मंगळवार, एप्रिल 29, 2025
Home Blog Page 240

 प्रशासकीय इमारत व नियोजन भवनाचे कामे करतांना टिकाऊ व दर्जेदार कामे करावी  – अजित पवार

जालना,(जिमाका)दि.२० : प्रशासकीय इमारत व नियोजन भवनाचे कामे करतांना टिकाऊ व दर्जेदार कामे करावीत. तसेच यात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज प्रशासकीय इमारत व नव्याने तयार करण्यात आलेल्या नियोजन भवनाच्या पाहणी प्रसंगी दिले.

 

यावेळी आमदार नारायण कुचे, आमदार विक्रम काळे, माजी आमदार सतिष चव्हाण, जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, पोलीस अधिक्षक अजयकुमार बंसल, निवासी उपजिल्हाधिकारी गणेश महाडीक, उपजिल्हाधिकारी न्रमता चाटे, उपविभागीय अधिकारी श्रीमंत हारकर, जिल्हा नियोजन अधिकारी श्री. सुर्यवंशी आदींची उपस्थिती होती. प्रशासकीय इमारत व नियोजन भवन येथील देखभाल दूरुस्ती सह इतर कामांची पाहणी करतांना उपमुख्यमंत्री पवार यांनी जिल्हाधिकारी डॉ. पांचाळ यांच्याकडून कामाबाबतची सविस्तर माहिती घेतली. तसेच सदर कामे करतांना सुरक्षितेच्यादृष्टीने प्रामुख्याने वीज, सोलर पॅनल, पायऱ्या, अग्निशमन यंत्रणा दर्जेदार कराव्यात. सदर कामे पूर्ण झाल्यावर देखभाल दुरुस्तीसह कार्यालय व परिसर नेहमी स्वच्छ राहिल याची दक्षता घेण्याच्या सूचना यावेळी उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी दिल्या.

क्रेडाईने एसटी महामंडळाची जमीन विकसित करण्यासाठी योगदान द्यावे – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई, दि. 20 : एसटी महामंडळाच्या 1360 हेक्टर जमिनीचा विकास करण्यासाठी क्रेडाई (CREDAI) या संस्थेने आपले योगदान द्यावे, असे आवाहन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले आहे. परिवहन मंत्री श्री.सरनाईक यांनी ‘महाराष्ट्र चेंबर ऑफ हाऊसिंग इंडस्ट्रीज’ने आयोजित केलेल्या प्रदर्शनाला भेट दिली. त्याप्रसंगी मंत्री बोलत होते.

मंत्री श्री. सरनाईक म्हणाले की, एसटी महामंडळाचे राज्यभरात 842 ठिकाणी 1360 हेक्टर जमीन उपलब्ध आहे. या जागांचे शहरी, निम-शहरी आणि ग्रामीण असे वर्गीकरण करण्यात आले आहे. ‘बांधा वापरा आणि हस्तांतरित करा’ अथवा खाजगी सार्वजनिक भागीदारी तत्त्वावर या जमिनी विकसित करून तेथे एसटी महामंडळाला आवश्यक असलेली बसस्थानके, आगार आणि आस्थापना कार्यालय संबंधित विकासकाकडून बांधून घेण्यात यावीत. त्याचबरोबर जिल्ह्याच्या ठिकाणी किमान 100 खाटांचे अद्ययावत रुग्णालय, इलेक्ट्रिक बस चार्जिंग स्टेशन, रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि सोलर पॅनलसारखे पर्यावरण पूरक प्रकल्प उभारणे अपेक्षित आहे. या बदल्यात संबंधित विकासकाला त्या जमिनीवर त्याच्या सोयीनुसार व्यावसायिक क्षेत्र विकसित करता येईल.

यासंदर्भातील सर्वसमावेशक धोरण लवकरच एसटी महामंडळ आणणार असून यासाठी सूचना आणि प्रस्ताव क्रेडाई यासारख्या देशातील रिअल इस्टेट क्षेत्रातील नामवंत संस्थेने द्यावेत, असे आवाहनही क्रेडाई मंत्री श्री. सरनाईक यांनी केले. याप्रसंगी क्रेडाईचे अध्यक्ष डॉमनिक रोमेल व इतर पदाधिकारी, विकासक, वास्तुविशारद उपस्थित होते. एसटी महामंडळातर्फे वास्तुविशारद निलेश लहिवाल यांनी महामंडळाचे सादरीकरण केले.

00000

निलेश तायडे/स.सं

देशाला पहिलं खोखो विश्वविजेतेपद जिंकून देणाऱ्या भारतीय संघातील महाराष्ट्रीय खेळाडूंचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिनंदन

मुंबई, दि. 20 :- नवी दिल्लीत झालेली पहिली जागतिक अजिंक्यपद खोखो स्पर्धा जिंकून विश्वविजेता ठरलेल्या भारताच्या पुरुष आणि महिला संघांतील खेळाडू तसेच संघ प्रशिक्षकांचे उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांनी अभिनंदन केले आहे. भारतीय पुरुष संघाचे नेतृत्व प्रतिक वाईकर आणि महिला संघाचे नेतृत्व प्रियांका इंगळे या महाराष्ट्राच्या खेळाडूंनी केले. विशेष म्हणजे प्रियांका मूळची बीड आणि सध्या पुणे तर, प्रतिक हा पुणे जिल्ह्यातील आहे. योगायोग म्हणजे या दोन्ही जिल्ह्यांचे पालकमंत्रीपद अजितदादांकडेच असून या विश्वविजेत्या दोन्ही कर्णधारांचे त्यांनी विशेष कौतुक केले आहे.

नवी दिल्लीत झालेल्या पहिल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताच्या पुरुष व महिला या दोन्ही संघांनी दमदार खेळ करत नेपाळवर एकतर्फी विजय मिळवला. विश्वविजेत्या भारतीय संघात कर्णधार प्रतीक वाईकर याच्यासह सुयश गरगटे, अनिकेत पोटे, आदित्य गनपुले व रामजी कश्यप या पाच महाराष्ट्राच्या खेळाडूंचा समावेश होता. तर विश्वविजेत्या महिला संघात कर्णधार प्रियांका इंगळे हिच्यासह कु. अश्विनी शिंदे, कु. रेश्मा राठोड, वैष्णवी पवार या महिला खेळाडू महाराष्ट्राच्या होत्या. या खेळाडूंसह पुरुष संघाचे प्रशिक्षक पुण्याचे शिरीन गोडबोले, महिला संघाच्या प्रशिक्षक पुण्याच्या प्राचीताई वाईकर तसेच फिजिओथेरेपिस्ट डॉ. अमित रावहाटे यांचेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिनंदन केले असून भविष्यातील यशस्वी क्रीडा कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

शिऊर बंगला ते नांदगाव रस्त्याच्या कामाचे पालकमंत्री शिरसाट यांच्या हस्ते भूमिपूजन

छत्रपती संभाजीनगर, दि.१९(जिमाका)- वैजापूर तालुक्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून भरघोस निधी देऊ व येथील जनतेची कामे करु असे आश्वास्न  राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाठ यांनी आज तलवाडा ता. वैजापूर येथे केले.तलवाडा येथे शिऊर बंगला ते नांदगाव यामार्गाच्या भूमिपुजन कार्यक्रमात  ते बोलत होते.

तलवाडा येथे पालकमंत्री संजय शिरसाठ यांच्या हस्ते शिऊर बंगला ते नांदगाव मार्गाचे सिमेंट कॉंक्रिटीकरण  कामाचे भूमिपूजन आज करण्यात आले. आमदार प्रा. रमेश बोरनारे, कन्नडच्या आमदार संजना जाधव, माजी आमदार भाऊसाहेब चिकटगावकर, अभय चिकटगावकर, राजेंद्र जंजाळ आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

त्यानंतर पालकमंत्री शिरसाट यांचा नागरी सत्कार आयोजित करण्यात आला. संजय निकम, साबेर खान, राजीव डोंगरे, बाबासाहेब जगताप, ज्ञानेश्वर जगताप,भागीनाथ मगर, रामहरी जाधव, राजेंद्र मगर, नारायण कवडे, विशाल शेळके,  संजय बोरनारे, कल्याण दंगोडे,  रिखाब पाटणी, कचरू डिके, उत्तमराव निकम, एल एम पवार,गोरख आहेर, प्रशांत शिंदे,प्रभाकर जाधव, अंबादास खोसे, बाबासाहेब राऊत, किशोर मगर, अनिल भोसले, संतोष सूर्यवंशी, शांताराम मगर, राजेंद्र साळुंके, सुभाष आव्हाळे, राधाकृष्ण सोनवणे, प्रमोद मगर, भारत साळुंके, डॉ अर्जुन साळुंके, बाळासाहेब जाधव, यांच्यासह तलवाडा, शिऊर, लोणी खुर्द, वाकला आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

०००००

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील अतिविशेषोपचार रुग्णालयाचे लोकार्पण

घाटीच्या विकासासाठी एकत्रित निधी देणार – पालकमंत्री संजय शिरसाट

छत्रपती संभाजीनगर, दि.१९(जिमाका)- शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणि संलग्न रुग्णालयात गोरगरीब रुग्ण मोठ्या संख्येने उपचारासाठी येतात. त्यांना उत्तम उपचार सुविधा देण्यासाठी शासन कटीबद्ध आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व संलग्न रुग्णालयात अवयव प्रत्यारोपण सुविधांसह सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्यात येतील,असे आश्वासन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज येथे दिले.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील (घाटी रुग्णालय) सर्व सुविधांचा विकास करणे ही आमची जबाबदारी असून पालकमंत्री म्हणून सर्व कामांसाठी एकत्रित निधी देणार,अशी घोषणा राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी केली.

येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आज अतिविशेषोपचार रुग्णालयाचे उद्घाटन  व आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय घटकांसाठी करावयाच्या सुविधांचे भुमिपूजन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते व पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते करण्यात आले.

त्यानंतर बजाज शैक्षणिक संकुलात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. केंद्रीय राज्यमंत्री (स्वतंत्र पदभार) आयुष, आरोग्य आणि कुटूंब कल्याण मंत्रालय प्रतापराव जाधव हे दुरदृष्य प्रणालीने या कार्यक्रमात सहभागी होते. राज्याचे सामाजिक न्यायमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट, राज्यसभा सदस्य डॉ. भागवत कराड, विधान परिषद सदस्य आ. सतिष चव्हाण, आ. विक्रम काळे, वैद्यकीय शिक्षण विभागाचे आयुक्त राजीव निवतकर, संचालक डॉ. अजय चंदनवाले, अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे, विशेष कार्य अधिकारी डॉ. वैशाली उणे आदी उपस्थित होते.

वैद्यकीय शिक्षण मंत्री मुश्रीफ म्हणाले की, वैद्यकीय शिक्षण विभागाचे काम रुग्णांना सेवा देतांनाच समाजासाठी चांगले डॉक्टर्स घडविणे हे सुद्धा आहे. त्यामुळे चांगली रुग्णसेवा देतांनाच दर्जेदार शिक्षण देण्याचे काम या विभागामार्फत होत असते. मेरीट मध्ये आलेले विद्यार्थी येथे शिक्षण घेतात. त्यांना शिक्षणाची, रहिवासाची चांगली सुविधा उपलब्ध करण्यात येते. याशिवाय येणारे गोरगरीब रुग्णांना दर्जेदार सेवा देणे हे सुद्धा आमचे कर्तव्य आहे. संलग्नित खाजगी व धर्मादाय रुग्णालयात योजनांद्वारे आर्थिक मदत देऊन उपचार दिले जातात. असे असले तरी रुग्णांना दर्जेदार सेवा देण्यासाठी शासकीय रुग्णालये बळकट करण्याचे आमचे धोरण आहे. येत्या वर्षभरात शासकीय रुग्णालयांमध्ये अवयव प्रत्यारोपणासारख्या उपचार सुविधांसोबत सर्व सेवा देण्यात येतील,असे नियोजन आहे. येथे येणाऱ्या प्रत्येक गोरगरीब रुग्णाला चांगली सेवा द्या. गोरगरिबांची सेवा हीच परमेश्वराची सेवा आहे,असे मुश्रीफ यांनी सांगितले.

पालकमंत्री शिरसाट म्हणाले की, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टर्सच्या सुविधांकडे अधिक लक्ष पुरविण्यात येईल. या शहराचे वैभव आणि ओळख असलेल्या या रुग्णालयात सुविधा देण्याची जबाबदारीही पालकमंत्री म्हणून आपली आहे. तेव्हा अधिकाधिक दर्जेदार सुविधा देण्यासाठी एकत्रित निधी देण्याचा प्रयत्न करु. रुग्णालयात आणि महाविद्यालयात लोकप्रतिनिधी, रुग्ण, समाजसेवक अशा सगळ्यांशी सुसंवाद व्हावा व त्यासाठीही प्रयत्न व्हावेत,असे निर्देशही त्यांनी दिले.

खा. डॉ. भागवत कराड व वैद्यकीय शिक्षण आयुक्त राजीव निवतकर  यांनीही आपेल मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक अधिष्ठाता डॉ. सुक्रे यांनी केले. सुत्रसंचालन डॉ. अर्चना दरे यांनी तर डॉ.वैशाली उणे यांनी आभार मानले.

०००००

खो-खो महिला-पुरुष संघाने विश्व चषक जिंकला

राज्य शासनाने दिलेल्या दहा कोटींच्या निधीबद्दल खेळाडूंनी मानले आभार

मुंबई, दि. १९ : खो-खो चा पहिला विश्वचषक दिल्लीतील इंदिरा गांधी स्टेडियमवर खेळला गेला. या स्पर्धेत भारतीय महिला आणि पुरुष संघांकडून ऐतिहासिक खेळ पहायला मिळाला. भारतीय संघाने नेपाळला हरवून ऐतिहासिक विजेतेपद पटकावले. या विजयानंतर क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे खेळाडूंशी संवाद साधत अभिनंदन केले.

खो-खो साठी क्रीडा मंत्री श्री. भरणे यांच्या निर्देशानुसार दहा कोटींचा निधी नुकताच दिला होता. हा निधी दिल्याबद्दल खेळाडूंनी क्रीडा मंत्री श्री. भरणे यांचे आभार मानले. यावेळी मंत्री श्री. भरणे खेळाडूंना म्हणाले, निधी देणं ही आमची जबाबदारी आहे. पण या जनतेच्या पैशाचे खेळाडूंनी आपल्या कर्तृत्वाने चीज केले आहे. भारतीयांच्या माना उंचावल्या आहेत. खेळाडूंच्या कामगिरीचा आम्हाला अभिमान आहे.

महाराष्ट्राची कन्या प्रियांका इंगळे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला संघाने ऐतिहासिक यश प्राप्त केले आहे. खो-खो वर्ल्डकपवर भारतीय संघाने नाव कोरले आहे. महिला व पुरुष संघाने  नवी दिल्ली येथे अंतिम सामन्यात नेपाळचा मोठ्या फरकाने पराभव करत विजेतेपद पटकावले. स्पर्धेच्या पहिल्या सामन्यापासून प्रत्येक सामन्यात वर्चस्व राखणाऱ्या दोन्ही संघाने अंतिम फेरीतही चमक दाखवली.

0000

विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्वांना सोबत घेऊन पुढे जाणे महत्त्वाचे – राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन

पुणे दि. 19:- ‘विकसित भारताचे स्वप्न आपल्या सर्वांना पूर्ण करायचे आहे. जगातील सर्वात सक्षम देश म्हणून भारताला पुढे नेण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न गरजेचे आहे. आपण समाजातील प्रत्येक घटकाच्या गरजा ओळखून त्यांना एकत्रित घेऊन पुढे गेलो तर भारत निश्चितच एक आदर्श देश म्हणून जगासमोर येईल. यामध्ये प्रत्येकाचे योगदान महत्वाचे असून कोणतेही काम करताना फळाची अपेक्षा न करता ते काम प्रामाणिकपणे केल्यास यश नक्की मिळेल, असे प्रतिपादन राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांनी केले.

दिव्‍यांग बांधवांना समाजाच्‍या मुख्‍य प्रवाहात आणत त्‍यांचे सक्षमीकरण करण्‍याच्‍या उद्देशाने पिंपरी चिंचवड महापालिका दिव्यांग भवनाच्या वतीने 17 ते 19 जानेवारी या कालावधीत ‘पर्पल जल्‍लोष’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचा समारोप राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांच्या उपस्थितीत झाला, त्यावेळी ते बोलत होते.

कार्यक्रमास खासदार श्रीरंग आप्पा बारणे, आमदार अमित गोरखे, पद्मश्री मुरलीकांत पेटकर, राज्याच्या दिव्यांग कल्याण आयुक्तालयाचे दिव्यांग कल्याण आयुक्त प्रवीण पुरी, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह, अतिरिक्त पोलीस आयुक्त वसंत परदेशी, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, विजयकुमार खोराटे, चंद्रकांत इंदलकर, दिव्यांग भवन फाऊंडेशनचे व्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश देशमुख, मुख्य आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, उप आयुक्त अण्णा बोदडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, सहाय्यक आयुक्त विजयकुमार थोरात, जनसंपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, दिव्यांग भवनाचे मुख्य कार्यकारी अधिकारी परेश गांधी, सल्लागार विजय कान्हेकर, अभिजित मुरुगकर, दिव्यांग संघटनेचे प्रतिनिधी मानव कांबळे, दत्तात्रय भोसले, संगीता काळभोर, राजेंद्र वागचौरे उपस्थित होते.

राज्यपाल म्हणाले, पिंपरी चिंचवड महापालिका आणि दिव्यांग भवन फाऊंडेशन यांनी दिव्यांगांच्या उत्कर्षासाठी, विकासासाठी जे पाऊल उचलले आहे ते कौतुकास्पद आहे. आजचा हा सोहळा म्हणजे दिव्यांग व्यक्तींच्या प्रबळ इच्छाशक्तीचा केलेला सन्मान आहे. असा अनोखा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल मी पिंपरी चिंचवड महापालिकेचे अभिनंदन करतो. पर्पल जल्लोष कार्यक्रम आयोजित करण्यामागे असणारा उद्देश खूप मोठा आहे. याठिकाणी दिव्यांगांसाठी काम करणाऱ्या विविध स्वयंसेवी संस्था, औद्योगिक संस्था यांच्या स्टॉलला भेट दिली. यावेळी एखाद्या उद्योगाला मानवी भावनांची जोड मिळाली तर प्रगती करणे सहज शक्य होते याचा प्रत्यय आला, असे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन म्हणाले.

पर्पल जल्लोष म्हणजे समाजाच्या संघटीत प्रगतीचे उत्तम उदाहरण

‘दिव्यांग व्यक्तीचे समाजाचा भाग होण्यासाठी जे प्रयत्न सुरू असतात, त्याचे शब्दात वर्णन करणे शक्य नाही. पण अशा प्रयत्नांना पर्पल जल्लोषच्या माध्यमातून बळ मिळते. पर्पल जल्लोष सोहळा म्हणजे समाजाची संघटीत प्रगतीचे एक उत्तम उदाहरण आहे. जन्मजात दिव्यांगांना लवकरात लवकर मदत मिळावी, उपचार मिळावेत, यासाठी निधी देऊन तो लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवणे गरजेचे आहे. आपल्याकडे जे काही कलागुण आहेत, त्याचा योग्य वापर करून त्यांनी पुढे जात रहावे. सामाजिक बांधिलकी जोपासून आपल्याकडून ज्या पद्धतीने मदत करणे शक्य होईल ती करावी,’ असे आवाहन राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांनी यावेळी केले.

खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, पिंपरी चिंचवड महापालिकेने देशातील पहिले दिव्यांग भवन उभारण्याचे काम केले आहे. त्याबद्दल मी महापालिका आयुक्त शेखर सिंह व त्यांच्या सहकाऱ्यांचे आभार मानतो. ‘पर्पल जल्लोष’ कार्यक्रमातून राज्यातील दिव्यांग संघटनांना मार्गदर्शन ठरावे असा जल्लोष झाला आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारच्या वतीने दिव्यांगांसाठी विविध योजना राबवण्यात येत असतात. केंद्र व राज्य शासनाच्या दिव्यांगांसाठी असणाऱ्या योजना या दिव्यांगांपर्यंत पोहोचवण्याचे काम करण्यासोबतच त्यांना न्याय देण्याचे, त्यांना आधार देण्याचे काम करणे गरजेचे आहे.

पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी प्रास्ताविक करताना ‘पर्पल जल्लोष’ कार्यक्रम आयोजित करण्यामागील उद्देश तसेच दिव्यांग भवन फाऊंडेशनबाबत माहिती दिली. शेखर सिंह म्हणाले, ‘दिव्यांग बांधवांचे उत्कर्ष आणि विकासाला केंद्रबिंदू मानत ‘पर्पल जल्लोष’ हा उत्सव आयोजित करण्यात आला आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेने महाराष्ट्रात सर्वात प्रथम दिव्यांगांसाठी दिव्यांग भवन सुरू केले. याठिकाणी 21 प्रकारच्या दिव्यांगत्वावर मोफत सल्ला व मार्गदर्शन, विविध प्रकारच्या थेरपी, कौशल्य विकास, रोजगार, स्वयंरोजगार असे विविध उपक्रम फाऊंडेशनच्या माध्यमातून सुरू आहेत. दिव्यांगांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी साहित्य जत्रा, सांस्कृतिक कार्यक्रम, फिल्म फेस्टिव्हलसारखे कार्यक्रम या पर्पल जल्लोषमध्ये घेण्यात आले.

पर्पल सॉल्वथॉन स्पर्धेतील विजेत्यांना पुरस्कार

पर्पल जल्लोष कार्यक्रमाच्या निमित्ताने पर्पल सॉल्वथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सॉल्वथॉन स्पर्धेमध्ये इंजिनीअरिंग थीम मध्ये जी.एच.रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अँड मॅनेजमेंट या महाविद्यालयाच्या संघाला प्रथम क्रमांक मिळाला. या महाविद्यालयाच्या टीममध्ये पियुष जोशी आणि राज तिलक जोशी यांचा समावेश होता. तर, आर्किटेक्चर थीम मध्ये भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ ऑर्किटेक्चर या महाविद्यालयाच्या टीमला प्रथम क्रमांक मिळाला. या दोन्ही संघांना राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले. राज्यपालांनी कार्यक्रमास उपस्थित असलेल्या दिव्यांग बांधवांशी संवाद साधला.

याप्रसंगी दिव्यांगांचे प्रतिनिधी म्हणून मानव कांबळे यांचा राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. आभार दिव्यांग भवन फाऊंडेशनचे व्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश देशमुख यांनी आभार मानले तर सूत्रसंचालन महापालिका विशेष अधिकारी किरण गायकवाड यांनी केले. कार्यक्रमाला महापालिकेच्या विविध विभागाचे अधिकारी, दिव्यांगांसाठी काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

00000

 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत २३ व्या छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ संपन्न

पुरुष विभागात मुंबई शहर पूर्व तर महिला विभागात पुणे ग्रामीण जिल्हा संघ विजयी

 बारामती, दि.19:  महाराष्ट्र राज्य खेळाच्या बाबतीत अग्रेसर राहिला पाहिजे, खेळाडूंना बक्षिसाच्या माध्यमातून भरीव रक्कम मिळाली पाहिजे यादृष्टीने क्रीडा क्षेत्राशी निगडित प्रश्न मार्गी लावण्याकरीता राज्यशासनाचा सकारात्मक प्रयत्न आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केले.

पुरुष विभागात पुणे ग्रामीण आणि मुंबई शहर पूर्व तर महिला विभागात पुणे ग्रामीण आणि मुंबई शहर पश्चिम यांच्या झालेल्या अंतिम सामन्यात  पुरुष विभागात मुंबई शहर पूर्व संघ तर महिला विभागात पुणे ग्रामीण संघ विजयी झाले.रेल्वे मैदानावर आयोजित कार्यक्रमात

विजेत्या संघास उपमुख्यमंत्री श्री पवार यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले.

यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उप विभागीय अधिकारी वैभव नावडकर, क्रीडा व युवक सेवा संचालनालयाचे सहसंचालक सुधीर मोरे, उपसंचालक युवराज नाईक, जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे, तालुका क्रीडा अधिकारी महेश चावले उपस्थित होते.

श्री. पवार म्हणाले, कबड्डी हा पारंपरिक खेळ असून त्यांच्या सर्वांगीण विकासाकरीता प्रयत्न करण्यात येईल.

कोणत्याही स्पर्धेत जय पराजय निश्चित असतो त्यामुळे जिंकण्यासाठी सर्व खेळाडूकडे खेळाडूवृत्ती असली पाहिजे, पराभव हा आदरपूर्वक, सन्मानजनक असला पाहिजे.  विजयी संघांनीदेखील विजयाची हवा डोक्यात जाऊ देऊ नका, पराभूत संघांनी पराभवाचे शल्य मनात न  ठेवता नव्या उमेदेनी पुढील तयारी केली पाहिजे. पराभूत संघाची सुध्दा लोकांनी स्तुती केली पाहिजे अशा  प्रकारची कामगिरी संघाकडून झाली पाहिजे. खेळाडूंनी खेळ पूर्ण क्षमतेने खेळ खेळून उत्कृष्ट कामगिरी करत सर्वोत्कृष्ट खेळ दाखविला पाहिजे.

राज्य सरकारच्यावतीने क्रीडा क्षेत्राकरीता विविध निर्णय घेण्यात आले असून हे निर्णय खेळाडूसह क्रीडा रसिकांना उपयुक्त ठरणार आहेत. पुढच्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा, कै. भाई नेरुरकर चषक राज्यस्तरीय खो-खो स्पर्धा, छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा आणि स्व. खाशाबा जाधव चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धांच्या आयोजनाकरीता राज्यशासनातर्फे १ कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करुन देण्यात येईल, राज्य शासनाच्यावतीने क्रीडा विभागासाठी निर्णय घेण्यात आले असून त्याचा खेळाडूंना निश्चित लाभ होईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी केले.

कला, क्रीडा, सांस्कृतिक अशा क्षेत्रातील विविध कार्यक्रमाचे आयोजन करुन बारामतीकरांना लाभ मिळाला पाहिजे, त्याचा आनंद घेता यावा याकरीता अशा प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. आपणही या स्पर्धा, कार्यक्रमाला उत्तम प्रतिसाद दिला आहे, याचा मला अभिमान आहे. कबड्डी स्पर्धेत खेळाडूंच्यावतीने क्रीडा रसिकांचे डोळ्यांचे पारणे फेडणारे खेळ खेळण्यात आले. शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाला साजेशी स्पर्धा आयोजित करण्यासाठी सहकार्य केल्याबद्दल सर्वांचे आभार मानले. यापुढे अशाच प्रकारच्या स्पर्धा आयोजित करण्यात येतील, असेही श्री. पवार म्हणाले.

महाराष्ट्र राज्य सहकार बँकेच्यावतीने कबड्डी खेळाच्या विकासासाठी महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेस 95 लाख  रुपयांचा धनादेश श्री. उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेचे सरकार्यवाह बाबुराव चांदोरे, अर्जून पुरस्कारार्थी शांताराम जाधव, शकुंतला खटावकर, मायाजी आकरे, महाराष्ट्र राज्य सहकार बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक संभाजी होळकर यांच्यासह राज्य कबड्डी संघटना व पुणे जिल्हा कबड्डी संघटनेचे पदाधिकारी, खेळाडू, क्रीडाप्रेमी यावेळी आदी उपस्थित होते.

श्री. चांदोरे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर आभार प्रदर्शन श्री. कसगावडे यांनी केले.

००००

मराठी बंधु-भगिनींचे प्रेम अनमोल, मला या प्रेमातच राहायचे आहे! – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

स्वित्झर्लंड, दि. १९ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे झ्युरिक, स्वित्झर्लंड येथे बृहन महाराष्ट्र मंडळ, स्वित्झर्लंडतर्फे उत्साहात स्वागत करण्यात आले. या स्वागत समारंभात मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी वैश्विक मराठी परिवारातील आपल्या मराठी बंधु-भगिनींशी मनमोकळा संवाद साधला.

बृहन महाराष्ट्र मंडळ, स्वित्झर्लंडच्या प्रेमाचे मोल नाही, मला या प्रेमातच राहायचे आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. मुख्यमंत्री श्री. फडणवीस पुढे म्हणाले की, आपला महाराष्ट्र भारताचे पॉवर हाऊस असून देश 5 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था झाल्यानंतर एक ते दोन वर्षांतच महाराष्ट्र पहिली उपराष्ट्रीय ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था होईल. एआय तंत्रज्ञानात आघाडी घेतलेला महाराष्ट्र भारताचे डेटा सेंटर कॅपिटल असल्याचे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात इनोव्हेशन सिटी तयार करणार असल्याचे सांगितले.

छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला देव, देश, धर्माकरता लढायला शिकवले, आपल्या संस्कृतीचा, भाषेचा अभिमान बाळगायला शिकवले, ती शिकवण मराठी माणसाने स्वित्झर्लंडमध्येही जपली आणि पुढच्या पिढीलाही दिली, असे मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले. मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिला असून मराठीला ज्ञानभाषा म्हणून प्रस्थापित करण्याचा आमचा प्रयत्न आहे. यासाठी स्वित्झर्लंडसह वैश्विक मराठी परिवारातील मराठी बंधु-भगिनी आमचे राजदूत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

याप्रसंगी बृहन महाराष्ट्र मंडळ, स्वित्झर्लंडचे अध्यक्ष अमोल सावरकर, सेक्रेटरी किर्तीताई गद्रे, महेश बिरादार व इतर मान्यवर उपस्थित होते.

0000

 

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे झ्युरिकमध्ये उत्स्फूर्त स्वागत

स्वित्झर्लंड, दि. १९ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे वर्ल्ड इकॅानॉमिक फोरममध्ये उपस्थित राहण्यासाठी आज झ्युरिक, स्वित्झर्लंड येथे आगमन झाले. हिंदू स्वयंसेवक संघ आणि सेवा स्वित्झर्लंड संस्थेच्यावतीने त्यांचे आनंदाने स्वागत करण्यात आले. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाचा अभिमान व्यक्त करत, स्थानिक मराठी मंडळींनी पारंपरिक पद्धतीने लेझीम खेळत त्यांचे स्वागत केले.

याप्रसंगी, झ्युरिकमधील लहान मुलांनी मराठी गौरवगीत सादर करत ‘पुन्हा येण्या’ची भावना अधोरेखित केली. वेदांत, हृषिकेश, रश्मी आणि अद्विका या चिमुकल्या दोस्तांनी आपल्या निरागस शुभेच्छा देऊन उपस्थितांचे मन जिंकले.

या स्वागत समारंभाला भारतीय राजदूत मृदुलकुमार आणि उत्तर प्रदेशचे मुख्य सचिव मनोज कुमार सिंह उपस्थित होते. सकाळी ६ वाजता झालेल्या या कार्यक्रमासाठी विविध भागांतून मराठी बांधव आवर्जून उपस्थित राहिले.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी या उत्स्फूर्त स्वागताबद्दल आनंद व्यक्त करत म्हटले की, “या स्वागताने मला घरच्याप्रमाणे वाटले. महाराष्ट्राच्या ऊर्जेची आणि ‘वसुधैव कुटुंबकम’ची भावना येथे अनुभवली.”

मुख्यमंत्री फडणवीस ‘दावोस समिट २०२५’ साठी झ्युरिकमध्ये दाखल झाले आहेत.

००००

 

ताज्या बातम्या

प्रत्येक मंडळात महाराजस्व अभियान राबविणार -पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

0
अमरावती, दि. २८ : राज्य शासनाने पारदर्शी आणि गतीमान सरकारचे धोरण ठरविले आहे. शासकीय कार्यालयातील कामे सहजपणे आणि विनातक्रार होण्यासाठी यंत्रणा राबविण्यात येत आहे....

नाविण्यपूर्ण उपक्रम राबविणाऱ्या ग्राम महसूल अधिकाऱ्यांचा गौरव करणार – महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

0
धुळे, दि. २८ (जिमाका):  महसूल विभाग हा शासनाचा चेहरा असून सर्वसामान्य नागरिकांना न्याय देण्याची भूमिका राबविण्याबरोबर सर्वसामान्य नागरिकांचे जीवनमान सुकर होण्यासाठी विविध नाविण्यपूर्ण उपक्रम...

उद्योगांसाठी रावेर येथील २ हजार एकर जमीन उपलब्ध करुन देणार -महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

0
उद्योगांना सोईसुविधा व सवलती देण्यासाठी शासन कटिबद्ध गुंतवणूक परिषद ठरणार धुळे जिल्ह्यासाठी गेमचेंजर परिषदेमध्ये 8436 कोटींचे गुंतवणूक करार, 11506 रोजगार उपलब्ध होणार रोजगार...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांचा विशेष सन्मान

0
नांदेड दि. २८ :  महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमाची दशकपुर्ती आणि प्रथम सेवा हक्क दिनानिमित्त आज मुंबई येथे अतिथीगृहात आयोजित राज्यस्तरीय सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...

परोटी तांडा येथे माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांच्या पुतळ्याचे भूमिपूजन

0
नांदेड दि. २८: राज्याचे माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांच्या पुतळ्याचा भूमिपूजन समारंभ कार्यक्रम किनवट तालुक्यातील परोटीतांडा येथे उद्योग, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून),...