गुरूवार, एप्रिल 24, 2025
Home Blog Page 37

सर्वसामान्य नागरिकांपर्यंत आरोग्य योजनांचा लाभ देण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहावे – विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे

मुंबई, दि. ७ : सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत शुभारंभ करण्यात आलेल्या विविध योजनांचा लाभ सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहचविण्यासाठी आरोग्य विभागाने सातत्याने प्रयत्न करणे आवश्यक आहे. जेणेकरून आरोग्य विषयक योजनांचा लाभ गरजू नागरिकांना मिळेल आणि त्यापासून कोणीही वंचित राहणार नाही, असे प्रतिपादन विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी केले.

यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई येथे आयोजित केलेल्या या कार्यक्रमात विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे बोलत होते. यावेळी विधानपरिषदेच्या सदस्या मनिषा कायंदे, सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव डॉ. निपुण विनायक, विरेन्द्र सिंह, आरोग्य सेवाचे आयुक्त तथा मुंबई राष्ट्रीय अभियानाचे संचालक अमगोथ श्री रंगा नायक, राज्य कामगार विमा योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, मुंबई आरोग्य सेवा संचालक डॉ. नितीन अंबाडेकर यांच्यासह राज्यातील विविध आरोग्य संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

सभापती प्रा. शिंदे म्हणाले, राज्याचा सार्वजनिक आरोग्य विभाग अतिशय चांगल्या पद्धतीने कार्यरत असून आरोग्य विभागातील कर्मचारी तसेच नागरिकांनी आपल्या निरोगी आरोग्य राखण्यासाठी स्वतःला वेळ द्यावा व नियमित व्यायाम करावा, असा सल्लाही त्यांनी दिला. राज्यातील जनतेचा आरोग्य विभागावर विश्वास आहे. कोविडच्या काळात त्याची प्रचिती सर्वांना आली असून लोकांचा हा विश्वास आरोग्य विभागाने अधिक दृढ करण्यासाठी कसोशीने व कर्तव्य तत्परतेने काम करावे असेही प्राध्यापक शिंदे म्हणाले.

कार्यक्रमात बोलताना आरोग्यमंत्री आबिटकर म्हणाले की, सार्वजनिक आरोग्य विभागाच्या योजनांचा सर्वसामान्यांनी फायदा करून घेतल्यास आरोग्य विषयक खर्चात 70% पर्यंत बचत होणार आहे. जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय आणि ग्रामीण रुग्णालयांमध्ये सोनोग्राफी, एक्सरे, ईसीजी, सिटी स्कॅन, एमआरआय, डायलेसिस अशा अत्याधुनिक सुविधा आता मोफत उपलब्ध असल्याची माहिती नागरिकांना असणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने आरोग्य विषयक विविध योजनांची व्यापक प्रचार व प्रसिद्धी होणे आवश्यक असल्याचे मत यावेळी त्यांनी व्यक्त केले.

यासोबत सर्व्हायकल कॅन्सर प्रतिबंधासाठी 9 ते 14 वयोगटातील मुलींसाठी लसीकरण मोहिमेची घोषणा झाली. ‘प्रीव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर’ या संकल्पनेनुसार, कॅन्सरसारख्या गंभीर आजारांचे प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यावर भर देण्यात येणार आहे. याशिवाय, आरोग्य संस्थांच्या निरीक्षण प्रणालीचे उद्घाटन, बांधकाम प्रकल्पांच्या ऑनलाइन पोर्टलचा शुभारंभ, तसेच CPR थेरपीसारख्या महत्त्वपूर्ण प्रशिक्षण उपक्रमांचाही शुभारंभ आज करण्यात आला. या सर्व उपक्रमांचा उद्देश म्हणजे नागरिकांना वेळीच आणि प्रभावी सेवा उपलब्ध करून देणे आहे.

जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने आरोग्य विभागात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या डॉक्टर्स, अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार करून त्यांचे विशेष सन्मान करण्यात आले. यावेळी बोलताना आरोग्य मंत्री आबिटकर म्हणाले की, सार्वजनिक आरोग्य व्यवस्था बळकट करण्यासाठी प्रत्येकाने आपली सेवा कर्तव्यबुद्धीने केल्यास राज्याची आरोग्यसेवा आणखी गतिमान होण्यास बळ मिळणार आहे. कार्यक्रमाच्या शेवटी, ‘आरोग्यं धनसंपदा’ या मंत्राचा उच्चार करत संपूर्ण महाराष्ट्राच्या आरोग्यसेवेचा संकल्प पुन्हा एकदा नव्याने करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी सर्व नागरिकांना स्वतःच्या आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन देखील मंत्री श्री. आबिटकर यांनी केले.

या आरोग्य सेवा योजनांचा झाला शुभारंभ…

  • e-Sushrut (HMIS System) संकेतस्थळाचे विस्तारीकरण शुभारंभ
  • महाराष्ट्र शुश्रुषागृह नोंदणी प्रणालीचे (Bombay Nursing Home Act)ऑनलाईन पद्धतीने प्रमाणपत्र वितरण शुभारंभ
  • राज्यातील 6 जिल्ह्यांत 6 आरोग्य संस्थांमध्ये डायलिसीस युनिटचा शुभारंभ
  • राज्यातील आरोग्य संस्थांच्या बांधकामाच्या ऑनलाईन संनियंत्रण व पाठपुरावा सॉफ्टवेअरचे उद्घाटन
  • गर्भाशयमुख कर्करोग जनजागृती (9 ते 14 वर्षे वयोगट) अभियान – कर्करोगासंबंधी जनजागृती आणि प्रतिबंधात्मक उपायांची प्रभावी अंमलबजावणी
  • महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटी रुग्णालयांमध्ये महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचा शुभारंभ – आता कामगारांसहित सर्वसामान्य जनतेसाठी सुद्धा खुली
  • महाराष्ट्र राज्यात सीपीआर प्रशिक्षणाचे उद्घाटन व प्रात्यक्षिकांचे सादरीकरण
  • आरोग्य सेवा निरीक्षण प्रणालीचा शुभारंभ

आरोग्य सेवा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या आरोग्य संस्थांचा सन्मान…

* राष्ट्रीय अंधत्व निवारण कार्यक्रमात उल्लेखनीय कामगिरी करणारा जिल्हा – मोतीबिंदू शस्त्रक्रिया – प्रथम – बीड, द्वितीय – धाराशिव

* कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेत उल्लेखनीय कामगिरी करणारा जिल्हा – प्रथम – नांदेड, द्वितीय – पालघर, लातूर महानगरपालिका

* मोठ्या (major) शस्त्रक्रिया करणारे १०० खाटाचे उपजिल्हा रुग्णालय – प्रथम – उपजिल्हा रुग्णालय गडहिंग्लज, कोल्हापूर, द्वितीय – उपजिल्हा रुग्णालय अचलपूर, अधिकाधिक मोठ्या (major) शस्त्रक्रिया करणारे ५० खाटाचे उपजिल्हा रुग्णालय – प्रथम – उपजिल्हा रुग्णालय देगलूर, जिल्हा नांदेड, द्वितीय – उपजिल्हा रुग्णालय गंगाखेड, परभणी

अधिकाधिक मोठ्या (major) शस्त्रक्रिया करणारे ग्रामीण रुग्णालय प्रथम – ग्रामीण रुग्णालय अहमदपूर, जिल्हा लातूर, द्वितीय ग्रामीण रुग्णालय माहूर, जिल्हा नांदेड

गुणवत्ता आश्वासन कार्यक्रम अंतर्गत सर्वात जास्त संस्थांना राष्ट्रीय पातळीवर प्रमाणित करणारा जिल्हा प्रथम – लातुर, द्वितीय धाराशिव

जास्त प्रसुती करणारे प्राथमिक आरोग्य केंद्र (PHC) – प्रथम – प्राथमिक आरोग्य केंद्र साईवन ता. डहाणू जिल्हा पालघर, द्वितीय – प्राथमिक आरोग्य केंद्र, शेंदूर्णी ता. जामनेर जिल्हा जळगाव

जास्त प्रसुती करणारे नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र (महानगरपालिका) – नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र आकुर्डी, पिंपरी चिंचवड महानगरपालिका

जास्त प्रसुती करणारे ग्रामीण रुग्णालय – प्रथम ग्रामीण रुग्णालय धडगाव, जिल्हा नंदुरबार, द्वितीय ग्रामीण रुग्णालय स्पर्श सस्तूर, ता. लोहारा जिल्हा धाराशीव

आरबीएसके कार्यक्रमांतर्गत उल्लेखनीय कामगिरी करणारा जिल्हा (विद्यार्थी तपासणी, हृदय शस्त्रक्रिया व इतर शस्त्रक्रिया). प्रथम कोल्हापूर, द्वितीय – पुणे

असंसर्गजन्य आजार नियंत्रण कार्यक्रमामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणारा जिल्हा प्रथम – सातारा द्वितीय वाशीम

सिकल सेल आजार नियंत्रण कार्यक्रमामध्ये उल्लेखनिय कामगिरी करणारा जिल्हा (सिकलसेल तपासणी) प्रथम नागपुर द्वितीय नाशिक

उल्लेखनीय कामगिरी करणारे विशेष नवजात शिशु काळजी कक्ष (SNCU) – प्रथम डागा रुग्णालय, नागपुर द्वितीय उपजिल्हा रुग्णालय, जव्हार जिल्हा पालघर

उल्लेखनीय कामगिरी करणारे पोषण पुनर्वसन केंद्र (NRC) – प्रथम – उपजिल्हा रुग्णालय पांढरकवडा, जिल्हा यवतमाळ, द्वितीय जिल्हा रुग्णालय, हिंगोली

मोबाईल मेडिकल यूनिट (एमएमय) कार्यक्रमांतर्गत उल्लेखनीय कामगिरी करणारा जिल्हा प्रथम ठाणे, द्वितीय नांदेड

पाच वर्षात सातत्याने बालमृत्यू कमी करणारा जिल्हा प्रथम धाराशीव

पाच वर्षात सातत्याने मातामृत्यू कमी करणारा जिल्हा – प्रथम रायगड

सर्वात जास्त In-house Dialysis करणाऱ्या आरोग्य संस्था प्रथम – डायलिसीस सेंटर, चंद्रपुर; द्वितीय – जिल्हा रुग्णालय, गडचिरोली

उल्लेखनीय कामगिरी करणारे अतिदक्षता कक्ष (ICU) – जिल्हा रुग्णालय धुळे

राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमांतर्गत उल्लेखनीय कामगिरी करणारा जिल्हा प्रथम गोंदिया, द्वितीय धाराशीव

राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमांतर्गत उल्लेखनीय काम करणारी महानगरपालिका: प्रथम मालेगाव, महानगरपालिका, द्वितीय धुळे महानगरपालिका

कष्ठरोग निर्मलन कार्यक्रमांतर्गत उल्लेखनीय कामगिरी करणारा जिल्हा प्रथम चंद्रपुर, द्वितीय सातारा

जिल्हा आरोग्य आधिकारी कार्यक्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारा जिल्हा

जिल्हा आरोग्य अधिकारी, अकोला, द्वितीय जिल्हा आरोग्य अधिकारी, धाराशीव

जिल्हा शल्य चिकित्सक कार्यक्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारा जिल्हा: प्रथम जिल्हा शल्य चिकित्सक वाशिम, द्वितीय जिल्हा शल्य चिकित्सक, नाशिक

वैद्यकीय आरोग्य अधिकारी कार्यक्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारी महानगरपालिका – प्रथम वैद्यकीय आरोग्य अधिकारी, सांगली महानगरपालिका, द्वितीय वैद्यकीय आरोग्य अधिकारी पिंपरी चिंचवड महानगरपालिका

उल्लेखनीय कामगिरी करणारे 100 खाटांचे रुग्णालय प्रथम उपजिल्हा रुग्णालय कराड जिल्हा सातारा, द्वितीय उपजिल्हा रुग्णालय, शहापूर जिल्हा ठाणे

उल्लेखनीय कामगिरी करणारे महिला रुग्णालय प्रथम महिला अकोला, द्वितीय महिला रुग्णालय, अमरावती

किडनी ट्रांसप्लांट मध्ये उल्लेखनीय कामगिरी करणारे रुग्णालय – विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय अमरावती

आयुष्मान भारत डिजिटल मिशन अंतर्गत उल्लेखनीय कामगिरी – ग्रामीण भाग- हिंगोली जिल्हा, शहरी भाग – पनवेल महानगरपालिका

००००

अर्चना देशमुख/विसंअ/

 

मुंबई महानगर प्रदेशाच्या विकासासाठी ग्रोथ हब प्रकल्पांच्या कामांना वेग द्या – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. ७ : मुंबई महानगर प्रदेशाचे (एमएमआर) सकल उत्पन्न (जीडीपी) सन २०३० पर्यंत 300 बिलियन डॉलर पर्यंत नेण्यासाठी एमएमआर ग्रोथ हब महत्त्वाचे आहे. त्यासाठी या क्षेत्रात विविध प्रकल्प हाती घेण्यात आले असून ही प्रकल्पांची कामे वेगाने करावीत, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

मुंबई महानगर प्रदेश ग्रोथ हब नियामक मंडळाची बैठक आज मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, पर्यटन मंत्री शंभूराज देसाई, मुख्य सचिव सुजाता सौनिक, डॉ. शिरीष संख्ये यांच्यासह विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मुख्य सचिव श्रीमती सौनिक यांनी ग्रोथ हबच्या आतापर्यंतच्या कामकाजाची माहिती सादरीकरणाद्वारे दिली.

श्री. फडणवीस म्हणाले की, मुंबई महानगर प्रदेशाला ग्रोथ हब करण्यासाठी पर्यटन, उद्योग, नगर विकास, गृहनिर्माण, पर्यावरण आदी क्षेत्रांचे मोठे योगदान असणार आहे. याचा विचार करूनच ग्रोथ हब अहवालात विविध प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. हे प्रकल्प जागतिक दर्जाचे व्हावेत, यासाठी प्रकल्पांच्या कामांचे संनियंत्रण केले पाहिजे. तसेच या प्रकल्पावर लक्ष ठेवण्यासाठी ग्रोथ हबमधील प्रकल्पांचा समावेश वॉररुममध्ये करून प्रकल्पांच्या प्रगतीचा अहवाल डॅशबोर्डवर ठेवावे. तसेच या प्रकल्पांसाठी येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी एक टीम तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी दिले.

मुंबई महानगर प्रदेश क्षेत्राला ग्रोथ हब म्हणून विकसित करण्यासाठी सप्टेंबर 2024 मध्ये अहवाल तयार करण्यात आला.यानंतर आतापर्यंत ग्रोथ हब संदर्भात 8 बैठका विविध स्तरावर घेण्यात आल्या. ग्रोथ हबमध्ये 37 प्रकल्प, 8 धोरणे, 19 शासन निर्णय घेण्यात आले असून या प्रकल्पांची अमंलबजावणी 7 संस्थांद्वारे होणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

गोरेगाव फिल्म सिटी प्रकल्पामध्ये आयआयसीटी उभारण्यात येणार असून तेथे जगातील अनेक स्टुडिओ येण्यास उत्सुक आहेत. पश्चिम उपनगर क्षेत्रात विशेष विकास क्षेत्र निर्माण करणे, एमबीपीटीच्या जागेचा विकास, वरळी डेअरीचा विकास, अनगाव सापे परिसराचा विकास, खारबाव एकात्मिक व्यवसाय केंद्र, बोईसर, विरार व ठाणे क्षेत्राचा विकास या प्रकल्पांचा समावेश ग्रोथ हबमध्ये आहे. याशिवाय वाढवण पोर्टचा एकात्मिक वाहतूक आराखडा, जागतिक दर्जाचे डेटा सेंटर तयार करणे, औद्योगिक जागांवर औद्योगिक शहरे तयार करणे, एमएमआर क्षेत्रात आरोग्य शहर उभारणे, गरिबांसाठी परवडणारी घरे उभारणे तसेच पर्यटनवाढी विशेष प्रकल्पांचा समावेशही ग्रोथ हब अंतर्गत करण्यात आला आहे.

मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रासाठी दीर्घकालीन, शाश्वत आणि जागतिक दर्जाच्या विकास आराखड्यातील प्रकल्पांच्या अंमलबजावणी संदर्भातील कामे लवकरात लवकर मार्गी लावण्यात यावेत. मुंबईत होणाऱ्या ‘वेव्ज’ कार्यक्रमात एमएमआर ग्रोथ हबचा प्रचार व प्रसार व्हावा, यासाठी उत्कृष्ट सादरीकरण व्हायला हवे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

श्रीमती सौनिक यांनी निती आयोग व महाराष्ट्र शासनाच्या ग्रोथ हब विषयक संयुक्त अहवाल व त्यावर केलेल्या कार्यवाहीची माहिती दिली. मुख्य सचिवांच्या परिषदेत महाराष्ट्राच्या मॉडेलचा विशेष उल्लेख व प्रशंसा झाली असल्याचे सांगितले. पर्यटन, उद्योग, नगर विकास, पर्यावरण, गृहनिर्माण आदी क्षेत्रांवर जास्त भर देण्याचे निर्देश प्रधानमंत्री महोदयांनी दिले आहेत. तसेच एमएमआर क्षेत्राबरोबरच आजूबाजूच्या परिसराच्या विकासावरही भर द्यावा, असे त्यांनी सुचविल्याचे मुख्य सचिव श्रीमती सौनिक यांनी यावेळी सांगितले.

यावेळी एमएमआर क्षेत्राच्या आर्थिक आराखड्याची ब्ल्यू प्रिंट, ग्रोथ हबसाठी आतापर्यंत घेतलेले निर्णय, महत्त्वाचे प्रकल्प व त्यांची सद्यःस्थिती, पर्यटन प्रकल्प, केंद्र राज्य समन्वय आदींवर चर्चा झाली.

0000

नंदकुमार वाघमारे/विसंअ/

 

जपानी तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचा प्रयत्न – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

  • जपानी तंत्रज्ञानाच्या मदतीने फुलणार राज्यातील शेती
  • जपानी एम २ लॅबो संस्थेच्या शिष्टमंडळाने घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट

मुंबई, दि. ७: जपानचे तंत्रज्ञान शेतीच्या क्षेत्रात आणून कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानावर आधारित १ अब्ज लोकांना मदत करायची आहे. मातीचे पुनरुज्जीवन, मॉडेल फार्म तयार करणे, ग्रीन हाऊस तंत्रज्ञान यावर महाराष्ट्र शासन जपानी एम २ लॅबो संस्थेसोबत काम करणार आहे. विपणन साखळीतील गैरप्रकार कमी करून शेतकऱ्यांना सक्षम करायचे आहे. भारतीय शेतकऱ्यांना शिक्षित करून त्यांना जपानमध्ये रोजगार मिळवून देण्यात येणार आहे. जपानी तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

कृषी क्षेत्राच्या विकासासाठी राज्य शासन विविध निर्णय घेत आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करीत शेती समृद्ध करण्यात येत आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित तंत्रज्ञान शेतीच्या विकासासाठी उपयोगात आणण्यात येत आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित धोरण जाहीर केले असून जपान व महाराष्ट्र तंत्रज्ञानाचा उपयोग करून एकत्र काम करण्याचे आवाहनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

एम 2 लॅबो जपान ही सुझुकीची कृषी क्षेत्रातील संस्था असून ही सुझुकीची मुंबई, महाराष्ट्रात नोंदणीकृत झालेली पहिली संस्था आहे. या संस्थेच्या अध्यक्षा युरिको कातो सान यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज भेट घेतली. या भेटीदरम्यान मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्यातील शेती समृद्ध करण्यासाठी जपानी तंत्रज्ञानाचा उपयोग करण्याबाबत संवाद साधला. यावेळी एम 2 लॅबो संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी युरिको कातो, मित्र संघटनेचे अध्यक्ष समीर खाळे, एम 2 लॅबो भारतचे मुख्य व्यवस्थापकीय अध्यक्ष प्रसून अग्रवाल, देवांग ओझा, एम 2 लॅबो जपानचे प्रबंधक मसाको मियाशीता आदी उपस्थित होते.

युरिको कातो सान जपानच्या पंतप्रधानांच्या कॅबिनेट ऑफिसमध्ये ‘डिजिटल गार्डन सिटी नॅशन’ च्या प्रत्यक्षात अंमलबजावणीसाठी काम करतात.

राज्यात संस्थेसोबत एकत्र काम करून “एम2 स्मार्ट व्हिलेज लॅबो” या संकल्पनेवर आधारित कृषी क्षेत्रातील एक जपानी उत्कृष्टता केंद्र (Center of Excellence) स्थापन करण्याची इच्छाही संस्थेने भेटीदरम्यान व्यक्त केली. या उपक्रमाचा उद्देश म्हणजे स्मार्ट शेतीमध्ये जपानी व भारतीय कंपन्यांना एकत्र आणून सोसायटी ५.० च्या माध्यमातून शाश्वत विकासासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI for Sustainable Development – A4SD) यास प्रोत्साहन देण्यात येणार आहे.

शेतकऱ्यांचे उत्पन्न लक्षणीयरीत्या वाढवून आणि संस्थेच्या “ज्युनियर व्हिलेज” संकल्पनेद्वारे तरुणांमध्ये शेती करिअर म्हणून निवडावी, यासाठी तरुणांना प्रेरणा देण्याची इच्छाही संस्थेने व्यक्त केली. तसेच जपानमध्ये भारतीय शेतमजुरांना जपानी शेतांमध्ये काम करण्यास समर्थन देण्यासाठी अधिकृत परवाना प्राप्त असल्याने त्यांना संधी देण्याविषयी चर्चाही यावेळी झाली.

0000

नीलेश तायडे/विसंअ/

केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या अध्यक्षतेखाली ‘धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान’चा आढावा

  • कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ करणार आदिवासी गावांचे सूक्ष्म सर्वेक्षण

जळगाव, दि. ०७ (जिमाका): जिल्ह्यातील आदिवासी भागांचा सर्वांगीण विकास करण्याच्या उद्देशाने ‘धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानाअंतर्गत केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत २१ विभागांकडून करण्यात येणाऱ्या कामांची माहिती घेण्यात आली.

यावेळी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या समाजकार्य विभागाला ५६ आदिवासी गाव व पाड्यांमधील मूलभूत सुविधा व विकासासाठी सूक्ष्म सर्वेक्षण आराखडा तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या. बैठकीला जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, उपवनसंरक्षक जमीर शेख, ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक राजू लोखंडे, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या समाजकार्य विभागाचे प्रमुख डॉ.अजय पाटील, आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी व संबंधित विभागांचे प्रमुख उपस्थित होते.

राज्यमंत्री खडसे यांनी दिलेल्या महत्त्वाच्या सूचना

  • पशुवैद्यकीय सुविधा वाढविणे: सध्या असलेल्या ६ पशुवैद्यकीय रुग्णालयांमध्ये सुधारणा करणे व आवश्यकतेनुसार नवीन केंद्र उभारणे.
  • कौशल्यविकास: आदिवासी विद्यार्थ्यांना गरजेच्या कौशल्यांचे प्रशिक्षण विद्यापीठाच्या अहवालाच्या आधारे देण्याचे निर्देश.
  • एलपीजी गॅस वितरण: गरजूंना गॅस कनेक्शन देण्यासाठी विशेष प्रयत्न.
  • कृषी उद्योग विकास: कृषी विभागाने प्रस्तावित ५३ शेतकरी गटांसाठी उद्योग व्यवसायाचे नियोजन करावे, ‘आत्मा’ प्रकल्पातून मदत मिळवून द्यावी.
  • जलसिंचन प्रकल्प: रावेर, यावल, मुक्ताईनगर भागातील वनक्षेत्रात जलसिंचन प्रकल्प उभारून पाणी जंगलातच मुरवण्याचे नियोजन करण्यात यावे.
  • प्रकल्पांचे कालबद्ध नियोजन: सर्व विभागांनी नियोजन ठरलेल्या वेळेत पूर्ण करावे. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनीही येत्या काही दिवसांत विभागनिहाय आढावा घेण्याचे जाहीर केले.

०००

नैसर्गिक शेतीसाठी राज्य, केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी – केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान

  • स्वावलंबी आणि गरीबीमुक्त गावांसाठी सर्वांचा पुढाकार आवश्यक

नंदुरबार दि. ०७,(जिमाका): दर्जेदार अन्न निर्मितीसाठी शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन आणि प्रशिक्षण मिळाले तर देशातील प्रेत्येक गाव स्वावलंबी बनेल आणि गरीबीमुक्त होईल. त्यासाठी सरकार सोबत जनतेचा पुढाकार आवश्यक आहे. तसेच नैसर्गिक शेतीसाठी केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचे प्रतिपादन केंद्रीय कृषि, शेतकरी कल्याण मंत्री तथा ग्रामीण विकास मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी केले आहे.

डॉ. हेडगेवार सेवा समिती, कृषि विज्ञान केंद्र, नंदुरबार आणि राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोग, महाराष्ट्रद्वारे सिलेज आधारित परिसर विकास कार्यक्रम (CADP) अंतर्गत उभारण्यात आलेल्या कृषक ज्ञान विज्ञान मंडपम् आणि महिलांसाठी तंत्रज्ञान पार्क या वास्तूंच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी उपस्थित शेतकऱ्यांना संबोधित करताना ते बोलत होते. यावेळी कृषिमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे, राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोगाचे अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर, माजी मंत्री डॉ. विजयकुमार गावित, विधानपरिषद सदस्य चंद्रकांत रघुवंशी आमदार सर्वश्री आमशा पाडवी, राजेश पाडवी, कवियित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापिठ जळगावचे कुलगुरु डॉ. विजय माहेश्वरी, जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी, एमसीआरसीएम मुंबईचे कार्यकारी अधिकारी निलेश सागर, जिल्हा पोलीस अधिक्षक श्रवण दत्त, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सावन कुमार, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अ.भा. कार्यकारीणी सदस्य मा.वी. भागय्याजी, भा.कृ.अ.नु.प.अटारी पुण्याचे संचालक डॉ. एस.के. रॉय, योजक (पुणे) चे  अध्यक्ष डॉ. गजानन डांगे, राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोगाचे सदस्य सचिव डॉ. एन.जी. शहा, डॉ. हेडगेवार सेवा समिती अध्यक्ष केदारनाथ कवडीवाले, सचिव डॉ, नितीन पंचभाई, कृषि विज्ञान केद्र प्रमुख राजेंद्र दहातोंडे, कोळदाचे सरपंच मोहिनी वळवी आदी यावेळी उपस्थित होते.

केंद्रीय कृषिमंत्री मंत्री चौहान म्हणाले, शेतकऱ्यांच्या आजच्या कार्यक्रमासाठी मी प्रमुख अतिथी नसून एक सेवक म्हणून उपस्थित आहे, एक शेतकऱ्यांच्या परिवारातील सदस्य म्हणून या डॉ. हेडगेवार सेवा समितीच्या कृषी विज्ञान केंद्रात मला उपस्थित राहण्याची संधी मिळाली त्यामुळे मी स्वत:ला भाग्यशाली समजतो. लोकशाहीत इकडे आणि जनता तिकडे असे चालत नाही, तशाने कामही होत नाही. जोपर्यंत दोघे मिळून एकत्र येत नाहीत तोपर्यंत विकास शक्य नाही. मला कल्पना आहे, येथील लोक मागणारे नाहित, झुकणारेही नाहीत, थेट निधड्या छातीने, आत्मविश्वासाने पुढे जाणारे आहेत. फक्त त्यांना गरज योग्य मार्गदर्शनाची गरज आहे.

ते पुढे म्हणाले, जेव्हा अमेरिकेसारख्या युरोपियन देशांचा जन्मही झाला नव्हता, तेव्हा भारताच्या ढाक्क्यात रेशीम वस्त्र बनत होते. तंत्रविज्ञानाच्या जोरावर पोलाद बनवून जगभरात निर्यात केले जात होते. अनादी काळापासून येथील आदिवासी बांधव आपल्या शेतीची औजारे स्वत: बनवत होते, स्वावलंबी होते. आज याच बांधवांना थोडे कौशल्याचे शिक्षण आणि मार्गदर्शन लाभले तर ते संपूर्ण मानवी समुदायाला समृद्ध करू शकतात. आणि असे शिक्षण आणि मार्गदर्शनाचे काम या कृषि विज्ञान केंद्रात सुरू आहे, हे काम म्हणजे समाजाला उभे करण्याचे महान कार्य आहे.

ते पुढे म्हणाले, आपण खूप नाही पण कमीतकमी क्षेत्रात कमीतकमी काय करू शकतो,  यावर सर्वांनी विचार करण्याची गरज आहे. संपूर्ण जिल्ह्यात नाही पण काही गावातील काही एकर मर्यादित क्षेत्रात नैसर्गिक शेती करून किटकनाशकमुक्त, कॅन्सरमुक्त शेतीला चालना द्यायला हवी. त्यामुळे जमीनीचे आरोग्य टिकून राहील आणि उत्पादकताही वाढेल. नैसर्गिक शेतीसाठी भारत सरकार शेतकऱ्यांना सदैव प्रोत्साहन देत असून त्यासाठी लागणाऱ्या प्रयोग व औजारांसाठी केंद्र सरकार प्रति एकर रुपये 4 हजारांचे सहाय्य करते आहे. भविष्यात ते कायम राहील, याची मी ग्वाही देतो.

“रहिमन पानी राखिए, बिन पानी सब सून।” या हिंदी दोह्याचा संदर्भ देत केंद्रीय मंत्री चौहान म्हणाले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणतात, ‘कॅश द रेन’ म्हणजे पावसाचे वाहून जाणारा प्रत्येक थेंब जमिनीत कसा मुरवता येईल, यासाठी उपाययोजना करायला हव्यात. मनरेगाच्या माध्यमातून त्यासाठी आत्ताच कामे हाती घ्यायला हवीत. त्यासाठी कुठल्याही प्रकारच्या निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही. तापी नदीच्या उपलब्ध पाण्याचा वापर शेतीसाठी करायला हवा. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेतून तुषार सिंचनाचे प्रयोग करून शेतात पाणी मुरवता येऊ शकेल.

कृषि विज्ञान केंद्राच्या माध्यमातून येथील महिलांनी भगरीपासून बिस्किटे बनवली आहेत, दाळीवर प्रक्रिया करणारी यंत्रे विकसित केली आहेत. आज अशाच छोट्या थोड्या-छोट्या प्रयोगांमधून देशात सुमारे 1 कोटी 48 लाख महिला लखपती दिदी झाल्या आहेत. आज देशातील महिला आपल्या पायावर उभ्या राहून शेती आणि मातीचे विज्ञान शिकून शेती प्रक्रिया उद्योग मोठ्या दिमाखाने चालवत आहेत. येणाऱ्या काळात शेतकरी आणि ग्राहक यांच्यातील अंतर कमी करून दोघांच्या फायद्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार कटिबद्ध असल्याचे यावेळी केंद्रीय मंत्री चौहान यांनी सांगितले. ते म्हणाले, मोठ्या शहरांमध्ये शेतमाल विक्रीसाठी लागणारा वाहतूक खर्च केंद्र सरकार करण्याच्या विचारात आहे.

विश्वकर्मा सारख्या योजनेत गावातील विविध पारंपरिक व्यवसाय करणाऱ्यांचे सर्वेक्षण करा, प्रशिक्षण द्या, त्यांना सविधा द्या, गाव स्वावलंबी आणि गरीबीमुक्त करा. ही योजना आपल्या जिल्ह्यात राबवून आपले गाव, जिल्हा आदर्श बनविण्यासाठी आपल्या सर्वांना पुढे यावे लागेल असेही केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी यावेळी सांगितले.

शाश्वत शेतीच्या विकासासाठी शासन सर्वोतोपरी मदत करणार -पालकमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे

देशातील 70 टक्के लोकांचा व्यवसाय शेतीवर आधारित आहे. शेती हा अत्यंत गुंतागुतीचा विषय असून शाश्वत शेतीशिवाय शेतकरी त्यात रमत नाही. शेती व्यवसायातून स्थलांतरित होण्याची मानसिकता मोठ्या प्रमाणात असताना कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून शेती आणि शेतकऱ्यांच्या विकासासाठी सुरू असलेले प्रयत्न नक्कीच शाश्वत शेतीतून या भागाचा कायापालट केल्याशिवाय राहणार नाही. अशा या शाश्वत शेतीच्या प्रयत्नांसाठी शासन सर्वतोपरी मदत करेल, असे यावेळी राज्याचे कृषिमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले.

यावेळी शेतकरी मेळावा, बचत गटांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमात पुण्यातील योजक संस्थेचे अध्यक्ष डॉ. गजानन डांगे यांच्या पुस्तकांचे प्रकाशन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

०००

पत्रकारांना मंत्रालयात दुपारी २ वाजेनंतर प्रवेशाचे निर्देश पत्र रद्द

मुंबई, दि. ७ : विविध दैनिक, वृत्तवाहिन्यांचे पत्रकार व प्रतिनिधींना प्रवेशासाठी त्यांचे ओळखपत्र (आरएफआयडी कार्ड) व सर्व सुरक्षा विषयक तपासणी करून दुपारी २ वाजेनंतर मंत्रालयात प्रवेश देण्यात यावा, असे निर्देश पत्र २४ मार्च २०२५ रोजी निर्गमित करण्यात आले होते. पत्रकारांना मंत्रालयात प्रवेशाबाबतचे हे निर्देश गृह विभागाकडून रद्द करण्यात आले आहे, असे कक्ष अधिकारी डॉ. प्रविण ढिकले यांनी कळविले आहे.

0000

नीलेश तायडे/विसंअ/

 

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त विविध शासकीय कार्यक्रमांचे आयोजन 

मुंबई, दि. ७ : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त चैत्यभूमी दादर येथे १४ आणि १५ एप्रिल २०२५ रोजी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. अभिवादन समारंभ, भीमगीते, पुस्तक स्टॉल आणि स्काऊट गाईड्स हॉल येथे विशेष कार्यक्रमांद्वारे जयंती सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करुन नागरीकांनी विविध कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन आर्टीचे व्यवस्थापकीय संचालक तथा बार्टीचे महासंचालक सुनिल वारे यांनी केले आहे.

या विशेष सप्ताहाचा समारोप १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त समता रॅलीने होणार आहे. तसेच राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये समतादुतांमार्फत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती विविध कार्यक्रमाद्वारे साजरी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

पुणे येथील बार्टीच्या कार्यालयात  जयंतीनिमित्त आजपासून १४ एप्रिल पर्यंत भारतीय संविधान अमृत महोत्सव सप्ताह संमेलनाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहात विविध सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्यविषयक उपक्रम राबवले जाणार आहेत. यामध्ये रक्तदान शिबिर, आरोग्य तपासणी, विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक व आरोग्यविषयक मार्गदर्शन, महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन, अभिवाचन कार्यक्रम, दुर्मिळ छायाचित्र आणि ग्रंथप्रदर्शन यांचा समावेश आहे.

कार्यक्रमाची रुपरेषा :

  • ८ एप्रिल रोजी पुणे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनात डॉ. अनिरुद्ध वनकर यांच्या भीम गीताचा कार्यक्रम दुपारी २: ३० ते ५:३० यावेळेत आयोजित करण्यात आला आहे.
  • १० एप्रिल रोजी १२ तास वाचन दिन उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना आणि अधिकाऱ्यांना सकाळी ७ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत अभ्यासासाठी प्रेरित करण्यात येईल.
  • ११ एप्रिलला क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्यावरील नाट्य सादर करण्यात येणार आहे.

0000

शैलजा पाटील/विसंअ/

‘छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, मराठा शौर्य स्मारकाच्या कामास गती देणार’- पर्यटनमंत्री शंभूराज देसाई

मुंबई, दि. ७ : आग्रा येथे ‘छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारणे’, पानिपत येथील ‘काला अंब’ येथे ‘मराठा शौर्य स्मारक’ उभारणे यासाठी पर्यटन, सांस्कृतिक व पुरातत्व विभागाने लवकरात लवकर स्मारक उभारण्यात येणाऱ्या‍ ठिकांणाची पाहणी करावी असे निर्देश पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले. राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांच्या अध्यक्षतेखाली या कामांचे संपूर्ण समन्वयन केले जाणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगतिले. मंत्रालयातील दालनात आयोजित पत्रकार परिषदेत  मंत्री श्री.देसाई बोलत होते. यावेळी राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल उपस्थित होते.

पर्यटनमंत्री शंभूराज देसाई म्हणाले की, “ज्या वास्तूत छत्रपती शिवाजी महाराजांना मुघलांनी नजरकैदेत ठेवले होते,  त्या वास्तूचे ठिकाण सर्व तज्ज्ञ लोकांकडून माहिती करून घेवून विहित परवानग्या घेवून तेथे छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारण्यात येईल. पानिपतच्या तिसऱ्या लढाईला २६४ वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त “काला अंब” परिसरात आयोजित मराठा शौर्य दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली होती. त्यांनी या ऐतिहासिक स्थळी मराठा योध्यांच्या स्मरणार्थ भव्य स्मारक उभारण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार ही कार्यवाही करण्यात येणार आहे. या दोन्ही स्मारकांच्या उभारणीसाठी शासन राज्यस्तरीय समितीचे गठन करून जमीन अधिग्रहण, या कामांसाठी लागणाऱ्या निधीची तरतूद करणे ही काम प्राधान्याने करण्यात येणार आहेत असेही ते म्हणाले.

मराठा साम्राज्याच्या पराक्रमाचा जागर देशभर होवून, नव्या पिढीला मार्गदर्शक ठरेल – मंत्री जयकुमार रावल

राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल म्हणाले की, आग्रा येथे आग्रा येथे ‘छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारल्यामुळे या वास्तूस नवसंजीवनी मिळणार असून, महाराजांच्या पराक्रमाचे स्मरण कायमस्वरूपी राहील. महाराष्ट्रातील तसेच संपूर्ण देशातील पर्यटक आणि इतिहासप्रेमींसाठी हे स्मारक एक प्रेरणादायी स्थळ ठरेल. तसेच पानिपतमधील “काला अंब” येथे भव्य स्मारक उभारले जाणार आहे हे स्मारक देखील राष्ट्रप्रेम, सर्वधर्मसमभाव आणि शौर्याचे प्रतीक ठरेल, मराठा साम्राज्याच्या पराक्रमाचा जागर देशभर करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वास  ही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

०००

संध्या गरवारे/विसंअ/

पुनर्वसनाच्या ठिकाणी सोयी-सुविधा उपलब्ध करुन द्या – मंत्री शिवेंद्रसिंह भोसले

सातारा, दि. ०७:  महू-हातगेघर प्रकल्पांतर्गत बाधितांच्या पुनर्वसनाबरोबरच इतर ज्या ठिकाणी प्रकल्प बाधितांचे पुनर्वसन झाले आहे त्या ठिकाणी सोयी- सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात. प्रकल्पग्रस्तांचे जे प्रश्न जिल्हास्तरावर सुटतील ते तातडीने सोडवाव्यात, असे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह भोसले यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात विविध प्रकल्प बाधितांच्या प्रश्नांबाबत मंत्री भोसले यांनी बैठक घेतली. या बैठकीला जिल्हाधिकारी संतोष पाटील, प्रभारी अपर जिल्हाधिकारी विक्रांत चव्हाण, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता जयंत शिंदे, कार्यकारी अभियंता अमर काशीद, जिल्हा पुनर्वसन अधिकारी मनोहर गव्हाड, प्रांताधिकारी राहुल बारकुल यांच्यासह प्रकल्पग्रस्त उपस्थित होते.


धरणामुळे शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या आहेत भूसंपादीत केलेल्या तथापि, उपयोगात न आणलेल्या जमिनीवर शेरे उठवून देण्याची कार्यवाही प्रांताधिकारी सातारा यांनी करावी, अशा सूचना करुन सार्वजनिक बांधकाम मंत्री भोसले म्हणाले, महू धरणावरील अस्तित्वातील रिंगरोडचे काम हे काही ठिकाणी संपादन नकाशाप्रमाणे झाले नाही. अस्तित्वातील रिंगरोड व संपादन नकाशावरील रिंगरोड मधील तफावतीची खातरजमा करुन घ्यावी. त्याचबरोबर पुनर्वसन ठिकाणी मिळालेल्या शेत जमिनीसाठी पाणी मिळण्यासाठीही कार्यवाही करावी.
प्रकल्पग्रस्तांना वर्ग 2 च्या जमिनी देण्यात आलेल्या आहेत. अशा जमिनी  वर्ग 1 करुन देण्याची मागणी होत आहे. यांच्या मागणीनुसार  जमिनी वर्ग 1 मध्ये करुन द्याव्यात. तसेच ज्या प्रकल्पग्रस्तांना मिळालेल्या गावठाणाची जागेची मोजणी करावयाची आहे त्यांनी 20 एप्रिलपर्यंत अर्ज सादर करावेत. या मोजणीची रक्कम कृष्णा खोरे विकास महामंडळाने भरावी, अशा सूचनाही सार्वजनिक बांधकाम मंत्री भोसले यांनी बैठकीत केल्या.
ज्या प्रकल्पग्रस्तांना आर्थिक स्वरुपात लाभ पाहिजे, अशा प्रकल्पबाधित शेतकऱ्यांनी आर्थिक माणीचा अर्ज सादर करावा. अर्ज एकत्र करुन त्यांचा विशेष प्रस्ताव शासनाकडे सादर करावा. मंत्रालयस्तरावर याचा पाठपुरावा केला लाईल.  हातगेघर ग्रामस्थांच्या मागणीनुसार नवीन उपसा सिंचन योजनेबाबत जलसंपदा  मंत्री यांच्यासोबत बैठक घेतली जाईल हा प्रश्नही मार्गी लावाला जाईल, अशी ग्वाहीही मंत्री भोसले यांनी बैठकीत दिली.
आंबळे पुरक जलाशय प्रकल्पाचा मंत्री भोसले यांनी घेतला आढावा
आंबळे जलाशय सातारा तालुक्यातील मौजे आंबळे येथे आहेत. या प्रकल्पग्रस्तांची आर्थिक स्वरुपात लाभ द्यावा, अशी मागणी आहे. खास बाब म्हणून प्रकल्पग्रस्तांचा प्रस्ताव कारणांसह शासनाकडे सादर करावा. याच्या मंजुरीसाठी प्रयत्न केले जातील.
कात्रेवाडी येथे सोयी – सुविधा उपलब्ध करुन द्यामंत्री भोसले
कात्रेवाडी ता. जावली हे गाव सह्याद्री व्याघ्र प्रकल्पांतर्गत येते. या गावासाठी प्रशासनाने सोयी-सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात, अशा सूचना सार्वजनिक बांधकाम मंत्री भोसले यांनी दिल्या. कात्रेवाडी हे गाव बफर झोनमध्ये येत आहे. यामुळे नागरिकांना विविध सोयी-सुविधा देताना अडचणी येत आहेत. वन विभागाने सोयी-सुविधांसाठी विविध परवानग्या द्याव्यात. जीओ लॉजीकल सर्व्हे ऑफ इंडियाने या गावाचा सर्व्हे केला असून हे गाव स्थलांतर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार त्यांच्या कायमस्वरुपी पुनर्वसनासाठी प्रयत्न करावेत, अशा सूचनाही मंत्री भोसले यांनी बैठकीत दिल्या.
०००

ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून ‘आषाढीवारी’ पूर्वतयारीचा आढावा

पुणे, दि. ०७: पालखी सोहळ्यात वारकऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी स्वच्छ, शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करुन देण्यासह पालखी मार्गावरील रस्ते, पालखीतळ दुरुस्तीसाठीचे प्रस्ताव दोन दिवसांत सादर करा. पालखी मार्गावरील रस्ते दुरुस्तीच्या अडचणीवर कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून रस्त्याच्या कामांना मान्यता व निधी उपलब्ध करुन देण्याबाबत शासनस्तरावर पाठपुरावा करण्यात येईल, असे आश्वासन ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांनी दिले.

विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित आषाढीवारी पूर्वतयारी आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन देसाई, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, अपर आयुक्त अरुण आनंदकर, उपायुक्त विजय मुळीक, नितीन माने, दत्तात्रय लांघी, तसेच दूरदृश्य प्रणालीद्वारे सातारा, सोलापूर, नाशिक व जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी व पोलीस अधीक्षक उपस्थित होते.

मंत्री गोरे म्हणाले, प्रत्येक मुक्कामाच्या ठिकाणी, पालखी मार्ग व विसावा स्थानांवर स्वच्छता राखली जाईल, याची विशेष खबरदारी घ्यावी. स्वच्छतेसाठी पुरेशा प्रमाणात फिरती शौचालये आणि अधिक प्रमाणात स्वच्छता कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी. टँकरमधील पाण्याच्या शुद्धतेबाबत नियमित तपासणी करावी. पाण्याच्या स्रोतांचे शुद्धीकरणही व्यवस्थित होईल याकडे लक्ष द्यावे. पालखी मार्गावरील रेस्टॉरंट, हॉटेल्स यांची स्वच्छता व अन्न शुद्धतेची खात्री करावी. तसेच पंढरपूर शहरातील कचऱ्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ व वाहनांची व्यवस्था करावी, पंढरपूर शहरात सोलापूर जिल्हा परिषद व पोलीस प्रशासनाने ड्रोनद्वारे नियंत्रण ठेवण्यासाठी संयुक्त व्यवस्थापन यंत्रणा तयार ठेवावी, वारीदरम्यान देण्यात आलेल्या कामांसाठी कंत्राटदारांकडून अटी व शर्तीचे पालन करुन कामे होण्यासाठी त्यांच्यावर शासकीय यंत्रणेने अंकुश ठेवावा, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. ग्रामपंचायतींना आगाऊ निधी देण्याची व्यवस्था करण्यात येईल असे सांगून पालखी सोहळ्यादरम्यान पिण्याचे पाणी, आरोग्य आणि स्वच्छतेसाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, अशी ग्वाही देखील मंत्री गोरे यांनी दिली.

विभागीय आयुक्त पुलकुंडवार यांनी सादरीकरणाद्वारे करण्यात आलेल्या नियोजनाची माहिती दिली. स्वच्छ आणि निर्मल वारीसाठी विशेष नियोजन करण्यात आले असून पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता तपासणी, प्रथमोपचार पेट्या, निवारा केंद्र, हिरकणी कक्ष आदी सुविधांसोबत वारकऱ्यांना आरोग्य सुविधा देण्यात येणार असल्याचे सांगून स्वच्छ, निर्मल व सुरक्षित वारीसाठी सर्व विभागांनी समन्वय ठेऊन दिलेल्या सूचनांचे पालन करावे तसेच स्थानिक प्रशासनाशी समन्वय ठेऊन पोलीस वाहतूक विभागाने पाण्याचे टँकर पालखी तळ व विसाव्याच्या ठिकाणी वेळेत पोहोचतील याची खबरदारी घ्यावी, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

यावेळी मंत्री गोरे यांनी आषाढीवारीच्या अनुषंगाने सर्वच जिल्ह्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. पुणे, सातारा, सोलापूर, नाशिक व जळगाव मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी पालखी सोहळ्याच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या पूर्वतयारीची माहिती दिली.

०००

ताज्या बातम्या

कोकणातील माकडे व वानरांच्या निर्बीजीकरणासाठी केंद्र उभारण्याचा प्रस्ताव विचाराधीन – वन मंत्री गणेश नाईक

0
मुंबई, दि. २४:  कोकणातील फळबागा आणि शेतीपिकांना वानर आणि माकडांचा मोठ्या प्रमाणात होणाऱ्या उपद्रवाला आळा घालण्यासाठी माकडांचे निर्बीजीकरण करण्यासाठी केंद्र उभारण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचे...

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यात मृत पावलेल्या डोंबिवलीतील तिघांना मुख्यमंत्र्यांकडून श्रद्धांजली

0
ठाणे, दि.२३ (जिमाका): जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या तीन जणांना बुधवारी रात्री डोंबिवलीत हजारो शोकाकुल नागरिकांनी भगशाला मैदानात एकत्रित...

काश्मिरातील महाराष्ट्राच्या नागरिकांना परत आणण्यासाठी विशेष विमानाची व्यवस्था

0
मुंबई, दि. 23 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काश्मिरातील महाराष्ट्राच्या नागरिकांना परत आणण्यासाठी विशेष विमानाची व्यवस्था करण्याचे निर्देश दिल्यानंतर 24 एप्रिल 2025 रोजी श्रीनगर...

महाराष्ट्र-अर्जेंटिना यांच्यात व्यापार व सहकार्याच्या अमर्याद संधी – पणन आणि राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल

0
मुंबई, दि. 23 : महाराष्ट्र आणि अर्जेंटिना यांच्यात कृषी, पर्यटन, ऊर्जा, माहिती तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक देवाणघेवाण यासारख्या विविध क्षेत्रात काम करण्याची मोठी संधी आहे, असे प्रतिपादन पणन आणि राजशिष्टाचार...

महाराष्ट्र – जिबूती यांच्यात व्यापारासाठी नवीन दालन खुले होणार – राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल

0
मुंबई, दि. 23 : जिबूती व महाराष्ट्र यांच्यात केवळ व्यापाराचे नव्हे, तर परस्पर विश्वासाचे संबंध आहेत. हा विश्वास दृढ करूया आणि एकत्रितपणे वाढ आणि समृद्ध भविष्यासाठी...