मंगळवार, मे 13, 2025
Home Blog Page 1578

सामान्य माणूस केंद्रस्थानी ठेवून विकासाचे चक्र सुरु – पालकमंत्री बाळासाहेब पाटील

रयतेच्या भल्यासाठी स्वराज्य स्थापन करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शाने महाराष्ट्र घडलेला आहे. सामान्य माणूस केंद्रस्थानी ठेवून या महाराष्ट्राची जडणघडण झाली. या राज्याचे पहिले मुख्यमंत्री, सातारा जिल्ह्याचे भूमिपुत्र यशवंतराव चव्हाण यांनी पुरोगामी महाराष्ट्राची ही घडी अधिक मजबूत केली. पुढे वसंतराव नाईक, वसंतदादा पाटील, शरद पवार यांच्या सारख्याच्या नेतृत्वात या राज्याने प्रगतीचे नवनवी यशोशिखरे निर्माण केली. तीच विकासाची परंपरा कायम ठेवून आमचे सरकार या राज्यात काम करत आहे. गेल्या ८ महिन्यात जिल्ह्याच्या विकासासाठी या सरकारनी जी कामे केली त्यातून सर्वसामान्यांमध्ये विश्वास निर्माण झाला. आता या जिल्ह्याचा विकास झपाट्याने होईल. आम्ही जे जे म्हणून शक्य आहे ते ते या जिल्ह्याच्या विकाससाठी करत आहोत. कोरोनाच्या या जागतिक संकटाच्या काळातही अधिकाधिक प्रयत्नांची पराकाष्ठा केली आणि अव्याहतपणे आम्ही संसर्ग रोखण्यासाठी काम करत आहोत. मागच्या आठ महिन्याच्या काळात जिल्ह्यासाठी ठळक गोष्टी केल्या त्याचा हा लेखाजोखा आपल्या समोर ठेवत आहे.

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना

राज्याचा सहकार मंत्री म्हणून काम करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०१९ ही योजना २७ डिसेंबर २०१९ रोजी जाहीर करण्यात आली. या योजनेंतर्गत १ एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०१९ रोजी पर्यंत ज्या शेतकऱ्यांचे २ लाखापर्यंत कर्ज थकीत आहे अशा शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. ही योजना पूर्णत: संगणकीय प्रणालीद्वारे राबविण्यात येत आहेत. या योजनेत ३१.६९ लाख पात्र खातेदार शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आली असून ३१ जुलै २०२० अखेर २८.८४ लाख खातेदारांना १८,५४२ कोटी एवढ्या रक्कमेचा लाभ देण्यात आलेला आहे. तसेच उर्वरित शेतकऱ्यांना लाभ देण्याचीही कार्यवाही सुरु आहे. पात्र लाभार्थींना या योजनेचा लाभ अद्याप झालेला नाही अशा खातेदारांच्या कर्जखात्यावर रक्कम शासनाकडून येणे दर्शवून पात्र लाभार्थ्यांना खरीप २०२० साठी कर्ज वितरणास पात्र समजण्यात यावे, असाही निर्णय घेण्यात आलेला आहे.

राज्यातील २ लाख सहकारी संस्थांपैकी प्रत्येक वर्षी सुमारे ४० हजार सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्यात येत असतात. कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका ६ महिन्यांसाठी पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत.

महात्मा जोतिराव फुले योजनेंतर्गत सातारा जिल्ह्यातील ५६ हजार २५६ शेतकऱ्यांच्या खात्यावर ३५३ कोटी ६३ लाख इतकी रक्कम खात्यावर जमा करण्यात आली आहे.

पीक कर्ज योजना

सन २०२०-२१ यावर्षातील खरीप हंगामासाठी राज्याचा  ४५,७८५ कोटी रुपये एवढा लक्षांक निश्चित करण्यात आला आहे. त्यापैकी ०१/०४/२०२० ते ३१/०७/२०२० या कालावधीत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका व व्यापारी बँकांनी सुमारे ३०.२२ लाख शेतकऱ्यांना रु. २२,७६२ कोटी एवढा पीक कर्जपुरवठा केला आहे. विशेषत: जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांनी त्यापैकी

२१.३५ लाख शेतकऱ्यांना सुमारे रु. ११,५७४ कोटी एवढा पीक कर्ज पुरवठा केला आहे. कर्ज वाटपाचे हे प्रमाण मागील वर्षाच्या तुलनेत ३८% टक्के जास्त आहे.

सातारा जिल्ह्याचा विचार केला असता खरीप हंगामासाठी १६०० कोटीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. या उद्दिष्टानुसार २ लाख ४८ हजार ३२८ शेतकऱ्यांना एकूण १५७० कोटी ५० लाख रुपये कर्ज वाटप करण्यात आले असून त्याची टक्केवारी ९८ इतकी आहे.

बांधावर खत व बियाणे वाटप

कोरोना विषाणू संक्रमण कालावधीत शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी लागणारे खते, बियाणे खरेदी करण्यास अडचणी निर्माण होऊ नयेत यासाठी कृषी विभागामार्फत बांधावर खते व बियाणे वाटप मोहिम राज्यात सुरु केली. ही मोहिम सातारा जिल्ह्यात राबविण्यात आली. मोहिमेंतर्गत सातारा जिल्ह्यात २१ हजार १८१ शेतकऱ्यांना १०३८ गटांमार्फत ६०१८.६२ मे. टन खते व ३१७८.८३ क्विंटल बियाणांचे वाटप करणयात आलेले आहे.

पीक विम्यात स्ट्रॉबेरीचा समावेश

प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत हवामान आधारित फळ पीक विमा योजनेमध्ये महाबळेश्वर तालुक्यातील स्ट्रॉबेरी पिकाचा समावेश नसल्याने तो करण्याविषयी शेतकऱ्यांची मागणी होती. यासाठी पाठपुरावा केल्याने महाबळेश्वर तालुक्यातील स्ट्रॉबेरी पिकाचा समावेश पीक विमा योजनेमध्ये या वर्षापासून करण्यात आला आहे.

महाबळेश्वर तालुक्यातील पाचगणी व महाबळेश्वर महसूल मंडळातील भात पिकाचा समावेश पीक विमा योजनेमध्ये होण्यासाठी शेतकऱ्यांची मागणी होती. याचाही पाठपुरावा केल्यान चालू खरीप हंगामापासून महाबळेश्वर व पाचगणी महसूल मंडळातील भात पिकाचा समावेश पीक विमा योजनेंतर्गत करण्यात आलेला आहे.

पंतप्रधान पीक विमा योजना आता ऐच्छिक स्वरुपाची करण्यात आली आहे. फळ पीक विमा योजनेमध्ये जिल्ह्यातील ४ हजार ९०२ शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला असून २ हजार ४२२ हेक्टर क्षेत्र संरक्षित केले आहे. तसेच पंतप्रधान पीक विमा योजनेत जिल्ह्यातील २६ हजार ४०६ शेतकऱ्यांनी सहभाग नोंदिवला असून १० हजार हेक्टर क्षेत्र संरक्षित करण्यात आले आहे. ही आकडेवारी अंतिम नूसन १८ ऑगस्ट शेवटची तारीख आहे. यात अजून शेतकऱ्यांची भर पडेल.

लॉकडाऊनच्या काळात परप्रांतीयांना सोडले घरी

महाराष्ट्र राज्य मार्ग परिहवन महामंडळाच्या सातारा विभागामार्फत ७ मे रोजी सातारा ते पाँडेचरी २३ प्रवासी, सातारा ते राजस्थान येथील राणिवाडा २३ प्रवासी, वडूज राणिवाडा २२ प्रवासी असे एकूण ६८ प्रवासी एसटी महामंडळाच्या बसेसने सोडण्यात आले. ९ मे रोजी सातारा-वडूज ते भंडारा २२, १० मे रोजी मेढा ते उत्तर प्रदेशात येथील वाराणसी येथे २३ असे एकूण ४५ प्रवासी सोडण्यात आले.

११ मे रोजी वडूज ते कर्नाटक राज्यातील हल्ल्याळ येथे २२, कराड ते तामिळनाडू येथील शेलम  ९ एसटी बसेस सोडण्यात आल्या आहेत. यातून २०१ प्रवासी सोडण्यात आले. सातारा ते मध्य प्रदेश येथील सुलतानपूर येथे २३ प्रवासी सोडण्यात आले. तसेच महामंडळाच्या सातारा विभागामार्फत हैद्राबाद व गुलबर्गा येथे लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या मजूरांना सोडण्यात आले.

केंद्र शासनाने कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी संपूर्ण देशात लॉक डाऊन केल्यानंतर महाराष्ट्रात काम करणारे परराज्यातील नागरिक हे आपापल्या गावी जात होते. अशा २७७ नागरिकांची राहण्याची, जेवणाची उत्तम सोय सातारा जिल्हा प्रशासनाने चांगल्या पद्धतीने केली होती.

कोविड १९ या महामारीच्या पार्श्वभूमीवर शासनाने घोषित केलेल्या लॉकडाऊनमुळे सुमारे १.४१ लाख ऊस तोडणी कामगार संबंधित साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात अडकले होते. या कामगारांना त्यांच्या मुळगावी पाठविणेबाबत सहकार विभागामार्फत निर्णय घेण्यात आला. या निर्णया नुसार राज्यातील ४४ साखर कारखान्यांनी १.४१ लाख ऊसतोडणी कामगारांना कारखान्याच्या खर्चाने विशेष वाहनाद्वारे पाठविण्यात आले आहे. तसेच कारखान्याचा गाळप हंगाम बंद झाल्या पासून या कामगारांना त्यांच्या मुळ गावी पाठविण्यापर्यंत त्यांच्या निवासाची व भोजनाची व्यवस्था संबंधित कारखान्याच्या खर्चाने करण्यात आली आहे. यासह अनेक महत्त्वाचे हिताचे निर्णय सहकार विभागाच्या माध्यमातून घेण्यात आलेले आहेत.

अन्नधान्याचा पुरवठा

लॉकडाऊनच्या काळात एप्रिल ते जुलै या कालावधीत प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत ५१५०.३७ मे. टन गहू व २९११०.४६ मे. टन तांदळाचे वाटप करण्यात आले. तसेच राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत याच कालावधीत ४०५३०२ शिधापत्रिकाधारकांना २१६४०.१९ मे. टन गहू व १३८०१.२ मे. टन तांदळाचे वाटप करण्यात आले.

पर राज्यात चालत चाललेल्या मजूरांची केली राहण्याची सेाय

यशोदा शिक्षण प्रसारक, मंडळ, सातारा येथे १६४, क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय शिरवळ येथील महाविद्यालयाच्या वसतिगृहात ५६ तर पाच पांडव आश्रमशाळा, अलगुडेवाडी ता. फलटण येथे ५७ असे एकूण २७७ नागरिकांची राहण्याची सोय जिल्हा प्रशासनाने केली होती. या सर्वांना सकाळी नाष्टा, दुपारी व रात्रीचे जेवण प्रशासनामार्फत देण्यात येत होते. काही स्वयंसेवी संस्थांनीही पुढकार घेतला होता. त्यांच्यावतीने या २७७ नागरिकांना जेवण देण्याचे काम केले.

साताऱ्यात कोरोना टेस्टिंग लॅब

साताऱ्यात मध्यवर्ती ठिकाणी कोरोना टेस्टिंग लॅब असावी अशी सर्वांची इच्छा होती. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात लॅबच्या उभारणीच्या प्रस्तावाला शासनाकडून मान्यता आणि निधीची पूर्तता झाल्यानंतर लॅब सुरु करण्यात आलेली आहे. या लॅबममधून रोज ३८० जणांचे नमुने तपासले जाणार असून यामध्ये आणखी वाढ करण्यासाठी प्रयत्न केले जातील. या लॅबमुळे कोरोना संसर्ग झालेल्या व्यक्तीचा अहवाल २४ तासाच्या आत मिळणार असून रुग्णावर वेळेत उपचार करण्यास मोठी मदत होणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय

स्वराज्याची राजधानी, छ. शाहूंची नगरी, राजघराण्याची गादी आणि सह्याद्रीच्या कुशीत जाज्वल्ल्य इतिहासाची साक्ष देत उभा असलेला अजिंक्यतारा. असे ऐतिहासिक वारसा लाभलेला सातारा. याच साताऱ्याला आता श्री. छत्रपती शिवाजी महाराजांचा संपुर्ण गौरवशाली इतिहास पुढच्या काही दिवसांमध्ये नवीन वस्तु संग्रहालयाच्या माध्यमातुन उलगडणार आहे.  छ. शिवाजी राजेंच्या यापुर्वी असलेल्या वस्तु संग्रहालयातुन आजतागायत इतिहास समजत होता. याठिकाणी ही अनेक शिवकालीन वस्तु, शस्त्रात्र, चित्रे यांचा संग्रह आहे. परंतु हा संग्रह मर्यादित जागेत सामावला आहे. तसेच त्यांची मांडणी व सजावट ही देखील जुन्या पद्धतीने केलेली आहे. त्यामुळे नवीन जागेत हे संग्रहालय स्थलांतरित करुन, रंगरुप देऊन पुढच्या अनेक पिढ्यांसाठी ह्या स्मृती जागृत ठेवणे गरजेचे आहे. तब्बल ३ हजार ५०० चौ. मी. क्षेत्रामध्ये १४ मोठ्या दालनांसह श्री. छत्रपती शिवाजी महाराजांचे हे नवीन वस्तू संग्रहालय अंतिम टप्प्यात आहे. गढीवजा रचनात्मक बांधकाम, वस्तू पाहण्यासाठी प्रशस्त जागा, अत्याधुनिक प्रकाश संयोजन, क्युरिओ शॉप, वाचनालय अशा काही विषेश वैशिष्ठ्यांसह इमारत लवकरच सज्ज होत आहे. आपण साताऱ्याचे आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यासह संग्रहालयाची पाहणी केली आहे. सन १९-२० च्या अर्थ संकल्पात १२ कोटी रुपये अर्थसंकल्पीय तरतूद केली आहे. कोरोना च्या काळात निधीची अडचण आली तरी आपण पाठपुरावा करुन सातारकरांचे भव्य स्वप्न पूर्णत्वास नेवू.

शिवभोजन थाळी

शिवभोजन थाळी योजना २६ जानेवारी पासून अंमलात आली. ही योजना एप्रिल २०२० पासून कार्यान्वित करण्यात आली आहे. मुख्यालयाच्या ठिकाणी ४ केंद्रे व तालुकास्तरावर २७ असे एकूण ३४ केंद्रावर ही योजना कार्यान्वित आहे. योजना सुरु झाल्यापासून म्हणजेच २६ जानेवारी पासून ते ३१ जुलै पर्यंत २१०० थाळी या प्रमाणे एकूण २ लाख ८१ हजार ३०० इतक्या शिवभोजन थाळ्या वितरित करण्यात आलेल्या आहेत.

मेडिकल कॉलेज

कृष्णा विकास महामंडळाची सातारास्थित ६१. ५ एकर ऐवढी जागा वैद्यकीय महाविद्यालयाला हस्तांतरित करण्यासाठी ही बाब प्रगतीपथावर आहे. अनेक वर्षापासूनचे मेडिकल कॉलेज स्वप्न सत्यात उतरणार आहे.

मागच्या आठ महिन्यात या काही ठळक कामांना गती देण्यात आली आहे. यापुढे यापेक्षा अधिक वेगाने या जिल्ह्याचा विकास करण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. आपल्या सर्वांच्या सहकार्याने सातारा जिल्ह्याचा मान आणि प्रगतीचे नवनवे मापदंड निर्माण करत राहू या.

बाळासाहेब पाटील

सहकार, पणन तथा पालकमंत्री, सातारा

पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील कोरोना परिस्थितीबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी साधला लोकप्रतिनिधींशी संवाद

पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात अँटीजेन चाचणी किटसाठी निधी उपलब्ध करुन देणार – उपमुख्यमंत्री अजित पवार

■  ५० हजार अँटीजेन किट घेण्याची कार्यवाही तात्काळ करा

■ अधिकाधिक रुग्णालयात ‘महात्मा फुले जनआरोग्य योजने’चा लाभ मिळवून देण्यासाठी कार्यवाही करा

■ ग्रामीण भागातील कोरोनाचा रुग्णदर व मृत्यूदर कमी करण्यासाठी प्रयत्न करा

■ अधिक रुग्णसंख्या असणाऱ्या भागावर लक्ष केंद्रित करा

■ अवाजवी शुल्क आकारणी करणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करा

■ गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्यासाठी लोकप्रतिनिधींनी जनजागृती करावी

पुणे, दि.१४ : पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागासाठी अँटिजेन किट घेण्याची कार्यवाही तातडीने करण्याचे निर्देश देत ५० हजार अँटिजेन किट घेण्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून आवश्यक तो निधी उपलब्ध करुन देण्यात येईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी दिली. तसेच ‘कोरोना’ रुग्णांना महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी जिल्ह्यातील अधिकाधिक रुग्णालयांचा या योजनेत समावेश करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

‘कोविड-१९’ विषाणू प्रादुर्भावाच्या परिस्थितीबाबत जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींसमवेत आज उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात बैठक पार पडली. यावेळी राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे-पाटील, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांची प्रमुख उपस्थिती होती. खासदार सुप्रिया सुळे, विधान परिषदेच्या माजी उपसभापती आमदार डॉ. निलम गोऱ्हे व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे बैठकीत सहभागी झाल्या. यावेळी खासदार डॉ.अमोल कोल्हे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, आमदार सर्वश्री दिलीप मोहिते, अशोक पवार, संजय जगताप, राहूल कूल, अतुल बेनके, सुनिल टिंगरे, सुनिल शेळके, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजित शिवतारे, विभागीय आयुक्त सौरभ राव, प्रभारी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

ग्रामीण भागातील कोरोना रुग्णदर व मृत्यूदर तसेच प्रशासनाच्या उपाययोजनांचा आढावा घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, कोरोना रुग्णांना महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ मिळवून देण्याच्या दृष्टीने अधिकाधिक रुग्णालयांचा या योजनेत समावेश होण्यासाठी कार्यवाही करावी. हवेली, खेड, मावळ, शिरुर, पुरंदर अशा रुग्णसंख्या अधिक असणाऱ्या भागाबरोबरच ग्रामीण भागातील कोरोना नियंत्रणासाठी प्रशासकीय अधिकारी व आरोग्य विभागाने विशेष लक्ष द्यावे. ग्रामीण भागातील कोरोनाचा रुग्णदर व मृत्यूदर कमी करण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करावेत, असे सांगून ‘जम्बो’ रुग्णालयाचे काम लवकरच पूर्ण होणार असून यामुळे रुग्णांना वेळेत उपचार मिळवून देण्यासाठी मदत होईल. नागरिकांनी देखील कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी दक्षता घ्यायला हवी, असे त्यांनी सांगितले.

कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी यावर्षी आषाढी वारी, बकरी ईद, दहिहंडी असे सर्व सण-समारंभ मर्यादित उपस्थितीत साजरे करण्यात आले असल्याचे सांगून उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी यावर्षीचा गणेशोत्सव देखील साधेपणाने साजरा करण्याबरोबरच गणेश विसर्जन घरगुती स्वरुपात करायला हवे. लोकप्रतिनिधींनी सार्वजनिक गणेश मंडळांना विश्वासात घेवून याबाबत जनजागृती करावी. उद्योजकांनी कारखाने सुरु ठेवताना कोरोना विषयी घ्यावयाच्या दक्षतेबाबत तसेच कामगारांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी विभागीय आयुक्तांनी उद्योजकांच्या सोबत बैठक घेवून आवश्यक त्या सूचना कराव्यात. जिल्ह्यात पूर परिस्थिती व ‘निसर्ग’ चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसान भरपाईसाठी जलदगतीने निधी उपलब्ध करुन देण्यात येईल, असे सांगून पुणे-नाशिक रेल्वे बाबतचा विषयही लवकरच मार्गी लागणार असल्याचे त्यांनी सांगितले. लोकप्रतिनिधींनी तालुक्यातील बांधकाम मजुरांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी त्यांची नोंदणी करुन घेण्यासाठी प्रयत्न करावा, असे सांगून जिल्ह्यातील विविध विषयांबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चर्चा केली.

राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे-पाटील म्हणाले, शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातील रुग्णांना आरोग्य सुविधा वेळेत उपलब्ध करुन देण्यासाठी प्रशासनाने नियोजन करावे. प्रत्येक तालुक्यात कोविड केअर केंद्रात खाटांची संख्या वाढविण्यावर भर द्यावा. तसेच ग्रामीण भागातील गंभीर रुग्णांसाठी पुण्यातील रुग्णालयात राखीव खाटा उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न करावेत.

सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, ग्रामीण भागात गंभीर रुग्णांवर वेळेत उपचार होण्यासाठी रुग्णवाहिका, व्हेंटीलेटर, ऑक्सीजनयुक्त खाटा आदी सोयी सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात.

राज्य शासन व प्रशासन कोरोना विषाणू नियंत्रणासाठी  चांगले काम करत असल्याच सांगून विधान परिषदेच्या माजी उपसभापती आमदार निलम गोऱ्हे म्हणाल्या, खाजगी रुग्णालयांमध्ये कोविड रुग्णांबरोबरच अन्य आजाराच्या रुग्णांनाही बेड उपलब्ध होणे गरजेचे आहे.

यावेळी खासदार सुप्रिया सुळे व खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी प्रशासन उत्तमरित्या काम करत असल्याचे सांगून आवश्यक त्या उपाययोजना राबविण्याच्या सूचना केल्या. आमदार सर्वश्री दिलीप मोहिते, अशोक पवार, संजय जगताप, राहूल कूल, अतुल बेणके, सुनिल टिंगरे, सुनिल शेळके, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, उपाध्यक्ष रणजित शिवतरे यांनी कोरोना नियंत्रणासाठी आवश्यक त्या सूचना केल्या. उद्योग व्यवसाय सुरु ठेवतांना उद्योजकांनी कामगारांच्या आरोग्याची  काळजी घ्यावी, सीएसआर निधीतून मदत उपलब्ध करुन द्यावी. अवाजवी शुल्क आकारणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करावी. अधिक रुग्णसंख्या असणाऱ्या भागांत कोविड रुग्णालय सुरु करावे, तपासणी संख्या वाढवावी, अँटीजेन तपासणी करण्यात यावी. प्लाझ्मा थेरपीचा वापर वाढविण्यात यावा, अशा सूचना यावेळी केल्या.

विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागात प्रशासनाच्या वतीने करण्यात येत असलेल्या उपायोजनांची माहिती दिली. तसेच प्लाझ्मा उपचार पद्धतीचा वापर वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रभारी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी ग्रामीण भागातील रुग्ण दर व मृत्यू दर, प्रतिबंधित क्षेत्रे, अधिक रुग्णदर असणाऱ्या भागात करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.  कोविड रुग्णालये, व्हेंटिलेटर, उपलब्ध खाटा व अन्य आवश्यक आरोग्य सेवा सुविधा व जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.जयश्री कटारे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अशोक नांदापूरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

००००००

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा, शहिदांना अभिवादन

मुंबई, दि. १४ : भारतीय स्वातंत्र्याच्या ७३व्या वर्धापनदिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जनतेला स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या असून स्वातंत्र्यलढ्यात हौतात्म्य पत्करलेल्या शहीद वीरांना अभिवादन केलं आहे. असंख्य ज्ञात-अज्ञात स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागातून मिळालेलं स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी सर्वांनी प्रतिज्ञाबद्ध होऊया, कोरोनाचं संकट आजवरचं सर्वात मोठं संकट असून पुढचे काही महिने प्रतिबंधक नियमांचे पालन करुन आपण सर्वांनी कोरोनामुक्तीचा लढा एकजुटीनं लढूया, कोरोनाला हरवूया, असं आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी केलं आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार स्वातंत्र्यदिनानिमित्तच्या शुभेच्छा संदेशात म्हणतात की, स्वातंत्र्यदिन हा आपल्यासाठी सर्वात मोठा राष्ट्रीय सण असूनही कोरोनामुळे तो मर्यादित उपस्थितीत, साधेपणानं साजरा करावा लागत आहे याची खंत सर्वांच्या मनात आहे. असं असलं तरी सामाजिक जाणीव, राष्ट्रीय कर्तव्यं व जबाबदारीच्या भावनेतून आपल्याला हे करायचे आहे. कोरोनाचा प्रसार रोखणं, देशवासियांचे प्राण वाचवणं, याला सर्वोच्च प्राधान्य असल्याने सर्व देशवासियांनी स्वत:चा, कुटुंबाचा, इतरांचाही कोरोनापासून बचाव करुन कोरोनामुक्तीच्या लढ्यात योगदान द्यावं. ही आजच्या घडीची सर्वात मोठी देशसेवा आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्र्यांनी देशवासियांना कोरोनामुक्तीच्या लढ्यास सहकार्य करण्याचं आवाहन केलं आहे.

देशाचं स्वातंत्र्य, एकता, अखंडता, सार्वभौमता, लोकशाही मुल्ये अबाधित राखणं ही आपली जबाबदारी आहे. ती पार पाडण्यासाठी आजवर अनेक सुपुत्रांनी सर्वोच्च त्याग केला. अमूल्य योगदान दिलं. त्या सर्वांबद्दल उपमुख्यमंत्र्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. कोरोनाविरुद्धच्या लढ्यात आघाडीवर राहून पहिल्या फळीत लढत असलेले डॉक्टर, नर्सेस, पॅरामेडिकल स्टाफ, सफाई कर्मचारी, पोलिस, अंगणावाडी ताई, आशाताई, शासकीय, निमशासकीय, स्थानिक स्वराज संस्थांचे अधिकारी-कर्मचारी, स्वयंसेवी संस्थांचे कार्यकर्ते या सर्वांचं, राज्यभरातील लोकप्रतिनिधींचेही उपमुख्यमंत्र्यांनी आभार मानले आहेत. राज्यातील जनतेनेही कोरोनाविरुद्धच्या लढ्यात नियम व संयम पाळून मोठा त्याग केला आहे. सक्रीय योगदान दिलं आहे. आपलं योगदान महाराष्ट्र विसरणार नाही, अशा शब्दात उपमुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेलाही धन्यवाद दिले आहेत.

देशाचं स्वातंत्र्य, सार्वभौमत्वं, लोकशाही मुल्यांच्या रक्षणासाठी आपण सर्वांनी एकजूट होऊन देशाला समृद्ध, बलशाली देश बनवण्याचा निर्धार करुया, असं आवाहनही उपमुख्यमंत्र्यांनी स्वातंत्र्यदिनाच्या संदेशात केलं आहे.

०००००००

जी.डी.सी. अँड ए व सी.एच.एम. परीक्षा अनिश्चित काळासाठी स्थगित

मुंबई, दि. १४ : सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था यांच्या मार्फत घेण्यात येणारी शासकीय सहकार व लेखा पदविका (जी.डी.सी. अँड ए.) परीक्षा व सहकारी गृहनिर्माण व्यवस्थापन प्रमाणपत्र (सी.एच.एम.) परीक्षा कोविड 19 मुळे अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली आहे. सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी याबाबत परिपत्रक जारी केले आहे.

0 0 0 0 0

निवृत्तीवेतनधारकांनी आयकर गणनेसाठी उचित पर्यायाची माहिती कळविण्याचे आवाहन

मुंबई, दि. १४ : निवृत्तीवेतनधारकांनी आर्थिक वर्ष २०२०-२१ च्या आयकर गणनेसाठी आयकर वसुलीच्या जुनी कर पद्धती (Old Tax Regime) आणि नवी कर पद्धती (New Tax Regime)
दोन प्रकारांपैकी उचित पर्याय निवडून त्याची माहिती ३० सप्टेंबरपूर्वी ईमेलद्वारे अधिदान व लेखा कार्यालयाला कळविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

केंद्र सरकारच्या आर्थिक वर्ष २०२०-२१ च्या अर्थसंल्पात आयकर कायद्यामध्ये बदल करण्यात आला आहे. त्यानुसार आयकर वसुलीचे नवीन सेक्शन ११५ बीएसी नुसार आर्थिक वर्ष २०२०-२१ च्या आयकर गणनेसाठी जुनी कर पद्धती (Old Tax Regime) आणि नवी कर पद्धती (New Tax Regime) असे दोन प्रकार ठरविण्यात आले आहेत. यापैकी योग्य असणारा पर्याय निवडावा. त्यासाठी आवश्यकता भासल्यास नजीकच्या सनदी लेखापालांची मदत घेण्याचेही सूचित करण्यात आले आहे.

निवड केलेला पर्याय अधिदान व लेखा कार्यालय, मुंबई यांना apaopensdat.mum-mh@gov.in या ई-मेलवर आपल्या नाव, पीपीओ क्रमांक, बँक व खाते या माहितीसहित ३० सप्टेंबर २०२० पूर्वी कळविणे आवश्यक आहे. या पर्यायानुसार देय होणारी टीडीएस वजाती करण्यात येणार आहे. टॅक्स पद्धतीची निवड वेळेत न कळविणाऱ्या निवृत्तीवेतनधारकांची टीडीएस वजाती पूर्वीप्रमाणेच म्हणजे जुन्या कर पद्धतीनुसार केली जाणार आहे, असे अधिदान व लेखा अधिकारी वैभव राजेघाटगे यांनी कळविले आहे.
00000

राज्यातील पहिल्या टेलिआयसीयू प्रकल्पाचा भिवंडीत शुभारंभ

मृत्यूदर नियंत्रणासाठी टेलिआयसीयू सुविधा फायदेशीर ठरेल; अकोला, जळगाव, सोलापूर, जालना औरंगाबाद येथेही लवकरच होणार कार्यान्वित -आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

मुंबई, दि. १४ : भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला भिवंडी येथील उपजिल्हा रुग्णालयात राज्यातील पहिल्या टेलीआयसीयु प्रकल्पाचा ऑनलाईन शुभारंभ आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते करण्यात आला. अतिदक्षता विभागात (आयसीयु) दाखल असलेल्या कोरोनाच्या गंभीर रुग्णांसाठी विशेषज्ञांचे मार्गदर्शन आणि उपचाराची सेवा या तंत्रज्ञानाच्या मदतीने घेण्यात येणार आहे. राज्यात अकोला, जळगाव, सोलापूर, जालना आणि औरंगाबाद येथील वैद्यकीय महाविद्यालय आणि जिल्हा रुग्णालयांमध्ये ही सुविधा लवकरच कार्यान्वित होणार आहे. कोरोनामुळे होणारा मृत्यूदर नियंत्रणासाठी टेलीआयसीयु सुविधा फायदेशीर ठरेल, असा विश्वास आरोग्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.

मेडीस्केप इंडिया फाऊंडेशनच्या माध्यमातून सामाजिक उत्तर दायित्व निधीच्या (सीएसआर) माध्यमातून प्रायोगिक तत्वावर ही सुविधा काही महिने देण्यात येणार आहे. भिवंडी येथील आयजीएम उपजिल्हा रुग्णालयातील आयसीयुमध्ये या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत असून दिल्ली येथील विशेषज्ञांकडून गंभीर रुग्णांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवले जाते आणि त्यांना कुठले उपचार द्यायचे याचे मार्गदर्शन केले जाते.

दिवसातून पाच वेळा या विशेषज्ञांकडून रुग्णांची विचारपूस केली जाते. राज्यात अन्य ठिकाणी करण्यात येणारी ही सुविधा वैद्यकीय महाविद्यालय आणि जिल्हा रुग्णालयात आहे मात्र भिवंडी त्याला अपवाद ठरले असून ही सुविधा असणारे ते राज्यातील पहिले उपजिल्हा रुग्णालय ठरले आहे. येथील टेलीआयसीयु कक्ष आरोग्यमंत्री यांच्या दिवंगत मातोश्री शारदाताई यांना समर्पित करण्यात आल्याचे मेडीस्केप फाऊंडेशनतर्फे सांगण्यात आले.

यावेळी आरोग्यमंत्री म्हणाले, आरोग्य सुविधेसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर ही काळाची गरज आहे. राज्यातील कोरोना रुग्णांचा मृत्यूदर ही चिंतेची बाब असून मृत्यूदर एक टक्क्यांपेक्षाही कमी करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यात विशेषज्ञांची जाणवणारी कमतरता टेलीआयसीयु तंत्रज्ञानामुळे काहीशी भरून निघणार असून कोरोनाच्या गंभीर रुग्णांवर विशेषज्ञांच्या मार्गदर्शनातून उपचार झाले तर मृत्यूदर कमी होण्यासाठी त्याचा लाभ होईल. जालना, सोलापूर, औरंगाबाद येथील रुग्णालयात ही सुविधा पुढील आठवड्यात कार्यान्वित होऊ शकते, असेही आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

यावेळी मेडीस्केप इंडिया फाऊंडेशनच्या डॉ.सुनिता दुबे, डॉ. संदीप दिवाण यांनी या तंत्रज्ञानाबाबत माहिती दिली. भिवंडी उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ.अनिल थोरात यांनी प्रास्ताविक केले. यावेळी आरोग्यमंत्र्यांनी आयसीयुमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांशी संवाद साधत त्यांची विचारपूस केली. बरे वाटते का.. दादा कसे आहात काळजी घ्या.. असे सांगताना त्यांनी आयसीयुमधील डॉक्टरांशी संवाद साधला.

0000

अजय जाधव..१४.८.२०२०

‘स्टॅण्ड अप अगेन्स्ट व्हायलेंस’ ॲपचे अनावरण

सुरक्षिततेचे साधन आता महिलांच्या हाती; अत्याचारांच्या घटना रोखण्यासाठी होईल मदत – ॲड.यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केला विश्वास

मुंबई, दि. १४ : बदलत्या परिस्थितीत महिलांपर्यंत पोहोचण्यासाठी तंत्रज्ञानाचा अधिकाअधिक वापर झाला पाहिजे. स्मार्ट फोनचा वापर मोठ्या प्रमाणावर महिला करत आहेत तेव्हा ‘स्टॅण्ड अप अगेन्स्ट व्हायलेंस’ हे वेब ॲप म्हणजे महिलांची सुरक्षा त्यांच्या हातात उपलब्ध करुन देण्याचा स्तुत्य उपक्रम असून अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी आणि मदत मिळवून देण्यासाठी हे ॲप उपयुक्त ठरेल, असा विश्वास महिला व बालविकास मंत्री ॲड.यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केला.

महिला व बाल विकास आयुक्तालय, अक्षरा संस्था आणि टाटा सामाजिक संस्था संचलित महिला विशेष कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने तयार करण्यात आलेल्या ‘स्टॅण्ड अप अगेन्स्ट व्हायलेंस’ या वेबॲपचे अनावरण ॲड.ठाकूर यांनी व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे केले. यावेळी महिला व बाल विकास विभागाच्या सचिव आय. ए. कुंदन, महिला व बाल विकास उपायुक्त दिलीप हिवराळे, ‘अक्षरा’ संस्थेच्या सहसंचालिका नंदिता गांधी, नंदिता शाह, टाटा सामाजिक संस्था महिला विशेष कक्षाच्या तृप्ती झवेरी- पांचाळ, राज्यातील संरक्षण अधिकारी, महिला विशेष कक्षांचे अधिकारी, समुपदेशक उपस्थित होते.

यावेळी मंत्री ॲड.ठाकूर म्हणाल्या, लॉकडाऊनमधे जनजीवन ठप्प असताना संपूर्ण जगात महिलांवरचे अत्याचार, हिंसाचाराच्या घटना वाढल्या ही वस्तुस्थिती आहे. आपल्या राज्यात महिलांना सुरक्षा मिळवून देणे, त्यांच्यापर्यंत पोहोचणे ही आपली प्राथमिकता होती. शासनाची यंत्रणा, हेल्पलाईल क्रमांक महिलांना मदत करत आहेतच, यासोबत ॲप सारख्या माध्यमातून महिलेच्या घरात, हातात जर सुरक्षेचे साधन देता आले तर नक्कीच अनेक घटनांना आळा बसेल असा विचार समोर आला. यादृष्टीने या ॲपचा चांगला उपयोग होऊ शकेल. आपल्या राज्यातला असा पहिलाच प्रयत्न असल्याचे सांगत ‘अक्षरा’ संस्थेचे तसेच महिला व बाल विकास विभागाच्या उपक्रमांना सहकार्य करणाऱ्या टाटा सामाजिक संस्थेचे त्यांनी आभार मानले. महिलांनी व्यक्त व्हावे, अन्यायाला वाचा फोडावी असे आवाहन करत एकत्रित प्रयत्नांनी हिंसाचाराच्या घटना रोखता येतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

‘स्टॅण्ड अप अगेन्स्ट व्हायलेंस’ हे वेबॲप असून https://standupagainstviolence.org/maharashtraApp/index.html या वेबपत्त्यावर क्लिक करून मोबाईलच्या होमस्क्रीनला जतन करता येईल. या ॲपमधे जिल्हावार माहिती संकलित करण्यात आली असून वापरकर्त्या महिलेने आपला जिल्हा निवडल्यानंतर त्यांना तात्काळ मदत करु शकणारे समाजसेवक, संरक्षण अधिकारी, समुपदेशक, वन स्टॉप सेंटर, निवारागृह, महिला विशेष कक्ष यांचे संपर्क क्रमांक मिळणार असून ॲपद्वारेच त्यांना दूरध्वनी करता येईल. यात मदत मिळाली नाही, संपर्क होऊ शकला नाही तर तसा अभिप्रायही नोंदवता येईल. अभिप्राय नोंद केल्यास त्याची तातडीने दखल घेतली जाईल. सध्या इंग्रजीमधे असलेले ॲप लवकरच मराठी भाषेतही उपलब्ध असेल.

महिला व बाल विकास सचिव आय. ए. कुंदन यांनी कौटुंबिक हिंसाचाराच्या प्रश्नावर काम करत असताना या वेबॲपची मोठ्या प्रमाणावर मदत होईल असे सांगत याबाबत जनजागृती करावी असे आवाहन केले.

यावेळी उपायुक्त श्री.हिवराळे यांनी, संकटग्रस्त महिलांना मदत नक्की कशी मिळेल, कोण करेल याची बरेचदा माहिती नसते, आणि या माहितीच्या अभावामुळेही त्या होणाऱ्या त्रासाविरोधात दाद मागत नाहीत. तेव्हा आपण महिलांपर्यंत पोहोचावे या हेतूने ॲपची निर्मिती करण्यात आल्याचे सांगितले. संरक्षण अधिकाऱ्यांनी अधिकाधिक महिलांपर्यंत याबाबत माहिती पोहोचवावी असे आवाहन त्यांनी केले.

‘अक्षरा’च्या सहसंचालिका नंदिता गांधी यांनी महिलांना नव्या संकटांचा सामना करावा लागत असल्याने त्याच्या निवारणासाठी आपल्यालाही आपल्या उपाययोजनांमध्ये बदल करणे क्रमप्राप्त असल्याचे सांगितले. तंत्रज्ञानाच्या सहाय्याने महिलांसोबत जायला हवे असे सांगत ॲप निर्मिती मागची पार्श्वभूमी सांगितली. श्रीमती तृप्ती झवेरी यांनी लॉकडाऊन काळात संस्थेकडून करण्यात आलेल्या मदतकार्याचा गोषवारा सादर केला.  महिलांसाठीच्या विशेष कक्ष हेल्पलाईनला गेल्या पाच महिन्यात तब्बल वीस हजार फोन आल्याचे त्यांनी सांगितले. अत्याचार, हिंसाचारासह इतर अडचणी, समुपदेशन यासाठी हे दूरध्वनी असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन श्रीमती नंदिता शाह यांनी केले.

०००

‘आम्हाला तुमचा अभिमान!’

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांचे अभिनंदन

राष्ट्रपती पदक, शौर्य, प्रशंसनीय सेवा पदक जाहीर

मुंबई, दि. १४ : ‘महाराष्ट्र पोलीस आम्हाला तुमचा अभिमान आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील राष्ट्रपती पोलीस पदक, शौर्य पोलीस पदक आणि पोलीस पदक जाहीर झालेल्या पोलीस अधिकारी, कर्मचारी यांचे अभिनंदन केले आहे.

केंद्रीय गृहमंत्रालयाकडून महाराष्ट्रातील ५८ पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती पोलीस पदक, शौर्य पोलीस पदक आणि पोलीस पदक जाहीर करण्यात आली आहेत. यात उत्कृष्ट सेवेकरिता ५ ‘राष्ट्रपती पोलीस पदक’, १४ पोलीस शौर्य पदक आणि प्रशंसनीय सेवेकरिता ३९ ‘पोलीस पदक’ जाहीर झाली आहेत.

या सर्वांचे अभिनंदन करताना मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांनी महाराष्ट्र पोलीस आम्हाला तुमचा अभिमान आहे, असे नमूद केले आहे. या सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी महाराष्ट्र पोलिसांचे “सद्रक्षणाय खलनिग्रहणाय” ब्रीद उंचावणारी कामगिरी केली आहे. या कामगिरीसाठी सर्वांना सलाम, आणि जाहीर पुरस्कारासाठी या अधिकारी, कर्मचाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा, असेही त्यांनी म्हटले आहे.

000

राष्ट्रध्वजाच्या योग्य वापरासाठी मार्गदर्शक सूचना

मुंबई, दि. 14 : महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागामार्फत 1 जानेवारी 2015 रोजीच्या आदेशानुसार प्लास्टिक आणि कागदी राष्ट्रध्वजांचा वापर थांबविण्यासाठी जनजागृती करण्याकरिता जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा व तालुका पातळीवर समित्या स्थापन कराव्यात असे सुचित करण्यात आले आहे. त्यानुसार मुंबई उपनगर जिल्ह्यासाठी जिल्हा स्तरावर अंधेरी, बोरीवली तसेच कंर्ला (मुलुंड) या तीन तालुक्यांसाठी समित्या गठीत करण्यात आल्या आहेत.

15 ऑगस्ट, 26 जानेवारी, 1 मे व इतर राष्ट्रीय कार्यक्रम, महत्त्वाचे सांस्कृतिक कार्यक्रम व क्रीडा सामन्यांच्यावेळी कार्यक्रम पार पडल्यानंतर खराब झालेले, माती लागलेले मैदानात/रस्त्यावर तसेच कार्यक्रमाच्या ठिकाणी पडलेले राष्ट्रध्वज गोळा करून ते तालुका स्तरावर तहसिल कार्यालयात आणि जिल्हा स्तरावर निर्माण करण्यात आलेल्या यंत्रणेस सुपुर्द करण्याचे अधिकार अशासकीय  संस्था तसेच इतर संघटनाना सुपुर्द करण्यात यावेत, असे आवाहन मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.

0 0 0 0 0

रानभाज्यांच्या संवर्धनासाठी हक्काची बाजारपेठ उपलब्ध करुन देणार – पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

रानभाज्या महोत्सव व प्रदर्शनाचा पालकमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

अमरावती, दि.14  : रानभाज्या हा निसर्गाने दिलेला अनमोल ठेवा आहे. त्याची जपणूक व संवर्धन करणे ही काळाची गरज आहे, मेळघाटातील आदिवासी बांधवांच्या या पारंपरिक रानवैभवाला नाविण्यपूर्ण योजनेतून येत्या काळात हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी नियोजन करण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज केले.

कृषी विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) व श्री शिवाजी उद्यान महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयात आयोजित रानभाज्या महोत्सवाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन झाले. त्यावेळी त्या बोलत होत्या. जिल्हाधिकारी शैलेश नवाल, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे, कृषी सहसंचालक सुभाष नागरे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी विजय चवाळे, श्री शिवाजी उद्यान महाविद्यालयाचे प्राचार्य शशांक देशमुख, जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती जयंत देशमुख आदी यावेळी उपस्थित होते.

प्रारंभी पालकमंत्र्यांनी रानभाज्या महोत्सव तथा प्रदर्शनातील रानभाज्यांच्या सर्व स्टॉल्सला भेट देऊन पाहणी केली व त्यांची माहिती जाणून घेतली. या उपक्रमाच्या माध्यमातून रानभाज्यांचे औषधी गुणधर्माविषयी माहिती नागरिकांपर्यंत पोहोचण्यास मदत मिळेल, असे पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, आदिवासी शेतकरी बांधवांना रोजगार उपलब्ध होण्याच्या उद्देशाने कृषी विभागामार्फत महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात व प्रमुख शहरांमध्ये रानभाज्या महोत्सव साजरा होत आहे. त्यामुळे आपल्या दैनंदिन जीवनात रानभाज्यांचे असलेले महत्त्व अधोरेखित होणार आहे. रानभाज्या ही निसर्गाची देणगी असून कोणतेही रासायनिक खत किंवा मशागतीशिवाय त्या उगवतात. आज कोरोना साथरोगाच्या पार्श्वभूमीवर आपल्याला या रोगाशी सामना करण्यासाठी शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढविणे व टिकविणे खूप गरजेचे आहे. या रानभाज्या प्रथिने, पोषणद्रव्य, व जीवनसत्वयुक्त असून रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी याचा निश्चितच उपयोग होऊ शकतो. त्यामुळे रानभाज्यांना एक व्यावसायिक बाजारपेठ मिळवून देण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचेही श्रीमती ठाकूर यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी शैलेश नवाल म्हणाले, शेतकरी व समाज यांना जोडण्याची  चांगली संधी कृषी विभागाने या महोत्सवाचे आयोजन करून  दिली आहे. आदिवासी बांधवांच्या रानभाज्या जनतेपर्यंत पोहविण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे.

मेळघाटात व परिसरात उगवणाऱ्या रानभाज्या विशिष्ट ऋतूमध्ये उगवणाऱ्या भाज्या आहेत. नैसर्गिकरित्या उगवणाऱ्या भाज्यांचा भोजनात उपयोग हा मनुष्याच्या शरीरासाठी गुणकारी आहे. शेवगा, कढीपत्ता यासारख्या रानभाज्या ह्या औषधीयुक्त असून त्याचा जेवणात उपयोग झाला पाहिजे. कृषी विभागाव्दारे आयोजित रानभाज्या महोत्सव हा चांगला उपक्रम असल्याचे मत मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांनी यावेळी व्यक्त केले.

या महोत्सवाच्या माध्यमातून शहरी भागातील लोकांना रानभाज्याविषयी माहिती मिळेल व त्यांचा दैनंदिन भोजनात उपयोग होईल. पावसाळी आजारापासून बचाव होण्यासाठी रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासाठी रानभाज्या महत्त्वपूर्ण आहेत, असे कृषी सहसंचालक सुभाष नागरे यांनी यावेळी सांगितले.

यावेळी कार्यक्रमात ‘ओळख  रानभाज्यांची’ या माहिती पुस्तिकेचे मान्यवरांच्या हस्ते विमोचन करण्यात आले. उद्यान महाविद्यालयाचे प्राचार्य यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमात विविध गावांतून आलेल्या शेतकऱ्यांनी  जवळपास 70 रानभाज्यांचे स्टॉल्स उभारले होते.

ताज्या बातम्या

राष्ट्रीय लोक न्यायालयात ७०४ कोटींची प्रकरणे निकाली

0
मुंबई, दि. १३ : नगर दिवाणी व सत्र न्यायालय, मुख्य न्याय दंडाधिकारी न्यायालय मुंबई, सहकारी अपिलीय न्यायालय, डीआरटी कुलाबा व मोटार अपघात दावा प्राधिकरण,...

घनसावंगी मतदारसंघातील पाणी पुरवठा योजनांना गती द्या – मंत्री गुलाबराव पाटील

0
मुंबई, दि. १३ : जालना जिल्ह्यातील घनसावंगी विधानसभा मतदारसंघातील विविध पाणी पुरवठा योजनांची कामे नियोजनपूर्वक व कालमर्यादेत पूर्ण करण्याचे निर्देश पाणी पुरवठा व स्वच्छता...

शिरोळ मतदारसंघातील पाणी पुरवठा योजनांना गती द्या – मंत्री गुलाबराव पाटील

0
मुंबई, दि. १३: कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ विधानसभा मतदारसंघातील विविध पाणीपुरवठा योजनांची कामे नियोजनपूर्वक व कालमर्यादेत पूर्ण करण्याचे निर्देश पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव...

यशस्वी विद्यार्थ्यांनी भविष्यातही यशाची शिखरे पादाक्रांत करावीत – मंत्री दादाजी भुसे

0
मुंबई दि. १३ : दहावीची परीक्षा हा विद्यार्थ्यांची शैक्षणिक दिशा ठरविणारा महत्त्वाचा टप्पा असतो. या टप्प्यावर यश मिळविलेले विद्यार्थी कौतुकास पात्र आहेत, अशा शब्दात...

दहावी परीक्षेच्या निकालात मुलींची वाढती टक्केवारी समाधानकारक – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

0
मुंबई, दि. १३: दहावीच्या परीक्षेत मुलींच्या यशाची वाढती टक्केवारी ही समाजातील सकारात्मक बदलाचे प्रतीक आहे. शिक्षणाच्या माध्यमातून मुली आत्मनिर्भर बनत असून, हे यश त्यांच्या...