गुरूवार, मे 1, 2025
Home Blog Page 478

राज्यभरात ‘घरोघरी तिरंगा’ अभियान राबविणार – अपर मुख्य सचिव विकास खारगे

SPK DGIPR Mantralay Mumbai

मुंबई, दि. 6: देशभरात 13 ते 15 ऑगस्टदरम्यान ‘हर घर तिरंगा’ अर्थात ‘घरोघरी तिरंगा’ अभियान राबविले जाणार आहे. यासाठी महाराष्ट्र राज्यानेही पूर्ण तयारी केली असून राज्यात 9 ते 15 ऑगस्ट या कालावधीत सर्वत्र विविध उपक्रमांनी हे अभियान साजरे केले जाईल, अशी माहिती मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव तथा सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांनी दिली.

आज केंद्रीय सांस्कृतिक कार्य मंत्रालयाच्या वतीने सर्व राज्यांच्या सांस्कृतिक कार्य विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक झाली. त्यावेळी अपर मुख्य सचिव श्री. खारगे यांनी ही माहिती दिली. यावेळी ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव के. गोविंदराज यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

SPK DGIPR Mantralay Mumbai

केंद्र शासनाने सन 2022 पासून हर घर तिरंगा (घरोघऱी तिरंगा )अभियान सुरु केले. यावर्षी या अभियानाचे हे तिसरे वर्ष आहे. मागील दोन्ही वर्षी या अभियानात महाराष्ट्र राज्याने विविध उपक्रम राबवून आघाडी घेतली. यावर्षीही तिरंगा रॅली, तिरंगा यात्रा, तिरंगा मॅरेथॉन, तिरंगा कॉन्सर्ट, तिरंगा कॅनव्हास, तिरंगा प्रतिज्ञा, तिरंगा सेल्फी, तिरंगा ट्रीब्यूट असे विविध उपक्रम राबविण्याबाबत केंद्र सरकारने सूचना दिल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर राज्याने केलेल्या तयारीची माहितीही श्री. खारगे यांनी यावेळी दिली.

प्रत्येक नागरिकाने घरावर तिरंगा ध्वज दिनांक 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत फडकवावा, यासाठी त्यांना राष्ट्रध्वज उपलब्ध करुन दिले जाणार आहेत. राज्यभरात विविध शाळा, महाविद्यालये, विविध सामाजिक संस्था, महिला बचत गट तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून हे अभियान राबविले जाणार आहे. गावपातळीपासून ते जिल्हापातळीपर्यंत तसेच राज्यस्तरावरही यानिमित्त रॅली, स्वातंत्र्यसैनिकांचा सन्मान, राष्ट्रध्वजासोबत सेल्फी, प्रतिज्ञावाचन असे विविध उपक्रम घेतले जाणार आहेत. नागरिकांच्या अधिकाधिक सहभागाने हे अभियान निश्चितपणे यशस्वी करु, असे अपर मुख्य सचिव श्री. खारगे यांनी यावेळी सांगितले.

000

दीपक चव्हाण/विसंअ

 

छत्रपती संभाजीनगरमधील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या फुटबॉल स्टेडियमला तत्वत: मंजुरी – पालकमंत्री अब्दुल सत्तार

SPK DGIPR Mantralay Mumbai

मुंबई, दि. ६ : छत्रपती संभाजीनगर येथील वक्फ बोर्डाच्या मालकीच्या आमखास मैदानावर आंतरराष्ट्रीय दर्जाच्या फुटबॉल स्टेडियमला पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या अध्यक्षतेत आणि क्रीडामंत्री संजय बनसोडे यांच्या उपस्थितीत तत्वत: मान्यता देण्यात आली. यासंदर्भातील प्रस्ताव तातडीने जिल्हाधिकारी यांनी क्रिडा विभागास सादर करण्याचे निर्देश पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी  दिले.

मंत्रालयात छत्रपती संभाजीनगर येथे जागतिक दर्जाचे फुटबॉल स्टेडियम आणि गारखेडा येथील विभागीय क्रीडा संकुलात खेळाडूंना सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासंदर्भात पालकमंत्री श्री. सत्तार यांनी आज बैठक घेतली.

