बुधवार, एप्रिल 30, 2025
Home Blog Page 221

मल्टीमिडीया छायाचित्र प्रदर्शनाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

यवतमाळ, दि.२७ (जिमाका) : सामाजिक न्याय विभागाच्यावतीने अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या कल्याणासाठी विविध प्रकारच्या योजना राबविण्यात येतात. या योजनांची माहिती देणारे मल्टीमिडीया छायाचित्र प्रदर्शन सामाजिक न्याय व जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात लावण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन पालकमंत्री संजय राठोड यांच्याहस्ते प्रजासत्ताकदिनी झाले.

यावेळी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया, उपवनसंरक्षक धनंजय वायभासे, सहाय्यक जिल्हाधिकारी लघिमा तिवारी, अप्पर जिल्हाधिकारी अनिल खंडागळे, निवासी उपजिल्हाधिकारी श्रीकांत उंबरकर, समाजकल्याणच्या सहाय्यक आयुक्त मंगला मुन, जिल्हा समाजकल्याण अधिकारी पियुष चव्हाण आदी उपस्थित होते.

अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या लाभार्थ्यांसाठी घरकुल, सिंचन, शेती, शैक्षणिक स्वरुपाच्या विविध योजना राबविण्यात येतात. या योजनांची लाभार्थ्यांना माहिती व्हावी आणि त्यांनी योजनांचा लाभ घेण्यासाठी पुढे येणे आवश्यक आहे. त्याच अनुषंगाने जनजागृतीसाठी सदर मल्टीमिडीया छायाचित्र प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. यावेळी सहाय्यक आयुक्त मंगला मुन यांनी संविधानाच्या प्रती भेट देऊन पालकमंत्री व अन्य मान्यवरांचे स्वागत केले.

सदर प्रदर्शन बुधवार दिनांक २९ जानेवारी पर्यंत सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजतापर्यंत सुरु राहणार आहे. शाळा महाविद्यालयांचे विद्यार्थी प्रदर्शनास भेट देऊन योजना समजून घेणार असून नागरिकांनी मोठ्या संख्येने प्रदर्शनाला भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. उद्गाटन कार्यक्रमाचे संचलन प्रा.कमलदास राठोड यांनी केले. यावेळी अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

000

पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रजासत्ताकदिनी विविध पुरस्कार, प्रमाणपत्रांचे वितरण

यवतमाळ, दि.२७ (जिमाका) : भारतीय प्रजासत्ताकाच्या ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त पालकमंत्री संजय राठोड यांच्याहस्ते विविध पुरस्कार, प्रमाणपत्रांचे वितरण व उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

समता मैदानात आयोजित या कार्यक्रमास पालकमंत्र्यांसह जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया, मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की, जिल्हा पोलिस अधीक्षक कुमार चिंता, उपवनसंरक्षक धनंजय वायभासे, उप्पर जिल्हाधिकारी अनिल खंडागळे, निवासी उपजिल्हाधिकारी श्रीकांत उंबरकर आदी उपस्थित होते.

पालकमंत्र्यांच्याहस्ते वीरनारी मंगला देवचंद सोनवणे, नंदाबाई दादाराव पुराम, सुनिता प्रकाश विहिरे, वीर माता लक्ष्मीबाई यशवंत थोरात यांचा सत्कार करण्यात आला. उत्कृष्ट बॅंकींग कार्यासाठी विदर्भ कोकण ग्रामीण बॅंकेच्या यवतमाळ शाखा व्यवस्थापकांना प्रमाणपत्र देण्यात आले. विधानसभा निवडणूकीत मतदान जनजागृतीसाठी केलेल्या कामासाठी आर्णी तालुक्यातील तळणी जिप शाळेच्या सहाय्यक शिक्षिका ज्योती गोविंदराव राठोड व विद्यार्थी आरती अरविंद पवार, आनंद सुभाष जाधव तसेच महेंद्र गुल्हाणे, वेदांती बावणे, वैष्णवी दिवटे, प्रा.डॉ.राहुल एकबोटे, रविंद्र विरकर, चंद्रबोधी घायवटे यांना प्रशस्तिपत्र देण्यात आले.

वाचन संकल्प महाराष्ट्राचा उपक्रमांतर्गत ब्रेल लिपीमध्ये सलग १२ तास वाचन केल्याबद्दल दृष्टीहीन विद्यार्थीनी भुमिका सुजित राय हिला प्रमाणपत्र देण्यात आले. १७ वर्षाखालील राष्ट्रीय सॅाफ्टबॅाल स्पर्धेत सहभाग घेऊन सुवर्ण पदक प्राप्त केल्याबद्दल नाठार इंग्लिश मेडियम स्कुलचे विद्यार्थी अनुश्री राठी व सुबोध अंबागडे यांना सन्मानित करण्यात आले. अतुलनिय शैक्षणिक व सांगितीक कार्यासाठी सेवानिवृत्त शारीरिक शिक्षक देवराव भालेराव यांना सन्मानपत्र देण्यात आले.

