गुरूवार, मे 15, 2025
Home Blog Page 1572

छत्रपती शिवाजी महाराजांकडून लढण्याचा आणि जिंकण्याचा गुण आत्मसात केला पाहिजे – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मंचर येथील छत्रपती शिवाजी महाराज महाद्वार आणि कार्डियाक अँब्युलन्सचे लोकार्पण

पुणे, दि. २१ –  अन्‍यायाविरुध्‍द लढण्‍याचे तेज ज्‍या मातीत रुजले आहे त्‍या मातीचा आशीर्वाद आपल्‍या पाठीशी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्‍या वास्‍तव्‍याने पावन झालेली नगरी आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी ठरलेली आहे. भक्ती आणि शक्तीचा संगम या भूमीत आपल्याला बघायला मिळतो. या पट्ट्यात अनेक महान संत, क्रांतीकारक होवून गेले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला अन्यायाविरुध्द लढण्याची शिकवण दिली आहे. त्यांच्याकडून आपण लढण्याचा व जिंकण्याचा गुण आत्‍मसात केला पाहिजे. आपल्या दैनंदिन जीवनात त्याचा उपयोग केला पाहिजे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.

जिल्‍ह्यातील आंबेगाव तालुक्‍यातील मंचर येथील छत्रपती शिवाजी महाराज महाद्वार नूतनीकरण कामाचे व कार्डियाक अँब्युलन्सचे ऑनलाईन उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्‍या हस्‍ते झाले. त्‍यावेळी ते बोलत होते. कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, जिल्‍हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जिल्‍हा परिषदेचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, निवासी उप जिल्‍हाधिकारी डॉ. जयश्री कटारे यांच्‍यासह इतर नागरिक ऑनलाईन उपस्थित होते.

मुख्‍यमंत्री उद्धव ठाकरे म्‍हणाले, नागरिकांनी प्रशासनाला कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी सहकार्य करावे. कोरोना विषाणूला जवळ येवू न देण्यासाठी नागरिकांनी काळजी घेतली पाहिजे, प्रत्‍येकाने  मास्कचा नियमित वापर करावा, वारंवार हात धुणे, वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छता करण्यावर भर देणे, संकटकाळात एकमेकांना मदत करणे यावर लक्ष दिले पाहिजे. तसेच प्रत्येक गावात कोरोना दक्षता समित्या स्थापन करुन त्यांच्या माध्यमातून जनजागृतीवर भर दिला पाहिजे असे सांगून या विषाणूवर अद्यापर्यंत कोणतेही औषध, लस बाजारात उपलब्ध नसल्यामुळे आपल्याला कोरोनासोबत जगायला शिकले पाहिजे, असे मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी सांगितले. गणेशोत्सव काळात नागरिकांनी विनाकारण गर्दी करु नये, प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे, असे सांगत मुख्यमंत्री ठाकरे यांनी श्री गणेशाला आणि छत्रपती शिवाजी महाराजांना राज्‍य, देश तसेच जगावरील कोरोनाचे संकट लवकरात लवकर नष्ट होऊ दे, सर्व कोरोनामुक्त होवू दे, असे साकडे घातले. प्रारंभी मुख्‍यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्व. किसनराव बाणखेले यांचे स्मरण  केले, तसेच जुन्‍या आठवणींना उजाळा देवून कार्यक्रमाची सुरुवात केली.

कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील म्हणाले, मंचर नगरीच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद होईल, असा हा दिवस आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्‍वारुढ पुतळा मंचरच्‍या वैभवात भर घालणारा असून तो सर्वांनाच प्रेरणा देत राहील. कोरोना विषाणूच्या संकटकाळात मोहरम व गणेशोत्सव सण साजरे करतांना नागरिकांनी कुठेही गर्दी करु नये, सामाजिक अंतर राखावे, वारंवार हात धुवावे, घराबाहेर पडतांना मास्कचा न चुकता वापर करावा, स्वयंशिस्त पाळावी. या काळात कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी पुणे जिल्हा प्रशासन उत्तम काम करीत असून नागरिकांनीही प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन केले. ग्रामपंचायतीने खरेदी केलेल्‍या कार्डियाक अँब्युलन्सचा उपयोग तालुक्‍यातील नागरिकांना होईल, असा विश्‍वासही त्‍यांनी व्‍यक्‍त केला.

माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी मनोगतात मंचरमधील घटनांना उजाळा दिला. ते म्‍हणाले, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते 1978 साली मंचर येथे (ता.आंबेगाव, जि.पुणे) छत्रपती शिवाजी महाराज वेशीचा उद्घाटन समारंभ संपन्न झाला होता. त्‍यानंतर तब्बल 42 वर्षांनी या वेशीचे भव्यदिव्य महाद्वारामध्ये रूपांतर करण्यात येऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यासह नूतनीकरण करण्यात आले आहे. तसेच ग्रामपंचायत निधीतून ग्रामपंचायतीने सुमारे 28 लक्ष रूपयांची कार्डियाक अँब्युलन्स खरेदी केलेली आहे. या अँब्युलन्समध्ये व्हेंटीलेटर, डिफायब्रीलेटर, ऑक्सीजन मशीन, मॉनिटर्स आदी कोरोनाविरोधात लढण्यासाठी सुसज्ज मशीन्‍स बसविण्यात आल्या आहेत. याचा उपयोग कोरोनाविरुध्‍दच्‍या लढाईत होईल, असा विश्‍वास त्‍यांनी व्‍यक्‍त केला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंचरचे सरपंच दत्ता गांजाळे यांनी केले. आभार वसंतराव बाणखेले यांनी मानले.

