शुक्रवार, जुलै 11, 2025
Home Blog Page 1793

नवी मुंबई डाक विभागात डाकसेवकांची पदभरती

मुंबई, दि. 21 : भारतीय डाक विभागांतर्गत महाराष्ट्र मंडळ कार्यालयांची 3650 ग्रामीण डाक सेवक पदासाठी जाहिरात प्रसिद्ध झाली असून त्यामध्ये अधीक्षक डाकघर, नवी मुंबई विभाग यांच्या कार्यक्षेत्रातील शाखा डाकपालाच्या 19 पदासाठी तसेच इतर भरती कार्यालयामार्फत 41 डाक सेवक/ सहाय्यक शाखा डाकपाल ही पदे भरली जाणार आहेत, असे वरिष्ठ अधीक्षक डाकघर, पनवेल यांनी कळविले आहे.

पात्र व इच्छुक उमेदवारांनी 30 नोव्हेंबर 2019 पर्यंतhttp://appost.in/gdsonline/या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज भरावेत. नवी मुंबई विभागकार्यक्षेत्रातील पात्र उमेदवारांना अर्जाची फी प्रधान डाकघर, पनवेल यांच्याकडे जमा करता येणार आहे.

अफवांना, भूलथापांना बळी पडू नये

भारतीय डाक विभाग पैसे भरण्यासाठी कोणत्याही प्रकारचा फोन व संदेश पाठवित नाही. निवड झालेल्या उमेदवारांना सिस्टिम जनरेटेड संदेश त्यांची निवड झाल्यावर प्राप्त होऊ शकेल. आवश्यक पत्र व्यवहार अधिकृत भरती कार्यालयामार्फत केला जाईल याची नोंद घ्यावी. त्यामुळे उमेदवारांनी आपला नोंदणीकृत क्रमांक व भ्रमणध्वनी क्रमांक जाहीर करु नये व अफवांपासून सावध राहावे. तसेच भारतीय डाक विभाग कोणत्याही हेतूसाठी आपणास फोन करत नाही. म्हणून उमेदवारांनी या बाबतीत जागरुक राहावे व कोणत्याही अफवांना, भूलथापांना बळी पडू नये, असे आवाहन प्रसिद्धीपत्रकाद्वारे करण्यात आले आहे.

न्यूझीलंडच्या खासदारांनी घेतली अपर मुख्य सचिव सीताराम कुंटे यांची भेट

मुंबई,दि.21 :न्यूझीलंडचे खासदार ग्रेग ओ’कॉनॉर यांच्या अध्यक्षतेखालील खासदारांच्या शिष्टमंडळाने आज राज्य शासनाचे अपर मुख्य सचिव सीताराम कुंटे यांची मंत्रालयात भेट घेतली. महाराष्ट्र विधानमंडळाचे सचिव राजेंद्र भागवत यावेळी उपस्थित होते.

न्यूझीलंडचे खासदार कंवलजीतसिंग बक्षी,टीम मॅकलँडो,मेलीसा ली,न्यूझीलंड संसदेच्या (चेंबर) संसदीय मैत्र गटाच्या सचिव नताली मूर यांचा शिष्टमंडळामध्ये समावेश होता. यावेळी महाराष्ट्र विधान मंडळाचे उपसचिव शिवदर्शन साठे उपस्थित होते.

प्रारंभी शिष्टमंडळाचे स्वागत करुन श्री. कुंटे यांनी महाराष्ट्राची कृषी,अर्थव्यवस्था,उद्योग आदींविषयी संक्षिप्त माहिती दिली. देशामध्ये वाहन उद्योग,माहिती तंत्रज्ञान उद्योगामध्ये राज्य देशात अग्रेसर असल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्र विधानमंडळाची रचना,सभागृहे,कामकाज पद्धती,केंद्र-राज्य संबंध,राज्य शासनाच्या प्रशासनाची रचना,कररचना आदींविषयी माहिती श्री. कुंटे आणि श्री. भागवत यांनी दिली.‘ईझ ऑफ डुईंग बिझनेस’मध्ये राज्य चांगल्या प्रकारे काम करत आहे. न्यूझीलंडबरोबरचे संबंध अधिक दृढ होण्यासह,विविध क्षेत्रात परस्पर सहकार्य वाढविण्यासाठी या भेटीमुळे मदत होईल,अशी आशा श्री. कुंटे यांनी यावेळी व्यक्‍त केली.

न्यूझीलंड उद्योग,डेअरी क्षेत्रात अग्रेसर असून दर्जेदार उच्चशिक्षणासाठी प्रसिद्ध असल्याचे न्यूझीलंडच्या खासदारांनी सांगितले. त्यांनी तेथील संसदीय व्यवस्थेची,प्रशासनाची माहिती देऊन न्यूझीलंडला भेट द्यावी,असे सांगितले. या भेटीदरम्यान श्री. कुंटे आणि न्यूझीलंडच्या खासदारांनी परस्परांना स्मृतिचिन्ह दिले.

००००

सचिन गाढवे/वि.सं.अ./दि.21.11.2019

महापरिनिर्वाण दिनानिमित्त सुविधा पुरविण्यासाठी यंत्रणांनी समन्वय साधण्याचे अपर मुख्य सचिव संजय कुमार यांचे निर्देश

मुंबई,दि.21 :  महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त6डिसेंबर रोजी चैत्यभूमी व शिवाजी पार्क येथे पुरविण्यात येणाऱ्या सेवा सुविधांचा आज गृह विभागाचे अपर मुख्य सचिव संजय कुमार यांनी मंत्रालयात झालेल्या बैठकीत आढावा घेतला. या काळात अनुयायांना शांततेत चैत्यभूमीला भेट देऊन अभिवादन करता यावे,यासाठी सर्व विभागांनी समन्वय ठेवण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

चैत्यभूमी व शिवाजी पार्क येथे राज्य शासनाबरोबरच महानगरपालिका,बेस्ट,रेल्वे प्रशासन,एसटी महामंडळ आदींनी विविध सुविधा पुरविल्या आहेत. अनुयायांच्या सुरक्षेसाठी समुद्रात जास्तीचे जीवरक्षक तैनात करणे,बोटी तयार ठेवणे,महानगरपालिकेच्या वतीने काढण्यात आलेल्या कॉफी टेबल बुकची ना नफा ना तोटा तत्वावर विक्री करणे,शिवाजी पार्कवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या (बार्टी)वतीने पुरविण्यात येणाऱ्या भोजन सेवेची व्याप्ती वाढविणे आदींसंदर्भात श्री. संजय कुमार यांनी निर्देश दिले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त येणाऱ्या अनुयायांना चांगल्या सेवा देण्यात याव्यात. कोणताही अनुचित प्रकार घडू नये,यासाठी सर्वांनी सतर्क राहावे,असेही आवाहन संजय कुमार यांनी यावेळी केले.

महापरिनिर्वाण दिनानिमित्त यंदाही माहिती व जनसंपर्क महासंचालनायाच्या वतीने शिवाजी पार्कवर तसेच दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्यावरील महाराष्ट्र शासन निर्मित चित्रपट प्रदर्शित करण्यात येईल. त्याचबरोबर दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरील‘जय महाराष्ट्र’कार्यक्रम व आकाशवाणीच्या‘दिलखुलास’या कार्यक्रमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा आढावा घेणाऱ्या तज्ज्ञांच्या विशेष मुलाखतीचे प्रसारण करण्यात येईल,असे यावेळी सांगण्यात आले. श्री. कांबळे यांनी सर्व यंत्रणांनी चांगली तयारी केल्याचे सांगितले.

यावेळी विशेष पोलीस महानिरीक्षक रजनीश शेठ,सहपोलीस आयुक्त वीरेश प्रभू,उपायुक्त प्रणय अशोक,रेल्वे सुरक्षा दलाचे विभागीय सुरक्षा आयुक्त के.के. अश्रफ,महापालिकेचे सहायक आयुक्त किरण दिघावकर,डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचे सरचिटणीस नागसेन कांबळे,उपाध्यक्ष महेंद्र साळवे,रवी गरुड आदी उपस्थित होते.

००००

उद्योग पुरस्कारासाठी सूक्ष्म व लघु उद्योजकांनी १५ ‍डिसेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई,दि.21: सूक्ष्म व लघु उद्योग घटकांच्या उत्पादनाचा दर्जा उंचावण्यासाठी व स्पर्धात्मक क्षमतावृद्धीसाठी उत्तेजन देण्याच्या हेतूने महाराष्ट्र शासनाच्या उद्योग विभागाकडून दरवर्षी जिल्हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. सन2019या वर्षीच्या या पुरस्कारांसाठी सूक्ष्म व लघु उत्पादक घटकांना विहित नमुन्यामध्ये अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. अर्ज सादर करण्याची अंतिम दिनांक  15‍डिसेंबर2019आहे.

          

मुंबई प्राधिकरण विभागातील मुंबई उपनगरामध्ये उत्पादन करणाऱ्या पात्र उद्योग घटकांना पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी,मुंबई उपनगर यांचे हस्ते सन2019या वर्षासाठी पुरस्कार देण्याचे प्रस्तावित आहे. त्यासाठी अर्ज मागविण्यात येत असून पुरस्कारासाठी पात्र घटकांचे निकष खालीलप्रमाणे आहेत.

1)     अर्जदार उद्योग घटकाने सूक्ष्म अथवा लघु उद्योग उत्पादक घटक उद्योग आधार मेमोरॅण्डम प्राप्त केलेले असावे व घटकाचे उत्पादन तीन वर्षापासून अथवा त्यापूर्वी सुरु झालेले असावे.

2)     आवेदन पत्रामध्ये नमूद असलेल्या उत्पादित बाबींसाठी घटक मागील तीन वर्षे सलग उत्पादनामध्ये असावा.

3)     यापूर्वी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय अथवा जिल्हा पुरस्कारप्राप्त झालेले घटक या पुरस्कारांसाठी पात्र ठरणार नाहीत.

4)   उद्योग घटक बँकेचा थकबाकीदार नसावा.

अर्जाचा नमुना व इतर माहितीसाठी कृपया खालील पत्त्यावर संपर्क साधावा –

            उद्योग सह संचालक (मुंप्रावि) यांचे कार्यालय,

            विकास सेंटर, 702, 7वा मजला,सी गिडवाणी मार्ग,

            बसंत सिनेमागृहाजवळ,चेंबूर (पूर्व),मुंबई-400 074.

            दूरध्वनी क्र.25208182/25206199

            Email ID : didicmumbai@gmail.com

अर्ज स्वीकारण्याची अंतिम दिनांक15डिसेंबर2019आहे.

‘जलयुक्त शिवार’मधून सांगली जिल्ह्यात ८४ हजार हेक्टरहून अधिक क्षेत्र संरक्षित सिंचनाखाली (विशेष वृत्त)

 

सांगली, दि.२१: सतत पडणाऱ्या दुष्काळावर मात करण्यासाठी व शाश्वत पाणीसाठा निर्माण करण्यासाठी जलयुक्त शिवार अभियान योजनेंतर्गत सन २०१५ ते २०१९ या कालावधीत २७६ कोटी ९० लाख रूपये खर्चून जिल्ह्यात ५२४ गावात १९ हजार ५७३ कामे करण्यात आली.  या कामातून सुमारे १ लाख ६९ हजार १६१ टीसीएम इतकी पाणीसाठवण क्षमता निर्माण झाली असून ८४ हजार ६०० हेक्टर क्षेत्र संरक्षित सिंचनाखाली येण्यास मदत झाली आहे. तर यावर्षी या सर्व कामांमधून प्रत्यक्ष पाणीसाठा सुमारे १ लाख २६ हजार ८७१ टीसीएम झाला आहे.

जलयुक्त शिवार योजनेंतर्गत सन २०१५-१६ मध्ये एकूण १४१ गावांची निवड करण्यात आली. या गावामध्ये १०२ कोटी ९ लाख रूपये खर्चून ४ हजार ६४८ कामे करण्यात आली. सन २०१६-१७ मध्ये एकूण १४० गावांची निवड करण्यात आली. या गावामध्ये ९३ कोटी ८४ लाख रूपये खर्चून ४ हजार ३२१ कामे करण्यात आली. सन २०१७-१८ मध्ये एकूण १४० गावांची निवड करण्यात आली. या गावामध्ये ६१ कोटी ९३ लाख रूपये खर्चून ७ हजार ९४६ कामे करण्यात आली. सन २०१८-१९ मध्ये एकूण १०३ गावांची निवड करण्यात आली. या गावामध्ये १९ कोटी ४ लाख रूपये खर्चून २ हजार ६५८ कामे करण्यात आली असून ३९ कामे प्रगतीपथावर आहेत. ही कामे ३१ डिसेंबर २०१९ पूर्वी पूर्ण करण्यात येणार आहेत.

जलयुक्त शिवार अभियान योजनेंतर्गत सन २०१५-१६ मध्ये एकूण १४१ गावांमध्ये केलेल्या ४ हजार ६४८ कामांमुळे ५५ हजार २२० टीसीएम इतकी पाणीसाठवण क्षमता निर्माण होऊन २७ हजार ६१० हेक्टर क्षेत्र संरक्षित सिंचनाखाली येण्यास मदत झाली. सन २०१६-१७ मध्ये एकूण १४० गावामध्ये केलेल्या ४ हजार ३२१ कामांमुळे ५४ हजार ४४८ टीसीएम इतकी पाणीसाठवण क्षमता निर्माण होऊन २७ हजार २४४ हेक्टर क्षेत्र संरक्षित सिंचनाखाली येण्यास मदत झाली. सन २०१७-१८ मध्ये एकूण १४० गावामध्ये केलेल्या ७ हजार ९४६ कामांमुळे ४५ हजार ९२८ टीसीएम इतकी पाणीसाठवण क्षमता निर्माण होऊन २२ हजार ९६४ हेक्टर क्षेत्र संरक्षित सिंचनाखाली येण्यास मदत झाली. सन २०१८-१९ मध्ये एकूण १०३ गावामध्ये केलेल्या २ हजार ६४८ कामांमुळे १३ हजार ५६५ टीसीएम इतकी पाणीसाठवण क्षमता निर्माण होऊन ६ हजार ७८२ हेक्टर क्षेत्र संरक्षित सिंचनाखाली येण्यास मदत झाली आहे. सांगली जिल्ह्यात एकूण ५२४ गावात १९ हजार ५७३ कामे करण्यात आली.  या कामातून सुमारे १ लाख ६९ हजार १६१ टीसीएम इतकी पाणीसाठवण क्षमता निर्माण झाली असून ८४ हजार ६०० हेक्टर क्षेत्र संरक्षित सिंचनाखाली येण्यास मदत झाली आहे. अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी कार्यालयाकडून उपलब्ध करून देण्यात आली आहे.

हक्कांसाठी ग्राहक सजग झाल्यास फसवणूक टळेल – अरुण देशपांडे

जागो ग्राहक जागोमोहिमेअंतर्गत एकदिवसीय प्रशिक्षण

मुंबई, दि. 20 : ग्राहक जागृत झाल्यास ग्राहक संरक्षणाचे अनेक प्रश्न आपोआप सुटतात. ग्राहकाच्या सजगतेमुळे वस्तू किंवा सेवा खरेदीप्रसंगी फसवणूक होण्याची शक्यता कमी होण्यासह न्यायालयापर्यंत जाण्याची आवश्यकता भासणार नाही, असे मत राज्य ग्राहक कल्याण सल्लागार समितीचे अध्यक्ष अरुण देशपांडे यांनी आज व्यक्त केले.

जागो ग्राहक जागोमोहिमेअंतर्गत नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा, मुंबई कार्यालयामार्फत अशासकीय सदस्य आणि अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी एकदिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा कैलास पगारे, कन्झ्युमर गाइडन्स सोसायटी ऑफ इंडियाचे अध्यक्ष डॉ. सीताराम दीक्षित, परिमंडळाचे उपनियंत्रक शिधावाटप प्रशांत काळे आदी यावेळी उपस्थित होते.

ग्राहक आपल्या हक्कासाठी जागृत झाल्यास ग्राहक संरक्षणाशी निगडित अनेक प्रश्न आपोआप सुटतात, असे सांगून श्री. देशपांडे म्हणाले, शासनाने ग्राहक हिताचे अनेक कायदे केले आहेत. या कायद्यांविषयक तसेच वस्तू किंवा सेवेची खरेदी करताना घ्यावयाच्या काळजीबाबत प्रत्येकाने जाणून घेणे गरजेचे आहे. त्यामुळे फसवणूक टाळता येणे शक्य आहे. यातूनही फसवणूक झाल्यास न्यायालयातून न्याय निश्चितच मिळू शकतो. ग्राहक कल्याण सल्लागार समितीच्या अशासकीय सदस्यांनी आपल्या परिमंडळातील किमान 10 शाळांमध्ये जाऊन ग्राहक जागृतीपर व्याख्यान, प्रशिक्षण द्यावे, असे आवाहनही श्री. देशपांडे यांनी यावेळी केले.

श्री. पगारे यावेळी म्हणाले, ग्राहक नेहमी चोखंदळ असावा, तो जागृत असावा या दृष्टीकोनातून यावर्षीपासून जागो ग्राहक जागोमोहीम सुरु करण्यात आली आहे. ग्राहक संरक्षण कायद्यातील सहा अधिकारांची माहिती ग्राहकाला असल्यास आपली फसवणूक टाळणे शक्य आहे.

या कार्यक्रमात डॉ. सीताराम दीक्षित यांनी ग्राहक संरक्षण कायदा, 2019 मधील विविध तरतुदींची माहिती दिली. ग्राहकाची व्याख्या, ग्राहक संरक्षण कायद्याच्या कक्षेत येणाऱ्या वस्तू व सेवा, ग्राहकांचे सहा अधिकार, वस्तू व सेवांविषयी फसव्या जाहिराती, ग्राहकाच्या फसवणुकीचे प्रकार, भेसळ आदींविषयी माहिती देऊन फसवणूक झाल्यास कुठे तक्रार करायची याबाबत माहिती यावेळी दिली.

प्रशिक्षणास अशासकीय सदस्य तसेच नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

००००

सचिन गाढवे/वि.सं.अ./दि.20.11.2019

प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेच्या उद्दिष्टपूर्तीसाठी संकल्प करण्याचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे आवाहन

मुंबई, दि. 20 : प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेच्या उद्दिष्टपूर्तीसाठी राज्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उत्कृष्ट काम केले आहे. यापुढील तीन वर्षात 7 लाख घरांचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संकल्प करावा, असे आवाहन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज येथे केले.

आवास दिनानिमित्त मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमात श्री.कोश्यारी बोलत होते. प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) व राज्य घरकुल योजनेमध्ये उत्कृष्ट कार्य केलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा ग्राम विकास विभागाच्या राज्य व्यवस्थापन कक्षामार्फत गौरव करण्यात आला. यावेळी मुख्य सचिव अजोय मेहता, आदिवासी विकास विभागाचे प्रधान सचिव मनिषा वर्मा, सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे, राज्य व्यवस्थापन कक्षाचे संचालक धनंजय माळी आदी यावेळी उपस्थित होते.

राज्यपाल श्री. कोश्यारी म्हणाले, देशातील गरीब, मजूर यांच्यासाठी गेल्या पाच वर्षात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अनेक योजना राबविल्या. ज्यांच्याकडे बँक खाते नाही, अशा देशभरातील सुमारे 30 कोटीहून अधिक नागरिकांचे बँकेत खाते उघडून दिले. प्रत्येक घरात शौचालय पोहोचविण्याचे काम या काळात झाले. त्यामुळे ग्रामीण महाराष्ट्र हागणदारीमुक्त झाला आहे. त्याचबरोबर प्रत्येक घरात वीज व विद्युत दिवे पोहोचविण्याचे कामही मोठ्या प्रमाणावर झाले आहे. वीज पोहोचू न शकणाऱ्या दुर्गम भागातही सौरऊर्जेद्वारे घरांमध्ये प्रकाश निर्माण करण्याचे काम केंद्र शासनाने केले आहे. या सर्व योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी व गटविकास अधिकारी यांनी प्रयत्न केले.

प्रत्येक घरात शौचालय योजनेप्रमाणेच सन 2024 पर्यंत प्रत्येक घरात नळाद्वारे पिण्याचे स्वच्छ पाणी पुरविण्याची योजना शासन सुरू करणार आहे. ही योजना नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करावे, असे आवाहन श्री. कोश्यारी यांनी यावेळी केले.

          

राज्यपाल श्री. कोश्यारी म्हणाले, राज्यात गेल्या तीन वर्षात 4.50 लाख घरे बांधण्याचे उद्दिष्ट होते. त्यापैकी 3.66 लाख घरे बांधण्यात आली असून आदिवासी विभागामार्फतही विविध योजनेतून मोठ्या प्रमाणात घरांची निर्मिती झाली आहे.

मुख्य सचिव श्री. मेहता म्हणाले, ज्यांच्याकडे राहण्यासाठी घर नाही, त्यांनाच घराचे महत्त्व कळते. मुंबईमध्ये घरांची निर्मिती हे मोठे आव्हान आहे. घर हे विकासाचे केंद्रबिंदू असते. घरामुळे स्वच्छता वाढते, कुटुंबांचे आरोग्य सुधारते व त्या कुटुंबातील शैक्षणिक दर्जाही सुधारतो. त्याचबरोबर स्वतःच्या घरामुळे स्थलांतराचे प्रमाण कमी होते. घर निर्मिती क्षेत्रामुळे रोजगार संधीही वाढतात. त्यामुळे घरांच्या निर्मितीसाठी प्रत्येकाने प्रयत्न करावेत. घर निर्मितीसाठी जमिनीची उपलब्धता करून देण्यासाठी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच घरांच्या बांधकामासाठी वित्त पुरविण्यासाठी बँकांनाही सांगण्यात आले आहे.

संचालक श्री. माळी यांनी प्रास्ताविकात सांगितले की, राज्य व्यवस्थापन कक्षाच्या वतीने ग्रामीण भागात घरांच्या निर्मितीसाठी मोठ्या वेगाने कामे सुरू आहेत. जमिनी नसलेल्या लाभार्थ्यांना जमिनी देण्यासाठीही पंडित दिनदयाळ उपाध्याय योजनेतून मदत करण्यात येत आहे. तसेच शासकीय जमिनींवरील अतिक्रमण नियमित करण्याची प्रक्रिया सुरू आहे. केंद्र शासनाच्या आवास प्लस योजनेनुसार केलेल्या सर्व्हेनंतर आणखी 57 लाख अर्ज प्राप्त झाले आहेत.

प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेच्या उद्दिष्टपूर्तीसाठी उत्कृष्ट कार्य केलेल्या जिल्ह्यातील मुख्य कार्यकारी अधिकारी, प्रकल्प अधिकारी, गट विकास अधिकारी, सरपंच, लाभार्थी यांचा राज्यपाल यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. राज्य व्यवस्थापन कक्षातील उपव्यवस्थापक मंजिरी टकले यांचा व त्यांच्या सहकाऱ्यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.

००००

नंदकुमार वाघमारे/विसंअ/20.11.2019

मुख्यमंत्री सहायता निधीमधून वैद्यकीय मदतीसाठी व्यवस्था कार्यरत; शासन निर्णय निर्गमित

मुंबई, दि. २० : मुख्यमंत्री सहायता निधीमधून वैद्यकीय मदतीसाठी तात्पुरती व्यवस्था करण्यात आली आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील गरजू रुग्णांना मदतीपासून वंचित रहावे लागू नये यासाठी ही व्यवस्था सुरु करण्यात आली आहे. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू असेपर्यंत गरजू रुग्णांना त्यांच्या उपचार व शस्त्रक्रियेकरिता आर्थिक सहाय्य देण्याबाबत ही यंत्रणा कार्य करेल. यासंदर्भातील शासन निर्णय आज निर्गमित करण्यात आला.

सध्या मुख्य कार्यकारी अधिकारी, महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना, जीवनदायी भवन, दुसरा मजला, राज्य कामगार विमा योजना रुग्णालय आवार (ESIS Hospital Compound), गणपतराव जाधव मार्ग, वरळी नाका, वरळी, मुंबई ४०००१८, दुरध्वनी ०२२-२४९९९२०३/०४/०५ याठिकाणी गरजूंनी आपले अर्ज सादर करावेत, असे कळविण्यात आले आहे.

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हे महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत समाविष्ट ५८१ समान उपचार पद्धती वगळून उर्वरित आजारांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीतून अर्थसहाय्य देण्याबाबत अर्जांची छाननी करतील. आवश्यक कागदपत्रे व पात्रता तपासून मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समिती पात्र अर्जांची शिफारस करेल. शिफारसपात्र अर्जानुषंगाने निधी वाटपाबाबतच्या कार्यवाहीसंदर्भात सद्यस्थितीत अस्तित्वात असलेल्या समितीच्या सदस्यांकडून निर्णय घेण्यात येईल, असे शासन निर्णयात म्हटले आहे.

अर्जाची छाननी करण्याची कार्यवाही करण्याकरिता लागणारा अनुभवी, आवश्यक अधिकारी, कर्मचारीवृंद त्वरित उपलब्ध करुन देण्याची कार्यवाही अपर मुख्य सचिव (सेवा) यांनी करावी, असेही शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे. या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मदतीने मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी अर्जांची स्वीकृती, छाननी इत्यादी कार्यवाही करावी, असेही निर्देशित करण्यात आले आहे.

दरम्यान, काल निर्गमित करण्यात आलेल्या दुसऱ्या एका आदेशान्वये या यंत्रणेसाठी मंत्रालयीन संवर्गातील ४ अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या सेवा देण्यात आल्या आहेत.  एक उपसचिव, एक कक्ष अधिकारी, एक सहायक कक्ष अधिकारी व एक लिपीक टंकलेखक यांच्या सेवा या कामासाठी उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. इतर अनुभवी, आवश्यक अधिकारी, कर्मचारीवृंद त्वरित उपलब्ध करुन देण्याची कार्यवाही अपर मुख्य सचिव (सेवा) यांनी करावी, असे आज निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयात आदेशित करण्यात आले आहे.

०००००

इर्शाद बागवान / विसंअ / दि. २० नोव्हेंबर २०१९

माजी प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात अभिवादन

मुंबई, दि. 19 : माजी प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त आज मंत्रालयात अपर मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी स्व. इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी वन विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, सामान्य प्रशासन विभागाच्या सचिव अंशू सिन्हा, मुख्य सचिव कार्यालयाचे  सहसचिव राजेश निवतकर, उपसचिव ज. जी. वळवी यांनी देखील माजी प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेस गुलाब पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

राष्ट्रीय एकात्मता दिवस म्हणून यावेळी, देशाचे स्वातंत्र्य आणि राष्ट्रीय एकात्मता अबाधित राखण्यासाठी व दृढ करण्यासाठी निष्ठापूर्वक काम करण्याची व कधीही हिंसाचार अवलंबणार नाही. तसेच सर्व धार्मिक, भाषिक किंवा प्रादेशिक मतभेद व तंटे किंवा इतर राजकीय वा आर्थिक गाऱ्हाणी शांततामय आणि संविधानिक मार्गाने सोडविण्याचा प्रयत्न चालू ठेवीन अशी शपथ घेण्यात आली. यावेळी मंत्रालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. ०००००

पूर्व प्रधानमंत्री इंदिरा गांधी की जयंती पर

मंत्रालय में अभिवादन

मुंबई, दि. 19 : पूर्व प्रधानमंत्री इंदिरा गांधी की जयंती के अवसर पर, अतिरिक्त मुख्य सचिव सीताराम कुंटे ने आज मंत्रालय में स्वर्गीय इंदिरा गांधी की प्रतिमा को पुष्पांजलि अर्पित कर अभिवादन किया।

इस अवसर पर, वन विभाग के प्रधान सचिव, विकास खारगे, सामान्य प्रशासन विभाग के सचिव, अंशु सिन्हा, मुख्य सचिव कार्यालय के सहायक सचिव, राजेश  निवतकर , उप सचिव ज.  वळवी  ने पूर्व प्रधानमंत्री इंदिरा गांधी की प्रतिमा को गुलाब का गुलदस्ता अर्पण कर अभिवादन किया।

इस दौरान राष्ट्रीय एकता दिवस के रूप में, देश की स्वतंत्रता और राष्ट्रीय एकता को बनाए रखने और मजबूत करने के लिए  निष्ठापूर्वक  कार्य करने व कभी भी हिंसा को बर्दाश्त नहीं किया जाएगा। इसी प्रकार सभी धार्मिक, भाषाई या क्षेत्रीय मतभेद और विवादों या अन्य राजनीतिक या आर्थिक मुद्दों को शांतिपूर्ण और संवैधानिक तरीके से सुलझाने के प्रयासों को जारी रखने की शपथ ली गई। इस दौरान मंत्रालय के अधिकारी और कर्मचारी बड़ी संख्या में उपस्थित थे।

००००

 

Tribute paid in Mantralaya on the birth anniversary of

former Prime Minister Indira Gandhi

Mumbai, date. 19: Upper Chief Secretary Sitaram Kute offered a garland to the photo of former Prime Minister Indira Gandhi and paid tribute on her birth anniversary.

Principal Secretary of Forest Department Vikas Kharge, Secretary of General Administration Department Anshu Sinha, Assistant Secretary of Chief Secretary Office Rajesh Nivatkar, Deputy Secretary J. G. Valvi also paid their tributes to former Prime Minister Indira Gandhi by offering rose flower to the photo.

On the National Unity Day, oath was taken preserve freedom of the country and national unity, to work to strengthen it, not to do violence, to solve all religious, lingual or regional and other political or economic disputes by the peaceful and constitutional way. Office-bearers and employees of Mantralaya were present in a large number on the occasion.

0000

‘दिलखुलास’ कार्यक्रमात खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या प्रधान सचिव डॉ. निलीमा केरकट्टा यांची मुलाखत

मुंबई, दि. 19 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलासकार्यक्रमात खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या प्रधान सचिव तथा मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. निलीमा केरकट्टा यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून बुधवार दि. 20 आणि गुरुवार दि. 21 नोव्हेंबर रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होईल. निवेदिका रेश्मा बोडके यांनी ही मुलाखत घेतली आहे.

महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाची स्थापना व उद्देश, रोजगार निर्मितीसाठी मंडळाच्या विविध योजना व उपक्रम, उत्पादनांना बाजारपेठ मिळावी म्हणून दिले जाणारे प्रोत्साहन, कारागीर हमी योजना,  मधमाशी-प्रजनन, मध उत्पादन योजना,  महाबळेश्वर येथे ऑर्गेनिक हनी प्रोजेक्टची अंमलबजावणी,  हँड मेड पेपर इन्स्टिट्यूट मार्फत घेतले जाणारे उत्पादन, आदी विषयांची सविस्तर माहिती डॉ. केरकट्टा यांनी दिलखुलासया कार्यक्रमातून दिली आहे.

ताज्या बातम्या

८.२६ टक्के महाराष्ट्र राज्य विकास कर्ज, २०२५ ची परतफेड

0
मुंबई, दि.११ : महाराष्ट्र शासनाने पूर्वी खुल्या बाजारातून उभारलेल्या ८.२६ टक्के महाराष्ट्र राज्य विकास कर्ज, २०२५ अदत्त शिल्लक रकमेची  ११ ऑगस्ट, २०२५ पर्यंत देय...

प्राथमिक तपासणी करून मतदान यंत्र सज्ज ठेवावीत – राज्य निवडणूक आयुक्त

0
मुंबई, दि. 11 : महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांसाठी आवश्यक ती सर्व प्रकारची पूर्वतयारी करून इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांची प्राथमिक तपासणी करण्यात यावी व ती मतदानासाठी सज्ज...

दिल्लीचे अन्न व नागरी मंत्री मनजिंदर सिंह सिरसा यांनी घेतली अन्न व नागरी पुरवठा...

0
मुंबई, दि. ११ : राष्ट्रीय राजधानी क्षेत्र दिल्लीचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री मनजिंदर सिंह सिरसा यांनी विधानभवनात राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री...

जलसंधारणात लोकसहभाग महत्त्वाचा – मंत्री संजय राठोड

0
दुष्काळमुक्त महाराष्ट्रासाठी धोरणात्मक सहकार्याच्या दिशेने ठाम पाऊल मुंबई, दि. ११ : राज्यातील मृद व जलसंधारण विभागाच्या विविध योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी तसेच धोरणात्मक सहकार्याच्या उद्देशाने विधानपरिषद...

चीनमधून होणारी बेदाण्यांची बेकायदा आयात थांबवण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची केंद्र सरकारकडे पत्राद्वारे मागणी

0
मुंबई, दि. 11 : चीनमधून कर चुकवून निकृष्ट बेदाण्यांची मोठ्या प्रमाणावर आयात होत असून यामुळे द्राक्षउत्पादक शेतकऱ्यांचे आणि राष्ट्रीय महसुलाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत...