बुधवार, एप्रिल 30, 2025
Home Blog Page 223

भारतीय प्रजासत्ताकाच्या 75 व्या वर्धापन दिनी पालकमंत्री यांच्या हस्ते संविधान उद्देशिकेचे वितरण

जळगाव दि.२६ (जिमाका): भारतीय प्रजासत्ताकाच्या ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते पाच निवडक प्रतिनिधींना संविधान उद्देशिका भेट देण्यात आल्या. या विशेष उपक्रमाचा उद्देश संविधानाच्या उद्देशिकेचे महत्त्व जनतेपर्यंत पोहोचवणे हा होता.

यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अंकित, तसेच सामाजिक न्याय विभागाचे सहायक आयुक्त योगेश पाटील उपस्थित होते.

संविधान उद्देशिका प्रतिनिधिक स्वरूपात ज्यांना देण्यात आल्या त्यात तृतीयपंथीय समुदायाचे प्रतिनिधी म्हणून श्री.मानव सुरेश इंगळे, खडगाव, ता. जामनेर येथील वाघूर प्रकल्पामुळे घर संपादित झालेले प्रकल्पग्रस्त व्यक्ती म्हणून श्री.समाधान लोटू माळी, अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातील मौजे मेलाने, ता. चोपडा येथील सरपंच श्रीमती. लालबाई प्रताप पावरा, जि. प. शाळा  पिलखेडे ता जळगाव येथे शिक्षण घेत असलेली मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी कु. मेघना विक्रम भालेराव, सिंधी समाजातील विद्यार्थिनी डॉ. नान्सी मुकेश सदमानी हिला भारतीय नागरिकत्व प्राप्त झालेले आहे.

0 0 0 0

पालघर जिल्हा प्रगतीशील जिल्हा म्हणून आपली ओळख निर्माण करेल-पालकमंत्री गणेश नाईक

पालघर, दि. २६:- शासनाच्या महत्त्वकांक्षी योजनेच्या माध्यमातून पालघर जिल्ह्यातील होत असलेल्या विकास कामांच्या व विविध प्रकल्पांच्या संदर्भात विचार करता आगामी काळामध्ये पालघर जिल्हा प्रगतीशील जिल्हा म्हणून आपली ओळख निर्माण करेल असा विश्वास वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी व्यक्त केला.

स्वातंत्र्य भारताच्या ७६ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आज पालघर जिल्ह्याचा ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ पोलीस परेड मैदान, कोळगाव, जैनेसिस औद्योगिक परिसराच्या मैदानात वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी पालकमंत्री गणेश नाईक यांनी उपस्थित स्वातंत्र्य सैनिक, नागरिक, शासकीय अधिकारी, शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थी, कर्मचारी यांना प्रजासत्ताक दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या.

या समारंभास जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम, खासदार डॉ. हेमंत सवरा, आमदार राजेंद्र गावित, जिल्हाधिकारी गोविंद बोडके, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे, जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, राज्य अनुसूचित जमाती आयोगाच्या सदस्या वैदेही वाढाण,निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष भागडे तसेच वरिष्ठ अधिकारी शालेय आणि महाविद्यालय विद्यार्थी, नागरिक उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री नाईक म्हणाले की, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेस पालघर जिल्ह्यामध्ये प्रचंड प्रतिसाद मिळाला असून या योजनेच्या माध्यमातून तळागाळातील खऱ्या अर्थाने गरजवंत असणाऱ्या जवळपास सहा लाख माता भगिनींना लाभ देण्यात आलेला आहे व आत्तापर्यंत सहा हप्त्यांमध्ये ही रक्कम अदा करण्यात आलेली आहे.

राज्यातील युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन त्यांची नोकरी मिळविण्याची क्षमता वाढविण्यासाठी ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना’ निःशुल्कपणे कार्यान्वित करण्यात आलेली असून जिल्हा प्रशासनामार्फत १५३३ उमेदवारांना प्रशिक्षण देऊन रुपये २ कोटी ८८ लाख इतके विद्यावेतन देखील अदा करण्यात आले असल्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी सांगितले.

अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वननिवासी (वनहक्कांची मान्यता) कायदा २००६ अन्वये जिल्ह्यामध्ये एकूण ३० हजार हेक्टर क्षेत्रावरील ५० हजार ६८७ वनहक्क दावे मंजूर करण्यात आलेले असून संपूर्ण देशात सर्वात जास्त वैयक्तिक वनहक्क दावे मंजूर करण्यात पालघर जिल्ह्याचा प्रथम क्रमांक लागतो.

देशाच्या व्यापार विकासात कच्च्या व पक्क्या मालाची आयात निर्यात करताना समुद्रकिनाऱ्यालगत मोठ्या बंदरांची निर्मिती व अन्य साठवण क्षमता असणारे लॉजिस्टिक पार्कची उभारणी आवश्यक ठरते. मुंबई व आसपासचे क्षेत्र भारताच्या उत्तर व दक्षिण भागाचा मध्यबिंदू असून आखाती व पश्चिमी देशांशी जोडले जाणारे महत्त्वाचे भौगोलिक केंद्र आहे. पालघर जिल्ह्यातील वाढवण येथे किनाऱ्यालगत नैसर्गिक २२ मीटर खोली असल्याने जगातील दहा मुख्य पोर्ट इतकी १५ टीईओ (तसेच वाढीव २३ टीईओ) कंटेनर क्षमतेचे बंदर विकसित करता येणार आहे. सदर बंदराला वाढवण तवा हा NH08 ला जोडणारा ३४ किलोमीटर लांबीचा रस्ता बांधणे प्रस्तावित आहे. सदर रस्त्यासाठी भू-संपादनाचे काम प्रगतीपथावर आहे. या प्रकल्पामुळे राज्याचा आणि देशाच्या विकासाला हातभार लागणार असून लाखो स्थानिकांना व युवकांना मोठ्या प्रमाणावर रोजगार मिळणार असल्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी सांगितले.

दरवर्षी २५ डिसेंबर हा ‘सुशासन दिन’ म्हणून साजरा केला जातो.या कालावधीमध्ये केंद्र शासनामार्फत १९ ते २४ डिसेंबर २०२४ या कालावधीत ‘सुशासन सप्ताह- गांव की ओर’ (Good Governance Week) साजरा करण्यात आला. केंद्र शासनाच्या DARPG विभागामार्फत तयार करण्यात आलेल्या पोर्टलवर स्पेशल कॅम्प CPGRAM (सी पी ग्राम स्टेट पोर्टल मधील निकाली काढलेल्या तक्रारी, नव्याने ऑनलाईन पद्धतीने दिलेल्या सेवा, तक्रारी निकाली काढण्याबाबतच्या यशोगाथा ( सक्सेस स्टोरीज) प्रसारमाध्यमाद्वारे विविध कार्यशाळांमधून तक्रार निवारण्यासाठी केलेले प्रयत्न, यांच्या एकूण मूल्यमापनानुसार उपक्रम कालावधीत, पालघर जिल्ह्याने महाराष्ट्रात ८ वा क्रमांक प्राप्त केलेला आहे. ही बाब जिल्ह्यासाठी निश्चितच गौरवास्पद आहे.