नोकरी शोधणारे आणि नोकरी देणारे यांच्यातील दुवा – ‘महाजॉब्स पोर्टल’!

औद्योगिक क्षेत्रात महाराष्ट्र हे सातत्याने अग्रेसर राहिले आहे. याला कारण म्हणजे आपल्या राज्याची भौगोलिक स्थिती, राज्यात वीज, पाणी आणि जमिनीची असलेली मुबलक प्रमाणातील उपलब्धता यासह आपल्या राज्यात मोठ्या प्रमाणात असलेल्या शिक्षण संस्थांमुळे कुशल मनुष्यबळ यांचाही मोठा वाटा आहे. राज्यातील उद्योगस्नेही धोरणाबरोबरच, उद्योग वाढीसाठी आवश्यक असलेल्या विमानतळ, जेट्टी, यांच्यासह दळणवळणासाठी सुसज्ज रस्ते यासारख्या पायाभूत सुविधा आहेत. देशात सातत्याने उद्योगक्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या महाराष्ट्रालाही कोविड-१९ या विषाणूच्या प्रादुर्भावानंतर अडचणींना तोंड द्यावे लागले होते.

महाराष्ट्राचा अर्थचक्राला फिरतं ठेवण्यासाठी ज्याप्रमाणे देश विदेशातून राज्यात येणारी राष्ट्र्रीय तसेच परकीय गुंतवणूक महत्त्वाची आहे. त्याचप्रमाणे मोठे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी लागणारे कुशल अकुशल कामगारांचीही आवश्यकता आहे. कोविड -१९ च्या पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक मजुर, कामगार जे परराज्यातून इथे पोटापाण्यासाठी आले होते, ते मोठ्या प्रमाणात स्थालांतरित झाले. टाळेबंदीमुळे अनेक उद्योगांना आपले उद्योग बंद ठेवावे लागले. ही टाळेबंदी उठल्यानंतरही उद्योगांना पुर्वपदावर येण्यासाठी मोठे आव्हान होते ते कामगारांचे. याच आव्हानाचे संधित रुपांतर करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी महाजॉब्सचा पर्याय राज्यासमोर ठेवला आहे.

उद्योग, कामगार तसेच कौशल्य विकास विभागाच्यावतीने स्थानिक तरुणांना रोजगार देण्यासाठी 6 जुलै रोजी महाजॉब्स वेबपोर्टलेचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते  करण्यात आले. महाराष्ट्र राज्यातील बेरोजगार तरुणांना त्यांच्या अंगी असलेल्या विविध कौशल्यांच्या आधारावर रोजगार शोधता यावा आणि कामगारांची कमतरता या समस्येवर मात करुन उद्योगांना आपले कार्य सुरळीतपणे पार पाडता यावे या उद्देशाने महाजॉब्स पोर्टल तयार करून दि. 6 जुलै 2020 या दिवशी सुरू केले. याचेच आता महाजॉब्स मोबाइल एप्लिकेशनसुद्धा उपलब्ध आहे. या महाजॉब्स ॲपचे उद्‍घाटन मा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या दिवशी करण्यात आले.

काय आहे महाजॉब्स?

उद्योग विभागाने केलेल्या पाहणीत राज्यातील उद्योगांत 50 हजार रोजगार उपलब्ध असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. त्यामुळे या पोर्टलद्वारे नोकरी मागणारे आणि देणारे यांच्यात शासनाने समन्वय साधण्याचा प्रयत्न केला आहे. महाजॉब्स पोर्टलद्वारे अभियांत्रिकी, लॉजिस्टिक, केमिकल आदी १७ क्षेत्राची निवड करण्यात आली आहे. त्यातील ९५० व्यावसायासाठी इच्छुक उमेदवार निवड करू शकतात. स्थानिक भूमिपुत्रांनांच नोकरीची संधी मिळावी यासाठी अधिवास (डोमेसाईल) प्रमाणपत्राची अट यामध्ये आहे.

महाजॉब्स पोर्टलची निर्मिती झाली ती, नोकरी शोधणारे कामगार आणि उद्योजक याच्यामधील दुवा तयार करण्यासाठी. निरनिराळ्या प्रकारच्या कौशल्यसंचात मनुष्यबळाची मागणी व पुरवठा यांच्यातील दरी कमी करणे हा या महाजॉब्स पोर्टलचा मुख्य उद्देश. यामुळे उद्योगांना अखंडपणे कार्य करण्यास सक्षम करणे शक्य होणार आहे. महाजॉब्समुळे महाराष्ट्रातील उद्योगांना योग्य स्थानिक कामगार मिळण्यासाठी कुशल, अर्ध-कुशल व अकुशल मनुष्यबळासाठी कायमस्वरूपी यंत्रणा निर्माण झाली आहे.

महाजॉब्स पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी अनेक कंपन्या आता पुढे सरसावल्या आहेत. अडीच ते तीन हजार कंपन्यांनी नोकरी देण्यासाठी रजिस्ट्रेशनही केले आहे. महाजॉब्स पोर्टलवर आतापर्यंत सुमारे 2 लाख 70 हजार लोकांनी रजिस्ट्रेशन केले आहे. तर, 22 हजार 355 नोकरी मागणाऱ्यांचे अर्ज आले आहेत.  पोर्टलच्या माध्यमातून 162 उद्योजकांमार्फत सुमारे 4,500 कामगारांना नोकरी देण्याची प्रक्रिया चालू झाली असून सुमारे 500 कामगारांना आतापर्यंत नेमणूक पत्र देण्यात आले आहे.

टाळेबंदीनंतर राज्यात सध्या 65 हजार उद्योग सुरू झाले आहेत. तर अनेक नवे उद्योग येऊ घातले आहेत. नुकतेच राज्य शासनाने देश-विदेशातील विविध कंपन्यांसोबत सुमारे 17 हजार कोटींचे सामंजस्य करार केले आहेत. याखेरीज नवीन उद्योग सुरू करण्यासाठी महापरावाना देणे सुरू केले आहे. अशा  स्थितीत उद्योगांत कुशल, अर्थकुशल तसेच अ-कुशल कामगारांची मागणी वाढली आहे. स्थानिकांना रोजगार मिळावा यासाठी महाजॉब्स हे वेबपोर्टल तयार करण्यात आले आहे. याकामी उद्योग, कामगार व कौशल्ये विकास विभागाच्या सूचना महत्वपूर्ण ठरल्या आहेत.

रोजगाराच्या शोधात असलेल्या इच्छुकांनी आपली माहिती महाजॉब्स पोर्टलवर अपलोड करणे आवश्यक आहे. एकदा नोंदणी केल्यानंतर विविध कंपन्याकडून इच्छुकांना नोकरीची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. यासाठी राज्यातील स्थानिक भूमिपुत्रांना रोजगाराची संधी निर्माण करून देणाऱ्या  http://mahajobs.maharashtra.gov.in  या संकेतस्थळावर नोकरी शोधणारे आणि नोकरी मागणारे या दोघांनीही नोंदणी करणे आवश्यक आहे.

महाजॉब्स ॲप

उद्योग, कामगार तसेच कौशल्य विकास विभागाच्यावतीने स्थानिक तरुणांना रोजगार देण्यासाठी महाजॉब्स वेबपोर्टलेचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले होते. ही प्रक्रिया अधिक सुकर व्हावी व तरुणांना हे पोर्टल सहजपणे वापरता यावे, यासाठी मोबाइल ॲप्लिकेशन विकसित करण्याची सूचना श्री. ठाकरे यांनी केली होती. त्यानुसार महाजॉब्स हे ॲप विकसित करण्यात आले आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून महाजॉब्ज ॲपचे अनावरण करण्यात आले. आतापर्यंत  सुमारे  764 लोकांनी हे ॲप डाऊनलोड केले आहे.

मोबाईल ॲपमुळे तरुणांना विनासयास नोकरी शोधणे शक्य झाले आहे, आपल्या पसंतीनुसार नोकरीचे ठिकाण देखील निवडता येते. तसेच तरुणांना रोजगारासंबंधी सर्व माहिती आपल्या मोबाइलमधून सहज मिळते आहे. नोकरी मागणारे आणि देणारे यांच्यातील संवाद यामुळे वाढण्यास मदत झाली आहे.

मोबाईल ॲप वापरण्यासाठी ही माहिती आवश्यक

  • वैयक्तिक माहिती (नाव, जन्म तारीख, सध्याचा पत्ता, कायम पत्ता, इ.)
  • मोबाइल क्रमांक (आवश्यक)
  • इमेल आयडी (वैकल्पिक)
  • अनुभव, कौशल्य आणि बायोडेटा
  • पॅन क्रमांक (वैयल्पिक, उपलब्ध असल्यास)
  • महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र (जोडणे आवश्यक)