SPK DGIPR Mantralay Mumbai

मंत्री श्री. सत्तार म्हणाले की, छत्रपती संभाजी नगर येथील विभागीय क्रीडा संकुलातील खेळाडूंना क्रीडा संदर्भातील सर्व सोयी -सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात. आमखास मैदानावर आंतरराष्ट्रीय दर्जाचे फुटबॉल स्टेडियमसंदर्भातील प्रस्ताव तातडीने जिल्हाधिकारी यांनी क्रीडा विभागास सादर करावा. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळाडूंना यश मिळविता यावे, यासाठी सर्व साहित्य त्यांना उपलब्ध करून देण्यात यावे, असेही त्यांनी सांगितले.

०००

श्रद्धा मेश्राम/स.सं

सेवा हक्क हमी कायद्याविषयी जनजागृती करुन अंमलबजावणी करावी – उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांचे निर्देश

सेवा हक्क हमी कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीचा कोल्हापूर जिल्ह्यात पथदर्शी प्रकल्प

मुंबई, दि. 5 :  सेवा हक्क हमी कायदा 28 एप्रिल 2015 पासून राज्यात अंमलात आला आहे. या कायद्यांतर्गत विविध विभागांच्या अनेक सेवा अधिसूचित करण्यात आल्या आहेत. सेवा हमी कायद्याविषयी नागरिकांमध्ये जनजागृती करून अंमलबजावणी करावी, असे निर्देश उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी आज दिले. या कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीचा पथदर्शी प्रकल्प कोल्हापूर जिल्ह्यात राबविण्यात येत असून त्यानंतर संपूर्ण राज्यात हा प्रकल्प राबविण्यात यावा, अशा सूचनाही मंत्री श्री. देसाई यांनी दिल्या.

सेवा हमी कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीच्या पथदर्शी प्रकल्पाचे  उद्घाटन 15 ऑगस्ट रोजी करण्यात येणार आहे. याबाबत श्री.देसाई यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील समिती कक्षात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीस आमदार प्रकाश आबिटकर, राज्य सेवा हक्क आयुक्त दिलीप शिंदे, सामान्य प्रशासन विभागाचे उपसचिव श्री. भोरे आदी उपस्थित होते. तर दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे सहभागी झाले होते.

मंत्री श्री. देसाई म्हणाले, सेवा हक्क कायद्याबाबत राबविण्यात येत असलेल्या पथदर्शी प्रकल्पाची माहिती सर्वदूर होण्यासाठी कार्यवाही करावी.या कायद्यांतर्गत अधिसूचित असणाऱ्या सेवांच्या माहितीचा फलक संबंधित कार्यालयाबाहेर ठळक शब्दात प्रकाशित करावा. त्यामध्ये विहित कालावधीत सेवा न मिळाल्यास अपिल करण्यात येणाऱ्या अधिकाऱ्यांचे नावही असावे.  कोल्हापूर जिल्ह्यात 15 ऑगस्ट रोजी पथदर्शी प्रकल्पाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाला सर्व जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी व मनपा आयुक्तांना ऑनलाईन आमंत्रित होण्यासाठी कळविण्यात यावे.

कोल्हापूर जिल्हाधिकारी यांनी पथदर्शी प्रकल्पाच्या अनुषंगाने नवीन संकल्पनांचा उपयोग करण्यात यावा. नवीन संकल्पनांमध्ये ई- सुनावणीचा समावेश असावा. तंत्रज्ञानाच्या साहाय्याने ई- सुनावणी संकल्पना उपयोगात आणावी. यामुळे ग्रामस्थांना जिल्ह्याच्या ठिकाणी, विभाग स्तरावर येण्याची आवश्यकता नाही. गावातच तलाठी, ग्रामपंचायत कार्यालयात व्यवस्था करण्यात यावी,  अशा सूचनाही मंत्री श्री. देसाई यांनी दिल्या.

या पथदर्शी प्रकल्पाच्या अंमलबजावणीचा अहवाल कोल्हापूर जिल्हाधिकारी यांनी राज्य सेवा हक्क आयोग, पुणे यांच्यामार्फत शासनास सादर करावा. सेवा हक्क हमी कायद्याच्या जनजागृतीसाठी समाज माध्यमांचाही उपयोग करण्यात यावा, असेही मंत्री श्री. देसाई यांनी सांगितले.

0000

निलेश तायडे/विसंअ

राज्यपालांच्या हस्ते उद्या ठाण्यात ‘योद्धा कर्मयोगी-एकनाथ संभाजी शिंदे’ पुस्तकाचे प्रकाशन

मुंबई, दि. ६ : राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते डॉ. प्रदीप ढवळ यांनी  लिहिलेल्या ‘योद्धा कर्मयोगी- एकनाथ संभाजी शिंदे’ या पुस्तकाचे प्रकाशन उद्या ( बुधवार, दि. 07) गडकरी रंगायतन सभागृह ठाणे येथे  सायंकाळी ६ वाजता  होणार आहे.

कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योगमंत्री उदय सामंत, राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, पद्मश्री शंकरबाबा पापळकर,  तसेच निमंत्रित उपस्थित राहणार आहेत.

0000

Governor to release ‘Yodha Karmayogi- Eknath Sambhaji Shinde’

Mumbai 6 : The Governor of Maharashtra C.P. Radhakrishnan will release the book ‘Yodha Karmayogi- Eknath Sambhaji Shinde’ at Gadkari Rangayatan, Auditorium, Thane at 6.00 hrs on Wednesday, 07th August 2024.

Chief Minister Eknath Shinde, Deputy Chief Ministers Devendra Fadnavis, Deputy Chief Ministers Ajit Pawar, Minister of Industries Uday Samant, Minister of Excise and Guardian Minister of Thane Shambhuraj Desai, Padmashree Shankar Baba Papalkar, Dr. Pradeep Dhawal and invitees will remain present.

‘मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी जास्तीत जास्त महिलांची नोंदणी करा – विभागीय आयुक्त डॉ.निधी पाण्डेय

उमरखेड येथे विविध बाबींचा आढावा

दिव्यांगांना लाभ मंजुरीपत्रांचे वितरण; रेशीम शेतीला भेट व शेतकऱ्यांशी संवाद

यवतमाळ, दि.६ (जिमाका) : शासनाने महिलांसाठी ‘मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण’ योजना सुरु केली आहे. महिलांच्या आर्थिक उत्थानासाठी ही योजना महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त महिलांची नोंदणी करा, अशा सूचना विभागीय आयुक्त डॉ.निधी पाण्डेय यांनी केल्या.

विश्रामगृह उमरखेड येथे आयुक्तांनी विविध विषयांचा आढावा घेतला. त्यावेळी त्यांनी सदर सूचना केल्या. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया, अपर जिल्हाधिकारी अनील खंडागळे, उपायुक्त शामकांत म्हस्के, उपविभागीय अधिकारी सखाराम मुळे, नगरपालिका प्रशासनचे सहाय्यक आयुक्त निलेश जाधव, तहसीलदार आर.यु.सुरडकर, मुख्याधिकारी महेश जामनोर आदी उपस्थित होते.

विभागीय आयुक्तांनी मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेसह मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना, स्वच्छ व सुंदर माझे कार्यालय, सैनिक हो तुमच्यासाठी, एक हात मदतीचा-दिव्यांगाच्या कल्याणाचा आदी योजना, उपक्रमांचा देखील आढावा घेतला. सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देणाऱ्या या योजना आहेत. विभागात या योजना, उपक्रमांची चांगल्या पद्धतीने अंमलबजावणी करुन जास्तीत जास्त लाभार्थ्यांना सामावून घ्यावे असे, आयुक्तांनी सांगितले.

बैठकीनंतर आयुक्तांनी उपविभागीय अधिकारी कार्यालयास भेट दिली. या ठिकाणी महसूल संवर्गातील कार्यरत तथा सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचारी यांच्याशी संवाद साधला. उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या महसूल सप्ताहांतर्गत दिव्यांग लाभार्थ्यांना लाभ मंजूरी पत्रांचे वितरण केले. उमरखेड विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्राचे विभाजन, मतदान केंद्राची इमारत, मतदान केंद्राचे नांव बदलणे तसेच नवीन मतदार नोंदणी, मतदार नावाची दुरुस्ती करणे ईत्यादी विषयाबाबत देखील आढावा घेतला. शे.तनवीर शे.मुबीन, अंजली रामराव निरडवार, फिजानाज शे.मुमताज या दिव्यांग लाभार्थ्यांना लाभ मंजूरी पत्राचे वितरण करण्यात आले.

रेशीम शेतीची पाहणी

उमरखेड नजीक असलेल्या सुकळी येथे मनोहर शिवराम वानखेडे हे शेतकरी गेल्या काही वर्षांपासून उत्तमप्रकारे रेशीम शेती करत आहे. विभागीय आयुक्त डॉ.निधी पाण्डेय यांनी त्यांच्या रेशीम शेतीस भेट देऊन पाहणी केली. या शेतकऱ्याने एक एकर क्षेत्रात तुतीची लागवड केली आहे. प्रत्येक वर्षी ते रेशीम कोषाच्या एकून चार बॅच घेतात. यातून वर्षाला साधारणपणे 2 लाख 50 हजार रुपयांचे उत्पन्न होत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

आर्णी येथे नुकसानीची पाहणी

विभागीय आयुक्तांनी आर्णी येथे दिग्रस मार्गानजीक अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेत पिकांची पाहणी केली. गेले काही दिवस सतत पाऊस होत असल्याने लगतच्या नाल्याला पुर येऊन निशाद काटपिलवार व रंजना काटपिलवार तसेच रियाज शेख हे वाहत असलेल्या शेत पिकांचे नुकसान झाले आहे. या पिकांची पाहणी करत शेतकऱ्यांशी आयुक्तांनी संवाद साधला.

000

करिअरच्या नव्या दिशा पुस्तक युवकांना मार्गदर्शक – कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा

मुंबई, दि. ६ : महाराष्ट्रातील युवकांना रोजगाराभिमुख अभ्यासक्रमांची सखोल माहिती देणारे ‘करिअरच्या नव्या दिशा’ हे पुस्तक निश्चितच उपयुक्त ठरेल,असा विश्वास कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी व्यक्त केला.

श्री. लोढा यांच्या हस्ते आज मुंबईत ‘करिअरच्या नव्या दिशा’ या पुस्तकाचे मुंबई महापालिका येथे प्रकाशन झाले,त्याप्रसंगी ते बोलत होते.

मंत्री श्री. लोढा  म्हणाले, राज्यातील युवकांना रोजगार आणि स्वयंरोजगार मिळण्याच्या दृष्टीने राज्याचा कौशल्य विकास, स्वयंरोजगार, उद्योजकता  विभाग गतिमानतेने कार्य करीत आहे. विविध प्रकारचे उपक्रम राबवित आहे. कौशल्य विकास विभाग आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्यामार्फत नुकतीच मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण ही योजना सुरू केली असून या योजनेचा युवक-युवतींनी लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

युवकांनी अधिक सक्रिय होऊन या संधींचा लाभ घेतला पाहिजे. स्वतःबरोबर देशाचे हित साधले पाहिजे. देशातील प्रत्येकाच्या हाताला काम मिळण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे अहोरात्र झटत आहे,याकडे त्यांनी लक्ष वेधले.

पुस्तकाचे लेखक महाराष्ट्र शासनाचे निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांनी परिश्रमपूर्वक, अतिशय अभ्यास करून लिहिलेल्या या पुस्तकाबद्दल मंत्री श्री. लोढा यांनी त्यांचे अभिनंदन केले. प्रारंभी पुस्तकाची माहिती देताना श्री.भुजबळ यांनी सांगितले की, या पुस्तकात केंद्र व महाराष्ट्र शासनाच्या आणि इतर राज्य सरकारांच्या मिळून जवळपास ७०० अभ्यासक्रमांची माहिती आहे.  या पुस्तकामुळे युवकांना आपली आवड ओळखून करिअरची निवड करण्यास नक्कीच मदत होईल.

आवडीनुसार करिअर निवडल्यास थकवा, कंटाळा, तणाव न जाणवून हे युवक आनंदाने आपले जीवन व्यतीत करू शकतील. या पुस्तकाचे प्रकाशक न्यूज स्टोरी टुडे पब्लिकेशनच्या प्रकाशक अलका भुजबळ यासुद्धा यावेळी उपस्थित होत्या.

0000

संध्या गरवारे/वि.संअ/

बांगलादेशात अडकलेल्या राज्यातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून उपाययोजना

विद्यार्थ्यांची सुरक्षितता आणि त्यांच्या परतीसाठी परराष्ट्र मंत्रालयाशी चर्चा

मुंबई, दि. 6 : बांगलादेशातील नागरी अशांततेच्या पार्श्वभूमीवर तेथे अडकलेल्या राज्यातील विद्यार्थ्यांची सुरक्षितता आणि मायदेशात त्यांच्या परतीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्त्वाची पावले उचलली आहेत. या विद्यार्थ्यांना तातडीची मदत उपलब्ध होणे आणि त्यांच्या भारतात परतण्यासंदर्भातील आवश्यक कार्यवाहीसाठी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्क साधला आहे.

बांगलादेशातील अशांततेमुळे परदेशी नागरिकांच्या, विशेषतः अशांत भागात अडकलेल्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न निर्माण झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी तिथे शिक्षण घेणाऱ्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य दिले आहे.

मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी परराष्ट्र मंत्रालयाशी संवाद साधला असून बांगलादेशातील परिस्थितीचे गांभीर्य पाहता त्वरित कृतीची गरज अधोरेखित केली आहे. प्रभावित विद्यार्थ्यांना सर्व शक्य मदत करण्याची विनंती केली आहे. त्यांची तात्काळ सुरक्षितता सुनिश्चित करणे, आवश्यकता असल्यास बांगलादेशातील सुरक्षित ठिकाणी त्यांचे स्थलांतर करणे, भारतात त्यांच्या सुरक्षित परतीची प्रक्रिया जलद करणे या अनुषंगाने मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी चर्चा केली आहे.

बांगलादेशात अडकलेल्या विद्यार्थ्यांची माहिती मिळविणे आणि त्यांना तातडीने मदत उपलब्ध करुन देण्याच्या अनुषंगाने सध्या बांगलादेशात असलेल्या राज्यातील विद्यार्थ्यांची यादी संकलित करून परराष्ट्र मंत्रालयाला उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांना त्वरित संपर्क साधण्यास आणि मदत उपलब्ध करणे शक्य होणार आहे. तेथील परिस्थितीवर लक्ष ठेवणे आणि केंद्रीय अधिकारी आणि प्रभावित कुटुंबांशी संपर्क ठेवण्यासाठी राज्य शासनामार्फत एक पथकही स्थापन करण्यात आले आहे. बांगलादेशातील भारतीय दूतावासाशी समन्वयाने काम करण्यात येत आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना करता येतील.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेस सर्वोच्च प्राधान्य आहे. त्यांचे मायदेशात परतण्यासाठी आवश्यक सर्व उपाययोजना करण्यात येत आहेत. या आव्हानात्मक काळात राज्य सरकार बाधित विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांसमवेत सक्षमपणे उभे आहे.

सिल्लोड तालुक्यातील साखळी बंधारा प्रकल्पाच्या पुनर्रचनेसंदर्भातील कार्यवाही तातडीने करावी – मंत्री अब्दुल सत्तार

मुंबई, दि. 6 : सिल्लोड तालुक्यातील अजिंठा गावाच्या परिसरातील पाणीटंचाई परिस्थिती दूर करण्यासाठी व या भागातील शेतकऱ्यांना सिंचन सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विशेष दुरूस्ती व विस्तार योजनेअंतर्गत पूलवजा बंधारा प्रकल्पच्या पुनर्रचनेसंदर्भातील कार्यवाही तातडीने करावी. तापी खोरे विकास महामंडळामार्फत या प्रकल्पाचा समावेश एकात्मिक राज्य जल आराखड्यात करण्यासाठीच्या कार्यवाहीस गती देण्याचे निर्देश अल्पसंख्याकमंत्री तथा छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले.

गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाअंतर्गतची कामे तसेच सिल्लोड- सोयगाव भागातील विकास कामांचा आढावा मंत्री अब्दुल सत्तार यांनी आज मंत्रालयात घेतला. यावेळी ते बोलत होते. यावेळी महामंडळाचे कार्यकारी संचालक संतोष तिमनवार, मुख्य अभियंता विजय घोगरे, उपसचिव प्रविण कोल्हे, आदींसह इतर अधिकारी उपस्थित होते.

मंत्री श्री. सत्तार म्हणाले, या भागातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबण्यासाठी साखळी बंधारा प्रकल्पाची पुनर्रचना गतीने होणे गरजेचे आहे. तसेच सोयगाव तालुक्यातील सोयगाव लघु पाटबंधारे प्रकल्पातून कालव्यामधून बंद नलिकेद्वारे जंगला तांडा लघु पाटबंधारे प्रकल्पात अतिरिक्त पाणी सोडण्याच्या कामासाठीची निविदा काढण्यात यावी. खेळणा मध्यम प्रकल्पाची गोडबोले दरवाजे बसवून उंची वाढवणे, पूर्णा नदीवरील साखळी बंधारे प्रकल्पास स्वनिधीअंतर्गत निधी उपलब्ध करून देण्यासंदर्भात कार्यवाही करावी. चारूतांडा प्रकल्पांतर्गत पूल बांधकाम करण्यासंदर्भातील निविदा  तातडीने काढण्याच्या सूचनाही यावेळी मंत्री श्री. सत्तार यांनी दिल्या.

००००

श्रद्धा मेश्राम/स.सं

आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्या हस्ते शहादा तालुक्यातील विविध विकास कामांचे भूमीपूजन व उद्घाटन

नंदुरबार, दि. 06 ऑगस्ट (जिमाका वृत्त) : आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्या हस्ते आज शहादा तालुक्यातील वैजाली, नांदर्डे, करणखेडा, कलमाडी, सोनावल, परिवर्धा, सलसाडी व पिंगाणे येथील विविध विकास कामांचे भूमीपूजन व उद्घाटन करण्यात आले.

यावेळी शहादा पंचायत समितीचे सभापती विरसिंग ठाकरे, सरपंच सौ. सुरेखा ठाकरे, उपसरपंच गणेश ठाकरे, संजय मोरे, मनिलाल पाटील, योगेश पाटील, डॉ. जगदीश पाटील, संदिप पाटील, प्रविण पाटील, राकेश पाटील, चुनिलाल पाटील, शशिकांत पाटील, मोजरा पाडवी, जान्हवी गिरासे आदि उपस्थित होते.

भूमीपजन व उद्घाटन यामध्ये रस्त्यांच्या सुधारणा, खडीकरण, डांबरीकरण, काँक्रीटीकरण, रुंदीकरण, पुलांची निर्मिती, संरक्षण भितींचे बांधकाम, रस्त्याची जलनिस्सारण यासारख्या कामांचा त्यात समावेश आहे. त्यांचा गावनिहाय तपशील पुढीलप्रमाणे…

या कामांचे झाले भूमिपूजन व उद्घाटन..

वैजाली

वैजाली कलमाडी जावदे रस्त्याची सुधारणा करणे.

तऱ्हावद वैजाली गावात रस्त्याचे काँक्रीटीकरण करणे.

राष्ट्रीय मार्ग 2 ते वैजाली ते कलमाडी जावदे रस्त्याची सुधारणा करणे.

वैजाली कलमाडी जावदे रस्त्याची रुंदीकरणासह सुधारणा करणे.

वैजाली ते काथर्दै खु. रस्त्याची सुधारणा करणे.

नांदर्डे

तऱ्हावद वैजाली भादे रस्त्यावरील वाकी नदीवरील लहान पुल बांधकाम.

नांदर्डे शिवार ते तऱ्हावद पुनर्वसन शिव रस्त्याची सुधारणा करणे.

करणखेडा

वैजाली नांदर्डे प्रकाशा व सोनावल ते करणखेडा रस्त्याची सुधारणा करणे.

करणखेडा ते बोरद हद्द जोडणारा रस्त्याची सुधारणा करणे.

करणखेडा ते नांदर्डे रस्त्याची सुधारणा करणे.

कलमाडी

वैजाली कलमाडी रस्त्यावर वर कलमाडी गांवात रस्ता कॉक्रीट रस्त्याचे बांधकाम करणे.

वैजाली कलमाडी वेळावद वाडी रस्त्याची रुंदीकरणासह सुधारणा करणे.

सोनावल

सोनावल ते करणखेडा मार्गाची सुधारणा करणे.

सोनवल ते तऱ्हाडी रस्त्याची सुधारणा करणे.

सोनावल ते ढेंग रस्त्याचे बांधकाम करणे.

परिवर्धा

परिवर्धा ते वाघोदा रस्त्यावर परिवर्धा गांवात रस्ता काँक्रीटीकरण करणे.

परिवर्धा वाघोदा काथर्दा रस्त्याची सुधारणा करणे.

पाडळता ते परिवर्धा रस्त्याची सुधारणा करणे.

कलसाडी

प्रकाशा धुरखेडा भादे अलखेड रस्त्याची जलनिस्सारणासह सुधारणा करणे.

पिंगाणे धुरखेड़ा रस्ता ते जागेश्वर मंदिर रस्त्याची सुधारणा करणे.

पिंगाणे

पिंगाणे धुरखेडा रस्ता ते जागेश्वर मंदिर रस्तालगत संरक्षण भितीचे बांधकाम करणे.

पिंगाणे गावालगत गोमाई नदीजवळ संरक्षण भिंतीचे बांधकाम करणे.

0000000000

सार्वजनिक गणेशोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने स्पर्धा

स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ३१ ऑगस्टपूर्वी अर्ज करण्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे आवाहन 

मुंबई, दि. 6 : राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे सन 2024 च्या गणेशोत्सवात सहभागी होणाऱ्या राज्यातील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पुररस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. राज्यातील पहिल्या तीन विजेत्या क्रमांकांना अनुक्रमे पाच लाख, अडीच लाख आणि एक लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. राज्यातील अधिकाधिक मंडळांनी यामध्ये सहभाग नोंदवावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे.

राज्यात गणेशोत्सवास दिनांक 7 सप्टेंबर रोजी सुरुवात होत आहे. राज्य समितीकडे जिल्हास्तरीय निवड समिती मुंबई, मुंबई उपनगर, पुणे, ठाणे या 4 जिल्ह्यातून प्रत्येकी 3 आणि अन्य जिल्ह्यातून प्रत्येकी एक याप्रमाणे एकूण 44 प्राप्त शिफारशींमधून गुणांकन आणि संबंधित कागदपत्रांच्या आधारे पहिल्या तीन विजेत्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची निवड केली जाणार आहे. वरीलप्रमाणे तीन विजेत्या गणेशोत्सव मंडळांना वगळून उर्वरित 41 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळास राज्य शासनाकडून प्रत्येकी 25 हजार रुपयांचे पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येईल. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई यांच्या mahotsav.plda@gmail.com या ई- मेल आयडीवर 31 ऑगस्टपूर्वी परिपूर्ण अर्ज सादर करावेत.

या पुरस्कारांसाठी निवड होणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी विविध निकष असतील. त्यांना गुण दिले जातील. या स्पर्धेत धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणी केलेल्या किंवा स्थानिक पोलिसांकडे परवानगी घेतलेल्या किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेची परवानगी घेतलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना सहभागी होता येईल, असे मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले.

या स्पर्धेसाठी सांस्कृतिक कार्यक्रम, स्पर्धांचे आयोजन, संस्कृतीचे जतन संवर्धन, राज्यातील गडकिल्ले यांचे जतन व संवर्धन, राष्ट्रीय/राज्य स्मारके, धार्मिक स्थळांविषयी जनजागृती, जतन व संवर्धन, सामाजिक उपक्रम, पर्यावरणपूरक मूर्ती, पर्यावरणपूरक सजावट (थर्मोकोल, प्लास्टिक विरहीत), ध्वनिप्रदूषणरहित वातावरण, पारंपरिक/ देशी खेळांच्या स्पर्धा आणि गणेश भक्तांसाठी देत असलेल्या  प्राथमिक सुविधा आदी बाबींवर गणेशोत्सव मंडळांना गुणांकन दिले जाणार आहेत.

विजेत्यांच्या निवडीसाठी जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी कार्यालयातील उपजिल्हाधिकारी दर्जाचा अधिकारी या समितीचा अध्यक्ष असेल. याशिवाय या समितीत शासकीय कला महाविद्यालयातील कला प्राध्यापक, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी, आरोग्य अधिकारी, पोलिस अधिकारी सदस्य असतील, तर जिल्हा नियोजन अधिकारी सदस्य सचिव असतील. निवड समिती प्रत्यक्ष उत्सवस्थळी भेट देतील तसेच मंडळाकडून व्हिडिओग्राफी व कागदपत्र जमा करुन घेतील. जिल्हास्तरीय समितीकडून प्रत्येक गणेशोत्सव मंडळाबाबत अभिप्रायासह गुणांकन करण्यात येईल. ही समिती मुंबई, मुंबई उपनगर, पुणे, ठाणे या 4 जिल्ह्यातून प्रत्येकी 3 व अन्य जिल्ह्यातून प्रत्येकी 1 उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळाची शिफारस करुन त्यांची नावे सर्व कागदपत्र व्हिडीओसह राज्य समितीकडे सादर करेल.

जिल्हास्तरीय समितीकडून शिफारस केलेल्या याद्यांमधून तीन विजेते क्रमांक निवडीसाठी राज्यस्तरावर समिती असेल. या समितीत सर जे. जे. कला विद्यालयाचे अधिष्ठाता, वरिष्ठ प्राध्यापक अध्यक्ष असतील, तर पर्यावरण विभागातील वरिष्ठ गट ‘अ’ मधील अधिकारी सदस्य, तर राष्ट्रीय सेवा योजनेचे राज्य जनसंपर्क अधिकारी सदस्य सचिव असतील.

गणेशोत्सव स्पर्धेअंतर्गत भाग घेणाऱ्या मंडळांपैकी मागील सलग 2 वर्षे राज्यस्तरीय/जिल्हास्तरीय पारितोषिक प्राप्त झालेली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे पारितोषिकास पात्र ठरणार नाहीत.

000

दीपक चव्हाण/विसंअ

ताज्या बातम्या

प्रगत, संपन्न महाराष्ट्र साकारण्यासाठी कटिबद्ध होऊया – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
मुंबई, दि. ३० : - महाराष्ट्र देशाच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावत असून, आपल्या सर्वांच्या प्रयत्नातून, सहकार्यातून आणखी प्रगत, संपन्न महाराष्ट्र साकारण्यासाठी कटिबद्ध होऊया, असे...

एमएचटी-सीईटी २०२५ पीसीएम गटाच्या परीक्षेत तांत्रिक त्रुटी; ५ मे रोजी फेर परीक्षा 

0
मुंबई, दि. ३० : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून दि.२७ एप्रिल २०२५ रोजी घेण्यात आलेल्या एमएचटी-सीईटी २०२५ (पीसीएम गट) सामाईक प्रवेश परीक्षेच्या सकाळच्या सत्रामध्ये...

जातनिहाय जनगणनेचा निर्णय क्रांतिकारी ठरेल – मंत्री अतुल सावे

0
मुंबई, ‍‍दि. ३० : केंद्र सरकारने घेतलेला जातनिहाय जनगणनेचा निर्णय हा ओबीसी व वंचित घटकांच्या दृष्टीने क्रांतिकारी ठरेल, असे इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे...

अल्पसंख्यांक विभागांतर्गत योजनांच्या कामाचा राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्याकडून आढावा 

0
मुंबई, दि. ३० : अल्पसंख्यांक विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांच्या कामकाजाच्या अल्पसंख्यांक राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी मंत्रालयात आढावा घेतला. राज्यमंत्री माधुरी मिसाळ म्हणाल्या की, मौलाना...

भारताला जागतिक सर्जनशीलतेचे केंद्र बनवणारा ऐतिहासिक ‘वेव्हज्-२०२५’ महोत्सव

0
भारताची सांस्कृतिक शक्ती आणि तंत्रज्ञानाची जादू एकाच व्यासपीठावर WAVES 2025 मध्ये सामील व्हा आणि जागतिक क्रिएटिव्ह क्रांतीचे साक्षीदार व्हा... १९ जानेवारी २०१९ रोजी मुंबईतील नॅशनल म्युझियम ऑफ...