बुधवार, मे 14, 2025
Home Blog Page 1575

उमेद अभियानात ‘जागर अस्मितेचा’ मोहिमेचा शुभारंभ

मोहिमेत अधिकाधिक गटांना सहभागी करून घ्यावे – पालकमंत्री ॲड.यशोमती ठाकूर यांचे निर्देश

अमरावती, दि. 16 : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान राज्यभर राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत उमेद अभियानात ‘जागर अस्मितेचा’ ही मोहिम 31 ऑगस्टपर्यंत सर्वदूर राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत अमरावती जिल्ह्यातील अधिकाधिक गटांना सहभागी करून घेण्याचे निर्देश राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी येथे दिले.

उमेद अभियानामार्फत 15 ऑगस्टपासून 31 ऑगस्टपर्यंत “जागर अस्मितेचा” ही मोहीम  राबविण्यात येत आहे. मोहिमेंतर्गत अस्मिता प्लस योजनेचा शुभारंभ महिला व बालविकास मंत्री श्रीमती ठाकूर यांच्या हस्ते जिल्हा परिषदेच्या सभागृहात स्वातंत्र्यदिनी झाला, त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी आमदार सुलभाताई खोडके, जिल्हा परिषदेचे अनिरुद्ध उर्फ बबलूभाऊ देशमुख, उपाध्यक्ष विठ्ठलराव चव्हाण, महिला व बाल कल्याण सभापती पूजाताई आमले, शिक्षण व बांधकाम सभापती श्रीमती प्रियंकाताई दगडकर, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अमोल येडगे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत थोरात, जिल्हा अभियान व्यवस्थापक सचिन देशमुख आणि उमेद चमू  यांची उपस्थित होती.

महिलांचे आरोग्य सुरक्षितता व जाणीव जागृतीसाठी ही मोहिम उपयुक्त ठरेल. मोहिमेत अधिकाधिक गटांना सहभागी करून घेत जिल्ह्यात सर्वदूर मोहिमेची भरीव अंमलबजावणी करावी, असे निर्देश पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी दिले.अभियानाबाबत माहिती देताना अभियानाचे व्यवस्थापक श्री. देशमुख म्हणाले की, या मोहिमेअंतर्गत ग्रामीण भागातील महिलांमध्ये मासिक पाळी व्यवस्थापनाबाबत जनजागृती करून अस्मिता प्लस  हे सॅनिटरी नॅपकिन माफक दरामध्ये माताभगिनींना उपलब्ध करून देणे आहे. त्याचप्रमाणे, स्वयं सहाय्यता समूहातील महिलांना माफक दरामध्ये सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध करून विक्रीमधून उपजीविकेचे साधन निर्माण करणे हा आहे.  

यावेळी स्वयं सहाय्यता समुहातील महिलांना “अस्मिता प्लस” च्या कीटचे वितरणही करण्यात आले. मोहिमेच्या छोट्या पुस्तिकेचे प्रकाशनही यावेळी झाले.स्वयंसहायता गटांची चळवळ ही महिलांना विकासाच्या मुख्यधारेत आणणारी महत्त्वाची चळवळ आहे. त्यामुळे जागर अस्मितेचा मोहिमेत जास्तीत जास्त गटांनी सहभागी होण्यासाठी प्रयत्न होत आहेत. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानातर्फे राज्यव्यापी ऑनलाईन महिला उद्बोधन मेळावाही घेण्यात आला आहे. महिलांमध्ये आरोग्यविषयक जागृती आणून बचत गटांना अर्थार्जनाचे माध्यम उपलब्ध करून देणे हाही या अभियानाचा हेतू असल्याचे श्री. देशमुख यांनी सांगितले.

त्याशिवाय,  ‘एक ग्रामपंचायत एक बीसी सखी’ या उपक्रमाला अधिक गती मिळण्याकरीता ‘उमेद महिला सक्षमीकरण-बीसी सखी / डिजी पे सखी अभियान’ राबविण्यात येणार असून या मोहिमेतून ग्रामस्थांना प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा, प्रधानमंत्री जीवन सुरक्षा विमा व अटल पेन्शन योजना या सामाजिक सुरक्षा योजनेचा लाभ मिळवून देण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. याबाबतही उमेद अभियानाच्या जिल्हा कक्षाकडून नियोजन करण्यात येत आहे. कोरोना संकटामुळे निर्माण झालेली स्थिती ही अर्थाजनाच्या संधीत परावर्तित करून गटांना सक्षम करण्यासाठी हे अभियान हाती घेण्यात आल्याची माहिती श्री. देशमुख यांनी दिली.

00000

चेतन चौहान यांच्या निधनाबद्दल राज्यपालांना दु:ख


मुंबई, दि. १६ – प्रसिद्ध माजी क्रिकेटपटू व उत्तर प्रदेश सरकारमधील कॅबिनेट मंत्री चेतन चौहान यांच्या निधनाबद्दल राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी दुःख व्यक्त केले आहे.
श्री चेतन चौहान हे देशातील एक उत्तम क्रिकेटपटू व क्रिकेट प्रशासक तर होतेच परंतु ते उत्तम समाजसेवक देखील होते. लोकसभा सदस्य तसेच उत्तर प्रदेश सरकारमधील मंत्री म्हणून त्यांनी उल्लेखनीय कार्य केले. चेतन चौहान माझे घनिष्ठ स्नेही होते. त्यांच्या निधनामुळे क्रिकेट विश्वाचे तसेच एकूण समाजाचे नुकसान झाले आहे. त्यांच्या निधनाबद्दल मी आपल्या शोक संवेदना त्यांच्या कुटुंबियांना कळवित आहे, असे राज्यपाल कोश्यारी यांनी आपल्या संदेशामध्ये म्हटले आहे.


Governor Koshyari condoles demise of Chetan Chauhan


Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari has expressed condolences on the demise of former India Cricketer and UP Cabinet Minister Chetan Chauhan. In a condolence message, the Governor said:
“Shri Chetan Chauhan was not only a great cricketer and cricket administrator, but was also a dedicated social worker. He did significant work as Member of Parliament and later as a Minister in the government of Uttar Pradesh. I had the privilege of knowing Shri Chetan Chauhan intimately. His demise is a great loss to the world of cricket and to society at large. I convey my heartfelt condolences on his demise to the members of the bereaved family.”

पंचायत समिती कवठेमहांकाळ येथील कर्मचारी निवासस्थानांचे लोकार्पण

स्व. आर.आर. (आबा) पाटील यांच्या जयंती निमित्त

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व पालकमंत्री जयंत पाटील यांची सोहळ्यास उपस्थिती

सांगली, दि. 16, (जि.मा.का.) : स्व.आमदार आर.आर. (आबा) पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून 2515 इतर ग्रामीण विकास कार्यक्रम सन 2014-15 मधून मंजूर झालेले पंचायत समिती कवठेमहांकाळ येथील कर्मचारी निवासस्थान टाईप 2 चे आठ व अधिकारी निवासस्थान टाईप 4 चे दोन या निवासस्थानांचे लोकार्पण स्व.आर आर आबा यांच्या जयंती निमित्त ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते व जलसंपदा व लाभ क्षेत्र मंत्री जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.

यावेळी खासदार संजय पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष प्राजक्ता कोरे, आमदार सुमनताई पाटील, तालुका पंचायत समितीचे सभापती विकास हक्के, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत गुडेवार, जिल्हा परिषदेच्या शिक्षण सभापती श्रीमती पाटील, रोहित आर आर पाटील, यांची प्रमुख उपस्थिती होती.

पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, जिल्ह्यात आणि तालुक्यात मोठ्या प्रमाणावर कोरोनाचा संसर्ग झाला आहे. अशा स्थितीत नागरिकांनी दुखणे अंगावर काढू नये त्याकडे दुर्लक्ष करू नये त्वरीत उपचार करावेत उपचार वेळेत झाल्यावर धोका टाळता येतो. अँटीजेन टेस्ट सर्वत्र चालू केली आहेत. सांगलीत लवकरच 400 बेडचे कोरोनासाठी नवे हॉस्पिटल उभे केले जात आहे. या संपूर्ण काळात लोकांनी सहाकार्य करावे अनावश्यक बाहेर जाणे टाळावे. नदीचे पाणी वाहून कर्नाटकात जात असते त्या कालावधीत टंचाईग्रस्त भागातील तलाव भरण कार्यक्रम आजपासून सुरू होणार आहे. टेंभूचे पाणी सांगोल्यापर्यत व म्हैसाळचे पाणी जत पर्यत नेवून सर्व तलाव भरूण घेण्यात येणार आहेत. त्यामुळे टंचाईग्रस्त भागातील पाणी प्रश्नही सुटेल.

कवठेमहांकाळ तालुक्यातील प्राथमिक शाळाच्या खोल्या व अंगणवाड्या इमारतीच्या खोल्या ग्रामपंचायत कार्यालय स्मशानशेड सुसज्ज करण्यात येतील असा विश्वास ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिला. यावेळी त्यांनी ग्रामविकास विभागाचा अधिकाधिक निधी ग्रामीण भागात दिला जाईल. 15व्या वित्त आयोगाचा निधी अखर्चीत आहे तो ग्रामपंचयातीनी आराखड्यानुसार केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सुचनेनुसार खर्च करावा.

0000

राज्यपालांची किल्ले शिवनेरीला भेट; पायी फिरून केली गडाची पाहणी


राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थान असलेल्या किल्ले शिवनेरीला भेट देऊन राजमाता जिजाऊ तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन केले. राज्यपालांनी संपूर्ण गडाची पायी फिरून पाहणी केली. गडावरील शिवाई देवतेचे दर्शन घेतले तसेच शिवजन्मस्थळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाळण्याला वंदन केले.


