सोमवार, ऑगस्ट 18, 2025
Home Blog Page 1653

ठाण्यातील दिव्यांग व विशेष मुलांच्या उपस्थितीत मुख्यमंत्र्यांनी साजरा केला वाढदिवस

ठाणे, दि. ९ (जिमाका) – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज ठाण्यातील दिव्यांग व विशेष मुलांसोबत केक कापून आगळ्या वेगळ्या पद्धतीने वाढदिवस साजरा केला. यावेळी दिव्यांगांच्या रोजगार मेळाव्यास शुभेच्छाही दिल्या. तसेच मतदारसंघातील किसन नगर येथील मुलांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते खाऊ व वह्या वाटप करण्यात आल्या. तसेच टेंभीनाका येथील कार्यक्रमात दिव्यांगाना विविध साहित्यांचे वाटप त्यांच्या हस्ते करण्यात आले.

स्वयंम दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या वतीने ठाण्यातील स्व. गंगूबाई संभाजी शिंदे बहुउद्देशीय सभागृहात दिव्यांग रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यास मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी उपस्थिती लावून दिव्यांग मुलांसोबत वाढदिवस साजरा केला. विशेष मुलांच्या हातून केक कापण्यात आला. यावेळी दिव्यांगांच्या रोजगारासाठी उपयुक्त अशा स्वयंम अँपचे अनावरण, स्वयंमच्या झेप या स्मरणिकेचे व संकेतस्थळाचे अनावरणही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. स्वयंम अँपच्या माध्यमातून दिव्यांगांना रोजगार संधीची माहिती मिळणार आहे. यावेळी दिव्यांगासाठी भरविण्यात आलेल्या विशेष प्रदर्शनाची पाहणीही मुख्यमंत्र्यांनी केली. यावेळी स्वयंमच्या संस्थापक डॉ. निता देवळालकर या उपस्थित होत्या.

मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघातील किसन नगर येथे वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात विभागातील मुलांना शालेय वह्या व खाऊचे वाटप मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या सुविद्य पत्नी श्रीमती लता शिंदे उपस्थित होत्या. यावेळी येथील भित्तीचित्राचे अनावरणही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले.

आनंद आश्रमात नागरिकांच्या शुभेच्छांचा केला स्विकार

मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी वाढदिवसानिमित्त आनंद आश्रमात धर्मवीर दिवंगत आनंद दिघे यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले. यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, माजी महापौर नरेश म्हस्के आदी उपस्थित होते. यावेळी आनंद आश्रमाच्या बाहेर शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित नागरिकांची मुख्यमंत्र्यांनी भेट घेत त्यांच्या शुभेच्छांचा स्वीकार केला. यावेळी शालेय विद्यार्थ्यांना दप्तर व क्रिकेट किटचे वाटप करण्यात आले.

दिव्यांगांना साहित्याचे वाटप

डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन व वंदनीय बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय मदत कक्षाच्या वतीने टेंभी नाका येथे आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दिव्यांग बांधवांना तीन चाकी सायकल, कुबड्या, कानाचे मशीन,  व्हीलचेयर या वस्तूंचे वाटप करण्यात आले. यावेळी आरोग्यदूत पुस्तिकेचे प्रकाशनही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते झाले. वैद्यकीय सहायता कक्षाचे विशेष कार्यअधिकारी मंगेश चिवटे, माजी महापौर नरेश म्हस्के यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

000

कोपरी रेल्वे ओलांडणी पुलाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण

ठाणे, दि. ९ : मुंबई – ठाणे जिल्ह्याच्या सीमेवर प्रवाशांची वाहतूक कोंडीपासून सुटका करण्याच्या दृष्टीने मुंबई महानगर विकास प्राधिकरणाच्यावतीने उभारण्यात आलेल्या ठाणे शहरातील कोपरी येथील रेल्वे ओलंडणी पुलाचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. या पुलाच्या रुंदीकरणामुळे मुंबई आणि ठाणे जिल्ह्यातील सीमेवरील वाहतूक कोंडी दूर होणार आहे.

यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार सर्वश्री निरंजन डावखरे, प्रताप सरनाईक, संजय केळकर, माजी आमदार रवींद्र फाटक, विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर, एमएमआरडीएचे महानगर आयुक्त एस.व्ही.आर. श्रीनिवासन, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, पोलीस आयुक्त जय जित सिंह आदी उपस्थित होते.

या पुलाचे रुंदीकरण मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत करण्यात आले आहे. कोपरी रेल्वे ओलांडणी पुलाच्या कामाचा संपूर्ण खर्च एमएमआरडीएमार्फत करण्यात आला आहे. पुलाच्या रेल्वे मार्गिकांवरील भागाचे काम मध्य रेल्वे मार्फत करण्यात आले असून या भागाच्या बांधकामासाठी प्राधिकरणाकडून रेल्वेला निधी देण्यात आला आहे. या पुलाची लांबी ७८४ मीटर तर रुंदी ३७.०४ मीटर इतकी आहे.

पूर्व द्रुतगती महामार्गावर हा पूल ५+५ मार्गिकांचा आहे तर ठाणे शहरातील कोपरी रेल्वे ओलांडणी पूल हा २+२ मार्गिकांचा होता. या अरुंद रेल्वे ओलांडणी पुलामुळे सकाळी व संध्याकाळच्या वेळेत या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत होती. ही समस्या दूर करण्याच्या उद्देशाने प्राधिकरणामार्फत कोपरी रेल्वे ओलांडणी पुलाचे रुंदीकरण व बांधकाम करण्यात आले आहे. २+२ पथमर्गिकेच्या पुलाचे ४+४ असे अपग्रेड केल्यामुळे मुंबई-ठाणे जिल्ह्याच्या सीमेवरील वाहतूक कोंडी कमी होऊन त्याचा फायदा पूर्व द्रुतगती महामार्गावरील लहान तसेच अवजड वाहनांना होणार आहे.

या प्रकल्पात नौपाडा जंक्शन ते ज्ञानसाधना कॉलेजपर्यंत महामार्गाखालून वाहनांच्या रहदारीसाठी २+२ मार्गिकांचा ४० मीटर लांब आणि २१.२ मीटर रुंद भुयारी मार्ग देखील बांधण्यात आला आहे. प्रस्तावित नवीन कोपरी स्टेशनला जाणाऱ्या वाहनांसाठी भुयारी मार्ग, पादचाऱ्यांना पूर्व द्रुतगती महामार्ग ओलांडण्यासाठी पादचारी पूल देखील बांधण्यात आला आहे. तसेच चिखलवाडी परिसरातील पावसाळी पाण्याचा निचरा होण्याकरीता, चिखलवाडी नाल्यापासून साठेवाडी नाल्यापर्यंत पर्जन्य जल वहिनीची (स्ट्रॉम वॉटर ड्रेनची) सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या बंदिस्त नाल्याचे सुधारीकरण देखील करण्यात आले आहे.

श्री. श्रीनिवासन म्हणाले की, कोपरी पूल हा मुंबई आणि ठाणे या दोन्ही जिल्ह्यांना जोडणारा महत्त्वाचा दुवा आहे. जुना पूल हा अरुंद असल्यामुळे अधिक गर्दीच्यावेळी (पीक अवर्स) मध्ये वाहनचालकांना काही मीटरचा प्रवास करण्यासाठी ३०ते ४० मिनिटे लागत. पूर्व द्रुतगती महामार्गावरील दोन्ही बाजूने येणाऱ्या वाहनांची मोठ्या प्रमाणात कोंडी होत होती. नवीन रुंद पुलामुळे प्रवाशांचा हा वेळ वाचणार आहे. त्यासोबतच तीन हात नाका परिसरातील वाहतुकीत मोठ्या प्रमाणात घट होणार आहे.

०००

भूतान आणि महाराष्ट्र यांच्यात पर्यटन सहकार्य वाढावे –  वांगचुक नामग्याल

मुंबई, दि. ९ : भूतान भारताचा जवळचा शेजारी असून भारताच्या सामाजिक – आर्थिक प्रगतीचा प्रशंसक देश आहे. विविध आंतरराष्ट्रीय मंचांवर भूतान भारताच्या पाठीशी भक्कमपणे उभा आहे. भगवान बुद्धांशी संबंधित भारतातील सांस्कृतिक स्थळे भूतानच्या जनतेकरिता आदराची आहेत. भूतान नैसर्गिक सौंदर्याने नटलेला देश आहे. या पार्श्वभूमीवर भूतान आणि महाराष्ट्र यांच्यात पर्यटन सहकार्य वाढावे, अशी अपेक्षा भूतानच्या राष्ट्रीय संसदेचे अध्यक्ष वांगचुक नामग्याल यांनी येथे व्यक्त केली.

वांगचुक नामग्याल यांनी भूतानच्या दहा सदस्यांच्या संसदीय शिष्टमंडळासोबत महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची राजभवन, मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली, त्यावेळी ते बोलत होते.

सुरुवातीला संसद अध्यक्षांनी भूतानचे राजे जिग्मे खेसर नामग्येल वांगचुक यांच्यावतीने राज्यपालांना शुभेच्छा कळवल्या. आपल्या भारत भेटीमध्ये आपण राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला व परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांची भेट घेतल्याचे नमूद करुन भूतान संसदेने भारतीय संसदेशी सहकार्य करार केल्याचे वांगचुक नामग्याल यांनी सांगितले.

भूतानचे लोक सर्वात आनंदी असल्याचे आपण ऐकून आहोत. सांस्कृतिकदृष्ट्या भूतान व भारत एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. भूतानमध्ये बौद्ध धर्माचा प्रसार झाल्याचा अभिमान वाटतो असे सांगून भूतान व भारत यांमध्ये व्यापार, वाणिज्य, लॉजिस्टिकस, याशिवाय पर्यटन, शैक्षणिक सहकार्य व जनतेच्या स्तरावर परस्पर संबंध वृद्धिंगत व्हावे, अशी अपेक्षा राज्यपाल कोश्यारी यांनी यावेळी व्यक्त केली. भूतानमधील पर्यटकांनी भारतातील कुशीनगर, बोधगया, सारनाथ यांसह महाराष्ट्रातील अजंठा वेरुळ लेण्यांना देखील भेट द्यावी, असेही राज्यपालांनी सांगितले.

संसदीय शिष्टमंडळामध्ये भूतान संसदेच्या कनिष्ठ आणि वरिष्ठ सभागृहांचे सदस्य असलेले विविध स्थायी समित्यांचे अध्यक्ष उपस्थित होते.

यावेळी भूतान संसदेचे खासदार शैवांग ल्हामो, कर्मा गेलतशेन,  ग्येम दोरजी, कर्मा वांगचुक, उग्येन वांगडी, कर्मा ल्हामो, उग्येन शरिन्ग, ल्हाकी डोल्मा, आदी संसद सदस्य उपस्थित होते.

०००

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अभीष्टचिंतन

मुंबई, दि. ९ : राष्ट्रपती द्रौपदी मूर्मु यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देऊन अभीष्टचिंतन केले.

राष्ट्रपती श्रीमती मुर्मू यांनी आज सकाळी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांना दूरध्वनीवरुन शुभेच्छा दिल्या. सुदृढ, निरोगी, दीर्घायुष्याच्या शुभेच्छा देतानाच महाराष्ट्राचा सर्वसमावेशक, सर्वांगीण विकास साधण्यासाठी आजचा दिवस आपल्याला निश्चितच बळ देईल, असेही राष्ट्रपती मुर्मू यांनी नमूद केले. राष्ट्रपतींनी दिलेल्या शुभेच्छांबद्दल मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी त्यांचे आभार मानले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडूनही शुभेच्छा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या ठाणे येथील निवासस्थानी जाऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी आमदार निरंजन डावखरे उपस्थित होते.

ज्येष्ठ समाजसेवकअण्णा हजारे यांच्या दूरध्वनीवरून शुभेच्छा-आशीर्वाद

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त ज्येष्ठ समाजसेवक, पद्मभूषण अण्णा हजारे यांनी दूरध्वनीवरून शुभेच्छा-आशीर्वाद दिले. श्री. हजारे यांनी शुभेच्छा देताना मुख्यमंत्र्यांच्या कामाचे कौतुक केले. तसेच मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांची जोडगोळी गतिमान राज्यकारभार करत आहे, अशी भावना व्यक्त केली.

श्री. अण्णा हजारे यांच्या सदिच्छा भेटीसाठी लवकरच राळेगणसिद्धी दौरा करणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले.

 

 

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ‘आपला दवाखाना’ योजनेच्या विस्ताराची मुख्यमंत्र्यांकडून घोषणा

मुंबई, दि. ९: राज्यात ३६६ ठिकाणी रक्तदान शिबीर, १८०० शाळांध्ये विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी, जागरुक पालक सुदृढ बालक अभियानाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. एवढ्या मोठ्या संख्येने राज्यात एकाच दिवशी आरोग्याचा महायज्ञ पहिल्यांदाच होत असल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांनी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ‘आपला दवाखाना’ या योजनेच्या विस्ताराची घोषणा केली. राज्यातील सगळ्या घटकांचे आरोग्य उत्तम राहावे यासाठी हे सारे उपक्रम, मोहिमा आपण हाती घेतल्याचे त्यांनी सांगितले.

आरोग्य विभागाच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या विविध आरोग्य शिबिरांचे उद्घाटन मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते दूरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत, रोहयो मंत्री संदीपान भुमरे, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे, आयुक्त धीरजकुमार, संचालक डॉ.विजय कंदेवाड यांच्यासह राज्यभरातील जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. शिंदे यावेळी म्हणाले, ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिकवणीनुसार आपल्या सरकारची वाटचाल सुरू आहे. सामान्यांच्या जीवनाशी निगडीत असे आरोग्यविषयक विविध उपक्रम आरोग्यमंत्री डॉ. सावंत यांच्या पुढाकारातून राज्यभर हाती घेण्यात आले आहेत. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करतो. एवढ्या मोठ्या संख्येने राज्यात एकाच दिवशी आरोग्याचा महायज्ञ पहिल्यांदाच होत असेल, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

आजच्या दिवसाचं औचित्य साधत मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे “आपला दवाखाना” या योजनेच्या विस्ताराची घोषणा केली. मुंबईपाठोपाठ आता राज्यातील प्रत्येक तालुक्याच्या मुख्यालयी आपला दवाखाना सुरू होणार असून सुमारे ५०० ठिकाणी आपला दवाखान्याचा शुभारंभ होणार आहे ही आनंदाची बाब असल्याचे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

राज्यातील सर्व जिल्हा रुग्णालयं, उपजिल्हा रुग्णालयं, ग्रामीण रुग्णालयं, स्त्री रुग्णालयं, नागरी सामुदायिक आरोग्य केंद्र, नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांत “आरोग्य शिबिरांचं आयोजन करण्यात आलं आहे. या आरोग्य शिबिरांत नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी होईलच, सोबतच त्यांना आवश्यक ते उपचार देखील मिळतील. याचाही लाभ राज्यभरातील जनतेला होईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

मी स्वतः अनेकदा रक्तदान करीत असतो, हे सांगत मुख्यमंत्री यावेळी म्हणाले, रक्त ही निसर्गानं आपल्याला दिलेली मौल्यवान देणगी असून, त्याच निरपेक्ष भावनेनं दान करण्यासारखं पुण्यकर्म नाही. हीच बाब लक्षात घेऊन आज राज्यात सुमारे ३६६ ठिकाणी “महारक्तदान शिबिरांचंही आयोजन करण्यात आलं आहे. या शिबिरांत सहभागी होऊन रक्तदान करा, व एखाद्या गरजूला जीवनदान द्या, असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.

महाराष्ट्र नेहमीच रक्तसंकलनात देशात अग्रेसर असतो. तो यापुढेही राहील, असा विश्वास व्यक्त करतानाच त्यांनी रक्तदात्यांचे अभिनंदन करताना त्यांचे आभारही मानले. संकलित रक्त कुठेही वाया जाणार नाही, याची काळजी घेण्याचे निर्देशही त्यांनी यंत्रणेला दिले.
राज्यात जागरुक पालक सुदृढ बालक मोहीमही हाती घेण्यात आली आहे. राज्यातील सुमारे १८०० शाळांमधील १८ वर्षांखालील विद्यार्थ्यांची आरोग्यतपासणी या अंतर्गत होणार आहे.

राज्यातील सगळ्या घटकांचं आरोग्य उत्तम राहावं यासाठी हे सारे उपक्रम, मोहिमा आपण हाती घेतल्या आहेत. आरोग्य विभागाचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी हे त्यासाठी कौतुकास पात्र आहेत. यापुढेही सामान्य माणसाची आरोग्यसेवा अशाप्रकारे होत राहील आणि आपला महाराष्ट्र समृद्ध आणि निरोगी राहील, अशा सदिच्छा मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केल्या.

चला जाणूया नदीला अभियान कालावधी १५ ऑगस्ट २०२४ पर्यंत वाढवणार- वनमंत्री सुधीर मुनगंटीवार

पुणे, दि. 8 : नदी प्रदुषण रोखण्यासह स्वच्छ पाण्याचे महत्त्व आणि त्याबाबतची मानसिकता बदलण्याच्यादृष्टीने ‘चला जाणूया नदीला’ या अभियानाची व्यापक जनजागृती करणे आवश्यक आहे. त्यासाठी या अभियानाचा कालावधी 15 ऑगस्ट 2024 पर्यंत वाढविण्यात येईल, असे प्रतिपादन वने,  सांस्कृतिक कार्य व  मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

वनभवन येथे आयोजित चला जाणूया नदीला अभियानाच्या अनुषंगाने आयोजित बैठकीत मंत्री श्री. मुनगंटीवार बोलत होते. बैठकीस प्रधान मुख्य वनसंरक्षक (सामाजिक वनीकरण) सुनीता सिंग, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक विवेक खांडेकर, पुणे प्रादेशिक मुख्य वनसंरक्षक एन. आर. प्रवीण, उपवन संरक्षक राहुल पाटील, पाटबंधारे विभागाच्या अधीक्षक अभियंता सुनंदा जगताप, महाराष्ट्र जल बिरादरीचे अध्यक्ष नरेंद्र चुग आदी उपस्थित होते.

श्री. मुनगंटीवार म्हणाले, स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव निमित्ताने सुरु करण्यात आलेल्या ‘चला जाणूया नदीला’ हे अभियान सर्वांसाठी महत्त्वाचे आहे. या अभियानास गती देण्यासाठी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, विभागांचे सचिव, विद्यापीठांचे कुलगुरु यांना सूचना देण्यात येतील.

यावेळी श्री. मुनगंटीवार यांनी विविध सूचना केल्या. या अभियानात समाविष्ट जलप्रहरींनी नदीचे महत्त्व शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांना समजावे यासाठी ५ वी ते १० वीच्या पुस्तकात एखादी धडा, कविता समाविष्ट करण्यासाठी प्रयत्न करावेत. वन विभागामार्फत चित्ररथ उपलब्ध करू त्याद्वारे सांस्कृतिक विभागाकडून नदी किनाऱ्याच्या गावांमध्ये जनजागृती करता येईल. या विषयावरील एखादा माहितीपट तयार करावा. नदीच्या प्रदूषणासंदर्भात प्रदूषण मंडळ आणि काही तज्ज्ञ यांची समिती करून नदी प्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजना सुचवाव्यात.

साहित्य संमेलन प्रमाणे नदी सम्मेलन आयोजित करता येईल. यामध्ये सर्व विभागांचे अधिकारी, जैव विविधता मंडळाचे अधिकारी, या क्षेत्रातील सामाजिक संस्था आदींना सहभागी करता येईल. त्या अगोदर व्हिडिओ स्पर्धा, निबंध स्पर्धा घ्याव्या. एक वेब पोर्टल करुन त्यावर नदीसंबंधाने ज्ञानवर्धक आणि या विषयाचे गांभीर्य दर्शविणारी माहिती असावी. विद्यापीठ स्तरावर एनएसएस, एनसीसी, शालेय स्तरावर इको क्लब आदींच्या माध्यमातून महाविद्यालयीन, शालेय विद्यार्थ्यांचा सहभाग कसा वाढेल यासाठी प्रयत्न करावेत, असेही श्री. मुनगंटीवार म्हणाले.

यावेळी अभियानाबाबत कार्यकारी अभियंता विजय पाटील, जल बिरादरीचे नरेंद्र चुग यांनी सादरीकरण केले. यावेळी राज्यात १०८ नद्यांचा या अभियानात समावेश करण्यात आल्याचे सांगण्यात आले. ४० नद्यांची पाहणी करुन आतापर्यत १५ नद्यांची नदी परिक्रमा करण्यात आल्याचे सांगण्यात आले. या उपक्रमासाठी जिल्हा नियोजन समितीतून निधी उपलब्ध करुन देण्याबाबत मागणी केल्याचेही सांगण्यात आले.

बैठकीस पाटबंधारे विभागाचे अधिकारी, जलबिरादरीचे सदस्य, अभियानातील नदिप्रहरी आदी उपस्थित होते.

पालखी मार्गावर वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनात लोकसहभाग वाढवण्यासाठी प्रयत्न करा – वनमंत्री सुधीर मुनगंटीवार

पुणे, दि. ८ : पालखी मार्गावर वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनासाठी लोकसहभाग वाढेल यादृष्टीने प्रयत्न करावेत. शालेय विद्यार्थ्यांचा सहभाग तसेच किर्तन, अभंगाच्या माध्यमातून प्रबोधन करावे, असे निर्देश वने,  सांस्कृतिक कार्य व  मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले.

वनभवन येथे  हरित पालखी मार्ग अनुशंगाने आयोजित बैठकीत मंत्री श्री. मुनगंटीवार बोलत होते. बैठकीस प्रधान मुख्य वनसंरक्षक (सामाजिक वनीकरण)  सुनीता सिंग, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक विवेक खांडेकर, पुणे प्रादेशिक मुख्य वनसंरक्षक एन. आर. प्रवीण, उप वनसंरक्षक राहुल पाटील, अपर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे, एनएचएआयचे प्रकल्प संचालक संजय कदम, हरित वारी अभियानाचे संयोजक ह.भ.प. शिवाजी सदाशिव मोरे उपस्थित होते.

पंढरपूर श्री विठ्ठल मंदिर देवस्थानच्या जागेवर वृक्ष लागवडीबाबत देवस्थानच्या पदाधिकाऱ्यांनी मागणी केल्यास वनविभागामार्फत सामंजस्य करार करून तेथे वृक्ष लागवड करता येईल. तसेच सामाजिक उत्तरदायित्व निधीतून हे काम करता येईल, असेही मंत्री मुनगंटीवार यांनी सुचवले.

महाराष्ट्राचे हरित आच्छादन २ हजार ५५० चौरस कि.मी. ने वाढले असल्याचे  तसेच कांदळवन संवर्धनाचेही देशात उल्लेखनीय कार्य महाराष्ट्रात झाले असल्याचे सांगून श्री. मुनगंटीवार पुढे म्हणाले, वृक्ष लागवड आणि संवर्धनात लोकसहभाग वाढविण्यासाठी नियोजन करावे. पालखी मार्गावर वनविभागाचे कायमस्वरूपी होर्डिंग्ज करावेत. त्यावर वृक्षाशी, पर्यावरणाशी संबंधित अभंग, ओव्या लिहाव्यात. या मार्गावर असलेल्या मोठ्या वृक्षांच्या रोपवाटिकांची यादी करावी.

तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी महत्वाच्या वृक्षांची लागवड व त्यांची माहिती देण्याची व्यवस्था झाली पाहिजे. पालखी मार्गावरील गावात वृक्षलागवडीबाबत प्रबोधन करण्यास इच्छुक असणाऱ्या प्रबोधनकार, प्रवचनकार, कीर्तनकार मार्गावर यादी करावी. त्यांना जुलै पूर्वी असे प्रबोधन करण्यासाठी मानधन देण्याची व्यवस्था करता येईल. देवस्थानने निर्माल्य आणि ओल्या कचऱ्यापासून कंपोस्ट खते निर्मितीसाठी यंत्रे बसवावीत, असेही ते म्हणाले. शासकीय जागांवर देवराया निर्माण करण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले.

आळंदी देवस्थानच्या 75 एकर जागेवर इको टुरिझममधून वृक्ष उद्यान निर्मिती

यावेळी आळंदी देवस्थानचे विश्वस्त लक्ष्मीकांत देशमुख आणि ॲड. विकास ढगे पाटील यांनी देवस्थानच्या ७५ एकर जागेवर वनविभागाने वृक्ष लागवड तसेच उद्यान निर्मिती करावी असा प्रस्ताव दिल्याचे सांगितले. त्याअनुषंगाने इको टुरिझममधून तसेच अटल घन वन योजनेतून वृक्ष उद्यान निर्मितीसाठी आराखडा तयार करावा, असे निर्देश वनमंत्र्यांनी दिले.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून पालखी मार्गावर लावण्यात येणारी झाडे निकषानुसार उंची योग्य वयाची असावीत. तसेच त्यासाठी झाडे लावतानाच ट्री गार्ड लावावीत. वृक्षलागवडीमध्ये सरकारच्या निकषांचे उल्लंघन करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करावी, अशा सूचना त्यांनी दिल्या.

प्रारंभी भीमाशंकर वन्यजीव अभयारण्यबाबत तयार केलेल्या कॉफी टेबल बुकचे आणि निवृत्त मुख्य वनसंरक्षक एस. एस. पाटील यांनी तयार केलेल्या वनवार्ता या बातमीपत्राचे प्रकाशन करण्यात आले.

हरित वारी अभियान संयोजकांच्यावतीने हरित पालखी महामार्ग बाबत सादरीकरण करण्यात आले. तुकाराम महाराज पालखी मार्ग २६५ कि.मी. आणि संत ज्ञानेश्वर पालखी मार्ग २५४ कि.मी. चा आहे. मार्गावर लावण्यात येणाऱ्या झाडांसाठी शास्त्रोक्त पद्धतीने ट्री गार्ड लावावीत. ७ मोठ्या पालख्यांच्या रस्त्याचे हरितकरण करायचे आहे. त्या कामात पालखी सोहळा आयोजकांचे सहकार्य घेण्याची संकल्पना आहे, असे सांगण्यात आले.

एनएचएआय चे प्रकल्प संचालक संजय कदम यांनी पालखी मार्गांवरील वृक्षलागवडीबाबत सादरीकरण केले.

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळचे मुख्य अभियंता राजेश पाटील, सार्वजनिक बांधकाम विभाग- राष्ट्रीय महामार्गचे मुख्य अभियंता संतोष शेलार, संत तुकाराम महाराज संस्थान देहूचे अध्यक्ष नितीन मोरे आदी यावेळी उपस्थित होते.

शेतीमध्ये सर्वाधिक उद्योग निर्मितीची क्षमता- मंत्री सुधीर मुनगंटीवार

बारामती दि. 8 : बारामतीतील कृषी विज्ञान केंद्रासह विविध उपक्रमांना वने, सांस्कृतिक कार्य व  मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी भेट दिली. शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात उद्योग निर्माण करण्याची क्षमता आहे, असे ते यावेळी म्हणाले.

यावेळी चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा, बारामतीचे प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, परीविक्षाधीन-तहसिलदार नेहा शिंदे, उप विभागीय कृषि अधिकारी वैभव तांबे, ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र पवार, विश्वस्त रणजित पवार आदी उपस्थित होते.

यावेळी श्री.मुनगंटीवार म्हणाले, आजही आपल्याकडे अधिक लोक शेतीवर उपजीविका करत आहेत. कृषि औजारे, उपकरणे नवीन तंत्रज्ञान पाहता या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात उद्योग निर्मिती क्षमता आहे. केव्हीके आणि ट्रस्टमध्ये उपलब्ध तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेतकरी बांधवांची प्रगती होण्यासाठी नक्कीच चालना मिळेल. बारामती ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या माध्यमातून शेती क्षेत्रात जागतिक स्तरावर होणाऱ्या संशोधनाची माहिती उपलब्ध होत आहे. कृषि विज्ञान केंद्रात नवीन तंत्रज्ञानाचे संशोधन होत आहे. शेतकऱ्यांनी या तंत्रज्ञानाचा वापर करावा. शेतकऱ्यांच्या हितासाठी चंद्रपूरसह इतर ठिकाणीही येथील कृषि प्रदर्शनासारखी प्रदर्शने आयोजित करण्यात येतील.

इन्क्युबेशन व इनोव्हेशन केंद्राच्या माध्यमातून नवीन संशोधक तयार करण्याचे काम या ठिकाणी होत असल्यामुळे भविष्यात संशोधक तयार होतील आणि नवउद्योग (स्टार्टअप) सुरू करण्यासाठी त्यांना चालना मिळेल असे सांगून त्यांनी ॲग्रीकल्चर  ट्रस्टच्या कार्याचे कौतुक केले.

आता जिल्हास्तरावरही मुख्यमंत्री सचिवालय कक्ष कार्यान्वित; जिल्हाधिकारी आंचल गोयल यांची पत्रकार परिषदेत माहिती

परभणी, दि. ८ (जिमाका) : ग्रामीण भागातील जनतेचे प्रश्न, शासनस्तरावरील कामे यासंदर्भात वेळोवेळी प्राप्त होणारी निवेदने, अर्जांवर जलद गतीने कार्यवाही व्हावी, तसेच प्रशासनात अधिकाधिक व प्रभावीपणे लोकाभिमुखता, पारदर्शकता व गतिमानता आणण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. यासाठी जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये मुख्यमंत्री सचिवालय कक्षाचे क्षेत्रीय कार्यालय निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार परभणीच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये मुख्यमंत्री सचिवालय कक्ष कार्यान्वित करण्यात आला असल्याची माहिती जिल्हाधिकारी श्रीमती आंचल गोयल यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर उपस्थित होते.  निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर हे मुख्यमंत्री सचिवालय कक्षाचे पदसिद्ध विशेष कार्य अधिकारी असतील. तसेच एक नायब तहसीलदार व एक लिपीक हे या कक्षाचे काम पाहतील. सर्वसामान्य जनतेकडून मुख्यमंत्री  यांना उद्देशून लिहिलेले दैनंदिन अर्ज, निवेदने, संदर्भ इत्यादी या कक्षामध्ये स्वीकारले जातील. जिल्ह्यातील जनतेला आपले अर्ज मुख्यमंत्री सचिवालय कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, परभणी येथे सादर करता येतील. अर्धन्यायिक स्वरूपातील अर्ज व शासकीय कर्मचारी यांचे आस्थापना सेवेविषयी अर्ज या कक्षात स्वीकारले जाणार नाहीत, असेही जिल्हाधिकार्‍यांनी यावेळी स्पष्ट केले.

१६ डिसेंबर २०२२ रोजी शासनाच्या सूचना प्राप्त झाल्यानंतर परभणी येथे २२ डिसेंबरपासून या कक्षाचे काम सुरू करण्यात आले होते. त्यामध्ये प्राप्त १४ पैकी १० प्रकरणे निकाली काढण्यात आल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी वडदकर यांनी  सांगितले.

असे असेल कामकाज

अर्ज, संदर्भ व निवेदनांवर जिल्हास्तरावरुन कार्यवाही होणे अपेक्षित आहे, अशी प्रकरणे जिल्हास्तरावरील संबंधित विभाग प्रमुखाकडे वर्ग करुन त्यावर तातडीने कार्यवाही करण्यात येणार आहे. तसेच शासन स्तरावरुन कार्यवाही होणे अपेक्षित प्रकरणे (वैयक्तिक, धोरणात्मक अर्ज, संदर्भ व निवेदने) मुंबई येथील मुख्यमंत्री सचिवालयाचे अपर मुख्य सचिव यांना सादर करण्यात येणार आहेत, असेही जिल्हाधिकारी श्रीमती गोयल यांनी सांगितले.

जल जीवन मिशन अंतर्गतची कामे दर्जेदार व गुणवत्तापूर्ण करावी- पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील

सातारा दि. 8 : जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत सातारा जिल्ह्यातील 794 कामे नव्याने सुरु होणार आहेत. सुरु होणाऱ्या कामांवर गावच्या सरपंचांनी लक्ष देवून ही कामे दर्जेदार व गुणवत्तापूर्ण  करावीत व राज्यात सातारा जिल्ह्याचा आदर्श निर्माण करावा, असे प्रतिपादन पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.

जिल्हा परिषदेच्या स्व. यशवंतराव चव्हाण बहुउद्देशिय सभागृहात पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, जिल्हा परिषद, सातारा, जल जीवन मिशन अंतर्गत जिल्हास्तरीय कार्यशाळेचे उद्घाटन व विविध पाणी पुरवठा योजनांचा ई-भूमिपुजन पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी आमदार महेश शिंदे, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, पोलीस अधीक्षक समीर शेख, उपमुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले, ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक चंचल पाटील, कार्यकारी अभियंता सुनिल शिंदे आदी उपस्थित होते.

ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाला नळाद्वारे पाणी देणे हे जल जीवन मिशन योजनेचे उद्दिष्ट असल्याचे सांगून पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री श्री. पाटील म्हणाले, विविध पाणी पुरवठ्याची एकूण 794 कामे आहेत याची अंदाजित रक्कम 1177.09 कोटी इतकी आहे. या कामांवर सरपंचांनी स्वत:  लक्ष देवून दर्जेदार व गुणवत्तापूर्ण  करावीत. या कामांचे त्रयस्त यंत्रणाकडून तपासणी करण्यात येणार आहे. राज्यातील मोठ्या योजनांना मी स्वत: भेटी देवून कामांची तपासणी करणार आहे. गैरप्रकार आढळल्यास कारवाई केली जाणार आहे. पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे काम चांगल्या पद्धतीने व्हावे यासाठी 2 हजार 226 पदांची निर्मिती करण्यात आली आहे. प्रत्येक तालुक्याला उपअभियंताही देण्यात आलेला आहे. तसेच 227 अनुकंपाधारक असलेल्या उमेदवारांना कामावर रुजु होण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

छोट्या छोट्या वस्ती, वाड्यांसाठी म्हणजे जेथे पाणी पुरवठ्याच्या योजना घेता येत नाही अशा ठिकाणी स्व. मिनाताई ठाकरे योजनेतून पाण्याच्या  साठवण टाक्या बसविण्यात आलेल्या आहेत. जल जीवन मिशन योजनेंतर्गत राज्यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी केंद्र व राज्य शासनाचे प्राधान्य आहे. या योजनेतून महिलांच्या पाण्याचा प्रश्न मिटणार आहे.  पिण्याचे पाणी ग्रामस्थांना सहज उपलब्ध व्हावे हे मोठे पुण्याचे काम आहे. हे काम जल जीवन मिशन अंतर्गत सरपंचांनी करावे, असे आवाहनही पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री श्री. पाटील यांनी केले.

जिल्ह्यातील पाणी पुरवठ्यांच्या योजनांना शासनाने मोठ्या प्रमाणात निधी दिला आहे. तसेच जिल्ह्याच्या हिताचे अनेक निर्णयही घेण्यात आले आहे. प्रशासनही केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना गावपातळीपर्यंत सक्षमपणे पोहचवित आहे, असे आमदार महेश शिंदे यांनी यावेळी सांगितले.

जिल्हाधिकारी श्री. जयवंशी म्हणाले, जल जीवन मिशन अंतर्गत 2024 पर्यंत ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाला नळाणे पाणी उपलब्ध करुन देण्याचा उद्देश आहे. यामध्ये केंद्र शासनाचा 50 टक्के  व राज्य शासनाचा 50 टक्के हिंस्सा असून 10 टक्के निधी लोकसभागातून उपलब्ध करणे असे योजनेचे स्वरुप आहे. या अंतर्गत बहुतांश योजना सौर ऊर्जेवर घेण्यात येणार आहे. स्व. मिनाताई ठाकरे योजनेतून 45 पाणी साठवण टाक्या बसविण्यास प्रशासकीय मंजुरी देण्यात आल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. खिलारी यांनी प्रास्ताविकात जल जीवनमिशन अंतर्गत जिल्ह्यात सुरु असलेल्या व सुरु करावयाच्या कामांची माहिती दिली. तसेच शुभारंभ होणाऱ्या पाणी पुरवठा योजना वेळेत पूर्ण करण्याची ग्वाहीही यावेळी दिली.

या कार्यशाळेस जिल्हा परिषदेतील विविध विभागांचे अधिकारी, विविध गावचे सरपंच, ग्रामसेवक उपस्थित होते.

000

ताज्या बातम्या

नशिराबाद आता विकासाच्या केंद्रस्थानी – पालकमंत्री गुलाबराव पाटील

0
नशिराबादमध्ये १४ कोटी रुपयाच्या कामाचे लोकार्पण, ८ कोटींच्या कामाचे भूमीपूजन  जळगाव दि. १८ (जिमाका): नशिराबाद गावाचे आता झपाट्याने शहरात रूपांतर होत आहे. विमानतळ, राष्ट्रीय महामार्ग...

धार्मिक भावना आणि परंपरेचा आदर करूनच कुलस्वामिनी तुळजाभवानी मंदिराचा जीर्णोद्धार

0
मुंबई, दि. १८: कुलस्वामिनी तुळजाभवानी मंदिराचे जीर्णोद्धाराचे काम करताना परंपरागत वास्तूंच्या संवर्धनात शासन कोणत्याही प्रकारचा तडजोडीचा मार्ग स्वीकारणार नाही. या ठिकाणी पुरातात्त्विक, स्थापत्यशास्त्रीय मूल्य...

गावोगावी विकासकामे दर्जेदार व वेळेत पूर्ण व्हावीत – पालकमंत्री गुलाबराव पाटील

0
▪ घरकुल तक्रारींचे निवारण करून मार्ग काढणार जळगाव दि. १८ (जिमाका):  "गरिबांना हक्काची घरे वेळेत मिळणे ही आपली जबाबदारी असून अधिकारी-कर्मचाऱ्यांनी समन्वय साधून विकासकामे दर्जेदार...

राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवी दिल्ली येथे भेट

0
महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवी दिल्ली येथे सदिच्छा भेट घेतली.

‘अंधत्व मुक्त महाराष्ट्र’च्या मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेला ‘दृष्टी यज्ञ’च्या माध्यमातून बळ

0
मुंबई, दि. १८: अंधत्व मुक्त महाराष्ट्र करणे हे राज्य शासनाचे उद्दिष्ट आहे. शासनामार्फत याबाबत विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून शालेय...