बुधवार, ऑगस्ट 20, 2025
Home Blog Page 161

‘दिलखुलास’ कार्यक्रमात संचालक सतिशकुमार खडके यांची मुलाखत

मुंबई दि. १३ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात ‘आपत्ती पूर्व व आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी करण्यात आलेले नियोजन व अंमलबजावणी’ या विषयासंदर्भात राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाचे संचालक सतिशकुमार खडके यांच्या विशेष मुलाखतीचे प्रसारण होणार आहे.

‘दिलखुलास’ कार्यक्रमातून ही मुलाखत सोमवार दि. १६ मंगळवार दि.१७ बुधवार दि.१८ गुरुवार दि. १९ आणि शुक्रवार दि.२० जून २०२५ रोजी आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून व ‘न्यूज ऑन एआयआर’या मोबाईल अॅपवर सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होणार आहे. निवेदक सुषमा जाधव यांनी ही मुलाखत घेतली आहे.

आजच्या बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर वाढते तापमान, वेळी-अवेळी पडणारा पाऊस आणि इतर अनपेक्षित नैसर्गिक घटना यामुळे आपल्यासमोर अनेक आव्हाने उभी राहात आहेत. नैसर्गिक आपत्तींपासून ते मानवनिर्मित आपत्तींपर्यंत आणि आगीसारख्या दुर्घटनांपर्यंत अनेक घटनांचा आपल्याला सामना करावा लागत आहे. या संकटांचा शास्त्रशुद्ध, प्रभावी आणि सुसंघटित पद्धतीने सामना करण्यासाठी शासनाकडून सातत्याने विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण ही त्रिस्तरीय यंत्रणा अखंडपणे कार्यरत असून, आपत्तीपूर्व नियोजन, तत्काळ प्रतिसाद आणि पुनर्वसन या सर्व टप्प्यांवर ही यंत्रणा सजगतेने काम करत आहे.

आपत्ती टाळता यावी आणि आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांचे जीवित आणि मालमत्तेचे संरक्षण व्हावे, यासाठी विविध स्तरांवर नियोजनबद्ध कार्यवाही केली जाते. गावपातळीवर स्थानिक प्रशासन, स्वयंसेवी संस्था आणि नागरिक यांच्याशी समन्वय साधून, सामूहिक जबाबदारीने आपत्ती व्यवस्थापन अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी कशा प्रकारे नियोजन केले जाते. या विषयावर ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून  संचालक श्री. खडके यांनी सविस्तर माहिती दिली आहे.

000

जयश्री कोल्हे/ससं/

स्वामी विवेकानंद विद्यालयाचे वर्ग मूळ मान्य ठिकाणीच स्थलांतरित – शालेय शिक्षण विभागाचे स्पष्टीकरण

मुंबई, दि. 13 : चेंबूर येथील विवेकानंद एज्युकेशन सोसायटीच्या स्वामी विवेकानंद विद्यालय या शाळेचे वर्ग मूळ मान्य ठिकाणीच स्थलांतरित करण्यात आले असून त्यास बहुसंख्य पालकांचा प्रतिसाद प्राप्त झाला असल्याचे शालेय शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.

विवेकानंद एज्युकेशन सोसायटीचे स्वामी विवेकानंद विद्यालय, सिंधी सोसायटी, चेंबूर या शाळेच्या विद्यार्थ्यांचे पूर्वकल्पना न देता अन्य शाळेत स्थलांतर झाल्याच्या आशयाच्या बातम्या काही माध्यमांमधून प्रसिद्ध झाल्या होत्या. त्या अनुषंगाने शिक्षण उपनिरीक्षक, उत्तर विभाग, चेंबूर मुंबई यांनी चौकशी करुन, या शाळेचे वर्ग मूळ मान्य ठिकाणीच स्थलांतरित करण्यात आले असून त्यास बहुसंख्य पालकांचा प्रतिसाद प्राप्त झालेला आहे. सदर स्थलांतर हे नियोजनपूर्वक बहुतांश पालकांशी सुसंवाद साधून करण्यात आले असल्याबाबत कळविले आहे, अशी माहिती मुंबई विभागीय शिक्षण उपसंचालक संदीप संगवे यांनी दिली आहे.

0000

बी.सी.झंवर/विसंअ/

शाहिदी शताब्दी व गुरु-ता-गद्दी समागमच्या यशस्वी आयोजनासाठी राज्य शासनाचे संपूर्ण सहकार्य – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. १३ : गुरु तेग बहादूर साहेबजी यांचा ३५० वा शाहिदी आणि गुरुगोविंद सिंगजी यांचे ३५० वा गुरु-ता-गद्दी समागम कार्यक्रमाचे आयोजन राज्यात नांदेड, नागपूर व मुंबई या तीन ठिकाणी करण्यात येईल. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी राज्य शासन संपूर्ण सहकार्य करेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देली. या कार्यक्रमांमधून श्री गुरु तेग बहादूर साहेबजी व गुरुगोविंद सिंगजी यांचा इतिहास निश्चितच पुढील पिढीपर्यंत पोहोचविता येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

वर्षा निवासस्थानी श्री गुरु तेग बहादूर ३५० शाहिदी समागम व गुरु गोविंद सिंग गुरु-ता-गद्दी समागम कार्यक्रमाच्या आयोजनबाबत राज्यस्तरीय समितीची बैठक पार पडली. बैठकीस राज्यस्तरीय समितीचे मार्गदर्शक संत ज्ञानी हरनाम सिंहजी खालसा, धर्मगुरू संत श्री बाबूसिह महाराज, संत रघुमुनीजी महाराज, गोपाल चैतन्यजी महाराज, शरद ढोले उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, संघर्ष काळात समाजाचे शोषण होत असताना गुरु तेग बहादूर यांनी समाजासाठी समर्पण केले. औरंगजेबाच्या जुलमी राजवटीत होत असलेला अन्याय दूर करण्यासाठी त्यांनी लढा दिला. समाजासाठी ते शहीद झाले, हा इतिहास पुढील पिढीला कळणे अत्यंत आवश्यक आहे. या कार्यक्रमांमधून मागील इतिहास सांगणे हेच अपेक्षित नाही, तर या पिढीच्या असलेल्या जबाबदाऱ्यांची जाणीव त्यांना करून देण्यात येणार आहे.

देशाच्या मजबूतीकरणासाठी लढणाऱ्या लोकांचा हा कार्यक्रम असणार आहे. वेगवेगळे समाज एकत्र येऊन हा कार्यक्रम होणार आहे. या सर्वांच्या एकजुटीतून देश घडविण्याची आणि आपला इतिहास हा समाजाच्या माध्यमातून नवीन पिढीपर्यंत पोहोचविण्याची ही एक संधी असल्याचे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.

यावेळी राज्यस्तरीय समितीचे समन्वयक रामेश्वर नाईक यांनी माहिती दिली. समागमाचे आयोजन नांदेड येथे १५ व १६ नोव्हेंबर, नागपूर येथे ६ डिसेंबर, नवी मुंबई येथे २१ व २२ डिसेंबर २०२५ दरम्यान करण्याचे नियोजन आहे. बैठकीच्या सुरुवातीला मार्गदर्शक संत श्री बाबूसिंहजी महाराज, संत ज्ञानी हरनाम सिंहजी खालसा, शरदराव ढोले यांनीही आपले विचार व्यक्त केले.

बैठकीला मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव इक्बालसिंह चहल, अपर मुख्य सचिव (वित्त) ओ. पी गुप्ता, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव के. गोविंदराज, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह, अपर पोलिस महासंचालक निखिल गुप्ता आदी उपस्थित होते.

००००

नीलेश तायडे/विसंअ/

रक्त देऊ या..आशा जागवू या : एकत्रितपणे जीव वाचवू या…।

मानवी रक्ताची गरज कधीही न संपणारी असल्यामुळे रक्तदानाची प्रेरणा समाजात द्दढ करणे, निरोगी रक्तदात्यांची फौज तयार करून रक्तदात्यांमध्ये स्वैच्छिक रक्तदानाविषयी जनजागृती करणे, सामाजिक बांधिलकी जोपासून रक्तदात्यांविषयी कृतज्ञता निर्माण व्हावी…  जागतिक रक्तदाता दिनाच्या निमित्ताने एवढाच उद्देश..

“रक्तदाता” हा रुग्णांचा जीव वाचविणारा महत्त्वाचा दुवा आहे. अनेक वर्षांपासून ज्या रक्तदात्यांनी सामाजिक बांधिलकी ठेवून आयोजित रक्तदान शिबिरात, रक्तकेंद्रात स्वयंस्फूर्तीने जवळच्या शासन मान्यता प्राप्त रक्तकेंद्रात गरजू रुग्णांसाठी रक्तदान (२५,५०,१०० किंवा त्यापेक्षा जास्त वेळा )केलेल्या रक्तदात्यांप्रति आभार व्यक्त  करण्याचा दिवस म्हणजे “१४ जून जागतिक रक्तदाता दिन”.

मानवाचे प्राण वाचवण्यासाठी ज्या रक्तदात्यांनी आपले स्वैच्छिक रक्तदान करुन रक्तदात्यांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस…..म्हणजे १४ जून जागतिक रक्तदाता दिवस..

ए,बी,ओ ‘रक्तगटाचा जनक ‘ कार्ल लँडस्टेनर यांच्या जयंतीदिनी १४ जून  हा ‘जागतिक रक्तदाता दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. सहानुभूती व सामाजिक बांधिलकी व स्वेच्छेने रक्तदान करणारे रक्तदाते यांना प्रोत्साहित करण्यासाठी हा ‘जागतिक रक्तदाता दिवस’ साजरा करण्यात येतो.

या वर्षाचे शासनाचे घोषवाक्य आहे, झालेल्या;

“रक्त देऊ या..आशा जागवू या… : एकत्रितपणे जीव वाचवू या…।”

“Give blood, give hope: together we save lives..!”

आधुनिक तंत्रज्ञान प्रत्येक क्षेत्रात प्रगत झाले असले तरी पण अजूनही मानवी रक्ताला कुठलाही पर्याय  आजपावेतो मानवाला अथवा शास्रज्ञांना सापडला नाही. यासाठी माणसाचे प्राण वाचवण्यासाठी मानसाचेच रक्त लागते. हे आजही जगजाहीर आहे. कुणाला कधी आणि कोणत्यावेळी रक्ताची गरज भासू शकते हे कोणीही सांगू शकत नाही.

“रक्त” हे  प्रत्येक मानवाच्या शरीरात तयार होत असते. रक्तदान ही जीव वाचविण्याची प्रक्रिया आहे आणि जीव वाचवणे नक्कीच सामान्य गोष्ट नाही! ही बाब नागरिकांच्या लक्षात आणून देऊन स्वैच्छिक रक्तदान मोहीम राबविणे महत्त्वाचे ठरते.

आपल्या शरीराला जिवंत ठेवणाऱ्या घटकांपैकी सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे रक्त.रक्त हे शरीराचा अविभाज्य घटक असुन संपूर्ण मासपेशींना तसेच अवयवांना पोषक व प्राणवायू (आँक्सिजन)देण्याचे कार्य रक्त करत असते.

स्वैच्छिक रक्तदान…वाचवी रुग्णांचे प्राण…विषयी जनजागृती : 

१)रक्त हे फार काळ टिकवून अथवा साठवता  येत नसल्यामुळे सतत रक्तदानाद्वारे रक्ताची गरज पूर्ण होते.

२)”रक्तदान” थँलेसेमिया, हिमोफिलिया ,ल्युकेमिया इ. रुग्णांसाठी “लाईफ लाईन” आहे .अशा रुग्णांना नेहमी रक्ताची गरज भासते. अशा रुग्णांना कधीही रक्ताची कमतरता भासू नये म्हणून स्वैच्छिक रक्तदान महत्त्वाचे…..!

३)अतिदक्षता,प्रसुती,अपघात, रक्तक्षय,अतिरक्तस्राव इ.आदी अशा रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी तातडीने रक्ताची आवश्यकता भासते.अशा रुग्णांसाठी स्वैच्छिक रक्तदान महत्त्वाचे….!

४)आपल्या रक्तदान केलेल्या एका युनिट मधून रक्त व रक्तघटक वेगळे केले जातात.(तांबड्या पेशी, पांढऱ्या पेशी(प्लाझमा),रक्तबिंबीका (प्लेटलेट्स)इ.अशाप्रकारे आपल्या रक्तदानाने एक ते तीन रुग्णांचे प्राण आपण वाचवू शकता.

५) माझ्या रक्तदानाने निश्चितच गरजूंना रक्त पुरवठा झाल्याचे समाधान मिळणार..यासाठी स्वैच्छिक रक्तदान महत्त्वाचे.!

६) रक्तदानाने….  शरीरातील रक्तदाब,कोलेस्टेराँलचे प्रमाण योग्य नियंत्रण  राहते.

७)   समाजाचे ऋण फेडायची ही एक संधी रक्तदानामुळे मिळते..

८) नवीन रक्त तयार करण्याची क्षमता वाढते.

९)रक्तदान केल्यानंतर चोवीस तास ते सात दिवसात नैसर्गिकरित्या झिज भरून निघते.

१०)रक्तदान केल्यानंतर नवीन पेशी तयार होण्यासाठी नवचेतना निर्माण होते.

११)शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार रक्तदान प्रक्रियेत रक्तदानावेळी सुरक्षिततचे काटेकोरपणे पालन केले जाते.

१२)समाजाचा एक जबाबदार नागरिक म्हणून निःस्वार्थीपणे, समाजहितासाठी, राष्ट्रसेवा म्हणून रक्तदान महत्त्वाचे आहे.

१३)निरोगी व्यक्ती दर तीन महिन्यांनी रक्तदान करु शकता.

यासाठी शासनस्तरावरुन समाजात स्वैच्छिक रक्तदानाबाबत सामाजिक कर्तव्याची जाणीव करून देण्यासाठी विविध उपक्रम, अभियान, जनजागृती कार्यक्रम राबविण्यात येतात. सोबतच स्वैच्छिक रक्तदान विषयी नागरीकांमध्ये सामाजिक बांधिलकी, समाजहित, राष्ट्रीयतेची भावना, युवा शक्तीमध्ये रक्तदानाविषयी गैरसमज दूर करून स्वैच्छिक रक्तदानाविषयी मोठ्या प्रमाणात जनजागृती करणे, सुदृढ मानसिक आरोग्य, स्वैच्छिक रक्तदानाबाबत समाजात सकारात्मक बदल घडवून आणणे हे अत्यंत महत्वाचे आहे.

यासाठी केंद्र सरकार अंतर्गत राष्ट्रीय रक्त संक्रमण परिषद, महाराष्ट्र शासनातर्फे आरोग्य विभाग,महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सो.,राज्य रक्त संक्रमण परिषद, धर्मदाय,  सांस्कृतिक/सामाजिक सेवाभावी संस्था , विविध संघटना इ.मार्फत शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार  स्वैच्छिक रक्तदान शिबिरे तसेच जनजागृती पर कार्यक्रम आयोजित केले जातात. भारताच्या लोकसंख्येच्या प्रमाणात स्वैच्छिक रक्तदानाचे प्रमाण कमी आहे. पण शासन स्तरावर जनजागृती मोहीम वेळोवेळी राबविण्यात येते.

आपल्या रक्तदानामुळे, आपण अनेक लोकांचे जीवन वाचवू शकतो. स्वैच्छिक रक्तदान हे सामाजिक कार्याबरोबर कर्तव्य देखील आहे. जे आपल्याला आपल्या समाजात जोपासण्याची गरज आहे.

“रक्तदाता” हा रुग्णांसाठी नेहमी आशेचा किरण ठरला आहे. “रक्त” हे कृत्रिमरीत्या तयार करता येत नाही तर ते तयार होते तुमच्या आमच्या मानवी शरीरात.यासाठी “रक्तदाता” म्हणून आपण स्वतःहून स्वैच्छिक रक्तदान करणे महत्त्वाचे ठरते. यासाठी शासनाच्या घोषवाक्यानूसार “करुया स्वैच्छिक रक्तदान… गरजूं रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी … आशा जागवू… या…!

यासाठी सामाजिक बांधिलकी ठेऊन एकत्रितपणे स्वैच्छिक रक्तदान मोहीम राबवून…. रुग्णांचे प्राण वाचवू या..!

– हेमकांत सोनार, रक्तपेढी तंत्रज्ञ, रक्त केंद्र, अलिबाग – रायगड.
भ्रमणध्वनी- 9511882578

00000

-संकलन

जिल्हा माहिती कार्यालय,

रायगड – अलिबाग

परभणी जिल्ह्यातील जलसंधारण महामंडळाच्या कामांची पाहणी करावी : विधानसभा उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांचे निर्देश

मुंबई, दि.१२ : महाराष्ट्र जलसंधारण महामंडळ छत्रपती संभाजीनगर अंतर्गत महाराष्ट्र जलसंधारण प्रशासकीय मान्यता प्राप्त असलेल्या परभणी जिल्ह्यातील सेलू जिंतूर तालुक्यातील कामांची पाहणी करावी, असे निर्देश विधानसभा उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांनी दिले.

विधानभवन येथे महाराष्ट्र जलसंधारण महामंडळ छत्रपती संभाजीनगर अंतर्गत महाराष्ट्र जलसंधारण प्रशासकीय मान्यता प्राप्त असलेल्या परभणी जिल्ह्यातील सेलू जिंतूर येथील योजनेच्या कामासंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला मृद व जलसंधारण विभागाचे सचिव गणेश पाटील, महाराष्ट्र जलसंधारण महामंडळाचे संचालक सु.पा.कुशिरे, छत्रपती संभाजीनगरचे अ.हा.परांडे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे क्षेत्र अधिकारी किरण मळभागे, अक्षय काकडे उपस्थित होते.

विधानसभा उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे म्हणाले की, महाराष्ट्र जलसंधारण महामंडळ छत्रपती संभाजीनगर अंतर्गत देण्यात आलेल्या कामाची निविदा ही सर्व अटी व शर्तींचे पालन करून केली आहे. या निविदेतील सर्व कामे पूर्ण केली आहेत. मात्र शासनाने दिलेल्या निकषांची पूर्तता करून केलेल्या कामांचीच बीले काढली जावीत. नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास विभागाने योग्य ती कारवाई करावी तसेच निविदेतील कामांची पाहणी संयुक्तरित्या करण्याचे निर्देश यावेळी त्यांनी दिले.

000

संध्या गरवारे, विसंअ

महाबळेश्वर येथील गहू गेरवा संशोधन केंद्राच्या अतिथीगृहाचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्याहस्ते भूमिपूजन

सातारा दि. 11 (जि.मा.का) : महाबळेश्वर येथील विभागीय गहू गेरवा संशोधन केंद्रामध्ये गव्हाच्या रोगावर संशोधन सुरु असून आता स्ट्रॉबेरी संदर्भात संशोधनास मान्यता मिळाली आहे. त्याचे देखील काम सुरु आहे. लवकरात लवकर केंद्र अद्ययावत करून शेतकऱ्यांना अधिकाधिक सुविधा देण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी केले.
कृषिमंत्री तथा महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरीचे प्रति कुलपती माणिकराव कोकाटे हे महाबळेश्वर येथील वेण्णालेक नजीक महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी यांच्या विभागीय गहू गेरवा संशोधन केंद्राच्या नव्याने उभारण्यात येत असलेल्या इमारत अतिथीगृह भूमिपूजनप्रसंगी बोलत होते.
श्री. कोकाटे म्हणाले, महाबळेश्वर येथे संशोधनासाठी येणारे शास्त्रज्ञ, परदेशी पाहुणे व शेतकरी याना राहण्यासाठी उपयोगी होईल. माणिकराव कोकाटे यांनी सध्याच्या जुन्या अतिथिगृहाची पाहणी केली. त्यानंतर नव्याने उभारण्यात येणाऱ्या इमारतीची जागा व आराखडा पहिला. यातील बारकावे समजून घेत अभियंत्यांना काही बदल कारण्यासह महाबळेश्वर पर्यटन स्थळास शोभेल असे दर्जेदार काम करण्याबाबत सूचना दिल्या.
यावेळी महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद पुणेचे उपाध्यक्ष तुषार पवार, विद्यापीठ अभियंता डॉ. मिलिंद ढोके गहू गेरवा कवक शास्त्रज्ञ डॉ. दर्शन कदम, गहू रोग शास्त्रज्ञ डॉ. मनीष सुशीर, वनस्पती रोग शास्त्रज्ञ डॉ. विक्रांत साळी, जिल्हा कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे यांच्यासह गहू गेरवा संशोधन केंद्रातील कर्मचारी,कृषी विज्ञान केंद्र बोरगाव येथील अधिकारी कर्मचाऱ्यासह मान्यवर उपस्थित होते.
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी यांच्या विभागीय गहू गेरवा संशोधन केंद्राच्या माध्यमातून उभारण्यात येणारे हे अतिथीगृह भारतीय कृषी अनुसंधान नवी दिल्ली येथील शास्त्रज्ञ, आंतरराष्ट्रीय मका आणि गहू सुधारणा केंद्र (CIMMYT) मेक्सिको येथील गहू तांबेरा शास्त्रज्ञ रोगावर काम करणारे शास्त्रज्ञ व शेतकरी यांच्यासाठी उपयोगी येणार असल्याचे गहू गेरवा कवक शास्त्रज्ञ डॉ दर्शन कदम यांनी सांगितले.

भारतीय निवडणूक कायद्यांनुसार मतदारांची नावे केंद्रीकृत स्वरूपात समाविष्ट किंवा वगळण्याची कोणतीही तरतूद नाही – मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य

मुंबई, दि. १२ : भारतीय निवडणूक कायद्यांनुसार, मतदारांची नावे केंद्रीकृत स्वरूपात समाविष्ट किंवा वगळण्याची कोणतीही तरतूद नाही. लोकप्रतिनिधित्व अधिनियम, १९५० व मतदार नोंदणी नियम, १९६० नुसार, मतदार यादी मतदान केंद्रनिहाय तयार करण्यात येते. राज्यभरातील २८८ मतदार नोंदणी अधिकाऱ्यांनी (EROs) ही यादी जवळपास एक लाख मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLOs) यांच्या मदतीने क्षेत्रीय पडताळणी करून तयार केली. या प्रक्रियेत सर्व मान्यताप्राप्त राजकीय पक्षांशी, सतत माहितीची देवाणघेवाण केली जाते. आक्षेप घेण्यासाठी आणि अपील करण्यासाठी भरपूर संधीही दिली जाते. मतदारयादीत नावांची भर घालणे किंवा वगळणे याबाबत काही अतिशयोक्त दावे करण्यात आले असल्याचे मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांनी कळविले आहे.

महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकांबाबत प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध लेखाच्या अनुषंगाने, काही बाबी स्पष्ट करणे आवश्यक असल्याचेही मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय, महाराष्ट्र राज्य यांनी कळविले आहे.

ऑगस्ट २०२४ मध्ये, विधानसभा निवडणुकांपूर्वी, विशेष संक्षिप्त पुनरिक्षण करण्यात आले आणि एक लाखाच्या आसपास असलेल्या प्रत्येक मतदान केंद्रासाठी प्रारूप व अंतिम मतदार यादींच्या (सॉफ्ट आणि हार्ड कॉपी) प्रती सर्व मान्यताप्राप्त पक्षांना प्रदान करण्यात आल्या होत्या.

महाराष्ट्रातील मतदार संख्येच्या वाढीबाबत लेखातील माहिती दिशाभूल करणारी आहे. वास्तविक माहिती पुढीलप्रमाणे आहे :

  • २०१९ च्या विधानसभा निवडणुकांपासून २०२४ च्या लोकसभा निवडणुकांदरम्यान १.३९ कोटी नावांची भर पडली, तर १.०७ कोटी नावांची वजाबाकी झाली. त्यामुळे एकूण निव्वळ वाढ ३२.२५ लाख मतदारांची झाली.
  • २०२४ लोकसभा ते २०२४ विधानसभा निवडणुका या काळात ४८.८२ लाख नवीन नावे जोडली गेली, आणि ८ लाख वगळली गेली. त्यामुळे निव्वळ वाढ ४०.८१ लाख इतकी होती. त्यात १८ ते २९ वयोगटातील २६ लाखांहून अधिक नवमतदार होते.
  • एकूण भर (Gross Addition) ही २०१९ ते लोकसभा २०२४ मध्ये १.३९ कोटी, आणि लोकसभा २०२४ ते विधानसभा २०२४ मध्ये ४८.८२ लाख इतकी होती.

मतदारांची संख्या प्रक्षेपित प्रौढ लोकसंख्येपेक्षा अधिक का आहे यासंदर्भातही स्पष्टीकरण आवश्यक असून कोणतेही आकडेवारीचे साधन हे केवळ सांख्यिकीय अंदाजासाठी असते. मतदार नोंदणी ही प्रत्यक्ष फॉर्म्स, क्षेत्रीय पडताळणी, आणि कायद्याने ठरवलेल्या प्रक्रियेनुसार निर्णय घेऊन केली जाते. ही प्रक्रिया संपूर्ण पारदर्शक असते आणि सर्व मान्यताप्राप्त पक्षांशी यामध्ये सातत्याने समन्वय साधला जातो.

मतदार याद्यांचे पुनरिक्षण करताना प्रत्येक राजकीय पक्षाने बूथ लेव्हल एजंट (BLA) नेमलेले असतात. काँग्रेसने महाराष्ट्रात २८,४२१ बीएलए नियुक्त केले होते. निवडणुकीचे निकाल लागेपर्यंत या एजंटांकडून किंवा काँग्रेसच्या उमेदवारांकडून कोणतीही गंभीर तक्रार प्राप्त झालेली नाही. ही बाब निवडणुकीनंतरच उपस्थित केली गेली आहे.

मतदार याद्यांचे वाटप :

मतदार यादी दरवर्षी सहभागात्मक पद्धतीने पुनरिक्षणाद्वारे अद्ययावत केली जाते. या प्रक्रियेत प्रारूप आणि अंतिम स्वरूपातील यादी सर्व मान्यताप्राप्त पक्षांना विनामूल्य दिली जाते. हीच प्रक्रिया २००९, २०१४, २०१९ आणि २०२४ मध्येही राबवण्यात आली होती आणि यादी पक्षांना देण्यात आली होती.

२०२४ च्या विधानसभा निवडणुकीसाठी वापरण्यात आलेली संपूर्ण मतदार यादी आयोगाच्या वेबसाइटवर सार्वजनिकरित्या डाउनलोडसाठी उपलब्ध आहे.

मतदार नोंदणी नियम १९६० च्या नियम ३३ नुसार कोणतीही व्यक्ती, संबंधित जिल्हा निवडणूक अधिकाऱ्याकडे अर्ज करून निर्धारित शुल्क भरून मतदारयादीची प्रत मिळवू शकतो.

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने (INC) नोव्हेंबर २०२४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांनंतरही अशाच स्वरूपाचे मुद्दे उपस्थित केले होते. निवडणूक आयोगाने दि. २४ डिसेंबर २०२४ रोजी यावर सविस्तर उत्तर दिले आहे. त्या उत्तराची प्रत आयोगाच्या वेबसाइटवर उपलब्ध आहे

(खाली लिंक दिली आहे) https://www.eci.gov.in/eci-backend/public/api/download?url=LMAhAK6sOPBp%2FNFF0iRfXbEB1EVSLT41NNLRjYNJJP1KivrUxbfqkDatmHy12e%2FzPKLkuiExxOKadAHYzWQYgrziMWVM9RdSa49qKKjiLLCWX%2FdIawdRjv6WA2GoknYcyLIzu4lIXP3VRXySBy%2F%2Bwg%3D%3D

******

पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते मंजुरीपत्र प्रदान

सिंधुदुर्ग दि १२(जिमाका) : गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेअंतर्गत दुर्दैवी घटनेत बळीराजाचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला नियमानुसार मदत दिली जाते. या सानुग्रह अनुदान योजनेअंतर्गत पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते शिवडाव येथील कृष्णा राजाराम करंगुटकर या शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू झाल्याने, शेर्पे येथील तुषार शेलार यांचा शॉक लागून मृत्यू झाल्याने तसेच करंजे येथील मंगेश बोभाटे यांचा रेल्वे अपघातात मृत्यू झाल्याने त्यांच्या वारसास मंजुरी पत्र देण्यात आले.

भूसंपादनाच्या प्रस्तावावर सकारात्मक विचार करणार – पालकमंत्री नितेश राणे

सिंधुदुर्गनगरी दि.१२ (जि.मा.का.) : वैभववाडी-कोल्हापूर मार्गावरील करुळ (गगनबावडा) हा घाट जिल्ह्याच्या विकासासाठी महत्वपूर्ण आहे. या मार्गाकडे विकासाचा मार्ग म्हणून आम्ही सर्वजण पाहतो. करुळ घाट मार्गाचे काम हे दर्जेदार झालेले आहे. या मार्गातील तळेरे- वैभववाडी रस्त्याच्या भूसंपादनाबाबत गांवकऱ्यांच्या तक्रारी आहेत. या अनुषंगाने रस्त्याच्या हद्दीबाबत जिल्हाधिकारी आणि कार्यकारी अभियंता, राष्ट्रीय महामार्ग, रत्नागिरी यांनी कागदपत्रे तपासून प्रस्ताव सादर करावा. या प्रस्तावावर सकारात्मक विचार केला जाईल असे पालकमंत्री नितेश राणे म्हणाले.

पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली कणकवली येथे तळेरे-वैभववाडी-गगनबावडा रस्त्याच्या भूसंपादनाच्या अनुषंगाने बैठक पार पडली. यावेळी जिल्हाधिकारी अनिल पाटील, राष्ट्रीय महामार्गचे मुख्य अभियंता संतोष शेलार, अधीक्षक अभियंता  श्रीमती तृप्ती नाग, कार्यकारी अभियंता अनामिका जाधव, प्रमोद रावराणे, डॉ. मिलिंद कुलकर्णी, करुळ सरपंच नरेंद्र कोलते, कोकिसरे सरपंच प्रदीप नारकर, माजी नगराध्यक्ष नेहा माईणकर, नगरसेवक रणजीत तावडे, संगीता चव्हाण, सुधीर नकाशे, दिलीप तळेकर, भालचंद्र साठे, गुलाबराव चव्हाण, संतोष कानडे, राजेंद्र राणे, अतुल सरवटे तसेच गांवकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कर्जत तालुका क्रीडा संकुलाच्या जागेचा निर्णय तालुका क्रीडा संकुल समितीने घ्यावा – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

मुंबईदि. १२ :- कर्जत तालुका क्रीडा संकुलाच्या जागेचा निर्णय तालुका क्रीडा संकुल समितीने १५ दिवसाच्या आत घेतला नाहीतर जिल्हा क्रीडा संकुल समिती याबाबत निर्णय घेऊन शासनाला कळवेलया जागेबाबत त्यापुढील कार्यवाही शासनस्तरावरुन करण्यात येईलअसे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.   

महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली विधान भवनमुंबई येथे तालुका क्रीडा संकुलाच्या जागेसंदर्भात उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी कर्जत नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा रोहिणी घुले व उप नगराध्यक्ष संतोष मेहत्रे उपस्थित होते.

कर्जत तालुका क्रीडा संकुलासाठी भांडेवाडी येथील जागेला मंजुरी मिळाली होती. त्यानुसार कामास सुरुवात करण्यात आलेली होती. त्याअनुषंगाने अतिरिक्त जागेची गरज लक्षात घेता बर्गेवाडी अथवा इतर पर्यायी दोन ते तीन ठिकाणांची जागेची मागणी तालुका क्रीडा संकुल समितीने करावीइतर तीन ते चार जागेचे सुयोग्य पर्याय सुचविण्यात यावेततसेच जिल्हाधिकारीअहिल्यानगर यांच्याकडून हे पर्याय तपासून घेण्यात यावेत, असे निर्देश सभापती प्रा.शिंदे यांनी दिले.

बैठकीस क्रीडा आयुक्त शितल उगले दूरदृष्यप्रणालीद्वारे सहभागी झाल्या होत्या. तसेच महसूल विभागाचे सहसचिव संजय बनकरक्रीडा विभागाचे उपसचिव सुनिल पांढरेसहसंचालक सुधीर मोरेकर्जत नगरपालिकेचे मुख्य अधिकारी अक्षय जायभाये उपस्थित होते.

0000

किरण वाघ/विसंअ/

ताज्या बातम्या

कुपोषणाविरुद्ध गडचिरोलीत ‘गिफ्टमिल्क’चा यशस्वी प्रयोग

0
गडचिरोली, दि. २० (जिमाका): गडचिरोली जिल्ह्यातील हजारो मुलांना रोज मिळणाऱ्या पौष्टिक दुधामुळे त्यांचे आरोग्य व आयुष्य सकारात्मक दिशेने बदलत आहे. मुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री...

‘समृद्धी’च्या धर्तीवर नांदेड-जालना मार्गासाठी मोबदला देण्याच्या पर्यायाचा विचार करावा- मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

0
मुंबई, दि. २० : नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर नांदेड-जालना द्रुतगती मार्गासाठीही जमीन संपादनाचा मोबदला निश्चित करण्याच्या पर्यायाचा विचार केला जावा, असे निर्देश महसूलमंत्री चंद्रशेखर...

सोलापूर आणि सातारा जिल्ह्यातील विकास प्रकल्पांना चालना द्यावी – ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे

0
नवी दिल्ली, दि. २०: पंचायत राज व ग्रामविकास मंत्री आणि सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे हे दिल्ली दौऱ्यावर असून त्यांनी सोलापूर आणि सातारा जिल्ह्याच्या...

क्रीडा दिनानिमित राज्यभर २९ ते ३१ ऑगस्ट दरम्यान क्रीडा महोत्सव

0
मुंबई, दि. २० : क्रीडा दिनानिमित्त आयोजित तीन दिवसीय महोत्सवात राज्यभर विविध कार्यक्रम यशस्वीरित्या राबविण्यासाठी कार्यप्रणाली तयार करण्यात यावी. त्यासाठीचा निधी तत्काळ उपलब्ध करून...

महिला, बालक व सामाजिक गटांसाठी योजनांची प्रभावी अंमलबजावणी -उपमुख्यमंत्री अजित पवार

0
मुंबई दि. २० : राज्यातील महिला, बालक आणि सामाजिक गटांसाठी राबविल्या जाणाऱ्या योजनांची व्याप्ती आणि परिणामकारकता वाढत असल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी समाधान व्यक्त...