गुरूवार, मे 15, 2025
Home Blog Page 1573

‘कोरोना’मुळे राज्याची विस्कटलेली आर्थिक घडी पूर्वपदावर आणण्यासाठी प्रयत्नशील -उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे, दि. २१:- ‘कोरोना’ विषाणूशी सामना करीत विविध विकास कामे मार्गी लावण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असून या विषाणूमुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे राज्याची विस्कटलेली आर्थिक विकासाची घडी पूर्वपदावर आणण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज केले.

उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात हवेली तालुक्यातील शेवाळेवाडी ग्रामपंचायतीच्या विविध विकास कामांचे कळ दाबून ऑनलाईन उद्घाटन केले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ राजेश देशमुख, सरपंच अशोक शिंदे, उपसरपंच अमोल जगताप, विक्रम शेवाळे उपस्थित होते. तसेच  कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आमदार जगन्नाथ बाप्पू शेवाळे, आमदार संजय जगताप,  जिल्हा परिषदेचे सदस्य दिलीप घुले, सदस्या अर्चना कामठे, हवेली पंचायत समितीचे सदस्य दिनकर बापू हरपळे, ग्रामसेवक एम.पी.चव्हाण, सर्व ग्रामपंचायत सदस्य, संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता समिती, पाणीपुरवठा व स्वच्छता समिती, महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे सदस्य यांच्यासह समस्त शेवाळेवाडीचे ग्रामस्थ, ग्रामपंचायतीचे कर्मचारी दृकदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, ‘कोरोना’ सारख्या संकट काळात शेवाळेवाडी ग्रामपंचायतीने शासनाच्या वतीने देण्यात आलेल्या निर्देशाचे पालन करीत विविध विकासकामे पूर्ण करण्यावर भर दिला असून ही चांगली बाब आहे. एका बाजूने विकास कामे हाती घेत दुसऱ्या बाजूने ग्रामपंचायत पदाधिकारी, प्रशासन, आरोग्य विभाग, आशा वर्कर व ग्रामस्थ यांच्या सामूहिक प्रयत्नाने कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत  नियोजनबद्ध कृती आराखडा तयार करुन कोरोनामुक्तीकडे वाटचाल करीत आहेत. पाणी गुणवत्ता, शौचालय, घनकचरा, सांडपाणी यांचे व्यवस्थापन, परसबागेसाठी पाण्याचे नियोजन, वृक्ष लागवड, वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छता, जनावरांच्या मलमूत्राचे शास्त्रीय पद्धतीने विसर्जन, यांसारखी लोकसहभागातून विविध कामे झालेली आहेत. याबद्दल ग्रामपंचायतीचे अभिनंदन केले. या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून अधिकाधिक लोकाभिमुख, पारदर्शक, दर्जेदार व टिकाऊ स्वरुपाची कामे पूर्ण व्हावीत, विकासाचा गाडा यापुढेही असाच सुरु राहील, अशी आशा व्यक्त करत पुढील कार्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुभेच्छाही दिल्या.  

शेवाळेवाडी ग्रामपंचायतीच्या वतीने शापुरजी पालनजी आणि कंपनी यांच्या सामाजिक उत्तरदायित्व निधी, लोकवर्गणी, ग्रामनिधी यांच्या माध्यमातून दीड किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे काम पूर्ण केले असून यासाठी एकूण २.२५ कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे. या रस्त्याला ‘लोकनेते शरदचंद्रजी पवार मार्ग’ असे नाव देण्यात आले आहे. जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागांतर्गत ‘एकात्मिक पाणीपुरवठा’ योजना व ग्रामनिधी यांच्या माध्यमातून तीन लक्ष लिटर पाण्याच्या टाकीचे बांधकाम पूर्ण केले असून यासाठी एकूण ३७ लक्ष रुपयाचा निधी खर्च करण्यात आला आहे. जिल्हा परिषदेच्या ‘जनसुविधा योजने’अंतर्गत शेवाळेवाडी- मांजरी बुद्रुक हद्दीलगत असलेल्या स्मशानभूमीचे काम पूर्ण झाले असून या  कामासाठी एकूण ५.६० लक्ष रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे.

शेतकऱ्यांचा सर्व कापूस खरेदी करणार – पणनमंत्री जयंत पाटील यांचे आश्वासन

राज्यातील कापूस खरेदीच्या अडचणीसंदर्भात पणनमंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न

मुंबई, दि. २१ : राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठिशी राज्य शासन खंबीरपणे उभे आहे. यावर्षी गेल्या दहा वर्षातील विक्रमी कापूस खरेदी केली आहे. कोणत्याही शेतकऱ्याचा कापूस खरेदी शिवाय राहणार नाही, असे आश्वासन पणन मंत्री जयंत पाटील यांनी दिले.

कापूस पणन महासंघाच्या अडचणीसंदर्भात पणन मंत्री श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित केली होती.

