सोमवार, एप्रिल 28, 2025
Home Blog Page 39

शेवटच्या घटकापर्यंत योजनांचा लाभ पोहोचविण्यासाठी एकत्रितपणे काम करा – मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई,दि. ०९: महसूल विभागाच्या विविध योजनांचा थेट ग्रामीण जनतेशी संबंध असून जनतेच्या शासनाकडून मोठ्या अपेक्षा आहेत. या अपेक्षा पूर्ण करताना गतिशील आणि पारदर्शकपणे काम करण्याचे राज्य शासनाचे धोरण असून समाजातील शेवटच्या घटकापर्यंत शासनाच्या विविध योजनांचा लाभ पोहोचविण्यासाठी महसूल यंत्रणेने एकत्रितपणे काम करावे, असे आवाहन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.

महसूल विभागामार्फत सर्वसामान्यांशी संबंधित असणाऱ्या मातोश्री ग्रामसमृद्धी शेत / पाणंद रस्ते, छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान, जिवंत सातबारा योजना, सलोखा योजना आदी विविध योजना राबविण्यात येतात. या योजना गावपातळीवर प्रत्यक्ष राबविणाऱ्या महसुली यंत्रणेशी मंत्री बावनकुळे यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला. यावेळी कोकण विभागीय आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांच्यासह महसूल विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मंत्री बावनकुळे म्हणाले, राज्य शासन गतिशीलपणे आणि पारदर्शकपणे वाटचाल करीत असून  कोणाच्याही चुकीमुळे याला हानी पोहोचणार नाही याची सर्वांनी दक्षता घेणे आवश्यक आहे. पारदर्शकपणे काम करताना अनवधानाने झालेल्या चुका माफ केल्या जातील. परंतु, जाणीवपूर्वक केलेल्या चुकांना पाठीशी घातले जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

मंत्री बावनकुळे म्हणाले की, नुकत्याच पुणे येथे झालेल्या महसूल विभागाच्या दोन दिवसीय परिषदेत मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विभागाच्या कार्याची दिशा स्पष्ट केली आहे. त्यानुसार विभागीय आयुक्त योग्य ती कार्यवाही करीत आहे. प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्या शेतीसाठी रस्ता, वीज आणि पाणी मिळण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. नागरिकांच्या प्रलंबित तक्रारींवर पुढील एक वर्षात एकही सुनावणी प्रलंबित राहणार नाही याची सर्वांनी दक्षता घ्यावी, असे सांगून महाराजस्व समाधान शिबिर अंतर्गत राज्यात १६०० शिबिरे होणार आहेत या माध्यमातून सर्वांना लाभ मिळेल, यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देश त्यांनी दिले. नुकत्याच जाहीर झालेल्या वाळू धोरणाबाबत कोणतीही तडजोड न करण्याची सूचना करून गरिबांच्या घरकुलांना वाळू मिळालीच पाहिजे, असे स्पष्ट निर्देशही त्यांनी दिले.

प्रत्येक अधिकाऱ्याने इतरांना मार्गदर्शक ठरेल असे एक नाविन्यपूर्ण कार्य करण्याचे आवाहन करून मंत्री बावनकुळे यांनी चांगले काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचा जाहीरपणे गौरव केला जाणार असल्याचे सांगितले. विविध माध्यमांमधून येत असलेल्या नकारात्मक बातम्यांबद्दल बोलताना, त्यातून आपली चूक निदर्शनास आल्यास ती दुरुस्त करावी अथवा बातमी चुकीची असल्यास त्याचे तातडीने खंडन करावे, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

०००

बी.सी.झंवर/विसंअ/

कृषी विद्यापीठास पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी – मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई दि. ०९: कोल्हापूर शहरातील शेंडापार्क येथील जागा आयटी पार्क आणि दंत महाविद्यालयासाठी देण्याची मागणी केली जात होती. तथापि, ही जागा महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी यांच्या ताब्यात आहे. ही जागा हस्तांतर करून विद्यापिठास पर्यायी जागा उपलब्ध करून देण्याबाबत प्रस्ताव पाठविण्याचे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.