नुकत्याच पार पडलेल्या ‘सुशासन सप्ताहा’मध्ये नागरिकांच्या तक्रारींचे ज्या पद्धतीने निवारण केले होते तसेच या कार्यक्रमात देखील विविध पोर्टलद्वारे नागरिकांच्या दाखल तक्रारींचे निरंतर निराकरण करण्याची प्रक्रिया सुरू ठेवण्याचे अंतिम ध्येय आहे. कार्यालयीन कर्मचारी, भेट देणारे अभ्यागत यांना कार्यालयात वावरताना आवश्यक त्या सोयी सुविधांचे, जसे पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह, प्रतिक्षागृह बैठकव्यवस्था, मार्गदर्शक बोर्ड  याबाबत सर्व जिल्ह्यांतील क्षेत्रीय कार्यालयात आवश्यक ती उपाययोजना करणे प्रस्तावित आहे. १०० दिवसांच्या कार्यक्रमातील पुढचा महत्त्वाचा टप्पा म्हणजे नवगुंतवणूकदारांकरिता गुंतवणूक प्रोत्साहन हा असून स्थानिक व नवउद्योजकांना येणाऱ्या सर्वच अडचणींचे निराकरण करून उद्योगक्षेत्रात सुलभता येण्याकरिता आवश्यक त्या सर्वसोयीसुविधा ‘एक खिडकी योजने’ सारख्या योजनांद्वारे त्यांच्या प्रशासकीय अडचणी कमी करण्यावर भर देण्यात येणार असल्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी सांगितले.

0000

‘युवा उमेद’ने युवकांना रोजगाराची संधी मिळेल – मंत्री अतुल सावे

नांदेड, दि. २६ : भोकर मतदार संघातील युवकांसाठी आमदार श्रीजया चव्हाण यांनी सुरू केलेला उपक्रम स्तुत्य आहे. युवा उमेदच्या माध्यमातून प्रशिक्षित होऊन युवकांना रोजगाराची संधी मिळेल अशी आशा, इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास व अपारंपारिक ऊर्जा मंत्री तथा पालकमंत्री अतुल सावे यांनी व्यक्त केली आहे.

डॉ. शंकरराव चव्हाण मेमोरियलमध्ये आयोजित युवा उमेदवार या फेसबुक पेज व इन्स्टाग्रामच्या शुभारंभ कार्यक्रमात ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार अशोक चव्हाण तर प्रमुख अतिथी म्हणून खासदार डॉ. अजित गोपछडे,  जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, मनपाचे आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, कौशल्य विकास विभागाच्या रेणुका तम्मलवार, आदी मान्यवर उपस्थित होते.

‘युवा उमेद’च्यावतीने शनिवार २२ फेब्रुवारी २०२५ रोजी शंकरराव चव्हाण महाविद्यालय, अर्धापूर येथे रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. हा रोजगार मेळावा आणि मेळावापूर्व प्रशिक्षण कार्यक्रमाच्या माहितीपत्रकाचे प्रकाशन देखील पालकमंत्री व इतर मान्यवरांनी याप्रसंगी केले. मराठवाड्यात अनेक उद्योग येत असून, ती संधी साधण्यासाठी आपल्या भागातील तरुणांनी सज्ज झाले पाहिजे, असे आवाहन पालकमंत्री श्री. सावे यांनी केले. विशेष म्हणजे त्यांच्या ओबीसी विकास खात्यांतर्गत असलेली संस्था ‘महाज्योती’चा स्टॉल अर्धापूरच्या रोजगार मेळाव्यात उपलब्ध असेल, असेही त्यांनी घोषित केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दावोसमध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममधून महाराष्ट्रात मोठी गुंतवणूक आणली. मराठवाड्यासारख्या भागात देखील ही गुंतवणूक व्हावी, यासाठी मुख्यमंत्र्यांनी घेतलेला पुढाकार अभिनंदनीय असल्याचे खासदार अशोक चव्हाण म्हणाले.

आमदार श्रीजया चव्हाण यांनी रोजगार व स्वयंरोजगाराच्या शोधात असलेल्या युवा वर्गाला माहिती, मार्गदर्शन व प्रशिक्षण देऊन मदत करावी, यासाठी आम्ही ‘युवा उमेद’ उपक्रम सुरु केला. या माध्यमातून रोजगाराची संधी व तरुणांमधील अंतर कमी करण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.

या कार्यक्रमात यशवंत महाविद्यालयाच्या अनेक गुणवंत विद्यार्थ्यांना पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. सूत्रसंचालन प्रा. विश्वाधार देशमुख यांनी केले.

०००

 

महाबळेश्वर येथील पर्यटन महोत्सव सर्व विभागांनी समन्वयातून  यशस्वी करावा- पालकमंत्री शंभूराज देसाई

सातारा, दि.२६ : महाराष्ट्र पर्यटन विभागामार्फत महाबळेश्वर येथे एप्रिल मध्ये पर्यटन महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. हा महोत्सव दिव्य भव्य असणार असून देशातून तसेच महाराष्ट्रातून पर्यटक येणार आहेत. सर्व विभागांनी समन्वयातून हा महोत्सव यशस्वी करावा, अशा सूचना पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केल्या.

महाराष्ट्र पर्यटन महोत्सवाच्या नियोजनासंदर्भात आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाली. या बैठकीला जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक समीर शेख, उपवनसंरक्षक आदिती भारद्वाज, वाईचे प्रांताधिकारी राजेंद्र कचरे, महाबळेश्वरच्या तहसीलदार तेजस्वीनी पाटील यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

महोत्सव काळात येणाऱ्या पर्यटकांची कोणत्याही प्रकारे गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्यावी, अशा सूचना करुन पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, महोत्सव हा तीन दिवसांचा असणार आहे. या तीन दिवसात मोठ्या प्रमाणात पर्यटक महाबळेश्वर येथे येतील यासाठी आत्तापासून पार्कीग व वाहनांची कोंडी होणार नाही यासाठी आराखडा तयार करावा. तसेच वाहन पार्कींगसाठी जागा शोधण्याचे काम करावे.

पर्यटन महोत्सव कालावधीत हेलीकॉप्टर सफर ठेवण्यात येणार आहे. यासाठी दोन हेलीपॅड तयार करावे. यासाठी जागा बघुन ठेवा. महोत्सव कालावधीत ज्यादा विद्युत पुरवठा लागणार आहे. विद्युत पुरवठा खंडीत होवू नये यासाठी विद्युत वितरण कंपनीने दक्ष रहावे तसेच जनरेटरचीही व्यवस्था करावी. महाबळेश्वर येथील रस्त्यांची कामे हातात घ्यावी. तसेच विविध उद्यांने चांगल्या पद्धतीने ठेवावीत. पाचगणी व महाबळेश्वर या कालावधीत स्वच्छ असले पाहिजे यासाठी जास्तीचे मनुष्यबळ उपलब्ध करुन घ्यावे, अशा सूचना करुन महाबळेश्वर येथे होणारा पर्यटन महोत्सव यशस्वीरित्या आयोजन करुया, असेही पालकमंत्री श्री. देसाई यांनी सांगितले.

000

‘हॉस्पीटल ऑन व्हील’ सुरु करणार- पालकमंत्री उदय सामंत

क्रीटीकल केअर युनिटच्या माध्यमातून आरोग्याच्या दालनाला सुरुवात

रत्नागिरी, दि. २६ (जिमाका) : २४ कोटी रुपये खर्चून क्रीटीकल केअर युनिट रत्नागिरीमध्ये होत आहे. या माध्यमातून आरोग्याच्या दालनाला सुरुवात होत आहे. घराघरात आरोग्याची सुविधा पोहचविण्यासाठी ‘हॉस्पीटल ऑन व्हील’ ही संकल्पना सुरुवात करणार आहे, असे आश्वासन देतानाच प्रादेशिक मनोरुग्णालय जिल्ह्यातून कुठेही बाहेर जाणार नाही, अशी ग्वाही पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली.

येथील प्रादेशिक मनोरुग्णालय परिसरात प्रधानमंत्री आयुष्यमान भारत हेल्थ इंन्फ्रास्ट्रक्चर मिशन (पीएम अभीम) क्रीटीकल केअर युनिटच्या इमारतीचे भूमिपूजन पालकमंत्री श्री. सामंत यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, जिल्हा आरोग्य अधिकारी अनिरुध्द आठल्ये, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर जगताप, अधिष्ठाता डॉ. रामानंद जयप्रकाश वैद्यकीय अधिष्ठाता डॉ. संघमित्रा फुले, बिपीन बंदरकर आदी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. सामंत म्हणाले, आरोग्याच्या सुविधा निर्माण करताना चांगल्या इमारती हव्यात. ग्रामीण भागातील जनतेला आरोग्याची सुविधा उपलब्ध होण्यासाठी सीसीयूमुळे मदत होणार आहे. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक कॅशलेस हॉस्पीटल रत्नागिरीमध्ये सुरु आहे. लवकरच हॉस्पीटल ऑन व्हील ही संकल्पना जिल्ह्यात आणणार असून, त्यामाध्यमातून घराघरात आरोग्याच्या सुविधा पोहचविल्या जातील. डॉक्टरांनी रुग्णांवर हसत हसत उपचार केले पाहिजेत.

प्रादेशिक मनोरुग्णालय आंतरराष्ट्रीय स्तरावर

काही महिन्यांपूर्वी येथील प्रादेशिक मनोरुग्णालयात एका रशियन महिलेच्या मानसिकतेवर उपचार करण्यात आले. घरच्यांपेक्षाही चांगले उपचार इथे आल्यावर रुग्णांवर होतात. या महिलेवरही तसे उपचार झाल्यानंतर तिला तिच्या कुटुंबाकडे पाठविण्यात आले. एका अर्थाने हे प्रादेशिक मनोरुग्णालय आंतरराष्ट्रीय पोहचविण्याचे काम केले आहे.  त्याबद्दल डॉ. फुले यांना धन्यवाद देतो, असे सांगून पालकमंत्री श्री. सामंत यांनी हे प्रादेशिक मनोरुग्णालय जिल्ह्यातच राहणार आहे. ते कोणत्याही जिल्ह्यात हलणार नाही, अशी ग्वाही दिली. शासकीय कार्यालयांबरोबरच शासकीय रुग्णालये त्याचा परिसर, विशेषत: शौचालये, स्वच्छतागृहे स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. ती जबाबदारी प्रत्येकांनी पार पाडावी, असेही ते म्हणाले.

000

कोल्हापूर जिल्ह्यातील आरोग्य सुविधा वाढविण्यास प्राधान्य – मंत्री प्रकाश आबिटकर

कोल्हापूर, दि. २६ (जिमाका) : सार्वजनिक आरोग्य विभाग कोल्हापूर विभागस्तरावरील कार्यक्रमामध्ये रुग्णसेवाचा दर्जा उंचावण्यासाठी ६ प्राथमिक आरोग्य केंद्रांना रुग्णवाहिका (अॅब्युलन्स) व ०३ व्हॅक्सिन व्हॅनचे लोकार्पण सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण तथा जिल्ह्याचे पालकमंत्री  प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली शेंडा पार्क येथील आरोग्य व कुटुंब कल्याणच्या प्रशिक्षण केंद्र आवारात पार पडले.

आरोग्य विभागातील रुग्ण सेवेचा दर्जा वाढविण्यासाठी दुर्गम भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना रुग्णवाहिका सुविधा देणेसाठी राज्यस्तरीय अनुदानातून सदर रुग्णवाहिका देण्यात आल्या आहेत.

त्यामुळे जिल्ह्यातील दुर्गम भागातील जनतेला रुग्णसेवा उपलब्ध होऊन उपचार व आरोग्य सुविधा देणे सोयीचे होणार आहे. त्यामध्ये हुपरी, पु.शिरोली, गवसे, मडूर, आंबा व माण प्राथमिक आरोग्य केंद्रानां रुग्णवाहिकाचे प्रदान करण्यात आले. जिल्हास्तरावर कोल्हापूर उपसंचालक कार्यालय ०१ व कोल्हापूर जिल्हा परिषद आरोग्य विभाग कार्यालय ०१ व सिंधुदूर्ग जिल्ह्याला ०१ अशा ०३ व्हॅक्सिन व्हॅन प्रदान करण्यात आल्या.

मंत्री श्री. आबिटकर म्हणाले, महाराष्ट्रतील उपलब्ध सोयी सुविधा कोल्हापूर जिल्ह्यासाठी प्राधान्याने उपलब्ध करुन देणे, अधिकारी व कर्मचारी यांची पदे भरणे, आरोग्य सुविधेत विविध साधन सामग्री उपलब्ध करुन कोल्हापुरातील जनतेला उत्तम दर्जाच्या आरोग्य सेवा मिळवून देणे माझी जबाबदारी आहे. सोबतच आरोग्य विभागातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही या सुविधांचा जनतेला कसा प्राधान्याने लाभ देता येईल हे पहावे.

विविध आजारांचा उल्लेख करत लोकांमध्ये विविध आजारची जनजागृती करुन जनतेमधील चुकिच्या माहितीमुळे गैरसमज निर्माण होऊन समाजामध्ये भीती निर्माण होते त्याकरिता आपण अत्यंत चांगल्या प्रकारे प्रचार व प्रसार करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. त्याकरिता विविध माध्यमांचा उपयोग करुन योग्य माहिती प्रसिद्ध करण्यात यावी.

उपलब्ध करुन दिलेल्या वाहनांचा योग्य प्रकारे वापर व देखभाल करुन जनतेच्या आरोग्य सुविधा देणे व जास्तीत जास्त दुर्गम भागातील माता व बालकांना आरोग्य सुविधा त्वरीत उपलब्ध कराव्यात.

आरोग्य सेवा कोल्हापूर मंडळाचे उपंसंचालक डॉ. दिलीप माने यांनी प्रास्ताविक केले.

या कार्यक्रमासाठी कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेन एस., जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुध्द पिंपळे, प्राचार्य कु.क. प्रशिक्षण केंद्र कोल्हापूरचे डॉ. योगेश साळे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुप्रिया देशमुख, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. हर्षला वेदक, जिल्हा कुष्ठरोग अधिकारी डॉ. पालेकर व जिल्ह्यातील आरोग्य विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

०००

पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते जिल्हा परिषदेच्या पीसीआय ॲपचे लोकार्पण

रत्नागिरी, दि. २६ (जिमाका) : जिल्हा परिषद व आयआयटी मुंबई यांच्या सहकार्याने रस्त्यांच्या पृष्ठभागांचा दर्जा ठरविण्यासाठी तयार करण्यात आलेल्या कृत्रिम बुध्दीमत्ता सक्षम पीसीआय ॲपचे लोकार्पण पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते आज करण्यात आले.

रत्नागिरी तालुक्यातील प्रायोगिक तत्त्वावर पाली बौध्दवाडी, पाली पाथरट व चरवेली नागलेवाडी या तीन नळपाणी पुरवठा योजना आयओटी सेंसरवर आधारित ॲटोमेटिक रिमोट मॉनेटरिंग सिस्टीम सुरु करण्याचे उद्घाटनही पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले.

कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील केपीटी इंडस्ट्रीज लि. या कंपनीच्या सीएसआर फंडातून जिल्हा परिषदेला प्राप्त झालेल्या ग्रामपंचायतींना कचरा संकलनासाठी देण्यात येणाऱ्या बॅटरी ऑपरेटेड १५ हायड्रोलिक ई कार्टचे लोकार्पण देखील पालकमंत्री श्री. सामंत यांच्या आज करण्यात आले.

यावेळी मुख्य कार्यकारी कीर्ती किरण पुजार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी परिक्षीत यादव, उप मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल देसाई, विजयसिंह जाधव, गटविकास अधिकारी जे. पी. जाधव, कार्यकारी अभियंता मानसिंग पाटील आदी उपस्थित होते.

000

जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध -शंभूराज देसाई

सातारा, दि.२६ : कृषी, उद्योग व पायाभूत सुविधांना गती देण्याचा कार्यक्रम १०० दिवसांमध्ये प्राधान्याने हाती घेण्यात आला आहे. सातारा जिल्ह्यातील गडकिल्ले संवर्धन, पर्यटन यांनाही चालना देण्यात येत आहे. जलसंपदा विभागाच्या प्रकल्पांना गती देण्यात येत असून सिंचनासाठी पाणी देण्यास शासन कटीबद्ध आहे, अशी ग्वाही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.

सातारा जिल्हा सर्वांगिण विकासीत करुन राज्यात आदर्शवत करण्यासाठी आपण व जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी कटीबद्ध आहोत. आपला देश महासत्ताकडे वाटचाल करित आहे. यामध्ये महाराष्ट्रही मागे नाही. महासत्ता होण्यासाठी सर्वांनी आपले योगदान द्यावे, असेही आवाहन पालकमंत्री श्री. देसाई यांनी यावेळी केले.

येथील छत्रपती शाहू क्रीडा संकुलात प्रजासत्ताक दिनानिमित्त पालकमंत्री श्री. देसाई यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम झाला, त्यावेळी ते बोलत होते. ध्वजवंदनानंतर पोलीस विभागाच्या वतीने मानवंदना दिली. त्यानंतर त्यांनी पोलीस व्हॅनमधून विविध पथकांचे निरीक्षण केले. त्यात पोलीस, गृहरक्षक दल, विविध शाळांची आरएसपी, एनसीसी, स्काऊट गाईडची मुले व मुलींच्या पथकांचा समावेश होता. प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम विविध सांस्कृतीक कार्यक्रमांनी अत्यंत उत्साहात झाला.

मेरे देश की धरती हे समूहगीत, राजं आलं जिंकूनी हे समूह नृत्य आणि शिवकालीन युद्ध कला या सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. या सोहळ्यास जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर जिल्हाधिकारी जीवन गलांडे, उपवनसंरक्षक आदिती भारद्वाज, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, स्वातंत्र्य सैनिक, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, राज्य शासनाने राज्याच्या सर्वांगिण विकासासाठी १०० दिवसांचा विविध क्षेत्रांसाठी कृती कार्यक्रम हाती घेतला असून अनेक प्रकल्पांना याद्वारे गती देण्यात येत आहे. परकीय गुंवणूक वाढवून उद्योग क्षेत्राच्या प्रगतीचे सुकाणु हाती घेण्यात आले आहेत. दावोस येथून १५ लाख कोटी रुपयांच्या परकिय गुंतवणूक प्रकल्पांबरोबर राज्य शासनाने करार केला आहे. सातारा जिल्ह्यात कृषी आणि उद्योग याबरोबरच विविध पर्यटन प्रकल्पांना चालना देण्यात येत आहे. यामध्ये मुनावळे, कोयनानगर, रासाटी या ठिकाणी जल क्रीडा प्रकल्प, कास पुष्पपठार, सह्याद्री वाघ्र प्रकल्प या सर्वांना चालना देण्यात येत आहे. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून जिल्ह्याच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणावर निधी देण्यात येत आहे. सन २०२४-२०२५ साठी अधिकाचा निधी मिळण्यासाठी लवकरच मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांची भेट घेण्यात येणार आहे, असे सांगून पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, जिल्हा नियोजन विकास आराखड्याच्या माध्यमातून आलेला सर्व निधी खर्च करण्यात व दर्जेदार विकास करण्यात सातारा जिल्हा अग्रेसर आहे. आदर्श प्राथमिक आरोग्य केंद्र व माझी शाळा आदर्श शाळा यासारख्या सातारा जिल्ह्याच्या योजनांचे राज्यभर कौतुक होत असून या योजना राज्यासाठी आदर्शवत ठरत आहेत. या दोन्ही उपक्रमांसाठी १५३ कोटींची तरतूद जिल्हा नियोजन आराखड्याच्या माध्यमातून करण्यात आल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमास उपस्थित राहत असतानाच पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी पोवई नाका येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तसेच शहीद कर्नल संतोष महाडिक स्मृती उद्यान येथे पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले.

राष्ट्रध्वजारोहण व राष्ट्रगीत आणि राज्यगीता नंतर अत्यंत शिस्तबद्ध व नेटके असे परेड संचालन आणि चित्ररथ सादरीकरण झाले. यामध्ये पर्यटन विभागाचा पर्यटन रथ, लोकनेते बाळासाहेब देसाई बहुउद्देशीय कृषी संकुल काळोली, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, लखपती दीदी योजना, आदर्श प्राथमिक शाळा, आदर्श प्राथमिक आरोग्य केंद्र, माजी वसुंधरा अभियान पंचायत समिती खंडाळा, फळांचे गाव धुमाळवाडी, सूर्या योजना- मन्याची वाडी, मांगर- मधाचे गाव, बांबू लागवड अभियान, प्रजापिता ब्रह्मकुमारी नारी सशक्तिकरण यांच्या चित्रथाचा समावेश होता. शिक्षण प्रसारक संस्था करंजे पेठ सातारा, श्रीपतराव हायस्कूल करंजे पेठ सातारा आणि संस्थेच्या इतर शाळांचा मिळून समूहगीत, समूह नृत्य, शिवकालीन युद्ध कला यांचा सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला. जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी पालकमंत्री शंभूराजे देसाई यांना संविधानाच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्यघटनेची प्रास्ताविका भेट दिली. या कार्यक्रमात पालकमंत्री देसाई यांच्या हस्ते विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. श्रीमती वीर पत्नी पूजा शंकर उकलीकर यांना ताम्रपट देऊन गौरविण्यात आले. संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानांतर्गत सन २०२३-२४ चे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेतील पुरस्कार अनुक्रमे कवठे- तालुका खंडाळा, दरेवाडी – तालुका वाई,  चोरांबे -तालुका जावळी यांना वितरित करण्यात आले.

पाणी गुणवत्ता पिण्याचे पाणी व सांडपाणी व्यवस्थापन यातील स्वर्गीय वसंतराव नाईक पुरस्कार खटाव तालुक्यातील वरुड ग्रामपंचायतीला व कराड तालुक्यातील खोजेवाडी ग्रामपंचायतीला देण्यात आला.

शौचालय व्यवस्थापनातील स्व.बाबासाहेब खेडकर पुरस्कार सातारा तालुक्यातील धोंडेवाडी ग्रामपंचायतला देण्यात आला.  मान्याची वाडी ता. पाटण, बनवडी ता कराड यांना राज्यस्तर पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल सन्मानपत्र देण्यात आले. कविता उत्तम महांगडे यांना गुणवंत मार्गदर्शक ,जाधव सृष्टी ज्ञानेश्वर यांना गुणवंत महिला खेळाडू, यासार असिफ मुलानी यांना गुणवंत पुरुष खेळाडू , विक्रम जिजाबा शेंडगे यांना गुणवंत दिव्यांग खेळाडू म्हणून गौरविण्यात आले.

गुराणूक प्रमेय प्राविण्य प्राप्त शाळांना प्रोत्साहन पर अनुदान देण्याच्या योजनेअंतर्गत १४ वर्षे वयोगटात आप्पासाहेब भाऊराव पाटील इंग्लिश मीडियम स्कूल सातारा, गुरुकुल स्कूल सातारा, पोद्दार इंटरनॅशनल स्कूल सातारा यांना प्रोत्साहनपर अनुदान वितरित करण्यात आले. १७ वर्षे वयोगटात मुदोजी हायस्कूल व जुनियर कॉलेज फलटण के एस डी शानबाग विद्या सातारा विद्यालय सातारा श्री संत गाडगे महाराज आश्रम शाळा खराडेवाडी यांना अनुदानित करण्यात आले तर १९ वर्षे वयोगटात लालबहादूर शास्त्री महाविद्यालय सातारा , यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स सातारा, सद्गुरु गाडगे महाराज कॉलेज कराड यांना अनुदानित करण्यात आले. भिमाबाई आंबेडकर कन्या महाविद्यालय सातारा येथील विद्यार्थिनी प्राजक्ता शितलकुमार स्वामी खगोलशास्त्रज्ञ हिचा सत्कार करण्यात आला . प्रतीक भोसले आणि ऋषिकेश ढाणे यांना आदर्श शेतकरी म्हणून गौरविण्यात आले.  या कार्यक्रमात अॅग्रिस्टक योजना अंतर्गत सहभागी झालेल्या व शेतकरी ओळख क्रमांक तयार झालेल्या शेतकऱ्यांना प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. शालेय शिक्षण व क्रीडा विभागा अंतर्गत वीर गाथा प्रकल्प ४.० अंतर्गत अंतर मारुती गव्हाणे, वरद संतोष शिंदे, गायत्री धनराज गायकवाड, अथर्व अर्जुन बोरकर, विजयकुमार कोकरे यांना विद्यार्थी शौर्य पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

000

सर्वजण मिळून जिल्ह्याची सर्वांगीण प्रगती करुया  -पालकमंत्री प्रकाश आबिटकर

कोल्हापूर, दि.२६ (जिमाका): विकासाच्या दिशेने वाटचाल करणारा कोल्हापूर जिल्हा औद्योगिक, सामाजिक,  शैक्षणिक, आर्थिक, वैद्यकीय, सांस्कृतिक आणि पर्यटन क्षेत्रात प्रगती करीत आहे. नैसर्गिकरित्या विपुल साधनसंपदेनं नटलेल्या कोल्हापूर जिल्ह्याची नोंद जागतिक पर्यटन स्थळांच्या यादीत लवकरच होईल, असा विश्वास व्यक्त करुन सर्वजण मिळून जिल्ह्याची सर्वांगीण प्रगती करुया, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले.

भारताच्या 76 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते शाहू स्टेडियम येथे मुख्य शासकीय कार्यक्रमात राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली. यावेळी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. तसेच क्षयमुक्त भारताची शपथ पालकमंत्री श्री. आबिटकर यांनी उपस्थितांना दिली. यावेळी जिल्हा प्रशासन व जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने कोल्हापूर जिल्ह्यातील पर्यटनस्थळांवर आधारित तयार करण्यात आलेल्या ‘कोल्हापूर पर्यटन’ पुस्तिकेचे अनावरण पालकमंत्री श्री. आबिटकर यांच्या हस्ते करण्यात आले.

उल्लेखनीय सेवेबद्दल राष्ट्रपती पदक प्राप्त कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांना पालकमंत्र्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. कोल्हापूर जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणारा ऑलिंपिकमध्ये कास्यंपदक विजेता व केंद्र सरकारच्यावतीने सन 2024-25 या वर्षातील अर्जून पुरस्कार प्राप्त खेळाडू स्वप्नील कुसाळे तर दिल्ली येथे आयोजित वर्ल्ड कप खो-खो क्रीडा स्पर्धेत सुवर्ण पदक विजेत्या कुमारी वैष्णवी बजरंग पवार यांचा सन्मान करण्यात आला. हा सन्मान कुटुंबियांनी स्वीकारला.

यावेळी जैन आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी, जिल्हाधिकारी अमोल येडगे, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी, कोल्हापूर महापालिका आयुक्त डॉ. के.मंजुलक्ष्मी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, सारथीच्या सहव्यवस्थापक संचालक किरण कुलकर्णी, अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक जयश्री देसाई, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली तसेच स्वातंत्र्य सैनिकांचे कुटुंबीय व इतर मान्यवर, ज्येष्ठ नागरिक, शालेय विद्यार्थी व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

देशाच्या जडणघडणीमध्ये स्वातंत्र्यपूर्व काळापासून कोल्हापूरकरांचे मोठे योगदान आहे. छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, महाराणी ताराबाई यांच्या पदपावन स्पर्शाने व विचारांनी घडलेला, त्यांच्या वैचारिक मांडणीतून उभा राहीलेला असा कोल्हापूर जिल्हा आहे. पर्यटन, ऐतिहासिक, धार्मिक, औद्योगिक क्षेत्रात आघाडीवर असलेला कोल्हापूर जिल्हा येत्या काळात विविध विकास आराखड्यांमधून देशात अग्रस्थानी नेण्याचा मानस आहे. यासाठी कोल्हापूर जिल्ह्यात केंद्र व राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांमधून सर्वसमावेशक विकास साधण्यासाठी योगदान देण्यात येईल.

कोल्हापूर जिल्ह्याची ओळख पर्यटन जिल्हा म्हणून सर्वदूर आहेच. यातून प्रगतीचा आणि विकासाचा नवा मार्ग सुरु होण्यासाठी येत्या काळात नवनवीन उपक्रम हाती घेण्यात येणार आहेत.  राज्य शासनाच्या कल्याणकारी योजनांमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, बळीराजा मोफत वीज योजना, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना अशा अनेक लोकहिताच्या योजनांबरोबरच मुख्यमंत्री 100 दिवस कृती आराखडा, 7 कलमी कार्यक्रम अशा उपक्रमांच्या माध्यमातून लोकहिताला प्राधान्य देण्यात येत आहे.

जिल्ह्याच्या विकासासाठी सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना सन 2024-25 अंतर्गत 576 कोटी रुपयांचा निधी मंजूर आहे. तसेच येत्या काळात जिल्ह्यातील प्रत्येक घटकासाठी आवश्यक असणारा निधी प्राधान्याने आणण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. कोल्हापूर येथे कोल्हापूर इंटरनॅशनल कन्वेन्शन सेंटर उभारण्यासाठी नुकताच निधीही मंजूर झाला आहे. तीर्थक्षेत्र विकास आराखडा अंतर्गत श्री करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवस्थान परिसर विकास आराखडा, श्री क्षेत्र जोतिबा व आजूबाजूच्या डोंगर परिसरातील गावांच्या विकासाचा आराखडा सादर करण्यात आला आहे.

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत सन 2024-25 साठी भरीव तरतूद करण्यात आली असून जिल्ह्यात 1 हजार 482 लाभार्थी असून राज्यात अनुदान वितरणात कोल्हापूर जिल्हा अग्रेसर आहे.

अनुसूचित जाती उपयोजनेंतर्गत सन 2023-24 या आर्थिक वर्षामध्ये सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण विभागामार्फत मागासवर्गीयांच्या विविध कल्याणकारी योजना आणि विकास कामांसाठी 117 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. तसेच नाविण्यपूर्ण योजनेतून सन 2023-24 मध्ये सामाजिक न्याय विभागाच्या सर्व शासकीय निवासी शाळा व सर्व शासकीय वसतिगृहामध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेकरिता सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत. जिल्हा परिषदेने नुकतेच जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये लोकसहभागातून सीसीटीव्ही बसवून एक चांगला आदर्श संपूर्ण महाराष्ट्रासाठी निर्माण केला आहे. यामुळे जिल्ह्यातील सर्व शाळा सुरक्षित होण्यास मदत होणार आहे.

अर्जून पुरस्कारप्राप्त स्वप्नील कुसाळे याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून जिल्ह्यातील युवकांनी जिल्ह्याची मान उंचविण्यासाठी प्रयत्न करावेत. या प्रयत्नांना बळ देण्यासाठी शासन येथील क्रीडा सुविधांमध्ये वाढ करीत आहे. अद्यावत शुटींग रेंज तयार करण्यात आली आहे. याचबरोबर क्रीडा क्षेत्रात आवश्यक सर्व सुविधा याठिकाणी उपलब्ध होत आहेत.

कोल्हापूर जिल्ह्यातील महापुराचे नियंत्रण करणे या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला जागतिक बँकेने मंजुरी दिली आहे. 3 हजार 200 कोटींच्या या प्रकल्पासाठी जागतिक बँक वित्तसहाय्य करणार आहे. पंचगंगा प्रदूषणमुक्तीसाठी शासनामार्फत उपाययोजना राबविण्यात येत आहेत.

जिल्ह्यात पी.सी.पी.एन.डी.टी. तसेच एम.टी.पी. कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जनजागृती करण्यात येत आहे. शेंडा पार्क येथे राजर्षी छत्रपती शाहु महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सर्व सोयींनीयुक्त तयार होत आहे. येथील नवीन बांधकाम, इमारतींचे नुतनीकरण, परिसरातील रस्त्याची दुरुस्ती, आंतर्बाह्य सुशोभीकरणाची कामे करण्यात येणार असून ही बाब विद्यार्थ्यांच्या दीर्घकालीन कल्याणाच्या दृष्टीने उपयोगी आहे.

कोल्हापूर जिल्हा पोलीस दलाकडून जिल्ह्यात ६ तालुक्यात  6 निर्भया पथके स्थापन करण्यात आली असून या पथकाकडून महिला, मुलींची छेडछाड करणाऱ्या व्यक्तीवर, तसेच शाळा, कॉलेज व इतर ठिकाणी बेदरकारपणे भरधाव वेगाने वाहन चालविणाऱ्या मोटर सायकलस्वारांवर कारवाई केली जात आहे.

केंद्र सरकारच्या डिजीटल पब्लिक इन्फ्रास्टक्चर फॉर ॲग्रीकल्चर अंतर्गत ॲग्रीस्टॅक हा प्रकल्प संपूर्ण देशात राबविण्यात येत आहे. शेतकऱ्यांना यातून शेतकरी ओळख क्रमांक दिला जाणार आहे. केंद्र आणि राज्य शासनाच्या योजनांचा लाभ देण्यासाठी शेतकरी ओळख क्रमांक हा मुलभूत घटक ठरणार आहे. जिल्ह्यामध्ये ६ हजार ४१५ नागरी सुविधा केंद्रामध्ये ही कार्यवाही करण्यात येत आहे. आज यातील काही शेतकऱ्यांना प्रातिनिधीक स्वरूपात ओळख क्रमांकाचे वाटपही याठिकाणी होत आहे.

शासनाच्या विविध सेवा नागरिकांपर्यंत वेळेत पोहोचविणे हा महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 अंतर्गत तयार केलेल्या पथदर्शी प्रकल्पाचा प्रमुख उद्देश आहे.  या अभिनव उपक्रमांव्दारे नागरिक व प्रशासन यांच्या दरम्यान ठोस नातंही निर्माण होईल. जिल्हा प्रशासनाने घरपोच सेवा, सेवा वाहिनी, आपले सरकार वेब पोर्टल आरटीएस मोबाईल ॲप्लिकेशन, व्हाट्सॲप चॅटबॉट, प्रत्येक तालुक्यात एक आदर्श आपले सरकार सेवा केंद्र, लोकांच्या तक्रारीसाठी सुरु केलेली क्युआर कोड संकल्पना तसेच कार्यालयांचं मानांकन इत्यादी घटकांमधून प्रशासन गतीमान करण्याचे नियोजन आहे. महसूल प्रशासनाने जानेवारी २०२५ अखेर नागरिकांना १ लक्ष विविध दाखले देण्याचा उपक्रम हाती घेतला असून सर्वांच्या प्रयत्नांतून जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधला जाईल असा विश्वास यावेळी व्यक्त केला.

जिल्ह्यातील स्वातंत्र्य सैनिक व त्यांच्या वारसांचा देशाच्या स्वातंत्र्यासाठी दिलेल्या योगदानाप्रित्यर्थ पालकमंत्री श्री. आबिटकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

कोल्हापूर पर्यटन पुस्तिकेचे अनावरण

जिल्हा प्रशासन व जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने कोल्हापूर जिल्ह्यातील पर्यटन स्थळांवर आधारित तयार करण्यात आलेल्या ‘कोल्हापूर पर्यटन’ पुस्तिकेचे अनावरण पालकमंत्री श्री. आबिटकर यांच्या हस्ते झाले. जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये असणाऱ्या विविध पर्यटनस्थळांची माहिती व आकर्षक छायाचित्रे या पुस्तिकेत देण्यात आली आहे. तसेच प्रत्येक पानावर क्यूआरकोड देण्यात आला असून  हा क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर त्या-त्या ठिकाणी जाण्याचा मार्ग व अंतर पाहता येईल.

यावेळी झालेल्या शानदार संचलनाद्वारे राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली. पालकमंत्री श्री. आबिटकर यांच्या हस्ते विविध विभागांच्या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करण्यात आले.

यावेळी, तसेच विविध विभागांचे अधिकारी, स्वातंत्र्य सैनिक, त्यांचे वारस, पत्रकार, विद्यार्थी, नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमानंतर पालकमंत्री श्री. आबिटकर यांनी उपस्थित स्वातंत्र्य सैनिक, माजी सैनिक, निमंत्रितांची भेट घेवून प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमास स्वातंत्र्य सैनिक व त्यांचे वारस, माजी सैनिक, पदाधिकारी, ज्येष्ठ नागरिक, विविध विभागांचे अधिकारी-कर्मचारी, पत्रकार, विद्यार्थी, पालक, नागरिक उपस्थित होते. सांस्कृतिक कार्यक्रमाने कार्यक्रमाचा शेवट झाला.

विविध क्षेत्रात उत्कृष्ट काम केलेल्या व्यक्तींचा सन्मान

उल्लेखनीय सेवेबद्दल राष्ट्रपती पदक प्राप्त कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांना पालकमंत्री श्री. आबिटकर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. कोल्हापूर जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणारा ऑलिंपिकमध्ये कास्यंपदक विजेता व केंद्र शासनाच्यावतीने सन 2024-25 या वर्षातील अर्जून पुरस्कार प्राप्त खेळाडू स्वप्नील कुसाळे तर दिल्ली येथे आयोजित वर्ल्ड कप खो-खो क्रीडा स्पर्धेत सुवर्ण पदक विजेत्या कुमारी वैष्णवी बजरंग पवार यांचा सन्मान करण्यात आला. हा सन्मान कुटुंबियांनी स्वीकारला.

पोलीस दलामध्ये उत्कृष्ट कामगिरीबाबत मा. राष्ट्रपती महोदय यांचे गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल पोलीस पदक प्राप्त पोलीस अंमलदार आयुबखान मुल्ला यांचा सन्मान करण्यात आला.

छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) या संस्थेमार्फत छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्तीस पात्र ठरलेल्या शिक्षकांना उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल सन्मान करण्यात आला. छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) या संस्थेमार्फत छत्रपती राजाराम महाराज सारथी युवा व्यक्तीमहत्व विकास व संगणक कौशल्य विकास प्रशिक्षामध्ये सर्वाधिक प्रशिक्षणार्थ्यांना लाभ दिल्याबद्दल केंद्र चालकांचा सन्मान करण्यात आला. सहायक संचालक इतर मागास बहूजन कल्याण कोल्हापूर, महाज्योती, नागपूर इतर मागास बहूजन कल्याण विभागामार्फत विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते टॅबचे वाटप करण्यात आले.

जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर ॲग्रीस्टॅक योजना अंमलबजावणी – शेतकरी माहिती संज निर्मितीमध्ये उस्फुर्त प्रतिसाद नोंदिविल्याबाबत सन्मानपत्र प्रदान केले.

कोल्हापूर महानगरपालिका अग्नीशमन विभागातील विविध वर्दीवर व स्पेशल कॉलमध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल वाहनचालक व फायरमन यांचा सन्मान तसेच कोल्हापूर महानगरपालिका आरोग्य स्वच्छता विभागातील कर्मचाऱ्यांचा उत्कृष्ट कार्याबद्दल सत्कार करण्यात आला.

कोल्हापूर महानगरपालिका प्राथमिक शिक्षण समितीच्या टेंबलाईवाडी विद्यालयाचे शालेय विद्यार्थी व  शिक्षण विभाग (माध्यमिक) शालेय पद्माराजे गर्ल्स हायस्कूल 250, एस.एम. लोहिया 250 व न्यू हायस्कूल 250 असे एकूण 750 विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम साजरा केला.

०००

धिरुभाई अंबानी डिफेन्स क्लस्टरमधून बंदुकांची निर्मिती रत्नागिरीमध्ये -पालकमंत्री उदय सामंत

कशेळी गाव होणार संपूर्ण सौर ऊर्जेवर

रत्नागिरी, दि. २६ (जिमाका) : धिरुभाई अंबानी डिफेन्स क्लस्टरमधून सैनिकांच्या हातातील बंदुका रत्नागिरीमध्ये निर्मिती होणार आहेत. विजेच्या बाबतीत ग्रामपंचायतींना सक्षम करण्याचे काम राज्यात प्रथमच गोळप सौर प्रकल्पाने केले आहे. दुसरा प्रकल्प गुहागरमध्ये मूर्त स्वरुप घेत आहे. कशेळी हे संपूर्ण गाव सौर ऊर्जेवर करण्यात येणार आहे, असे सांगतानाच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पुढेही सुरु राहणार असल्याचे पालकमंत्री उदय सामंत म्हणाले.

छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियममध्ये मुख्य शासकीय सोहळ्यात देशाच्या ७६ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त पालकमंत्री श्री. सामंत यांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकवून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. यावेळी जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी आदींसह विभागप्रमुख उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. सामंत म्हणाले, सोहळ्यास उपस्थित सन्माननीय स्वातंत्र्य सैनिक, त्यांचे कुटुंबीय, लोकप्रतिनिधी, अधिकारी तसेच कर्मचारी, पत्रकार मित्र आणि जिल्ह्यातील सर्व नागरिकांना प्रजासत्ताक दिनाच्या सर्वप्रथम मी मन:पूर्वक शुभेच्छा देतो.

जगात सर्वात मोठी लोकशाही असणाऱ्या आपल्या भारत देशाला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून मजबूत केले आहे. समाजवादी, धर्मनिरपेक्ष, न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मुल्यांवर आपल्या देशाची गतिमान पाऊले पडत आहेत. सर्वसामान्य नागरिक हा आपल्या लोकशाहीचा, विकासाचा केंद्रबिंदू आहे.

देशाचे प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदीजी यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या देशाचा दबदबा जगात वाढत चालला आहे.

सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना चालू आर्थिक वर्षाचा रू.३६० कोटी इतका मंजूर अर्थसंकल्पीय नियतव्यय असून, जिल्ह्याच्या विकासावर तो १०० टक्के खर्च होईल. राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार यांच्या नेतृत्त्वाखाली दावोस येथे १५ लाख ७० हजार कोटींचे सामंजस्य करार करण्यात आले. त्यापैकी ४० हजार कोटींचे सामंजस्य करार रत्नागिरी शहरासाठी आहेत. त्यामुळे २५ ते ३० हजार युवक-युवतींना आता रोजगार उपलब्ध होणार आहे.

रत्नागिरी जिल्हा हा पर्यटनाच्यादृष्टीने अतिशय महत्त्वाचा जिल्हा आहे. पर्यटनाचे वेगवेगळे प्रकल्प जिल्ह्यात व्हावेत, अशी सर्वांची इच्छा होती. कोट्यवधी रुपये खर्च करुन जिल्ह्यामध्ये पर्यटन स्थळे विकसित होत आहेत. तालुकाच्या ठिकाणी शिवसृष्टी ही संकल्पना महाराष्ट्रात प्रथम जिल्ह्यात उदयास आली. दापोली, चिपळूण, रत्नागिरी, राजापूर याठिकाणी शिवसृष्टी उभारण्यात यशस्वी झालो. उर्वरित तालुक्यातही शिवसृष्टी उभारण्याचे काम दोन वर्षात केले जाईल. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शांने पावन झालेल्या जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे संशोधन केंद्र तयार होत आहे. याचा उपयोग देशातील आणि परदेशातील शिवप्रेमींना होणार आहे.  देशातला पहिला थ्रिडी मल्टीमीडिया शो महिनाभरात लोकार्पण करत आहोत.

२०० कोटी रुपये खर्चून रत्नागिरीत झालेल्या टाटा कौशल्यवर्धन केंद्रातून ५ हजार विद्यार्थी पुढे येणार आहेत. कोट्यवधी रुपयांचा विमा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळाला आहे. रत्नागिरी शहरातील नवीन प्रशासकीय इमारत, जिल्हा परिषदेची इमारत असेल, पोलीस अधीक्षकांचे कार्यालय असेल या सर्व इमारती ८०० कोटी रुपये खर्चून सुसज्ज होत आहेत. २४ कोटी रुपये मधून निर्माण होणाऱ्या क्रीटीकल केअर युनिटचे भूमिपूजन आज होणार आहे. प्रादेशिक मनोरुग्णालयाची इंग्रजकालीन वास्तू डागडुजी करण्यासाठी १४ कोटी मंजूर करण्यात आले आहेत. त्याचे काम सुरु आहे. प्रादेशिक मनोरुग्णालय हे कुठेही जाणार नाही, जिल्ह्यातच राहणार आहे, अशी खात्रीही पालकमंत्र्यांनी दिली.

भविष्यामध्ये सैनिकांच्या हातातील बंदुकांचा कारखाना हा आपल्या रत्नागिरीमध्ये आणण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करतोय, त्यासाठी दावोस १६ हजार ५०० कोटींचा सामंजस्य करार धिरुभाई अंबानी डिफेन्स क्लस्टरबरोबर झाला आहे. हा आपणा सर्वांचा अभिमान व स्वाभिमान आहे, असे सांगून पालकमंत्री म्हणाले, थिबा राजाने ज्या ठिकाणी भगवान गौतम बुध्दांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली होती, त्याठिकाणी साडेआठ कोटी खर्चून बौध्द विहाराची वास्तूचे काम सुरु करण्यात आले आहे. देशातील पहिले सागरी विद्यापीठ रत्नागिरीत होत आहे, त्याची सुरुवात वर्षभरात करायची आहे. पुस्तकांचे गाव मालगुंडला केले जाईल, त्यासाठी सव्वा कोटी रुपये मराठी विभागाकडून दिले जातील. भविष्यातही देशाची, झेंडाची शान अशीच कायम ठेवावी, त्यासाठी देशभक्तीपर कार्यक्रम प्रशासनाकडून राबविले जावेत, असेही पालकमंत्री म्हणाले.

पालकमंत्री श्री. सामंत यांनी परेड निरीक्षण केले. यानंतर पोलीस पथक, महिला पोलीस पथक, गृह रक्षक दल, पोलीस बँड पथक, गृह रक्षक महिला पथक, एनसीसी स्काऊट गाईड, एनसीसी नेवल, नवोदय विद्यालय स्टुडन्ट पोलीस कॅडेट, विराट श्वान पथक, जलद प्रतिसाद पथक, अग्नीशामन दल, उमेद टुरिस्ट व्हॅन, प्राथमिक शिक्षक  विभाग आदींनी संचलन करुन मानवंदना दिली. यामध्ये गोगटे जोगळेकर महाविद्यालय, ए डी नाईक गर्ल्स हायस्कूल, गोदुताई जांभेकर विद्यालय, पटवर्धन हायस्कूल, शिर्के हायस्कूल, मेस्री्ट हायस्कूल, कॉन्वेन्ट स्कूल आदींचा सहभाग होता.

समाजकल्याण विभागामार्फत संविधानाच्या उद्देशिकेची प्रत प्रदान

समाजकल्याण कार्यालयाच्यावतीने घर घर संविधान अंतर्गत जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते पालकमंत्र्यांना संविधानाच्या उद्देशिकेची प्रत प्रदान करण्यात आली. त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिक सुलभा श्रीपाद धाकरस, तृतीयपंथी पल्लवी प्रकाश परब आणि दिव्यांग प्रशांत महेंद्र सावंत यांना पालकमंत्र्यांच्या हस्ते संविधानाच्या उद्देशिकेची प्रत देण्यात आली. यावेळी सहाय्यक आयुक्त दीपक घाटे उपस्थित होते.

पालकमंत्र्यांच्या हस्ते विविध सत्कार

ध्वजदिन निधी संकलनामध्ये उत्कृष्ट काम केल्याबद्दल जिल्हाधिकारी श्री. सिंह, निवासी उपजिल्हाधिकारी श्री. सूर्यवंशी यांचा सत्कार करण्यात आला. फोर्सवन पथकामध्ये विशेष सेवा पथक सोहेल इक्बाल ढगे, उत्कृष्ट उद्योजक शर फरद्दीन अब्दुला साखरकर, शिराजउद्दीन अब्दुला साखरकर प्रथम पुरस्कार, दत्तात्रय जाधव द्वीतीय पुरस्कार, आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरीबद्दल प्रशांत महेंद्र सावंत यांचा सत्कार करण्यात आला.

अग्रीस्टॅक योजनेमध्ये शेतकरी ओळख क्रमांक सन्मानपत्र उमेश लाड, दत्तात्रय सोहोनी आणि संतोष सकपाळ यांना देण्यात आले.

सांस्कृतिक कार्यक्रमांनी विद्यार्थ्यांनी स्टेडियम जिंकले

सेक्रेट हार्ट कॉन्व्हेंट हायस्कूल सिटी रत्नागिरीने वंदन भारतमातेला व संविधानाला, एम. एस. नाईक हायस्कूलने भारत का नया चेहरा आणि पटवर्धन हायस्कूलने देशभक्तीपर नृत्य सादर करुन उपस्थितांना भारावून टाकले. यावेळी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या अप्रतिम सांस्कृतिक कार्यक्रमाने स्टेडियम जिंकले.

000

ताज्या बातम्या

महाराष्ट्र दिनानिमित्त राज्यपालांचे वाणिज्यदूतांसाठी चहापान

0
मुंबई, दि. २९  : दिनांक १ मे रोजी साजरा होत असलेल्या महाराष्ट्र राज्य स्थापना दिनाचे औचित्य साधून राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत...

नागरिकांना वेळेत सुविधा मिळण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे – राज्यमंत्री माधुरी मिसाळ

0
पुणे महापालिकेत महाप्रितच्या सहकार्याने राबविण्यात येणाऱ्या प्रकल्पांचा आढावा मुंबई, २८: पुणे महानगरपालिका आणि महात्मा फुले नविनीकरणीय ऊर्जा व पायाभूत प्रौद्योगिकी महामंडळ (महाप्रित) यांच्या संयुक्त विद्यमाने...

खाडीत सोडण्यात येणाऱ्या प्रदूषित पाण्यामुळे मासेमारीवर होणाऱ्या परिणामासंदर्भात अभ्यास समिती स्थापन करावी – सभापती...

0
मुंबई दि. २९ :- राज्यातील मुंबई, ठाणे, बेलापूर, उलवे, तळोजा येथील खाड्यांमध्ये औद्योगिक क्षेत्रामधून सोडण्यात येणारे सांडपाणी आणि डंम्पिंग ग्राऊंडचा कचरा यामुळे प्रदूषण वाढत असून त्याचा फटका मासेमारी...

जिगाव प्रकल्पाच्या भूसंपादनाबाबत आठ दिवसात नव्याने प्रस्ताव सादर करावा – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

0
मुंबई दि. २९ : बुलढाणा जिल्ह्यातील जिगाव प्रकल्पाच्या भूसंपादनाबाबत शेतकऱ्यांनी 40 टक्के वाढीव मोबदला मागितला आहे. त्यामुळे 8 हजार 782 दावे प्रलंबित असून ते निकालात...

सुरक्षा रक्षक मंडळाच्या नोंदणीकृत कर्मचाऱ्यांचा खाकी गणवेश; १ मे पासून अंमलबजावणी – कामगार मंत्री ॲड.आकाश...

0
मुंबई, दि. 29 : राज्यातील नोंदणीकृत सुरक्षा कर्मचाऱ्यांसाठी खाकी रंगाच्या गणवेशास शासनाने मान्यता दिली. यामध्ये टोपी निळ्या रंगाची असून, त्यावर सुरक्षा रक्षक मंडळाचा लोगो...