शुक्रवार, मे 2, 2025
Home Blog Page 951

तावरजा कॉलनी गॅस स्फोटातील जखमींची जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली भेट

लातूर दि. १६ (जिमाका) : येथील तावरजा कॉलनीत फुग्यात हवा भरणाऱ्या सिलेंडरचा रविवारी  स्फोट होऊन यात फुगे विक्रेता ठार झाला असून ११ लहान मुले गंभीर जखमी झाली आहेत. जखमींवर विलासराव देशमुख शासकीय वैद्यकिय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत. ही घटना समजताच जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी रविवारी रात्री रुग्णालयात जाऊन रुग्ण आणि नातेवाईकांची भेट घेतली. जखमींवर योग्य त्या उपचाराबाबत डॉक्टरांना सूचना दिल्या.

घडलेली घटना अत्यंत दुर्देवी असून जखमींवर डॉक्टर सर्वतोपरी इलाज करत आहेत. डॉक्टरांच्या टीमने तात्काळ उपचार सुरु केल्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांनी समाधान व्यक्त केले. घटना घडल्यानंतर पोलिसांनीही ताबडतोब घटनास्थळी जावून जखमी बालकांना ताबडतोब रुग्णालयात दाखल केले. पालकमंत्री गिरीश महाजन, क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनीही फोनकरून रुग्णांच्या तब्येतीची माहिती जाणून घेतल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. पोलीस घटनेची चौकशी करीत असून अशा दुर्दैवी घटना यापुढे घडू नयेत, यासाठी चौकशी अहवालानंतर जिल्हा प्रशासन निर्णय घेईल, अशी माहिती जिल्हाधिकारी यांनी यावेळी दिली.

 

कोल्हापूरचा शाही दसरा सर्वांना बरोबर घेऊन जाणाऱ्या परंपरेचे प्रतीक – श्रीमंत शाहू महाराज छत्रपती

 कोल्हापूरच्या शाही दसरा महोत्सवाची दिमाखात सुरुवात 

 पर्यटन मोबाईल ॲप, पर्यटन सुविधा केंद्र आणि पर्यटक सामान सुरक्षा केंद्राचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन

 कोल्हापूर, दि.१५ (जिमाका): सर्वांना बरोबर घेऊन जाणारी कोल्हापूरची परंपरा आहे आणि त्याचेच प्रतीक हा शाही दसरा आहे असे प्रतिपादन श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांनी शाही दसरा कोल्हापूरचा या महोत्सवाच्या उद्घाटन समारंभावेळी केले.

पर्यटन विभाग, महाराष्ट्र शासन व जिल्हा नियोजन समिती कोल्हापूर आयोजित शाही दसरा महोत्सवाचा प्रारंभ समारंभ व पर्यटन सुविधा केंद्राचे उद्घाटन भवानी मंडप येथे वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते व श्रीमंत  शाहू महाराज छत्रपती यांच्या विशेष उपस्थितीत पार पडले. उद्घाटन प्रसंगी खासदार धनंजय महाडिक, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, कोल्हापूर महानगरपालिका प्रशासक तथा आयुक्त के. मंजूलक्ष्मी, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, पर्यटन उपसंचालक शमा पवार, माजी राज्यमंत्री भरमू अण्णा पाटील, नियोजन समिती सदस्य अंकुश निपाणीकर, अमित कामत, संजय पवार आदी मान्यवर उपस्थित होते.

शाही दसरा कोल्हापूरचा या महोत्सवाच्या उद्घाटन समारंभावेळी पागा इमारतीमधील पर्यटक सुविधा केंद्राचे श्रीमंत शाहू महाराज छत्रपती, पालकमंत्री हसन मुश्रीफ, आमदार श्रीमती जयश्री जाधव यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर पर्यटक सामान सुरक्षा केंद्राचे उद्घाटन झाले. मुख्य कार्यक्रमात शाही दसरा कॅलेंडरचे अनावरण, “डेस्टिनेशन कोल्हापूर” या पर्यटन ॲपचे उद्घाटन करण्यात आले.

श्रीमंत शाहू महाराज छत्रपती म्हणाले की,  कोल्हापूरच्या दसऱ्यात सर्वजण सहभागी होत असतात, सर्वजण एकत्र येतात. सर्व जनतेसाठी असलेल्या या शाही दसऱ्याची परंपरा शेकडो वर्षापासून सुरू आहे. गेल्या वर्षापासून शाही दसरा महोत्सव सुरू झाल्याने चांगलं वातावरण पुन्हा निर्माण करण्याचा प्रशासनाकडून प्रयत्न केला जातोय. हा दसरा महोत्सव अधिक व्यापक करण्यासाठी प्रशासनाकडून अनेक सुविधा निर्माण करण्याकडे लक्ष दिले जात आहे. भाविकांसाठी रांगांची व्यवस्था, शौचालयाची व्यवस्था, माहिती देणाऱ्या केंद्राची व्यवस्था, पिण्यासाठी पाणी इत्यादी सुविधा नव्याने निर्माण केल्या जात आहेत.

शाही दसऱ्यातून कोल्हापूरचे वैभव, परंपरा जगभर जातील – पालकमंत्री हसन मुश्रीफ

कोल्हापूरचे वैभव, कोल्हापूरची परंपरा जगभर पोहोचण्यासाठी शाही दसरा महोत्सवाची निश्चितच मदत होणार असल्याचा विश्वास पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी यावेळी व्यक्त केला.

पालकमंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले की, जगभरात शाही दसरा पोहोचावा यासाठी प्रशासनाकडून उत्कृष्ट आखणी केली आहे. भाविकांसाठी वेगवेगळ्या सुविधाही निर्माण केल्या आहेत. यासाठी सर्वांनी सहकार्य करून या वैभवशाली ऐतिहासिक दसरा महोत्सवाला आपल्या नातेवाईकांसह बाहेरील मित्रमंडळींना निमंत्रित करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. येणाऱ्या संपूर्ण नवरात्रोत्सवात शाही दसऱ्याच्या दरम्यान आयोजित केलेल्या विविध कार्यक्रमांची माहिती त्यांनी यावेळी दिली.

यावेळी खासदार धनंजय महाडिक यांनी नवरात्रीच्या शुभेच्छा देऊन यावर्षीच्या दुसऱ्या शाही दसरा महोत्सवात राज्य शासनाकडून राज्यस्तरावरील महोत्सवाचा दर्जा दिल्याने आता शासनाकडून निधीची तरतूद होईल. यामुळे एक आगळावेगळा उत्साह या शाही दसऱ्यात निर्माण झाल्याचे ते म्हणाले. वसा आणि वारसा असलेल्या या दसरा महोत्सवात आपल्या पै-पाहुण्यांना निमंत्रित करा असे आवाहनही त्यांनी कोल्हापूरकरांना केले.

जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी कोल्हापूरचा वारसा, परंपरा जगभर पोहोचावा हा यामागील शाही दसऱ्याचा उद्देश असल्याचे सांगितले. त्यांनी छत्रपती चॅरिटेबल ट्रस्ट आणि श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या सहकार्याने सर्व सुविधा भाविकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत झाल्याचे सांगितले. कोल्हापूरचे ऐतिहासिक भव्य स्वरूप लोकांपर्यंत आणण्याचा हा प्रयत्न शाही दसऱ्यातून केला जातोय असे ते यावेळी म्हणाले.

पर्यटक सुविधा केंद्रात प्रथमच चार अंध दिव्यांग युवकांना माहिती देण्यासाठी नेमले आहे. या कार्यक्रमात शाही दसरा नियोजन समितीच्या विविध सदस्यांचा सन्मान महोत्सवाच्या उत्कृष्ट नियोजनासाठी करण्यात आला. महादेव नरके यांनी सूत्रसंचालन केले. कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रशासक तथा आयुक्त के.मंजूलक्ष्मी यांनी आभार मानले.

०००

विभागीय आयुक्त कार्यालयात माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांना जयंतिनिमित्त अभिवादन

नागपूर,दि.१५:  विभागीय आयुक्त कार्यालयात माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला उपायुक्त चंद्रभान पराते यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

यावेळी उपायुक्त प्रदीप कुलकर्णी, कमलकिशोर फुटाणे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

जिल्हाधिकारी कार्यालयात माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला अधीक्षक कमलाकर गायकवाड यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

यावेळी नायब तहसिलदार दिघोळे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

 

नवरात्रीनिमित्त विशेष हातमाग प्रदर्शनाचा लाभ घ्यावा – वस्त्रोद्योग आयुक्त गाडीलकर

नागपूर, दि. १५ : नवरात्री सणाच्या शुभारंभप्रसंगी १५ व १६ ऑक्टोबरला राज्य हातमाग महामंडळामार्फत आयोजित करण्यात आलेल्या विशेष हातमाग प्रदर्शनाचा लाभ नागपूरकरांनी घ्यावा. मोठ्या प्रमाणात खरेदीसाठी या ठिकाणी भेट द्यावी, असे आवाहन राज्याचे वस्त्रोद्योग आयुक्त गोरक्ष गाडीलकर यांनी येथे केले.

महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळाद्वारे नवरात्री निमित्त गोंडवाना गॅलरी, रामदासपेठ नागपूर येथे राज्याचे वस्त्रोद्योग आयुक्त गोरक्ष गाडीलकर (भा.प्र.से.) यांच्या हस्ते उद्घाटन झाले.

यावेळी मीना सूर्यवंशी, शालिनी इटनकर तसेच महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

नवरात्रीनिमित्त महिलांसाठी विशेष आयोजनाचा याचा मुख्य हेतू असल्याचे श्री. गाडीलकर  म्हणाले. खादी वस्त्रोद्योग हा देशातील महत्त्वाचा उद्योग असून पर्यावरणपूरक आहे. ग्रामीण भागात रोजगार उपलब्ध करुन आर्थिकदृष्टया दुर्बल घटकांमध्ये आत्मनिर्भरता निर्माण करणे, हे मुख्य उद्दिष्ट असल्याचेही त्यांनी सांगितले.

सकाळी 10 ते रात्री 9 वाजेपर्यंत हे प्रदर्शन असून निशुल्क प्रवेश आहे. यामध्ये खादीपासून तयार केलेल्या साड्या, चादरी, कुर्ती तसेच विविध प्रकारचे खादीचे कापड विक्रीसाठी आहेत, नागरिकांनी प्रदर्शनीला भेट देण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

०००

 

शेतरस्ते, पांदण रस्तेप्रश्नी तहसीलदारांनी आपल्या अधिकाराची काटेकोर अंमलबजावणी करावी – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील 

 नांदेड, दि. १५ (जिमाका): कृषी क्षेत्राच्या विकासात लहान – मोठ्या रस्त्यांची सहज, सुलभ उपलब्धता ही अत्यंत आवश्यक बाब आहे. अनेक गावात एक-दोन शेतकऱ्यांच्या अडमुठेपणामुळे शेकडो शेतकऱ्यांना शेतासाठी मार्गच उरत नाही. शेतीच्या इतर प्रश्नासमवेत महसूल विभागाच्या दृष्टीने शेतरस्ते व पांदण रस्त्याची जबाबदारी तेवढीच महत्त्वाची असून वेळप्रसंगी तहसीलदारांनी आपल्याला मिळालेल्या न्यायालयीन अधिकाराची अधिक काटेकोर अमंलबजावणी करावी, असे स्पष्ट निर्देश राज्याचे महसूल, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवन येथे आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी खासदार प्रताप पाटील चिखलीकर, आमदार राम पाटील रातोळीकर, आमदार राजेश पवार, आमदार बालाजी कल्याणकर, संतुकराव हंबर्डे, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, सर्व विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

 जिल्ह्यातील आपत्तीच्या काळात महसूल विभागाने आपली जबाबदारी समर्थपणे पार पाडल्याबद्दल महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी समाधान व्यक्त केले. शासनाच्या योजना, सेवा, सुविधा या जनतेपर्यंत जलद पोहचण्यासमवेत त्याचा लाभ देण्यासाठी इतर विभागांशी परस्पर समन्वय हा अधिक महत्त्वाचा असतो. यासाठी राजस्व अभियान, ई-चावडी, मिशन 90 दिवस, सलोखा योजना याची प्रभावी अंमलबजावणी महत्त्वाची आहे. देशाप्रती आपली कटिबद्धता अधिक दृढ व्हावी यादृष्टीने “मेरी माटी मेरा देश” हे अभियान जिल्ह्यातील किमान 1 लाख मुलांपर्यंत पोहोचविण्याचे निर्देश त्यांनी विभाग प्रमुखांना दिले. तलाठी, तहसिलदार, कृषि अधिकारी, पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी, जिल्हा परिषदेचे अधिकारी यांनी समन्वय ठेवून मिशन मोडवर काम केले पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी शेतरस्ते, पांदणरस्त्यांना गती मिळावी यादृष्टीने जलद नियोजन आवश्यक असल्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निदर्शनास आणून दिले. याचबरोबर लालकंधारी ही बैलाची जात कंधारची ओळख आहे. या भागातूनच लालकंधारी सर्वत्र पोहोचली. गौळ येथे शासनाची यासाठी जागा असून हे केंद्र कंधार येथे होण्याबाबत आग्रही मागणी त्यांनी महसूल मंत्री तथा पशु व संवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे केली. आमदार राम पाटील रातोळीकर, आमदार राजेश पवार, आमदार बालाजी कल्याणकर यांनी शेतरस्ते, पांदणरस्ते व शेतीच्या विम्याची रक्कम शेतकऱ्यांना मिळावी यासाठी महसूल मंत्र्यांचे लक्ष वेधले.

०००

शेतीपूरक उद्योग व्यवसाय, सहकार चळवळीकडे सकारात्मक दृष्टीने पाहणे आवश्यक – महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

नांदेड दि. १५ (जिमाका)  : शेती व शेतकरी समृद्ध होण्याचा मार्ग हा शेतीपूरक व्यवसायात दडलेला आहे. तो भक्कम होण्यासाठी सहकार चळवळीची राज्यात महत्त्वपूर्ण जोड देवून पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांनी शेती व शेतकऱ्यांना एक समृद्ध मार्ग दिला. ज्या सहकाराच्या माध्यमातून राज्याच्या ग्रामीण भागाची पायाभरणी झाली त्या सहकार चळवळीचा सकारात्मक विस्तार राज्यात झाला नाही अशी, खंत महसूल, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली.

नियोजन भवन येथे पद्यश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषद आयोजित शेतकरी सन्मान सोहळा कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी माजी केंद्रीय मंत्री सुर्यकांता पाटील, आमदार राम पाटील रातोळीकर, आमदार राजेश पवार, आमदार बालाजी कल्याणकर, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल, वसंतराव नाईक कृषि विद्यापीठ परभणीचे कुलगुरु डॉ. इंद्रमणी, पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे डॉ. अनिल भिकाने, संतुकराव हंबर्डे, कृषी परिषदेचे अध्यक्ष भागवत देवसरकर आदी मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती.

सहकार महर्षी पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांनी महाराष्ट्रात सहकारी चळवळीचा पाया घातला. सहकार चळवळीच्या माध्यमातूनच शेतकऱ्यांच्या जीवनात आमुलाग्र बदल घडणे शक्य झाले. मराठवाडा व विदर्भात मात्र सहकार चळवळी पूर्ण ताकदीने व यातील सत्वाने उभ्या राहील्या नाहीत असे महसूल मंत्री  राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले. या भागात शेतकऱ्यांच्या विकासासाठी आजही सहकार चळवळीची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

शेतकरी स्वत: खूप मोठा संशोधक आहे. संशोधनाच्या माध्यमातून अनेक प्रगत शेतकरी शेतीत नवनवीन प्रयोग करुन भरघोस उत्पादन घेत आहेत. अशा प्रगतशील शेतकऱ्यांना सोबत घेवून इतर शेतकऱ्यांना प्रगत शेती करण्यास कृषी विद्यापीठांनी प्रोत्साहीत केले पाहिजे. कृषी संशोधन केंद्रानी त्यांना सोबत घेवून संशोधन करण्यावर भर दिला तर वेगळे चित्र दिसेल. शेतकऱ्यांनी सेंद्रीय शेती करण्यावर भर देवून रासायनिक खतांचा अति वापर टाळला पाहिजे. शेती व शेतकरी हे क्षेत्र प्रयोगशील असून ही प्रयोगशिलता शेतकऱ्यांचे आत्मबल वाढवेल, अशा विश्वास महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला.

शेतकऱ्याच्या मुलांनी अधिक तंत्रकुशल होण्याची गरज – माजी केंद्रीय राज्यमंत्री सुर्यकांता पाटील

मराठवाड्यासारख्या भागातील पाण्याचे दुर्भिक्ष लक्षात घेवून केंद्रीय राज्यमंत्री असताना शेततळ्यासारखी अभिनव योजना भारतात प्रथम सुरु करण्याची संधी मला मिळाली. मराठवाड्यातील शेतकरी या योजनेतून अधिक संपन्न होईल असा विश्वास त्यावेळी होता. अन्य विभागातील व मराठवाड्यातील काही शेतकऱ्यांनी या योजनेचा पुरेपूर तंत्रशुद्ध लाभ घेवून प्रगती साध्य केली. बहुसंख्य शेतकऱ्यांनी या योजनेच्या अनुदानाकडे पाहून पाहिजे तसा या योजनेचा लाभ घेतला नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. शेती ही आता कष्टाची आहे. शेतकऱ्यांच्या मुलांनी कष्टासमवेत तंत्रकुशलताही मिळविली पाहिजे. सुरक्षा, शिक्षा व आरोग्य ही शासनाची जबाबदारी असून या त्रिसूत्रीवर विकासाचा पाया भक्कम होणे अधिक गरजेचे आहे असल्याचे त्यांनी सांगितले.

मराठवाड्यातील बहुतांश भाग हा कोरडवाहू आहे. येणाऱ्या संकटातून शेतकऱ्यांना सावरण्यासाठी कृषी व पशुसंवर्धन यांचा सुयोग्य समन्वय कसा साधला जातो हे अधिक महत्त्वाचे आहे. यादृष्टीने वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ व महाराष्ट्र पशु व मस्त्य विज्ञान विद्यापीठ मिळून संयुक्त प्रयत्नावर आम्ही भर देत असल्याचे कुलगुरु डॉ. इंद्रमणी यांनी सांगितले.

विदर्भासारखी मराठवाड्यातील काही भागात अतिवृष्टीने जमीन खरडून गेल्याने काही शेतकऱ्यांचे नुकसान झाले. अतिवृष्टीपाठोपाठ यलो मोझॅक मुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. लोहा व कंधार भागात नुकसान अधिक आहे. शासनाने या भागातील शेतकऱ्यांना अधिक मदत द्यावी, अशी विनंती आमदार राम पाटील रातोळीकर यांनी केली.

