रविवार, ऑगस्ट 17, 2025
Home Blog Page 1659

धुळे शहर ‘सीसीटीव्ही’ च्या निगराणीखाली; पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

धुळे, दि. 5 (जिमाका वृत्तसेवा) : धुळे शहरातील नागरिकांची सुरक्षितता अबाधित राखणे, धार्मिक कार्यक्रम व मिरवणुकांवर नियंत्रण ठेवणे, वाहतुकीचे नियंत्रण तसेच शहरातील संवदेनशील भागावर नियंत्रण ठेवण्यासाठी धुळे पोलीस दलास आता सीसीटीव्ही ची मदत मिळणार आहे. शहरातील सहा पोलीस स्टेशन अंतर्गत लावण्यात आलेल्या 116 ठिकाणच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे व पोलीस अधिक्षक कार्यालयातील नियंत्रण कक्षाचे लोकार्पण आज राज्याचे ग्रामविकासमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष महाजन यांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष अश्विनी पाटील, खासदार डॉ सुभाष भामरे, आमदार अमरिश पटेल, आ. जयकुमार रावल, नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरिक्षक बी. जी. शेखर पाटील, पोलीस अधीक्षक संजय बारकुंड, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, उपमहापौर नागसेन बोरसे, उपविभागीय पोलीस अधिकारी एस.ऋषीकेश रेड्डी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

धुळे शहराच्या सुरक्षिततेसाठी शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यास जिल्हा वार्षिक योजनेतंर्गत सन 2020-21 मध्ये 5 कोटी 36 लाख रुपयांच्या निधीस प्रशासकीय मान्यता देण्यात येऊन 2 कोटी 65 लाख रुपयांचा निधी वितरीत करण्यात आला होता. या निधीतून शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे काम पूर्ण करण्यात आले. तर सप्टेंबर 2022 मध्ये फायबर नेटवर्क तयार करुन सर्व कॅमेरे नियंत्रण कक्षात कनेक्ट करण्यात आली आहे. यांचे लोकार्पण आज पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. पुढील काळात जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार असल्याचे यावेळी पालकमंत्री श्री. महाजन यांनी सांगितले.

धुळे शहर पोलीस स्टेशन हद्दीत 33, आझादनगर 20, देवपूर 31, देवपूर पश्चिम 14, चाळीसगाव रोड 10, मोहाडी पोलीस स्टेशन हद्दीत 8 असे एकूण 116 ठिकाणी कॅमेरे बसविण्यात आले आहे. तर या आर्थिक वर्षात साक्री, शिरपूर, दोंडाईचा, शिंदखेडा या शहरांमध्येही सीसीटीव्ही सनिरिक्षण यंत्रणा बसविण्याचे काम सुरु करण्यात येणार असून यामुळे गुन्हेगारांवर वचक ठेवण्यास मदत होणार असल्याचे पोलीस अधीक्षक श्री. बारकुंड यांनी यावेळी सांगितले.

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाला ऊर्जितावस्थेत आणण्याचा शासनाचा प्रयत्न – पालकमंत्री शंभूराज देसाई

सातारा -दि.5- कोरोना संसर्गामुळे  विविध प्रतिबंध लादण्यात आले होते. या प्रतिबंधामुळे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे मोठे नुकसान झाले. महामंडळ हे सर्वसामान्यांचे परिवहनाचे साधन आहे या महामंडळाला ऊर्जितावस्थेत आणण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचे राज्य उत्पादन शुल्क तथा पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले

पाटण एसटी बस आगाराला नवीन दहा बसेस मिळाल्या आहेत त्याचे लोकार्पण पालकमंत्री श्री. देसाई यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी प्रांताधिकारी सुनील गाडे, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे महाव्यवस्थापक शिवाजीराव जगताप, उपमहाव्यवस्थापक श्रीनिवास जोशी, विभाग नियंत्रक रोहन पलंगे, आगार व्यवस्थापक दयानंद पाटील आदी उपस्थित होते

 

परिवहन महामंडळ  उर्जितावस्थेत  आणण्यासाठी शासन विविध उपक्रम राबवत आहे असे सांगून पालकमंत्री श्री देसाई म्हणाले, राज्यातील प्रत्येक एसटी डेपोला नवीन बसेस व इलेक्ट्रॉनिक बसेस उपलब्ध करून देण्यात येणार आहेत तसेच डोंगरी भागासाठी लहान बसेस उपलब्ध करून देण्यात येणार आहेत .शासनाने नेहमीच परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्राधान्य दिले आहे. कर्मचाऱ्यांनीही उपलब्ध होणाऱ्या बसेस चांगल्या पद्धतीने वापराव्यात व शिस्तबद्ध पद्धतीने काम करावे.

स्वच्छ व सुंदर डेपोसाठी राज्य शासनाने पारितोषिक जाहीर केले आहे हे पारितोषिक  पटकविण्यासाठी पाटण आगाराने प्रयत्न करावा. बस स्थानक विस्तारणीकरणाच्या आराखड्यास मंजुरी देण्यात आली आहे. विविध विभागांच्या माध्यमातून विस्तारणीकरणाचा प्रश्न मार्गी लावावा असेही पालकमंत्री श्री देसाई यांनी यावेळी सांगितले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाव्यवस्थापक  शिवाजीराव जगताप यांनी केले तर आभार आगार व्यवस्थापक दयानंद पाटील यांनी मानले

या कार्यक्रमास परिवहन महामंडळातील अधिकारी कर्मचारी नागरिक उपस्थित होते.

संत रविदास महाराज जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अभिवादन

ठाणे, दि. ५ (जिमाका) : महान संत रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज अभिवादन केले.

ठाणे येथील निवासस्थानी झालेल्या कार्यक्रमाच्या वेळी तहसीलदार राजाराम तवटे यांच्यासह अधिकारी, आदी उपस्थित होते.

कोकण लोककला महामंडळ स्थापन करण्यासाठी शासन सकारात्मक – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

रत्नागिरी, दि. ०५:- कोकणात लोककलेची समृद्ध  परंपरा आहे. कोकणात पर्यटनाच्या अमर्याद संधी आहेत. यासाठीच कोकण क्षेत्र विकास प्राधिकरण  स्थापन करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. या माध्यमातून संपूर्ण कोकणाचा कायापालट कालबद्ध रितीने होऊ शकतो. मुंबई ते सिंधुदुर्गपर्यंत ग्रीनफिल्ड रस्ता  तयार झाल्यास पर्यटन वाढीस चालना मिळेल. कोकणातील लोककला वृद्धिंगत करण्यासाठी लोककला महामंडळ स्थापन करण्यासाठी शासन सकारात्मक आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

चिपळूण येथील श्रीजुना कालभैरव मैदानावर ५ ते ८ फेबुवारीदरम्यान पर्यटन, लोककला, सांस्कृतिक, खाद्य महोत्सव रंगणार आहे.या महोत्सवाचे उद्घाटन दूरदृश्य प्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.

याप्रसंगी कार्यक्रमस्थळी राज्याचे उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, ज्येष्ठ साहित्यिक तथा संयोजन समिती अध्यक्ष तानाजी चोरगे, लोकमान्य टिळक स्मारक वाचनालयाचे मार्गदर्शक प्रकाश देशपांडे, आमदार शेखर निकम, आमदार प्रसाद लाड, आमदार योगेश कदम, माजी आमदार सदानंद चव्हाण, जिल्ह्याचे जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, जिल्हा पोलीस अधिक्षक धनंजय कुलकर्णी,  लोककलावंत प्रभाकर मोरे, ग्रंथालयाचे अध्यक्ष डॉ. यतीन जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

रत्नागिरी जिल्ह्यात आतापर्यंत होऊन गेलेल्या रत्नांचे लोककला प्रदर्शनात लावलेल्या तैलचित्रांचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या तैलचित्रांमध्ये धर्मवीर आनंद दिघे यांच्या तैलचित्राचा समावेश करण्यात आला आहे.

यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, लोककला महोत्सवामुळे आर्थिक विकासाला चालना मिळेल,गेल्या सहा महिन्यांत या शासनाने अनेक लोकहिताचे निर्णय घेतले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या कोकण भूमीतील गडकिल्ले,सागरी किनारे,निसर्गसंपन्न वातावरण हे कोकणचे वैभव आहे. मुंबई ते गोवा जुना महामार्गदेखील वेगाने तयार होत आहे.

कोकणची वैशिष्ट्ये अधोरेखित करणाऱ्या पर्यटन, लोककला, सांस्कृतिक आणि कोकणी खाद्य महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. उर्वरित महाराष्ट्राला किंबहुना भारताला कोकणचा सर्वांगीण परिचय व्हावा, हा या महोत्सवामागचा मुख्य उद्देश आहे.  वाढत्या मोबाईल वापराने लोककला महोत्सवामुळे तरुण पिढी याकडे वळेल असेही मुख्यमंत्री म्हणाले.

लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराच्या अरविंद जाधव अपरांत संशोधन केंद्रातर्फे आयोजित करण्यात आलेल्या या महोत्सवात चार दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. कोकणातील विविध लोककला सादर होणार आहेत.

पालघरपासून सिंधुदुर्गपर्यंत तारपा, घोळनृत्य, दशावतार, चित्रकृती यांसह विविध कला एकत्र आणल्या जाणार आहेत. रोजची संध्याकाळ विविध लोककलांच्या दर्शनाने सुरू होणार आहे.

खाद्य महोत्सवांतर्गत विविध कोकणी शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थांचे स्टॉल असतील. श्री जुना कालभैरव मंदिर अंतर्गत कै. बापू बाबाजी सागावकर मैदानावर उभारण्यात आलेल्या सह्याद्रीनगरात हा महोत्सव होणार आहे.

अशा महोत्सवांमुळे गोवा आणि केरळकडे असणारा पर्यटकांचा ओघ तितक्‍याच निसर्गसंपन्न आणि सांस्कृतिक संपन्नता असणाऱ्या आणि परंपरा जपणाऱ्या कोकणाकडे वळण्यास  मदत होईल. कोकणचे निसर्गसौंदर्य, खाद्यपदार्थ, सामाजिक,सांस्कृतिक परंपरा आणि मुख्यत: कोकणची लोककला ठळकपणाने जगासमोर यावी, अपरिचित कोकणची ओळख व्हावी आणि पर्यटकांचे पाय कोकणाकडे वळावेत, यासाठी या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

चार दिवस चालणाऱ्या या महोत्सवामध्ये कोकणाच्या मातीतील अनेक अस्सल लोककला सादर केल्या जाणार आहेत. सिंधुदुर्गातील दशावतार/चित्रकथी, रत्नागिरी जिल्ह्यातील नमन, जाखडी, काटखेळ, गजो, संकासूर रायगड जिल्ह्यातील कोळी नृत्य, ठाणे जिल्ह्यातील तारपा नृत्य अशा ४० पेक्षा अधिक लोककला त्यांच्या मूळ रूपात सादर केल्या जाणार आहेत. दररोज सायंकाळी ६ ते रात्री १० या वेळेत लोककलांचे सादरीकरण होणार आहे. दररोज सायंकाळी साडेचार ते सहा या वेळेत खुला लोककला कट्टा स्थानिक कलाकारांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याशिवाय संदर्भपूर्ण माहिती देणारे परिसंवाद दिवसभरात होणार आहेत. कोकणी पदार्थांच्या वैशिष्ट्यपूर्ण चवींचे ३० पेक्षा अधिक स्टॉल्स असणारी खाऊगल्ली ही चोखंदळ खवैय्यांसाठी पर्वणी असणार आहे. हा सर्व कार्यक्रम रसिकांसाठी विनामूल्य खुला आहे.

मनोरंजनातून हसत खेळत नवमतदार समजून घेत आहेत मतदानाचे महत्त्व

साहित्य संमेलनात खेळा लुडो, सापसिडी; जाणून घ्या निवडणूक आयोगाचा इतिहास

वर्धा, दि. 4 (जिमाका) : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात हसत खेळत मनोरंजनातून जनजागृती केली जात आहे. सापसिडी, लुडोचा आनंद घेत घेत नवमतदार मतदानाचे महत्व, मतदार नोंदणी, निवडणूक आयोगाचा इतिहास समजून घेत आहे. मुलांच्या या खेळात अप्पर मुख्य सचिव तथा मुख्य निवडणूक अधिकारी डॅा.श्रीकांत देशपांडे यांनी सहभाग घेतला. खेळात विजयी झालेल्या मुलांना त्यांनी बक्षिसे दिली.

गेल्या तीन वर्षांपासून साहित्य संमेलनात निवडणूक जनजागृती या विषयवार विविध उपक्रमांसह विशिष्ट परिसंवाद निवडणूक आयोगाच्यातीने आयोजित केला जातो. आयोगाच्यावतीने वर्धा येथील संमेलनात आयोगाच्या या उपक्रमांना नवमतदारांसह सर्वसामान्य नागरिक, मतदारांचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभत आहे. विशेष म्हणजे आयोगाच्या जनजागृती खेळांचा नवमतदार आनंद घेत असल्याचे दिसत आहे.

आयोगाच्यावतीने चार स्वतंत्र दालने लावण्यात आली आहे. त्यातील दोन दालनांमध्ये निवडणूक आयोगाच्या स्थापनेपासूनचा आतापर्यंतचा इतिहास दाखविण्यात आला आहे. आयोगाचा हा रंजक आणि तेवढाच खडतळ प्रवास पाहतांना लोकशाहीच्या सुरुवातीपासूनचे आतापर्यंतचे चित्र डोळ्यासमोर उभे राहते. याठिकाणी स्वतंत्र भारताच्या पहिल्या मतदाराचा फोटो व माहिती तसेच निवडणूक प्रक्रियेत होत गेलेला बदल दर्शविण्यात आला आहे.

दुसऱ्या दालनात निवडणूक आयोगाच्यावतीने प्रकाशित व निवडणूक जनजागृती विषयक पुस्तके ठेवण्यात आली आहे. ही पुस्तके विक्रीस सुध्दा उपलब्ध आहे. याच ठिकाणी संमेलनात येणाऱ्या नागरिकांना मतदानाचे महत्व, मतदार नोंदणी, नोंदणीतील बदल करण्याची सोय उपलब्ध आहे. याठिकाणी उपस्थित असलेले मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यासाठी नागरिकांना लागणारे सर्व सहाय्य उपलब्ध करून देत आहे.

संमेलनातील ग्रंथ प्रदर्शनाच्या परिसरात विशेष जनजागृती चित्रफित दाखविण्यात येत आहे. ही चित्रफित देशातील विविध भाषांमध्ये आहे. याच ठिकाणी जनजागृती सापसिडी व लुडोचा खेळ आहे. येथे नवमतदार या खेळांसोबत मतदानाचे महत्व समजून घेत आहे. या खेळांना मुख्य निवडणूक अधिकारी डॅा.श्रीकांत देशपांडे यांनी भेट देऊन नवमतदारांसोबत खेळात सहभाग घेतला. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, निवडणूक उपजिल्हाधिकारी प्रविण महिरे, उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे, तहसिलदार रमेश कोळपे उपस्थित होते.

000000

मराठा आरक्षणासाठी एकजुटीने लढा देऊ – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. ४ : – मराठा समाजाचे आरक्षण मिळविण्यासाठी एकजुटीने लढा देऊ. मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, ही आपली सर्वांचीच प्रामाणिक इच्छा आहे. त्यामुळे मराठा समाजाच्या आरक्षणाची बाजू सर्वोच्च न्यायालयात आणखी, प्रबळपणे मांडण्यासाठी न्यायालयीन लढ्यासाठी टास्क फोर्स स्थापन केला जाईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे सांगितले. न्यायालयीन लढा चालुच राहील. या दरम्यान मराठा समाजाला ओबीसी प्रमाणेच सर्व सवलती व सुविधा देण्यात येतील. सारथी संस्थेच्या विस्तार आणि विविध योजना तसेच आणि आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाकरिता निधीची कुठलीही कमतरता भासू दिली जाणार नाही, असेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी जाहीर केले.

मराठा समाजाचे आरक्षणाच्या अनुषंगाने आज सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली व्यापक बैठक झाली. या बैठकीत मराठा समाजाच्या विविध मागण्यांबाबत सविस्तर चर्चा झाली. अनेक मुद्यांवर सकारात्मक निर्णय घेण्यात आले.

बैठकीस मराठा समाज आरक्षण व सुविधा मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष तथा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, दृकश्राव्य प्रणालीच्या माध्यमातून उपस्थित होते. तर समितीचे सदस्य व बंदरे व खनिकर्म मंत्री दादाजी भुसे आणि आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, आमदार भरत गोगावले यांच्यासह, राज्याचे मुख्य सचिव मनु कूमार श्रीवास्तव, राज्याचे महाधिवक्ता अँड. विरेंद्र सराफ, महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव नितीन करिर, सामान्य प्रशासन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव नितीन गद्रे, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव आनंद लिमये, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे सचिव सुमंत भागे तसेच विविध विभागांचे सचिव, वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते. विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदीही दृकश्राव्य प्रणालीद्वारे बैठकीस उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी निर्देश दिले की, सारथी संस्थेकरिता निधीची तरतूद मोठ्या प्रमाणात करण्यात येईल. त्यासाठी कार्यक्रम आणि योजनांची व्याप्ती वाढवण्यात यावी. यासाठी मनुष्यबळ आणि आवश्यकर आर्थित तरतूद करण्यात येईल. प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी वसतिगृह व्हावे यासाठी या वसतिगृह योजनेचा आराखडा तयार करण्यात यावा. सारथीच्या योजना गावा-गावात पोहोचविण्यासाठी दूत संकल्पना राबविण्यात यावी. याशिवाय आणखी अभिनव तसेच मराठा समाजातील तरुणांना शिक्षण, प्रशिक्षण यांच्यासह स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणाऱ्या योजनांवर आणखी भर देण्यात यावा. आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळासाठी जिल्ह्यातील सामाजिक न्याय भवन येथे जागा देण्यात येईल. जेणेकरून महामंडळाच्या योजना तरुणांपर्यंत आणि लोकांपर्यंत पोहचू शकतील. या महामंडळाच्या भाग भांडवलाची उपलब्धता, तसेच मंडळाच्या वित्त पुरवठ्याच्या अटींबाबत आणि अन्य बाबींबाबत केंद्रीय अर्थ राज्यमंत्री तसेच राज्यस्तरीय बँकर्स समितीकडेही पाठपुरावा केला जाईल. मराठा समाजातील तरुणांना आता ओबीसीप्रमाणेच सवलती दिल्या जातात. त्यामध्ये तफावत आढळल्यास त्या करिताही निर्देश दिले जातील. सर्वच विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांनी अधिसंख्य पदे भरण्याबाबतची कार्यवाही तातडीने पूर्ण करावी.

आरक्षणाच्या न्यायालयीन लढ्याबाबत बैठकीत व्यापक सूचना आल्या. त्याबाबत मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, आरक्षण व सुविधांबाबत मंत्रिमंडळ उपसमिती आहेच. पण न्यायालयीन लढा प्रबळपणे मांडण्यासाठी एक टास्क फोर्स स्थापन केला जाईल. यापुर्वी उच्च न्यायालयात मराठा आरक्षण टिकले होते. त्यावेळी हा न्यायालयीन लढा देणारे तसेच महाराष्ट्रातील विविध संघटना, संस्था, विद्यापीठातील तज्ज्ञ आणि प्रदीर्घ काळ न्यायालयीन लढा देणाऱ्या सर्वांना एकत्र घेऊन हा टास्क फोर्स स्थापन केला जाईल. यातून आरक्षणाबाबत सर्वांमध्ये समन्वय ठेवूया. सूसुत्रता आणून, संवाद आणि समन्वयावर भर दिला जाईल. जेणेकरून पुढे जाऊन कुठल्याही पातळीवर पुन्हा मत भिन्नता येणार नाही. किंवा कायदेशीर अडचणी उभ्या राहणार नाहीत. यात मंत्रिमंडळ उपसमितीसमोरही ही टास्क फोर्सची संकल्पना मांडली जाईल. आपली बाजू भक्कम होईल, असे प्रयत्न केले जातील. ज्येष्ठ विधीज्ञानांही सोबत घेतले जाईल. मराठा आरक्षणासाठी जे जे करावे लागेल, आणि त्यासाठी सहकार्य देऊ इच्छिणाऱ्यांना सोबत घेतले जाईल. सरकार आरक्षण मिळावे याच भूमिकेचे आहे. त्यामुळे आंदोलकांनीही हे समजून घेतले पाहिजे. आम्ही तुमच्या सोबतच आहोत. तुमची जी भावना आहे, तीच आमची भावना आहे. आपण घेतलेले निर्णय टिकले पाहिजे यासाठी नवीन मार्ग शोधू. शासन मराठा समाजातील तरुणांना रोजगार, स्वयंरोजगार, उच्च शिक्षणाची संधी मिळेल यासाठी प्रयत्नशील आहे. या समाजाच्या शैक्षणिक, आर्थिक तसेच सामाजिक- सांस्कृतिक तसेच एकंदर सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चार मुख्यमंत्र्यांनी केला.

यावेळी बैठकीत शिष्टमंडळाने विदर्भ-मराठवाड्यातील कुणबी-मराठा या मुद्यांबाबत मांडणी केली. त्याबाबतही मुख्यमंत्री शिंदे सकारात्मक भूमिका मांडली. या मुद्याबाबत सर्व कागदपत्रे, पुरावे आणि तज्ज्ञ यांना एकत्र घेऊन सर्व बाबी तपासून पुढे जाऊया असेही त्यांनी सांगितले.

बैठकीस महेंद्र मोरे, अंकुश कदम, राजेंद्र कोंडरे, एम. एम. तांबे, प्रशांत लवांडे, किशोर गिराम, अतिश गायकवाड, राहुल बागल, अक्षय चौधरी आदींचे शिष्टमंडळ उपस्थित होते. या सर्वांनीही चर्चेत सहभाग घेतला.

सामाजिक न्याय विभागाचे सचिव श्री. भांगे यांनी मराठा आरक्षण व सुविधांबाबतची माहिती दिली. न्यायालयीन लढ्याबाबत त्यांनी सादरीकरण केले.

सारथीचे महाव्यवस्थापक अशोक काकडे तसेच एस.टी. महामंडळाचे महाव्यवस्थापक शेखर चन्ने, आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे व्यवस्थापक श्री. मोहिते यांनी सादरीकरणाद्वारे विविध विषयांची माहिती दिली. यात श्री. काकडे यांनी सारथीचा पुढील दहा वर्षांच्या नियोजनाबाबतची माहिती दिली. श्री. चन्ने यांनी मराठा आरक्षण आंदोलनात मृत्यु झालेल्या ३६ जणाच्या कुटुंबातील २७ जणांना नियुक्ती दिल्याची माहिती दिली.

०००००

सर्वांच्या मनोकामना पूर्ण करण्याची आई श्री भराडी देवीच्या चरणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रार्थना

सिंधुदुर्गनगरी दि.04 (जि.मा.का):-  राज्यातील सर्व जनतेची मनोकामना पूर्ण करावी, अशी प्रार्थना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज आंगणेवाडी येथील श्री. देवी भराडी मातेचे दर्शन घेवून केली.

यावेळी पालकमंत्री रविंद्र चव्हाण, आमदार प्रवीण दरेकर, आमदार नितेश राणे, माजी आमदार प्रमोद जठार आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, आईच्या चरणी नतमस्तक होतो. श्री देवीभराडी मातेचे आशीर्वाद घेतो. खरंतर आंगणेवाडीच्या भराडी देवीच्या दर्शनाला मला येण्याची संधी यापूर्वी मिळाली नाही. पण यावर्षी भराडी देवीमुळे मला आज येण्याची संधी मिळाली. त्याबद्दल मी आईचे मनापासून आभार मानतो. आई भराडी देवी आपल्या सर्वांना शुभ आशीर्वाद द्यावेत. सर्वांच्या मनोकामना पूर्ण कराव्यात. सर्वांच्या जीवनामध्ये सुख समाधान आरोग्य मिळावे. अशी आईच्या चरणी प्रार्थना केली.

०००००

राजभवन आता कॅनव्हासवर : राजभवन येथील कार्यशाळेला राज्यपालांची भेट 

मुंबई, दि.4 : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या सूचनेनुसार सर जे. जे. स्कुल ऑफ आर्टच्या विद्यार्थ्यांसाठी राजभवन येथे ‘ग्लोरी ऑफ हेरिटेज’ या विषयावरील दोन दिवसांच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असून शनिवारी राज्यपाल कोश्यारी यांनी कार्यशाळेला भेट दिली.

यावेळी राज्यपालांनी राजभवनातील विविध ठिकाणी वास्तूंची तसेच राजभवन परिसराची चित्रे साकारणाऱ्या विद्यार्थ्यांजवळ जाऊन त्यांची विचारपूस केली.

जेजे स्कुल ऑफ आर्ट येथील रेखा व रंगकला विभागाचे अधिव्याख्याता व कलाकार प्रकाश सोनवणे कार्यशाळेचे समन्वयक असून दुसरे अधिव्याख्याता शार्दूल कदम यांचेसह ते देखील कार्यशाळेत सहभागी झाले आहेत.        

000

कोकण क्षेत्र नियोजन विकास प्राधिकरणाची निर्मिती करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

सिंधुदुर्गनगरी दि.4 (जि.मा.का):- “आई श्री देवी भराडी माते देशावरचं, राज्यावरचं अरिष्ट दूर कर. बळीराज्याला,सर्व सामान्यांना सुखी अणि समाधानी ठेव”, अशी प्रार्थना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी  करतानाच, कोकणाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी कोकण क्षेत्र नियोजन विकास प्राधिकरणाची निर्मिती करण्यात येणार असल्याची घोषणाही केली.

आंगणेवाडी येथील श्री देवी भराडी मातेचे दर्शन मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी आज घेतले. यानंतर झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे, राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत, शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार कालीदास कोळंबकर, आमदार नितेश राणे, माजी खासदार निलेश राणे, माजी आमदार रविंद्र फाटक, राजन तेली आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, अंतर्गत रस्ते देखील महत्त्वाचे आहेत. एमएमआरडीएच्या धर्तीवर एमआयडीसी, सीडको व एमएसआरडीसी यांना सोबत घेऊन कोकण क्षेत्र नियोजन विकास प्राधिकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे कोकणाला त्याचा खूप फायदा होईल. हे प्राधिकरण अतिशय महत्त्वाचे आहे. ते पुढे म्हणाले की, श्री देवी भराडी आईच्या दर्शनाला आलेल्या लाखो भाविकांचे, भक्तांचे मी मनापासून स्वागत करतो. त्यांना शुभेच्छा पण देतो. राज्यातील जनतेला, बळीराजाला त्यांच्या जीवनामध्ये सुख, समृध्दी, भरभराटी त्यांना चांगलं आरोग्य मिळू दे, तसेच त्यांच्या जीवनात आनंदाचे क्षण व समाधान आले पाहिजे, अशी मी प्रार्थना करतो.

त्याचबरोबर राज्याच्या सर्वांगीण विकास करण्यासाठी आपण प्रामाणिक प्रयत्न करुया, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, सागरी महामार्ग हा कोकणच्या विकासासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. त्याचेही काम हातामध्ये घेत आहोत. रस्त्यांचे रुंदीकरण आपण करतोय, जेणेकरुन कोकणच्या पर्यटनाला चालना मिळेल. सगळे सागर किनारे हे अतिशय सुंदर आहेत. त्यांचे सुशोभिकरण करण्यात येईल. बाळासाहेब ठाकरे समृध्दी महामार्ग नागपूर-मुंबई महामार्गाच्या धर्तीवर आपण ग्रीनफिल्ड रस्ता मुंबई- सिंधुदुर्ग फास्टट्रॅक कंट्रोल याचे देखील काम हाती घेतोय. जेणेकरुन खऱ्या अर्थाने कनेक्टीव्हिटी मिळेल. तसेच प्रदूषण कमी होईल व लोकांचा वेळ वाचेल. विकासाला चालना मिळेल. विकासाची दारे खुली होतील. कोकणामध्ये पर्यटन व मस्त्य व्यवसायालाही मोठा वाव आहे.  कोकणामध्ये इतर जिल्ह्यांपेक्षा खूप  पाऊस पडत असतो. परंतु, बरेचसे पाणी हा वाहून जाते. वाहून जाणारे पाणी शॉर्टटर्म व लाँगटर्म प्रकारचे प्रकल्प केले पाहिजेत. सिंधुदुर्गात मालवण वेंगुर्ला येथे काजू व आंबा मार्केटिंग व ब्रॅडिंग यांनादेखील चालना द्यायची आहे, असेही ते म्हणाले.

केंद्रीयमंत्री श्री. राणे म्हणाले की, हे सरकार सामान्य जनतेचे आहे. शासनाने या यात्रेसाठी सुविधा उपलब्ध करुन दिल्याने भाविकांची मोठी सोय झाली आहे.

यावेळी आंगणेवाडी विकास मंडळाचे अध्यक्ष भास्कर आंगणे यांचा भगवी शाल आणि रोप देऊन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.

०००००

जर्मनीची कुशल मनुष्यबळाची गरज पूर्ण करण्यास महाराष्ट्र उत्सुक – शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर

मुंबई, दि.4 – “जर्मनीला विविध क्षेत्रात कुशल मनुष्यबळाची आवश्यकता आहे. महाराष्ट्र या कामी सहकार्य करण्यास उत्सुक असून यासाठी नियोजनबद्ध प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करू”, असे प्रतिपादन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केले.

विविध क्षेत्रातील परस्पर सहकार्यासाठी जर्मनीचे शिष्टमंडळ मुंबईत आले आहे. आज या शिष्टमंडळासह मुंबईत झालेल्या एका परिषदेत श्री. केसरकर बोलत होते. यावेळी जर्मनीच्या बाडेन वृटेमबर्गचे राज्यमंत्री डॉ.फ्लोरियन स्टॅगमन, लॉर्ड मेयर डॉ.फ्रँक मेंट्रप, स्टूटगार्ड चे महापौर थॉमस फुहरमन, जर्मनीचे महा वाणिज्य दूत अचिम फॅबिक यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

मंत्री श्री.केसरकर म्हणाले की, मुंबईचे जर्मनीतील विविध शहरांशी घनिष्ठ संबंध असून महाराष्ट्र जर्मनीशी हृदयाने जोडला गेलेला आहे. भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नवीन शैक्षणिक धोरण जाहीर केले असून व्यावसायिक आणि कौशल्य आधारित शिक्षणावर भर दिला आहे. महाराष्ट्रात शालेय शिक्षण विभागाने विविध व्यावसायिक तसेच कौशल्य प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांशी करार केलेले आहेत. शाळांमधून व्यवसाय आणि कौशल्य आधारित प्राथमिक शिक्षण दिले जाते. जर्मनीमध्ये प्रशिक्षित मनुष्यबळाची कमतरता असून जर्मनीची आवश्यकता विचारात घेता व्यवस्थित नियोजन करून महाराष्ट्रातील युवकांना कौशल्य आधारित प्रशिक्षण देण्याबाबत परस्पर सामंजस्य करार करता येईल, असेही त्यांनी सांगितले.

महाराष्ट्रात पर्यावरण, पर्यटन, सांस्कृतिक क्षेत्रात परस्पर सहकार्यास वाव असून विशेषतः कोकणातील पर्यटन स्थळे आंतरराष्ट्रीय दर्जाची आहेत. जर्मनीतील पर्यटकांनी कोकणात यावे, असे आवाहन श्री.केसरकर यांनी यावेळी केले.

जर्मनीतील राज्यमंत्री डॉ. स्टॅगमन यांनी यावेळी बोलताना भारत विविध क्षेत्रात प्रगती करीत असल्याचे सांगितले. स्मार्ट सिटी, कुशल मनुष्यबळ आदी क्षेत्रात आम्ही सहकार्य करू इच्छित आहोत, तर जर्मनीला सुमारे चार लाख कुशल मनुष्यबळाची आवश्यकता आहे. महाराष्ट्र ती पूर्ण करू शकतो. या माध्यमातून परस्पर संबंध अधिक दृढ होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

00000

ताज्या बातम्या

प्रस्ताव सादर करा, खंडपीठही लवकरच करू – सरन्यायाधीश भूषण गवई

0
शाहू महाराजांप्रमाणे समानतेच्या न्यायदान प्रक्रियेत सहभागी होण्याचे आवाहन सर्किट बेंचच्या शुभारंभाला कोल्हापूरने अनुभवला सरन्यायाधीशांचा कृतज्ञता सोहळा कोल्हापूर, दि. १७: राज्याच्या सीमेवरील दुर्गम भागातील सर्वसामान्य...

जळगावच्या मेडिकल हबची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून पाहणी

0
जळगाव दि. १७ (जिमाका):  जळगाव- छत्रपती संभाजीनगर रोडवरील चिंचोली शिवारात 66.27 एकर क्षेत्रावर उभारण्यात येत असलेल्या भव्य मेडिकल हबची पाहणी आज उपमुख्यमंत्री अजित पवार...

येत्या बजेटमध्ये जिल्ह्याला निधी देणार वाढवून – उपमुख्यमंत्री अजित पवार

0
जळगाव जिल्ह्यातील उद्योगांनाही मराठवाडा, विदर्भासारख्या सवलती देणार तीन दिवसातील अतिवृष्टीच्या पंचनाम्याचे आदेश जळगाव दि. १७ (जिमाका वृत्तसेवा): आपण प्रत्येक जिल्ह्यात गेल्यानंतर त्या जिल्ह्यात जिल्हा...

सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते कोल्हापूर सर्किट बेंच इमारतीचे उद्घाटन

0
कोल्हापूर, दि. १७ (जिमाका): सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंच इमारतीचे उद्घाटन व कोनशिला अनावरण करण्यात आले. या ऐतिहासिक...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लाभार्थ्यांना सदनिकांच्या चाव्या प्रदान

0
कोल्हापूर दि. १७: जुना बुधवार पेठ येथे महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळ मुंबई यांच्यामार्फत 'राजर्षी शाहू महाराज पोलीस संकुल' या नावाने उभारण्यात...