मंत्री बावनकुळे यांच्या मंत्रालयातील दालनात याबाबत बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी कोल्हापूर जिल्हाधिकारी अमोल येडगे, कृषी विद्यापीठ राहुरीचे अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

मंत्री बावनकुळे म्हणाले की, कोल्हापूर शहराच्या विकासासाठी शेंडापार्क येथील जागेची अदलाबदल करण्यास महसूल विभागाची तयारी आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांना पर्यायी जागा उपलब्ध करून दिली जात असेल आणि त्यांची तयारी असेल तर त्यासाठी कोल्हापूर जिल्हाधिकारी यांनी प्रस्ताव पाठवावा.

कृषी विद्यापीठाने आपणास मिळणारी जागा ही शेती आणि संशोधनास योग्य अशी मिळावी आणि जागेच्या अदलाबदलीमध्ये त्या ठिकाणच्या विकासासाठी निधी मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.

०००

बी.सी.झंवर/विसंअ/

पालघर येथे ईएसआयसी रुग्णालयासाठी जागा देणार – मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई, दि. ०९: पालघर जिल्ह्यातील मौजे कुंभवती येथे १५० खाटांचे कर्मचारी राज्य विमा महामंडळाचे (ईएसआयसी) रुग्णालय बांधण्याचे प्रस्तावित आहे. हे रुग्णालय ही या परिसरातील रुग्णांसाठी अत्यावश्यक बाब असून यासाठी एक रुपये भाडेतत्वावर शासकीय जागा उपलबध करुन देण्यात येईल, असे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.

मौजे कुंभवती येथील सर्व्हे क्रमांक 1775/57 ही जमीन 150 खाटांचे ईएसआयसी रुग्णालय बांधण्यासाठी नाममात्र शुल्कात मिळण्याबाबत मंत्री बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली. या बैठकीस खासदार हेमंत सवरा, जिल्हाधिकारी इंदुराणी जाखर उपस्थित होते. तर विभागीय आयुक्त विजय सुर्यवंशी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

मंत्री बावनकुळे म्हणाले की, पालघर परिसरात ईएसआयसी रुग्णालय अत्यावश्यक असल्याने सदर जागेचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने शासनाकडे सादर करावा. एक रुपये भाडेतत्त्वावर जागा देण्याबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात येईल.

०००

बी.सी.झंवर/विसंअ/

वाशी (जि. धाराशिव) येथे शासकीय आयटीआय जागेचा प्रस्ताव तातडीने पाठवा – मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई, दि. ०९ : धाराशिव जिल्ह्यातील वाशी येथे शासकीय आयटीआयसाठी वाशी परिसरात जागा देण्यासाठीचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांमार्फत तातडीने पाठवावा. शासनामार्फत त्यास तत्काळ मंजुरी देण्यात येईल, असे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.

वाशी येथे शासकीय आयटीआयसाठी जागा उपलब्ध करून देण्याबाबत मंत्री बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीस आमदार राणा जगजित सिंह पाटील, धाराशिव जिल्हाधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

आयटीआयसाठी वाशी येथे शासकीय जमीन देण्याचा निर्णय यापूर्वी घेण्यात आला होता. तथापि, स्थानिकांच्या विरोधामुळे हा निर्णय रद्द झाला. आता वाशीपासून १० किलोमीटर अंतरावर तेरखेडा गाव परिसरात जागा देण्याचे प्रस्तावित आहे, परंतु यासाठी वन विभागाची परवानगी आवश्यक असल्याची माहिती जिल्हाधिकारी यांनी दिली.

मंत्री बावनकुळे म्हणाले की, जिल्हा प्रशासन, आयटीआयशी संबंधित सर्व अधिकारी यांनी एकत्रितपणे वाशी नगरपरिषदेच्या पाच किलोमीटर परिसरात जागा निश्चिती करून शासनाकडे नवीन प्रस्ताव सादर करावा. शासकीय जमीन असल्यास त्यास तत्काळ मंजुरी देण्यात येईल. अशी जागा उपलब्ध नसल्यास आणि खासगी जमीन असल्यास त्या जागेबाबत कौशल्य विकास विभागाची मान्यता घेऊन प्रस्ताव पाठविण्याची सूचनाही त्यांनी यावेळी केली.

०००

बी.सी.झंवर/विसंअ/

 

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मंत्री भरत गोगावले यांची आढावा बैठक

रायगड, दि. ०९ (जिमाका): छत्रपती शिवाजी महाराज पुण्यतिथीनिमित्त केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या 12 एप्रिल 2025 रोजी होणाऱ्या किल्ले रायगड दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर रोहयो मंत्री भरत गोगावले यांनी सर्व प्रमुख विभागांची आढावा बैठक घेतली. या संदर्भातील काटेकोर नियोजनाच्या सूचना त्यांनी सर्व संबंधित यंत्रणांना दिल्या.

महाड शासकीय विश्राम गृहात आयोजित बैठकीला जिल्हाधिकारी किशन जावळे, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, महाडचे प्रभारी प्रांताधिकारी संदीपान सानप, तहसीलदार महेश शितोळे गटविकास अधिकारी डॉ. स्मिता पाटील यांच्यासह केंद्रीय पुरातत्व विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद, वन विभाग, महावितरण, पंचायत समिती, पोलीस दल, महसूल विभाग, राज्य परिवहन, पशुवैद्यकीय विभाग, आरटीओ,रायगड रोपवे प्रशासन,आरोग्य विभाग, नगरपरिषद प्रशासन,पाणीपुरवठा विभाग यांसह अन्य शासकीय, प्रशासकीय विभागांचे प्रमुख प्रतिनिधी उपस्थित होते.

मंत्री गोगावले यांनी हा कार्यक्रम सुनियोजित व सुव्यवस्थितपणे पार पडण्याची जबाबदारी सर्वांवर आहे. प्रत्येकाने आपले काम चोख बजावावे अशा सूचना दिल्या.

यावेळी मंत्री गोगावले यांनी प्रत्येक विभागाकडून रायगडच्या पायथ्यापासून ते प्रत्यक्ष गडावर होणाऱ्या संपूर्ण कार्यक्रमाच्या नियोजनाचा आढावा  घेतला.

यामध्ये  वाहनतळ, एसटी गाड्यांचे जाण्या-येण्याचे नियोजन, प्रमुख व आवश्यक ठिकाणी वीजपुरवठा, पिण्याचे पाण्याचे नियोजन, रोपवेच्या वापराच्या वेळा, गडाचा पायथा ते गडावरील कार्यक्रमा दरम्यानची आरोग्य सुविधा, तात्पुरती होणारी हेलिपॅड निर्मिती, रस्ते व दळणवळणाचे नियोजन या प्रमुख मुद्द्यांवर चर्चा करून यातील त्रुटी व समस्यांवर तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश दिले.

०००

सांस्कृतिक संबंध परिषदेने मित्र देशांमध्ये भारतीय सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करावे – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

मुंबई, दि. ९ : गेल्या काही वर्षांमध्ये भारताचे जागतिक पटलावर महत्व वाढले असून देशोदेशींचे राष्ट्रप्रमुख भारताशी व्यापार, संयुक्त उपक्रम यांसह शिक्षण व सांस्कृतिक संबंध वाढविण्यासाठी प्रयत्नशील आहेत. सांस्कृतिक विविधता भारताचे बलस्थान असून सांस्कृतिक संबंध परिषदेने विविध देशांमध्ये भारताच्या सांस्कृतिक महोत्सवांचे आयोजन करून विविध देशांशी संबंध आणखी दृढ करण्यात योगदान द्यावे असे प्रतिपादन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी केले.

राज्यपाल राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचा ७५ वा स्थापना दिवस नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स (एनसीपीए), मुंबई येथे संपन्न झाला, त्यावेळी ते बोलत होते.

