छत्रपती संभाजीनगर, दि.२०(जिमाका): लोकसंस्कृतीचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांवर कला आणि संस्कृतीचे संस्कार करण्यासाठी शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठाच्या माध्यमातून व्यासपीठ उपलब्ध करा, असे आवाहन राजस्थानचे राज्यपाल हरीभाऊ बागडे यांनी केले.

केंद्रीय संस्कृती मंत्रालयांतर्गत पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, उदयपूर आणि सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने एमआयटी महाविद्यालयाच्या मंथन सभागृहात आयोजित दोन दिवसीय ‘वारसा सह्याद्रीचा’ कार्यक्रमाच्या समारोप समारंभात सांगितले.

राज्यपाल बागडे म्हणाले की, शालेय व महाविद्यालयीन जीवनामध्ये आपल्या कलेचा वारसा विद्यार्थ्यांना माहिती होणे आवश्यक आहे.यामुळे लोककलांना प्रोत्साहन मिळेल. तसेच नवीन लोककलाकार तयार होतील. हे व्यासपीठ म्हणजे आपल्या प्राचीन लोककलांना जिवंत ठेवणारे माध्यम ठरू शकते. त्यामुळे याकडे लक्ष देण्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

लोककलांमधून संस्कृती दर्शनही घडते. विविध संस्कृतीतून वेगवेगळ्या कलांची माहिती होते. त्यातून एकतेची संस्कृती तयार होते. भारताचे वैविध्य व त्यातून एकता हे वैशिष्ट्य आहे. ते म्हणाले ,भारताला कोणीही गुलाम बनवू शकत नाही, कारण येथे एकतेची संस्कृती आहे. ही संस्कृती अखंड राहिली तर कोणीही भारताकडे वाईट नजरेने पाहू शकणार नाही. शिक्षण घेत असताना काही बदल स्वीकारण्याची गरज व्यक्त करत भारतीय गुरुकुल शिक्षण पद्धतीमधील काही गोष्टीचा समावेश केल्याने त्याचे फायदे आहेत.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेबद्दल आणि पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, उदयपूर यांनी अशा महोत्सवांचे आयोजन केल्याबद्दल केंद्राचे संचालक फुरकान खान आणि त्यांच्या टीमचे कौतुक केले.

सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबईचे सहसंचालक श्रीराम पांडे, पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्राचे संचालक फुरकान खान, एमआयटीचे संचालक मुनिश शर्मा यांच्यासह विद्यार्थी, नागरिक या कार्यक्रमास उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीत आणि महाराष्ट्राच्या राज्यगीताने झाली. मोहिता दीक्षित आणि मिलिंद रमेश कुलकर्णी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
छत्रपती संभाजीनगरकर लोकनृत्यावर थिरकले
‘वारसा सह्याद्रीचा’ मध्ये 7 राज्यातील २३५ कलाकारांचा सहभाग, सात राज्यांच्या लोककला आणि संस्कृतीचा अनोखा संगम विविध राज्यांतील वाद्यांची संगीतमय सिम्फनी व लोकनृत्यांवर छत्रपती संभाजीनगरचे रसिक थिकरले. तर विख्यात नृत्यांगणा शमा भाटे यांचे ‘कृष्णा द लिबरेटर’ हे कथ्थक आणि प्रमिला सूर्यवंशी यांच्या लावणीने प्रेक्षकांच्या मनाला भुरळ घातली.

कार्यक्रमात महाराष्ट्रासह गोवा, गुजरात, राजस्थान, मणिपूर, पंजाब आणि पश्चिम बंगाल या 7 राज्यातील 235 कलाकारांनी लोककला सादर केली. दोन्ही दिवस महोत्सवाला प्रेक्षकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला.
नृत्यांगना शमा भाटे आणि संचाने ‘कृष्णा द लिबरेटर’ हे कथ्थक बॅले सादर केले. यात श्रीकृष्णाच्या संकटमुक्तीच्या प्रसंगांना बारकाईने उलगडण्यात आले. भाटे यांच्या दिग्दर्शनाखाली आणि अमीरा पाटणकर व अवनी गद्रे यांच्या नेतृत्वात 14 नृत्यांगनांनी मनमोहक भावमुद्रा आणि आनंदित तालबद्धतेने सादरीकरणाला वेगळ्या उंचीवर नेले. कालियामर्दन, गोवर्धन पर्वत उचलणे, कंस वध, माखन चोरी, गोपी वस्त्रहरण यांसारखे प्रसंग दाखवत गोप-गोपिकांसह सर्वांना संकटातून मुक्त करून निर्भयपणे जगण्याचा संदेश दिला. त्यांनी श्रीकृष्णाचे पर्यावरण प्रेम आणि रूढीवादविरोधी स्वरूपही बारकाईने व्यक्त केले. प्रमिला सूर्यवंशी यांच्या लावणीने महोत्सवात रंग भरले. वेगवान संगीत आणि तालावर थिरकणाऱ्या प्रमिला यांच्या भावमुद्रांनी अस्सल मराठमोळ्या अदाकारीने रसिक मनाला स्पर्श केला.

‘डेझर्ट सिम्फनी’ या लोकनृत्याच्या सादरीकरणात राजस्थानचे लोकवाद्य खरताल, पुंगी (बीन), चौतारा, कामायचा, सारंगी, मटका, बाजा, ढोलक, मोरचंग यांच्यासह कच्छची वीणा, जोडिया पावा, गमेलू, मंजीरा आणि महाराष्ट्राची नाळ आणि तुतारी यांच्या अनोख्या संगीतमय मिश्रणाने श्रोते थक्क झाले. यानंतर, संतोष नायर यांच्या दिग्दर्शनात तयार करण्यात आलेल्या नृत्य सादरीकरणात गोंधळ, गोव्याचे समई नृत्य, लावणी, राजस्थानचे चरी व कालबेलिया, गुजरातचे राठवा आणि सिद्दी धमाल, मणिपूरचे पुंग ढोल चोलम, पश्चिम बंगालचे पुरूलियाचे नटुआ आणि पंजाबच्या भांगडाच्या सादरीकरणाने प्रेक्षकांची वाहवा मिळवली. सादरीकरणादरम्यान हॉल अनेकदा टाळ्यांच्या कडकडाटाने दणाणून गेला.
विविध राज्यांमध्ये अशा प्रकारचे महोत्सव आयोजित करून एका राज्याची लोकसंस्कृती दुसऱ्या राज्यापर्यंत पोहोचवण्यास मदत होते असे पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, उदयपूरचे संचालक फुरकान खान म्हणाले. तर छत्रपती संभाजीनगरातील प्रेक्षकांना 7 राज्यातील सांस्कृतिक वैविध्य एकाच व्यासपीठावर अनुभवण्याची संधी देणारा हा अविस्मरणीय असा सांस्कृतिक सोहळा ठरल्याचे पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, उदयपूरचे सहायक संचालक (वित्त एवं लेखा) दुर्गेश चांदवानी आणि कार्यक्रम अधिकारी हेमंत मेहता म्हणाले.
०००