महाजॉब्स मोबाईल ॲपचे महत्त्वपूर्ण वैशिष्ट्ये

  • सुलभ नोंदणी प्रक्रिया, नोकरी शोधणारे मोबाईल ॲपद्वारे ऑनलाईन नोंदणी करू शकतात. ज्यामध्ये त्यांना ओटीपी प्राप्त होईल, आणि नोंदणी प्रक्रिया पूर्ण होईल. नोंदणीनंतर वापरकर्ता मोबाइल किंवा इ मेलद्वारे लॉगिन करून आपले प्रोफाइल भरू शकतो.
  • नोकरी शोधणारे आपला प्रोफाइल आणि बायोडेटा काही सोप्या क्लिकसह अपडेट करून अर्ज करू शकतात. ज्यामध्ये वैयक्तिक माहिती, पत्ता, शैक्षणिक माहिती, कौशल्य, अनुभव, कोणत्या जिल्ह्यात काम करण्याची इच्छा आहे. रहिवासी प्रमाणपत्र अपलोड करणे आदी सुविधा उपलब्ध आहेत. नवीन कौशल्ये व इतर माहिती तो भरू शकतो. संपूर्ण माहिती भरलेले प्रोफाइल उद्योजकांना दिसतील.
  • नोकरी शोधक आपले कौशल्ये, शैक्षणिक पात्रता, मागील कामाचा अनुभव, क्षेत्र, प्रोफाइल तपशील, उद्योगाच्या पसंतीनुसार संबंधित नोकऱ्या शोधू शकतात. यासाठी वेगवेगळ्या फिल्टरची सोय दिलेली आहे.
  • नोकरी शोधणारे अनेक ठिकाणी अर्ज करू शकतात.
  • नोकरी शोधणारे अर्ज केलेल्या नोकरीची स्थिती सहजपणे पाहू आणि ट्रॅक करू शकतात. उद्योजकाने त्याला शॉर्टलिस्ट केले असल्याचे तसेच मुलाखतीनंतर निवड केल्यास त्यासंबंधी अलर्ट पाठविले जातील. सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी संगणकावर लॉगिन करून पाहण्याची गरज नाही. त्याऐवजी मोबाइल झटपट पाहता येतो.
  • फ्रेशर्स तसेच अनुभवी यासाठी नोंदणी करू शकतात.
  • नोंदणी प्रक्रिया सर्वांसाठी विनामुल्य आहे.
  • अँड्रॉइड मोबाइलवर हे ॲप उपलब्ध आहे.

राज्यशासनातर्फे ॲप आणि वेबपोर्टलच्या माध्यमातून नोकरी देणारे आणि नोकरी मागणारे यांच्यादरम्यान एक भक्कम सेतू उभारण्याचे काम झाले आहे. आता आवश्यकता आहे, ती स्थानिक उद्योजकांनी आपल्याला आवश्यक असलेल्या कामगारांची मागणी करण्याची आणि स्थानिक तरुणांनी या उपलब्ध संधीचा जास्तीत जास्त फायदा घेण्याची. तर आजच आपल्या स्मार्ट फोनच्या प्लेस्टोअर मधुन  https://play.google.com/store/apps/details?id=com.mahajobs या लिंकवर जाऊन हे ॲप डाऊनलोड करा, किंवा  http://mahajobs.maharashtra.gov.in  या संकेतस्थळावर जाऊन आपला प्रोफाईल पुर्ण करा.

अर्चना शंभरकर

वरिष्ठ सहायक संचालक

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय

‘लिपिक’ पदाचे पदनाम आता ‘महसूल सहायक’- महसूलमंत्री बाळासाहेब थोरात

मुंबई, दि. २१ : महसूल विभागांतर्गत क्षेत्रीय कार्यालयातील लिपिक गट पदाचे पदनाम आता महसूल सहायक करण्यात आल्याची माहिती महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली.

महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेची राज्यातील महसूल विभागांतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयातील ‘लिपिक गट क‘ कर्मचाऱ्यांची तांत्रिक लिपिक ऐवजी ‘महसूल सहायक‘ असे पदनाम करावे अशी मागणी होती. राज्य शासनाने महसूल कर्मचारी संघटनेची ही मागणी मान्य केली आहे. सदर कर्मचाऱ्यांना पदनाम बदलामुळे शासनावर कोणताही आर्थिक बोजा पडणार नसल्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले आहे.

श्री गणपती बाप्पांच्या कृपेने महाराष्ट्र लवकरच कोरोनामुक्त होईल – उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विश्वास

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून श्री गणरायांना वंदन व गणेशोत्सवाच्या शुभेच्छा

पुणे, दि. २१ :-उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुखकर्ता, विघ्नहर्ता श्रीगणरायांच्या चरणी वंदन केलं असून राज्यावरील कोरोनाचं संकट दूर कर, महाराष्ट्राला लवकर कोरोनामुक्त कर, असं साकडं श्री गणपती बाप्पांना घातलं आहे. बाप्पांच्या आगमनानं घराघरात आनंद, उत्साह, चैतन्याचं, भक्तीचं वातावरण निर्माण झालं आहे. भक्तीमय वातावरणात साजरा होत असलेला यंदाचा गणेशोत्सव कोरोनाप्रतिवबंधक नियमांचं पालन करुन साजरा होईल. श्रीगणरायांच्या आशिर्वादाने संपूर्ण महाराष्ट्र लवकरंच कोरोनामुक्त होईल, असा विश्वास व्यक्त करीत उपमुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला श्रीगणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

उपमुख्यमंत्री अजित पवार श्रीगणेशोत्सवानिमित्त दिलेल्या शुभेच्छा संदेशात म्हणतात की, कोरोना संकटामुळे गणेशभक्तांनी घरगुती व सार्वजनिक गणेशोत्सव यंदा गर्दी टाळून, सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून साधेपणानं साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. सामाजिक जाणीवेतून गणेशोत्सव साधेपणानं साजरा होत असला तरी, आनंद, उत्साह, भक्तीमध्ये जोश कायम आहे. त्यात उणीव नाही. बुद्धीची देवता असलेल्या श्रीगणरायांच्या समस्त भक्तांनी श्रीगणेशोत्सवासंदर्भात घेतलेल्या कौतुकास्पद निर्णयामुळे राज्यातील कोरोनाचा संसर्ग रोखला जाईल तसंच श्री गणपती बाप्पांच्या कृपेने महाराष्ट्र लवकर कोरोनामुक्त होण्यास मदत होईल, असा मला विश्वास आहे, असं सांगून उपमुख्यमंत्र्यांनी गणेशोत्सव काळात सुरक्षिततेची काळजी घेण्याचं आवाहन सर्वांना केलं आहे.

यंदाचा गणेशोत्सव साधेपणाने साजरा करूया! : महसूलमंत्री बाळासाहेब थोरात

मुंबई, दि.२१ : गणेशोत्सव हा आपल्या सर्वांसाठी आनंदाचा आणि उत्साहाचा सोहळा. कोविड-१९ चा मुकाबला करण्यासाठी सध्या राज्यात लॉकडाऊन करण्यात आला आहे. राज्यात ‘मिशन बिगीन अगेन‘ करण्यात आले असले तरी आपण सगळ्यांनी यापुढील काळातही काळजी घेणे आवश्यक आहे.  मात्र यावर्षी आपण आपल्या सुरक्षा आणि स्वच्छतेला प्राधान्य देत यंदाचा गणेशोत्सव साधेपणानं साजरा करूया. जगावर आलेले हे संकट टळूदे, पुन्हा एकदा जनजीवन गतिमान होऊ दे, अशी प्रार्थनाही गणरायाला आपण सर्वांनी करूया असे आवाहन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.

श्री. थोरात म्हणाले की, आज फक्त भारतापुढे नाही, तर जगासमोर कोविड-१९ चे संकट उभे राहिले आहे. त्यामुळे आपण सर्वांनी स्वयंशिस्त आणि संयम दाखवित येणाऱ्या काळातही आपल्या सर्वांना एकजुटीने परिस्थितीशी सामना करूया. दरवर्षी अत्यंत उत्साहाने आणि आनंदाने आपण गणेशोत्सव साजरा करतो परंतु यंदा सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करत असताना एकूण जगावर, देशावरचे कोविड-१९ संकट आपल्याला माहित आहे. त्यामुळे यावर्षीचा गणेशोत्सव सार्वजनिक मंडळे आणि घरगुती गणपती यांनी साधेपणाने साजरा करावा. पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करताना गणेशोत्सव काळात कोविड-१९ चा संसर्ग होऊ नये यासाठी सार्वजनिक ठिकाणी गर्दी करण्याचे टाळूया. आपल्या मनामध्ये भावना आणि सामाजिक भान ठेवून उत्सव साजरा करूया.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे यांनी ‘रुसा’ अंतर्गत उपाययोजनांचा प्रस्ताव तयार करावा – उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत

मुंबई, दि. २१ : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेर यांनी राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षा अभियान ( RUSA ) अंतर्गत प्राप्त निधीतून करावयाच्या उपाययोजना आणि भविष्यातील शैक्षणिक सुविधा याबाबत सविस्तर प्रस्ताव तयार करावा अशा सूचना उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिल्या.

 राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षा अभियान ( RUSA ) अंतर्गत प्राप्त निधीतून करण्यात आलेल्या उपाययोजना आणि प्रलंबित कामांचा आढावा याबाबत आज उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखालील झालेल्या  बैठकीत घेण्यात आला.

श्री. सामंत म्हणाले,विद्यापीठाच्या विकासासाठी रुसा अंतर्गत प्राप्त निधीचा एक शैक्षणिक आराखडा तयार करावा त्यासाठी लागणार निधी भविष्यातील शैक्षणिक गरज लक्षात घेऊन हा आराखडा तयार करावा त्यामुळे प्रलंबित कामांना गती मिळाले आणि नवीन कामे सुरू करण्यास मदत होईल त्यासाठी हा आराखडा तातडीने तयार करावा आशा सूचना श्री. सामंत यांनी यावेळी केल्या.

पुणे येथील शासकीय तंत्रनिकेतन येथील कार्यरत असलेल्या अधिव्याख्यातांच्या अडचणींबाबत बैठक संपन्न

पुणे येथील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये कार्यरत असलेल्या अधिव्याख्यातांच्या अडचणींबाबत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. बैठकीत कर्मचाऱ्यांना येणाऱ्या अडचणी बद्दल सविस्तर आढावा घेण्यात आला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अडचणींसंदर्भात उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

मुंबई, दि. २१ : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद येथील विद्यार्थ्यांना दर्जेदार शैक्षणिक सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजे त्यासाठी विद्यापीठाच्या ज्या अडचणी आहेत त्या तातडीने दूर करून आवश्यक त्या उपाययोजना करण्यासाठी शासन सहकार्य करेल, असे आश्वासन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज येथे दिले.

आज मंत्रालयात दुरदृश्य प्रणालीद्वारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद यांच्या अडचणीसंदर्भात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री. सामंत यांच्या अध्यक्षतेखाली  बैठक आयोजित करण्यात आली होती.

श्री. सामंत म्हणाले, जालना येथे कौशल्य विकास अभियानातंर्गत कौशल्य विकास केंद्र सुरू करण्याबाबत शासन सकारात्मक असून याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे तातडीने पाठवावा. तसेच घनसांगवी येथील मॉडेल डिग्री कॉलेजच्या अडचणी आणि निधीसंदर्भात मुख्य सचिव यांच्याशी चर्चा करण्यात येईल असेही श्री. सामंत यांनी यावेळी सांगितले.

बैठकीत वसंतराव नाईक जन्मशताब्दी वर्षानिमित्त भटक्या व विमुक्त जाती – जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी वसतीगृह निर्मिती, दीनदयाळ उपाध्याय कौशल्य केंद्रास मुदतवाढ देणे, गोपीनाथराव मुंडे राष्ट्रीय ग्रामीण विकास व संशोधन संस्थेस स्थैर्य प्राप्त करून देणे, यशवंतराव चव्हाण जन्मशताब्दी वर्षानिमित्त मुलींच्या वसतिगृहासाठी पदनिर्मिती प्रस्ताव, २०१८-१९ च्या खरीप हंगामातील दुष्काळ सदृष्य तालुक्यातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करणे, संतपीठा तातडीने सुरू करण्यासाठी सर्व प्रशासकीय बाबीची पूर्तता करणेबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. आणि विद्यापीठाच्या सर्व अडचणी सकारात्मकपणे सोडविल्या जातील आणि याबद्दल पुढील आठवड्यात पुन्हा एकदा आढावा बैठक घेण्यात येईल असेही श्री.सामंत यांनी यावेळी सांगितले.

नोडल अधिकारी नेमावा अशा विद्यापीठांना सूचना

राज्यशासन आणि विद्यापीठे यांच्यात योग्य  समन्वय राहावा यासाठी राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठांनी नोडल अधिकारी नेमावा त्यामुळे प्रलंबित कामांना गती मिळण्यास मदत होईल अशा सूचनाही श्री. सामंत यांनी यावेळी केल्या.

या बैठकीस तंत्र शिक्षण संचालक डॉ. अभय वाघ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले, संबंधित अधिकारी उपस्थित होते.

‘कोरोनाशी लढताना सर्वांना अधिक शक्ती मिळो!’ – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

‘गणेशोत्सवानिमित्त राज्यातील जनतेला शुभेच्छा!’

मुंबई, दि. २१ :-  श्री गणेशाची प्रतिष्ठापना आपण दरवर्षीप्रमाणे यंदाही करतो आहोत मात्र यावेळेस आपल्यासमोर कोरोनाचे विघ्न आहे. या विघ्नातून लवकरात मुक्ती मिळावी तसेच या साथीचा मुकाबला करण्यासाठी कोविड योद्ध्यांना आणि आपल्या सर्वांना शक्ती मिळो अशी प्रार्थना केल्याचे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला श्री गणेश आगमनाच्या पुर्वसंध्येला शुभेच्छा दिल्या आहेत.

आरोग्य आणि समाज प्रबोधनावर भर द्या

सण आणि उत्सवांची बदलेली रूपे आपण पाहिली आहेत, यातील काळानुरूप बदल आपण स्वीकारले आहेत. सामाजिक जागृतीसाठी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात झाली, कोरोनामुळे जिथे सगळे जग हादरून गेले आहे तिथे याविरुद्ध एक मोठा लढा लढण्याची संधी आपल्याला मिळाली आहे, यातून एक नवे समाज प्रबोधन आपण करू आणि सामाजिक भान ठेऊन शांततेत यंदाचा गणेशोत्सव आपण साजरा करू असेही मुख्यमंत्री म्हणाले. 

नियम पाळा, गाफीलपणा नको

संपूर्ण उत्सव काळात गर्दी होणार नाही, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही याची प्रत्येकाने दक्षता घ्यावी असे आवाहन करतानाच गाफील न राहता आतापर्यंत आपण जी काळजी घेतो आहोत तीच पुढेही घ्यावी असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले आहे. 

गणेश मंडळांना धन्यवाद 

राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, महानगर पालिका आयुक्त, जिल्हा पोलीस अधीक्षक, जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याशी नुकतीच चर्चा करून त्यांनाही सुचना दिल्या आहेत असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, आता ही वेळ नियम पाळून उत्सव साजरा करण्याची आहे. श्रीगणेशाचे आगमन असो किंवा विसर्जन असो, प्रत्येकाने कोरोनाचा प्रादुर्भाव आपल्या घरात, गल्लीत आणि कॉलनीत होणार नाही याची दक्षता घेणे अत्यावश्यक आहे. 

काही सार्वजनिक गणेश मंडळांनी सामजिक प्रबोधन व आरोग्य शिबिरे घेण्याचे नियोजन केले आहे, त्यांचे अभिनंदन करून मुख्यमंत्री म्हणाले की, गणेशोत्सवातून सार्वजनिक गणेश मंडळांनी  सामाजिक, प्रबोधनात्मक संदेश हाती घ्यावा तसेच मंडळांनी ऑनलाईन दर्शनाची सुविधा उपलब्ध करून दिल्यास अधिक सोयीचे होईल. शासनाने घालून दिलेले नियम पाळत असल्याबद्द्ल मुख्यमंत्र्यांनी या मंडळांना धन्यवाद दिले आहेत.

पूरग्रस्तांना तातडीने मदत करा – विधानसभा अध्यक्ष नाना पटोले

भंडारा दि. २१:- जिल्ह्यातील विविध भागामध्ये अतिवृष्टीमुळे पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि त्याचा फटका मोठ्या प्रमाणात काही गावांना तसेच वस्त्यांना बसलेला आहे. आज लाखनी तालुक्यातील अतिवृष्टीमुळे प्रभावित झालेल्या भागांना विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी स्वतः भेट देऊन आवश्यक ती कार्यवाही तातडीने करण्याचे आदेश प्रशासनाला दिले.

याप्रसंगी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी संदीप कदम, स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच सर्व विभागाचे अधिकारीदेखील उपस्थित होते. ज्यांच्या घरांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरलेले असून अन्नधान्य देखील खराब झालेले आहे त्यांच्या जेवणाची आणि राहण्याची सोय सुद्धा करण्याचे आदेश तातडीने देण्यात आलेले आहेत. या पाहणी दौऱ्यात श्री. पटोले यांनी प्रभावित नागरिकांची भेट घेऊन त्यांना शासन आपल्या पाठीशी असून सर्वतोपरी मदत व सहकार्य करण्याची ग्वाही दिली.

सर्व जनतेला विनंती आहे की कृपया काळजी घ्यावी, विशेष करून लहान मुलांची काळजी घ्यावी. कुठलेही साथीचे रोग पसरू नयेत यासाठी योग्य दक्षता घेण्याचे आदेश आरोग्य विभागाला देखील देण्यात आलेले आहेत तसेच आपत्कालीन परिस्थितीसाठी आवश्यक असलेले सर्व संपर्क क्रमांक 24 तास सुरु ठेवा असे निर्देश नाना पटोले यांनी प्रशासनाला दिले.

‘कोरोना’च्या रुग्णांना खाटा अपुऱ्या पडणार नाहीत याची दक्षता घ्या – उपमुख्यमंत्री अजित पवार

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला पुणे जिल्ह्यातील ‘कोरोना’ व्यवस्थापन व नियोजनाचा आढावा

पुणे, दि. 21 : पुणे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रासह ग्रामीण भागात ‘कोरोना’चा रुग्णदर व मृत्यूदर नियंत्रणात आणण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशा सूचना देवून  ‘कोरोना’च्या रुग्णांना खाटा अपुऱ्या पडणार नाहीत, याची दक्षता घेण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिले.

विधानभवन सभागृहात उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुणे जिल्ह्यातील ‘कोविड व्यवस्थापन व नियोजना’बाबत बैठक झाली. यावेळी ते बोलत होते. बैठकीला महापौर मुरलीधर मोहोळ, विभागीय आयुक्त सौरभ राव, जमाबंदी आयुक्त एस.चोक्कलिंगम, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पुणे महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, संदीप बिष्णोई, पोलीस अधीक्षक संदीप पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, आरोग्य विभागाच्या संचालक डॉ. अर्चना पाटील, ‘आयसर’चे अर्नब घोष व डॉ. आरती नगरकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक नांदापूरकर, आरोग्य उपसंचालक डॉ. संजय देशमुख, ससूनचे प्रभारी अधीष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.जयश्री कटारे तसेच वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

पुणे जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न केला पाहिजे. पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतो आहे. कोणत्याही परिस्थितीत शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातील कोरोना संसर्गावर नियंत्रण आणणे गरजेचे आहे, यासाठी सर्वांनी विशेष लक्ष देऊन काम करावे. तसेच कोरोनाबरोबरच पावसाळ्यातील अन्य संसर्गाचे आजार व सारी आजाराच्या रुग्णांवर वेळेत व योग्य ते वैद्यकीय उपचार मिळवून देण्याच्या दृष्टीने आरोग्य विभागाने आवश्यक ती खबरदारी घ्यावी.

पुण्यातील गणेशोत्सव आणि विसर्जन मिरवणुकीला मोठी परंपरा आहे. परंतु यावर्षी कोरोनाची महामारी असल्यामुळे संसर्ग रोखण्यासाठी घरगुती स्वरुपात गणेशोत्सव साजरा करणे आवश्यक आहे. नागरिकांनी घरातल्या गणपतींचे घरातच तर सार्वजनिक मंडळांच्या गणेश मुर्तींचे विसर्जन देखील साधेपणाने करणे गरजेचे आहे. यासाठी कोणीही सार्वजनिक विसर्जनाच्या ठिकाणी गर्दी करु नये. ‘कोरोना’चा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी मानाचे गणपती व अन्य कुठल्याही गणपतीच्या दर्शनासाठी कोणालाही परवानगी देता येणार नाही, याची पोलीस विभागाने दक्षता घेण्याची सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.

कोरोनाच्या परिस्थितीमुळे जिल्ह्यातील विकासाचे प्रकल्प कोणत्याही परिस्थितीत रखडणार नाहीत याची दक्षता घ्यावी. पुरंदर विमानतळाचे काम लवकरात लवकर सुरु होऊन गतीने पूर्ण होण्यासाठी प्रयत्न करावेत. पुणे-नाशिक रेल्वेमार्गाचे काम मार्गी लागण्यासाठी उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी, असे सांगून पुणे मेट्रोसह जिल्ह्यातील महत्‍त्वपूर्ण प्रकल्पांची कामे वेगाने पूर्ण होण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले, गणेशोत्सव कालावधीत गणेश विसर्जनाबाबत सार्वजनिक गणेश मंडळांना विश्वासात घेऊन पोलीस विभाग व महापालिका प्रशासनाने योग्य ते नियोजन केले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता घरगुती स्वरुपात विसर्जन करणे, तसेच फिरते विसर्जन हौदाची व्यवस्था करणे तसेच गणेश मुर्तीं दान केंद्रे स्थापन करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.

विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी पुणे जिल्ह्यातील आतापर्यंतची कोरोनाबाधित रुग्णांची सद्यस्थिती,  कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या,  बाधित रुग्णांची क्षेत्रनिहाय माहिती, नमुना तपासणी प्रयोगशाळा, रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी, तपासण्यात आलेल्या बिलांचे व्यवस्थापन, बेड व्यवस्थापन आदि विषयी  माहिती दिली.

जिल्हाधिकारी डॉ राजेश देशमुख यांनी ग्रामीण भागातील ‘कोरोना’ स्थितीची माहिती दिली. ग्रामीण भागात अँटीजेन टेस्ट वाढविण्यात येत असल्याचे सांगितले तसेच ज्येष्ठ नागरिक व सहव्याधीग्रस्तांच्या तपासणीवर भर देवून रुग्णदर,  मृत्यूदर कमी करण्यासाठी उपाययोजना करण्यात येत असून यामुळे ग्रामीण भागातील कोरोना परिस्थिती नियंत्रणात येईल, असे त्यांनी सांगितले.

‘आयसर’चे अर्नब घोष व डॉ. आरती नगरकर यांनी कोरोना विषयी सादरीकरण केले. जमाबंदी आयुक्त एस.चोक्कलिंगम, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, संदीप बिष्णोई, पोलीस अधीक्षक संदीप पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, आरोग्य विभागाच्या संचालक डॉ. अर्चना पाटील तसेच इतर उपस्थित अधिकाऱ्यांनी आपल्या विभागात सुरू असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.

ताज्या बातम्या

संत भोजाजी महाराज देवस्थानच्या पर्यटनस्थळाचा दर्जा उन्नतीसाठी प्रस्ताव करा- मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

0
मुंबई, दि. १४ : विदर्भाची पंढरी समजल्या जाणाऱ्या संत भोजाजी महाराज देवस्थानच्या पर्यटनस्थळाचा 'ब' दर्जा उन्नतीसाठी प्रस्ताव सादर करावा, असे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर...

उमरेड तालुक्यातील खाणपट्ट्यांची तपासणी करा – मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

0
मुंबई, दि. १४ : उमरेड तालुक्यातील शासकीय जागेवरील कोणतीही खाणपट्टी मंजूर करू नये. लीज संपलेल्या खाणपट्ट्यांची सोळा मुद्द्यांवर आधारित तपासणी करावी. खणलेल्या खाणपट्ट्यांच्या ठिकाणी...

महाराष्ट्र शासनाचे अधिकृत संकेतस्थळ तांत्रिक अद्ययावत करण्यासाठी १५ व १६ मे रोजी बंद

0
मुंबई, दि. १४: महाराष्ट्र राज्य शासनाचे अधिकृत संकेतस्थळ www.maharashtra.gov.in  व शासन निर्णय संकेतस्थळ www.gr.maharashtra.gov.in  हे पोर्टल नियमित देखभालीबरोबरच तांत्रिकदृष्ट्या अद्ययावत करण्यात येणार आहे, त्यासाठी...

प्रलंबित वनहक्क दावे निकाली काढण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम आखा – मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

0
मुंबई दि. १४ : प्रलंबित वनहक्क दावे निकाली काढण्यासाठी कालबद्ध कार्यक्रमाची आखणी करून राज्यात या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी नियोजन करावे. याचबरोबर सामुदायिक वनहक्क...

पालघर व ठाणे जिल्ह्यात मत्स्यव्यवसायाच्या नुकसान भरपाईसाठी सहकार्य – मंत्री मकरंद जाधव-पाटील

0
मुंबई, दि. १४ : अवकाळी पावसामुळे पालघर व ठाणे जिल्ह्यात मासेमारी बोटींचे, जाळी, सुकी मासळीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. नुकताच मत्स्य व्यवसायाला कृषी...