सोमवार, एप्रिल 28, 2025
Home Blog Page 971

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाला भेट

पुणे, दि. 24 : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण निगडी येथील शरदनगर आणि दुर्गानगरच्या 670 झोपडीधारक सभासदांच्या पुनर्वसन प्रकल्पाला भेट दिली. प्रकल्पाची माहिती घेत शहराच्या सौंदर्यात आणि वैभवात भर घालणारे काम अधिकाऱ्यांनी करावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

यावेळी पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह, पोलीस आयुक्त विनय चौबे, सुनील नहार आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री.पवार यांनी सदनिकातील सुविधा, सौर ऊर्जेची व्यवस्था, इमारतीची सुरक्षा, देखभाल आणि स्वच्छता, परिसरातील वृक्षारोपण, जलपुनर्भरण आदीविषयी माहिती घेतली. इमारतीच्या परिसरात स्वच्छता राखावी, प्रकल्पातील विविध सेवांसाठी स्थानिकांना संधी द्यावी अशा सूचना त्यांनी केल्या.

श्री.पवार यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात दोन झोपडी धारकांना सदनिकांचे हस्तांतरण करण्यात आले. इमारतीत चांगल्या सुविधा देण्यात आल्या असून त्या नीटपणे वापराव्यात. घरासोबत इमारतही स्वच्छ व सुंदर राहील असा सर्वांनी प्रयत्न करावा, असे त्यांनी लाभार्थ्यांशी संवाद साधताना सांगितले. मेट्रो सुविधा निगडीपर्यंत आणण्यासाठी प्रयत्नशील असल्याचेही उपमुख्यमंत्री म्हणाले.

महानगरपालिका आयुक्त श्री.सिंह यांनी प्रकल्पाविषयी माहिती दिली.

श्री मोरया गोसावी समाधी मंदिराला भेट

उपमुख्यमंत्री श्री.पवार यांनी श्री मोरया गोसावी समाधी मंदिराला भेट देऊन समाधीचे दर्शन घेतले आणि श्री गणेशाची आरती केली. त्यांनी पिंपरी चिंचवड येथील विविध गणेश मंडळांना भेट देऊन गणपतीचे दर्शन घेतले.

000

जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडून कर्नाटकातील हेबल नाल्याची पाहणी

सोलापूर, दि.२३ (जिमाका): यावर्षी पाऊस कमी झाल्याने व सोलापूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या औज व चिंचपूर येथील पाणीसाठा काही दिवस पुरेल एवढाच असल्याने कर्नाटक राज्यातील अलमट्टी धरणातून सोलापूर शहराला पाणीपुरवठा व्हावा, याबाबत दिनांक ७ सप्टेंबर २०२३ रोजीच्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत समिती सदस्यांनी पालकमंत्री यांच्याकडे मागणी केली होती.

त्या अनुषंगाने पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जलसंपदा विभागाने त्वरित प्रस्ताव सादर करावा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व कर्नाटकचे मुख्यमंत्री यांच्यात सोलापूर शहराला अलमट्टी धरणातून पाणी सोडण्याबाबत चर्चा होईल. तत्पूर्वी जिल्हाधिकारी व जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी अलमट्टी धरणातून सोलापूर शहराला कशा पद्धतीने पाणीपुरवठा करता येईल याबाबत पाहणी करावी असे सूचित केले होते.

त्यानुसार जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता धीरज साळे व कर्नाटकच्या इंडी ब्रांच कॅनॉलचे उपअभियंता हिरोळे यांच्या समवेत औज नदीपासून १२ किलोमीटर असलेल्या कर्नाटकमधील हेबल नाल्याची प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी विजयपूरच्या जिल्हाधिकारी यांच्या समवेत काल फोनद्वारे चर्चा केली होती. पाहणीसाठी विजयपूर जलसंपदा विभागाचे अधिकारी त्यांनी पाठवून दिलेले होते.

कर्नाटकमधील अलमट्टी धरणाच्या इंडी  कॅनॉलची नाल्याची लांबी 160 किलोमीटर आहे. सोलापूर शहराला पाणीपुरवठा होणाऱ्या औज नदीपासून बारा किलोमीटर अंतरावर कर्नाटक मधील हेबल नाल्यापर्यंत अलमट्टी धरणाचे पाणी येते. या नाल्याची पाणी वाहून नेण्याची क्षमता 50 क्युसेक पर्यंत आहे. परंतु पूर्ण क्षमतेने या नाल्यातून पाणी सोडल्यास ते नाल्याच्या बाहेर जाऊन शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जाऊ शकते. त्यामुळे किमान 25 ते 30 क्यूसेक पाणी औज पर्यंत येऊ शकते, अशी माहिती इंडी ब्रांच कॅनॉलचे उपअभियंता हिरोळे यांनी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना दिली.

जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी संपूर्ण हेबल नाल्याची पाहणी केली. तसेच हेबल नाल्यामध्ये काही ठिकाणी झाडेझुडपे व वृक्ष मोठ्या प्रमाणावर वाढल्याचे दिसून आले.

यावेळी उपजिल्हाधिकारी विठ्ठल उदमले, सोलापूर जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता धीरज साळे, उप अभियंता कोकरे, सेवानिवृत्त अभियंता पी. एस. केसकर, विजयपूर संपदा विभागाचे उपअभियंता शिरोळे कनिष्ठ अभियंता काटे उपस्थित होते.

अलमट्टी धरणातून सोलापूर शहराला पाणी सोडण्याच्या अनुषंगाने आज झालेली संयुक्त पाहणी ही प्राथमिक आहे. सद्यस्थितीत आजच्या पाहणीच्या अनुषंगाने राज्य शासनाला अहवाल सादर करण्यात येणार आहे. तो अहवाल सादर झाल्यानंतर दोन्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांमध्ये या अनुषंगाने चर्चा होऊन निर्णय घेतला जाणे अपेक्षित आहे.

०००

पुरापासून कायमस्वरूपी संरक्षण योजनेसाठी राज्य शासन निधी देणार – उपमुख्यमंत्री

नुकसान झालेल्या दुकानदारांना ५० हजार तर क्षतीग्रस्त घरांना १० हजार सानुग्रह अनुदान

 नागपूर दि.२३ : शनिवारी रात्री झालेल्या ढगफुटीसदृश मुसळधार पावसामुळे नागपुरात उद्भवलेली पूर परिस्थिती अघटित असली तरी अशी घटना पुन्हा होऊ नये यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात येईल. ज्यांच्या घरामध्ये पाणी शिरले त्या कुटुंबाला १० हजार रुपये प्रत्येकी तर दुकानाचे नुकसान झालेल्यांना ५० हजार रुपये प्रत्येकी सानुग्रह अनुदान देण्यात येईल, अशी माहिती आज आढावा बैठकीनंतर देण्यात आली.

शनिवारी रात्री २ ते पहाटे ५ वाजेपर्यंत नागपूर शहरात विजांच्या कडकडाटासह ढगफुटीसदृश पाऊस झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले. त्यामुळे सकल भागात पावसाचे पाणी शिरले. यामुळे सुमारे दहा हजार घरांना नुकसान पोहोचले आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महानगरपालिकेमध्ये आज संपूर्ण पूर परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. बैठकीनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांना ही माहिती दिली.

पत्रकारांशी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज झालेली घटना ही २५-३० वर्षात होणारा एखादा अघटीत घटनाक्रम आहे. अचानक झालेल्या ढगफुटीसदृश मुसळधार पावसामुळे उद्भवलेल्या स्थितीत तीन नागरिक मृत्युमुखी पडले असून १४ जनावर दगावले आहेत. सर्व घटनाक्रमांचा पंचनामा सुरू करण्यात आला आहे. एनडीआरएफ, एसडीआरएफ, लष्कर आणि स्थानिक प्रशासनाच्या मदतीने अवघ्या तीन तासांमध्ये दुपारपर्यंत परिस्थिती पूर्वपदावर आणली. अतिशय उत्तम प्रकारे प्रशासनाने बचाव कार्य केल्याचे त्यांनी सांगितले.

नागपूर शहरातील ज्या घरांमध्ये पाणी शिरले त्या घराची साफसफाई करण्याची जबाबदारी महानगरपालिकेने घेतली आहे. उद्यापर्यंत हे काम पूर्ण करण्यात येईल. कोणत्याही घरामध्ये गाळ साचणार नाही. निवारा केंद्रामध्ये असणाऱ्या नागरिकांच्या खानपानाची व्यवस्था करण्यात आली आहे. पूर्णतः क्षतीग्रस्त अशा प्रत्येक कुटुंबाला, घराला प्रत्येकी १० हजार रुपये सानुग्रह अनुदान, पूर्णत: नुकसान झालेल्या दुकानदारांना ५० हजार अनुदान तर पक्क्या दुकानाशिवाय ज्यांच्या हातगाडीचे, रस्त्यावरील ठेल्याचे नुकसान झाले आहे.त्यांनाही १० हजाराची मदत करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

अंबाझरी तलावाच्या मजबुतीसाठी कायमस्वरूपी संरक्षण भिंत, काही नवीन पुलांचे बांधकाम करण्याची सूचना महानगरपालिकेला करण्यात आली आहे. संपूर्ण बंधाऱ्याचे मजबुतीकरण करताना पाटबंधारे विभाग या कामांमध्ये एजन्सीचे काम करेल, राज्य सरकार यासाठी निधी उपलब्ध करून देईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

आज अनेक ठिकाणची वीज बंद करण्यात आली होती, बहुतेक ठिकाणी पुन्हा सुरु करण्यात आली आहे. 14 ट्रान्सफॉर्मर अजून सुरु केलेले नाहीत. मात्र हा निर्णय सुरक्षिततेच्या कारणाने घेण्यात आलेला आहे.  कुठलाही अनर्थ होऊ नये, म्हणून वीज बंद आहे. त्यामुळे नागरिकांनी सहकार्य करावे. सकाळपर्यंत वीज पुरवठा सुरु करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. पावसाची दाट शक्यता आहे. प्रशासन उद्याच्या प्रतिबंधात्मक तयारीसाठी सज्ज आहे. त्यामुळे उद्या जर पाऊस असेल तर गरज नसताना नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.उद्या नुकसान झालेल्या काही ठिकाणी भेट देणार असल्याचेही त्यांनी शेवटी सांगितले.

या पुरामध्ये १४ जनावरे दगावली. पशुपालक योगेश वऱ्हाडकर यांना या बैठकीपूर्वी स्वयंसेवी संस्थेच्यावतीने एक लक्ष रुपयाचा धनादेश श्री. गडकरी व श्री. फडणवीस यांच्या हस्ते देण्यात आला.

या बैठकीला आमदार प्रवीण दटके, कृष्णा खोपडे, विकास कुंभारे, पोलीस आयुक्त अमितेश कुमार,मनपा आयुक्त डॉ. अभीजित चौधरी, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्यासह जिल्हा प्रशासन व महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

०००

राज्यातील आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी शासन कटिबद्ध-उपमुख्यमंत्री अजित पवार

बारामती, दि. २३  : सर्वसामान्य नागरिकांना आरोग्यविषयक सोयी सुविधा वेळेत आणि माफक दरात मिळाव्यात यासाठी राज्यातील आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील बाह्य रुग्ण कक्षाच्या (अपघात विभाग) उद्घाटनप्रसंगी  ते बोलत होते. यावेळी  उप विभागीय अधिकारी वैभव नावडकर, अपर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे, महावितरणचे मुख्य अभियंता सुनिल पावडे, तहसीलदार गणेश शिंदे, उप विभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे, महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत म्हस्के, उप अधिष्ठाता, डॉ.अंजली शेटे, वैद्यकीय अधीक्षक डॉ.आमोल शिंदे, प्रशासकीय अधिकारी नंदकुमार कोकरे,  डॉ. संतोष भोसले आदी उपस्थित होते.

 

उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले की, सर्वसामान्य नागरिकांना महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मूत्रपिंड प्रत्यारोपण व इतर गंभीर उपचार व शस्त्रक्रियांसाठी लाभार्थी कुटुंबाला प्रतिवर्षी रुपये ५ लाखांपर्यंत विमा संरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचबरोबर इतर वैद्यकीय योजनाही राबविल्या जात आहेत. रुग्णालयातील आरोग्य विषयक सोयी सुविधांसाठी निधीची कमतरता कमी पडू देणार नाही. बाह्य रुग्ण कक्षाच्या माध्यमातून रुग्णांना उत्तमातील उत्तम सेवा देवून चांगले कार्य घडावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

 

बारामतीतील शासकीय रुग्णालयात सर्वसामान्य नागरिकांना वेळेत सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्यात.  रुग्णाला उपचारासाठी पुण्यामध्ये पाठवण्यापूर्वी वरिष्ठांनी  उपलब्ध सुविधांची खातरजमा करावी. रुग्णालयात दर्शनी भागात इलेक्ट्रॉनिक फलक बसवावेत. डॉक्टर, विद्यार्थी, परिचारिका व इतर कर्मचारी यांना ओळखपत्र   बंधनकारक करावे. रुग्णालयात हजेरीसाठी बायोमेट्रिक उपकरणे वापरावी. दर महिन्याला बायोमेट्रिक हजेरीचा आढावा घेण्यात यावा. १०८ क्रमांक रुग्णवाहिकेची माहिती नागरिकांना होणे गरजेचे आहे. रुग्णालयातील एखादे महत्वाचे पद रिक्त झाल्यास तातडीची गरज म्हणून पर्यायी व्यवस्था करण्यात यावी, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

उल्लेखनीय कार्य करणारे मेंदू विकार तज्ज्ञ डॉ. संजय व्होरा, कर्करोग तज्ज्ञ डॉ.चकोर व्होरा, अतिदक्षता विभाग तज्ज्ञ डॉ. प्रसाद सुर्यवंशी,  डॉ. ठाकूर  डॉ.संतोष भोसले यांचा उपमुख्यमंत्री श्री.  पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

बाह्य रुग्ण विभागांमध्ये अतिदक्षता विभाग, ६ खाटाचं अतिदक्षता विभाग, सुसज्ज असे २ वॉर्ड  पुरुष व महिलासाठी तयार करण्यात आले आहेत.

विविध विकासकामांची पाहणी

 

उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी कन्हेरी वन उद्यानातील तलाव, जळोची स्मशानभूमी जवळील ओढ्याचे खोलीकरण, बारामती नगरपरिषदेच्या इमारतीचे बांधकाम, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम जवळील वसंतराव पवार नाट्यगृह व शॉपिंग कॉम्प्लेक्स च्या इमारतीचे बांधकाम, बारामती नवीन बस स्थानकातील सुशोभीकरण आणि लँडस्केपच्या कामांची पाहणी केली.  विकासकामे आकर्षक, दर्जेदार व टिकाऊ असावीत आणि वेळेत पूर्ण होईल याकडे लक्ष द्यावे, अशा सूचना त्यांनी दिल्या.

यावेळी गट विकास अधिकारी डॉ. अनिल बागल,  पूर्व विभागाचे कार्यकारी अभियंता अनिल ढेपे, मुख्याधिकारी महेश रोकडे, बारामती सहकारी बँकेचे अध्यक्ष सचिन सातव, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक संभाजी होळकर आदी उपस्थित होते.

०००

सहकार चळवळीचे भविष्य उज्ज्वल – केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह

मुंबई, दि. २३: सहकार चळवळीने कालानुरुप स्वत:ला बदलणे आवश्यक आहे. देशात रोजगारनिर्मिती सोबतच आर्थिक विकास वाढविण्याची ताकद सहकार क्षेत्रात आहे. केंद्र सरकारही सहकार विद्यापीठाची स्थापना करुन त्या माध्यमातून बॅंक, दुग्धव्यवसाय, कृषी, विपणन क्षेत्रासाठी प्रशिक्षित मनुष्यबळ निर्माण करणार आहे. ग्रामीण भागातील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांचे बळकटीकरण करण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे. त्यामुळे सहकार चळवळ ही कालबाह्य होणार नसून या चळवळीचे भविष्य उज्ज्वल आहे, असे प्रतिपादन केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांनी केले.

मुंबई विद्यापीठ आणि सहकार भारती यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी विद्यापीठाच्या फोर्ट येथील कावसजी जहागीर दीक्षांत सभागृहात लक्ष्मणराव इनामदार यांच्या स्मृतीनिमित्त आयोजित व्याख्यानमालेत मंत्री श्री. शाह बोलत होते. यावेळी राज्यपाल तथा विद्यापीठांचे कुलपती रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. रवींद्र कुलकर्णी, सहकार भारतीचे अध्यक्ष दीनानाथ ठाकूर, राष्ट्रीय महामंत्री उदय जोशी आदी उपस्थित होते.

यावेळी केंद्रीय मंत्री श्री. शहा म्हणाले की, सहकार चळवळ देशासाठी उपयुक्त आहे. देशासाठी अधिक उत्पादन जेवढे गरजेचे आहे,  तेवढेच अधिकाधिक लोकांना रोजगाराची उपलब्धता करुन देणे गरजेचे आहे. सहकार चळवळ ही बाब पूर्ण करु शकते. खऱ्या अर्थाने व्यक्ती हिताचा विचार करणारे हे सहकाराचे मॉडेल असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नवे खाते निर्माण करून सहकार चळवळीत चैतन्य आणले. २०१४ पूर्वी देशातील ६० कोटी लोक बँक व्यवहाराच्या बाहेर होते. त्यांना या परिप्रेक्ष्यात आणले. त्यांना घर, गॅस, वीज, अन्न उपलब्ध करून दिले. आरोग्याच्या सोयी उपलब्ध करून दिल्या. हे लोक आता आर्थिक विकासात भागीदार होऊ इच्छितात. त्यांना आता सहकार चळवळीच्या माध्यमातून देश विकासाशी जोडले जात आहे, असे केंद्रीय मंत्री श्री. शाह यांनी सांगितले.

ग्रामीण विकासाला महत्व देऊन शहरीकरणाकडे वाढणारा ओढा गावातच सुविधा उपलब्ध करुन देत थांबवण्याचा प्रयत्न आता आपण करत आहोत. देशात ३ लाखांहून अधिक विकास सहकारी सेवा संस्था आहेत. आता केवळ एका कामापुरता त्यांचा उपयोग न करता या संस्थांचे संगणकीकरण आणि बळकटीकरण करुन त्यांना नागरी सेवा केंद्राप्रमाणे बहुपयोगी करण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे. ग्रामीण भागाला सहकाराच्या माध्यमातून समृद्ध करण्याच्या प्रयत्नांसोबतच केंद्र सरकारने नागरी सहकारी बॅंकानाही आता नवीन शाखा, बँक मित्र, मायक्रो एटीएम, कर्ज सुविधा दुप्पट आदी सुविधा देण्यास परवानगी दिली आहे. याशिवाय, नागरी बॅंकाना इतर राष्ट्रीयीकृत बॅंकांप्रमाणेच सेटलमेंट करण्याचा अधिकार दिला असल्याचेही त्यांनी सांगितले.

यावेळी श्री. शाह यांनी सहकार चळवळीचाही आढावा घेतला. सहकार चळवळीने १९०४ पासून वेग धरला. स्वातंत्र्यानंतर सहकार चळवळीने सगळ्यांच्या हिताचा विचार करून चळवळ पुढे नेली. महाराष्ट्रात विठ्ठलराव विखे पाटील, धनंजयराव गाडगीळ, वैकुंठभाई मेहता यांनी ही चळवळ सुरु केली. गुजरातमध्ये श्वेतक्रांतीच्या माध्यमातून आमुलाग्र बदल झाले. राज्याच्या विकासात सहकार चळवळीचा मोठा वाटा असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी त्यांनी सहकार चळवळीचे मार्गदर्शक लक्ष्मणराव इनामदार यांच्याविषयी गौरवोद्गार काढले. महाराष्ट्र ही जन्मभूमी आणि गुजरात कर्मभूमी असलेल्या लक्ष्मणराव इनामदार यांचे नाव आजही गुजरातमधील प्रत्येक गावामध्ये आदराने घेतले जाते. त्यांचा आदर्श ठेवून अनेक कार्यकर्ते तेथे काम करत आहेत.  कोणत्याही सहकारी संस्थेचे पदाधिकारी नसताना त्यांनी केलेले काम अनेकांना मार्गदर्शक असे होते, असे श्री. शाह यांनी सांगितले.

सहकारातूनच सर्वसामान्यांचा विकास शक्य – राज्यपाल रमेश बैस

राज्यपाल श्री. बैस म्हणाले की, लक्ष्मणराव इनामदार सहकार क्षेत्राचे आधारस्तंभ आणि मार्गदर्शक होते. समाजात आमुलाग्र बदल घडविण्यासाठी आवश्यक बदल सहकार क्षेत्राच्या माध्यमातून घडू शकतील, असा त्यांचा विश्वास होता. कृषी आणि श्वेत क्रांती सहकाराच्या माध्यमातून शक्य झाली आहे. शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या विकासाचा मार्ग सहकाराच्या माध्यमातूनच जातो. साखर कारखानदारी, दूध व्यवसायाबारोबरच वेगवेगळ्या क्षेत्रात सहकाराच्या माध्यमातून प्रगती होत आहे. सहकारातून राज्यात महाबळेश्वरजवळ उभ्या राहिलेल्या मधाच्या गावाचीही माहिती राज्यपाल श्री. बैस यांनी यावेळी दिली. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत  महोत्सवी वर्षात सहकार क्षेत्रातील बदल शेवटच्या घटकाच्या जीवनात मैलाचा दगड ठरेल, असेही त्यांनी सांगितले.

सहकार चळवळीला व्यापक स्वरुप लक्ष्मणराव इनामदारांनी दिले –मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

       मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, महाराष्ट्र आणि गुजरातमधील समान धागा म्हणजे सहकार चळवळ होय. त्यामुळे लक्ष्मणराव इनामदार हे या दोन्ही राज्यातील संवादाचा सेतू होते. त्यांनी सहकार चळवळीला व्यापक स्वरूप प्राप्त करून दिले. सहकार क्षेत्रातील लक्ष्मणराव इनामदार यांचे कार्य अनुकरणीय आहे. त्यांच्या कार्याची आठवण म्हणून जिहे कठापूर पाणीपुरवठा योजनेला त्यांचे नाव देण्यात आले आहे. सहकार चळवळीचा सर्वसामान्य नागरिकांना लाभ होण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले, असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला कुलगुरु प्रा. कुलकर्णी यांनी मान्यवरांचे स्वागत केले.

 

०००

कथक नृत्यातून गणेश आणि शिवस्तुतीचे सादरीकरण

पुणे दि.२३: लोकशाहीर अण्णा भाऊ साठे स्मृती सभागृहात सुरू असलेल्या प्रादेशिक संस्कृती महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी  बडोदा येथील महाराजा सयाजीराव विद्यापीठाच्या कला शाखेच्या पथकाने केलेल्या कथक नृत्याच्या सादरीकरणाने वातावरण भक्तिमय केले. रविवारी प्रसिद्ध गायिका साधना सरगम यांच्या मैफिलीने महोत्सवाचा समारोप होणार आहे.

डॉ. दीप्ती गुप्ता यांनी शिवस्तुती तर ध्रुवी मोटानी, अमिषा तिवारी, पल्लवी रॅम्बर्न या कलाकारांनी गणेशस्तुती सादर केली.  यानंतर नगमा व पधंत, चतुरंग व तराणाचे सादरीकरण झाले.  बद्रिया कारी यांनी सादर केलेल्या सावन उत्सवसादरीकरणाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

आशा भोसले यांच्या सन्मानार्थ मधुरा दातार यांची मैफल

सुप्रसिद्ध पार्श्वगायिका मधुरा दातार यांनी आशा भोसले यांच्या सन्मानार्थ त्यांनी गायलेली गाणी सादर केली. आशाताईंना सप्टेंबरमध्ये ९० वर्षे पूर्ण झाली आहेत.  त्या अनेक वर्षांपासून संगीत साधना करत आहे. त्यांच्या सन्मानार्थ हा छोटासा प्रयत्न असल्याचे दातार म्हणाल्या.मधुरा दातार यांनी आशा भोसले यांनी गायलेली हिंदी आणि मराठी गीते सादर केली. या गीतांना रसिकांनी भरभरून दाद दिली.

लोककलाकारांचे विविधरंगी सादरीकरण

देशाच्या विविध भागातील लोककलाकारांच्या  कलाविष्कारातून देशाच्या विविधरंगी संस्कृतीचे दर्शन घडले. महाराष्ट्राचा सोंगी मुखवटे, धनगरी गजा, कोळी, डांग आणि गुजरातचे सिद्धी धमाल, राजस्थानचे कालबेलिया आणि तेलंगणाचे गुसाडी नृत्याच्या सादरीकरणाच्यावेळी रसिकांनीही ठेका धरला.

रविवारी महोत्सवाचा समारोप

रविवारी प्रादेशिक संस्कृती महोत्सवाचा समारोप होणार आहे, असे पश्चिम विभागीय सांस्कृतिक केंद्राच्या संचालक किरण सोनी गुप्ता यांनी सांगितले. सायंकाळी स्वरसंगम संस्कृती मंच नागपूरतर्फे भरतनाट्यम नृत्याचे सादरीकरण होणार आहे.  देशातील प्रसिद्ध गायिका साधना सरगम आपली गाणी सादर करणार आहेत.

०००

चिंतामणीनगर रेल्वे उड्डाण पुलाचे काम जलद गतीने करा – पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे

 सांगली, दि. २३ (जिमाका) :  वाहतुकीची होणारी कोंडी आणि लोकहिताचा विचार करून चिंतामणीनगर येथील रेल्वे उड्डाण पुलाचे काम रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी तातडीने सुरू करून हे काम जलद गतीने पूर्ण करण्याची दक्षता घ्यावी. या परिसरातील नागरिकांना वाहतुकीची सोय व्हावी यासाठी रेल्वे उड्डाण पुलाखाली पर्यायी व्यवस्था करावी, असे निर्देश पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी रेल्वे व संबधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.

सांगली – तासगाव रोडवरील चिंतामणीनगर येथील रेल्वे उड्डाणपूल बांधकाम अनुषंगाने मध्यवर्ती प्रशासकीय इमारत येथील पालकमंत्री कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, महापालिका आयुक्त सुनील पवार, मध्य रेल्वेच्या दक्षिण झोनचे मुख्य अभियंता सुरेश पाखरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता क्रांतीकुमार मिरजकर, महापालिका उपायुक्त राहुल रोकडे उपस्थित होते.

पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी सांगितले की, चिंतामणीनगर व परिसरातील लोकांना रहदारीची सोय व्हावी यासाठी रेल्वे पुलाखाली करण्यात येणाऱ्या पर्यायी रस्त्यासाठी संबंधित यंत्रणेने तातडीने रेल्वे विभागास पत्र द्यावे. रेल्वेनेही यासाठी येणाऱ्या खर्चाचे अंदाजपत्रक यंत्रणेस उपलब्ध करून द्यावे. यासाठी येणाऱ्या खर्चाचे अंदाजपत्रक प्राप्त झाल्यानंतर निधी उपलब्ध करून देण्याबाबत योग्य ती कार्यवाही केली जाईल.

तत्पूर्वी पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी सांगली-तासगाव रोडवरील चिंतामणीनगर येथील रेल्वे उड्डाणपूल बांधकाम परिसराची पाहणी केली.

उड्डाणपूल, परिसरातील नागरिकांसाठी पर्यायी मार्गाबाबत अधिकारी व नगरिकांशी चर्चा केली व या परिसरातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यास प्राधान्य दिले जाईल असे नागरिकांना आश्वासित केले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, महापालिका आयुक्त सुनील पवार, मध्य रेल्वेच्या दक्षिण झोनचे मुख्य अभियंता सुरेश पाखरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता क्रंतीकुमार. मिरजकर, महापालिका उपायुक्त राहुल रोकडे, रेल्वेचे अधिकारी शंभो चौधरी व परिसरातील नागरिक उपस्थित होते.

०००

३५२ कोटींच्या कामांना प्रशासकीय मान्यता

जळगाव,दि.२३ (जिमाका):  जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत यावर्षीच्या सर्वसाधारण, SCP, TSP/OTSP योजनेंतर्गत ६५८ कोटींच्या नियतव्यय पैकी आतापर्यंत तब्बल ३५२ कोटी २१ लाख ९६ हजारांच्या (५०टक्के) कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. कमी कालावधीतच ३५२ कोटींच्या कामांना प्रशासकीय मान्यता देणारा जळगाव जिल्हा राज्यात एकमेव ठरला आहे. या सर्व शंभर टक्के कामांच्या तांत्रिक मान्यता घेण्यात आल्या आहेत. जिल्हा प्रशासनाच्या सांघिक कामकाजाचे पालकमंत्री गुलाबराव पाटील व ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांनी कौतुक केले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्ह्यातील जिल्हा वार्षिक योजनांच्या कामकाजाबाबत आज आढावा घेण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी व जिल्हा परिषद अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी मान्यता दिलेल्या प्रशासकीय मान्यतांचे पालकमंत्री गुलाबराव पाटील व ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. यामध्ये जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण मध्ये २२५ कोटी ४३ लाख २९ हजार रूपये, अनुसूचित जाती उपयोजना ७८ कोटी ४१ लाख, आदिवासी उपयोजनामध्ये (टीएसपी/ओटीएसपी) ४८ कोटी ३७ लाख ६७ हजार रूपयांच्या प्रशासकीय देण्यात आल्या आहेत.

पालकमंत्र्यांचे विभाग प्रमुखांना निर्देश

यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी निर्देश दिले की, विभाग प्रमुखांनी मागील वर्षाच्या स्पील वगळून नवीन कामांना सात दिवसांच्या आत प्रशासकीय मान्यता द्यावी. ज्या विभागांची तांत्रिक मान्यता किंवा इतर कोणत्याही मान्यता वरिष्ठ कार्यालयास प्रलंबित असल्यास व्यक्तीशा: पाठपुरावा करावा . सदर बाब जिल्हाधिकारी यांच्या निदर्शनास आणून देण्यात यावी. कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठात बहिणाबाई चौधरी यांचा पुतळा बसण्याबाबत शासन स्तरावर विशेष बाब म्हणून मान्यता देण्यात आलेली आहे. सदर कामांचे अंदाजपत्रके तयार करून आवश्यक सर्व परवानगी यांसह तातडीने जिल्हा नियोजन समिती कार्यालयात सादर करावे. जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत २०२२-२३ मध्ये मंजूर झालेल्या निधीबाबत काही विभागांचे कार्यारंभ आदेश देणे प्रलंबित आहे. तरी सदर निधी कार्यारंभ आदेश देऊन डिसेंबर २०२३ पूर्वी खर्च करावा. जिल्हा नियोजन समितीच्या अखर्चित कामांचे दायित्व जिल्हा नियोजन समितीवर येणार नाही. याची दक्षता घ्यावी. जिल्हा नियोजन समिती सभागृहाच्या स्थापत्य विषयक मंजुरी मिळालेल्या कामास तात्काळ सुरुवात करण्यात यावी. अशा सूचना ही पालकमंत्र्यांनी यावेळी दिल्या.

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले की, आतापर्यंत प्रशासकीय मान्यता दिलेल्या शंभर टक्के कामांच्या तांत्रिक मान्यता घेण्यात आल्या आहेत. उर्वरित कामांच्या शासन स्तरावरील वरिष्ठ कार्यालयाकडे तांत्रिक मान्यता प्रलंबित असल्याने प्रशासकीय मान्यता बाकी आहेत. या कामांच्या मूल्यमापनासाठी स्वतंत्र तरतूद करण्यात आली आहे. ५० लाखांपेक्षा जास्त रकमेच्या कामाचे त्रयस्थ पक्षामार्फत लेखापरीक्षण केले जाणार आहे.

खेडी येथे प्रस्तावित वारकरी भवनच्या आराखड्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी सादरीकरण केले. या बैठकीला जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, जळगाव उप वनसंरक्षक प्रविण ए, अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, निवासी उपजिल्हाधिकारी सोपान कासार, मनपा आयुक्त डॉ. विद्या गायकवाड, जिल्हा नियोजन अधिकारी विजय शिंदे, समाजकल्याण सहायक आयुक्त योगेश पाटील, यावल आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी अरूण पवार तसेच विविध विभागांचे विभागप्रमुख उपस्थित होते.

क्रीडा संकुलाची संयुक्त पाहणी

बैठकीनंतर पालकमंत्री गुलाबराव पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांनी जिल्हा क्रीडा संकुलाची संयुक्त पाहणी केली. जिल्हा क्रीडा संकुलात सध्या उपलब्ध सुविधा व भविष्यात उपलब्ध करून देण्यायोग्य सुविधांचा धावता आढावा घेतला. जिल्हा क्रीडा संकुलाच्या बळकटीकरणाच्या दृष्टीने त्यांनी सूचना केल्या. याप्रसंगी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, जिल्हा क्रीडा अधिकारी रविंद्र नाईक उपस्थित होते.

०००

नागपुरात ४ तास ढगफुटीसदृश पाऊस ; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे परिस्थितीवर लक्ष

 मनपा आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्या भेटी : ४०० जणांना सुरक्षित स्थळी पोहचविले, दुपारपर्यंत परिस्थिती पूर्व पदावर

नागपूर,दि.२३ :  शनिवारी रात्री २ ते पहाटे ५ दरम्यान शहरात विजांच्या कडकडाटासह ढगफुटीसदृश पाऊस झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले. त्यामुळे सकल भागात पावसाचे पाणी शिरले. उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाच्या सतर्कतेने एनडीआरएफ, एसडीआरएफ, लष्कर आणि स्थानिक प्रशासनाच्या मदतीने दुपारपर्यंत परिस्थिती पूर्वपदावर आली.  विविध ठिकाणी बचावकार्याद्वारे ४०० नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. या घटनाक्रमात दोन महिलांचा दुर्देवी मृत्यू झाला असून १४ जनावरे दगावली आहेत.

शनिवारी रात्री २ वा. अचानक मुसळधार पाऊस सुरु झाला, ४ तासात १०९ मि.मी. पाऊस कोसळला. यातील पहिल्या २ तासांमध्ये ९० मि.मी.पाऊस झाला. परिणामी शहरातील अंबाझरी तलावातील पाणीओव्हर फ्लो होवून नागनदीत प्रचंड प्रवाहाने शिरले. यामुळे नदीकाठावरील घरांमध्ये पाणी घुसले. अंबाझरी आणि वर्मा ले आऊट तसेच शंकरनगर भागात मोठ्या प्रमाणात पाणी मानवी वस्तीमध्ये शिरले.

या परिस्थितीचा सामना करण्याकरिता उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांच्या मार्गदर्शनात प्रशासनाने पावले उचलली. शहरात तत्काळ राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे (एनडीआरएफ) आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे (एसडीआरएफ) आणि लष्कराचे प्रत्येकी दोन दल दाखल झाले व बचावकार्य सुरु झाले. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी नागपुरसह जिल्ह्यातील शाळा महाविद्यालयांना सुटी जाहीर केली. बचाव कार्यादरम्यान शंकरनगर भागातील मूक व कर्णबधिर शाळेच्या तसेच एलईडी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना सुखरुप बाहेर काढण्यात आले. यासोबतच  शहराच्या सकल भागात पावसाचे पाणी साचल्याने अडकून पडलेल्या नागरिकांनाही बाहेर काढण्यात आले. ४०० नागरिकांना सुरक्षितरित्या बाहेर काढून प्रशासनाने तयार केलेल्या निवारा केंद्रात त्यांना पाठविण्यात आले.

या सर्व घटनाक्रमात घरात पावसाचे पाणी शिरल्याने महेशनगर परिसरातील मिराबाई पिल्ले (७० वर्षे) आणि तेलंगखडी परिसरातील सुरेंन्द्रगड येथील संध्या डोरे (८० वर्षे) यांचा  मृत्यू झाला.

दरम्यान, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर आणि मनपा आयुक्त डॉ.अभिजीत चौधरी यांनी पहाटे ५ पासून प्रत्यक्ष घटनास्थळाला भेटी देऊन बचाव कार्याचे नियंत्रण केले. आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनीही महानगर पालिका कार्यालयातील वार रुममधून परिस्थितीचा आढावा घतला.  शहरातील विविध भागांना भेटी देत परिस्थितीचा आढावा घेतला. हजारीपहाड (सह्याद्री) भागात या उभय अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष घटनास्थळाला भेट दिली. या भागात गोठ्यात बांधलेली चौदा जनावरे (सहा म्हशी, सहा गायी आणि दोन वासरे) मृत झाली आहेत.  हजारी पहाड नाल्यातील पाणी गोठ्यात शिरल्याने ही दुर्दैवी घटना घडली. गोठ्याचे व जनावरांचे मालक योगेश वऱ्हाडकर, राजेश वऱ्हाडकर आणि मृणाल घोघल यांचे जिल्हाधिकारी आणि मनपा आयुक्तांनी सांत्वन केले. तसेच, प्रशासनाला या घटनेचा तत्काळ पंचनामा करण्याचे व आर्थिक मदत देण्याचे निर्देश दिले.

नंदनवन परिसरतील स्वातंत्र्य गल्ली क्र.४ व ६  झोपडपट्टी भागासही  जिल्हाधिकारी आणि मनपा आयुक्त यांनी प्रत्यक्ष  भेट दिली. यावेळी आमदार अभिजित वंजारी उपस्थित होते. याभागातील घरांची पडझड झाली आहे. घरांमध्ये व रस्त्यावर पावसाचे पाणी शिरले आहे. प्रशासनाच्यावतीने कुंभारपुरा जुना बगडगंज येथील नागरिकांना घरातून सुरक्षित जागी जाण्याचे आवाहन करण्यात आले असून, धोकादायक घरातील नागरिकांना घरातून सुरक्षित जागी हलविण्यात आले आहे. निवारा केंद्र सुरु करण्यात आले आहे. सक्करदरा गार्डन, मोरभवन बसस्थानकामध्येही  पावसाचे  पाणी शिरल्याचे  चित्र होते.

दरम्यान, मनपा मुख्यालयातील ‘श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी सिटी ऑपरेशन सेंटर’(सीओसी) ला आज आमदार चंद्रशेखर बावनकुळे, मनपा आयुक्त, जिल्हाधिकारी, नागपूर स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पृथ्वीराज बी.पी., माजी महापौर संदीप जोशी यांनी भेट दिली तथा शहरात सर्वत्र लावण्यात आलेल्या कॅमेऱ्यांच्या माध्यमातून शहरातील परिस्थितीची पाहणी केली. मुसळधार पावसामुळे अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो झाल्याने काही भागात पाणी शिरले आहे. पाणी साचलेल्या भागात कार्यवाही करण्यासाठी आयुक्त डॉ. चौधरी यांनी प्रशासनाला निर्देश दिले.

०००

चंद्रपूर जिल्ह्यातील पिवळा मोझॅकग्रस्त शेतकऱ्यांसाठी पालकमंत्र्यांची मुख्यमंत्र्यांकडे विशेष पॅकेजची विनंती

चंद्रपूर, दि. २३ : चंद्रपूर जिल्ह्यात सोयाबीन पिकावर पिवळा मोझॅक या रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे हातची पिके निसटलेल्या शेतकरी हवालदिल झाले आहेत. चंद्रपुरात प्रथमच हा रोग आढळून आला आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तसेच चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी प्रत्यक्ष पिकांची पाहणी केली. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी एक विशेष पॅकेज चंद्रपूर जिल्ह्यासाठी जाहीर करण्याची विनंती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केली आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील ६७.७६६  हेक्टरवर सोयाबीनची लागवड होते. वरोरा, भद्रावती, चिमुर, राजुरा, कोरपना, गोंडपिपरी, पोंभुर्णा या तालुक्यांमध्ये हे पीक घेतले जाते. या पिकावर ऑगस्टच्या सुमारास पिवळा मोझॅक रोगाचा प्रादुर्भाव झाला. कृषी विभागाने प्रयत्न करून या रोगावर नियंत्रण मिळविण्यासाठी मोहिमही हाती घेतली. परंतु १५ ते १८ सप्टेंबरच्या आसपास अचानक सोयाबीनचे पिक काळवंडले. पावसाचा खंड, वाढलेले उष्णतामान आणि रोगाचा प्रादुर्भाव यामुळे हे घडल्याचे कृषी तज्ज्ञांनी स्पष्ट केले.

चंद्रपूर जिल्ह्यातील ही परिस्थिती कळताच मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी राजुरा तालुक्यातील खामोना, पांढरपौनी, हरदोणा (खु.) येथील शेतशिवरात सोयाबीन पिकावरील रोगामुळे नुकसानग्रस्त भागांचा प्रत्यक्ष पाहणी दौरा केला. त्यावेळी त्यांनाही पिकांवर मळकुज, खोडकुज व रायझोक्टोनिया एरीयल ब्लॉईट या रोगांचा प्रादुर्भाव आढळला. या रोगामुळे दोनच दिवसात सोयाबीनचे पीक पिवळे पडले होते. या पाहणीच्या वेळी जिल्हा कृषी अधिकारी शंकर तोटावार,  देवराव भोंगळे, सुदर्शन निमकर, सुनिल उरकुडे, अजय राठोड, अरुण मस्की, हरीदास झाडे, वामन तुरानकर, दिलीप गिरसावळे, कृषी सहाय्यक डांगे हे उपस्थित होते.

यामुळे चिंताग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांसाठी त्यांनी तातडीने यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्राद्वारे नुकसाभरपाईची मिळण्यासाठी विनंती केली. कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनाही पत्र पाठविले. मृदा संतुलनात मोठा बिघाड निर्माण झाला आहे. हे संतुलन पुन्हा निर्माण करण्याचे मोठे आव्हान यंत्रणेपुढे आहे. सोयाबीनवर तीन प्रकारचे रोग सध्या आहेत. यासंदर्भात डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या संशोधकांना बोलावून या रोगांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यात येणार असल्याचे यावेळी मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले. पीक नुकसानीसंदर्भात आपण जिल्हाधिकाऱ्यांनाही सूचना केल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

हरभरा पिकाचेही गारपिटीमुळे नुकसान झाले होते. याशिवाय ५० हजार रुपये नियमित कर्ज भरणाऱ्यांपैकी काहींच्या खात्यात तांत्रिक कारणाने रक्कम जमा झाली नव्हती, ती रक्कम जमा करण्याबाबतही श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री व कृषी मंत्री यांचे लक्ष वेधले.

०००

ताज्या बातम्या

दशकपूर्ती महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमाची!

0
राज्यातील नागरिकांना पारदर्शक, गतिमान व कालबद्ध पद्धतीने लोकसेवा देता याव्या यासाठी शासनाने 'महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, 2015' लागू केला आहे. यामुळे शासकीय आणि निमशासकीय...

देशाची आरोग्य व्यवस्था जगात सर्वात सक्षम आणि मोठी – केंद्रीय आरोग्य मंत्री जे.पी.नड्डा

0
छत्रपती संभाजीनगर, दि. २७ (जिमाका): जगात आपल्या देशाची आरोग्य व्यवस्था सर्वात मोठी असून या आरोग्यव्यवस्थेने प्रगती केली आहे. लसीकरण, महिलांचे आरोग्य, बाल आरोग्य तसेच...

सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न करणार – विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे

0
अमरावती, दि. २६: विधान परिषदेचे सभापती पद हे संविधानिक पद आहे. या पदाला समन्वय साधण्याची जबाबदारी आहे. त्यामुळे या समन्वयातूनच येत्या काळात सर्व घटकांना...

महाहौसिंगने परवडणाऱ्या घरांच्या निर्मितीचा वेग वाढवावा – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

0
मुंबई दि. २७: महाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडळ म्हणजेच महाहौसिंगने प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुलांच्या बांधकामांना गती देण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत. त्यांना येणाऱ्या अडचणींवर शासनाच्या स्तरावरून...

पनवेल महानगरपालिकेच्या क्रिकेट प्रशिक्षण केंद्रातून गुणवत्ताधारक खेळाडू घडतील – मंत्री ॲड. आशिष शेलार

0
मुंबई, दि. २७ : पनवेल महापालिकेने उभारलेल्या क्रिकेट प्रशिक्षण केंद्राची व्यवस्था उत्तम आहे. या प्रशिक्षण केंद्रासाठी महापालिकेने दिलीप वेंगसरकर यांची अगदी अचूक निवड केली...