शुक्रवार, मे 16, 2025
Home Blog Page 465

दिव्यांगांसाठी स्वतंत्र विद्यापीठ स्थापनेबाबत तातडीने प्रस्ताव तयार करावा – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

मुंबई, दि.29 :  दिव्यांग बांधवांसाठी  स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करण्यासाठी राज्य शासन सकारात्मक असून याबाबतचा प्रस्ताव तातडीने तयार करावा, अशा सूचना उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी  दिल्या.

मंत्रालयात दिव्यांग बांधवांसाठी  स्वतंत्र विद्यापीठ स्थापनेसंदर्भात आढावा बैठक झाली. या बैठकीला आमदार बच्चू कडू, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

मंत्री श्री. पाटील म्हणाले, या विद्यापीठाच्या माध्यमातून  दिव्यांग विद्यार्थ्यांना  उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध होतील, आणि त्यामुळे त्यांच्या कौशल्यांचा विकास होईल, विद्यापीठाचा प्रस्ताव तयार करताना या विद्यार्थ्यांना शैक्षणिक पाठ्यक्रमांसोबतच विशेष प्रशिक्षण कार्यक्रम, संशोधन आणि इतर उपक्रमांमध्ये अधिकाधिक सहभागी होण्याची संधी उपलब्ध होईल असा प्रस्ताव तयार करावा. प्रस्ताव तयार झाल्यानंतर मंत्रीमंडळ बैठकीत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल.

या निर्णयामुळे दिव्यांगांच्या हक्कांचे संरक्षण आणि त्यांच्या सर्वांगीण विकासाला नक्कीच गती मिळेल असेही मंत्री  श्री. पाटील यांनी यावेळी सांगितले.

0000

काशीबाई थोरात/विसंअ

टुरिंग टॉकीज व तंबूमधून ऐतिहासिक चित्रपट दाखवले जावेत – सांस्‍कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार

Virendra Dhuri DGIPR,Mantralaya

मुंबई, दि. २९ :-  राज्यातील टुरिंग टॉकीज व तंबूमधून ऐतिहासिक चित्रपट दाखवले जावेत. विविध शासकीय योजनांची माहिती तळागळातील जनतेपर्यंत पाहचविण्यासाठी या चित्रपट खेळांच्या दरम्यान शासकीय योजनांच्या जाहिरातींचीही प्रसिद्धी करावी. याबाबत विभागाने तातडीने योग्य पावले उचलावीत, अशा सूचना सांस्‍कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज दिल्या.

टुरिंग टॉकीज, तंबूतील सिनेमांचे जतन व पुनर्वसन यासंदर्भात वनमंत्री श्री. मुनगंटीवार यांनी मंत्रालयातील परिषद सभागृहात बैठक घेतली. बैठकीस सांस्कृतिक कार्य विभागाचे संचालक विभीषण चवरे, चित्रनगरीचे सह व्यवस्थापकीय संचालक संजय पाटील यांच्यासह टुरिंग टॉकीजचे मालक व प्रतिनिधी उपस्थित होते.

सांस्‍कृतिक कार्य मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले की, टुरिंग टॉकीज व तंबूमधून ऐतिहासिक चित्रपट  दाखविल्यास थोर महापुरुषांचे विचार व कार्य घराघरात पोहोचेल. या चित्रपट खेळादरम्यान शासकीय योजनांच्या जाहिरातीही दाखविल्यास शासकीय योजना ही तळागाळापर्यंत पोहोचण्यास मदत होईल. जाहिरात प्रसारणामुळे टुरिंग टॉकीज व तंबू मालकांना आर्थिक बळकटीही मिळेल. टुरिंग टॉकीज व तंबू मालकांना देण्यात येणारे भांडवली अनुदान एक रक्कमी देण्याबाबत श्री. मुनगंटीवार यांनी सूचना केल्या.

०००००

एकनाथ पोवार/विसंअ

महाराष्ट्रातील विकास प्रकल्पांसाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे पाठबळ – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

एमएमआर प्रदेश एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट गाठेल

 मुंबई, दि. 29 : राज्यातील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी आठ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणुकीचे प्रकल्प सुरू आहेत. मुंबई महानगर प्रदेशात (एमएमआर) पायाभूत सुविधा विकास प्रकल्पांसाठी केंद्र सरकार, जागतिक बँक, आशियाई डेव्हलपमेंट बँक आदी मार्फत निधी उभारणी केली जात आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे महाराष्ट्रातील विकास प्रकल्पांसाठी पाठबळ असून एमएमआर प्रदेश एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट गाठेल अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

हॉटेल ताज प्रेसिडेंट येथे आयोजित पुढारी न्युज पहिला वर्धापन दिन निमित्त ‘महाराष्ट्राचा विकास व भविष्यातील महाराष्ट्राची वाटचाल’ या विषयावर प्रसन्न जोशी यांनी घेतलेल्या मुलाखत प्रसंगी ते बोलत होते.

मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी बोलताना महाराष्ट्राच्या विकासाचा पट उघडून दाखविला. विकास कामांमुळे गुजरात व कर्नाटक पेक्षा महाराष्ट्र देशात सर्वात जास्त परकीय गुंतवणूक आकर्षित करण्यात यशस्वी ठरला आहे. मेट्रो लाईन–3 प्रकल्प सप्टेंबर मध्ये जनतेसाठी खुला केला जाईल. मुंबई-पुणे एक्सप्रेस वे मिसिंग लिंक, रेल्वेचे पायाभूत सुविधा व वाहतूक प्रकल्प, बुलेट ट्रेन, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज सागरी किनारी रस्ता – कोस्टल रोड या प्रकल्पांचा त्यांनी यावेळी उल्लेख केला.

मुख्यमंत्री म्हणाले, मुंबई महानगर प्रदेश (एमएमआर) एक ट्रिलियन डॉलर्सचे उद्दिष्ट गाठू शकतो असे नीती आयोगाने म्हटले आहे. या दृष्टीने लॉजिस्टिक्स पार्क, वाढवण, दिघी, औद्योगीक हाय-ग्रोथ इंडस्ट्रीयल हब, विकासीत करण्यात येत आहे. नागरी विकासाच्या व उत्पादन प्रकल्पांमुळे मुंबई महानगर प्रदेशातील पायाभूत  विकासाला दिलेले प्राधान्य  महत्त्वाचे आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

महाराष्ट्राच्या विकासाशी संबंधित विविध प्रश्न तसेच युवक, महिला, शेतकरी, विद्यार्थी यांच्याबाबत राज्य सरकारच्या धोरणांच्या अनुषंगाने विचारलेल्या प्रश्नांना  त्यांनी दिलखुलासपणे उत्तरे दिली.

शेतकऱ्यांसाठी विविध योजनांतून व विकास कामातून 45 हजार कोटी रुपये खर्च केले असून मुलींना उच्च शिक्षणाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी वैद्यकीय ,अभियांत्रिकी सारख्या अभ्यासक्रमांना शंभर टक्के फी सवलत दिली आहे.

‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेबाबत मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, यामुळे अनेक भगिनींना हक्काच्या आधारासह आर्थिक बळ मिळाले आहे. रक्षाबंधनपूर्वी बँक खात्यात आलेल्या रकमेतून आपल्या गरजांच्या पूर्तीसाठी त्याचा त्यांना उपयोग होणार आहे. भविष्यात ही रक्कम 3000 पर्यंत वाढविण्यात येईल. असे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.

बदलापूर येथील घटनेच्या अनुषंगाने कठोर शिक्षा व्हावी यासाठी शासन प्रयत्नशील आहे. मुख्यमंत्री श्री.शिंदे यांचे पुढारी मीडिया हाऊस तर्फे पद्मश्री प्रतापराव जाधव यांनी ‘वेध महाराष्ट्राचा’हे कॉफी टेबल बुक व पुढारी न्युज च्या ‘गोल्डन बूम’ चे सन्मानचिन्ह देऊन स्वागत व सत्कार केला. याप्रसंगी शिक्षण मंत्री दीपक केसरकर, महिला व बालविकास मंत्री कु. अदिती तटकरे, समूह संपादक योगेश जाधव, विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

00000

रायगड जिल्ह्यातील घेरावाडी, मोदिमाळ व हश्याची पट्टी येथील मुलभूत सोयी-सुविधांची कामे प्राधान्याने करावीत – वनमंत्री सुधीर मुनगंटीवार

मुंबई,दि.२९ : रायगड जिल्ह्यातील घेरावाडी, मोदिमाळ व हश्याची पट्टी येथील मुलभूत सोयी-सुविधांची कामे प्राधान्याने करावीत,  अशा सूचना वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केल्या.

मंत्रालयातील परिषद सभागृह येथे घेरावाडी,मोदिमाळ व हश्याची पट्टी येथील मुलभूत सोयी-सुविधांच्या कामासंदर्भात बैठक झाली. यावेळी वन विभागाचे प्रधान सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी यासह अधिकारी उपस्थित होते.

वनमंत्री श्री.मुनगंटीवार म्हणाले की, पनवेल तालुक्यातील कर्नाळा अभयारण्य परिसरातील घेरावाडी येथील पुनर्वसन, मोदीमाळ ठाकूरवाडी (सपने) (ता.पनवेल), हश्याची पट्टी, (ता.खालापूर) या गावातील मुलभूत सोयी-सुविधासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे. आवश्यक सर्व विभागांच्या परवानग्या घेऊन योग्य ती कार्यवाही करावी. त्याचप्रमाणे मुलभूत सोयी सुविधांची मंजूर झालेली कामे विहित वेळेत पूर्ण करण्यास प्रशासनाने प्राधान्य द्यावे, अशा सूचना वनमंत्री श्री.मुनगंटीवार यांनी केल्या.

००००

संध्या गरवारे/विसंअ

‘कवी नर्मद’ पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक बाबा भांड यांना प्रदान; महाराष्ट्र राज्य गुजराती साहित्य अकादमीच्या पुरस्कारांचे वितरण

मुंबई, दि. 29 – महाराष्ट्र राज्य गुजराती साहित्य अकादमीच्या वतीने देण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारांचे वितरण प्रभादेवी येथील पु. ल.देशपांडे अकादमी येथे आयोजित सोहळ्यात करण्यात आले. यंदाचा कवी नर्मद मराठी साहित्य पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक बाबा भांड यांना प्रदान करण्यात आला.  तर कवी नर्मद गुजराती साहित्य पुरस्कार ईश्वरलाल परमार यांना प्रदान करण्यात आला.

गुजराती साहित्य अकादमीचे कार्याध्यक्ष स्नेहल मुजुमदार, सहसंचालक सचिन निंबाळकर यांच्यासह अकादमीच्या सदस्यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले.

इतर पुरस्कार :- जीवन गौरव पुरस्कार साहित्य – तरिणीबहेन देसाई, जीवन गौरव पुरस्कार कला – ललिता पटेल, जीवन गौरव पुरस्कार पत्रकारिता – अक्षय अंताणी, जीवन गौरव पुरस्कार संस्था – जन्मभूमी, सौराष्ट्र.

चूनीलाल मीडिया द्वितीय पुरस्कार निरंजन मेहता यांच्या ‘अतिथी देवो भव’ या पुस्तकास मिळाला. हरिश्चंद्र भट्ट काव्य पुरस्कार प्रथम -उदयन ठक्कर यांच्या रावनहाथ्थो यास तर द्वितीय- पुरस्कार प्रदीप संघवी यांच्या ‘कारवी’ या काव्यास मिळाला. ललित निबंध विभागात नीला संघवी यांच्या नवा जमानानी नवा वातो या निबंधास प्रथम पुरस्कार देण्यात आला. यशवंत जोशी नवोदित लेखक पुरस्कार प्रथम – मिता मेवाड यांच्या ‘झाकल भिनी वातो’ या पुस्तकास तर द्वितीय – ममता पटेल यांच्या ‘आत्ममंथन’ या पुस्तकास देण्यात आला. अनुवादीत पुस्तकांसाठीचा गोपाळराव विद्ववांस पुरस्कार वैशाली त्रिवेदी यांना प्रदान करण्यात आला.

००००

बांबू आधारित व्यवसायामध्ये काळानुरूप नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणार – वनमंत्री सुधीर मुनगंटीवार

Virendra Dhuri DGIPR,Mantralaya

मुंबई,दि.२९ : बांबू आधारित व्यवसायाकरिता नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यासाठी  शासन प्रयत्नशील आहे. नाविन्यपूर्ण संकल्पनांच्या माध्यमातून रोजगार निर्मितीवर भर देण्यात येणार असून शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

मंत्रालयातील परिषद सभागृह येथे बांबू उत्पादक शेतक-यांच्या विविध प्रश्नासंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी वन विभागाचे प्रधान सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, नाबार्डचे महाप्रबंधक डॉ.प्रदीप पराते, एमडीबीचे पी.कल्याणकुमार यांच्यासह इतर अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.

मंत्री श्री.मुनगंटीवार म्हणाले की, शेतकरी समुहासाठी बांबू उत्पादक समूह नाबार्डच्या सहयोगाने प्रकल्प तयार करण्यासाठी बांबू क्षेत्रातील नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यावर शासनाने भर दिला आहे. ससमिरा, वरळी मुंबई यांचे मार्फत बी.आर.टी. ला बांबूपासून वस्त्रोद्योग निर्मितीसाठी संशोधन प्रकल्प सादर करण्यात आला आहे. वन विभागाने समिती नेमून याबाबत योग्य ती कार्यवाही करावी. महाराष्ट्र स्मॉल स्केल इंडस्ट्रीज मुंबई यांचेकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांचे बांबू आधारित स्किल डेव्हलमेंटकरिता व्यापक प्रशिक्षण  कार्यक्रम राबवावा. राज्यातील विशेषत: चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व सामूहिक उपयोगिता केंद्राना सूक्ष्म उद्योगाचा दर्जा देण्याबाबत विभागाने कार्यवाही करावी. राज्यातील विविध क्षेत्रातील महिलांना बांबू आधारित कौशल्य प्रशिक्षण देण्यासाठी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना जिल्हा नियोजन समितीमध्ये अथवा नाविन्यपूर्ण योजनेंतर्गत निधीची तरतूद करावी, अशा सूचनाही यावेळी मंत्री श्री.मुनगंटीवार यांनी बैठकीत केल्या.

००००

संध्या गरवारे/विसंअ

महाराष्ट्र देशाचे ग्रोथ इंजिन; जनतेच्या विकासासाठी शेवटच्या घटकांपर्यंत कल्याणकारी योजनांचा लाभ – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

‘न्यूज १८ इंडिया’ वृत्तवाहिनीचा ‘डायमंड  स्टेट समिट महाराष्ट्र’ कार्यक्रम

मुंबई, दि.29 :- महाराष्ट्र हे देशात पहिल्या क्रमांकाचे राज्य ठरले आहे. ते देशाचे ग्रोथ इंजिन आहे. राज्य सरकार महिला, युवक, शेतकरी, ज्येष्ठ नागरिकांसह सर्व स्तरातील नागरिकांसाठी विविध कल्याणकारी योजना राबवत असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी  केले.

आयटीसी ग्रँट सेंट्रल हाँटेल मुंबई येथे न्युज १८ इंडिया या वाहिनीच्या डायमंड  स्टेट समिट महाराष्ट्र या कार्यक्रमात मुख्यमंत्री श्री.शिंदे प्रगतिशील महाराष्ट्र या चर्चेत बोलत होते.

मुख्यमंत्री श्री शिंदे म्हणाले,राज्यात महिलांच्या सक्षमीकरणासाठी ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत एक कोटी पेक्षा अधिक महिलांच्या खात्यात १५०० रुपयांचे दोन हप्ते जमा करण्यात आले. अन्नपूर्णा योजनेअंतर्गत तीन गॅस सिलिंडर देण्याची योजना सुरु करण्यात आली आहे. मुलींना उच्च शिक्षण मोफत, महिलांना प्रवासात सवलत या माध्यमातून महिलांना आत्मनिर्भर बनवण्याचे काम राज्य शासन करत आहे. मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानातून प्रधानमंत्री यांचे स्वप्न पूर्ण करण्याचा संकल्प आपण केला असल्याचे असल्याचे त्यांनी सांगितले.

देशात ३ कोटी ‘लखपती दीदी’ बनविण्याच्या प्रक्रियेत महाराष्ट्राचा वाटा मोठा असेल. देशातील तीन कोटी दीदी मध्ये राज्यातील ५० लाख दीदींचा समावेश राहील. देश ५ ट्रिलियन डाँलर अर्थव्यवस्थेकडे वाटचाल करत आहे. यात महाराष्ट्राचा वाटा मोठा राहणार असून १ ट्रिलियन डाँलर अर्थव्यवस्थेकडे वाटचाल सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यात विकासाची विविध कामे प्रगतीपथावर आहेत. समृद्धी हायवे, कोस्टल रोड बनवला. मेट्रो प्रकल्पाची कामं प्रगतीपथावर आहेत. राज्यात रस्त्याची कामेही वेगाने सुरू आहे. मुंबईत वेगाने मेट्रोचे जाळे पसरत आहे. दोन वर्षात देशाच्या विकासात राज्याचे मोठे योगदान आहे. राज्यात पयाभूत सुविधांची कामे वेगाने सुरू आहेत. दावोसमध्ये अनेक सामंजस्य करार करण्यात आले आहे. महाराष्ट्रात उद्योग क्षेत्र वेगाने विकासित होत आहे.यामुळे राज्यात रोजगार निर्मितीसाठी चालना मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.

रायगड जिल्ह्यातील दिघी बंदराला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली आहे. साडेपाच हजार कोटी खर्च करून दिघी बंदर उभारण्यात येणार आहे. तब्बल ६ हजार एकर परिसरात हे बंदर उभारण्यासाठी  केंद्र शासनाने ७६ हजार कोटींच्या वाढवण बंदर विकासाला सहाय्य केले आहे. भूमिपूजन समारंभ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे.

यामुळे मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण होणार आहेत. राज्यात  मोठ्या प्रमाणावर उद्योग येत आहेत. त्यांना विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. बाहेरून येणाऱ्या उद्योगांना  शासनाविषयी विश्वास निर्माण झाला असल्याने अनेक नवीन सामंजस्य करार करण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, राज्यात पायभुत सुविधा मोठ्या प्रमाणावर निर्माण करण्यात आल्या आहेत. समृद्धी महामार्ग, अटल सेतू, कोस्टल रोड नागरिकांना वाहतूकीसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे. यामुळे नागरिकांचा वेळ, पैसे यांची बचत होऊन आणि प्रदूषण नियंत्रण होण्यासही मदत झाली आहे.

सर्वसामान्य घरातील महिलांना घर चालविण्यात येणाऱ्या अनेक अडचणी लक्षात घेऊन आम्ही ‘मुख्यमंत्री-लाडकी बहीण’ योजना सुरू केली. १ कोटी पेक्षा जास्त  महिलांनी या योजनेचा आतापर्यंत लाभ घेतला आहे. तसेच लाडकी बहीण योजनेबरोबरच लाडका भाऊ योजना म्हणजेच युवा प्रशिक्षण योजना सुरू झाली आहे. त्याअंतर्गत आपण मुलांना सहा हजार, आठ हजार, दहा हजार याप्रमाणे विद्यावेतन देऊन कौशल्य विकासावर आधारित रोजगार निर्मिती करण्यात येत आहे.

शेतकऱ्यांसाठी अनेक सवलती, योजना सरकारने तयार केल्या आहेत. एक रुपयात पीक विमा योजना सुरू केली आहे. शेतकऱ्यांचे ७.५ एचपी पर्यंतचे वीज बील माफ करण्यात आले आहे. जे शेतकरी सोलर पंप लावण्यास इच्छुक असतील त्यांना देखील सरकार मदत करत आहे. शेतकऱ्यांना मदत व्हावी यासाठी अनेक निर्णय घेण्यात आले आहेत.

महाराष्ट्रातील नक्षलवाद हटविण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले जात आहेत. नक्षलग्रस्त भागात शाळा, महाविद्यालये, रुग्णालये इत्यादी सुविधांमुळे आता राज्यातील नक्षलवाद नष्ट होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

 

000000000

राजू धोत्रे/विसंअ

विधानपरिषदेच्या शतक महोत्सवानिमित्त कार्यक्रमासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे – उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे

मुंबई, दि.२९ :- महाराष्ट्र विधानपरिषदेच्या शतक महोत्सवानिमित्त मंगळवार, ३ सप्टेंबर २०२४ रोजी भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या प्रमुख उपस्थितीत मध्यवर्ती सभागृह, विधान भवन, मुंबई येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे, अशा सूचना विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिल्या.

उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी या कार्यक्रमाच्या पूर्व तयारीबाबत आढावा बैठक विधानभवन येथे आज घेतली.

कार्यक्रमस्थळी बैठक व्यवस्था, विधान भवन परिसरातील स्वच्छता, निवास, स्वागत, वैद्यकीय पथक, सुरक्षा पासेस, वाहन पार्किंग, प्रसिद्धी व्यवस्था आदींचे नियोजन विभागांकडून जाणून घेतले. विधान भवन परिसरात सर्व आरोग्य सुविधांनी युक्त रुग्णवाहिका, मोबाईल टॉयलेट्स ची व्यवस्था करण्यात यावी, तसेच  प्रत्येक पथकाने आपल्यावर सोपविण्यात आलेली जबाबदारी चोखपणे पार पडण्याच्या सूचना उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी यावेळी केल्या. पाऊस आणि ऊन यांच्या बचावासाठी विधान भवन प्रवेशद्वाराजवळ उपाययोजना करण्यात यावी. कार्यक्रम योग्य प्रकारे पार पडण्यासाठी संबंधित विभागांनी सूक्ष्म नियोजन करण्याचे निर्देश डॉ.गोऱ्हे यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.

या बैठकीस विधिमंडळ सचिव जितेंद्र भोळे, मुंबई दक्षिण विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ.अभिनव देशमुख,पोलीस उपायुक्त प्रवीण मुंढे, पोलीस उपायुक्त दत्ता कांबळे, उपसचिव हेमंत डांगे, जे. जे. रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे, आरोग्य विभागाच्या सहसंचालक डॉ. सरिता हजारे तसेच बृहन्मुंबई महानगरपालिका, आपत्ती व्यवस्थापन, हवामान शास्त्र, पोलीस, सार्वजनिक बांधकाम,आरोग्य, राजशिष्टाचार विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

००००

शैलजा पाटील/विसंअ

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते विधानपरिषद शतक महोत्सवानिमित्त ३ सप्टेंबर रोजी ग्रंथाचे प्रकाशन

“उत्कृष्ट संसदपटू” आणि “उत्कृष्ट भाषण” पुरस्कारांचे वितरण

‘वरिष्ठ सभागृहाची आवश्यकता आणि महत्त्व’ ग्रंथाचे प्रकाशन

मुंबई, दि. २९ :- महाराष्ट्र विधानमंडळातील राष्ट्रकुल संसदीय मंडळ, महाराष्ट्र शाखेतर्फे दिल्या जाणाऱ्या विधानपरिषद आणि विधानसभा अशा दोन्ही सभागृहांतील सन २०१९ ते २०२४ या कालावधीतील ‘उत्कृष्ट संसदपटू’ आणि ‘उत्कृष्ट भाषण’ पुरस्कारप्राप्त सदस्यांना मंगळवार, ३ सप्टेंबर, २०२४ रोजी  राष्ट्रपती  द्रौपदी मुर्मू यांच्या प्रमुख उपस्थितीत सन्मानित करण्यात येणार आहे. विधानपरिषद शतक महोत्सवानिमित्त होणाऱ्या या विशेष समारंभात हे पुरस्कार प्रदान करण्यात येतील. यावेळी ‘वरिष्ठ सभागृहाची आवश्यकता आणि महत्त्व’ या ग्रंथाचे प्रकाशन देखील करण्यात येणार आहे, अशी माहिती विधानसभेचे अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर आणि विधानपरिषदेच्या  उप सभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी दिली.

राष्ट्रकुल संसदीय मंडळ, महाराष्ट्र शाखा ही देशातील राज्य विधानमंडळांमध्ये स्थापन झालेली (सन १९५२) सर्वात पहिली शाखा आहे. संसदीय लोकशाहीच्या संदर्भात सदस्यांसाठी विविध प्रबोधनात्मक आणि प्रशिक्षणात्मक उपक्रम राष्ट्रकुल संसदीय मंडळ, महाराष्ट्र शाखेतर्फे सातत्याने राबविण्यात येतात. सन १९९५ पासून दोन्ही सभागृहांच्या सदस्यांना प्रत्येक वर्षासाठी “उत्कृष्ट संसदपटू” आणि “उत्कृष्ट भाषण” पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येते. सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन पुरस्कारप्राप्त सदस्यांना दि. ३ सप्टेंबर, २०२४ रोजीच्या समारंभात गौरविण्यात येईल.

या समारंभास राज्यपाल  सी. पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,  उपमुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार, संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, दोन्ही सभागृहांचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि  विजय वडेट्टीवार यांची प्रमुख उपस्थिती असेल.

महाराष्ट्र विधानमंडळाच्या गौरवशाली परंपरेतील या संस्मरणीय आणि ऐतिहासिक सोहळ्यासाठी दोन्ही सभागृहांचे विद्यमान सदस्य, विधानपरिषदेचे माजी सदस्य आणि महाराष्ट्रातील संसद सदस्य यांना निमंत्रित करण्यात आले असून सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहनही पीठासीन अधिकारी यांनी केले.

००००

शैलजा पाटील/विसंअ

प्रवासी सुविधांनीयुक्त नवीन सातारा बस स्थानकाची निर्मिती करावी – उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई

Virendra Dhuri DGIPR,Mantralaya

मुंबई, दि. २९ : सातारा शहरातील मध्यवर्ती बस स्थानकाची वास्तू जुनी झाली असून येथील प्रवासी सुविधांवरही मर्यादा येत आहेत. सातारा शहरातील बस स्थानकाची वास्तू पूर्णपणे पाडून त्या ठिकाणी नवीन बस स्थानकाची निर्मिती करावी. यामध्ये प्रवासी सुविधांना अधिक प्राधान्य देण्यात यावे, असे निर्देश उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई यांनी दिले.

मंत्रालयीन दालनात आज सातारा बस स्थानक दुरूस्ती व सुशोभीकरण आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी श्री. देसाई बोलत होते. बैठकीस महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर, महामंडळाचे महाव्यवस्थापक (बांधकाम) दिनेश महाजन उपस्थित होते.

सातारा येथील संपूर्ण बसस्थानकाचा कायापालट करण्याचे निर्देश देताना राज्य उत्पादन शुल्क मंत्री श्री. देसाई म्हणाले की, बस स्थानक निर्मितीचा प्रस्ताव सादर करावा. बस स्थानकाचा चांगला आराखडा अंतिम करावा. बस स्थानकामध्ये प्रवासी सुविधांना प्राधान्य देण्यात यावे. बांधकाम एकाच टप्प्यात शक्य नसल्यास दोन टप्प्यात करावे. बस स्थानकाचा दर्शनी भाग आकर्षक करून प्लॅटफॉर्मची संख्या वाढविण्यात यावी, प्रवाशांसाठी स्वच्छतागृह, चालक, वाहक यांच्यासाठी निवासाची दर्जेदार व्यवस्था करण्यात यावी. पाटण येथील बस स्थानकाचे काम पूर्ण करावे. बस स्थानकावर चार्जिंग स्टेशनची व्यवस्था करण्यात यावी. सातारा जिल्ह्यातील मरळी, हिरवडी व तराळी बस स्थानकांची कामेही गतीने पूर्ण करण्याच्या सूचनाही मंत्री श्री. देसाई यांनी दिल्या.

००००

नीलेश तायडे/विसंअ

ताज्या बातम्या

क्रीडापटूंसाठी अद्ययावत सुविधा उपलब्ध करून द्या – मंत्री आदिती तटकरे

0
मुंबई, दि. १५: मौजे धाटव येथे तालुका क्रीडा संकुलाच्या डागडुजीचे तसेच क्रीडापटूंना सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात. जे क्रीडा प्रकार मोठ्या प्रमाणात खेळले जातात, त्या...

माणगांव शहरातील नागरी समस्यांचे मान्सूनपूर्व निराकरण करा – मंत्री आदिती तटकरे

0
मुंबई, दि. १५: माणगांव शहरातील बारमाही वाहणारी काळनदी ही माणगांव शहराची जीवनवाहिनी आहे. या काळनदीचे पुनर्जीवन, जीर्णोद्धार आणि संवर्धन करण्याच्या प्रक्रियेस गती देण्यासाठी पर्यावरण...

केळीच्या कल्स्टर डेव्हलपमेंटसाठी शासनाचे सर्वतोपरी सहकार्य – मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे

0
मुंबई, दि. १५ : केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी डिजिटल शेती शाळा असे नाविन्यपूर्ण उपक्रम प्रभावीपणे राबवा. केळी संशोधनाची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा. जळगाव जिल्ह्यात केळी पिकाच्या...

फणस लागवड क्षेत्र वाढीसाठी सर्वसमावेशक आराखडा तयार करा – मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे

0
मुंबई, दि. १५ : फणस उत्पादन लागवडीखालील क्षेत्र वाढावे, यासाठी दापोली कृषी विद्यापीठाने सर्वसमावेशक असा आराखडा तयार करावा. फणसाच्या विविध जातीची दर्जेदार कलमे तयार...

आदिवासी विभागाच्या योजनांमध्ये महिलांना प्राधान्य द्या – मंत्री डॉ. अशोक वुईके

0
मुंबई, दि. १५ : आदिवासी विभागाच्या विविध योजनांचा अधिकाधिक लाभ महिलांना आणि शालेय विद्यार्थ्यांना व्हावा, यासाठी या घटकांवर विशेष लक्ष केंद्रित करावे, असे निर्देश...