बुधवार, एप्रिल 30, 2025
Home Blog Page 480

पालकमंत्री अजित पवार यांच्याकडून जिल्ह्यातील पूर परिस्थितीचा आढावा

पुणे दि. ४- उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर वरिष्ठ अधिकाऱ्यांशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज ठेवण्याचे आणि नदीकाठच्या सखल भागातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश दिले.

श्री.पवार यांनी विभागीय आयुक्त, पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त , जिल्हाधिकारी, पाटबंधारे विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून पूरपरिस्थितीबाबत माहिती घेतली. खडकवासला धरणातील विसर्ग दिवसा वाढवून पाणीसाठा ६५ टक्क्यांवर आणावा, जेणेकरून रात्रीच्यावेळी पाऊस झाल्यास नदीपात्रात अधिक विसर्ग करावा लागणार नाही. महापालिकेने ध्वनिक्षेपक आणि समाज माध्यमाद्वारे नागरिकांना खबरदारी घेण्याच्या सूचना द्याव्यात, त्यांना वेळोवेळी पुरपरिस्थितीची माहिती द्यावी.

नदीकाठच्या सखल भागातील कुटुंबांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करून त्यांना आवश्यक सुविधा पुरवाव्यात. आपत्तीच्या परिस्तिथीत प्रशासनाच्या मदत व बचाव यंत्रणेने गतिमान पद्धतीने प्रतिसाद द्यावा. सर्व यंत्रणांनी परस्पर संपर्कात राहून समन्वयाने काम करावे, असे निर्देशही उपमुख्यमंत्री पवार यांनी दिले.

जिल्ह्यातील विविध धरणातील पाणीसाठा, धरणातून होणारा पाण्याचा विसर्ग, पावसाचे प्रमाण, हवामानाचा अंदाज, पूरग्रस्त भागातील नागरिकांचे स्थलांतर याविषयीदेखील श्री.पवार यांनी अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली.

जिल्हा प्रशासन सतर्क असून सर्व यंत्रणा क्षमतेने मदत आणि बचाव कार्यात कार्यरत आहेत. नागरिकांनी घाबरून न जाता आपत्ती व्यवस्थापनात प्रशासनाला सहकार्य करावे. हवामान विभागाने आजच्या दिवसासाठी अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. जिल्ह्यातील खडकवासला, पानशेत, वरसगाव, भाटघर, मुळशी अशा विविध धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत आहे.

नागरिकांनी नदीकाठच्या धोकादायक भागातून सुरक्षित स्थळी किंवा प्रशासनातर्फे तयार करण्यात आलेल्या तात्पुरत्या शिबिरात स्थलांतरित व्हावे. प्रशासन नागरिकांच्या मदतीसाठी आणि सुरक्षेसाठी कार्यरत असून नदीपात्रापासून दूर रहात प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही उपमुख्यमंत्री पवार यांनी केले आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्यांची एकता नगर परिसराला भेट
विभागीय आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार, पुणे महानगरपालिका आयुक्त डॉ.राजेंद्र भोसले, जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे यांनी एकता नगर परिसराला भेट दिली. तेथील मदत व बचावकार्य युद्धपातळीवर सुरू असून त्याचा आढावाही अधिकाऱ्यांनी घेतला. अधिकाऱ्यांनी नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि नागरिकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले.

दरम्यान भारतीय लष्कराची एक तुकडी मदतकार्यासाठी दाखल झाली आहे. या तुकडीत १०५ जवान आहेत. आवश्यकता असल्यास आणखी एक तुकडी राखीव म्हणून तयार ठेवण्यात आली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून बारामती येथील विकासकामांची पाहणी

बारामती, दि. ४: शहरातील तीन हत्ती चौक परिसरात प्रशासनाने आवश्यक उपाययोजना करुन वाहतूक कोंडी सोडवावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिले. नागरिकांनीही वाहतूक नियमांचे पालन करुन प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

श्री.पवार यांनी बारामती परिसरातील कन्हेरी वन विभाग, बिरोबा मंदीर परिसर, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ ग्रंथालय इमारत, उपजिल्हा कारागृह इमारत आणि श्रीमंत बाबुजी नाईक वाडा परिसरातील सुरू असलेल्या सार्वजनिक विकासकामांची पाहणी केली. यावेळी अपर पोलीस अधीक्षक संजय जाधव, उपवनसंरक्षक महादेव मोहिते, महावितरणचे मुख्य अभियंता अंकुश नाळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता बप्पा बहीर आदी उपस्थित होते

श्री. पवार म्हणाले, तीन हत्ती चौकात वाहतूक सोडवण्यासाठी नागरिकासाठी दिशादर्शक फलक लावावेत, चौकात पोलीस कर्मचाऱ्यांची नेमणूक करावी, वाहतुकीला अडथळे निर्माण करणाऱ्या बाबी त्वरित हलविण्यात याव्या, परिसरात अतिक्रमण होणार नाही याबाबत प्रशासनाने दक्षता घ्यावी.

बारामती परिसरातील सुरू असलेली विविध सार्वजनिक विकासकामे कामे दर्जेदार पद्धतीची व गतीने पूर्ण करावीत; यापूर्वी पूर्ण झालेल्या शासकीय इमारती स्वच्छ राहतील व परिसरात अतिक्रमण होणार नाही, याबाबत दक्षता घ्यावी.

कन्हेरी वनविभागात हवामानारुप वाढणाऱ्या व सावली देणाऱ्या प्रजातींचे वृक्षारोपण करा आणि ती झाडे जगली पाहिजेत, याबाबत दक्षता घ्यावी.  तलावातील पाणी व परिसर स्वच्छ राहील, याची दक्षता घ्यावी. लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांना चढ-उतार करण्यासाठी सोईस्कर पायऱ्या व बैठक व्यवस्था करावी.

काटेवाडी येथील बिरोबा मंदिराच्या भिंतीबाहेर तिन्ही बाजूस नागरिकांना बसण्यासाठी ओटा करावा. वयोवृद्ध नागरिक आणि लहान मुलांना ओट्यावर चढ-उतार करण्यासाठी पायऱ्या कराव्यात. बाजरी घडई असणाऱ्या फरश्या बसवाव्यात.परिसरात दोन लाख लिटर पाण्याची टाकी बांधावी. यात्रेदरम्यान येणाऱ्या नागरिकांची संख्या लक्षात शौचालये आणि वाहनतळ उभारावे. परिसरात पाण्याचा व्यवस्थितपणे निचरा होईल, आदी बाबींचा विचार करून आराखडा तयार करा.

प्राचीन आणि आधुनिकतेचा संगम साधत श्रीमंत बाबुजी नाईक वाडा परिसर विकसित करा; कामे  करतांना वाड्याचे मूळ रूप जतन झाले पाहिजे. वास्तू पूर्ण झाल्यानंतर स्वातंत्र्यपूर्व काळाची अनुभूती आली पाहिजे. खोलीत स्वच्छ सूर्यप्रकाश राहील तसेच नागरिकांच्या स्पष्ट दिसेल असे विजेचे दिवे लावावेत. दिवे लावतांना नागरिकांच्या सुरक्षितेतचाही विचार करावा. भिंती, फरश्यामधील फटी राहता कामा नये. परिसरात अधिकाधिक वृक्षारोपण करावे.

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाअंतर्गत ग्रंथालयाच्या इमारतीच्या सभोवतालची संरक्षण भिंत १० फूट उंच बांधावी. उपजिल्हा कारागृहाच्या इमारतीची उंची परिसरात असलेल्या रोडपेक्षा तीन फुट उंच ठेवावी जेणेकरुन भविष्यात परिसरात होणाऱ्या इमारतीमुळे कारागृह इमारतीच्या उंचीवर परिणाम होणार नाही. या सार्वजनिक कामांसाठी अत्याधुनिक दर्जाच्या साहित्याचा वापर करावा. विकास कामांसाठी निधीची कमतरता भासू देणार नाही, अशा ग्वाही उपमुख्यमंत्री श्री.पवार यांनी दिली.

यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अमोल पवार , जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता दिगंबर डुबल, तहसीलदार गणेश शिंदे,  गट विकास अधिकारी अनिल बागल, मुख्याधिकारी महेश रोकडे, वन परिक्षेत्र अधिकारी शुभांगी लोणकर, बारामती सहकारी बँकचे अध्यक्ष सचिन सातव, नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष, बाळासाहेब जाधव आदी उपस्थित होते.

पाहणी दौऱ्यानंतर येथे उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या हस्ते नगर परिषदेच्या अग्निशमन दलाकरीता हायप्रेशर वॉटर मिस्ट असलेल्या चार अग्निशमन बुलेट दुचाकी वाहनांचे सहयोग सोसायटी येथे लोकार्पण करण्यात आले. सदरची वाहने मदत व पुनर्वसन विभागाकडून प्राप्त झाली आहेत.

000

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील प्रशासनाला सतर्क राहण्याच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचना

  • एनडीआरएफ, एसडीआरएफ, सेनादलाची मदत घेण्यात यावी

  • बाधित लोकांसाठी निवारास्थाने, कपडे, जेवण इत्यादी सर्व व्यवस्था करण्यात यावी

मुंबई, दि. 4 : भारतीय हवामान खात्याने पुणे आणि जिल्हा परिसरात अतिवृष्टीचा इशारा दिला असून आज जोराचा पाऊस होत आहे. या पार्श्वभूमीवर संपूर्ण प्रशासनाने सज्ज राहावे. नदी आणि धरण परिसरातील संभाव्य धोकादायक क्षेत्रातील नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात यावे. आवश्यकता वाटल्यास एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि सेनादलाची मदत घेण्यात यावी. लोकांचे स्थलांतर केल्यास त्यांच्यासाठी निवारा, कपडे, जेवण, औषधे, आरोग्य सुविधा इत्यादी सर्व व्यवस्था करण्यात यावी, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुणे महापालिका आयुक्त आणि पुणे जिल्हाधिकारी यांना दूरध्वनीद्वारे दिल्या आहेत.

पुणे परिसरातील खडकवासला, मुळशी, पवना इत्यादी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर या धरण आणि नदी परिसरातील पूररेषेच्या आतील आणि संभाव्य धोका क्षेत्रातील नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात यावे. या विसर्गामुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील बाधित होऊ शकणाऱ्या एकतानगर, दत्तवाडी, पाटील इस्टेट, येरवडा परिसर, शिवाजी नगर कोर्ट परिसर, कामगार पुतळा, हॅरीस ब्रीज, दापोडी, जुनी सांगवी, कासारवाडी, पिंपरी कॅम्प, रावेत, बालेवाडी गावठाण, ज्युपीटर हॉस्पिटल परिसर, कपिल मल्हार परिसर, बाणेर, बावधन, संगमवाडी इत्यादी सखल भागातील लोकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना करण्यात याव्यात, अशा सूचना मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिल्या आहेत.

संपूर्ण प्रशासनाने या काळात अलर्ट राहावे. लोकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करणे, निवारा केंद्रांमध्ये त्यांच्यासाठी सर्व सुविधांची उपलब्धता करून देणे यासाठी सर्व प्रशासनाने समन्वयाने काम करावे. हवामान खात्याकडून येणाऱ्या विविध सूचनांची दखल घेऊन त्याची लोकांना त्वरित माहिती देण्यात यावी. सर्वांनी सतर्क राहून लोकांना कोणत्याही प्रकारच्या अडचणी निर्माण होणार नाहीत याची दक्षता घ्यावी, अशा सूचना मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिल्या आहेत.

000

नागपूर येथे म्हाळगीनगर चौक व मानेवाडा चौक उड्डाणपूल बांधकामाचे भूमिपूजन

नागपूर, दि. 3- मानेवाडा चौक, म्हाळगीनगर येथील उड्डाणपुलामुळे नागरिकांना मोठी सुविधा होणार आहे. उड्डाणपुलामुळे रिंगरोड आता अधिक परिपूर्ण होईल. नागरिकांची वाहतूक कोंडीतून सुटका होईल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते  म्हाळगीनगर चौक व मानेवाडा चौक उड्डाणपूल बांधकामाच्या भूमिपूजन समारंभाचे उदयनगर चौक, रिंगरोड  येथे आयोजन करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते.

गत दहा वर्षात केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी नागपूर महानगरात चांगले रस्ते, उड्डाणपूल निर्मितीतून जागतिक पातळीवरचा बहुमान नागपूरला दिला. चांगल्या रस्त्यांबरोबरच आरोग्य सुविधांवरही लक्ष देण्यात आले आहे. नागपुरातील सामान्य जनतेच्या आरोग्यासाठी सुमारे ६०० कोटी रुपये निधी आपण दिला आहे. यातून वैद्यकीय महाविद्यालयात अत्याधुनिक सुविधा आपण नव्याने उपलब्ध करून देत असल्याचे उपमुख्यमंत्री म्हणाले.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, गेल्या अनेक काळापासून या  भागात वाहतुकीची समस्या होती. उड्डाणपुलामुळे वाहतुकीची ही समस्या सुटेल. अनेक वर्षापासून या भागातील नागरिकांची उड्डाणपुलाची मागणी होती. आता उड्डाणपूलाचे भूमिपूजन झाल्यावर लवकरच हा उड्डाणपूल पूर्णत्वास येणार आहे.  या भागातील दळणवळणाची सुविधा या माध्यमातून सुकर होणार असल्याचे केंद्रीय मंत्री श्री. गडकरी यावेळी म्हणाले.

कार्यक्रमाला आमदार मोहन मते यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

नागपुरात जागतिक दर्जाचे क्रीडा विद्यापीठ साकारु – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर दि. 3 – नागपूरच्या क्रीडा क्षेत्राला चालना मिळावी, आंतरराष्ट्रीय पातळीवरचे खेळाडू विदर्भातून घडावेत यासाठी जागतिक दर्जाच्या क्रीडासुविधा खेळाडूंना मिळाल्या पाहिजेत. यासाठी 684 कोटी रुपये निधी आपण उपलब्ध करून दिला असून नागपुरात जागतिक दर्जाचे क्रीडा विद्यापीठ आपण लवकर साकारू असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले.

मानकापूर परिसरातील क्रीडा केंद्राच्या बांधकामाचे भूमिपूजन व कोनशीला अनावरण आज उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी होते.

यावेळी खासदार श्यामकुमार बर्वे, आ. टेकचंद सावरकर, मनपा आयुक्त अभिजित चौधरी ,  जिल्हाधिकारी  विपीन इटनकर,  क्रीडा उपसंचालक शेखर पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी पल्लवी धात्रक व मान्यवर उपस्थित होते.

 

बालेवाडीसारख्या क्रीडा सुविधा व प्रशिक्षण नागपुरात मिळव्यात यासाठी आम्ही प्रयत्नशील होतो. आता या क्रीडा केंद्राच्या माध्यमातून अत्याधुनिक क्रीडासुविधा व प्रशिक्षण आपल्याला देता येईल. विदर्भातील खेळाडूंना त्यांच्या आवडत्या खेळामध्ये रुची वाढावी, त्यांच्या मनातील आधुनिक दालने इथे व्हावीत अशी आमची भूमिका आहे.  करायचे तर वर्डक्लास हवे हा आम्ही  आग्रह ठेवला असून सर्व प्रकारच्या सुविधा व प्रशिक्षण आम्ही या नवीन क्रीडा केंद्राच्या माध्यमातून देऊ असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

आधुनिक स्पोर्ट्स सुविधेसाठी नवा आयाम केंद्रीय मंत्री गडकरी यांनी दिला. नागपूरचे, विदर्भातील घडणारे खेळाडू आपल्या देशाचे नाव पुढे नेण्याची जबाबदारी समर्थपणे पार पाडतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, स्वप्नवत वाटेल असे हे केंद्र असणार असून नगपुरसाठी ऐतिहासिक दिवस आहे. खेळातून व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व घडते, तसा विकास होतो असे ते म्हणाले.

या संपूर्ण क्रीडा केंद्राची जागा लक्षात घेता मोठ्या प्रमाणात रूफटॉपवर सौर पॅनलद्वारे ऊर्जा निर्मिती याठिकाणी आपल्याला करता येईल.  शिवाय परिसरात झाडांच्या लागवडीतून हा परिसर अधिक निसर्गपूरक  आपल्याला करता येईल असे त्यांनी सांगितले.

या क्रीडा संकुलात इतर सुविधांसोबतच ४५० बेडेड (मुला-मुलींसाठी) होस्टेल सुविधा, अद्ययावत जिमनॅशियम सुविधा, प्रशासकीय इमारत, संकुलात येणाऱ्या खेळाडू व नागरिकांसाठी अल्पोपहार व भोजन व्यवस्थेसाठी कॅफेटेरीया सुविधा, सर्व सुविधांसाठी आऊटडोअर व इनडोअर लाईटिंग सिस्टिम, सर्व क्रीडा सुविधांसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा साहित्य, रेनवॉटर हारवेस्टिंग, ग्रीन बिल्डींग रिक्वारमेंट फॅसिलीटी, सिवेज ट्रीटमेंट प्लान, लॅन्डस्केपींग इत्यादी सुविधा निर्माण करून देण्यात येत आहेत. या माध्यमातून आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडविणे, नवोदित खेळाडू व पालकांना क्रीडा क्षेत्राबाबत समुपदेशन व मार्गदर्शन सुविधा, क्रीडापटू घडवण्यासोबतच क्रीडा क्षेत्रातील विविध करिअरच्या संधी व सुविधा उपलब्ध होतील. पुढील 3 वर्षात  हे केंद्र खेळाडूंसाठी उपलब्ध करुन देण्याचा मानस आहे.

जिल्हा वार्षिक योजना सन २०२४-२५ च्या ८५७ कोटी मंजूर निधीच्या कामांचे प्रस्ताव शासकीय यंत्रणांनी तात्काळ द्यावेत

सर्व लोकप्रतिनिधी व समिती सदस्यांनी विकासात्मक कामासाठी 10 ऑगस्ट 2024 पर्यंत प्रस्ताव समितीकडे सादर करावेत

सोलापूर, दि. 3(जिमाका):- जिल्हा नियोजन समिती अंतर्गत जिल्हा वार्षिक योजना सन 2024-25 मध्ये सर्वसाधारण 702 कोटी, अनुचित जाती उपयोजना 151 कोटी व आदिवासी उपयोजनासाठी  4 कोटी 28 लाख असे एकूण 857 कोटी 28 लाख निधी मंजूर आहे. तरी सर्व शासकीय यंत्रणांनी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत निविदा प्रक्रिया राबवून जास्तीत जास्त विकास कामांचे कार्यारंभ आदेश दिले गेले पाहिजेत, असे निर्देश उच्च व तंत्र शिक्षणमंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले.

नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्री श्री. पाटील बोलत होते. यावेळी खासदार सर्वश्री ओमप्रकाश राजे निंबाळकर, धैर्यशील मोहिते पाटील, प्रणिती शिंदे, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, महापालिका आयुक्त शितल उगले- तेली, मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे, सोलापूर शहर पोलीस आयुक्त एम. राजकुमार, पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकूर, उपायुक्त नियोजन संजय कोलगणे, निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार, जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार, सहायक नियोजन अधिकारी पुंडलिक गोडसे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

पालकमंत्री श्री पाटील म्हणाले की,  जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी व नियोजन समिती सदस्यांनी मंजूर निधी अंतर्गत विविध विकासात्मक कामाचे प्रस्ताव दिनांक 10 ऑगस्ट 2024 पर्यंत प्रशासकीय यंत्रणांकडे सादर करावेत. महाराष्ट्र विधानसभा आचारसंहिता 15 ते 20 सप्टेंबर 2024 दरम्यान लागण्याची शक्यता आहे. तरी सर्व शासकीय यंत्रणांनी जास्तीत जास्त कामांची निविदा प्रक्रिया पूर्ण करून 31 ऑगस्ट 2024 पर्यंत त्या कामांचे कार्यारंभ आदेश देण्याची कार्यवाही अत्यंत गतीने करावी, असेही त्यांनी सूचित केले.

जिल्हा वार्षिक योजना सन 2024- 25 अंतर्गत कृषी व संलग्न सेवा 51 कोटी, ग्राम विकास 61 कोटी, नागरी क्षेत्राचा विकास 125 कोटी, पाटबंधारे व  पुर नियंत्रण 63 कोटी, ऊर्जा विकास 56 कोटी 40 लाख, रस्ते विकास 76 कोटी, सामान्य शिक्षण 42 कोटी, आरोग्य क्षेत्र 62.65 कोटी, तीर्थक्षेत्र, पर्यटन, गड किल्ले 43.75 कोटी, महिला बाल विकास 20.86 कोटी व्यायामशळा व क्रीडांगण विकास 7 कोटी अशा महत्त्वाच्या क्षेत्रासाठी निधीची तरतूद करण्यात आलेली असल्याची माहिती पालकमंत्री श्री पाटील यांनी दिली. तसेच केंद्र सरकारच्या आकांक्षीत तालुका कार्यक्रमास सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट सांगोला हे दोन आकांक्षीत तालुक्याचा समावेश करण्यात आला आहे  यासाठी दहा कोटीचा निधी ठेवण्यात आलेला आहे. तसेच ज्या यंत्रणांनी अद्याप सन 2023- 24 मधील मंजूर कामासाठी आवश्यक दायित्वाच्या निधीची मागणी केली नाही ती मागणी लवकरात लवकर करावी. तसेच प्रशासकीय मान्यतेसाठी आवश्यक कार्यवाही केलेली नाहीत त्यांनी ती तातडीने पूर्ण करणे गरजेचे असल्याचे त्यांनी निर्देशित केले.

सोलापूर महानगरपालिका अंतर्गत रमाई घरकुल योजना व प्रधानमंत्री आवास योजनांची संबंधित अधिकाऱ्यांनी आतापर्यंत मंजुरी दिलेली प्रकरणे, प्रत्यक्ष पूर्ण झालेली घरकुलांची संख्या, अपूर्ण घरकुलांची संख्या व त्याची कारणे आदी बाबीची सविस्तर माहिती पुढील आठ दिवसात सादर करण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले. महापालिकेने रमाई घरकुल योजनेअंतर्गत 2700 घरांची कामे पूर्ण केलेली आहेत परंतु अपूर्ण घरकुलांची संख्याही खूप मोठ्या प्रमाणावर दिसून येत असल्याने महापालिकेने यामध्ये अत्यंत गतीने काम करून संबंधित लाभार्थ्यांची घरकुल पूर्ण करण्याची कारवाई केली पाहिजे असे त्यांनी सूचित केले.

महापालिकेच्या दुहेरी पाईपलाईन तसेच उड्डाणपुलेच्या कामकाजाचाही पालकमंत्री पाटील यांनी आढावा घेऊन याबाबत स्वतंत्र बैठका घेऊन ही कामे मार्गी लावण्याची कारवाई करण्यात येईल असे सांगितले. वीज वितरण कंपनीने त्यांच्याकडील विविध कामाच्या अनुषंगाने पुढील आठवड्यात स्वतंत्र बैठक घेण्याची सूचना केली. अनगर येथे मंजूर झालेले अप्पर तहसील कार्यालयाच्या अनुषंगाने मुख्यमंत्री महोदयांची संबंधित सदस्य सोबत भेट घेऊ असे त्यांनी सांगितले. जिल्हा परिषदेने त्यांच्याकडील विविध विकासात्मक कामाच्या मंजूर निधीतून आवश्यक कामे त्वरित प्रस्तावित करावीत असे निर्देश त्यांनी यावेळी दिले. कृषी सेवा केंद्रातून औषध घेऊन फवारणी केल्याने पिकांची नुकसान भरपाई  पिकांचे नुकसान झालेले आहे अशा कृषी सेवा केंद्राची तपासणी करावी तसेच पिकांचा तपासणी अहवाल मागून घ्यावा असं संबंधित कृषी सेवा केंद्र सील करण्याचे निर्देश पालकमंत्री पाटील यांनी कृषी विभागाला दिले.

प्रारंभी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीतील विषयाची माहिती सादर केली. जिल्हा परिषद योजना सन 2023- 24 चा माहे मार्च 2024 अखेर सर्वसाधारण योजना 590 कोटी अनुसूचित जाती उपायोजना 150.98 कोटी आदिवासी क्षेत्राबाहेरील उपयोजना 3.77 कोटी असा एकूण मंजूर निधीच्या 745.28 कोटीच्या अंतर्गत 744.75 कोटी खर्च झाल्याची माहिती देऊन खर्चाची टक्केवारी 99.99% इतके असल्याचे त्यांनी सांगितले. पीएम किसान सन्मान योजनेचा सतरावा हप्ता जमा करण्यात आलेला असून जिल्ह्यातील 4 लाख 85 हजर  585 शेतकऱ्यांना थेट त्यांच्या बँक खात्यावर 96 कोटी जमा करण्यात आलेले आहेत. तसेच आधार सीडिंग नसणे व अन्य कारणामुळे ज्या शेतकऱ्यांचे पैसे जमा झालेले नाही त्यांच्यासाठी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली.

सोलापूर महापालिकेच्या रामवाडी येथील आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी पोस्टाच्या अनुपस्थिती बबत माहिती घेऊन संबंधितावर कारवाई करण्यात येईल अशी माहिती महापालिका आयुक्त शितल तेली उगले यांनी दिली. तसेच सोलापूर शहरातील नागरिकांना पाणीपुरवठा करण्यासाठी दुहेरी पाईपलाईनचे 110 किलोमीटर पैकी 97 किलोमीटरचे पाईपलाईन टाकण्याचे काम पूर्ण झालेले असून जॅकवेलचे 73 टक्के काम पूर्ण झालेले आहे तर पंपाचे काम ही पूर्ण झाल्याचे माहिती श्रीमती उगले यांनी देऊन तीस नोव्हेंबर 2024 पर्यंत दुहेरी पाईपलाईनचे काम पूर्ण होईल. तसेच शहरातील उड्डाण पुलाच्या कामाच्या अनुषंगाने भूसंपादनाच्या प्रक्रियेमुळे वेळ लागत असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी उपस्थित लोकप्रतिनिधी व अशासकीय सदस्यांनी पुढील प्रश्न, सूचना मांडल्या व विकासासाठी निधी देण्याची मागणी केली…

सोलापूर महापालिका अंतर्गत रमाई व प्रधानमंत्री आवास योजनेचे कामे त्वरित पूर्ण व्हावीत, रामवाडी येथील प्रस्तुती गृहासाठी वैद्यकीय स्टाफ मिळावा, अनगर येथील अप्पर तहसील कार्यालय कार्यवाही बंद करावी, दुहेरी पाईपलाईनचे काम, शहरातील उड्डाणपुलाचे काम, वीज वितरण कंपनीने रोहित्र उपलब्ध करणे व शेती पंप अनुषंगिक कामे, भीमा नदीतून वाहून जाणारे पाणी अडवणे, उजनी धरण जवळपास शंभर टक्के भरलेले आहे खालील भागाला पाणी सोडणे, पी एम किसान योजनेचे पैसे जमा करणे, अतिवृष्टी व टंचाईचे अनुदान शेतकऱ्यांना देणे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठात पुण्यश्लोक अहिल्यादेवी चे भव्य स्मारक बांधकाम गतीने पूर्ण करण्याबाबत लक्ष देणे या व अन्य विकासात्मक मागण्या सदस्यांनी केल्या व त्यासाठी आवश्यक असलेला निधी उपलब्ध करून द्यावा असे सांगितले.

यावेळी आमदार सर्वश्री रणजितसिंह मोहिते पाटील, बबनदादा शिंदे, विजयकुमार देशमुख, सुभाष देशमुख, राजेंद्र राऊत, समाधान आवताडे, सचिन कल्याणशेट्टी, संजय शिंदे, यशवंत माने यांच्यासह माजी आमदार प्रशांत परिचारक, दीपक साळुंखे आदी तसेच नियोजन समितीचे अशासकीय सदस्य उपस्थित होते.

प्रारंभी जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार यांनी नियोजन समितीचे अध्यक्ष तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील सर्व लोकप्रतिनिधी व सर्व समिती सदस्यांचे स्वागत केले. नियोजन समितीच्या बैठकीतील विविध विषयांची माहिती त्यांनी सादर केली.

 

दिग्रस येथील कब्रस्तान विस्तारीकरणाची कारवाई तातडीने करा – पालकमंत्री संजय राठोड

यवतमाळ, दि.3  (जिमाका) : दिग्रस येथी कब्रस्तान फार जुने आहे. तेथील जागा अपुरी पडत असल्याने विस्तार करणे आवश्यक आहे. त्यामुळे विस्तारीकरणासाठी संपादित केल्या जात असलेल्या जागेचे हस्तांतरण तातडीने करा, अशा सूचना पालकमंत्री संजय राठोड यांनी केल्या.

दिग्रस येथील विविध विषयांचा श्री.राठोड यांनी महसूल भवन येथे आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया, मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की, जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.पवन बन्सोड, सहाय्यक जिल्हाधिकारी लघिमा तिवारी, महसूल उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोदवड, दिग्रसचे उपविभागीय अधिकारी आशिष बिजवल, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुखदेव राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.प्रल्हाद चव्हाण, दिग्रस तहसिलदार, मुख्याधिकारी, दिग्रस येथील मुस्लीम समाजाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

कब्रस्तानसाठी जागा अपुरी पडत असल्याने अडचणी येतात. त्यामुळे विस्तार करणे आवश्यक आहे. यासाठी 133 आर जमीन संपादीत केली जात आहे. जमीन संपादनाची कारवाई तातडीने केल्या जावी, अशा सूचना पालकमंत्र्यांनी केल्या. दिग्रस येथे नवीन स्मशानभूमीजवळ ईदगाहसाठी जमीन उपलब्ध करून देण्याबाबत देखील यावेळी चर्चा झाली.

दिग्रस येथे जुन्या पोलिस स्टेशनच्या जागेवर अभ्यासिका बांधण्याबाबत पालकमंत्र्यांनी सूचना केल्या. सदर जागा पोलिस विभागाची असल्याने पोलिस विभागाने पोलिस कल्याण निधी, लोकसहभाग किंवा जिल्हा वार्षिक योजनेतून अभ्यासिका बांधण्याबाबत पुढाकार घ्यावा, असे सूचविले. हज यात्रेस मोठ्या प्रमाणावर मुस्लिम बांधव जातात. त्यापूर्वी करावे लागणारे लसीकरण दिग्रससह जिल्ह्यातील सर्व ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालयात उपलब्ध करून देण्यात यावे, असे निर्देश आरोग्य विभागास दिले.

दिग्रस येथील नगर परिषद उर्दू शाळा क्रमांक तीनच्या विद्यार्थ्यांना बायपास रोड क्रॅास करून जावे लागते. त्यामुळे तेथे तातडीने पर्यायी मार्ग निर्माण करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांना केल्या. अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी पोलिस भरतीपूर्व प्रशिक्षण सुरू करण्याबाबत आवश्यक कारवाई करण्याचे निर्देश दिले. हिबा नामानुसार खरेदी विक्रीचे व्यवहार तहसील व भूमि अभिलेख कार्यालयात करण्यात यावे, अशी मागणी असल्याने त्याबाबत तपासणी करावी तसेच चॅाद नगर येथील लीज पट्टेवाटपाबाबत आवश्यक सूचना केल्या.

दिग्रस शहरातील अल्पसंख्याक घरकुलांचा देखील पालकमंत्र्यांनी आढावा घेतला. शहरात 716 घरकुले मंजूर आहे. त्यापैकी 294 घरकुले पुर्ण झाले असून 108 घरांचे बांधकाम सुरु आहे. काही घरांच्या बाबतीत कागदपत्रांची पुर्तता केली जात असल्याचे यावेळी सांगण्यात आले. दिग्रस येथील सर्वात जास्त विद्यार्थी संख्या असलेल्या दोन उर्दू शाळा मॅाडेल बनविण्याच्या सूचना केल्या. या शाळांना संगणकांसह सर्व आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.

ज्येष्ठ नागरिकांनी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेचा लाभ घ्यावा – पालकमंत्री संजय राठोड

यवतमाळ, दि.3  (जिमाका) :  राज्यातील 60 वर्ष व त्यावरील सर्वधर्मीय ज्येष्ठ नागरिकांना राज्य व राज्याबाहेरील तीर्थस्थळांना भेटी देऊन दर्शन घेता यावे, यासाठी शासनाने नुकतेच मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना सुरु केली आहे. जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा. जास्तीत जास्त नागरिकांना योजनेचा लाभ कसा मिळेल, यासाठी प्रयत्न करावे, असे निर्देश पालकमंत्री संजय राठोड यांनी दिले.

महसूल भवन येथे पालकमंत्र्यांनी योजनेच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीला जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया, मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की, जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.पवन बन्सोड, सहाय्यक जिल्हाधिकारी लघिमा तिवारी, समाजकल्याणचे सहाय्यक आयुक्त भाऊराव चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुखदेव राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.प्रल्हाद चव्हाण यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

शासनाने ही योजना जाहीर करताना तीर्थ स्थळांची यादी जाहीर केली आहे. त्यात देशभरातील 73 तर राज्यातील 66 स्थळांचा समावेश आहे. यात जिल्हा व परिसरातील काही स्थळे सुटलेली आहे. या स्थळांच्या समावेशासाठी शासनास प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी केल्या. या योजनेसाठी शासन स्वतंत्र पोर्टल तयार करत आहे. त्यावर ज्येष्ठ नागरिकांना ऑनलाईन नोंदणी करता येतील. जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांना या योजनेचा लाभ दिल्या गेला पाहिजे, असे पालकमंत्री म्हणाले.

योजनेंतर्गत जेष्ठांना राज्य व देशातील तीर्थ स्थळ यात्रा मोफत करता येणार आहे. यासाठी प्रति लाभार्थी 30 हजार इतका खर्च शासन करणार आहे. त्यात प्रवास, निवास व भोजनाचा देखील समावेश आहे. शासन नियुक्त संस्थेद्वारे लाभार्थ्यांना ही यात्रा घडविण्यात येणार आहे. यासाठी लाभार्थी व्यक्ती 60 किंवा अधिक वर्ष वयाची असणे आवश्यक आहे. लाभार्थी राज्यातील रहिवासी असावा व कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2 लाख 50 हजाराच्या आत असावे.

योजनेचा लाभ घेण्यासाठी आधारकार्ड किंवा रेशनकार्ड, अधिवास किंवा जन्म दाखला, अधिवास उपलब्ध नसल्यास लाभार्थ्यांचे 15 वर्षापुर्वीचे रेशनकार्ड, मतदार ओळखपत्र, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, जन्म दाखला यापैकी कोणतेही ओळखपत्र, प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येतील. उत्पन्नाचा दाखला किंवा पिवळे, केशरी रेशनकार्ड, वैद्यकीय प्रमाणपत्र, पासपोर्ट फोटो, अटी व शर्तीचे पालन करणार असल्याबाबतचे हमीपत्र अर्जासोबत सादर करणे आवश्यक आहे.

जेष्ठ नागरिक स्वत: ऑनलाईन अर्ज करू शकतील. ऑनलाईन अर्ज भरता येत नसल्यास अर्ज भरण्याची सुविधा सेतू केंद्रात उपलब्ध होईल. अर्ज भरण्याची प्रक्रिया संपुर्णपणे विनामूल्य आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त ज्येष्ठ नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री संजय राठोड यांनी केले आहे. सुरुवातीस समाजकल्याणचे सहाय्यक आयुक्त भाऊराव चव्हाण यांनी योजनेची माहिती दिली.

नवनियुक्त तलाठ्यांनी लोकाभिमुख व पारदर्शकपणे काम करावे  – महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

अहमदनगर दि. 3 ऑगस्ट (जिमाका) :- महसूल विभाग हा सर्वात मोठा विभाग असून या विभागात तलाठी हा महत्त्वाचा घटक आहे. या विभागाचा सर्व ठिकाणी संबंध आहे. त्यामुळे नियुक्ती देण्यात आलेल्या नवनियुक्त तलाठ्यांनी विभागात लोकाभिमुख व पारदर्शकपणे काम करावे. असे प्रतिपादन राज्याचे महसूल, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. जिल्हा सहकारी बँकेच्या सहकार भवन सभागृहात महसूल पंधरवड्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

महसूल पंधरवड्यानिमित्त जिल्ह्यात 189 नवनियुक्त तलाठी यांना आज महसूलमंत्री श्री. विखे पाटील यांच्या हस्ते नियुक्ती आदेश देण्यात आले. या कार्यक्रमाला जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले, पद्मश्री पोपटराव पवार, जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी, शिर्डीचे अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, विविध संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.

महसूल मंत्री श्री. विखे पाटील पुढे म्हणाले, नवनियुक्त तलाठ्यांनी महसूल विभागात काम करताना शासनाची प्रतिमा उंचावेल असे काम करावे. जनतेचा विश्वास सार्थ ठरवावा. जनतेला तात्काळ व विनाविलंब सेवा उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने त्यांनी काम करावे. असे त्यांनी सांगितले.

आमचे शासन गतिमान शासन असून सर्वसामान्यांचे आहे. लोकांना महसूल विभागाच्या सर्व सेवा ऑनलाईन मिळाल्या पाहिजे यासाठी आमचा प्रयत्न आहे. महसूल विभागात जमिनीच्या मोजण्या रोअर मशीन प्रणालीमुळे जलद गतीने होत आहेत. मोजणीनंतर ऑनलाईन पध्दतीने नागरीकांना उतारा उपलब्ध होत आहे. यामुळे मानवी हस्तक्षेप कमी झाला असून जनतेला तात्काळ सेवा उपलब्ध झाली आहे. या डिजिटल युगात नागरिकांना ऑनलाईन पद्धतीने सुलभ सेवा मिळावी या उद्देशाने महसूल विभाग काम करत आहे. जिल्ह्यातील महाविद्यालयात सेतू केंद्राच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सर्व दाखले उपलब्ध होण्याच्या दृष्टीने आमचा प्रयत्न आहे.

मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजना जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्यात येत असून आतापर्यंत 7 लाख अर्जांची ऑनलाईन नोंदणी झाली असून जवळपास 1 लाख 50 हजार अर्ज मंजूर झाले आहेत. शासनाच्या मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना, मुलींना मोफत शिक्षण योजना आदी योजनांचा लाभ जास्तीत-जास्त नागरीकांनी घ्यावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

कार्यक्रमात जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले म्हणाले, महसूल पंधरवड्यानिमित्त जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे विविध कामे जलद गतीने होतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. मुख्यमंत्री – माझी लाडकी बहिण योजनेचा लाभ गावपातळीपर्यंत पोहोचवावा यासाठी गावागावात शिबिरांचे आयोजन करावे. असे त्यांनी सांगितले. पद्मश्री पोपटराव पवार आपल्या मनोगतात म्हणाले, शासनाने राज्यात तलाठी भरतीचा चांगला निर्णय घेतला असून यामुळे नागरिकांची विविध कामे वेळेत पूर्ण होतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ यावेळी म्हणाले, महसूल विभागामार्फत जिल्ह्यात जीएम सेवा दूत या ऑनलाईन प्रणालीमार्फत विविध सेवा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. त्यांचा नागरिकांनी लाभ घ्यावा. तसेच जीएम जलदूत या ऑनलाईन प्रणालीतून टँकरद्वारे पाणीपुरवठा योजनेमध्ये टँकर मंजुरीपासून ते टँकरच्या शेवटच्या फेरीपर्यंत पारदर्शक पद्धतीने पाणीपुरवठ्याचे काम होणार आहे. यामुळे यातील गैरप्रकार बंद होतील. असे ते म्हणाले.

पालकमंत्री श्री. विखे पाटील यांच्या हस्ते, कार्यक्रमात प्रातिनिधीक स्वरुपात 5 नवनियुक्त तलाठ्यांना नियुक्त आदेश प्रदान करण्यात आले. तसेच त्यांच्या हस्ते जीएम सेवादूत व जीएम जलदूत या प्रणालीचे लोकार्पण व महसूल विभागाच्या विविध प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी महसूल पंधरवड्यानिमित्त आयोजित कार्यक्रमाची माहिती दिली. उर्वरित 184 नवनियुक्त तलाठ्यांना कार्यक्रमानंतर कार्यक्रमस्थळी नियुक्ती पत्राचे वाटप प्रशासनातर्फे करण्यात आले.

कार्यक्रमात ई-हक्क प्रणाली ई-रेकॉर्ड प्रणालीबाबत सादरीकरण करण्यात आले. कार्यक्रमाला जिल्ह्यातील नवनियुक्त तलाठी, त्यांचे कुटुंबीय, नागरिक उपस्थित होते. उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील यांनी आभार मानले.

पीएम किसान कार्ड, रेल्वेचे प्रलंबित प्रकल्प तात्काळ मिशन मोडवर पूर्ण करावेत – केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण मंत्री रक्षा खडसे

जळगाव दि. 3 ( जिमाका )  – जिल्ह्यात पीएम किसान कार्डचे 4 लाख 33 हजार 55 एवढे लाभार्थी असून उर्वरित कार्ड देण्यात ज्या तांत्रिक अडचणी आहेत त्या दूर कराव्यात. जिल्ह्यात रेल्वेकडून अनेक कामे अपूर्ण असून ती मिशन मोडवर पूर्ण करावीत असे निर्देश देऊन जिल्ह्यातील केंद्र सरकारच्या ज्या योजनांची कामे प्रलंबित आहेत, त्याची यादी आपल्याला द्यावी त्याचा पाठपुरावा आपण करणार असल्याचे केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी सांगितल्या.

जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित ‘दिशा ‘ (जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समिती ) च्या बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी खा. स्मिता वाघ, आ. सुरेश भोळे, आ. संजय सावकारे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अंकित, महानगरपालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे, ग्रामीण विकास प्रकल्पाचे संचालक आर. एस. लोखंडे यांच्यासह विविध विभागाचे प्रमुख उपस्थित होते.  रेल्वे विभागाकडून अमृत भारत स्टेशन योजना सुरु असून यात रावेर, सावदा, मलकापूर, चाळीसगाव, पाचोरा, जळगाव स्टेशन मध्ये विविध कामे सुरु आहेत, ते गुणवत्तापूर्ण व्हावीत यासाठी संबंधित विभागाच्या अधिकारी यांनी दक्षता घ्यावी तसेच जिथे रेल्वे लाईनच्या खालून रस्ते आहेत त्याची उंची वाढविण्यासाठी तसेच जे रेल्वे लाईन वरूनचे ब्रिज आहेत तेही पूर्ण करावेत. जिथे काही अडचणी असतील ते सांगाव्यात त्याचा पाठपुरावा करून प्रश्न सोडविला जाईल. हे प्रश्न लोकांच्या रोजच्या जगण्याशी संबंधित आहेत. त्यामुळे यावर तत्काळ कार्यवाही करावी असे निर्देश केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती खडसे यांनी दिले.

जळगाव विमानतळावरून सध्या मुंबई, पुणे, हैद्राबाद आणि गोवा येथे विमान सेवा सुरु असून आता पर्यंत 18, 865 एवढ्या प्रवाशांनी या सेवेचा लाभ घेतला आहे. या सेवेला उत्तम प्रतिसाद असून याच्या वेळेत बदल केला तर अजून चांगला प्रतिसाद मिळू शकतो. अहमदाबाद आणि बेंगलोरसाठी नवीन विमान सेवा सुरु करण्याचे प्रस्तावित असून यासाठी पाठपुरावा करणार असल्याची माहितीही केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती खडसे यांनी यावेळी दिली. जळगाव जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गा संदर्भात बऱ्याच गोष्टी प्रलंबित असल्याबाबत  खा. स्मिता वाघ, आ. सुरेश भोळे, आ. संजय सावकारे यांनी प्रश्न उपस्थित केले. याबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी  यांच्याशी चर्चा करून तात्काळ यातून मार्ग काढू अशी ग्वाही देऊन जिल्ह्यातील प्रलंबित सिंचन प्रकल्प, अटल भूजल योजना, एकात्मिक वीज वितरण क्षेत्र योजना, दीप नगर येथील नवा प्रकल्प याचा आढावा घेवून शेतकऱ्यांना सोलरवरून मुबलक वीज मिळावी म्हणून सुरु केलेली प्रधानमंत्री कुसुम योजनेला जिल्ह्यात उत्तम प्रतिसाद असून कामाचा वेग वाढविण्याच्या सूचना श्रीमती खडसे यांनी यावेळी दिल्या.

बीएसएनएलच्या टॉवर अपग्रेड करण्याचे काम सुरु असले तरी लोकांना गुणवत्तापूर्ण सेवा मिळते आहे का याबाबतची खात्री करावी, तांत्रिक अडचणी असतील तर वरिष्ठ स्तरापर्यंत सांगाव्यात आणि लोकांना उत्तम सेवा उपलब्ध करून द्यावी. पिक विम्याच्या संदर्भात फेरतपासणी करून शेतकऱ्यांना तात्काळ न्याय द्यावा अशा सूचना यावेळी  केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांनी केल्या. यावेळी खा. स्मिताताई वाघ, आ. सुरेश भोळे, आ. संजय सावकारे यांनी विविध प्रलंबित प्रश्न उपस्थित केले. अधिकाऱ्यांनी यात प्रामुख्याने लक्ष घालून सोडवावेत याबाबत आपण वेळोवेळी आढावा घेणार असल्याचे श्रीमती खडसे यांनी सांगितले.  जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सर्व 27 विभागाच्या कामाचे सादरीकरण केले. त्यात पूर्ण झालेले, प्रलंबित कामे याची सविस्तर माहिती दिली.

ताज्या बातम्या

राजधानीत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि संत महात्मा बसवेश्वर यांना अभिवादन

0
नवी दिल्ली ३०:  राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि संत महात्मा बसवेश्वर जयंतीदिनी महाराष्ट्र सदन आणि महाराष्ट्र परिचय केंद्रात अभिवादन  करण्यात आले. कोपर्निकस मार्गस्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहातील कार्यक्रमात...

स्वच्छतेसाठी प्रत्येकाचे योगदान महत्त्वाचे – मंत्री गुलाबराव पाटील

0
मुंबई, दि. ३०: राज्यातील ग्रामीण भागात वैयक्तिक स्वच्छतेसोबतच शाश्वत सार्वजनिक स्वच्छतेचे महत्त्व पटवून देणे तसेच गावात दृश्यमान शाश्वत स्वच्छता राखणे आवश्यक आहे. यासाठी ग्रामीण...

जिल्ह्यात वन पर्यटन विकसित करा – सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल

0
गडचिरोली, (जिमाका) दि.30: गडचिरोली जिल्हा वेगाने विकसित होत असताना येथील नैसर्गिक वैभव आणि पर्यटनाच्या संभावनांना चालना देण्यासाठी जिल्ह्यात वनपर्यटन विकसित करण्याचे निर्देश राज्याचे वित्त,...

खासगी आस्थापनांतील अंतर्गत तक्रार समितीची नोंद करण्यासाठी ‘शी बॉक्स पोर्टल’

0
मुंबई दि. ३०: कामाच्या ठिकाणी महिलांच्या लैंगिक छळास प्रतिबंध करण्यासाठी अंतर्गत तक्रार समिती स्थापन करणे अनिवार्य आहे. असे न केल्यास ५० हजार रूपये दंडात्मक...

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या अनुदान व बीज भांडवल योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

0
मुंबई, ‍‍दि. ३० : महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्यादित, जिल्हा कार्यालया मुंबई शहर/उपनगर कार्यालयामार्फत सन 2025-26 या वर्षासाठी 50 टक्के अनुदान योजना व...