सोमवार, मे 12, 2025
Home Blog Page 943

माजी प्रधानमंत्री इंदिरा गांधी, सरदार वल्लभभाई पटेल यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अभिवादन

मुंबई, दि. ३१ : माजी प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांच्या पुण्यस्मरणानिमित्त आणि माजी उपपंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

मंत्रालयात माजी प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्ताने ‘राष्ट्रीय संकल्प दिवस’ व माजी उपपंतप्रधान लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त ‘राष्ट्रीय एकता दिवस’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रीय एकता दिवस निमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राष्ट्राची एकता, अखंडता व सुरक्षा अबाधित राखण्यासाठी समर्पित भावनेने काम करण्याची शपथ उपस्थित अधिकारी आणि कर्मचारी यांना यावेळी दिली.

यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे -पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, अल्पसंख्याक विकास, पणन मंत्री अब्दुल सत्तार, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, कृषिमंत्री धनंजय मुंडे, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम) दादाजी भुसे, राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत, आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित, कामगार मंत्री सुरेश खाडे, अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड, रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे, क्रीडा व युवक कल्याण, बंदरे विकास मंत्री संजय बनसोडे, मुख्य सचिव मनोज सौनिक, अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक, मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव विकास खारगे, यांनीही इंदिरा गांधी व वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून वंदन केले. यावेळी मंत्रालयातील प्रधान सचिव, सचिव, वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

0000

महाराष्ट्राला देशातील सर्वात प्रगतशील व आकर्षक औद्योगिक राज्य बनविण्यात कामगारांचा सिंहाचा वाटा – राज्यपाल रमेश बैस

मुंबईदि. 30 :- कामगारांचे समर्पणत्याग आणि कठोर परिश्रमाने महाराष्ट्र हे देशातील सर्वात प्रगतीशील राज्य झाले आहे.

मुंबईला देशाची आर्थिक राजधानी करण्यात आणि देशातील सर्वात प्रगतिशील आणि आकर्षक औद्योगिक राज्य म्हणून महाराष्ट्राची प्रतिमा निर्माण करण्यात कष्टकरी कामगारांचा सिंहाचा वाटा आहेअसे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी कामगार कल्याण मंडळाच्या पुरस्कार वितरण सोहळ्यात केले.

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्यावतीने 35 व्या विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्काररावबहादूर मेघाजी लोखंडे  कामगार मित्र पुरस्कार आणि कामगार भूषण पुरस्कार वितरण सोहळा  हुतात्मा बाबू गेनूमुंबई गिरणी कामगार क्रीडा भवनात आयोजित करण्यात आला होता. राज्यपाल श्री. बैस यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात आलेत्यावेळी ते बोलत होते.

कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडेशालेय शिक्षणमंत्री तथा मुंबई जिल्ह्याचे पालकमंत्री  दीपक केसरकरआमदार ॲड. मनीषा कायंदेआमदार कालिदास कोळंबकरआमदार सदा सरवणकरकामगार विभागाच्या प्रधान सचिव विनिता वेद सिंगलकामगार आयुक्त सतीश देशमुखकामगार कल्याण आयुक्त रविराज इळवेजिल्हाधिकारी राजेन्द्र क्षीरसागर आदी उपस्थित होते.

राज्यपाल श्री. बैस यांच्या हस्ते रावबहादुर नारायण मेघाजी लोखंडे कामगार मित्र पुरस्कार भारतीय मजदूर संघाला प्रदान करण्यात आला, तर कामगार भूषण पुरस्कार टाटा मोटर्स लिमिटेडचे मोहन गोपाळ गायकवाड यांना प्रदान करण्यात आला.  सोबतच विविध क्षेत्रातील ५१ गुणवंत कामगारांना विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी श्रमकल्याण युगविशेष अंकाचे प्रकाशनही करण्यात आले. पुरस्कार प्राप्त पुरस्कारार्थींचे आणि त्यांच्या कुटुंबीयांचे राज्यपालांनी विशेष अभिनंदन केले.  कामगार कार्यकर्ते खऱ्या अर्थाने विश्वकर्मा आहेत. ते राज्याचे व देशाचे  निर्माते आहेत. संयुक्त महाराष्ट्राच्या उभारणीच्या चळवळीत कष्टकरी आघाडीवर होते.

कामगार कल्याणाच्या बाबतीत महाराष्ट्र नेहमीच अग्रेसर राहिला आहे. 1953 मध्ये कामगार कल्याण मंडळ तयार करणाऱ्या पहिल्या राज्यांपैकी महाराष्ट्र एक होते. आज महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळामध्ये ५६ लाखांहून अधिक कामगार नोंदणीकृत आहेत.

मंडळाचे क्रीडा संकुल‘ आणि जलतरण तलाव हे नियोक्तेकर्मचारी आणि राज्य सरकार यांच्या त्रिपक्षीय पद्धतीने कल्याण मंडळाने उभारलेल्या निधीतून चालवले जातात. रायफल शूटिंग आणि नेमबाजीबॅडमिन्टन आदी खेळांसाठी मंडळाकडून सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. कामगार साहित्य संमेलन मंडळाने आयोजित केले आहे ते निश्चितच कौतुकास्पद आहे. एक प्रकारे कामगार कल्याण मंडळाने देशाला अव्वल खेळाडू, नाट्यकर्मी दिले आहेत. महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाने राज्यभरातील  पायाभूत सुविधांमध्ये आणखी सुधारणा करण्याच्या कामात कॉर्पोरेट्स आणि उद्योगांना सहभागी करून घ्यावे, असेही त्यांनी सांगितले.     

आगामी काळात कौशल्याशिवाय नोकऱ्या मिळणार नाहीत. आज औद्योगिक आस्थापनांच्या कामगार गरजा बदलत आहेत. नवीन क्षेत्रात अनेक नोकऱ्या निर्माण होत आहेत. उद्योग आणि उद्योजकांना मल्टीटास्कर असलेल्या कामगारांची आवश्यकता असेल.

तंत्रज्ञानात पारंगत असलेल्या कामगारांना ते प्राधान्य देतील. आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग रोजगाराचे नवीन मार्ग उघडत आहेत. त्यामुळे नवीन कौशल्ये आत्मसात करणा-यांना नवीन अर्थव्यवस्थेत अधिक चांगल्या नोकऱ्या मिळतील. कौशल्य विकासात गुंतलेल्या सर्व संबंधित प्रशिक्षण संस्था आणि विद्यापीठांनी कन्व्हर्जन्ससोबत काम करावे. यामुळे महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ महिला आणि पुरुषांना विविध नवीन क्षेत्रात प्रशिक्षण देऊ शकेल. कर्मचाऱ्यांपैकी 93 टक्के कर्मचारी असंघटित क्षेत्रातून येतात. तरीही सर्व संघटित व असंघटित क्षेत्रातील कामगारांचे कल्याण हाच आपला प्रयत्न असायला हवा. उज्ज्वल आणि अधिक समृद्ध भविष्याची खात्री करताना सर्व कामगारांच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी वचनबद्ध असले पाहिजे, असेही राज्यपाल  श्री. बैस यावेळी म्हणाले.

कामगारांचा विकास महत्त्वाचा – कामगारमंत्री डॉ. सुरेश खाडे

कामगाराचा विकास झाला तरच राज्य व देशाचा विकास होईल, असे कामगार मंत्री डॉ. खाडे म्हणाले.

कामगार कल्याण मंडळाच्या अंशदानात वाढ झाल्यानंतर मंडळाकडे विकास कामांसाठी आणि कल्याणकारी योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध होणार आहे. मंडळाच्या भवनांमधील शिशुमंदिरशिवणवर्गअभ्यासिकाव्यायामशाळा इत्यादी उपक्रमांकरीता नवीन साहित्य उपलब्ध करुन देण्यात येईल.

कामगार कल्याण भवनांमध्ये पाळणाघर आणि अभ्यासिका हे दोन उपक्रम प्राधान्याने राबविण्यात येतील. पती पत्नी दोन्ही कामावर जात असल्यास मुलांचा सांभाळ करण्यासाठी कामगार कल्याण भवनाच्या इमारतींमध्ये पाळणाघर सुरु केल्यास अशा कुटुंबांची मोठी सोय होणार आहे. तसेच या इमारतींमध्ये स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या मुलांसाठी अभ्यासिका सुरु करण्यात येईल. त्यासाठी निधी उपलब्ध करुन देणाऱ्या पालकमंत्री दीपक केसरकर यांचे त्यांनी आभार मानले.

यावेळी बोलताना मंत्री श्री. केसरकर म्हणाले कीमुंबई शहराच्या विकासात कामगारांचे मोठे योगदान आहे. ज्यांच्या कष्टाने उभे राहिले त्या कामगारांचा आज गौरव होतोय याचा सर्वाधिक आनंद आहे. कामगार भवन वैभवशाली झाले पाहिजे. आज कामगार क्रीडा केंद्राचे रुप बदलत आहे. दिवसभर काम केल्यानंतर थोडे विरंगुळ्याचे क्षण त्यांना मिळावेत यासाठी कामगार क्रीडा केंद्र दर्जेदार असावेत, असा प्रयत्न आहे. 5 ट्रिलियन देशाची अर्थव्यव्स्था करताना महाराष्ट्राचा वाटा 1 ट्रिलियनचा असणार आहेत्यात कामगारांचा महत्वाचा वाटाही महत्वाचा राहणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

प्रधान सचिव श्रीमती सिंघल यांनी प्रास्ताविक केले. मंजिरी मराठे यांनी सूत्रसंचालन तर आभार श्री. इळवे यांनी मानले.

०००

मनीषा सावळे/विसंअ/

मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी’ योजनेची प्रभावी अंमलबजावणी करणार – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

मुंबई, दि. 30 : “मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी’ योजनेची राज्यात प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार आहे, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली. याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.

मुलींच्या जन्मास प्रोत्साहन देऊन, मुलींचा जन्मदर वाढविणे, मुलींच्या शिक्षणास चालना देणे, मुलींचा मृत्यू दर कमी करणे व बालविवाह रोखणे, कुपोषण कमी करणे, शाळा बाह्यमुलींचे प्रमाण शून्यवर आणण्यासाठी प्रोत्साहित करणे यासाठी लेक लाडकी योजना राज्यात राबविण्यात येणार आहे. या योजनेत   पिवळ्या व केशरी रेशनधारक कुटुंबात मुलींच्या जन्मानंतर 5 हजार रुपये, इयत्ता पहिलीत 6 हजार रुपये, सहावीत 7 हजार रुपये, अकरावीत 8 हजार रुपये अनुदान दिले जाईल. लाभार्थी मुलींचे वय 18 वर्ष पुर्ण झाल्यानंतर तिला 75 हजार रुपये रोख देण्यात येतील. राज्यातील अंदाजे अडीच लाख मुलींना या योजनेचा लाभ मिळेल.

शासनामार्फत थेट लाभार्थी हस्तांतरण (DBT) द्वारे लाभाची रक्कम लाभार्थ्यांना अदा करण्यात येणार आहे.

या योजनेची अंमलबजावणी एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालयामार्फत करण्याकरिता पोर्टल तयार करून लाभार्थ्यांची पोर्टलवर नोंदणी होऊन योजना कार्यान्वित राहण्याकरिता आयुक्तालयस्तरावर एक कक्ष निर्माण करण्यात येईल आहे.

या योजनेसाठी पुढीलप्रमाणे अटी व शर्ती आहेत. ही योजना पिवळ्या व केशरी शिधापत्रिकाधारक कुटुंबामध्ये 1 एप्रिल 2023 रोजी वा त्यानंतर जन्माला येणाऱ्या एक अथवा दोन मुलींना लागू राहील. एक मुलगा व एक मुलगी असल्यास मुलीला लागू राहील, पहिल्या अपत्याच्या तिसऱ्या हप्त्यासाठी व दुसऱ्या अपत्याच्या दुसऱ्या हप्त्यासाठी अर्ज सादर करताना माता, पित्याने कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य राहील. तसेच दुसऱ्या प्रसूतीच्या वेळी जुळी अपत्ये जन्माला आल्यास एक मुलगी किंवा दोन्ही मुलींना या योजनेचा लाभ अनुज्ञेय राहील. मात्र, त्यानंतर माता / पित्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे आवश्यक राहील. १ एप्रिल २०२३ पूर्वी एक मुलगी / मुलगा आहे व त्यानंतर जन्माला आलेल्या दुसऱ्या मुलीस किंवा जुळ्या मुलींना (स्वतंत्र) ही योजना अनुज्ञेय राहील. मात्र माता / पित्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे आवश्यक राहील. लाभार्थीचे कुटुंब महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असणे आवश्यक राहील. लाभार्थीचे बँक खाते महाराष्ट्र राज्यात असणे आवश्यक आहे. लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम रु. १ लाख पेक्षा जास्त नसावे.

आवश्यक कागदपत्रे पुढील प्रमाणे आहेत : लाभार्थीचा जन्माचा दाखला, कुटुंब प्रमुखांच्या उत्पन्नाचा दाखला (वार्षिक उत्पन्न १ लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे.) याबाबत तहसीलदार / सक्षम अधिकारी यांचा दाखला आवश्यक राहील, लाभार्थीचे आधार कार्ड (प्रथम लाभावेळी ही अट शिथिल राहीला), पालकाचे आधार कार्ड, बँकेच्या पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत, रेशनकार्ड (पिवळे अथवा केशरी रेशन कार्ड साक्षांकित प्रत), मतदान ओळखपत्र (शेवटच्या लाभाकरिता १८ वर्षे पूर्ण झाल्यांनतर मुलीचे मतदार यादीत नाव असल्याचा दाखला), संबंधित टप्प्यावरील लाभाकरिता शिक्षण घेत असल्याबाबतचा संबंधित शाळेचा दाखला (Bonafied),कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्र (“अ” येथील अटी शर्तीमधील क्रमांक २ येथील अटीनुसार) १०) अंतिम लाभाकरिता मुलीचा विवाह झालेला नसणे आवश्यक राहील, (अविवाहित असल्याबाबत लाभार्थीचे स्वयं घोषणापत्र आवश्यक आहे).

‘लेक लाडकी’ योजनेत लाभार्थींची ग्रामीण भागात पात्रता पडताळणी करण्याची जबाबदारी अंगणवाडी सेविका, सबंधित पर्यवेक्षिका, तर नागरी भागात मुख्यासेविका यांची राहील.

लाभार्थींची माहिती  ऑनलाइन भरून अंतिम मंजुरी सबंधित महिला व बालविकास अधिकारी तर मुंबई शहर आणि उपनगर बाबतीत नोडल अधिकारी असतील. पोर्टलची संपूर्ण जबाबदारी अद्ययावत करणे याबाबत राज्य कक्ष प्रमुख जबाबदार असतील. या योजनेचा आढावा घेण्याकरीता राज्यस्तरावर सुकाणू समिती गठित करण्यात आली आहे. अध्यक्ष म्हणून महिला व बालविकास विभागाचे सचिव असतील तर वित्त विभाग, नियोजन विभाग, सार्वजनिक आरोग्य विभाग, शालेय शिक्षण क्रीडा विभाग यांचे सचिव, एकात्मिक बाल विकास आयुक्त हे सदस्य असून महिला व बालविकास विभागाचे उपसचिव हे सदस्य सचिव असतील. या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी एकात्मिक बाल विकास आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली कार्यकारी समिती गठित करण्यात आली आहे. महिला व बालविकास पुणे, आरोग्य सेवा आयुक्त, प्राथमिक शिक्षण पुणे चे संचालक, एकात्मिक बाल विकास, नवी मुंबईचे सहायक संचालक सदस्य असून एकात्मिक बाल विकास सेवा योजना, नवी मुंबईचे उपयुक्त हे या समितीचे सनियंत्रण करतील.

०००

संध्या गरवारे/विसंअ/

[pdf-embedder url=”http://13.200.45.248/wp-content/uploads/2023/10/lek-ladki-gr.pdf” title=”lek ladki gr”]

‘शासन आपल्या दारी’ ५५ कक्षांच्या माध्यमातून योजनांबाबत मार्गदर्शन

यवतमाळ, दि. ३० : ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमाच्या जिल्हास्तरीय कार्यक्रमात विविध शासकीय विभागांकडून ५५ कक्षांच्या माध्यमातून योजना- उपक्रमांची माहिती देण्यात आली. हजारो नागरिकांनी कक्षांना भेट देऊन या उपक्रमाचा लाभ घेतला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विविध योजनांचे लाभ वितरण लाभार्थ्यांना झाले. यावेळी कृषी यांत्रिकीकरण अभियानात ट्रॅक्टर, कृषी अवजारे आदी लाभाचे वितरणही करण्यात आले.  परिसरात विविध विभागांकडून शासकीय योजना व उपक्रमांची माहिती देणारे ५५ स्टॉल उभारण्यात आले.

पोलीस, कामगार, महावितरण, महसूल, कृषी, मत्स्य व्यवसाय विकास, आदिवासी विकास, वने, बँक, समाज कल्याण, कौशल्य विकास, उमेद, परिवहन, माविम, उद्योग केंद्र, संजय गांधी योजना, पुरवठा, आरोग्य, महिला व बालकल्याण, दिव्यांग कल्याण‍ विभाग, महाऊर्जा आदी विभाग व महामंडळांनी कक्षाच्या माध्यमातून कार्यालयातर्फे राबविण्यात येणाऱ्या कल्याणकारी योजनांची माहिती नागरिकांना दिली.

कृषी विभागातर्फे शेतीसाठी उपयुक्त यंत्रे व अवजारे तसेच बी-बियाणे, लागवड, मशागत पद्धती, अद्ययावत संशोधन आदींची माहिती देण्यात आली, तसेच कृषी योजनांची माहिती पुस्तिकाही वितरित करण्यात आली. या स्टॉलला शेतकरी बांधवांचा मोठा प्रतिसाद मिळाला. अग्रणी बँकेतर्फे जीवन ज्योती विमा आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेचे फॉर्म भरून विमा काढण्याची सोय करून देण्यात आली.

समाजकल्याण कार्यालयातर्फे वंचित घटकांसाठीच्या योजनांची माहिती असलेल्या पुस्तिकेचे वितरण करण्यात आले. कौशल्य विकास विभागातर्फे युवक-युवतींना नोकरीच्या संधी, रोजगार मेळावे व मुलाखत तंत्राबाबत मार्गदर्शन करण्यात आले. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेतर्फे उमेद, स्वयंसहायता समूहांसाठी उपक्रम, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाची माहिती नागरिकांना देण्यात आली.

पोलीस विभागातर्फे सायबर क्राईम, ऑनलाईन फसवणूक प्रतिबंध आदी विषयासंबंधी जनजागृती करण्यात आली. महिला आर्थिक विकास महामंडळाच्या स्टॉलवर जिल्ह्यातील महिला बचतगटांनी तयार केलेली उत्पादने उपलब्ध करून देण्यात आली. जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागातर्फे दिव्यांगांसाठीच्या योजना व कृत्रिम अवयव साहित्य वितरण योजनेबाबत दिव्यांगांना माहिती देण्यात आली.

महाराष्ट्र राज्य विकास अभिकरण कार्यालयाद्वारे महाकृषी ऊर्जा अभियान, प्रधानमंत्री कुसुम योजना, शेतकऱ्यांसाठी सौर कृषी पंप  आदींबाबत माहिती देण्यात आली. जिल्हा उद्योग केंद्राने उद्योजक पुस्तिका, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, कर्जसुविधा आणि त्यासंबंधीची माहिती उपलब्ध करून दिली. खादी व ग्रामोद्योग महामंडळाद्वारे मधमाशीपालन व मधसंकलन, पंतप्रधान रोजगारनिर्मिती कार्यक्रम, मुख्यमंत्री रोजगारनिर्मिती कार्यक्रम या योजनांची माहिती देण्यात आली.

 जिल्हाधिकारी कार्यालयातर्फेही कक्षाची उभारणी करण्यात आली होती. त्याद्वारे संजय गांधी निराधार योजना, पुरवठा विभागाचे उपक्रम, निवडणूक, सेवा हक्क कायदा माहिती देण्यात आली. जिल्ह्यातील खेड्यापाड्यातून कार्यक्रमात सहभागी झालेल्या हजारो नागरिकांनी या स्टॉलला भेट दिली.

 

000

लोककल्याणकारी योजनांमुळे सर्वसमावेशक विकासाला गती – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

  • यवतमाळ शहर समृद्धी महामार्गाला जोडणार

  • जिल्ह्यात १६ लाख नागरिकांना ६०१ कोटी रू. निधीतून लाभाचें वितरण

 

यवतमाळ, दि. 30 : गत दोन वर्षांत राज्य शासनाने राबविलेल्या विविध योजना व निर्णयांमुळे युवक, ज्येष्ठ नागरिक, महिला, वंचित, दिव्यांग आदी सर्व समाजघटकांच्या सर्वसमावेशक विकासाला गती मिळाली आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले.

यवतमाळ शहरानजिक किन्ही गावाजवळ ‘शासन आपल्या दारी’ अभियानात जिल्हास्तरीय कार्यक्रमाचा शुभारंभ करताना ते बोलत होते. जिल्ह्यात 881 कोटी रू. निधीतून विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. मृद व जलसंधारण मंत्री तथा पालकमंत्री संजय राठोड, खासदार भावना गवळी, आमदार भरत गोगावले, प्रा. अशोक उईके, किरण सरनाईक, इंद्रनील नाईक, संदीप धुर्वे, संजीव रेड्डी बोदकुरवार, प्र. विभागीय आयुक्त संजय पवार, विशेष पोलीस महानिरीक्षक जयंत नाईकनवरे, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मैनाक घोष, पोलीस अधिक्षक डॉ. पवन बन्सोड आदी यावेळी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, औद्योगिक विकासाच्या दृष्टीने यवतमाळ शहर समृद्धी महामार्गाला जोडण्यात येईल. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांना मुंबई, नागपूर या महानगरांशी वेगवान संपर्क होऊन दळणवळण, व्यापार व रोजगार वाढेल. यवतमाळ जिल्ह्यात व्हितारा कंपनीसह नामांकित उद्योग सुमारे 5 हजार कोटींची गुंतवणूक करणार असून, मोठी रोजगारनिर्मिती होणार आहे. आदिवासी समाजबांधवांची संस्कृती व गौरवशाली इतिहासाच्या जोपासनेसाठी बिरसा मुंडा वस्तूसंग्रहालय उभारण्याबाबत सकारात्मक निर्णय घेऊ. सुपर स्पेशालिटी रूग्णालय येथे पदे लवकरच भरण्यात येतील व ट्रॉमा केअर सेंटर कार्यान्वित करण्यात येईल. वन्यप्राण्यांपासून शेतीपिकांचे नुकसान टाळण्यासाठी 21 हजार शेतक-यांना ‘सौर झटका’ यंत्रांचे वितरण करण्यात येत आहे.
मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, शेतकरी बांधवांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे आहे. शेतीसाठी आपत्तीकाळातील नुकसानभरपाईचे प्रमाण दुपटीवर नेले आहे. शेतक-यांना एक रूपयात पीक विमा देणारे देशातील महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरले आहे. सिंचनासाठी गत दोन वर्षांत 35 सिंचन प्रकल्पांना मान्यता देण्यात आली आहे. केंद्र शासनाच्या किसान सन्मान योजनेत राज्य शासनाने प्रतिव्यक्ती 6 हजार रू. ची भर घालून अंमलबजावणीला गती दिली आहे. नागरिकांच्या आरोग्य संवर्धनासाठी महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेत देय उपचार निधी दीड लाखाहून पाच लाखांपर्यंत वाढविण्यात आला आहे.

जिल्ह्यात अभियान कालावधीत 16 लाख नागरिकांना 601 कोटी रू. निधीतून विविध योजनांचे लाभ वितरण करण्यात आले. शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी जिल्ह्यात 75 ‘मॉडेल स्कूल’सुरू करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले की, राज्य शासनाने महिलाभगिनींसाठी एसटी प्रवास सवलत, मुलींचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी ‘लेक लाडकी लखपती’ योजना, महिला बचत गटांचे खेळते भांडवल दुप्पट करणे, तसेच गटांकडून उत्पादित वस्तूंचे ब्रॅडिंग व विपणन करण्याचा निर्णय घेतला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी राज्य शासन सकारात्मक असून, कायद्याच्या चौकटीत टिकणारे आरक्षण देऊ, अशीही ग्वाही त्यांनी दिली.

पालकमंत्री श्री. राठोड म्हणाले की, राज्य शासन शेतकरी बांधव, महिला व वंचितांसाठी अनेक योजना राबवत असून, भरघोस निधी उपलब्ध करून दिला आहे. सिंचनाच्या दृष्टीने महत्वाची असलेली जलयुक्त शिवार योजना पुन्हा कार्यान्वित करण्यात आली आहे. मुख्यमंत्री सहायता कक्षातर्फे जिल्ह्यातील अनेक रूग्णांना मदत मिळाली आहे. जिल्हा परिषद व नगरपालिकांच्या शाळांतील रिक्त शिक्षक पदे भरण्याची मागणीही त्यांनी केली. खासदार श्रीमती गवळी यांनीही मनोगत व्यक्त केले.

यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विविध योजनांच्या 25 लाभार्थ्यांना लाभ वितरण करण्यात आले. कार्यक्रमानंतर मुख्यमंत्र्यांनी सौर झटका यंत्राच्या प्रात्यक्षिकाचे अवलोकन केले. त्यांच्या हस्ते कृषी यांत्रिकीकरण योजनेच्या लाभार्थ्यांना विविध कृषी अवजारे, तसेच ट्रॅक्टरच्या चाव्या वितरित करण्यात आल्या.

जिल्हाधिकारी डॉ. आशिया यांनी प्रास्ताविक केले. मंगला माळवे व अमिन चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले. अपर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे यांनी आभार मानले. कार्यक्रमात सुमारे 50 हजार नागरिक उपस्थित होते.

०००

 

लाभार्थ्यांची अलोट गर्दी…

शासन आपल्या दारी अभियानाचा यवतमाळ जिल्हास्तरीय कार्यक्रम ‘रेकॅार्ड ब्रेक’ ठरला. प्रशासनाने 35 हजार लाभार्थ्यांच्या उपस्थितीचे नियोजन केले होते. प्रत्यक्षात 50 हजारापेक्षा अधिक लाभार्थी व सर्वसामान्य नागरिकांची उपस्थिती होती. प्रशासनाची उत्तम तयारी आणि लाभार्थ्यांच्या ‘अलोट गर्दी’ने खऱ्या अर्थाने ‘शासन आपल्या दारी’ आल्याचा अनुभव या कार्यक्रमात आला.

सर्वसामान्य नागरिकांना कालमर्यादेत आणि पारदर्शकपणे सेवा उपलब्ध करून देण्यासाठी दि.1 एप्रिलपासून राज्यात ‘शासन आपल्या दारी’ हे अभियान राबविण्यात येत आहे. यवतमाळ जिल्ह्यात या कालावधीत 16 लाख 21 हजार लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला. या लाभार्थ्यांना देण्यात आलेल्या लाभाची रक्कम 601 कोटी ईतकी आहे.

राज्यभर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत लाभ वाटपाचे कार्यक्रम घेतले जात आहे. यवतमाळ येथे आज झालेला 17 वा कार्यक्रम ‘रेकॅार्ड ब्रेक’ ठरला. कार्यक्रमाला 50 हजारापेक्षा जास्त लाभार्थी व नागरिकांची उपस्थिती होती. गेल्या काही दिवसात शासनाने आपल्यासाठी काहीतरी केल्याची भावना लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसून येत होती.

कार्यक्रमाला शेतकरी, कष्टकरी, महिला, कामगारांसह समाजातील सर्वच घटक तसेच शासनाच्या विविध योजनेचे लाभार्थी उपस्थित होते. जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या लाभार्थ्यांना सुखकरपणे कार्यक्रमस्थळी पोहोचता यावे, यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या 498 बसेसची व्यवस्था करण्यात आली होती. प्रवास सुरु करतांना लाभार्थ्यांना नास्ता व पाणी तर कार्यक्रम संपल्यानंतर बसमध्ये भोजन देण्यात आले. लाभार्थ्यांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही, याची संपुर्ण काळजी प्रशासनाने घेतली.

लाभार्थी कार्यक्रमस्थळी पोहोचल्यानंतर त्यांना काहीतरी मिळाले पाहिजे, यादृष्टीने विविध शासकीय विभागांचे 55 दालने लावण्यात आले होते. येथे विविध शासकीय विभागांनी आपल्या योजनांची लाभार्थ्यांना माहिती दिली. आलेल्या लाभार्थ्यांसाठी आरोग्य तपासणी शिबिर ठेवण्यात आले होते. त्याचा असंख्य लाभार्थ्यांनी लाभ घेतला.

सर्वसामान्य नागरिकांना विविध प्रकारच्या अडचणी, समस्या, तक्रारी असतात. त्याची शासनस्तरावर दखल घेतली जावी, असे त्यांना वाटत असते. यासाठी जिल्हास्तरावर मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष सुरु करण्यात आले. कार्यक्रमस्थळी देखील अशा तक्रारींची दखल घेण्यात आली. यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाचे स्वतंत्र दालने लावण्यात आली होती. त्यासाठी शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांचे चार स्वतंत्र पथके नेमण्यात आले होते.

सुशिक्षित बेरोजागारांसाठी कार्यक्रमस्थळी रोजगार मेळावा घेण्यात आला. त्याला देखील युवकांचा चांगला प्रतिसाद लाभला. या मेळाव्यात विविध नामांकित कंपन्यांच्यावतीने आपल्याकडील रिक्त 1 हजार 500 पदांसाठी युवकांच्या मुलाखती घेतल्या.

प्रशासनाने भव्य सभामंडप कार्यक्रमस्थळी तयार केला होता. आलेल्या कोणत्याही लाभार्थ्यांची गैरसोय होऊ नये, त्यांना नीट बसता यावे यासाठी नियोजनाप्रमाणे 35 हजार खुर्च्यांची मांडणी करण्यात आली होती. प्रत्येक खुर्चीवर पाण्याची बॅाटल व ओआरएसचे पाकीट ठेवण्यात आले होते. आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास त्याचा सामना करण्यासाठी वैद्यकीय व आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली होती.

जिल्हाभरातून येणाऱ्या शासकीय व खाजगी बसेस, छोटी वाहने यांच्या पार्कींगचे उत्तम नियोजन झाल्याने कुठेही गैरसोय झाली नाही. वाहनाच्या प्रकाराप्रमाणे वेगवेगळ्या ठिकाणी स्वतंत्र वाहनतळ करण्यात आल्याने वाहने, लाभार्थी व वाहनचालकांची सुविधा झाली. वाहनांचा कुठेही अधिकवेळ थांबावे लागले नाही.

फेटेधारी सरपंचांनी वेधले लक्ष

कार्यक्रमासाठी जिल्हाभरातील सरपंचांना निमंत्रित करण्यात आले होते. या सरपंचांना मंडपात पुढच्या ठिकाणी बसविण्यात आले. विशेष म्हणजे येथे आलेल्या प्रत्येक सरपंचास फेटे बांधण्यात आल्याने हे फेटेधारी सरपंच लक्षवेधक ठरले. इतक्या मोठ्या कार्यक्रमात त्यांना विशेष मान मिळाल्याने खऱ्या अर्थाने आपण गावाचे खरे कारभारी असल्याचे भाव त्यांच्या चेहऱ्यावर दिसून येत होते.

पोवाड्यांची आणली रंगत

मुख्य कार्यक्रमाच्या सुरुवातीस स्थानिक कलावंत गजानन वानखडे व त्यांच्या संचाने पोवाडे, मराठी गीते, मनोरंजनातून जनजागृतीचा अतिशय सुंदर कार्यक्रम सादर केला. संचातील कलावंतांच्या सादरीकरणाने उपस्थित हजारो लाभार्थ्यांचे मनोरंजन केलेच शिवाय मनोरंजनातून प्रबोधनही केले.

लाभार्थ्यांना प्रमाणपत्र व रोपटे

कार्यक्रमासाठी आलेल्या प्रत्येक लाभार्थ्यांना कार्यक्रमात सहभाग नोंदविल्याबद्दल परतीच्या प्रवासासाठी बसमध्ये बसतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व पालकमंत्री स़जय राठोड यांच्या स्वाक्षरीचे प्रमाणपत्र त्यांच्या हातात देण्यात आले. यासोबतच प्रत्येक लाभार्थ्यास वेगवेगळ्या फळांचे एक रोपटे देखील देण्यात आले.

विजयाची मशाल वर्षभर धगधगती ठेवण्याचा संकल्प करा – पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे खेळाडूंना आवाहन

चंद्रपूर, दि. 30 : राज्याच्या एका टोकाला असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील छोट्याशा तालुक्यात आज राज्यस्तरीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धा होत आहेत. ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे. मात्र एवढ्यावरच न थांबता भविष्यात येथे राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा घेण्याचे नियोजन आहे. आज पेटविलेली मशाल केवळ एका स्पर्धेपुरती मर्यादित न ठेवता प्रत्येक खेळाडूने वर्षभर विजयाची मशाल स्वत:च्या मनात धगधगती ठेवून उत्कृष्ट कामगिरी करावी, असे आवाहन राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

विसापूर (ता. बल्लारपूर) येथील तालुका क्रीडा संकुल येथे आयोजित राज्यस्तरीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेचे श्री. मुनगंटीवार यांच्या हस्ते थाटात उद्घाटन झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा, तहसीलदार डॉ. कांचन जगताप, जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड, वनविकास महामंडळाचे माजी अध्यक्ष चंदनसिंग चंदेल, जिल्हा ॲथलॅटिक्स असोसिएशनचे सचिव सुरेश अडपेवार, परभणीचे जिल्हा क्रीडा अधिकारी जयंत टेंभरे, क्रीडा मार्गदर्शक अनिल इंगळे, अरुणा गंधे, पुनम नवघरे, श्री. पवार आदींची प्रमुख उपस्थिती होती.

चांद्यापासून बांद्यापर्यंत प्रत्येक जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातील उदयोन्मुख खेळाडू वाघाच्या भूमीत आले आहेत. यासाठी जिल्हाधिकारी, जिल्हा क्रीडा अधिकारी आणि संपूर्ण टीमचे विशेष अभिनंदन. भविष्यात चंद्रपूर जिल्ह्यात राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांचे आयोजन करण्यात येईल, अशी ग्वाही पालकमंत्री श्री. मुनगंटीवार यांनी यावेळी दिली.

ते पुढे म्हणाले, ‘मशालीची आग कायम धगधगती ठेवण्याचा संकल्प खेळाडूंनी करावा. प्रत्येक स्पर्धेत पराक्रम करून मी विजय मिळविणारच, या उद्देशाने खेळाडूंनी वाटचाल करावी. राज्य शासन खंबीरपणे खेळाडूंच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहील. वाघाच्या भूमित सर्व खेळाडू आले आहात, परत जाताना वाघासारखा पराक्रम आणि स्पर्धेचा आनंद सोबत घेऊन जा,’ असेही श्री. मुनगंटीवार म्हणाले. तत्पूर्वी, ना. मुनगंटीवार यांच्या हस्ते प्रतिमा पूजन आणि दीप प्रज्ज्वलनानंतर क्रीडा ज्योत प्रज्वलित करण्यात आली.

जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड यांनी प्रास्ताविक करताना पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारामुळे स्पर्धा होत असल्याचे नमूद केले. श्री. मुनगंटीवार यांच्यामुळे प्रथमच तालुकास्तरावर राज्यस्तरीय स्पर्धांचे आयोजन होत आहे. राज्यातील सर्वांत उत्कृष्ट तालुका क्रीडा संकुल विसापूरमध्ये आहे. क्रीडा क्षेत्रावर केलेला खर्च हा सुवर्ण पदकांच्या स्वरुपात भविष्यासाठी केलेली गुंतवणूक आहे,’ असे ते म्हणाले.

ऑलिम्पिकचे लक्ष्य डोळ्यापुढे ठेवा

‘2036 मध्ये भारतात ऑलिम्पिक स्पर्धा घेण्याचे नियोजन आहे. जागतिक स्तरावरच्या या स्पर्धेत आपल्या खेळाडूंना जास्त पदके मिळवता आली नव्हती. मात्र अलीकडेच झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी दमदार कामगिरी केली. क्रीडा क्षेत्राकडे सरकार विशेष लक्ष देत असून सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देत उत्कृष्ट खेळाडू घडविण्यासाठी प्रयत्न करीत आहे. त्यामुळे प्रत्येक खेळाडूने डोळ्यापुढे ऑलिम्पिकचे लक्ष्य ठेवावे,’ असे आवाहन श्री. मुनगंटीवार यांनी केले.

क्रीडा क्षेत्राचा सर्वांगीण विकास

राज्यात तीन स्मार्ट सिंथेटिक ट्रॅक आहेत आणि तिन्ही ट्रॅक आपल्या जिल्ह्यात म्हणजे चंद्रपूर येथील क्रीडा संकुलात, विसापूर क्रीडा संकुल आणि सैनिक स्कूलमध्ये आहेत. याशिवाय पोलिसांचे सर्वोत्तम जिम आपल्या जिल्ह्यात आहे. चंद्रपूर, बल्लारपूर, मूल, पोंभुर्णा आदी ठिकाणी उत्तम स्टेडियम उभारण्यात येत आहेत, असेही ते म्हणाले.

खेळाडूंना मोफत ताडोबा सफारी

जगातील 193 देशांपैकी 14 देशात वाघ आहेत. त्यापैकी 65 टक्के वाघ भारतात असून सर्वाधिक वाघ हे फक्त चंद्रपूर जिल्ह्यात आहेत. त्यामुळे राज्यभरातून येथे आलेल्या खेळाडूंना ताडोबाची मोफत जंगल सफारी दाखविण्याचे नियोजन करावे, अशा सूचना वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांना दिल्या.

उत्तम व्यवस्थेबाबत सूचना

राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेकरीता चंद्रपूरमध्ये आलेले खेळाडू, त्यांचे पालक व मार्गदर्शकांची राहण्याची व जेवण्याची उत्तम व्यवस्था करावी. प्रत्येक खेळाडू येथून आनंद घेऊनच परत गेला पाहिजे, अशा सूचना पालकमंत्री यांनी दिल्या.

दिमाखदार उद्घाटन सोहळा

विसापूर येथील क्रीडा संकूलात राज्यस्तरीय शालेय मैदानी स्पर्धेचे अतिशय आकर्षक आणि मनमोहक पद्धतीने उद्घाटन करण्यात आले. यात राज्याच्या संस्कृतीची झलक गोंधळ व देवीचा जागरमधून सादर करण्यात आली. तसेच लाठी-काठी मार्च, व आतषबाजीने उपस्थितांची मने जिंकली.

1600 खेळाडू व 700 पालकांचे आगमन

राज्यातील आठ महसूल विभाग तसेच पुणे येथील क्रीडा प्रबोधिनी अशा एकूण 9 विभागांमधून 1600 खेळाडू आणि त्यांच्यासोबत 700 पालक राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी विसापूर येथे आले आहेत. तीन दिवस 100, 200, 400, 800, 1500 आणि 3000 मीटर धावणे, गोळाफेक, थाळीफेक, उंच उडी, लांब उडी, हॅमर थ्रो, भालाफेक, क्रॉसकंट्री या स्पर्धा होणार आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संवादाचे उद्या ‘दिलखुलास’ कार्यक्रमात प्रसारण

मुंबई, दि. 30 : मराठा आरक्षण व सुविधांसाठी  नियुक्त करण्यात आलेल्या उपसमितीच्या बैठकीत घेण्यात आलेल्या महत्त्वाच्या निर्णयांची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 30 ऑक्टोबर रोजी सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी पत्रकारांशी साधलेला हा संवाद ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून प्रसारित करण्यात येणार आहे.

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या ॲपवर हा संवाद मंगळवार दि. 31 ऑक्टोबर, 2023 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होईल.

000

राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठानच्या निधी योजनांसाठी ग्रंथालयांनी अर्ज करावेत – ग्रंथालय संचालक दत्तात्रय क्षीरसागर

मुंबई, दि. 30 : राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान, कोलकाता यांच्या समान व असमान निधी योजनांचा लाभ घेण्यासाठी राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांनी अर्ज सादर करण्याचे आवाहन ग्रंथालय संचालक दत्तात्रय क्षीरसागर यांनी केले आहे.

भारत सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत राजा राममोहन रॉय  ग्रंथालय प्रतिष्ठान, कोलकाता यांच्या समान निधी व असमान निधी योजनेंतर्गत राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांच्या सर्वांगीण विकासासाठी अर्थसहाय्याच्या विविध योजना ग्रंथालय संचालनालय यांच्या मार्फत राबविण्यात येतात.

समान व असमान निधी योजनांचा लाभ घेण्यासाठी विहित नमुन्यातील प्रस्ताव सादर करणे आवश्यक असल्याने सन २०२३-२४ साठी राज्यातील शासनमान्य ग्रंथालयांकडून प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. त्या संदर्भातील नियम, अटी व अर्जाचा नमुना प्रतिष्ठानच्या www.rrrlf.gov.in या संकेतस्थळावर असून इच्छुक ग्रंथालयांनी अर्जाचा नमुना उपलब्ध करून घ्यावा. सन २०२३-२४ साठीच्या समान निधी योजनेनंतर्गत इमारत बांधकाम व विस्तार अर्थसहाय्य योजनेसाठी प्रस्ताव सादर करावेत. या योजने व्यतिरिक्त समान निधी योजनेंतर्गत इतर योजनांचा लाभ केंद्रीय पद्धतीने देण्यात येत असल्यामुळे इतर योजनेसाठीचे प्रस्ताव सादर करू नयेत.

असमान निधी योजनेंतर्गत ग्रंथालय सेवा देणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना ग्रंथ, साधन सामग्री, फर्निचर, इमारत बांधकाम  व विस्तार यासाठी अर्थसहाय्य, राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान ‘ज्ञान कोपरा’ विकसित करण्यासाठी अर्थसहाय्य, महोत्सवी वर्ष जसे ५०/६०/७५/१००/१२५/१५० वर्ष साजरे करण्यासाठी अर्थसहाय्य, राष्ट्रस्तरीय चर्चासत्र, कार्यशाळा, प्रशिक्षण वर्ग व जागरुकता कार्यक्रमाच्या आयोजनासाठी अर्थसहाय्य, बाल ग्रंथालय व राजा राममोहन रॉय ग्रंथालय ‘बाल कोपरा स्थापन’ करण्याकरिता अर्थसहाय्यासाठी प्रस्ताव सादर करता येणार आहे.

अर्ज कुठे व कसा करावा  :

राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान, कोलकाता यांच्या समान व असमान निधी योजनांचा लाभ घेण्यासाठी इछुकांनी प्रतिष्ठानचे www.rrrlf.gov.in या संकेतस्थळला भेट द्यावी. आवश्यकता असल्यास संबंधित जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. ग्रंथालयांनी कोणत्याही एका योजनेसाठीचा प्रस्ताव विहित मार्गाने मुदतीत आवश्यक कागदपत्रांसह इंग्रजी किंवा हिंदी भाषेत चार प्रतीत संबंधित जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयास ३० नोव्हेंबर २०२३ पर्यंत पाठवावेत, असे आवाहन ग्रंथालय संचालक श्री. क्षीरसागर यांनी राज्यातील शासनमान्य ग्रंथालयांना केले आहे.

 

000

काशीबाई थोरात/विसंअ/

नंदुरबार जिल्ह्यातील पर्यटन विकासाच्या कामांना गती द्यावी – आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित

मुंबई, दि. 30 : नंदुरबार जिल्ह्यातील पर्यटन विकासाची मंजूर कामे लवकरात लवकर सुरु करावीत. तसेच जिल्ह्यातील पर्यटन विकासाच्या अनुषंगाने प्रलंबित कामांना गती द्यावी असे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी सांगितले.

नंदुरबार जिल्ह्यातील पर्यटन विभागाच्या कामांबाबत आढावा बैठक मंत्री डॉ. गावित यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात झाली. त्यावेळी ते बोलत होते.

मंत्री डॉ.गावित म्हणाले की, पर्यटन विकासाची प्रलंबित असणारी विविध विकास कामे वेळेत पूर्ण करण्याचे नियोजन करावे. तसेच ही कामे करत असताना कामांचा दर्जाही चांगला राहिला पाहिजे.

पर्यटन विकासाच्या अनुषंगाने प्रकाशा (ता. शहादा) येथील केदारेश्वर मंदिर येथे घाट बांधणे व सुशोभीकरण, तोरणमाळ येथील विकास कामे, अस्तंबा येथील विकास कामे, लघु तलाव चोपाळे येथील कृष्णा पार्क येथील कामांचा सविस्तर आढावा मंत्री डॉ.गावित यांनी यावेळी घेतला.

या बैठकीस नंदुरबारच्या जिल्हाधिकारी मनीषा खत्री, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता संजय कलपे तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

000

शैलजा पाटील/विसंअ/

महिला बचतगटांसाठी सुरु केलेल्या पथदर्शी प्रकल्पास गती द्यावी – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

मुंबई, दि. 30 : अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि कौशल्य विकसित करून महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्याकरिता लोरियल इंडिया आणि महिला आर्थिक विकास महामंडळाच्या संयुक्त विद्यमाने सातारा, नाशिक आणि रायगड येथे राबविण्यात  येणाऱ्या प्रकल्पाचे काम गतीने करण्याचे आदेश महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी  दिले.

मंत्रालयात महिला आर्थिक विकास महामंडळ आणि लोरियल इंडिया यांच्या प्रतिनिधींसमवेत घेण्यात आलेल्या बैठकीत मंत्री कु. तटकरे बोलत होत्या. यावेळी महिला व बालविकास विभागाचे सचिव डॉ.अनुपकुमार यादव, महिला व आर्थिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक इंदू जाखड, लोरियल इंडियाच्या संचालक कृष्णा विलासनी यासह इतर अधिकारी उपस्थित होते.

मंत्री कु. तटकरे म्हणाल्या की, ‘माविम’ एक महिला बचत गटांचे उत्कृष्ट संघटन आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान व कौशल्य विकसित करून महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्याकरिता लोरियल इंडिया आणि महिला आर्थिक विकास महामंडळाच्या संयुक्त विद्यमाने सातारा, नाशिक आणि रायगड येथे महिला बचतगट यांना ब्यूटीपार्लरचे प्रशिक्षण देण्यासाठी जागा निश्चित करून प्रशिक्षण देण्याचा कालावधी ठरवणे, बचत गटातील महिलांना प्रशिक्षण देण्यासाठी कार्यक्रम ठरवावा, असेही त्या म्हणाल्या.

सार्वजनिक ठिकाणी महिलांना काही वेळेस असुरक्षित वातावरणात प्रवास करावा लागतो हे टाळण्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना कराव्यात याबाबतचा आराखडा तयार करावा आणि त्याबाबत महिला व बालविकास विभागाने योग्य ती कार्यवाही करावी, असे त्यांनी सांगितले.

लोरियल इंडियाच्या संचालक कृष्णा विलासनी यांनी यावेळी लोरियलमार्फत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांच्या माहिती सादर केली.

000

संध्या गरवारे/विसंअ/

 

ताज्या बातम्या

जिल्ह्यात २८ शहीद स्मारके उभारणार  – पालकमंत्री गुलाबराव पाटील

0
▪️ भारत-तिबेट सीमा पोलिस दलाच्या जवानांकडून ‘गौरव सलामी’ जळगाव, दि. ११ (जिमाका): मातृभूमीसाठी प्राणार्पण करणाऱ्या 9 वी वाहिनी, भारत-तिबेट सीमा पोलिस दलाच्या शहीद जवान सुनील...

नागपूर येथे लवकरच जागतिक दर्जाच्या वेल्डिंग इन्स्टीट्यूटची पायाभरणी –  कामगार मंत्री आकाश फुंडकर

0
नागपूर, दि. ११: बॉयलर हा औद्योगिक क्षेत्राचा आत्मा आहे. बॉयलरच्या कार्यक्षमतेवर उत्पादन खर्च अवलंबून असतो. याची कार्यक्षमता ही बॉयलरच्या निर्मितीशी निगडीत असून परिपूर्ण कौशल्य...

गोमाता संवर्धनाशिवाय नैसर्गिक शेतीला गती नाही — मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
‘गोवर्धन गोशाळा कोकण’ प्रकल्पाचे उद्घाटन सिंधुदुर्गनगरी, दि. ११ : शेतकऱ्यांना समृद्ध करण्यासाठी देशी गायींचे संवर्धन महत्त्वाचे असून, गोमातेचे संवर्धन केल्याशिवाय नैसर्गिक शेतीला गती मिळणार...

छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा पुढील पिढ्यांना स्फूर्तिदायक  -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
विक्रमी वेळेत आकर्षक पुतळ्याची उभारणी परिसराचा विकास करुन पर्यटनाला चालना सिंधुदुर्गनगरी, दि. ११ (जिमाका): छत्रपती शिवाजी महाराज महान योद्धा होते. त्यांचे विचार सर्वांसाठी...

निवडणूक आयुक्तांचा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या शिष्टमंडळाशी संवाद

0
मुंबई दि. ११:  मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि निवडणूक आयुक्त डॉ. सुखबीर सिंग संधू व डॉ. विवेक जोशी यांनी आज मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे...