शुक्रवार, ऑगस्ट 22, 2025
Home Blog Page 5

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या अनुषंगाने ‘साई’  ही देशातील यशस्वी आणि पथदर्शक संस्था ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे, दि. २०: कृत्रिम बुद्धीमत्तेच्या वेगवान लाटेतही यशस्वी होण्याची क्षमता भारतीयांमध्ये आहे. त्यासाठी हे ज्ञान सामान्यजनांपर्यंत पोहोचविणाऱ्या शैक्षणिक संस्थांची आवश्यता आहे. सिंम्बायोसिसने यासाठी योग्य वेळी पुढाकार घेतला असून या प्रयत्नात ‘साई’  ही देशातील यशस्वी आणि पथदर्शक संस्था ठरेल,  असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठ लवळे येथे सिम्बायोसिस आर्टिफिशियल इंटेलिजन्स इन्स्टिट्यूटच्या (एसएआयआय- साई) उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी सिम्बायोसिस आंतराष्ट्रीय विद्यापीठाचे संस्थापक आणि कुलपती पद्मभूषण डॉ. शां. ब. मुजुमदार, यावेळी सिम्बायोसिसच्या प्रधान संचालक तथा सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या प्र-कुलपती डॉ. विद्या येरवडेकर, कुलगुरू डॉ. रामकृष्णन रमण, एसएआयआयच्या संचालक प्रा. डॉ. लवलीन गौर आदी उपस्थित होते.

कृत्रिम बुद्धिमत्तेबाबत जाणून घेत या क्रांतीत आघाडी घेण्याची ही योग्य वेळ आहे असे नमूद करून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, कृत्रिम बुद्धिमत्तेचा कृषी क्षेत्रात उपयोग करण्यासाठी राज्य शासनाने प्रयत्न सुरू केले आहेत. शेतीच्या प्रत्येक टप्प्यावर या तंत्रज्ञानाचा शेतकऱ्यांना उपयोग होणार असून त्यांचे जीवन अधिक सुकर होईल. पुण्यात झालेल्या ॲग्री हॅकेथॉनमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित उपयुक्त तंत्रज्ञान प्रदर्शित करण्यात आले.

राज्य शासनाने एआय चॅटबॉट्स तयार केले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांना कळेल त्या भाषेत शंकाचे समाधान होऊ शकेल. शासनाने कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने पुण्यातील वाहतूक विषयक अडचणींवर उपाययोजना सुचविण्यासाठी गुगलशी करार केला आहे. त्यामुळे वाहतूक नियोजनासाठी आवश्यक माहिती तात्काळ मिळू शकणार आहे. मानवाचे जीवन सुकर करण्यासाठी बहुविध पद्धतीने हे तंत्रज्ञान उपयोगात आणता येऊ शकते. राज्य शासनाने मायक्रोसॉफ्टच्या सहकार्याने मुंबई, पुणे आणि नागपूर येथे कृत्रिम बुद्धिमत्तेशी संबंधित ३ संस्थांची सुरूवात केली आहे. कायदा व सुव्यवस्था, प्रशासन, कृषी, तंत्रज्ञान आदी विविध क्षेत्रात या संस्था काम करणार असून त्यासोबतच कृत्रिम बुद्धीमत्तेच्या मुलभूत ज्ञानाबाबत नागरिकांना याद्वारे प्रशिक्षित करण्यात येईल.

कृत्रिम बुद्धिमत्तेचा सकारात्मक उपयोग गरजेचा

सध्याच्या युगात कृत्रिम बुद्धीमत्ता, क्वाँटम कंम्प्युटिंग आणि सेमी कंडक्टर या गोष्टींमुळे मोठे बदल घडून येत आहेत. अशा तंत्रज्ञानाच्या आव्हानांचा क्षमतेने उपयोग करून घेतल्यास प्रगतीचा वेग आणि कार्यक्षमतेवर सकारात्मक परिणाम दिसून येतात. म्हणून अनुकूल विकासासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेला स्वीकारणे ही आजची गरज आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे डिजीटल आर्थिक फसवणुकीची प्रकरणेही समोर येत आहेत. त्यामुळे कृत्रिम बुद्धिमत्तेचा जबाबदार आणि सकारात्मक वापर करणे गरजेचे आहे. दुर्गम भागातील आरोग्य सेवेसाठी आणि औषध निर्मितीत एआयचा उपयोग याचेच एक उदाहरण आहे.

इंटरनेट क्रांतीप्रमाणे ‘एआय क्रांती’तही आघाडी घ्या

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या प्रसाराने समाजासमोर येणाऱ्या आव्हानांची चर्चा सुरू झाली आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचा रोजगारावर होणाऱ्या परिणामाविषयी विशेषत्वाने प्रश्न उपस्थित केले जातात. नव्वदीच्या दशकात इंटरनेट आणि संगणक क्रांतीच्या संदर्भातही अशीच शंका उपस्थित करण्यात आली होती, मात्र देशाने या क्रांतीचे संधीत रुपांतर करून भारतीयांनी जगात माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात आपले वर्चस्व प्रस्थापित केले. आज एआय क्षेत्राचे ज्ञान सामान्य जनांपर्यंत पोहोचवून या क्षेत्रातही आघाडी घेण्याची संधी आपल्याला आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. सिम्बायोसिस संस्थेने त्यासाठी घेतलेला पुढाकार स्तुत्य असल्याचेही ते म्हणाले.

डॉ. मुजुमदार म्हणाले, कला, वाणिज्य, विज्ञान ज्ञानशाखांतील विद्यार्थ्यांसाठी पदवीस्तरावर कृत्रिम बुद्धिमत्ताविषयक शिक्षण देणारी संस्था नसल्याचे ओळखून राज्यात प्रथमच अशा स्वरुपाची संस्था स्थापन करण्यात आली आहे. येथे बी.बी.ए. इन एआय आणि बी.एस.सी. इन एआय हे अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत. मानवी विकासाच्या चौथ्या क्रांतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेची भूमिका महत्त्वाची आहे. आता भविष्यात तंत्रज्ञानासोबतच आध्यात्मिक मूल्यांवर आधारित क्रांतीचीही गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

स्वागतपर भाषणात डॉ. येरवडेकर म्हणाल्या, सिम्बायोसिस आर्टिफिशियल इंटेलिजन्स इन्स्टिट्यूटची स्थापना अभियांत्रिकी शाखा विरहित कृत्रिम बुद्धिमत्ताविषयक प्रशिक्षण देण्यासाठी करण्यात आली आहे. येथे सुरू करण्यात आलेल्या अभ्यासक्रमांना विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद लाभला असून पहिल्याच वर्षी १९० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. पुढील काळात नागपूर येथेही अशी संस्था सुरू करण्याचा प्रयत्न असल्याचे त्या म्हणाल्या.

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते सिम्बायोसिसच्या ‘साई’ (SAII) या बहुभाषिक व्हर्चुअल असिस्टंटचे लोकार्पण करण्यात आले. डॉ. रामकृष्णन रमण यांनी या बहुभाषिक व्हर्चुअल असिस्टंटबाबत माहिती दिली. प्रारंभी सिम्बॉयसिसच्या वाटचालीबाबत लघुचित्रफीत दर्शविण्यात आली.

यावेळी विद्यापीठातील विविध विद्याशाखांचे प्रमुख, प्राध्यापक, विद्यार्थी आदी उपस्थित होते.

०००

महाराष्ट्र राज्य विकास कर्ज, २०२५ ची परतफेड

मुंबई, दि. २० : महाराष्ट्र शासनाने पूर्वी खुल्या बाजारातून उभारलेल्या ८.२३ % महाराष्ट्र राज्य विकास कर्ज २०२५ अदत्त शिल्लक रकमेची ८ सप्टेंबर, २०२५ पर्यंत देय असलेल्या व्याजासह ९ सप्टेंबर २०२५ रोजी सममूल्याने परतफेड करण्यात येईल, असे वित्त विभागाच्या (वित्तीय सुधारणा) सचिव श्रीमती शैला ए. यांनी प्रसिद्धीपत्राद्वारे कळवले आहे.

‘परक्राम्य संलेख अधिनियम, १८८१’ अन्वये महाराष्ट्र शासनाने उपरोक्त दिनांकास सुटी जाहीर केल्यास, राज्यातील अधिदान कार्यालय, कर्जाची परतफेड अगोदरच्या कामाच्या दिवशी करेल. या कर्जावर दि. ९ सप्टेंबर २०२५ पासून व त्यानंतर कोणतेही व्याज अदा करण्यात येणार नाही.

सरकारी प्रतिभूती विनियम, २००७ च्या उप-विनियम २४ (२) व २४ (३) अनुसार, दुय्यम सर्वसाधारण खातेवही लेखा किंवा रोखे प्रमाणपत्र यांच्या स्वरुपातील शासकीय रोख्यांच्या नोंदणीकृत धारकाकडील मुदत्त समाप्ती उत्पन्नाचे प्रदान हे, इलेक्ट्रॉनिक माध्यमामार्फत जमा निधीची सुविधा असलेल्या कोणत्याही बँकेतील धारकाच्या खात्यात जमा करुन त्याच्या बँक खात्याचे संबधित तपशिलांसह प्रदानादेशाव्दारे करण्यात येईल. रोख्यांच्या बाबतीतील प्रदान करण्यासाठी, अशा रोख्यांचा मूळ वर्गणीदार किंवा यथास्थिती उत्तरवर्ती धारक, बँकेकडे किंवा कोषागाराकडे किंवा भारतीय स्टेट बँकेच्या शाखेच्या उप-कोषागाराकडे किंवा यथास्थिती त्यांच्या दुय्यम बँकांकडे जर त्यांना व्याज प्रदान करण्यासाठी मुखांकित करण्यात आले असल्यास/त्यांची नोंदणी करण्यात आली असल्यास त्याच्याकडे, त्यांच्या बँक खात्याचा संबंधित तपशील सादर करतील.

तथापि, बँक खात्याच्या संबधित तपशिलाच्या/इलेक्ट्रॉनिक माध्यमामार्फत निधी जमा करण्याच्या आदेशाच्या अभावी, नियत दिनांकास परतफेड करणे सुलभ व्हावे यासाठी, ८.२३% महाराष्ट्र राज्य विकास कर्ज, २०२५ च्या धारकांनी, लोक ऋण कार्यालयात २० दिवस अगोदर त्यांचे रोखे सादर करावेत. रोख्यांच्या मागील बाजूस  प्रमाणपत्रावरील देय मुद्दलाची रक्कम मिळाली, असे यथोचितरीत्या नमूद करुन ते रोखे परतफेडीसाठी सादर करावेत.

भारतीय स्टेट बँकेच्या किंवा तिच्या कोणत्याही सहयोगी बँकांच्यामार्फत ज्या ठिकाणी कोषागाराचे काम केले जाते त्या ठिकाणी ते रोखे रोखा प्रमाणपत्राच्या स्वरुपात असल्यास, ते संबंधित बँकेच्या शाखेत सादर करावेत आणि ते कोषागार किंवा उपकोषागार येथे सादर करु नयेत, याची विशेष नोंद घेतली पाहिजे.

रोख्यांची रक्कम प्रदान करण्यासाठी जी ठिकाणे मुखांकित करण्यात आली असतील त्या ठिकाणांखेरीज अन्य ठिकाणी ज्या रोखेधारकांना, रक्कम स्वीकारायची असेल, त्या रोखेधारकांनी ते रोखे नोंदणीकृत व विमाबध्द डाकेने संबंधित लोक ऋण कार्यालयात यथोचितरित्या पाठवावेत. लोक ऋण कार्यालय हे, महाराष्ट्र राज्यात शासकीय कोषागाराचे काम करणाऱ्या भारतीय स्टेट बँकेच्या किंवा तिच्या सहयोगी बँकेच्या कोणत्याही शाखेत कोषागारात/उपकोषागारात देय असलेल्या धनाकर्षाद्वारे त्याचे प्रदान करील,असे वित्त विभागाने प्रसिद्धीपत्रात नमूद केले आहे.

०००

आर्टीच्या स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण नोंदणीला २८ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

मुंबई, दि. २०: अण्णा भाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्थेमार्फत (आर्टी) राज्यातील मातंग व त्यातील तत्सम जातीच्या उमेदवारांसाठी विविध स्पर्धा परीक्षांकरिता अनिवासी पूर्व प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्याकरीता २८ ऑगस्ट २०२५ पर्यंत ऑनलाईन अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती आर्टीचे व्यवस्थापकीय संचालक सुनील वारे यांनी दिली आहे.

मांग, मातंग, मिनिमादिग, दखनी- मांग, मांग- म्हशी, मदारी, गारुडी, राधेमांग, मांग गारोडी, मांग गारुडी, मादगी व मादिगा समाजातील जे उमेदवार १२ वी आणि पदवीधर परीक्षा उत्तीर्ण आहेत अशा पात्र उमेदवारांनी https://barticet.in/ARTI या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन ऑनलाईन स्वरुपात अर्ज करावेत. २९ ते ३० ऑगस्ट २०२५ या दोन दिवसात उमेदवारांनी त्यांच्या ऑनलाईन अर्जात दुरुस्ती व प्रिंट काढण्यासाठी देण्यात आले आहेत. त्यानंतर या प्रशिक्षणासाठी विद्यार्थ्यांची सामयिक प्रवेश परीक्षा (Common Entrance Test-CET) घेऊन गुणवत्तेनुसार निवड करण्यात येणार आहे.

महाराष्ट्र शासनामार्फत सर्वंकष धोरण निश्च‍ित करण्यात आले असून त्यानुसार बार्टी संस्थेमार्फत टीआरटीआय, सारथी, महाज्योती, आर्टी या संशोधन संस्थांच्या स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रमांचे संनियंत्रण व अंमलबजावणी बार्टी संस्था करणार आहे.

११ महिन्यासाठी स्पर्धा परीक्षेचे पूर्व प्रशिक्षण

राज्यातील पात्र व इच्छुक उमेदवारांसाठी ११ महिन्यांकरीता यूपीएससी, एमपीएससी राज्यसेवा, अराजपत्रित सेवा, महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा (एमईएस), न्यायिक सेवा (जेएफएमसी) आणि सहा महिन्यांसाठी बँक (आयबीपीएस), कर्मचारी निवड आयोग (एसएससी), पोलीस- सैन्य भरती पूर्व प्रशिक्षण खासगी नामांकित व्यवसायिक प्रशिक्षण संस्थेमार्फत देण्यात येणार आहे.

प्रशिक्षण कालावधीकरीता विद्यावेतन

प्रशिक्षण कालावधीत दर महिना सहा ते १३ हजार रुपये विद्यावेतन त्यासोबत पुस्तक संच, बुट व इतर खर्चाकरिता एकवेळ १२ ते १८ हजार रुपये अनुषांगिक लाभ देण्यात येणार आहे. त्याकरीता पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन स्वरुपात अर्ज मागविण्यात येत आहेत.

०००

शैलजा पाटील/विसंअ/

आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून अतिवृष्टी स्थितीचा आढावा

मुंबई, दि. २० : राज्यात गेल्या तीन चार दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी आज घेतला. आपत्ती व्यवस्थापन मंत्री महाजन यांनी राज्य आपत्कालीन कार्य केंद्रास भेट देऊन राज्यातील परिस्थितीची माहिती घेतली. यावेळी राज्य आपत्कालीन कार्य केंद्राचे संचालक डॉ.भालचंद्र चव्हाण यांनी राज्यातील हवामानाविषयी अनुषंगिक माहिती दिली. यावेळी आमदार विजय रहांगडाले उपस्थित होते.

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार ज्या जिल्ह्यात रेड अलर्ट, ऑरेंज अलर्ट दिले आहेत, त्या ठिकाणी संभाव्य आपत्तीच्या अनुषंगाने आवश्यक उपाययोजना कराव्यात. नागरिकांना वेळीच दक्षता इशारा देण्यात यावेत. धरणातून सोडण्यात येणाऱ्या विसर्गामुळे नदीच्या पाणी पातळीत होणारी वाढ याबाबत नागरिकांना सूचना देण्यात याव्यात. पुराचे पाणी येणाऱ्या भागातील नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात यावे, अशा सूचना मंत्री महाजन यांनी दिल्या.

भारतीय हवामान विभागाशी सातत्याने संपर्कात राहून राज्यातील पर्जन्यमांचे अंदाज नागरिकांना वेळेत दिले जावेत. आवश्यक त्या ठिकाणी राज्य व राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची पथके पाठवावीत, अशा सूचनाही मंत्री महाजन यांनी यावेळी दिल्या.

 

०००

 

एकनाथ पोवार/विसंअ/

मंत्री आदिती तटकरे यांच्याकडून महिला व बाल विकास विभागाच्या योजनांचा आढावा

RAVI JADHAV

मुंबई, दि. २० : राज्यातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी राबविण्यात येत असलेल्या आदिशक्ती अभियानासह बाल संगोपन, मिशन वात्सल्य आणि मातृ वंदना योजना यांच्या अंमलबजावणीचा सविस्तर आढावा महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी घेतला.

RAVI JADHAV

मंत्रालयात आयोजित बैठकीत सचिव डॉ. अनुपकुमार यादव, आयुक्त कैलास पगारे, सहसचिव वी. रा. ठाकूर आदीसह अधिकारी उपस्थित होते.

आदिशक्ती अभियानांतर्गत महिलांच्या आरोग्य समस्या, कुपोषण, बालमृत्यू व मातृमृत्यूचे प्रमाण कमी करणे, लैंगिक व शारीरिक अत्याचारांना प्रतिबंध घालणे तसेच हिंसामुक्त कुटुंब व समाज निर्माण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यासाठी राज्यभर ३६ जिल्ह्यांमध्ये व १५० तालुक्यांमध्ये समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. ग्रामस्तरावर समिती गठित करण्याचे काम सुरू असून उर्वरित तालुक्यांमध्ये समित्या तातडीने स्थापन करण्याचे निर्देशही मंत्री तटकरे यांनी दिले.

कोरोना काळात सुरू झालेल्या एकल महिलांसाठीच्या योजनेची व्याप्ती वाढवून विधवा, परित्यक्ता व एकल महिला यांचा समावेश करण्यात यावा, असे निर्देश मंत्री तटकरे यांनी यावेळी दिले. बाल संगोपन योजनेसाठी निधी तातडीने उपलब्ध करून देण्यात देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. तसेच मिशन वात्सल्य आणि प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेचाही त्यांनी आढावा घेतला.

आयुक्त कैलास पगारे म्हणाले की, मातृ वंदना योजनेअंतर्गत राज्यातील जिल्ह्यांचे शंभर टक्के मॅपिंग पूर्ण झाले असून लाभार्थींना योजनेचा थेट फायदा होणार आहे.

 

०००

 

श्रद्धा मेश्राम/विसंअ/

नव्या काळातील बदल स्विकारणारी पीढी एमकेसीएलने घडवावी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे, दि. २०: कृत्रिम बुद्धीमत्तेच्या वेगवान लाटेत समाजात होणारे नवे बदल स्विकारणारी आणि त्यांना सक्षमपणे सामोरे जाणारी पिढी महाराष्ट्र ज्ञान महामंडळाने घडवावी, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. एमकेसीएलच्या नाविन्यपूर्ण आणि विकासाभिमूख उपक्रमात आपली भूमिका अदा करण्यासाठी राज्य शासन अग्रेसर राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.

बाणेर येथील बंटारा भवन येथे महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित (एमकेसीएल) च्या रौप्यमहोत्सवी स्थापना दिवस कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील, माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार, माजी मंत्री दिलीप वळसे-पाटील, एमकेसीएलचे अध्यक्ष पद्मविभूषण डॉ.अनिल काकोडकर, संस्थापक पद्मभूषण डॉ.विजय भटकर, डॉ. विवेक सावंत, एमकेसीएलचे व्यवस्थापकीय संचालक समीर पांडे आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, आज कृत्रिम बुद्धीमत्तेचे मोठे आव्हान आपल्यासमोर असताना हे ज्ञान शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचविणे महत्वाचे आहे. डेटा हा जगातील संपत्तीचा भाग झाला आहे. या परिस्थितीत नवी मूल्ये आणि आव्हाने ओळखून पुढे जावे लागेल. क्वांटम कम्युटींग, कृत्रिम बुद्धीमत्ता आणि सेमीकॉन या तीन क्षेत्रात उत्तम मनुष्यबळ निर्माण करून नव्या लाटेत आपल्याला पुढे जाता येईल. महाराष्ट्र हे देशाचे डेटा सेंटर कॅपीटल आहे. देशातील ६० टक्के डेटा सेंटर क्षमता महाराष्ट्राकडे आहे, या सुविधांचा लाभ घेण्याचे प्रयत्न एमकेसीएलने करायला हवे. राज्य शासन त्यांच्या प्रत्येक प्रयत्नात सहकार्य करेल.

माहिती तंत्रज्ञान लाटेप्रमाणे कृत्रिम बुद्धीमत्तेच्या काळातही आपल्याला पुढे रहावे लागेल. रोजगाराचे स्वरुप बदलत असतांना नवे ज्ञान आणि तंत्रज्ञान नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याची व्यवस्था उभी केली तर राज्य सरकार त्याला निश्चितपणे सहकार्य करेल. एमकेसीएलचे विविध उपक्रम समाजासाठी आणि शासनासाठी उपयुक्त ठरले आहेत. एमकेसीएलने विकसीत केलेल्या नव्या संकेतस्थळावर ५० हजार पुस्तके वाचता येणार आहे. एमकेसीएलच्या विविध प्रकल्पामुळे प्रशासनात पारदर्शकता आणण्यासोबत कार्यक्षमतेतही वाढ झाली आहे. गेल्या २५ वर्षात उत्तम प्रकारचे बदल एमकेसीएलने घडवून आणले आहेत, असे मुख्यमंत्री म्हणाले.

कुठल्याही समाजजीवनात नेहमी आव्हाने येत असतात आणि त्यांना उत्तरे शोधणाऱ्या व्यक्ती-संस्था उभ्या राहतात. जगात इंटरनेटची लाट आली असतांना डिजीटल विषमतेसंदर्भातील समाजजीवनापुढच्या प्रश्नाला उत्तर शोधण्यासोबत ते सर्वांपर्यंत पोहोचविणारी व्यवस्था उभी करण्याचे कार्य महाराष्ट्र ज्ञान मंडळाने केले. समाजातील एक विशिष्ट वर्गाला पुढे आणण्यासाठी केवळ लाभाचा विचार न करता दीर्घकालीन लाभ लक्षात घेऊन एमकेसीएलने जबाबदारीने उत्तम प्रकारचे कार्य केले. राज्यात साडेसहा हजार उद्योजकांचे जाळे आणि कोणत्याही क्षणी समाजाच्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचण्याची व्यवस्था या माध्यमातून उभी राहीली. सामान्यातल्या सामान्य माणसाला आपण या व्यवस्थेत आणू शकलो, अशा शब्दात मुख्यमंत्री फडणवीस यांनी एमकेसीएलच्या कार्याचे कौतुक केले.

राज्यातील जनतेचे जीवन ज्ञानसमृद्ध करण्यात एमकेसीएलने महत्वाची भूमिका अदा करावी-उपमुख्यमंत्री अजित पवार

उपमुख्यमंत्री पवार म्हणाले,  महाराष्ट्र ज्ञान महामंडळाने गेल्या २५ वर्षात जगभरात अखंड ज्ञानाचा प्रकाश पसरविण्याचे कार्य एमकेसीएलने केले. संस्थेने संगणक साक्षरतेपासून सुरूवात करून लाखो विद्यार्थ्यांपर्यंत संगणकीय तंत्रज्ञान पोहोचविले. डिजीटल युगात ग्रामीण भागात नवे तंत्रज्ञान पोहोचविण्याचे कार्य संस्थेने केले. जगात कृत्रिम बुद्धीमत्तेमुळे विविध क्षेत्रात वेगाने बदल घडत असतांना बदलत्या तंत्रज्ञान युगासाठी तरुण पिढीला सक्षम बनविणे ही सर्वांची जबाबदारी आहे. त्यामुळे एमकेसीएल आणि माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे तंत्रज्ञान संशोधन संस्था उभारण्यासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.

ते पुढे म्हणाले, तंत्रज्ञान युगात राज्यातील विद्यार्थ्यांना सक्षम बनविण्याची गरज आहे. आपल्या लोकसंख्येचे रुपांतर मानवी भांडवलात केले तरच देशाला प्रगती करता येईल. ज्ञान, कौशल्य, नवनिर्मिती आणि तंत्रज्ञानाचा समन्वय साधण्याची गरज आहे. एमकेसीएलने यासाठी पुढाकार घेऊन नवीन डिजीटल उत्पादने, नाविन्यपूर्ण प्रकल्प आणि समाजाभिमुख उपक्रम आणण्याची हीच योग्य वेळ आहे. संस्थेने या संदर्भात शासनाला उपयुक्त सूचना कराव्यात, त्यासाठी सर्व सहकार्य शासनामार्फत करण्यात येईल.

आगामी काळ कृत्रिम बुद्धीमत्तेचा असल्याने शासनाने कृषी क्षेत्रात या तंत्रज्ञानाचा वापर करण्यासठी ५०० कोटींची तरतूद केली आहे. नवी मुंबईत अडीचशे एकर क्षेत्रावर नाविन्यता शहर स्थापित करण्यात येणार आहे.  नव्या पिढीला उत्तम शिक्षणाची संधी मिळवून देण्यासाठी पाच परदेशी नामवंत विद्यापीठांसोबत सामंजस्य करार करण्यात आला आहे. एमकेसीएलने अधिक व्यापक दृष्टीकोन ठेवून कृत्रिम बुद्धीमत्ता, मशिन लर्निंग, डेटा सायन्स, ब्लॉकचेन अशा नवीन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून राज्यातील जनतेचे जीवन सुलभ, समृद्ध आणि ज्ञानसमृद्ध करण्यात महत्वाची भूमिका अदा करावी, असे आवाहन त्यांनी केले. एमकेसीएल प्रत्येक जबाबदारीला न्याय देईल आणि महाराष्ट्राच्या ज्ञानयात्रेतील डिजीटल प्रगतीत महत्त्वाचा दीपस्तंभ ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रगत संशोधन संस्था उभारण्यात येईल- मंत्री आशिष शेलार

मंत्री ॲड.शेलार म्हणाले, महाराष्ट्र ज्ञान महामंडळ हा शासनासाठी अभिमानाचा विषय आहे. ज्ञान आणि कौशल्याला एमकेसीएल महत्व देत असल्याने ही ज्ञानमार्गातील चळवळ झाली आहे. २ कोटी प्रशिक्षणार्थींना संस्थेने माहिती तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण दिले आहे. जगात प्रगती करतांना मराठी भाषेसोबत तंत्रज्ञानाचे शस्त्र आवश्यक आहे हे एमकेसीएलने ओळखले आणि डिजीटल साक्षरतेचा प्रसार केला. ६ हजारावर केंद्र सुरू करून कृत्रिम बुद्धीमत्तेचा समावेशही प्रशिक्षणात केला. डिजीटल साक्षरतेसंदर्भात उद्याच्या विषमतेला लक्षात घेवून भारतीयांना समान संधी उपलब्ध करून देण्याचे महान कार्य एमकेसीएलने २५ वर्षात केले आहे.

ई-गव्हर्नन्सकडून एआय गव्हर्नन्सकडे वळतांना एमकेसीएलचे सहकार्य आणि सहभागीता अपेक्षित आहे. विकसीत महाराष्ट्र घडविण्यासाठी माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रगत संशोधन संस्था उभारण्यात एमकेसीएलच्या जोडीने माहिती तंत्रज्ञान विभाग कार्य करेल आणि त्यासाठी आवश्यक सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

कृत्रिम बुद्धीमत्ता सक्षम ग्रामीण युवक तयार करा-डॉ.अनिल काकोडकर

डॉ.काकोडकर म्हणाले, ज्ञान आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात मोठी उलाढाल होत असताना व्यावसायिक दृष्टीकोन ठेवूनदेखील समाज परिवर्तनाचे कार्य करणे शक्य आहे हे महाराष्ट्र ज्ञान मंडळाने दाखवून दिले. देशाच्या आर्थिक आणि तंत्रज्ञान विषयक प्रगती घडवून आणण्यासाठी  ज्ञानक्षेत्रात खूप काही करण्यास वाव आहे. येत्या काळात विकसीत राष्ट्र म्हणून पुढे येण्यासाठी सामरिक आणि आर्थिक शक्तीसोबत तात्विक शक्ती मिळणे आवश्यक आहे आणि हे ज्ञानाच्या माध्यमातून शक्य आहे. एमकेसीएलचे हेच उद्दीष्ट असायला हवे.

विविध प्रकारच्या क्षमता असणाऱ्या व्यक्तींच्या परस्पर सहकार्याने अधिक समृद्ध समाज निर्माण करू शकू. जगभरात संशोधनाला महत्त्व प्राप्त झाले आहे. जगभरात उन्नत तंत्रज्ञान आपल्याला आत्मसात करणे गरजेचे आहे. उद्योग आणि संशोधनाचा समन्वय साधण्यासाठी एमकेसीएलने प्रयत्न केल्यास देशाला आवश्यक कार्य करणे शक्य होईल. त्यासोबतच डिजीटल ज्ञानावर आधारित विषमता कमी करण्यासाठी ग्रामीण भागात काम करणे सर्वात प्रभावी उपाय आहे. कृत्रिम बुद्धीमत्ता सक्षम ग्रामीण युवक तयार केल्यास ही विषमता लवकर दूर होऊन आर्थिक प्रगतीला गती मिळेल. हे उद्दिष्ट साध्य करण्याचा संकल्प सर्वांनी करावा, असे आवाहन डॉ. काकोडकर यांनी केले.

यावेळी माजी मंत्री दिलीप वळसे-पाटील यांनीही विचार व्यक्त केले.

प्रास्ताविकात एमकेसीएलचे मुख्य मार्गदर्शक डॉ.विवेक सावंत यांनी एमकेसीएलच्या वाटचालीची माहिती दिली. ६ हजार ३०० उद्योजकांनी समाज परिवर्तनाच्या उद्दीष्टाने एकत्रितरित्या कार्य करून एमकेसीलएलचे काम पुढे नेले आहे. ग्रीन कॉलर जॉबच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणार असल्याने त्यावर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. एमकेसीएलने गेल्या २४ वर्षात सेवेतील आनंद घेतला, असे ते म्हणाले.

मराठी साहित्याबाबत अद्ययावत माहिती डिजीटल स्वरुपात उपलब्ध करून देण्यासाठी एमकेसीएलतर्फे तयार करण्यात आलेल्या ‘मराठी साहित्यसृष्टी’ या संकेतस्थळाचे  मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. ‘प्रांजळाचे आरसे’ या पुस्तकाचे डॉ.काकोडकर यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांच्या हस्ते ई-पुस्तकांचे प्रकाशन

महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित (एमकेसीएल) च्या रौप्य महोत्सवी स्थापना दिवसाच्या सकाळच्या सत्रातील  कार्यक्रमात उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते ‘हायब्रिड फ्युचर ऑफ हायर एज्युकेशन इकोसिस्टीम’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. ‘युनिफाईड क्रेडीट इन्टरफेस’ या ॲपचे लोकार्पणही श्री.पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या ॲपच्या माध्यमातून विद्यार्थ्याने विविध अभ्यासक्रमातून मिळविलेले क्रेडीट त्याच्या पदवीत रुपांतरीत करण्यात सुलभता येणार आहे.

मंत्री पाटील म्हणाले, महाराष्ट्राच्या डिजीटल साक्षरतेतील मोठी क्रांती एमकेसीएलने केली आहे. डिजीटल ज्ञान ग्रामीण भागापर्यंत पोहोचविण्यासाठी एमकेसीएलने नव्या ॲपची माहिती सोप्या सुलभ भाषेत तयार करावी आणि अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावी. डिजीटल ज्ञानाच्या क्षेत्रात नवे संशोधन करून देशाला पुढे नेण्यात एमकेसीएलने योगदान द्यावे. समाज साक्षर होत असतांना डिजीटल निरक्षरता दूर करण्यासाठी एकेसीएलला मोबाईल संगणक प्रयोगशाळेसह विशेष प्रयत्न करावे,  असे आवाहन त्यांनी केले.

नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीत महाराष्ट्र अग्रेसर आहे. राज्यातील ९० टक्केपेक्षा अधिक विद्यार्थ्यांचे क्रेडीट अकाऊंट सुरू करण्यात आले आहे. विविध अभ्यासक्रमाचे क्रेडीट्स विद्यार्थ्यांना मिळणार असून त्या विषयाचे पुढील शिक्षण घेतांना ते उपयोगात येणार आहे. जागतिक स्तरावरील नामांकीत विद्यापीठातून शिक्षण घेण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळावी यासाठी राज्य शासनाने पाच विद्यापीठांशी सामंजस्य करार केले आहेत, असेही मंत्री पाटील म्हणाले.

०००

विद्यार्थी स्कूल व्हॅन नियमावली अंतिम करून अधिसूचना जारी करा

मुंबई, दि. २० : विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतूकीसह रोजगाराच्या संधीसाठी परिवहन विभागाकडून स्कूल व्हॅन नियमावली आणण्यात येत आहे. ही नियमावली अंतिम करून याबाबत तातडीने अधिसूचना जारी करावी, असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले.

परिवहन आयुक्त कार्यालयात आयोजित बैठकीत स्कूल व्हॅन बाबत सादरीकरण करण्यात आले. त्यावेळी मंत्री सरनाईक बोलत होते. बैठकीस परिवहन आयुक्त विवेक भीमनवार, सहसचिव राजेंद्र होळकर, अपर परिवहन आयुक्त भरत कळसकार, सह परिवहन आयुक्त जयंत पाटील आदी उपस्थित होते. सेवानिवृत्त अतिरिक्त परिवहन आयुक्त जितेंद्र पाटील यांनी सादरीकरण केले.

यावेळी मंत्री सरनाईक म्हणाले की, अत्याधुनिक सुरक्षा व सुविधांनी युक्त अधिकृत स्कूल व्हॅन विद्यार्थ्यांना उपलब्ध होण्यासाठी आधीच्या नियमात बदल करण्यात येऊन नियमावली सुटसुटीत करावी. स्कूल व्हॅनचे भाडे मासिक तत्वावर आणि वर्षाच्या १० महिने कालावधीपर्यंतच घेण्याबाबत बंधन असावे. नियमावलीमध्ये परिवहन समित्यांचे सक्षमीकरण, महिन्यातून एकदा समितीची बैठक होणे, प्रत्येक शाळेने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी नोडल अधिकारी नेमणे अंतर्भूत असावे.

देशात सुरक्षित विद्यार्थी वाहतूकीसाठी केंद्र सरकारने स्कूल बस नियमावलीचा (ऑटोमोटिव्ह इंडस्ट्री स्टँडर्ड्स अर्थात एआयएस-०६३) आधार घेऊन अद्यावत मानके अर्थात स्कूल व्हॅन नियमावली (एआयएस-२०४ ) तयार केली आहे. चारचाकी १२+१ आसनापर्यँत विद्यार्थी वाहतूक करण्यासाठी वाहनाला शालेय व्हॅनचा दर्जा देण्यात येणार आहे. वाहने BS-VI या श्रेणीतील असतील. यात चालक ओळखपत्र, आपत्कालीन निर्गमन, वाहन प्रवेश, स्टोरेज रॅक यांच्या स्पष्टतेसह आसन रचना, अग्निशमन अलार्म यंत्रणा, वाहन ट्रॅकिंग अशा आधुनिक सुरक्षा तंत्रज्ञानाचा ही समावेश आहे, असेही मंत्री सरनाईक यांनी सांगितले.

मंत्री सरनाईक म्हणाले, स्कूल बस भाडे परवडत नसलेले पालक विद्यार्थ्यांसाठी अनेकदा अवैध रिक्षाचा पर्याय अवलंबतात. रिक्षाच्या तुलनेत व्हॅनमध्ये अधिक सुरक्षेची तरतूद आहे. व्हॅनचे दरवाजे बंद असतात. व्हॅनमध्ये शाळेची बॅग, पाण्याची बाटली आणि अन्य साहित्य ठेवण्यासाठी पुरेशी जागा असते.

अशी असेल स्कूल व्हॅन

– जीपीएस

– सीसीटीव्ही आणि डॅशबोर्डवर स्क्रीन

– अग्निशमन अलार्म प्रणाली

– दरवाजा उघडा राहिल्यास अलार्म यंत्रणा

– ताशी ४० वेगमर्यादेसह स्पीड गव्हर्नर

– पॅनिक बटण, आपत्कालीन दरवाजे

– स्कूल व्हॅनमध्ये लहान विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी पायरी

– गाडीच्या छतावर शाळेचे नाव

०००

संजय ओरके/विसंअ/

मराठी भाषा विभागामार्फत ‘अभिजात मराठी, माझ्या अपेक्षा’ या विषयावर वक्तृत्व स्पर्धा

मुंबई, दि. २० : केंद्र सरकारच्या ३ ऑक्टोबर २०२४ च्या अधिसूचनेन्वये मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला. त्या अनुषंगाने राज्य शासनाने शासन निर्णय निर्गमित करून ३ ऑक्टोबर हा दिवस अभिजात मराठी भाषा सन्मान दिवस तर ३ ते ९ ऑक्टोबर हा कालावधी अभिजात मराठी भाषा सप्ताह म्हणून साजरा करण्याचे घोषित केले आहे.

मराठी भाषा विभागातर्फे मराठी भाषा दूत ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा घेण्यात येणार आहे. ही स्पर्धा जगभरातील १८ ते २१ वयोगटातील मराठी बोलणाऱ्यांसाठी खुली असेल. ‘अभिजात मराठी-माझ्या अपेक्षा’ या विषयावर जास्तीत जास्त तीन मिनिटांचा वेळ प्रत्येक स्पर्धकाला देण्यात येणार आहे. या स्पर्धेचे संयोजन ‘ऑगस्ट मीडिया’ या संस्थेतर्फे केले जाईल. ही स्पर्धा ८ ते २२ सप्टेंबर २०२५ या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येईल. महाराष्ट्रातील वेगवेगळे महसूल विभाग तसेच बृहन्महाराष्ट्र मिळून प्रथम नोंदणी करणाऱ्या १००० स्पर्धकांना प्रवेश मिळेल.

स्पर्धकांनी विषयाचे आकलन करून तो विषय आपल्या पद्धतीने मांडणे अपेक्षित आहे. यामधून जास्तीत जास्त १०० उत्तम स्पर्धकांची निवड “मराठी भाषा दूत” म्हणून करण्यात येईल. तसेच, सर्व सहभागींना महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागातर्फे सहभाग प्रमाणपत्र देण्यात येईल. यासाठी गुगल फॉर्म पाठवण्याची अंतिम तारीख ३१ ऑगस्ट २०२५, रात्री १२ पर्यंत आहे.

या स्पर्धेसाठी १८ ते २१ या वयोगटातील युवकांनी ऑनलाईन स्पर्धेमध्ये https://forms.gle/NYvWxvYCSFXCjkzn9 या लिंकवर नोंदणी करावी, असे आवाहन मराठी भाषा विभागातर्फे करण्यात आले आहे.

०००

संजय ओरके/विसंअ

मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावर गणेशोत्सवादरम्यान जड वाहनांना वाहतूक बंदी

मुंबई, दि. २० : गणेशोत्सवासाठी मुर्तींचे आगमन, गौरी गणपती विसर्जन, परतीचा प्रवास आदींसाठी सार्वजनिक हितास्तव मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वर वजनक्षमता 16 टन किंवा 16 टनापेक्षा जास्त वाहनांना मोटार वाहन अधिनियम 1988 च्या कलम 155 मधील तरतूदीनुसार वाहतूक बंदी करण्यात आली आहे.

गणेशोत्सवाच्या पूर्व तयारीचा प्रवास म्हणून 23 ऑगस्ट रोजी मध्यरात्री 12 वाजतापासून ते 28 ऑगस्ट रोजी रात्री 11 वाजेपर्यंतच्या कालावधीत जड वाहनांना वाहतूक बंदी असणार आहे. यामध्ये अवजड वाहने, ट्रक, मल्टीएक्सल, ट्रेलर, लॉरी आदी वाहनांचा समावेश आहे.

तसेच 5 व 7 दिवसांच्या गणपतीचे विसर्जन, गौरी गणपती विसर्जन आणि परतीच्या प्रवासासाठी 31 ऑगस्ट आणि 2 सप्टेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून रात्री 11 वाजेपर्यंत, अनंत चतुर्दशी 11 दिवसांचे गणपती विसर्जन, परतीचा प्रवासाकरिता 6 सप्टेंबर रोजी सकाळी 8 वाजपासून ते 7 सप्टेंबर 2025 रोजी रात्री 8 वाजेपर्यंत या कालावधीत जड वाहतूकीस बंदी राहील.

महामार्गावर बंदी असलेल्या कालावधी व्यतिरिक्त उर्वरित कालावधीत ज्यांची वजन क्षमता 16 टन किंवा 16 टनांपेक्षा जास्त आहे, अशा वाहनांना 28 ऑगस्ट रोजी रात्री 11 वाजतापासून ते 31 ऑगस्ट रोजी सकाळी 8 वाजेपर्यंत, 31 ऑगस्ट रोजी रात्री 11 वाजतापासून ते 2 सप्टेंबर रोजी सकाळी 8 वाजेपर्यंत आणि सप्टेंबर रोजी रात्री 11 वाजतापासून ते 6 सप्टेंबर रोजी सकाळी 8 वाजेपर्यंत वाहतूकीस परवानगी राहील. तसेच सर्व वाहनांना 7 सप्टेंबर रोजी रात्री 8 वाजल्यानंतर नियमित वाहतूकीस परवानगी असेल.

हे निर्बंध जेएनपीटी बंदर ते जयगड बंदर येथून आयात- निर्यात मालाची वाहतूक करणारी वाहने,  दूध, पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाचे गॅस सिलेंडर, औषधे, लिक्वीड मेडीकल ऑक्सिजन, अन्न धान्य, भाजीपाला व नाशवंत माल आदी जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या वाहनांना लागू राहणार नाहीत. तसेच मुंबई -गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र. 66 च्या रस्ता रूंदीकरण, रस्ता दुरूस्ती कामकाज आणि साहित्य, माल ने – आण करणाऱ्या वाहनांनाही ही बंदी लागू राहणार नाही. यासंदर्भात वाहतूकदारांना संबंधित वाहतूक विभाग, महामार्ग पोलीस यांनी प्रवेशपत्र देण्याची कार्यवाही करावी.

कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांचा आणि महामार्गांचा विचार करून पोलीस आयुक्त, नवी मुंबई आणि संबंधीत जिल्ह्यांचे पोलीस अधीक्षक यांनी जड, अवजड वाहनांवरील वाहतुकीचे निर्बंध शिथील करण्याबाबत प्राप्त परिस्थितीनुसार आपल्या स्तरावर योग्य तो निर्णय घ्यावा. तसेच जेएनपीटी व जयगड बंदरातून आयात – निर्यात मालाची वाहतूक सुरू राहील, याकरिता वाहतुकीचे नियेाजन करण्यात यावे, असे सहसचिव राजेंद्र होळकर यांनी आदेशात नमूद आहे.

०००

निलेश तायडे/विसंअ

मरोळ येथे उभारण्यात येणारे मच्छी मार्केट सुसज्ज आणि सर्वसोयीयुक्त असावे – मंत्री नितेश राणे

मुंबई, दि. २० : मुंबईतील मरोळ येथे उभारण्यात येत असलेले मच्छी मार्केट सर्व सोयींनी युक्त आणि सुसज्ज असावे, असे निर्देश मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिले.

मंत्रालयात मरोळ मच्छी मार्केट संदर्भात बैठक झाली. यावेळी मत्स्य व्यवसाय विभागाचे सचिव एन. रामास्वामी, मत्स्यव्यवसाय, आयुक्त किशोर तावडे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

मच्छी मार्केट उभारण्याची प्रक्रिया गतीने पूर्ण करावी असे सांगून मंत्री राणे म्हणाले की, निधी मंजुरीसह इतर सर्व मंजुरी प्रक्रिया नोव्हेंबरपर्यंत पूर्ण कराव्यात. या मार्केटच्या ठिकाणी कोळी भवन, कम्युनिटी हॉलही उभारण्यात यावा. तसेच यानंतर पुणे आणि इतर महत्त्वाच्या शहरांमध्ये मच्छी मार्केट उभारण्याचे प्रस्ताव तयार करावेत, असे निर्देशही श्री. राणे यांनी दिले.

तळघरासह चार मजले असलेल्या या मार्केटमध्ये वाहन पार्किंग, लोडिंग, अनलोडिंग डेक, सुक्या मासळीचा बाजार, बर्फ कारखाना, प्रसाधनगृह, उच्च दर्जाचे मासळी बाजार, कोळी भवन, उपाहारगृह, शीतगृह, प्रशिक्षण हॉल यांचा समावेश असणार आहे.

०००

हेमंतकुमार चव्हाण/विसंअ/

ताज्या बातम्या

गणेशोत्सव काळात नागरिकांची गैरसोय टाळा -पालकमंत्री नितेश राणे

0
सिंधुदुर्गनगरी दि २१ (जिमाका):- सततच्या पावसामुळे शहरी व ग्रामीण भागातील रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. त्यामुळे रस्त्यांची डागडूजी व दुरूस्तीची कामे २५ ऑगस्ट पर्यंत पूर्ण...

पालकमंत्री नितेश राणे यांनी साधला उपोषणकर्त्यांशी संवाद

0
NHM काम बंद आंदोलन मागे घेण्याचे आवाहन सिंधुदुर्गनगरी दि. २१ (जिमाका) :-  नागरिकांना चांगल्या आरोग्य सेवा मिळणे हा त्यांचा अधिकार आहे. रुग्णांना सेवा देताना कोणत्याही प्रकारची...

मिशन शक्ती अंतर्गत पाळणा योजनेची राज्यात अंमलबजावणी – महिला व बालविकास मंत्री आदिती...

0
महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात ३४५ ठिकाणी ही पाळणाघरे सुरू करण्यास मान्यता मुंबई दि २१ : केंद्र शासनाच्या मिशन शक्ती अंतर्गत सामर्थ्य या उपक्रमामध्ये महिलांना नोकरीदरम्यान मुलांची...

महाराष्ट्र सदनात लवकरच स्वयंसहायता गटांचे दालन

0
नवी दिल्ली, दि.21 : राजधानी दिल्लीमध्ये महाराष्ट्रातील स्वयं सहायता गटांच्या वस्तुंना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी एक स्वतंत्र दालन सुरू करण्यासंदर्भात आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश...

अमृत, नगरोत्थानच्या पायाभूत सुविधांच्या कामांची गती वाढवण्यासाठी महत्वाच्या सुधारणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उचलले...

0
मुंबई, दि २१ : केंद्राचे अमृत अभियान त्याचप्रमाणे नगरोत्थान महाभियानातील पायाभूत सुविधा प्रकल्प वेळेत पूर्ण होऊन नागरिकांना सुविधांचा लाभ जलद गतीने मिळण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ...