बुधवार, मे 14, 2025
Home Blog Page 1574

मालाड मालवणी इमारत दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना पालकमंत्री अस्लम शेख यांच्या हस्ते ४ लाखांचे धनादेश प्रदान

मुंबई, दि. १८ : मालाड मालवणी येथे इमारतीच्या वरचा मजला बाजुच्या घरावर कोसळून झालेल्या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ४ लाख तर अन्य दुर्घटनाबाधितांना देखील आर्थिक मदतीच्या धनादेशांचे वितरण मुंबई शहरचे पालकमंत्री अस्लम शेख यांच्या हस्ते वितरीत करण्यात आले.

जुलै महिन्याच्या १६ तारखेला मालाड मालवणी येथील ओल्ड कलेक्टर कंपाऊंड भागातील इमारतीचा वरचा मजला बाजुच्या घरावर कोसळून झालेल्या दुर्घटनेत एकुण २ जण मृत्यूमुखी पडले होते तर १३ जण जखमी झाले होते.

याप्रसंगी तहसिलदार श्री.विनोद धोत्रे, तलाठी श्रीमती मनिषा नागले आदी मान्यवर उपस्थित होते. मृतांच्या नातेवाईकांना अधिक मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्नशिल असल्याचे अस्लम शेख यांनी सांगितले.

राज्यात २० ऑगस्टपासून सामाजिक ऐक्य पंधरवडा

अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांची माहिती

मुंबई, दि. १८ – दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांचा २० ऑगस्ट हा जयंती दिवस दरवर्षी सद्भावना दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. या अनुषंगाने राज्यात २० ऑगस्ट ते ५ सप्टेंबर २०२० या कालावधीत सामाजिक ऐक्य पंधरवडा साजरा करण्याचे शासनाने ठरविले आहे. राज्यातील विविध भागातील विविध धर्मांच्या व विविध भाषा बोलणाऱ्या लोकांमध्ये एकमेकाविषयी ऐक्याची भावना, सौहार्दभाव वृध्दीगंत करणे व हिंसाचार टाळणे ही प्रमुख उद्दिष्टे हा पंधरवडा साजरा करण्यामागे आहेत, अशी माहिती अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी दिली.

सद्भावना दिवस व सद्भावना पंधरवडा हा कोरोना विषाणुच्या संसर्गाची पार्श्वभूमी विचारात घेता केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार साजरा करण्यात यावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. मंत्रालयाच्या प्रांगणात सामाजिक अंतराचे पालन करून २० ऑगस्ट रोजी सद्भावना दिवस साजरा करण्यात येणार असून उपस्थिताना सद्भावना दिवसाची प्रतिज्ञा देण्यात येणार आहे. महसूल विभागाच्या आयुक्त, जिल्हाधिकारी यांनी त्यांच्या कार्यालयातून ऑनलाईन किंवा लाऊड स्पिकरमार्फत सद्भावना दिवसाची प्रतिज्ञा घेण्याचा कार्यक्रम आयोजित करावा, तसेच अधिकाधिक नागरिकांना हा सोहळा घरबसल्या पाहाता यावा यासाठी वेबसाईटव्दारे सोहळ्याचे थेट प्रक्षेपण करावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

सामाजिक ऐक्य पंधरवडा साजरा करण्यासाठी कोविडच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. संबंधित जिल्हाधिकारी यांनी त्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा मुख्यालयात सामाजिक ऐक्याचा संदेश प्रसृत करण्यासाठी ऑनलाईन वेबिनार इत्यादीव्दारा संवाद, मार्गदर्शक कार्यक्रम आयोजित करावेत. या कार्यक्रमांमध्ये जिल्ह्यातील स्वातंत्र्य सैनिकांना भाषण देण्यासाठी निमंत्रित करावे. बृहन्मुंबईत लोकांच्या विशेषत: युवकांच्या सहभागाने सांस्कृतिक कार्य संचालक यांनी सद्भावना विषयावर ऑनलाईन वेबिनार इत्यादीव्दारा संवाद, मार्गदर्शक कार्यक्रम आयोजित करावा. यंदा सद्भावना शर्यतसारखे उपक्रम आयोजित करू नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

राज्यावरील कोरोनाचे, निराशेचे मळभ दूर करुन पोळा सण समृध्दी घेऊन येईल – उपमुख्यमंत्री अजित पवार

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्यातील जनतेला पोळा सणाच्या शुभेच्छा

मुंबई, दि. १७ : ‘अमावस्या श्रावणाची, आली घेऊन सणाला, कृषीवल आनंदाने, सजवितो हो बैलाला’… याच कृतार्थ भावनेने राज्यभरातील शेतकरी बैलपोळा सण मोठ्या उत्साहाने साजरा करतात. कृषी संस्कृतीतला हा महत्वाचा सण राज्यावर दाटलेले कोरोना संकटाचे, निराशेचे मळभ दूर करुन सगळीकडे उत्साह, चैतन्य, आनंद, समृध्दी घेऊन येईल, असा विश्वास व्यक्त करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील शेतकरी बांधवांसह सर्व जनतेला पोळा सणाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.


आपला देश हा कृषीप्रधान देश आहे. आपली अर्थव्यवस्था आजही कृषी क्षेत्रावरच अवलंबुन आहे. या कृषी संस्कृतीत शेतकऱ्याच्या बरोबरीने बैल राबत असतात. वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलांच्या ऋणातून उतराई होण्यासाठी हा सण साजरा करण्याची परंपरा आहे. शेतकऱ्यांचे बैलांप्रती भावनिक नाते असते. राज्यभरातील शेतकरी आपल्या प्रदेशानुसार तिथीनुसार येणाऱ्या अमावस्येला बैल पोळा सण साजरा करतो. काही ठिकाणी पोळा सणाला बेंदूर ही म्हटले जाते. जरी राज्यात हा सण वेगळ्या नावाने, वेगळ्या तिथीला साजरा केला जात असला तरी हा सण साजरा करण्यामागे सर्व शेतकऱ्यांची बैलांप्रती कृतज्ञतेची भावना सारखीच असते. सध्या राज्यभर चांगला पाऊस सुरु आहे, त्यामुळे पिकेही जोमात आहे, पिण्याच्या, शेतीच्या पाण्याची चिंता कमी झाली आहे. त्यामुळे येणाऱ्या वर्षात चांगले अन्न-धान्य पिकेल, निराशेचे मळभ दूर होऊन राज्यात बैल पोळा सण निश्चितच समृध्दी घेऊन येईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या स्मृतीदिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिवादन

“तुम मुझे खून दो , मैं तुम्हें आज़ादी दूँगा…” असा नारा देणारे आझाद हिंद सेनेचे संस्थापक, क्रांतिकारक, स्वातंत्र्यसेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन. देशाच्या स्वांतंत्र्यासाठी नेताजींनी सशस्त्र लढा उभारला. त्यांचं संपूर्ण जीवन अलौकिक, प्रेरणादायी आहे. भारतमातेच्या या महान सुपुत्रास, नेताजी सुभाषचंद्र बोस यांना माझे विनम्र अभिवादन.. – अजित पवार, उपमुख्यमंत्री

माजी आमदार सुधाकरपंत परिचारक यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजली

मुंबई, दि.१८ : ज्येष्ठ नेते, माजी आमदार सुधाकरपंत परिचारक यांच्या निधनाबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दुःख व्यक्त केले असून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

लोकसेवेला, ग्रामीण विकासाला वाहून घेतलेले त्यांचे नेतृत्व होते. त्यांच्या निधनाने सहकार क्षेत्रातील मार्गदर्शक नेतृत्व हरपल आहे. राजकीय, सामाजिक, सहकार क्षेत्रातील त्यांचे योगदान नेहमी स्मरणात राहील, परिचारक कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सर्व सहभागी आहोत. अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची माजी आमदार सुधाकरपंत परिचारक यांना श्रद्धांजली

सहकार, समाजकारणातील मार्गदर्शक नेतृत्व हरपले

मुंबई, दि. १८ :- ‘ सहकार, शिक्षण क्षेत्रातील कामाने समाजकारणात आणि जनतेत आदराचे स्थान मिळविलेल्या ज्येष्ठ नेते माजी आमदार सुधाकरपंत परिचारक यांच्या निधनामुळे मार्गदर्शक नेतृत्व हरपले आहे, अशी श्रद्धांजली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वाहिली आहे.

मुख्यमंत्री शोकसंदेशात म्हणतात, सोलापूर जिल्ह्याच्या समाजकारणात माजी आमदार सुधाकरपंत परिचारक यांना आदराचे स्थान होते. त्यांनी पंढरपूर मतदार संघाचे विधानसभेत दीर्घकाळ प्रतिनिधित्व केले. सहकारी साखर कारखाना, बँक आणि शैक्षणिक क्षेत्रातील कामाने त्यांनी सोलापूर जिल्ह्याच्या विकासासाठी योगदान दिले. त्यांच्या निधनामुळे सहकार, समाजकारणातील मार्गदर्शक नेतृत्व हरपले आहे. माजी आमदार सुधाकरपंत परिचारक यांना विनम्र श्रद्धांजली.

पंडित जसराज हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतातील युगपुरुष

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ज्येष्ठ हिंदुस्तानी शास्त्रीय गायक पद्मविभूषण पंडित जसराज यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे.

मुंबई, दि. १८ : पंडित जसराज भारतीय शास्त्रीय संगीतातील ‘युगपुरुष‘ होते. आपल्या दैवी स्वरांनी भारतीय शास्त्रीय संगीत आसमंतात नेतानाच त्यांनी ते जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी विशेष प्रयत्न केले. संगीतातील नव्या प्रवाहांचा तसेच नावीन्यपूर्ण संकल्पनांचा त्यांनी सकारात्मक दृष्टीने स्वीकार केला. जसराज यांनी आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत अनेक शिष्योत्तम घडविले. त्यांचे दैवी संगीत अमर राहील. पंडित जसराज यांच्या निधनामुळे भारतीय शास्त्रीय संगीतातील एक महान पर्व संपले आहे. या दुखद प्रसंगी त्यांच्या असंख्य चाहत्यांना तसेच त्यांच्या कुटुंबीयांना मी आपल्या शोकसंवेदना कळवितो, असे राज्यपालांनी आपल्या शोक संदेशात म्हटले आहे.

शेतकऱ्यांच्या दु:खाचे निराकरण करण्यासाठी अहोरात्र प्रयत्नशिल – विधानसभा अध्यक्ष नाना पटोले

विधानसभा अध्यक्षांची तीड्डी व दवडीपार (बेला) पूरबाधित गावांना भेट

भंडारा,दि.17 – तीड्डी या  पुरबाधीत गावाला पुराचा फटका बसून पाणी गावात येते. या ठिकाणी कन्हान, नागनदी व वैनगंगा नदीचा संगम होत असल्याने दूषित पाणी गावात येतो.  नागनदीच्या दुषित पाण्यामुळे गावात र्दुगंध पसरते तसेच अनेक जंतू व किडे या पाण्यातून गावात येतात. त्यामुळे गावकऱ्यांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. स्वनिर्णयाने गावातील लोक पुर्नवसित होण्यास तयार आहेत. त्याकरीता जमीन उपलब्ध करुन दयावी. तसेच गावकऱ्यांच्या आरोग्यास धोका होणार नाही यासाठी उपाय योजना करण्याचे निर्देश  विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी दिले. शेतकऱ्यांच्या दु:खाचे निराकरण करण्यासाठी आपण अहोरात्र प्रयत्नशिल आहोत, अशी ग्वाही त्यांनी दिली.

गोसेखुर्द प्रकल्पबाधित तीड्डी व दवडीपार(बेला) गावांना भेट दिली. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी घनश्याम भूगावकर, विदर्भ पाटबंधारे विभागाचे कार्यकारी संचालक जे.एम. शेख, सहाय्यक जिल्हाधिकारी मिनल करनवाल, उपविभागीय अधिकारी भस्मे, तहसिलदार अक्षय पोयाम, कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहन पंचभाई  व गोसेखुर्द प्रकल्प विभागाचे अधिकारी तसेच तीड्डी व दवडीपारचे सरपंच  उपस्थित होते.

आरोग्यास धोकादायक वातावरण असल्याने  लोकांना गाव सोडून जावे लागले ही दुखा:ची बाब आहे. नदीच्या प्रदुषित पाण्याच्या वासामुळे उन्हाळयात नाहरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.  गोसेखुर्द  धरणामुळे शेतकरी आनंदी झाला. शेतकऱ्यांचा उद्धार होईल अशी भावना होती. शेतकरी सुखी झाला पाहिजे यासाठीच गोसेखुर्द प्रकल्पाची योजना कार्यान्वित करण्यात आली परंतु गेल्या अनेक  वर्षापासून हा प्रश्न गंभीर होत चालला आहे. यावर तात्काळ उपाय योजना करण्याचे निर्देश विधानसभा अध्यक्षांनी दिले. सर्वेक्षणाअभावी  आरोग्याचे प्रश्न निर्माण झाले आहेत, त्याकडे त्यांनी लक्ष केंद्रीत केले.

जिल्हयातील लोकांच्या दु:खाचे निराकरण झाले पाहिजे. अजूनही लोकांना घर, जमीनपट्टे तसेच उर्वरित मोबदला मिळाला नाही. तीन पिढया यात निघून गेल्या पण प्रश्न सुटले नाही. सातत्याने याबाबत पाठपूरावा चालू आहे. पूरबाधीत जमीन विकायची नाही, त्याबदल्यात पर्यायी जमीन घ्यावी अशी राज्यात  पध्दत आहे. परंतु येथील लोकांनी  जमीन विकून घरे बांधली पर्यायी त्यांना उदरनिर्वाहाचे साधनच राहीले नाही. जमीनीच्या बदल्यात जमीन घेतली असती तर पुर्नवासितांचे प्रश्न निर्माण झाले नसते, असे ते म्हणाले.

स्वेच्छा पुर्नवसनामुळे रोजगाराचा प्रश्न सुटेल.  वैनगंगा नदीचे पाणी बारमाही शुध्द राहीले पाहिजे. यावर आपला भर असून त्यामुळे या शुध्द पाणी, वन्यप्राणी, जंगल याचा संगम साधून पर्यटनाला चालना देता येईल. केरळ मध्ये राबविण्यात येणाऱ्या पर्यटन पॅर्टन राबविण्याचा विचार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे पाण्याचा फायदा शेतीसह रोजगार निर्मितीसाठी होईल. सुदृढ जीवनासाठी स्वच्छ पाणी आवश्यक आहे. विकासाची वाटचाल कोराना संसर्गामुळे स्थगित झाली असली तरी  शेतकऱ्यांच्या दु:खाचे निराकरण करण्यासाठी आपण अहोरात्र प्रयत्नशिर आहोत, अशी ग्वाही त्यांनी दिली.

गावाची 75 टक्के घरे पूर बाधीत असल्यासच पूर्नवसन होते. दूषित पाणी व आरोग्याबाबत लवकरात लवकर कार्यवाही करण्यात येईल, असे विदर्भ पाटबंधारे विभागाचे कार्यकारी संचालक जे. एम. शेख यांनी सांगितले. 75 टक्के पाण्याचे शुध्दीकरण लवकरच प्रक्रियेद्वारे होणार आहे. नाग नदीचे पाणी धरणाद्वारे अडवून शुध्दीकरण प्रकल्पाद्वारे पाण्याची र्निजंतूकीकरण करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

दवडीपार(बेला) येथे वैनगंगा नदीचे  बॅक वॉटर नाल्याद्वारे गावात शिरते त्यामुळे येथील 98 घरे पुरबाधित झाली आहेत. त्यांना लवकरात लवकर पुर्नवसित करण्याचे विधान सभा अध्यक्षांनी सांगितले.यावेळी दवडीपार व तीड्डी येथील लोकांच्या समस्या व अडचणी विधानसभा अध्यक्षांनी  जाणून घेवून त्याचे निराकरण करण्याचे आश्वासन दिले.

चिमूर शहरातील उद्योग, व्यापार क्षेत्रातील नागरिकांची तपासणी करावी : पालकमंत्री विजय वडेट्टीवार

चंद्रपूर, दि. 17 : चिमूर शहरातील उद्योग, व्यापार, क्षेत्रातील सर्व नागरिकांची तपासणी करण्याची मोहीम राबविण्यात यावी, असे आवाहन राज्याचे मदत पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन, इतर मागास बहुजन कल्याणमंत्री विजय वडेट्टीवार यांनी काल येथे केले.

रविवारी चिमूर येथील शहीद स्मारक व हुतात्मा स्मारक येथे 16 ऑगस्ट क्रांती दिनाला अभिवादन केल्यानंतर त्यांनी चिमूर उपविभागीय कार्यालयांमध्ये कोरोना संदर्भात आढावा बैठक घेतली. या बैठकीमध्ये चिमूर शहरात कोरोना संदर्भातील सुरू असणाऱ्या उपाययोजनांचा आढावा त्यांनी घेतला.

या बैठकीला नगराध्यक्ष गोपाल झाडे, उपविभागीय अधिकारी प्रकाश संकपाळ, तहसिलदार संजय नागतिलक, मुख्याधिकारी मंगेश खवले, तालुका वैद्यकीय अधिकारी दिगंबर मेश्राम, गटविकास अधिकारी संजय पुरी, जि.प सदस्य ममता डुकरे, गजानन बुटके, पं.स. सभापती लता पिसे, चित्राताई डांगे आदिंची उपस्थिती होती.

यावेळी कोरोना परिस्थिती नियंत्रणात ठेवल्याबद्दल त्यांनी उपविभागीय परिक्षेत्रातील अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. तथापि, पुढील काळामध्ये गावात नव्याने येणाऱ्या नागरिकांची व व्यापार-उद्योग क्षेत्रात असणाऱ्या व लोकांच्या सातत्याने संपर्कात येणाऱ्या व्यवसायिकांची तपासणी करण्यात यावी. जेणेकरून शहर आणखी सुरक्षित राहील. त्यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देश त्यांनी दिले. प्रत्येक गावांमध्ये सरपंच यांच्यासह एक चमू करण्यात आली असून याच्या मार्फत प्रत्येक नागरिकाची नोंद घ्यावी, कोरोना आजारास संदर्भात तपासणी करणे आवश्यक आहे. थोडे जरी आजारी वाटत असल्यास तातडीने तपासणी करून घ्यावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.    

यावेळी त्यांनी वैद्यकीय क्षेत्रात असणाऱ्या अडचणी संदर्भात माहिती घेतली. जिल्ह्यात व चिमूर उपविभागात देखील डॉक्टरांची कमतरता असल्याचे पुढे आले. याशिवाय या ठिकाणचे डायलिसीस सेंटर व सोनोग्राफी सेंटर या दोन्ही यंत्रणा बळकट करण्याचे त्यांनी निर्देश दिले.

रेतीघाट, संदर्भात काही तक्रारी आल्या असल्याचे निर्देशास आणून दिले. यासंदर्भातील प्रचलित कायद्यानुसार कारवाई करावी, जनावरांच्या लसीकरणाला गती द्यावी,चना खरेदीची थकीत रक्कम मिळावी, तसेच अन्नधान्य वितरण आणखी सक्षमतेने व्हावे, असे निर्देश दिले. उपस्थित काही पदाधिकाऱ्यांच्या सूचनांना देखील त्यांनी अधिकाऱ्यांना अवगत केले.

दुपारच्या सत्रात त्यांनी सिंदेवाही तहसील कार्यालयामध्ये कोरोना संदर्भात बैठक घेतली. तालुकास्तरीय अधिकारी उपस्थित होते.

पंडित जसराज यांच्या निधनाने शास्त्रीय संगीतातील एक पर्व संपले : महसूलमंत्री बाळासाहेब थोरात

मुंबई, दि. १७ : ख्यातनाम शास्त्रीय गायक व संगीतकार पद्मविभूषण पंडित जसराज यांच्या निधनाने भारतीय शास्त्रीय संगीताचे मोठे नुकसान झाले असून त्यांच्या जाण्याने शास्त्रीय संगीतातील एक पर्व संपले आहे, अशा शोकभावना महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केल्या आहेत.

पंडितजी मेवाती घराण्याशी संबंधित होते. सुरुवातीला त्यांनी वडिलांकडून संगीताचे धडे गिरवले व त्यानंतर भावाने त्यांना प्रशिक्षण दिले. ८० वर्षांहून अधिक काळ ते संगीत क्षेत्रात कार्यरत होते. आपल्या संगीताने त्यांनी लाखो श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. भारतातच नाही तर संपूर्ण जगभरात त्यांनी शास्त्रीय संगीताची वेगळी छाप सोडली. पंडित जसराज यांचे भारत, अमेरिकेसह जगभरात अनेक शिष्य आहेत. पंडितजींना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. शास्त्रीय संगीतातील त्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल भारत सरकारने पद्मश्री, पद्मभूषण व पद्मविभूषण या पुरस्कारांनी सन्मानित केले आहे. त्यांच्या जाण्याने संगीत क्षेत्रात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करुन पंडित जसराज यांच्या कुटुंबाच्या दुःखात सहभागी आहे, असे श्री.थोरात म्हणाले.

ताज्या बातम्या

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ब्लॅकस्टोन समूहासोबत सामंजस्य करार

0
मुंबई, दि. १४: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र शासन तसेच ब्लॅकस्टोन समूहाच्या एक्सएसआयओ लॉजिस्टिक्स पार्क्स आणि होरायझन इंडस्ट्रियल पार्क्स यांच्यात आज महत्त्वपूर्ण...

घरच्या घरी पहा बियाण्याची उगवणक्षमता…!!

0
खरीप हंगाम जवळ आला की शेतकऱ्यांची पेरणीची लगबग सुरू होते. उत्पादनात भरघोस वाढ व्हावी, यासाठी बियाण्याची निवड हा पहिला आणि महत्त्वाचा टप्पा ठरतो. अनेकदा...

पूरपरिस्थितीत जीवित व वित्त हानी टाळण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवा- विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार

0
पुणे, दि. १४: हवामान खात्याच्या अंदाजानुसार यंदा सरासरी पेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता लक्षात घेता सर्व विभागांनी पूरपरिस्थितीत जीवित व वित्त हानी टाळण्यासाठी यंत्रणा...

येत्या वर्षभरात बाराशे सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करणार -सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार

0
पुणे, दि. १४ : येत्या ३६५ दिवसात महाराष्ट्राची कला संस्कृती, नाट्य संस्कृती लोककला, लोकसंगीत, महान विभूतींना अभिवादन आदींचे १ हजार २०० कार्यक्रम आयोजित करण्याचा...

राजधानीत छत्रपती संभाजी महाराज यांना जयंतीनिमित्त अभिवादन

0
नवी दिल्ली, दि. १४ :  छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र सदन येथे त्यांना अभिवादन करण्यात आले. महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात सहायक निवासी...