अलीकडेच चिलीचे अध्यक्ष भारत दौऱ्यावर येऊन गेले. भारतीय संस्कृती व परंपरांबद्दल आपण वाचले असून येथील सांस्कृतिक विविधता आपल्याला प्रत्यक्ष अनुभवायची असल्याचे त्यांनी आपणास सांगितले असे नमूद करुन भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेने देशाचे परराष्ट्र संबंध अधिक दृढ करण्यात महत्त्वाची भूमिका बजावावी असे राज्यपालांनी सांगितले.

भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेने अनेक देशांमधील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान करून भारतात उच्च शिक्षण घेण्यास सहकार्य केले याबद्दल आनंद व्यक्त करून देशोदेशींचे हे सर्व माजी विद्यार्थी आज त्यांच्या देशात भारताचे सांस्कृतिक राजदूत झाले आहेत. भारतीय शिष्यवृत्तीमुळे अफगाणिस्तान सह अनेक मित्र देशातील विद्यार्थ्यांना भारतात उच्च शिक्षण घेण्याची संधी मिळाली असे राज्यपालांनी यावेळी सांगितले.

यावेळी प्रसिद्ध नृत्यांगना आदिती भागवत यांच्या ‘लय की कहानी’ या नृत्याधारित कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाला समाजसेविका व कला इतिहासकार फिरोजा गोदरेज, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु  डॉ. रवींद्र कुलकर्णी, राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, प्रोटेक्टर ऑफ इमिग्रंट्स राहुल बर्हत, भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेच्या विभागीय संचालिका रेणू पृथियानी, राज्यपालांचे उपसचिव एस राममूर्ती, विविध देशांचे मुंबईतील वाणिज्यदूत, आयसीसीआर शिष्यवृत्ती प्राप्त विविध देशांचे विद्यार्थी आदी  उपस्थित होते.

००००

75th Foundation Day of Indian Council of Cultural Relations

Governor compliments ICCR for promoting Cultural Diplomacy

Mumbai, 9 April : Maharashtra Governor C. P. Radhakrishnan presided over the 75th Foundation Day programme of the Indian Council for Cultural Relations (ICCR) at NCPA in Mumbai on Wed (9 April).

In his address, Governor Radhakrishnan expressed his admiration for ICCR for promoting India’s cultural diplomacy and facilitating cultural exchange. He praised ICCR’s efforts in showcasing the diverse and vibrant Indian heritage through its global network of International Cultural Centres, and the impact it has had in promoting mutual understanding between nations.

 “ICCR has been at the forefront of promoting India’s rich cultural heritage. Thousands of scholarships have been provided to students from various countries, many of whom today stand as ambassadors of Indian culture in their respective nations,” remarked the Governor. He further praised ICCR’s role in fostering education, with students from countries such as Afghanistan actively seeking opportunities to study in India.

The Governor said India’s global image has witnessed a remarkable transformation in recent years. Many nations are eager to forge multilateral partnerships with India, which according to him is a testament to our growing influence on the world stage.

The Governor said the President of Chile expressed a desire to experience India’s culture by living among the people. He encouraged ICCR to further extend its outreach and suggested organizing India festivals in various countries to strengthen the bond of cultural exchange.

A dance and musical programme ‘Laya Ki Kahani’ was presented by well known Kathak dance exponent Aditi Bhagwat on the occasion.

Philanthropist and art historian Pheroza Godrej, Secretary to the Governor Dr Prashant Narnaware, Vice Chancellor of the University of Mumbai Dr. Ravindra Kulkarni, Protector of Emigrants (PoE) Rahul Barhat, ICCR Mumbai Zonal Director Renu Prithiani, Deputy Secretary to the Governor S Ramamoorthy, diplomats from various countries and foreign students getting ICCR scholarship were present.

0000

देशविघातक कारवाया करणाऱ्या संघटनांविरुद्धच विशेष जनसुरक्षा कायदा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबईदि. ९ : महाराष्ट्र शासनाने प्रस्तावित केलेला विशेष जनसुरक्षा कायदा हा देशांतर्गत सुरक्षेसाठी महत्त्वाचा आहे. या कायद्यामुळे पत्रकार किंवा कोणत्याही सर्वसामान्य व्यक्तीला कोणताही त्रास होणार नाहीत्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याला बाधा पोहोचणार नाही. हा कायदा व्यक्तींसाठी नसून देशविघातक कृत्ये करणाऱ्या संघटनांविरुद्ध असल्याची नि:संदिग्ध ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेनंतर पत्रकार संघटनांच्या प्रतिनिधींनी समाधान व्यक्त केले.

विशेष जनसुरक्षा कायद्यासंदर्भात राज्यातील विविध पत्रकार संघटनांच्या प्रतिनिधींबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सह्याद्री अतिथीगृहात आयोजित बैठकीत चर्चा करून पत्रकारांच्या शंकांचे निरसन केले. यावेळी मुख्य सचिव सुजाता सौनिकगृह विभागाचे अपर मुख्य सचिव इक्बालसिंह चहलमाहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंहपोलिस महासंचालक रश्मी शुक्लाविशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांच्यासह राज्यातील विविध पत्रकार संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

प्रस्तावित महाराष्ट्र जनसुरक्षा कायद्यातील तरतुदीबद्दल पत्रकार संघटनांमध्ये काही शंका होत्या. १२ संघटनांनी एकत्र येत पत्रकार अभिव्यक्ती मंच स्थापन केला होता. या शंकांचे निरसन व्हावे व हा कायदा देशाच्या अंतर्गत सुरक्षेसाठी किती उपयुक्त आहेयाची माहिती पत्रकारांना व्हावीयासाठी बैठकीत यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच पत्रकार संघटनांच्या शंकांवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी सविस्तर उत्तरे दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले कीदेशात यापूर्वीच तेलंगणासह इतर चार राज्यांनी तसेच केंद्र शासनाने जनसुरक्षा कायदा केला आहे. या चार राज्यांपेक्षा महाराष्ट्र शासनाने केलेला कायदा हा अधिक संरक्षित आहे. अनेक माओवादी संघटनांना देशातील अनेक भागात बंदी आहे. त्यामुळे या संघटनांनी महाराष्ट्रात त्यांचे मुख्यालय हलविले आहे. माओवादी संघटनांच्या फ्रंटल ऑर्गनाझेशन हे आता शहरी भागात राहून कार्य करत आहेत. त्यामुळे आता जर हा कायदा केला नाही तर भविष्यात अनेक अडचणींना महाराष्ट्राला सामोरे जावे लागेल.

या प्रस्तावित जनसुरक्षा कायद्यासंदर्भात जनतेमध्ये स्पष्टता यावीयासाठी विधीमंडळात कायद्याचा प्रस्ताव मांडतानाच तो संयुक्त समितीकडे पाठवून त्याबद्दल जनसुनावणी घेण्याची भूमिका मांडली. या प्रस्तावित कायद्यामध्ये पत्रकार संघटनांच्या काही सूचना असतील तर त्यावरही योग्य ती कार्यवाही करण्यात येईल. तसेच कायद्यातील तरतुदीत स्पष्टता येण्यासाठी योग्य ती काळजी घेण्यात येईलअसेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

एखाद्या संघटनेने देशाच्या सुरक्षेला बाधा येईलअसे बेकायदेशीरपणे कृत्य केल्यास किंवा माओवादी संघटनेची विचारधारा पुढे नेण्याचे कृत्य केल्यास अशा संघटनेविरुद्ध तीन न्यायाधीशांच्या सल्लागार समितीपुढे सुनावणी झाल्यानंतरच कारवाईची त्यात तरतूद आहेत्यामुळे कोणतेही सरकार त्याचा दुरुपयोग करु शकत नाही. या समितीपुढे संघटनेचे कृत्य आंतरिक सुरक्षेविरुद्ध असल्याचे पोलिसांना सिद्ध करावे लागेल. ते सिद्ध झाले तरच त्या संघटनेविरुद्ध बंदी घालण्याची कारवाई होईल. त्यानंतरच कारवाईचे अधिकार प्राप्त होतील. हा कायदा कोणत्याही व्यक्तींविरुद्ध किंवा पत्रकारांविरुद्ध नाहीअसे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

यावेळी अखिल भारतीय मराठी  पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुखबृहन्मुंबई युनियन ऑफ जर्नालिस्टचे सचिव इंदरकुमार जैनमुंबई पत्रकार परिषदेचे संदीप चव्हाणमंत्रालय व विधीमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष दिलीप सपाटेराज्य अधिस्विकृती समितीचे अध्यक्ष यदू जोशीप्रेस क्लबचे सौरभ शर्माअनुराग कांबळेमुंबई हिंदी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष राजकुमार सिंहबृहन्मुंबई महापालिका वार्ताहर संघाचे मारुती मोरेपुणे श्रमिक पत्रकार संघाचे उपाध्यक्ष किशन काळेमुंबई क्राईम रिपोर्टर संघटनेचे अध्यक्ष विशाल सिंहमहाराष्ट्र श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रदीप मैत्रकोषाध्यक्ष सौरभ शर्मामराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त किरण नाईकटीव्ही जर्नालिस्ट असोसिएशनचे महासचिव पंकज दळवीमनोज हलवाई यांच्यासह विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

००००

नंदकुमार वाघमारे/विसंअ/

भगवान महावीरांचे मानवकल्याणाचे विचार आचरणात आणण्याचा सर्वांनी प्रयत्न करुया -उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून महावीर जयंतीच्या शुभेच्छा

मुंबई, दि. ९ :- “अहिंसा हाच सर्वात मोठा धर्म आहे. तुम्ही जगा, दुसऱ्यांना जगू द्या. लोभ, क्रोध, अभिमान, आसक्ती हेच मोठे शत्रू आहेत, त्यांना स्वत:पासून दूर ठेवा. स्वत:वर मिळवलेला विजय सर्वश्रेष्ठ विजय असतो. प्रत्येक आत्म्यात आनंद असतोच, स्वत: आनंदी रहा आणि दुसऱ्यांना आनंदी ठेवा…,” भगवान महावीरांच्या या विचारांमध्ये सर्वांना सुखी करण्याची ताकद असून मानवकल्याणाचे हे विचार आचरणात आणण्याचा आपण सर्वांनी प्रयत्न करुया, असे आवाहन करीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील नागरिकांना भगवान महावीर जयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महावीर जयंतीनिमित्त भगवान महावीरांच्या कार्याचे, विचारांचे स्मरण करुन त्यांना श्रद्धापूर्वक वंदन केले आहे. महावीर जयंतीनिमित्त दिलेल्या संदेशात उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणतात की, भगवान महावीर हे जैन धर्माचे 24 वे आणि शेवटचे तीर्थंकर होते. चिंतनशील विचारवंत ही त्यांची ओळख होती. त्यांनी मानवतावादाचे विचार मांडले. अखिल प्राणीमात्रांनी सुखी रहावे हे त्यांचे ध्येय होते. राजघराण्यात जन्मलेल्या महावीरांनी ऐहिक सुखाचा त्याग केला. त्याग, संयम, प्रेम, करुणा, शील, सदाचारासारख्या सद्गगुणांचं महत्वं जगाला समजावून सांगितलं. अडीच हजार वर्षांपूर्वी जगाला शांती, अहिंसा, बंधुत्वाची शिकवण दिली. ही शिकवण आजच्या काळात तितकीच किंबहूना अधिक महत्वाची आहे, असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भगवान महावीर जयंतीनिमित्त दिलेल्या आपल्या संदेशात म्हटले आहे.
—–००००—–

भगवान महावीरांची शिकवण सत्य,अहिंसेच्या मार्गावर चालण्यासाठी प्रेरणादायी

मुंबई, दि. ९: भगवान महावीरांच्या पवित्र संदेशांचा आपल्या जीवनात अंगीकार करतानाच त्यांनी आपल्याला सत्य आणि अहिंसेच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा दिली. त्यांची शिकवण आजही जीवन शांत, संयमी आणि यशस्वी करण्याचा मार्ग दाखवते, अशा शब्दात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महावीर जयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

उपमुख्यमंत्री श्री. शिंदे आपल्या शुभेच्छा संदेशात म्हणतात, भगवान महावीरांनी सत्य, अहिंसेबरबरच क्षमा करण्यावर सर्वाधिक भर दिला. त्याग आणि संयम, प्रेम आणि करुणा, नैतिकता आणि सद्गुण ही त्यांची शिकवण होती. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य मानवजातीला दुःखमुक्तीचा मार्ग दाखविण्यासाठी समर्पित केले.

महावीर जयंती दिनी त्यांच्या शिकवणींचे स्मरण करून त्या आपल्या दैनंदिन जीवनात आचरणात आणण्याचा दिवस आहे. केवळ शारीरिक हिंसेपासून नव्हे, तर मनाने आणि वाणीनेही कोणालाही दुखवू नये, हा भगवान महावीर यांनी दिलेला संदेश खुप मोलाचा आहे. समाजात शांती, समता आणि बंधुभाव दृढ करण्यासाठी आपण सर्व जण मिळून प्रयत्न करूयात, असे आवाहनही उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी केले आहे.
००००

जलव्यवस्थापन कृती पंधरवडा : १५ ते ३० एप्रिल २०२५ या कालावधीत होणार साजरा

मुंबई दि. ९ :- नागरिकांमध्ये जलसाक्षरता वाढवणेपाण्याच्या बचतीचे महत्व पटवून देणे आणि  जलव्यवस्थापनाच्या शाश्वत उपाययोजना राबवणे यासाठी जलसंपदा विभागाच्यावतीने १५ ते ३० एप्रिल २०२५ या कालावधीत जलव्यवस्थापन कृती पंधरवडा‘ साजरा केला जाणार आहे.

जलव्यवस्थापन कृती पंधरवड्याच्या माध्यमातून समाजात पाण्याच्या सुयोग्य वापराबाबत जनजागृती वाढवण्याचा उद्देश आहे. विशेष मोहीम स्वरूपात राबविण्यात येणाऱ्या या लोकाभिमुख उपक्रमात सर्व यंत्रणा व घटकांनी सक्रिय सहभाग घ्यावा,असे आवाहन जलसंपदा (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील आणि जलसंपदा (विदर्भतापी व कोकण खोरे विकास महामंडळ) आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी केले आहे.

जलव्यवस्थापन कृती पंधरवड्यातील उपक्रम

दिनांक १५ एप्रिल २०२५ रोजी जलव्यवस्थापन कृती पंधरवडा २०२५  साजरा करणे व जलसंपदा पंधरवडा शुभारंभ१६ एप्रिल रोजी जलसंपदा अधिकारी/कर्मचारी यांचे प्रशिक्षण व  ई-ऑफिस प्रणाली कार्यान्वित करणे१७ एप्रिल रोजी स्वछ व सुंदर माझे कार्यालयजल पुनर्भरण१८ एप्रिल रोजी  शेतकरी/पाणी वापर संस्था संवाद१९ एप्रिल रोजी भूसंपादन व पुनर्वसन इ. अडचणी निराकरणकालवा संयुक्त पाहणी२० एप्रिल रोजी कालवा स्वच्छता अभियान२१ एप्रिल रोजी उपसा सिंचनाचे पाणी परवानगी देण्यासाठी तक्रारींची निरसन करणे२२ एप्रिल रोजी अनधिकृतपणे वाणिज्य व औद्योगिक पाणी उपसा प्रकरणे शोध घेऊन कार्यवाही करणे २३ एप्रिल रोजी जलसंपदा व कृषी विभागामार्फत संयुक्तपणे पीक पद्धतीबदलउत्पादकता वाढ,  पाण्याचे नियोजन इ. बाबत बैठक/कार्यशाळा मार्गदर्शन कार्यक्रम२४ एप्रिल रोजी सिंचन ई-प्रणालीपाणी दरपाणीपट्टी आकारणी व वसुलीथकीत पाणीपट्टी प्रकरणांचा आढावा२५ एप्रिल रोजी विद्यापीठ/केव्हीकेसेवाभावी संस्था यांचे समवेत संवाद व कृती कार्यक्रम२६ एप्रिल रोजी महानगरपालिकानगरपालिकाग्रामपंचायत यांच्या प्रत्यक्ष पाणी वापराचा जललेखा परीक्षण व पाण्याचा पुनर्वापर न करता धरणांमध्ये व नदीमध्ये सांडपाणी सोडण्यात येत असल्याबद्दल प्रकरणांचा शोध घेणे२७ एप्रिल रोजी आपत्ती व्यवस्थापन करण्यात मार्गदर्शन (पूर/मालमत्तेचे रक्षण)२८ एप्रिल रोजी महसूल विभागाच्या समन्वयाद्वारे महामंडळाचे नावे संपादित जमिनींच्या ७/१२ उताऱ्यावर नोंदी घेणे/अतिक्रमण निष्कासन दिनांक ३१ मे पूर्वी करणे२९ एप्रिल रोजी  पाणी वापर संस्था सक्षमीकरण चर्चासत्र/कार्यशाळा आणि ३० एप्रिल २०२५ रोजी मा. पालकमंत्री यांच्या उपस्थितीत जिल्हा मुख्यालयी कार्यशाळा/महिला मेळावा आणि या पंधरवडा कालावधीत नाविन्यपूर्ण उपक्रम राबवणाऱ्या अभियंतांचा सत्कार व पंधरवडा समारोप असे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत,असे जलसंपदा विभागाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

००००

एकनाथ पोवार/विसंअ/

ताज्या बातम्या

दशकपूर्ती महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमाची!

0
राज्यातील नागरिकांना पारदर्शक, गतिमान व कालबद्ध पद्धतीने लोकसेवा देता याव्या यासाठी शासनाने 'महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, 2015' लागू केला आहे. यामुळे शासकीय आणि निमशासकीय...

देशाची आरोग्य व्यवस्था जगात सर्वात सक्षम आणि मोठी – केंद्रीय आरोग्य मंत्री जे.पी.नड्डा

0
छत्रपती संभाजीनगर, दि. २७ (जिमाका): जगात आपल्या देशाची आरोग्य व्यवस्था सर्वात मोठी असून या आरोग्यव्यवस्थेने प्रगती केली आहे. लसीकरण, महिलांचे आरोग्य, बाल आरोग्य तसेच...

सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न करणार – विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे

0
अमरावती, दि. २६: विधान परिषदेचे सभापती पद हे संविधानिक पद आहे. या पदाला समन्वय साधण्याची जबाबदारी आहे. त्यामुळे या समन्वयातूनच येत्या काळात सर्व घटकांना...

महाहौसिंगने परवडणाऱ्या घरांच्या निर्मितीचा वेग वाढवावा – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

0
मुंबई दि. २७: महाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडळ म्हणजेच महाहौसिंगने प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुलांच्या बांधकामांना गती देण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत. त्यांना येणाऱ्या अडचणींवर शासनाच्या स्तरावरून...

पनवेल महानगरपालिकेच्या क्रिकेट प्रशिक्षण केंद्रातून गुणवत्ताधारक खेळाडू घडतील – मंत्री ॲड. आशिष शेलार

0
मुंबई, दि. २७ : पनवेल महापालिकेने उभारलेल्या क्रिकेट प्रशिक्षण केंद्राची व्यवस्था उत्तम आहे. या प्रशिक्षण केंद्रासाठी महापालिकेने दिलीप वेंगसरकर यांची अगदी अचूक निवड केली...