बुधवार, मे 21, 2025
Home Blog Page 982

राज्याचा ऊस गाळप हंगाम १ नोव्हेंबरपासून करण्यास मुख्यमंत्र्यांची मान्यता

यंदा ८९ लाख मेट्रिक टन साखर उत्पादनाचा अंदाज

मुंबई, दि. १९: राज्याचा यंदाचा ऊस गाळप हंगाम दिनांक १ नोव्हेंबरपासून सुरू करण्याची मान्यता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मंत्रालयात झालेल्या बैठकीत दिली. यंदा १४.०७ लाख हेक्टर क्षेत्र एकूण ऊस क्षेत्र गाळपासाठी उपलब्ध होणार असून ८८.५८ लाख मेट्रिक टन साखर उत्पादनाचा अंदाज आहे. यावर्षी उसाचे क्षेत्र गेल्या वर्षीच्या तुलनेत ६ टक्क्यांनी कमी झाले आहे. निर्धारित केलेल्या दिनांकापूर्वी साखर कारखान्यांचे गाळप सुरू होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

मंत्रालयातील मंत्रिमंडळ सभागृहात ऊस गाळप हंगामासाठीची मंत्री समितीची बैठक मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील, आमदार प्रकाश सोळंके, माजी आमदार हर्षवर्धन पाटील, प्रकाश आवाडे आदी सदस्यांसह मुख्य सचिव मनोज सौनिक उपस्थित होते. साखर आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी सादरीकरण केले.

गेल्या वर्षी राज्यात २११ साखर कारखान्यांनी गाळप घेतले असून १०५ लाख मेट्रिक टन साखरेचे उत्पादन झाले आहे. यंदा मात्र उसाचे क्षेत्र घटल्याने साखर उत्पादन ८८.५८ लाख मेट्रिक टन एवढे होण्याचा अंदाज यावेळी वर्तविण्यात आला. हंगाम २०२२-२३ मध्ये साकार उत्पादनात महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर असून त्यापाठोपाठ उत्तर प्रदेश राज्याचा क्रमांक आहे.

ऊस तोड कामगारांसाठी त्यांच्या कुटुंबासाठी, मुला-मुलींच्या शिक्षणासाठी तसेच विविध योजनांचा लाभ देण्यासाठी साखर कारखान्यांकडून १० रुपये प्रति टन याप्रमाणे वसुली करून लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊस तोड कामगार कल्याण महामंडळाला ही रक्कम देण्याचे यावेळी निर्णय झाला. या रकमेतून कामगारांच्या मुला-मुलींसाठी शाळा, वसतिगृह त्याचबरोबर कामगार हिताच्या योजना प्रभावीपणे राबवा, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. यावेळी एफआरपीबाबत समग्र माहिती पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.

राष्ट्रीय जल पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे जलशक्ती मंत्रालयाचे आवाहन

नवी दिल्ली 19 :  जलसंपदा, नदी विकास आणि गंगा पुनरुज्जीवन विभाग, जलशक्ती मंत्रालयाने राष्ट्रीय पुरस्कार पोर्टलवर पाचवे राष्ट्रीय जल पुरस्कार, 2023 लाँच केले आहे. या पुरस्कारांसाठीचे सर्व अर्ज https://awards.gov.in/Home/Awardpedia या लिंकवर ऑनलाइन राष्ट्रीय पुरस्कार पोर्टलद्वारे किंवा विभागाच्या संकेतस्थळावर (www.jalshakti-dowr.gov.in) सादर करु शकतात. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 15 डिसेंबर 2023 आहे.

पुरस्कारांसाठी पात्रता :

कोणतेही राज्य, जिल्हा, ग्रामपंचायत, शहरी स्थानिक संस्था, शाळा/कॉलेज, संस्था (शाळा/कॉलेज व्यतिरिक्त), उद्योग, नागरी संस्था, पाणी वापरकर्ता संघटना किंवा जलसंधारण आणि व्यवस्थापन क्षेत्रात अनुकरणीय कार्य करणारी व्यक्ती अर्ज करण्यास पात्र आहे.

ट्रॉफी आणि प्रशस्तीपत्र:

‘सर्वोत्कृष्ट राज्य’ आणि ‘सर्वोत्कृष्ट जिल्हा’ विजेत्यांना ट्रॉफी आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात येईल. उर्वरित श्रेणींमध्ये – ‘सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत’, ‘सर्वोत्कृष्ट शहरी स्थानिक संस्था’, ‘सर्वोत्कृष्ट शाळा/कॉलेज’, ‘सर्वोत्कृष्ट संस्था (शाळा/कॉलेज व्यतिरिक्त)’, ‘सर्वोत्कृष्ट उद्योग’, ‘सर्वोत्कृष्ट नागरी संस्था’, ‘सर्वोत्कृष्ट वॉटर ‘यूजर असोसिएशन’, ‘बेस्ट इंडस्ट्री’, ‘बेस्ट इंडिव्हिज्युअल फॉर एक्सलन्स’ विजेत्यांना रोख बक्षिसे तसेच ट्रॉफी आणि प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित केले जाईल. प्रथम, द्वितीय आणि तृतीय विजेत्यांसाठी अनुक्रमे रु. 2 लाख, रु. 1.5 लाख आणि रु. 1 लाख अशी रोख पारितोषिके आहेत.

निवड प्रक्रिया :

राष्ट्रीय जल पुरस्कारांसाठी प्राप्त झालेल्या सर्व अर्जांची जलसंपदा, नदी विकास आणि गंगा पुनरुज्जीवन मंत्रालयाच्या स्क्रिनिंग समितीद्वारे तपासणी केली जाईल. निवडलेले अर्ज निवृत्त सचिव स्तरावरील अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखालील ज्युरी समितीसमोर ठेवले जातील. त्यानंतर, जलसंपदा, नदी विकास आणि गंगा पुनरुज्जीवन मंत्रालयाच्या संस्थांद्वारे निवडलेल्या अर्जांची छाननी केली जाईल, म्हणजे केंद्रीय जल आयोग (CWC) आणि केंद्रीय भूजल बोर्ड (CGWB). ज्युरी समिती अहवालाच्या आधारे अर्जांचे मूल्यांकन करेल आणि विजेत्यांची शिफारस करेल. समितीच्या शिफारशी केंद्रीय मंत्री (जलशक्ती) यांच्याकडे मंजुरीसाठी सादर केल्या जातील.

‘जल समृद्ध भारत’ या सरकारच्या संकल्पनेची पूर्तता करण्यासाठी देशभरातील राज्ये, जिल्हे, व्यक्ती, संस्था इत्यादींनी केलेल्या अनुकरणीय कार्य आणि प्रयत्नांना मान्यता देण्यासाठी आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी राष्ट्रीय जल पुरस्कार (NWA) ची स्थापना करण्यात आली. पाण्याच्या महत्त्वाविषयी लोकांना जागरुक करणे आणि त्यांना पाणी वापराच्या सर्वोत्तम पद्धती अवलंबण्यास प्रवृत्त करणे हा त्याचा उद्देश आहे. विविध श्रेणीतील पुरस्कार विजेत्यांना प्रशस्तिपत्र, ट्रॉफी आणि रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात येईल.

000000000000000

अमरज्योत कौर अरोरा /वृ.क्र 189, दि.17.10.2023

मागेल त्याला फळबाग, शेततळे योजनेस छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव

मुंबई दि. १९ : कृषी विभागामार्फत मागेल त्याला फळबाग, ठिबक/ तुषार सिंचन, शेततळे शेततळेच्या अस्तरीकरण, शेडनेट, हरितगृह, आधुनिक पेरणी यंत्रे (BBF) आणि कॉटन श्रेडर देणे योजनेस ‘छत्रपती शिवाजी महाराज कृषी योजना’ असे नाव देण्यात येत आहे. याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.

2023 -24  आर्थिक वर्षात मागेल त्याला शेततळे योजनेचा विस्तार करण्यात येऊन मागेल त्याला फळबाग, ठिबक/ तुषार सिंचन, शेततळे शेततळेच्या अस्तरीकरण, शेडनेट, हरितगृह, आधुनिक पेरणी यंत्रे (BBF) आणि कॉटन श्रेडर देण्याबाबत मागेल त्याला शेततळे या योजनेच्या विस्तारित योजनेस मान्यता देण्यात आली आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यभिषेक सोहळ्याच्या ३५० व्या वर्षपूर्ती निमित्त योजनेस नाव देण्यात आले आहे.

0000

दत्तात्रय कोकरे/विसंअ/

८९ दर्जेदार मराठी चित्रपटांना मिळणार आर्थिक अनुदान

मुंबई दि. १९ : दर्जेदार मराठी चित्रपट निर्मितीस अर्थसहाय्य अनुदान योजनेंतर्गत तब्बल ८९ मराठी चित्रपटांना धनादेश वितरण करण्यात येणार आहे. शुक्रवार, २० ऑक्टोबर २०२३ रोजी, सायंकाळी  ६ वाजता, रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी येथे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते धनादेश वितरण कार्यक्रम होणार आहे.

फेब्रुवारी २०२३ ते जून २०२३ या कालावधीत एकूण १७४ चित्रपट परीक्षण करण्यात आले आहेत. त्यापैकी ‘अ’ दर्जा प्राप्त चित्रपट ३७, ‘ब’ दर्जा प्राप्त चित्रपट ४८, राज्य-राष्ट्रीय पारितोषिक प्राप्त चित्रपट ०४ असे एकूण ८९ चित्रपटांना अनुदान वितरण करण्यात येणार आहे. यासाठी एकूण २९ कोटी ८५ लाख रुपयांचा निधी वितरित होणार आहे.

राज्य शासनाने दर्जेदार मराठी चित्रपट निर्मितीस अर्थसहाय्य योजना कार्यान्वित केली आहे. त्यात कालानुरूप बदल करून सुधारणा करण्यात आल्या असून या योजनेची अंमलबजावणी महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्यावतीने करण्यात येते.

दर्जेदार चित्रपट निर्मितीस अर्थसहाय्य योजनेनुसार ‘अ’ दर्जा प्राप्त चित्रपटांकरिता ४० लाख रुपये इतके अनुदान आणि ‘ब’ प्राप्त चित्रपटांकरता ३० रुपये लाख इतके अनुदान मंजूर करण्यात येते. परिक्षणाअंती ज्या चित्रपटांना ७१ च्या पुढे गुण असतील त्यांना ‘अ’दर्जा, व ५१ ते ७० गुण असणाऱ्या चित्रपटांना ‘ब’ दर्जा देण्यात येतो.

महाराष्ट्र राज्य पुरस्कार / राष्ट्रीय पुरस्कार / आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त चित्रपटांना कोणत्याही परीक्षणाशिवाय ‘अ’दर्जा देण्यात येतो. मात्र यासाठी चित्रपट प्रदर्शनासंबंधीच्या अटींची पूर्तता करणे बंधनकारक आहे. मराठी चित्रपटांना अर्थसहाय्य मंजूर करण्यासाठी एकूण २८ सदस्यांची चित्रपट परीक्षण समिती गठित करण्यात आलेली आहे.

राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त ‘दशक्रिया’, ‘बार्डो’ आणि ‘फनरल’ आणि राज्य पुरस्कार प्राप्त चित्रपट  ‘तेंडल्या’ यांना अनुदान मिळणार आहे.

000

दीपक चव्हाण/विसंअ/

 

मंत्रिमंडळ निर्णय : दि. १९ ऑक्टोबर २०२३

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक मुंबईतून

शासकीय बँकिंग व्यवहार करता येणार

 

शासकीय कार्यालयांच्या बँकिंग विषयक व्यवहार आणि सार्वजनिक उपक्रम महामंडळे यांच्याकडील निधी गुंतवण्यासाठी  महाराष्ट्र राज्य  सहकारी बँक, मुंबई  या बँकेस पात्र ठरविण्याचा  निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.  बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

राज्य सहकारी बँक ही सहकार क्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजावते.  या बँकेला अधिक सक्षम करणे तसेच ग्रामीण पतपुरवठ्यात वाढ करणे आवश्यक असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला.

राष्ट्रीयकृत बँकांसोबतच 16 हजार कोटी किंवा अधिक मूल्य त्याचप्रमाणे खासगी बँकांनी सतत 5 वर्षे निव्वळ नफा मिळविणे, भांडवल प्रर्याप्तता गुणोत्तर (Capital Adequacy Ratio) 12 टक्क्यांपेक्षा जास्त असणे तसेच बँकेवर रिझर्व्ह बँकेकडून कोणतेही आर्थिक निर्बंध तसेच त्वरित सुधारात्मक कार्यवाही लादलेली नसणे या निकषांची पूर्तता करण्याच्या अटींवर शासकीय कार्यालयांच्या बँकिंग व्यवहारासाठी आणि महामंडळाकडील अतिरिक्त गुंतवणुकीसाठी पात्र ठरविण्यात यावे.

राज्य सहकारी बँक, मुंबई या बँकेचे नक्त मूल्य 4 हजार कोटींपेक्षा जास्त असून सतत 5 वर्षे नफ्यात राहिलेली आहे.  लेखापरीक्षणातदेखील सतत 5 वर्षे अ वर्ग दर्जा असून भांडवल प्रर्याप्तता गुणोत्तर 12 टक्क्यांपेक्षा जास्त आहे.  तसेच बँकेवर रिझर्व्ह बँकेचे कोणतेही आर्थिक निर्बंध किंवा त्वरित सुधारणा करावयाची कार्यवाही लादलेली नाही.  या निकषावर ही बँक पात्र ठरविण्यात आली आहे.

या पुढील काळात वेळोवेळी नक्त मूल्याची किमान मर्यादा वाढविण्याची कार्यवाही वित्त विभागाकडून करण्यात येईल.  तसेच दरवर्षी आढावा घेऊन या निकषावर संबंधित बँकांची नावे समाविष्ट करून किंवा वगळून बँकांची यादी अद्ययावत करण्यात येईल.

—–०—–

कोराडीत सुपर क्रिटिकल तंत्रज्ञानावरील

वीज प्रकल्पास मान्यता

 

नागपूर जिल्ह्यातील कामटी तालुक्यातील कोराडी येथे २ x ६६० मेगावॅट क्षमतेच्या कोळशावर आधारित सुपर क्रिटिकल तंत्रज्ञानावरील वीज प्रकल्पास मान्यता देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.  बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

महानिर्मिती कंपनीच्या जुन्या बंद होणाऱ्या १२५० मेगावॅट क्षमतेच्या संचाच्या बदल्यात हा १३२० मेगावॅट क्षमतेचा प्रकल्प उभारण्यात येईल.  यासाठी येणाऱ्या १० हजार ६२५ कोटींच्या खर्चासदेखील मान्यता देण्यात आली.  यापैकी ८० टक्के रक्कम म्हणजेच ८ हजार ५०० कोटी रुपये महानिर्मितीस विविध बँका आणि संस्थांकडून उपलब्ध करता येतील.  तसेच २० टक्के म्हणजेच २ हजार १२५ कोटी रुपये पुढील ५ वर्षात टप्प्याटप्प्याने भागभांडवल म्हणून उपलब्ध करून देण्यात येतील. राज्यात वेगाने होणारे औद्योगिकीकरण तसेच पायाभूत सुविधांमुळे वीजेच्या मागणीत होणारी वाढ लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे.

—–०—–

महाप्रित उभारणार ठाण्यात समूह गृहनिर्माण प्रकल्प

परवडणारी घरे मोठ्या प्रमाणावर

 

‘महाप्रित’मार्फत ठाण्यात समूह गृहनिर्माण प्रकल्प राबवून त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर परवडणारी घरे बांधण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.  बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाला अधिक कार्यक्षम करण्यासाठी आणि नवीन योजना राबविण्यासाठी महात्मा फुले नविनीकरणीय ऊर्जा व पायाभूत प्राद्योगिकी मर्यादित- महाप्रित या सहयोगी कंपनीची स्थापना करण्यात आली.  या कंपनीमार्फत विविध शासकीय कामे उदा. परवडणारी घरे आणि शहरी नियोजन, अक्षय ऊर्जा, कृषिमूल्य साखळी, पायाभूत सुविधा प्रकल्प, पर्यावरण उदयोन्मुख तंत्रज्ञान क्षेत्रे करण्यास 10 जुलै 2023 मध्ये मान्यता देण्यात आली आहे.  यालाच अनुसरुन ठाणे शहरातील टेकडी बंगला, हजुरी व किसन नगर येथे एकत्रित विकास नियंत्रण नियमावलीमध्ये समूह विकास प्रकल्प राबविण्यासाठी ठाणे महापालिकेसोबत सामंजस्य करार करण्यात आला आहे.  हा प्रकल्प राबविण्यास त्याचप्रमाणे महात्मा फुले मागासवर्ग महामंडळाकडील ठेवींवर मिळणाऱ्या व्याजाच्या रकमेतून 25 कोटी इतक्या रकमेची 3 वर्षांत व्याजासह परतफेड करण्याच्या तत्वावर या प्रकल्पास मान्यता देण्यात आली.

—–०—–

राज्यातील सूतगिरण्या सुरळीतपणे चालवणार

पुढील पाच वर्षे कर्जावरील व्याज शासन भरणार

 

राज्यातील सूतगिरण्या सुरळीतपणे चालविण्यासाठी पुढील पाच वर्षे कर्जावरील व्याज शासनाने भरण्याची योजना सुरु ठेवण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.  बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

सहकारी सूतगिरण्यांसाठी वित्तीय संस्थांकडून  व राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळाकडून प्रति चाती 3 हजार रुपये प्रमाणे घेतलेल्या कर्जावरील व्याज शासनामार्फत देणारी योजना 11 जानेवारी 2017 रोजी लागू करण्यात आली होती.  या योजनेत काही आवश्यक सुधारणा करून ती पुढील पाच वर्षे सुरु ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.

शासन निर्णय निर्गमित झाल्यापासून पुढील एक वर्षापर्यंत ज्या सहकारी सूतगिरण्या 5 वर्ष मध्यम मुदतीचे नवीन कर्जाची उचल करतील त्याच सहकारी सूतगिरण्या या योजनेसाठी पात्र राहतील. या योजनेचा लाभ घेण्यासाठी सहकारी सूतगिरण्यांनी 5 वर्षे कालावधीचे मध्यम मुदतीचे कर्ज वित्तीय संस्थेकडून, महामंडळाकडून घ्यावे. या योजनेचा लाभ केवळ या निर्णयानंतर पुढील एक वर्षापर्यंत कर्ज उचल करणाऱ्या सहकारी सूतगिरण्यांना लागू राहील.

हे कर्ज केवळ 5 वर्ष मुदतीसाठी घेतलेले मुदत कर्ज प्रकारचे रेड्युसिंग बॅलन्स मेथड नुसार असावे. इतर प्रकारचे कर्ज जसे – कॅश क्रेडिट, माल तारण कॅश क्रेडिट, बुलेट परतफेड प्रकारचे कर्ज (कर्जाच्या मुद्दलाची परतफेड कर्ज अवधीनंतर ठोक एकरकमी करणे), पुनर्गठन कर्ज, इ. प्रकारचे कर्ज तसेच मंथली कंपाऊडींग बेसिस वर आधारित असलेले कर्ज या योजनेकरिता पात्र राहणार नाही.  11 जानेवारी 2017 रोजीच्या शासन निर्णयान्वये या योजनेचा लाभ ज्या 29 सहकारी सूतगिरण्या सध्या घेत आहेत, त्यांना या योजनेचा लाभ घ्यावयाचा असल्यास त्यांनी प्रथम घेतलेल्या संपूर्ण कर्जाची परतफेड करून संपूर्ण मुद्दल रक्कम व्याजासह परतफेड केल्याचे संबंधित बँकेचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील. त्यानंतरच या सूतगिरण्या सुधारित योजनेसाठी पात्र ठरतील.

ज्या सहकारी सूतगिरण्या प्रस्तुत योजनेचा लाभ घेतील त्या सूतगिरण्यांनी रेड्युसिंग बॅलन्स मेथडनुसार दरवर्षी 5 समान हप्त्यात मुदलाची परतफेड करणे आवश्यक असेल. तसेच सूतगिरण्यांनी मुद्दल रक्कमेच्या परतफेडीचा हप्ता नियोजित वेळेत केला नाही तर या सूतगिरण्या या योजनेचा लाभ आपोआप घेण्यास अपात्र ठरतील. योजनेचा लाभ घेण्याऱ्या अंशत: उत्पादनाखालील सूतगिरण्यांनी पुढील 2 वर्षामध्ये सूतगिरणी प्रकल्प पूर्ण क्षमतेने उत्पादनाखाली आणावा, असे न करणाऱ्या सहकारी सूतगिरण्यांना सदर योजनेचा लाभ दोन वर्षानंतर देणे बंद करण्यात येईल.

ज्या सहकारी सूतगिरण्या त्यांच्या संचालक मंडळामार्फत चालविल्या जात आहेत केवळ अशाच सूतगिरण्या या योजनेसाठी पात्र राहतील. या योजनेचा लाभ घेण्याकरिता संबंधित सूतगिरणीच्या अध्यक्षांनी सूतगिरणी संचालक मंडळामार्फत चालविण्यात येत असल्याचे प्रतिज्ञापत्र देणे बंधनकारक राहील.