अपघातानंतर उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या विशाल कृष्णराव येरावार यांच्या कुटुंबियांनी मृत्यूनंतर अवयव दानास संमती देऊन तीन महिलांना किडणी व यकृत देऊन जीवनदान दिल्याबद्दल त्यांच्या कुटुंबियांचा प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला. हत्तीपाय रुग्णांना दिव्यांग प्रमाणपत्र वाटपाचे उद्दिष्ट पुर्ण केल्याबद्दल जिल्हा हिवताप अधिकारी डॅा.तनविर शेख यांना गौरविण्यात आले.

महाआवास अभियानांतर्गत भीमराव कदम, देवानंद राठोड, नितीन तांगडे, राजकमल ढोके, धनराज कंगाले, विजय शिवणकर या लाभार्थ्यांना घराच्या चावी व प्रशस्तीपत्र देण्यात आले. आर्णी तालुक्यातील जवळा भूमिहीन लाभार्थी उषा राठोड, साहीर खान, अकेलाबी शेख, विजय आडे, प्रकाश शेलोकर यांना जागा उपलब्ध करून देऊन घरकुल मंजुरीचे प्रमाणपत्र पालकमंत्र्यांच्याहस्ते वितरीत करण्यात आले. ॲग्रीस्टॅक अंतर्गत शेतकरी माहिती संच निमितीमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदविल्याबद्दल यवतमाळ तालुक्यातील लोणी येथील शेतकरी चैतन्य घोडमारे, हरीष राठोड, कृष्णा रहाटे यांना सन्मानित करण्यात आले.

सन 2020-21 च्या जिल्हा क्रीडा पुरस्काराचे वितरण देखील करण्यात आले. त्यात गुणवंत खेळाडू अभिषेक नाचपेलवार, पायल जाधव व गुणवंत क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार पंकज रोहनकर यांना देण्यात आला. माध्यमिक व उच्च माध्यमिक परिक्षेत विशेष प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थीनींचा सत्कार करण्यात आला. त्यात जान्हवी बावनकुळे, लुंबिनी देवतळे पांढरकवडा, ऐश्वर्या रुद्रकंठवार विडुळ, ता.उमरखेड, राजश्री हिरुळकर, अस्मिता बेंद्रे, सानिका मरगाडे, एन.सुविधी श्री यवतमाळ व सुप्रिया नगराळे माणिकवाडा, ता.नेर या विद्यार्थीनींचा समावेश आहे.

000

अडाण कालव्याच्या विशेष दुरुस्तीचा पालकमंत्र्यांकडून आढावा

यवतमाळ, दि.२७ (जिमाका) : अडाण नदी प्रकल्पाच्या कालव्यांची विशेष दुरुस्ती केली जात आहे. दुरुस्तीच्या कामातील अडथळे व काम तातडीने होण्याच्या अनुषंगाने पालकमंत्री संजय राठोड यांनी महसूल भवन येथे आयोजित बैठकीत आढावा घेतला.

यावेळी पालकमंत्र्यांसह जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया, उपवनसंरक्षक धनंजय वायभासे, सहाय्यक जिल्हाधिकारी लघिमा तिवारी यांच्यासह जलसंपदा, विज वितरण, वन, महसूल विभागाचे अधिकारी उपस्थित होते. अडाण नदी प्रकल्प वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यात अडाण नदीवर बांधण्यात आला आहे. धरणास ६५ किमीचा उजवा कालवा आहे. या प्रकल्पांतर्गत वाशिम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यातील १०५ हेक्टर तर दारव्हा तालुक्यातील ९ हजार ९६२ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आले आहे. परंतु कालवा नादुरुस्त असल्याने पुर्ण क्षमतेने सिंचन होत नाही.

त्यामुळे कालव्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. प्रथम सुधारीत प्रशासकीय मान्यतेनुसार दुरुस्तीचे काम १८२ कोटी रुपयांचे आहे. सदर काम तातडीने सुरु करून पुर्ण करण्याच्या सूचना बैठकीत पालकमंत्र्यांनी दिल्या. कालव्याच्या संपादीत जागेवर असलेले विद्युत पोल, डीपी लावलेली असल्याने दुरुस्तीची कामे करतांना अडचण येत असल्याने तारा व डीपी हलविण्यासोबतच त्याची उंची वाढविण्याच्या सूचना त्यांनी केल्या.

