शुक्रवार, मे 16, 2025
Home Blog Page 464

ड्रायव्हींग लायसन्सचे स्मार्ट कार्डमध्ये रूपांतरणासाठी १५ सप्टेंबरपर्यंत मुदत

मुंबई, दि. ३० : ताडदेव प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत ड्रायव्हींग लायसन्सचे स्मार्ट कार्डमध्ये रूपांतर करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. ज्या वाहन चालकांनी मानवी स्वरूपात अनुज्ञप्ती प्राप्त केली आहे. अशा वाहन चालकांनी १५ सप्टेंबर २०२४ पर्यंत अनुज्ञप्तीचे (ड्रायव्हींग लायसन्स) संगणक प्रणालीद्वारे स्मार्ट कार्डमध्ये रूपांतर करण्याचे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर यांनी केले आहे.

१५ सप्टेंबरनंतर मानवी स्वरूपातील अभिलेखाचे स्मार्ट कार्डमध्ये रूपांतरण केले जाणार नाही याची अनुज्ञप्ती धारकांनी नोंद घ्यावी. मुंबई (मध्य) ताडदेव येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (आरटीओ) परिसरात कार्यालयीन इमारतीचे बांधकाम, आय ॲण्ड सी सेंटर, वाहन चालक प्रशिक्षण केंद्राचे बांधकाम होणार आहे. या कार्यालयाकडून नोव्हेंबर २००६ पूर्वी जारी करण्यात आलेल्या सर्व अनुज्ञप्ती धारकांना अनुज्ञप्ती मानवी स्वरूपातच आहे. अशा अनुज्ञप्ती धारकांनी १५ सप्टेंबर २०२४ पर्यंत या कार्यालयामध्ये येऊन आपले अनुज्ञप्तीचे संगणक प्रणालीमध्ये बॅकलॉग करून घ्यावे. व मानवी स्वरूपातील अभिलेखाचे स्माट कार्डमध्ये रूपांतरण करण्याची प्रक्रिया पूर्ण करावी.

०००

महाराष्ट्रातील महिला सशक्तीकरण व महिला अधिकाऱ्यांचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडून कौतुक

पालघर, दि. ३० (जिमाका): महिला विकास व नारी सशक्तीकरणात महाराष्ट्र हा देशाला दिशा देण्याचे काम करत असल्याचे सांगून राज्यातील महत्त्वाच्या पदांवर असलेल्या महिला अधिकाऱ्यांचा गौरवपूर्ण उल्लेख करून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले.

पालघर येथे आयोजित वाढवण बंदराच्या पायाभरणी समारंभात प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी राज्यातील महिला सशक्तीकरण व महिला अधिकाऱ्यांचे जाहीर सभेत कौतुक केले. श्री. मोदी म्हणाले की, महाराष्ट्रातील अनेक उच्च पदांवर महिला अधिकारी अतिशय सक्षमपणे शानदार काम करत आहेत. राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच मुख्य सचिवपदी सुजाता सौनिक या राज्यातील प्रशासनला मार्गदर्शन करत आहेत. पहिल्यांदाच राज्याच्या पोलीस महासंचालकपदी रश्मी शुक्ला या नेतृत्व करत आहेत. पहिल्यांदाच राज्याच्या वन संरक्षण बलाच्या प्रमुखपदी सौमिता बिश्वास नेतृत्व करत आहेत. राज्याच्या विधी विभागाच्या प्रमुख म्हणून सुवर्णा केवले या जबाबदारी सांभाळत आहेत. राज्याच्या प्रधान अकाऊंटंट जनरलपदी जया भगत यांनी तर मुंबईतील कस्टम विभागाची धुरा प्राची स्वरूप सांभाळत आहेत. तर मेट्रो तीनचे नेतृत्व व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे करत आहेत, असेही त्यांनी सांगितले.

तसेच उच्च शिक्षण क्षेत्रात महाराष्ट्रातही महिला नेतृत्व करत असल्याचे सांगून महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठाच्या कुलगुरू लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी कानिटकर आणि पहिल्या कौशल्य विकास विद्यापीठाच्या पहिल्या कुलगुरू डॉ. अपूर्वा पालकर यांचा गौरवपूर्ण उल्लेख प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी केला.

अशा अनेक महत्त्वाच्या मोठ्या जबाबदारीच्या पदांवर महाराष्ट्रातील नारीशक्ती उत्कृष्ट कार्य करत आहे. विसाव्या शतकातील नारीशक्ती समाजाला नवी दिशा देण्यासाठी तयार आहे. ही नारीशक्तीच विकसित भारताचा मोठा आधार असल्याचेही प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी सांगितले.

०००

नंदकुमार वाघमारे/मा.अ./

 

वित्तीय सेवांचे लोकशाहीकरण करण्यात फिनटेकची भूमिका महत्त्वपूर्ण – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

PM addressing at the Global Fintech Fest 2024 at Mumbai, in Maharashtra on August 30, 2024.

ग्लोबल फिनटेक फेस्ट (जीएफएफ) 2024 ला प्रधानमंत्र्यांनी केले संबोधित

मुंबई, दि. ३० : गेल्या 10 वर्षात फिनटेक क्षेत्रात ३१ अब्ज डॉलर्सहून अधिक विक्रमी गुंतवणूक झाली आहे. स्टार्टअपमध्ये 500 टक्के वाढ झाली आहे. यूपीआय हे भारताच्या जागतिक पातळीवर फिनटेकच्या यशाचे मोठे उदाहरण आहे. प्रत्येक गाव आणि शहरात २४ तास बँकिंग सेवा पुरवठा यूपीआयमुळे शक्य झाला असून, वित्तीय सेवांचे लोकशाहीकरण करण्यात फिनटेकची भूमिका महत्वपूर्ण असल्याचे प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केले.

PM addressing at the Global Fintech Fest 2024 at Mumbai, in Maharashtra on August 30, 2024.

मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये पेमेंट्स कौन्सिल ऑफ इंडिया, नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आणि फिनटेक कन्व्हर्जन्स कौन्सिल यांच्या संयुक्त विद्यनाने आयोजित ग्लोबल फिनटेक फेस्ट (जीएफएफ) 2024 ला संबोधित करताना प्रधानमंत्री श्री. मोदी बोलत होते. यावेळी भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास आणि जीएफएफचे अध्यक्ष क्रिस गोपालकृष्णन, आदी उपस्थित होते.

PM visits an exhibition at the Global Fintech Fest 2024 at Mumbai, in Maharashtra on August 30, 2024.

प्रधानमंत्री श्री. मोदी म्हणाले की, अर्थव्यवस्था आणि बाजारपेठेत उत्सवी वातावरण आहे. देशातील एकूण ब्रॉडबँड वापरकर्त्यांची संख्या 60 दशलक्ष वरून 940 दशलक्षपर्यंत वाढली आहे.  530 दशलक्षाहून अधिक लोकांकडे जन धन खाती आहेत. जनधन खात्यांच्या आधारे सुरू करण्यात आलेल्या मुद्रा योजनेच्या माध्यामातून 27 ट्रिलिअन रुपये कर्जवाटप करण्यात आले आहे. या योजनेचे 70 टक्के लाभार्थी महिला आहेत. जनधन खात्यांमुळे महिला बचत गटांना बँकिंग व्यवस्थेशी जोडून घेणे शक्य झाले असून, त्याचा 10 कोटी ग्रामीण महिलांना फायदा झाला आहे. जनधन उपक्रमामुळे महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी भक्कम पायाभरणी झाली असल्याचेही त्यांनी सांगितले.

PM visits an exhibition at the Global Fintech Fest 2024 at Mumbai, in Maharashtra on August 30, 2024.

प्रधानमंत्री श्री. मोदी म्हणाले की, सरकारी योजनांमध्ये डीबीटी वापरामुळे व्यवस्थेतील गळतीला प्रतिबंध करण्यात यश आले. फिनटेकने कर्जप्राप्तीचा मार्ग सुलभ आणि समावेशी केला आहे. प्रधानमंत्री स्वनिधी योजनेमुळे रस्त्यावरील विक्रेत्यांना डिजिटल व्यवहारामुळे अनुषंगिक – मोफत कर्ज घेऊन व्यवसायवृद्धीसाठी मदत मिळत आहे. शेअर बाजार प्रवेश, म्युच्युअल फंड, गुंतवणूक अहवाल मिळवणे, डिमॅट खाती उघडणे सुलभ झाले आहे. दुर्गम भागात आरोग्य सेवा, डिजिटल शिक्षण आणि कौशल्य अध्ययन शक्य झाले आहे. भारताची फिनटेक क्रांती जगण्याची प्रतिष्ठा वाढवण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहे.

PM visits an exhibition at the Global Fintech Fest 2024 at Mumbai, in Maharashtra on August 30, 2024.

फिनटेक क्षेत्राला मदत करण्यासाठी सर्व आवश्यक ते बदल करण्यात येत आहे. एंजल टॅक्स रद्द करण्यासोबतच संशोधन आणि नवोन्मेषाला प्रोत्साहन देण्यासाठी एक लाख कोटी रुपयांची तरतूद आणि डिजिटल वैयक्तिक डेटा संरक्षण कायद्याची अंमलबजावणी करण्यात येत आहे. फिनटेक आणि स्टार्टअपच्या वाढीच्या मार्गात सायबर फसवणूक होणार नाही याची काळजी घेण्यासाठी नियामकांनी डिजिटल साक्षरतेला चालना द्यावी. प्रगत तंत्रज्ञान आणि नियामक चौकटीसह वित्तीय बाजारपेठेला बळकट करण्यासाठी शासन मजबूत, पारदर्शक आणि कार्यक्षम प्रणाली तयार करत असल्याचेही प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी सांगितले.

०००

वाढवण बंदरामुळे पालघर परिसराचे आर्थिक चित्र बदलणार – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

वाढवण बंदराचा पायाभरणी व १५६३ कोटी रुपयांच्या मत्स्यव्यवसाय प्रकल्पांचे व योजनांचे लोकार्पण व शुभारंभ

पालघर, दि. ३० (जिमाका) : देशाच्या व महाराष्ट्राच्या विकासात मच्छिमार बांधवांचे मोठे योगदान आहे. वाढवण बंदर जगातील सर्वात खोल व मोठ्या बंदरांपैकी एक महत्त्वपूर्ण बंदर होणार आहे. या प्रकल्पामुळे या परिसराचे आर्थिक चित्र बदलणार आहे. आता हा परिसर रेल्वे व महामार्गांशीही जोडला जाणार असून यामुळे या परिसरात नवनवीन व्यापार सुरू होतील. या बंदराचा लाभ महाराष्ट्राबरोबरच या भागातील स्थानिकांना व त्यांच्या पुढील पिढ्यांना होणार आहे, असे प्रतिपादन देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज येथे केले.

सुमारे 76,200 कोटी रुपये खर्चाच्या वाढवण बंदराचा पायाभरणी समारंभ तसेच 1563 कोटी रुपयांच्या मत्स्यव्यवसाय प्रकल्प व योजनांचे लोकार्पण व शुभारंभ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पालघरमधील सिडको मैदानात आयोजित कार्यक्रमात झाले. यावेळी राज्यपाल सी.पी. राधाकृष्ण, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय बंदर विकास, जहाज व जलवाहतूक मंत्री सर्बानंद सोनोवाल, केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन मंत्री राजीव रंजन सिंह, केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन राज्यमंत्री जॉर्ज कुरियन, केंद्रीय बंदर विकास, जलमार्ग राज्यमंत्री शंतनू ठाकूर, राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालघरचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, बंदर विकास, क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे, खासदार डॉ. हेमंत सावरा, आमदार श्रीनिवास वनगा, आमदार निरंजन डावखरे आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते. तसेच या कार्यक्रमास राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रकाश निकम, जिल्हाधिकारी गोविंद बोडके, जेएनपीएचे अध्यक्ष उन्मेश वाघ, पोलीस अधिक्षक बाळासाहेब पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे, अपर जिल्हाधिकारी भाऊसाहेब फटांगरे, निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष भागडे आदी यावेळी उपस्थित होते.

मराठी भाषेतून संवाद साधत भाषणाची सुरुवात

सर्व लाडक्या बहिणी व भावांना तुमच्या या सेवकाचा नमस्कार, अशा शब्दांत मराठी भाषेतून संवाद साधत प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी संत सेना महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त वंदन करून भाषणाची सुरूवात केली.

सिंधुदुर्ग येथील घटनेबद्दल छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरणाशी मस्तक टेकून मी माफी मागतो, असे सांगून प्रधानमंत्री पदासाठी नाव घोषित झाल्यानंतर मी सर्व प्रथम रायगड येथे जाऊन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीवर जाऊन प्रार्थना केली होती. भक्तिभावाने आशिर्वाद घेऊन राष्ट्रसेवेला प्रारंभ केला. छत्रपती शिवाजी महाराज हे माझ्यासाठी व माझ्या सहकाऱ्यांसाठी आराध्य दैवत असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.

आजचा दिवस हा विकसित महाराष्ट्र विकसित भारत संकल्पनेसाठी महत्त्वाचा दिवस आहे. राज्याच्या विकास यात्रेतील हा एक ऐतिहासिक दिवस असल्याचे सांगून श्री. मोदी म्हणाले की, महाराष्ट्राला एक समृद्ध व संसाधनयुक्त समुद्रकिनारा लाभला आहे. या समुद्र किनाऱ्यावरून आंतरराष्ट्रीय व्यापार होत असून यामुळे भविष्यातही मोठ्या संधी निर्माण होणार आहे. त्यामुळेच 76,200 कोटी रुपयांहून अधिक खर्चाचा, देशातील सर्वात मोठे बंदर वाढवणमध्ये उभारण्याचा निर्णय घेतला आहे. देशभरातील सर्वच बंदरामधून जेवढी कंटेनर वाहतूक होते, त्यापेक्षाही जास्त कंटेनर वाहतूक एकट्या वाढवण बंदरातून होणार आहे. हे बंदर देशाच्या व्यापार व औद्योगिक प्रगतीचे मोठे केंद्र बनणार आहे. वाढवण बंदरामुळे या परिसराचा चेहरामोहरा बदलणार असून एक नवी ओळख निर्माण होईल. तसेच हा परिसर वेस्टर्न फ्रेट कॉरिडॉर, दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर यांना जोडला जाणार आहे. यामुळे वाढवण बंदरात वर्षभर कंटेनरची वाहतूक होणार आहे. या क्षेत्राची ओळख पूर्वी किल्ल्यांमुळे होत होती आता ही ओळख आधुनिक पोर्टमुळे होणार आहे.

वाढवण बंदरामुळे १२ लाख रोजगार निर्माण होणार

मेक इन इंडिया, आत्मनिर्भर भारत या संकल्पनांचा लाभ महाराष्ट्राला होत असून यामध्ये महाराष्ट्राचे योगदान मोठ्या प्रमाणात आहे. वाढवण बंदरामुळे लाखो रुपयांची गुंतवणूक या परिसरात होणार असून सुमारे 12 लाख रोजगार निर्माण होणार आहेत, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

महाराष्ट्राच्या विकासासाठी केंद्र सरकारने नेहमीच मोठे निर्णय घेतले. महाराष्ट्राचा विकास ही माझ्यासाठी सर्वात प्राधान्याची गोष्ट आहे. त्यामुळेच नुकतेच आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेल्या रायगड जिल्ह्यात दिघी येथे बंदर औद्योगिक क्षेत्राला मंजुरी दिली आहे. ही महाराष्ट्रातील नागरिकांसाठी आनंद द्विगुणित करणारी गोष्ट आहे. दिघी पोर्ट औद्योगिक क्षेत्र हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वप्नाचे प्रतिक बनेल. या पोर्टमुळे पर्यटन व इको रिसोर्टला चालना मिळेल, असेही प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी यावेळी सांगितले.

छत्रपती शिवाजी महाराजांमुळे सागरी ताकदीला वेगळी ओळख

मच्छिमार बांधवांसाठी आज 700 कोटीहून अधिक योजनांचा शुभारंभ केला आहे. तसेच वाढवण बंदर, दिघी बंदर औद्योगिक क्षेत्र, विविध मत्स्य व्यवसायाच्या योजनांचा शुभारंभ ही मोठमोठी कामे माता महालक्ष्मी, माता जिजाऊ, माता जीवदानी व भगवान तुंगारेश्वर यांच्या आशिर्वादने होत आहेत, असेही प्रधानमंत्री श्री. मोदी म्हणाले.

छत्रपती शिवाजी महाराजांनी, सागरी ताकदीला एक वेगळी ओळख दिली. सरखेल कान्होजी आंग्रे यांनी ईस्ट इंडिया कंपनीला धडकी भरवली होती. त्यांच्या या वारसाकडे नंतरच्या काळात  लक्ष दिले गेले नाही. पण आजचा भारत हा नवीन भारत आहे. नवीन भारत देशात अनेक बदल घडवीत आहे. नवीन भारत आपल्या सामर्थ्याला व गौरवांना ओळखतो. सागरी क्षेत्रातील पायाभूत सुविधांचा विकास करत आहोत. देशातच जहाज निर्मिती होण्यासाठी व रोजगार निर्मितीसाठी प्रयत्न केले. त्यातून या क्षेत्रात कोट्यवधींची गुंतवणूक करत आहोत. यामुळे जहाज वाहतुकीचा वेळ कमी होत असून याचा फायदा व्यापारी व उद्योगांना होत असून तरुणांना नवी संधी मिळत आहे. देशातील बंदरांची क्षमता दुप्पट झाली आहे, असेही त्यांनी सांगितले.

भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा मत्स्य उत्पादन करणार देश झाला असून मत्स्य उत्पादनातही गेल्या नऊ वर्षात दुप्पट वाढ झाली आहे. झिंगा निर्यातही दुप्पट झाली आहे. मत्स्य उत्पादन क्षेत्रात महिलांचे योगदान वाढविण्यात केंद्र सरकार अग्रेसर असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

देशाच्या विकासात आदिवासी व मच्छिमार बांधवांचे मोठे योगदान

देशाच्या विकासात आदिवासी व मच्छिमार बांधवांचे योगदान मोठे आहे. सागरी क्षेत्रातील विकासात मच्छिमार बांधवांचे योगदान आहे. 526 गावे, कोळीवाडे आणि 15 लाख मच्छिमारांच्या लोकसंख्येसह महाराष्ट्राचे मत्स्यपालन क्षेत्रातील योगदान खूप मोठे आहे. त्यामुळेच आमच्या सरकारने आदिवासी तसेच मच्छिमारांसाठी वेगळे मंत्रालय निर्माण केले आहे. मच्छिमार बांधवांचे जीवनमान सुधारण्याला प्राधान्य दिले असून त्यांच्या हितासाठी योजना बनविण्यात येत आहेत. मच्छिमार बांधवांचे सामर्थ्य वाढविण्यासाठी मच्छिमार संस्था मजबूत करत असल्याचेही त्यांनी सांगितले. आज शुभारंभ केलेल्या मत्स्य व्यवसाय विभागाच्या योजना तसेच प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेमुळे मच्छिमार बांधवांचे जीवनमान सुधारून आर्थिक संपन्नता येणार आहे. रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होणार असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.

वाढवण बंदर प्रकल्पाची वैशिष्ट्ये

  • वाढवण बंदर या प्रकल्पासाठी 76,200 कोटी रुपये खर्च येणार आहे.
  • भारतातील सर्वात मोठे खोल पाण्याचे बंदर बनणार आहे
  • हा प्रकल्प जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा विकसित करण्याबरोबर आर्थिक वाढीला चालना देण्यासाठी व्यापार कनेक्टिव्हिटी वाढणार आहे.
  • 2047 पर्यंत विकसित भारताच्या अमृतकाल दृष्टिकोनासाठी महत्त्व पूर्ण प्रकल्प आहे.
  • पश्चिम किनाऱ्यावर स्थित वाढवण बंदर आंतरराष्ट्रीय शिपिंग मार्गांना थेट कनेक्टिव्हिटी निर्माण करेल आणि पारगमन वेळ आणि खर्च कमी करेल.
  • अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि पायाभूत सुविधांनी सुसज्ज असलेल्या या बंदरात डीप बर्थ, कार्यक्षम कार्गो हाताळणी सुविधा आणि आधुनिक बंदर व्यवस्थापन प्रणाली असणार आहे.
  • या बंदराच्या उभारणीमुळे अमृतकाल दरम्यान भारताच्या व्यापक आर्थिक उद्दिष्टांशी जुळवून घेऊन रोजगाराच्या लक्षणीय संधी निर्माण होणार आहेत.
  • या प्रकल्पामुळे सुमारे 10 लाखाहून अधिक रोजगार निर्मिती होणे अपेक्षित आहे.
  • स्थानिक व्यवसायांना चालना मिळणार असून या प्रदेशाच्या सर्वांगीण आर्थिक विकासात योगदान मिळणे अपेक्षित आहे.
  • वाढवण बंदर प्रकल्पामध्ये शाश्वत विकास पद्धतींचा समावेश करण्यात आला आहे, ज्यामध्ये पर्यावरणीय प्रभाव कमी करणे आणि कठोर पर्यावरणीय मानकांचे पालन करणे यावर लक्ष केंद्रीत केले आहे.
  • प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर, हे बंदर भारताची सागरी कनेक्टिव्हिटी वाढवेल आणि जागतिक व्यापार केंद्र म्हणून त्याचे स्थान आणखी मजबूत करणार आहे.
  • वाढवण बंदर प्रकल्प हा बंदर वाहतूक आणि जलमार्ग मंत्रालय आणि महाराष्ट्र सरकारचा खासगी क्षेत्रातील भागीदारांच्या सक्रिय सहभागासह संयुक्त उपक्रम आहे. बंदर टप्प्याटप्प्याने कार्यान्वित होण्याची अपेक्षा आहे, पहिला टप्पा 2028 पर्यंत पूर्ण होणार आहे.

मत्स्यपालन पायाभूत सुविधा प्रकल्प

  • प्रधानमंत्री श्री. मोदी यांच्या हस्ते या कार्यक्रमात 757.27 कोटी रुपयांच्या महत्त्वाच्या मत्स्यपालन पायाभूत सुविधा प्रकल्पांची पायाभरणी.
  • यामध्ये मासेमारी बंदरांचे आधुनिकीकरण आणि फिश मार्केटचे बांधकाम यांचा समावेश आहे.
  • या प्रकल्पामुळे मासे आणि सीफूडच्या काढणीनंतरच्या व्यवस्थापनासाठी आवश्यक सुविधा आणि स्वच्छताविषयक परिस्थिती प्रदान करण्यात येणार आहे.
  • या क्षेत्रांमध्ये मासेमारी उद्योगासाठी पायाभूत सुविधा आणि सुविधा वाढवण्याच्या उद्देशाने हा उपक्रम आंध्र प्रदेश, केरळ आणि ओरिसा या राज्यांमध्येही लागू केले जाणार आहे.

मासेमारी बोटींवर ट्रान्सपॉन्डर बसविण्याचा शुभारंभ

  • 364 कोटी रुपये खर्चून एक लाख मासेमारी बोटींवर ट्रान्सपॉन्डर बसवण्याच्या योजनेचा देखील प्रधानमंत्री श्री. मोदी यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.
  • समुद्रातील मच्छिमारांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी आणि संकटाच्या वेळी त्यांना संवाद साधता यावा यासाठी हे स्वदेशी ट्रान्सपॉन्डर इस्रोने विकसित केले आहेत.
  • स्वदेशी ट्रान्सपॉन्डरमुळे समुद्रात गेलेल्या मच्छिमारांना संकटकाळात संपर्क साधण्यास व मदत पोचविण्यास सहाय्य होणार आहे.

०००

नंदकुमार वाघमारे/मा.अ.

 

मुल्याधिष्ठित ज्ञान मिळविताना माणूसपणही जपा – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

अमरावती, दि. 30 (जिमाका) : अन्य देशांच्या तुलनेत आपल्या देशात पारिवारिक जीवन जपल्यामुळे संस्कारशील समाजरचना आजही कायम आहे. नवतंत्रज्ञानाच्या सहाय्याने आपापल्या क्षेत्रात मुल्याधिष्ठित ज्ञान मिळवितानाच माणूसपणही जपा. अर्थार्जन करताना उत्तम नागरिक म्हणून आपली कर्तव्ये पाळा, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज येथे केले.

नेमाणी गोडाऊन समोरील सिपना कॉलेज ऑफ इंजिनिअरींग टेक्नॉलॉजीच्या रौप्य महोत्सवी सोहळ्याचा समारोपीय सोहळा विद्यालयाच्या स्व. अरविंदजी उर्फ भाऊ लिमये सभागृहात आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी मार्गदर्शन करताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी बोलत होते. सिपना प्रसारक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष जगदीश गुप्ता, प्राचार्य संजय खेरडे यावेळी उपस्थित होते.

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, सिपना प्रसारक शिक्षण मंडळ रौप्य महोत्सवी वर्ष साजरे करीत आहे. आजवर येथे कितीतरी विद्यार्थी घडले. ज्ञानामुळेच माणसाची किंमत वाढते. शोध, कौशल्य, ज्ञान यांचे रुपांतरण तुमच्या कार्यात केल्यास निश्चितच प्रगती होते. प्रत्येक व्यक्तीकडून शिकण्यासारखी बाब असते, ती तेवढी शिकून घ्या. आयुष्यात अर्थार्जन करीत असताना ज्ञान, संशोधन, तंत्रज्ञान यांचे नवनवे प्रयोग करीत रहा. सुरक्षिततेपेक्षा धोके पत्करायला शिका. कोणतेही नवीन कार्य करताना तुमची इच्छाशक्ती खूप महत्त्वपूर्ण आहे. स्वत:ची प्रगती करण्यासाठी वक्तृत्व, कर्तृत्व आणि नेतृत्वपण सिध्द करा.

श्री. गडकरी पुढे म्हणाले की, देशातील शेतकरी अन्नदाता नसून उर्जादाता आहे. यामुळेच शेतीपूरक व्यवसायाला प्राधान्य देण्यात येत आहे. देशाच्या विकासासाठी ‘स्मार्ट व्हिलेज’ या संकल्पनेवर काम करणे सुरु आहे. जीवनमान सुकर करण्यासाठी नवतंत्रज्ञानाचा वापर करा. इथेनॉल, बायोडिझेल, इलेक्ट्रिक चारचाकी, दुचाकी वाहने यामुळे सामान्यांच्या आयुष्यात मोठ्या प्रमाणावर अर्थबचत होत आहे. सध्या भारत हा जगातील पाचव्या क्रमांकाची  अर्थव्यवस्था आहे. देशाची अर्थव्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी आर्थिक समता आणि सामाजिक समता महत्त्वपूर्ण आहे. ‘नीडबेस रिसर्च’ वर विद्यार्थांनी काम करणे गरजेचे आहे. ग्रामीण भागातील गरजा गावातच पूर्ण होण्यावर भर द्या. मदर डेअरी, शेणापासून पेंट, इथेनॉलपासून इंधन अशासारख्या छोट्या बदलातून मोठे बदल लवकर होतात. ई-रिक्षा, ई-कार्टमुळे आज मानवी रिक्षा बंद झाली आहे. यासाठी नवतंत्रज्ञान आत्मसात करुन नोकरी मागणारे न बनता नोकरी निर्माण करणारे बना, असा संदेश त्यांनी यावेळी दिला.

सिपना प्रसारक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष श्री. गुप्ता यांनी संस्थेचा आजवरचा प्रवास आणि प्रगती या विषयी माहिती दिली. संस्थेची वाटचाल अधिक प्रगतीशील करण्यासाठी नवतंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेऊन विविध उपक्रम राबवावे. पुस्तकी ज्ञानासोबत सामाजिक भान जपा. आयुष्यात सत्कर्म करण्यासाठी संगत महत्त्वपूर्ण आहे. यामुळे आपली संगत योग्य राहील यासाठी विद्यार्थ्यांनी लक्ष द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी सिपना प्रसारक शिक्षण मंडळाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त संस्थेच्या विकासाबाबतची चित्रफित दाखविण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य संजय खेरडे यांनी केले. आभार डॉ. विशाल राठी आणि नेहा राठी यांनी मानले.

00000

अपघात नियंत्रणासाठी प्रशिक्षित वाहनचालक आवश्यक – केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी

प्रादेशिक चालक प्रशिक्षण केंद्राचे रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते लोकार्पण

अमरावती, दि. 28 (जिमाका): देशामध्ये राष्ट्रीय महामार्ग व रस्ते बांधणीचे कामे वेगाने सुरु असून वाहतुकीचा वेग वाढला आहे. वाढत्या वेगासोबतच रस्ते अपघातामध्येही लक्षणीय वाढ चिंताजनक आहे. अपघात होण्याचे मुख्य कारण परिपूर्ण प्रशिक्षित नसल्याचे  निदर्शनास आले आहे. त्यामुळे रस्ते अपघात कमी करण्यासाठी वाहनचालकांना योग्य प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. अशा प्रादेशिक प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून उत्तम प्रशिक्षित वाहनचालक निर्माण होऊन अपघात कमी होण्यास निश्चित मदत होईल, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

मार्डी रोडवरील प्रादेशिक चालक प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन केंद्रीय मंत्री श्री. गडकरी यांच्या हस्ते आज झाले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार डॉ. अनिल बोंडे, परिवहन आयुक्त विवेक भीमनवार, विशेष पोलीस महानिरीक्षक रामनाथ पोकळे, पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, विभागीय परिवहन अधिकारी उर्मिला पवार, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर, सिपना शिक्षण प्रसारक मंडळ व प्रादेशिक चालक प्रशिक्षण केंद्राचे अध्यक्ष जगदिश गुप्ता आदी उपस्थित होते.

देशात राष्ट्रीय महामार्ग जलद गतीने तयार होत असून यामुळे पैसा, पर्यावरण व वेळेत बचत होत आहे. वाहतुकीचा वेग वाढल्यामुळे रस्ते अपघातामुळे मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. ही बाब लक्षात घेऊन प्रत्येक ठिकाणी प्रशिक्षण केंद्र निर्माण करण्यात येत आहे. यातून प्रशिक्षित वाहनचालक निर्माण करण्याचे धोरण आहे. त्याचाच एक भाग म्हणून येथील प्रादेशिक चालक प्रशिक्षण केंद्र सुरु करण्यात आले आहे. हे राज्यातील पहिले केंद्र आहे. या प्रशिक्षण केंद्रामुळे प्रशिक्षित वाहनचालक तयार होतील, असा विश्वास केंद्रीयमंत्री नितिन गडकरी यांनी व्यक्त केला.

रस्ता सुरक्षा व अपघात कमी करण्यासाठी केंद्र सरकार उपाययोजना करीत आहे. त्यामध्ये अपघात प्रवण स्थळाचा शोध घेऊन दुरुस्ती करणे, वाहननिर्मिती करणाऱ्या उद्योगांना वाहनामध्ये एअर बॅग, ऑटोमॅटिक ब्रेकींग सिस्टीम, आधुनिक तंत्राचा वापर करुन अपघात नियंत्रण सुविधा निर्माण करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. पेट्रोल, डिझेलला पर्याय म्हणून इलेक्ट्रिक वाहन, सीएनजी, इॅथेनॉल इंधनावर चालणाऱ्या वाहनाचा एक सशक्त व परवडणाऱ्या पर्यायाला प्रोत्साहन देण्यात येत आहे. वाहतूक क्षेत्रामध्ये क्रांतिकारक बदल होत आहे.  प्रशिक्षित वाहनचालकांना देश-विदेशात 22 लाखापेक्षा जास्त रोजगार उपलब्ध होणार आहे. त्यामुळे बेरोजगारांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळणार असून देशाच्या विकासाला चालना मिळणार आहे. कौशल्य विकास क्षेत्रात मोठी मागणी असून प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून या संधीचा युवकांनी लाभ घ्यावा, असे आवाहनही श्री. गडकरी यांनी केले.

प्रादेशिक चालक प्रशिक्षण केंद्रामुळे शहराच्या वैभवात भर पडली आहे. या केंद्रामध्ये चांगले प्रशिक्षित वाहनचालक तयार होवून रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होणार आहे. केंद्रीयमंत्री नितिन गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली देशात रस्ताचा विकास झपाट्याने होत असून पर्यावरणपूरक इंधनाला ते प्रोत्साहन देत आहे. त्यांच्या या अभिनव उपक्रमामुळे देशाच्या विकासात हातभार लागत असल्याचे डॉ. अनिल बोंडे यांनी सांगितले.

कार्यक्रमाच्या सुरुवातील केंद्रीयमंत्री श्री. गडकरी यांनी प्रादेशिक चालक प्रशिक्षण केंद्राची पाहणी केली. सिपना शिक्षण प्रसारक मंडळ व प्रादेशिक चालक प्रशिक्षण केंद्राचे अध्यक्ष जगदिश गुप्ता यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. इशांत राजगुरु यांनी केले. तर राखी गुप्ता यांनी आभार मानले.

00000

आदिवासी भागातील पेसा कायद्यांतर्गत भरतीचा प्रश्न सोडविण्यासाठी शासन सकारात्मक – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

याचिकेच्या निकालाच्या अधीन राहून आदिवासी उमेदवारांना नियुक्ती देण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाला विनंती करणार

मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतर पेसा भरतीबाबतचे आंदोलन स्थगित

मुंबई दि. २९- आदिवासी भागातील पेसा कायद्यांतर्गत भरतीचा प्रश्न सोडविण्यासाठी शासन सकारात्मक आहे. सर्वोच्च न्यायालयात याबाबत दाखल याचिकेचा निकालाच्या अधीन राहून आदिवासी उमेदवारांना नियुक्ती देण्याबाबत विनंती न्यायालयाला करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

पेसा क्षेत्रातील भरतीचा प्रश्नासह इतर विषयांबाबत सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. पेसा क्षेत्रातील भरतीसाठी नाशिक येथे उपोषणास बसलेल्या जे.पी. गावित यांनी मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर तात्पुरत्या स्वरूपात उपोषण मागे घेतले.

यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, की आदिवासी बांधवांचा विकास हा आमच्या प्राधान्याचा विषय आहे. आदिवासी भागातील आरोग्य सेवा मजबूत करण्यासाठी तेथील गावाच्या विकासासाठी ग्रामसभा सक्षम करण्यासाठी तातडीने पाऊले उचलली जातील. याकरिता पेसा क्षेत्रातील आरोग्य विभागासह इतर सर्व विभागांची पद प्राधान्याने भरण्यात येतील. आदिवासी भागाच्या विकासासाठी नव्या दमाच्या सनदी अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात येतील. तसेच ग्रामसभेला काही प्रमाणात निधी खर्चाचे अधिकार देण्यासाठी राज्यपालांना विनंती करण्यात येईल , असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

तसेच आदिवासींच्या कब्जातील हक्कदारांच्या सातबाऱ्यावर त्यांची स्वतंत्रपणे नोंद करण्यात येईल. क्रीडापटू कविता राऊत यांची शासकीय सेवेत लवकरच थेट नियुक्ती करण्यात येईल , असे ही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

या बैठकीला विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ , आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित , शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर , वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ.पी. गुप्ता , नगरविकास विभागाचे प्रधान सचिव असीमकुमार गुप्ता यांच्या सह इतर मान्यवर उपस्थित होते.

0000

मालवणमधील राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या कामाला गती

दुर्घटनेची जबाबदारी निश्चित करण्यासाठी तसेच नवीन पुतळा उभारण्यासाठी समित्या गठित

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतल्या निरनिराळ्या मूर्तिकारांशी भेटीगाठी

मुंबई :- मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याबाबत घडलेल्या दुर्दैवी घटनेनंतर त्याच ठिकाणी पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या कामाला गती दिली आहे. यासाठी त्याच ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यासाठी त्यांनी नुकत्याच काही शिल्पकारांच्या भेटीही घेतल्या आहेत.

मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याबाबत घडलेल्या दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या विषयावर चर्चा करण्यासाठी काल वर्षा निवासस्थानी विशेष बैठक घेतली होती.

या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी शिल्पकार विनय वाघ आणि शशिकांत वडके यांची मते देखील जाणून घेतली होती. त्यानंतर आज त्यांनी ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांची वर्षा निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांनी सुतार त्यांच्याशी या विषयावर प्रदीर्घ चर्चा केली. यासोबतच अजूनही काही मूर्तिकारांची ते भेट घेणार असून त्यांचीही याबाबतची मते ते जाणून घेणार आहेत.

दरम्यान झालेल्या दुर्घटनेनंतर शासनाने दोन तांत्रिक समित्या स्थापन करण्याची अधिसूचना जाहीर केली आहे. यात झालेल्या दुर्घटनेची कारणमीमांसा करण्यासाठी पहिली समिती गठित केली असून, भारतीय नौदलाचा 20 वर्षांहून जास्त अनुभव असलेले कमोडोर पवन धिंग्रा यांच्या अध्यक्षतेखाली ही पाच सदस्यीय समिती काम करेल. झालेल्या दुर्घटनेसाठी नक्की कोण जबाबदार आहेत याची जबाबदारी ही समिती निश्चित करेल. तर दुसरी समिती ही त्याच ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा स्थापन करण्यासाठी तयार करण्यात आली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अप्पर मुख्य सचिव सौ. मनीषा म्हैसकर यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती काम करणार असून, पुन्हा एकदा त्याच ठिकाणी पुतळा उभारण्याबाबतची कार्यपद्धती ही समिती निश्चित करेल.

राज्यातील साखर कारखान्यांना मोठा दिलासा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

केंद्र शासनाकडून साखर कारखान्यांना इथेनॉल निर्मितीस परवानगी

मुख्यमंत्र्यांनी मानले केंद्र शासनाचे आभार

 

मुंबई, दि. २९ : उसाचा रस, बी-हेवी मेालॅसिस पासून इथेनॉल तयार करण्यास केंद्र सरकारने परवानगी दिल्याने राज्यातील साखर कारखान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे, असे सांगतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्र शासनाचे आभार मानले आहेत.

गेल्या वर्षी म्हणजे डिसेंबरमध्ये केंद्र सरकारने इथेनॉल निर्मितीवर निर्बंध आणले होते. हे निर्बंध हटवावेत आणि साखर कारखान्यांना इथेनॉल निर्मितीची परवानगी द्यावी यासंदर्भात वेळोवेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी केंद्र शासनाकडे पाठपुरावा केला होता.

राज्य शासनाने केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून केंद्र शासनाने इथेनॅाल निर्मितीवर घातलेले निर्बंध २०२४-२५ गाळप हंगामात उठवले आहेत. केंद्र शासनाच्या या निर्णयामुळे साखर कारखाने व डिस्टिलरीजना मोठा दिलासा मिळाला आहे, असे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.

केंद्र शासनाने आज घेतलेल्या निर्णयामुळे आता नव्या हंगामात राज्यातील साखर कारखान्यांना आणि डिस्टिलरीजना उसाचा रस, सिरप, बी हेवी मेालॅसिस पासून इथेनॉल निर्मिती करता येणार आहे.

००००

विद्यार्थिनींच्या वसतिगृहातील सुरक्षा नियमांचे काटेकोरपणे पालन करावे – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

मुंबई, दि.29 : विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी वसतीगृहाच्या सुरक्षा नियमावलीचे काटेकोरपणे पालन करून आवश्यक सुरक्षा व्यवस्था 24 तास उपलब्ध राहील, याची दक्षता सबंधितांनी घ्यावी, अशा सूचना उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिल्या.

उच्च तंत्र शिक्षणविभागांतर्गत मुलींच्या वसतिगृहातील सुरक्षेसंदर्भात मंत्री श्री.पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. बैठकीला उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, तंत्रशिक्षण विभागाचे संचालक डॉ. विनोद मोहितकर, सहसंचालक प्रकाश बच्छाव संबंधित अधिकारी उपस्थित होते.

मंत्री श्री.पाटील की, वसतिगृहातील सुरक्षा महत्वाची असून पालक म्हणून संबंधित अधिकारी यांनी अधिक जबाबदारीने लक्ष द्यावे,वसतिगृहातील सुरक्षेची पाहणी आणि आढावा सातत्याने घेण्यात यावा. तसेच जिल्ह्यातील संबंधित अधिकारी यांच्यावर वसतिगृहाच्या पालकत्वाची जबाबदारी देता येईल का याचा विचार करावा.

वसतीगृहाच्या सुरक्षेसाठी कडक उपाययोजना करणे आणि सुरक्षेसाठी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. सुरक्षा पुरविण्यात दिरंगाई केली तर संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असेही मंत्री श्री. पाटील यांनी यावेळी सांगितले.

000

काशीबाई थोरात/विसंअ

ताज्या बातम्या

क्रीडापटूंसाठी अद्ययावत सुविधा उपलब्ध करून द्या – मंत्री आदिती तटकरे

0
मुंबई, दि. १५: मौजे धाटव येथे तालुका क्रीडा संकुलाच्या डागडुजीचे तसेच क्रीडापटूंना सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात. जे क्रीडा प्रकार मोठ्या प्रमाणात खेळले जातात, त्या...

माणगांव शहरातील नागरी समस्यांचे मान्सूनपूर्व निराकरण करा – मंत्री आदिती तटकरे

0
मुंबई, दि. १५: माणगांव शहरातील बारमाही वाहणारी काळनदी ही माणगांव शहराची जीवनवाहिनी आहे. या काळनदीचे पुनर्जीवन, जीर्णोद्धार आणि संवर्धन करण्याच्या प्रक्रियेस गती देण्यासाठी पर्यावरण...

केळीच्या कल्स्टर डेव्हलपमेंटसाठी शासनाचे सर्वतोपरी सहकार्य – मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे

0
मुंबई, दि. १५ : केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी डिजिटल शेती शाळा असे नाविन्यपूर्ण उपक्रम प्रभावीपणे राबवा. केळी संशोधनाची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा. जळगाव जिल्ह्यात केळी पिकाच्या...

फणस लागवड क्षेत्र वाढीसाठी सर्वसमावेशक आराखडा तयार करा – मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे

0
मुंबई, दि. १५ : फणस उत्पादन लागवडीखालील क्षेत्र वाढावे, यासाठी दापोली कृषी विद्यापीठाने सर्वसमावेशक असा आराखडा तयार करावा. फणसाच्या विविध जातीची दर्जेदार कलमे तयार...

आदिवासी विभागाच्या योजनांमध्ये महिलांना प्राधान्य द्या – मंत्री डॉ. अशोक वुईके

0
मुंबई, दि. १५ : आदिवासी विभागाच्या विविध योजनांचा अधिकाधिक लाभ महिलांना आणि शालेय विद्यार्थ्यांना व्हावा, यासाठी या घटकांवर विशेष लक्ष केंद्रित करावे, असे निर्देश...