शनिवार, मे 3, 2025
Home Blog Page 950

आपत्ती निवारण कामांना गती द्यावी – उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई, दि. 17 : राज्यातील आपत्ती निवारण विषयक सुरू असलेली सार्वजनिक बांधकाम, जलसंपदा, खारभूमी विकास आणि ऊर्जा या विभागांची कामे विहित कालावधीत पूर्ण करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या.

उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज मदत व पुनर्वसन विभागाच्या कामकाजाचा आढावा बैठक झाली. यावेळी मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर, उपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव आशिष शर्मा, नियोजन विभागाचे सचिव सौरभ विजय, मदत व पुनर्वसन विभागाच्या प्रधान सचिव डॉ. सोनिया सेठी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव एस. एस.साळुंखे, जलसंपदाचे सचिव राजेंद्र मोहिते, राज्य आपत्ती व्यवस्थापन संचालक आप्पासो धुळाज, महावितरणचे मुख्य अभियंता चंद्रमणी मिश्रा, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे मुख्य अभियंता आर.पी. नि. घटे यासह इतर अधिकारी उपस्थित आहेत.

उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले, आपत्तींची तीव्रता कमी होवून  मनुष्य व जिवित हानी होवू नये यासाठी शासन विविध उपाययोजना राबवत आहे. पावसाळा संपल्यानंतर जी कामे होणे अपेक्षित आहे ती कामे गतीने करण्यासाठी यंत्रणांनी प्राधान्य द्यावे. धूप प्रतिबंधक बंधारे बांधणे, दरड प्रतिबंधात्मक कामे ही कामे केली जावीत. कोकणामध्ये करण्यात येणारी आपत्ती सौम्यीकरण प्रकल्पाची कामे, आपत्ती प्रतिबंधक कामे वेळेत पूर्ण करावीत. काही खाजगी संस्था देखील आपत्ती निवारण क्षेत्रात काम करत आहेत, त्यांनीही कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावा.कोकण आपत्ती सौम्यीकरण प्रकल्पाच्या कामांचे तांत्रिक  व प्रशासकीय मंजूरी तपासून पहा आणि गुणवत्तापूर्ण कामे करा. पावसाळी हंगामात झालेल्या नुकसानीपोटी शेतक-यांना देण्यात येणारी मदत देखील वेळेत वितरीत करावी. यंदा काही ठिकाणी गोगलगायीमुळे झालेले पिकांचे नुकसान देखील झाले आहे त्याचेही पंचनामे काटेकोरपणे करा. न्यायालयाच्या आदेशानुसार भुकंप ग्रस्तांच्या पुनर्वसनाकरिता संपादित झालेल्या जमिनीचा मोबदला देणे, कोयना भुकंप पुनर्वसन आणि पुनर्वसन विषयक कामेही प्राधान्याने पूर्ण करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी दिल्या.

आपत्तीची सूचना देणारी अद्यावत यंत्रणा उभारणार : मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील

मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील म्हणाले, गेल्या काही वर्षात जागतिक हवामान बदलामुळे राज्यात विविध ठिकाणी वादळे, अतिवृष्टी, पूरपरिस्थीती, दरड खचणे अशा आपत्ती घडत आहेत. या आपत्तींचा सामना करण्यासाठी मदत व पुनर्वसन विभाग विविध उपाययोजना करत आहे. आपत्ती पूर्व आणि आपत्ती नंतर काय काळजी घ्यावी यासाठी विविध प्रशिक्षण, राज्य आपत्ती व्यवस्थापन संस्थेची स्थापना, जी.आ.एस.चा वापर करून आपत्तीची तीव्रता मोजणे, विभागाचा स्वतंत्र उपग्रह असावा का याबाबतची सविस्तर आराखडा तयार करणे,आपत्ती पूर्व सूचना प्रणाली देणे राज्यातील ६ हजार ठिकाणी स्वयंचलित हवामान केंद्र उभारणार आहोत ही कामे प्राधान्याने पूर्ण करणार आहे, असेही मंत्री श्री.पाटील म्हणाले.

*****

‘स्वच्छता मॉनिटर’ प्रकल्पाचा पहिला टप्पा पूर्ण

मुंबई, दि. १७ : महाराष्ट्र कचऱ्याबाबत निष्काळजी मुक्त करण्यासाठी शिक्षण विभागाच्या ‘स्वच्छता मॉनिटर’ प्रकल्पाचा पहिला टप्पा नुकताच पूर्ण झाला. यात ६४ हजार १९८ शाळांमधून ५९,३१,४१० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला असून समाज माध्यमांतून यासंदर्भातील १५ लाखांहून अधिक व्हीडिओ शेअर झाले आहेत. या अनुषंगाने सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या प्रभावी १०० शाळांचा लवकरच मुंबई येथे सत्कार केला जाणार असल्याची माहिती, शिक्षण विभागामार्फत देण्यात आली आहे.

प्रकल्पाचा पहिला टप्पा म्हणजे शाळा आणि विद्यार्थ्यांना स्वच्छता मॉनिटर प्रकल्पात नेमके काय करायचे हे समजण्यासाठीचा महत्वपूर्ण टप्पा होता. या प्रकल्पात विद्यार्थी कळत नकळत झालेली चूक निदर्शनास आणून ती सुधारायला सांगणारे कडक मॉनिटर आहेत. प्रकल्पाचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते झाला होता. त्यानंतर ६४ हजार शाळांच्या सहभागाची नोंदणी झाली आणि विद्यार्थी वाटेल तिथे कचरा टाकणाऱ्यांना आणि बेफिकीरपणे थुंकणाऱ्यांना जागच्या जागी थांबवून झालेली चूक दाखवून देऊ लागले.

या टप्प्यात विद्यार्थ्यांनी घाण करणाऱ्याला ती साफ करायला विनंती करणे अपेक्षित होते. स्वच्छता मॉनिटरगिरी म्हणजे सफाई करणे किंवा भाषणबाजी नसल्यामुळे मुलांना मजा येऊ लागली आणि त्यापुढे घटनेचे विवरण सांगतानाचे मजेशीर व्हीडिओ तयार करून समाज माध्यमांवर शेअर करणेही त्यांना आवडू लागले. पहिल्या टप्प्यात असे १५ लाखांहून अधिक व्हीडिओ शेअर झाले आहेत. शालेय शिक्षण मंत्री श्री. केसरकर यांनी प्रस्तावित केलेल्या या संकल्पनेला गती मिळाली आहे.

यापुढील दुसऱ्या टप्प्यात विद्यार्थ्यांना स्वच्छता मॉनिटरगिरी करण्याची आणि वर्ग शिक्षकांना रोज स्वच्छता मॉनिटरगिरी केल्याबाबत विद्यार्थ्यांना विचारणा करण्याची सवय होण्यावर लक्ष्य केंद्रित होणार आहे. ठिकठिकाणी प्रत्येक चुकीला कोणी ना कोणी दाखवून दिल्याने सगळेच नागरिक जागरूक राहतील आणि महाराष्ट्र स्वच्छतेच्या बाबतीत निष्काळजी मुक्त बनेल, अशी अपेक्षा या प्रकल्पाचे संचालक रोहित आर्या यांनी यानिमित्ताने व्यक्त केली आहे.

या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात बुलढाणा, जालना, सातारा, मुंबई आणि यवतमाळ जिल्ह्यांनी उत्तम कामगिरी केली असून श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल, अंकुशनगर, जि.जालना; मत्स्योदरी विद्यालय, अंबड, जि.जालना; युगधर्म पब्लिक स्कूल, बुलढाणा; आदर्श जि.प. स्कूल, बोरखेडी, जि.बुलढाणा; एन.व्ही. चिन्मया विद्यालय, शेगाव आणि जनता हायस्कूल, जालना या शाळांनी प्रभावी कामगिरी केली आहे.

00000

बी.सी.झंवर/विसंअ/

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाच्या सूचित समाविष्ट असलेल्या जातींना राष्ट्रीय सूचित समाविष्ट करण्यासाठी जलद शिफारस करावी – राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर

मुंबई दि १७ – राष्ट्रीय आरक्षण सूचीमध्ये समाविष्ट होण्यासाठी ज्या जातींनी महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाकडे शिफारस केली आहे, अशा जातींच्या कागदपत्रांची पूर्तता करून अहवाल राष्ट्रीय आयोगाकडे सादर करावा.  तसेच, नव्याने आलेल्या अर्जासंदर्भातील शैक्षणिक व सामाजिक परिस्थितीचा अभ्यास करून  शिफारस तातडीने राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाकडे पाठविण्यात यावी, अशा सूचना राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांनी दिल्या.

आज सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे राष्ट्रीय सूचित समाविष्ट होण्यासाठी ज्या जातींचे अर्ज प्रलंबित आहेत, त्या अर्जाबाबत सुनावणी घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते.

श्री. अहिर म्हणाले की, लोधी, बडगुजर, वीरशैव लिंगायत, सलमानी, भोयर पवार, सुर्यवंशी गुर्जर, बेलदर, झाडे, डांगरी व कलवार, शेगर-धनगर या जातींचा राज्य मागास यादीत समावेशाबाबत कागदपत्रांची पूर्तता करून राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाकडे १५ दिवसांत यादी पाठविण्यात यावी. तसेव, नव्याने आलेल्या शिफारशींवर सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या वर्गांच्या परिस्थिती आणि अडचणी तपासाव्यात. ही कार्यवाही जलदगतीने करण्यासंदर्भात त्यांनी सांगितले.

यावेळी राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे सदस्य भुवन भूषण कमल, सचिव राजीव रंजन, सल्लागार राजेश कुमार, महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य माजी न्यायमूर्ती चंद्रलाल मेश्राम, ॲङ बी.एल. सगर किल्लीकर, सदस्य सचिव श्रीमती आशाराणी पाटील, आमदार कीर्तीकुमार उर्फ बंटी भांगडीया, माजी आमदार संजय धोटे, माजी आमदार आशिष देशमुख,  सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे सचिव सुमंत भांगे, इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सचिव विरेंद्र सिंग, इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे संचालक डॉ. प्रवीण देवरे यांच्यासह विविध जाती समुहाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

०००

श्रद्धा मेश्राम/ससं/

मालीच्या वाणिज्यदूतांनी घेतली पणन मंत्री अब्दुल सत्तार यांची सदिच्छा भेट

मुंबई, दि. 17 : मालीचे वाणिज्यदूत विकास मित्तरसेन यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने अल्पसंख्याक विकास व औकाफ, पणन मंत्री अब्दुल सत्तार यांची आज शासकीय निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली.

कृषी उत्पन्न बाजार समिती ही शेतकऱ्यांसाठी कशा पद्धतीने काम करते, पणन विभागामार्फत शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणारे विविध उपक्रम व योजना याविषयी माहिती मंत्री श्री. सत्तार यांनी यावेळी सांगितली. कृषी माल प्रक्रिया, कृषी मालाची निर्यात या बाबींवर यावेळी चर्चा करण्यात आली. कृषी माल  निर्यातीसाठी माली वाणिज्य दूतावासाचे सहकार्य मिळणार असल्याचे मंत्री श्री. सत्तार यांनी सांगितले.

*****

शैलजा पाटील/विसंअ/

 

 

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनतेशी साधला संवाद

नागपूर, दि. 17 : उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज देवगिरी या शासकीय निवासस्थानी जनतेशी संवाद साधला व निवेदने स्वीकारली.

उपमुख्यमंत्र्यांना भेटून समस्या व अडचणी मांडण्यासाठी जिल्ह्याच्या विविध भागातून नागरिक आले होते. श्री. फडणवीस यांनी नागरिकांची भेट घेत आस्थेने विचारपूस करीत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या व निवेदने स्वीकारली.

ज्येष्ठ नागरिक, महिला, विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी आणि विद्यार्थ्यांनी आपल्या अडचणी व समस्या उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्याकडे मांडल्या. उपमुख्यमंत्र्यांनी निवेदने स्वीकारत त्यांचे म्हणणे ऐकून घेतले.

******

                                                    

शिवमहापुराण’ कार्यक्रमस्थळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट

नागपूर, दि. 17 : दिघोरी चौकात पंडित प्रदीप मिश्रा यांच्या शिवमहापुराण कथेला आज प्रारंभ झाला असून उपमुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांनी कार्यक्रमस्थळी भेट दिली.

आमदार सर्वश्री. मोहन मते, विकास कुंभारे, कृष्णा खोपडे, प्रवीण दटके यांच्यासह देशातील विविध भागातून आलेले नागरिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उमरेड मार्गावरील दिघोरी चौक येथील बहादुरा फाटा टोल नाक्याजवळ असलेल्या 80 एकर परिसरात या प्रवचनाचे आयोजन करण्यात आले आहे. सुमारे दोन ते अडीच लाख लोक बसतील असा सभामंडप तयार करण्यात आला आहे. 21 ऑक्टोबरपर्यंत हे आयोजन करण्यात आले आहे.

कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची ‘दिलखुलास’ कार्यक्रमात उद्या मुलाखत

मुंबई, दि. 17 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची मुलाखत प्रसारित करण्यात येणार आहे. कोल्हापुरात 15 ते 24 ऑक्टोबर 2023 दरम्यान सुरु असलेल्या दसरा महोत्सवात विविध उपक्रम, स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रमांचे विनामूल्य आयोजन केले आहे. यामध्ये नागरिक आणि पर्यटकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन मंत्री श्री. मुश्रीफ यांनी ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून केले आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील ‘शाही दसरा’ देशभरात प्रसिद्ध असून त्याला ऐतिहासिक वारसा आहे. कोल्हापूरचा शाही दसरा महोत्सव देश – विदेशात पोहोचविण्यासाठी तसेच पर्यटनदृष्ट्या कोल्हापूर जिल्ह्याचा विकास होण्यासाठी शासनस्तरावर विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. यासाठी निधीही उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. घटस्थापनेपासून सुरु झालेल्या दसरा महोत्सवाला पर्यटन परिचय केंद्र व पर्यटन प्रदर्शनाच्या उद्घाटनाने सुरुवात झाली असून या कार्यक्रमास जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.

‘दिलखुलास’ कार्यक्रमातून ही मुलाखत उद्या बुधवार 18 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर प्रसारित होणार आहे. निवेदक पल्लवी मुजुमदार यांनी ही मुलाखत घेतली आहे.

००००

जयश्री कोल्हे/ससं/

 

नव्याने मान्यता दिलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश प्रक्रियेचे नियोजन करावे – मंत्री हसन मुश्रीफ

मुंबई, दि. 17 : राज्यात नव्याने मान्यता दिलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात  ज्याठिकाणी पायाभूत सुविधा उपलब्ध आहेत, अशा ठिकाणी येत्या शैक्षणिक वर्षात प्रवेश प्रक्रिया सुरू करण्याचे नियोजन करावे, अशा सूचना वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले.

नव्याने मान्यता दिलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांच्या विविध कामांचा मंत्रालयात आढावा घेताना ते बोलत होते. यावेळी वैद्यकीय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे, आयुक्त राजीव निवतकर, वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर यांच्यासह नवीन मान्यता मिळालेल्या वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता दूरदृश्य संवाद प्रणालीव्दारे उपस्थित होते.

मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले की, राज्यात नव्याने मान्यता दिलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांसाठी भूखंड सर्व ठिकाणी उपलब्ध झाले असून बांधकाम प्रक्रिया सुरू करण्याच्या संबंधितांना सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच ज्या ठिकाणी पायाभूत सुविधा उपलब्ध आहेत, अशा ठिकाणी वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश प्रक्रिया तयारी करण्यात यावी. याबरोबरच पद निर्मिती, पद भरती, लेखाशीर्षसाठी तातडीने प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले.

यावेळी वाशीम, वर्धा, भंडारा ,बुलढाणा, पालघर, जालना, गडचिरोली, अंबरनाथ, अमरावती या नव्याने मान्यता प्राप्त शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांच्या इमारत व वसतिगृह बांधकाम, येत्या शैक्षणिक वर्षापासून सुरु होणा-या प्रवेशाबाबत नियोजन, जिल्हा रुग्णालयाचे नूतनीकरण, यंत्रसामुग्री, उपकरणे, फर्निचर, ग्रंथालय व इ. बाबींचा आढावा यावेळी घेण्यात आला.

0000

राजू धोत्रे/विसंअ/

‘उमेद’च्या माध्यमातून बँक आपल्या दारी – ग्रामविकास व पंचायतराज मंत्री गिरीष महाजन

मुंबई, दि. १७ : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत (उमेद) माध्यमातून बँक आपल्या दारी येणार आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये  एक बँक प्रतिनिधी (बी.सी.) सखी  निवडण्यात येणार असून स्वयं सहाय्यता समूहातील अधिकाधिक पात्र व इच्छुक महिलांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन ग्रामविकास व पंचायतराज मंत्री गिरीष महाजन यांनी केले आहे.

मंत्री श्री. महाजन म्हणाले की, ‘उमेद’ अभियानांतर्गत समुदाय संस्था (स्वयंसहाय्यता समूह, ग्रामसंघ व प्रभागसंघ) व त्यातील सहभागी सदस्य यांच्यामध्ये रोख विरहित (Digital Transaction) आर्थिक व्यवहाराला प्रोत्साहन देण्याकरिता व ग्रामीण व दुर्बल भागामध्ये बँकेच्या सुविधा पोहोचविण्याकरिता ‘मिशन एक ग्रामपंचायत एक बँक प्रतिनिधी (बी.सी.) सखी’ ही संकल्पना राबविण्यात येत आहे. यासाठी राज्यभर आयोजित करण्यात येणाऱ्या निवड शिबिरांमध्ये जास्तीत जास्त पात्र स्वयंसहायता गटाच्या महिलांनी  सहभागी होऊन रोजगाराची संधी प्राप्त करावेत.

या अंतर्गत राज्यातील सर्व ग्रामपंचायतस्तरावर स्वयंसहाय्यता समूहातील सदस्य महिलांना बी.सी. सखी साठी निवड करून त्यांना प्रशिक्षण व इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ बँकींग फायनान्स (Indian Institute of Banking and Finance) प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी मार्गदर्शन करण्यात येते. परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांना संबंधित ग्रामपंचायतस्तरावर संबंधित बँक किंवा त्यांच्या व्यवसाय प्रतिनिधी (Business Corporate) मार्फत नेमणूक देऊन बँक प्रतिनिधी (बी. सी.) सखी म्हणून कार्यरत करण्यात येते. या बँक प्रतिनिधी (बी. सी.) सखींना त्यांनी केलेल्या आर्थिक व्यवहारावर बँकेकडून कमिशन स्वरुपात उपजीविकेचे साधन उपलब्ध करून देण्यात येते. सध्या राज्यभर ३३०० बी. सी. सखी कार्यरत आहेत. त्यापैकी अनेक बँक प्रतिनिधी (बी. सी.) सखी २० हजार रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न ग्रामीण भागात बँकिंग सेवेच्या माध्यमातून मिळवत आहेत असे मंत्री श्री महाजन यांनी सांगितले.

जिल्हा, तालुकास्तरावर २० ऑक्टोबर ते ३१ डिसेंबर २०२३ या काळात शिबीर

बँक प्रतिनिधी (बी. सी.) सखी कार्यरत करण्याची कार्यवाही जलदगतीने व्हावी याकरिता महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियान व वुमेन्स वर्ल्ड बँक यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आलेला आहे. बँक प्रतिनिधी (बी. सी.) सखींकरिता विविध बँकेद्वारे मोठ्या प्रमाणात  बँक प्रतिनिधी (बी. सी.) केंद्र देण्यात आले आहेत. या बी.सी. केंद्रावर स्वयंसहाय्यता समूहातील अधिकाधिक पात्र महिलांना कार्यरत करता यावे याकरिता महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान व वुमेन्स वर्ल्ड बँकिंग यांनी राज्यातील जिल्हास्तरावर आणि तालुकास्तरावर २० ऑक्टोबर ते ३१ डिसेंबर २०२३ या काळात शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरांमध्ये स्वयंसहाय्यता समूहातील अधिकाधिक पात्र व इच्छुक महिलांनी सहभाग घ्यावा व बँक प्रतिनिधी (बी. सी.) सखी होऊन आपल्या गावामध्ये बँकेच्या सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात असे आवाहन महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे  मुख्य कार्यकारी अधिकारी रुचेश जयवंशी, जागतिक महिला बँकेच्या प्रादेशिक प्रमुख, (दक्षिण आशिया) कल्पना अजयन यांनी केले आहे.

0000

राजू धोत्रे/विसंअ/

सिल्लोड-सोयगाव मतदारसंघातील पाणी पुरवठा योजनांना गती द्यावी – मंत्री गुलाबराव पाटील

मुंबई, दि. १७ : जल जीवन मिशनअंतर्गत सिल्लोड, सोयगाव मतदारसंघातील योजनांचा आढावा घेऊन प्रलंबित कामांना गती देऊन ही कामे तातडीने पूर्ण करावीत, असे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले. तसेच अल्पसंख्याक विकास मंत्री अब्दुल सत्तार यांच्या उपस्थित वॉटर ग्रीडबाबत स्वतंत्र बैठक घ्यावी, अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली.

सिल्लोड, सोयगाव मतदारसंघातील पाणीपुरवठा योजनेची आढावा बैठक पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व अल्पसंख्यांक विकास मंत्री श्री. सत्तार यांच्या उपस्थितीत मंत्रालयात आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे, जलजीवन मिशनचे संचालक अमित सैनी, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे सहसंचालक अभिषेक कृष्णा, पाणीपुरवठा विभागाच्या मुख्य अभियंता मनीषा पलांडे, संभाजीनगरचे मुख्य अभियंता आर. एस. लोलापोडे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता दीपक कोळी, अधीक्षक अभियंता बी. के. वानखेडे, पाणीपुरवठा विभागाचे वासुदेव पाटील, छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता अजित वाघमारे, वरिष्ठ भूवैज्ञानिक छत्रपती संभाजीनगरचे जीवन बडेवाल आदी उपस्थित होते.

सिल्लोड सोयगाव मतदारसंघातील जलजीवन अंतर्गत कामाची भौतिक प्रगती, प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार संस्थांच्या कामाची सद्य:स्थिती, नेमण्यात आलेल्या त्रयस्थ तपासणी संस्थांच्या कामाची सद्य:स्थिती, तालुकानिहाय योजनांच्या खर्चाचा तपशील, सिल्लोड मतदारसंघातील योजनांची सद्य:स्थिती याबाबत यावेळी चर्चा झाली.

मंत्री श्री. पाटील म्हणाले की, सिल्लोड – सोयगाव मतदारसंघातील जलजीवन अंतर्गत सिलोडमध्ये 117 व सोयगाव 31 अशा एकूण 148 योजनांचे काम काम प्रगतीपथावर आहे. यासाठी अंदाजित रक्कम 117 कोटी रुपये नियोजित करण्यात आली आहे. ‘हर घर नल से जल’अंतर्गत केलेल्या कामाच्या गावांची संख्या 24 असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

अजिंठा गावचे जुने जलशुद्धीकरण केंद्र जिल्हा परिषदेमार्फत दुरुस्ती करून घ्यावा, अशी सूचना त्यांनी यावेळी केली. फर्दापूर पाणीपुरवठा योजना व अजिंठा पाणीपुरवठा योजना या दोन्ही योजनांचे पुनर्जीवीकरण तातडीने करून करून या योजनेचे लोकार्पण लवकरच करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मंत्री श्री. सत्तार यांनी मतदारसंघातील वॉटर ग्रीड अंतर्गत गावांच्या सद्य:स्थितीबाबत माहिती दिली. तसेच पाणीपुरवठा योजनेअंतर्गत जलवाहिनी खोदकामामुळे होणारे नुकसान कामात होणारी दिरंगाई या अनुषंगाने मंत्री श्री. पाटील यांच्या निदर्शनास आणून दिले. रस्त्याची कामे व्यवस्थितरित्या करून दिले पाहिजे. तसेच रस्त्याचे खोदकाम झाले आहे तो अर्धवट न सोडता तयार करुन द्यावा, असेही मंत्री श्री. पाटील म्हणाले.

0000

प्रविण भुरके/वि.सं.अ./

‘प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रां’चे गुरुवारी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन – मंत्री मंगलप्रभात लोढा

मुंबई दि.१७- ‘प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्र’ही संकल्पना राज्यातील तरुणांच्या रोजगार संधीसाठी आणि ग्रामीण भागाच्या विकासाला चालना देणार आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुरुवार १९ ऑक्टोबर २०२३ रोजी राज्यातील ५०० ग्रामपंचातींमध्ये ही केंद्र सुरु करण्यात येणार आहेत, अशी माहिती कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली.

मंत्रालयातील मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर कक्ष येथे आयोजित पत्रकार परिषदेत मंत्री श्री.लोढा बोलत होते. यावेळी व्यवसाय  शिक्षण व प्रशिक्षण  संचालनालयाचे संचालक दिगांबर दळवी  उपस्थित होते.

मंत्री श्री लोढा म्हणाले की, “राज्यातील २८ हजार ग्रामपंचायतींमध्ये एकही कौशल्य विकास केंद्र नव्हते. कौशल्य विकास हा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे, त्या अनुषंगाने त्यांच्या संकल्पनेनुसार ५०० ग्रामपंचातींमध्ये कौशल्य विकास केंद्रे सुरु करण्याचा निर्णय घेतला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली हा प्रकल्प पूर्ण झाला असून येत्या १९ ऑक्टोबर रोजी प्रधानमंत्री यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन होणार आहे.

रोजगारासाठी तरुणांचे गावातून शहरात स्थलांतर होऊ नये, त्या दृष्टीने कौशल्य विकास केंद्रांची संकल्पना महत्वाची असून भविष्यात राज्यातील या केंद्रांची संख्याही वाढविण्यात येईल. हा कार्यक्रम राज्यस्तरावर होणार असल्याने कौशल्य विकास, उद्योग यांच्याबरोबरच महसूल, ग्रामविकास यांच्यासह महिला व बालविकास विभागांचा यामध्ये सहभाग असणार आहे. पहिल्या टप्प्यात ज्या- ज्या गावांत हे केंद्र सुरु होणार आहे. त्याच्या आजूबाजूच्या गावातील नागरिक, लोकप्रतिनिधी आणि विविध घटकांचा कार्यक्रमात सहभाग वाढावा यासाठीचे नियोजन करण्यात येणार आहे.

लोकप्रतिनिधींसह आशा व अंगणवाडी सेविका आदीं या कौशल्य विकास केंद्राच्या उद्घाटनात सहभाग नोंदवतील. विश्वकर्मा योजनेशी संबंधित लाभार्थी आणि अन्य घटकांनाही या कार्यक्रमात सहभागी करून घेण्याचे प्रशासनाचे प्रयत्न आहेत, असेही मंत्री श्री. लोढा यांनी सांगितले.

०००००

संध्या गरवारे/विसंअ/

ताज्या बातम्या

जागतिक माध्यम संवाद २०२५ : सदस्य राष्ट्रांद्वारे वेव्हज जाहीरनाम्याचा स्वीकार

0
‘एआय’च्या युगात सर्जनशीलतेला प्रोत्साहन देताना परंपरा आणि वारशाला अभिव्यक्ती देण्यासाठी दर्शवली सहमती पक्षपात कमी करत, सामग्रीचे लोकशाहीकरण करून आणि नीतिमत्तेला प्राधान्य देताना उदयोन्मुख तंत्रज्ञानाच्या जबाबदार...

नवी मुंबईतील ‘एज्युकेशन सिटी’मध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाच्या विद्यापीठांच्या माध्यमातून शिक्षण मिळेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
मुंबई, दि. २ - विकसित भारताच्या उभारणीसाठी आखण्यात आलेल्या नवीन शैक्षणिक धोरणामुळे भारताचे दरवाजे जगासाठी खुले झाले आहेत. नवी मुंबईत आकाराला येत असलेल्या ‘एज्यूकेशन...

अखिल भारतीय सिनेमा दंतकथा नाही; चित्रपट उद्योगातील दिग्गजांचा भारतीय चित्रपटातील एकतेवर भर

0
कोविडनंतर चित्रपट पाहण्यातील बदलते कल अनुपम खेर यांनी केले अधोरेखित ज्यावेळी आपली परस्पर सामायिक संस्कृती, गाणी, कथा, माती याचा आदर करता, त्यावेळी तो...

‘वेव्हज्’ने मांडली जागतिक स्ट्रीमिंग आणि चित्रपट अर्थव्यवस्थेत भारताची विकसित होणारी भूमिका

0
“आशयाने खऱ्या अर्थाने सीमा ओलांडून प्रवास करावा यासाठी भारताने स्टुडिओ संबंधित पायाभूत सुविधा, निर्मिती केंद्रे आणि तंत्रज्ञान-चालित प्रणालीमध्ये गुंतवणूक केली पाहिजे” - शिबाशिष सरकार सर्जनशीलतेत...

जगाचे आशय निर्मिती केंद्र बनण्याकरिता भारतासाठी उत्तम काळ  – अभिनेत्री श्रद्धा कपूर

0
भारत आशय निर्मितीत अभूतपूर्व वाढ अनुभवत आहे -  इंस्टाग्राम प्रमुख अॅडम मोसेरी वेव्हज्‌ २०२५ मध्ये अनौपचारिक संभाषणात कल आणि व्हायरल होणे यावर विचारमंथन मुंबई,...