गुरूवार, मे 1, 2025
Home Blog Page 953

मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना’ – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

मुंबई, दि. १० : राज्यात मुलींच्या जन्मास प्रोत्साहन देऊन मुलींचा जन्मदर वाढविणे, मुलींच्या शिक्षणास चालना देणेमुलींचा मृत्यूदर कमी करणे व बालविवाह रोखणे, कुपोषण कमी करणे, शाळा बाह्यमुलींचे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी प्रोत्साहित करणे यासाठी मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी’ ही योजना राज्यात सुरु करण्यात येणार आहे, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री कु.आदिती तटकरे यांनी दिली.

या योजनेत पिवळ्या व केशरी रेशनधारक कुटुंबात मुलींच्या जन्मानंतर ५ हजार रुपयेइयत्ता पहिलीत ६ हजार रुपयेसहावीत ७ हजार रुपयेअकरावीत ८ हजार रुपये अनुदान दिले जाईल. लाभार्थी मुलींचे वय १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर तिला ७५ हजार रुपये रोख देण्यात येतील. राज्यातील अंदाजे अडीच लाख मुलींना या योजनेचा लाभ मिळेल.

सन २०२३-२४ च्या अर्थसंकल्पीय भाषणांत उपमुख्यमंत्री तत्कालीन वित्त मंत्री  देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या घोषणेप्रमाणे ‘लेक लाडकी योजने’ मध्ये लाभार्थ्यांना लाभ देण्याचे प्रस्तावित होते.महिला व बाल विकास विभागामार्फत राज्यात सद्यःस्थितीत सुधारित “माझी कन्या भाग्यश्री” ही योजना दि.१ ऑगस्ट २०१७ पासून राबविण्यात येत आहे. या योजनेत दरवर्षी सुमारे ५००० लाभार्थी पात्र ठरत होते. त्याकरिता वार्षिक सुमारे १२ कोटी एवढा खर्च येत होता.आता ही योजना बंद होणार असून नव्या स्वरूपात लेक लाडकी योजना’ राबविण्यात येणार आहे.

शासनामार्फ़त थेट लाभार्थी हस्तांतरण (DBT) द्वारे लाभाची रक्कम  लाभार्थ्यांना अदा करण्यात येणार आहे.

या योजनेची अंमलबजावणी एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालयामार्फ़त करण्याकरिता पोर्टल तयार करून त्याकरिता तसेच योजनेतील लाभार्थ्यांची पोर्टलवर नोंदणी होऊन योजना सुरळीत कार्यान्वित राहण्याकरिता आयुक्तालयस्तरावर एक कक्ष निर्माण करण्यात येणार आहे. त्यामध्ये तांत्रिक मनुष्यबळ बाह्ययंत्रणेद्वारे उपलब्ध करुन घेण्यास मान्यता देण्यात आली आहे. या व तदनुषंगिक प्रशासकीय खर्च भागविण्याकरिता आवश्यकतेनुसार येणाऱ्या अतिरिक्त खर्चास मान्यता देण्यात आली आहे.

०००

संध्या गरवारे/विसंअ/

तृतीयपंथीयांनी शासकीय योजनांचा लाभ घ्यावा – शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर            

मुंबई दि. १० : समाजातील प्रत्येक घटकाच्या विकासासाठी शासन कटिबद्ध आहे. तृतीयपंथीयांसाठी शासन विविध योजना राबविते. या समुदायातील व्यक्तींनी या योजनांचा लाभ घेण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे अवाहन शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केले.

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत तृतीयपंथी व्यक्तींच्या कल्याणकारी योजनांबाबत राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन यशवंतराव चव्हाण सभागृह मुंबई येथे करण्यात आले होते. या कार्यशाळेचे उद्घाटन मंत्री श्री.केसरकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

या कार्यशाळेस सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगेबार्टीचे महासंचालक सुनिल वारेसंत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक धम्मज्योती गजभियेकिन्नरमां ट्रस्टच्या सलमा खानयुएनडीपी चे डॉ. चिरंजिवी भट्टाचार्यतृतीयपंथीयांसाठी काम करणाऱ्या सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

मंत्री श्री. केसरकर म्हणाले की,  मानसिक बदल आणि संवादाच्या माध्यमातून तृतीयपंथीयांना समजून घेऊन समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सर्व मिळून प्रयत्न करु या. तृतीयपंथीयांसाठी रोजगार निर्मिती करून सक्षमीकरणावर शासन भर देत आहे. या  समुदायासाठी वसतिगृह उभारण्याचा विचार सुरू असून इतर राज्यातील धोरणांचा अभ्यास करून या समुदायांसाठी राज्याचे सर्वंकष धोरण तयार करण्याचे काम सुरू आहे. या समुदायांचे जीवनमान उंचावेल यासाठी शासन नेहमीच प्रयत्नशील राहील. तृतीयपंथीयांच्या समस्याप्रश्न व मागण्यांबाबत लवकरच मुख्यमंत्री महोदयांकडे बैठक घेण्यात येईलअसेही मंत्री श्री. केसरकर यांनी सांगितले.

या कार्यशाळेचे चार सत्रात आयोजन करण्यात आले होते. पहिल्या सत्रात तृतीयपंथीय व्यक्तींच्या सामाजिक समस्या, नोंदणी प्रमाणपत्र व ओळखपत्र याबाबत डॉ. वैशाली कोल्हे, सलमा खानपवन यादव यांनी माहिती दिली. दुसऱ्या सत्रात सामाजिक व आर्थिक उन्नतीच्या योजना आणि शिक्षण व रोजगार याबाबत श्रीदेवी रासक यांनी माहिती दिली. तिसऱ्या सत्रात तृतीयपंथीय व्यक्तींचे आरोग्यपुनर्वसन आणि कल्याणकारी योजना याबाबत डॉ. चिरंजिवी भट्टाचार्य यांनी माहिती दिली. चौथ्या सत्रात तृतीयपंथीय व्यक्तींचे मानसिक आरोग्यतृतीयपंथीय व्यक्तींचे सामाजिक प्रश्न व त्यांचे मानवी हक्क अबाधित राखण्यासाठी सार्वजनिक धोरणाद्वारे निवारण याबाबत प्रा. श्याम मानवनिर्मला सामंत प्रभावळकर यांनी माहिती दिली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सामाजिक न्याय विभागाचे सचिव श्री. भांगे यांनी केले, तर आभार अवर सचिव रवींद्र गोरवे यांनी मानले. या कार्यक्रमास प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण, मुंबई वंदना कोचुरेसहायक आयुक्त समाज कल्याण मुंबई शहर प्रसाद खैरनारसहायक आयुक्त समाजकल्याण रायगड सुनील जाधव, सहायकआयुक्त समाजकल्याण ठाणे समाधान इंगळे उपस्थित होते.

०००

शैलजा पाटील/विसंअ/

मनोधैर्य योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी संगणकीय प्रणाली निर्माण करणार – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

मुंबई, दि. १० : अवैध मानवी वाहतूकहिंसा आणि लैंगिक शोषितपीडित महिला व बालकांच्या पुनर्वसनासाठी शासनस्तरावर विविध उपाययोजना राबवित आहेत. शासनाची मनोधैर्य योजना अत्यंत प्रभावीपणे राबविण्यासाठी संगणकीय प्रणाली निर्माण करण्यात येणार असल्याची माहिती, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.

अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध पुनर्वसन प्रक्रिया सक्षमीकरण संदर्भात आज मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंत्री कु. तटकरे बोलत होत्या.

मंत्री कु.तटकरे म्हणाल्या कीबलात्कारबालकांवरील लैंगिक अत्याचार आणि ॲसिड हल्ला या गुन्ह्यातील पीडितांना न्याय देण्यासाठीतसेच त्यांना आयुष्यात आणि समाजात पुनर्स्थापित करण्यासाठी राज्य शासन मनोधैर्य योजना राबवीत आहे. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आता संगणकीय प्रणालीचा वापर करण्यात येणार आहे.

अनैतिक मानवी तस्करी प्रक्रियेतून सुटका केलेल्या बालकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांना शासकीय शाळेत प्रवेश देऊन त्यांचे शैक्षणिकरित्या सक्षमीकरण करण्यात यावे. याचबरोबर पुनर्वसन गृहातील महिलांना विविध विभागांशी जोडून स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात. तसेच समाजात राहून पुनर्वसन करण्यासाठी कार्यवाही करण्याच्या सूचनाही यावेळी मंत्री कु.तटकरे यांनी दिल्या.

बैठकीस विप्ला फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद निगुडकर यांच्यासह प्रतिनिधी उपस्थित होते.

००००

श्रद्धा मेश्राम/स.सं

शिपिंग, लॉजिस्टिक क्षेत्रातील उद्योग वृद्धीसाठी सहकार्यात महाराष्ट्र नेहमीच आघाडीवर राहील – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. 10 :- दळण-वळणाच्या दृष्टीने भारत भौगोलिकदृष्ट्या सुस्थापित असून जगासाठी लॉजिस्टिक्स हब ठरण्याची क्षमताही आहे. या पार्श्वभूमीवर शिपिंग आणि लॉजिस्टिक क्षेत्रातील उद्योग वृद्धीसाठी सहकार्य करण्यात महाराष्ट्र नेहमीच आघाडीवर राहील, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

मित्सुई ओएसके लाईन्स लि. च्या प्रतिनिधी मंडळाने उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी संचालक ज्युनिचिरो ईकेडामासारु ओनिशीदक्षिण आशिया आणि मध्यपूर्व भागाचे प्रभारी अजय सिंगकॅप्टन आनंद जयरामनउपमुख्यमंत्री यांचे सचिव डॉ. श्रीकर परदेशी हे उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले कीदेशात विविध क्षेत्रात झपाट्याने विकास होत आहे. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. थेट परकीय गुंतवणुकीत राज्य पहिल्या क्रमांकावर आहे. ऊर्जा निर्मितीच्या क्षेत्रातही राज्य अग्रेसर आहे. पुण्यात इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टरची उभारणी करण्यात येत असून राज्यात सर्वच क्षेत्रात भक्कम पायाभूत सुविधांच्या उभारणीचे काम वेगाने सुरू असल्याचे उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.

शिपिंग आणि लॉजिस्टिक क्षेत्रातील उद्योग वृद्धीसाठी सर्व आवश्यक सहकार्य करण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.

शिपिंग आणि लॉजिस्टिक क्षेत्रासाठी आवश्यक इको सिस्टिम महाराष्ट्रात उपलब्ध आहे. कंपनीमार्फत या क्षेत्रातील करिअरसाठी प्रशिक्षण व कौशल्य विकास कार्यक्रमही घेण्यात येतात अशी माहिती मित्सुई ओ.एस.के. लाईन्सच्या प्रतिनिधी मंडळाने यावेळी दिली.

मित्सुई ओ.एस.के. लाइन्स (MOL) ग्रुप जगभरात दैनंदिन जीवनाला आणि उद्योगांना आधार देणारी संसाधनेऊर्जाकच्चा माल आणि तयार उत्पादनांसह विविध वस्तूंची सुरक्षित आणि स्थिर वाहतूक सेवा उपलब्ध करून देत आहे. विविध उद्योगांमध्ये मल्टीमोडल ओशन शिपिंग कंपनी म्हणून आघाडीवर आहे. एमओएल समूह आपल्या ग्राहकांच्या आणि मोठ्या प्रमाणावर समाजाच्या गरजा आणि मागणीनुसार शाश्वत आणि धोरणात्मक उपक्रम राबवत असल्याचे प्रतिनिधी मंडळातील सदस्यांनी सांगितले.

—–000——-

मंत्रिमंडळ बैठक

राज्यात मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना’ मुलींना करणार लखपती

मुंबई, दि. १० : राज्यात मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजना राबवून गरीब कुटुंबातील मुलींना लखपती करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.  बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.
पिवळ्या व केशरी रेशनकार्डधारक कुटुंबात मुलीचा जन्म झाल्यावर ५ हजार रुपये, इयत्ता पहिलीत गेल्यावर ६ हजार रुपये, सहावीत गेल्यावर ७ हजार रुपये, ११ वीत गेल्यावर ८ हजार रुपये, १८ वर्षे पूर्ण झाल्यावर ७५ हजार रुपये, अशा रितीने एकूण त्या मुलीस १ लाख १ हजार रुपये एवढा लाभ मिळेल.
या संदर्भात अर्थसंकल्पीय भाषणात उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली होती.  माझी कन्या भाग्यश्री ही योजना अधिक्रमित करून १ एप्रिल २०२३ पासून जन्मणाऱ्या मुलींसाठी ही योजना राबविण्यात येईल.
मुलींच्या जन्मास प्रोत्साहन देऊन त्यांचा जन्मदर वाढविणे, मुलींच्या शिक्षणास चालना देणे, मुलींचा मृत्यूदर कमी करणे व बालविवाह रोखणे, कुपोषण कमी करणे आणि मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहन देणे यासाठी ही योजना राबविण्यात येईल. १ एप्रिल २०२३ नंतर कुटुंबात जन्मणाऱ्या १ अथवा २ मुलींना त्याच प्रमाणे १ मुलगा व १ मुलगी असल्यास मुलीला या योजनेचा लाभ मिळेल.  दुसऱ्या प्रसुतीच्या वेळी जुळी अपत्ये जन्माला आल्यास १ मुलगा किंवा दोन्ही मुलींना या योजनेचा लाभ मिळेल.  मात्र आई किंवा वडिलांनी कुटूंबनियोजन शस्त्रक्रीया करणे आवश्यक राहील.  १ एप्रिल २०२३ पूर्वी १ मुलगी किंवा मुलगा आणि आणि त्यानंतर दुसरी मुलगी किंवा जुळ्या मुली जन्माला आल्यास त्यांना या योजनेचा लाभ मिळेल.  जुळ्या दोन्ही मुलांना स्वतंत्र लाभ देण्यात येईल. लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न १ लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे.

उदंचन जलविद्युत प्रकल्पासाठी धोरण मोठी खासगी गुंतवणूक जलविद्युतमध्ये येणार

सार्वजनिक खासगी भागीदारीतून उदंचन जलविद्युत प्रकल्पासाठी (Pumped Storage Projects) स्वतंत्र धोरण राबवून मोठ्या प्रमाणावर खासगी गुंतवणूकीला जलविद्युतमध्ये प्रोत्साहन देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.  बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.
राज्यात १० हजार ७५७ मेगावॅट अपारंपरिक ऊर्जा उत्पादन झाले आहे.  २०२५ पर्यंत ही ऊर्जा क्षमता २५ हजार मेगावॅटपर्यंत गाठण्याचे उद्दीष्ट आहे.  सौर तसेच वाऱ्याच्या वेगाद्धारे निर्माण होणारी ऊर्जा पुरेशी नाही. त्यामुळे अशाश्वत नवीकरणीय ऊर्जा क्षमतेमध्ये तफावत येऊन एकूणच ग्रीडला आव्हानांचा सामना करावा लागू शकतो.  त्यामुळे एनर्जी स्टोरेज सिस्टिमला महत्त्व आहे.  यामध्ये अन्य पारंपरिक ऊर्जा प्रकल्पांना एनर्जी स्टोरेज सिस्टिममधून ऊर्जा देऊन ग्रीडचे संतुलन ठेवता येऊ शकते. वीज निर्मितीत खंड पडल्यास अथवा तुडवडा पडल्यास या सिस्टिममधून ऊर्जा उपलब्ध होऊ शकते.  केंद्रीय विद्युत मंत्रालयाने देखील देशात उदचंन जलविद्युत प्रकल्पांना उत्तेजन देण्याचे ठरविले आहे.
या धोरणाद्धारे उदचंन जलविद्युत प्रकल्पातून (पीएसपी) मेगावॅट लेव्हल एनर्जी स्टोरेज क्षमता विकसित करणे सद्य:स्थितीतील पंप हायड्रो सोलर हायब्रील पॉवर प्रकल्पांना प्रोत्साहन देणे, आंतरखोरे हस्तांतरणासाठी प्रोत्साहन देणे तसेच खासगी क्षेत्रातील गुंतवणूक आकर्षित करण्यात येईल.  या संदर्भातील विकासकाची निवड सामजंस्य कराराद्धारे सरळ वाटप किंवा स्पर्धात्मक निविदा प्रक्रीयेतून करण्यात येईल.
उदचंन प्रकल्पाच्या माध्यमातून एनर्जी स्टोरेज सिस्टिमद्धारे क्षमता वाढविता येऊ शकते.  शिवाय ते पर्यावरण स्नेही आणि स्वस्त आहे.  सध्या घाटघर येथे उदचंन प्रकल्प २००८ पासून कार्यान्वित आहे.

सांगली,अहमदनगर जिल्ह्यात जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालये

सांगली, अहमदनगर जिल्ह्यात  जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालये सुरु करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.  बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.
सांगली जिल्ह्यातील विटा येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय स्थापन करून १९ नियमित पदे व ५ मनुष्यबळाच्या सेवा बाह्य यंत्रणेद्धारे घेण्यास मान्यता देण्यात आली यासाठी एकूण १ कोटी ५० लाख ६८ हजार २५६ इतका खर्च येईल. या नव्या न्यायालयात पलूस, विटा, कडेगाव, आटपाडी या तालुक्यातील १ हजार ९१३ प्रकरणे वर्ग होतील. सध्या विटा येथे २ दिवाणी न्यायालये (वरिष्ठ स्तर) व ३ दिवाणी न्यायालये (कनिष्ठ स्तर) कार्यरत आहेत.
अहमदनगर जिल्ह्यात राहाता येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय सुरु करण्यात येईल. १९ नियमित पदे व ६ मनुष्यबळाच्या सेवा बाह्य यंत्रणेद्धारे घेण्यास मान्यता देण्यात आली यासाठी एकूण २ कोटी १३ लाख ७६ हजार ४२४ इतका खर्च येईल.
कोपरगाव न्यायालयाकडून या न्यायालयात एकूण १३३६ प्रकरणे वर्ग होणार आहेत.  राहाता न्यायालयाच्या क्षेत्रात प्रलंबित खटल्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला.

फलटण ते पंढरपूर नवीन ब्रॉडगेज रेल्वेमार्ग आता रेल्वे मंत्रालयातर्फे पूर्ण करणार

फलटण ते पंढरपूर नवीन ब्रॉडगेज रेल्वेमार्ग आता महारेल ऐवजी रेल्वे मंत्रालयातर्फे पूर्ण करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.  बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.
फलटण ते पंढरपूर हा रेल्वेमार्ग तयार करण्यासाठी महाराष्ट्र लोहमार्ग पायाभूत विकास कंपनीने (महारेल) १८४२ कोटी रुपये खर्चाच्या या  प्रकल्पाचा अहवाल तयार केला होता.  यामध्ये राज्य शासनाचा सहभाग ९२१ कोटी इतका असून  हा निधी टप्प्याटप्याने उपलब्ध करून देण्यात येत आहे.  हा प्रकल्प महारेल ऐवजी रेल्वे विभागातर्फे राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

भोसला मिलिटरी स्कूलला नागपूर येथे जमीन

नाशिक येथील भोसला मिलिटरी स्कूलला नागपूर येथे जमीन देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.  बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.
नागपूर येथे मौजा चक्कीखापा येथील स.क्र. ६४/१, आराजी २१.१९ हे.आर. ही जमीन ३० वर्षाच्या भाडेपट्टयाने देण्यात येईल. भोसला मिलिटरी स्कूल हे नाशिक येथील सेंट्रल हिंदू एज्युकेशन सोसायटी मार्फत चालविण्यात येत असून अतिविशिष्ट गुणवत्ताधारक आणि ख्यातनाम संस्था म्हणून या संस्थेस जागा देण्याचा निर्णय झाला आहे.
या ठिकाणी भारतीय प्रशासनीक पूर्व सेवा तयारी प्रशिक्षण वर्ग निवासी सुविधा व वरिष्ठ महाविद्यालयासह सुरु करण्यात येईल.

विद्यापीठाच्या नावात औरंगाबाद ऐवजी छत्रपती संभाजीनगर बदल करण्यास मान्यता

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नावात औरंगाबाद ऐवजी छत्रपती संभाजीनगर असा बदल करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.  बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.
यामुळे या विद्यापीठाचे नाव आता डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर असे होईल.  या विद्यापीठासमोर नमूद जिल्ह्यांच्या सूचित देखिल औरंगाबाद ऐवजी छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबाद ऐवजी धाराशिव असा बदल करण्यात येईल.
नवीन अभ्यास पाठ्यक्रम, विषय, नवीन महाविद्यालये, अतिरिक्त तुकड्या सुरु करण्यासाठी आता पूर्वीच्या तारखेत बदल करण्यात येऊन १५ नोव्हेंबर २०२३ पूर्वी विद्यापीठाच्या कुलसचिवांकडे विहित नमुन्यात अर्ज करण्यास मान्यता देण्यात आली.

पात्र माजी खंडकरी शेतकऱ्यांना १ एकरापेक्षा कमी जमिनीचे देखील वाटप होणार

पात्र माजी खंडकरी शेतकऱ्यांना १ एकरापेक्षा कमी जमीन देखील वाटप करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.  बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.
महाराष्ट्र शेत जमीन (जमीन धारणेची कमाल मर्यादा) अधिनियम १९६१ सुधारणा अधिनियम २०१२ मधील मार्गदर्शक सूचना ९.३ मध्ये संदर्भ क्र.२ अन्वये खंडकरी शेतकऱ्यास १ एकर पेक्षा कमी क्षेत्र परत करावे लागत असल्यास असे क्षेत्र परत करण्यात येऊ नये अशी सुधारणा करण्यात आली होती.  मात्र, माजी खंडकरी शेतकरी यांच्याकडून सातत्याने होणारी मागणी लक्षात घेता १ एकरापेक्षा कमी क्षेत्र देय असल्यास देखील त्याचे वाटप करण्याचा निर्णय आज घेण्यात आला.
महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रिकरण करण्याबाबत अधिनियम १९४७ अन्वये निश्चित केलेले किमान प्रमाणभूत क्षेत्राचे उल्लंघन न करता शेतकऱ्यास देय क्षेत्र वाटप करावे असे ठरले.

रुग्णांना तत्काळ उपचारसेवा पुरविण्यासाठी आरोग्य यंत्रणेने सतर्क रहावे – विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय

अमरावती, दि.6 : रुग्णालयात दाखल होणाऱ्या प्रत्येकाला तात्काळ उपचार सुविधा उपलब्ध होण्यासाठी चोवीस तास सतर्क राहून आवश्यक वैद्यकीय सेवा-सुविधा, औषधी व उपकरणांची तजवीज करुन ठेवावी. औषधे व उपचाराअभावी कोणालाही जीवाला मुकावे लागणार नाही, यासाठी आरोग्य यंत्रणेने जबाबदारीपूर्वक काम करावे. आरोग्य सेवा-सुविधांबाबत नियमितता राहण्यासाठी संबंधित जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, नगरपालिका प्रशासन आदींनी आरोग्य केंद्र, रुग्णालयांना दररोज प्रत्यक्षरित्या भेट द्यावी. तेथील आरोग्य सेवासुविधांचा, अनुषंगिक बाबींचा आढावा घेऊन त्यासंबंधीचा अनुपालन अहवाल सादर करावा, असे निर्देश विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय यांनी आज येथे दिले.

राज्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेबाबत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या बैठकीला विभागीय आयुक्त डॉ. पाण्डेय दूरदृश्यप्रणालीच्या माध्यमातून उपस्थित होत्या. त्यानंतर विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित बैठकीत विभागीय आयुक्तांनी अमरावती विभागाचा आरोग्य व्यवस्थेसंबंधीचा आढावा दूरदृश्यप्रणालीच्या माध्यमातून घेतला. अमरावती विभागांतर्गत येणाऱ्या पाचही जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, महापालिका आयुक्त देविदास पवार, आरोग्य उपसंचालक, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दिलीप सौंदळे, जिल्हा आरोग्य अधिकारी, नगरपालिका प्रशासनाचे अधिकारी आदी यावेळी उपस्थित होते.

डॉ. पाण्डेय म्हणाल्या की, रुग्णसेवा हीच खरी ईश्वर सेवा मानून आरोग्य विभागाने रुग्णांना तात्काळ उपचार सेवा-सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात. जिल्ह्यातील प्रत्येक गरजूला वेळेत वैद्यकीय उपचार मिळावेत, ही जिल्हा प्रशासनाची जबाबदारी असल्याने आरोग्यविषयक बाबींची पूर्तता होण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे. आरोग्य सेवा सुविधांबाबत सुसुत्रता व नियमितता राहण्यासाठी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या जिल्ह्यातील रुग्णालयांना सकाळच्या सुमारास दररोज प्रत्यक्ष भेट देऊन तपासणी करावी. तसेच तपासणी करताना रुग्णालयाच्या नियमित कामांत अडथळा निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी. आयसीयु व ओपीडीतील रुग्णांशी संवाद साधून उपचार व सोयीसुविधेबाबत माहिती जाणून घ्यावी, जिल्ह्यातील क्षेत्रीय रुग्णालयांना भेटी देऊन आवश्यक वैद्यकीय बाबींचा आढावा घ्यावा. ग्रामीण भागातील रुग्णांशी संवाद साधून त्यांची गाऱ्हाणी समजून घ्यावी. आवश्यकतेनुसार आवश्यक निधी जिल्हा नियोजन योजनेतून आरोग्य संस्थांना उपलब्ध करुन द्यावा, असे त्यांनी सांगितले.

पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, एकही बालक लसीकरणापासून वंचित राहू नये, यासाठी ‘इंद्रधनुष्य मिशन’ची प्रभावी अंमलबजावणी जिल्ह्यात करावी. औषधांचा साठा, वैद्यकीय उपचार यंत्र, संसाधन, बाह्य व आंतर रुग्ण कक्षातील(ओपीडी-आयपीडी) रुग्ण संख्या, वैद्यकीय उपकरणांची सद्यस्थिती, डॉक्टर्स व परिचारिकांची संख्या, सुरक्षा रक्षक, वार्डातील रुग्णांची सद्यस्थिती, प्रसुती व शिशू अतिदक्षता व ओपीडी कक्षातील सोयीसुविधेबाबत सविस्तर आढावा घेण्यात यावा. रुग्णांना वेळेत व दर्जेदार आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी रुग्णालय व्यवस्थापनामार्फत सर्तकता बाळगण्यात यावी. यासाठी रुग्णालयात औषधांचा पुरेसा साठा, वैद्यकीय उपकरण-यंत्रे, वैद्यकीय तज्ज्ञ, स्त्रीरोग व बालरोग तज्ज्ञ नियमितपणे सेवेत उपलब्ध ठेवावे. रुग्णालय व रुग्णालयाचा परिसरात नियमितपणे स्वच्छता ठेवावी. शुध्द पिण्याच्या पाण्याची सुविधा रुग्णालयात नियमित उपलब्ध राहील याची दक्षता घ्यावी. तसेच रुग्णालयांतील रिक्त पदे तातडीने भरण्यासाठी कार्यवाही करावी. मनुष्यबळ कमी असल्यास कंत्राटीपद्धतीने पदे भरुन कामे करावीत, असेही विभागीय आयुक्तांनी  यावेळी सांगितले.

आरोग्य केंद्रात उपचारासाठी येणाऱ्या कोणत्याही नागरिकांना परत पाठवू नये, त्यांना आवश्यक असणारे उपचार व औषधे तातडीने उपलब्ध करून द्यावीत. आरोग्य केंद्रात शुध्द पिण्याचे पाणी व वीज पुरवठा अखंडीत सुरु राहील याची दक्षता घ्यावी. दुर्गम भागातील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी परिसरातील नागरिकांना वेळेत वैद्यकीय उपचार पुरविण्यासाठी पुरेसा औषधसाठा, आवश्यक लसी, इंजेक्शन केंद्रात उपलब्ध ठेवावा. औषधसाठा संपण्यापूर्वी पुरेशा वेळेत त्याचा अंदाज घेऊन आवश्यक औषध साठा वेळेत उपलब्ध होईल, याची खात्री बाळगावी. औषधसाठ्याची माहिती ई-सुश्रुत किंवा ई-औषधी या पोर्टलवर वेळोवेळी अपलोड करावी, आरोग्य सेवेचा लाभ घेण्यासाठी येणाऱ्या रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांचीही आस्थेने चौकशी करून दाखल रुग्णावर तातडीने आवश्यक व योग्य औषधोपचार करावेत, रुग्णांच्या नातेवाईकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी त्याचबरोबर रुग्णालय व रुग्णालयाचा संपूर्ण परिसर स्वच्छ ठेवावा, असेही डॉ. पाण्डये यांनी यावेळी सांगितले.

00000

भारत-युगांडातील परस्परसंबंध दृढ व्हावेत – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई दि. ९- भारत आणि युगांडा दरम्यान थेट हवाई संपर्कामुळे व्यवसाय, व्यापार, संस्कृती, पर्यटन, आरोग्य सेवांचा विस्तार होणार आहे. अशा पाऊलामुळेच दोन्ही देशांतील परस्पर संबंध दृढ होणार असून समृद्धी, शांतता व चांगल्या भविष्यासाठी सहकार्य मजबूत होईल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

युगांडा प्रजासत्ताकच्या राष्ट्रीय दिन आणि मुंबई-एंटेबे थेट उड्डाणाच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मंत्री धर्मरावबाबा आत्राम, मंत्री एडवर्ड वामला, प्रा जॉयस किकाफुंडा, मधुसूदन अग्रवालजी, विनोद सरोगीजी आणि अबुल हुसेन समीर सोमय्याजी, जुही चावला, जय मेहता आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

सुरुवातीला मुख्यमंत्र्यांनी उपस्थितांना युगांडा प्रजासत्ताकच्या राष्ट्रीय दिना निमित्त शुभेच्छा दिल्या. ते पुढे म्हणाले की, युगांडा हा आफ्रिकेतील सर्वात सुंदर देशांपैकी एक आहे. भारत आणि युगांडाचे द्विपक्षीय संबंध अनेक दशकांपासून आहेत. 40 हजारांपेक्षा जास्त भारतीय आज युगांडात राहतात आणि ते युगांडाच्या विकासात योगदान देत आहेत. आज सुरु होणाऱ्या भारत ते युगांडा विमानसेवेमुळे दोन्ही राष्ट्रांच्या अर्थव्यवस्थेत निश्चितच भर पडेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

0000

ज्येष्ठ नागरिकांना आधार देण्याचा संकल्प करूया – निवृत्त न्यायमूर्ती के.के.तातेड

मुंबई दि. ९ : ज्येष्ठ नागरिकांची काळजी घेणे ही केवळ आपली जबाबदारी नाही, तर आपले कर्तव्यच आहे. ज्या ज्येष्ठांना मदतीचीआधाराची गरज असते त्यांना आधार देण्याचा संकल्प करू या, असे महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती के.के.तातेड यांनी सांगितले.

 राज्य मानवी हक्क आयोग आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या अधिकारांच्या संरक्षणासाठी काम करणाऱ्या यंत्रणा आणि शासकीय योजनांची माहिती या विषयावर जागरूकता कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते.

या कार्यक्रमास उपजिल्हाधिकारी कल्याण पांढरेपोलीस उपायुक्त प्रवीण मुंढेमाजी महापौर निर्मला सामंत प्रभावळकरमानसोपचारतज्ज्ञ डॉ. हरीश शेट्टी उपस्थित होते.

श्रीमती प्रभावळकर म्हणाल्या की, केंद्र शासनाने ज्येष्ठ नागरिक यांचा निर्वाह व कल्याण अधिनियम राज्य शासनाने ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या मालमत्तेचे रक्षण व त्यांचा उदरनिर्वाह, वैद्यकीय उपचाराकरिता संरक्षण कायदा केलेला आहे. त्यांनी याचा गरजेनुसार वापर करावा.

डॉ. शेट्टी म्हणाले कीज्येष्ठ नागरिकांनी नियमित आरोग्य तपासणी करून घ्यावी. निरोगी राहण्याकरीता आवश्यक झोप घेणेवेळेवर जेवण करणे इत्यादी बाबी त्यांनी समजावून सांगितल्या.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक राज्य मानवी हक्क आयोगाचे  सदस्य एम. ए. सय्यद यांनी केले. तर विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. जय जाधव यांनी आभार मानले.

***

शैलजा पाटील/विसंअ/

‘दिलखुलास’ कार्यक्रमामध्ये प्रधान मुख्य वनसंरक्षक शैलेश टेंभुर्णीकर यांची उद्या मुलाखत

मुंबई, दि. 9 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात प्रधान मुख्य वनसंरक्षक तथा वनबल प्रमुख शैलेश टेंभुर्णीकर यांची मुलाखत प्रसारित करण्यात येणार आहे.

नामशेष होत चाललेल्या वन्य पशुपक्षांबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी वन विभागाच्या वतीने राज्यात दरवर्षी 1 ते 7 ऑक्टोबर दरम्यान ‘वन्यजीव सप्ताह’ साजरा केला जातो. या कालावधीत वन्य जीवविषयी निबंध, चित्रकला स्पर्धा घेणे, वन्यजीव तज्ज्ञ, पक्षी मित्र यांचे व्याख्यान आयोजित करणे, वन्यजीवविषयी माहिती व चित्र प्रदर्शन दाखवणे, पक्षी निरीक्षण करणे इत्यादी उपक्रम वन विभागामार्फत राबविण्यात येतात. या उपक्रमांमध्ये नागरिकांचा सहभाग कसा होता, या उपक्रमांची अंमलबजावणी कशा प्रकारे करण्यात आली याबाबत प्रधान मुख्य वनसंरक्षक तथा वनबल प्रमुख श्री. टेंभुर्णीकर यांनी ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून माहिती दिली आहे.

‘दिलखुलास’ कार्यक्रमातून ही मुलाखत उद्या मंगळवार दि. 10, ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर प्रसारित होणार आहे. निवेदक शंतनू ठेंगडी यांनी ही मुलाखत घेतली आहे.

0000

राज्य कौशल्य विद्यापीठाच्या कामकाजाचा राज्यपालांकडून आढावा

???????????????????????????????

मुंबई, दि. 9 : केंद्र व राज्य शासन कौशल्य विकासाला सर्वाधिक चालना देत आहे. सर्वसाधारण पदवीपेक्षा कौशल्य विकासातील पदवीला महत्व आले आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास विद्यापीठाने राज्यात विद्यार्थ्यांसाठी विविध आधुनिक कौशल्य अभ्यासक्रम राबवावे, अशी सूचना राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस यांनी केली.

राज्यपाल श्री. बैस यांनी सोमवारी (दि.९) महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या कामकाजाचा राजभवन येथे आढावा घेतला त्यावेळी ते बोलत होते.

पनवेल येथे आयटीआय पनवेलच्या जागेवर विद्यापीठाची इमारत तसेच आयटीआयची नवी वास्तू उभारण्याच्या कामाचे मार्च महिन्यात भूमिपूजन झाले असून पुढील वर्षी जून पर्यंत विद्यापीठाच्या इमारतीचे पहिल्या टप्प्याचे बांधकाम पूर्ण होणे अपेक्षित आहे, असे कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरु डॉ. अपूर्वा पालकर यांनी यावेळी सांगितले.

कौशल्य विकास अभ्यासक्रमांची आवश्यकता लक्षात घेऊन विद्यापीठाने खारघर येथे एक इमारत भाडेतत्त्वावर घेऊन यावर्षीपासूनच कौशल्य विकासाचे १५ पदव्युत्तर, पदवी व प्रमाणपत्र अभ्यासक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे अशी माहिती त्यांनी दिली.  यासाठी विद्यापीठाने अनुभवी प्राध्यापक देखील नेमले असल्याचे त्यांनी सांगितले. पुणे येथे देखील यावर्षीपासून कौशल्य विकास अभ्यासक्रम सुरु करीत असल्याचे त्यांनी राज्यपालांना सांगितले.

विद्यापीठाने तयार केलेल्या अभ्यासक्रमांमध्ये कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी, इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी, बॅचलर ऑफ व्होकेशनल ट्रेनिंग, बॅचलर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन (रिटेल),  आदरातिथ्य, डिजिटल मार्केटिंग, बिझनेस अनॅलिटिक्स आदी अभ्यासक्रमांचा समावेश आहे, अशी माहिती त्यांनी दिली. विद्यापीठाने आपले अभ्यासक्रम राबविण्यासाठी विविध नामवंत कंपन्यांशी सहकार्य करार केले असल्याचे त्यांनी सांगितले.

???????????????????????????????

Governor reviews the work of State Skills University

Maharashtra Governor and Chancellor of the public universities in the State Ramesh Bais reviewed the working of the newly created Maharashtra State Skills University (MSSU) at Raj Bhavan Mumbai.

Vice Chancellor of MSSU Dr Apoorva Palkar made a presentation on the university’s new campus and its activities. She apprised the Governor of the various Post Graduate, Under Graduate and Certificate programmes started by the University.

0000

 

ताज्या बातम्या

भारताच्या निरंतर विकासामध्ये महाराष्ट्राची सर्वात महत्त्वाची भूमिका – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
मुख्यमंत्र्यांकडून महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा मुंबई, दि. ०१: महाराष्ट्राकडे भारतातील सर्वात पुरोगामी आणि प्रगतिशील राज्य म्हणून पाहिले जाते. छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब...

प्रगत, संपन्न महाराष्ट्र साकारण्यासाठी कटिबद्ध होऊया – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
मुंबई, दि. ३० : - महाराष्ट्र देशाच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावत असून, आपल्या सर्वांच्या प्रयत्नातून, सहकार्यातून आणखी प्रगत, संपन्न महाराष्ट्र साकारण्यासाठी कटिबद्ध होऊया, असे...

एमएचटी-सीईटी २०२५ पीसीएम गटाच्या परीक्षेत तांत्रिक त्रुटी; ५ मे रोजी फेर परीक्षा 

0
मुंबई, दि. ३० : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून दि.२७ एप्रिल २०२५ रोजी घेण्यात आलेल्या एमएचटी-सीईटी २०२५ (पीसीएम गट) सामाईक प्रवेश परीक्षेच्या सकाळच्या सत्रामध्ये...

जातनिहाय जनगणनेचा निर्णय क्रांतिकारी ठरेल – मंत्री अतुल सावे

0
मुंबई, ‍‍दि. ३० : केंद्र सरकारने घेतलेला जातनिहाय जनगणनेचा निर्णय हा ओबीसी व वंचित घटकांच्या दृष्टीने क्रांतिकारी ठरेल, असे इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे...

अल्पसंख्यांक विभागांतर्गत योजनांच्या कामाचा राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्याकडून आढावा 

0
मुंबई, दि. ३० : अल्पसंख्यांक विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांच्या कामकाजाच्या अल्पसंख्यांक राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी मंत्रालयात आढावा घेतला. राज्यमंत्री माधुरी मिसाळ म्हणाल्या की, मौलाना...