Governor treks Fort Shivneri


Governor Bhagat Singh Koshyari today visited the Shivneri Fort, the birthplace of Chhatrapati Shivaji Maharaj and paid his obeisance at the memorial of Rajmata Jijau and Chhatrapati Shivaji Maharaj. The Governor trekked the entire Shivneri Fort on feet. He paid his respects at the Shivai temple and offered his pranams to the cradle of Chhatrapati Shivaji Maharaj.

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठाच्या ‘आत्मनिर्भर भारत सेल’चे उद्घाटन

मुंबई, दि. १६ – लोणेरे, जि. रायगड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठाच्या आत्मनिर्भर भारत सेलचे उद्घाटन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते शनिवारी डिजिटल माध्यमातून संपन्न झाले. यावेळी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, कुलगुरू डॉ. रामा शास्त्री, विविध विद्यापीठांचे कुलगुरू, प्राचार्य, शिक्षक व विद्यार्थी ऑनलाईन उपस्थित होते. आत्मनिर्भर भारत निर्माण करण्यासाठी युवकांनी मातृभाषेचा स्वीकार करावा, आत्मविश्वास व संकल्पशक्ती वाढवावी तसेच उद्योजक व्हावे अशी सूचना राज्यपालांनी केली.


Governor Bhagat Singh Koshyari inaugurated the Atma Nirbhar Bharat Cell of the Dr Babasaheb Ambedkar Technological University, Lonere through a digital platform on Saturday. Union Minister Prakash Javadekar, Vice Chancellor Dr Rama Sastry, Vice Chancellors of various universities, Principals, Teachers and Students were present. The Cell has been created to promote innovation and creativity among youths and students from Maharashtra. The Governor called for adopting and promoting mother tongue, awakening self-confidence and encouraging enterprise among youths to create Atma Nirbhar Bharat.

अलविदा रॉकी!

बीड पोलीस दलातील रॉकी नामक श्वानाचे काल दीर्घ आजाराने दुःखद निधन झाले. त्याच्या आत्म्यास चिरशांती लाभो अशी मी ईश्वराजवळ प्रार्थना करतो. भावपूर्ण श्रद्धांजली!  दहशतवादी हल्ले, बॉम्बशोधक, बॉम्बनाशक पथके, गुन्ह्यांची उकल आणि सभा बंदोबस्त इ. विषयांच्या संदर्भात महाराष्ट्र पोलीस दलातील श्वानपथक महत्त्वाची भूमिका बजावत असते. महाराष्ट्र पोलीस दलातील तंत्रशुद्ध प्रशिक्षणाने तयार झालेले श्वान हजारो नागरिकांचे जीवन वाचविण्याचे काम करत आले आहेत. रॉकीने आजपर्यंत ३६५ गुन्हे उघडकीस आणण्यात मोलाची भूमिका बजावली होती. बीड पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारा एक प्रामाणिक योद्धा आम्ही रॉकीच्या जाण्याने गमावला आहे. त्यांच्या निधनाचे वृत्त मन हेलावून टाकणारे आहे. रॉकीने केलेली कामगिरी माझ्यासह बीड पोलीस दलाच्या मनात सदैव घर करून राहील.

– गृहमंत्री अनिल देशमुख

पुणे ग्रामीण पोलीस आणि स्‍मार्ट पोलिसिंग

गुवाहाटी येथे 30 नोव्हेंबर 2014 रोजी झालेल्या 49 व्या पोलीस महासंचालक/विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या परिषदेमध्ये भारताच्या प्रधानमंत्री महोदयांनी स्‍मार्ट (एसएमएआरटी) पोलिसींग संकल्पना जाहीर केली होती. यानुसार पोलीस प्रशासन हे सामान्य नागरिकांसाठी अधिक अनुकूल बनविणे. अधिक प्रशिक्षित पोलीस दल आणि पोलिसींगमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करणे. आपत्कालीन परिस्थितीत जलद प्रतिसाद उपलब्ध करणे. सतर्क आणि जबाबदार पोलिस दल. पोलीसांच्या वर्तनात सकारात्मक बदल घडवून संवेदनशील आणि विश्वासार्ह असे पोलीस दल समाजासाठी उपलब्ध करून देणे याबाबींचा समावेश होता.


एस म्‍हणजे स्‍ट्रीक्‍ट ॲण्‍ड सेन्सिटीव्‍ह, एम म्‍हणजे मॉडर्न ॲण्‍ड मोबाईल, ए म्‍हणजे अलर्ट ॲण्‍ड अकाऊंटेबल, आर म्‍हणजे रिलायबल ॲण्‍ड रिस्‍पॉन्सिव्‍ह आणि टी म्‍हणजे टेक्‍नोसॅव्‍ही ॲण्‍ड पोलीस फोर्स असा त्‍याचा अर्थ आहे. जिल्‍हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांच्‍या मार्गदर्शनाखाली पुणे जिल्‍ह्यात ‘स्‍मार्ट पोलिसींग’ उपक्रम यशस्‍वीपणे राबविण्‍यात येत आहे.
स्‍मार्ट पोलिसींगचे पोलीस स्‍टेशन, तंत्रज्ञान व दळणवळण, गतीमानता, जनतेशी पोलीसांशी सह-संबंध, पोलिसांचे वर्तन, तपास, आपत्‍कालिन प्रतिसाद प्रणाली, वाहतुकीचे नियमन, अभिलेख देखभाल आणि प्रशिक्षण हे महत्‍त्‍वाचे पैलू आहेत. पोलिसींगच्या अनुषंगाने पुणे जिल्ह्यामध्ये डिसेंबर २०१८ पासून कामास सुरुवात झाली. त्यामध्ये पायाभूत सुविधांची उपलब्धता, अभिलेख वर्गीकरण व नाश, पोलीस ठाण्याचे एकंदरीत कामकाज व त्यावर अधिकाऱ्यांचे नियंत्रण, महिला पोलीस कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र विश्रांती कक्ष तसेच येणाऱ्या काळानुसार सायबर गुन्‍हे व इतर गुन्हे तपास कामी अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर, डिजिटल रेकॉर्ड अद्ययावत करणे, इंटरनेट सुविधा, स्मार्टफोनचा वापर तसेच महिला व नागरिक सुरक्षिततेसाठी १०० नंबर, १०९१, प्रतिसादचा वापर व खऱ्या अर्थाने मिळणारा प्रतिसाद अशा अनेक गोष्टींचा या स्‍मार्ट पोलिसींग तपासणीमध्ये समाविष्ट करून प्रत्येक पोलीस स्टेशनचे मानांकन निश्चित केले गेले. याचा शासन सर्व पोलीस अधिकारी/कर्मचारी व नागरिकांना फायदा होईल, असा विश्‍वास उपमुख्‍यमंत्री तथा जिल्‍ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी व्‍यक्‍त केला.


पुणे ग्रामीण पोलीस दलाच्‍या पुणे विभागात 4 उपविभाग आणि 16 पोलीस स्‍टेशन तर बारामती विभागात 3 उपविभाग आणि 15 पोलीस स्‍टेशन येतात. पोलीस अधीक्षक कार्यालयात स्‍थानिक गुन्‍हे अन्‍वेषण विभाग, जिल्‍हा विशेष शाखा, आर्थिक गुन्‍हे शाखा, सुरक्षा शाखा, सायबर पोलीस स्‍टेशन, कल्‍याण शाखा, जिल्‍हा वाहतूक शाखा, वायरलेस विभाग, मोटार परिवहन विभाग यांचा समावेश होतो. ‘स्‍मार्ट पोलीसींग’मध्‍ये हवेली उप विभागीय पोलीस अधिकारी क्षेत्रातील लोणीकंद, पौड पोलीस स्‍टेशनला ए प्‍लस तर हवेली, वेल्‍हा आणि लोणी काळभोर पोलीस स्‍टेशनला ए ग्रेडचे मानांकन मिळाले. लोणावळा उप विभागीय पोलीस अधिकारी क्षेत्रातील लोणावळा शहर, लोणावळा ग्रामीण, वडगाव मावळ पोलीस स्‍टेशनला ए प्‍लस, कामशेत पोलीस स्‍टेशनला ए ग्रेड मानांकन मिळाले. खेड उप विभागीय पोलीस अधिकारी क्षेत्रातील घोडेगाव पोलीस स्‍टेशनला ए डबल प्‍लस, खेड ए प्‍लस तर मंचर पोलीस स्‍टेशनला ए ग्रेड मानांकन मिळाले. जुन्‍नर उप विभागीय पोलीस अधिकारी क्षेत्रातील नारायणगावला ए डबल प्‍लस, आळेफाटा ए प्‍लस तर ओतूर आणि जुन्नर पोलीस स्‍टेशनला ए ग्रेड मानांकन मिळाले.


बारामती उप विभागीय पोलीस अधिकारी क्षेत्रातील बारामती शहर, इंदापूर, वडगाव निंबाळकर, वालचंदनगर पोलीस स्‍टेशनला ए डबल प्‍लस तर बारामती तालुका व भिगवण पोलीस स्‍टेशनला ए ग्रेड मानांकन मिळाले. दौंड उप विभागीय पोलीस अधिकारी क्षेत्रातील दौंड, यवत, शिक्रापूर, रांजणगाव (एमआयडीसी) पोलीस स्‍टेशनला ए डबल प्‍लस व शिरुर पोलीस स्‍टेशनला ए ग्रेड मानांकन मिळाले. भोर उप विभागीय पोलीस अधिकारी क्षेत्रातील भोर, सासवड, राजगड आणि जेजुरी पोलीस स्‍टेशनला ए ग्रेड मानांकन मिळाले.


‘स्मार्ट पोलिसींग’ प्रकल्पाच्या अंमलबजावणीमुळे पोलिस स्टेशनची पायाभूत सुविधा, पोलिसांचे वर्तन, कुशल व प्रशिक्षित मनुष्यबळ यामध्‍ये सुधारणा करता आली. उत्तम सेवा उपलब्‍ध केल्‍यामुळे सामान्य लोकांमध्ये पोलिसांबद्दलची व पर्यायाने शासनाची प्रतिमा उज्‍ज्‍वल करता आली. पोलिस मित्र समिती, ग्राम सुरक्षा दल, महिला सुरक्षा समिती, पोलिस स्टेशन -100, बीट -100 यांच्या कम्युनिटी पोलिसींग उपक्रमावर लक्ष केंद्रीत केल्याने अधिक समन्वय साधून गोपनीय माहिती संग्रह वाढला आणि कायदा व सुव्यवस्थेचे प्रश्न कमी झाले आहेत. ग्रामीण भागात स्थानिक प्रशासनाच्या माध्यमातून 300 सीसीटीव्ही कॅमेरे आणि लोकसहभागातून 400 सीसीटीव्ही लावण्‍यात आले. या कामातील खासगी सहभागामुळे 5 कोटी रुपयांचा निधी वाचला आहे. ई-चालानचा वापर आणि रहदारी मनुष्यबळाच्या चांगल्या वापरामुळे वाहतुकीचे महसूल संकलन वाढले आहे. व्हॉलीबॉल मैदान सुरू करणे आणि पोलिस ठाण्यात जीम उघडणे, 45 वर्षांवरील सर्वांची वैद्यकीय तपासणी अनिवार्य करण्‍यात आली. पोलिस कर्मचारी, कर्मचारी यांच्‍याकडून हेल्मेटचा सक्तीने वापर केल्याने दर वर्षी पोलिसांचे 15 मृत्यू कमी झाले आहेत. रात्रीच्या वेळी गस्त घालण्यात आरएफआयडीचा (रेडिओ फ्रीक्‍वेन्‍सी इन्‍फ्रारेड डिव्‍हाईस) वापर करणे, मोठ्या बंदोबस्तामध्ये तसेच गर्दीवर नजर ठेवण्यासाठी ड्रोन कॅमेऱ्याचा वापर, प्रमुख बन्दोबस्तामध्ये जातीय दंगल काबू योजनेच्या अंमलबजावणीमुळे जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था प्रश्‍न रोखण्यास मदत झाली आहे.


सीएसआर उपक्रम – ‘स्मार्ट पोलिसिंग’ उपक्रमाच्या जबरदस्त वैशिष्ट्यांमुळे मोठ्या प्रमाणात सीएसआर (कॉरपोरेट सोशल रिस्‍पॉन्सिबीलीटी) उपक्रमांत वाढ झाली. सीएसआर उपक्रमांतर्गत पोलिस कल्याण निधीला अडीच कोटी निधी प्राप्त झाला. औद्योगिक क्षेत्रातील व्यक्तींचा व सामान्य माणसांचा आत्मविश्वास वाढल्‍याने गुन्हेगारी नोंदीचे प्रमाण वाढले. जिल्ह्यातील 12 टोळ्यांवर एमसीएसीए (मोका) अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आणि त्या अंतर्गत 130 गुन्हेगारांना, बॉम्‍बे पोलीस कायद्यानुसार 55 गुन्हेगारांना हद्दपार केले गेले.


सायबर गुन्‍हेगारी जनजागृती, आर्थिक गुन्हेगारी, महिला सुरक्षा आणि सर्वसाधारण संबंधित विषयांवर विविध पोलिस ठाण्यातील पोलिस अधिकारी आणि पोलिस कर्मचारी यांच्यासाठी 100 हून अधिक कार्यशाळा घेण्‍यात आल्यात. यामुळे अशा प्रकारचे अनेक गुन्हे रोखण्‍यास मदत झाली. वर्तणुकीतील बदल घडवून आणण्यासाठी ध्यानधारणा कार्यशाळा तसेच खासगी एजन्सीसमवेत आयोजित केलेल्या प्रशिक्षणांमुळे तक्रारदारांना पुरविण्यात येणारी सेवा सुधारली आहे.


डायल 100 च्या लाईनमध्ये वाढ, वाहनांवर जीपीएस बसविणे, कर्मचारी-अधिकारी यांच्‍याद्वारे वायरलेसचा वापर होत असल्‍यामुळे पोलिसांकडून प्रतिक्रियेची वेळ 20 मिनिटांवरून 6 मिनिटांवर आणली गेली. एका मार्गाचा वापर करून वाहतुकीचा प्रवाह वाढवणे, विषम पार्किंग, पार्किंग सीमांकन, पार्किंग झोन, ट्रॅफिक वॉर्डन, ई-चालान प्रणाली, आवश्यकतेनुसार नवीन सिग्नल यामुळे रहदारीची परिस्थिती सुधारली आहे.


इमारत सुस्थितीत व प्रशस्त जागेसह सर्व सोयींनी युक्त, स्वागत कक्ष, पुरेसे व चांगले फर्निचर, स्वतंत्र मुद्देमाल कक्ष, शस्त्रसाठा व अभिलेख कक्ष, अधिकारी, कर्मचारी यांच्‍याकरिता विश्रांतीगृह, लॉकअपमध्ये पुरेशी हवा व स्वच्छतागृह, स्वतंत्र मुलाखत कक्ष, स्वच्छ व प्रशस्त प्लास्टिक विरहीत परिसर, आवश्यक व पुरेसा शस्त्रसाठा, अश्रूधूर, ढाल, हेल्मेटचा साठा, प्रशिक्षित व अनुभवी अधिकारी व कर्मचारी हेही पायाभूत सुविधांबाबतचे सर्वेक्षण आधारीत मुद्दे होते.


अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर- पोलीस ठाण्‍यामध्ये सीसीटीव्ही यंत्रणा ही मुलाखत कक्ष, लॉकअप, स्वागत कक्षामध्ये उपलब्ध आहे. सी.सी.टी.एन.एस. (क्राईम ॲण्‍ड क्रिमीनल ट्रॅकींग ॲण्‍ड नेटवर्कींग सिस्‍टीम) प्रणालीच्‍या अनुषंगाने कॅस सॉफ्टवेअर व हार्डवेअरचा जास्तीत जास्त वापर करण्‍यात येत आहे. पुरेशा संगणकासह इंटरनेट सुविधा त्याचबरोबर प्रिंटर, फोटो कॉपियर, मशीन, फॅक्स मशीन व स्कॅनर उपलब्ध आहेत. पोलीस अधिकारी व कर्मचारी स्मार्टफोनचा वापर करतात. पोलीस ठाण्‍याच्‍या हद्दीमधील खाजगी कार्यक्षेत्रामधील आस्थापना, बँका, शाळा व महाविद्यालयांच्‍या परिसरात सी.सी.टी.व्ही. कॅमेऱ्याचा वापर करण्‍यास प्रोत्‍साहन तर तांत्रिक दळणवळणासाठी (ई-मेल व व्‍हॉट्स ॲप) संगणकीय वापर करण्‍यात येतो. पोलीसांचे जनतेशी सहसबंध आपुलकीचे, विश्‍वासाचे रहावे यासाठी विविध उपक्रम राबविण्‍यात आले. त्‍यानुसार अनुभवी व निवडक पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांचा नागरिकांचे सुरक्षिते संबंधाने प्रत्येक कामामध्ये सहभाग असतो. या पथकाद्वारे वेगवेगळे विषय घेवून शाळा-महाविद्यालयाच्‍या विद्यार्थ्‍यांकरिता कार्यशाळा, स्पर्धा आयोजित करुन जनजागृती केली गेली. जातीय सलोखा कायम ठेवण्याकरीता वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमांचे/कार्यक्रमांचे आयोजन करण्‍यात येते. झोपडपट्टीतील नागरिकांच्‍या सुरक्षिततेच्या दृष्टिने बैठका घेवून मार्गदर्शन केले जाते. महिला, मुलींचा आत्मविश्वास वाढवून सुरक्षिततेची भावना निर्माण करणे व नोकरीच्‍या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा छळ होणार नाही, याची दक्षता घेतली गेली. मोहल्ला कमिटी बैठक, शांतता समिती बैठक, शासकिय कर्मचारी/कार्यकर्ते यांच्या बैठकांचे नियमित आयोजन केले जाते. पोलीसांचे वर्तन – अनुभवी, प्रशिक्षित व कौशल्यपूर्ण पोलीस अधिकारी व कर्मचारी असल्‍याने त्‍यांचे नागरिकांचे प्रति विनयशील, संवेदनशील, प्रामाणिक व सभ्‍य वर्तन असते. सर्वोच्च न्यायालयाच्या इसम अटकेबाबतच्या नियमांचे तंतोतंत पालन करण्‍यात येते.

महिलां तक्रारदारांसाठी महिला कर्मचाऱ्यांची नियुक्‍ती तसेच आधुनिक व वैज्ञानिक दृष्टिकोन यामुळे सामान्य जनतेमध्ये पोलीस दलाची प्रतिमा उंचावण्‍यास मदत झाली आहे. तपास यंत्रणा- विनाविलंब अर्जाची स्‍वीकृती, कायदा व गुन्ह्याची सद्यस्थिती तपासून त्वरित गुन्हा दाखल, तक्रारीची व तपासाची कार्यवाही त्वरित सुरु, लवकरात लवकर घटनास्थळास भेट, कायद्याचे ज्ञान नसलेल्या तक्रारदारास व्यवस्थित सल्ला देणे, गुन्ह्याची तीव्रता कमी न करणे, तक्रारदारास तक्रार नोंदविल्‍यानंतर प्रत (पोहोच) देणे, अद्ययावत, सुसज्ज व स्वतंत्र पुणे ग्रामीण सायबर पोलीस स्टेशन, तपासकामी अनुभवी व प्रशिक्षित पोलीस कर्मचारी, तपासी अंमलदारांकरिता प्रशिक्षण किंवा कार्यशाळांचे आयोजन, तपास वेळेत पूर्ण करून त्याबाबत तक्रारदार यांना वेळोवेळी सुचित करणे, शास्त्रशुद्ध पद्धतीने तपास, जप्त मुद्देमालाची एफ.एस.एल.कडे (फॉरेन्सिक सायन्‍स लॅब) विनाविलंब तपासणी, जखमीचे प्रमाणपत्र किंवा पोस्ट मॉर्टम रिपोर्ट याकरिता आवश्यक पाठपुरावा केला जातो.

आपत्कालिन प्रतिसाद प्रणाली- पोलीस ठाणे हद्दीतील संवेदनशील ठिकाणे, संभाव्य धोके, महत्त्वाच्या व्यक्‍तींची सुरक्षा, सिक्युरीटी ऑडिट याची आवश्यक माहिती उपलब्ध, धार्मिक स्थळांची माहिती व जनसमुदायाबद्दल माहिती उपलब्ध, परिसरातील शैक्षणिक संस्था, बँका, व्यावसायिक, पत संस्था, ऐतिहासिक ठिकाणे, नद्या व पुराची ठिकाणे, संवेदनशील ठिकाणे, प्रेक्षणीय स्थळांची माहिती उपलब्‍ध आहे. पोलीस ठाण्‍याच्‍या हद्दीतील महसूल, सार्वजनिक बांधकाम विभाग, अग्निशामक यंत्रणा, औद्योगिक आस्‍थापना, सिंचन विभागातील जबाबदार अधिकाऱ्यांबरोबर नियमित बैठका घेण्‍यात येतात. वाहतुकीचे नियमन- अपघात प्रवण ठिकाणांची माहिती, सर्व हॉस्पीटल व आपत्कालीन सेवांच्‍या संपर्क क्रमांकाची माहिती, वाहनांची वर्दळ व ट्रॅफिक जॅम होणाऱ्या ठिकाणांची माहिती, रस्त्याची दुरुस्ती करणाऱ्या विभागाची माहिती, गर्दीच्या ठिकाणी ट्रॅफिक पोलीस कर्मचाऱ्यांची नेमणूक, पुणे ग्रामीण पोलीस दलातील हद्दीच्‍या चौकामध्ये डिजिटल स्‍कॅनिंग व रेकॉर्डिंग सी.सी.टी.व्ही. कॅमेऱ्यांची उपलब्धता आहे. अभिलेख जतन- पोलीस ठाणे अभिलेखावरील पाहिजे (वॉण्‍टेड) असलेले आरोपी, फरारी, मागील वर्षामध्‍ये अटक केलेल्या आरोपींचे रेकॉर्ड, शिक्षा लागलेले, माहितगार गुन्‍हेगार, हिस्‍ट्रीशिटर, कोर्टात हजर न झालेले आरोपी यांची माहिती, जुने रेकॉर्ड आवश्‍यकतेनुसार ठेवून इतर रेकॉर्ड नियमाप्रमाणे नष्‍ट करणे, रेकॉर्डरुम (अभिलेख कक्ष) व्‍यवस्थित व सुस्थितीत असावी, जेणेकरुन वाळवी लागून नाश होवू नये, पोलीस ठाण्‍यातील रेकॉर्ड पोलीस मॅन्‍युअलमधील तरतुदीनुसार ठेवण्‍यात आले आहे. प्रशिक्षण- पोलीस कर्मचाऱ्यांचे क्राईम ॲण्‍ड क्रिमीनल ट्रॅकींग ॲण्‍ड नेटवर्कींग सिस्‍टीम व दैनंदिन ऑनलाईन अहवाल याबाबतचे मुलभूत प्रशिक्षण झाले आहे. पोलीस कर्मचाऱ्यांचे संगणक वापराचे मुलभूत प्रशिक्षण झाले आहे. किशोर न्याय कायदा, मुलांची काळजी व संरक्षणाबाबतचे प्रशिक्षण पोलीस कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहे. अधिकारी/कर्मचाऱ्यांना नागरिकांच्या शंका निरसनाचे, तक्रार निवारण्याचे तसेच त्‍यांना विविध योजनांची माहिती करुन देण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. अधिकारी/कर्मचारी यांना अद्ययावत प्रशिक्षण/कार्यशाळा गरजेनुसार आयोजित केली जाते.

सेजल समीर रुपलग आणि समीर रुपलग यांच्‍या सोर ग्रुपतर्फे विविध मुद्दयांवर आधारित सर्व्‍हेक्षण करुन ‘स्‍मार्ट पोलिसींग’चे मानांकन निश्चित करण्‍यात आले. मानांकन प्राप्‍त पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांचा उपमुख्‍यमंत्री तथा जिल्‍ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी प्रमाणपत्र देवून गौरव केला. यामध्‍ये बारामतीचे अपर पोलीस अधीक्षक मिलींद मोहिते यांच्‍यासह आंतरिक सुरक्षा पदकाने सन्मानित पोलिस उप अधीक्षक जाधव आण्णासाहेब मारुती, खन्ना दिपाली मोहन, पोलीस निरीक्षक उगले गणेश रंगनाथ (लोणी काळभोर), पोलीस उपनिरीक्षक मोहिते नितीन मोहन- (वाचक, दौंड एसडीपीओ) गोरे अमोल महादेव (स्थानिक गुन्हे शाखा), धोंगडे रामेश्वर चंद्रभान (स्थागुशा),लकडे नितीन शिवाजी (यवत), पालवे भगवान जगन्नाथ (शिरूर) ननावरे शिवाजी लक्ष्मण (लोणी काळभोर), पवार राजेंद्र भीमा, (भोर) लवटे अनिल मनोहर,(पौड), गायकवाड मृगदीप सुधाकर (लोणावळा शहर ), लोंढे सुशील शामराव(इंदापूर),सहायक पोलिस निरीक्षकदत्तात्रय महादेव दराडे, अर्जुन हरिबा मोहिते, रमेश नारायण खुणे आणि सहायक फौजदार जितेंद्र दत्तात्रय शेवाळे तसेच पोलीस हवालदार राजु बापुराव पुणेकर, रविंद्र एकनाथ शिनगारे, सचिन मोहन गायकवाड, निलेश बाळासाहेब कदम, सुरेश दौलत भोई,अजित रघुनाथ ननावरे, पोलीस नाईक प्रमोद परशुराम नवले, मंगेश तुकाराम नेवसे या अधिकाऱ्यांचा समावेश होता.


‘स्‍मार्ट पोलिसींग’या उपक्रमामुळे पोलीस आणि जनता यांच्‍यातील संबंध विश्‍वासाचे होतील,अशी आशा उपमुख्‍यमंत्री अजित पवार यांनी व्‍यक्‍त केली. प्रत्‍येक नागरिकांच्‍या सर्वसाधारण अपेक्षा पूर्ण करण्‍यात पुणे ग्रामीण पोलीस यशस्‍वी झाले आहेत, भविष्‍यातही ते यशस्‍वी होतील, अशी अपेक्षा आहे.

राजेंद्र सरग, जिल्‍हा माहिती अधिकारी, पुणे
मो- 9423245456

000000000000000000000000000

असा होता आठवडा

दि.९ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट या कालावधीत शासनाने घेतलेले निर्णय आणि घडामोडींचा संक्षिप्त आढावा

कोरोना युद्ध

९ ऑगस्ट २०२०

  • बरे झालेल्या १३ हजार ३४८ रुग्णांची घरी रवानगी. आतापर्यंतची सर्वोच्च संख्या. आतापर्यंत ३ लाख ५१ हजार ७१० रुग्ण बरे. नवीन निदान झालेले रुग्ण- १२ हजार २४८, रुग्ण बरे होणाचे प्रमाण ६८.२५ टक्के  . सध्या १ लाख ४५  हजार ५५८  रुग्णांवर उपचार सुरू. आज ७८ हजार ७० चाचण्या पूर्ण, नोंद झालेले मृत्यू- ३९०.
  • महाराष्ट्र स्टार्टअप सप्ताह संपन्न, उत्कृष्ट २४ स्टार्टअप्सची निवड जाहीर, स्टार्टअप्सना १५ लाख रुपयांपर्यंतचे शासकीय कामाचे आदेश मिळणार असल्याची कौशल्य विकास मंत्री श्री. नवाब मलिक यांची माहिती.
  • कोरोना (COVID-१९) विषाणूच्या जगभरातील वाढत्या प्रादुर्भावामुळे देशात व संपूर्ण राज्यात संचारबंदी लागू करण्यात आलेली असताना प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शालेय शिक्षण विभागातर्फे  ऑफलाइन आणि ऑनलाइन शिक्षणाची सोय उपलब्ध.        दीक्षा ॲपव्दारे दररोज इयत्ता व विषयनिहाय ई- साहित्य अभ्यासमालेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविण्याची सुविधा. ऑफलाइनची सुविधा सुध्दा उपलब्ध. घरपोच पाठ्यपुस्तकांचे वितरण.  
  • २० जुलै, २०२० पासून सह्याद्री वाहिनीवर एमकेसीएल फाउंडेशन व राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र यांच्यामार्फत इयत्ता १ ली ते ८ वी साठी आनंददायी शिक्षण.
  •  दुर्गम भाग व कोरोना प्रादुर्भाव कमी आहे किंवा नाही अशा ठिकाणी प्रत्यक्ष शिक्षण सुरु.

१० ऑगस्ट २०२०

  • आज बरे झालेल्या ६७११ रुग्णांची घरी रवानगी. आतापर्यंत एकूण ३ लाख ५८ हजार ४२१ रुग्ण बरे, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६८.३३ टक्के. आज ९,१८१ नवीन रुग्णांचे निदान, , सध्या १ लाख ४७ हजार ७३५ ॲक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरु   . आज२९३ करोनाबाधितरुग्णांच्यामृत्यूंचीनोंद. मृत्यूदर३.४४ टक्के
  • लातूर जिल्ह्यातील लॉकडाऊन  13 ऑगस्टपासून शिथिल तर 17 ऑगस्ट पासून पूर्णपणे उठणार असल्याची वैद्यकीय शिक्षण व  सांस्कृतिक कार्य मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांची माहिती.
  • २२ मार्च ते ९ ऑगस्ट पर्यंत  २,२५,३८०    गुन्ह्यांची नोंद, ३३,११७ व्यक्तींना अटक, विविध गुन्हांसाठी  १९ कोटी ८८ लाख ०५  हजार ३५ ४ रु. दंडाची आकारणी.
  • मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते  बुलडाणा येथील कोविड समर्पित रूग्णालय व देऊळगावराजा येथील कोविड हेल्थ सेंटरचे ऑनलाईन लोकार्पण. यावेळी पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे उपस्थित.  या आरोग्य सुविधांच्या निर्मितीमुळे कोविड रूग्णालय व कोविड केअर सेंटर येथे अनुक्रमे 100 व 20 खाटांची सोय उपलब्ध.

११ ऑगस्ट २०२०

  • २२ मार्च ते १० ऑगस्ट पर्यंत  कलम १८८ नुसार २, २५ ,९०७    गुन्ह्यांची नोंद, ३३,१९० व्यक्तींना अटक, विविध गुन्हांसाठी  १९ कोटी ९९ लाख ७३  हजार ८०४ रु. दंडाची आकारणी.
  • प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी यांच्यामार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री उध्दव ठाकरे आणि गुजरात, पश्चिम बंगाल, पंजाब, आंध्रप्रदेश, कर्नाटक, तेलंगणा, तामिळनाडू, बिहार आणि उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांशी व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद. ठळक मुद्दे-  कोरोना बाधित आणि मृत्यू झालेले एकही प्रकरण महाराष्ट्राने लपवले नाही, मृत्यू दर कमी करण्याचा प्रयत्न, मुंबईतील धारावी, वरळी येथील स्थिती नियंत्रणात आणल्याबद्दल सर्वत्र कौतुक,  कोरोनाची दुसरी लाट महाराष्ट्रात येऊ देणार नाही यासाठी सर्वोच्च प्राधान्य. याकाळात शिवभोजन योजनेव्दारे दर महिन्यात लाखो लोकांना केवळ ५ रुपयांमध्ये जेवणाची सोय, कुपोषण निर्मुलनासाठी आदिवासी बालक व मातांना दुध भूकटी मोफत देण्याचा निर्णय, कोरोनानंतरचे उपचार व्हावे यासाठी यंत्रणा निर्माण करण्याची गरज, महाराष्ट्रात साथ रोग नियंत्रण रुग्णालय मुंबईसह सर्व जिल्ह्यांमध्ये सुरु करणार, इम्युनॉलॉजी लॅबची संख्या वाढविण्याची गरज, विषांणुचा उद्भव कसा आणि का होतो यावर संशोधन करण्याची गरज, अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबत देशपातळीवर एकच निर्णय आवश्यक, राज्यात कोरोना उपचारासाठी ऑक्सीजन, व्हेंटिलेटर आणि इतर सुविधांसह साडेतीन लाख खाटा उपलब्ध,  
  • आज बऱ्या झालेल्या १० हजार १४ रुग्णांची घरी रवानगी.  आतापर्यंत एकूण ३ लाख ६८ हजार ४३५ रुग्ण बरे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६८.७९ टक्के. आज ११ हजार ८८ नवीन रुग्णांचे निदान, सध्या १ लाख ४८ हजार ५५३ ॲक्टिव्ह रुग्ण. आज २५६ मृत्यूंची नोंद. मृत्यूदर ३.४२ %. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २८,३७,५७८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५,३५,६०१ (१८.८७ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह, १०,०४,२३३ व्यक्ती होमक्वारंटाइन, ३५,६४८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइन.

१२ ऑगस्ट २०२०

  • आज बरे झालेल्या १३ हजार ४०८ रुग्णांची घरी रवानगी. ही आतापर्यंतची सर्वोच्च संख्या. एकूण ३ लाख ८१ हजार ८४३ रुग्ण बरे, आज १२ हजार ७१२ नवीन रुग्णांचे निदान, रुग्ण बरे होणाचे प्रमाण ६९.६४ टक्के,  सध्या १ लाख ४७  हजार ५१३  रुग्णांवर उपचार सुरू, आज नोंद झालेले  मृत्यू – ३४४.
  • खुल्या प्रवर्गातील वैद्यकीय व दंत अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्काची प्रतिपूर्ती मिळणार  असल्याची वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित विलासराव देशमुख यांची माहिती.
  • राज्यातील वैद्यकीय व दंत महाविद्यालयात कार्यरत निवासी डॉक्टरांच्या विद्या वेतनात दरमहा दहा हजार रुपयांची 1 मे 2020 पासून वाढ करण्याचा निर्णय.
  • कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या मराठवाड्यातील दोन पत्रकारांच्या कुटुंबियांना सरकारने घोषणा केल्याप्रमाणे पन्नास लाख रुपये विमा संरक्षण अंतर्गत मदत करण्याची, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांची मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि आरोग्य मंत्र्यांकडे मागणी.
  • कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत अभय योजनेची मुदत ३१ डिसेंबर २०२० पर्यंत वाढविण्याचा निर्णय. मुंबई महापालिकेच्या पाणी बिलाच्या थकबाकीवर दरमहा २ टक्के आकराले जाणारे शुल्क अभय योजनेअंतर्गत माफ.
  • कोविड पार्श्वभूमीवर विमुक्त जाती व भटक्या जमातीच्या मुला-मुलींच्या शिक्षणाबाबत निर्माण झालेल्या परिस्थितीबाबत महाराष्ट्र राज्य आश्रमशाळा वसतीगृह संचालक संघासोबत बैठक. यावेळी खासदार  सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे आणि इतर मागासवर्ग, बहुजन समाज  कल्याण विभागाचे मंत्री विजय वडेट्टीवार, खा.श्री  शरद पवार उपस्थित. आश्रमशाळातील सर्व विद्यार्थ्यांना इंटरनेट कनेक्टिव्हिटी आणि अँड्रॉइड मोबाइल फोन उपलब्ध करुन देण्यासंदर्भात शासकीय उपाययोजनेबाबत बैठकीत चर्चा.
  • राज्यात कोरोना चाचण्यांसाठीचे सुधारीत दर जाहीर, आधिच्या दरात प्रति तपासणी ३०० रुपये कमी. सॅम्पल घेऊन त्याची वाहतूक आणि नमुन्याच्या अहवालाकरिता २२०० रुपयांऐवजी १९०० रुपये दर, स्वॅब कलेक्शन सेंटर, कोरोना केअर सेंटर्स, क्वारंटाइन सेंटरमधून स्वॅब घेतल्यास २५०० रुपयांऐवजी २२०० रु. दर, रुग्णाच्या घरी जाऊन स्वॅब घेतल्यास २५०० रुपये दर.

मंत्रिमंडळ  निर्णय

  • कोविड विषाणुमुळे आदिवासी कुटुंबांना रोजगार नसल्याने आर्थिक मदत करणे गरजेचे असल्याने आर्थिक विवंचनेतील आदिवासींसाठी खावटी अनुदान योजना पुन्हा सुरु करण्याचा निर्णय, सुमारे 11.55 लाख आदिवासी लाभार्थींना याचा फायदा. या योजनेत एकूण 4 हजार रुपये कुटुंब अनुदान.  ज्यामध्ये 2 हजार रुपये किंमतीच्या वस्तू आणि 2 हजार रुपये रोख रक्कम बँक खात्यात जमा, यासाठी 486 कोटी रुपये इतक्या खर्चास मान्यता.  
  • प्रधान मंत्री गरीब कल्याण अन्न योजनेतील राज्यामधील अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंबातील लाभार्थींना जुलै ते नोव्हेंबर 2020 या कालावधीकरिता अख्या चण्याऐवजी प्रति महिना प्रत्येक शिधापत्रिकाधारकास एक किलो मोफत चणाडाळ वितरित करण्याचा निर्णय.
  • महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या अंमलबजावणीसाठी 1 हजार 500 कोटी इतका निधी आकस्मिकता निधी अग्रिमातून उपलब्ध करून देण्याचा निर्णय.

१३ ऑगस्ट २०२०

  • बऱ्या झालेल्या ९११५ रुग्णांची घरी रवानगी. एकूण ३ लाख ९० हजार ९५८ रुग्ण बरे, रुग्ण बरे होणाचे प्रमाण ६९.८ टक्के  . ११ हजार ८१३ नवीन रुग्णांचे निदान, सध्या १ लाख ४९  हजार ७९८ रुग्णांवर  उपचार सुरू. नोंद झालेले मृत्यू – ४१३
  • उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली काजू व्यावसायिकांच्या विविध मागण्यासंदर्भात  बैठक, उद्योगमंत्री श्री सुभाष देसाई, उद्योग राज्यमंत्री आदिती तटकरे उपस्थित, काजू व्यावसायिकांना राज्याच्या जीएसटीची शंभर टक्के प्रतिपूर्ती; मागील कालावधीतील व्हॅटची थकीत रक्कम परत देण्याचा श्री पवार यांचा‍ निर्णय.
  • ‘आयडीबीआय’ बँकेच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्यावतीने ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी’साठी 23 लाख 9 हजारांचा डिमांड ड्राफ्ट उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांच्याकडे सुपूर्द.
  • आंतरराष्ट्रीय विद्यापीठांमध्ये पदव्युत्तर पदवी किंवा तत्सम उच्च शिक्षण घेणाऱ्या अनुसूचित जाती संवर्गातील विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीसाठी २०२० – २१ या नवीन शैक्षणिक वर्षात लाभ मिळवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना अर्ज करण्यासाठी १४ ऑगस्ट पर्यंतची मुदत पंधरा दिवसांनी वाढवून आता २८ ऑगस्ट पर्यंत करण्यात आल्याची सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांची माहिती.
  • विधानसभा अध्यक्ष श्री. नाना पटोले यांच्या सूचनेनुसार  महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची 20 सप्टेंबर 2020 रोजी होणारी परीक्षा आता सर्व महसूल विभागीय केंद्रांवर घेण्याचा निर्णय.

१४ ऑगस्ट २०२०

  • आत्मनिर्भर भारत योजनेअंतर्गत विस्थापित मजूर व विनाशिधापत्रिकाधारकांना पाच किलो  मोफत तांदूळ व एक किलो  अख्खा चना  वाटप करण्यास 31 ऑगस्ट 2020 पर्यंत  मुदतवाढ.
  • महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातील नोंदीत सक्रीय बांधकाम कामगारांना आणखी ३ हजार रुपयांचे अर्थसहाय्य आणि बांधकाम कामगारांच्या  खात्यात दुसरा हप्ता मंजूर करण्याचा कामगार मंत्री दिलीप         वळसे-पाटील यांचा निर्णय. यामुळे १० लाख बांधकाम कामगार लाभान्वित. यासाठी मंडळामार्फत ३०० कोटी रुपये खर्च.
  • कर्तव्य बजावताना कोरोनाच्या संसर्गामुळे मृत्यू झालेल्या परभणी जिल्ह्यातील ग्रामविकास अधिकाऱ्याच्या वारसास ५० लाख रुपयांच्या विमा कवचाची रक्कम अदा करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांची माहिती. प्रस्तावास एका दिवसात मंजुरी.
  • सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था यांच्यामार्फत घेण्यात येणारी शासकीय सहकार व लेखा पदविका (जी.डी.सी. अँड ए.) परीक्षा व सहकारी गृहनिर्माण व्यवस्थापन प्रमाणपत्र (सी.एच.एम.) परीक्षा कोविड 19 मुळे अनिश्चित काळासाठी स्थगीत.
  • २२ मार्च ते १३ ऑगस्टपर्यंत  २, २८ ,०७६   गुन्ह्यांची नोंद, ३३,३५९ व्यक्तींना अटक, विविध गुन्हांसाठी  २० कोटी ६२ लाख ५३  हजार ४९४ रु. दंडाची आकारणी, अत्यावश्यक सेवेसाठी ७ लाख ४३  हजार ४८४   पासेसचे वितरण.
  • भिवंडी उपजिल्हा रुग्णालयात राज्यातील पहिल्या टेलीआयसीयू प्रकल्पाचा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते शुभारंभ, यामुळे अतिदक्षता विभागात (आयसीयू) दाखल कोरोनाच्या गंभीर रुग्णांसाठी विशेषज्ञांचे मार्गदर्शन आणि उपचाराची सेवा उपलब्ध. अकोला, जळगाव, सोलापूर, जालना आणि औरंगाबाद येथील वैद्यकीय महाविद्यालय आणि जिल्हा रुग्णालयांमध्ये ही सुविधा लवकरच कार्यान्वित.
  • बऱ्या झालेल्या १० हजार ४८४ रुग्णांची घरी रवानगी. एकूण ४ लाख १ हजार ४४२ रुग्ण बरे. रुग्ण बरे होणाचे प्रमाण ७०.०९ टक्के  . आज १२ हजार ६०८ नविन रुग्णांचे निदान, सध्या १ लाख ५१  हजार ५५५ रुग्णांवरउपचार सुरू. नोंद झालेले मृत्यू-  ३६४.

१५ ऑगस्ट २०२०

  • बरे होऊन घरी रवानगी केलेले रुग्ण- ६८४४. आतापावेतो  ४ लाख ८ हजार २८६ रुग्ण बरे. बरे होणाचे प्रमाण ६९.८२ टक्के. आज १२ हजार ६१४ नवीन रुग्णांचे निदान. सध्या १ लाख ५६  हजार ४०९ रुग्णांवर उपचार सुरू. नोंद झालेले मृत्यू-  ३२२.

इतर निर्णय व घडामोडी

९ ऑगस्ट २०२०

  • जागतिक आदिवासी दिनानिमित्त  उपमुख्यमंत्री श्री अजित पवार, आदिवासी विकास मंत्री अॅड. के.सी. पाडवी आणि वनमंत्री श्री संजय राठोड यांच्याद्वारे शुभेच्छा.
  • उपमुख्यमंत्री श्री  अजित पवार यांच्यामार्फत ऑगस्ट क्रांतिदिनाच्या शुभेच्छा.
  • जुन्नर पंचायत समितीचे माजी सभापती, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दशरथ मारुती पवार यांच्या निधनाबद्दल उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांच्याद्वारे दु:ख व्यक्त.
  • महाराष्ट्र सायबर विभागात इंटर्नशीपची संधी, संपर्क-  Twitter@MahaCyber1 / The Special Inspector General of Police, Maharashtra Cyber, 32nd floor, World Trade Center, Cuffe Parade, Mumbai-400 005

१० ऑगस्ट २०२०

  • मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीमध्ये स्वातंत्र्य दिनी ध्वजारोहणाबाबत सूचना निर्गमित, प्रशासक, स्वातंत्र्य सैनिक, तंटामुक्ती समिती अध्यक्ष, ग्रामसेवक किंवा सक्षम अधिकारी यांच्याहस्ते ध्वजारोहण होणार असल्याची ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांची माहिती.
  • राज्यातील पूरस्थितीसंदर्भात प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी यांची मुख्यमंत्री श्री उध्दव ठाकरे यांच्या समवेत व्हिडिओ कॉन्फरंसिंगद्वारे चर्चा, आपत्ती निवारण व सर्व राज्यांमध्ये समन्वय साधण्यासाठी प्रधानमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याची श्री ठाकरे यांची मागणी. ठळक मुद्दे-  निसर्ग चक्रीवादळाने राज्यात १ हजार ६५ कोटीहून अधिक रुपयांचे नुकसान, ५  ऑगस्ट २०२० रोजी वादळासह पडलेल्या पावसामुळे मुंबईत अंदाजे ५०० कोटी रुपयांपेक्षा जास्त नुकसान, त्यामुळे राज्याला लवकरात लवकर मदत आवश्यक. केंद्र शासनाच्या वाणिज्य मंत्रालयाची जागा मुंबई महानगर पालिकेस हस्तांतरीत केल्यास माहूल पंपिंग स्टेशनच्या उभारणीच्या कामाला गती येणे शक्य. यामुळे हिंदमाता, दादर, वडाळा या भागातील पावसाचे मोठ्याप्रमाणात साचणारे पाणी बाहेर काढणे शक्य. नदीकाठी पुररेषेच्या आत राहणाऱ्या मानवी वस्त्या शोधून तेथील नागरिकांना इतरत्र हलवण्याची, योग्य जागी त्यांचे पुनर्वसन करण्याची गरज. मराठवाड्याच्या हवामान अंदाजासाठी औरंगाबाद येथे  स्वतंत्र ३ x डॉपलर रडार उभारणीची मागणी.

११ ऑगस्ट २०२०

  • गणेशोत्सवाच्या काळात रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गसह कोकण भागात चोवीस तास वीज पुरवठा करण्याचे , ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांचे निर्देश.
  • पर्यावरण प्रभाव मूल्यांकन मसुद्याचे पुनर्मूल्यांकन करण्याची पर्यावरण मंत्री श्री. आदित्य ठाकरे यांची केंद्रीय पर्यावरण  आणि वनमंत्री श्री. प्रकाश जावडेकर यांना विनंती.
  • विदर्भातील मार्की मांगली – २ या कोळसा ब्लॉकचा लिलाव थांबविण्यासाठी हस्तक्षेप करण्याची पर्यावरण मंत्री श्री. आदित्य ठाकरे यांची केंद्रीय कोळसा आणि खाण मंत्री यांना विनंती.

१२ ऑगस्ट २०२०

  • दिनांक १३ ते २० ऑगस्ट या कालावधीत अवयवदान करण्यासाठी अधिकाधिक लोकांना प्रवृत्त करण्यासाठी राज्यातील विद्यापीठांनी ‘अवयवदान जनजागृती सप्ताह‘ आयोजित करण्याची राज्यपाल श्री भगतसिंह कोश्यारी यांची विद्यापीठांना सूचना.
  • उत्कृष्ट तपास कार्य करणाऱ्या देशातील १२१ पोलीस अधिकारी – कर्मचाऱ्यांना केंद्रीय गृहमंत्रालयाचे विशेष पोलीस पदक जाहीर, महाराष्ट्रातील १० पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश.
  • पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनील केदार यांच्या अध्यक्षतेखाली दूध भेसळ रोखण्यासंदर्भातील कार्यवाहीचा आढावा घेण्यासाठी बैठक. राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे उपस्थित. महत्वाचे मुद्दे – दूध भेसळ  विरोधात दुग्धव्यवसाय आणि अन्न व औषध प्रशासन विभाग समन्वयाने  कठोर कारवाई, प्रमाणित नसलेल्या दुधात नीळ टाकण्याचे निर्देश, क्षेत्रीय पातळीवर जाऊन दुधाचे नमुने तपासणार.
  • मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मराठी विकास संस्थेच्या कार्यकारी समितीची बैठक. महत्वाचे मुद्दे–         रंगवैखरी नाट्याविष्कार स्पर्धेचे दरवर्षी आयोजन, मराठीतल्या उत्तमोत्तम साहित्याचे श्राव्य पुस्तक (बोलक्या पुस्तकांना) योजनेचा दुसरा टप्पा कार्यान्वित करण्यास मान्यता, दुसऱ्या टप्प्यात ज्ञानेश्वरी व तुकाराम गाथा यांचे मान्यवर कलावंतांकडून बोलक्या  पुस्तकात रूपांतर. “सिंधुदुर्गातील रानभाज्या” या पुस्तकाला अर्थसहाय्य, मराठी विकास संस्थेतर्फे घेण्यात येणाऱ्या विविध आस्थापनांमधील अमराठी भाषकांसाठी असलेल्या मराठी प्रशिक्षण वर्गाच्या संख्येत वाढ.  सीबीएससी व आयसीएससी बोर्डाच्या विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरतील अशा सुलभ संदर्भसाहित्याची निर्मिती, अमराठी भाषकांना उपयुक्त ठरलेल्या “मायमराठी” पाठ्यक्रमांसारखे नवीन उपक्रम,मराठी भाषा-साहित्य-संस्कृती याविषयांवर मुंबई दूरदर्शनवरून प्रदर्शित कार्यक्रम दूरदर्शनच्या सहकार्याने संस्थेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न, महाराष्ट्रातील ९ विद्यापीठांच्या सहकार्याने महाराष्ट्रातील लोककलांचे डिजिटायजेशन संस्थेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देणार, मराठी साहित्यक्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्या साहित्यिकांपैकी निवडक साहित्यिकांच्या गावी अथवा जिथे त्यांची स्मारके आहेत अशा ठिकाणी भाषा-साहित्यविषयक विविध उपक्रमांचे आयोजन, कोविडच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सहकार्याने सार्वजनिक तसेच वैयक्तिक आरोग्य साक्षरता वाढण्यास साहाय्यभूत ठरेल अशा सुलभ साहित्याची मराठीतून निर्मिती.

मंत्रिमंडळ  निर्णय

  • उपकरप्राप्त इमारतीतील लाखो रहिवाशांना दिलासा देण्यासाठी म्हाडा अधिनियमात सुधारणा करण्याचा निर्णय, या सुधारणेनुसार अर्धवट अवस्थेतील अथवा कुठलेही काम सुरु नसलेले प्रकल्प म्हाडाने ताब्यात घेतल्यावर त्यासाठी आरंभ प्रमाणपत्र मिळाल्याच्या दिनांकापासून तीन वर्षाच्या कालावधीत भाडेकरु/रहिवाशी यांचे पुनर्रचित गाळे पूर्ण करुन देणे म्हाडास बंधनकारक. या निर्णयामुळे 14500 उपकरप्राप्त इमारतीतील रहिवाशांना फायदा.
  • रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील मुचकुंदी लघुपाटबंधारे योजनेच्या 290 कोटी 30 लाख रुपये किंमतीच्या सुधारित प्रशासकीय मान्यता.  

१३ ऑगस्ट २०२०

  • आचार्य अत्रे यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांचे अभिवादन.
  • उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांच्यामार्फत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना स्मृतीदिनानिमित्त अभिवादन.
  • सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना आणि विद्यार्थी विकास मंडळ यांच्या वतीने आयोजित अवयवदान प्रोत्साहन व जनजागृती अभियानाचे राज्यपाल श्री भगतसिंह कोशारी यांच्या हस्ते उद्घाटन.
  • कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांना टोल माफ करण्याचा निर्णय. गणेशोत्सव सुरू होण्याच्या दोन दिवस आधी आणि परतीच्या प्रवासात दोन दिवस टोल मधून सवलत मिळणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम) एकनाथ शिंदे यांची माहिती.
  • तांबडी बु. (ता. रोहा, जि.रायगड) येथे घडलेल्या बलात्कार प्रकरणाची सखोल चौकशी करून आरोपीवर कडक कारवाई करण्याचे गृहराज्यमंत्री  (ग्रामीण) शंभूराज देसाई यांच्यामार्फत रायगड जिल्हा पोलीस अधिक्षकांना निर्देश.  
  • कांदीवली येथील शिपोंली क्रीडा संकुलाच्या बांधकामाला तत्काळ सुरुवात करण्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांचे निर्देश.
  • पद्म पुरस्कार शिफारस समितीचे अध्यक्ष राजशिष्टाचार मंत्री श्री. आदित्य ठाकरे यांच्या  अध्यक्षतेखाली बैठक. उद्योग, खनिकर्म आणि मराठी भाषामंत्री श्री. सुभाष देसाई, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास आणि क्रीडा व युवक कल्याणमंत्री श्री. सुनील केदार, सामाजिक न्यायमंत्री श्री. धनंजय मुंडे, राजशिष्टाचार राज्यमंत्री श्रीमती आदिती  तटकरे, राज्यमंत्री श्री. दत्तात्रय भरणे उपस्थित. वेगवेगळ्या क्षेत्रात अत्युत्कृष्ट कामगिरी करुन योगदान देणाऱ्या मान्यवरांच्या नावावर चर्चा.

१४ ऑगस्ट २०२०

  • राष्ट्रपती पोलीस पदक, शौर्य पोलीस पदक आणि पोलीस पदक जाहीर झालेल्या महाराष्ट्रातील ५८ पोलीस अधिकारी, कर्मचारी यांचे मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे यांच्यामार्फत अभिनंदन. उत्कृष्ट सेवेकरिता ५ ‘राष्ट्रपती पोलीस पदक’, १४ पोलीस शौर्य पदक आणि प्रशंसनीय सेवेकरिता ३९ ‘पोलीस पदक’ जाहीर.
  • माजी मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख यांच्या  पुण्यतिथीनिमित्त उप मुख्यमंत्री श्री अजित पवार यांची श्रध्दांजली.
  • पैलवान खाशाबा जाधव यांना,स्मृतीदिनानिमित्त उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांचे अभिवादन.
  • माजी मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख यांच्या  पुण्यतिथीनिमित्त उप मुख्यमंत्री श्री अजित पवार यांची श्रध्दांजली.
  • पैलवान खाशाबा जाधव यांना,स्मृतीदिनानिमित्त उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांचे अभिवादन.

15 ऑगस्ट 2020

  • स्वातंत्र्याच्या 73 व्या वर्धापन दिनानिमित्त मंत्रालयातील मुख्य शासकीय समारंभात मुख्यमंत्री श्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण. ठळक मुद्दे– आरोग्य या विषयाकडे  प्राधान्याने लक्ष, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 150 टेस्टिंग लॅब सुरू, महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत 29 लाख 50 हजार शेतकऱ्यांना 18 हजार 980 कोटी रुपये रक्कम खात्यावर जमा करून त्यांची कर्जमुक्ती. मागील दहा वर्षात झाली नाही एवढी विक्रमी म्हणजे 418 लाख क्विंटल यावर्षी कापूस खरेदी.रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी महाजॉब्ज’ हे पोर्टल सुरू. ऑनलाइन शिक्षण सुरू करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य. सर्व प्रमुख शहरांमध्ये झोपडपट्टी पुनर्विकास योजना राबविण्याचा निर्णय. अनलॉक प्रक्रिया सुरू केल्यानंतर सध्या सुमारे 50 ते 60 हजार उद्योग सुरू. उद्योगक्षेत्रात 12 देशांमधील गुंतवणूकदारांसोबत सुमारे 16 हजार कोटीं रुपयांचे सामंजस्य करार. देशात प्रथमच तज्ज्ञ डॉक्टरांच्या टास्क फोर्सची निर्मिती. जिल्ह्यातील डॉक्टरांचे सुद्धा टास्क फोर्स तयार. गावोगावी कोरोना ग्राम दक्षता समित्या, कोरोना चाचण्यांमध्ये वाढ, रुग्णांच्या संपर्कातील लोकांचे ट्रेकिंग , ट्रेसिंग आणि ट्रीटमेंटला वेग. जिल्ह्याजिल्ह्यात रुग्ण सुविधांची उभारणी वेगाने सुरू. साडेचार कोटी लिटर दुधाचे भुकटीत रूपांतर. आदिवासी मुले व महिलांना ही दूध भुकटी मोफत देण्याचा निर्णय. गेल्या काही वर्षांपासून बंद असलेली आदिवासी खावटी योजना सुरू, 100 टक्के अनुदान म्हणून 2 हजार रुपये रोख रक्कम आणि दोन हजार रुपयांच्या जीवनावश्यक वस्तू देण्याचा निर्णय. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचे काम वेगाने सुरू.
  • स्वातंत्र्याच्या 73 व्या वर्धापन दिनानिमीत्त मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे यांच्यामार्फत वर्षा निवासस्थानी ध्वजारोहण, श्रीमती रश्मी ठाकरे यांच्यामार्फत राष्ट्रध्वजास मानवंदना.
  • स्वातंत्र्यदिनाच्या 73 व्या वर्धापनदिनानिमित्त मुंबई उच्च न्यायालयात मुख्य न्यायाधीश श्री दिपांकर दत्ता यांच्या हस्ते ध्वजारोहण.
  • स्वातंत्र्यदिनानिमित्‍त राज्यपाल श्री भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते पुणे येथील विधानभवनाच्या (कौन्सिल हॉल) प्रांगणात मुख्य ध्वजारोहण कार्यक्रम संपन्‍न झाला. यावेळी उपमुख्यमंत्री तथा जिल्‍ह्याचे पालकमंत्री अजित पवार उपस्थित. 
  • मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयात स्वातंत्र्यदिनानिमित्त कोविड योद्ध्यांचा पालकमंत्री श्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते सन्मान.
  • मुंबई शहर जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांच्या हस्ते ध्वजारोहण.

०००

सामाजिक स्वास्थ्य राखण्यासाठी नशामुक्त भारत अभियान आवश्यक – मुंबई शहर जिल्हाधिकारी राजीव निवतकर

मुंबई दि. १६- नशामुक्त भारत अभियान हे सामाजिक स्वास्थ्य राखण्यासाठी आवश्यक अभियान असून मुंबई शहर जिल्ह्यात ते अत्यंत सक्षमतेने राबवण्यात येईल.ज्यायोगे समाज नशामुक्त होईल, असे प्रतिपादन मुंबई शहर जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांनी केले.

केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय मंत्रालयामार्फत देशातील २७२ जिल्ह्यांमध्ये या अभियानाची काल सुरुवात झाली. यात महाराष्ट्रातील मुंबई शहर, मुंबई उपनगर, नागपूर, पुणे आणि नाशिक या पाच जिल्ह्यांचा समावेश आहे.

जिल्हाधिकारी श्री.निवतकर यांच्या हस्ते स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने या अभियानाच्या ‘लोगो’चे औपचारिक उद्घाटन करण्यात आले. यावेळी सहायक आयुक्त, समाज कल्याण श्री. समाधान इंगळे व इतर उपस्थित होते.

या अभियानात असलेल्या मुंबई शहर जिल्ह्यातील सर्व घटकांनी अत्यंत सक्षमतेने काम करून जिल्ह्यात हे अभियान यशस्वीपणे राबवावे अशा सूचना जिल्हाधिकारी श्री. निवतकर यांनी यावेळी दिल्या. जनजागृती मोहीम, रुग्णालय, पुनर्वसन केंद्र पाहणी, तेथील सोयीसुविधा उपचार पद्धती याची पाहणी करणे ही सर्व कामे नेमून दिलेल्या व्यक्ती, कार्यालये, सामाजिक संस्थांनी काटेकोरपणे करावीत असेही निर्देश त्यांनी यावेळी दिले.

राज्य व जिल्हास्तरीय समिती

या अभियानाच्या यशस्वितेसाठी राज्य व जिल्हास्तरीय समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. राज्यस्तरीय समितीत प्रधान सचिव, सामाजिक न्याय विभाग हे अध्यक्ष तर संचालक, समाज कल्याण हे सदस्य सचिव आहेत. दर दोन महिन्यांनी या समितीची बैठक अपेक्षित आहे. तसेच जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती असून जिल्हा समाज कल्याण अधिकारी हे सदस्य सचिव आहेत. या समितीमध्ये पोलीस आयुक्त /पोलीस अधीक्षक तसेच विविध विभागाचे अधिकारी, जिल्हा स्तरावर काम करणारे नशामुक्ती मंडळ, सामाजिक संस्था हे सदस्य आहेत. दरमहा या समितीची एक बैठक अपेक्षित आहे.

१५ऑगस्ट 2020 ते ३१ मार्च 2021 या कालावधीत हे अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत जनजागृती कार्यक्रम, उच्च शैक्षणिक संस्था, विद्यापीठ परिसर आणि शाळा यावर लक्ष केंद्रित करणे; अशा समुदायापर्यंत पोहोचणे. पुनर्वसन केंद्र, रुग्णालयांमध्ये सल्ला व उपचार सुविधांवर लक्ष केंद्रित करणे. असे उपक्रम राबविण्यात येणार आहेत.   

सेलू कोरोना केअर सेंटरचा पॅटर्न संपूर्ण जिल्ह्यात राबवावा

पालकमंत्री नवाब मलिक यांचे निर्देश

परभणी, दि. 15 : जिल्ह्यात कोरोनाची रुग्ण संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात रहावी यासाठी जिल्हा प्रशासन व आरोग्य यंत्रणा सज्ज असून कोरोनाग्रस्त रुग्णांचे मनोबल वाढविणे खूप गरजेचे आहे. ते कार्य विविध उपक्रमांच्या माध्यमातून सेलू येथील उपजिल्हा रुग्णालयाअंतर्गत कार्यरत असलेल्या कोरोना केअर सेंटरने केले आहे. त्यामुळे सेलू कोरोना केअर सेंटरचा पॅटर्न संपूर्ण जिल्ह्यात राबवावा, असे निर्देश पालकमंत्री नवाब मलिक यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात  कोव्हिड-19 बाबत आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी दी.म. मुगळीकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पृथ्वीराज बी.पी., पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय, महापालिका आयुक्त देविदास पवार आदीची प्रमुख उपस्थिती होती.

पालकमंत्री श्री.मलिक म्हणाले की, सेलू उपजिल्हा रुग्णालयाअंतर्गत कार्यरत असलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी वसतीगृहातील कोरोना केअर सेंटरचा उपक्रम स्तुत्य असून तेथे रुग्णांना देण्यात येणाऱ्या सर्व सोयी- सुविधांचा अभ्यास करून इतर ठिकाणी त्याचा तातडीने अवलंब करावा. वैद्यकीय अधीक्षक डॉ.संजय हरबडे हे कोरोना रुग्णांना देत असलेल्या सर्व सोयी-सुविधेबद्दल समाधान व्यक्त करून त्यांनी त्यांचे कौतुक केले.

कोरोना पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या परंतु कुठलेही लक्षणे न जाणवणाऱ्या रुग्णांना त्यांच्या घरात स्वतंत्र टॉयलेट, बाथरूमसह रूम उपलब्ध असेल तर त्यांना घरात राहूनच उपचार देण्यात यावेत, तसेच त्यांच्या घराबाहेर तसा फलक लावण्यात यावा. जिल्ह्यात जास्तीत जास्त होम क्वारंटाईनला प्राधान्य देण्यात यावे, अशी सूचना केली. लॉकडाऊनपासून जिल्ह्यातील बंद असलेल्या चहा स्टॉल व पान स्टॉलला चार व्यक्तींपेक्षा जास्त व्यक्ती जमणार नाहीत व फिजिकल डिस्टन्ससह इतर सर्व नियमांचे तंतोतंत पालन करून परवानगी देण्यात यावी, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

जिल्हाधिकारी दी.म. मुगळीकर यांनी  कोरोनाबाबत जिल्ह्यात करण्यात आलेल्या उपाययोजनांची व भविष्यातील नियोजनाची सविस्तर माहिती यावेळी दिली. तसेच सेलू येथील कोरोना केअर सेंटरमध्ये राबविण्यात आलेले उपक्रम व देण्यात येत असलेल्या सुविधा योगा, नृत्य, संगीत, नाश्ता, भिजविलेले बदाम, ग्रीन टी, काढा, सकस आहार आणि समुपदेशन आदीबाबत सविस्तर माहिती सेलू उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. संजय हरबडे यांनी संगणकीय सादरीकरण व दृक-श्राव्य चित्रफितीच्या माध्यमातून दिली. या बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती स्वाती सूर्यवंशी, जिल्हा शल्य चिकित्सक बाळासाहेब नागरगोजे, यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0000

ताज्या बातम्या

छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिवादन

0
मुंबई, दि.१४ : छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संभाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी आमदार प्रकाश सोळंके, अमरावतीचे...

महाराष्ट्र रेल्वे फाटक मुक्त करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
महारेलद्वारे मुंबईतील पहिला केबल स्टेड रोड ओवर ब्रिज मुंबई, दि. १३ : संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात रेल्वे ब्रिजचे काम महारेलनी हाती घेतले आहे. आतापर्यंत...

महाराष्ट्राला नागरी क्षेत्रातील प्रकल्पांसाठी आवश्यक सहकार्य करणार – केंद्रीय मंत्री मनोहर लाल खट्टर

0
मुबंई, दि. १३: महाराष्ट्रात मेट्रोचे जाळे अधिक विस्तारीत करण्यासाठी तसेच नागरी क्षेत्रातील विविध प्रकल्पांच्या व्यापक अंमलबजावणीसाठी आवश्यक सर्व सहाकार्य केंद्रीय नगरविकास मंत्रालयाकडून  करण्यात येईल,असे...

चिंचघाट उपसा सिंचन योजनेला गती द्या – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

0
मुंबई, दि. १३: चिंचघाट उपसा सिंचन योजना नागपूर जिल्ह्यातील कुही तालुक्यात प्रस्तावित महत्त्वपूर्ण सिंचन प्रकल्प आहे. या योजनेचा उद्देश कृषी क्षेत्रात सिंचन सुविधा वाढवून शेतकऱ्यांना...

युवकांनी  ‘MY भारत’ पोर्टलवर सिव्हिल डिफेन्स वॉरिअर म्हणून नोंदणी करावी – मंत्री चंद्रकांत पाटील

0
मुंबई, दि. १३ : आपत्ती व्यवस्थापन, वैद्यकीय सेवा, पोलीस दल, अग्निशमन दल यासारख्या आपत्कालीन यंत्रणांमध्ये युवकांचा सक्रिय सहभाग असणे महत्त्वाचे आहे. तसेच आपत्कालीन परिस्थितीत रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्यास...