—–०—–

अहमदनगर जिल्ह्यात नवीन

पशुवैद्यक पदवी महाविद्यालय

 

अहमदनगर जिल्ह्यात नवीन पशुवैद्यक पदवी महाविद्यालय सुरु करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.  बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

सध्या देशात 50 टक्के पशुवैद्यकांची कमतरता असून वर्ष 2035 पर्यंत 1 लाख 25 हजार एवढ्या पशुवैद्यकांची आवश्यकता असेल.  राज्यात पशुवैद्यक विद्यार्थ्यांची संख्या दुप्पट करणे आवश्यक आहे.  सध्या पदवी आणि पदव्युत्तर यामध्ये अनुक्रम 405 आणि 240 अशी प्रवेश क्षमता आहे.  राज्याला सुमारे 6 हजार 600 पशुवैद्यक पदवीधरांची गरज आहे.  सध्या राज्य पशुसंवर्धन विभागाकडे 2 हजार 500 पशुधन विकास अधिकारी असून 3 कोटी 33 लाख 79 हजार 118 पशुधनाची संख्या आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यातील शिर्डी येथील मौ. सावळी विहिर खुर्द येथे सुमारे 75 एकर जमिनीवर हे नवीन पशुवैद्यक पदवी महाविद्यालय स्थापन करण्यात येईल. यासाठी एकूण 234 पदे नियमित आणि शिक्षकेतर 42 अशी बाह्यस्त्रोताने पदे भरण्यास मान्यता देण्यात आली.  यासाठी एकूण 107 कोटी 19 लाख इतका खर्च येईल. तसेच उपकरणे, यंत्रसामुग्री, इमारती इत्यादीसाठी 346 कोटी 13 लाख एवढा खर्च येईल.

—–०—–

 

राज्यात चार धर्मादाय सह आयुक्त

पदांची निर्मिती करणार

 

राज्यात चार धर्मादाय सह आयुक्त पदांची निर्मिती करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.  बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

धर्मादाय संघटनेतील नाशिक, पुणे, नागपूर, व नांदेड येथील कार्यालयांत प्रत्येकी 1 याप्रमाणे एकूण 4 धर्मादाय सह आयुक्त व 4 लघुलेखक (उच्च श्रेणी) अशी एकूण 8 नियमित पदे निर्माण करण्यास व 4 मनुष्यबळाच्या (बहुउद्देशीय गट-ड कुशल कर्मचारी) सेवा बाह्ययंत्रणेद्वारे उपलब्ध करुन घेण्यात येतील. सध्या छत्रपती संभाजीनगर येथे 740, नाशिक येथे 779, पुणे येथे 2394 आणि नागपूर येथे 1029 अशी प्रलंबित प्रकरणे धर्मादाय सह आयुक्त कार्यालयात आहेत. त्यामुळे या 4 ठिकाणी ही पदे निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आला.

—–०—–

इमारत व बांधकाम लाभार्थी कामगारांसाठी

नियमांत सुधारणा करणार

 

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनेमध्ये सुधारणा करून त्यांचा लाभ गतीने मिळण्यासाठी कामगार नियमांत सुधारणा करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.  बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

या मंडळामार्फत लाभार्थीकरिता विविध कल्याणकारी योजना आहेत.  मात्र, त्यांच्या अटी, शर्ती, निकष आणि आर्थिक बाबी निश्चित करण्यात न आल्यामुळे त्यांची अंमलबजावणी करताना अडचणी येत होत्या.  या अडचणी दूर करण्यासाठी सुधारणा आवश्यक होत्या.  केंद्र शासन व राज्य शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनेचा लाभ एखाद्या लाभार्थ्याने घेतला असल्यास त्यास परत त्याच योजनेचा लाभ मिळू नये यासाठी आता मंडळामार्फत सदर लाभार्थी कामगार अपात्र ठरविण्यात येईल अशी सुधारणादेखील महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार (रोजगार विनियमन व सेवाशर्ती) नियम, २००७ मधील नियम ४५ मध्ये करण्यात येईल.

—–०—–

बार्टी, सारथी, महाज्योती, अमृत या संस्थांच्या

कार्यक्रमांत समानता आणणार

अधिछात्रवृत्ती, परदेशी शिष्यवृत्ती संख्या निश्चित

 

बार्टी, सारथी, महाज्योती, अमृत या संस्थांच्या कार्यक्रम व योजनांमध्ये एकसमानता आणण्यासाठी कायमस्वरुपी समिती गठीत करण्याचा तसेच एक सर्वंकष धोरण आखण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.  बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. आजच्या बैठकीत अधिछात्रवृत्ती, परदेशी शिष्यवृत्ती या योजनांकरिता लाभार्थींच्या संख्येस मान्यता देण्यात आली.

राज्यात आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था (टीआरटीआय), डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), छत्रपती शाहू महाराज संशोधन व प्रशिक्षण संस्था (सारथी), महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती), महाराष्ट्र संशोधन व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) या संस्थांमार्फत समाजातील विविध घटकांसाठी सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक कार्यक्रम राबविण्यात येतात.  त्याचप्रमाणे अधिछात्रवृत्ती, विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा तयारी, पोलीस आणि सैन्यभरती प्रशिक्षण, कौशल्यविकास, वसतीगृह व वसतीगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना देण्यात येणारा निर्वाह भत्ता, स्वाधार, स्वंयम अशा वेगवेगळ्या योजना राबविण्यात येतात.  याबाबतीमध्ये एक सर्वंकष धोरण आणण्याचे मंत्रिमंडळाचे निर्देश होते. त्याला अनुसरुन अपर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समितीस कायमस्वरुपी मान्यता देण्यात आली.

आता प्रत्येक संस्था त्यांचा वार्षिक कृती आराखडा तयार करून तो वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली समितीसमोर मान्यतेसाठी ठेवेल.

अधिछात्रवृत्ती- अधिछात्रवृत्ती ही योजना राबविण्याकरिता वरील स्वायत्त संस्थांमध्ये पुढील प्रमाणे विद्यार्थी संख्या निश्चित करण्यात येत आहे. बार्टी- 200 विद्यार्थी, सारथी- 200 विद्यार्थी, टीआरटीआय- 100विद्यार्थी, महाज्योती- 200 विद्यार्थी

निकष- याकरिता विद्यापीठ अनुदान आयोग (यू.जी.सी.)च्या मार्गदर्शक सूचनांनुसार कार्यवाही करावी. लाभार्थ्याच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रु. 8.00 लक्ष इतके मर्यादित असावे. आरक्षणाच्या धोरणानुसार महिलांकरिता 30 टक्के, दिव्यांगाकरिता 5 टक्के व अनाथांकरिता 1 टक्के याप्रमाणे आरक्षण राहिल. अधिछात्रवृत्ती योजनेअंतर्गत राज्य विद्यापीठांमार्फत, भारतीय विद्यापीठ अनुदान आयोग (UGC), राष्ट्रीय अनुसूचित जाती वित्त आणि विकास महामंडळ (NSFDC) व इतर तत्सम संस्थांमार्फत देखील विद्यावेतन देण्यात येते. त्यामुळे सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यात येत असलेल्या विद्यार्थ्याचा समावेश बार्टी, सारथी, टीआरटीआय, महाज्योती अधिछात्रवृत्ती योजनेअंतर्गत करण्यात येऊ नये. अथवा त्यांना वरीलपैकी एकच पर्याय उपलब्ध करुन द्यावा. अधिछात्रवृत्ती योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना योजनेचा लाभ अनुज्ञेय करण्याकरिता विद्यार्थ्यांनी किमान “B+” मानांकन प्राप्त शासकीय विद्यापीठात/ “A” मानांकन खाजगी विद्यापीठात  प्रवेश घेणे आवश्यक आहे .

स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण- युपीएससीसाठी – उच्च व तंत्र  शिक्षण विभागांनी सूचीबद्ध केलेल्या दिल्ली येथील प्रशिक्षण केंद्रामार्फत सर्व संस्थांनी प्रशिक्षण कार्यक्रम राबवावा. एमपीएससी, आयबीपीएस बँकिंग, पोलीस व मिलीटरी भरतीपूर्व प्रशिक्षण व तत्सम स्पर्धा परीक्षा कार्यक्रमस्पर्धा परीक्षा प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांबाबत निवडीचे निकष अंतिम करावेत. स्पर्धा परीक्षा प्रशिक्षणाचा लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे निकष अंतिम करावेत.

परदेश शिष्यवृत्ती- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग- 75 विद्यार्थी, इतर मागास व बहुजन कल्याण विभाग- 75 विद्यार्थी, आदिवासी विकास विभाग- 40 विद्यार्थी, उच्च व तंत्र शिक्षण विभाग- 20 विद्यार्थी, नियोजन विभाग- 75 विद्यार्थी, अल्पसंख्याक विभाग- मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ – 25 विद्यार्थी, अल्पसंख्याक विभाग –  27 विद्यार्थी.  परदेशी शिष्यवृत्तीचे निकष देखील निश्चित करण्यात आले आहेत.  यामध्ये विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रु.8.00 लक्ष इतके मर्यादित असावे. QS World Ranking नुसार ज्या विद्यापीठांचे मानांकन 200 च्या आतमध्ये आहे. त्या विद्यापीठात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनाच या योजनेचा लाभ देण्यात यावा. अशा स्वरुपाचे निकष आहेत.

स्वाधार/स्वयंम /निर्वाह भत्ता विभागनिहाय तत्सम योजना- वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांरीता वार्षिक खर्चासाठी पुढीलप्रमाणे अनुदान विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट रक्कम वितरित करण्यात यावी.            मुंबई शहर, मुंबई उपनगर, नवी मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड व नागपूर या ठिकाण शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अनुज्ञेय रक्कम- रु. 60,000/- प्रति वर्ष. इतर महसूली विभागीय शहरातील व उर्वरित “क” वर्ग महानगरपालिका क्षेत्रामध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अनुज्ञेय रक्कम- रु.51,000/- प्रति वर्ष. इतर जिल्ह्याच्या ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसांठी अनुज्ञेय रक्कम- रु. 43,000/- प्रति वर्ष. तालुक्याच्या ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अनुज्ञेय रक्कम-  रु. 38,000/- प्रति वर्ष. ज्या विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश मिळत नाही अशा विद्यार्थ्यांसाठी स्वयंम, स्वाधार/निर्वाह भत्त्याचा लाभ देण्याकरिता एकच स्वतंत्र पोर्टल विकसित करावे. वसतिगृह प्रवेश व स्वयंम स्वाधारच्या लाभार्थ्यांचे पात्रता निकष अंतिम करावेत.

—–०—–

हिमोग्लोबिन वाढविण्यासाठी उपयुक्त वरई

वरईपासून ‘भगर’ बनविली जाते. आपल्या राज्यात उपवासासाठी मोठ्या प्रमाणात भगरचा आहार घेतला जातो. पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 मध्ये ऑक्टोबर महिना हा नवरात्री महोत्सवाला वरईसाठी समर्पित केला आहे.

 वरई पिकाचे महत्त्व : वरईत ग्लुटेन नसल्याने तसेच प्रथिने व तंतूमय पदार्थांचे प्रमाण अधिक असल्याने पचायला हलकी असते. वरईत स्निग्ध पदार्थ, लोह जास्त प्रमाणात आढळतात म्हणूनच शरीरातील हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढवण्यासाठी उपयुक्त आहे. वरईत असलेल्या व्हिटॅमिन बी-3, सी, ए व इ जास्त प्रमाणात असतात. वरईत पोटॅशियम, लोह, जस्त व कॅल्शियम हि खनिजे उपलब्ध असतात. ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. वरई धान्याचा आहारात वापर केल्याने हृदयाशी निगडित व्याधी नियंत्रणात ठेवण्यासाठी लाभ होतो. शरीरात साठलेल्या चरबीचे प्रमाण कमी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. वरई मध्ये अॅण्टीऑक्स‍िडन्टचे प्रमाण भरपूर असते. त्यामुळे त्वचा, केस यांचे आरोग्य राखण्यास मदत होते. वरईतील सर्व पौष्टिक घटकांचा विचार केल्यास रक्तातील कोलेस्टेरोल, शर्करा प्रमाण, पोटाचे व पचनाचे विकार कमी करण्यास मदत होते.

              वरी/ वरई /कुटकी(Little millet) : हे गवतवर्गीय कुळातील पीक असून या पिकाचे शास्त्रीय नाव [Panicum sumatrense] असे आहे. या पिकाची लागवड प्रमुख्याने जास्त पाऊस पडणाऱ्या पश्चिम घाट विभाग, उप-पर्वतीय विभाग व कोकण विभाग या कृषी हवामान विभागातील डोंगराळ भागात केली जाते. वरी हे महाराष्ट्रात खरीप हंगामात लागवड केल्या जाणाऱ्या पिकांपैकी महत्त्वाचे तृणधान्य पीक आहे. या भागातील आदिवासी व स्थानिक शेतकऱ्यांसाठी हे प्रमुख पौष्टिक तृणधान्य पीक आहे.

पौष्टिक भरडधान्य पिकांचे लागवडीच्या दृष्टीने महत्त्व : कमी  पक्वता कालावधी असणारी पिके, हलक्या जमिनीत उत्तम वाढ होते. वाढीच्या काळात कमीत कमी निविष्ठा वापरून वाढ पूर्ण करतात. सुधारित तंत्रज्ञानानुसार लागवड केल्यास उत्तम प्रतिसाद देणारी व अधिक उत्पादन देणारी पिके आहेत. बदलत्या हवामानात तग धरणारी पिके व तसेच आकस्मिक शेतीकरिता नियोजन केले जाऊ शकते. उत्तम प्रकारचे पौष्टिक गुणधर्म असल्याने आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर व भविष्यात मागणी वाढणारी पिके आहेत. या पिकांपासून उत्तम प्रतीचे धान्य व जनावरांसाठी सकस चारा मिळतो.

वरी/ वरई /कुटकी पौष्टिक गुणधर्म :

अ) प्रथिने व खनिज पदार्थ :

या पिकांमध्ये खालील प्रमाणे पौष्टिक तत्वे असतात. दैनंदिन मानवी आहाराच्या दृष्टीने हे एक अत्यंत महत्त्वाचे पौष्टिक तृणधान्य आहे. यामध्ये पौष्टिक घटकांबरोबरच चांगल्या प्रतीचे पोषक तंतूमय पदार्थ असल्याने बद्धकोष्ठता होत नाही. या पिकाच्या धान्यामध्ये स्निग्ध पदार्थाचे प्रमाण  भात आणि गहू धान्यापेक्षा जास्त असते. तसेच कॅल्शियम , मॅग्नेशियम व लोह  या खनिजाचे प्रमाण अधिक आहे.

ब) जीवनसत्वे : भरडधान्य पिकांचा आणखी वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्म म्हणजे या पिकांमध्ये मुबलक असलेले जीवनसत्वाचे प्रमाण. वरी/ वरई धान्यामध्ये थायमिन बी-१  व फॉलिक असिड  याचे प्रमाण सर्वाधिक आहे.

नित्य सेवन करणाऱ्या लोकांमध्ये पचनाचे विकार, हृदयरोग आणि मधुमेहाचे प्रमाण कमी करता येऊ शकते. या धान्यापासून भगर, डोसा, भाकरी, माल्ट, नूडल्स, पापड, आंबिल, इडली, बिस्क‍िटे यासारखे खाद्यपदार्थ तयार करता येतात.

      सुधारित लागवड तंत्रज्ञान : जमीन व हवामान : या पिकाच्या लागवडीसाठी हलकी ते मध्यम, पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन उत्तम आहे. या पिकाची लागवड प्रामुख्याने महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वत रांगेतील अतिपावसाच्या उप-पर्वतीय विभाग, पश्चिम घाट विभाग आणि कोकण विभागातील डोंगर उताराच्या जमिनीवर केली जाते.

पूर्वमशागत : जमिनीची खोल नांगरट करुन उभ्या आडव्या कुळवाच्या दोन पाळ्या देऊन ४ ते ५ टन शेणखत/कंपोस्ट खत याचवेळी शेतात मिसळून जमीन भुसभुशीत करावी. पूर्वी घेतलेल्या  पिकाचे धसकटे, काडीकचरा व बहुवार्षिक गवताचे अवशेष वेचून शेत स्वच्छ करावे.

सुधारित वाण 1. फुले एकादशी हे वाण 120 ते 130 दिवसांमध्ये परिपक्व होते. याची उत्पादकाता हेक्टरी 11 ते 12 क्विंटल असते. हे उशीरा पक्व होणारे व उंच वाढणारे वाण आहे.

  1. कोकण सात्विक हे वाण 115 ते 120 दिवसांमध्ये परिपक्व होते. याची उत्पादकाता हेक्टरी 18 ते 20 क्विंटल असते. हे मध्यम पक्वता व अधिक उत्पादकता देणारे पिक आहे.

बियाणे व पेरणीची पद्धत पेरणीची/लावणीची वेळ : या पिकाचा खरीप हा प्रमुख हंगाम आहे. बियाणे पेरणी पावसाचे आगमन होताच अथवा पाण्याची सुविधा असल्यास जूनच्या पहिल्या पंधरवाड्यात करावी. पिकाची लागवड मुख्यत्वे रोप लागण पद्धतीने केली जाते. रोप लागण पद्धतीने लागवड करायची असल्यास ४ ते ५ किलो बियाणे/हेक्टरी वापरावे. रोपवाटिका करताना गादीवाफे तयार करून त्यावर बियाणे ओळीमध्ये पेरून घ्यावे. बियाणे १.०० ते १.५ से. मी. पेक्षा जास्त खोल जाणार नाहीत याची काळजी घ्यावी म्हणजे उगवण चांगली होते.

बीज प्रक्रिया : बियाणे पेरणीपूर्वी ‘अझोस्पिरिलम ब्रासिलेंस’ आणि ‘अस्पर्जीलस अवामोरी’ या जिवाणू संवर्धकाची प्रति किलो बियाण्यास २५ गॅम प्रमाणे करावी.

        रोप लावणी पद्धत : गादी वाफ्यावर रोपे २० ते २५ दिवसांची झाल्यानंतर शेतामध्ये रोपांची पुनर्लागण करावी. रोपलागण करताना दोन ओळीमधील अंतर ३०.० से.मी. (एक फूट) व दोन रोपामंधील अंतर १०.० से.मी. ठेवावे.

        खत व्यवस्थापन : पेरणीपूर्वी एक महिना अगोदर शेणखत अथवा कंपोष्ट खत ५ ते १० टन प्रति हेक्टर या प्रमाणे जमिनीत मिसळून द्यावे. या पिकासाठी रासायनिक खताची मात्रा ४० किलो नत्र, २० किलो स्फूरद आणि २० किलो पालाश प्रति हेक्टर याप्रमाणे द्यावे. अर्धे नत्र व संपूर्ण पालाश व संपूर्ण स्फुरद मात्रा पेरणी करताना द्यावी व उरलेले अर्धे नत्र पेरणी नंतर एक महिन्याने द्यावे.

        आंतरमशागत : पीक वाढीच्या सुरुवातीच्या काळात पिकाची वाढ संथ गतीने होत असल्याने तणे पिकाशी स्पर्धा करतात.त्यामुळे तण नियंत्रणासाठी एक कोळपणी करुन गरजेनुसार एक महिन्याच्या आत एक खुरपणी करावी.

आंतरपिके शिफारस : पिकाचे अधिक धान्य उत्पादन आणि निव्वळ नफा मिळविण्यासाठी उप-पर्वतीय विभागात वरी/ वरई  पिकामध्ये कारळा ४:१ या प्रमाणात आंतरपीक घेण्याची शिफारस करण्यात आली आहे.

        पीक संरक्षण : कीड व्यवस्थापन : खोडमाशी : पेरणीनंतर पीक ६ आठवड्याचे असताना खोडमाशीचा प्रादुर्भाव सुरु होतो. या किडीच्या अळीद्वारे मुख्य खोडाचे नुकसान होऊन मर होते. त्यामुळे  फुटव्यावर परिणाम होतो. सर्वाधिक नुकसान जुलै महिन्याच्या शेवटी व ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला जाणवते.

        उपाययोजना : पावसाळा सुरु होताच ७ ते १० दिवसांच्या आत पेरणी करावी. तसेच पेरणीकरिता जास्त बियाणे वापरावे.

        काढणी व मळणी : पिकाच्या विविध वाणानुसार पक्वता कालावधी वेगळा असू शकतो. साधारणपणे १०० ते १२० दिवसांत पीक काढणीस सुरुवात करावी. काढणीस उशीर झाल्यास कणसातील/बोंडातील दाणे झडण्याची शक्यता असते. पिकाची काढणी करताना कणसे/बोंडे विळ्याने कापून करावी. दोन-तीन दिवस उन्हात चांगली वाळल्यानंतर कणसे बडवून मळणी करावी. धान्य उन्हात चांगले वाळवून हवेशीर जागी साठवण करुन ठेवावे.

        उत्पादन : वरी/ कुटकी पीक हे लागवड करताना वापरण्यात येणाऱ्या सुधारित निविष्ठा व तंत्रज्ञानास उत्तम प्रतिसाद देणारे C4 वर्गातील पीक आहे. या पिकापासून सरासरी हेक्टरी १३ ते १५ क्विंटल प्रति हेक्टर धान्य उत्पादन घेता येते.

 

दत्तात्रय कोकरे

विभागीय संपर्क अधिकारी

००००

(संदर्भ : अखिल भारतीय समन्वीत नाचणी व तत्सम तृणधान्य संशोधन प्रकल्प, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत विभागीय कृषी संशोधन केंद्र, कोल्हापूर)

महाराष्ट्र शासनाचे ११ वर्षे मुदतीचे २ हजार कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

मुंबई, दि. १९ : महाराष्ट्र शासनाचे ११ वर्षे मुदतीच्या २ हजार कोटी रुपयांच्या शासकीय रोख्यांची ७.४७ टक्के दराने विक्री अटी आणि शर्तींच्या अधीन राहून लिलावाने करण्यात येईल. या कर्जाद्वारे मिळालेल्या रकमेचा विनियोग शासनाच्या विकास कार्यक्रमासाठी केला जाईल, अशी माहिती वित्त विभागाच्या सचिव शैला ए. यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये दिली आहे.

अस्पर्धात्मक लिलाव पद्धतीनुसार (सुधारित) कर्जरोखे रकमेच्या १० टक्के रक्कम पात्र वैयक्तिक व संस्थात्मक गुंतवणूकदारांना वाटप करण्यात येईल. मात्र, एका गुंतवणूकदारास एकूण अधिसूचित रकमेच्या जास्तीत जास्त एक टक्का रकमेच्या मर्यादेपर्यंतच वाटप करण्यात येईल. २३ ऑक्टोबर २०२३ रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेतर्फे मुंबई येथील कार्यालयात लिलाव केला जाईल, तर लिलावाचे बीडस् संगणकीय प्रणालीनुसार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, कोअर बँकिंग सोल्यूशन, (ई-कुबेर) सिस्ट‍िमनुसार सादर करावयाचे आहेत.