या कार्यक्रमात पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषद यांच्यावतीने मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते जिल्ह्यातील उल्लेखनिय योगदान देणाऱ्या शेतकऱ्यांचा शाल, सन्मानचिन्ह देवून गौरव करण्यात आला. व्यंकट पाटील, दशरथ संभाजीराव कपाटे, दत्ता पाटील हडसणीकर, मिथेलेश हरीशचंद्र देसाई, माधव लक्ष्मणराव राऊत, अनंत कबिरदास कदम, डॉ. जे.एच.कदम, निलेश पुनमचंद सोमाणी, तुकाराम रामजी गवळी, त्रिभुवन चव्हाण कंजारकर, मंगेश केशवराव इंगोले, संदीप सुरेश हंबर्डे, रमेश नंदकुमार पंडीत, मंजूषा गुलाबराव पावडे, प्रमोद पंजाबराव देशमुख, वसंत रामजी घोरबांड, सागर निळकंठअप्पा रावले, प्रल्हाद पाटील हडसनीकर, दत्तराव किशनराव तावडे, सुदेश नारायणराव शिंदे, दिलीप बळीराम पवार, शंकर चव्हाण उंचाडेकर, विनायक जाधव, प्रा. महेश देशमुख, दिगंबर अर्जूनराव जाधव यांचा सन्मान करण्यात आला. तसेच विशेष सन्मान दत्ता पाटील हडसणीकर, आत्माराम पाटील वाटेगावकर, एकनाथ पाटील बोरगावकर, डॉ. अविनाश खंदारे पाटील-उमरखेड यांचा करण्यात आला. यासोबत पशुसंवर्धन विभागाचे डॉ. भुपेंद्र बोधनकर, किनवटचे उपविभागीय कृषी अधिकारी राजकुमार रणवीर, कंधार तालुक्यातील बाचोटी येथील पशुपालक विठ्ठल बालाजी पांडरणे, डॉ. साईनाथ पवार, डॉ. राजीव टरफेवाड, डॉ. अविनाश बुन्नावार, डॉ. सपना पेदुलवार, डॉ. मारोजी कानोळे यांचा सन्मान करण्यात आला. दत्ता जाधव यांनी आभार मानले.

०००

आठवडी बाजाराच्या माध्यमातून महिला बचत गटांना हक्काची बाजारपेठ – मंत्री मंगलप्रभात लोढा

मुंबई, दि.१५: महिला बचत गटांनी तयार केलेल्या वस्तूंना हक्काची बाजारपेठ मिळावी यासाठी ‘आठवडी बाजार’ महत्वाची भूमिका बजावतील. मुंबई महापालिकेने आठवडी बाजारांचा अत्यंत चांगला उपक्रम सुरू केला आहे. असे गौरवोद्गार कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी काढले.

जोगेश्वरी (पूर्व) येथे महिला बचत गटांनी तयार केलेल्या गृहपयोगी वस्तूंच्या विक्रीसाठी ‘आठवडी बाजार’चे आयोजन केले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन मंत्री श्री. लोढा यांच्या हस्ते करण्यात आले ते बोलत होते.

मंत्री श्री. लोढा म्हणाले की, महिला बचतगट खूप चांगल्या प्रकारे कार्यरत असून त्यांनी तयार केलेल्या वस्तूंना बाजारपेठ मिळणे अत्यंत गरजेचे आहे. मुंबई महापालिका क्षेत्रात जिथे जागा उपलब्ध होईल, त्या – त्या ठिकाणी असे उपक्रम राबविण्यात येतील. राज्य शासन व केंद्र सरकारच्या योजनांचाही लाभ या बचतगटांना मिळावा यासाठी शासन प्रयत्नशील आहे,  असेही मंत्री श्री. लोढा यावेळी म्हणाले.

अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे म्हणाले की, गोरेगाव येथेही बचत गटांसाठी आठवडी बाजार लवकरच सुरू करणार आहोत. या बचतगटांना महापालिकेतर्फे २० हजार रूपये अनुदान देण्यात आले असून बचत गटांना ब्रॅण्डींग करण्यासाठी महापालिकेतर्फे पूर्णपणे सहकार्य केले जाईल. गोरेगावमध्ये नोकरी करणाऱ्या महिलांसाठी वर्किंग वुमन हॉस्टेलही लवकरच सुरू होणार आहे. तसेच ज्या महिला घरकाम करतात अशा महिलांसाठी प्रायोगिक तत्वावर बालसंगोपन केंद्रही सुरु करण्यात येणार आहे. त्याचबरोबर महिलांना शासनस्तरावर सहकार्य करण्यात येणार असून स्व:ताचा उद्योगव्यवसाय सुरू करण्यासाठी अनुदान अथवा कर्ज दिले जाईल. तसेच ज्या महिला घरी बसून शिलाई मशिन अथवा कांडप यंत्र चालविणे असे काम करू इच्छितात अशा पात्रताधारक महिलांसाठी १०२ कोटी रूपयांची तरतूदीतून त्यांना साहित्य वितरण करण्यात येईल, असेही डॉ. शिंदे म्हणाले.

या कार्यक्रमाला नगरसेवक पंकज यादव, अभिजित सामंत, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे, संचालक (नियोजन) डॉ.प्राची जांभेकर, एशिया पॅसिफिक लीड पब्लिक सेक्टर इनोवेशनच्या (यूएनडीपी) श्रीमती आफ्रिन सिद्दीकी, पब्लिक डिप्लोमसी ऑफिसर (वाणिज्य दूत कार्यालय, अमेरिका ) श्रीमती सीटा रैटा उपस्थित होते.

०००

आदिवासी क्षेत्रात सिंचन सुविधांचे जाळे निर्माण करणार -आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित

नंदुरबार,दि. १५ (जिमाका):  सातपुड्याच्या दऱ्याखोऱ्यात राहणाऱ्या व नेहमी निसर्गाच्या भरवश्यावर शेती करणाऱ्या आदिवासी शेतकरी बांधवांची शेती येणाऱ्या काळात ओलिताखाली आणण्यासाठी सिंचन सुविधांचे जाळे निर्माण करण्याचा मानस आहे. आयुष्यभर काबाडकष्ट करून आपली गुजराण करणाऱ्या आदिवासी बांधवांच्या सर्व प्रकारचे आवश्यक शासकीय दाखले, ओळखपत्रे यांचा खर्च आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून केला जाणार असल्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी सांगितले.

मुंदलवड ( ता. अक्राणी ) येथे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळाच्या वतीने आयोजित कामगारांसाठी साहित्य वितरण कार्यक्रमात बोलत होते. यावेळी खासदार डॉ. हिना गावित, स्थानिक लोकप्रतिनिधी सर्वश्री हेमंत वळवी, नीलम पावरा, सुभाष पावरा, हिरालाल पाडवी, लतेश मोरे, रामसिंग वळवी, केल्ला वळवी, रमेश वसावे, बळवंत पाडवी, दित्या पाडवी, अंतरसिंग वळवी, रायसिंग वळवी, प्रदीप वळवी, संदीप वळवी, गौतम वळवी, अशोक पावरा, जयसिंग चौधरी आदींसह परिसरातील बांधकाम मजूर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मंत्री डॉ. गावित म्हणाले की, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळाची स्थापना होवून चार वर्षे उलटली आहेत. या महामंडळाच्या योजनांची फायदा आपल्या जिल्ह्यातील कामगारांना कसा करून देता येईल यासाठी सातत्याने प्रयत्नशील होतो. त्यासाठी प्रयत्न सुरू ठेवले. येणाऱ्या काळात या महामंडळाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर योजनांचा लाभ आपल्या जिल्ह्यातील नागरिकांना झाल्याचे आपल्याला दिसून येईल. तसेच एका कुटुंबाच्या एकाच रेशनकार्डावर केवळ एक गॅस, एक घरकूल अशी व्यवस्था आहे, त्यामुळे एकाच मोठ्या कुटुंबातील सदस्यांना आपल्या हक्काच्या गॅस कनेक्शन व घरकुलापासून गरज असूनही वंचित रहावे लागते. त्यामुळे एकाच छताखाली, एकाच घरात राहणाऱ्या अनेक कुटुंबांनी प्रत्येक हक्काच्या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्या कुटुंबाचे स्वतंत्र रेशन कार्ड बनवून घ्यावे. तसेच राज्यातील सर्व आदिवासी बांधवांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या रेशन कार्ड, आधार कार्ड, बॅंक पासबुक, आभा कार्ड यासारख्या विविध शासनोपयोगी कार्डांचा व कागदपत्रांच्या खर्च आदिवासी विकास विभाग करणार आहे.

ते पुढे म्हणाले की, येणाऱ्या काळात सिंचनाचे जाळे जिल्हाभरात निर्माण करण्यासाठी व या भागातील शेतकऱ्यांची जमीन ओलीताखाली आणण्यासाठी जिथे शक्य असेल तिथे गाव, तालुकास्तरावर धरण, कालव्यांची निर्मिती करून पाणीपुरवठा करण्याचा मानस असून येणाऱ्या काळात मोहफुल, टोळंबी यासारख्या वनस्पतींपासून बनवल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थांच्या निर्मितीच्या प्रक्रिया उद्योगासाठी आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून निधी दिला जाणार आहे. त्यामुळे शेतीसोबत निसर्गावर आधारित पूरक व्यावसायांचे मोठे जाळे जिल्ह्यात निर्माण होणार असून त्यातून रोजगार निर्माणासोबत आदिवासी बांधवांचे परराज्यातील स्थलांतरही थांबणार आहे.

केंद्र सरकारच्या माध्यमातून जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील -डॉ. हिना गावित

खासदार डॉ. हिना गावित म्हणाल्या की, आज देण्यात आलेल्या प्रमाणपत्र व कार्डचा उपयोग फक्त कामगार साहित्य घेण्यापुरता नव्हे, तर भविष्यात तुमच्या मुलांच्या शिक्षणासाठी होईल. कामगारांना अपघात झाल्यास त्यांचा सर्व खर्च शासन करेल. दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झाल्यास त्यांना २ लाख रुपये शासनामार्फत विमा म्हणून अदा करण्यात येतील त्याचप्रमाणे आदिवासी भगिनींना प्रसूती झाल्यानंतर ५ हजार रुपये अदा करण्यात येतील. तसेच बंद झालेली उज्वला योजना आता पुन्हा ६ महिन्यांसाठी सुरू करण्यात आली आहे. सहा महिन्यांमध्ये लाभार्थींनी अर्ज करून योजनेचा लाभ घ्यावा. तसेच जल जीवन मिशन अंतर्गत ‘हर घर नल से जल’या योजनेत नंदुरबार लोकसभा क्षेत्रात सर्व पाड्यांमधील प्रत्येक घरापर्यंत पाणीपुरवठा योजनेस मंजुरी मिळाली आहे. जिल्हा परिषद शाळांच्या इमारत दुरुस्तीसाठी आदिवासी विकास विभागामार्फत निधी मंजूर करण्यात आला आहे. जि. प. शाळा डिजिटल करून आदिवासी विद्यार्थ्यांना मराठी, हिंदी, इंग्रजीसह आदिवासी बोली भाषेतून त्यांना संकल्पना समजावण्यासाठीचे नियोजन करण्यात आले आहे. सर्व आदिवासी पाड्यांमध्ये १०० टक्के विद्युतीकरण करण्याचा मानस त्यांनी यावेळी व्यक्त केला. त्याचबरोबर केंद्र सरकारच्या माध्यमातून नंदुरबार जिल्ह्यातील सर्व आदिवासी बांधवांसाठी १५० बी.एस.एन.एल आणि जिओचे टॉवर्स मंजूर केले आहेत.

०००

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारांच्या काय असतात पात्रता व अपात्रता जाणून घ्या !

सध्या जिल्ह्यात ग्रामपंचायत सार्वत्रिक व पोटनिवडणुकांची रणधुमाळी सुरु झाली आहे. १६ ऑक्टोबर २०२३ पासून ग्रामपंचायतींमध्ये सरपंच व सदस्यपदांसाठी नामनिर्देशने दाखल करण्यात येणार आहेत. ग्रामपंचायतीचे सरपंच, सदस्यपदी निवडून येण्यासाठी असलेली पात्रता व अपात्रता सोप्या आणि मोजक्या शब्दात समजून घेऊ या !

ग्रामपंचायत सदस्य होण्यासाठी खालील पात्रता असणे आवश्यक आहे

१) नामनिर्देशनपत्र सादर करण्याकरिता निश्चित करण्यात आलेल्या अंतिम दिनांकास त्या व्यक्तीचे वय २१ वर्षांपेक्षा कमी नसावे.

२) ग्रामपंचायतीच्या विद्यमान मतदार यादीमध्ये त्या व्यक्तीचे नाव समाविष्ट केलेले असावे.

३) कोणत्याही कायद्याखाली अशा व्यक्तीला ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून येण्यास अपात्र (अनर्ह) ठरविण्यात आलेले नसावे.

४) महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमाचे कलम १३ (२) (अ) नुसार जी व्यक्ती १ जानेवारी, १९९५ रोजी वा त्यानंतर जन्मलेली असेल, अशा व्यक्तींकडे किमान शालेय शिक्षणातील ७ वी इयत्तेची परीक्षा उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र असल्याशिवाय निवडणूक लढविता येणार नाही.

५) महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमानुसार एकापेक्षा जास्त प्रभागामध्ये उमेदवार म्हणून निवडणूक लढवू शकते. परंतु एकाच प्रभागात एकापेक्षा जास्त जागांवर निवडणूक लढवू शकत नाही.

महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमाचे कलम १०-१ अ  नुसार अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती किंवा यथास्थिती नागरिकांचा मागासवर्ग यांच्याकरीता राखीव असलेल्या जागेवरील निवडणूक लढविण्यासाठी संबंधित व्यक्तीने नामनिर्देशनपत्राबरोबर सक्षम प्राधिकारी यांनी दिलेले जातीचे प्रमाणपत्र आणि पडताळणी समितीने दिलेले वैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.  परंतु, जात वैधता प्रमाणपत्र नसेल तर जात पडताळणी समितीकडे नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या दिनांकापूर्वी अर्ज केलेला असेल, पडताळणी समितीकडे सादर केलेल्या अर्जाची सत्यप्रत व निवडुन आल्याचे घोषित झाल्याच्या दिनांकापासून १२ महिन्यांच्या आत जात वैधता प्रमाणपत्र सादर करील, असे हमीपत्र नामनिर्देशनापत्रासोबत सादर करील. अन्यथा, मुदतीच्या आत वैधता प्रमाणपत्र दाखल न केल्यास, त्या उमेदवाराची निवड भूतलक्षी प्रभावाने रद्द झाली असेल, असे मानण्यात येईल व ती व्यक्ती सदस्य म्हणून राहण्यास निरर्ह ठरेल.

६) महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमाचे कलम १० नुसार स्त्रियांसाठी राखीव असलेल्या जागांवर सर्व पात्र स्त्रिया अर्ज सादर करु शकतील. परंतु अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती किंवा यथास्थिती नागरिकांचा मागासवर्ग याप्रवर्गातून महिलांसाठी राखीव असलेल्या जागांवर त्या त्या प्रवर्गातीलच महिला आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करु शकतील.

७) अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व इतर मागासवर्गीय महाराष्ट्र राज्याबाहेरील इतर राज्यातून महाराष्ट्रामध्ये स्थलांतरीत झाले असल्यास त्या व्यक्तींनी ग्रामपंचायत निवडणुकामध्ये त्या जातीसाठी आरक्षित असलेल्या प्रभागातून नामनिर्देशनपत्र जरी दाखल केले असले तरी त्यांना निवडणूक लढविता येणार नाही.

ग्रामपंचायत निवडणूकीत उमेदवाराला लागू असलेल्या अपात्रतेच्या तरतुदी आपण जाणून घेऊ !

१) महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमाचे कलम १४(१)(अ-१) नुसार एखाद्या व्यक्तीस राज्य विधानमंडळाने कोणत्याही कायद्याद्वारे अपात्र ठरविले असेल तर अपात्रतेचा कालावधी संपेपर्यंत ती व्यक्ती स्थानिक ग्रामपंचायतीची निवडणूक लढवू शकणार नाही.

२) महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमाचे कलम १४ (१) (अ) (एक) व कलम १४ (१) (अ) (दोन) नुसार (अ) एखाद्या व्यक्तीला अस्पृश्यता (अपराध) अधिनियम, १९५५ किंवा मुंबई दारूबंदी अधिनियम, १९४९ अन्वये दोषी ठरविले असेल व त्यानंतर पाच वर्षांचा कालावधी संपला नसेल किंवा शासनाने त्यामध्ये सूट दिली नसेल तर अशी व्यक्ती ग्रामपंचायत निवडणूक लढवू शकणार नाही.

३) एखाद्या व्यक्तीला इतर अपराधाबाबत न्यायालयाने दोषी ठरविले असेल व तिला ६ महिन्यापेक्षा अधिक कालावधीसाठी कारावसाची शिक्षा झाली असेल व कारावासातून मुक्त झाल्यापासून पाच वर्षांचा कालावधी संपत नसेल किंवा शासनाने त्यामध्ये सूट दिली नसेल अशी व्यक्ती ग्रामपंचायत निवडणूक लढवू शकणार नाही.

४) जर एखाद्या व्यक्तीला अपराधसिद्धीनंतर जामिनावर सोडले असेल परंतु तिचे अपील निकालात काढण्यासाठी प्रलंबित असेल तर मा. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार ती व्यक्ती निवडणूक लढविण्यासाठी अपात्र ठरेल. परंतु तिच्या अपराधसिद्धीलाही स्थगिती दिली असेल तर ती व्यक्ती निवडणूक लढवू शकते.

६) महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९६५ चे कलम १४ (१) (क) नुसार संबंधित व्यक्तीस सक्षम न्यायालयाने अमुक्त नादार (Provincial Insolvency Act,१९२० अन्वये) म्हणून घोषित केलेले असणे आवश्यक आहे व ज्याला अद्याप नादारीतून मुक्तता मिळाली नाही. अशी व्यक्ती ग्रामपंचायत निवडणूक लढवू शकत नाही.

७) महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमाचे कलम १४ (१) (ब) नुसार संबंधित व्यक्तीस सक्षम न्यायालयाने विकल मनाची (Indian Lunacy Act.१९९२ अन्वये) म्हणून घोषित केलेले असेल तर अशी व्यक्ती ग्रामपंचायत निवडणूक लढवू शकत नाही.

८) महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमाचे कलम १४ (१) (ज) अन्वये एखाद्या व्यक्तीने स्वेच्छेने परकीय देशाचे नागरिकत्व मिळविले असेल किंवा कोणत्याही परकीय देशाला निष्ठा किंवा इमान देण्यास कोणत्याही कबुलीने बद्ध असेल तर ती व्यक्ती ग्रामपंचायतीची निवडणूक लढवू शकत नाही.

९) महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमाचे कलम १४ (१) (आय) नुसार एखाद्या व्यक्तीने शासन अथवा स्थानिक प्राधिकरणामध्ये कर्मचारी असेल तर त्या व्यक्तीस ग्रामपंचायत निवडणूक लढविता येत नाही.

१०) महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमाचे कलम १४ (१) (क-१) नुसार एखाद्या व्यक्तीने शासन अथवा स्थानिक प्राधिकरणामध्ये कोणतेही पद धारण केले असून तिला गैरवर्तणुकीबद्दल बडतर्फ करण्यात आले असेल तर ती व्यक्ती ग्रामपंचायत निवडणूक लढवू शकणार नाही. तथापि, अशा व्यक्तीस जर गैरवर्तणुकीबद्दल बडतर्फ करण्यात आले असेल तर तिच्या बडतर्फीपासून पाच वर्षांचा कालावधी संपल्याशिवाय ती व्यक्ती ग्रामपंचायत निवडणूक लढविण्यास पात्र होवू शकत नाही.

११) महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमाचे कलम १४ (१) (ह) नुसार एखाद्या व्यक्तीकडे ग्रामपंचायतीची/पंचायत समिती/जिल्हा परिषदेची कोणत्याही प्रकारची थकबाकी (कर व फी) देय असेल आणि ती थकबाकी देण्याविषयी कसूर करेल तर अशा व्यक्तीस निवडणूक लढविता येणार नाही.

१२) महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमाचे कलम १४ (१) (फ) नुसार जी व्यक्ती पंचायतीच्या नियंत्रणाखाली वेतनीपद किंवा लाभाचे पद धारण करीत असेल अशी व्यक्ती असे पद धारण करीत असलेल्या मुदतीत निवडणूक लढवू शकत नाही.

१३) महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमाचे कलम १४ (१) (ग) नुसार एखाद्या व्यक्तीने तिचा ग्रामपंचायतीच्या कामात/करारात/सेवेत स्वत: किंवा भागीदारामार्फत प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या सहभाग किंवा हितसंबंध असेल अशी व्यक्ती निवडणूक लढविण्यास अपात्र ठरेल.

महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमाचे कलम १४ (१) (जे-१) नुसार मुंबई ग्रामपंचायत आणि महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती (सुधारणा) अधिनियम १९९५ अन्वये प्रारंभाच्या दिनांकास म्हणजेच १३ सप्टेंबर २००० रोजी असलेल्या अपत्यांची संख्या दोनपेक्षा अधिक असली तरी अशी व्यक्ती निवडणूक लढविण्यास अपात्र ठरणार नाही. तसेच, अधिनियमाच्या प्रारंभाच्या दिनांकापासून एक वर्षांचे कालावधीत म्हणजेच १३ सप्टेंबर २००० ते १२ सप्टेंबर २००१ या कालावधीत एकाच प्रसुतीमध्ये जन्माला आलेले एक किंवा एकापेक्षा अधिक अपत्ये ही अपात्रतेसाठी विचारात घेतली जाणार नाहीत. मात्र त्यानंतर (१२ सप्टेंबर २००१ नंतर) झालेल्या अपत्यामुळे एकूण अपत्याचे संख्येत भर पडत असल्यास अशा व्यक्ती निवडणूक लढविण्यास अपात्र ठरते.

१४ ) महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमाचे कलम १४ (१) (जे-२) नुसार जिल्हा परिषदेचा सदस्य म्हणून किंवा पंचायत समितीचा सदस्य म्हणून निवडून आल्यास अशी व्यक्ती ग्रामपंचायतीचा सदस्य राहणार नाही.

१५) महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमाचे कलम १४ (१) (जे-३) नुसार ज्या व्यक्तीने शासकीय जमिनीवर किंवा सार्वजनिक मालमत्तेवर अतिक्रमण केलेले आहे, अशी व्यक्ती ग्रामपंचायत निवडणूक लढवू शकत नाही.

१६) सुलेमान अव्वास विरूद्ध प्रमोद नंदलाल यादव, २००७ (५) ऑल महाराष्ट्र लॉ रिपोर्टर २५५ नुसार एका व्यक्तीस तीन मुले होती. नंतर त्यापैकी एक मूल त्याने दत्तक दिले आहे. परंतु नामनिर्देशनपत्र दाखल करतेवेळी त्या व्यक्तीकडे दोन मुले असतील तर ती निवडणूक लढवू शकेल काय ? उत्तर :- नाही. दिनांक १२ सप्टेंबर, २००१ रोजी अथवा त्यानंतर व्यक्तीस तिसरे मूल झाले असेल तर त्याच दिवशी ती व्यक्ती निवडणूक लढविण्यास अपात्र ठरते. तसेच मूल जरी दत्तक दिले असले तरी त्या मुलाचे पालकत्व हे त्याच्या नैसर्गिक पालकांकडे (Biological Parents) गृहीत धरले जाते.

१७ ) महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमाचे कलम १४(१) (ज-४) अन्वये राज्य निवडणूक आयोगाने राजपत्रात प्रसिद्ध केलेल्या आदेशाद्वारे एखादी व्यक्ती अनर्ह असल्याचे घोषित केल्यास अशी व्यक्ती अशा आदेशाच्या दिनांकापासून पाच वर्षाच्या कालावधीकरीता ग्रामपंचायत सदस्य म्हणून राहण्यास किंवा निवडणूक लढविण्यास अनर्ह असेल अशी तरतूद आहे. उक्त तरतुदीनुसार अनर्हतेचा कालावधी संपल्यानंतर अशी व्यक्ती पुन्हा निवडणूक लढवू शकेल.

१८) विद्याधर विनायक मधाने विरूद्ध महाराष्ट्र शासन आणि इतर २००४ (३) Mh LJ ३२८  नुसार एखाद्या व्यक्तीस भारताच्या निवडणूक आयोगाने निवडणूक खर्चाचा हिशेबाच्या मुद्यावरून अपात्र ठरविले असेल तर ती व्यक्ती अपात्रता आदेशाच्या कालावधीमध्ये पुन्हा निवडणूक लढवू शकणार नाही.

१९) खाजगी अनुदानित शैक्षणिक संस्थेतील शिक्षक / कर्मचारी यांना निवडणूक लढविता येते. स्थानिक स्वराज्य संस्थेचे कर्मचारी / शिक्षक यांना निवडणूक लढविता येणार नाही.

२०) परकीय राष्ट्राचे नागरिकत्व संपादन केलेली व्यक्ती ग्रामपंचायतीची निवडणूक लढवू शकणार नाही. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमाचे कलम १४ (ज-५), मुंबई ग्रामपंचायत आणि महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती (दुसरी सुधारणा अधिनियम, २०१० (२०१० चा महा.३३) नुसार जी व्यक्ती शौचालयाचा नियमित वापर करीत असल्याबाबत ग्रामसभेच्या ठरावासोबत संबंधित पंचायतीचे प्रमाणपत्र सादर करण्यास कसूर करेल ती व्यक्ती सदस्य होण्यास / असण्यास अनर्ह ठरते.

२१) एखाद्या व्यक्तीला महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमाचे कलम ३९ नुसार ग्रामपंचायत सदस्य पदावरून आयुक्ताने दूर केले असेल तर अशा रितीने दूर करण्याच्या तारखेपासून पुढील पाच वर्षांचा कालावधी संपल्याशिवाय ती व्यक्ती निवडणूक लढविण्यास पात्र होवू शकत नाही. परंतु अशारितीने निश्चित होणारा अपात्रतेचा कालावधी हा राज्य शासन आदेशाद्वारे कमी अथवा दूर करू शकते.

२२) ग्रामपंचायत निवडणूकीमध्ये सरपंच व सदस्यपदी निवडून येण्यासाठी आवश्यक अर्हता व निरर्हता संबंधी महत्त्वाच्या तरतुदी आपण याद्वारे जाणून घेतल्या. तसेच अधिक तरतुदी स्पष्ट करुन घेण्यासाठी ग्रामपंचायत अधिनियमांतील तरतुदींचे वाचन करावे. तसेच ग्रामपंचायत निवडणूकीसाठी तहसिल कार्यालयातील स्थापित मदत कक्षाचीही आपण मदत घेऊ शकतात.

  • प्रसिद्धी- जळगाव जिल्हा निवडणूक शाखा

मुलींच्या आर्थिक उन्नतीसाठी महिला सन्मान बचत पत्र व सुकन्या समृद्धी योजना

मुलीचे शिक्षण, आरोग्य, मुलीचे लग्न तसेच त्यांच्या उज्ज्वल भविष्य सुधारण्याच्या उद्देशाने पोस्टामार्फत महिला सन्मान बचत पत्र आणि सुकन्या समृद्धी योजना राबविली जात आहे. मुलीचे भविष्य सुरक्षित करण्याच्या दृष्टीने या योजना फलदायी ठरत आहेत. या योजनांच्या माध्यमातून सामाजिक व आर्थिक विकास साधण्यासही मदत होत आहे. महिला व मुलांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या महिला सन्मान बचत पत्र आणि सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ घेऊन आर्थिक उन्नती साधता येईल.

महिला सन्मान बचत पत्र योजना

महिला सन्मान बचत पत्र योजनेअंतर्गत महिला पोस्ट ऑफिसात बचत खाते उघडू शकतात. तसेच या बचत खात्यात १ हजार रुपयांपासून ते २ लाख रुपयांपर्यंत रक्कम जमा करता येऊ शकते. महिलांनी या बचत खात्यात २ लाख रुपये जमा केल्यानंतर संबंधित महिलेला दोन वर्षांनंतर २ लाख ३२ हजार रुपये मिळतील. या योजनेच्या लाभासाठी खाते उघडण्याचा फॉर्म, केवासी दस्तऐवज (आधार  व पॅनकार्ड झेरॉक्स) या कागदपत्रांची आवश्यकता आहे. ही योजना पोस्ट ऑफिसमार्फत राबविली जात आहे. या योजनेअंतर्गत महिलेच्या नावावर किंवा मुलीच्यावतीने तिच्या नावावर तिचे पालक बचतपत्र घेवू शकतात.

या योजनेत किमान एक हजार रुपयांपासून कमाल २ लाखापर्यंत गुंतवणूक करण्याची सोय आहे. महिला व मुलीच्या नावावर कमाल २ लाखापर्यंत किमतीही बचत पत्रे घेता येतील. पण दोन बचत पत्रांमध्ये किमान तीन महिन्यांचे अंतर असले पाहिजे. या योजनेमधील गुंतवणुकीसाठी व्याजदर ७.५ टक्के तिमाही चक्रवाढ पद्धतीने असून एका वर्षानंतर ४० टक्के रक्कम काढण्याची सोय आहे. या योजनेतून घेतलेल्या बचत पत्रांची मुदत दोन वर्षाची आहे.

महिला सन्मान बचत पत्र योजनेत १ हजार रुपये गुंतविल्यास मुदतीअंती १ हजार १६० रुपये, ५० हजाराची गुंतवणूक केल्यास मुदतीअंती  ५८ हजार ११ रुपये,  रुपये १ लाखाची गुंतवणूक केल्यास मुदतीअंती १ लाख १६ हजार २२ रुपये आणि रुपये २ लाखाची गुंतवणूक केल्यास मुदतीअंती २ लाख ३२ हजार ४४ रुपये  रक्कम मिळते.

सुकन्या समृद्धी योजना

केंद्र सरकार आणि राज्य शासनामार्फत मुली व महिलांसाठी गुंतवणुकीच्या व बचत ठेवीच्या योजना राबविल्या जातात त्यापैकी एक योजना म्हणजे सुकन्या समृद्धी योजना होय. मुलीचे शिक्षण, आरोग्य, मुलीचे लग्न तसेच त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी ही एक अतिशय फायदेशीर बचत योजना आहे. मुलींचे आई-वडील एखाद्या राष्ट्रीयकृत बँकेत किंवा पोस्ट ऑफिस मध्ये बचत खाते उघडून या योजनेचा लाभ घेऊ शकतात.  या योजनेतील गुंतवणुकीवर ८ टक्के व्याजदर असून चक्रवाढ दराने व्याजाची आकारणी केली जाते. मुलीच्या जन्मापासून ते १० वर्षापर्यंत मुलीचे खाते उघडता येते. खाते उघडल्यापासून १५ वर्षापर्यंत प्रत्येक वर्षी किमान २५० रुपये ते कमाल १ लाख  ५० हजाराची गुंतवणूक करता येते.  प्रत्येक महिन्याला १००० रुपये भरत गेल्यास मुदतीअंती ५ लाख ३९ हजार ४५३ इतकी रक्कम मिळते. या योजनेतील गुंतवणूकीवर आयकरातून सूट आहे. या योजनांच्या अधिक माहितीसाठी पोस्ट कार्यालयात संपर्क साधावा.

०००

  • संकलन – एकनाथ पोवार, माहिती अधिकारी, सांगली

ताज्या बातम्या

ऑस्करमध्ये भारताचे प्रतिनिधित्व व्यापक करण्याची गरज ‘इंडियाज रिच टू ऑस्कर्स’ या विषयावरील चर्चासत्रात तज्ज्ञांचे...

0
मुंबई दि. 2 :- भारतात सध्याच्या घडीला ३५ हून अधिक भाषांमध्ये चित्रपट निर्मिती होत असून ऑस्करमध्ये एकाच प्रवेशिकेने संपूर्ण भारताचे प्रतिनिधित्व करणे कठीण आहे....

माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रासाठी शासनाचा ऐतिहासिक पुढाकार – अभिनेते अमीर खान

0
मुंबई, दि. 2 : राज्य शासनाने माध्यम आणि मनोरंजन क्षेत्राच्या विकासासाठी पुढाकार घेतला आहे. या क्षेत्रासाठी सकारात्मक विचार होत असून भारत या क्षेत्रामध्ये उत्तुंग...

वेव्हज् २०२५ : कृत्रिम बुद्ध‍िमत्ता आणि सर्जनशीलतेचा मेळ

0
मुंबई, दि. २ : ५०० दशलक्षाहून अधिक भारतीय ऑनलाइन आशय वापरत आहेत आणि प्रादेशिक भाषांकडे मोठ्या प्रमाणात वळत आहेत. सर्जनशीलता आणि उत्पादन सशक्त करणे,...

‘वेव्हज् २०२५’ मध्ये माध्यम आणि मनोरंजनासह साहस, समानतेचा उत्सव

0
मुंबई, दि. २ : कथानकांमध्ये बदल घडवण्यासाठी आणि लोकांना एकत्र आणण्यासाठी एक व्यासपीठ वेव्हज २०२५ ने उपलब्ध करून दिले आहे. चित्रपटसृष्टीत नवीन संधी निर्माण...

‘एआय’ आणि मनोरंजन क्षेत्रात भारताला नेतृत्वाची संधी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
मुंबई, दि.  २ : जागतिक स्तरावर मनोरंजनक्षेत्रात ‘एआय’चा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. येत्या काळात नवी मुंबई येथे ‘एआय’ तंत्रज्ञानची शिक्षणनगरी उभारण्यात येणार आहे....