बुधवार, एप्रिल 30, 2025
Home Blog Page 48

कलाकारांना मिळणार एकाच छताखाली सर्व सुविधा – सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार

स्व. सुधीर फडके दृक-श्राव्य संकुल सांस्कृतिक क्षेत्रासाठी नवसंजीवनी;

मुंबई, दि. ९ : प्रसिद्ध गायक-संगीतकार सुधीर फडके उर्फ बाबूजी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ उभारण्यात आलेल्या स्वर गंधर्व सुधीर फडके दृक-श्राव्य‘ या संकुलात ३६० डिग्री क्रोमा स्टुडिओरेकॉर्डिंगएडिटिंगमिक्सिंगचित्रीकरणऑडिओ-व्हिज्युअल अशा सर्व सुविधा उपलब्ध आहेत. सर्व कलाकारांसाठी या सर्व सुविधा माफक दरात एकाच छताखाली उपलब्ध होणार असल्याचे प्रतिपादन सांस्कृतिक कार्यमाहिती तंत्रज्ञान तथा मुंबई उपनगरचे पालकमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी केले.

पु. ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीमुंबई येथे  स्वर गंधर्व सुधीर फडके दृक-श्राव्य संकुलाचा लोकार्पण सोहळा सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांच्या प्रमुख उपस्थितीत व ज्येष्ठ संगीतकार, गायक श्रीधर फडके यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. त्यावेळी मंत्री ॲड. शेलार बोलत होते. यावेळी सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगेपु. ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या संचालक मीनल जोगळेकरगायिका उतरा केळकर, कला व संगीत क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार म्हणालेस्वर गंधर्व सुधीर फडके यांच्या नावाने अद्याप काहीच नव्हतंआणि म्हणूनच हे नाव देणे हे सर्वार्थाने योग्य होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी  झालेल्या चर्चेनंतर सुधीर फडके’ हे नाव निश्चित करण्यात आले. या संकुलाच्या निमित्ताने स्व. सुधीर फडके यांच्या स्मृतींना उजाळा मिळणार आहे.

स्वर गंधर्व सुधीर फडके दृक-श्राव्य संकुलाचे नाव सुचविण्यापासून ते उभारणी पर्यंत विशेष मेहनत घेणार सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे व अकादमीच्या संचालिका मीनल जोगळेकर यांचे विशेष कौतुक करून अभिनंदन केले.

संकुलाची रचना

स्वर गंधर्व सुधीर फडके दृक-श्राव्य संकुलामध्ये ध्वनिमुद्रण कक्षआभासी चित्रीकरण (क्रोमा) कक्षपाच अद्ययावत संकलन कक्षरंगपटपूर्व परीक्षण (प्रिव्ह्यू) दालन, व्हीएफएक्स व प्रशिक्षण वर्ग अशी रचना आहे.

मराठी मनावर अधिराज्य गाजविणारे महान संगीतकार तसेच भावगीत भक्तीगीतेतील अलौकिक स्वर गंधर्व स्वर्गीय सुधीर फडके यांच्या अजरामर गीतांचा कार्यक्रमातून त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला. ज्येष्ठ संगीतकारगायक श्रीधर फडके यांनी देव देव्हाऱ्यात नाही…: या गाण्याने सर्व रसिक प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करून स्व. सुधीर फडके यांच्या चिरंतन स्मृतींना वंदन केले. तसेच यावेळी गायक अजित परबसोनाली कुलकर्णीकेतकी भावे-जोशीअभिषेक नलावडे यांचा सहभाग होता. कार्यक्रमात उत्कृष्ट बासरी वादनाचाही समावेश होता. खास सुधीर फडके यांना श्रद्धांजली म्हणून हा अनोखा सांगीतिक क्षण उपस्थितांना भावनिक करून गेला.

 कार्यक्रमाचे प्रस्ताविक सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांनी केले तर अकादमीच्या संचालक मीनल जोगळेकर यांनी आभार मानले. सूत्र संचालन कुणाल रेगे व संगीत संयोजन प्रशांत लळीत यांनी केले.

0000

मोहिनी राणे/ससं/

 

आरोग्य संस्थांच्या बळकटीकरणासाठी आशियाई विकास बँकेच्या सहकार्याने ‘मिशन’ राबवा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबईदि. ९ : राज्यातील आरोग्य उपकेंद्र ते संदर्भ सेवा रुग्णालयांपर्यंत असलेल्या विविध आरोग्य संस्थांचे बळकटीकरण करण्यासाठी विस्तृत प्रकल्प तयार करण्याचे निर्देश देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा प्रकल्प आशियाई विकास बँकेच्या सहकार्याने मिशन‘ म्हणून राबविण्यात यावाअशा सूचनाही दिल्या.

सह्याद्री अतिथीगृह येथे आशियाई विकास बँकेच्या सहकार्याने वैद्यकीय शिक्षण आणि सार्वजनिक आरोग्य विभागाच्या प्रकल्पांबाबत आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते. यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर, मित्रा संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशीवित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ. पी. गुप्तासार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव वीरेंद्र सिंहवैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव धीरज कुमारवैद्यकीय शिक्षण विभागाचे आयुक्त राजीव निवतकर आदी उपस्थित होते. तसेच दूरसंवाद प्रणालीद्वारे आशियाई विकास बँकेचे प्रतिनिधी निशांत जैन सहभागी झाले होते.

मुख्यमंत्री म्हणालेकर्करोग निदान उपचाराबाबत केंद्राने राष्ट्रीय कर्करोग उपचार धोरण आणले आहे. याच धर्तीवर कर्करोग निदान व उपचारासाठी संदर्भ सेवा देण्याबाबत प्रभावी कार्यपद्धती ठरविण्यात यावी. कर्करोगावर केमोथेरपीरेडिएशन थेरपी या उपचारांचा समावेश असावा. यासंदर्भात विहित काल मर्यादा ठरवून कार्यवाही करण्यात यावी.

वैद्यकीय शिक्षण व सार्वजनिक आरोग्य विभाग यांनी आरोग्य संस्थांचे बळकटीकरण करण्यासाठी विस्तृत प्रकल्प अहवाल तयार करावा. नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा देण्यासाठी नाविन्यपूर्ण उपायांचा अवलंब करण्यात यावा. राज्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय निर्माण करण्यात येत आहे. महाविद्यालयांसाठी संबंधित जिल्ह्यात सार्वजनिक आरोग्य विभागाची रुग्णालय संलग्न करण्यात आली आहेत. याबाबत जास्त लोकसंख्या व रुग्णसंख्येचे भार असलेल्या ठिकाणी स्वतंत्र रुग्णालय निर्माण करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणालेशासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू झालेल्या जिल्ह्यात वैद्यकीय शिक्षण विभागाचे स्वतंत्र रुग्णालय आवश्यकतेची पडताळणी करावी. वैद्यकीय शिक्षण आणि सार्वजनिक आरोग्य विभागासाठी आवश्यक असणारी रुग्णालयेनव्याने रुग्णालय उभारणी गरजेची असलेली ठिकाणे या पद्धतीने वर्गीकरण करून विस्तृत नियोजन आराखडा तयार करावा. धाराशिव येथे वैद्यकीय शिक्षण विभागाचे रुग्णालय निर्माण करण्यात यावे. पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमांना प्रवेश देताना विद्यार्थ्यांना पदव्युत्तर शिक्षणानंतर कालावधी विहित करून शासकीय रुग्णालयांमध्ये सेवा देणे बंधनकारक करण्यासंदर्भात पडताळणी करावीअसे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिले.

आशियाई विकास बँकेच्या सहकार्याने राज्यातील प्रकल्प

अलिबाग आणि सिंधुदुर्ग शासकीय सामान्य रुग्णालयाचे बांधकाम सुरू आहे. अमरावतीवाशिम आणि धाराशिव येथील रुग्णालये निविदा स्तरावर आहेत. गुणवत्ता वृद्धिंगत करण्यासाठी उत्कृष्ट केंद्राचे जाळे निर्माण करण्यात येत आहे. त्यामध्ये महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ ‘ हब ‘ आणि सात ‘ स्पोक ‘ प्रस्तावित आहेत. तसेच आरोग्य व्यवस्थापन माहिती प्रणाली विकसित करण्यात येत आहे. साताराचंद्रपूर शासकीय रुग्णालय आणि सर जे.जे. सुपर स्पेशलिटी रुग्णालयामध्ये उपकरणे खरेदी करण्यात येत आहेत. तसेच अवयवदान प्रत्यारोपण संबंधित संस्था निर्माण करण्यात येणार आहेत.

0000

नीलेश तायडे/विसंअ/

‘आपले सरकार’ पोर्टलच्या अद्ययावतीकरणामुळे १० ते १४ एप्रिल या काळात सेवांमध्ये तात्पुरती खंडितता

मुंबई, दि.९ : महाराष्ट्र शासनाच्या माहिती तंत्रज्ञान विभागाकडून १० एप्रिल २०२५ (गुरुवार) ते १४ एप्रिल २०२५ (सोमवार) दरम्यान ‘आपले सरकार’ पोर्टलवर नियोजित देखभाल आणि हार्डवेअर अद्ययावत करण्याचे काम करण्यात येणार आहे.

या कालावधीत ‘आपले सरकार सेवा पोर्टल’ वरील सर्व सेवा आणि प्रणाली काही काळासाठी अनुपलब्ध राहतील.

दिनांक १० ते १४ एप्रिल २०२५ या कालावधीत बहुतांश दिवस सार्वजनिक सुट्ट्या असल्यामुळे, नागरिकांनी, आपले सरकार सेवा केंद्र/ सेतू केंद्र चालवणाऱ्या कर्मचाऱ्यांनी, ग्रामपंचायतींनी तसेच शासनाच्या विविध विभागांतील कर्मचाऱ्यांनी आपापल्या सेवा संबंधित कामांचे नियोजन पूर्वीच करावे, असे आवाहन माहिती तंत्रज्ञान विभाग, महाराष्ट्र शासन यांनी केले आहे.

 

0000

संजय ओरके/ विसंअ/

जन्म त्रिशताब्दीनिमित्त पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या चर्चगेट स्थानकाजवळील पुतळ्याचे सुशोभीकरण होणार

मुंबई, दि. ९ : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या चर्चगेट स्टेशनजवळ असलेल्या पुतळ्याचे आणि परिसराचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे. पुतळ्याचे दुरुस्तीकार्य तसेच पाठीमागील भिंतीवर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी केलेले कार्य, महेश्वर येथील राजवाडा, इंदोर येथील वास्तूशिल्प, काशीविश्वनाथ मंदिराचा केलेला जीर्णोद्धार, वृक्षसंवर्धन या बाबींचा देखावा आकर्षक स्वरुपातील प्रकाश योजनेसह मांडण्यात येणार आहे.

आज महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई महापालिका सहायक आयुक्त श्री.जयदीप मोरे आणि अन्य अधिकारी तसेच डॉ.असिम गोकर्ण हरवंश यांची या कामासंदर्भात बैठक झाली.

हे काम दिनांक १५ मे, २०२५ च्या आत पूर्ण करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले. दिनांक ३१ मे, २०२५ रोजी पुण्याश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची ३०० वी जयंती आहे. या जन्म त्रिशताब्दी निमित्त पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा हा सुशोभित आणि पुष्पमंडित पुतळा तयार करण्यात येत आहे.

दुबईचे उपपंतप्रधान राजकुमार शेख हमदान बिन मोहम्मद बिन रशीद अल मकतुम यांची बॉम्बे स्टॉक एक्सचेंजला भेट

मुंबई, दि.९ : भारत दौऱ्यावर आलेले दुबईचे उपपंतप्रधान राजकुमार शेख हमदान बिन मोहम्मद बिन रशीद अल मकतुम यांनी त्यांच्या शिष्टमंडळासमवेत आज बॉम्बे स्टॉक एक्सचेंज येथे सदिच्छा भेट दिली.

यावेळी बॉम्बे स्टाक एक्सचेंजचे (बीएसई) व्यवस्थापकीय संचालक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदरारामन रामामुरथी यांनी श्री. अल मकतुम व त्यांच्या शिष्टमंडळाचे स्वागत केले. तसेच बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या वाटचालीबाबत सविस्तर माहिती दिली.

000000

वंदना थोरात/विसंअ/

मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत औद्योगिक वापरासाठीचे चार बिगर सिंचन पाणी आरक्षण प्रस्ताव मंजुरीस्तव सादर

मुंबईदि. ८ : राज्यातील घरगुती व औद्योगिक पातळीवर पाण्याची वाढती गरज लक्षात घेताबिगर सिंचन  पाणी आरक्षणासाठी सादर करण्यात आलेल्या चार प्रस्तावांबाबत आजच्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.

या बैठकीस जलसंपदा मंत्री गिरीश महाजनकृषीमंत्री ॲड. माणिकराव कोकाटेजलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूरजलसंपदा विभागाचे सचिव डॉ. संजय बेलसरे आदि उपस्थित होते.

प्रचलित क्षेत्रीय वाटपाच्या मर्यादेनुसार – पिण्याच्या पाण्यासाठी १५ टक्के व औद्योगिक वापरासाठी १० टक्के – या मर्यादे अंतर्गत असलेल्या आरक्षण प्रस्तावांना मंजुरी देण्याचे अधिकार पाटबंधारे विकास महामंडळास देण्यात आले आहेत. त्या मर्यादे पलीकडील प्रस्तावांना या मंत्रिमंडळ उपसमिती समोर मांडून त्यांना मान्यता देण्यात येते.

आजच्या बैठकीत मंत्रिमंडळ उपसमितीने खालील तीन प्रस्तावांना मान्यता दिली आहे .

मे. मेघा इंजिनिअरिंग अ‍ॅन्ड इन्फ्रास्ट्रक्चर लि.हैद्राबाद – पाचोराजळगाव, मे. मेघा इंजिनिअरिंग अ‍ॅन्ड इन्फ्रास्ट्रक्चर लि.हैद्राबाद – नवापूरनंदूरबार आणि मे. रॉकिंग बॉम्बे ब्रेवरेज – मौजे खानावता. खालापूरजि. रायगड

त्या व्यतिरिक्त चौथ्या – म्हणजे एनटीपीसी (National Thermal Power Corporation) च्या  प्रस्तावाच्या बाबतीत सर्वानुमते असे मान्य झाले की, कुंभे जलविद्युत प्रकल्पाची उर्वरित कामे पूर्ण करण्याकरीता आवश्यक निधी एनटीपीसीने त्यांना आवश्यक पाणी वापराच्या प्रमाणात उपलब्ध करून देण्याबाबत एनटीपीसीला विचारणा करावी व शासनाच्या प्रचलित नियमानुसार पुढील कार्यवाही स्वतंत्रपणे करावी.

….

संध्या गरवारे/विसंअ/

‘सामाजिक समता सप्ताह’ विविध उपक्रमांनी साजरा करणार – सहाय्यक आयुक्त प्रसाद खैरनार

मुंबई, दि. ०८: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ वी जयंतीनिमित्त ८ ते १४ एप्रिल २०२५ दरम्यान ‘सामाजिक समता सप्ताह’ साजरा केला जाणार आहे. यानिमित्त विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. यामध्ये सर्व समाजघटकांनी सहभाग घेण्याचे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रसाद खैरनार यांनी केले आहे.

समता पर्व सप्ताहाच्या अनुषंगाने जिल्हास्तरावर सर्व शासकीय वसतिगृह, सर्व दिव्यांग शाळा व समाज कल्याण विभागांर्तगत येणाऱ्या सर्व कार्यालयांमध्ये व्याख्यान, रक्तदान शिबिर, विविध उपक्रमांच्या अनुषंगाने कार्यशाळा, विविध प्रबोधनपर कार्यक्रम, ज्येष्ठ नागरिक व महिला मेळावा आदी उपक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. यात सहभाग घेण्याचे आवाहनही  करण्यात आले आहे.

सामाजिक समता सप्ताहात हे उपक्रम राबविले जाणार

➡️दि. ९ एप्रिल, २०२५ रोजी  विभागातील सर्व शाळा, महाविद्यालये, शासकीय वसतिगृहे येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचांरावर आधारित वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, लघुनाट्य स्पर्धा इत्यादी कार्यक्रमांचे आयोजन.

➡️दि. १० एप्रिल, २०२५ रोजी मुंबई शहर जिल्ह्यामध्ये पथनाट्य व लघुनाटिका या द्वारे सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांबाबत जनतेचे प्रबोधन.

➡️दि. ११ एप्रिल, २०२५ रोजी क्रांतीसूर्य महात्मा जोतिराव फुले यांची जयंती साजरी करण्यात येणार.

➡️ दि. १२ एप्रिल, २०२५ संविधान जागर भारतीय संविधानाविषयी सर्वसाधारण माहिती देण्यात येत आहे तसेच संविधानाची निर्मिती, संविधान निर्मिती समिती, अनुच्छेद, विशेषतः मुलभूत अधिकार व मुलभूत कर्तव्ये याविषयी व्याख्यान.

➡️ दि. १३ एप्रिल, २०२५ रोजी प्रत्येक जिल्ह्यात ज्येष्ठ नागरिकांसाठी जनजागृती शिबिर व ज्येष्ठ नागरिकांचा मेळावा आयोजित करण्यात येत असून, जिल्ह्यात जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या सहकार्याने विभागातील सर्व शाळा, महाविद्यालये, शासकीय वसतिगृहे येथे रक्तदान शिबिराचे आयोजन. सर्व शासकीय कार्यालयांमध्ये स्वयंसेवी संस्थांच्या साहाय्याने जिल्ह्यातील सर्व महत्त्वाच्या ठिकाणी व अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्त्यांमधून स्वच्छता अभियान राबविण्यात येणार .

➡️ दि. १४ एप्रिल, २०२५ रोजी  सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या अधिनस्त सर्व शासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालये येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करुन व इतर कार्यक्रम, व्याख्याने, चर्चासत्र इत्यादी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या दिवशी विभागातील सर्व जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालयात ऑनलाईन जातपडताळणी प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहेत.

०००

शैलजा पाटील/विसंअ/

‘मातोश्री ग्रामसमृद्धी शेत/पाणंद रस्ते योजना’ अधिक प्रभावीपणे राबवा – रोहयो मंत्री भरत गोगावले

मुंबई, दि. ०८: ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी महत्त्वाकांक्षी ‘मातोश्री ग्रामसमृद्धी शेत/पाणंद रस्ते योजना’ अधिक प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांनी दिले.

मंत्रालयात वित्त राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांच्या दालनात आयोजित मातोश्री ग्रामसमृद्धी शेत पाणंद रस्ते योजनेचा आढावा घेताना ते बोलत होते. यावेळी आमदार प्रताप अडसड, नाना पटोले, विनोद अग्रवाल, अभिमन्यू पवार, राजू तोडसाम,  राजेंद्र पाटील आदी लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

मंत्री गोगावले म्हणाले, योजनेतील कामे वेळेत व दर्जेदार व्हावीत, केंद्र सरकारकडून प्रलंबित निधीसाठी पाठपुरावा करण्यात यावा, तसेच रोहयो अंतर्गत न होणारे रस्त्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी प्रयत्न करावेत. शेतीच्या विकासासाठी आणि शेतकऱ्यांना शेतीच्या कामासाठी योग्य रस्ता सुविधा मिळण्यासाठी ही योजना अत्यंत उपयुक्त आहे. कामांची गुणवत्ता राखत ती वेळेत पूर्ण व्हावीत यासाठी विशेष लक्ष द्यावे.

राज्यमंत्री जयस्वाल म्हणाले, ज्या ठिकाणी मजूर उपलब्ध नाहीत, त्या ठिकाणी कामांसाठी पर्यायी समायोजन करावे. मजूर उपलब्ध नसणे ही अंमलबजावणीतील मोठी अडचण असून, त्यावर तातडीने उपाययोजना करावी. ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा मजबूत करून शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावणे हे या योजनेचे प्रमुख उद्दिष्ट आहे. योजनेची प्रभावी अंमलबजावणी करून अधिकाधिक शेतकऱ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील.

०००

राजू धोत्रे/विसंअ/

भूसंपादनाच्या प्रत्येक टप्प्यावरील प्रक्रिया वेळेत पूर्ण करा – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे 

मुंबई, दि. ०८: राज्यात पायाभूत सुविधा तसेच विकासाची विविध कामे मंजूर आहेत. यासाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू असून भूसंपादनाच्या प्रत्येक टप्प्यावरील प्रक्रिया वेळेत पूर्ण करावी, असे आदेश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. राज्य शासन गतिशीलपणे आणि पारदर्शकपणे वाटचाल करीत असून भूसंपादनाच्या प्रक्रियेत कोणाच्याही चुकीमुळे याला हानी पोहोचणार नाही याची सर्वांनी दक्षता घ्यावी, असे त्यांनी स्पष्ट केले.

राज्यातील सर्व उपविभागीय अधिकारी आणि भूसंपादन अधिकारी यांच्यासमवेत भूसंपादन प्रकल्पांची सद्यस्थिती तसेच मोबदला रक्कम वाटप याबाबत मंत्री बावनकुळे यांनी सविस्तर ऑनलाईन आढावा बैठक घेतली. या बैठकीस सर्व विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी उपस्थित होते.

प्रारंभी विभागीय आयुक्तांनी त्यांच्या विभागातील तसेच जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यातील भूसंपादन सुरू असलेल्या प्रकल्पांची माहिती दिली. त्यानंतर मंत्री बावनकुळे यांनी संबंधित सर्व उपविभागीय अधिकारी तसेच भूसंपादन अधिकाऱ्यांशी भूसंपादन प्रक्रिया कोणत्या टप्प्यावर आहे याविषयी चौकशी करून भूसंपादनात काही समस्या असल्यास त्या जाणून घेतल्या.

मंत्री बावनकुळे म्हणाले की, गतिशीलपणे काम करताना अनवधानाने एखादी चूक होणे स्वाभाविक आहे. त्यासाठी शासन आपल्या पाठीशी उभे राहील. तथापि, जाणीवपूर्वक चूक करणाऱ्यांना पाठीशी घातले जाणार नाही. विभागीय आयुक्तांनी भूसंपादन प्रक्रियेचा नियमित आढावा घेऊन शासनाकडून काय सहकार्य हवे ते कळवावे, शासन पातळीवर आवश्यक ते सर्व सहकार्य केले जाईल. विकास प्रकल्प वेळेत पूर्ण होणे आणि त्यासाठी वेळेत भूसंपादन होणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असून कोणाच्याही चुकीमुळे प्रकल्पाला विलंब होणार नाही अथवा शासनाची बदनामी होणार नाही याची सर्वांनी दक्षता घ्यावी, असे त्यांनी स्पष्ट केले.

भूसंपादनाच्या प्रक्रियेत चूक झाल्यामुळे माध्यमांमधून अनेकदा बातम्या प्रसिद्ध होत असतात. आपली चूक होत असल्यास ती दुरुस्त करावी, अथवा बातमी चुकीची असल्यास जनमानसामध्ये गैरसमज पसरणार नाही यासाठी त्याचे तातडीने खंडन करावे, अशी सूचनाही मंत्री बावनकुळे यांनी यावेळी केली.

महसूल विभागाचे सहसचिव श्रीराम यादव यांनी, भूसंपादन प्रक्रियेस विलंब होणे, मोबदला अदा करण्यास विलंब होणे, वाढीव मोबदला निघाल्याने व्याजामध्ये वाढ होणे, त्याचप्रमाणे ज्या भूसंपादन अधिकाऱ्यांच्या निवाड्यांना आव्हान देण्याचे प्रमाण अधिक आहे अशा प्रकारच्या निवाड्यांमध्ये सुधारणा करणे याबाबतीत विभागीय आयुक्तांनी अभ्यास करून उपाययोजना सुचवाव्यात, असे यावेळी सांगितले.

०००

बी.सी.झंवर/विसंअ/

प्रगतीचे मार्ग: दुबई – भारत आर्थिक भागीदारी व्यावसायिक परिसंवाद

मुंबई, दि. ०८ : दुबई वाणिज्य व उद्योग मंडळे आणि कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री (सीआयआय), फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (एफआयसीसीआय) आणि आयएमसी चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री यांच्या सहयोगाने दुबईचे उपपंतप्रधान राजकुमार शेख हमदान बिन मोहम्मद बिन रशीद अल मकतुम आणि केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांच्या उपस्थित  ‘प्रगतीचे मार्ग: दुबई – भारत आर्थिक भागीदारी’ या व्यावसायिक परिसंवादाचे आयोजन आज करण्यात आले होते.

यावेळी दुबई चेंबर्सचे अध्यक्ष सुलतान बिन सईद अल मन्सुरी, डीपी वर्ल्डचे चेअरमन आणि सीईओ तसेच दुबई इंटरनॅशनल चेंबरचे चेअरमन सुलतान अहमद बिन सुलेयम आणि  त्यांचे शिष्टमंडळ उपस्थित होते.

या परिसंवाद मध्ये दुबई आणि भारत यांच्यातील डिजिटल इकॉनॉमी मार्गाचा आरंभ होत असल्याचे घोषित करण्यात आले. या भागीदारीचा एक नवीन टप्पा म्हणून बंगळुरूमध्ये दुबई चेंबर्सचे नवीन कार्यालय उघडण्यात येणार आहे. हे कार्यालय भारतातील डिजिटल क्षेत्रातील सहकार्याचा प्रवेशद्वार ठरेल, असे सांगण्यात आले.

या परिसंवादात करण्यात आलेल्या घोषणा

  • ‘भारत पार्क’च्या बांधकामाला आजपासून सुरुवात झाली आहे. याचा पहिला टप्पा २०२६ च्या अखेरीस पूर्ण होईल. हे पार्क भारतीय उत्पादने जागतिक खरेदीदारांसाठी एक मंच म्हणून काम करेल,विशेषतः जीसीसी देश आणि आफ्रिकेतील खरेदीदारांसाठी.
  • ‘भारत आफ्रिका सेतू’या उपक्रमाचा शुभारंभ या माध्यमातून भारत आणि आफ्रिका दरम्यान समुद्री आणि हवाई संपर्क, आणि डीपी वर्ल्डच्या लॉजिस्टिक पार्क्सच्या साहाय्याने व्यापार अधिक मजबूत होईल. भारतातील निर्यातदारांना आफ्रिकेतील ५३ देशांमध्ये व्यापारासाठी मोठे नेटवर्क आणि पायाभूत सुविधा मिळतील.
  • डीपी वर्ल्ड आणिRITESलिमिटेड यांच्यात सामंजस्य करार. या कराराच्या अंतर्गत, दोन्ही संस्था जागतिक प्रकल्प विकसित करण्याच्या संधी शोधतील. व्हर्च्युअल ट्रेड कॉरिडॉर प्लॅटफॉर्म एकत्र सुलभ सान्निध्य देईल जे कस्टम्स आणि लॉजिस्टिक्स प्रक्रियांना एकत्र आणेल. डीपी वर्ल्ड आणि कोचीन शिपयार्ड यांच्यात सामंजस्य करार. या सहकार्यामुळे शिप रिपेयर, शिप कन्स्ट्रक्शन, ऑफशोअर फॅब्रिकेशन, ऑइल व गॅस यामध्ये सहकार्य वाढेल. ‘मेक इन इंडिया २०३०’ आणि ‘आत्मनिर्भर भारत’ उपक्रमांना गती मिळेल.
  • डीप-वॉटर पोर्टवरील कंटेनर टर्मिनलचे पूर्ण बांधकाम २०२७ पर्यंत पूर्ण होईल. हे पोर्ट भारत सरकारच्या ग्रीन पोर्ट गाइडलाइन्सनुसार तयार केले जात आहे.

यावेळी केंद्रीय मंत्री गोयल परिसंवादामध्ये मनोगत व्यक्त करताना म्हणाले, मुंबई आणि दुबई यांच्यात केवळ क्रिकेटच नव्हे, तर अनेक ऐतिहासिक आणि सांस्कृतिक संबंध आहेत. यंदा आपल्या कुटुंबाच्या भारतभेटीच्या १०० वर्षांचं स्मरणीय वर्ष आहे — शेख सईद यांच्या १९२४ मधील भेटीला १०० वर्ष पूर्ण झाली आहेत.

भारत आणि युएई यांचे नाते हे केवळ व्यापारी संबंध नसून, विश्वासावर उभं असलेलं एक भागीदारीचं आदर्श उदाहरण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि युएईतील सर्व प्रमुख नेत्यांमधील विश्वासाचं मूर्त स्वरूप आहे.

युएईमध्ये उभ्या राहत असलेल्या स्वामीनारायण मंदिराबद्दलही आम्ही आपले अत्यंत ऋणी आहोत.

शिक्षण क्षेत्रातील वाढती भागीदारी — दुबईत आयआयटी सुरू झालं आहे, आता आयआयएम येत आहे, आणि लवकरच आयआयएफटीही सुरू होईल. ही केवळ सुरुवात आहे. शिक्षण, व्यापार, संस्कृती, ऊर्जा, लॉजिस्टिक्स, कृत्रिम बुद्धिमत्ता, हरित ऊर्जा, अन्न सुरक्षा, आणि आणखी अनेक क्षेत्रांत संधी उपलब्ध आहेत.

भारताची जीडीपी दुपटीने वाढली आहे. २०२५ अखेर भारत जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल, आणि २०२७ पर्यंत तिसरी बनेल. यामुळे ‘विकसित भारत’चं स्वप्न आणि युएईचं ५० वर्षांचं व्हिजन हातात हात घालून पुढे जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

०००

गजानन पाटील/ससं/

ताज्या बातम्या

मुख्य न्यायदंडाधिकारी कार्यालयातील चार वाहनांची लिलावाद्वारे विक्री

0
मुंबई, दि. ३० : मुख्य न्यायदंडाधिकारी, मुंबई या कार्यालयातील मारूती इको (पेट्रोल) या चार वाहनांची जाहीर लिलाव पद्धतीने विक्री करण्यात येणार आहे. या वाहनाची...

महाराष्ट्र दिनानिमित्त राजधानीत विविध कार्यक्रम

0
नवी दिल्ली, दि. ३० : महाराष्ट्र राज्याचा ६६ वा स्थापना दिवस गुरूवारी १ मे रोजी साजरा होणार आहे या निमित्ताने राजधानी दिल्लीत विविध कार्यक्रम...

महाराष्ट्र दिनानिमित्त राज्यपालांचे कार्यक्रम

0
मुंबई, दि. ३० : महाराष्ट्र राज्याच्या ६६ व्या स्थापना दिनानिमित्त राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन गुरुवारी (दि. १ मे) छत्रपती शिवाजी महाराज मैदान, दादर, मुंबई...

महात्मा बसवेश्वर व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले अभिवादन

0
मुंबई, दि. ३० : महात्मा बसवेश्वर आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी सामान्य...

नागरिकांना वेळेत सुविधा मिळण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे- राज्यमंत्री माधुरी मिसाळ

0
मुंबई, दि. ३० : पुणे महानगरपालिका आणि महात्मा फुले नविनीकरणीय ऊर्जा व पायाभूत प्रौद्योगिकी महामंडळ (महाप्रित) यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे महापालिकेच्या हद्दीत राबविण्यात येणाऱ्या...