यामध्ये स्पर्धात्मक बिड्स संगणकीय प्रणालीद्वारे ई-कुबेर सिस्टीमनुसार सकाळी 10.30 ते 11.30 वाजेपर्यंत सादर करावेत. तर अस्पर्धात्मक बीडस् ई-कुबेर सिस्टिमनुसार सकाळी 10.30 ते 11.00 पर्यंत सादर करावेत. लिलावाचा निकाल भारतीय रिझर्व्ह बँकेच्या संकेतस्थळावर त्याच दिवशी प्रसिद्ध करण्यात येईल. यशस्वी झालेल्या बीडर्सकडून रकमेचे प्रदान २५ ऑक्टोबर 2023 रोजी करण्यात येईल.

यशस्वी झालेल्या बीडर्सकडून २५ ऑक्टोबर २०२३ रोजी रोखीने, बँकर्स धनादेश/प्रदान आदेश, डिमांड ड्राफ्ट किंवा त्यांच्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, मुंबई येथील खात्यात देय असलेले धनादेश बँकेची कामकाजाची वेळ संपण्यापूर्वी अधिदानाने प्रदान करण्यात येतील.

कर्जरोख्याचा कालावधी ११ वर्षांचा असून, रोख्यांचा कालावधी १३ सप्टेंबर, २०२३ पासून सुरू होईल, तर कर्जरोख्याची परतफेड दिनांक १३ सप्टेंबर २०३४ रोजी पूर्ण किमतीने केली जाईल. व्याजाचा दर ७.४७ टक्के दर शेकडा एवढा असेल.  व्याजाचे प्रदान प्रतिवर्षी १३ मार्च आणि १३ सप्टेंबर रोजी सहामाही पद्धतीने करण्यात येईल.

शासकीय रोख्यांमधील बँकांची गुंतवणूक ही बँकिंग विनियम अधिनियम 1949 खालील कलम 24 अंतर्गत सांविधिक रोकड सुलभता गुणोत्तर (SLR) या प्रयोजनार्थ पात्र समजण्यात येईल. हे कर्जरोखे पुन: विक्री-खरेदीसाठी अनुज्ञेय असतील, अशी माहिती वित्त विभागाने दिली आहे.

००००

गोपाळ साळुंखे/ससं/

महाराष्ट्र शासनाचे दहा वर्षे मुदतीचे २ हजार कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

मुंबई, दि. १९ : महाराष्ट्र शासनाच्या दहा वर्षे मुदतीच्या २ हजार कोटी रुपयांच्या शासकीय रोख्यांची ७.४६ टक्के दराने विक्री अटी आणि शर्तींच्या अधीन राहून लिलावाने करण्यात येईल. या कर्जाद्वारे मिळालेल्या रकमेचा विनियोग शासनाच्या विकास कार्यक्रमासाठी केला जाईल, अशी माहिती वित्त विभागाच्या सचिव शैला ए. यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये दिली आहे.

अस्पर्धात्मक लिलाव पद्धतीनुसार (सुधारित) कर्जरोखे रकमेच्या १० टक्के रक्कम पात्र वैयक्तिक व संस्थात्मक गुंतवणूकदारांना वाटप करण्यात येईल. मात्र, एका गुंतवणूकदारास एकूण अधिसूचित रकमेच्या जास्तीत जास्त एक टक्का रकमेच्या मर्यादेपर्यंतच वाटप करण्यात येईल. २३ ऑक्टोबर २०२३ रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेतर्फे मुंबई येथील कार्यालयात लिलाव केला जाईल, तर लिलावाचे बीडस् संगणकीय प्रणालीनुसार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, कोअर बँकिंग सोल्यूशन, (ई-कुबेर) सिस्ट‍िमनुसार सादर करावयाचे आहेत.

यामध्ये स्पर्धात्मक बिड्स संगणकीय प्रणालीद्वारे ई-कुबेर सिस्टीमनुसार सकाळी 10.30 ते 11.30 वाजेपर्यंत सादर करावेत. तर अस्पर्धात्मक बीडस् ई-कुबेर सिस्टिमनुसार सकाळी 10.30 ते 11.00 पर्यंत सादर करावेत. लिलावाचा निकाल भारतीय रिझर्व्ह बँकेच्या संकेतस्थळावर त्याच दिवशी प्रसिद्ध करण्यात येईल. यशस्वी झालेल्या बीडर्सकडून रकमेचे प्रदान २५ ऑक्टोबर 2023 रोजी करण्यात येईल.

यशस्वी झालेल्या बीडर्सकडून २५ ऑक्टोबर २०२३ रोजी रोखीने, बँकर्स धनादेश/प्रदान आदेश, डिमांड ड्राफ्ट किंवा त्यांच्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, मुंबई येथील खात्यात देय असलेले धनादेश बँकेची कामकाजाची वेळ संपण्यापूर्वी अधिदानाने प्रदान करण्यात येतील.

कर्जरोख्याचा कालावधी १० वर्षांचा असून, रोख्यांचा कालावधी १३ सप्टेंबर, २०२३ पासून सुरू होईल, तर कर्जरोख्याची परतफेड दिनांक १३ सप्टेंबर २०३३ रोजी पूर्ण किमतीने केली जाईल. व्याजाचा दर ७.४६ टक्के दर शेकडा एवढा असेल.  व्याजाचे प्रदान प्रतिवर्षी १३ मार्च आणि १३ सप्टेंबर रोजी सहामाही पद्धतीने करण्यात येईल.

शासकीय रोख्यांमधील बँकांची गुंतवणूक ही बँकिंग विनियम अधिनियम 1949 खालील कलम 24 अंतर्गत सांविधिक रोकड सुलभता गुणोत्तर (SLR) या प्रयोजनार्थ पात्र समजण्यात येईल. हे कर्जरोखे पुन: विक्री-खरेदीसाठी अनुज्ञेय असतील, अशी माहिती वित्त विभागाने दिली आहे.

००००

गोपाळ साळुंखे/ससं/

प्रवेश नियामक प्राधिकरणाच्या ऑनलाईन पुनर्विलोकन अर्ज प्रणालीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन

मुंबई, दि. 19 : राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष व प्रवेश नियामक प्राधिकरणामार्फत ऑनलाईन पुनर्विलोकन अर्ज प्रणाली (Admissions Regulating Authority MODULE) ची निर्मिती करण्यात आली आहे. या अर्ज प्रणालीचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते आज मंत्रालयात करण्यात आले.

या प्रसंगी मुख्य सचिव मनोज सौनिक, उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष आयुक्त महेंद्र वारभुवन, सामान्य प्रशासन विभागाचे सचिव सुमंत भांगे, वस्त्रोद्योग विभागाचे सचिव वीरेंद्र सिंग, उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे, माजी सनदी अधिकारी जे.पी.डांगे, तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.

खाजगी व्यावसायिक शैक्षणिक संस्थांमधील प्रथम वर्ष प्रवेशासाठी केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया राबविणाऱ्या राज्य सीईटी कक्षामार्फत दरवर्षी साधारणतः पावणेतीन ते तीन लाख विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येतो. यामधून प्रवेशित उमेदवारांच्या प्रवेशास मान्यता देण्याचे काम प्रवेश नियामक प्राधिकरण करत असते. प्रवेश नियामक प्राधिकरणाकडे सादर करण्यात आलेल्या अशा प्रस्तावांना मान्यता देण्याची प्रक्रिया जलद आणि सुलभ गतीने होण्यासाठी सदर प्रक्रिया ऑनलाईन प्रणालीद्वारे विकसित करण्यात आली आहे.

या ऑनलाईन प्रणालीच्या माध्यमातून उमेदवार तसेच महाविद्यालय यांना पुनर्विलोकन याचिका सादर करण्याची प्रक्रिया अतिशय सुलभ करण्यात आली आहे. त्यामुळे ही ऑनलाइन प्रणाली महाविद्यालय, उमेदवार आणि  पालक यांना उपयुक्त ठरणार आहे.

0000

काशीबाई थोरात/विसंअ/

महिलांसाठी जननी सुरक्षा व जननी‍ शिशु सुरक्षा योजना

            ग्रामीण व शहरी भागातील दारिद्र्य रेषेखालील  व अनुसूचित जाती जमातीच्या महिलांचे आरोग्य संस्थांमध्ये  होणाऱ्या प्रसूतीचे प्रमाण  वाढविणे व माता मृत्यू  व अर्भक मृत्यू प्रमाण कमी  करण्यासाठी  जननी सुरक्षा योजना  राबविण्यात येते. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व दारिद्र्य रेषेखालील सर्व गर्भवती महिला या योजनेसाठी लाभार्थी म्हणून पात्र आहेत. तसेच, बालकाला आवश्यक सेवा व उपचारात मदत करण्यासाठी जननी शिशु सुरक्षा योजना राबविली जात आहे.  या योजनांबाबत थोडक्यात…..

जननी सुरक्षा योजना

गरोदर मातांची लवकर नोंदणी, किमान तीन तपासण्या व सेवांचा लाभ, संस्थात्मक प्रसूती, जोखमीची वेळीच नोंद घेऊन संदर्भ सेवा, गरजेनुसार सिझेरियनसाठी अर्थसहाय्य, याद्वारे माता मृत्यू अर्भक मृत्युदर कमी करणे ही या योजनेची उद्दिष्टे आहेत.

            ग्रामीण व शहरी भागातील दारिद्र्य रेषेखालील लाभार्थीची प्रसूती घरी झाल्यास 500 रुपये, शहरी भागातील लाभार्थीची प्रसूती शासकीय किंवा शासनमान्य मानांकित आरोग्य संस्थेत झाल्यास 600 रुपये, ग्रामीण भागातील लाभार्थीची प्रसूती शासकीय किंवा शासनमान्य मानांकित आरोग्य संस्थेत झाल्यास 700 रूपये, तर सिझेरिअन शस्त्रक्रिया झाल्यास लाभार्थीस 1500 रुपये लाभ देय आहे.

प्रसूती सेवा उपलब्ध असलेल्या सर्व शासकीय आरोग्य संस्था व शासन मानांकित खासगी आरोग्य संस्थेत या सेवा उपलब्ध असून सेवा मिळण्यासाठी रहिवासी दाखला, जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला ही कागदपत्रे आवश्यक आहेत. आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर प्रसुतीनंतर 7  दिवसांच्या आत या योजनेचा लाभ हा लाभार्थीच्या बँक खात्यावर डीबीटी, पीएफएमएसद्वारे, धनादेशाद्वारे देण्यात येतो. योजनेचा लाभ घेण्यासाठी जवळच्या आशा, आरोग्य सेविका, अंगणवाडी सेविका किंवा जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा.

जननी शिशु सुरक्षा योजना

            या योजनेअंतर्गत गरोदर मातेस प्रसूती पश्चात 42  दिवसांपर्यंत मोफत सुविधा देण्यात येतात. प्रसूती, सिझेरीयन शस्त्रक्रिया, प्रसूती संदर्भातील गरोदरपणातील व प्रसूती पश्चात आवश्यक औषधे व साहित्य, प्रयोगशाळेतील तपासण्या, प्रसूती पश्चात आहार (स्वाभाविक प्रसूती 3 दिवस, सिझेरीयन प्रसूती – 7 दिवस), मोफत रक्तसंक्रमण, घरापासून आरोग्य संस्थेपर्यंत, एका आरोग्य संस्थेतून दुसऱ्या आरोग्य संस्थेत तसेच आरोग्य संस्थेतून घरापर्यंत वाहतूक व्यवस्था करण्याची सोय उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

तसेच, या योजनेंतर्गत एक वर्षापर्यंतच्या आजारी बालकास उपचारासाठी आवश्यक औषधे व साहित्य, प्रयोगशाळेतील तपासण्या, मोफत रक्तसंक्रमण, घरापासून आरोग्य संस्थेपर्यंत, एका आरोग्य संस्थेतून दुसऱ्या आरोग्य संस्थेत तसेच आरोग्य संस्थेतून घरापर्यंत वाहतूक व्यवस्था करण्याची सोय उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

            ही सेवा शासकीय आरोग्य संस्थेत उपलब्ध असून  आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर गरोदरपणाच्या काळात, प्रसूती दरम्यान, प्रसूतीनंतर 42 दिवसांपर्यंत व एक वर्षे वयापर्यंतच्या आजारी बालकास सेवा पुरविली जाते. मुलांच्या आरोग्याबाबत, संगोपनाबाबत व विनामूल्य उपचाराबाबत  आशा, आरोग्य सेविका, अंगणवाडी सेविका किंवा जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा.

00000

-संकलन- एकनाथ पोवार

माहिती अधिकारी, सांगली

ताज्या बातम्या

पाटण येथे तिरंगा रॅली संपन्न; पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी मानले भारतीय सैन्य दलाचे आभार

0
सातारा दि. 20 :  पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैन्य दलाने राबवलेल्या ऑपरेशन सिंदूर अंतर्गत दहशतवादांची ठिकाणे उद्धवस्त केली. दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैन्यदल उत्तर...

विभागीय आयुक्तांकडून मान्सूनपूर्व तयारीचा आढावा 

0
छत्रपती संभाजीनगर, दि. 20: हवामान विभागाने पावसाबाबत वर्तविलेल्या अंदाजानुसार प्रत्येक विभागाने मान्सून कालावधीत आपली यंत्रणा सज्ज ठेवावी, तसेच ‘पावसाळ्यात पूरस्थिती, इमारतीची पडझड, पाणी साचणे...

 कल्याणमधील इमारतीचा स्लॅब कोसळल्याने जीवितहानी

0
एकूण सहा जखमी तर सहा जणांचा मृत्यू; तहसिलदार कार्यालयाकडून अहवाल सादर ठाणे, दि.20(जिमाका):- कल्याण शहरातील कल्याण (पूर्व) चिकणीपाडा येथील सप्तशृंगी कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी या पाच...

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित सर्व रस्ते, पुल इमारतीची कामे तात्काळ पूर्ण करा – सार्वजनिक...

0
मुंबई, दि. २० : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत असलेले रस्ते व पुल पावसाळ्यात वाहतुकीकरीता सुस्थितीत ठेवण्यासाठी दक्षता घेणेबाबतचे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले...

विद्यानिकेतनच्या सक्षमीकरणासाठी सुविधा उपलब्ध करुन देणार – शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

0
मुंबई, दि. 20 : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राज्यात पाच शासकीय विद्यानिकेतन निवासी शाळा सुरू आहेत. या शाळांमधून दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून दिले...