शुक्रवार, मे 2, 2025
Home Blog Page 952

दीर्घकाळ शहरासाठी उपयुक्त असणाऱ्या कामांना प्राधान्य द्या – उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे, दि. १४ : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या बैठकीत पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील विकासकामांचा आढावा घेतला. दीर्घकाळ शहरासाठी उपयुक्त असणाऱ्या कामांना प्राधान्य द्यावे, असे निर्देश श्री.पवार यांनी यावेळी दिले.

यावेळी आमदार अण्णा बनसोडे, विभागीय आयुक्त सौरभ राव,  पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख,  मुख्य अभियंता अतुल चव्हाण आदी उपस्थित होते.

 उपमुख्यमंत्री श्री.पवार यांनी जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील दापोडी-निगडी कॉरिडॉर प्रकल्पाची माहिती घेतली. ते म्हणाले, रस्त्याच्या बाजूला दोन झाडांच्यामध्ये अधिक जागा असल्यास तेथे वृक्षारोपण करावे, प्रामुख्याने स्थानिक प्रजातीची झाडे वापरावी. पदपथाच्या बाजूला असणारी हिरवळ आणि फुलझाडांचे नीट जतन होईल याचे सुरुवातीपासून नियोजन करावे.

पदपथावर आलेले अतिक्रमण काढण्यात यावे. तसेच कामादरम्यान रस्त्याच्या बाजूला होणारे अतिक्रमण तात्काळ काढावे. पूल आणि मेट्रोमार्ग परिसरात सुशोभीकरण करण्यात यावे, असे त्यांनी सांगितले. कामांची देखभाल दुरुस्ती चांगल्या पद्धतीने होण्यासाठी उत्तम दर्जाची सामुग्री वापरावी, अशी सूचना त्यांनी केली.

 पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील पिण्याचे पाणी, सांडपाणी व्यवस्थापन, झोपडपट्टी पुनर्विकास, शहरातील अतिक्रमण काढणे आदीविषयी देखील उपमुख्यमंत्री श्री.पवार यांनी माहिती घेतली. पवना धरण भरले असले तरी आतापासून पाण्याचे योग्य नियोजन करावे, असे त्यांनी सांगितले.

 पुणे व पिंपरी चिंचवड महापालिका रुग्णालयात औषधे, मनुष्यबळ, आरोग्य सुविधांमध्ये त्रुटी राहणार नाही याची दक्षता घ्यावी, असे निर्देश श्री.पवार यांनी दिले.

 आयुक्त श्री.सिंह यांनी सादरीकरणाद्वारे प्रकल्पाविषयी माहिती दिली. दापोडी-निगडी कॉरिडॉर १२ किलोमीटर लांबीचा असून त्यात विविध प्रकारच्या सुविधांचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले.

000

बचत गटातील सदस्यांच्या सक्षमीकरणासाठी तेजस्विनी फूड्स व तेजस्विनी कलादालन उपयुक्त – महिला व बालविकास मंत्री कुमारी आदिती तटकरे

पुणे, दि. १३ : बचत गटातील सदस्यांच्या सक्षमीकरणासाठी तेजस्विनी फूड्स व तेजस्विनी कलादालन उपयुक्त आहे, असे प्रतिपादन महिला व बालविकास मंत्री कुमारी आदिती तटकरे यांनी केले.

सावरकर भवन येथे महिला आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत सुरू असलेल्या तेजस्विनी फूड्स व तेजस्विनी कलादालनास मंत्री कुमारी तटकरे यांनी भेट दिली. यावेळी त्या  बोलत होत्या. यावेळी महिला व बालविकास विभागाचे आयुक्त प्रशांत नारनवरे, उपयुक्त राहुल मोरे, बाल विकास प्रकल्प अधिकारी सुरेश टेके, बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी) तृप्ती ढेरे, रचना व कार्यपद्धती अधिकारी गोविंद इसानकर, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या जिल्हा समन्वय अधिकारी अर्चना क्षिरसागर आदी उपस्थित होते.

यावेळी मंत्री कुमारी तटकरे म्हणाल्या, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून महिला बचत गटातील सदस्यांना रोजगार उपलब्ध व्हावा या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या तेजस्विनी फूड्स व तेजस्विनी कलादालनासारखे उपक्रम स्तुत्य असून यामुळे महिला बचत गटांच्या उत्पादनांना चांगली बाजारपेठ मिळत आहे. यामुळे महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होत आहेत याचे समाधान वाटते.

सणासुदीच्या कालावधीत महिलांना उपयुक्त ठरणाऱ्या व इतर वस्तू या ठिकाणी विक्रीसाठी ठेवल्या जातात. तसेच फूड्स दालनात विविध खाद्य पदार्थांची विक्री केली जाते. याला बाजारपेठ मिळणे आवश्यक आहे. महिला बचत गटांच्या उत्पादनांना ऑनलाईन बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी विविध कंपन्यांसोबत बैठका घेऊन ऑनलाईन खरेदीची प्रक्रिया सुरू करण्यात येईल.

महिला बचत गटांच्या बळकटीकरणासाठी तसेच फूड्स आणि कलादालनाच्या विकासासाठी उपाययोजना सुचवाव्यात. बचत गटांच्या उन्नतीसाठी तसेच त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी शासनाच्या वतीने सहकार्य करण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी  कुमारी तटकरे यांनी  तेजस्विनी फूड्स व तेजस्विनी कलादालनाची पाहणी करुन महिला बचत गटांच्या सदस्यांशी संवाद साधला. श्री. नारनवरे यांनी या उपक्रमाची माहिती दिली.

‘छत्रपती शिवाजी महाराज पारंपरिक क्रीडा महोत्सवाचे डिसेंबरमध्ये आयोजन – मुंबई उपनगर पालकमंत्री मंगल प्रभात लोढा

मुंबई, दि. 13 : देशी खेळांना प्रोत्साहन मिळावे तसेच पारंपरिक क्रिडा प्रकार जपले जावेत यासाठी मुंबई उपनगर जिल्ह्यात डिसेंबर 2023 मध्ये ‘छत्रपती शिवाजी महाराज पारंपरिक क्रिडा महोत्सव’ आयोजित केला जाणार आहे. महोत्सवाचे नियोजन देशी मैदानी क्रीडा संघटनांनी समन्वय साधून  काटेकोरपणे करावे, असे निर्देश कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री तथा मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिले.

देशी मैदानी खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांबाबत मंत्रालयात आयोजित बैठकीत मंत्री श्री.लोढा बोलत होते. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी वर्षा साळवी, मालाडचे उपजिल्हाधिकारी धनाजी तोरस्कर, उपजिल्हाधिकारी संदीप निचीत, क्रीडा भारतीचे श्रीकांत धर्माधिकारी, डॉ. उत्तम केंद्रे, सदस्य गणेश विचारे तसेच विविध देशी मैदानी  क्रीडा संघटनांचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

मंत्री श्री. लोढा म्हणाले, आपले पारंपरिक क्रीडा प्रकार लुप्त होवू नयेत यासाठी अशा प्रकारचे क्रीडा महोत्सव केले जावेत, अशी मागणी वारंवार केली जाते. ही मागणी  पाहता डिसेंबर महिन्यात खो-खो,दंड बैठक, मल्लखांब, लंगडी, विटी-दांडू, लगोरी, अखाडा कुस्ती, मानवी मनोरा (पिरॅमिड), रस्सी खेच, दोरी उडी, सूर्यनमस्कार, पावनखिंड दौड, शरीरसौष्ठव, तलवार बाजी, ढाल तलवार आदी मैदानी खेळांचा समावेश करुन पंधरा दिवसांच्या क्रीडा महोत्सवाचे नियेाजन करण्यात येणार आहे. क्रीडा महोत्सवास संपूर्ण सहकार्य केले जाईल. या महोत्सवा दरम्यान खेळाडूंना विविध सोयी-सुविधा पुरविण्यात याव्यात. नियोजन काटेकोरपणे करावे अशा सूचना पालकमंत्री श्री.लोढा यांनी यावेळी केल्या.

०००

संध्या गरवारे/विसंअ/

हरविलेल्या १९ हजारपेक्षा जास्त मुली, महिलांना परत मिळविण्यात पोलिसांच्या प्रयत्नांमुळे यश

मुंबई, दि. 13 : राज्यात 05 महिन्यांत 29 हजार मुली व महिला बेपत्ता झाल्याचे वृत्त विविध माध्यमांतून  प्रसारीत झाले आहे. पण, पोलीस विभागामार्फत प्राप्त माहितीनुसार यात तथ्य नसल्याचे दिसून आले आहे. राज्यात यावर्षी मे, 2023 पर्यंत अपहरण झालेल्या मुलींपैकी 68.93 टक्के मुली परत मिळाल्या असून हरविलेल्या महिलांपैकी 63.10 टक्के महिला परत मिळाल्या आहेत, अशी माहिती महाराष्ट्र पोलीस विभागाच्या महिला व बाल अपराध प्रतिबंध शाखेने दिली आहे.

राज्यातील विविध पोलीस स्टेशनमध्ये मुली व महिला हरविल्याच्या नोंदी घेण्यात येतात. मात्र पोलीस प्रशासनाने केलेल्या तपासाअंती जानेवारी ते ऑगस्ट 2023 दरम्यान हरविलेल्या 29 हजार 807 महिलांपैकी 19 हजार 89 महिला घरी परतल्या आहेत. त्याचप्रमाणे जानेवारी ते ऑगस्ट 2023 दरम्यान अपहरण झालेल्या 5 हजार 495 मुलींचा शोध घेण्यात आला आहे. मुली व महिला हरविल्याच्या तुलनेत त्यांचा शोध घेऊन घरी परतण्याचे प्रमाण अधिक आहे. महिला, मुली हरविल्याची तक्रार नोंद झाल्यानंतर संबंधित पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी महिलेचा कसून शोध घेतात. तपासासाठी आवश्यक पर्यायांचा उपयोग करीत महिलेला शोधून घरापर्यंत आणण्यात येते.

राज्य शासन महिलांच्या सक्षमीकरणासाठी विविध योजनांची अंमलबजावणी करीत आहे. राज्याचा गृह विभाग महिलांच्या सुरक्षेसाठी विविध उपक्रम राबवित आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी गृह विभाग कटिबध्द आहे.

000

निलेश तायडे/विसंअ/

दीक्षाभूमी व चैत्यभूमीप्रमाणेच येवल्याच्या मुक्तिभूमीला ऐतिहासिक महत्त्व – मंत्री छगन भुजबळ

मुक्तिभूमी येथे ८८ व्या धर्मांतर घोषणेचा वर्धापन दिन कार्यक्रम संपन्न 

नाशिक, दिनांक: 13 (जिमाका वृत्तसेवा): महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १३ ऑक्टोबर १९३५ रोजी येवला येथे धर्मांतराची घोषणा केली होती. त्यामुळे या ऐतिहासिक स्थळाला मुक्तिभूमी म्हणून संबोधण्यात येते. नागपूर येथील दीक्षाभूमी व दादारची चैत्यभूमी प्रमाणेच येवल्याच्या मुक्तिभूमीला ऐतिहासिक महत्त्व असल्याचे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले.

आज येवला येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुक्तिभूमी येथे ८८ व्या धर्मांतर घोषणेच्या वर्धापन दिन कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. यावेळी केंद्रीय सामाजिक न्याय तथा सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले, मुक्तिभूमी स्मारक समितीचे सदस्य व मोठ्या संख्येने कार्यकर्ते व अनुयायी उपस्थित होते.

मंत्री छगन भुजबळ म्हणाले, दरवर्षी १३ ऑक्टोबर, विजयादशमी व १४ एप्रिल या दिवशी देशभरातून लाखो बौद्धबांधव मुक्तिभूमीवर डॉ.बाबासाहेबांना वंदन करण्यासाठी येत असतात. तसेच वर्षभर हजारो पर्यटक आणि बौद्धबांधव येथे भेटी देत असतात. मुक्तिभूमी स्थळाला डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे पदस्पर्श लाभल्यामुळे हे स्थान अतिमहत्त्वाचे तीर्थस्थळ बनलेले आहे. १३ ऑक्टोबर १९३५ रोजी येवला येथे परिषद भरली. भारताच्या कानाकोपऱ्यातून १० हजार अनुयायी येथे जमले होते. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतराची घोषणा केल्यामुळे या जागेला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे. धर्मांतराच्या ऐतिहासिक घोषणेनंतर तब्बल २१ वर्षांनी १३ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपूर येथे बौद्ध धर्माची दीक्षा घेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी धर्मांतर घोषणेची प्रतिज्ञापूर्ती केली होती. त्यामुळे नागपूर हा धर्मांतराचा कळस तर येवला मुक्तिभूमी धर्मांतराचा पाया असल्याचे म्हटले जाते. असेही मंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी सांगितले.

नाशिक शहरात त्रिरश्मी बुद्ध लेणी येथील बुद्ध स्मारकाच्या परिसरात २४ ऑक्टोबर २०२३ रोजी श्रीलंकेतील अनुराधापुर येथील बोधी वृक्षाच्या फांदीचे रोपण करण्यात येणार आहे. या बोधी वृक्षारोपणाच्या महोत्सवासाठी देश विदेशातून उपासक येणार असल्याने या कार्यक्रमास सर्वांना उपस्थित राहण्याचे आवहन मंत्री छगन भुजबळ यांनी उपस्थितांना केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार सर्वांनी पुढे न्यावेत : केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

येवला शहर  डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी असून येथे त्यांनी ८८ वर्षांपूर्वी  धर्मांतराची घोषणा केली होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेले संविधान हे सर्व जाती, धर्माला न्याय देणारे संविधान आहे. संविधानातून अखंड भारताची रचलेली लोकशाही जगभरात कौतुकास पात्र आहे. १२ वर्षानंतर या मुक्तिभूमीस १०० वर्षे पूर्ण होत आहे. त्या निमित्ताने जागतिक स्तरावर या स्थानाला महत्त्व प्राप्त होण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न व्हावेत तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार सर्वांनी पुढे न्यावेत अशी अपेक्षा यावेळी केंद्रीय सामाजिक न्याय तथा सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली.

कार्यक्रमाच्या सुरवातीला राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ आणि केंद्रीय सामाजिक न्याय तथा सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मुक्तिभूमी येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून बुद्धवंदना केली.

येवला मुक्तिभूमी विकास कामे

मुक्ती भूमीचे महत्त्व लक्षात घेवून सदर जागेवर सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत पहिल्या टप्प्यात विश्वभुषण स्तुपाचे १५ कोटी किंमतीचे बांधकाम पूर्ण झालेले आहे. फेज १ अंतर्गत येवला येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची ऐतिहासिक मुक्तिभूमी चा विकास करून याठिकाणी भगवान गौतम बुद्ध यांची मूर्ती, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा, विश्वभूषण स्तूप व विपश्यना हॉल निर्माण करण्यात आले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या येवला मुक्तिभूमी या ऐतिहासिक स्थळाला महाराष्ट्र शासनाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या दिवशी ‘ब’ वर्ग तीर्थस्थळाचा दर्जा देण्यात आलेला आहे. येवला मुक्तिभूमी स्मारक परिसरात फेज दोन अंतर्गत पाली व संस्कृत अभ्यास केंद्र, सुसज्ज ग्रंथालय, ऑडीओ व्हिज्युअल रूम, आर्ट गॅलरी, ॲम्पीथिएटर, मिटिंग हॉल, भिक्कू पाठशाला, १२ भिक्कू विपश्यना खोली, कर्मचारी निवासस्थान, डायनिंग हॉल, संरक्षण भिंत, लॅण्डस्केपिंग, आदी विकास कामे पूर्ण झाली आहे.

राज्य घटनेनुसार लोकसेवेचे काम सुरु राहणार – पालकमंत्री संजय राठोड

यवतमाळ,दि.१३ (जिमाका) : भारतीय राज्यघटनेमध्ये लोकप्रतिनिधींचे कर्तव्य आणि जबाबदाऱ्या लिखित आहेत. या राज्यघटनेनुसारच लोकसेवेचे काम सुरु असून यापुढेही ते सुरु राहणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी केले.

दिग्रस तालुक्यातील लाख, तुपटाकळी आणि सावंगा येथील विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण पालकमंत्री श्री.राठोड यांच्याहस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उपविभागीय अधिकारी एकनाथ काळबांडे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सुधीर देशमुख, राजकुमार वानखेडे, उत्तमराव ठवकर, लाख, तुपटाकळी आणि सावंगा ग्रामपंचायतीचे सरपंच, माजी जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पालकमंत्री संजय राठोड पुढे म्हणाले, राज्यघटनेचे शिल्पकार डॅा.बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात लोकप्रतिनिधींचे कर्तव्य, जबाबदाऱ्या समाविष्ट केल्या आहेत. या घटनेनुसारच कृती आणि जबाबदाऱ्या पार पाडण्याचा प्रयत्न करीत आहे. जातीधर्म, गरीब-श्रीमंत न पाहता सर्वसामान्य, शेतकरी हिताची कामे केली जात आहे. गोरगरीब, शेतकरी, महिलांच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणण्याचा प्रयत्न सातत्याने करीत आहे. लोकहिताची कामे ही बोलण्यापेक्षा करुन दाखवण्यावर माझा विश्वास आहे. लोकांचे ऋण फेडण्याच्या भूमिकेतून काम करीत आहे. यापूर्वीही अनेक विकासाची कामे केली असून यापुढेही सार्वजनिक विकासकामांसाठी निधी उपलब्ध करुन दिला जाईल, असेही पालकमंत्री श्री.राठोड यांनी सांगितले.

आगामी काळात मोठे उद्योग आणून तरुणांना रोजगाराच्या संधी ग्रामीण भागातील महिलांना सक्षम करण्यासाठी धोरण आखले जात आहे. या माध्यमातून महिला बचत गटांना उद्योग उभारण्यासाठी आर्थिक सहाय्य केले जात आहे. ग्रामसंघांना गोदामासाठी ५० लाख रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. ग्रामीण भागात डांबरी पांदन रस्ते, शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्याचा प्रयत्न करणार आहे. जलसंधारणाची कोट्यवधी रुपयांची कामे होणार आहेत. त्याचे नियोजन सुरु आहे. निराधारांना १५०० रुपये देण्यात येणार आहे. शेतकऱ्याला केंद्रबिंदू मानून त्यांच्या जीवनामध्ये समृद्धी आणण्याचा प्रयत्न करत आहोत.

शेतकरी हिताचे निर्णय घेतले जात आहेत. अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे बाधित शेतकऱ्यांच्या मदतीसाठी निधी उपलब्ध झाला आहे. नमो शेतकरी सन्मान निधी योजनेतून आर्थिक सहाय्य दिले जात आहे. आरोग्य शिबिर, नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया, गोरगरिब रुग्णांना मदत आदी लोकाभिमुख कामे केली  जात असल्याचे पालकमंत्री श्री. राठोड म्हणाले.

पालकमंत्री संजय राठोड यांनी दिग्रस तालुक्यातील लाख येथे २ कोटी २९ लाख, तुपटाकळी ३ कोटी २० आणि सावंगा येथील २ कोटी रुपयांच्या विकासकामांसाठी निधी उपलब्ध करुन दिल्याबद्दल ग्रामस्थांकडून त्यांचा सत्कार करण्यात आला.

चिमुकल्यांनी केले नऊ भाषेत पालकमंत्र्यांचे स्वागत

तुपटाकळी येथील जिल्हा परिषद शाळेतील चिमुकल्या मुलामुलींनी जपानी, ग्रीक, इंग्रजी, तेलगु, कन्नड, गुजरातीसह नऊ भाषांमध्ये पालकमंत्री संजय राठोड यांचे स्वागत केले. चिमुकल्यांच्या या भाषाज्ञानाचे कौतुक करुन पालकमंत्र्यांनी या विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

अभिवाचन, काव्यवाचनाने मंत्रालयात साजरा झाला ‘वाचन प्रेरणा दिन’

मुंबई, दि. १३ : माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जातो. यानिमित्त आज मंत्रालयात आयोजित कार्यक्रमात मंत्रालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी अभिवाचन आणि काव्यवाचन करून वाचन प्रेरणा दिन साजरा केला.

मराठी भाषेच्या संवर्धनाबरोबरच भाषेच्या प्रचार व प्रसाराच्या हेतूने मराठी भाषा विभागाकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. त्याचाच एक भाग म्हणून रविवारी येणाऱ्या वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य साधून मंत्रालयाच्या त्रिमूर्ती प्रांगणात अभिवाचन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. अभिवाचनासाठी शिवराज्याभिषेकाच्या 350 व्या वर्षानिमित्त ‘350 वा शिवराज्याभिषेक छत्रपती शिवाजी महाराजांचा, उत्सव शिवचरित्रपर पुस्तकाच्या वाचनाचा’ हा विषय निवडण्यात आला.

या अभिवाचन आणि काव्यवाचन कार्यक्रमात सर्वश्री ज्ञानेश पाटमासे, अतुल कुलकर्णी, अजय सावद, दीपक दळवे, अरविंद शेटे, श्रीमती अनघा पटवर्धन, सोनाक्षी पाटील, शिल्पा नातू, सारिका चौधरी, पूजा भोसले, मंगल नाखवा आदींनी सहभाग घेऊन वृत्तपत्रातील लेख, शिवचरित्रात्मक पुस्तकांतील उतारा, कविता वाचन, ओवी गायन, गीत गायन, बखरीतील लेख, शिवरायांचे मूळ मोडी लिपितील पत्र व त्याबाबतचे विवेचन असे विविधांगी वाचन आणि गायन सादर केले. कार्यक्रमाचे निवेदन वासंती काळे यांनी केले.

वाचन प्रेरणा दिनानिमित्त मराठी भाषेतील पुस्तकांचे प्रदर्शन देखील आयोजित करण्यात आले. यात मराठी भाषा विभागाच्या अखत्यारीतील विविध मंडळे, शासकीय मुद्रणालय, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांच्या स्टॉलचा समावेश होता. मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव तथा सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे यांनी प्रदर्शनास भेट देऊन पाहणी केली. तसेच अभिवाचन कार्यक्रमास उपस्थित राहून अधिकारी, कर्मचाऱ्यांचा उत्साह वाढविला.

०००

बी.सी.झंवर/विसंअ

महिला आयोग आपल्या दारी उपक्रमातून महिलांचे सक्षमीकरण करणार – अध्यक्ष रूपाली चाकणकर

बुलडाणा, दि. : महिलांच्या सक्षमीकरणासाठी राज्य शासन विविध उपायोजना आणि योजना राबवत आहे. या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचून महिलांचे सक्षमीकरण करावे, असे आवाहन राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आज महिलांविषयी समस्यांचा आढावा घेण्यात आला. यावेळी राज्य महिला आयोगाच्या सदस्य आभा पांडे, जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते, जिल्हा पोलिस अधीक्षक सुनील कडासने, अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी, जिल्हा महिला बालविकास अधिकारी अमोल डिगोळे आदी उपस्थित होते.
श्रीमती चाकणकर म्हणाल्या, महिला आयोगाकडे आज एकूण 165 तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. वैवाहिक कौटुंबिक 113, सामाजिक तीन, मालमत्ता आणि आर्थिक 17, कामाच्या ठिकाणी महिलांचा होणारा लैंगिक छळतील कामाच्या ठिकाणी त्रास शून्य, इतर 29 अशा तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या सर्व तक्रारींची दखल घेऊन संबधित विभागांना कारवाईच्या सूचना दिल्या आहे. जिल्ह बालविवाहाले प्रमाण भविक आहे. त्यामुळे या क्षेत्रात अधिक कार्य करणे गरजेचे आहे. गेल्या काळात 29 बालविवाह रोखण्यात यश आले असून दोन जणांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. बालविवाहाचे प्रकार होऊ नये, यासाठी विवाह संबंधित ज्या संस्था आणि लोक असतील त्यांच्यावरही कारवाई करण्यात येणार आहे.  बालविवाह रोखल्यानंतर संबंधित मुलींची समुपदेशन करण्याची जबाबदारी पार पाडावी. तसेच त्यांच्यासाठी आर्थिक स्त्रोतांची व्यवस्था करण्यात यावी.
आजच्या बैठकीत प्रामुख्याने कोविडमुळे अनाथ झालेली मुले, एकल महिला, शेतकरी आत्महत्यांमुळे महिलांची स्थिती आणि त्यांना देण्यात येणारे लाभ याबाबत माहिती देण्यात आली.
प्रत्येक आस्थापनेमध्ये दहाच्यावर कर्मचारी असल्यास त्या ठिकाणी अंतर्गत तक्रार निवारण समिती स्थापन करावे, असे निर्देश आहे. या समितीना व्यापक अधिकार देण्यात आलेले आहे. शासकीय कार्यालयात या समित्या कार्यरत असल्या तरी खाजगी आस्थापनांमध्ये याबाबत सकारात्मकता दिसून येत नाही. त्यामुळे खाजगी आस्थापनांमध्ये या समिती स्थापन होण्यासाठी पुढाकार घेण्यात यावा.
स्वच्छता ही मूलभूत गरज आहे. मात्र शाळा, सार्वजनिक ठिकाणी, एसटी महामंडळाचे बसस्थानक आदी ठिकाणी सार्वजनिक शौचालयाची स्थिती अत्यंत वाईट आहे. ही स्थिती 15 दिवसाच्या आत सुधारावी, असे निर्देश देण्यात आले आहे. महिलांच्या विकासासाठी पीएम विश्वकर्मा, ई-श्रम कार्ड, मदत, स्वाधारगृह, वस्तीगृह आदी व्यवस्था तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे श्रीमती चाकणकर यांनी सांगितले.

कोळी समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी सहकार्य करणार – विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई, दि. १३ : राज्यातील अनुसूचित जमातीतील महादेव कोळी, टोकरे कोळी, मल्हार कोळी या जमातीतील व्यक्तींना जात प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र मिळणेबाबत येणाऱ्या अडचणी आणि इतर प्रश्न सोडविण्यासाठी सहकार्य करणार असल्याचे विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी सांगितले.

राज्यातील अनुसूचित जमातीतील कोळी महादेव, टोकरे कोळी, मल्हार कोळी व इतर तत्सम जमातीतील व्यक्तींना जात प्रमाणपत्र व जातवैधता प्रमाणपत्र मिळणे या विषयाबाबत उपसभापती डॉ. गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवन येथे बैठक झाली.

या बैठकीस आमदार रमेश पाटील, आदिवासी विकास विभागाचे सचिव विजय वाघमारे, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे आयुक्त डॉ.राजेंद्र भारूड, महसूल विभागाचे सहसचिव जमीर शेख, सामाजिक न्याय विभागाचे सहसचिव सो. ना. बागूल, कोकण विभागीय उपायुक्त अनिल साखरे आदी उपस्थित होते.

उपसभापती डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, आदिवासी विकास मंत्री यांच्याकडे राज्यातील महादेव कोळी, टोकरे कोळी, मल्हार कोळी या जमातीच्या प्रलंबित प्रश्नांसंदर्भातील शिष्टमंडळाने दिलेले निवेदन पाठविण्यात येईल. मंत्री आदिवासी विकास विभाग याबाबत बैठक घेतील. त्यांच्या बैठकीतील निर्णयाचा अहवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पाठविला जाईल. मुख्यमंत्री यांच्याकडे आदिवासी विकास विभाग, सामाजिक न्याय विभाग व महसूल विभाग यांची याबाबत संयुक्त बैठक घेण्यात येईल. या समाजाला जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र देण्याबाबतचा निर्णय हा धोरणात्मक असेल.

०००

शैलजा पाटील/विसंअ

महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांची बालगृहाला भेट

पुणे, दि.१३: महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी येरवडा येथील बालगृहाला भेट देऊन परिसराची पाहणी केली.

यावेळी आमदार सुनील टिंगरे, महिला व बालविकास आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे, सहआयुक्त राहुल मोरे, विभागीय उपआयुक्त संजय माने, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी मोनिका रंधवे आदी उपस्थित होते.

श्रीमती तटकरे म्हणाल्या, बालगृहात २२ विद्यार्थी महिला व बालविकास विभागाच्यावतीने देण्यात येणाऱ्या शासनाच्या बालसंगोपन सुविधेचा लाभ घेत आहेत. परिसरात महिला व बाल विकास विभागाच्या जागेवर असलेल्या जुन्या इमारतींचे ऐतिहासिक महत्त्व जपत नियमांचे पालन करुन याठिकाणी नवीन इमारती उभारण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. परिसरात महिला बचत गटासाठी सुविधा, नोकरदार महिलासांठी वसतिगृहे आदी सुविधा देण्याच्या विचार करण्यात येत आहे. त्यासाठी उपलब्ध जागेचे योग्य नियोजन करण्याच्या संबंधितांना सूचना देण्यात आल्या आहेत.

महिला व बाल विकास आयुक्त कार्यालयासाठी पूर्वीच्या प्रस्तावामध्ये बदल करुन त्यामध्ये आणखी नवीन बाबी समाविष्ट करण्यात येणार आहे. नवीन इमारतीमध्ये विभागाची सर्व कार्यालये एकाच ठिकाणी उपलब्ध करुन देण्यासाठी प्राधान्य देण्यात येत आहे. याबाबत उपमुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली आहे. त्यासाठी शासनाच्यावतीने सहकार्य करण्यात येईल. यासाठी लागणारा निधी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यामातून उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल, असेही श्रीमती तटकरे म्हणाल्या.

सुरुवातीला श्रीमती तटकरे यांनी रस्त्यावरील बालकांच्या आरोग्य, आहार व पुनर्वसनासाठी असलेल्या फिरते पथक प्रकल्पाविषयी माहिती जाणून घेतली.

महिला व बाल विकास आयुक्त डॉ. नारनवरे यांनी यावेळी परिसरातील जागा व फिरते पथक प्रकल्पाविषयी माहिती दिली.

ताज्या बातम्या

महाराष्ट्र व गुजरात देशाच्या विकास आणि जागतिक पटलावर नाव चमकणारी राज्ये : केंद्रीय गृहमंत्री...

0
नवी दिल्ली, दिनांक १ : भारताला समृद्ध करणारे भारताचे नाव जागतिक पटलावर येण्यात मोठी भूमिका निभावणारे महत्वाचे राज्य ठरणाऱ्या महाराष्ट्र आणि गुजरात राज्यांचा राज्य...

मुंबईत साकारणार ‘आयआयसीटी’- माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव

0
वेव्हज् परिषद – २०२५ मुंबई, दि. ०१ : भारतात पहिल्यांदाच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी (IICT) मुंबईत स्थापन होणार असून, त्यासाठी केंद्र सरकारने ४०० कोटी...

सृजनशीलतेत चैतन्य निर्माण करण्याची क्षमता – पंतप्रधान नरेंद्र मोदी

0
मुंबई, दि. ०१ : व्यक्तीला चैतन्यमय व प्रसन्नतेने जगण्याचा अनुभव देण्याची ताकद ही सृजनशीलतेत आहे. त्याचप्रमाणे वाईट गोष्टींना निष्प्रभ करण्याची क्षमता असलेली सृजनशीलता प्रत्येकाने...

बॉलिवूडचे महान अभिनेते मनोज कुमार यांना ‘वेव्हज्’ ची श्रद्धांजली

0
मुंबई, दि. ०१: वेव्हज् २०२५ मध्ये ‘मनोज कुमार यांच्या आठवणींना उजाळा : उत्कृष्ट चित्रपट निर्माते, अस्सल राष्ट्रवादी’ या ‘वेव्हज् ब्रेकआउट’ सत्रात श्रद्धांजली वाहण्यात आली....

‘वेव्हज्’ सारख्या सुंदर उपक्रमाचा भाग असल्याचा अतिशय आनंद – हेमा मालिनी

0
वेव्हज् परिषद – २०२५ कला आणि व्यावसायिक सिनेमा यामध्ये भेदभाव नाही - लोकांच्या हृदयाला स्पर्श करतं ते कथाकथन - मोहनलाल अभिनय हे माझं बालपणापासूनचं...