सोमवार, ऑगस्ट 18, 2025
Home Blog Page 1652

राज्यातील ग्रामीण जनतेसाठी ‘ग्राम राजस्व अभियान’ – ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन

मुंबई, दि. 10 : राज्याच्या ग्रामविकास व पंचायत राज विभागांतर्गत ग्रामपंचायती, पंचायत समित्या आणि जिल्हा परिषदेच्या विविध योजनांचा थेट फायदा लाभार्थींना होण्यासाठी राज्यात ‘ग्राम राजस्व अभियान’ राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मिनी मंत्रालय अंतर्गत येणाऱ्या विविध खात्यांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील नागरिकांना देण्यात येणाऱ्या सर्व योजनांची प्रभावी व लोकाभिमुख अंमलबजावणी होण्यासाठी ग्राम राजस्व अभियानाचा उपयोग होणार आहे. या अभियानाचा शुभारंभ लवकरच अहमदनगर जिल्ह्यातील राळेगणसिद्धी येथून करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांनी आज दिली.

स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून राज्यात दि. 26 जानेवारी 2023 पासून दि.25 जानेवारी 2024 पर्यंत हे ग्राम राजस्व अभियान राबविण्यात येणार आहे. यात जिल्हा परिषदा, पंचायत समित्या व ग्रामपंचायतीतील विविध विभाग ग्राम राजस्व अभियानात विविध उपक्रम राबविणार आहेत. अंत्योदय हे ध्येय डोळ्यापुढे ठेवून शेवटच्या घटकापर्यंत शासकीय योजनांचा लाभ पोहोचवण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचा उपयोग लाभार्थींना व्हावा, हा यामागचा प्रमुख उद्देश आहे.

याअंतर्गत राज्यातील सर्व ग्रामपंचायती आता डिजिटल ग्रामपंचायती म्हणून विकसित करून यामार्फत नागरिकांना बीपीएल दाखला, जन्म नोंद दाखला, निराधार दाखला, नमुना 8 चा उतारा आदी दाखले देण्यात येतील. ग्रामपंचायत हद्दीमध्ये वारस नोंदी व मिळकत नोंदीसंदर्भात विशेष मोहीमा राबविण्यात येतील. ग्रामपंचायतीस मिळणाऱ्या हरकती आणि सूचनांवर सरपंच, सदस्य यांच्या समक्ष सुनावणी घेण्यात येईल. त्याचबरोबर ग्रामपंचायतीच्या सर्व करांची 100 टक्के वसुली व्हावी, यासाठी शिबिरे आयोजित करण्यात येतील, अशी माहिती श्री.महाजन यांनी दिली.

ग्राम राजस्व अभियानांतर्गत महिला व बाल विकास विभागामार्फत अंगणवाडी बालकांची 100 टक्के आरोग्य तपासणी करणे तसेच लसीकरण करण्यात येईल. गावातील बालकांची श्रेणीवर्धन करून गाव कुपोषण मुक्त करण्यासाठी डॉक्टरांच्या मदतीने आरोग्य तपासणी शिबिरे देखील आयोजित करण्यात येतील.

त्याचबरोबर आरोग्य विभागामार्फत नागरिकांना तातडीच्या सेवा उपलब्ध करून देणे, मुली, गरोदर माता, स्तनदा माता यांच्यासाठी आरोग्यविषयक सर्व योजना प्रभावीपणे राबविण्यात येतील. प्राथमिक शिक्षक विभागामार्फत प्राथमिक शाळांची 100 टक्के पटनोंदणी बरोबर शाळाबाह्य मुलांची नोंदणी केली जाईल. सोबतच सर्व प्राथमिक मुलांचे लसीकरण करण्यात येईल. माध्यमिक शिक्षण विभागामार्फत शालेय शिक्षणातील नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येईल, अशीही माहिती मंत्री श्री.महाजन यांनी दिली.

ग्राम राजस्व अभियानांतर्गत प्रत्येक गाव शिवारात पाण्याचा ताळेबंद करून पाणी वापराचे नियोजन केले जाणार आहे. घन कचरा, सांडपाणी, ओला-सुका कचरा, प्लास्टीक कचरा आदीच्या विलगिकरणासाठी मोहीम राबविल्या जातील. जनावरांचे आरोग्य व वैरणाच्या नियोजनासाठी शिबिरे आयोजित केले जातील. दिव्यांग व्यक्तींना विविध लाभ मिळण्यासाठी शिबीरे आयोजित केले जातील आणि एस.सी. व नवबौद्ध घटक वंचित राहू नये, यासाठी योजनांचे प्रस्ताव ग्रामस्तरावर तयार करण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील प्रत्येक घराला नळाद्वारे पाणीपुरवठा करण्याबरोबरच गावातील सर्व शासकीय, निमशासकीय तसेच खासगी कार्यालयांवर रेन वॉटर हार्वेस्टींगची सुविधा निर्माण करण्यात येणार आहे. त्याचबरोबर बंधाऱ्याची क्षमता वाढविणे, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या तसेच ग्रामपंचायतीच्या मालकीच्या सर्व इमारतींची देखभाल दुरूस्ती करणे, असे विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती ग्रामविकास व पंचायत राज मंत्री गिरीष महाजन यांनी दिली.

0000

संजय ओरके/विसंअ

सांस्कृतिक क्षेत्राला पुढे नेण्यासाठी पूर्ण क्षमतेने प्रयत्नशील- सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार

पुणे, दि. 9: सांस्कृतिक कार्य विभागाच्या माध्यमातून सांस्कृतिक, नाट्य, चित्रपट, साहित्य या क्षेत्राला पुढे नेण्यासाठी पूर्ण क्षमतेने कार्य करत असल्याची माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

मुकुंदनगर थिएटर अकॅडमी येथे आयोजित 21 व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव समारोप व पुरस्कार वितरण प्रसंगी ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील, ज्येष्ठ दिग्दर्शक पद्मभुषण जानु बर्मा, अभिनेत्री पद्मश्री विद्या बालन, पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे अध्यक्ष डॉ. जब्बार पटेल, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. अविनाश ढाकणे आदी उपस्थित होते.

 पुस्कारार्थीचे अभिनंदन करुन श्री. मुनगंटीवार म्हणाले, मुंबई व कोल्हापूर येथील चित्रनगरी अत्याधुनिक करण्याचा प्रयत्न आहे. राज्याने वस्तु व सेवा कर कायदा आल्यानंतर नागरिकांना सहज, सुलभरित्या चित्रपट बघता यावा यासाठी महानगरपालिका क्षेत्रातील करमणुक कर समाप्त करण्याचा सांस्कृतिक विभागाने निर्णय घेतला. महाराष्ट्र सरकार ओटीटी प्लॅटफार्म, पोर्टल तयार करीत आहे.  चित्रपट उद्योगाला चालना देण्यासाठी शासन प्रयत्न करणार आहे.

देशातील चित्रपट क्षेत्रानेदेखील आज चांगली प्रगती केली आहे. विश्वात सर्वात जास्त चित्रपटाची निर्मिती भारतात केली जाते. आपल्या चित्रपटांचे अनुकरण इतरांनी केले पाहिजे. पर्यावरणाचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी दिग्दर्शकांनी काम करावे. येत्या काळात पुरस्काराच्या रक्कमेत वाढ करण्याबाबत शासन विचार करेल, असे श्री. मुनगंटीवार म्हणाले.

सांस्कृतिक क्षेत्राच्या माध्यमातून मनाला शक्ती, ऊर्जा, उत्साह देण्याचे कार्य करायचे आहे. या क्षेत्रात महाराष्ट्राने आपली विशेष ओळख जगभरात प्रस्थापित केली आहे असेही त्यांनी सांगितले.

पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, पुणे ही सांस्कृतिक राजधानी आहे. सगळ्या प्रकारच्या कलेचे अविष्कार येथे होतात. मुंबई ही हिंदी चित्रपटाची जन्मभूमी, कर्मभूमी मानली जाते त्याचप्रमाणे पुण्याला मराठी चित्रपटाची जन्मभूमी मानली जाते. त्यामुळे कोल्हापूरप्रमाणे पुण्यात उत्तम दर्जाचा चित्रनगरी निर्माण करण्याची सांस्कृतिक कार्य मंत्र्यांकडे मागणी केली आहे. या चित्रनगरीच्या माध्यमातून पुण्यात अनेक चांगले चित्रपट निर्माण होतील, असे त्यांनी सांगितले.

सलग 21 वर्ष पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे आयोजन केल्याबद्दल आयोजकांचे तसेच पुरस्कारार्थीचे श्री. पाटील यांनी अभिनंदन केले.

डॉ. पटेल म्हणाले, 21 व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सुमारे 1 लाख नागरिकांनी चित्रपट बघितले. चित्रपट दाखविण्याबरोबर जागतिक पातळीवरील विविध विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे, असेही ते म्हणाले.

अभिनेत्री विद्या बालन यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमापूर्वी गायक राहुल देशपांडे आणि गायिका प्रियंका बर्वे यांच्या शास्त्रीय गायनाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.

मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना पुरस्काराचे वितरण करण्यात आले. ज्युरी व निवड समितीतील सदस्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

राज्य शासनाचा संत तुकाराम आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपट पुरस्कार ‘मदार’ या चित्रपटाला तर  आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार ‘टोरी अँड लोकिता’ (दिग्दर्शक जीन-पियरे डार्डेन, लुक डार्डेन) या चित्रपटाला देण्यात आला.

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ पुरस्कार

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्कार – मंगेश बदार (चित्रपट मदार)

सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार – मिलिंद शिंदे (चित्रपट मदार)

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार- अमृता अगरवाल (चित्रपट मदार)

सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी पुरस्कार – आकाश बनकर आणि अजय भालेराव (चित्रपट मदार)

सर्वोत्कृष्ट पटकथा पुरस्कार – राहुल आवटे (चित्रपट पंचक)

 विशेष नामनिर्देशित दिग्दर्शक पुरस्कार – कविता दातीर आणि अमित सोनवणे (चित्रपट गिरकी)

विशेष नामनिर्देशित कला दिग्दर्शक पुरस्कार – कुणाल वेदपाठक ( चित्रपट डायरी ऑफ विनायक पंडीत)

महाराष्ट्र शासनाचे आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार

सर्वोत्कृष्ट  आंतरराष्ट्रीय  दिग्दर्शक पुरस्कार – मारयाना एर गोर्बार्च ( चित्रपट क्लोंडिके)

एमआयटी-एसएफटी ह्युमन स्प्रिट पुरस्कार – चित्रपट क्लोंडिके

विशेष नामनिर्देशित चित्रपट पुरस्कार – बॉय फ्राम हेव्हन

विशेष नामनिर्देशित अभिनेत्री पुरस्कार -लुब्ना अझ्बल (द ब्लयू कॅफ्टन)

समतेसाठी प्रयत्न करणाऱ्या सामाजिक संस्थांना प्रोत्साहन देणार –  सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार

            पुणे, दि. ९ : समाजातील विषमता दूर करून समतेसाठी कार्य करणाऱ्या सामाजिक संस्थांना प्रोत्साहन देण्यात येईल, असे प्रतिपादन सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

            महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्यावतीने सामाजिक दायित्व निधीतून ९ सामाजिक संस्थांना आर्थिक मदतीच्या धनादेशाचे मंत्री श्री. मुनगंटीवार यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंडळ येथे आयोजित या कार्यक्रमाला महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. अविनाश ढाकणे आणि संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

            मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले की, काही सामाजिक संस्था समाजातील विषमता दूर करण्यासाठी सेवाभावीवृत्तीने आणि चांगले संस्कार सोबत घेऊन कार्य करत आहेत याचे समाधान वाटते. अशा संस्थांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे. सामाजिक संस्थांनी त्यांच्या कार्याचे चांगल्याप्रकारे सादरीकरण करून प्रस्ताव सादर करावेत. राज्य सरकारच्यावतीने सामाजिक दायित्व निधीच्या माध्यमातून या संस्थांना आर्थिक मदत उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न केले जातील.

            आज महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ यांच्या वतीने ९ संस्थांना आर्थिक मदत देण्यात आली याचा आनंद होत आहे, असे सांगून त्यांनी सामाजिक संस्थांच्या पुढील वाटचालीस त्यांनी शुभेच्छा दिल्या.

आर्थिक मदत देण्यात आलेल्या संस्था

            जनसेवा न्यास हडपसर, सेवा आरोग्य फाऊंडेशन, पुणे, स्वानंद जनकल्याण प्रतिष्ठान, सिंहगड रोड, पुणे, स्वरूप वर्धिनी, पुणे, विवेक व्यासपीठ,पुणे, वनांचल समृध्दी अभियान फाऊंडेशन, नवी मुंबई, हिंदुस्थान प्रकाशन संस्था,मुंबई व भोगावती सांस्कृतिक मंडळ, कोल्हापूर या संस्थांना यावेळी आर्थिक मदत देण्यात आली.

            या संस्था समाजातील झोपडट्टीवासीय नागरिकांना आरोग्य सुविधा, मुलांसाठी अभ्यासिका, संस्कार वर्ग, किशोरी विकास प्रकल्प, गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा, साक्षरता, सामाजिक विकासासाठी शिक्षण, पर्यावरण व दुर्गम व डोंगराळ भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सर्वांगीण विकास करण्यासाठी वसतिगृहे, इत्यादी माध्यमातून कार्य करत आहेत.

०००

राज्यातील सामान्य नागरिकांसाठी ५०० ठिकाणी आपला दवाखाना – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

            मुंबई, दि. ९ : राज्यातील सर्व नागरिकांना आरोग्याच्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना योजनेचा राज्यभर विस्तार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सांगितले. राज्यातील प्रत्येक तालुक्यात आणि शहरी भागात, असे एकूण पाचशे ठिकाणी आपला दवाखाना सुरू केले जातील, असे त्यांनी सांगितले.

            राज्यातील प्रत्येक तालुक्यात एक हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना स्थापन करण्याबाबत घोषणा कार्यक्रम झाला. त्यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे हा कार्यक्रम झाला. यावेळी वाशिम जिल्ह्यातील रिसोड येथील आपला दवाखानाचे प्रातिनिधिक स्वरूपात उद्घाटन करण्यात आले.

            या कार्यक्रमाला सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, बंदरे मंत्री दादाजी भुसे, राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा, आमदार आशिष शेलार, भरत गोगावले, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

            मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, मुंबईपाठोपाठ राज्यातील प्रत्येक तालुक्याच्या मुख्यालयी आपला दवाखाना सुरू होणार असून सुमारे ५०० ठिकाणी आपला दवाखाना सुरू करण्यात येईल. मुंबईत सुरू केलेल्या दवाखान्याला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. घराजवळ असलेल्या दवाखान्यामुळे लगेच उपचार मिळायला सुरू झाले. त्यामुळे मुंबईतील ही संकल्पना राज्यातील तालुक्यात विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे.

            केंद्र सरकारने राज्यातील रेल्वेचे प्रकल्प, नगर विकास विभागाच्या विविध प्रकारच्या प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. मुंबई शहराला आणखी विकसित करण्यावर भर दिला जात आहे, असे त्यांनी सांगितले.

            सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी प्रास्ताविक केले. आज झालेल्या ४५८ रक्तदान शिबीरात सुमारे ७ हजार २०० बॅगचे संकलन झाले. राज्यभरात १ हजार ८३५ आरोग्य शिबीरात २ लाख १२ हजार ५०५ रुग्णांना तपासण्यात आले. जागरुक पालक, सुदृढ बालक अभियानात सुमारे साडेतीन लाख बालकांची तपासणी करण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले.

            यावेळी मंत्री श्री. पाटील, आमदार ॲड. आशिष शेलार यांचीही भाषणे झाली. यावेळी खासदार श्रीरंग बारणे, आमदार कालिदास कोळंबकर, आमदार यामिनी जाधव, आमदार संजय शिरसाट आदी उपस्थित होते.

            यावेळी आयुक्त धीरजकुमार, संचालक डॉ. नितीन अंबाडेकर, डॉ. स्वप्नील लाळे, उपसंचालक डॉ.विजय कंदेवाड, उपसंचालक डॉ विजय बाविस्कर, कैलास बाविस्कर आदी उपस्थित होते. डॉ. कंदेवाड यांनी आभार मानले.

०००

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव

आरोग्य, रक्तदान शिबिरे यांसह समाजोपयोगी उपक्रमांवर भर

मुंबई, दि. ९ :- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आज वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव झाला. राज्यभर त्यानिमित्त आरोग्य, रक्तदान शिबीरे, आपला दवाखान्याचे विस्तारीकरण, दिव्यांगांना सायकल वाटप यांसारख्या विविध समाजोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. मुख्यमंत्री श्री. शिंदे यांना राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी शुभेच्छा देवून अभिष्टचिंतन केले.

विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर, अबाल-ज्येष्ठांपासून अनेकांनी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांना प्रत्यक्ष भेटून, दुरध्वनीद्वारे शुभेच्छा दिल्या. यात राजकीय, सामाजिक संस्था तसेच विविध संघटना आणि कला, नाट्य, चित्रपट क्षेत्रातील मान्यवर, पदाधिकारी आणि प्रशासनातील अधिकारी आदींचा समावेश होता.

मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या ठाणे येथील निवासस्थानी सकाळपासूनच परिसरातील शालेय मुला-मुलींचीही शुभेच्छा देण्यासाठी गर्दी झाली होती. मुख्यमंत्री श्री. शिंदे यांना शुभेच्छा देण्यासाठी मध्यरात्रीपासूनच ओघ सुरु झाला होता. देशात तसेच विदेशातही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आल्याची छायाचित्रे, ध्वनीचित्रफिती विविध समाजमाध्यमांवरही झळकली. मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी ठाणे येथील निवासस्थानी, आनंदाश्रम, टेंभी नाका, वर्षा शासकीय निवासस्थानी शुभेच्छा स्वीकारल्या.

वाढदिवस साधेपणाने साजरा करतानाच विविध समाजोपयोगी उपक्रम, कार्यक्रम आयोजित करण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले होते. त्याला प्रतिसाद म्हणून राज्यात विविध ठिकाणी आरोग्य आणि रक्तदान शिबीर, वृक्षारोपणासह, स्वच्छता आणि अशा अनेकविध मोहिमांचे आयोजन करण्यात आले.

०००

मातृभाषा, संस्कार, नितीमूल्यांच्या आधारे देशाची प्रगती – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

पुणे, दि. ९: मातृभाषा, संस्कार आणि नितीमूल्यांच्या आधारे उद्दिष्ट निश्चित करीत दूरदृष्टीने कार्य केल्यास देश प्रगती करेल, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.

राज्यपाल श्री. कोश्यारी यांच्या हस्ते सिम्बायोसिस विश्वभवन येथे क्यूएस रेटिंग सिस्टमचे सीईओ डॉ. अश्विन फर्नांडिस लिखित ‘इंडियाज नॉलेज सुप्रीमसी : द न्यू डॉऊन’ या पुस्तकाचे प्रकाशन झाले. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या प्र. कुलगुरु डॉ. विद्या येरवडेकर, कुलगुरु डॉ. रजनी गुप्ते, अधिष्ठाता डॉ. भामा वेंकटरमणी उपस्थित होते.

आपले ज्ञान विश्वात सर्वोत्कृष्ट असल्याचे सांगून राज्यपाल श्री. कोश्यारी म्हणाले की, आपल्याला स्थिती, काळाप्रमाणे बदलले पाहिजे. फक्त आपल्या पूर्व वैभवाचा गौरव करून चालणार नाही. भूतकाळापासून शिकावे, वर्तमानात जगावे आणि भविष्याकडे पहावे या पद्धतीने पुढे जायला हवे.

जागतिक क्रमवारीमध्ये (रँकिंग) भारतीय विद्यापीठांचे स्थान कसे सुधारावे यासाठी प्रयत्न म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल राज्यपालांनी सिम्बायोसिसचे अभिनंदन केले. या पुस्तकामध्ये आपल्या शैक्षणिक क्षेत्रातील पूर्ववैभवाचा, महान बुद्धीवंतांच्या विचारांचा दाखला देऊन उज्ज्वल भविष्यासाठी उपाययोजनांची माहिती चांगल्याप्रकारे दिल्याचे श्री. कोश्यारी म्हणाले.

भारतातील बुद्धीवंत विदेशात जाऊन मोठ्या बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये उच्च पदे भूषवतात. त्याप्रमाणे आपल्या विद्यापीठांनाही विश्वस्तरावर घेऊन जाण्यासाठी प्रयत्न व्हावेत. पूर्वीच्या काळात आपला देश ज्ञानाच्या बाबतीत उत्कृष्ट होता. हे वैभव पुन्हा मिळवण्यासाठी सर्व घटकांनी काम करण्याची गरज आहे. शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण महत्त्वपूर्ण ठरेल, असेही ते म्हणाले.

बुद्धिमान लोकांनी आपल्या मुलांना संस्कार द्यावेत, देशाविषयी, मातृभाषेविषयी गौरव भावना निर्माण करावी.  शिक्षकाने आपल्या विद्यार्थ्याकडे समर्पित भावनेने पाहिले पाहिजे, असेही श्री. राज्यपाल म्हणाले.

पुस्तकाचे लेखक आणि मध्य पूर्व, आफ्रिका आणि दक्षिण आशियातील क्यूएस क्वाक्वेरेली सायमंड्सचे प्रादेशिक संचालक व क्यूएस रेटिंग सिस्टमचे सीईओ डॉ. फर्नांडिस म्हणाले, भारताच्या  शैक्षणिक पूर्व वैभवाकडे जाण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याची गरज आहे. सध्या एकही भारतीय विश्वविद्यापीठ जगात पहिल्या १०० क्रमांकामध्ये नाही. मात्र, ऐतिहासिक काळातील विद्यापीठांचा दाखला घेत शिक्षण संस्थांना नियोजनबद्ध प्रयत्न करावे लागतील.

कार्यक्रमाला विद्यापीठातील प्राचार्य, प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते.

000

पश्चिम वाहिनी नद्यांचे वाहून जाणारे पाणी मराठवाड्यात वळविण्याचे काम यावर्षी सुरु करण्यासाठी प्रयत्नशील – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मराठवाड्याचा दुष्काळ दूर झाल्याशिवाय राज्याचा विकास होऊ शकत नाही

 लातूर येथील कारखान्यात ‘वंदे भारत रेल्वेच्या बोगींची निर्मिती होणार

 मराठवाड्याच्या विकासाचे स्वप्न साकार करण्यासाठी एकजुटीने प्रयत्न करूया

लातूर, दि. ९ (जिमाका) : कृष्णा खोऱ्यातील पश्चिम वाहिनी नद्यांचे समुद्राला वाहून जाणारे पाणी गोदावरी खोऱ्यात वळवून मराठवाड्यात आणले जाणार आहे. यासाठीच्या तांत्रिक बाबींची पूर्तता करण्याची कार्यवाही अंतिम टप्प्यात असून २०२३ मध्येच या कामाला सुरुवात करण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. निलंगा (जि. लातूर) येथे राज्याचे माजी मुख्यमंत्री कर्मवीर डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या स्मारकाच्या अनावरणप्रसंगी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.

माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या हस्ते स्मारकाचे अनावरण झाले. यावेळी माजी मुख्यमंत्री तथा माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी मंत्री तथा आमदार जयंत पाटील, माजी मंत्री तथा आमदार यशोमती ठाकूर, श्रीमती सुशीलाबाई शिवाजीराव पाटील निलंगेकर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. तसेच खासदार सुधाकर शृंगारे, आमदार रमेश कराड, आमदार विक्रम काळे, आमदार संजय बनसोडे, आमदार संभाजी पाटील निलंगेकर, आमदार अभिमन्यू पवार, माजी मंत्री दिलीपराव देशमुख, माजी खासदार रूपाताई निलंगेकर, जिल्हाधिकरी पृथ्वीराज बी. पी. यांच्यासह माजी खासदार, माजी आमदार उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनी सतत समाजाच्या भल्याचा विचार केला. मराठवाड्याच्या विकासासाठी ते आग्रही होते. जिल्ह्यातील लोअर तेरणा, मांजरा प्रकल्पासह राज्यात अनेक सिंचन प्रकल्प आकारास येण्यामध्ये त्यांनी महत्त्वाचे योगदान दिले. औरंगाबाद येथे उच्च न्यायालायचे खंडपीठ होण्यासाठी त्यांनी सर्वोच्च न्यायालयापर्यंत यशस्वी लढा दिला. त्यामुळे आज मराठवाड्यातील लोकांना जलद न्याय मिळण्यास मदत होत आहे. राज्याचे मुख्यमंत्री म्हणून काम करताना डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनी सर्वसामान्य लोकांच्या विकासासाठी योजना आखल्या. चाळीस कलमी कार्यक्रम राबवून मराठवाडा, विदर्भ आणि कोकणच्या विकासाला गती दिली. यासारखे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेवून राज्याच्या विकासासाठी त्यांनी प्रयत्न केल्याचे उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यावेळी म्हणाले. मराठवाड्याचा विकास हे त्यांचे स्वप्न होते. त्यांचे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मराठवड्यात सिंचनाच्या सोयी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. त्यासाठी पश्चिम वाहिनी नद्यांमधून समुद्राला वाहून जाणारे पाणी मराठवाड्यात आणले जाणार आहे. त्याशिवाय मराठवाड्याचा दुष्काळ दूर होणार नाही आणि पर्यायाने महाराष्ट्राचा विकास पूर्ण होणार नाही. त्यामुळे डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे मराठवाड्याच्या विकासाचे स्वप्न साकार करण्यासाठी एकजुटीने प्रयत्न करण्याची ग्वाही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी दिली

लातूर येथे रेल्वे बोगी निर्मितीचा कारखाना मंजूर झाल्यानंतर डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनी आनंद व्यक्त केला होता. या बोगी निर्मिती कारखान्यात लवकरच ‘वंदे भारत’रेल्वेच्या बोगींची र्निमिती सुरु होणार असल्याचे उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले. सध्या मराठवाडा मुक्तिसंग्रामाचे अमृत महोत्सवी वर्ष सुरु असून डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनीही या लढ्यात सहभाग घेतला होता. या अनुषंगाने त्यांच्या जीवनातील एक प्रसंग उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितला.

माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांनी आपल्या मनोगतात डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्यासोबत काम करताना घडलेल्या प्रसंगांना उजाळा दिला. कोणताही भेदभाव न करता सर्व समाज घटकांच्या विकासासाठी डॉ. शिवाजीराव पाटील – निलंगेकर यांनी प्रयत्न केल्याचे त्यांनी सांगितले. तसेच त्यांच्यापासून सर्वांनी प्रेरणा घेवून समाजाच्या, देशाच्या विकासासाठी काम करावे, असे आवाहन केले.

डॉ. शिवाजीराव पाटील – निलंगेकर यांनी राज्यातील कष्टकरी जनतेच्या हिताची कामे केली. त्यांच्या विकासासाठी भरीव योगदान दिले. त्यांच्या स्मारकामुळे समाजातील सर्व घटकांसाठी काम करण्याची प्रेरणा पुढील पिढीला मिळेल, असा विश्वास माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केला.

समाज हिताचे कोणतेही काम करताना डॉ. शिवाजीराव पाटील – निलंगेकर यांच्याकडे विचार स्पष्टता होती. त्यांच्या कार्यकाळात मांजरा, तेरणा खोऱ्यात अनेक विकासकामे झाली, असे माजी मंत्री तथा आमदार जयंत पाटील यांनी सांगितले. तसेच त्यांच्याविषयीच्या आठवणींना उजाळा दिला.

विविध पदांची जबाबदारी पार पडताना डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर राज्यातील सर्वसामान्य जनतेच्या विकासासाठी प्रयत्न केले. त्या पदांमुळे मिळालेल्या अधिकारांचा वापर लोकांच्या हितासाठी केला. त्यांच्या काळात मराठवाड्याच्या विकासाला गती मिळाली, असे माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी सांगितले. तसेच त्यांचे नव्या पिढीसाठी मार्गदर्शक ठरेल असा विश्वास व्यक्त केला.

डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनी आपल्या कार्यकाळात हजारो लोकांची घरे उभी केली. त्यांच्या विषयीचा जिव्हाळा आजही अनुभवायला मिळतो. उच्च न्यायालयाचे औरंगाबाद खंडपीठ ते विधानभवनाच्या इमारतीच्या उभारणीसह अनेक विकासकामांमध्ये त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान होते. मराठवाड्याच्या विकासासाठी त्यांनी प्रयत्न केले. त्यांनी पाहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी समुद्रात वाहून जाणारे पाणी मराठवाड्यात आणणे आवश्यक असल्याचे माजी मंत्री तथा आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी सांगितले. तसेच डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्याविषयीच्या विविध आठवणींना त्यांनी उजाळा दिला.

माजी मंत्री यशोमती ठाकूर, माजी राज्यमंत्री संजय बनसोडे यांनीही यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्याविषयीच्या आठवणींना उजाळा दिला. तसेच डॉ. शिवाजीराव पाटील – निलंगेकर स्मारक अनावरणनिमित्त केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील यांचा संदेश यावेळी चित्रफितीच्या माध्यमातून दाखविण्यात आला.

महाराष्ट्र शिक्षण समितीच्या वतीने विजय पाटील निलंगेकर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वागत केले. तसेच यावेळी चित्रफितीच्या माध्यमातून डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचा जीवनपट मांडण्यात आला. अशोकराव पाटील-निलंगेकर यांनी प्रास्ताविक केले. शैलेश गोजमगुंडे यांनी सूत्रसंचालन केले.

000

महाराष्ट्र शेतकरी आत्महत्यामुक्त करण्याचा राज्य शासनाचा संकल्प – पालकमंत्री उदय सामंत

अलिबाग, दि.9(जिमाका) : शेतकरी बांधवांचे जीवन सुसह्य होण्यास्तव राज्य शासन कटिबद्ध असून महाराष्ट्र शेतकरी आत्महत्यामुक्त करणे, हा राज्य शासनाचा संकल्प असल्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी आज येथे सांगितले.
सिडको मैदान, खांदेश्वर रेल्वे स्टेशन जवळ, कामोठे, पनवेल येथे रायगड जिल्हा कृषी महोत्सव 2022-23 चे उद्घाटन आज पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते संपन्न झाले, त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी विधानपरिषद शिक्षक मतदारसंघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, आमदार प्रशांत ठाकूर,जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे, महानगरपालिका आयुक्त गणेश देशमुख, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी उज्ज्वला बाणखेले, पनवेल प्रांताधिकारी राहुल मुंडके, तहसिलदार विजय तळेकर, विविध शासकीय विभागांचे जिल्हास्तरीय प्रमुख, शेतकरी बांधव व सर्व संबंधित उपस्थित होते.
श्री. सामंत पुढे म्हणाले, स्थानिक पातळीवरच्या उत्पादनास चांगली बाजापेठ मिळण्याकरिता सर्वांनी मिळून प्रयत्न करणे आवश्यक आहे. या भागातील शेतकऱ्यांसाठी काजू बोर्ड आणि आंबा बोर्ड स्थापन करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून या माध्यमातून शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत मिळणार आहे.

ते म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असणारे हे सरकार शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांचे सरकार आहे. सरकारने अवघ्या काही महिन्यांच्या कालावधीत शेतकरी बांधवांच्या हिताचे अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत आणि यापुढेही घेतले जातील.

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना ( CMEGP ) योजनेत समाविष्ट होणाऱ्या शहरी भागातील घटकांना २५% तर ग्रामीण भागातील घटकांना ३५% देय अनुदानाचा लाभ मिळणार आहे. या योजनेंतर्गत कर्ज उपलब्ध होण्याकरिता सरकारी आणि खाजगी क्षेत्रातील बँकासह आता राज्यातील सहकारी क्षेत्रातील १४ बँकांना प्रमुख सहयोगी संस्था म्हणून मान्यता देण्यात आली आहे. सहकारी बँकांकडून कर्ज उपलब्ध होण्याची व्यवस्था केल्यामुळे घटकांना जलदगतीने कर्ज मिळणे अधिक सोयीचे होणार आहे. कर्ज मिळण्यासाठी कोणत्याही तांत्रिक अडचणी येणार नाहीत, यासाठी बँकांना सूचित केले असल्याचेही श्री.सामंत यांनी यावेळी सांगितले.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने भात पीक स्पर्धेतील विजेत्या स्पर्धक शेतकरी बांधवांना पालकमंत्री श्री.सामंत यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देवून सन्मानित करण्यात आले.

या महोत्सवात कृषी तंत्रज्ञानाचा प्रचार आणि प्रसार करणाऱ्या अनेक संस्था सहभागी झालेल्या आहेत. हा कृषी महोत्सव पाच दिवस चालणार असून जिल्ह्यातील हजारो शेतकरी यामध्ये सहभागी होणार आहेत.

000

मागासवर्गीय कल्याणकारी योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी – पालकमंत्री दादाजी भुसे

नाशिक: दिनांक 09 फेब्रुवारी, 2023 (जिमाका वृत्तसेवा): जिल्हा परिषदेच्या 20 टक्के मागासवर्गीय सेस मंजूर निधीतून महिला, बेरोजगार युवक व विद्यार्थिनींना विविध साहित्याचे वाटप पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते आज करण्यात आले. मागसवर्गीयांसाठी असलेल्या कल्याणकारी योजनांची जिल्ह्यात प्रभावीपणे अंमलबजावणी करावी असे प्रतिपादन राज्याचे बंदरे व खनिकर्म मंत्री जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी केले.

छत्रपती शिवाजी स्टेडियम येथे आयोजित कार्यक्रमात पालकमंत्री श्री. भुसे बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी गंगाथरन डी., जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, जिल्हा समाज कल्याण अधिकारी योगेश पाटील यांच्यासह जिल्हा परिषदेचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागामार्फत 80 मागासवर्गीय बेरोजगार युवकांना 1 कोटी 60 लाख निधी सेस निधीतून मालवाहतूक व्यवसायासाठी चारचाकी वाहनांचे वाटप करण्यात आले. तसेच 12 लाख 90 हजार निधीतून 30 महिला लाभार्थ्यांना मसाला कांडप यंत्राचे वाटप आणि  3 लाख 85 हजार निधीतून 700 सायकली मागसवर्गीय विद्यार्थिंनींना देण्यात आल्या आहेत. त्यातील प्रातिनिधीक स्वरूपात 59 विद्यार्थींनींना सायकलींचे वाटप व 30 बेरोजगार युवकांना चारचाकी वाहनांचे वाटप पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते करण्यात आले.

तसेच जिल्हा नियोजन समिती मार्फत जिल्हा परिषदेला देण्यात आलेल्या 9 रूग्णवाहिकांचे लोकार्पण सुद्धा पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते यावेळी करण्यात आले.

000

विकास कामे दर्जेदार करुन ती गतीने पूर्ण करा – पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या सूचना

सांगली दि. 9 (जिमाका) :- ग्रामीण भागाच्या विकासासाठी केंद्र सरकार व राज्य शासनाच्या अनेकविध योजना आहेत. या योजनेतून जिल्ह्यात करण्यात येत असलेली विकास कामे दर्जेदार व गुणवत्तापूर्ण होण्याबरोबरच ती गतीने पूर्ण करावीत, अशा सूचना पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी आज जिल्हा परिषद येथील आढावा बैठकीत दिल्या.

जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध योजना, विकास कामांचा आढावा घेण्यासाठी जिल्हा परिषदेमध्ये पालकमंत्री डॉ. खाडे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक संपन्न झाली. या बैठकीत त्यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डूडी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक दीपक चव्हाण यांच्यासी जिल्हा परिषदेमधील सर्व खात्यांचे प्रमुख उपस्थित होते.

विकास योजनांचा लाभ सामान्य माणसाला झाला पाहिजे. विकास योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी अधिकाऱ्यांनी  काम करावे. विकास योजनांवरील मंजूर निधी त्या-त्या योजनांवर पूर्णपणे खर्च व्हावा. तसेच निधी परत जावू नये याची दक्षता घ्यावी. मंजूर विकास कामे, पूर्ण झालेली कामे, प्रगती पथावरील कामे आणि अपूर्ण कामे याचा अधिकाऱ्यांनी नियमित आढावा घ्यावा. विकास कामांची माहिती स्‍थानिक लोकप्रतिनिधींना द्यावी, अशा सूचना पालकमंत्री डॉ. खाडे यांनी आढावा बैठकीत दिल्या.

ग्रामपंचायतीलकडील जनसुविधांची कामे प्राधान्याने पूर्ण करण्याच्या सूचना करुन पालकमंत्री डॉ. खाडे म्हणाले 2024 पर्यंत प्रत्येक घरात नळाद्वारे पाणी पुरवठा करण्यासाठी जल जीवन मिशन योजना राबविण्यात येत आहे.  देशाच्या  प्रधानमंत्री महोदयांची ही महत्वाकांक्षी योजना असून प्रत्येक गावात ही योजना प्राधान्याने राबवावी. या बरोबरच घरकुलांच्या योजनांची कामे, बांधकाम विभागाकडील कामे, पाणी पुरवठा योजनांची कामे, महिला व बाल विकास विभाग यासह सर्वच विभागांनी त्यांच्यकडील कामे गतीने पूर्ण करण्यासाही प्राधान्य द्यावे, अशा सूचना पालकमंत्री डॉ. खाडे यांनी यावेळी दिल्या.

000

ताज्या बातम्या

किसान समृद्धी प्रकल्पांमुळे माल थेट बाजारपेठेत विकण्याची संधी – पालकमंत्री संजय राठोड

0
जिल्हा वार्षिक योजनेतून प्रकल्पांवर १२ कोटी ४७ लाखाचा खर्च यवतमाळ, दि. १८ (जिमाका): वसुंधरा महिला किसान समृद्धी कार्यक्रमांतर्गत उभारण्यात आलेल्या धान्य प्रतवारी, ग्रेडिंग व...

पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते आकांक्षित तालुक्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सन्मान

0
यवतमाळ, दि. १८ (जिमाका): नीती आयोगाच्यावतीने जिल्ह्यातील पुसद व झरी जामणी या तालुक्यात आकांक्षित तालुका कार्यक्रम राबविण्यात येत आहे. आयोगाच्यावतीने या तालुक्यांना संपूर्णता अभियानांतर्गत...

रानभाज्यांचा दैनंदिन आहारात समावेश करावा -पालकमंत्री संजय राठोड

0
यवतमाळ, दि. १८ (जिमाका): अलिकडे प्रत्येकाचेच जीवनमान, दैनंदिन सवयी व खानपान बदलले आहे. सकस, पोषक आहाराऐवजी घातक अशा गोष्टींचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे शरीर...

राज्यातील प्रत्येक माणूस सुखी, समाधानी, आनंदी होऊ दे

0
पुणे दि. १८: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खेड तालुक्यातील श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिरात ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेऊन विधिवत पूजा केली. राज्यात सर्वत्र चांगला पाऊस पडत...

नवीन पिढीला इतिहासाशी जोडण्याचे कार्य सुरू – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
मुंबई, दि. १८: इतिहासाशी नवीन पिढीला जोडण्याची भूमिका श्रीमंत राजे रघुजी भोसले यांच्या ऐतिहासिक तलवारीने पार पाडली आहे. या तलवारीमुळे आपण इतिहासाशी जोडले गेलो...