बुधवार, मे 14, 2025
Home Blog Page 1577

मिरज येथील हेल्थपॉइंट मल्टिस्पेशालिटी कोव्हिड हॉस्पिटलचे पालकमंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

सांगली, दि. 15, (जि. मा. का.) :  कोव्हिड कालावधीमध्ये अत्याधुनिक व सुसज्ज अशा हेल्थपॉइंट मल्टिस्पेशालिटी कोव्हिड हॉस्पिटल व सिनर्जी मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलच्या उभारणीमुळे रुग्णांना व प्रशासनाला मोठी मदत होणार आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री जयंत पाटील यांनी केले.

कोव्हिड 19 च्या उपचारासाठी चंदनवाडी, मिरज येथे 50 बेडचे हेल्थपॉईंट मल्टिस्पेशालिटी कोव्हिड हॉस्पिटल व अत्याधुनिक उपचार व रुगणांच्या सेवेसाठी 200 बेडचे सिनर्जी मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचे उद्घाटन राज्याचे जलसंपदा मंत्री तथा  सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हा पोलीस प्रमुख सुहैल शर्मा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, मिरज पोलीस उपविभागीय अधिकारी संदिपसिंह गिल, हॉस्पिटलचे चेअरमन डॉ. रविंद्र आरळी, व्यवस्थापकीय संचालक प्रसाद जगताप यांची प्रमुख उपस्थिती होती.

या हॉस्पिटलमध्ये ह्रदयरोग विभाग, सामान्य शस्त्रक्रिया विभाग, अस्थिरोग, स्त्रीरोग, बालरुग्ण विभाग, कान, नाक, घसा, मूत्रशास्त्र विभाग, गॅस्रोताएनटोरोलॉजी विभाग, मेंदू व मज्जारज्जू शस्त्रक्रिया विभाग, त्वचारोग अशा 20 पेक्षा जास्त आजारांसाठीचे विभाग आहेत.  यावेळी जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हा पोलीस प्रमुख सुहैल शर्मा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

सर्वांच्या सहकार्याने येणाऱ्या काळात जिल्हा अधिक प्रगतीच्या दिशेने आगेकूच करेल – पालकमंत्री आदिती तटकरे

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.15  समाजातील सर्व घटकांच्या विकासासाठी शासन कटिबद्ध असून शासनाकडून विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर सर्वांच्या सहकार्याने येणाऱ्या काळात जिल्हा अधिक प्रगतीच्या दिशेने आगेकूच करताना दिसले, असे प्रतिपादन राज्याच्या उद्योग राज्यमंत्री तथा पालकमंत्री रायगड कु.आदिती तटकरे यांनी आज येथे केले.

अलिबाग येथील पोलीस परेड मैदान येथे स्वातंत्र्यदिनाच्या 73  व्या वर्धापनदिनी मुख्य ध्वजारोहण त्यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले, त्यावेळी त्या बोलत होत्या.

यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष योगिता पारधी, जिल्हाधिकारी निधी चौधरी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारसकर, परिविक्षाधीन जिल्हाधिकारी मैनक घोष, अपर जिल्हाधिकारी डॉ.भरत शितोळे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी आदी मान्यवर उपस्थित होते. 

सर्वप्रथम ध्वजारोहणानंतर पोलीस दलाच्या पथकांनी राष्ट्रध्वजास मानवंदना दिली. त्यानंतर पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी स्वातंत्र्यदिनाच्या 73  व्या वर्धापनदिनानिमित्त जिल्ह्यातील सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा दिल्या त्याचप्रमाणे निसर्ग चक्रीवादळ, अतिवृष्टी व कोरोना या संकटात दुर्देवी मृत्यू झालेल्या व्यक्तींना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण केली.

उपस्थितांना संबोधताना पालकमंत्री कु.आदिती तटकरे म्हणाल्या, आपले स्वातंत्र्य अबाधित राहावे, यासाठी आपले जवान देशाच्या सीमेवर रात्रंदिवस जागता पहारा देत आहेत. त्यामुळेच आपण आज सुरक्षित आहोत. त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणं, हे आपलं कर्तव्यचं आहे. 

यंदाच्या स्वातंत्र्यदिन सोहळ्यावर कोरोनाचं सावट आहे. गेले पाच महिने आपण सगळेच या विषाणूशी सर्व साधनसामुग्रीसह एकवटून लढतोय, त्यात यशस्वी देखील होतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या कुशल नेतृत्वाखाली आपले राज्य विविध आघाड्यांवर मार्गक्रमण करीत आहे. समाजातील शेतकरी, कामगार, कष्टकरी, व्यापारी, व्यावसायिक, नोकरदार, उद्योजक या सर्व घटकांच्या विकासासाठी शासन कटीबद्ध आहे.

महाराष्ट्र हे देशातील नव्हे तर जगातील सर्वोच्च  व सर्वोत्तम  आरोग्य सुविधा असणारे राज्य घडविण्याचा संकल्प आपले आदरणीय मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि संपूर्ण मंत्रिमंडळानं केला आहे. या संकल्पपूर्तीसाठी मी या  जिल्ह्याची पालकमंत्री  या नात्याने कटिबध्द आहे.  कोरोना संकटाच्या सुरुवातीच्या काळापासूनच आपण जिल्ह्यातील सर्व आरोग्य व्यवस्था तत्पर ठेवण्यावर लक्ष केंद्रित केलं होतं. जिल्हा प्रशासन, स्वयंसेवी संस्था यांच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणावर आरोग्य सुविधा निर्माण करण्यावर भर देण्यात आला असून कोरोनाची तपासणी करण्यासाठी लवकरच जिल्हा रुग्णालय येथे सुसज्ज अशी आरटीपीसीआर प्रयोगशाळाही सुरु करण्यात येत आहे.

कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी जिल्हा प्रशासनाला मदत करावी, यासाठी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत ओएनजीसी, उरण, एमआयडीसी असोसिएशन, महाड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन, महाड, रोहा इंडस्ट्रीज असोसिएशन, रोहा, स्वदेश फाऊंडेशन, रिलायन्स यासारख्या उद्योग समूहांनी मदतीचा हात पुढे केला, त्यांचे पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी यावेळी आभार मानले.

शिवभोजन थाळी योजनेबद्दल बोलताना त्या म्हणाल्या, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या परिस्थितीत राज्यातील गोरगरीब, कामगार, शेतकरी, मजूर व विद्यार्थी उपाशी राहू नये, यासाठी केवळ पाच रुपयांत शिवभोजन थाळीचे वितरण करण्यात येत आहे.  सध्या जिल्ह्यात 98 शिवभोजन केंद्रांना 17 हजार 300 शिवभोजन थाळी मंजूर असून या शिवभोजन केंद्रांच्या माध्यमातून दररोज जवळपास 16 हजार गरजूंना जेवण मिळत आहे. याशिवाय कम्युनिटी किचनसारख्या उपाययोजनांमधून गरजूंना जेवण देण्यासाठी योग्य ती व्यवस्था करण्यात आली.

कोरोना पाठोपाठ जिल्ह्यावर निसर्ग चक्रीवादळाचे संकट आले. या संकटात सर्व लोकप्रतिनिधींच्या सहकार्याने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्रशासनाच्या माध्यमातून एनडीआरएफ, भारतीय तटरक्षक दल, रायगड जिल्हा आपत्ती प्रतिसाद दलातील सदस्य संस्था, विविध सामाजिक संस्था, स्वयंसेवक, पोलीस विभाग, महसूल विभागाच्या मदतीने जिल्ह्यात निर्माण झालेल्या आपत्कालीन प्रसंगी सर्व विभागांशी समन्वय साधल्यामुळे मोठ्या प्रमाणावर मनुष्यहानी टाळण्यास  यश आले, याबद्दल पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी  विविध शासकीय यंत्रणांच्या योग्य समन्वयामुळे हे शक्य झाले, असे सांगत त्यांचे कौतुक केले.

अलिबाग येथे 100 विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व 500 रुग्ण खाटांचे संलग्नित रुग्णालय सुरू करण्याबाबत मान्यता देण्यात आली असून लवकरच सर्व सोयी-सुविधायुक्त शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अस्तित्वात येईल. याशिवाय लवकरच मांडवा ते गेट वे ऑफ इंडिया या सागरी मार्गावर प्रायोगिक तत्त्वावर मोबाईल मेडीकल युनिटसह बोट अँम्बुलन्स सेवा बाह्य यंत्रणेकडून कार्यान्वित होणार आहे, असे सांगून  त्यांनी  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब व उपमुख्यमंत्री अजित दादा पवार, सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे विशेष आभार मानले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘आत्मनिर्भर भारत अभियाना’चा उल्लेख करुन पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी एक देश म्हणून एकत्रितपणे या संकटाचा मुकाबला करताना देशाला आर्थिक समस्या भेडसावत आहे. आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी कोरोना विषाणूमुळे निर्माण झालेल्या संकटावर मात करण्यासाठी ‘आत्मनिर्भर भारत अभियान’ची घोषणा केली. आत्मनिर्भर भारत पाच खांबांवर उभा राहील. ते पाच खांब म्हणजे – अर्थव्यवस्था, पायाभूत सुविधा, तंत्रज्ञानाधारित व्यवस्था, आपली डेमोग्राफी आणि मागणी. या अभियानासाठी भारताच्या GDP च्या 10 टक्के रक्कम म्हणजे 20 लाख कोटी रुपयांच्या पॅकेजची त्यांनी घोषणा केली. हे पॅकेज 2020 मध्ये या अभियानाला नवी गती देईल, असे सांगितले.

जिल्ह्यातील विकास कामांबाबत बोलताना पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी सांगितले की, कोकणातील पर्यटन वाढीसाठी शासनाने बीच शॅक पॉलिसी सुरु करण्याचा घेतलेल्या महत्वपूर्ण निर्णयामुळे स्थानिकांना पर्यटन व्यवसायाच्या माध्यमातून रोजगार प्राप्त होणार आहे तसेच यातून सागरी किनारपट्टयांवर स्थानिकांच्या माध्यमातून पर्यटन व्यवसाय भरभराटीस येईल. त्याचप्रमाणे रेवस ते रेडी सागरी महामार्गाच्या कामासाठी शासनाने 4 हजार 500 कोटी रुपयांच्या खर्चाला मान्यता दिली असून रेवस, करंजा, अलिबाग, नांदगाव, मुरुड, दिघी, दिवेआगर, शेखाडी मार्गे रेडी या भागातून हा सागरी महामार्ग जाणार आहे. यामुळे येथील पर्यटन विकासाला नवीन आयाम प्राप्त होणार आहे.

यावेळी केंद्र शासनाच्या जलशक्ती मंत्रालयाच्या निर्देशानुसार गंदगीमुक्त भारत अभियानाच्या निमित्ताने स्वच्छतेची शपथ घेण्यात आली व  प्रत्येकजण स्वच्छतेप्रती जागरुक राहून स्वत:चे आणि संपूर्ण समाजाचे जीवन सुसह्य होण्यास हातभार लावू, असा संकल्प या निमित्ताने करण्यात आला.

एकविसावं शतक भारताचं असेल, हे निव्वळ स्वप्न नाही तर ती आपली सर्वांची आपल्या देशाप्रतीची जबाबदारी आहे. प्रत्येकाने आपापल्या परीने देशाच्या विकासाला हातभार लावला पाहिजे व त्यासाठी आपल्या सर्वांच्या सामूहिक प्रयत्नांची गरज आहे असे सांगून आजपासून प्रत्येक नागरिकाने स्थानिक उत्पादने विकत घेण्याचा आणि त्यांचा प्रचार करण्याचा निश्चय करुया, असे आवाहन पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी यावेळी नागरिकांना केले.

कोरोनाच्या सुरुवातीच्या संचारबंदी काळात आलेले सर्व जातीधर्माच्या बांधवांनी सण, उत्सव अतिशय साधेपणाने साजरे करून जिल्हा प्रशासनाला मोलाचे सहकार्य केले. तसेच आगामी काळातही गणेशोत्सव, नवरात्रोत्सव व अन्य सणांच्या काळात देखील जिल्हा प्रशासनाच्या नियमांचे, सूचनांचे पालन करून साधेपणाने व सामंजस्याने हे सर्व उत्सव साजरे करावेत,  असे नागरिकांना आवाहन करीत  जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांसाठी देण्यात येणाऱ्या सूचनांचा, माहितीचा योग्य प्रकारे प्रचार व प्रसार करून समाजाला उपयुक्त अशी मदत केली आहे, याबद्दल पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी प्रसारमाध्यमांचेही मनःपूर्वक आभार मानले.

मिशन बिगिन अगेनमुळे निर्बंध शिथिल होत असले तरी संकट टळलेले नाही. एकीकडे दैनंदिन कामकाज सुरु ठेवणे आवश्यक आहे तर दुसरीकडे कोरोनापासून लोकांचे रक्षण करणे, हे देखील महत्वाचे आहे. यासाठी प्रत्येकाने सामाजिक सुरक्षित अंतर, मास्कचा वापर आणि वारंवार हात धुणे, सॅनिटायझरचा वापर या चतुःसूत्रीचा दैनंदिन जीवनात अंगीकार करावा, शासन सदैव आपल्या सोबत आहे असे सांगून सर्वांच्या सहकार्याने येणाऱ्या काळात रायगड जिल्हा अधिक प्रगतीच्या दिशेने आगेकूच करताना दिसेल, असा विश्वास व्यक्त करीत पालकमंत्री कु.आदिती तटकरे पुनःश्च एकदा सर्व जिल्हावासियांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या.

विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांचा तसेच

पालकमंत्र्यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरव

विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा, सामाजिक संस्थांचा, व्यक्तींचा व प्रसारमाध्यम प्रतिनिधींचा यावेळी पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. त्यांची नावे पुढीलप्रमाणे

निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.पद्मश्री बैनाडे, जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल जाधव, उपनियंत्रक नागरी संरक्षण दल, उरण एम.के.म्हात्रे, स्वयंसेवक रायगड आपत्ती प्रतिसाद दल, उरण सलिम नूर शेख, मावळा प्रतिष्ठा अलिबाग, मानस कुंटे,  ऑल इंडिया रिहॅबिलिटेशन फोरम, डॉ.सय्यद साजिद, वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय, महाड डॉ.भास्कर जगताप, तालुका वैद्यकीय अधिकारी, महाड, डॉ.इजाज बिरासदार, जैन श्वेतांबर ट्रस्ट कर्जत, उपजिल्हा रुग्णालय, कर्जत, डॉ.सुप्रिया घोसाळकर, वैद्यकीय अधीक्षक, उपजिल्हा रुग्णालय, माणगाव डॉ.तुषार शेठ, सर्वविकास दिप संस्था, माणगाव, फादर रिचार्ड, स्वदेश फाऊंडेशन माणगाव, तुषार इनामदार,  रामेश्वर कन्स्ट्रक्शन, पेण, राजू पिचिका, अहिल्या महिला मंडळ, पेण, श्रीम.अश्विनी गाडगीळ, सामाजिक कार्यकर्ता वडवळ, ता.खालापूर, जितेंद्र सकपाळ, सामाजिक कार्यकर्ता, खालापूर संतोष गुरव,  हॅम ऑपरेटर, नेरुळ, पनवेल, अमोल देशपांडे व ग्रुप, हॅम ऑपरेटर, अलिबाग दिलीप बापट, लिपिक,तहसिल कार्यालय, मुरुड, सुग्रिव वसंत वाघ, राजू बाबूलाल भोये, तळा तालुका रास्त भाव दुकानदार संघटना, रमेश गजानन कोलवणकर, तळा तालुका पत्रकार संघ, साळुंखे रेस्क्यू ग्रुप, महाड, प्रशांत साळुंखे, निवासी नायब तहसिलदार, पोलादपूर, समीर देसाई, लिपिक, भाले, ता.माणगाव, सागर खानविलकर, तहसिल कार्यालय, पोलादपूर,आर.डी.केकाण, दै.लोकसत्ता, जिल्हा प्रतिनिधी, अलिबाग, हर्षद कशाळकर, दै.पुढारी, रायगड आवृत्ती प्रमुख जयंत धुळप, जेम्स ॲण्ड ज्वेलरी असोसिएशन, मुंबई, मेहूल शाह, लाईफ फाउंडेशन श्रीमती पूनम ललवाणी, डॉ.साठे, अलिबाग, आर.के.हॉस्पिटल, चोंढी, डॉ.आर.के.पाटील,  मानस मित्र, महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समिती रायगड, मोहन भोईर.

कोविड योद्ध्यांचा मरणोत्तर सन्मान

नायब तहसिलदार, रोहा, कै.संजय नागावकर, अंगणवाडी सेविका केळवणे-1, ता.पनवेल, कै.नंदा ठाकूर, ग्रामपंचायत कणे, ता.पेण कै.हरिश्चंद्र शंकर म्हात्रे.

कोरोना प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर या सोहळयात उपस्थित सर्वांनी सॅनिटायझरचा वापर, मास्क लावणे, सोशल डिस्टन्सिंग पाळणे या सूचनांचे काटेकोर पालन करीत विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी  तसेच ज्येष्ठ नागरिक, पत्रकार, विद्यार्थी उपस्थित होते.

गडचिरोली जिल्ह्यातील दुर्लक्षित विषयांना प्रथम प्राधान्य – राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर

गडचिरोली,(जिमाका)दि.15: गडचिरोली जिल्ह्यातील दुर्लक्षित विषयांवर लक्ष केंद्रित करून प्राधान्याने सोडविणार असल्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री, राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी सांगितले. भारतीय स्वातंत्र्याच्या 73 व्या वर्धापन दिनानिमित्त गडचिरोली येथील मुख्य कार्यक्रमात ते बोलत होते.  

स्वातंत्र्यासाठी हौतात्म्य पत्करलेल्या देशभक्तांना आणि स्वातंत्र्य अबाधित राखण्यासाठी सीमा रेषेवर प्राणांचे बलिदान देणा-या सैनिकांना तसेच नक्षलवाद्यांचा मुकाबला करताना शहीद झालेल्या जवानांना त्यांनी यावेळी श्रध्दांजली अर्पण केली. ते म्हणाले राष्ट्रीय एकता आणि अखंडता अबाधित राहावी, तसेच एकिकृत मजबूत भारताच्या मूल्यांचे संवर्धन व्हावे, यासाठी ज्यांनी योगदान दिले त्यांची आठवण काढणे व त्यांच्या विचारांना आज उजाळा देणे आपले सर्वांचे कर्तव्य आहे. अखंड भारतासाठी आपण योगदान देण्यासाठी आज संकल्प करण्याची गरज आहे असे ते म्हणाले.

गडचिरोली जिल्हा महाराष्ट्र राज्यातील अभिमानाचं स्थान आहे. इथली आदिवासी संस्कृती, चालीरीती, सण, उत्सव, कलासंस्कार नागरिकांनी जसेच्या तसे जपले आहेत. या जिल्ह्यातील वेगवेगळया भाषा, भौगोलिक परिसर, निसर्ग जणू एक मिनी भारतच. गडचिरोली जिल्ह्याला हिरवागार शालू पांघरणारी वनश्री, घनदाट जंगलात मुक्तपणे संचार करणारे वन्यजीव, स्वच्छंद विहरणारे पशुपक्षी, नद्या आणि त्यांच्या साथीनं आपलं रम्य जीवन जगणारे आदिवासी, त्यांची कलाकुसर अशा अनेक बाबी जिल्ह्याचे सौंदर्य प्रकट करतात.

अशा या गडचिरोलीसाठी हे शासन प्रत्येक दुर्लक्षित विषयांचा आराखडा तयार करून टप्प्याटप्प्याने योजनांची अंमलबजावणी करत आहे. अत्यंत आवश्यक आणि दुर्लक्षित विषयांची निवड प्राधान्यक्रमाने करण्यात येत आहे. यामध्ये आरोग्य, रस्ते, पूल तसेच रोजगार विषयक कामांना प्राधान्य दिले जात आहे. अर्थव्यवस्था बळकट करून जिल्ह्यातील युवकांना जिल्हयातच काम मिळवून देणे शासनाचे महत्त्वाचे उद्दीष्ट असणार आहे. जिल्हयातील रोजगार वाढवून अर्थ व्यवस्थेला बळकटी देऊन जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाला विकास प्रक्रियेत सामावून घेण्यासाठी शासन कटिबध्द आहे असे ते म्हणाले.

गडचिरोली जिल्हयातही सर्व आरोग्य कर्मचारी, पोलीस व प्रशासनातील लोकांनी मेहनत करून संसर्गाला रोखण्यासाठी योगदान दिले आहे. जनतेने केलेल्या सहकार्यामूळे आज कोरोनाला रोखण्यात चांगले यश मिळत आहे. यापुढेही आपण देशाला या संसर्गापासून वाचविण्यासाठी व अखंड भारत देश नव्याने उभा करण्यासाठी योगदान द्यावयाचे आहे. त्यासाठी आरोग्य विषयक अधिक खबरदारी बाळगणे गरजेचे आहे असे यड्रावकर यांनी उपस्थितींना सांगितले.

दुर्गम भागातील शेवटच्या माणसापर्यंत विकास पोहचविण्यासाठी येत्या काळातही प्रशासन आणि लोकप्रतिनिधी समन्वयातून कार्य करत राहतील. बारमाही वाहणाऱ्या नद्यांवर सिंचन प्रकल्प राबवून जिल्ह्यातील शेती व्यवसायाला चालना देण्यात येणार आहे. शेतीमध्ये दुबार पिक पध्दत घेण्यासाठी शेतकरी पुढे येत आहे. पारंपरिक शेतीला आधुनिक शेतीची जोड दिल्यास जिल्हयातील शेती अधिक प्रगतशील होईल.

जिल्ह्यात नक्षलवाद कमी होत आहे : आत्मसमर्पण करणाऱ्या नक्षलवाद्यांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. आत्मसमर्पित नक्षलवाद्यांना आत्मसन्मानाने जगता यावे व जिल्ह्यातील नक्षलवाद संपुष्टात येण्यासाठी आता त्यांच्या पुनर्वसनासाठी भरीव प्रयत्न केले जाणार आहेत. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने जिल्हा नियोजन मध्ये नवे शिर्षक तयार करून जवळजवळ 10 कोटींची तरतूद त्यामध्ये करण्यासाठी नियोजन केले आहे. याबाबत सविस्तर प्रस्ताव सादर केला आहे त्याला लवकरच मंजूरी मिळेल. प्रत्येक आत्मसमर्पितास सन्मानपूर्वक पुन्हा समाजामध्ये वागवणे, त्यांचे पुनर्वसन करणे यासाठी हा निधी वापरण्यात येणार आहे अशी त्यांनी माहिती दिली.

विविध क्षेत्रात उत्कृष्ट काम केलेल्यांचा सत्कार : यावेळी जलसंधारण अंतर्गत सिंचन क्षेत्रात भरीव व उत्कृष्ट कामगिरीबद्दल मनोहर कुंभारे शाखा अभियंता कुरखेडा यांचा सत्कार करण्यात आला. महात्मा ज्योतिबा फुले कर्ज मुक्ती योजना उत्कृष्टपणे राबविल्याबद्दलही नितीन मस्के, सहाय्यक निबंधक सहकारी संस्था गडचिरोली व राजेंद्र चौधरी, जिल्हा विकास प्रबंधक, नाबार्ड गडचिरोली यांचा सन्मान करण्यात आला. कोविड 19 साथरोग अंतर्गत उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल जिल्ह्यातील अधिकारी कर्मचाऱ्यांचाही राज्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यामध्ये डॉ.माधुरी किलनाके, डॉ.मुकुंद ढवले, विनोद म्हशाखेत्री, बागराज दुर्वे, विनोद बीटपल्लीवार, सारिका दुधे, नागेश ताटलावार, संतोष महातो, प्रशांत कराडे, सुनील हजारे, अशोक तागडे व विनोद लटारे यांचा सत्कार करण्यात आला. तसेच यावेळी जिल्ह्यातील यशस्वी कोरोनामुक्त झालेल्या चार कोरोना रुग्णांचा सन्मानही राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या हस्ते करण्यात आला.

या सोहळ्यास जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार, आमदार डॉ.देवराव होळी, माजी आमदार नामदेवराव उसेंडी, जिल्हाधिकारी दीपक सिंगला, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आर्शिवाद, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी राहुल गुप्ता, जि.प.उपाध्यक्ष मनोहर पोरेटी, अधिकारी, नागरीक उपस्थित होते.

सर्वांगीण विकासासोबत जिल्ह्याला कोरोनामुक्त करण्यासाठी प्रयत्नशील – पालकमंत्री दत्तात्रय भरणे

सोलापूर, दि. १५ : जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून विविध विकास प्रकल्प राबवले जात आहेत. त्यासाठी ४२४ कोटी रुपयांचा आराखडा आखण्यात आला आहे. सर्वांगीण विकासासोबतच जिल्ह्याला कोरोनामुक्त करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले.

भारतीय स्वातंत्र्याच्या ७३ व्या वर्धापनदिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात आयोजित कार्यक्रमात पालकमंत्री श्री. भरणे बोलत होते. यावेळी त्यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले.

कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरूद्ध कांबळे, पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, महानगरपालिका आयुक्त पी. शिवशंकर, जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ, अपर जिल्हाधिकारी संजीव जाधव यांच्यासह लोकप्रतिनिधी, कोरोना योद्धे, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

पोलीस पथकाने मानवंदना दिली. यावेळी श्री. भरणे यांनी जनतेला स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. श्री. भरणे म्हणाले, जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद आणि सोलापूर महानगरपालिका यांच्या माध्यमातून व्यापक प्रयत्न सुरू आहेत. सोलापूर शहरातील कोरोनाचा संसर्ग आणि मृत्यूचा दर कमी करण्यात यश आले असून जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही याचप्रमाणे यश येईल. कोरोना विषाणूच्या मुकाबल्यासाठी जिल्हा नियोजन समितीतून भरीव निधीची तरतूद केली असून राज्य स्तरावरुनही भरघोस निधी दिला जाईल.

जिल्ह्यातील आरोग्याच्या पायाभूत सुविधा अधिक मजबूत होण्यासाठी श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयाचे बळकटीकरण करण्यावर भर देण्यात येईल. खास महिला आणि मुलांसाठीच्या स्वतंत्र रुग्णालयाची उभारणी लवकरच पूर्ण करण्यात येईल. साथरोग नियंत्रण रुग्णालय सुरु केले जाणार असून उपजिल्हा रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र येथे मनुष्यबळ आणि औषधांचा तुटवडा भासू नये यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे, असेही त्यांनी नमूद केले.

सोलापूर जिल्हा शेतीवर अवलंबून आहे. कृषी औद्योगिक जिल्हा म्हणून ओळख अधिक दृढ होण्यासाठी नियोजन करण्यात येत आहे. यंदा जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात चांगला पाऊस झाल्याने पेरणीखालील क्षेत्र वाढले आहे. ही बाब अतिशय समाधानाची आहे. शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री विमा योजनेस चांगला प्रतिसाद दिला आहे. शेती आणि शेतकरी सक्षम व्हावे यासाठी उन्नत शेती, समृद्ध शेतकरी, कृषी यांत्रिकीकरण, गट शेतीस प्रोत्साहन, मागेल त्याला शेततळे या योजनांना चांगले यश मिळत आहे, असे ते म्हणाले.

जिल्ह्यातील रस्ते विकासाचे काम प्राधान्याने हाती घेण्यात आले आहे. पालखी मार्गांना महामार्गांचा दर्जा देण्यात आला असून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने या रस्त्यांची कामे सुरू आहेत. या कामांसाठीचे भूसंपादन गतीने करण्यात आले आहे. भूसंपादनापोटी शेतकऱ्यांना सुमारे दोन हजार कोटी रुपयांची भरपाई देण्यात आली असून गावांतील वाहतूक सुरळीत होण्यासाठी पालकमंत्री पाणंद रस्ते योजना प्रभावीरित्या राबवली जात असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रशासकीय कामकाजात माहिती तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर होत असून शेतकऱ्यांना संगणकीकृत सात बारा उतारे दिले जात आहेत. स्वामित्व योजनेअंतर्गत गावठाणांची ड्रोनद्वारे मोजणी करण्यासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यातील दहा गावांची निवड करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना जमिनींचे उतारे झटपट मिळण्यासाठी राष्ट्रीय भूमी अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रमाअंतर्गत सातबारा उताऱ्यांसोबत ८/अ उताराऱ्यांचेही संगणकीकरणाचे काम सुरु आहे, असेही त्यांनी सांगितले.

वनक्षेत्र वाढविण्यासाठी यंदा सुमारे अडीचशे हेक्टर क्षेत्रावर पावणेतीन लाख रोपांची लागवड करण्याचे उद्दिष्ट्य आहे. वृक्ष लागवडीच्या या मोहिमेत नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून विकासात योगदान देण्याचे आवाहनही श्री. भरणे यांनी केले.

यावेळी महसूल, पोलीस, जिल्हा परिषद, सार्वजनिक आरोग्य, महानगरपालिका यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

कोरोना योद्ध्यांचा सन्मान

जिल्ह्यातील उत्कृष्ट काम केलेल्या महसूल, पोलीस विभागातील अधिकारी, कर्मचारी, कोरोना काळात काम केलेले अधिकारी, कर्मचारी, कोरोना योद्धे, सामाजिक संस्था यांचा पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.

यावेळी कर्तव्यावर असताना कोरोनामुळे निधन झालेले पोलीस नाईक जाकीर हिदायतरसूल शेख यांच्या वारसांना शासनाकडून मंजूर ५० लाख आणि पोलीस महासंचालक यांच्या विशेष सहायता निधीतून १० लाख रूपयांचा धनादेश पालकमंत्री श्री. भरणे यांच्या हस्ते देण्यात आला.

सन्मानार्थी खालीलप्रमाणे

पोलीस दलात उत्कृष्ठ सेवा केल्याने पोलीस महासंचालक यांचे सन्मानचिन्ह प्राप्त- ग्रामीण- पोलीस निरीक्षक अरूण सावंत (स्थानिक गुन्हे शाखा), विश्वंभर गोल्डे (माळशिरस), सहायक पोलीस निरीक्षक सुनिल जाधव (करमाळा), सहायक फौजदार नाशिर शेख (तालुका पोलीस ठाणे), हवालदार महेश क्षीरसागर (सुरक्षा शाखा), सुभाष राठोड (विशेष शाखा), शहर- पोलीस निरीक्षक संजय जगताप, सहायक पोलीस निरीक्षक मच्छिंद्रनाथ गुरव, रणजित माने, पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ देशमाने, हवालदार उमाकांत कदम, संजय आवताडे, गजानन कणगेरी, मुनीरोद्दीन शेख, इमाम कासीम महेंदी, पोलीस नाईक धनाजी सुरवसे, संजय सावरे, मंजूनाथ मुत्तनवार, राहुल फुटाणे, पोलीस शिपाई श्रीमती श्रीदेवी म्हेत्रे.

महसूल विभाग – प्रांताधिकारी सचिन ढोले (पंढरपूर), तहसीलदार राजेश चव्हाण (माढा), नायब तहसीलदार तुषार देशमुख (माळशिरस), लघुलेखक प्रदीप शिंदे (जिल्हाधिकारी स्वीय सहायक), मंडल अधिकारी जे.आर. धनुरे (बोरामणी), अव्वल कारकून जे.डी. पवार (जिल्हाधिकारी कार्यालय), तलाठी श्रीमती ए.ए. जोरी (उत्तर सोलापूर तहसील), लिपीक टंकलेखक केतन राचमाले (जिल्हाधिकारी कार्यालय), वाहन चालक आर.एस. पालक (मोहोळ तहसील), पोलीस पाटील सचिन माने (कोंडबावी, ता. माळशिरस), कोतवाल विकास माने (लक्ष्मीदहिवडी, ता. मंगळवेढा), शिपाई राजू आगळे (अपर जिल्हाधिकारी कार्यालय).

