गुरूवार, ऑगस्ट 21, 2025
Home Blog Page 159

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुणे शहर पोलीस विभागाच्या ‘पीटीपी ट्रॅफिकॉप ॲप’चे लोकार्पण

पुणे, दि. १४: पुणे शहरात प्रवास करणारे नागरिक आणि वाहतूक विभागात समन्वयासाठी, परिस्थितीनुसार दुहेरी संवाद राहण्यासाठी आणि नागरिकांना वाहन चालवताना संबंधित परिसरातील वाहतूकीची माहिती तात्काळ मिळण्याच्या दृष्टीने पुणे शहर पोलीस आयुक्तालयाने तयार केलेल्या ‘पीटीपी ट्रॅफिकॉप ॲप’चे (PTP TRAFFICCOP APP) राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.

विधानभवन येथे आयोजित एका बैठकीत झालेल्या लोकार्पण कार्यक्रमास विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, पुणे महानगरपालिका आयुक्त नवलकिशोर राम, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह आदी उपस्थित होते.

पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या संकल्पनेतून हे ॲप तयार करून घेण्यात आले आहे. यावेळी पुणे शहरच्या पूर्व प्रादेशिक विभागाचे अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी या ॲपबाबत माहितीचे चित्रफीतीद्वारे सादरीकरण केले.

पुणेकरांना उद्भवणाऱ्या नागरी समस्यांमध्ये मुख्यतः वाहतूक कोंडी, त्यातून घडणारे अपघात आणि वाहतूकीमुळे निर्माण होणारे प्रदूषण आदी गंभीर समस्यांना सामोरे जावे लागत आहे. यास प्रामुख्याने वाहतूक नियमभंग करणाऱ्या वाहन चालकांवर प्रभावी कारवाई न होणे, हे सुद्धा एक मुख्य कारण आहे. या परिस्थितीवर मात करण्यासाठी पुणे पोलिसांनी नागरीकांना सक्षम करण्यासाठी व वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त श्री. पाटील, वाहतूक शाखेचे पोलीस उप आयुक्त अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली खासगी संगणक अभियंत्यांकडून हे ॲप तयार करून घेण्यात आले आहे.

या ॲपमध्ये फुटपाथवर वाहन पार्किंग करणे, पदपथावरून वाहन चालविणे, जड वाहनांचे निर्बंधांचा भंग करणे, वाहन चालविताना मोबाईलचा वापर करणे, ट्रिपल सिट वाहन चालविणे, काळ्या फिल्मचा वापर, फॅन्सी नंबर प्लेट, विरूद्ध दिशेने नो एंन्ट्रीतुन वाहन चालविणे आदी प्रकारचे धोकादायक नियमभंग करणान्या वाहन चालकांची छायाचित्रे नागरीक या ॲपवर अपलोड करू शकतील.

या व्यतिरिक्त रिपोर्ट इन्सीडेन्टअंतर्गत वाहतूक कोंडीस कारणीभूत असणाऱ्या अपघात, वाहनात बिघाड, रस्त्यातील खड्डे, वाहतूक कोंडी, रस्त्यात तेल गळती, रस्त्यावर पाणी साचणे, रस्त्यावर झाड पडणे, रस्त्यात बेवारस असणारे वाहन आदी अडथळ्यांची माहिती नागरीक या ॲपद्वारे वाहतूक पोलीस नियंत्रण कक्षास कळवू शकतात. वाहतूक नियमभंगाचा फोटो पाठविणाऱ्या किंवा तक्रार करणाऱ्या नागरिकांची गोपनीयता राखली जाणार आहे. गोपनीयता भंग होणार नाही, याची कटाक्षाने दक्षता घेण्यात येईल.

अशी देता येईल माहिती :

वाहतूक नियमभंगाची माहिती अपलोड करताना नियमभंग करणाऱ्या वाहनाचे छायाचित्र किंवा चित्रफीत पोस्ट करावे. संबंधित वाहनाची नंबरप्लेट सुस्पष्ट दिसणे आवश्यक आहे. वाहतूक अडथळ्यांची माहिती अपलोड करताना वाहतूक अडथळयाचे छायाचित्र किंवा चित्रफीत पोस्ट करावे. अडथळ्याचे वर्णन या टॅबमध्ये सविस्तर व अचूक माहिती देणे आवश्यक आहे.

या ॲपच्या माध्यमातून प्राप्त होणाऱ्या तक्रारीची पुढील ४८ तासांमध्ये पडताळणी करून वाहतूक पोलीस नियमभंग करणाऱ्या वाहन चालकांवर ऑनलाईन चलन तयार करतील.

अडथळ्यांबाबतची माहिती मिळाल्यावर वाहतूक नियंत्रण कक्ष अधिकारी त्याची तात्काळ दखल घेवून, तक्रारीचे निरसन करण्यासाठी संबंधित वाहतूक विभागाचे प्रभारी अधिकारी यांना किंवा संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेस कळवून प्राप्त तक्रारींची पूर्तता प्राधान्याने करून घेतील. जेणेकरून वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या बाबींवर तातडीने उपाययोजना होवून शहरातील वाहतूक सुरळीत राहील. या प्रणालीद्वारे माहिती मिळाल्यानंतर दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याने नागरिकांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन वाहतुक शाखेकडून करण्यात आले.

0000

पुणे विभागातील कोविड-१९ परिस्थितीचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून आढावा

पुणे दि. १४: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानभवन येथे आयोजित बैठकीत पुणे विभागातील कोविड-१९ साथीच्या अनुषंगाने आढावा घेतला. लक्षणे सौम्य असली तरी वृद्ध तसेच सहव्याधी असलेल्या व्यक्तींनी विशेष काळजी घेणे आवश्यक असून आरोग्य विभाग, महानगरपालिका तसेच इतर स्थानिक स्वराज्य संस्थांनी समन्वयाने काम करावे, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

बैठकीस विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पुणे महानगरपालिका आयुक्त नवलकिशोर राम, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह, पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, आरोग्य संचालक डॉ. विजय कंदेवाड यांच्यासह दूरदृष्यप्रणालीद्वारे कोल्हापूर मनपा आयुक्त के. मंजुलक्ष्मी, कोल्हापूर, सातारा, सोलापूर, सांगली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदी उपस्थित होते.

यावेळी डॉ. कंदेवाड यांनी कोविड-19 च्या अनुषंगाने सादरीकरण केले. सद्यस्थितीत तपासणीमध्ये ओमीक्रॉनचे जेएन, एक्सएफजी व जीएफ7-9 हे उपप्रकार आढळून येत आहेत. या प्रकारामुळे ताप, खोकला, घसा दुखणे असे सौम्य आजार होतात. फक्त रक्तशर्करा, कर्करोग आदी सहव्याधी कमी असलेले, रोग प्रतिकार शक्ती कमी असलेले नागरीक आदींना थोडा धोका जास्त आहे. अशांनी गर्दीत जाणे टाळावे. हात स्वच्छ धुणे, मास्क वापरणे तसेच सुरक्षित अंतर ठेवावे. श्वसनदाह वाढल्यास त्वरीत जवळच्या दवाखान्यात जाऊन तपासणी व इलाज करावा, असे यावेळी सांगण्यात आले.

सहायक संचालक डॉ. प्रशांत वाडीकर, विभागातील सर्व जिल्हा शल्य चिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकारी यावेळी होते. त्यांना कोविड व वारीबाबत काळजी घेण्याच्या सूचना व सर्व रुग्णालये कोविडच्या संभाव्य साथीसाठी सज्ज ठेवण्याच्या व सतत माहिती सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

0000

 

 

पालखी सोहळ्यात वारकऱ्यांसाठी आवश्यक सुविधा तातडीने पूर्ण करा – उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे दि. १४: आषाढी पालखी सोहळ्यादरम्यान वारकऱ्यांना कोणत्याही स्वरूपाचा त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी; पालखी तळ, मुक्कामाच्या ठिकाणी तसेच संपूर्ण पालखी मार्गावर आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात, असे निर्देश राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. सोहळ्यासाठी शासनातर्फे आवश्यक निधी देण्यात येईल, अशी ग्वाहीदेखील त्यांनी दिली.

पुणे विधानभवन येथे झालेल्या श्री क्षेत्र देहू व श्री क्षेत्र आळंदी पालखी सोहळा-२०२५ पूर्वतयारी आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, पुणे महानगरपालिका आयुक्त नवलकिशोर राम, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह, पीएमआरडीए आयुक्त डॉ.योगेश म्हसे, पुणे, सातारा आणि सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, वरिष्ठ पोलीस अधिकारी, आदी उपस्थित होते.

श्री.पवार म्हणाले, पावसाच्या पार्श्वभूमीवर विसाव्याच्या, मुक्कामाच्या ठिकाणी आवश्यक व्यवस्था करावी. दिवे घाटात पाऊस पडत असल्यास पालखी सोहळा जाण्यास अडचण येणार नाही याबाबत दक्षता घ्यावी. घाट परिसरात पालखीचे दृश्य पाहण्यासाठी नागरिकांना प्रतिबंध करावा. डोंगराच्या बाजूने खोदाई सुरू असल्याने पावसाने दगड रस्त्यावर येऊन वारकऱ्यांना धोका होऊ उत्पन्न होऊ नये म्हणून बॅरिकेटिंग करावे.

उंडवडी कडेपठार येथील बारामतीकडे जाणाऱ्या जुन्या तुकाराम महाराज पालखी मार्गावरील राडारोडा दूर करावा, रस्त्यावरील खड्डे भरून घ्यावेत, काम वेगाने पूर्ण करावे. इंदापूरकडे जाणाऱ्या पालखी महामार्गाचे कामाला वेग द्यावा. इंदापूर ते पंढरपूर दरम्यान पालखी महामार्गाच्या कामाला गती मिळणे आवश्यक असून पालखी जाईपर्यंत सुरक्षिततेच्या सर्व उपाययोजना कराव्यात. पीएमआरडीएच्या मेट्रोच्या कामामुळे रस्त्याच्या बाजूला असलेले बांधकाम साहित्य त्वरित बाजूला करावे.

महावितरणने संपूर्ण पालखी मार्गावर आपली अधिकारी-कर्मचाऱ्यांचे पथक सतर्क आणि कार्यरत ठेवावे. जिल्हा परिषद व नगरपालिकांनी पालखी सोहळा पुढे गेल्यावर त्वरित त्या मार्गाची, गावांची स्वच्छता करावी. मुक्कामाच्या ठिकाणी वीज व्यवस्थेसाठी संबंधित जिल्हा परिषदेने जनरेटरची व्यवस्था करावी. आवश्यकता असल्यास जनरेटरसाठी जिल्हा नियोजन समितीतून अधिकचा निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

वादळात रस्त्याच्या कडेला असलेले जाहिरात फलक खाली कोसळून दुर्घटना होऊ नये म्हणून अनधिकृत फलक तातडीने काढावे. त्यासाठी संपूर्ण मार्गावर महसूल, पोलीस अधिकारी व स्थानिक स्वराज्य संस्थांनी संयुक्त पाहणी करावी. अधिकृत जाहिरात फलकांचे संरचनात्मक स्थीरता परीक्षण (स्ट्रॅक्चरल स्टॅबिलीटी ऑडिट) करून घ्यावे, असे निर्देशही श्री.पवार यांनी दिले.

कोविडच्या साथीच्या पार्श्वभूमीवर पालखी सोहळा प्रमुख, दिंडीप्रमुखांशी संवाद साधून सर्दी, ताप, खोकला आदी त्रास असणाऱ्या वारकऱ्यांनी वारीत सहभागी होण्यापूर्वी तपासणी करुन घ्यावी असे आवाहन करावे. असे आजार असलेल्या वारकऱ्यांची तपासणी, उपचार तातडीने होतील यासाठी आवश्यक ते तपासणीची व्यवस्था, औषधे पालखीमार्गावरील आरोग्य पथकांकडे ठेवावीत, अशाही सूचना त्यांनी दिल्या.

विभागीय आयुक्त श्री. पुलकुंडवार यांनी करण्यात आलेल्या नियोजनाची माहिती दिली. स्वच्छ आणि निर्मल वारीसाठी विशेष नियोजन करण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले.

पोलीस आयुक्त अमितेशकुमार, विनय कुमार चौबे यांनी सुरक्षा आणि वाहतूक नियोजनाबाबत माहिती दिली. इतर उपस्थित जिल्हाधिकारी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही पालखी सोहळ्यासाठी आवश्यक सूचना तसेच केलेल्या तयारीची माहिती दिली.

उपमुख्यमंत्री श्री.पवार यांच्या हस्ते पुणे पोलीस वाहतूक शाखेतर्फे तयार करण्यात आलेल्या ‘पीटीपी ट्रॅफिकॉप’ मोबाईल ॲपचे लोकार्पण करण्यात आले. पालखीचे रिअल टाईम ट्रॅकिंगसाठी पालखी ट्रॅकिंग ॲपचे लोकार्पण करण्यात आले. तसेच पुणे पोलीस आयुक्तालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘प्रोजेक्ट वारी’ या संगणकीय उपक्रमाचेही लोकार्पण करण्यात आले. या उपक्रमांतर्गत वारकऱ्यांची संख्या मोजण्यात येणार असल्यामुळे भविष्यात अचूक नियोजनासाठी उपयोग होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

0000

आपत्कालीन परिस्थितीत मदत कार्यासाठी एनडीआरएफ, एसडीआरएफ पथके सतर्क

मुंबई,दि. १४ : अतिवृष्टी आणि संभाव्य पूर परिस्थिती बाबत उपाय योजना म्हणून   एनडीआरएफ, एसडीआरएफ पथकांना आपत्कालीन परिस्थितीत सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.  राज्यात मागील २४ तासामध्ये (१४ जून रोजी सकाळपर्यंत) सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वाधिक ७०.३ मिमी पाऊस झाला आहे. तर रत्नागिरी जिल्ह्यात ४५ मिमी,  मुंबई शहर २५.४, पुणे २३.८ आणि रायगड जिल्ह्यात २० मिमी पावसाची नोंद झाली असल्याची माहिती राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून देण्यात आली आहे.

राज्यात कालपासून आज १४ जून २०२५  रोजी सकाळपर्यंत झालेल्या पावसाची सरासरी आकडेवारी पुढीलप्रमाणे (सर्व आकडे मिलिमीटरमध्ये) :- ठाणे ३.४,रायगड २०, रत्नागिरी ४५,  सिंधुदुर्ग ७०.८,  पालघर ०.२, नाशिक १०.५, धुळे २.२, नंदुरबार ४.६, जळगाव ४.८, अहिल्यानगर ५.५, पुणे २३.८, सोलापूर ५.९,  सातारा ८.८,  सांगली २.६,  कोल्हापूर ७, छत्रपती संभाजीनगर १६.७, जालना ७.८, बीड ७.६, लातूर २,  धाराशिव ९.५, नांदेड ०.६,  परभणी ०.७,  हिंगोली ०.८, बुलढाणा २.७, अकोला ३, वाशिम १.८, अमरावती ०.६, यवतमाळ ०.८, नागपूर २.४, भंडारा ३.४, गोंदिया १.१, चंद्रपूर ०.४ आणि गडचिरोली ०.२.

इंद्रायणी नदी पात्रात देहू, आळंदी येथे एसडीआरएफ व एनडीआरएफ पथक

आषाढवारी निमित्ताने इंद्रायणी नदी पात्रात मोठ्याप्रमाणात भाविकांची गर्दी होत असते. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे  (एसडीआरएफ) एक पथक देहु येथ तसेच राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे (एनडीआरएफ) एक पथक आळंदी येथे तैनात राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

दोन व्यक्ती, तीन प्राण्यांचा मृत्यू

राज्यात अहिल्यानगर जिल्ह्यात  वीज पडून दोन प्राण्यांच्या मृत्यू, नाशिक जिल्ह्यात वीज पडून एका प्राण्याचा मृत्यू, पुणे जिल्ह्यात वीज पडून एक व्यक्ती मृत्यू आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात भिंत पडून एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूरमधील अडीवरे गावात अतिवृष्टीमुळे पूर परिस्थिती निर्माण होऊन पुलावरुन पाणी वाहत होते. स्थानिक प्रशासनाकडून वाहतुक बंद करण्यात आली होती. याबाबत स्थानिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

ठाणे जिल्ह्यातील तुर्भे एमआयडीसी येथे जनरेटरच्या धुरामुळे ग्रस्त झालेल्या २८ लोकांपैकी २६ व्यक्तींना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले असून दोन व्यक्ती रुग्णालयात उपचार घेत असल्याचे राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून कळविण्यात आले आहे.

००००

जागतिक शिक्षणाचा केंद्रबिंदू मुंबईत भारतातील पहिले आंतरराष्ट्रीय विद्यापीठांचे शैक्षणिक हब महाराष्ट्रात

देशाच्या नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 अंतर्गत भारतात शिक्षण क्षेत्रात ऐतिहासिक परिवर्तनाची सुरुवात झाली आहे. देशातील एकूण नोंदणी गुणोत्तर (Gross Enrollment Ratio – GER) ५०% पर्यंत नेण्याचे राष्ट्रीय उद्दिष्ट गाठण्यासाठी, भारताने जागतिक दर्जाचे शिक्षण आणि संशोधन भारतातच उपलब्ध करून देण्यासाठी धोरणात्मक पावले उचलली आहेत.तसेच  महाराष्ट्रातही राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे  महाराष्ट्रात उच्च व तंत्र शिक्षण विभागाने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP 2020) ची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी  विविध अभिनव आणि परिवर्तनशील उपक्रम राबविले आहेत. यामध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण, तंत्रज्ञानाधारित अध्यापन, पारदर्शक भरती प्रक्रिया, विद्यार्थ्यांपर्यंत संधींची समान उपलब्धता आणि संशोधनाला चालना देणे यावर अधिक भर देऊन उच्च  शिक्षण क्षेत्रात गुणवत्तापूर्ण शैक्षणिक बदल घडवत राज्यातील शिक्षण व्यवस्था अधिक सक्षम, लोकाभिमुख केले जात आहे याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने मुंबई/नवी मुंबई येथे पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठांचे स्वतंत्र कॅम्पसेस उभारण्याचा महत्त्वाकांक्षी उपक्रम  हाती घेतला असून  भारतातील उच्च शिक्षण क्षेत्रात हा मैलाचा दगड ठरणार आहे.

पहिल्या टप्प्यात सहभागी आंतरराष्ट्रीय विद्यापीठे

  1. University of Aberdeen – स्कॉटलंड
  2. University of York – युनायटेड किंगडम
  3. University of Western Australia – ऑस्ट्रेलिया
  4. Illinois Institute of Technology – अमेरिका
  5. Istituto Europeo di Design (IED) – इटली

या पाच नामवंत विद्यापीठांनी मुंबईत आपले शैक्षणिक केंद्र स्थापन करण्यास सहमती दर्शवली आहे. त्यांना केंद्र सरकार व विद्यापीठ अनुदान आयोगाकडून (UGC) परदेशी विद्यापीठांना दिले जाणारे LOI (Letter of Intent) प्रदान करण्यात येणार आहे. या विद्यापीठांपैकी अनेक संस्था त्यांच्या देशात टॉप १०० मध्ये आहेत आणि Go8, Russell Group किंवा आयव्ही लीग यांसारख्या उच्च दर्जाच्या संघटनांशी संलग्न आहेत. भारतातील त्यांच्या कॅम्पसेसना पदवीपूर्व, पदव्युत्तर, पीएच.डी., डिप्लोमा आणि संशोधन कार्यक्रम राबवण्यासाठी पूर्ण स्वायत्तता आणि मान्यता देण्यात आली आहे.

भारतीय विद्यार्थ्यांसाठी जागतिक दर्जाचे शिक्षण, देशातच विद्यार्थ्यांना आता जागतिक दर्जाचे अभ्यासक्रम, संशोधन संधी आणि अनुभव परदेशी न जाता देशातच उपलब्ध होतील. हे शिक्षण केवळ परदेशी अभ्यासक्रमांची प्रतिकृती न राहता, भारतातील स्थानिक गरजांशी सुसंगत व रोजगारक्षम असेल. हे अभ्यासक्रम स्थानिक औद्योगिक गरजांनुसार अनुकूल केले जातील. संशोधन, स्टार्टअप्स आणि उद्योग सहकार्याला चालना मिळेल.विद्यार्थ्यांना एक्स्चेंज प्रोग्राम्स, सेमिस्टर ट्रान्सफर, ग्लोबल इंटर्नशिप्स यांसारख्या संधी उपलब्ध होतील. आणि प्राध्यापक व संशोधक यांचाही आंतरराष्ट्रीय स्तरावर सहभाग वाढेल.

प्रत्येक विद्यापीठाचे वैशिष्ट्यपूर्ण योगदान

University of Aberdeen (स्कॉटलंड)

भारतामध्ये कॅम्पस स्थापन करणारे पहिले स्कॉटिश विद्यापीठ. जागतिक समस्यांवर उपाय शोधणाऱ्या अभ्यासक्रमांवर विशेष भर.

University of Western Australia (Go8)

STEM, व्यवसाय आणि संशोधन क्षेत्रातील अभ्यासक्रम. भारतीय विद्यार्थ्यांना जागतिक कार्यबलासाठी सक्षम करणे हे मुख्य उद्दिष्ट.

University of York (UK – Russell Group)

एआय, सायबर सुरक्षा, बिझनेस आणि क्रिएटिव्ह इंडस्ट्रीजसाठी विशेष अभ्यासक्रम. जागतिक उद्योगांच्या गरजेनुसार अभ्यासक्रम डिझाइन.

Illinois Institute of Technology (USA)

इंजिनिअरिंग, संगणक विज्ञान आणि बिझनेस क्षेत्रात अग्रगण्य. Elevate प्रोग्रामच्या माध्यमातून संशोधन, इंटर्नशिप आणि रिअल-वर्ल्ड अनुभव.

Istituto Europeo di Design (IED – इटली) फॅशन, प्रॉडक्ट डिझाईन आणि व्हिज्युअल कम्युनिकेशन क्षेत्रात कौशल्याधारित, क्रिएटिव्ह शिक्षण देणारे प्रतिष्ठित संस्था आहेत.

राज्य शासन केवळ परदेशी विद्यापीठांचे कॅम्पस उभारत नाही, तर महाराष्ट्रातील विद्यापीठांनाही आंतरराष्ट्रीय सहकार्याच्या संधी प्रदान करत आहे.यामध्ये Twinning, Dual Degree आणि Joint Degree कार्यक्रम संशोधन सहकार्य व विद्यार्थी-प्राध्यापक आदान-प्रदान असून उद्यमशीलता व नवोन्मेषावर आधारित आहे

त्यामुळे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील गुणवत्ता वाढविणे या सहकार्यामुळे राज्यातील विद्यापीठांचे ग्लोबल रँकिंग सुधारण्यास मदत होईल, विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावरील करिअर व संधी उपलब्ध होतील आणि उद्योग-संस्थांशी थेट जोडले जातील

मुंबई रायजिंग – क्रिएटिंग ॲन इंटरनॅशनल एज्युकेशन सिटी” या महाराष्ट्र सरकारच्या उपक्रमाअंतर्गत, पाच जागतिक स्तरावर प्रसिद्ध परदेशी विद्यापीठांना मुंबई आणि नवी मुंबईत त्यांच्या कॅम्पसची स्थापना करण्यासाठी इरादापत्रे (LOIs) अधिकृतपणे प्रदान केली जाणार आहेत. यामध्ये अ‍ॅबर्डीन विद्यापीठ (Aberdeen University), यॉर्क विद्यापीठ (University of York), वेस्टर्न ऑस्ट्रेलिया विद्यापीठ (University of Western Australia), इलिनॉय इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी (Illinois Institute of Technology) आणि इस्तितुतो यूरोपीओ दी डिझाईन (Istituto Europeo di Design – IED) या विद्यापीठांचा समावेश आहे.

या कार्यक्रमाला केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या समारंभात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थित पार पडणार आहे.

महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शनाखाली, सिडकोमार्फत उभारल्या जाणाऱ्या या आंतरराष्ट्रीय एज्युसिटीमुळे संपूर्ण भारतातील विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाच्या शिक्षणाची संधी मिळणार असून, हे शिक्षण विविध संस्कृतींच्या आदान-प्रदानाला चालना देईल आणि विविध पार्श्वभूमीतील विद्यार्थी व प्राध्यापकांमध्ये सहकार्य व संवाद वाढवेल. भारतामध्येच आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण उपलब्ध करून देणे आणि परदेशी विद्यापीठांचे कॅम्पस महाराष्ट्रात स्थापन करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. आंतरराष्ट्रीय एज्युकेशन सिटी प्रकल्पाच्या अंतर्गत, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पाच किलोमीटर परिसरात सर्वोच्च 10 परदेशी विद्यापीठांचे कॅम्पस उभारण्याचे नियोजन आहे. ही देशातील पहिली अशा प्रकारची आंतरराष्ट्रीय एज्युकेशन सिटी ठरणार आहे.

हा प्रकल्प नवी मुंबई व मुंबईला जागतिक शैक्षणिक केंद्र म्हणून ओळख मिळवून देईल आणि महाराष्ट्र राज्याचे एक ट्रिलियन अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट व भारताचे पाच ट्रिलियन अर्थव्यवस्थेचे आर्थिक लक्ष्य २०२९ पर्यंत साध्य करण्यासाठी एक महत्त्वाचा घटक ठरेल.

हा उपक्रम म्हणजे ‘वसुधैव कुटुंबकम्’ या तत्त्वज्ञानाचा शैक्षणिक अविष्कार आहे. महाराष्ट्राची ही वाटचाल केवळ राज्यापुरती मर्यादित नसून, ती नव्या भारताच्या ज्ञानाधिष्ठित विकासाची दिशा दर्शवणारी आहे.

-काशीबाई हनुमंत  थोरात धायगुडे

विभागीय संपर्क अधिकारी

००००

मुंबई उच्च न्यायालय मुख्य न्यायमूर्ती व न्यायमूर्ती मंडळ यांनी व्यक्त केल्या अहमदाबाद विमान दुर्घटनाप्रकरणी संवेदना

मुंबई, दि.१३ : मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती तसेच न्यायमूर्ती मंडळ आणि नोंदणी विभागातील अधिकारी यांनी अहमदाबाद येथे झालेल्या दुर्दैवी विमान अपघातात प्राण गमावलेल्या आणि गंभीर जखमी झालेल्या नागरिकांच्या कुटुंबियांप्रती आपल्या तीव्र संवेदना व्यक्त केल्या आहेत.

या दु:खद प्रसंगी पीडित कुटुंबियांच्या सोबत खंबीरपणे उभे असून, त्यांच्या दु:खात सामील असल्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत. पीडित कुटुंबियांना या दुःखाच्या प्रसंगी बळ आणि मानसिक आधार मिळावा, यासाठी सदिच्छा व प्रार्थना व्यक्त केल्या आहेत.

त्याचप्रमाणे, बी. जे. मेडिकल कॉलेज आणि सिव्हिल हॉस्पिटल, अहमदाबाद येथील प्राध्यापक, विद्यार्थी आणि कर्मचारी वर्गासाठीही आपल्या सदिच्छा व प्रार्थना व्यक्त केल्या आहेत.

००००

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा सामाजिक न्यायाच्या विचारांना चालना देणारा ठरेल – विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे

नवी दिल्ली 13  : मुंबईतील इंदू मिल येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक तयार होत असून या ठिकाणी 350 फूट उंच उभारण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर  यांचा भव्य पुतळा हा सामाजिक न्यायाच्या विचारांना चालना देणारा ठरेल असे पुतळ्याचे सुरू असलेले काम पाहिल्यानंतर महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी सांगितले.

सुप्रसिद्ध मूर्तिकार पद्मभूषण राम सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली गाझियाबाद येथे त्यांच्या वर्कशॉपमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयाचे काम जलदगतीने सुरू आहे. श्री बनसोडे यांनी या पुतळयाच्या कामाची पाहणी केली, तसेच  या प्रकल्पाला गती देण्यासाठी महत्त्वपूर्ण सूचना दिल्या. हा पुतळा तयार झाल्यावर जागतिक किर्तीमान तर ठरेलच सोबतच  देशासाठी प्रेरणादायीही ठरेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

राम सुतार यांचे चिरंजीव अनिल सुतार प्रत्यक्ष काम पाहत असून त्यांना येणाऱ्या अडचणी उपाध्यक्ष श्री. बनसोडे यांनी समजून घेतल्या तसेच त्यावर तातडीने उपाययोजना करण्यात येतील असे सांगितले. पुढील आठवडयात यासंदर्भात मुंबई येथे बैठक आयोजित करून या प्रकल्पाशी संबंधित सर्व विभागांची बैठक आयोजित करण्यात येईल, अशी माहितीही श्री बनसोडे यांनी यावेळी  दिली.

विधानसभा उपाध्यक्ष बनसोडे यांनी पुतळ्याच्या निर्मिती प्रक्रियेची बारकाईने पाहणी केली. 100 फुट  उंच पादपीठासह 350 फूट उंचीच्या या पुतळ्याचे काम सध्या सुरुवातीच्या टप्प्यात आहे. पुतळ्याचा पायाचा भाग (बूट) 65 फूट लांब आणि 35 फूट रुंद असून, त्यासाठी सुमारे 20 टन धातूचा वापर होणार आहे. या पुतळयाचे काम डिसेंबर 2026 पर्यंत काम पूर्ण होण्याचा अंदाज आहे. श्री.बनसोडे यांनी पुतळ्याच्या गुणवत्तेची आणि तांत्रिक बाबींची तपासणी करून राम सुतार आणि अधिकाऱ्यांशी चर्चा केली.

यावेळी झालेल्या बैठकीत राम सुतार, त्यांचे चिरंजीव अनिल सुतार, महाराष्ट्र विधानसभेचे सचिव डॉ. विलास आठवले,  एमएमआरडीएचे मुख्य अभियंता प्रकाश भांगरे, उमेश साळवी, शापुरजी पालनजीचे उमेश साळुंखे, शशी प्रभू अँड असोसिएट्सचे अतुल कैटीकवार, भदंत राहूल बोधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरीनिर्वाण दिन समन्वय समितीचे नागसेन कांबळे, सुबोध भारत उपस्थित होते.

विधानसभा उपाध्यक्ष यांनी त्यांच्या दिल्ली दौऱ्याची सुरुवात महाराष्ट्र सदनातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून केली. त्यानंतर त्यांनी  अलीपुर रोडवरील डॉ.आंबेडकर नॅशनल मेमोरियलला भेट दिली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आयुष्यावर आधारीत तसेच त्यांनी केलेल्या कार्याची माहिती या संग्रहालयाच्या माध्यमातून जनसामान्यांना कळेल असे सुरेख संग्रहालय बनविले असल्याचे गौरवउद्गार त्यांनी काढले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय सेंटरचे संचालक आकाश पाटील यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. जनपथ येथे असलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय सेंटरलाही त्यांनी सदिच्छा भेट दिली. या भेटी दरम्यान महाराष्ट्र परिचय केंद्रामार्फत तयार करण्यात आलेली खासदार परिचय पुस्तिका विधानसभा अध्यक्ष बनसोडे यांना यावेळी देण्यात आली.

0000

शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी समिती स्थापन करणार -पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

अमरावती, दि 13 (जिमाका): शेतकऱ्यांची कर्जमुक्ती हा गहण विषय आहे. तसेच कर्जमाफी करताना कोणत्या घटकाची कर्जमाफी करावी याबाबत क्लिष्टताही आहे. त्यामुळे गरजू शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी, यासाठी समिती स्थापन करण्यात येणार आहे. या समितीच्या शिफारशीच्या अहवालानंतर शेतकऱ्यांच्या कर्जाचे वर्गीकरण करून कर्जमुक्तीचा सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

गुरुकुंज मोझरी येथे आज श्री. बावनकुळे यांनी बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाला भेट दिली. यावेळी आमदार प्रताप अडसड, चंदू यावलकर, विभागीय आयुक्त श्वेता सिंघल, जिल्हाधिकारी आशिष येरेकर, जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद, पोलीस आयुक्त अरविंद चावरिया, उपविभागीय अधिकारी मिन्नू पीएम आदी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. बावनकुळे म्हणाले, शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करण्याचे धोरण राज्य शासनाने स्वीकारले आहे. प्रामुख्याने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय होणे गरजेचे आहे. याबाबत उच्च स्तरावर बैठकही घेण्यात आल्या आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचा निर्णय घेताना शेवटच्या घटकातील एकही शेतकरी सुटू नये, याची खबरदारी घेण्यात येणार आहे. कर्जमाफीसाठी स्थापन करण्यात येणाऱ्या समितीच्या बैठकांना बच्चू कडू यांना निमंत्रित करण्यात येईल. त्यांच्या सर्व सूचना आणि प्रस्तावांचा आग्रहपूर्वक समावेश केला जाईल. या समितीचा अहवाल सर्वांसाठी खुला राहील. त्यासोबतच येत्या खरीप हंगामासाठी कर्ज थकीत असलेल्या शेतकऱ्यांनाही कर्ज मिळणे गरजेचे आहे. या शेतकऱ्यांनाही नव्याने कर्ज मिळावे यासाठीही मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा करण्यात येतील.

आंदोलनात दिव्यांगांना देण्यात येणारे अनुदान वाढवावे, अशी महत्त्वाची मागणी आहे. याबाबत येत्या पावसाळी अधिवेशनात पुरवणी मागण्या सादर करून निर्णय घेण्यात येईल. शासनाकडून कोणत्याही योजनेत निधी देताना त्याची अर्थसंकल्पात तरतूद असणे गरजेचे आहे. यामुळे अपंगांचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यास मदत होईल.

शेतकऱ्यांच्या संदर्भात असलेल्या पशुसंवर्धन, जलसंधारण, महसूल, पणन आदी मंत्र्यांशी चर्चा झाली असून याबाबत पुढील आठवड्यात बैठका घेऊन निर्णय घेण्यात येईल. आंदोलनाच्या निमित्ताने मांडण्यात आलेल्या सर्व मागण्यांबाबत शासन सकारात्मक आहे. त्यामुळे उपोषण सोडावे, असे आवाहन श्री. बावनकुळे यांनी यावेळी केले.

पालकमंत्र्यांशी झालेल्या चर्चेनुसार आंदोलन मागे घेण्यासंदर्भात कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल, असे यावेळी बच्चू कडू यांनी जाहीर केले. यानंतर श्री. बावनकुळे यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेतले.

000000

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सातारा जिल्ह्यात आगमन

सातारा दि.13- राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असून सातारा येथील बॉम्बे रेस्टारंट चौक येथे राज्याचे पर्यटन, खनिकर्म व माजी सैनिक कल्याण मंत्री व सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्वागत केले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दरे खु. येथे मुक्कामी असणार आहेत.
000

अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन आढळल्यास अन्न व्यवसायिकाविरुद्ध कायदेशीर कारवाई – आयुक्त राजेश नार्वेकर

मुंबई दि१२ : अन्न सुरक्षा व मानके अधिनियम२००६ अंतर्गतअन्न सुरक्षा व मानके (परवाना व नोंदणी) नियमन२०११ मधील अनुसूची ४ मधील सूचनांनुसार शाकाहारी व मांसाहारी पदार्थाची तयारीप्रक्रियाशिजवणे वेगळी असावी. शाकाहारी अन्नपदार्थाची मांसाहारी अन्नपदार्थापासून प्रक्रियात्मक व साठवणीच्या टप्प्यावर स्पष्टपणे वेगळी व्यवस्था करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.  या अन्न सुरक्षा नियमांचे पालन न करणाऱ्या अन्न व्यावसायिकांवर परवाना रद्ददंड आकारणे किंवा कायदेशीर कारवाई करण्यात येईलअसे अन्न व औषध प्रशासनाचे अन्न सुरक्षा आयुक्त राजेश नार्वेकर यांनी कळविले आहे.

 सर्व अन्न व्यवसायिकांनी अन्न सुरक्षेबाबत असलेल्या नियमांचे पालन करणे अनिवार्य आहे.  अन्न व औषध प्रशासनामार्फत गतवर्षी राज्यातील ३० हजार अन्न व्यवसायिकांना अन्न सुरक्षेबाबत प्रशिक्षण  देण्यात आले आहे तर या वर्षी एक लाख अन्न व्यवसायिकांना प्रशिक्षण देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

 अन्न सुरक्षा ही केवळ कायदेशीर बाब नसून ग्राहकांच्या आरोग्याशी संबंधित अत्यंत महत्त्वाची सामाजिक जबाबदारी आहे. नियमांच्या पालनात दोषी अन्न आस्थापनाना त्वरित नोटीसकारवाई व आवश्यक ती कायदेशीर कारवाई केली जात असल्याचे त्यांनी कळविले आहे.

 अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र आणि भारतीय अन्न व सुरक्षा आणि मानके प्राधिकरण  (FSSAI) यांच्या संयुक्त विद्यमाने अन्नसुरक्षा व प्रमाणपत्र प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत राज्यभर विविध प्रशिक्षण शिबिरेकार्यशाळा व जनजागृती मोहिम राबविण्यात येत आहे. अन्न व औषध प्रशासनात एकूण नवीन १८९ अन्न सुरक्षा अधिकारी ७ जून २०२५ रोजी  रुजू झालेले असल्याने अन्न आस्थापना तपासणी संख्या निश्चितच वाढणार आहे. राज्यभरातील हॉटेल्सरेस्टॉरंट्स व उपाहारगृहांमध्ये नियमित तपासण्या केल्या जात असून तपासणीत दोषी आढळणाऱ्यांवर अन्न सुरक्षा व मानके अधिनियम २००६ अंतर्गत कारवाई करण्यात येईल.

 अन्न भेसळीसंदर्भात नागरिकांनीही हेल्पलाइन किंवा Food Safety Connect App च्या माध्यमातून तक्रार नोंदवावी. अधिक माहितीसाठी किंवा मार्गदर्शनासाठी आपले नजीकचे अन्न व औषध प्रशासन कार्यालय किंवा https://fda.maharashtra.gov.in या संकेतस्थळास भेट द्यावी, असेही आयुक्त श्री. नार्वेकर यांनी कळविले आहे.

00000

एकनाथ पोवार/विसंअ

ताज्या बातम्या

पायाभूत विकास प्रकल्पांसाठी युनिक आयडी पोर्टल प्रशिक्षण कार्यशाळा

0
छत्रपती संभाजीनगर, दि.२० (विमाका): राज्यातील प्रत्येक पायाभूत प्रकल्पासाठी युनिक पायाभूत सुविधा आयडी (Infra ID Portal) संदर्भात प्रशिक्षण कार्यशाळेचे उद्घाटन विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांच्या...

यशवंतराव चव्हाण पंचायत राज अभियानांतर्गत गुणवंतांचा गौरव

0
छत्रपती संभाजीनगर, दि. २० :“प्रामाणिकपणे, जबाबदारीने आणि कार्यतत्परतेने काम करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव हा इतरांसाठी प्रेरणादायी ठरतो,” असे प्रतिपादन विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी केले. यशवंतराव...

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा – पालकमंत्री संजय राठोड

0
 पंचनाम्यातून नुकसानग्रस्त सुटणार नाही याची दक्षता घ्या संबंधित विभागांनी समन्वयाने काम करण्याचे निर्देश यवतमाळ, दि. २० (जिमाका): गेले दोन दिवस जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस...

मुख्यमंत्री सहाय्यता निधी – प्रभावी सामाजिक कल्याण योजना

0
मुख्यमंत्री सहाय्यता निधी ही राज्य शासनाची एक प्रभावी सामाजिक कल्याण योजना असून, ती आर्थिकदृष्ट्या दुर्बल, गंभीर आजारांनी ग्रस्त व आपत्तीग्रस्त नागरिकांना वेळेवर मदत पोहोचवण्याच्या...

रुग्णांना उपचारासाठी मिळतोय मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा भक्कम आधार !

0
३० रुग्णांना उपचारासाठी २३ लक्ष रुपयांचा निधी वितरीत राज्यातील सर्वसामान्य नागरिकांना आरोग्यपूर्ण जीवन जगता यावे, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मागर्दशनाखाली मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता...