शनिवार, ऑगस्ट 16, 2025
Home Blog Page 1662

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला अर्थसंकल्प पूर्व आढावा

मुंबई, दि.३ : उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री देवेंद्र फडणवीस हे आर्थिक वर्ष २०२३-२४ चा राज्याचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. यासंदर्भात विविध विभागांच्या मागण्यांची तरतूद व पूर्ण केलेल्या कामांचा त्यांनी आज आढावा घेतला. यावेळी पुढील वार्षिक योजनांच्या मागण्यासंदर्भात त्यांनी विस्तृत चर्चा केली. विभागाच्या नाविन्यपूर्ण व महत्त्वाच्या योजना पूर्ण करण्याच्या अनुषंगाने त्यांनी संबंधितांना सूचना केल्या.

वार्षिक योजना सन २०२३-२४ ची आखणी संदर्भात मंत्रालयीन विभागस्तरीय बैठकीचे आयोजन सह्याद्री अतिथीगृह येथे करण्यात आले होते. यावेळी पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग, ग्रामविकास व पंचायत राज, क्रीडा व युवक कल्याण, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये, अन्न व औषध प्रशासन, फलोत्पादन, रोजगार हमी योजना, राज्य उत्पादन शुल्क, इतर मागास बहुजन कल्याण, सहकार, महिला व बालविकास, कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता तसेच पर्यटन या विभागांच्या कामाचा व मागण्यासंदर्भात उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी आढावा घेतला.

पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, ग्रामविकास व पंचायत राज, क्रीडा व युवक कल्याण, वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन, फलोत्पादन व रोजगार हमी योजना मंत्री संदीपान भुमरे, महिला व बालविकास, कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता, पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा, सहकार, इतर मागास बहुजन कल्याण विभाग मंत्री अतुल सावे यांच्यासह राज्य उत्पादन शुल्क, नियोजन  आणि संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

००००

श्रद्धा मेश्राम/स.सं

अमरावती विद्यापीठाचा अतिरिक्त प्रभार डॉ. प्रमोद येवले यांचेकडे सुपूर्द

            मुंबई, दि. 3 : राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी एका आदेशान्वये डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांचेकडे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या कुलगुरुपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविला आहे. यासोबतच संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या कुलगुरु नियुक्तीची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. 

            संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. दिलीप मालखेडे यांच्या निधनामुळे दिनांक २८ जानेवारी पासून हे पद रिक्त झाले होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नागपूर विमानतळावर स्वागत

नागपूर, दि. 3 : वर्धा येथील 96 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आज सकाळी 10.30 वाजता नागपूर विमानतळ येथे विमानाने आगमन झाले. त्यांच्या समवेत शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर हे होते. नागपूर विमानतळ येथे त्यांचे स्वागत विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी केले.

पोलीस आयुक्त अमितेश कुमार, जिल्हाधिकारी डॉ.विपिन इटनकर, नागपूर महानगरपालिका आयुक्त राधाकृष्णन बी, नागपूर सुधार प्रण्यासचे सभापती मनोज सूर्यवंशी, विशेष पोलीस महानिरीक्षक छेरिंग दोरजे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा, पोलीस उपायुक्त अनुराग जैन यांनीदेखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्वागत केले.

मुख्यमंत्री शिंदे हे मंत्री दीपक केसरकर यांचे समवेत 11.50 वाजता नागपूर येथून हेलिकॉप्टरने वर्ध्याकडे रवाना झाले.

राष्ट्रीय छात्रसेनेच्या मुख्यमंत्री शिष्यवृत्तीसाठी एक कोटींचा निधी- क्रीडा मंत्री गिरीश महाजन

 मुंबई दि. २ : महाराष्ट्र राष्ट्रीय छात्र सेनेच्या (एनसीसी) छात्रांना दिल्या जाणाऱ्या मुख्यमंत्री शिष्यवृत्ती योजनेसाठी यावर्षीपासून १८.२५ लाख रुपये रक्कमेत वाढ करुन थेट एक कोटी रूपये एवढ्या भरीव निधीची तरतूद करण्यात आली आहे. राष्ट्रीय छात्र सेनेतील (एनसीसी) छात्रांसाठी ही बाब मनोबल वाढवणारी ठरेल, अशी माहिती क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीश महाजन यांनी दिली.

राष्ट्रीय छात्र सेनेच्या (एनसीसी) गुणवंत छात्रांचा उत्साह वाढवण्यासाठी सन १९९२ पासून राज्यात मुख्यमंत्री शिष्यवृत्ती योजना मंजूर करण्यात आली होती. यासाठी १८.२५ लाख रुपये रकमेची तरतूद करण्यात आली होती. या रकमेच्या व्याजातून पात्र आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील छात्रांना शिष्यवृत्ती दिली जात होती. मात्र, या अत्यंत तोकड्या रकमेच्या व्याजातून प्रति छात्राला प्रति वर्षी २ हजार रुपये शिष्यवृत्ती देण्यात येते होती. यामधून छात्रांना आर्थिक खर्च भागविण्यासाठी ही रक्कम अपुरी पडत होती.

त्यामुळे विद्यमान शिष्यवृत्ती निधीची रक्कम १ कोटी रुपयांपर्यंत वाढवावी, अशी विनंती राष्ट्रीय छात्र सेनेचे महासंचालक यांनी केली होती. वाढीव निधीसाठी क्रीडा मंत्री श्री. महाजन यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा केला होता. बुधवारी संध्याकाळी सह्याद्री अतिथीगृहावर प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्रातून दिल्ली येथे संचलनात सहभागी झालेल्या १२५ एनसीसी कॅडेट्स सन्मान सोहळ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रीय छात्र सेनेतील छात्रांसाठीच्या मुख्यमंत्री शिष्यवृत्ती योजनेच्या निधीत एक कोटी रुपयांपर्यंत वाढीची घोषणा केली असल्याचे क्रीडा मंत्री श्री. महाजन यांनी सांगितले.

महाराष्ट्रतील राष्ट्रीय छात्र सेनेने स्थापनेपासून राज्याचे नाव उज्ज्वल केले असून आतापर्यंत महाराष्ट्रासाठी ३३ पैकी १८ वेळेस प्रतिष्ठित असा प्रधानमंत्री बॅनर जिंकण्याचा अनोखा विक्रम केला आहे.तसेच ८ वेळेस उपविजेता ठरले आहेत. ही कामगिरी महाराष्ट्रासाठी निश्चितच गौरवास्पद आहे. ही बाब विचारात घेऊन मुख्यमंत्री शिष्यवृत्ती योजनेच्या निधीत वाढ केल्यामुळे छात्र सैनिकांचे मनोबल वाढवणारी तसेच त्यांना राष्ट्राच्या उदात्त हेतूसाठी अधिक चांगली कामगिरी करण्यास प्रोत्साहित करेल, असे यावेळी क्रीडा मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.

00000

राजू धोत्रे /विसंअ/

नाशिक येथील महाराष्ट्र पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण व संशोधन संस्थेकरिता राष्ट्रीय वैद्यकीय आयोगानुसार पदे निर्माण करणार – वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन

मुंबई दि. 2 : नाशिक येथील महाराष्ट्र पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण व संशोधन संस्थेकरिता राष्ट्रीय वैद्यकीय आयोगानुसार (एनएमसी) पदे निर्माण करण्यात येणार असल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.

वैद्यकीय शिक्षण मंत्री श्री. महाजन यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला. यावेळी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठनाशिक व त्यांच्या अधिनस्त नव्याने सुरू करण्यात आलेल्या महाराष्ट्र पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण व संशोधन संस्था याबाबत देखील आढावा घेण्यात आला. या बैठकीस वैद्यकीय शिक्षण विभागाच्या सचिव अश्विनी जोशीमहाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरू लेफ्टनंट जनरल (सेवानिवृत्त) श्रीमती माधुरी कानिटकरवैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे संचालक दिलीप म्हैसेकरवैद्यकीय शिक्षण विभागाचे उप सचिव अजित सासुलकर व इतर अधिकारी उपस्थित होते.

विद्यापीठाचा आकृतीबंध मंजूर करण्यात यावा तसेच आकृतीबंध मंजूर झाल्यानंतर आवश्यक पदे निर्म‍िती करण्याबाबतचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना मंत्री श्री. महाजन यांनी यावेळी दिले. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या नागपूरलातूरकोल्हापूर येथील उपकेंद्राकरिता त्याठिकाणच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये जागा उपलब्ध करुन देण्याचे निर्देश संचालकवैद्यकीय शिक्षण व संशोधनमुंबई यांना यावेळी देण्यात आले. विद्यापीठाच्या प्रस्तावित विशेष विभाग (सेंटर ऑफ एक्सेलंस) करिता देखील अनुदान उपलब्ध करुन देणार असल्याचे मंत्री श्री. महाजन यांनी सांगितले.

नाशिक येथे वैद्यकीय महाविद्यालय आणि महाराष्ट्र पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण व संशोधन संस्था स्थापन करण्यासाठी सन 2016-2019 या कालावधीत तत्वत: मान्यता देण्यात आली होती. यानंतर या दोन्ही संस्था सुरु करण्यासाठी पाठपुरावा करण्यात येत होता. एप्रिल 2021 रोजीच्या शासन निर्णयानुसार नाशिक येथे 100 विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे वैद्यकीय महाविद्यालय आणि त्यास संलग्नित 430 रुग्णखाटांचे रुग्णालय तसेच महाराष्ट्र पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण व संशोधन संस्था स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे रुग्णांना मुंबई किंवा पुण्याऐवजी नाशिक येथेच विविध आजारांवरील विशेषोपचार व अतिविशेषोपचार सोय उपलब्ध होणार आहे. 29 नोव्हेंबर 2022 रोजी काढण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार या संस्थांच्या इमारत बांधकामासाठी 348 कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली आहे. नाशिक येथे शासनाचे वैद्यकीय महाविद्यालय स्थापन होण्याकरिता नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री आणि बंदरे व खनिकर्म मंत्री दादा भुसे यांच्यासह आमदार देवयानी फरांदेआमदार सीमा हिरेआमदार राहुल ढिकलेआमदार राहुल आहेर पाठपुरावा करत होते. नाशिक येथील स्थापन करण्यात आलेल्या महाराष्ट्र पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण व संशोधन संस्थेकरिता राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या निकषानुसार जागा उपलब्ध करण्याकरिता तत्काळ कार्यवाही करण्याचे निर्देशही श्री. महाजन यांनी दिले.

०००

वर्षा आंधळे/विसंअ/

जपानमधील वाकायामा राज्याबरोबरील सामंजस्य करारामुळे कुस्तीपटूंच्या तांत्रिक कौशल्यात भर – क्रीडा मंत्री गिरीश महाजन

मुंबईदि. : जपानमधील वाकायामा राज्याच्या कुस्तीगीर संघटनेबरोबर झालेल्या सामंजस्य करारातून राज्यातील कुस्तीपटूंना तांत्रिक मदत होवून त्यांचे कौशल्य वाढण्यास मदत होईल. त्यामुळे विविध स्पर्धांमधील पदकांची संख्याही वाढेल, असे प्रतिपादन  क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीश महाजन यांनी केले.

येथील सह्याद्री अतिथीगृह येथे सामंजस्य कराराप्रसंगी वाकायामा राज्याचे राज्यपाल शुहेइ किशिमोतोआमदार मेघना बोर्डिकर- साकोरेक्रीडा व युवक सेवा संचालनालय आयुक्त डॉ. सुहास दिवसेवाकायामा राज्य कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष वातारू किमुरावाकायामाचे आमदार श्री. तानेगुची आदी उपस्थित होते.

मंत्री श्री. महाजन म्हणालेया करारामुळे महाराष्ट्र व वाकायामा या दोन्ही राज्यांतील खेळाडूंना परस्परांच्या देशात जाऊन एकत्र सरावतंत्रज्ञानाची देवाणघेवाण करणे सुलभ होणार असून प्रशिक्षकांनाही सहकार्य करून खेळाडूंना नवनवीन तंत्रे शिकवणे शक्य होणार आहे. खेळाडूंचा दर्जा उंचावण्यासाठी याचा उपयोग  होणार असून खेळाडूंची आंतरराष्ट्रीय स्पर्धांमधील कामगिरी उंचावण्यास मदत होणार आहे. पुणेस्थित असोसिएशन ऑफ फ्रेंडस् ऑफ जपान (AFJ) या संस्थेच्या समन्वयाने हा करार साध्य झाला आहे. ही संस्था गेली ३२ वर्ष भारत व जपान या दोन देशांचे विविध क्षेत्रांतील संबंध दृढ करण्यासाठी झटत आहे

कुस्ती तथा मल्ल विद्येला मोठा इतिहास आहे. वैदीक काळापासून हा खेळ खेळला जातो. महाभारतातील प्राचीन ग्रंथांमध्ये मल्लविद्येचा उल्लेख अनेक प्रसंगांमध्ये  आढळतो. भारताला जी 20 गटाचे यावर्षीचे अध्यक्षपद मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर भारत व जपान या दोन जी २० समूहातील देशातील दोन राज्यांमध्ये होणारा करार हा सहकार्य वाढवण्यास उपयुक्त ठरेल, असेही मंत्री श्री. महाजन यांनी यावेळी सांगितले.

मंत्री श्री. महाजन म्हणाले, बदलत्या काळात आंतरराष्ट्रीय स्तरावर कुस्तीविषयक आयाम बरेच बदलले असून त्याअनुषंगाने राज्यातील कुस्तीपटूंना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्पर्धांमध्ये पदके मिळविता यावीत यासाठी राज्य शासन आणि वाकायामा स्टेटजपान येथील वाकायामा प्रीफेक्चर कुस्ती महासंघ यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आला. राज्यातील फुटबॉल खेळाच्या विकासासाठी महाराष्ट्र राज्य क्रीडा विभाग व एफ.सी बायर्न म्युनिक (FC Bayern Munich) जर्मनी यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला असल्याचेही त्यांनी सांगितले.

वाकायामा राज्याचे राज्यपाल शुहेइ किशिमोतोया कराराच्या निमित्ताने राज्यात जास्तीत जास्त पदक विजेते कुस्तीपटू घडावेत, अशा सदिच्छा व्यक्त केल्या आणि जपान बरोबर इतरही क्षेत्रात मैत्रीचे संबंध यामुळे दृढ होतील, असे सांगितले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वाती भागवत यांनी केले, तर आभार आमदार मेघना बोर्डीकर यांनी मानले.

0000

राजू धोत्रे/विसंअ/

सेवाभावी वृत्तीने कलेची सेवा करणाऱ्यांचा गौरव करणे हा शासनाचा बहुमान – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार

मुंबई, दि.2 – सांस्कृतिक क्षेत्र असे एकच क्षेत्र आहे जिथे कलाकारांनी सादर केलेल्या कलेतून उपस्थित प्रेक्षकांना उर्जा आणि उत्साह मिळतो. आज गौरविण्यात आलेल्या कलाकारांनी वर्षानुवर्ष सेवाभावी वृत्तीने काम करुन कलेची उपासना केली. या अशा कलाकारांचा गौरव करणे हा शासनाचा बहुमान असल्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवनगौरव पुरस्कार, नटवर्य प्रभाकर पणशीकर जीवनगौरव पुरस्कार आणि संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव पुरस्कारांचे वितरण आज संध्याकाळी सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते प्रभादेवी येथील पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी येथे झाले. या कार्यक्रमासा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, सांस्कृतिक कार्य विभागाचे उपसचिव विलास थोरात, सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक विभिषण चवरे यांच्यासह सांस्कृतिक क्षेत्रातले मान्यवर उपस्थित होते.

उपस्थित कलाकारांचा गौरव केल्यानंतर श्री. मुनगंटीवार म्हणाले की, आपण नेहमी ब्रिटीशांनी भारतातून कोहिनूर हिरा घेऊन गेल्याबद्दल खेद व्यक्त करतो पण महाराष्ट्रात विविध क्षेत्रात काम करुन महाराष्ट्राला पुढे नेणारे कलाकारच आपले कोहिनूर असून महाराष्ट्र ही कोहिनूरची खाण आहे. आतापर्यंत ४८ भारतरत्न दिले असून यापेकी १० भारतरत्न महाराष्ट्राला मिळाले आहेत, तर दरवर्षी देण्यात येणाऱ्या एकूण पद्म पुरस्कारामध्ये १० टक्के पुरस्कार महाराष्ट्राला मिळतात यावरुन महाराष्ट्रात असलेल्या सांस्कृतिक वैभवाची प्रचिती येते. नुकतेच राज्य शासनाने जय जय महाराष्ट्र माझा हे महाराष्ट्र गीत म्हणून स्वीकारले असून या गीतामध्ये सांगितल्याप्रमाणे दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा हे महाराष्ट्र आपल्या कलेच्या माध्यमातून सिद्ध करेल.

वित्तमंत्री म्हणून काम करताना महाराष्ट्राची अर्थ क्षेत्रात आघाडी टिकून रहावी यासाठी प्रयत्न केले. आता सांस्कृतिक कार्य मंत्री म्हणून काम करताना साहित्य, रंगभूमी, कला, सिनेमा यामुळे प्रेक्षकांना समाधान कसे मिळेलं याकडे लक्ष देत आहे. येणाऱ्या काळात महाराष्ट्र सांस्कृतिक क्षेत्रात आघाडीवर कसा येईल याकडे लक्ष देण्यात येत असून आपल्यापैकी कोणाकडे काही याबाबत सूचना असल्यास नक्की कळवाव्यात.

पुरस्कार सोहळ्याच्या कार्यक्रमात प्रास्ताविक करताना श्री. खारगे यांनी येणाऱ्या काळात सांस्कृतिक कार्य विभागामार्फत विविध क्षेत्रातील कला आणि कलाकारांना हक्काचे व्यासपीठ निर्माण करण्यावर भर देण्यात येणार आहे. यावर्षी या विभागामार्फत विविध उपक्रम वर्षभर राबविण्यात येणार आहे.

साहित्य संमेलनासाठी ५० लाख नाही तर २ कोटी रुपये अनुदान

श्री. केसरकर यावेळी म्हणाले की, कला आणि साहित्य याना हक्काचे व्यासपीठ मिळावे म्हणून हे राज्य शासन प्रयत्न करत आहे. उदयापासून साहित्य संमेलन सुरु होत असून या संमेलनासाठी ५० लाख ऐवजी २ कोटी अनुदान देण्यात येणार आहे. यशिवाय येणाऱ्या काळात गिरगावातील चौपाटी येथे मराठी भाषा भवन उभारण्यात येणार आहे. तर याच ठिकाणी ५०० आसनी अंबी थिएटर असणार आहे. तर नवी मुंबई येथील जागेत मुंबईत येणाऱ्या साहित्यिक यांची रहाण्याची सोय केली जाणार आहे. यशिवाय वाई येथे विश्वकोश इमारत उभारण्यात येणार आहे. सिंधुदुर्ग येथे यापूर्वी ३ नाट्यगृह बांधण्याचे काम पूर्ण झाले असून चौथ्या नाट्यगृह बांधण्याचे भूमीपूजन लवकरच केले जाईल.

सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते रंगभूमी जीवनगौरव पुरस्काराचे वितरण

भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवनगौरव पुरस्कार, नटवर्य प्रभाकर पणशीकर जीवनगौरव पुरस्कार आणि संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव पुरस्कारांचे स्वरुप ५ लाख रुपये रोख, मानचित्र,सन्मानपत्र असे आहे. याच कार्यक्रमात संगीत नाटक अकादमी पुरस्कारप्राप्त कलाकारांचा सत्कारही उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. १ लाख रुपये रोख, मानचित्र,सन्मानपत्र देऊन यावेळी मान्यवरांना गौरविण्यात आले. 2 फेब्रुवारी ते 4 फेब्रुवारी दरम्यान भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत महोत्सवाचे आयोजनही करण्यात आले आहे.

भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवनगौरव पुरस्काराचे वितरण

सन 2020 रोजीचा भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवनगौरव पुरस्कार पद्मभूषण डॉ.एन. राजम यांना प्रदान करण्यात आला. सन 2021 रोजीचा भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवनगौरव पुरस्कार पं. शिवकुमार शर्मा यांना जाहीर करण्यात आला होता. मात्र पद्मविभूषण पंडित शिवकुमार यांचे निधन झाल्याने त्यांना जाहीर झालेला पुरस्कार पंडित शर्मा यांच्या पत्नी मनोरमा शर्मा आणि मुलगा राहुल शर्मा यांना आज सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला.

नटवर्य प्रभाकर पणशीकर जीवनगौरव पुरस्काराचे वितरण

सन 2019-20 सालाचा नटवर्य प्रभाकर पणशीकर जीवनगौरव पुरस्कार रत्नाकर मतकरी यांना जाहीर झाला होता. मात्र त्यादरम्यान श्री. मतकरी यांचे निधन झाल्याने त्यांना प्रदान करण्यात येणारा पुरस्कार त्यांच्या पत्नी प्रतिभा रत्नाकर मतकरी यांनी स्वीकारला. सन 2020-21 सालाचा नटवर्य प्रभाकर पणशीकर जीवनगौरव पुरस्कार दत्ता भगत यांना तर सन 2021-22 सालाचा नटवर्य प्रभाकर पणशीकर जीवनगौरव पुरस्कार पद्मश्री सतीश आळेकर यांना आज सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला.

संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव पुरस्काराचे वितरण

सन 2019-20 सालाचा संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार मधुवंती दांडेकर यांना,सन 2020-21 सालाचा संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार दीप्ती भोगले यांना तर सन 2021-22 सालाचा संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार सुधीर ठाकूर यांना आज सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला.

याशिवाय संगीत नाटक अकादमी पुरस्कारप्राप्त कलाकारांचा सत्कारही यावेळी सन्मान करण्यात आला.सन 2019 साठी दिग्दर्शनासाठी कुमार सोहोनी, लोकसंगीतासाठी पांडुरंग घोटकर, वादय निर्माणासाठी माजिद गुलाबसाहेब सतारमेकर यांचा सत्कार करण्यात आला. सन 2020 साठी हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतासाठी वि. आरती अंकलीकर-टिकेकर, अभिनयासाठी प्रशांत दामले, कळसुत्री बाहुल्यांसाठी मीना नाईक, समग्र योगदान- कथकसाठी डॉ. नंदकिशोर कपोते, ओडिसी नृत्यासाइी पं.रवींद्र अतिबुध्दी, सुगम संगीतासाठी अनुप जलोटा आणि कॉन्टेम्पररी नृत्यासाठी भूषण लकींद्रा यांचा सत्कार करण्यात आला.सन 2021 साठी हिंदुस्थानी शास्त्रीय गायन-धृपदसाठी पं.उदय भवाळकर, कथक नृत्यासाठी शमा भाटे, व्हायोलिनसाठी डॉ. संगीता शंकर यांचा सत्कार करण्यात आला.याशिवाय लोककलेसाठी डॉ. प्रभाकर भानुदास मांडे, सितारसाठी पं. शंकर कृष्णाजी अभ्यंकर, कथकसाठी डॉ. पद्मा शर्मा, संगीतासाठी उस्मान अब्दुल करीम खान, तारपा लोकसंगीतासाठी भिकल्या लडक्या धिंडा आणि तमाशा लोकनाट्यासाठी डॉ. हरिश्चंद्र प्रभाकर बोरकर या अमृत पुरकारप्राप्त मान्यवरांचाही सत्कार यावेळी करण्यात आला.

भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत महोत्सव

पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी येथे 2 फेब्रुवारी ते 4 फेब्रुवारी दरम्यान भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत महोत्सवाचे आयोजनही करण्यात आले आहे. आज म्हणजेच 2 फेब्रुवारी रोजी बेगम परवीन सुलताना आणि पं. जयतीर्थ मेवुंडी यांचे गायन झाले. शुक्रवारी म्हणजेच 3 फेब्रुवारी रोजी वि. आरती अंकलीकर, वि. सानिया पाटणकर, विराज जोशी यांचे गायन होणार आहे. तर पं. उद्धव आपेगांवकर आणि पं. पुष्कराज कोष्टी यांचे वादन होणार आहे. शनिवारी म्हणजेच 4 फेब्रुवारी रोजी पं. राजा काळे, डॉ. आशिष रानडे आणि पं. कैवल्यकुमार गुरव यांचे गायन तर वि. कला रामनाथ यांचे वादन होणार आहे.

तृणधान्यापासून बनवलेल्या पदार्थांच्या विक्रीस भरभरुन प्रतिसाद; दोन दिवसात तब्बल ११ लाख रुपयांची विक्री

मुंबई, दि. 2 : उच्च पोषणमूल्य व आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या अशा पौष्टिक तृणधान्यांना बळकटी देण्यासाठी मंत्रालयात महाराष्ट्र मिलेट मिशनच्या शुभारंभ प्रसंगी आयोजित तृणधान्यापासून तयार केलेल्या पदार्थांच्या प्रदर्शनास मंत्रालय अधिकारी – कर्मचारी यांनी भरभरुन प्रतिसाद दिला. दोन दिवसात तब्बल ११ लाख रुपयांच्या पदार्थांची यावेळी विक्री झाली.

संयुक्त राष्ट्रसंघाने २०२३ हे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून घोषित केले आहे. उच्च पोषणमूल्य व आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या, अशा पौष्टिक तृणधान्यांना बळकटी देण्यासाठी तसेच तृणधान्य पिकांचे कमी होत चाललेले लागवड क्षेत्र वाढविण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणे आणि शेतकऱ्यांचे जीवनमान, अर्थकारण उंचवण्यासाठी या तृणधान्यांचा आपल्या आहारामध्ये जास्तीत जास्त वापर होणे आवश्यक आहे. तोच उद्देश लक्षात घेत कृषी विभागाच्या वतीने दिनांक ३१ जानेवारी रोजी महाराष्ट्र मिलेट मिशनचा प्रारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कृषि मंत्री अब्दुल सत्तार आणि मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. तसेच दिनांक ३१ जानेवारी आणि १ फेब्रुवारी रोजी मंत्रालयाच्या त्रिमूर्ती प्रांगणात भरड धान्यापासून बनवलेल्या पदार्थांच्या प्रदर्शन विक्रीसाठी स्टॉल्स लावण्यात आले होते. त्यास अधिकारी कर्मचाऱ्यांनी भरघोस प्रतिसाद दिला.

या प्रदर्शनात २८ बचत गट आणि कृषी प्रक्रिया धारक सहभागी झाले होते. त्यांनी बनवलेल्या नाचणी कुकीज, बाजरी कुकीज, नाचणी बिस्कीट, नाचणी सत्व, नाचणी लाडू, पापड, शेव, ज्वारी रोस्ट लाया, नाचणी चिवडा, नाचणी केक, बर्फी, शंकरपाळी, ज्वारीची चकली, नाचणीचे मोदक, आंबील, ज्वारी पालक वडी, मिक्स ढोकळा, भगर दहिवडे, नाचणी आप्पे आणि कचोरी, ज्वारी उपमा अशा पदार्थाची चवीने उपस्थितांना मोहविले आणि त्या पदार्थांच्या खरेदीसाठी झुंबड उडाली.

बदलत्या जीवनशैलीमुळे आहाराकडे होत असलेले दुर्लक्ष तसेच फास्टफूडमुळे उद्भवणाऱ्या विविध प्रकारच्या आजारांवर मात करण्याकरिता पौष्टिक तृणधान्याचा आहारामध्ये जास्तीत जास्त समावेश असणे आवश्यक आहे. कारण तृणधान्यांमध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस, लोह, प्रथिने, कार्बोदके मुबलक प्रमाणात असतात तसेच पौष्टिक तृणधान्य ही ग्लुटेन विरहित पचनास हलकी असतात. लहान मुले, महिलांना याचा चांगल्या प्रकारे फायदा होतो. त्यामुळेच तृणधान्यापासून बनविल्या जाणाऱ्या विविध पाक कलाकृती या प्रदर्शनाच्या माध्यमातून विक्रीसाठी ठेवण्यात आल्या होत्या.

मंत्रालयामध्ये महाराष्ट्रातल्या विविध जिल्ह्यातील अधिकारी कर्मचारी काम करत असतात. तसेच महाराष्ट्रातील सर्व भागातून लोक आपल्या कामांसाठी येत असतात. या सर्वांच्या माध्यमातून तृणधान्याचे महत्त्व हे वेगवेगळ्या पाक कलाकृतीच्या माध्यमातून सर्वदूर पोचविण्यास मोठ्या प्रमाणात मदत होईल, हा उद्देश गेल्या दोन दिवसात सफल झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

या प्रदर्शनामध्ये साधारणपणे ११ लाख रुपयांची विक्री झाली.समृद्धी ॲग्रो ग्रुप पुणे ( श्री तात्यासाहेब फडतरे ) यांनी सर्वाधिक विक्री केली. या प्रदर्शनात नाचणी कुकीज, लाडू, बाजरी चिवडा, नाचणी सत्व या पदार्थांना मोठी मागणी असल्याचे दिसले.

जास्तीत जास्त नागरिकांनी आपल्या आहारात पौष्टिक तृणधान्याचा वापर करावा व आपले आरोग्य सुदृढ व निरोगी ठेवावे. महाराष्ट्र मिलेट मिशन हे यशस्वी करावे, असे आवाहन कृषी विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी केले आहे.
हे प्रदर्शन यशस्वी व्हावे यासाठी मंत्रालयातील कृषी विभागाचे अधिकारी – कर्मचारी, ठाणे विभागीय कृषी सहसंचालक आणि इतर जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयाच्या अधिकारी कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
000

अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पहिला अर्थसंकल्प; थेट जनतेतून मागितल्या संकल्पना आणि सूचना

मुंबईदि. 2 : केंद्रीय अर्थसंकल्प बुधवारी सादर झाल्यानंतर आता महाराष्ट्रातील अर्थसंकल्पाची प्रतीक्षा आहे. महाराष्ट्राचा अर्थसंकल्प कसा असावायासाठी उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट जनतेतून सूचना आणि संकल्पना मागविल्या आहेत.

केंद्रीय अर्थसंकल्प झाल्यानंतर आता महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पाकडे जनतेचे लक्ष आहे. 27 फेब्रुवारीपासून राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबईत होणार असूनलवकरच कामकाज सल्लागार समितीत अर्थसंकल्पीय कामकाजाचे वेळापत्रक ठरेल. महाराष्ट्रात आता अर्थसंकल्पाची तयारी सुरू झाली आहे. जिल्हाश: डीपीसी आणि विभागश: वार्षिक आराखड्यासाठी बैठकी पूर्ण झालेल्या आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आतापर्यंत मुख्यमंत्रीगृहमंत्रीविरोधी पक्षनेताउपमुख्यमंत्री अशी अनेक पदे भूषविली. पणअर्थमंत्री म्हणून त्यांचा हा पहिला अर्थसंकल्प असणार आहे.

 अर्थसंकल्प कसा वाचावा’ हे पुस्तक त्यांनी आमदार असतानाच लिहिले आहे. अर्थसंकल्पावर अनेक व्याख्याने सुद्धा त्यांनी दिली आहेत. कालही केंद्रीय अर्थसंकल्पावर त्यांचे मुंबईत व्याख्यान झाले. यंदाच्या आणि आपल्या पहिल्या अर्थसंकल्पात जनतेच्या सूचनांचेसंकल्पनांचे प्रतिबिंब असावेम्हणून त्यांनी थेट जनतेतून सूचनासंकल्पना मागविल्या आहेत. http://bit.ly/MahaBudget23 या संकेतस्थळावर जाऊन लोकांना आपल्या संकल्पना मांडता येणार आहेत. त्यामुळेच निश्चित जनतेच्या आशाआकांक्षांचे प्रतिबिंब राज्याच्या आगामी अर्थसंकल्पात असणार आहे.

००००

स्वच्छ मुख अभियानाच्या बोधचिन्हाचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते अनावरण

मुंबई, दि. २ : आधुनिक जीवन पद्धतीमध्ये जेवणानंतर चूळ न भरता फिंगर बोलमध्ये हात धुण्याची पद्धत प्रचलित झाली आहे. दंतरोग्याच्या दृष्टीने ही पद्धत अतिशय चुकीची असून दंत वैद्यकांनी ही पद्धत बंद करण्यासाठी जनजागृती करावीअसे आवाहन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी येथे केले.

दंतवैद्यकीय क्षेत्रातील उत्कृष्ट सेवेबद्दल राज्यपाल श्री. कोश्यारी यांच्या हस्ते नुकतेच राज्यातील दंतवैद्यकांना एक्सलन्स इन डेन्टिस्ट्री‘ पुरस्कार राजभवन येथे प्रदान करण्यात आलेत्यावेळी राज्यपाल बोलत होते.  मेडियुष‘ या दंतवैद्यकांच्या संघटनेच्यावतीने हे पुरस्कार देण्यात आले.

यावेळी महाराष्ट्र शासनाच्या स्वच्छ मुख अभियानाच्या बोधचिन्हाचे तसेच बोधवाक्याचे राज्यपालांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.

स्वच्छ मुख अभियान‘ हा चांगला उपक्रम असून असे अभियान निरंतर राबवावे. वैद्यकीय सेवा हा एक पवित्र व्यवसाय असून त्याचे पावित्र्य टिकवून ठेवण्यासाठी डॉक्टरांनी प्रयत्न करावे असे राज्यपालांनी सांगितले.  

कार्यक्रमाला मेडीयुषचे सह-संस्थापक डॉ गोविंद भतानेवैद्यकीय शिक्षण सहसंचालक डॉ विवेक पाखमोडे,  ‘ओरल हेल्थ मिशनचे डॉ दर्शन दक्षिणदासडॉ विश्वेश ठाकरे,  इंडियन डेंटल असोसिएशनचे डॉ अशोक ढोबळेसौंदर्यवर्धक व कृत्रिम दंतशास्त्र तज्ज्ञ  डॉ संदेश मयेकरकालिका स्टीलचे संचालक गोविंद गोयलतसेच दंतचिकित्सा क्षेत्रातील विविध मान्यवर उपस्थित होते.

०००

 Maharashtra Governor presents ‘Excellence in Dentistry Awards’

Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari presented the ‘Excellence in Dentristry’ awards to dentists from across the State at Raj Bhavan Mumbai. The programme was organised by ‘Mediyush’, an organisation of dentists. 

The Governor also unveiled the Logo and Tagline of Government of Maharashtra’s ‘Swachch Mukh Abhiyan’.

Observing that the modern practice of rinsing hands in a finger bowl after lunch or dinner was harmful for dental care, the Governor called upon dentists to create awareness to stop the practice.

Co Founder of Mediyush Dr Govind Bhatane, Joint Director of Medical Education Dr Vivek Pakhmode, Indian Dental Association’s Dr Ashok Dhobale, Aesthetic and Cosmetic Dental specialist Dr Sandesh Mayekar,  Dr Darshan Dakshindas, Director of Kalika Steel Govind Goyal, Dr Vishwesh Thakre and doctors and specialists from Dentistry were present.

000

ताज्या बातम्या

कानडवाडी येथील १० एम.व्ही.ए. पॉवर ट्रान्सफॉर्मरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते लोकार्पण

0
सांगली, दि. 16, (जि. मा. का.) : मिरज तालुक्यात 33/11 के.व्ही. कानडवाडी उपकेंद्र येथील 10 एम.व्ही.ए. पॉवर ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते...

पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या चौंडी येथील राष्ट्रीय स्मारक विकासासाठी पहिल्या टप्यात ५० कोटींची तरतूद, प्रकल्प सर्वेक्षणास २१ लाख रुपये मंजूर

0
सभापती प्रा.राम शिंदे यांच्या पाठपुराव्याला यश; सिना नदीवर होणार २ बुडीत बंधारे, १५० कोटी खर्च अपेक्षित मुंबई , दिनांक 16 :- विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांच्या पुढाकारातून श्री क्षेत्र चौंडी येथे 'स्टॅच्यू ऑफ...

राज्यात १६ ते २१ ऑगस्ट २०२५ दरम्यान अतिवृष्टीचा इशारा

0
मुंबई, दि. १६ :- भारतीय हवामान विभागाच्या प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई यांच्याकडून प्राप्त माहितीच्या आधारे, राज्यात पुढील काही दिवसात १६ ते २१ ऑगस्ट २०२५...

शाहू महाराजांच्या समाजपरोपकारी कार्याला सरन्यायाधीश भूषण गवई यांच्याकडून अभिवादन

0
समाधीस्थळाला भेट कोल्हापूर, दि. १६ : भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी आज कोल्हापूर येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीस्थळाला भेट देऊन त्यांना अभिवादन केले. याप्रसंगी...

सांगली जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करू – उपमुख्यमंत्री अजित पवार

0
विविध विकासकामे, योजनांच्या जिल्हास्तरीय आढावा बैठकीत निर्देश सांगली, दि. 16, (जि. मा. का.) : सांगली जिल्हा हा नेतृत्त्व करण्यास संधी देणारा जिल्हा आहे. या जिल्ह्याने...