श्री. पाटील म्हणाले, राज्यात यंदा कापसाची विक्रमी खरेदी झाली आहे. महासंघाने आपल्या क्षमतेपेक्षा जास्त कापूस खरेदी केली आहे. कोणत्याही शेतकऱ्याचा कापूस खरेदीविना पडू नये याची काळजी राज्य शासन आणि पणन महासंघाने घेतली आहे. राज्य शासन कापूस पणन महासंघासमोरील कापूस खरेदी संदर्भातील सर्व अडचणी सोडवून योग्य त्या उपाययोजना करेल तसेच दि कॉटन कार्पोरेशन ऑफ इंडियासोबत (सीसीआय) बैठक घेऊन या अडचणींतून मार्ग काढला जाईल. त्यामुळे पुढील हंगामात सुद्धा जर एवढ्या मोठ्या प्रमाणात कापूस खरेदी करावी लागली तर अडचणी येणार नाहीत त्यासाठी या उपाययोजना तातडीने करण्यात येतील, असेही श्री. पाटील यांनी यावेळी संगितले

बैठकीला पणन विभागाचे प्रधान सचिव अनुपकुमार, महासंघाचे अध्यक्ष अनंत देशमुख, उपाध्यक्ष विष्णुपंत सोळंके, कापूस पणन महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक नवीन सोना आदी उपस्थित होते.

मुंबई महापालिका क्षेत्रात सार्वजनिक उत्सवासाठी नऊ तपासणी पथकांची नियुक्ती

मुंबई, दि. २१ : सार्वजनिक उत्सवासाठी उभारण्यात येणाऱ्या मंडपांच्या तपासणीसाठी मुंबई शहर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुंबई महानगरपालिका क्षेत्रात तीन समित्या व नऊ पथकांची नियुक्ती केली आहे. आगामी सणासुदीच्या कालखंडात विविध मंडळांतर्फे उत्सव साजरे केले जातील. त्या अनुषंगाने उभारण्यात येणाऱ्या मंडपांची तपासणी करुन त्याचा अहवाल देण्याची जबाबदारी या पथकांवर सोपविण्यात आली आहे.

उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार महानगरपालिका क्षेत्रामध्ये सार्वजनिक सण, उत्सव, समारंभासाठी उभारण्यात येणाऱ्या मंडप तपासणीबाबत संबंधित जिल्हाधिकाऱ्यांमार्फत तहसीलदार, नायब तहसीलदार अथवा त्यावरील अधिकाऱ्यांच्या गठित मंडप तपासणी पथकातर्फे उत्सव सुरु होण्यापूर्वी मंडप तपासणी करुन त्याचा अहवाल संबंधित सक्षम प्राधिकाऱ्यांकडे आवश्यक कार्यवाहीसाठी सादर करणे आवश्यक आहे. यानुसार मुंबई शहरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी 3 समिती व 9 पथकांची नियुक्ती केली आहे.

विभागनिहाय तपासणी पथक असे

ए विभाग – मीनल दळवी, तहसीलदार तथा रचना व  कार्यपध्दती अधिकारी, मुंबई शहर (दुरध्वनी क्र. 22665233, भ्रमणध्वनी क्र. 9324213025, ई मेल magcollectormumbaicity@gmail.com)

बी विभाग – प्रसाद कालेकर, नायब तहसीलदार, मलबार हिल विधानसभा मतदार संघ, (दुरध्वनी क्र. 22665233, भ्रमणध्वनी क्र. 8308037954, ई मेल magcollectormumbaicity@gmail.com),

ई विभाग – प्रकाश भोसले, नायब तहसीलदार निवडणूक शाखा (दुरध्वनी क्र. 22665233, भ्रमणध्वनी क्र. 9892363373, ई मेल magcollectormumbaicity@gmail.com),

सी विभाग – अश्विनकुमार पोतदार, तहसीलदार करमणूककर वसुली शाखा (दुरध्वनी क्र 22665233, भ्रमणध्वनी क्र.  7588813400, magcollectormumbaicity@gmail.com)

डी विभाग – अशोक सानप, नायब तहसीलदार, अति/निष्का धारावी विभाग, (दुरध्वनी क्र. 22665233, भ्रमणध्वनी क्र.  9967977259  magcollectormumbaicity@gmail.com)

 जी विभाग – एम. आर. वारे, वरळी विधानसभा मतदार संघ, (दुरध्वनी क्र. 22665233, भ्रमणध्वनी क्र.  7038430195, ई मेल  magcollectormumbaicity@gmail.com),

एफ नॉर्थ विभाग – एम आर जाधव, नायब तहसीलदार सायन कोळीवाडा विधानसभा मतदार संघ, दुरध्वनी क्र. 22665233, भ्रमणध्वनी क्र. 9404987473  magcollectormumbaicity@gmail.com),

जी नॉर्थ विभाग – श्याम सुरवसे,  तहसीलदार, निवडणूक शाखा, (दुरध्वनी क्र. 22665233, भ्रमणध्वनी क्र.   9881108916  magcollectormumbaicity@gmail.com),

एफ साऊथ विभाग  – आशा तामखेडे, तहसीलदार जमीन महसूल वसूली शाखा, (दुरध्वनी क्र. 22665233, भ्रमणध्वनी क्र.  9137773090  magcollectormumbaicity@gmail.com)

चंदगड येथे ट्रामा केअर सेंटर व मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल उभारणीस पाठपुरावा करु – सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर

कोल्हापूर, दि. २० : राज्यातील ग्रामीण भागात आरोग्याच्या आवश्यक सुविधा उपलब्ध करुन देण्यास राज्य शासनाने सर्वोच्च प्रधान्य दिले आहे. ग्रामीण भागातील जनतेला सर्व प्रकारच्या आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी चंदगड येथे ट्रामा केअर सेंटर उभारणीस आवश्यक असणाऱ्या जागेस निधी मिळवून देण्यास आणि या भागात अत्याधुनिक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल उभारणीसाठी पाठपुरावा करु, असे प्रतिपादन सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी चंदगड येथे बोलताना केले.

चंदगड तहसील कार्यालयात कोरोना संदर्भात आढावा बैठक राज्यमंत्री श्री. यड्रावकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बैठकीस खासदार संजय मंडलिक, आमदार राजेश पाटील, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सतीश पाटील, नगरपंचायतीच्या अध्यक्षा प्राची काणेकर, पंचायत समिती सभापती आनंद कांबळे, प्रांताधिकारी विजया पांगारकर, तहसीलदार विनोद रणवरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बी.सी.केम्पी पाटील आदी उपस्थित होते.

आरोग्य राज्यमंत्री श्री. यड्रावकर म्हणाले, गेले चार-पाच महिने राज्य शासन कोरोनाशी लढा देत आहे. या लढ्यात राज्यातील आरोग्य, महसूल, पोलीस यासह अन्य यंत्रणा चांगले काम करत आहेत. यामुळेच कोरोनाची साखळी तोडण्यासाठी आपण यशस्वी होऊ. चंदगड तालुक्यात उभारण्यात येणाऱ्या ट्रामा केअर सेंटरसाठी एमआयडीसीकडील जमिनीसाठी आवश्यक असणारा निधी उपलब्ध करुन घेण्यासाठी प्रयत्न केले जातील. चंदगड व परिसारातील ग्रामीण जनतेला आरोग्याच्या चांगल्या सुविधा एका छताखाली मिळाव्यात यासाठी या भागात अत्याधुनिक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलसाठीही पाठपुरावा केला जाईल. चंदगड ग्रामीण रुग्णालयाच्या दुरुस्तीचा प्रस्ताव सादर करावा. प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर आवश्यक दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करुन दिला जाईल.

आरोग्य राज्यमंत्री श्री. यड्रावकर म्हणाले, राज्यातील जनतेला आरोग्याच्या चांगल्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी राज्य शासनाने महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेची व्याप्ती वाढवली आहे. कर्नाटकातील के.एल.ई. हॉस्पिटलचाही योजनेत समावेश केल्याने येथे उपचारसाठी येणाऱ्या राज्यातील रुग्णांना दिलासा मिळाला आहे. रवळनाथ पतसंस्था, चंदगड अर्बन बँक आणि वेणू गोपाल पतसंस्थेमार्फत चंदगड ग्रामीण रुग्णालयास ५ व्हेंटिलेटर उपलब्ध करुन दिली जाणार आहेत. व्हेंटिलेटरसाठी आवश्यक असणारे मनुष्यबळ रुग्णालयास उपलब्ध करुन दिले जाईल. चंदगड तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आरोग्य विषयक सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी प्राध्यान दिले जाईल. चंदगड तालुक्यात सुरवातीच्या काळात कोरोना रुग्णांची वाढती संख्या ही चिंतेची बाब होती. मात्र प्रशासनाने कोरोनाची साखळी तोडण्यासाठी केलेल्या प्रयत्नामुळेच आज चंदगड तालुक्यात रुग्णांची संख्या कमी झालेली दिसून येते. प्रशासनाने केलेले काम कौतुकास्पद व अभिनंदनीय आहे. यापुढील काळात तालुक्यात कोरोना रुग्ण वाढणार नाहीत यासाठी दक्ष रहावे, असे ही श्री. यड्रावकर म्हणाले.

काजू उपकेंद्रासाठी प्रयत्न करणार-खासदार मंडलिक

चंदगड तालुका कर्नाटक आणि गोवा राज्याच्या सीमेशी जोडलेला तालुका आहे. तालुक्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात काजुचे उत्पादन घेत आहेत. शेतकऱ्यांना काजू उत्पादनासाठी अद्ययावत माहिती उपलब्ध व्हावी, त्यांच्या मालाला चांगला भाव मिळावा यासाठी तालुक्यात काजू उपकेंद्र सुरु करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे खासदार मंडलिक यावेळी म्हणाले.

खासदार श्री. मंडलिक म्हणाले, राज्यात आरोग्याची सक्षम यंत्रणा उभी करण्यासाठी राज्य शासनाने प्राधान्य दिले आहे. चंदगड तालुक्याने कोरोनाचा समर्थपणे मुकाबला केल्याने आज तालुक्यात रुग्णांची संख्या घटली आहे. मात्र पुढील काळातही ग्रामस्थानी व यंत्रणनेने दक्षता घ्यावी. सार्वजनिक ठिकाणी मास्क वापर करण्याबरोबरच सामाजिक अंतर पाळावे. ग्रामीण भागात आयसीयुसह आरोग्याच्या सर्व सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी खासदार फंडातून १ कोटीचा निधी दिला जाईल, असेही ते म्हणाले. चंदगड तालुक्यात ट्रामा केअर सेंटर उभारावे. तालुक्यास शव वाहिका मिळावी तसेच तालुक्यातील आरोग्य विभागाकडील रिक्त पदे भरावीत, अशी मागणी त्यांनी केली.

आमदार श्री. पाटील म्हणाले, कोरोना लढाईत चंदगड तालुक्याने महत्त्वपूर्ण काम केले आहे. यामध्ये प्रशासनाचे काम कौतुकास्पद आहे. तालुक्यात आरोग्य सेवा सक्षम होण्यासाठी आमदार फंडातून देण्यात आलेल्या रुग्ण्वाहिकेमुळे रुग्णांना तत्पर सेवा मिळण्यास मदत होईल. ग्रामीण भागातील जनतेला चांगल्या आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी तालुक्यातील आरोग्य विभागाकडील रिक्त पदे भरावीत. तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचे वन्य प्राण्यांपासून होणारे नुकसान टाळण्यासाठी कायम स्वरुपी उपाययोजना व्हाव्यात. वन्य प्राण्यांपासून झालेल्या नुकसानीची भरघोस भरपाई मिळावी, असेही ते म्हणाले.

प्रारंभी प्रांताधिकारी श्रीमती पांगारकर यांनी स्वागत केले. प्रास्ताविकात चंदगड तालुक्यातील कोरोना रुग्ण, प्रशासनामार्फत केलेल्या उपाय योजना याबाबात माहिती दिली. तहसीलदार श्री. रणवरे यांनी आभार मानले.

तत्पुर्वी आमदार राजेश पाटील यांच्या स्थानिक विकास निधीतून चंदगड ग्रामीण रुग्णालयासाठी देण्यात आलेल्या रुग्णवाहिकेचे लोकार्पण आरोग्य राज्यमंत्री श्री. यड्रावकर यांच्या हस्ते करण्यात आले. तद्नंतर आरोग्य राज्यमंत्री यड्रावकर यांनी ग्रामीण रुग्णालयास भेट देऊन पाहणी केली.

‘स्वच्छ सर्वेक्षण’मध्ये महाराष्ट्राची मोहोर!

महाराष्ट्राला दुसऱ्या क्रमांकाचा ‘बेस्ट परफॉर्मिंग स्टेट’चा पुरस्कार

नवी दिल्ली दि. २० : ‘स्वच्छ सर्वेक्षण-२०२०’ मध्ये महाराष्ट्राने ‘बेस्ट परफॉर्मिंग स्टेट’ चा दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार पटकाविला आहे. मोठ्या शहरांच्या श्रेणीत नवी मुंबई देशातील तिसऱ्या क्रमांकाचे शहर ठरले तर लहान शहरांच्या श्रेणीत कराड, सासवड आणि लोणावळा शहराने देशातील पहिले तीनही क्रमांक पटकाविले आहेत. आज राज्याने एकूण १७ पुरस्कार मिळविले आहेत.

सलग तिसऱ्या वर्षी देशातील सर्वाधिक महाराष्ट्राला मिळाले आहेत. महाराष्ट्र स्वच्छता अभियानांतर्गत (नागरी) सन 2018, 2019 आणि 2020 सलग तीनही वर्षी देशात सर्वाधिक पुरस्कार राज्याला मिळाले आहेत. राष्ट्रीय पातळीवर राज्याचे कौतुक होत आहे. अमृत शहरांच्या स्वच्छ श्रेणीमध्ये राष्ट्रीयस्तरावरील 100 अव्वल अमृत शहरांपैकी महाराष्ट्रातील ४3 पैकी 31 शहरांचा समावेश आहे. राज्यातील 75 टक्के अमृत शहरे पहिल्या 100 शहरांमध्ये आली आहेत. 25 नॉन अमृत शहरांपैकी 20 महाराष्ट्रातील आहेत. कचरामुक्त राष्ट्रीय तारांकित 141 शहरांमध्ये महाराष्ट्रातील 77 शहरांचा समावेश आहे. संपूर्ण राज्य हागणदारी मुक्त असून राज्यातील 216 शहरे ओडीएफ प्लस तर 116 शहरे ओडीएफ प्लस प्लस झाली आहेत.          

2018 मध्ये सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या राज्यामध्ये महाराष्ट्राने दुसरा क्रमांक मिळविला होता. त्याचबरोबर राष्ट्रीय पातळीवरील 46 पुरस्कारांपैकी सर्वाधिक 10 पुरस्कार महाराष्ट्राला मिळाले होते. पहिल्या 100 अमृत शहरांमध्ये राज्यातील 27 अमृत शहरांचा सहभाग होता.

स्वच्छ सर्वेक्षण 2019 मध्ये देखील राज्याने सर्वोत्तम कामगिरीचा तृतीय क्रमांक मिळविला होता. त्याचबरोबर देशात सर्वाधिक 46 पुरस्कार राज्याने मिळविले होते. पहिल्या 100 अमृत शहरांमध्ये यावर्षी राज्यातील 29 अमृत शहरांचा सहभाग होता. कचरामुक्त शहरांच्या तारांकित मानांकनामध्ये देशपातळीवर 53 शहरांना तीन स्टार मानांकन प्राप्त झाले होते त्यातील निम्म्याहून अधिक म्हणजे 27 शहरं महाराष्ट्रातील होती. याचवर्षी देशातील 500 शहरांनी ओडीएफ प्लस आणि ओडीएफ प्लस प्लस दर्जा प्राप्त केला यात महाराष्ट्रातील 154 शहरांचा समावेश होता.

केंद्रीय गृहनिर्माण व शहरी विकास  हरदीपसिंग पुरी  यांच्या उपस्थितीत व्हर्च्युअल पध्दतीने आज ‘स्वच्छ सर्व्हेक्षण-2020’ चे निकाल घोषित करण्यात आले. यावेळी विविध श्रेणींमध्ये एकूण 129  पुरस्कार व्हर्च्युअल पध्दतीने प्रदान करण्यात आले महाराष्ट्राला यात एकूण 17 पुरस्कार मिळाले. केंद्रीय शहरी विकास विभागाचे सचिव दुर्गा प्रसाद मिश्रा आणि महाराष्ट्राच्यावतीने नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे, राज्यमंत्री प्रसाद तनपुरे, नगर विकास विभागाच्या तत्कालिन प्रधान सचिव मनिषा म्हैसकर, प्रधान सचिव महेश पाठक आदी यावेळी उपस्थित होते. यावेळी श्री पुरी यांनी श्री शिंदे यांचे  अभिनंदन केले.

महाराष्ट्राला ‘बेस्ट परफॉर्मिंग स्टेट’चा दुसऱ्या क्रमांकाचा मान

100 नागरी स्थानिक स्वराज संस्थांपेक्षा जास्त संख्या असलेल्या राज्यांच्या श्रेणीत महाराष्ट्राने 2895.29 गुण मिळवून देशात दुसरा क्रमांक मिळविला. एकूण 11 राज्य या श्रेणीत निवडण्यात आली. मागील वर्षी या श्रेणीत महाराष्ट्र तिसऱ्या स्थानावर होता.

नवी मुंबईला ‘पंचताराकिंत’ शहराचा दर्जा

देशभरातील घनकचरा मुक्त शहरांच्या पंचताराकिंत वर्गवारीत देशभरातील एकूण 6 शहरांचा समावेश आहे. यामध्ये महाराष्ट्रातील नवी मुंबईचा समावेश आहे. याव्यतीरिक्त इंदोर, अंबिकापूर, सूरत, राजकोट, मैसुर ही शहरे आहेत. 86 शहरे 3 स्टार, आणि 64  शहरे 1 स्टार आहेत.

एक लाख पेक्षा जास्त लोकसंख्येच्या स्वच्छ शहरांमध्ये राज्यातील 4 शहर

एक लाख पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या देशातील  टॉप 25 स्वच्छ शहर निवडण्यात आली असून राज्यातील 4 शहरांचा यात समावेश आहे. या श्रेणीमधील पहिल्या तीन शहारांमध्ये नवी मुंबईने देशात तिसरा क्रमांक पटकाविला आहे. या श्रेणीत चंद्रपूर (9),  धुळे (18)  आणि नाशिक (25) या शहारांचा समावेश आहे.

एक लाख पेक्षा कमी लोकसंख्येच्या स्वच्छ शहरांमध्ये पहिले तीन पुरस्कार महाराष्ट्राला पहिल्या 25 शहरांमध्ये राज्यातील 20 शहरं

राज्याने एक लाख पेक्षा कमी लोकसंख्येच्या स्वच्छ शहरांमध्ये राष्ट्रीय पातळीवरील एकूण रँकींगमध्ये बाजी मारली असून या श्रेणीत देशात पहिले तिनही पुरस्कार महाराष्ट्राने पटकाविले आहेत. यामध्ये कराड शहराने  पहिला, सासवड शहराने दुसरा तर लोणावळा शहराने  तिसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार मिळविला.

या तीन शहरांसह या श्रेणीत देशातील पहिल्या टॉप 25 शहरांमध्ये राज्यातील 17 शहरांचा समावेश आहे.  यात पन्हाळा(5), जेजुरी(6), शिर्डी(7),मौदा(8),कागल(9),रत्नागिरी(10), ब्रह्मपुरी(11), वडगाव (12), गडहिंगलज(13), इंदापूर(14), देवळाली प्रवरा(15), राजापूर (16) ,वीटा (17),मुरगुड(18), नरखेड(23), माथेरान(24) आणि मलकापूर (25) या शहारांचा समावेश आहे.   

देहूरोड कँटॉनमेंट ठरले सर्वोत्तम

देशातील एकूण 8 स्वच्‍छ कँटॉनमेंट बोर्डांना आज पुरस्कार देण्यात आला यात महाराष्ट्रातून देहूरोड कँटॉनमेंटने पहिला क्रमांक पटकाविला आहे. 6 कँटॉनमेंट बोर्डांना पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार विभागून मिळाला आहे. देशातील एकूण 62 कँटाँनमेंट बोर्डना स्वच्छता रँकींग देण्यात आली असून महाराष्ट्रातील 6 कँटॉनमेंट बोर्डचा यात समावेश आहे. यात देहूरोड  कँट(8), अहमदनगर (12), खडकी (15), पुणे (25), औरंगाबाद (29) आणि देवळाली (52) असा क्रम आहे.

पश्चिम विभागात राज्यातील 11 शहारांनी मारली बाजी

देशातील पश्चिम विभागातील राज्यांमधील लोकसंख्या निहाय तीन श्रेणींमध्ये 15 शहारांना सन्मानित करण्यात आले असून यात राज्यातील सर्वाधिक 11 शहरांचा समावेश आहे.

पश्चिम विभागातील राज्यांमधील 50 हजार ते एक लाख लोकसंख्येच्या स्वच्छ शहरांमधून 5 शहरांना सन्मानित करण्यात आले असून यात राज्यातील 4 शहरांनी वेगवेगळया श्रेणीत पहिला क्रमांक पटकाविला आहे . यात हिंगोली , बल्लारपूर, रत्नागिरी आणि शेगाव नगर परिषदांचा समावेश आहे.

याच विभागातील राज्यांमधील 25 ते 50 हजार लोकसंख्येच्या स्वच्छ शहरांमधून 5 शहरांना सन्मानित करण्यात आले असून यात राज्यातील 4 शहरांना वेगवेगळ्या श्रेणीत प्रथम क्रमांकांच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले . यात वीटा , इंदापूर, शिर्डी आणि वरोरा नगर परिषदांचा समावेश आहे.

पश्चिम विभागातील राज्यांमधील 25 हजार पेक्षा कमी लोकसंख्येच्या स्वच्छ शहरांमधून 5 शहरांना सन्मानित करण्यात आले असून यात राज्यातील 3 शहरांनी वेगवेगळया श्रेणीत पहिला क्रमांक पटकाविला आहे . यात अकोले , जेजुरी आणि पन्हाळा नगर परिषदांचा समावेश आहे.

अंजु निमसरकर/रितेश भुयार  /वृत्त वि. क्र.79 / दिनांक  20.08.2020

राज्यातील नामवंत शिक्षण तज्ञ, अभ्यासक यांची समिती स्थापण्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सूचना

नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी

मुंबई, दि २० : केंद्राने नुकत्याच घोषित केलेल्या नव्या शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने राज्यातील सर्व विभागांतील शिक्षण तज्ञांचा आणि अभ्यासकांचा समावेश असलेली समिती नेमून या धोरणाच्या अंमलबजावणीसंदर्भात व्यवस्थित विचार विनिमय करावा, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिले.

वर्षा निवासस्थानी नवीन शैक्षणिक धोरणासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी आज एका बैठकीत जाणून घेतले. यावेळी शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत, मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू सहभागी झाले होते. त्यांनी आपापले विचार यावेळी मांडले.

मुख्यमंत्री म्हणाले की, या नव्या धोरणात अनेक नव्या संकल्पना आहेत. त्यादृष्टीने राज्य सरकारला कायद्यातही अनेक बदल करावे लागतील. काही आवश्यक आणि अनिवार्य बदल स्वीकारावेच लागतील तर जे स्वीकारले जाऊ शकत नाही किंवा त्यात काही अडचणी आहेत तर त्याबाबतही विचार करावा लागेल. यादृष्टीने या धोरणाची सध्या केवळ घोषणा करण्यात आली आहे. आपण राज्यभरातील सर्व विभागांचे प्रतिनिधित्व असलेला तज्ञ व संशोधक, अभ्यासक यांचा गट स्थापन करून या धोरणाच्या संदर्भात विचार करणे योग्य ठरेल. यामध्ये तंत्रशिक्षण, व्यवसाय शिक्षण तसेच मातृभाषेतून शिक्षण, विद्यार्थी केंद्रित शिक्षण, विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता निर्माण होईल तसेच ते जास्तीत जास्त प्रश्न विचारू शकतील असा प्रस्तावित शैक्षणिक ढांचा यावर सखोल चर्चा करता येईल.  यामुळे राज्यातील विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थाने लाभ आणि एकूणच शिक्षण क्षेत्रात आमुलाग्र बदल घडू शकतील का ते पाहण्याची गरज आहे असे मुख्यमंत्री म्हणाले.

शिक्षण विभागाने उणिवा दूर कराव्यात

कोरोना परिस्थितीमुळे सध्या सर्वच क्षेत्रांना फटका बसला आहे. शिक्षण क्षेत्रही त्याला अपवाद नाही. राज्यात काहीही झाले तरी १०० टक्के विद्यार्थ्यापर्यंत ऑनलाईन, ऑफलाईन व जसे शक्य होईल तसे शिक्षण मिळालेच पाहिजे. शिक्षण विभागाने यातील सर्व उणीवा, अडथळे दूर करावे, शिक्षकांची उपस्थिती कशी आहे ते तपासावे, विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात काय अडचणी येत आहेत त्या तत्काळ पहाव्यात असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, नेहमी जूनपासून शैक्षणिक वर्ष सुरु होते मात्र सध्याचा काळ पाहता जानेवारी ते डिसेंबर असे शैक्षणिक वर्ष सुरु करता येते का त्याबाबत केंद्राशी विचारविनिमय करण्याची सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केली. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी देखील यावर आपले विचार मांडले.

गेल्या ३ महिन्यांपासून राज्यात शिक्षणाला सुरुवात झाली आहे. याबाबत शिक्षण विभाग ऑक्टोबरपर्यंत एकूणच बदललेल्या स्थितीत विद्यार्थी, शिक्षक यांना दिल्या जाणाऱ्या ऑनलाईन, ऑफलाईन शिक्षणाच्या फलश्रुतींचा  आढावा घेणार आहे असेही शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या. भविष्यात दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी तरी प्रत्यक्ष शाळा काही प्रमाणात सुरु करता येतील का यावरही बैठकीत चर्चा झाली. मंत्री गायकवाड यांनी ११ वी प्रवेशाचे काम व्यवस्थित सुरु असल्याचे यावेळी सांगितले. पहिली ते बारावी पर्यंत २५ टक्के अभ्यासक्रम कमी केला आहे असेही त्या म्हणाल्या. अतिरिक्त मुख्य सचिव वंदना कृष्णा यांनी प्रारंभी ऑनलाईन शिक्षण हळूहळू अंगवळणी पडते आहे असे सांगून पाठ्यपुस्तकेही सर्वांपर्यंत वितरीत झाल्याचे सांगितले.

या बैठकीस मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे आदींची उपस्थिती होती.

000

मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून माजी प्रधानमंत्री स्व.राजीव गांधी यांना अभिवादन

मुंबई, दि. २० : भारताचे माजी प्रधानमंत्री राजीव गांधी यांना जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिवादन केले. मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते स्व.राजीव गांधी यांच्या प्रतिमेस पुप्षहार अर्पण करण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी उपस्थितांना ‘सद्भावना’ दिनानिमित्त प्रतिज्ञाही दिली. यावेळी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, कृषीमंत्री दादाजी भुसे, कृषी राज्यमंत्री डॉ.विश्वजीत कदम, मुख्य सचिव संजय कुमार आदी यावेळी उपस्थित होते.

दरम्यान, स्व.राजीव गांधी यांना अभिवादन करताना उपमुख्यमंत्री श्री.पवार म्हणाले की, युवा नेते, माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी यांनी देशाची एकता, अखंडता, सार्वभौमतेसाठी सर्वोच्च त्याग केला. एकविसाव्या शतकाची आव्हाने पेलण्यासाठी देशाला सज्ज केले. संगणक क्रांती, डिजिटलक्रांती विचारपूर्वक घडवून आणली. ग्रामीण भागात दूरध्वनीसेवा पोहोचवली. पंचायतराज व्यवस्था भक्कम केली. नवोदय विद्यालयांची पायाभरणी केली. युवकांना अठराव्या वर्षी मतदानाचा हक्क दिला. देशाला आधुनिक विचार, जागतिक व्यासपीठांवर सन्मान मिळवून देण्याचं काम केलं. त्यांच्या रुपाने देशाला युवा, कर्तबगार, दूरदृष्टीचं, सुसंस्कृत नेतृत्वं लाभलं होतं. महान देशाचे महान पंतप्रधान म्हणून राजीव गांधी नेहमी स्मरणात राहतील, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजीव गांधी जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करुन आदरांजली वाहिली. 

राजीव गांधी यांची जयंती सद्‌भावना दिवस साजरी होत आहे. तसेच ५ सप्टेंबरपर्यंत सामाजिक ऐक्य पंधरवडा साजरा करण्यात येत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जनतेला सद्‌भावना दिनाच्या व सामाजिक ऐक्य पंधरवड्याच्याही शुभेच्छा दिल्या आहेत. यानिमित्ताने वंश, धर्म, प्रदेश, भाषा असा कुठलाही भेद न राहता देशात एकता, समता, बंधुता, सौहार्दाची भावना वाढीस लागेल, हिंसाचारमुक्त समाजाच्या निर्मितीस मदत होईल, असा विश्वास उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. कोरोना संकटकाळात ‘वर्क फ्रॉम होम’ करीत असताना हे ज्यामुळे शक्य झालं त्या डिजिटल क्रांतीची सुरुवात स्वर्गीय राजीव गांधींनी केली होती याची जाणीव ठेवून त्याबद्दल कृतज्ञ राहिलं पाहिजे, अशी भावनाही उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.

00000

उस्मानाबाद उपकेंद्राचे विद्यापीठात रूपांतर करण्यासाठी समिती गठीत

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांची माहिती

मुंबई, दि. 20 : विद्यार्थ्यांच्या हितासाठी उस्मानाबाद येथील उपकेंद्राचे विद्यापीठात रूपांतर करता येईल का यासाठी एक अभ्यासगट म्हणून सात सदस्यांची समिती गठीत करण्यात येईल, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी संगितले.

आज मंत्रालयात याबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास घाडगे पाटील उपस्थित होते.

श्री.सामंत म्हणाले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद ते  उस्मानाबाद जिल्ह्याचे अंतर अधिक आहे. या भोगोलिक दृष्टीने विचार करून विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये यासाठी उस्मानाबाद उपकेंद्राचे विद्यापीठात रूपांतर करावे अशी अनेक वर्षांपासूनची  मागणी आहे. गठीत केलेल्या  समितीने विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी त्यांच्या अडचणी काय आहेत याचा सर्व शैक्षणिक दृष्टीने अभ्यास करून तीन महिन्यांत आपला अहवाल शासनाकडे सादर करावा, अशा सूचनाही श्री.सामंत यांनी केल्या.

बैठकीस उस्मानाबाद जिल्हाधिकारी दिपा मुधोळ-मुंडे, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे संचालक डॉ.धनराज माने, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.प्रमोद येवले आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.

0000

महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळात प्रशिक्षण झालेल्या त्या ५४२ उमेदवारांना नेमणूक देणार

गृहमंत्री अनिल देशमुख यांची माहिती

मुंबई, दि. २० : महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळात प्रशिक्षण झालेल्या ५४२ उमेदवारांना नेमणूक देणार असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

महाराष्ट्र पोलीस दल भरती प्रक्रियेच्या २०१४ व १६ या वर्षातील पात्र पण निवड न झालेल्या उमेदवारांची महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाने भरती प्रक्रिया करून त्यांची सुरक्षारक्षक म्हणून निवड केली होती. त्यांचे प्रशिक्षण देखील पूर्ण करण्यात आले होते. मात्र त्यापैकी ५४२ जणांनी नेमणूक स्वीकारली नाही.

या ५४२ पैकी ५५ जणांनी महामंडळाकडे नेमणूक मिळावी याकरिता अर्ज केला आहे. त्या अर्जाच्या अनुषंगाने गृहमंत्री महोदय यांच्यासमवेत पोलीस महासंचालक तथा महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक यांची सविस्तर बैठक नुकतीच संपन्न झाली. महामंडळाने या उमेदवारांवर प्रशिक्षणासाठी खर्च केलेला आहे. तो पाहता तसेच या उमेदवारांच्या नोकरीची निकड पाहता या सर्वांना महामंडळात नेमणूक देण्याचे चर्चेअंती ठरले.

त्या ५४२  पैकी जे उमेदवार नेमणुकीसाठी अर्ज करतील, त्यांना महामंडळात नेमणूक दिली जाईल, अशी माहिती श्री.देशमुख यांनी दिली.

00000

वि.सं.अ.-डॉ. राजू पाटोदकर

ताज्या बातम्या

संत भोजाजी महाराज देवस्थानच्या पर्यटनस्थळाचा दर्जा उन्नतीसाठी प्रस्ताव करा- मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

0
मुंबई, दि. १४ : विदर्भाची पंढरी समजल्या जाणाऱ्या संत भोजाजी महाराज देवस्थानच्या पर्यटनस्थळाचा 'ब' दर्जा उन्नतीसाठी प्रस्ताव सादर करावा, असे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर...

उमरेड तालुक्यातील खाणपट्ट्यांची तपासणी करा – मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

0
मुंबई, दि. १४ : उमरेड तालुक्यातील शासकीय जागेवरील कोणतीही खाणपट्टी मंजूर करू नये. लीज संपलेल्या खाणपट्ट्यांची सोळा मुद्द्यांवर आधारित तपासणी करावी. खणलेल्या खाणपट्ट्यांच्या ठिकाणी...

महाराष्ट्र शासनाचे अधिकृत संकेतस्थळ तांत्रिक अद्ययावत करण्यासाठी १५ व १६ मे रोजी बंद

0
मुंबई, दि. १४: महाराष्ट्र राज्य शासनाचे अधिकृत संकेतस्थळ www.maharashtra.gov.in  व शासन निर्णय संकेतस्थळ www.gr.maharashtra.gov.in  हे पोर्टल नियमित देखभालीबरोबरच तांत्रिकदृष्ट्या अद्ययावत करण्यात येणार आहे, त्यासाठी...

प्रलंबित वनहक्क दावे निकाली काढण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम आखा – मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

0
मुंबई दि. १४ : प्रलंबित वनहक्क दावे निकाली काढण्यासाठी कालबद्ध कार्यक्रमाची आखणी करून राज्यात या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी नियोजन करावे. याचबरोबर सामुदायिक वनहक्क...

पालघर व ठाणे जिल्ह्यात मत्स्यव्यवसायाच्या नुकसान भरपाईसाठी सहकार्य – मंत्री मकरंद जाधव-पाटील

0
मुंबई, दि. १४ : अवकाळी पावसामुळे पालघर व ठाणे जिल्ह्यात मासेमारी बोटींचे, जाळी, सुकी मासळीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. नुकताच मत्स्य व्यवसायाला कृषी...