कोरोना काळात उत्कृष्ट कामकाज करणारे कोरोना योद्धे खालीलप्रमाणे

उपायुक्त धनराज पांडे, पंकज जावळे, अजय पवार (महानगरपालिका), उपजिल्हाधिकारी शैलेश सुर्यवंशी, वैद्यकीय अधीक्षक डॉ. ए.एन. मस्के, विभाग प्रमुख डॉ. व्ही.एन. धडके (शासकीय रूग्णालय आणि महाविद्यालय), पोलीस नाईक महेश कांबळे, पोलीस शिपाई श्रीमती प्रियंका आखाडे, होमगार्ड गजानन स्वामी, विशाल वजाळे (ग्रामीण पोलीस), वैद्यकीय अधिकारी डॉ.वैशाली शिरशेट्टी, आरोग्य निरीक्षक सचिन कदम, परिचर शिवम अलकुंटे, आशासेविका सरोजा वाघमारे, सफाई कामगार नागनाथ केशपागा, नागुबाई रातुल, झाडूवाली शिवबाई बनसोडे, स्मशानभूमी रखवालदार राजू डोलारे (महानगरपालिका)

वैद्यकीय अधिकारी डॉ. आनंद पुरी, अधिपरिचारिका श्रीमती रुपाली पर्वतराव, वॉर्ड बॉय अंकुश क्षीरसागर, वॉर्ड कामगार सिता घंटे (जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय), वैद्यकीय अधिकारी डॉ.वृषाली पाटील, आरोग्यसेविका श्रीमती एस. एम. मठे, आशासेविका फरहान शेख, भागिरथी कुंभार, अॅम्ब्युलन्स वाहन चालक गणेश झुंझार( जिल्हा परिषद), नायब तहसीलदार प्रविण घम, अव्वल कारकून चंद्रकांत हेडगिरे, लिपीक अजित कांबळे, सुशांत देशपांडे, विजय काकडे, शिपाई रमेश माळी, मोजणीदार समीर पाटील, लिपीक अतुल रणसुभे लिपीक प्रशांत माशाळकर, अव्वल कारकून राजू शेळके (जिल्हाधिकारी कार्यालय), लघुलेखक निम्नश्रेणी सागर लोंढे (जिल्हा कृषी कार्यालय), मंडल अधिकारी विजयकुमार जाधव (म्हैसगाव, कुर्डूवाडी), तलाठी विकास माळी (सांगोला), कोतवाल फिरोज सुतार (तळसंगी), श्रीमती कविता चव्हाण (टायगर ग्रुप ऑल इंडिया) आणि चंद्रिका चौहान (उद्योगवर्धिनी सामाजिक संस्था).

पोलीस आयुक्त कार्यालय-

हवालदार अशोक लोखंडे, पोलीस नाईक प्रवीण जाधव, अंबाजी कोळी, इम्रान शेख, पोलीस शिपाई मनीष जाधव, भीमराव काळे, संपत करबाळे.

एकजुटीच्या बळावर कोरोनावर मात करु – पालकमंत्री बच्चू कडू

अकोला, दि. १५ – कोविड १९ या विषाणू संसर्गाच्या जागतिक संकटाचा आपण अभूतपूर्व एकजुटीने सामना करत आहोत. त्यामुळे या संकटावर आपण नक्कीच मात करु, असा ठाम विश्वास पालकमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी व्यक्त केला.

येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात भारतीय स्वातंत्र्याचा ७३ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी पालकमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांच्या हस्ते मुख्य शासकीय समारंभात ध्वजारोहण करुन राष्ट्रध्वजास मानवंदना देण्यात आली.

यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रतिभा भोजने, विधानपरिषद सदस्य आ. गोपिकिशन बाजोरिया, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार, जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अपर जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर, जिल्हा परिषदेचे अति. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मिनाक्षी गजभिये, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे तसेच विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.

यावेळी पोलीस दलाच्या वाद्यवृंदाने वाजविलेल्या राष्ट्रगिताच्या धुनवर राष्ट्रगीत गायन करुन उपस्थितांना आपल्या राष्ट्रध्वजास मानवंदना दिली. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर उपस्थितांनी यावेळी सामाजिक अंतर राखले होते. त्यानंतर आपल्या मार्गदर्शनात पालकमंत्री श्री. कडू यांनी देशासाठी स्वातंत्र्य संग्रामात त्याग आणि बलिदान केलेल्या हुतात्मे, स्वातंत्र्य सैनिक यांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन केले. ते पुढे म्हणाले, कोविड १९ या विषाणू संसर्गाच्या जागतिक संकटाचा आपण अभूतपूर्व एकजुटीने सामना करत आहोत. त्यामुळे या संकटावर आपण नक्कीच मात करु, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. या संकटकाळात सर्व डॉक्टर्स, सर्व नर्सेस, आरोग्य कर्मचारी, सफाई कर्मचारी, पोलीस कर्मचारी, प्रशासनातले कर्मचारी- अधिकारी या साऱ्यांनी दाखवलेल्या अतुलनीय कार्यशक्तीचा त्यांनी गौरवपूर्ण उल्लेख केला.

ते म्हणाले, जिल्ह्यातील प्रत्येक गावात प्रत्येकाच्या हाताला काम मिळावे यासाठी उद्योगपूर्ण गाव ही योजना राबविण्यासाठी प्रयत्नशील आहोत. तसेच जिल्ह्यातील स्वातंत्र्य सैनिक, हुतात्मा यांचे स्मरण राहण्यासाठी पुस्तकरुपी संकलन करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले. कोरोना संकटावर मात करताना सर्व अधिकारी कर्मचारी, आरोग्य व प्रशासन यंत्रणा यांच्या अथक परिश्रमातून अकोला जिल्हा राज्यात सर्वाधिक रुग्ण बरे होण्याचा दर असणारा जिल्हा म्हणून ओळखला जात आहे, याबद्दल त्यांनी कौतूक केले. एकजुटीने कोरोना विरुद्धचा लढा आपण जिंकू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्यानंतर त्यांनी समारंभास उपस्थित स्वातंत्र्य सैनिक, वीरमाता, वीरपत्नी, कोविड योद्धा यांची भेट घेतली.

अनाथ व दुर्धर आजारग्रस्त बालकांना पालकमंत्र्यांच्या हस्ते लाभाचे वितरण

स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत जिल्ह्यातील अनाथ व दुर्धर आजारग्रस्त बालकांना विशेष साहाय्य योजनेच्या लाभाच्या अनुदानाचे वितरण पालकमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांच्या हस्ते करण्यात आले. शासकीय ध्वजारोहणाच्या मुख्य सभारंभानंतर लगेचच जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकशाही सभागृहात हा कार्यक्रम झाला.

यावेळी अकोला तालुक्यातील आनंद आश्रम, गुडधी, सुर्योदय बालगृह मलकापूर, गायत्री बालिकाश्रम, मलकापूर येथील ११ बालक तसेच सात दुर्धर आजारग्रस्त बालकांना या लाभांचे वितरण करण्यात आले.

अनाथांच्या विकासासाठी शासन कटिबद्ध

शासनाच्या विविध योजनांचे एकत्रीकरण करुन त्याचा लाभ अनाथ मुलांना देण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे पालकमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी सांगितले. माधवनगर येथील शासकीय मुलांचे निरीक्षण गृह व शासकीय मुलांचे बालगृह येथे भेट दिल्यावर त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

पालकमंत्री श्री. कडू यांनी बालगृहाला भेट देऊन तेथील मुलांच्या समस्या व अडीअडचणी जाणून घेतल्या. मुलांना कोणत्याही प्रकारचा त्रास झाल्यास संबंधित अधिकाऱ्यावर कार्यवाही करण्यात येईल, असे सांगून शासनाच्या विविध योजना एकत्रीकरण करुन त्यासंबंधीचा अहवाल त्वरित सादर करावा. यासाठी शासन आपल्याला योग्य ते सर्व सहकार्य करेल. विद्यार्थ्यांचा अभ्यासातील कल लक्षात घेता त्याप्रमाणे त्यांना शिक्षण देऊन स्पर्धा परीक्षा तसेच ज्यांना उद्योगाकडे वळायचे आहे, अशांना उद्योग करण्याचे शिक्षण द्यावे. अनाथांना योग्य शिक्षण तसेच सोयीसुविधा उपलब्ध करुन देऊन येत्या काही वर्षात त्यांना देशाचे सक्षम नागरिक बनवण्यासाठी त्यांच्यावर योग्य संस्कार करावे, असेही ते म्हणाले.

अकोला थॅलेसिमीया सोसायटीला भेट

‍पालकमंत्री श्री. कडू यांनी अकोला थॅलेसिमीया सोयायटी व डे केअर सेंटरला भेट दिली. यावेळी त्यांच्यासोबत आमदार गोपीकिशन बाजोरिया, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, थॅलेसिमीया सोसायटीचे अध्यक्ष व माजी नगरध्यक्ष हरिश अलीमचंदानी, डॉ. अशोक ओळंबे, नगरसेवक आशिष पवित्रकार, नुतन जैन, डॉ. विनीत वर्टे, डॉ. चंदन मोटवाणी होते.

सामाजिक बांधिलकी समजून थॅलेसिमियाचे उच्चाटन करण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री श्री. कडू यांनी केले. अलीमचंदानी सारखे रंजल्या गांजल्याची सेवा करणारे व्यक्ती खरच समाजातील देव आहे. अशा व्यक्तीचा आदर्श ठेऊन समाजातील प्रत्येक व्यक्तीने थॅलेसिमियासारख्या आजारासाठी सढळ हातानी सहकार्य करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. थॅलेसिमिया हा आजार आनुवंशिक आजार असल्यामुळे लग्न करताना कुंडली न बघता थॅलेसिमियाची चाचणी करुन घेणे आवश्यक आहे. यामुळे समाजात थॅलेसिमीया आजाराचा फैलाव होणार नाही. यासाठी जनजागृती करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

रक्तदान शिबिरास पालकमंत्र्यांची भेट

मेहरबानो महाविद्यालय येथे कावड पालखी उत्सवानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिराला पालकमंत्री बच्चू कडू यांनी भेट दिली.

शासकीय रूग्णालयांमध्ये मनुष्यबळ उपलब्धतेसाठी तात्काळ प्रस्ताव द्या – पालकमंत्री जयंत पाटील

सांगली, दि. १५ : शासकीय रूग्णालयांमध्ये कर्मचारी वर्ग अपुरा पडत आहे. याचा सविस्तर आढावा घेऊन यावर मार्ग काढण्यासाठी कंत्राटी तत्वावर मनुष्यबळ उपलब्ध करून घेण्याच्या दृष्टीने मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयाचे अधिष्ठाता यांनी तात्काळ प्रस्ताव तयार करावा व तो मंत्रालय स्तरावर सादर करावा. त्यासाठी आवश्यक पाठपुरावा करण्यात येईल, असे पालकमंत्री जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना प्रादुर्भावाच्या अनुषंगाने पालकमंत्री जयंत पाटील यांनी आढावा बैठक घेतली. यावेळी आमदार सुधीर गाडगीळ, जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, महापालिका आयुक्त नितीन कापडणीस, अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे, निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी बर्डे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भूपाल गिरीगोसावी व विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, जिल्ह्यात सद्यस्थितीत ५ हजार ७८८ एकूण कोरोना बाधित असून यातील २ हजार ५१७ कोरोना बाधित उपचाराखाली आहेत. तर ३ हजार ७० रूग्ण बरे झाले आहेत. महानगरपालिका क्षेत्रात तुलनेने प्रादुर्भाव जास्त आहे. या सर्व बाबींचा आढावा घेऊन सद्यस्थितीवर पालकमंत्री जयंत पाटील यांनी सविस्तर चर्चा केली. सांगलीत उभारण्यात येत असणारे ऑक्सिजन प्लँट व मिरज येथील ऑक्सिजन प्लँटची क्षमता वृद्धी याबाबतही चर्चा करून पालकमंत्री जयंत पाटील यांनी अधिग्रहित रूग्णालयांमधून रूग्णांकडून जादा दराने बिलांची आकारणी होऊ नये यासाठी प्रत्येक खाजगी रूग्णालयांवर शासकीय ऑडिटर नेमून खात्री करावी. रूग्णांना देण्यात येणाऱ्या जेवणाचा दर्जा चांगला असावा. रूग्ण मृत झाल्यास स्वॅबचा अहवाल येण्यामध्ये होत असलेला विलंब कमी करावा याबाबत निर्देशित केले.

सांगलीत कोरोना रूग्णांवर उपचारासाठी ४०० खाटांचे हॉस्पिटल लवकरच उभारणार – पालकमंत्री जयंत पाटील

भारतीय स्वातंत्र्याचा ७३ वा वर्धापनदिन उत्साहात साजरा

सांगली, दि. 15, (जि. मा. का.) : कोरोना बाधित रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यासाठी जिल्हा क्रीडा संकुल सांगलीच्या बाजूला कोरोना रूग्णांवर उपचार करण्यासाठी 400 खाटांचे हॉस्पिटल उभा करण्यासाठीचा प्रस्ताव शासनाला देण्यात आला असून यावर लवकरच निर्णय होऊन त्याचे काम लवकरच सुरू होईल. कोरोनाची परिस्थिती गंभीर असल्यामुळे गरज नसताना घराच्या बाहेर पडू नये. कोरोनापासून दूर राहण्यासाठी अधिक दक्षता घेणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी केले.

भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 73 व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात मुख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. राष्ट्रध्वजाला सलामी देण्यात आली व राष्ट्रगीत झाले. उपविभागीय पोलीस अधिकारी सांगली अशोक वीरकर यांनी संचलनाचे नेतृत्त्व केले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा प्राजक्ता कोरे, महापौर गीता सुतार, आमदार सुधीर गाडगीळ, जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, महापालिका आयुक्त नितीन कापडणीस, अप्पर जिल्हाधिकारी गोपीचंद कदम, अतिरीक्त जिल्हा पोलीस अधीक्षक मनिषा डुबुले, निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी बर्डे, मिरज पोलीस उपविभागीय अधिकारी संदीपसिंह गिल, पद्मश्री विजयकुमार शहा यांच्यासह ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी, अन्य पदाधिकारी व विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, कोरोना आजाराचा फैलाव वेगाने होत आहे. कोरोना नियंत्रणासाठी शासकीय यंत्रणा गेल्या काही महिन्यापासून प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहे. काही विलंब व अडचणी समजून घेऊन त्यांना सर्वांनी साथ देणे गरजेचे आहे. हे संकट नेहमीचे व साधारण संकट नाही. या संकटाच्या काळात सर्वांनी समजून घेऊन प्रशासकीय काम करणाऱ्या कोरोना योध्यांना साथ देणे गरजेचे आहे. आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, प्रसिध्दी माध्यमांचे प्रतिनिधी यांनीही या संकटाच्या काळात अतिशय चांगले काम केले आहे. कोरोनाबाबत लोकांची जागृती व समजूत घालणे हाच उपाय आहे.

आरोग्य विभागाने 50 वर्षावरील व कोमॉर्बिडिटी असलेल्या नागरिकांची तपासणी मोहीम हाती घेतली  असून त्यांची वारंवार तपासणी व त्यांना काही अडचणी आहेत का हे पाहण्याचे काम आरोग्य यंत्रणा करीत आहे असे सांगून पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, कोरोनाच्या काळात कोमॉर्बिडिटी असणाऱ्यांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. सध्या कोरोनापासून बचाव हाच सर्वोत्तम उपाय आहे.

पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, सांगली जिल्ह्याने आत्तापर्यंत अनेक प्रकारच्या आपत्ती पाहिल्या आहेत. पूर, दुष्काळ, गतवर्षीचा भीषण महापूर, अवकाळी पाऊस आणि आता यावर्षी कोरोना. हे सारे आघात पेलताना जिल्हा         प्रत्येकवेळी धैर्याने उभा राहिला. प्रत्येक संकटाने आपल्याला अधिक

कणखर आणि संघर्षशील बनविले. कोरोनाशी लढताना कोणतीही सरावलेली युध्दसामग्री कुचकामी ठरते. अशा परिस्थितीतही जिल्हा खंबीरपणे कोरोना योध्यांच्या, प्रशासनाच्या बाजूने सहनशिलतेने उभा आहे. प्रशासनातील सर्व यंत्रणा झोकून देवून अहोरात्र राबत आहे. सर्व लोकप्रतिनिधीही एकदिलाने साथ देत आहेत. सांगली जिल्हावासियांनी तर संकटाच्या या काळात संयम    बाळगून प्रशासनाला दिलेली साथ अतुलनीय आहे. यासाठी मी सर्वांचाच ऋणी आहे.

जसजशी कोरोना रूग्णांची संख्या वाढत आहे तसतसे शासकीय रूग्णांलयाबरोबरच खाजगी रूग्णालयेही अधिग्रहित करण्यात येतआहेत. उपचारापासून कोणीही वंचित राहू नये यासाठी महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेची व्याप्ती वाढविण्यात आली आहे. तालुकास्तरावर कोविड केअर सेंटर कार्यान्वीत करण्यात आले आहेत. तसेच काही ग्रामीण रूग्णालयांमधून व उपजिल्हा रूग्णालयांमध्ये डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर सुरू करण्यात आले आहेत, असे सांगून पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, जिल्हा प्रशासन, महानगरपालिका, जिल्हा परिषद, पोलीस प्रशासन, आरोग्य यंत्रणा हे सर्व घटक कोणतीही तमा न बाळगता या साथीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अहोरात्र झटत आहे. यांच्या जोडीला खाजगी रूग्णालयातील डॉक्टर्स व त्यांचे सर्व सहकारी यांनीही रूग्ण सेवेचे आपले आद्य कर्तव्य पार पाडण्यासाठी पुढाकार घेणे ही वेळेची गरज आहे. खाजगी क्षेत्रातील सर्व आरोग्य यंत्रणेतील घटक यासाठी संपूर्ण योगदान देतील. आणि मानव जातीच्या इतिहासात उदभवलेल्या या अभूतपूर्व महामारीच्या संकटात आपल्या संपूर्ण क्षमता वापरून योगदान देतील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

जिल्ह्यात आजमितीस 5 हजार 700 हून अधिक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत.  जवळपास तीन हजाराहून अधिक रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) मधून गत आर्थिक वर्षात 7 कोटी 32 लाखाची तर यावर्षी 10 कोटीची तरतूद करण्यात आली आहे. तसेच शासनाकडून 4 कोटी 65 लाखाचा निधीही आत्तापर्यंत उपलब्ध करून देण्यात आला आहे. कोरोना आज प्रत्येकाच्या दारात आला आहे,  मात्र  त्याला  उंबरठ्यावरुनच  परत  पाठवायचं असेल तर नागरिकांनी घरी राहूनच कोरोनाशी दोन हात केले पाहिजेत, असेही त्यांनी यावेळी सांगितले. 

जिल्ह्यात गेल्या वर्षी उदभवलेल्या महापूराच्या पार्श्वभूमीवर यंदा पूरप्रतिबंधासाठी आवश्यक उपाययोजना नियोजनबध्दरितीने केल्याचे सांगून पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, पडणारा पाऊस, धरणातील पाणीसाठा, धरणातून पाणी सोडण्याचे   नियोजन, नदीकाठच्या  लोकांना  सावधानतेचा  इशारा आणि पूरग्रस्तांसाठी बचाव व मदत कार्य याचे शास्त्रशुध्द नियोजन केले आहे. कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांमध्ये योग्य समन्वय ठेऊन अलमट्टी धरणातील पाणीसाठा आणि विसर्ग यावर अधिक लक्ष देण्यात येत आहे. जिल्ह्यात गतवर्षी जुलै-ऑगस्ट महिन्यात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. अशा शेतकऱ्यांसाठी एक हेक्टर पर्यंतच्या पीक कर्जास माफी जाहीर करण्यात आली होती.  यासाठी सातत्याने पाठपुरावा करून 131 कोटी रूपयांचा निधी उपलब्ध करून घेतला. जिल्ह्यातील 26 हजार 256 शेतकऱ्यांच्या कर्जखात्यावर 130 कोटी 91 लाख रक्कम वर्गकरून पुरबाधीत शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यात आला.

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेमध्ये सांगली जिल्ह्यात आत्तापर्यंत 74 हजार 771 शेतकऱ्यांच्या कर्जखात्यावर 443 कोटी 68 लाख रक्कम वर्ग करण्यात आली. यावर्षी खरीपासाठी 1497 कोटी पीक कर्जाचे उद्दिष्ट आहे. 31 जुलै अखेर 1025 कोटी रूपयांचे पीक कर्ज वाटप झाले आहे. उर्वरित उद्दिष्टही लवकरच साध्य होईल. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 30 मार्च 2020 पासून शासनाने केवळ पाच रुपयात शिवभोजन थाळी योजना राबवून अडचणीत सापडलेल्या  गरीब आणि गरजू जनतेला पोटभर जेवण उपलबध करुन दिले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 21 शिवभोजन केंद्रामार्फत  ४ लाखाहून अधिक थाळ्याचे वाटप करण्यात आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. 

कोरोनाबरोबरच जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या अनुषंगानेही पोलीस दलाने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. लॉकडाऊन अंमलबजावणी, कंटेनमेंट झोन व्यवस्थापन, दैनंदिन आवश्यक वस्तुंची घरपोच सेवा या सर्वांमध्ये उत्कृष्ट काम केले आहे. जिल्ह्यातील महत्त्वाकांक्षी सिंचन प्रकल्प टेंभू, ताकारी व म्हैसाळ या उपसा सिंचन येाजनांमुळे 9 तालुक्यातील सुमारे 1 लाख 80 हजार हेक्टराहून अधिक क्षेत्रास सिंचनाचा लाभ होणार असून सद्यस्थितीत या सर्व क्षेत्रास सिंचनाचा प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रित्या लाभ दिला जातो. या उपसा सिंचन योजनांमधून सद्यस्थितीत वार्षिक 30 ते 35 टीएमसी पाणी अनेक टप्प्यांव्दारे उचलून आवर्षण भागातील शेतीसाठी सिंचन सुविधा पुरविण्यात येते. तसेच प्रकल्पांच्या लाभक्षेत्रातील लहान मोठे तलाव भरून दिले जात आहेत. त्यामुळे या भागातील नागरिकांना व पशुधनास टंचाई कालावधीत टंचाई निवारणार्थ फार मोठी मदत झाली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

कृषि विभागाच्या आत्मा अंतर्गत नाविण्यपूर्ण योजनेतून 200 शेत तलावामध्ये मत्स्यपालनाचा उपक्रम राबविण्यात आला. शेततळी अस्तरीकरणासाठी सुमारे 2 हजार शेतकऱ्यांना 12 कोटी अनुदान दिले. त्यामुळे शेततळ्यामध्ये 12 लाख 58 हजार 350 घनमीटर पाणीसाठ्यामध्ये वाढ होऊन त्याचा लाभ पाण्याचे दुर्भिक्ष असलेल्या क्षेत्रातील द्राक्ष पिकाला झाला असल्याचे सांगून पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, 26 कोटी 25 लाख रूपये अनुदान वितरीत करून 13 हजाराहून अधिक शेतकऱ्यांना 6784 हेक्टरवर ठिबक सिंचनाचा लाभ दिला. लॉकडाऊन काळात 3 हजार 906 क्विंटल बियाणे व 8 हजार 966 मेट्रिक टन रासायनिक खते 20 हजार 200 शेतकऱ्यांच्या बांधावर पुरवठा केली आहेत.

प्रत्येक पातळीवर सर्वसामान्य माणसाचे जीवन सुरळीत चालावे यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहेत, असे सांगून पालकमंत्री जयंत पाटील यांनी सांगलीकरांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी पालकमंत्री जयंत पाटील यांच्याहस्ते कोरोना योध्दा पुरस्कार डॉ. प्रिया बिडवे, डॉ. अंजना पलकंडी, कक्षसेवक अनिल कांबळे, आशा वर्कर मनिषा कांबळे, साधना खाडे, अरूणा शिंदे, सहिदा जमादार व वर्षा ढोबळे, कोरोना विषयक विशेष कामगिरीबध्दल जमीर पाथरवट, अनिल मादरगे,  कोरोना मुक्त झालेल्या हौसाबाई पाटील, ताराबाई खोत, बाबासाहेब खोत, प्रकाश पांढरे, कोरोना जनजागृतीसाठी पत्रकार दीपक चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला.

जिल्हा क्रीडा पुरस्कार सन 2018-19 युवराज खटके, सुरेश चौधरी, सुरेश सावंत, प्रियंका कारंडे, गिरीष जकाते, विशाल पवार यांना देण्यात आला. सन 2016-17 चा जिल्हा युवा पुरस्कार प्रताप मेटकरी, योगीता मगदूम व एकलव्य बहुउद्देशीय सेवाभावी संस्था सांगली यांना, 2017-18 चा जिल्हा युवा पुरस्कार चंद्रशेखर तांदळे, माया गडदे व इन्साफ नॅचरल सिक्युरिटी ऑफ ॲनिमल फाऊंडेशनचे अध्यक्ष मुस्ता मुजावर यांना व सन 2018-19 चा जिल्हा युवा पुरस्कार मयुर लोंढे, अनिता पाटील यांना पालकमंत्री जयंत पाटील यांच्याहस्ते देण्यात आला.

पुरस्कार वितरणानंतर पालकमंत्री जयंत पाटील यांनी स्वातंत्र्य सैनिक, कोरोना योध्दे, नागरिक यांना भेटून शुभेच्छा दिल्या.

सूत्रसंचालन विजय कडणे यांनी केले. यावेळी स्वातंत्र्य सैनिक, विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, नागरिक उपस्थित होते.

गणेश मंडळांनी प्लाझ्मा दानासारखे उपक्रम राबवावेत – पालकमंत्री सतेज पाटील

सर्वांच्या सहकार्यातून कोरोनावर मात करण्याची शक्ती मिळो

कोल्हापूर, दि. 15 (जिल्हा माहिती कार्यालय): सर्वांच्या सहकार्यातून कोरोनावर मात करण्याची शक्ती मिळो आणि कोरोनाचे संकट लवकरच दूर होवो ही आशा व्यक्त करताना गणेश उत्सवात गणेश मंडळांच्या तरूण कार्यकर्त्यांनी प्लाझ्मा दानासारखे उपक्रम राबवून गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहन पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज केले.

         भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 73 व्या वर्धापनदिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात पालकमंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा मुख्य सोहळा करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बजरंग पाटील, खासदार संजय मंडलिक, आमदार चंद्रकांत जाधव, आमदार ऋतुराज पाटील, विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. सुहास वारके, जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. पाटील शुभेच्छा संदेशात म्हणाले, कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा स्वातंत्र्यदिन सोहळा आज देशभर कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांचा अवलंब करुन साजरा होत आहे. ज्यांच्या असिम त्यागातून आपल्याला स्वातंत्र्य मिळाले, त्या थोर स्वातंत्र्य सैनिकांच्या, देशभक्तांच्या, क्रांतीकारकांच्या आणि शहिदांच्या प्रती मी प्रथम आदर व्यक्त करतो. आपणा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो.

कोल्हापूर जिल्हयात कोरोनाचा संसर्ग वाढत असताना रुग्ण डिस्चार्ज होण्याचे प्रमाणही चांगले आहे. जिल्ह्यात कोरोना समूह संसर्गाचा धोका टाळण्यासाठी शासन-प्रशासन अहोरात्र प्रयत्न करीत आहेच, मात्र आम्ही कोल्हापूरी- जगात भारी ही उक्ती कोरोनाच्याबाबतीत खरी ठरविण्यासाठी जनतेने आता प्रतिबंधक उपाययोजना कठोरपणे अंमलात आणून आपण, आपलं कुटुंब आणि समाजाला कोरोनापासून दूर ठेवण्याची गरज आहे.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जवळपास गेली पाच महिने लॉकडाऊनसह अन्य प्रतिबंधक उपायांव्दारे कोरोनाला हरविण्याचे प्रयत्न शासन आणि प्रशासन यांच्याकडून युध्दपातळीवर केले जात आहेत. असे असले तरी गेल्या महिनाभरात कोल्हापूर जिल्ह्यात 12 हजाराहून अधिक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांनी राज्यातील जनतेच्या सक्रीय पुढाकाराने कोरोना विरुध्दच्या युध्दात निश्चितपणे जिंकू असा आत्मविश्वास बाळगला आहे. त्यांचा हा आत्मविश्वास सार्थ ठरविण्यासाठी प्रत्येकाने नियमांची अंमलबजावणी करून कोरोनाला हरविण्यात पुढाकार घेणे गरजेचे आहे.

प्लाझ्मा थेरेपीने 25 अत्यवस्थांना जीवदान

कोरोना रुग्णावर प्लाझ्मा थेरेपीचा प्रयोगही जिल्ह्यात यशस्वी झाल्याचे सांगून पालकमंत्री म्हणाले, 60 दात्यांनी प्लाझ्मा दान केला आहे. यामुळे 25 अत्यवस्थ रुग्णांना जीवदान मिळाले आहे. यासाठी सीपीआर, डी.वाय.पाटील हॉस्पिटल, आयसोलेशन, आयजीएम हॉस्पीटल या कोरोना हॉस्पीटलांबरोबरच खासगी हॉस्पिटलमध्येही कोरोना रुग्णांवर उपचाराच्या सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत. कोल्हापूर शहरातील खासगी हॉस्पीटलांनीही रुग्णसेवेसाठी योगदान दिले आहे. 

7 हजार 332 बेडची उपलब्धता

जिल्ह्याचे प्रमुख आरोग्य उपचार केंद्र म्हणून सी.पी.आर.कडे पाहिले जाते. सी.पी.आर. मध्ये सध्या 429 बेड्सची व्यवस्था असून त्यापैकी 222 ऑक्सिजन बेड्स आहेत. आणखी 94 ऑक्सिजन बेड्स वाढविण्याचे काम सुरु आहे. आयसीयू बेड्स 73 असून आणखी 8 बेड्सची भर घातली जात आहे. त्याचबरोबर 66 व्हेंटिलेटर, 50 एनआयव्ही, 20 हाय फ्लो नेझल ऑक्सीजन या सुविधा उपलब्ध आहेत.  सीपीआरसह समर्पित कोरोना हॉस्पीटल आणि समर्पित कोरोना मदत केंद्र यांना एकूण 12 एक्सरे मशिन देण्यात येत आहेत. जिल्ह्यात दररोज होणारी 2 हजार स्वॅब नमुने तपासणी क्षमता आता 5 हजार पर्यंत करण्यात येत आहे. प्रत्येक कोव्हिड केअर सेंटरमध्ये ॲन्टीजेन टेस्ट करण्याची सुविधा उपलब्ध आहे.

कोव्हिड काळजी केंद्र, समर्पित कोव्हिड आरोग्य केंद्रांमध्ये एकूण 7 हजार 332 बेडची उपलब्धता असून यामध्ये 808 ऑक्सिजन बेड व 288 आयसीयू बेड आहेत. 

रुग्णांना हॉस्पिटलमधील उपलब्ध बेडची माहिती मिळावी तसेच बेड उपलब्ध करुन देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. यासाठी तीन स्वतंत्र मोबाईल क्रमांक दिले आहेत. दिवसाला सरासरी 400 ते 500 फोन स्वीकारण्यात येत आहेत. कोरोना रुग्णांकडून खासगी हॉस्पीटलमध्ये शासकीय दराने बील आकारणी व्हावी तसेच उपलब्ध बेडची संख्या कळावी यासाठी प्रत्येक हॉस्पीटलसाठी एका शासकीय कर्मचाऱ्याकडे समन्वयक म्हणून जबाबदारी दिली आहे. महापालिकेच्यावतीने खासगी रूग्णालयांना दरफलक लावण्याबाबत कळविण्यात आले असून बिले तपासणीसाठी लेखापरीक्षण विभागातील कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागातही हॉस्पीटलांसाठी समन्वय अधिकारी नेमण्यात आले आहेत. 

कोरोना योध्यांना मानाचा मुजरा

जिल्ह्यात सुरु असलेल्या कोरोना विरुध्दच्या लढ्यात शासन, प्रशासन, स्वयंसेवी-सेवाभावी संस्था-संघटना तसेच जिल्ह्यातील जनतेने केलेले सहकार्य महत्वाचे आहे. आरोग्य यंत्रणेतील डॉक्टर्स, नर्सेस व सर्व स्टाफ, पोलीस अधिकारी व कर्मचारी तसेच विविध विभागाचे शासकीय कर्मचारी, सेवाभावी संस्थांचे सदस्य या सर्व कोरोना योध्दांना आजच्या स्वातंत्र्यदिनी मी मानाचा मुजरा करतो ! अशा शब्दात पालकमंत्र्यांनी गौरव केला. 

कोरोनाची सौम्य लक्षणे असणाऱ्या किंवा लक्षणे नसणाऱ्या पॉझिटिव्ह रूग्णांवर घरी उपचार करण्यास जिल्हा प्रशासनाने परवानगी दिली आहे. करवीर तालुक्यातील वडणगे ग्रामपंचायतीने सर्वप्रथम पुढाकार घेवून हा उपक्रम सुरु करुन तो यशस्वी केला आहे. याबाद्दल वडणगे ग्रामपंचायतीचे सरपंच, सर्व सदस्य व कोरोना दक्षता समितीचे सदस्य आणि ग्रामस्थ यांचे मी मनापासून कौतुक करतो. कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात अणेक ठिकाणी हा उपक्रम सुरु झाला असून यामुळे आरोग्य यंत्रणेवरील ताण निश्चितपणे कमी झालेला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून आजअखेर जिह्यात 3 हजारहून अधिक कोरोना बाधित घरी उपचार घेत आहेत. प्रशासनामार्फत या सर्वांना किट दिले असून त्यामध्ये पल्स ऑक्सीमीटर, डिझीटल थर्मामीटर, मास्क इत्यादी वस्तू देण्यात आल्या आहेत. यापैकी 2 हजारहून अधिक आता बरे झाले आहेत.

कोल्हापूरकरांचे दातृत्व

कोरोनाच्या या संकट काळात अनेक सेवाभावी संस्था, संघटना व व्यक्तींनी कोल्हापूर रिलीफ फंड याला मदत करुन दातृत्वाची परंपरा जपली आहे. रोटरी मुव्हमेंट कोल्हापूर तर्फे 62 लाख रुपये खर्चून 538 बेड्स उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. त्यापैकी 120 बेड्स च्या माध्यमातून महासैनिक दरबार हॉल येथे कोवीड केअर सेंटर सुरु केले आहे. या ठिकाणी क्रिडाई कोल्हापूर तर्फे पायाभूत सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत. तसेच शिरोली येथील जैन मंदीरामध्ये जैन समाजातर्फे कोवीड केअर सेंटर सुरु केले आहे. कसबा बावडा, राजोपाध्येनगर, फुलेवाडी या ठिकाणी स्थानिक नगरसेवकांनी कोवीड केअर सेंटर उभारण्याचा निर्णय घेतला आहे. उद्योजक व औद्योगिक संघटना यांनी 20 व्हेंटीलेटर उपलब्ध करुन देण्याचे जाहीर केले असून त्यापैकी 3 व्हेंटीलेटर जिल्हा प्रशासनाकडे सुपूर्द केले आहेत.

घाटगे ग्रुपने शववाहिका उपलब्ध करुन दिली आहे. व्हाईट आर्मी संस्थेने कोवीडच्या काळात लाखो गरजूंना जेवण उपलब्ध करुन दिले आहे. अनेक शैक्षणिक संस्था, साखर कारखाने यांनी सुध्दा आपल्या कडील सुविधा कोरोना केअर सेंटर तयार करण्यासाठी जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत. होर्डिंग ॲण्ड आऊट सोर्सींग ॲडर्व्हटायझर्स असोसिएशनच्या माध्यमातून 2 हजार प्रबोधनाचे फलक लावण्यात आले आहेत. त्याचबरोबर अनेक ज्ञात-अज्ञात लोकांनी सुध्दा या संकट काळात मदतीचा हात पुढे केला आहे. त्‍या सर्वांचे पालकमंत्र्यांनी आभार मानले.

पूरपरिस्थिती हाताळण्यासाठी यंत्रणा सज्ज

जिल्ह्यात गेल्या वर्षी उदभवलेल्या महापुराच्या पार्श्वभूमीवर यंदा पूर प्रतिबंधासाठी आवश्यक उपाययोजना नियोजनबध्दरितीने राबविल्याने ऑगस्टच्या पहिल्या आठवडयात निर्माण झालेल्या पूर परिस्थितीतूनही जिल्ह्याला सावरता आले. यापुढे पडणारा पाऊस, धरणातील पाणीसाठा, धरणातून पाणी सोडण्याचे नियोजन, नदीकाठच्या लोकांना सावधानतेचा इशारा आणि पूरग्रस्तांसाठी बचाव व मदत कार्य याचे नियोजन सुध्दा केले आहे. याबरोबरच कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांमध्ये योग्य समन्वय ठेऊन अलमट्टी धरणातील पाणीसाठा आणि विसर्ग यावर अधिक लक्ष देण्यात येत आहे. संभाव्य पूरपरिस्थिती हाताळण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज आहे. 

पूर परिस्थिती उद्भवल्यास एनडीआरएफच्या 4 पथकांसह स्वयंसेवी संस्थांची पथकेही तैनात आहेत. यात  जवळपास 808 स्वयंसेवक आहेत. 51 रबर बोट, 700 लाईफ जॅकेट, 400 लाईफ रींग, 18 आस्का लाईट उपलब्ध आहेत. पुढारी रिलिफ फौंडेशनतर्फे दोन यांत्रिकी बोटी महापालिकेला नुकत्याच प्रदान करण्यात आल्या आहेत. यापूर्वीही पाच यांत्रिकी बोटी जिल्हा प्रशासनाला प्रदान करण्यात आल्या आहेत, असेही पालकमंत्री म्हणाले. 

जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत यंदा जिल्ह्यास सर्वसाधारण वार्षिक योजनेसाठी 330 कोटीची तर अनुसूचित जाती उपयोजनेसाठी 130 कोटीचा विकास आराखडा मंजूर करण्यात आला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वर्ष 2019-20 साठी 13 कोटी 17 लाख तर चालू वर्षी 13 कोटी 25 लाख तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये अधिकाधिक निधी उपलब्ध करून घेण्याचा माझा प्रयत्न राहील. 

छ. शिवाजी महाराज, राजर्षी शाहू, म. फुले,

 डॉ. आंबेडकर यांच्या विचारावर शासनाची वाटचाल

छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, म. जोतीराव फुले, भारतरत्न 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर शासनाची  वाटचाल सुरू आहे, असे सांगून पालकमंत्री म्हणाले,  महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील 43 हजार 965 शेतकऱ्यांच्या खात्यावर 262 कोटी रक्कम वर्ग करण्यात आली आहे. उर्वरित पात्र शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्यास शासन वचनबध्द आहे. यासाठी शेतकऱ्यांनी  आपला  आधार  क्रमांक  बँकेच्या कर्ज खात्याशी संलग्न करुन त्यांचे प्रमाणिकरण करणे गरजेचे आहे. या योजनेमुळे प्रती शेतकरी दोन लाखांपर्यतची कर्जमुक्तीची रक्कम राज्य शासन शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात थेट जमा करत आहे. राष्ट्रीयकृत बँका, व्यापारी बॅंका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, ग्रामीण बँका, विविध कार्यकारी सहकारी संस्थाकडून शेतकऱ्यांनी घेतलेले पीककर्ज “महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजने” तून माफ केले जात आहे. तसेच जे शेतकरी अल्पमुदत पीक कर्जाची नियमितपणे परतफेड करीत असतात, अशा शेतकऱ्यांनाही प्रोत्साहन देण्याचा शासनाचा मानस आहे. 

दहा रुपयात शिवभोजन थाळी योजना आघाडी शासनाने सुरु केली आहे. शिवभोजन थाळी या महत्वाकांक्षी योजनेचा लाभ जिल्ह्यातील हजारो गरजू लोकांना होत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने केवळ पाच रुपयात शिवभोजन थाळी योजना राबवून अडचणीत सापडलेल्या गरजूंना पोटभर जेवण उपलब्ध करुन दिले आहे. जिल्ह्यात 34 ठिकाणी ही योजना सुरु असून आतापर्यंत 4 लाख 21 हजार 477 लाभार्थ्यांना याचा लाभ झाला आहे. 

गुन्हे नियंत्रण व कायदा सुव्यवस्थेबरोबरच ग्रामपंचायत हद्दीत होणारे अतिक्रमण रोखण्यासाठी सीसीटीव्ही कंट्रोल रुमचा वापर उपयुक्त असल्याने पाचगाव, मोरेवाडी व कळंबा या ग्रामपंचायतींसाठी पोलीस विभागाच्या माध्यमातून व जिल्हा नियोजन मंडळाच्या निधीतून 1 कोटी 9 लाख 15 हजार इतका निधी खर्च करुन सीसीटीव्ही कंट्रोल रुम पाचगांव येथे कार्यान्वित करण्यात आली आहे. या माध्यमातून या तीन गावातील 63 ठिकाणी 147 कॅमेरे बसविण्यात आले आहेत, असे सांगून पोलीस शौर्य पदक मिळालेल्या अधिकारी व जवान अशा 14 जणांचे त्यांनी अभिनंदन केले.

नुकत्याच जाहीर झालेल्या यूपीएससी परीक्षेमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील चार गुणवंत विद्यार्थ्यांनी यश मिळवून कोल्हापूरचा नावलौकीक वाढविला आहे. नेर्ली गावच्या डॉ. प्रणोती संकपाळ, राजारामपुरी येथील गौरी पुजारी-किल्लेदार, जवाहरनगर येथील सौरभ व्हटकर आणि पन्हाळा तालुक्यातील किसरुळ येथील अजय कुंभार या गुणवंतांच्या हातून कोल्हापूरच्या परंपरेला साजेशी कामगिरी नक्की होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. 

आपल्या सर्वांना आनंद देणारा गणेशोत्सव पुढील आठवड्यात साजरा होणार आहे. आपण सर्वांनी उत्साहाने गणेशोत्सव साजरा करावा. पण सोशल डिस्टंसिंग तसेच स्वत:च्या आणि कुटूंबाच्या सुरक्षेची काळजी घ्यावी. तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी गणेशोत्सवात प्लाझमा दान सारखे उपक्रम राबवून कोरोना बाधित रुग्णांना बरे करण्यासाठी सहकार्य करावे. मोहरमच्या उत्सवात सुध्दा सर्वांनी आपली काळजी घ्यावी, असे आवाहनही पालकमंत्र्यांनी केले. 

आज आपण सर्वजण स्वातंत्र्याचा आनंद घेत आहोत. हे स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांच्या प्रती तुम्हा आम्हा सर्वांनाच नितांत आदर आहे. जिल्हयातील शहीद जवानांच्या तसेच स्वातंत्र्य सैनिकांच्या, क्रांतिकारकांच्या प्रती सर्वांनीच उतराई होणे अगत्याचे आहे. आपणा सर्वांच्या सहकार्यातून कोरोनावर मात करण्याची शक्ती तुम्हा-आम्हा सर्वांना मिळो आणि कोरोनाचे संकट लवकरच दूर होवो, ही  आशा व्यक्त करतानाच कोव्हिड -19 मुळे मृत्यूमुखी पडलेल्या रूग्णांना त्यांनी आदरांजली वाहिली. सायकलींगमध्ये गिनीज बुकमध्ये रेकॉर्ड करणाऱ्या अथर्व गोंधळी याचा यावेळी सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमास निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ गलांडे, अप्पर पोलीस अधीक्षक तिरूपती काकडे, जिल्हा पुरवठा अधिकारी दत्तात्रय कवितके, उपजिल्हाधिकारी स्मिता कुलकर्णी, संजय शिंदे, श्रावण क्षीरसागर, प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. स्टिव्हन अल्वारिस आदी उपस्थित होते.

अव्वल कारकूर नलिनी मोहिते यांनी सूत्रसंचालन केले.

जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी शासन, प्रशासन कटिबद्ध – पालकमंत्री डॉ. विश्वजीत कदम

भंडारा,दि. 15 :- कोरोना साथरोगाने संपूर्ण जगाला विळखा घातला असून गेले काही महिने या रोगाशी आपला लढा सुरु आहे. कोविड-19 ला हरविण्यासोबतच अर्थचक्र व विकासाची गाडी रुळावर आणण्याचं आव्हानसुद्धा मोठं आहे. भंडारा जिल्ह्यात प्रशासन या दिशेने उत्कृष्ट काम करत आहे. आरोग्य शिक्षण, शेती व रोजगार या विषयाला प्राधान्य देण्यासोबतच नागरिकांचे जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी शासन, प्रशासन कटिबद्ध असल्याची ग्वाही पालकमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी दिली.

स्वातंत्र्यदिनाचा मुख्य ध्वजारोहण समारंभ जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात  साजरा करण्यात आला. यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास  खासदार सुनिल मेंढे, जिल्हाधिकारी एम.जे. प्रदीपचंद्रन, मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस., जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, अप्पर जिल्हाधिकारी घनश्याम भूगावकर, परिविक्षाधिन जिल्हाधिकारी मिनल करनवाल, निवासी उपजिल्हाधिकारी शिवराज पडोळे, उपविभागीय अधिकारी संदीप भस्के प्रामुख्याने उपस्थित होते. प्रारंभी ध्वजारोहण होऊन पोलीसांनी पालकमंत्र्यांना मानवंदना दिली. तसेच जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात पालकमंत्र्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

आरोग्य, शिक्षण शेती व रोजगार हा आमच्या सरकारच्या प्राधान्याचा विषय आहे. भंडारा जिल्ह्याचा विचार करता राज्याच्या तुलनेत येथे कोरोनाचा प्रादुर्भाव कमी असला तरी अद्यापही संकट पूर्णपणे टळलेले नाही. भंडारा प्रशासनाने केलेल्या उपाययोजनामुळे जिल्हयात कोरोना प्रादुर्भाव रोखण्यात बऱ्यापैकी यश आले आहे. मात्र नागरिकांनी स्वयंशिस्त पाळत काळजी घेणे गरजेचे आहे, असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने अनेक उपाययोजना केल्या आहेत. जिल्हा स्तरावर जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथे 222 खाटांचे डेडिकेटेट कोविड हॉस्पिटल तयार करण्यात आले आहे. सदर हॉस्पिटलमध्ये 8 व्हँटिलेटर, सेंट्रल ऑक्सीजन आयसीयू बेडस्‌ व इतर आवश्यक सेवा उपलब्ध आहेत. आवश्यकतेनुसार ही संख्या अधिक वाढविता येईल. वेगळे डायलेसिस सेंटर, गायनॅकॉलॉजी ओटी, नवजात शिशूंकरिता आवश्यक उपकरणे व प्रयोगशाळा आदीची व्यवस्था या ठिकाणी आहे. संशयित किंवा पॉझिटिव्ह रुग्णांसाठी विशेष रुग्णवाहिका तयार ठेवण्यात आल्या आहेत. 3 कोविड सॅम्पल कलेक्शन ब्लॉक तयार करण्यात आले आहेत. जिल्हयातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय व नागरी आरोग्य केंद्रात फ्लू फिव्हर ओपीडी सुरु करण्यात आली आहे. नागरिकांनी घाबरुन जाण्याची गरज नसून काळजी मात्र घ्यावी. सुरक्षित अंतर ठेवूनच आपला वावर असावा,असे ते म्हणाले.

माझी कन्या भाग्यश्री योजनेत भंडारा जिल्हयात 1142 लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला आहे. या योजनेत भंडारा जिल्हा प्रथम क्रमांकावर आहे. पोषण अभियाना अंतर्गत जिल्ह्यात आधार सिडींगचे काम 95 टक्के झाले आहे. यामध्येही जिल्हा प्रथम क्रमांकावर आहे. तसेच अस्मिता योजनेचा लाभ देण्यात जिल्हा अव्वल आहे. महिला व बाल विकास विभागाच्या या यशाबद्दल पालकमंत्र्यांनी अभिनंदन केले.

शेती विकास व शेतकरी हा शासनाचा केंद्रबिंदू असून महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या माध्यमातून कर्जात असलेल्या जिल्ह्यातील 24 हजार 940 शेतकऱ्यांना 132.10 कोटी रुपये कर्जमाफीचा लाभ देण्यात आला आहे. कर्जमाफी पासून एकही पात्र लाभार्थी शेतकरी वंचित राहणार नाही, याची काळजी घेण्यात येणार आहे. खरीप हंगामासाठी जिल्हयातील 81 हजार 989 शेतकऱ्यांना 405 कोटी 71 लाख रुपयांचे पिक कर्ज वाटप करण्यात आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

चालू खरीप हंगाम 2019-20 मध्ये किमान आधारभूत धान खरेदी अंतर्गत जिल्ह्यात 32 लाख 10 हजार क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली आहे. धान खरेदीसाठी 1 लाख 3 हजार 87 शेतकऱ्यांना 583 कोटी 3 लाख 80 हजार रुपयांचे वाटप करण्यात आले तर 203 कोटी 87 हजाराचा बोनस वितरित करण्यात आला असे ते म्हणाले. .

भंडारा जिल्ह्यामध्ये मागील पाच वर्षात 7 हजार 191 कृषी पंपांना वीज जोडण्या देण्यात आल्या आहेत. प्रधानमंत्री हर घर बिजली सौभाग्य योजनेत जिल्ह्यातील 4 हजार 621 लाभार्थ्यांना नवीन वीज जोडणी देण्यात आली असून एकूण 147.30 लक्ष रुपयाचा निधी खर्च करण्यात आला असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.

यावेळी पोलीस विभागात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल पोलीस महासंचालक यांचेकडून विशेष सेवापदक व सन्मानचिन्ह मिळालेल्या पोलीस उपनिरिक्षक अमरदीप खाडे,  पोलीस हवालदार धमेंद्र बोरकर, प्रकाश शेंडे, दिलीप चुधरी यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते विशेष सेवापदक व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. कोरोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेवून राम घोटेकर या शिंप्याने नि:शुल्क मास्क पोलीस विभागाला वाटप केल्याबद्दल त्याचाही सत्कार करण्यात आला.

शिक्षण विभागातर्फे घेण्यात आलेल्या ऑनलाईन ‍निबंध, चित्रकला, भाषण, समुहगान स्पर्धेत कु. सायली शरणागते, आलोक काळे, दर्शना बावणकर, बुटी हायस्कुल खमारी यांचा तर दहावी व बारावीच्या परीक्षेत जिल्हयातून प्राविण्य प्राप्त विद्यार्थीनी आयुषी घावडे, किर्ती वाघाये, तोषिता गभणे, स्नेहा डोकरीमारे, पुजा अश्विन मेहता यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

सर्वांसाठी घरे कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी  गणेशपूर ग्रामपंचायत येथील अतिक्रमित लाभार्थी दुर्गा देशमुख, लक्ष्मीबाई सोनकुसरे, श्रीहरी काठाणे यांना पाल्कमंत्र्यांच्या हस्ते अभिनंदन पत्र देण्यात आले. कार्यक्रमाचे संचलन स्मिता गालफाडे व मुकूद ठवकर यांनी केले.  या कार्यक्रमास सर्व विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

मुंबईचे जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांच्या हस्ते ध्वजारोहण

मुंबई दि. १५ : ७४ व्या भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालय, ओल्ड कस्टम हाऊस येथे जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

या ध्वजारोहण कार्यक्रमास निवासी उपजिल्हाधिकारी माधव पाटील, उपजिल्हाधिकारी सूर्या कृष्णमूर्ती, सुषमा सातपुते, भागवत गावंडे, तहसीलदार श्यामसुंदर सुरवसे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी तसेच विविध विभागाचे अधिकारी,  कर्मचारी, महिला कर्मचारी उपस्थित होते. कोरोना (कोवीड-19) प्रार्दुभावानिमित्त भौतिक अंतर पाळून व मार्गदर्शक सूचनांचे पालन करून ध्वजारोहणाचा समारंभ संपन्न झाला.

ताज्या बातम्या

महाराष्ट्र रेल्वे फाटक मुक्त करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
महारेलद्वारे मुंबईतील पहिला केबल स्टेड रोड ओवर ब्रिज मुंबई, दि. १३ : संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात रेल्वे ब्रिजचे काम महारेलनी हाती घेतले आहे. आतापर्यंत...

महाराष्ट्राला नागरी क्षेत्रातील प्रकल्पांसाठी आवश्यक सहकार्य करणार – केंद्रीय मंत्री मनोहर लाल खट्टर

0
मुबंई, दि. १३: महाराष्ट्रात मेट्रोचे जाळे अधिक विस्तारीत करण्यासाठी तसेच नागरी क्षेत्रातील विविध प्रकल्पांच्या व्यापक अंमलबजावणीसाठी आवश्यक सर्व सहाकार्य केंद्रीय नगरविकास मंत्रालयाकडून  करण्यात येईल,असे...

चिंचघाट उपसा सिंचन योजनेला गती द्या – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

0
मुंबई, दि. १३: चिंचघाट उपसा सिंचन योजना नागपूर जिल्ह्यातील कुही तालुक्यात प्रस्तावित महत्त्वपूर्ण सिंचन प्रकल्प आहे. या योजनेचा उद्देश कृषी क्षेत्रात सिंचन सुविधा वाढवून शेतकऱ्यांना...

युवकांनी  ‘MY भारत’ पोर्टलवर सिव्हिल डिफेन्स वॉरिअर म्हणून नोंदणी करावी – मंत्री चंद्रकांत पाटील

0
मुंबई, दि. १३ : आपत्ती व्यवस्थापन, वैद्यकीय सेवा, पोलीस दल, अग्निशमन दल यासारख्या आपत्कालीन यंत्रणांमध्ये युवकांचा सक्रिय सहभाग असणे महत्त्वाचे आहे. तसेच आपत्कालीन परिस्थितीत रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्यास...

महाराष्ट्र सागरी मंडळाने महसूल वाढीसाठी नियोजनबद्ध कार्यक्रम आखावा – मंत्री नितेश राणे

0
मुंबई, दि. १३: महाराष्ट्र सागरी मंडळाने प्राप्त होणारा निधी शंभर टक्के खर्च करावा. तसेच मंडळाच्या महसूल वाढीसाठी नियोजनबद्ध कार्यक्रम राबवावा अशा सूचना मत्स्यव्यवसाय व बंदरे...