गुरूवार, मे 1, 2025
Home Blog Page 477

ऑनलाईन माध्यमातून होणारे बालकांचे लैंगिक शोषण रोखणे सर्वांची जबाबदारी –  महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

‘सेफ वेब फॉर चिल्ड्रन’ कार्यक्रमाचे उद्घाटन

मुंबई, दि.६ : लहान मुलांना मोबाईलपासून दूर ठेवणे ही पालकांची जबाबदारी आहे. मुलांना इंटरनेटमुळे जगभरातल्या ज्ञानाची कवाडे खुली झाली आहेत. परंतु लहान मुलांविरोधातील गुन्हेगारीही वाढली आहे. त्यातूनच ऑनलाईन माध्यमातून होणारे  मुलांचे लैंगिक शोषण रोखणे ही सर्वांची जबाबदारी आहे, असे प्रतिपादन महिला व बालविकास मंत्री कु.आदिती तटकरे यांनी  केले.

महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग व चाईल्ड फंड इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सेफ वेब फॉर चिल्ड्रन’ (SAFE WEB FOR CHILDREN) या कार्यक्रमाचे उद्घाटन महिला व बालविकास मंत्री कु. तटकरे यांच्या हस्ते सह्याद्री अतिथीगृह येथे करण्यात आले, त्यावेळी त्या बोलत होत्या.

या कार्यक्रमास राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्ष ॲड. सुशीबेन शाह, महिला व बाल विकास विभागाचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे, एकात्मिक बाल विकास योजना आयुक्त कैलास पगारे, विशेष पोलीस महानिरीक्षक सुहास वारके,पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे, चाइल्ड फंड इंडियाचे राजेश रंजन सिंग आदी उपस्थित होते.

महिला व बालविकास मंत्री कु. तटकरे म्हणाल्या, सोशल मीडिया, इंटरनेटच्या वापरामुळे आपले आयुष्य जसजसं सोप होत आहे, तशीच आपली प्रायव्हसी त्यामुळे कमी होत आहे. हॅकर्स सोशल मीडियाच्या माध्यमातून नवनवीन मार्गांनी फसवणूक करत आहेत. सोशल मीडिया, इंटरनेट आणि नवे तंत्रज्ञान याचा सुरक्षितरित्या वापर करणे आवश्यक आहे. लहान मुलेही इंटरनेट वापरत असल्यामुळे त्यांच्या पालकांपर्यंत पोहचून सायबर क्राईमबाबत जागरूकता निर्माण करणे गरजेचे आहे.

सध्या लहान मुलांकडे स्वतःचा मोबाईल नसला, तरी मुलांना गप्प बसवण्यासाठी म्हणून पालक स्वतःचा मोबाईल मुलांना देतात. यामुळे मुलांना सोशल मीडियावर सहज प्रवेश मिळतो. मुलांना मोबाईलपासून दूर ठेवणे ही पालकांची जबाबदारी आहे, असे सांगून  मंत्री कु. तटकरे म्हणाल्या की,  राज्य बाल हक्क संरक्षण आयोग व चाईल्ड फंड इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणारा हा कार्यक्रम खरोखरच स्तुत्य आहे. महिला व बालविकास विभागातर्फे या उपक्रमाला पाठबळ देण्यात येईल, असेही तटकरे यांनी यावेळी सांगितले.

श्रीमती शाह प्रास्ताविकात म्हणाल्या, लहान मुले, महिला आणि पालक यांच्यात वेब सुरक्षा याविषयी जागरूकता निर्माण करण्याची गरज आहे. यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. मुलांनी इंटरनेट चा सुरक्षितरित्या आणि इंटरनेट चा योग्यप्रकारे वापर कसा करावा यासाठी मुलांमध्ये जागरूकता निर्माण करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न आहे. सायबर क्राईमचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे याबद्दल जागरूकता निर्माण करणे हा या उपक्रमाचा मुख्य हेतू आहे. राज्य बाल हक्क संरक्षण आयोग व चाईल्ड फंड इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने मुलांच्या हक्कांचे संरक्षण आणि मुलांचे ऑनलाईन लैंगिक शोषण व गैरवर्तन यापासून संरक्षण करणे या उद्देशाने मुलांसाठी ऑनलाईन सुरक्षिततेचा उपक्रम राज्यात राबविण्यात येणार असल्याचे शाहा यांनी सांगितले.

या कार्यक्रमास विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

शारीरिक शिक्षण महाविद्यालय अनुदानासंदर्भात शासन सकारात्मक – उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील

मुंबई,दि.6 : शारीरिक शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि विद्यार्थ्यांमध्ये खेळाची आवड निर्माण करण्यासाठी शारीरिक शिक्षण महाविद्यालयांना अनुदान देण्यासंदर्भात शासन  सकारात्मक आहे, असे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

आज मंत्रालयात नागपूर येथील पद्मश्री अजित वाडेकर शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या अनुदानासंदर्भात आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला माजी आमदार प्रकाश गजभिये, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव  विकासचंद्र रस्तोगी संबंधित अधिकारी उपस्थित होते.

मंत्री श्री. पाटील म्हणाले, शारीरिक शिक्षण महाविद्यालयामधून मोठ्या प्रमाणात खेळाडू तयार होतील आणि देशामध्ये नाव करतील. अनुदानासंदर्भातचा प्रस्ताव विभागाने तयार करून वित्त विभागाला पाठवावा. त्यानंतर तो प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीसमोर ठेवण्यात येईल आणि सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असेही यावेळी सांगितले.

००००

काशीबाई थोरात/विसंअ

 

रिद्धपूर येथील मराठी विद्यापीठाच्या कामाला गती द्यावी -उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील 

मुंबई, दि. 6 : अमरावती जिल्ह्यातील रिद्धपूर येथील मराठी विद्यापीठाच्या कामाचे कालबद्ध नियोजन करून या कामाला अधिक प्राधान्य देऊन गती द्यावी, अशा सूचना  उच्च व तंत्रशिक्षण मंत्री  चंद्रकांत पाटील यांनी  दिल्या.

आज मंत्रालयात उच्च व तंत्र शिक्षणमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली मराठी विद्यापीठ सद्यस्थितीसंदर्भात सादरीकरण करण्यात आले. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी,सार्वजनिक बांधकाम विभागाचे  संबंधित अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत मुख्य प्रशासकीय इमारत, कुलगुरू दालन, निबंधक दालन, आस्थापना बैठक व्यवस्था, थीमपार्क, विद्यार्थी बैठक व्यवस्था, ध्यानकेंद्र, स्वागतकक्ष, वाचनालय, मुले व मुलींकरिता स्वतंत्र वसतिगृहाची निर्मिती, मोठे बहुउद्देशीय सभागृह आणि विद्यापीठ सुरू करण्यासाठी, कुलगुरुंची निवड, विद्यार्थ्यांना पुरविण्यात येणाऱ्या सोयी-सुविधा तसेच आवश्यक बाबींची पूर्तता करण्यासाठी अधिक गती द्यावी, असे निर्देशही मंत्री श्री. पाटील यांनी यावेळी दिले.

००००

काशीबाई थोरात/विसंअ

 

 

सार्वजनिक ग्रंथालयांमध्ये अद्ययावत सुविधांसाठी सुधारणांना मान्यता – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालये अधिनियम सुधारणासंदर्भातील अहवालाचे सादरीकरण 

मुंबई,दि. ६ : कोणतीही व्यक्ती, समाज वा राष्ट्राच्या जडणघडणीत ग्रंथ व ग्रंथालयाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. माहिती आणि  ज्ञानाबरोबरच वाचकांना अद्ययावत सोयीसुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. त्यासाठी अद्ययावत सुधारणा करण्यासाठी मान्यता देण्यात येत आहे, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालये नियम १९७० सुधारणा समितीने आज मंत्रालयात उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासमोर सादरीकरण केले.

यावेळी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकास चंद्र रस्तोगी, उपसचिव प्रताप लुबाळ, प्र.ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर व समितीचे सदस्य सचिव व प्र.ग्रंथालय उपसंचालक शशिकांत काकड उपस्थित होते.

शाश्वत विकासाची ध्येय साध्य करणे,वाचनसंस्कृती सर्वदूर रुजविणे आणि ज्ञानाधिष्ठित समाजाची निर्मिती व्हावी, यासाठी ग्रंथालयांची गरज वाढलेली आहे. वाढती लोकसंख्या ग्रंथालय लोकांमधील वाढती सजगता, नवीन ग्रंथालयाची मागणी लक्षात घेऊन लोकसंख्या निकषांचा पहिल्या टप्प्यात ५०० लोकसंख्या ऐवजी १ हजार लोकसंख्या तसेच १ हजार १ नंतर प्रति १० हजार लोकसंख्येसाठी १ ग्रंथालय या सुधारणा करण्यास मान्यता देण्यात आली आहे. तसेच वाढती लोकसंख्या व ग्रंथालय दर्जा/वर्गास आवश्यक नोंदणीकृत वर्गणीदार वाचक सभासद संख्या विचारात घेऊन ५०० ऐवजी १ हजार ही संख्या नव्याने समाविष्ट करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

‘अ’ वर्ग ग्रंथालयासाठी ग्रंथालयात ग्रंथसंपदा, वृत्तपत्रे व नियतकालिके आणि संदर्भ ग्रंथ यांची मांडणी करण्यास पुरेसे  दालन, ज्येष्ठ नागरिक, महिला विभाग, बाल विभाग,स्पर्धा परीक्षा विभाग,दैनंदिन वाचन कक्ष, ग्रंथ देवघेव विभाग,ग्रंथालय  सेवकांसाठी आवश्यक आणि नोंदणीकृत सभासद संख्येच्या किमान १० टक्के  सभासदांना एका वेळी बसता येईल इतके किमान फर्निचर आवश्यक असेल  तसेच ग्रंथालयात दिव्यांग सभासदांसाठी आवश्यक सुविधा आवश्यक आहेत, या सुधारणा करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

सर्व वयोगटातील वाचकांना ग्रंथालयात किमान सुविधा मिळाव्यात यासाठी ग्रंथालयात ग्रंथसंपदा वृत्तपत्रे व नियतकालिके आणि संदर्भ ग्रंथ यांची मांडणी करण्यास थोडेसे दालन ज्येष्ठ नागरिक महिला विभाग,बाल विभाग, स्पर्धा परीक्षा विभाग, दैनंदिन वाचन कक्ष,ग्रंथ देवघेव विभाग, ग्रंथालय सेवकांसाठी आवश्यक आणि नोंदणीकृत वाचक संख्येच्या किमान १० टक्के  वाचकांना एकावेळी बसता येईल इतके किमान फर्निचर आवश्यक असेल.अशा अद्ययावत सोयीसुविधा देऊन बौद्धिक विकासाचे शक्तिकेंद्र आणि सामाजिक विकासाचे ऊर्जा केंद्र म्हणून सार्वजनिक ग्रंथालयामध्ये  सुधारणा करावी अशा सूचनाही मंत्री श्री.पाटील यांनी यावेळी दिल्या.

0000

काशीबाई थोरात/विसंअ

सिद्धिविनायक मंदिर सुशोभीकरण, भाविकांसाठी सुविधा या कामांना गती द्यावी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. 6 : – श्री सिद्धिविनायक मंदिरात येणाऱ्या भाविकांना उत्कृष्ट दर्जाच्या सोयी-सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी सुशोभीकरणाच्या कामाला गती द्यावी.  या कामाचा शुभारंभ आगामी गणेश चतुर्थीच्या दिवशी व्हावा यासाठी नियोजन करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले.

सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर परिसर सुशोभीकरण व सोयी-सुविधांसंदर्भात कामांचा आढावा घेण्यासाठी बैठक झाली. यावेळी मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर, श्री सिद्धिविनायक न्यासाचे अध्यक्ष आमदार सदा सरवणकर, माजी खासदार राहुल शेवाळे, मुख्यमंत्र्याचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. आय. एस. चहल, मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी आदी उपस्थित होते.

श्री सिद्धिविनायक सुशोभीकरणासाठी मुंबई महापालिकेमार्फत पाचशे कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार असून, या कामासंदर्भात आज मुख्यमंत्र्यांसमोर सादरीकरण करण्यात आले. यात्रीनिवास, मंदिराच्या परिसरात पाच किलोमीटरच कॉरिडॉर, दुकाने, पार्किंग, भाविकांसाठी दर्शन रांग त्यातील सुविधा आदी विविध बाबीसंदर्भात सादरीकरणात माहिती देण्यात आली. या कामांचा संदर्भात तातडीने तांत्रिक बाबी पूर्ण करून, येणाऱ्या गणेश चतुर्थीला कामांचा शुभारंभ करता येईल, अशा पद्धतीने नियोजन करण्याचे निर्देश मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिल्या.

 

राज्यातील कार्यरत ३१०५ विशेष शिक्षकांना सेवेत सामावून घेणार; केंद्र शाळेला एक विशेष शिक्षक नेमणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

शिक्षकांना जुनी पेन्शनसंदर्भात समिती स्थापन

मुंबई, दि. ६: समग्र शिक्षा अभियान आणि दिव्यांग एकात्मिक शिक्षण योजनेंतर्गत २००६ पासून सेवेत असणाऱ्या ३१०५ विशेष शिक्षकांना सामावून घेण्याचा निर्णय आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला. राज्यातील केंद्र शाळेला एक विशेष शिक्षक नेमण्याचे निर्देश देखील मुख्यमंत्र्यांनी शिक्षण विभागाला दिले.

दरम्यान, २००५ पूर्वी टप्पा अनुदानावर कार्यरत असलेल्या २६ हजार ९०० शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू केल्यास येणाऱ्या आर्थिक भारासंदर्भात फेर पडताळणी करण्यासाठी शिक्षण आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली आणि शिक्षक आमदारांचा समावेश असलेल्या समितीची स्थापना यावेळी करण्यात आली.

सह्याद्री अतिथीगृह येथे आज विशेष शिक्षक पदनिर्मिती, जुनी पेन्शन योजनेसंदर्भात बैठक झाली. यावेळी शिक्षण मंत्री दीपक केसरकर, मंत्री सर्वश्री संजय राठोड, संजय बनसोडे, आमदार सर्वश्री अभिमन्यू पवार, आशीष जयस्वाल, प्रकाश आबिटकर, किशोर दराडे, ज्ञानेश्वर म्हात्रे, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आय. एस. चहल, शिक्षण विभागाच्या प्रधान सचिव आय. एस कुंदन, आयुक्त सुरज मांढरे आदी यावेळी उपस्थित होते.

राज्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेत सध्या सुमारे २ लाख ४१ हजार दिव्यांग विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी राज्यात समग्र शिक्षा योजनेंतर्गत २००६ पासून कंत्राटी तत्वावर १०२ जिल्हा समन्वयक, गट स्तरावर ८१६ विषय तज्ञ, केंद्र शाळास्तरावर १७७५ असे एकूण २६९३ विशेष शिक्षक तर दिव्यांग एकात्मिक शिक्षण योजनेतर्गत प्राथमिक स्तरावरील ५४ व माध्यमिक स्तरावरील (IEDSS)- ३५८ मिळून ४१२ असे एकूण ३१०५ विशेष शिक्षक आहेत.

दिनांक १५ मार्च २०२४ च्या शासन निर्णयाप्रमाणे प्रत्येक तालुक्याच्या केंद्र शाळेत दोन विशेष शिक्षक मंजूर असून त्याची व्याप्ती वाढवितानाच केंद्र शाळेला एक विशेष शिक्षक नेमण्याचा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला. त्यानुसार सध्या कार्यरत असणाऱ्या ३१०५ विशेष शिक्षकांना सामावुन घेतले जाणार आहे. त्याच प्रमाणे गरजेप्रमाणे नविन भरती देखील करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.

शिक्षकांना जुनी पेन्शनसंदर्भात समिती स्थापन

राज्यात २००५ पूर्वी टप्पा अनुदानावर कार्यरत असलेल्या आणि २०१० पूर्वी १०० टक्के अनुदावानर असलेल्या २६ हजार ९०० शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत आजच्या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी शिक्षक आमदार आणि संघटनांच्या प्रतिनिधींनी मते मांडली.

जुनी पेन्शन योजना लागू केल्यास येणाऱ्या आर्थिक भारासंदर्भात फेर पडताळणी करण्यासाठी समिती नेमण्यात आली. शिक्षण आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्याचा निर्णय झाला होता. त्याबाबत शिक्षण विभागाने पाठविलेल्या फाईलवर मुख्यमंत्र्यांनी बैठकीतच स्वाक्षरी केली आणि समिती स्थापन झाल्याची घोषणाही केली.

सुपरमॅक्स कंपनीच्या कामगारांची थकित देणी देण्याबाबत तातडीने कार्यवाही करावी – उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई

मुंबई, दि. 5 : ठाणे येथील मे.सुपरमॅक्स पर्सनल केअर प्रा. लि. कंपनीने त्यांच्याकडील कामगारांची थकित देणी व वेतन दिलेले नाही. कामगारांचे वेतन व थकित देणी देणे हे शासनाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. कंपनीने कामगारांचे थकित देणे देण्याची योग्य ती कार्यवाही करावी, असे निर्देश उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.

मंत्रालयातील समिती कक्षात मे. सुपरमॅक्स कंपनीच्या कामगारांच्या समस्यांबाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस कामगार विभागाचे अप्पर आयुक्त संतोष भोसले, उपायुक्त प्रदीप पवार, सहाय्यक आयुक्त चेतन जगताप, कामगारांचे प्रतिनिधी शशांक खरे, श्री.चव्हाण आदी उपस्थित होते.

मंत्री श्री. देसाई म्हणाले, राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणामार्फत (एनसीएलटी) या प्रकरणात कंपनीविरोधात कॉर्पोरेट इनसॉल्व्हन्सी रिझॉल्यूशन प्रोसेस (सीआयआरपी) सुरू करण्यात आली आहे. त्याकरिता इंटरिम रिझॉल्यूशन प्रोफेशनल (आयआरपी) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये निर्णय घेताना आयआरपी यांनी कामगारांचे हित लक्षात घ्यावे. त्यासाठी कामगार कार्यालयाकडे नोंदणीकृत किंवा कंपनीसोबत करारबद्ध कामगार संघटनेच्या दोन प्रतिनिधींना घेण्यात यावे.  जेणेकरून निर्णय होताना कामगारांचे हित जोपासले जाईल. कंपनी व्यवस्थापनाने कामगारांची देणी न दिल्यास आर्थिक गुन्हे शाखेमार्फत कारवाई करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. बैठकीत कामगार संघटनांचे प्रतिनिधी व अधिकारी यांनी विविध मुद्दे मांडले.

0000

निलेश तायडे/विसंअ

कुर्ला रेल्वे स्थानकाबाहेरील ‘सॅटीस’ प्रकल्पाला गती द्या – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

कुर्ला विधानसभा मतदारसंघातील प्रश्नांचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

मुंबई दि.६-  मुंबईतील कुर्ला रेल्वे स्थानकाबाहेरील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी ‘सॅटीस’ प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरणार आहे. मुंबई महापालिकेने सॅटीस प्रकल्पाला गती द्यावी, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या.

कुर्ला मतदारसंघातील विविध प्रश्नांची आढावा बैठक मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे पार पडली. यावेळी मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर, आमदार मंगेश कुडाळकर, माजी खासदार राहुल शेवाळे, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. आय.एस. चहल, विकास खारगे, मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, की कुर्ला मतदारसंघातील वृक्षांचे संवर्धन करण्यासाठी उपलब्ध जागेत बॉटनिकल गार्डन साकारावे. चुनाभट्टी येथील रेल्वे फाटकाच्या जागी उड्डाणपूल  बांधण्याच्या कामाला रेल्वेच्या सहकार्याने गती देण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

यावेळी कुर्ला विधानसभा मतदारसंघातील विविध प्रश्न सोडविण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी संबंधितांना सूचना दिल्या.

‘दिलखुलास’ कार्यक्रमात उद्या कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांची मुलाखत; ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात गुरुवारी मुलाखतीचे प्रसारण

मुंबई, दि ६ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांची ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना ‘ या विषयावरील मुलाखत प्रसारित होणार आहे.

बुधवार दि.७ ऑगस्ट २०२४  रोजी  आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत ही मुलाखत प्रसारित होणार आहे.

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेची उद्दिष्टे, राज्यात या योजनेची करण्यात येणारी अंमलबजावणी, कौशल्य विकास विभागाच्या माध्यमातून या योजनेसाठी करण्यात आलेली तयारी तसेच केंद्र शासन कौशल्यविषयक राबवत असलेले विविध उपक्रम, याबद्दल  ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात मंत्री श्री. मंगल प्रभात लोढा यांनी माहिती दिली आहे. निवेदक राजेंद्र हुंजे  यांनी ही मुलाखत घेतली आहे.

‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ही मुलाखत गुरुवार, ८ ऑगस्ट २०२४ रोजी सायंकाळी ७.३० वाजता महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर पाहता येईल.

 

महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या लिंक पुढीलप्रमाणे

एक्स – https://twitter.com/MahaDGIPR

फेसबुक – https://www.facebook.com/MahaDGIPR

यू ट्यूब – https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR

राज्यात रब्बी ज्वारी खरेदीकरिता ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

मुंबई, दि. ६ – राज्यात महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महसंघामार्फत खरेदी करण्यात येणाऱ्या रब्बी ज्वारी खरेदीसाठी दि. ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याचे पणन महासंघाने कळविले आहे.

शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत रब्बी पणन हंगाम २०२३-२४ मध्ये बिगर आदिवासी क्षेत्रात धान व भरडधान्य (मका, ज्वारी व रागी) खरेदीसाठी पणन महासंघाची मुख्य खरेदी संस्था म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. रब्बी ज्वारी खरेदीसाठी पणन महासंघास ८ लाख २० हजार क्विंटल खरेदीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. हे उद्दिष्ट पूर्ण न झाल्याने तसेच नोंदणीकृत शेतकऱ्यांकडील रब्बी ज्वारी शिल्लक राहिल्याने शासनाने शिल्लक राहिलेल्या शेतकऱ्यांकडील ज्वारी खरेदीसाठी दि. ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत मुदतवाढ दिलेली आहे.

तसेच अमरावती जिल्ह्यासाठी ज्वारी खरेदीचे ८५ हजार क्विंटलचे वाढीव उद्दिष्ट देण्यात आले आहे. राज्यातील ज्या शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे, पण त्यांची ज्वारी अजून खरेदी झालेली नाही, अशा शेतकऱ्यांनी दिलेल्या मुदतीत त्यांची ज्वारी पणन महासंघाच्या केंद्रावर विक्रीसाठी आणावी. राज्यातील ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघाने केले आहे.

०००००

हेमंतकुमार चव्हाण/विसंअ

ताज्या बातम्या

भारताच्या निरंतर विकासामध्ये महाराष्ट्राची सर्वात महत्त्वाची भूमिका – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
मुख्यमंत्र्यांकडून महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा मुंबई, दि. ०१: महाराष्ट्राकडे भारतातील सर्वात पुरोगामी आणि प्रगतिशील राज्य म्हणून पाहिले जाते. छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब...

प्रगत, संपन्न महाराष्ट्र साकारण्यासाठी कटिबद्ध होऊया – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
मुंबई, दि. ३० : - महाराष्ट्र देशाच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावत असून, आपल्या सर्वांच्या प्रयत्नातून, सहकार्यातून आणखी प्रगत, संपन्न महाराष्ट्र साकारण्यासाठी कटिबद्ध होऊया, असे...

एमएचटी-सीईटी २०२५ पीसीएम गटाच्या परीक्षेत तांत्रिक त्रुटी; ५ मे रोजी फेर परीक्षा 

0
मुंबई, दि. ३० : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून दि.२७ एप्रिल २०२५ रोजी घेण्यात आलेल्या एमएचटी-सीईटी २०२५ (पीसीएम गट) सामाईक प्रवेश परीक्षेच्या सकाळच्या सत्रामध्ये...

जातनिहाय जनगणनेचा निर्णय क्रांतिकारी ठरेल – मंत्री अतुल सावे

0
मुंबई, ‍‍दि. ३० : केंद्र सरकारने घेतलेला जातनिहाय जनगणनेचा निर्णय हा ओबीसी व वंचित घटकांच्या दृष्टीने क्रांतिकारी ठरेल, असे इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे...

अल्पसंख्यांक विभागांतर्गत योजनांच्या कामाचा राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्याकडून आढावा 

0
मुंबई, दि. ३० : अल्पसंख्यांक विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांच्या कामकाजाच्या अल्पसंख्यांक राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी मंत्रालयात आढावा घेतला. राज्यमंत्री माधुरी मिसाळ म्हणाल्या की, मौलाना...