प्रकल्पाच्या कालव्यात झाडे वाढलेली असल्याने दुरुस्तीत अडचणी निर्माण होत आहे. त्यामुळे वनविभागाने झाडे तोडण्याची परवानगी द्यावी किंवा विभागानेच झाडे तोडावी. कालवा भरावासाठी मुरुम काढण्यासाठी खनिकर्म विभागाने खदान मंजुर करावी. विभागाने कामाची गती वाढवावी. कालव्यातील शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत लवकरता लवकर पाणी पोहोचेल यादृष्टीने प्रयत्न करावे, अशा सूचना पालकमंत्र्यांनी बैठकीत केल्या. दुरुस्ती कामातील अडचणी समजून घेतल्या व त्या सोडविण्यासाठी निर्देश दिले.

000

महात्मा फुले वाडा, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्मारकाच्या विस्तारीकरण कामास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून प्रशासकीय मान्यता

मुंबई, दि. २३: पुणे येथील महात्मा फुले वाडा आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्मारकाच्या विस्तारीकरणासाठी भूसंपादन आणि रहिवाशांचे अन्यत्र पुनर्वसन करण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासकीय मान्यता दिली आहे. या कामांसाठी २०० कोटी रुपयांचा निधी मंजूर असून प्रशासकीय मान्यता मिळाल्याने आता या स्मारकाच्या विस्तारीकरणाला अधिक गती मिळणार आहे.

पुणे शहरातील महात्मा फुले वाडा व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले या स्मारकांचे विस्तारीकरण करण्यासाठी भूसंपादन आणि रहिवाशांचे पुनर्वसन या कामांसाठी २०० कोटी रुपयांचा निधी अर्थसंकल्पात मंजूर करण्यात आलेला आहे. स्मारकांच्या विस्तारीकरणासाठी भूसंपादन रहिवाशांचे पुनर्वसन करण्यात येणार असून त्यानंतर फुले वाडा आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्मारक या दोन्ही स्मारकांना जोडण्यासाठी रस्ता करण्यात येणार आहे. त्याचबरोबर दोन्ही स्मारकांचे जतन आणि विकास करण्यात येणार आहे. प्रशासकीय मान्यतेनंतर मंजूर निधी पुणे महापालिकेला वितरीत केला जाईल. यामुळे स्मारकांच्या कामाला गती मिळण्यास मदत होणार आहे.

००००

धुळे पोलीस दलाचे काम उल्लेखनीय; जिल्ह्यातील चारही तालुक्यात पोलिसांसाठी  निवासस्थाने बांधणार : पालकमंत्री जयकुमार रावल

धुळे, दिनांक 27 जानेवारी, 2025 (जिमाका वृत्त) : धुळे जिल्हा पोलीस दलाचे काम अत्यंत उल्लेखनीय असून येत्या काळात जिल्ह्यातील चारही तालुक्यात पोलिसांसाठी निवासस्थाने  बांधण्यात येतील, असे प्रतिपादन राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी केले.

धुळे पोलीस दलातर्फे नव्याने तयार करण्यात आलेल्या जिल्हा पोलीस वेबसाईटचे उद्धाटन, मुद्देमाल हस्तांतरण सोहळा, धुळे मॅरेथॉन सीजन -3 टी-शर्ट तसेच लोगो अनावरण, उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्रशस्तीपत्र वाटपाचा कार्यक्रम पालकमंत्री श्री. रावल यांच्या हस्ते संपन्न झाला, यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार डॉ. शोभाताई बच्छाव, आमदार अनुपभैय्या अग्रवाल, राघवेंद्र पाटील, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, मनपा आयुक्त अमिता दगडे पाटील, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा धरतीताई देवरे, माजी खासदार डॉ. सुभाष भामरे, माजी आमदार शरद पाटील, माजी महापौर प्रदीप कर्पे, प्रतिभाताई चौधरी, जयश्री अहिरराव, चंद्रकांत सोनार यांच्यासह पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पालकमंत्री रावल म्हणाले की, प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर आज जिल्हा पोलीस दलात उत्कृष्ट काम करणारे अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सत्काराचा कार्यक्रम होत आहे हा अत्यंत स्तुत्य व प्रेरणादायी आहे. या सन्मानामुळे पोलीस दलातील कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन मिळून पोलिसांची प्रतिमा जनसामान्यात उंचावण्यास मदत होणार आहे.

पोलीस हे 24 तास तणावात काम करत असतात त्यांना अनेकदा टिकेला तोंड द्यावे लागते. परंतू पोलीसांमार्फत झालेले चांगले काम जनतेसमोर येणे आवश्यक आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून पोलीस विभागातील कर्तव्यदक्ष असलेला पोलीस व त्यांनी समाजासाठी केलेलं काम मांडण्याचा प्रयत्न या कार्यक्रमाच्या माध्यमातून होत असल्याचा आनंद होत आहे. येत्या काळात सुद्धा धुळे जिल्ह्याला अभिमान वाटेल, राज्यात आपले नाव होईल  असे काम यापुढे देखील करावे. राज्याच्या गृहमंत्र्यांच्या अपेक्षेनुसार जनताभिमुख असे पोलीस दल झाले पाहिजे. त्यासाठी इंटरॲक्टिव्ह असे वेबपेज असले पाहिजे आणि महाराष्ट्रातील असं काम करणार पहिल माझ्या धुळे जिल्ह्याचे पोलीस दल आहे, याचा मला अभिमान असल्याचे त्यांनी सांगितले.

धुळे जिल्ह्यातील नागरिक हे शारीरिकदृष्टया तंदुरुस्त असले  पाहिजे, यासाठी जिल्हा प्रशासन तसेच धुळे पोलीस दलामार्फत गेल्या तीनवर्षापासून धुळे मॅरेथॉन स्पर्धा घेत आहे. या स्पर्धेचे हे तिसरे वर्ष साजरे करीत आहे. पोलीसांच्या माध्यमातून चोरी, मिसींग, पतीपत्नीचे भांडण, सामाजिक जातीय सलोखा असे अनेक लोकोपयोगी कामे होत आहे हे भुषणावह आहे.

लोकप्रतिनिधी म्हणून 25 वर्ष तसेच जिल्ह्याचा एक भूमिपुत्र म्हणून आगामी काळात जिल्ह्यात चांगल्या कामास पाठिंबा देण्याचे काम त्याचबरोबर चुकीच्या गोष्टी रोखण्याचा काम देखील येत्या काळात करणार आहे. येत्या काळात जिल्ह्यातील पोलीस कार्यालयात नागरिकांसाठी बसण्याची व्य्वस्था, पंखा, लाईट, स्वच्छता, पाणी, शौचालय अशा मुलभूत व्यवस्था करण्यात येईल. त्याचबरोबर जिल्ह्यातील चारही तालुक्यात टप्पयाटप्यात पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थाने बांधण्यात येईल. जिल्हा वार्षिक योजनेतून पोलीस विभागाच्या बळकटीकरणासाठी निधी उपलब्ध करुन देण्यात येईल.  पोलीस विभागाचे बॅन्ड पथक अतिशय चांगले असल्याचे कौतुक देखील त्यांनी केले.

जिल्हा पोलीस अधिक्षक श्री.धिवरे म्हणाले की, 2024 मधील लोकसभा, विधानसभा निवडणूकीत पोलीसांवर प्रचंड ताण होता. त्यातच अनेक मान्यवरांचे दौरे असूनही धुळे पोलीस दलाने अतिशय चांगली कामगिरी केली आहे. लोकसभा, विधानसभा कालावधीत आपल्याकडे अतिशय कमी गुन्हे दाखल झाले आहे. सन 2024 मध्ये 7 हजार 500 च्या वर प्रतिबंधात्मक कारवाया केल्या आहेत. त्यादेखील 2023 पेक्षा प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे. लोकसभा व  विधानसभा निवडणुकीत भारत निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार जप्तीच्या (सीजर्स) च्या कारवाईत धुळे जिल्हा राज्यात आठव्या क्रमांकावर होता. भरोसा सेल मार्फत 239 कुटूंबाचे समुपदेशन करण्यात आले, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.

यावेळी पालकमंत्री श्री.रावल व मान्यवरांच्या हस्ते धुळे जिल्हा पोलीस दलाच्या नूतन वेबसाईटचा शुभारंभ करण्यात आला. तसेच धुळे पोलीसांनी गुन्ह्यांचा तपास लावून हस्तगत केलेले दागिने, मोबाईल तसेच विविध मुद्देमाल फिर्यादी, तक्रारदार यांना हस्तांतर, धुळे मॅरेथॉन सिझन-३ चे टी शर्ट व लोगोचे अनावरण तसेच धुळे जिल्हा पोलीस दलात विशेष उल्लेखनिय कामगिरी करणाऱ्या अधिकारी व अंमलदारांना प्रशस्तीपत्र वाटप करुन सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे सुत्रसंचलन श्रीमती कल्याणी कचवाह यांनी तर अपर पोलीस अधिक्षक किशोर काळे यांनी आभार प्रदर्शन केले.

असे आहे नविन संकेतस्थळ

धुळे पोलिसांचे नवीन आणि अद्ययावत अधिकृत संकेतस्थळ : https://dhulepolice.gov.in/ असे आहे. यात

  • नागरिकांना तक्रारी मांडण्यास आणि मौल्यवान सूचना करण्यास सक्षम करणे.
  • महत्वाची माहिती आणि आपत्कालीन संपर्क त्वरित  प्रदान करणे.
  • पारदर्शकता आणि विश्वास वाढवून पोलीस आणि जनता यांच्यातील बंध दृढ करणे.

0000000

महापारेषणमध्ये ७६ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

 मुंबई, दि. 26 : महापारेषणचे मुख्यालय असलेल्या प्रकाशगंगा येथे भारताचा 76 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. तसेच महापारेषणच्या सात परिमंडळ कार्यालयांमध्येही प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने विविध कार्यक्रम घेण्यात आले.

प्रकाशगंगा येथील मुख्यालयात महापारेषणचे संचालक (संचलन) सतीश चव्हाण यांनी ध्वजवंदन केले. यावेळी महापारेषणचे संचालक (मानव संसाधन) सुगत गमरेयांच्यासह वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ऊर्जा विभागाच्या चित्ररथाने वेधले लक्ष

दादरच्या शिवाजी पार्कवर झालेल्या चित्ररथाच्या सादरीकरणावेळी महापारेषणच्या (ऊर्जा विभाग) चित्ररथाने सर्वांचे लक्ष वेधले. विशेषतः मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी 2.0., पारेषणचे वहन, नविनीकरणीय ऊर्जा या संकल्पनेवर असलेल्या चित्ररथाने उपस्थितांची वाहवा मिळविली. ऊर्जा विभागाच्या अपर मुख्य सचिव श्रीमती आभा शुक्ला व महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजीव कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली हा चित्ररथ तयार करण्यात आला.

0000

लातूर जिल्ह्याच्या विकासासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घ्या – पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

  • जिल्ह्यातील विविध प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याला प्राधान्य देणार
  • चुकीच्या गोष्टींना पाठीशी घालणार नाही; चांगल्या कामाला सहकार्य

लातूर, दि. २६ : जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांसाठी हितावह असणारे नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून जिल्ह्याच्या विकासाला गती देण्यासाठी सर्व शासकीय विभागांनी प्रयत्न करावेत. जिल्ह्याला प्रगतीपथावर नेण्यासाठी प्रशासनाने अधिक गतीने आणि समन्वयाने काम करावे, अशा सूचना पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत दिल्या.

जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, लातूर शहर महानगरपालिका आयुक्त बाबासाहेब मनोहरे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी असलम तडवी, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, उपजिल्हाधिकारी संगीता टकले, संदीप कुलकर्णी, अहिल्या गाठाळ, जिल्हा नियोजन अधिकारी सोमनाथ रेड्डी, प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय चव्हाण, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता डॉ. सलीम शेख यांच्यासह विविध शासकीय विभागांचे प्रमुख यावेळी उपस्थित होते.

जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाकडून अधिकाधिक निधी मिळविण्याचा आपला प्रयत्न राहणार असल्याचे सांगून पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले की, जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांना लाभदायक ठरणारी विकास कामे करण्यावर सर्व विभागांनी भर द्यावा. यासाठी लोकप्रतिनिधींना विश्वात घेवून काम करावे. जिल्ह्याच्या विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या चांगल्या उपक्रमाला आपला पाठींबा राहील. मात्र, कोणत्याही चुकीच्या गोष्टींना पाठीशी घातले जाणार नाही. तसेच जिल्ह्यातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी पालकमंत्री म्हणून सर्वोतोपरी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

लातूर ते टेंभूर्णी महामार्गाचे रुंदीकरण, जिल्हा रुग्णालयासह जिल्ह्यातील विविध प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याला आपले प्राधान्य राहणार आहे. तसेच विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयाला नवीन एमआरआय मशीन घेण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल. यासोबतच जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी सीएसआर फंडातून निधी मिळविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे पालकमंत्री ना. भोसले म्हणाले. लातूर जिल्ह्याने शिक्षण क्षेत्रातील वेगळा पॅटर्न तयार केला आहे, याप्रमाणेच जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांच्या विकासासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून विकासाचा नवा पॅटर्न निर्माण करावा. आपल्या कार्यकाळात जिल्ह्याच्या विकासात भरीव योगदान देण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करावेत, असे पालकमंत्री यावेळी म्हणाले.

 बर्ड फ्ल्यूचा प्रसार रोखण्यासाठी सतर्क राहून काम करा

उदगीर शहरातील कावळ्यांचा मृत्यू बर्ड फ्ल्यूमुळे झाल्याचे निष्पन्न झाले आहे. मात्र, त्यानंतर पाठविलेले उदगीर आणि अहमदपूर तालुक्यातील कुक्कुट पक्ष्यांचे वैद्यकीय अहवाल नकारात्मक आल्याने कुक्कुट पक्ष्यांना बर्ड फ्ल्यूची बाधा झाली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. आपल्या जिल्ह्यातील कुक्कुट पक्ष्यांना सध्या बर्ड फ्ल्यूची लागण झालेली नाही. मात्र, बाजूच्या जिल्ह्यांमधून बर्ड फ्ल्यूचा प्रसार होवू नये, यासाठी पशुसंवर्धन विभागाने सतर्क राहून काम करावे. विविध पथके प्रत्यक्ष फिल्डवर पाठवून सातत्याने परिस्थितीचा आढावा घ्यावा. प्रतिबंधात्मक उपाययोजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, अशा सूचना पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिल्या. तसेच नागरिकांनी घाबरून जावू नये, अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही त्यांनी केले.

जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी यावेळी जिल्ह्यातील विविध विकास कामांची पीपीटीद्वारे माहिती दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या शंभर दिवसांच्या सात कलमी कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील जास्तीत जास्त पांदन रस्ते अतिक्रमणमुक्त करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यादृष्टीने तहसीलदार यांनी कार्यवाही सुरु केली आहे. जिल्ह्यातील विविध क्षेत्रांचा अभ्यास करून जिल्हा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यानुसार दरवर्षी करावयाच्या कामांचे नियोजन करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. कृषी, आरोग्य, उद्योग, प्राथमिक शिक्षण, कौशल्य विकास, जिल्हा परिषद, पोलीस प्रशासन यासह विविध विभागांचा पालकमंत्र्यांनी यावेळी आढावा घेतला.

लातूर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये तयार करण्यात आलेल्या हिरकणी कक्षाला पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी भेट देवून तेथील सुविधांची पाहणी केली.

 शासकीय जमिनींची माहिती आता एका क्लिकवर

लातूर जिल्ह्यातील सर्व शासकीय व गायरान जमिनींची माहिती एका क्लिकवर उपलब्ध व्हावी, यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने तयार केलेल्या संगणक प्रणालीचे उद्घाटन पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते रिमोटद्वारे करण्यात आले. या उपक्रमामुळे विविध विकास कामांसाठी जिल्ह्यातील शासकीय जमिनींची माहिती तत्काळ उपलब्ध होणार आहे.

0000

 

पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते जिल्हा प्रशासनाला ४२ चारचाकी वाहने सुपूर्द

लातूर, दि. २६ : राज्य शासनामार्फत जिल्हा प्रशासनातील विविध विभागांना ४२ चारचाकी वाहने प्राप्त झाली आहेत. पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते ही वाहने संबंधित विभागांना सुपूर्द करण्यात आली. तसेच जिल्हा क्रीडा संकुल येथे प्रजासत्ताक दिनी आयोजित या कार्यक्रमामध्ये पोलीस विभागाच्या अभया सुरक्षित प्रवास योजनेंतर्गत क्यूआर कोड बसविलेल्या वाहनांना पालकमंत्र्यांनी हिरवा झेंडा दाखविला.

जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, लातूर शहर महानगरपालिका आयुक्त बाबासाहेब मनोहरे, प्रशिक्षणार्थी आयपीएस अधिकारी सागर खर्डे, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, उपजिल्हाधिकारी संदीप कुलकर्णी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

महसूल विभागाला ९, जिल्हा परिषदेला ८, लातूर शहर महानगरपालिकेला १ आणि पोलीस विभागाला २४ वाहने राज्य शासनाकडून प्राप्त झाली आहेत. महसूल, जिल्हा परिषद विभागाला मिळालेली वाहने जिल्हाधिकारी विविध कार्यालयांना सुपूर्द करण्यात आली. लातूर शहर महानगरपालिकेला एक अग्निशमन वाहन, तसेच पोलीस दलातील विविध पथके, अधिकारी यांच्यासाठी २४ वाहने प्राप्त झाली आहेत.

 अभया सुरक्षित प्रवास योजनेंतर्गत क्यूआर कोड बसविलेल्या वाहनांना हिरवा झेडा

लातूर शहरातील महिला, बालक व वयोवृद्ध नागरिकांना सुरक्षित, कोणतीही भीती न बाळगता प्रवास करता यावा, यासाठी पोलीस प्रशासनाने अभया सुरक्षित प्रवास योजना सुरु केली आहे. या योजनेमुळे प्रवाशांना ऑटो रिक्षावर, सिटी बसमध्ये लावण्यात आलेले क्यूआर कोड स्कॅन करून तत्काळ पोलीस मदत मागवता येईल. याद्वारे मदत मागताना लोकेशन पाठविण्याची सुविधा असल्याने लवकर मदत उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. या योजनेंतर्गत क्यूआर कोड बसविलेली सिटी बस, ऑटोरिक्षाला पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी हिरवा झेंडा दाखविला.

यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी योजनेविषयी सविस्तर माहिती दिली. तसेच मराठवाड्यात अशी योजना राबविणारा लातूर हा पहिलाच व राज्यात दुसरा जिल्हा असल्याचे त्यांनी सांगितले.

0000

गड-किल्ल्यांवर लोककलेतून शिवरायांच्या शौर्यगाथा सादरीकरणासाठी प्रयत्नशील – मंत्री उदय सामंत

अहिल्यानगर, दि.२६: उद्योगमंत्री तथा अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे विश्वस्त उदय सामंत यांच्या हस्ते अहिल्यानगर येथील १०० व्या अखिल भारतीय मराठी विभागीय नाट्यसंमेलनाचे स्व.सदाशिव अमरापूरकर नाट्यनगरी येथे शानदार उद्घाटन करण्यात आले. महाराष्ट्राची लोककला सर्वदूर पोहोचविण्यासाठी राज्यातील गड-किल्ल्यांवर छत्रपती शिवाजी महाराजांची शौर्यगाथा लोककलांचा माध्यमातून सादर करण्याबाबत लवकरच प्रयत्न करण्यात येईल, असे श्री.सामंत यावेळी म्हणाले.

अ. भा. मराठी नाट्य परिषदेच्या अहिल्यानगर उपनगर शाखेतर्फे आयोजित या कार्यक्रमाला आमदार संग्राम जगताप, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे विश्वस्त  मोहन जोशी, सुप्रसिद्ध अभिनेते मकरंद अनासपुरे, ९९ व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाचे प्रेमानंद गज्वी, नाट्यसंमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉ. बापूसाहेब कांडेकर, महानगरपालिका आयुक्त यशवंत डांगे, शिरीष मोडक, अजित भुरे, दिलीप कोरके, दीपा क्षीरसागर, प्रा. प्रसाद बेडेकर, नाट्य परिषदेचे पदाधिकारी आदी उपस्थित होते.

अहिल्यानगर येथील १०० वे विभागीय नाट्यसंमेलन ऐतिहासिक असून नवे कलाकार घडविण्याचे कार्य अहिल्यानगर नाट्य परिषद शाखेने नेहमी केल्याचे नमूद करून मंत्री श्री. सामंत म्हणाले की,  हौशी आणि प्रायोगिक रंगभूमीपासून व्यावसायिक रंगभूमीकडे जाणारे कलाकार घडविण्याची गरज आहे. राज्यात लोककला, संगीत क्षेत्राच्या विकासात ज्येष्ठ कलाकारांचे मोठे योगदान आहे. शहरात नाट्यगृहाची सुविधा करतांना व्यावसायिक नाटकांवर होणारा खर्च कमी करणे गरजेचे आहे. त्यासाठी नाट्यगृहांमध्ये सौर ऊर्जेचा वापर होणे गरजेचे आहे. स्थानिक हौशी रंगभूमी कलाकारांना कमी दराने नाट्यगृह उपलब्ध करून द्यावे, अशी सूचना त्यांनी केली. मराठी भाषेच्या विकासासाठी चांगल्या सूचना आल्यास त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

अहिल्यानगर परिसरात ३ हजार ५०० कोटींचे प्रकल्प उभे राहणार असून त्यातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल. दावोस येथेदेखील जिल्ह्यात उद्योग आणण्यासाठी करार करण्यात आल्याची माहिती, श्री.सामंत यांनी दिली.

आमदार जगताप म्हणाले की, जिल्ह्यात २२ वर्षापूर्वी नाट्यसंमेलन झाले होते. या माध्यमातून नवीन कलाकार घडविण्याचे कार्य होते. यावर्षी विभागीय नाट्यसंमेलनाचे आयोजन करतांना १०१ वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन अहिल्यानगर शहराला मिळाल्यास त्याचे यशस्वीपणे आयोजन करण्यात येईल. शहरात नाट्यगृह उभे राहत आहे. शहराचा औद्योगिक विकासाची वेगाने वाढ होत असल्याचे त्यांनी सांगितले. नाट्यसंमेलनाच्या माध्यमातून पुढील पिढीतील कलाकार घडविण्याचे कार्य व्हावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

ज्येष्ठ रंगकर्मी मोहन जोशी यांनी विभागीय नाट्यसंमेलन सुनियोजित असल्याचे नमूद करून अहिल्यानगर उपनगर शाखेचे आयोजनाबद्दल अभिनंदन केले.

अभिनेते मकरंद अनासपुरे म्हणाले की, नवोन्मेष आणि नवी ऊर्जा असलेल्या रंगकर्मींसाठी ठोस कामगिरी होईल. हौशी रंगमंच सशक्त झाल्यास व्यावसायिक रंगभूमीला बळ मिळते. प्रायोगिक रंगभूमीसाठी गावोगावी मंच उभे राहिल्यास व्यावसायिक रंगभूमी सशक्त होते. राज्य पातळीवर यशस्वी एकांकिका ठिकठिकाणी दाखविण्यात याव्यात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड-किल्ल्यांवर लोककलाकारांच्या माध्यमातून शौर्याची गाथा मांडली गेल्यास नव्या पिढीला प्रेरणा मिळेल. रंगकर्मी जेवढे मोठे होतील तेवढा समाजातील एकोपा टिकून राहील, असे त्यांनी सांगितले.

डॉ. कांडेकर, श्री.भुरे यांनी यावेळी विचार व्यक्त केले.

विभागीय नाट्यसंमेलन प्रमुख क्षितिज झावरे यांनी प्रास्ताविकात विभागीय नाट्यसंमेलनाविषयी माहिती दिली.

कार्यक्रमाच्या प्रारंभी १०० व्या अखिल भारतीय मराठी विभागीय नाट्यसंमेलनानिमित्त अहिल्यानगरच्या १०० कलाकारांनी नांदी आणि १०० कलाकारांनी स्वागत नृत्य सादर केले. विभागीय नाट्य संमेलनाची सुरुवात नाट्यदिंडीने करण्यात आली. प्रोफेसर कॉलनी चौकापासून संमेलनस्थळापर्यंत नटराजाच्या दिंडीचे आयोजन करण्यात आले.

०००

 

अल्पसंख्याक विकास विभागाद्वारे ‘गेटवे ऑफ इंडिया’ समोर विशेष कार्यक्रमाचे आयोजन

मुंबई, दि. २६ : प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने अल्पसंख्याक विकास विभाग व महाराष्ट्र राज्य उर्दू साहित्य अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात शायरी, गझल आणि सूफी संगीताचा अनोखा संगम अनुभवायला मिळाला.

यावेळी अल्पसंख्याक विकास विभागाचे सचिव रुचेश जयवंशी, अल्पसंख्याक विकास विभागाचे आणि उर्दू साहित्य अकादमीचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

कार्यक्रमाला मोठ्या संख्येने प्रेक्षकांची उपस्थिती पाहायला मिळाली. गझल गायक सिराज अहमद खान यांनी आपल्या सुरेल आवाजाने रसिकांना मंत्रमुग्ध केले. प्रत्येक सादरीकरणानंतर टाळ्यांच्या कडकडाटासह “वाह! क्या बात है!” असे शब्द ऐकू येत होते.

शायर मोनिका सिंग, शाहिद लतीफ, सिराज सोलापुरी, डॉ. कमर सुरूर फारूकी, नैम फराज, सदानंद बेंद्रे, अभिजित सिंग, वालिद जमाद, शौखत अली, तारीख जमाल, नईम फराझ यांनी आपल्या शायरीने कार्यक्रमात रंगत आणली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. कासिम इमाम यांनी केले.

ताज्या बातम्या

महाराष्ट्र दिनानिमित्त राज्यपालांचे वाणिज्यदूतांसाठी चहापान

0
मुंबई, दि. २९  : दिनांक १ मे रोजी साजरा होत असलेल्या महाराष्ट्र राज्य स्थापना दिनाचे औचित्य साधून राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत...

नागरिकांना वेळेत सुविधा मिळण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे – राज्यमंत्री माधुरी मिसाळ

0
पुणे महापालिकेत महाप्रितच्या सहकार्याने राबविण्यात येणाऱ्या प्रकल्पांचा आढावा मुंबई, २८: पुणे महानगरपालिका आणि महात्मा फुले नविनीकरणीय ऊर्जा व पायाभूत प्रौद्योगिकी महामंडळ (महाप्रित) यांच्या संयुक्त विद्यमाने...

खाडीत सोडण्यात येणाऱ्या प्रदूषित पाण्यामुळे मासेमारीवर होणाऱ्या परिणामासंदर्भात अभ्यास समिती स्थापन करावी – सभापती...

0
मुंबई दि. २९ :- राज्यातील मुंबई, ठाणे, बेलापूर, उलवे, तळोजा येथील खाड्यांमध्ये औद्योगिक क्षेत्रामधून सोडण्यात येणारे सांडपाणी आणि डंम्पिंग ग्राऊंडचा कचरा यामुळे प्रदूषण वाढत असून त्याचा फटका मासेमारी...

जिगाव प्रकल्पाच्या भूसंपादनाबाबत आठ दिवसात नव्याने प्रस्ताव सादर करावा – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

0
मुंबई दि. २९ : बुलढाणा जिल्ह्यातील जिगाव प्रकल्पाच्या भूसंपादनाबाबत शेतकऱ्यांनी 40 टक्के वाढीव मोबदला मागितला आहे. त्यामुळे 8 हजार 782 दावे प्रलंबित असून ते निकालात...

सुरक्षा रक्षक मंडळाच्या नोंदणीकृत कर्मचाऱ्यांचा खाकी गणवेश; १ मे पासून अंमलबजावणी – कामगार मंत्री ॲड.आकाश...

0
मुंबई, दि. 29 : राज्यातील नोंदणीकृत सुरक्षा कर्मचाऱ्यांसाठी खाकी रंगाच्या गणवेशास शासनाने मान्यता दिली. यामध्ये टोपी निळ्या रंगाची असून, त्यावर सुरक्षा रक्षक मंडळाचा लोगो...