रविवार, ऑगस्ट 17, 2025
Home Blog Page 1660

जपान-भारत आणि महाराष्ट्र-वाकायामा हे नाते ठरेल आदर्श – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. 3 :- भारत आणि जपान यांच्यातील संबंध पूर्वापार आहेत. ते अधिकाधिक दृढ होण्यास या करारामुळे मदतच होणार आहे. महाराष्ट्रात पायाभूत सुविधांसारखे वैविध्यपूर्ण प्रकल्प सुरु आहेत. या सर्वच क्षेत्रात जपानने सहकार्याचा हात पुढे केलेला आहे, ही आनंदाची गोष्ट आहे. जपान-भारत आणि महाराष्ट्र आणि वाकायामा हे नाते एक आदर्श ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व्यक्त केला.

गेट वे ऑफ इंडिया येथे आज महाराष्ट्र शासन आणि जपानचे वाकायामा प्रांत यांच्यात सामंजस्य कराराचे नूतनीकरण करण्यात आले. या कार्यक्रमात मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. यावेळी विधान सभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वाकायामाचे गव्हर्नर किशीमोटो शुहेही, पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, पर्यटन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक श्रध्दा जोशी-शर्मा, पर्यटन संचालक बी. एन. पाटील, जपानचे 45 जणांचे शिष्टमंडळ, अधिकारी, नागरिक उपस्थित होते. या वेळी सुमो व महाराष्ट्रीयन कुस्तीची प्रात्यक्षिके खेळाडूंनी सादर केली. यानिमित्त गेट वे ऑफ इंडिया येथे लेझर शोचे देखील आयोजन करण्यात आले होते.

 मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, भारत आणि जपान यांचे पूर्वापार संबंध आहेत. ते अधिकाधिक दृढ होण्यास महाराष्ट्र आणि वाकायामासारख्या प्रांताचा पुढाकार महत्त्वाचा ठरला आहे. यापुढेही ठरेल असा मला विश्वास आहे. त्याच दिशेने काम करण्याचा निर्धारही  करू. ऑक्टोबर 2013 मध्येच उभयंतामध्ये पर्यटन आणि अन्न प्रक्रिया क्षेत्राशी संबधित करार झाला आहे. या कराराची ही दशकपूर्ती आहे. या कराराचे आज आपण नूतनीकरणच करत आहोत. गेल्या दहा वर्षांत या करारातील उद्दिष्टांची जी पूर्ती झाली त्यासाठी  सर्वांचे अभिनंदन करतो आणि या नव्या करारासाठीही शुभेच्छा देतो.

जपान आणि महाराष्ट्रचा गुण लढवय्येपणा, उद्यमशीलता आणि नावीन्याचा ध्यास घेणारा आहे. कुस्ती दोन्हीकडे लोकप्रिय आहे. त्यामुळे कुस्तीबाबत महाराष्ट्राचे क्रीडा संचालनालय आणि वाकायामा प्रीफेक्चर रेसलिंग फेडरेशन (Wakayama Prefecture Wrestling Federation) यांच्या दरम्यान होणारा हा करारही महत्वाचा आहे. यामुळे कुस्तीमधील प्रशिक्षणापासून ते खेळाडूंच्या सुविधांबाबत आदान-प्रदान होईल. तसेच खेळाचा दर्जा सुधारण्यास त्यामुळे मदत होईल, असेही मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले.

सुमो आणि कुस्ती खेळातील साधर्म्य दोन्ही देशांना जोडणारा एक दुवा ठरेल  विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर

विधानसभा अध्यक्ष ॲड. नार्वेकर म्हणाले, की सुमो जपानमध्ये लोकप्रिय असून महाराष्ट्रात कुस्ती लोकप्रिय आहे. या समान धाग्यामुळे दोन्ही देशांचे संबंध अधिक दृढ होऊन दोन्ही देशांना जोडणारा दुवा ठरेल.

 जपानचे आणि महाराष्ट्राचे संबंध अधिक मजबूत होतील  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, पर्यटनाच्या क्षेत्रात जपानने खूप  मदत केली आहे. जपानमध्ये महाराष्ट्र सरकारच्या पर्यटन विभागाचे कार्यालय आहे आणि संभाजीनगरमध्ये जपानचे कार्यालय आहे. या नवीन सामंजस्य कराराच्या पार्श्वभूमीवर  जपान आणि महाराष्ट्राचे संबंध अधिकच मजबूत होतील. या सामंजस्य करारामुळे जपान आणि महाराष्ट्र सरकारमध्ये सांस्कृतिक देवाण- घेवाण होऊन पर्यटनाला चालना मिळेल. आजच्या सामंजस्य करार नूतनीकरणामुळे राज्यातील पर्यटन वाढीस मदत होणार आहे.

अजिंठा अभ्यागत केंद्रासाठी वाकायामाचे 300 कोटी रुपयांचे सहकार्य  पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा

पर्यटन मंत्री श्री. लोढा म्हणाले की, अजिंठा अभ्यागत केंद्रासाठी वाकायामा शासनाने 300 कोटी रुपयांचे सहकार्य केले. पर्यटन क्षेत्रातच फक्त या सामंजस्य करारामुळे मदत होणार नसून अन्य क्षेत्रातही प्रगती होण्यासाठी मदत होणार आहे.सुमो कुस्ती प्रकार देखील आज मुंबईकरांना पहता येणार आहे असेही मंत्री श्री.लोढा म्हणाले.

महाराष्ट्र शासन आणि जपान यांचे दहा वर्षापासून मित्रत्वाचे संबध

वाकायामाचे गव्हर्नर किशीमोटो शुहेही म्हणाले, की महाराष्ट्र राज्य आणि जपानचे वाकायामा प्रांत यांच्यात  सुमो व कुस्ती खेळ याबाबत सन 2013 मध्ये सामंजस्य करार करण्यात आला होता. आजच्या सामंजस्य करारामुळे दोन्ही राज्यांच्या विकासात भर पडेल असेही श्री. शुहेही म्हणाले. या कराराअंतर्गत पर्यटन क्षेत्रातील अनेक प्रकल्प होते. कोयासन विद्यापीठात महाराष्ट्र शासनाकडून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचे अनावरण, ‘यशदा’मार्फत महाराष्ट्रातील शहरी विकास अधिकाऱ्यांसाठी वाकायामा येथे प्रशिक्षण, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांसाठी जपानी आदरातिथ्य (Omotenashi) प्रशिक्षण, शालेय विद्यार्थींसाठी सांस्कृतिक वारसा प्रशिक्षण, जपानी मार्गदर्शक प्रशिक्षण,  वाकायामा येथील हेंगू अभ्यागत केंद्र व अजिंठा अभ्यागत केंद्र यांच्यात सामंजस्य करार, कोयासन विद्यापीठ आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ, औरंगाबाद यांच्यात सामंजस्य करार, टोकियोमध्ये एमटीडीसी माहिती कार्यालय आणि औरंगाबाद आणि मुंबई येथे वाकायामा कार्यालय उघडणे, वाकायामा येथून या कार्यालयांमध्येअधिकारी प्रतिनियुक्ती, ट्रॅव्हल एजन्टसाठी परिचय, पर्यटन प्रसिद्धी उपक्रम, अजिंठ्यावरील माहितीपट कार्यक्रम पार पडले.

००००

संध्या गरवारे/विसंअ

महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पांसाठी केंद्रीय अर्थसंकल्पात १३ हजार ५३९ कोटींचा निधी – रेल्वेमंत्री अश्व‍िनी वैष्णव

नवी दिल्ली, 03 : केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्राच्या रेल्वे प्रकल्पांसाठी १३ हजार ५३९ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली आहे. राज्यातील १२३ रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण करण्यात येईल. यासह ‘बुलेट ट्रेन’ प्रकल्पासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्यामुळे जमीन अधिग्रहणाच्या आवश्यक मंजुरीचे काम पूर्णत्वास गेले, असल्याची माहिती केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज येथे दिली.

येथील रेल भवनमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत केंद्रीय रेल्वेमंत्री श्री. वैष्णव बोलत होते. त्यांनी सांगितले, रेल्वेच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्र हे एक महत्त्वाचे राज्य आहे. यावर्षी सादर केलेल्या अर्थसंकल्पात महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पांसाठी 13 हजार 539 कोटी रूपयांची भरीव तरतूद केली गेली आहे.

महाराष्ट्रातील 123 रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण केले जाईल. याअंतर्गत निवड केलेल्या  रेल्वे स्थानकांमध्ये  मुलभूत तसेच अद्ययावत सुविधा पुरविण्यात येतील.  छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकाच्या आधुनिकीकरणाच्या कंत्राटाचे काम मार्चपर्यंत पूर्ण होऊन त्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरूवात होईल, अशी माहिती मंत्री श्री. वैष्णव यांनी दिली.

‘बुलेट ट्रेन’ रेल्वेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून यासंदर्भात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या सहकार्याने  जमीन अधिग्रहणाच्या आवश्यक मंजुरीचे काम पूर्ण झालेले आहे. मुंबई ते वापीपर्यंतच्या कामाचे कंत्राट दिले गेले आहे. बुलेट ट्रेनच्या मार्गावरील बांधणी सुरू झालेली आहे. ऑगस्ट 2026 पर्यंत बुलेट ट्रेन धावणार असल्याचेही मंत्री श्री. वैष्‍णव यांनी यावेळी सांगितले.

अद्ययावत तंत्रज्ञानयुक्त आणि सुविधापूर्ण असणाऱ्या ‘वंदे भारत’ रेल्वेची सुरूवात झालेली असून येत्या काळात अधिक संख्येने ‘वंदे भारत’ रेल्वे गाड‌्या धावतील. तसेच,  50 ते 100 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या दोन शहरांना जोडण्यासाठी, प्रादेशिक दळवळणाला अधिक गती देण्यासाठी ‘वंदे मेट्रो’ नावाने गाड‌्यांचे काम हाती घेतले असून ‘वंदे मेट्रो’ नजीकच्या शहरांना जोडणाऱ्या गाड्या पुढील काळात दिसतील. याशिवाय हायड्रोजन रेल्वे भविष्यात सुरू केली जाईल. सध्या जगातील दोन-तीन देशात हायड्रोजनवर चालणाऱ्या रेल्वे आहेत. भारतातही या दिशेने काम सुरू झाले असल्याची माहिती त्यांनी दिली.

मागील वित्तीय वर्षात जवळपास 250 रेल्वे डब्यांचा दर्जा वाढलेला आहे. यावर्षी 300 रेल्वे गाड्यांचे जुने डबे बदलून राजधानी दर्जाचे केले जातील. यावर काम सुरू आहे. कवच (स्वंयचलित रेल्वे सुरक्षा प्रणाली) आहे.  या प्रणालीत 5 जी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येईल. कवच प्रणालीच्या वापराने अपघाताचे प्रमाण कमी होईल.  सध्या या प्रणाली अंतर्गत 4 हजार किलोमीटरचे काम सुरू आहे. येत्या वर्षभरात यात  पाच हजार किलोमीटरची भर पडणार असल्याची, माहिती श्री. वैष्णव यांनी यावेळी दिली.

0000

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते टेरेस गार्डनचे उद्घाटन

पुणे दि. ३: पुणे महानगरपालिकेचे सिंहगड क्षेत्रीय कार्यालय, साई जनसेवा प्रतिष्ठान  आणि ग्रीन व्हिजन मॅनेजमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने ओल्या कचऱ्यापासून तयार करण्यात आलेल्या टेरेस गार्डनचे उद्धाटन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमाला आमदार भीमराव तापकीर, महापालिका आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमनार, उपायुक्त आशा राऊत, वनराई संस्थेचे रविंद्र धारीया, साई जनसेवा प्रतिष्ठानचे सुरज लोखंडे, ग्रीन व्हिजन मॅनेजमेंटच्या गीता मेहेरकर, सहायक आयुक्त प्रदीप आव्हाड आदी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. पाटील यावेळी म्हणाले, वेगवेगळ्या पद्धतीने कचऱ्याचे निर्मुलन करत स्वच्छ भारताच्या दिशेने आपण वेगाने वाटचाल करत आहे. या स्पर्धेतील पुणे शहराची कामगिरी अधिकाधिक उंचाविण्याची गरज आहे. एक सोसायटी म्हणजे एक गाव असे मानून विभागवार स्वच्छतेसाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे. ओला आणि सुका कचरा जिरविण्यासाठीची पुस्तिका नागरिकांपर्यंत पोहोचवावी आणि कचऱ्याचा उत्तम उपयोग होऊ शकतो हे त्यांना पटवून द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

महानगरपालिकांच्या सर्व  इमारतींवर असे प्रकल्प सुरू करावे आणि लोकप्रतिनिधींदेखील अशा अभिनव उपक्रमांसाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही पालकमंत्र्यांनी केले. पुणे महानगरपालिकेने राबविलेला उपक्रम स्तुत्य असून याद्वारे नागरिकांनाही पर्यावरणपूरक उपक्रम राबविण्याचे प्रोत्साहन मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

असा आहे प्रकल्प

ओला कचरा सहज जिरविण्यासाठी व त्यापासून नागरिकांना फायदा मिळावा यासाठी सिंहगड क्षेत्रिय कार्यालयाच्या छतावर ‘टेरेस गार्डन’ हा प्रकल्प तयार करण्यात आला आहे. या प्रकल्पात तीस लिटरच्या  100 बकेटमध्ये रोज तीनशे किलो ओला कचरा जिरवला जात आहे.

दररोजचा ओला कचरा पुणे महापालिकेचे कर्मचारी आणि वडगाव येथील भाजी मार्केट मधील उरलेला भाजीपाला, फुलांचा कचरा आणून देतात. बकेटमध्ये कचरा जिरवताना बकेटला तळाला सात ते आठ होल्स करण्यात आले आहेत, बकेट मध्ये तळाला विटांचे तुकडे , त्यावर नारळाच्या शेंड्या, बायोकल्चर व ओला कचरा पुन्हा बायोकल्चर ओला कचरा  व त्यामध्ये रोप असे थर देऊन भरण्यात आले आहेत.

या बगीच्यात फळझाडे, फुल झाडे, तुळसही लावण्यात आली आहे. बकेटमध्ये दीड वर्षापर्यंत ओला कचरा जिरला जाऊ शकतो आणि त्यात जमा झालेले खत काढून रोप पुन्हा लावता येऊ शकते. अशा प्रकल्पामुळे नागरिकांना घरगुती अथवा सोसायटी पातळीवर ओला कचरा जिरवणे सोपे असून सहज शक्य आहे. मोठ्या सोसायट्यानी इमारतीच्या टेरेसवर असा प्रकल्प केला तर त्यांचा ओला कचरा घरच्या घरी जिरविण्यासाठी मोठी मदत होईल.

तृतीयपंथीयांसाठी देशातला पहिला विशेष कक्ष मुंबईच्या जी. टी. रुग्णालयात कार्यान्वित – वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन

मुंबई, दि. 3 : तृतीयपंथी हा देखील समाजाचा एक घटक आहे. ‘सबका साथ, सबका विकास’ संकल्पनेच्या माध्यमातून या घटकातील लोकांच्या समस्या सोडविण्यावर भर देण्यात येत आहे. महाराष्ट्रातला नाही तर देशातला पहिला तृतीयपंथीयांसाठी विशेष कक्ष मुंबईतील जी. टी. रुग्णालयात कार्यान्वित झाला असल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांनी सांगितले.

ग्रँट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर ज.जी.समूह रुग्णालये संलग्नित गोकुळदास तेजपाल रुग्णालय येथे तृतीयपंथीयांसाठी विशेष कक्ष आणि व्यसनोपचार केंद्राचे ई उद्घाटन आज वैद्यकीय शिक्षण मंत्री श्री.महाजन यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी वैद्यकीय शिक्षण विभागाचे आयुक्त राजीव निवतकर, वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर, सर.ज.जी. रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे, डॉ.भालचंद्र चिखलकर, गौरी सावंत, सलमा खान आदी उपस्थित होते. याच कार्यक्रमादरम्यान तृतीयपंथीयांसाठी विशेष कक्षाबाबतच्या मार्गदर्शन सूचना पुस्तिकेचे अनावरण करण्यात आले.

कमी वेळात अत्यंत मेहनतीने डॉक्टर, परिचारिका आणि कर्मचारी यांनी हा विशेष कक्ष सुरु केल्याबद्दल त्यांचे कौतुक करताना मंत्री श्री. महाजन म्हणाले की, तृतीयपंथीयांच्या अनेक वैद्यकीय समस्या होत्या, या समस्या सोडवून या घटकाला चांगल्या वैद्यकीय सुविधा मिळाव्यात या दृष्टीकोनातून 30 खाटांचा विशेष कक्ष आजपासून जी. टी. रुग्णालयात कार्यान्वित करण्यात आला आहे. आतापर्यंत तृतीयपंथीयाना पुरुष किंवा महिला कक्षात भरती करायचे हा प्रश्न असायचा, मात्र आता हा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. या विशेष कक्षात तृतीयपंथीयांवर शारीरिक आणि मानसिक आजारांवर उपचार केले जाणार आहे.

या विशेष कक्षात येणाऱ्या तृतीयपंथीयांवर उपचार करण्यासाठी अद्ययावत सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत. 2 व्हेंटिलेटर, मॉनिटर, सेमी आयसीयू यासह येथील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणही देण्यात आले आहे. येत्या काही काळात सर ज.जी. समूहाच्या सेंट जॉर्ज, जे.जे. रुग्णालय आणि कामा हॉस्पीटल येथेही विशेष कक्ष सुरु करण्यात येईल. जे.जे.रुग्णालयात आजपासून व्यसनोपचार केंद्र सुरु करण्यात आले आहे. विविध प्रकारच्या व्यसनांपासून मुक्तता मिळविण्यासाठी उपचार, समुपदेशन तसेच पुनर्वसनाची गरज असते. आजपासून हे व्यसनोपचार केंद्र कार्यान्वित झाले असल्याचेही मंत्री श्री. महाजन यांनी सांगितले.

राज्यातील वैद्यकीय यंत्रणा सक्षम करण्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय उभारण्यात येणार आहे. सध्या 13 जिल्ह्यांतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय उभारण्याच्या कामाला गती देण्यात येत आहे. प्रत्येक जिल्ह्यात सक्षम वैद्यकीय सुविधांचे जाळे निर्माण करणे यावर भर असणार असल्याचेही मंत्री श्री. महाजन यांनी यावेळी सांगितले.

आतापर्यंत राज्य शासनाच्या वैद्यकीय रुग्णालयात भरती होत असताना केस पेपरवर महिला किंवा पुरुष असे दोनच रकाने असायचे आता तृतीयपंथी हा नवीन रकाना असणार असल्याचे या कार्यक्रमादरम्यान प्रस्ताविकात डॉ.सापळे यांनी सांगितले.

००००

वर्षा आंधळे/विसंअ

महात्मा गांधीजींचे विचार सर्वसामान्यांसाठी प्रेरणादायी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

वर्धा, दि.3 (जिमाका) : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी दिनदुबळ्यांची सेवा करण्याचे काम केले. त्यांचे हे कार्य पुढे चालू ठेवण्याचे काम राज्य शासन करीत आहे. महात्मा गांधीजींचे विचार सर्वसामान्यांसाठी सर्वकाळ प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी सेवाग्राम येथील बापूकुटीस भेट देऊन बापूंना अभिवादन केले. त्यावेळी माध्यमांशी ते बोलत होते. यावेळी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, आमदार डॉ. पंकज भोयर, भंडाराचे आमदार नरेंद्र बोंडेकर, नागपूर विभागाचे विशेष पोलिस महानिरिक्षक छेरींग दोरजे, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा पोलिस अधीक्षक नूरुल हसन उपस्थित होते.

वर्धा येथे आयोजित 96 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन कार्यक्रमानिमित्त मुख्यमंत्री आले होते त्यावेळी त्यांनी सेवाग्राम बापूकुटीला भेट दिली. आश्रमातील प्रार्थना सभेत त्यांनी सहभाग घेतला. नोंदवहीत आपले अभिप्राय देखील नोंदविले.

सर्व घटकातील सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचे काम राज्य शासन करीत असून समृद्धी महामार्गामुळे विदर्भातील विकासाला चालना मिळेल. यासोबतच संपूर्ण राज्यात विकासाचे जाळे निर्माण करण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. यावेळी त्यांनी आश्रमाची पाहणी केली. येथे आल्यानंतर महात्मा गांधीजींच्या साध्या राहणीमानाच्या आठवणींना उजाळा मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.

आश्रमात आगमन झाल्यानंतर जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी पुष्पगुच्छ व सुतमालेने त्यांचे स्वागत केले. यावेळी सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानच्या अध्यक्ष आशा बोथरा, सर्वसेवा संघाचे अध्यक्ष चंदनपाल, टी.आर.एस प्रभू, सेवाग्रामच्या सरपंच सुजाता ताकसांडे यांची उपस्थिती होती.

००००००

‘बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ हा उपक्रम राज्यभर राबविणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

वर्धा, दि. 3 : मुंबई आणि ठाणे परिसरात ‘बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. सर्वसामान्यांच्या प्राथमिक आरोग्यविषयक गरजा पूर्ण करणारा हा उपक्रम लवकरच संपूर्ण राज्यात सुरू करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

दत्ता मेघे शिक्षण व संशोधन संस्थेच्या सावंगी मेघे येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयातील थ्री टेस्ला आणि एमआरआयचे उद्घाटन मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते झाले. त्यानंतर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, माजी खासदार दत्ता मेघे, आमदार समीर मेघे, आमदार डॉ. पंकज भोयर, सागर मेघे यांच्यासह दत्ता मेघे शिक्षण व संशोधन संस्थेचे अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्री महोदयांचा सत्कार करण्यात आला.

 आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयातील थ्री टेस्ला आणि एमआरआयचे उद्घाटनप्रसंगी सर्वसामान्यांना या यंत्रणेचा कशाप्रकारे लाभ होणार याची माहिती मुख्यमंत्र्यांना देण्यात आली. अशाचप्रकारे सर्वसामान्यांना आरोग्य सुविधा पुरविणा-या ‘बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ या योजनेचा त्यांनी पुनरुच्चार करीत जास्तीत जास्त लोकांना दैनंदिन आजारांसाठी प्रभावीपणे या दवाखान्यांच्या माध्यमातून उपचार मिळतील, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

दत्ता मेघे शिक्षण व संशोधन संस्थेच्या माध्यमातून रूग्ण सेवेचे ईश्वरीय कार्य करण्यात येत आहे. रुग्ण सेवा ही ईश्वर सेवा आहे. माजी खासदार श्री. मेघे यांनी अगदी विपरीत परिस्थितीत आरोग्य सेवेची सुरुवात केली. त्यांचे रुग्ण सेवेचे कार्य कौतुकास्पद आहे. महात्मा गांधी आणि विनोबा भावेंच्या भूमीत रुग्ण सेवेचे मोठे कार्य त्यांनी सुरू केले आहे. त्यांच्या रुग्ण सेवेचा वारसा त्यांच्या दोन्ही मुलांनी पुढे सुरू ठेवला आहे. या संस्थेच्या माध्यमातून विदर्भातील अनेक जिल्ह्यांना आरोग्य सुविधा मिळत आहेत. संस्थेचे  रुग्ण सेवेबरोबरच शिक्षण कार्यही सुरू आहे. कोरोना काळातही संस्थेने कौतुकास्पद काम केले असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. कार्यक्रमाचे आभार आमदार श्री. मेघे यांनी मानले. तत्पूर्वी त्यांनी रुग्णालय व परिसराची पाहणी केली तसेच रुग्णांची भेट घेत आस्थेवाईकपणे चौकशी केली.

००००

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात विस्तारित स्वरुपात “महाराजस्व अभियान”

सर्वसामान्य जनता आणि शेतकरी यांचा महसूल विभागाशी दैनंदिन संबंध येत असतो. दैनंदिन प्रश्न निकाली काढणे तसेच महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, पारदर्शक, कार्यक्षम आणि गतिमान होण्यासाठी महाराजस्व अभियान 26 जानेवारी ते 30 एप्रिल 2023 या कालावधीत राबविण्यात येत आहे… या अभियानाविषयी माहितीपर लेख..

राज्यातील सर्वसामान्य जनता, शेतकरी आणि शेतमजूर यांचे प्रश्न त्वरित निकाली काढण्यासाठी राज्यात महसूल विभागामार्फत महाराजस्व अभियान राबविण्यात येत आहे. भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असताना महसूल विभागामार्फतही हा विभाग अधिक लोकाभिमुख आणि कार्यक्षम करण्यासाठी महाराजस्व अभियानाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत शेतकऱ्यांना आणि सर्वसामान्य नागरिकांना विविध सेवा देण्यात येणार असून या सेवा गतिमान पद्धतीने देण्यावर भर देण्यात येईल.

या विस्तारित स्वरुपातील अभियानात सर्व शेतकऱ्यांना घरी जाऊन शेतीचा सातबारा देणे आणि फेरफार निकाली काढण्यासाठी निश्चित कालमर्यादा आणि फेरफार अदालतीचे आयोजन करणे, भूसंपादनाची गावपातळीवरील कमी- जास्त पत्रके अद्ययावत करणे आदींसह प्रमुख आठ बाबींचा समावेश यामध्ये करण्यात आला आहे. या नवीन स्वरूपाच्या अभियानात बिगरशेती प्रकरणे गतीने मार्गी लावणे, पाणंद, शिवार रस्ते मोकळे करणे, गाव तेथे स्मशानभूमी, दफनभूमीसाठी सुविधा उपलब्ध करून देणे, लोकसेवा हक्क अधिनियमाची प्रभावी अंमलबजावणी, निस्तार पत्रकाच्या नोंदी अद्ययावत करणे, ई-पीक पाहणी प्रकल्पाची प्रभावी अंमलबजावणी या महत्त्वाच्या आठ बाबींचा यात समावेश करण्यात आला आहे.

महसूली सेवांची प्रभावी अंमलबजावणी

एका महिन्याच्यावर प्रलंबित असलेले फेरफार निकाली काढणे व त्याकरिता मंडळ मुख्यालयी फेरफार अदालत घेणे, भूसंपादन केलेल्या व अकृषिक परवानगी दिलेल्या प्रकरणी कमी जास्त पत्रके तयार करुन गाव दप्तर अद्ययावत करणे, महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, 1966 च्या विविध कलमांची कार्यवाही करणे, गाव नकाशाप्रमाणे अतिक्रमित व बंद झालेले गाडी रस्ते/ पाणंद/ पांधण/शेतरस्ते/ शिवाररस्ते/ शेतावर जाण्याचे मार्ग मोकळे करणे, मामलेदार न्यायालय अधिनियम, 1906 अंतर्गत मंजूर वहिवाटीचे रस्ते मोकळे आणि तयार करणे, गाव तिथे स्मशानभूमी/ दफनभूमी सुविधा उपलब्ध करुन देणे, लोकसेवा हक्क अधिनियम, 2015 ची प्रभावी अंमलबजावणी करणे तसेच यासाठी प्रचार – प्रसिद्धी करणे, निस्तार पत्रक व वाजिब-उल-अर्जच्या नोंदी अद्ययावत करणे, सप्टेंबर 2022 पर्यंतची मोजणी प्रकरणे मार्च 2023 पर्यंत निकाली काढणे, ई- पीक पाहणी प्रकल्पाची अंमलबजावणी करणे, ई – चावडी प्रणालीची अंमलबजावणी करणे, भूसंपादन अधिनियम, 1894 अंतर्गत कार्यवाही करणे या घटकांची अंमलबजावणी जिल्हाधिकारी तसेच अपर जिल्हाधिकारी यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयापासून गावपातळीपर्यंत प्रभावीपणे करण्यात येणार आहे.

गौण खनिजासाठी कार्यपद्धती

याशिवाय परराज्यातून आणलेल्या वाळूचा साठा व निर्गतीबाबतची कार्यपद्धती निश्चित करणे, गौण खनिज ऑनलाइन प्रणाली वापराबाबतची माहिती देणे तसेच सन 2016 चा महाराष्ट्र महसूल अधिनियमान्वये कुळकायद्याच्या कलम 63 मधील सुधारणा करणे, पोटहिस्सा/सामीलिकरण/ भूसंपादन/रस्ता सेटबॅक इत्यादी कारणामुळे नकाशामध्ये होणाऱ्या बदलाबाबत दुरुस्तीसह अद्ययावत नकाशा पुरविणे, नावीन्यपूर्ण योजना उपविभाग आणि तहसील कार्यालय येथे राबविणे महाराजस्व अभियानात घेण्यात आले आहे.

प्रलंबित कामांच्या निपटाऱ्यासाठी कालबद्ध मोहीम

राज्यातील सर्व जिल्हाधिकारी यांनी महाराजस्व अभियानांतर्गत त्यांच्या जिल्ह्यांमध्ये जिल्हा, तालुका आणि ग्रामपातळीवर केलेल्या कामगिरीबाबतची माहिती मासिक प्रगती अहवालाद्वारे विभागीय आयुक्त यांच्याकडे सादर करणे आवश्यक राहील. तसेच जमाबंदी आयुक्त तथा संचालक भूमी अभिलेख यांनी या अभियानांतर्गत त्यांच्या अधिनस्त कार्यालयात होणाऱ्या कार्यवाहीचा आढावा शासनाला देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. महाराजस्व अभियानाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी अभियानात अंतर्भूत विविध लोकाभिमुख आणि प्रशासकीय घटकांच्या निपटाऱ्यासाठी कालबद्ध मोहीम आखून प्रलंबित कामांचा निपटारा करण्यावर भर देणे आवश्यक आहे. यासाठी सर्व विभागीय आयुक्तांनी घटकनिहाय कालबद्ध कार्यक्रमाची रुपरेषा निश्चित करुन व्यवस्थापन पथकाची स्थापना करुन सर्व जिल्हाधिकाऱ्यांना अनुपालनाचे निर्देश देण्यात यावेत अशा सूचना निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयात देण्यात आल्या आहेत.

आधुनिकता आणि गतिमानतेला प्राधान्य

महाराजस्व अभियान अधिक व्यापक स्वरुपात राबविल्यामुळे महसूल विभागातील यंत्रणेमध्ये अधिक सुधारणा करून पारदर्शकता आणण्यास मदत होणार आहे. याशिवाय जमीन मोजणीची कामे अधिक गतीने आणि अचूकपणे होण्यासाठी रोव्हरयंत्रे क्रांतिकारी ठरणार आहेत. तर ऑनलाइन यंत्रणेचा उपयोग अधिकाधिक केल्यामुळे महसूल विभागाचे काम अधिक गतिमान होण्यास मदत होणार असल्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे- पाटील यांनी सांगितले.

 लोकोपयोगी उपक्रमांसाठी तंत्रज्ञानाचा वापर

ई-पीक पाहणी प्रकल्पाची अंमलबजावणी, ई- हक्क प्रणालीचा वापर, विसंगत सातबारा दुरुस्ती, प्रलंबित फेरफाराचा आढावा व उपविभागीय अधिकारी यांनी याबाबत घोषणापत्र देणे याबाबी पूर्ण करण्यावर भर देण्यात येईल. महाराजस्व अभियानामध्ये कार्यवाही करावयाच्या मुद्यांव्यतिरिक्त विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांना त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये लोकभिमुख आणि लोकोपयोगी कोणताही नावीन्यपूर्ण उपक्रम राबवायचा असल्यास ते या वर्षाच्या महाराजस्व अभियानामध्ये हाती घेऊ शकणार आहेत. त्या त्या भागातील गरज, भौगोलिक परिस्थिती, त्या भागानुसार वेगळे महसूली विषय इत्यादी याअंतर्गत ते राबविले जाऊ शकतात. जिल्हाधिकारी यांचा मासिक प्रगती अहवाल प्राप्त झाल्यानंतर विभागीय आयुक्त यांनी या अभियानाचा आढावा घेऊन तिमाही प्रगती अहवाल शासनास सादर करणे आवश्यक आहे.

शेतकऱ्यांना घरपोच सातबारा मिळणार

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात डिजिटल भूमी अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रम, ई-महाभूमि अंतर्गत विकसित करण्यात आलेल्या आज्ञावलीमधून संगणकीकृत डिजिटल स्वाक्षरीने प्राप्त होणाऱ्या अधिकार अभिलेख विषयक गाव नमुना क्र. 7/12 अद्ययावत करणे, तसेच गावातील खातेदारांना संगणकीकृत सातबारा घरपोच देण्यासाठी कार्यवाही करण्यात येत आहे. याबरोबरच एका महिन्याच्यावर प्रलंबित असलेले फेरफार निकाली काढण्यावर भर देण्यात येत आहे. भूसंपादन केलेल्या प्रकरणी कमी जास्त पत्रके तयार करुन गाव दप्तर अद्ययावत करण्यात येत आहे. यामध्ये संयुक्त मोजणी नकाशा आणि संयुक्त मोजणी पत्रक, भूसंपादन कायदा करुन 6 चे नोटिफिकेशन, अंतिम जाहीर निवाड्याची प्रत, भूमी संपादित जमिनीच्या ताबे पावतीची नक्कल, शेतसारा कमी करण्याबाबतचे आदेश, जमिनीचे सर्व्हे क्र. किंवा अन्य क्षेत्र वर्ग करावे लागत असल्यास तसे जमीन वर्ग केल्याबाबतचे जिल्हाधिकारी यांचे अभिहस्तांतरित आदेश याबाबत कार्यवाही पूर्ण करण्यात येणार आहे.

 

वर्षा फडके-आंधळे,

विभागीय संपर्क अधिकारी (महसूल)

स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र व आदर्श शाळा तयार करा- पालकमंत्री शंभूराज देसाई

सातारा दि. 3: ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा मिळावी यासाठी स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र अभियान राबविण्यात येत आहे. तसेच  जिल्हा परिषदेतील शाळेतील विद्यार्थ्यांना गुणवत्ता पूर्ण  शिक्षण मिळावे म्हणून आदर्श शाळा निर्मिती उपक्रम राबविण्यात येत आहे. हे स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र व आदर्श शाळा राज्यातील इतर जिल्ह्यांना आदर्शवत ठरतील असे तयार करा, अशा सूचना पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिल्या.

जिल्हा परिषदेमधील सभागृहात पालकमंत्री श्री. देसाई यांनी स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र अभियान व आदर्श शाळा निर्मितीबाबत आढावा बैठक घेण्यात आली.  यावेळी ते बोलत होते. या बैठकीला जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, पोलीस अधीक्षक समीर शेख, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले, जिल्हा नियोजन अधिकारी शशिकांत माळी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. वैशाली बडदे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) शबनम मुजावर आदी उपस्थित होते.

सार्वजनिक आरोग्य सेवेचा दर्जा उंचावला तर ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा मिळेल यासाठी स्मार्ट प्राथमिक आरोग्य अभियान योजना राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत सतरा प्राथमिक आरोग्य केंद्रांची निवड करण्यात आली आहे. येत्या जून पर्यंत दहा स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्रे तयार करा, अशा सूचनाही पालकमंत्री श्री. देसाई यांनी दिल्या.

  जिल्ह्यातील सतरा प्राथमिक आरोग्य केंद्रे स्मार्ट करण्यासाठी  जिल्हा वार्षिक योजनेतून देण्यात आलेल्या निधीचा वापर करावा, अशा सूचना करुन पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र अभियानातील कामे ही दर्जेदार होण्यासाठी अधिकाऱ्यांची नेमणुक करावी. निधी कमी पडत असल्यास आणखीन निधी दिला जाईल.

स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये सोलर एजर्जी, रेन वॉटर हार्वेस्टिंग, आयुष हर्बल गार्डन याच्या निर्मितीबरोबर या अभियानासाठी जिल्हा नियोजन, जिल्हा परिषद स्वनिधी, सीएसआर, राष्ट्रीय आरोग्य अभियान यासह विविध योजनांचा निधीचा वापर करुन ग्रामीण भागातील नागरिकांना जास्तीत जास्त चांगल्या आरोग्य सुविधा कशा उपलब्ध होतील यासाठी प्रयत्न करावा, असेही पालकमंत्री श्री. देसाई यांनी सांगितले.

 

जिल्ह्यातील 56 शाळा आदर्श शाळा करा

आदर्श शाळा उपक्रमाचा आढावा घेताना पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, ग्रामीण भागातील मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाच्या  56 शाळा ह्या आदर्श शाळा करण्यात येणार आहे. यामध्ये मुलांच्या अत्याधुनिक शिक्षण मिळावे यासाठी एक मॉडेल तयार करावे हे मॉडेल पूर्ण जिल्ह्यात वापरावे.

आदर्श शाळेसाठी जिल्हा वार्षिक योजनेचा निधी दिला जाईल त्याचबरोबर या उपक्रमासाठी सीएसआर फंड व लोकसहभाग ही घ्यावा. प्रामुख्याने विज्ञान व गणित प्रयोगशाळा, ग्रंथालय, संगणक कक्ष, परिसर सुशोभीकरण, ई-लर्निंग यासह विविध सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात.

जिल्ह्यात दहा ई-लर्निंग स्टुडिओ उभारण्यात येणार असून यासाठी अंदाजे दहा ते बारा लाखापर्यंतचा खर्च येतो. हे स्टुडिओ इंटरनेट सुविधा उपलब्ध आहे अशा ठिकाणी तयार करावे. या स्टुडिओला तालुक्यातील जास्तीत जास्त शाळा जोडाव्यात. स्टुडिओच्या माध्यमातून मार्गदर्शनाबरोबर शैक्षणिक गुणवत्ता वाढीचे कार्यक्रमा घेता येतील. यासाठी संबंधित शिक्षकाला प्रशिक्षणही द्यावे, असेही पालकमंत्री श्री. देसाई यांनी यावेळी सांगितले.

‘जय महाराष्ट्र’ या कार्यक्रमात कॅन्सर तज्ज्ञ डॉ. देवेंद्र चौकर यांची उद्या मुलाखत

मुंबई, दि. 3 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ या कार्यक्रमात जागतिक कर्करोग दिनानिमित्त कॅन्सर तज्ज्ञ डॉ. देवेंद्र चौकर यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. शनिवार दि. 4 फेब्रुवारी 2023 रोजी सायं 7.30 वा. ही मुलाखत महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर पाहता येईल.

यू ट्यूब- https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR

फेसबुक https://www.facebook.com/MahaDGIPR

ट्विटर – https://twitter.com/MahaDGIPR

दरवर्षी 4 फेब्रुवारी रोजी जागतिक कर्करोग दिवस जगभर पाळला जातो. यानिमित्ताने जगभरातील व्यक्तींनी एकत्र येऊन रोग ओळखणे, रुग्णांची काळजी घेणे, रोगाशी लढण्याचे त्यांना बळ देणे, रूग्णांना भावनिक आधार देण्याबाबत जनजागृती केली जाते. या आजाराबाबत रूग्णांना तत्काळ आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी यादृष्टीने शासनाच्यामार्फत सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहेत.

कर्करोग हा आजार काय आहे, या आजाराची लक्षणे, प्रभावी उपचार पद्धती, आरोग्याची घ्यावयाची काळजी अशा विविध विषयांवरील उपयुक्त माहिती, कॅन्सर तज्ज्ञ डॉ. देवेंद्र चौकर यांनी ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून दिली आहे. वरिष्ठ सहायक संचालक देवेंद्र  पाटील यांनी ही मुलाखत घेतली आहे.

0000000

‘दिलखुलास’ कार्यक्रमात कॅन्सर तज्ज्ञ डॉ.देवेंद्र चौकर यांची शनिवार व सोमवारी मुलाखत

मुंबई, दि. 3 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात जागतिक कर्करोग दिनानिमित्त कॅन्सर तज्ज्ञ डॉ. देवेंद्र चौकर यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर शनिवार  दि. 4 व सोमवार दि. 6 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होईल.

दरवर्षी 4 फेब्रुवारी रोजी जागतिक कर्करोग दिवस जगभर पाळला जातो. यानिमित्ताने जगभरातील व्यक्तींनी एकत्र येऊन रोग ओळखणे, रुग्णांची काळजी घेणे, रोगाशी लढण्याचे त्यांना बळ देणे, रुग्णांना भावनिक आधार देण्याबाबत जनजागृती केली जाते. या आजाराबाबत रूग्णांना तत्काळ आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी यादृष्टीने शासनाच्यामार्फत सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहेत.

कर्करोग हा आजार काय आहे, या आजाराची लक्षणे, प्रभावी उपचार पद्धती, आरोग्याची घ्यावयाची काळजी अशा विविध विषयावरील उपयुक्त माहिती कॅन्सर तज्ज्ञ डॉ. देवेंद्र चौकर यांनी ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून दिली आहे. वरिष्ठ सहायक संचालक देवेंद्र पाटील यांनी ही मुलाखत घेतली आहे.

0000000

ताज्या बातम्या

श्रीमंत राजे रघूजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार उद्या मुंबईत दाखल

0
मुंबई, दि. १७ : श्रीमंत राजे रघूजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार उद्या सोमवार १८ रोजी मुंबईत दाखल होणार असून महाराष्ट्र शासनातर्फे मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर...

शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेचा उद्या निकाल

0
मुंबई, दि. १७: शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (TAIT) परीक्षा २०२५ चा निकाल सोमवार दि. १८ ऑगस्ट २०२५ रोजी प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र...

कानडवाडी येथील १० एम.व्ही.ए. पॉवर ट्रान्सफॉर्मरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते लोकार्पण

0
सांगली, दि. 16, (जि. मा. का.) : मिरज तालुक्यात 33/11 के.व्ही. कानडवाडी उपकेंद्र येथील 10 एम.व्ही.ए. पॉवर ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते...

पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या चौंडी येथील राष्ट्रीय स्मारक विकासासाठी पहिल्या टप्यात ५० कोटींची तरतूद, प्रकल्प सर्वेक्षणास २१ लाख रुपये मंजूर

0
सभापती प्रा.राम शिंदे यांच्या पाठपुराव्याला यश; सिना नदीवर होणार २ बुडीत बंधारे, १५० कोटी खर्च अपेक्षित मुंबई , दिनांक 16 :- विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांच्या पुढाकारातून श्री क्षेत्र चौंडी येथे 'स्टॅच्यू ऑफ...

राज्यात १६ ते २१ ऑगस्ट २०२५ दरम्यान अतिवृष्टीचा इशारा

0
मुंबई, दि. १६ :- भारतीय हवामान विभागाच्या प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई यांच्याकडून प्राप्त माहितीच्या आधारे, राज्यात पुढील काही दिवसात १६ ते २१ ऑगस्ट २०२५...