असेही यावेळी पालकमंत्री डॉ. गावित यांनी सांगितले.

वैद्यकीय महाविद्यालयाच्या अनुषंगाने आवश्यक त्या इमारतींसोबत वसतीगृहांच्या निर्मितीवरही येणाऱ्या काळात जाणीवपूर्वक प्रयत्न केले जाणार आहेत. आवश्यक साधनसामुग्रीसोबत आवश्यक सेवा,सुविधा वैद्यकीय महाविद्यालय, विग्यार्थ्यांसाठी निर्माण करण्यासाठी वचनबद्ध असल्याचेही यावेळी पालकमंत्री डॉ. गावित यांनी यावेळी सांगितले सांगितले.

यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित, खासदार डॉ. हिना गावित, अधिष्ठाता डॉ. अरूण हुमणे यांनी, तसेच विद्यार्थी प्रतिनिधी अथर्व पवार, डॉ. तृप्ती रामटेके, डॉ. श्रीनिवास चित्ते, डॉ. आशिष रडके यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी रक्तदान व त्यासाठी समाजप्रबोधन करणाऱ्या वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

 

0 0 0

चर्मकार समाजाच्या पाठिशी शासन खंबीरपणे – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर दि.24 : चर्मकार समाजाच्या पाठिशी शासन खंबीरपणे उभे असून समाजातील तरूणांना पुढे नेण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षणासाठी व शिष्यवृत्ती मिळविण्यासाठी सर्वतोपरी मदत  व प्रशिक्षण  राज्य सरकारच्या माध्यमातून करण्यात येईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

चर्मकार समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि समाजमेळाव्याच्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते. तत्पूर्वी कार्यक्रमाचे उद्घाटन केंद्रीय रस्ते विकास व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले.  आमदार प्रवीण दटके, आमदार विकास कुंभारे, चर्मकार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष भैय्यासाहेब बिघाणे, केंद्रीय राखीव पोलीस दलाचे दीपक गवई, माजी आमदार परिणय फुके, अशोक थोटे, राजेंद्र चौधरी, रोशन माहुरकर, परिणिता फुके आदी मंचावर उपस्थित होते.

चर्मकार समाजातील प्राविण्यप्राप्त विद्यार्थ्यांची संख्या दरवर्षी वाढत आहे. विशेष म्हणजे प्राविण्यप्राप्त विद्यार्थ्यांमध्ये सर्वाधिक मुली आहेत, ही आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे. महिलाशक्ती ओळखूनच देशाच्या प्रगतीसाठी महिलांना संधी देण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी लोकसभा आणि विधानसभेत 33 टक्के आरक्षण देण्याविषयीचे विधेयक आणल्याचे श्री. फडणवीस यांनी सांगितले.

चर्मकार महामंडळाच्या कर्ज वितरणात सुलभता आणण्यासाठी  मुंबई येथे लवकरच बैठक घेवून जामीन देण्याबाबतच्या व इतर अटी-शर्थी दूर करण्याचा प्रयत्न करण्यात येईल. बारा बलुतेदारमधील चर्मकार समाजाला उद्योग-व्यवसायात नवीन तंत्र, व्यवसायाच्या नवीन संधी, बाजारपेठ आणि कर्जही मिळाले पाहिजे, याकरता प्रधानमंत्री  विश्वकर्मा योजना सुरू केलेली आहे. समाजात नवीन उद्योजक घडविण्यासाठी या योजनेच्या माध्यमातून मिळणाऱ्या नवीन दालनाचा चर्मकार समाजाने लाभ घ्यावा, असे आवाहन श्री. फडणवीस यांनी केले. चर्मकार समाजाकरिता नागपूर येथे समाज भवन निर्माण करण्यासाठी निधीची उपलब्धता करू, असेही ते म्हणाले. याप्रसंगी उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थांचा सत्कार करण्यात आला.

दहावीचे 230 व बारावीचे 135 असे एकूण 365 विद्यार्थ्यांचा चर्मकार संघाच्या वतीने सत्कार करण्यात येत असल्याची माहिती प्रास्ताविकेत भैय्यासाहेब बिघाणे यांनी दिली.

000

नाग नदीच्या पुरामुळे झालेल्या घरांच्या नुकसानीची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पाहणी

नागपूर दि. 24 : नाग नदीला आलेल्या महापुरामुळे सुमारे दहा हजार घरांचे नुकसान झाले आहे. घरात पाणी शिरल्यामुळे घरगुती साहित्य तसेच अन्नधान्य भिजले असून घरातील चिखल काढण्यासाठी  नागरिकांना मदत करण्यात येईल, तसेच नुकसानीसंदर्भात पंचनाम्याला दुपारी सुरुवात करून तत्काळ मदत देण्याची ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिली.

शुक्रवारी मध्यरात्रीनंतर चार तासात जोरदार पावसामुळे अंबाझरी परिसरातील नागरिकांच्या घरात पुराचे पाणी शिरल्यामुळे अन्नधान्यासह इतर साहित्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी श्री. फडणवीस यांनी केली. डागा लेआउट, कार्पोरेशन कॉलनी, शंकर नगरसह इतर वस्त्यांना भेट देऊन येथील नागरिकांशी संवाद साधला. तसेच घरात चिखलामुळे झालेल्या नुकसानीचीही पाहणी केली.

झालेल्या नुकसानीसंदर्भात नागरिकांनी आपल्या भावना यावेळी व्यक्त केल्या. सुमारे दहा हजार घरांचे नुकसान झाले असून या नुकसानीसंदर्भात नागरिकांना संपूर्ण मदत करण्यात येईल. जास्तीत जास्त मदत करण्याची ग्वाही यावेळी श्री. फडणवीस यांनी दिली.

नाग नदीला आलेल्या पुराची तसेच नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याच्या घटनेची संपूर्ण माहिती यावेळी त्यांनी घेतली. एका तासात 109 मिलिमीटर एवढा पाऊस झाला असून पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी नदीचे पात्र  कमी पडल्यामुळे इतर वस्त्यांमध्ये पाणी शिरले. यापुढे अशी घटना घडणार नाही, याची दखल घेण्यात आली असून पाण्याचा प्रवाह कुठेही थांबणार नाही, यादृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्यात येईल. भविष्यात अशा घटना टाळण्यात येतील, असेही श्री. फडणवीस यांनी सांगितले.

पुराचे पाणी घरात शिरल्यामुळे  सर्वत्र चिखल साचला आहे. तसेच घरातील चिखल काढण्याला प्राधान्य देण्यात येत आहे. आरोग्याच्या दृष्टीने खबरदारीच्या उपाययोजना म्हणून सर्वांना क्लोरीनच्या गोळ्या देण्यात येत आहेत. जिल्हा प्रशासन व महानगरपालिकेने तातडीने उपाययोजना कराव्यात, असे निर्देशही उपमुख्यमंत्री
श्री. फडणवीस यांनी दिले.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सकाळी अंबाझरी तलाव, नाग नदी तसेच कार्पोरेशन कॉलनी, डागा लेआउट, शंकर नगर आदी सर्व भागांना भेट देऊन पाहणी केली. यावेळी माजी महापौर संदीप जोशी, महानगरपालिका आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांच्यासह महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

000

ताज्या बातम्या

दशकपूर्ती महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमाची!

0
राज्यातील नागरिकांना पारदर्शक, गतिमान व कालबद्ध पद्धतीने लोकसेवा देता याव्या यासाठी शासनाने 'महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, 2015' लागू केला आहे. यामुळे शासकीय आणि निमशासकीय...

देशाची आरोग्य व्यवस्था जगात सर्वात सक्षम आणि मोठी – केंद्रीय आरोग्य मंत्री जे.पी.नड्डा

0
छत्रपती संभाजीनगर, दि. २७ (जिमाका): जगात आपल्या देशाची आरोग्य व्यवस्था सर्वात मोठी असून या आरोग्यव्यवस्थेने प्रगती केली आहे. लसीकरण, महिलांचे आरोग्य, बाल आरोग्य तसेच...

सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न करणार – विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे

0
अमरावती, दि. २६: विधान परिषदेचे सभापती पद हे संविधानिक पद आहे. या पदाला समन्वय साधण्याची जबाबदारी आहे. त्यामुळे या समन्वयातूनच येत्या काळात सर्व घटकांना...

महाहौसिंगने परवडणाऱ्या घरांच्या निर्मितीचा वेग वाढवावा – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

0
मुंबई दि. २७: महाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडळ म्हणजेच महाहौसिंगने प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुलांच्या बांधकामांना गती देण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत. त्यांना येणाऱ्या अडचणींवर शासनाच्या स्तरावरून...

पनवेल महानगरपालिकेच्या क्रिकेट प्रशिक्षण केंद्रातून गुणवत्ताधारक खेळाडू घडतील – मंत्री ॲड. आशिष शेलार

0
मुंबई, दि. २७ : पनवेल महापालिकेने उभारलेल्या क्रिकेट प्रशिक्षण केंद्राची व्यवस्था उत्तम आहे. या प्रशिक्षण केंद्रासाठी महापालिकेने दिलीप वेंगसरकर यांची अगदी अचूक निवड केली...