बुधवार, जुलै 9, 2025
Home Blog Page 192

म्हसळा तालुक्यातील सरवर येथे युनानी महाविद्यालय उभारण्यात यावे – वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

मुंबई, दि. १६ : रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यातील सावर  येथे युनानी महाविद्यालय उभारण्यास मान्यता देण्यात आली होती. परंतु या जागेत क्रीडा संकुल इमारतीचे बांधकाम झाले असल्याने ही जागा  महाविद्यालय उभारणीसाठी पुरेशी नाही. त्यामुळे सरवर येथे महाविद्यालय उभारण्यात यावे, अशा सूचना वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिल्या.

मंत्रालयात युनानी वैद्यकीय महाविद्यालय, म्हसळा जि. रायगड येथील अडचणीबाबत आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे, खासदार सुनील तटकरे, वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे संचालक अजय चंदनवाले, आयुष संचालनालयाचे संचालक रमण घोंगळारकर उपस्थित होते.

वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, तात्पुरत्या स्वरूपात शासकीय रिकाम्या इमारतीत किंवा भाडेतत्त्वावरील जागेत महाविद्यालय सुरु करण्यात यावे. तसेच वैद्यकीय महाविद्यालयासाठी आवश्यक प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावी.

सरवर येथील जागा महसूल विभागाने सुचविली असून त्यास  महिला व बाल विकास  मंत्री आदिती तटकरे यांनी सहमती दर्शविली.

000

मोहिनी राणे/स.सं

माजलगावमधील वीज, रस्ते,आरोग्य विषयीचे समस्या गांभीर्याने घ्या – राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

मुंबई, दि. १६ : माजलगाव व माजलगाव विधानसभा मतदारसंघातील वीज, रस्ते आणि आरोग्य विषयीच्या समस्या गांभीर्याने घेऊन तातडीने उपाययोजना करण्यात याव्यात अशा सूचना सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण पाणीपुरवठा स्वच्छता, ऊर्जा, महिला व बालविकास सार्वजनिक बांधकाम विभागाच्या राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी दिल्या.

महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ होल्डिंग कंपनीच्या मुख्य कार्यालयात माजलगाव विधानसभा मतदारसंघातील विविध समस्यांबाबत आयोजित बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे सदस्य प्रकाश सोळंके, महावितरणचे संचालक अरविंद भादीकर, महावितरणचे प्रकल्प संचालक प्रसाद रेशमे, एम एस आर डी सीचे कार्यकारी अभियंता सुनिता वनवे, अधीक्षक अभियंता सतीश साबणे, उपअभियंता अतुल कोटेच्या उपस्थित होते.

राज्यमंत्री श्रीमती साकोरे-बोर्डीकर म्हणाल्या, माजलगाव परिसरात  ग्राहकांना दर्जेदार आणि अखंडित वीज पुरवठा मिळावा यासाठी ट्रान्सफॉर्मरची क्षमता वाढवणे, नवीन उपकेंद्रांची उभारणी, जीर्ण झालेल्या वीजवाहिन्यांची पुनर्बांधणी करणे. आदी कामे समाधानकारक असून उर्वरित कामे गतीने पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

माजलगाव मतदारसंघातील प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे व ग्रामीण रुग्णालयातील सुविधा, औषध साठा, डॉक्टर व इतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांची उपस्थिती याबाबत चर्चा करण्यात आली.

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत माजलगाव ते कैज (जि. बीड) आणि माजलगाव ते परतुर (जि. जालना) या मार्गांवर राष्ट्रीय महामार्ग ५४८ (C) अंतर्गत राबवण्यात येणाऱ्या रस्ते विकास प्रकल्पाची सविस्तर माहिती सादर करण्यात आली.

राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी सर्व विभागांनी समन्वय साधत कामांची गुणवत्ता राखून नियोजित वेळेत विकासकामे पूर्ण करावीत असे निर्देश दिले.

०००

राजू धोत्रे/विसंअ

ग्रामीण व औद्योगिक क्षेत्रात अखंड वीजपुरवठ्यासाठीचे अडथळे दूर करा – राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

मुंबई, दि. १६ : राज्यातील ग्रामीण भागात उद्योग व व्यवसायांना अखंड वीज मिळण्यासाठी अडथळे निर्माण होणार नाहीत, यासाठी आवश्यक त्या उपाययोजना तातडीने कराव्यात. तसेच ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण तातडीने करावे, असे निर्देश उर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी दिले.

महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ होल्डिंग कंपनीच्या मुख्य कार्यालयात विविध सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींनी ऊर्जा विभागाशी संबंधित समस्यांविषयी आयोजित आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी महावितरणचे संचालक अरविंद भादीकर, महावितरणचे प्रकल्प संचालक प्रसाद रेशमे, लघु उद्योग भारती, भारतीय किसान संघ, भारतीय मजदूर संघ आणि अखिल भारतीय ग्राहक पंचायत या प्रमुख सामाजिक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

राज्यमंत्री श्रीमती साकोरे-बोर्डीकर यांनी सर्व प्रतिनिधींच्या समस्या गांभीर्याने ऐकून घेतल्या. जे तातडीने सोडवता येतील असे प्रश्न तत्काळ मार्गी लावा. नियमित देखभाल आणि दुरुस्तीची कामे वेळेवर पार पाडावीत, असे स्पष्ट निर्देश त्यांनी यावेळी दिले.

००००००

राजू धोत्रे/विसंअ

कुकडी प्रकल्पांतर्गत वडज उपसा सिंचन योजनेच्या कामाला गती द्यावी – जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील

मुंबई,दि. 16 :- कुकडी प्रकल्पांतर्गत वडज उपसा सिंचन योजनेच्या कामाला  सुधारित प्रशासकीय मान्यता घेऊन या कामास  गती द्यावी.  30 जून पर्यंत या कामाची निविदा निघेल अशा पद्धतीने कामाचे नियोजन करावे, अशा सूचना जलसंपदा (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिल्या.

जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जुन्नर तालुक्यातील पिंपळगाव जोगे, कुकडी, वडज, माणिकडोह धरणांच्या प्रलंबित कामांबाबत मंत्रालयात बैठक झाली. यावेळी आमदार शरददादा सोनवणे, जलसंपदा विभागाचे सचिव संजय बेलसरे, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले, मुख्य अभियंता हणमंत गुणाले, अ. ह. धुमाळ यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

पिंपळगाव जोगे कालवा 1 ते 47 मधील अस्तरीकरण, दुरुस्ती व गळती प्रतिबंधक उपाय योजना करुन हे काम  प्राधान्याने सुरु करावे. माणिकडोह जलाशय बुडित बंधाऱ्याचे काम सुरु करण्याबाबत प्रकल्प आराखडा तयार  करावा. तसेच मीना पुरक कालावा व मीना शाखा कालवा विशेष दुरुस्तीसाठी आराखडा तयार करुन त्यानुसार कार्यवाही करावी, अशा सूचना जलसंपदा मंत्री विखे-पाटील यांनी दिल्या.  बैठकीत जुन्नर तालुक्यातील कुकडी  प्रकल्प व इतर धरणातील गाळ काढणेबाबतही  चर्चा करण्यात आली.

00000

एकनाथ पोवार/विसंअ

कोल्हापूर महानगरपालिकेडील पाणीपट्टी थकित रकमेच्या सूट संदर्भात सकारात्मक – मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील

मुंबई,दि. १६ :-  कोल्हापूर महानगरपालिकेकडे थकित असलेल्या पाणीपट्टीच्या एकूण रक्कमेपैकी 10 कोटींची रक्कम दोन टप्प्यात तातडीने भरावी. ही रक्कम भरल्यानंतर उर्वरित थकित रक्कमेत सूट देण्यासंदर्भात सकारात्मक विचार केला जाईल, असे जलसंपदा (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.

कोल्हापूर महानगरपालिकेच्या थकीत पाणीपट्टीसंदर्भात मंत्रालयात जलसंपदा मंत्री श्री. विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. बैठकीस आमदार अमल महाडिक, आमदार शरददादा सोनावणे,  जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, सचिव संजय बेलसरे, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले, मुख्य अभियंता हणमंत गुणाले, अ. ह. धुमाळ यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. तर कोल्हापूर महानगरपालिकेच्या आयुक्त के. मंजुलक्ष्मी दूरदृश्यप्रणालीद्वारे बैठकीस सहभागी झाल्या होत्या.

मंत्री श्री. विखे पाटील म्हणाले, कोल्हापूर महानगरपालिकेकडे पाणीपट्टी पोटी सुमारे 62 कोटींची रक्कम थकित आहे. यापैकी आतापर्यंत 8 कोटी महापालिकेने भरले आहेत. उर्वरित रक्कमेतील 10 कोटींची रक्कम दोन हप्प्यात भरावी. त्यानंतर यासंदर्भात महापालिका व जलसंपदा विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बैठक घेऊन उर्वरित रक्कमेसंदर्भात मार्ग काढावा. उर्वरीत थकित पाणीपट्टींमध्ये सवलत देण्यासंदर्भात सकारात्मक विचार केला जाईल.

महानगरपालिकेने यावर्षी 8 कोटी पाणी पट्टी भरली असल्याबाबतची माहिती महानगरपालिका आयुक्त के. मंजुलक्ष्मी यांनी यावेळी दिली. सन 2025 ते 2031 पर्यंत पाणी उपलब्ध होण्यासंदर्भात महानगरपालिकेने पाणी  करार केला आहे. तसेच यावर्षीपासून प्रतिमहा पाणीपट्टी भरण्याचे नियोजन केले असल्याचे त्यांनी सांगितले.

00000

एकनाथ पोवार/विसंअ

माढा लोकसभा मतदारसंघातील जलसिंचन प्रकल्प व पाणी प्रश्नाबाबत जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्र

मुंबई,दि. 16 :-  माढा लोकसभा मतदारसंघातील जलसिंचन प्रकल्प व पाणी प्रश्नाबाबत जलसंपदा (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महाकंडळ) मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक संपन्र झाली. यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, सचिव संजय बेलसरे, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले, मुख्य अभियंता हणमंत गुणाले, अ. ह. धुमाळ यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

माढा लोकसभा मतदारसंघातील तळीये, विखळे, जाधववाडी, फडतरवाडी, दानेवाडी, वाठार स्टेशन, तडवळे, पिंपोडे बु., दहिगांव, धिगेवाडी, सोळशी, नायगाव, मोरर्वेद, रणदुल्लाबाद या उत्तर कोरेगांव, आसणगांव, राउतवाडी, अनपटवाडी, वाघोली, सर्कलवाडी, चौधरवाडी, करंजखोप, सोनके, नांदवळ या गावाना पाण्याचा लाभ मिळण्यासाठी उपाय योजनांवर चर्चा करण्यात आली. निरा देवघरच्या लाभक्षेत्रा पासून वंचित असणाऱ्या माळशिरस तालुक्यातील नीरा देवघर प्रकल्पाच्या पाण्याच्या लाभापासून वंचीत असणाऱ्या गावांना पाणी देण्याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. तसेच सोळशी धरण ता. महाबळेश्वर येथील धरण बांधकाम व नीरा देवघर कालव्यातून धोम बलकवडी कालव्यामध्ये सोडण्यात येणाऱ्या पाण्याच्या उपसासिंचनाचे नियोजन करण्याबाबतही यावेळी बैठकीत चर्चा करण्यात आली.

00000

एकनाथ पोवार/विसंअ

कोयना धरणाच्या जलाशयाचे नाव बदलण्याचा प्रस्ताव सादर करा -जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील

मुंबई,दि. १६ :- कोयना धरणाच्या जलाशयाचे नाव छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर करण्याबाबत, कोयना धरण परिसर सुशोभिकरण, जलाशय परिसरात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारणे याबाबतचा सर्वसमावेशक प्रस्ताव शासनास सादर करावा, अशा सूचना जलसंपदा (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महाकंडळ) मंत्री  राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिल्या.

कोयना प्रकल्प विभागाच्या स्थानिक प्रश्नांबाबत उपाययोजना करण्यासंदर्भात जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली. यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, ग्राम विकास मंत्री जयकुमार गोरे,  जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, सचिव संजय बेलसरे, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले, मुख्य अभियंता हणमंत गुणाले, अ. ह. धुमाळ यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

मंत्री श्री. विखे पाटील म्हणाले,  छत्रपती शिवाजी महाराज हे आपले दैवत आहे.  कोयना धरण हे महत्त्वाचे धरण असल्याने या धारणाच्या जलाशयाला छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर असे नाव दिल्यास राज्यातील प्रत्येक नागरिकास याचा अभिमान वाटेल, त्यामुळे याबाबतचा प्रस्ताव तातडीने सादर करावा. तसेच हुंबरळी पाझर तलावासाठी आवश्यक निधी उपलब्ध करुन दिला जाईल. या पाझर तलावासाठी सुधारित प्रशासकीय मान्यतोसाठीचा प्रस्ताव  तातडीने सादर करावा. कोयना धरण पायथा (डावा तीर) विद्युत गृहाबाबत योग्य निर्णय घेतला जाईल. कोयना परिसरातील नेताजी सुभाषचंद्र हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालय यांच्या थकीत भाड्याबाबत  संबंधित संस्थेने कार्यकारी मंडळाची बैठक घ्यावी. त्यानंतर याबाबत निर्णय घेतला जाईल. कोयनानगर ता. पाटण येथील व्यापाऱ्यांच्या समस्येबाबतही सकारात्मक विचार केला जाईल.  तसेच पूर नियंत्रणाबाबतही जलसंपदा विभागाने आवश्यक कार्यवाही करावी, अशा सूचना मंत्री श्री.विखे-पाटील यांनी दिल्या.

या बैठकीत उरमोडी धरण प्रकल्पासंदर्भातील विषयांवर चर्चा करण्यात आली.  ज्या पुनर्वसित वसाहतींचे गावठाण अद्यापि तयार नाही त्यांना उदरनिर्वाह भत्ता सुरु ठेवण्यात यावा. तसेच गावठाण तयार करणेबाबतचा निर्णय तातडीने घ्यावा अशा सूचना जलसंपदा मंत्री विखे पाटील यांनी दिल्या.

0000

एकनाथ पोवार/विसंअ

चिकोत्रा समन्यायी पाणी वाटप पथदर्शी प्रकल्पाचा सुधारित प्रस्ताव सादर करावा – जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील

मुंबई,दि. १६ :-  कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यातील झुलपेवाडी येथील चिकोत्रा मध्यम प्रकल्पातून सहा गावांसाठी चिकोत्रा समन्यायी पाणी वाटप पथदर्शी प्रकल्पाचा सुधारित प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना जलसंपदा (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिल्या.

जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, सचिव संजय बेलसरे, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले, मुख्य अभियंता हणमंत गुणाले, अ. ह. धुमाळ आणि समन्यायी पाणी हक्क परिषदेचे सदस्य आदि मान्यवर उपस्थित होते.

मंत्री श्री. विखे-पाटील म्हणाले, चिकोत्रा पथदर्शी प्रकल्पास शासनाची मूळ मान्यता आहे.  यापूर्वी या कामाच्या काढलेल्या निविदा काही कारणास्तव रद्द झाल्याने  या कामासाठी  पुन्हा सुधारित प्रशासकीय मान्यता घेणे आवश्यक  असल्याने याचा प्रस्ताव विभागाने तातडीने शासनास सादर करावा. चिकोत्रा समन्यायी पाणी वाटप पथदर्शी प्रकल्पांतर्गत सहा गावांसाठी जलसंपदा विभागामार्फत पाणी देण्याचे काम केले जाईल. मात्र ड्रीपसाठी येणारा खर्च संबंधित शेतकऱ्यांनी केला पाहिजे. या गावांनी पाणी वापर संस्था स्थापन करुन त्यानुसार पुढील कार्यवाही करावी, असे त्यांनी यावेळी सांगितले.

मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, उपलब्ध होणाऱ्या पाण्याचा प्रभावी वापर झाला पाहिजे यासाठी शेतकऱ्यांनी ड्रीपची योजना करावी. ड्रीपसाठी आवश्यकतेनुसार जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून कर्ज उपलब्ध करुन दिले जाईल.

0000

एकनाथ पोवार/विसंअ

अत्याधुनिक साधनांनी पोलिस दल सक्षम करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

अमरावती, दि. 16 (जिमाका) : पोलिस दलाला परिणामकारक अंमलबजावणीसाठी जिल्हा वार्षिक योजनेतून वाहने देण्यात येत आहे. येत्या काळातही पोलिसांना अत्याधुनिक साधने देऊन सक्षम करण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

कोंडेश्वर येथे अमरावती ग्रामीण पोलिस दलाची कोंडेश्वर येथील निवासस्थान इमारत, प्रशासकीय इमारत, चारचाकी नवीन वाहने, तसेच शहर पोलिसांचे चारचाकी नवीन वाहने, वातानुकूलित वाहतूक कक्ष आणि महिला विसावा कक्षाचे लोकार्पण मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या करण्यात आले.

यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, खासदार डॉ. अनिल बोंडे, आमदार रवी राणा, केवलराम काळे, उमेश उर्फ चंदू यावलकर, प्रताप अडसड, प्रवीण तायडे, प्रवीण पोटे-पाटील, पोलीस महासंचालक (गृहनिर्माण) अर्चना त्यागी, विभागीय आयुक्त श्वेता सिंघल, विशेष पोलीस महानिरीक्षक रामनाथ पोकळे, जिल्हाधिकारी सौरभ कटियार, पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, पोलीस अधीक्षक विशाल आनंद, मनपा आयुक्त सचिन कलंत्रे आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, पोलीसांच्या आधुनिकीकरणासाठी शासन कटिबद्ध आहे. आधुनिक संसाधनांमुळे नागरिकांच्या सुरक्षितेत भर पडणार आहे. त्यासोबतच पोलीसिंग अधिक गतिमान होईल. आधुनिक साधने पोलिसांनाही सहाय्यभूत ठरणार असल्याने त्यांचे जीवनमान उंचावेल. पोलीस दलात अद्ययावत वाहने दाखल होणे सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. तसेच पोलिस गृहनिर्माण महामंडळाच्या माध्यमातून दर्जेदार घरे बांधण्यात येत आहेत. पोलीस विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना हक्काचे घर मिळावे यासाठी डीजी लोन स्कीमही सुरू करण्यात आली आहे.

नागरिकांना सुरक्षितता प्रदान करणाऱ्या पोलीसांनाही उत्तम सुविधा पुरविण्यावर भर देण्यात येत आहे. यातील शहर पोलिस दलाचे वातानुकूलित कक्ष, महिला विसावा कक्ष निश्चितच पोलिसांना मदतीचे ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी शहानूर शासकीय निवासस्थान इमारतीच्या कोनशिलेचे अनावरण करण्यात आले. तसेच 18 चारचाकी वाहनांचे लोकार्पण करण्यात आले. पोलिस कर्मचाऱ्यांना कोंडेश्वर येथील निवासस्थानाची चावी सुपूर्द करण्यात आली.

उद्योग उभारणीसाठी विमानतळ आणि कनेक्टिव्हिटी महत्त्वाची – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

अमरावती, दि. 16 (जिमाका) : जिथे विमानतळ आहे तिथे उद्योग उभे राहतात. यामुळे उद्योग हवे असतील तर विमानतळ आणि कनेक्टिव्हिटी महत्त्वाची आहे. यामुळे अमरावतीसह विदर्भामध्ये विमानतळ निर्मिती व विस्तारीकरणाचे काम सुरु आहे. अमरावती येथील विमानतळाची धावपट्टी यापुढील काळात 3000 मीटर इतकी करण्यात येईल. स्टेट ऑफ आर्ट असलेल्या अमरावती विमानतळ आणि पायलट प्रशिक्षण केंद्रामुळे अमरावतीला विशेष ओळख प्राप्त होणार आहे. येत्या काळात सिंचन, पायाभूत सुविधा यासोबतच सर्वसामान्य नागरिकांसाठी वेगवान प्रवासाच्या सुविधा निर्माण करण्यात येतील. विदर्भातील विकासात्मक कामे पूर्ण करून या भागाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम प्राधान्याने केले जाईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

अमरावती विमानतळाचे उद्घाटन, तसेच प्रवासी विमानसेवेचा शुभारंभ आणि एअर इंडिया पायलट प्रशिक्षण केंद्राच्या उड्डाणाचे प्रात्यक्षिक आज पार पडले. यावेळी केंद्रीय विमान वाहतूक मंत्री किंजरापू राम मोहन नायडू, केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, कामगार मंत्री आकाश फुंडकर, अनुसूचित जाती जमाती आयोगाचे अध्यक्ष आनंदराव अडसूळ, खासदार डॉ. अनिल बोंडे, बळवंत वानखडे, अमर काळे, आमदार संजय खोडके, डॉ. संजय कुटे, रवी राणा, सुलभा खोडके, प्रताप अडसड, केवलराम काळे, राजेश वानखडे, प्रविण तायडे, उमेश यावलकर, गजानन लवटे, नवनीत राणा, परिवहन व बंदरे विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव संजय सेठी, विभागीय आयुक्त श्वेता सिंघल, जिल्हाधिकारी सौरभ कटियार, महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी लिमिटेडच्या उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक स्वाती पांडे आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, राज्याच्या विकासासाठी करण्यात येणाऱ्या करारामध्ये विदर्भाला महत्त्वाचे स्थान दिले आहे. यामुळे विदर्भाचे चित्र बदलले आहेत. समृद्धी महामार्ग जेएनपीटी आणि वाढवण बंदराला जोडण्यात येणार आहे. यासोबतच वैनगंगा-नळगंगा प्रकल्पात विदर्भातील सात जिल्ह्यांचा समावेश राहणार आहे. यातून दहा लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार असून शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीने शेती करता येणे शक्य होणार आहे. प्रकल्पामुळे या भागाचा चेहरामोहरा बदलणार आहे. हा प्रकल्प वेळेत पूर्ण करून विदर्भातील दुष्काळ कायमचा संपविण्यात येणार आहे. सिंचनाने कोरडवाहू शेती बागायती करण्यात येणार आहे. तसेच सहा हजार कोटी रुपये खर्च करून नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचा दुसरा टप्पा राबविण्यात येणार आहे.

विदर्भाच्या दृष्टिकोनातून अमरावती हे महत्त्वाचे स्थान आहे. या ठिकाणी पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर भर देण्यात येत आहे. विमानतळामुळे आर्थिक क्रांती होणार असून या भागाला प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष लाभ होणार आहे. तसेच रोजगाराच्या विविध संधी निर्माण होतील. विमानतळामुळे परिसराला नवी ओळख निर्माण होणार आहे. उद्योजकही विमानतळ असणाऱ्या भागाला प्राधान्य देऊन उद्योग उभारत असल्याने येथील टेक्स्टाईल उद्योगाला चालना मिळेल. या ठिकाणी होऊ घातलेल्या पीएम मित्रा पार्कमुळे दोन लाख रोजगार निर्माण होणार असून कापूस ते कापड आणि पुढे फॅशनमुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना लाभ होणार आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

आज या ठिकाणी विमानाचे पहिले उड्डाण होत असून भविष्यात रात्री विमान उतरण्याची सोय करण्यात येईल. यासोबतच नवी मुंबई विमानतळ सुरू झाल्यानंतर सकाळच्या सत्रातील विमान उड्डाणाची वेळ प्राधान्याने ठरविण्यात येईल. या ठिकाणी दक्षिण आशियामधील सर्वात मोठे पायलट प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात येणार आहे. यात एका वर्षात 180 पायलट तयार होतील. त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी 34 विमाने उपलब्ध असतील. भविष्यात विमानतळाचे विस्तारीकरण करण्यात येणार असून लवकरच पूर्ण क्षमतेने विमानतळ सुरू होईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.

केंद्रीय मंत्री नायडू म्हणाले, विचार आणि कर्तृत्ववाने महाराष्ट्राच्या भूमीने संकल्पना आणि समर्पणाचा वारसा जपला आहे. अमरावती विमानतळामुळे या भागाच्या विकासाचा पाया रचला गेला आहे. राज्यात दूरदर्शी नेतृत्व असल्याने याचा लाभ जनतेला होत आहे. तुकडोजी महाराजांच्या ग्रामगीतेमध्ये सांगितलेला मानवसेवेचा वसा सरकार जपत आहे. देशाच्या विकासात हवाई क्षेत्राचे योगदान महत्त्वाचे आहे. गेल्या काळात प्रवासी विमानसेवेत 40 टक्के वाढ झाली आहे. देशातील 160 विमानतळापैकी 105 विमानतळ सुरू झाली आहेत. तसेच दहा वर्षात 159 असलेल्या फ्लाईटची संख्या 400 वर नेण्यात आली आहे. तसेच मुंबई विमानतळ हे प्रमुख झाले आहे. त्याला पूरक म्हणून नवी मुंबई विमानतळ सुरू करण्यात येणार आहे. विमानतळासोबतच कार्गो, विमान दुरुस्ती आणि प्रशिक्षण केंद्र आदी सुरू होणे गरजेचे आहे. यामुळे या भागात रोजगार निर्मितीसोबतच उद्योग उभारणीही होईल. विमानतळ क्षेत्राचा विकास होताना तो पर्यावरणपूरक, जल पुनर्भरण आणि सौर उर्जेवर आधारित करण्यावर भर देण्यात येत असल्याचे सांगितले.

उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी, अमरावती येथील विमानतळ विक्रमी वेळेत पूर्ण केल्याबद्दल अभिनंदन केले. राज्यात समृद्धी मार्ग, कोस्टल रोड, अटल सेतू, नवी मुंबई एअरपोर्ट, वाढवण बंदरासोबतच रायगड येथेही बंदर उभारणी करण्यात येणार आहे. राज्यात प्रामुख्याने पायाभूत सुविधांवर भर देण्यात येणार असून राज्याच्या विकासाला गती देण्यात येणार आहे. अमरावती येथील विमानतळ हा एक गेम चेंजर प्रकल्प ठरणार आहे. राज्य शासनाने महिला, शेतकरी, युवक यांच्यासाठी सुरू केलेल्या योजना यापुढेही सुरू राहतील, असे सांगितले.

उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी, विमानतळ हे या भागाच्या विकासाला नवे पंख देणारा टप्पा आहे. राज्य मागे राहू नये यासाठी सुविधांवर भर देण्यात येत आहे. यात प्रामुख्याने पाण्याचा प्रश्न, पायाभूत सुविधा आणि महामार्गाच्या निर्मितीवर भर देण्यात येते आहे. आजच्या घडीला सर्वात जास्त विमानतळ महाराष्ट्रात आहे. येत्या काळात अकोला येथील विमानतळाच्या जागेचाही प्रश्न मार्गी लावून विमानतळ कार्यान्वित करण्यात येईल. विमानतळाचे जाळे निर्माण करून आपत्कालीन परिस्थितीत तातडीने पोचता येईल, यासाठी प्रयत्न करण्यात येतील. अमरावती येथील टेक्सटाईल पार्क पीएम मित्रामधून निर्यातक्षम उत्पादन होणार आहे. यामुळे निर्यातीला चालना मिळणार आहे. अमरावती विमानतळावरून सेवा देणाऱ्या कंपनीने अखंड सेवा द्यावी. काही अडचणी आल्यास पर्यायी व्यवस्था द्यावी, अन्यथा प्रवाशांना पूर्ण रक्कम परत द्यावी. तसेच सकाळच्या सत्रात फ्लाईटची सुविधा करून देण्यात यावी असे निर्देश दिले.

केंद्रीय विमान वाहतुक राज्यमंत्री श्री. मोहोळ यांनी पश्चिम विदर्भातील महत्त्वाचे स्थान असलेल्या अमरावती येथून विमान सेवा सुरू होणे ही विमान वाहतूक क्षेत्रातील क्रांती असल्याचे सांगून देशातील आज असलेल्या 160 विमानतळाच्या संख्येत 86 ने भर पडणार आहे. गेल्या काळात प्रवासी संख्या दुप्पट झाली असून येत्या काळात नवीन अकराशे विमाने विकत घेण्यात येणार आहेत. परिणामी देश विमान वाहतुकीमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे. यामुळे 2047 मध्ये विकसित भारताचे उद्दिष्ट पूर्ण होण्यास मदत होईल. येत्या काळात विमानतळ विस्तारीकरणाची कामे हाती घेऊन भरीव कामे करण्यात येईल. ही कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी परिपूर्ण प्रयत्न करण्यात येतील, असेही ते म्हणाले.

महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणच्या उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक स्वाती पांडे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी विमानतळावरून पहिल्यांदा प्रवास करणारे ऋषिकेश गव्हाणे, अनवर अली, आसिफ इकबाल या प्रवाशांना प्रातिनिधीक स्वरूपात बोर्डिंग पासचे वितरण करण्यात आले. अमरावती विमानतळावर आलेल्या पहिल्या प्रवासी विमानाचे वॉटर कॅननने स्वागत करण्यात आले. त्यानंतर पायलट प्रशिक्षण केंद्राच्या डेमो फ्लाईटचे प्रात्यक्षिक करण्यात आले. मुख्यमंत्री फडणवीस आणि मान्यवरांनी विमानतळाच्या कोनशिलेचे अनावरण केले. माजी आमदार प्रवीण पोटे आणि बेलोराच्या सरपंच माधुरी चौधरी यांनी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांचा सत्कार केला.

ताज्या बातम्या

पूर्व विदर्भातील पूरस्थिती नियंत्रणात; एसडीआरएफ, एनडीआरएफ  यंत्रणा सज्ज – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
मुंबई, दि. ९: मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसामुळे पूर्व विदर्भात पूरस्थिती निर्माण झाली आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात असून राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) आणि राज्य...

नाशिक ‘मनपा’तील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वेतनातील गैरप्रकार प्रकरणी चौकशी होणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
मुंबई, दि. 8 : नाशिक महानगरपालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांवर वेतनाबाबत अनेक गंभीर तक्रारी समोर आल्या आहेत. या संदर्भात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यामार्फत चौकशी करण्यात येईल. संबंधित...

महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पुनर्रचनेची अधिसूचना जाहीर

0
मुंबई, दि. 8 : राज्यातील विविध विकास कामे व प्रकल्पांना किनारी क्षेत्र नियमन (सीआरझेड) अंतर्गत वेळेवर मंजुरी मिळावी यासाठी महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण...

महाराष्ट्रातील सहा औ‌द्योगिक प्रशिक्षण संस्थांचे आधुनिकीकरण होणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
विदेशी पतसंस्था करणार १२० कोटींची गुंतवणूक मुंबई, दि. ८ : बंदरे आणि लॉजिस्टिक क्षेत्रासाठी कुशल मनुष्यबळ पुरविण्यासाठी कौशल्य विकास विभाग, बंदरे विभाग आणि अटल...

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राजमुद्रेतील शब्दांचा युनेस्कोमधील राजदूतांकडून सन्मान

0
मुंबई, दि. 8 : - छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेतील शब्दांचा गौरवपूर्ण उल्लेख हा तमाम शिवप्रेमी आणि महाराष्ट्रासाठी एक आनंददायी आणि अभिमानास्पद क्षण आहे. युनेस्कोमधील...