रविवार, एप्रिल 20, 2025
Home Blog Page 1587

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात वन विभाग उभारणार डीएनए प्रयोगशाळा

प्रयोगशाळा उभारणारा महाराष्ट्राचा वन विभाग देशात पहिला

मुंबई, दि. 10 : वन्यप्राण्यांची डीएनए चाचणी करण्यासाठी महाराष्ट्र राज्याच्या वन विभागाने स्वत:ची प्रयोगशाळा उभारण्याचा निर्णय घेतला आहे. अशी प्रयोगशाळा उभारणारा महाराष्ट्राचा वन विभाग देशात पहिला ठरला आहे. यासाठी आवश्यक असलेला३ कोटी ९६ लाखरुपयांचा निधी उद्यान व्यवस्थापनाला उपलब्ध झाला असून ही प्रयोगशाळा उभारण्याची प्रक्रिया  सुरु झाल्याचे उद्यानाचे मुख्य वन संरक्षक अन्वर अहमद यांनी सांगितले.

मानव वन्यजीव संघर्षात विशेषत: जेव्हा यात मनुष्य मृत्यूच्या घटना घडतात तेव्हा घटनेच्यावेळी कारणीभूत प्राण्याला ओळखून त्याला जेरबंद करणे अत्यंत महत्त्वाचे ठरते.  आतापर्यंतअशा वन्य प्राण्यांची ओळख पटविण्यासाठी पायांचे ठसे किंवा शरीरावरील ठिपके/पट्टयांचा वापर केला जात होता. आता प्राण्यांची तंतोतंत ओळख होण्याकरिता प्राण्यांची डीएनए चाचणी करणे आवश्यक ठरत असल्याची बाब लक्षात घेऊन वन विभाग स्वत:ची प्रयोगशाळा उभारणार आहे.

सद्यस्थितीत डी.एन.ए चाचणी करण्यासाठीचे नमुने  हैदराबाद व भारतीय वन्यजीव संस्थान डेहराडून यांच्याकडे पाठविले जातात. या चाचणीचे परिणाम मिळण्याकरिता अनेक महिने वाट पाहावी लागते. दरम्यान मानव वन्यजीव संघर्षात कारणीभूत ठरलेल्या प्राण्याची तंतोतंत ओळख निश्चित न झाल्याने वन्यजीव संरक्षण अधिनियम१९७२ चे कलम ११ वराष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण यांच्या मार्गदर्शक सुचनेनुसार प्राण्याला जेरबंद करण्याचे आदेश काढण्यास अडचण निर्माण होते. डीएनए चाचणीचे परिणाम लवकर प्राप्त व्हावेत याकरिता वन विभागात स्वतंत्र डी.एन.ए चाचणी प्रयोगशाळा स्थापन करणे अत्यंत आवश्यक होते.

संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, बोरिवली येथे प्रयोगशाळा सुरु करण्यासाठी इमारत उपलब्ध आहे. मुंबई शहरात उपलब्ध असलेले तज्ज्ञ मनुष्यबळ, वाहतुकीची सोय लक्षात घेऊन संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात ही प्रयोगशाळा उभारण्यात येत आहे.  राज्यात दुर्देवाने कुठे मानव वन्यजीव संघर्षाच्या घटना घडल्या तर कोणत्या वन्यजीवाकडून हे कृत्य घडले याची अचूक ओळख पटवणे या डीएनए चाचणीमुळे शक्य होईल, असेही श्री.अहमद यांनी सांगितले.

००००

डॉ.सुरेखा मुळे/विसंअ/10.12.19

राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या प्रकरणात दोषींवर तातडीने कारवाई करण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आदेश

निर्भया फंडाच्या त्वरित विनियोगासाठी कार्यपद्धती तयार करा – मुख्यमंत्री

मुंबई, दि. 10 : राज्यात महिलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या प्रकरणात दोषींवर तातडीने कारवाई करा, असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पोलीस महासंचालक कार्यालयात राज्य पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत दिले.

महिलांवरील अत्याचारबाबत कठोरात कठोर पावले उचलण्यात यावीत, असे सांगून मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले, महाराष्ट्र पोलीस दलाच्या कामाची वाखाणणी नुकत्याच पार पडलेल्या देशातील पोलीस महासंचालकांच्या परिषदेत झाली. महिला अत्याचाराच्या प्रकरणात तात्काळ व जलद कार्यवाही करून गुन्हेगारांना वचक बसेल असे काम करावे.

निर्भया फंडाच्या विनियोगासाठी कार्यपद्धती तयार करा मागील काही कालावधीत निर्भया फंड मधील निधी खर्च न झाल्याची बाब गंभीर आहे. ह्या निधीचा तात्काळ कशा पद्धतीने त्वरित विनियोग करता येईल, याची कार्यपद्धती तयार करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. पोलीस दलाच्या सक्षमीकरणासाठी ज्या ज्या आवश्यक असतील त्या सर्व सुविधा शासनाकडून उपलब्ध करुन देण्यात येतील. आपल्या सरकारला खाकी वर्दीच्या आतला माणूस मजबूत करायचा आहे, असा संदेश श्री. ठाकरे यांनी पोलीस दलाला दिला.

       सर्वसामान्य नागरिकाला पोलिसांविषयी आदर आणि त्याचबरोबर दरारा वाटेल अशा पद्धतीने काम करावे, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, काही वेळा न्याय्य मागण्यांसाठी सर्वसामान्य नागरिक अहिंसात्मक मार्गाने रस्त्यावर उतरतात. अशा वेळी नोंदविण्यात आलेले गंभीर गुन्हे वगळता गुन्हे काढून घेण्यासाठी सकारात्मक पावले टाकावीत. अतिशय आवश्यक असेल तेव्हाच बळाचा वापर केला पाहिजे. पोलिसांमुळे नागरिकांचे सण-उत्सव आनंदात पार पडतात, असेही गौरवोद्गार त्यांनी यावेळी काढले.

       पोलीस दलाच्या सक्षमीकरणासाठी आवश्यक प्रस्ताव सादर करावेत. त्याला तत्काळ मान्यता देण्यात येईल. पोलिसांच्या घरांचे प्रश्न, आरोग्याचे प्रश्न, कर्तव्य कालावधीचे प्रश्न, कर्तव्य सहजतेने पार पाडता येतील यासाठीच्या सुधारणांसाठी प्रयत्नशील राहू.

       मुंबई हे आंतरराष्ट्रीय शहर असून त्याकडे जगाचे लक्ष असते. कोणतीही दुर्घटना घडण्यापूर्वीच शहराच्या सुरक्षिततेसाठी सतत सतर्क राहावे, अशाही सूचना त्यांनी यावेळी केल्या.

       या बैठकीत व्ह‍िडिओ कॉन्फरन्सद्वारे पुणे, ठाणे, औरंगाबाद, नागपूर, नाशिक, नवी मुंबई पोलीस आयुक्तांशी तसेच परिक्षेत्रांच्या विशेष पोलीस महानिरीक्षकांशी संवाद साधून मार्गदर्शन केले. प्रारंभी श्री. जयस्वाल यांनी मुख्यमंत्र्यांचे स्वागत करुन प्रास्ताविक केले. मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस राज्याचे पोलीस महासंचालक सुबोध जायसवाल, मुंबईचे पोलीस आयुक्त संजय बर्वे यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.

००००

सचिन गाढवे/वि.सं.अ./दि.10.12.2019

विधानसभा अध्यक्षांकडून सुधीर मुनगंटीवार यांना विधानसभा सदस्यत्वाची शपथ

मुंबई, दि. 10 : विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी आज सुधीर मुनगंटीवार यांना विधानसभा सदस्यत्वाची शपथ दिली. विधानसभा अध्यक्षांच्या दालनात झालेल्या या कार्यक्रमास माजी मंत्री सर्वश्री चंद्रकांत पाटील, राधाकृष्ण विखे-पाटील, आशिष शेलार, विजय वडेट्टीवार यांच्यासह विधिमंडळ सदस्य व विधानमंडळाचे अधिकारी उपस्थित होते.

कर्तव्य समजून मानवी हक्कांचे संरक्षण करण्याचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे आवाहन

          

मुंबई, दि. 10 : नागरिकांनी मानवी हक्काचे संरक्षण हे कर्तव्य समजून केले पाहिजे. तसेच गरीब, दुर्बल आणि दिव्यांग व्यक्तींच्या हक्कांचे संरक्षण व विकास करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज मानवी हक्क दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात व्हिडिओ संदेशाद्वारे केले.

          

सह्याद्री अतिथीगृह येथे आज मानवी हक्क दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

        

यावेळी मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष एम.ए.सईद म्हणाले, तरुणांनी स्वातंत्र्य, समता व प्रतिष्ठा या संबंधातील हक्कांचे संरक्षण करण्यासाठी पुढे आले पाहिजे. आर्थिक सामाजिक आणि सांस्कृतिक हक्क अबाधित ठेवण्यासाठी तरुणांनी काम केले पाहिजे. नागरिकांनी आपल्या हक्काबरोबरच कर्तव्याचेही पालन केले पाहिजे.

यावेळी महाराष्ट्र सायबरचे विशेष पोलीस महानिरीक्षक ब्रिजेश सिंह यांनी ‘मानवी हक्क चळवळ व सायबर कायदा’ याविषयी माहिती देऊन व्यक्तींनी मानवी हक्काबरोबरच कर्तव्यालाही महत्त्व दिले पाहिजे, असे सांगितले.

          

यावेळी राज्य मानवी हक्क आयोगाचे अतिरिक्त मुख्य सचिव व्ही.के.गौतम, आय.जे.एम. साऊथ एशियाचे संजय माकवान, मुंबई विद्यापीठाच्या प्रा.रश्मी ओझा तसेच मानवी हक्क चळवळीत काम करणारे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

यावर्षीचे मानवी हक्क चळवळीचे ब्रीद वाक्य‘स्टँड अप फॉर ह्युमन राईटस्असे आहे.

००००

दत्तात्रय कोकरे/वि.सं.अ./10.12.19

धान उत्पादक शेतकऱ्यांना शासनाकडून क्विंटलमागे पाचशे रूपयांचे अनुदान – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मान्यता

मुंबई, दि.१० : राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाकडून प्रति क्विंटल पाचशे रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रस्तावास मान्यता दिली आहे.

सन २०१९-२० या हंगामातील धान उत्पादकांसाठी केंद्र शासनाने किमान आधारभूत किंमत निश्चित केली आहे. तथापि धान उत्पादनाच्या खर्चात वाढ झाली आहे. त्यावर शेतकऱ्यांना दिलासा देणे आवश्यक होते. त्यानुसार राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना पन्नास क्विंटलच्या मर्यादेत प्रती क्विंटल पाचशे रुपयांचे प्रोत्साहन अनुदान देण्याचा प्रस्ताव होता. या प्रस्तावाला मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी मान्यता दिली आहे. यामुळे राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना २०१९-२०मधील पणन हंगामात मोठा दिलासा मिळणार आहे.

भंडारा जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना १२ डिसेंबरला पीक विम्याच्या रकमेचे वाटप – विधानसभा अध्यक्ष नाना पटोले

मुंबई, दि. 10 : भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप 2019 मधील पीक विम्याच्या रकमेचे वाटप 12 डिसेंबर रोजी लाखांदूर येथे शेतकरी मेळावा घेऊन करावे, असे निर्देश विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी आज येथे विमा कंपनीला दिले.

विधानभवनात भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याच्या रकमेच्या वितरणाबाबत अध्यक्षांनी बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते.

बैठकीस कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले, कृषी विभागाचे संचालक नारायण शिसोदे, भंडारा जिल्हा कृषी अधीक्षक हिंदुराव चव्हाण, विमा कंपन्यांचे अधिकारी आदी उपस्थित होते.

भंडारा जिल्ह्यातील  एक लाख 61 हजार 343 धान उत्पादक शेतकऱ्यांनी पीक विमा काढला. त्यांनी 5 कोटी 43 लाख रुपये विम्याच्या हप्त्यापोटी जमा केले. आता या शेतकऱ्यांना नुकसान भरपाईपोटी 67 कोटी 86 लाख रुपये मिळणार आहेत. प्रती हेक्टरी ही रक्कम 9 हजार 62 रुपये असेल अशी माहिती विमा कंपनीच्या प्रतिनिधीने यावेळी दिली.

ही रक्कम शेतकऱ्यांच्या बचत खात्यावर जमा करण्याची कार्यवाही तातडीने सुरू करून जाहीर मेळावा घेण्यात यावा, त्यात शेतकऱ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात मदत वाटप करण्यात यावी, जेणेकरून शेतकऱ्यांमध्ये विमा वितरणासंदर्भात साशंकता राहणार नाही, असे अध्यक्ष श्री. पटोले यांनी यावेळी सांगितले.

००००

अजय जाधव/विसंअ/10.12.19

नगरपरिषदा, नगरपंचायतींसाठी ९ जानेवारीला मतदान

मुंबई, दि. 10 : कन्हान- पिंपरी (जि. नागपूर) व गडचांदूर (जि. चंद्रपूर) नगरपरिषद आणि लांजा (जि. रत्नागिरी) नगरपंचायतीच्या सार्वत्रिक; तर इतर विविध नगरपरिषदा/ नगरपंचायतींमधील सहा रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी 9 जानेवारी 2020 रोजी मतदान होणार आहे. मतमोजणी 10 जानेवारी 2020 रोजी होईल, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज येथे दिली.

श्री. मदान यांनी सांगितले की, या सर्व संबंधित ठिकाणी आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे. नामनिर्देशनपत्रे 16 ते 20 डिसेंबर 2019 या कालावधीत सादर करता येतील. त्यांची छाननी 21 डिसेंबर 2019 रोजी होईल. अपील नसलेल्या ठिकाणी 27 डिसेंबर 2019 पर्यंत नामनिर्देशनपत्रे मागे घेता येतील. अपील असलेल्या ठिकाणी अपिलाच्या निर्णयानंतर तिसऱ्या दिवसापर्यंत नामनिर्देशनपत्र मागे घेता येतील. मतदान 9 जानेवारी 2020 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत होईल. मतमोजणी 10 जानेवारी 2020 रोजी सकाळी 10 वाजता सुरू होईल.

रिक्त पदांसाठी पोटनिवडणुका होणाऱ्या जागांचा नगरपरिषद/ नगरपंचायतनिहाय तपशील: तळेगाव दाभाडे (जि. पुणे)- 7ब, देवळा (नाशिक)- 11, भुसावळ (जळगाव)- 24अ, नेवासा (अहमदनगर)- 13, नांदुरा (बुलढाणा)- 7ब आणि कळमेश्वर ब्राम्हणी (नागपूर)- हद्दवाढ क्षेत्रासाठी.

०-०-०

(Jagdish More, SEC)

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशाची १६ डिसेंबरपासून नागपुरात सुरुवात

मुंबई, 10 : विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर व विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कामकाज सल्लागार समितीमध्ये विधिमंडळाच्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनातील कामकाजावर चर्चा झाली.

येत्या16 तारखेपासून विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे सुरू होणार आहे. अधिवेशनात पुरवणी मागण्या, अशासकीय कामकाज, शासकीय विधेयके, राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा आदी कामकाज होणार आहे. विधानपरिषदेत 7 अशासकीय विधेयकांवर चर्चा होणार आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदी महाराष्ट्रातील श्री. शरद बोबडे यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांच्या अभिनंदनाचा ठरावही या अधिवेशनात मांडण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

          

विधानसभा सल्लागार समितीच्या बैठकीस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, मंत्री एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, आमदार सर्वश्री चंद्रकांत पाटील, गिरीष महाजन, आशिष शेलार, अमिन पटेल, दिलीप वळसे-पाटील, सुधीर मुनगंटीवार, विजय वड्डेटीवार, सुनील प्रभू आदी उपस्थित होते.

तर विधानपरिषद कामकाज सल्लागार समिती बैठकीस उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मंत्री एकनाथ शिंदे, सुभाष देसाई,  आमदार सर्वश्री विजय ऊर्फ भाई गिरकर, हेमंत टकले, डॉ. रणजित पाटील, शरद रणपिसे, सुरजितसिंह ठाकूर, भाई जगताप, अनील परब, जयंत पाटील, रामहरी रुपनवर आदी उपस्थित होते.

००००

नंदकुमार वाघमारे/विसंअ/10.12.2019

‘#हायवे मॅनर्स’ कार्यक्रमाद्वारे रस्ते सुरक्षेबाबत जनजागृती

मुंबई, दि. 10 : महामार्ग पोलीस व इंडियन ऑईल कॉर्पोरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यामध्ये पीपल वॉलनेट ही संस्था #हायवे मॅनर्स‘ (#HIGHWAY MANNERS) हा रस्ता सुरक्षेसंबंधी जनजागृती कार्यक्रम राबविणार आहे. या कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा उद्या बुधवार दि. ११ डिसेंबर रोजी मरिन ड्राईव्ह येथील पोलीस जिमखान्यात दुपारी ३ वाजता होणार आहे. अशी माहिती अपर पोलीस महासंचालक (वाहतूक) विनय कारगावकर यांनी दिली.

राज्यातील छोटे मोठे अपघात व त्यामुळे होणारी जीवितहानी ही फार गंभीर बाब आहे. वाहन चालवताना अनेक वेळा निष्काळजीपणा व वाहतूक नियमांचे उल्लंघन केले जाते. यामुळेसुद्धा अपघातांचे प्रमाण वाढत असल्याने यासंदर्भात जनजागृती होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. म्हणूनच या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.’#हायवे मॅनर्सया कार्यक्रमातून वाहन चालवताना चालकाने घ्यावयाची काळजी व वाहतूक नियमांचे महत्त्व समजणार आहे. अपघातांची संख्या कमी होण्याच्या दृष्टीने हा कार्यक्रम राबविण्यात येत असून या कार्यक्रमात लोकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून विविध उपाययोजनांची माहिती करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

००००

‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात उद्या ‘विशेष मिशन इंद्रधनुष्य – २ लसीकरण मोहीम’ या विषयावर मुलाखत

दिलखुलास कार्यक्रमात बुधवारी, गुरुवारी मुलाखतीचे प्रसारण

मुंबई, दि. 9 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयनिर्मित जय महाराष्ट्र या दूरदर्शनवरील कार्यक्रमात तसेच आकाशवाणीवरील दिलखुलासकार्यक्रमात विशेष मिशन इंद्रधनुष्य -2 लसीकरण मोहीमया विषयावर आरोग्य विभागाच्या संचालक डॉ. अर्चना पाटील यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे.

ही मुलाखत दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून मंगळवार दि. 10 डिसेंबर रोजी संध्याकाळी 7.30 वाजता प्रक्षेपित होणार आहे. तर राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून बुधवार दि. 11 आणि गुरुवार दि. 12 डिसेंबर रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होईल. निवेदिका रेश्मा बोडके यांनी ही मुलाखत घेतली आहे.

‘मिशन इंद्रधनुष्य’ या मोहिमेचे ध्येय, लसीकरणाचे वेळापत्रक, मोहिमेत सहभागी शासनाचे विविध विभाग, लसीकरण मोहीम यशस्वी करण्यासाठी करण्यात येत असलेले प्रयत्न, प्रधानमंत्री मातृवंदना योजना व  तिची वैशिष्ट्ये आदी विषयांची माहिती जय महाराष्ट्रदिलखुलासया कार्यक्रमातून डॉ. पाटील यांनी दिली आहे.

या कार्यक्रमात आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीपकुमार व्यास, आरोग्य आयुक्त डॉ.अनुपकुमार यादव, जागतिक आरोग्य संघटनेचे लसीकरण व सर्वेक्षण अधिकारी डॉ. मुजीब सय्यद यांचे मार्गदर्शनपर आवाहनही या कार्यक्रमातून प्रसारित करण्यात येणार आहे.

ताज्या बातम्या

मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र मिशन यशस्वीतेसाठी शासन कटीबद्ध – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
मुंबई, दि. 20 : नागरिकांचे आरोग्य प्राधान्यक्रमावर ठेवून नागरिकांच्या आरोग्यविषयक अनेकविध योजना शासनामार्फत सुरू करण्यात आल्या आहेत. वयस्क लोकांमध्ये मोतीबिंदूमुळे येणारी दृष्टिहीनता टाळण्यासाठी मोतीबिंदू...

पत्रकारांची लेखणी सत्याला आधार देणारी आणि समाजाला दिशा देणारी असावी – उपमुख्यमंत्री अजित पवार

0
सातारा, दि. 19: माध्यमांनी केवळ बातम्या देण्याचे काम करू नये तर समाजाचे प्रबोधन करण्याचेदेखील एक प्रभावी साधन तुम्ही आहात आणि तसे तुम्ही व्हावे.  तुमची...

ऊर्जा राज्यमंत्र्यांनी केली भटाळी कोळसा खाण प्रकल्पाची पाहणी

0
चंद्रपूर दि. 19 एप्रिल : ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे -बोर्डीकर यांनी आज (दि.19)  वेकोलि चंद्रपूर क्षेत्रातील भटाळी कोळसा खाण प्रकल्पाला भेट देऊन पाहणी केली....

पालकमंत्र्यांच्या हस्ते शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या खेळाडू आणि प्रशिक्षकांचा सन्मान

0
अहिल्यानगर दि.१९- विविध क्रीडा प्रकारात आपले नैपुण्य दाखून शिवछत्रपती पुरस्काराने सन्मानित झालेल्या खेळाडूमुळे क्रीडा क्षेत्रात जिल्ह्याचा नावलौकीक अधिकच उंचावला असल्याचे गौरवोद्गार जलसंपदा मंत्री तथा...

जिल्ह्यातील अवैध धंद्याविरोधात मोहीम सुरू करा-पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

0
अहिल्यानगर दि.१९- जिल्ह्यातील अवैध धंद्याविरोधात पोलिसांनी निर्भयपणे आणि मोहीम स्तरावर कारवाई सुरू करावी, असे निर्देश जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी...