सोमवार, एप्रिल 28, 2025
Home Blog Page 966

विधानपरिषदेच्या मुंबई, कोकण विभाग पदवीधरसह शिक्षक मतदारसंघांसाठी मतदारांनी नोंदणी करण्याचे आवाहन – मुंबई शहर जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर

मुंबईदि. २७ : विधान परिषदेच्या मुंबई आणि कोकण विभागाच्या पदवीधर मतदारसंघासाठी तसेच  शिक्षक मतदारसंघांसाठी मतदार नोंदणी ३० सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. या मतदार नोंदणीसाठी १ नोव्हेंबर २०२३ या अर्हता दिनांकावर आधारित पुनरीक्षण कार्यक्रम घोषित करण्यात आला असून मतदारांनी नोंदणी करावी, असे आवाहन मुंबई शहर जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी आवाहन केले आहे.

या मतदार नोंदणीसाठी पुनरीक्षण कार्यक्रमाचे टप्पे पुढीलप्रमाणे आहेत. शनिवार ३० सप्टेंबर २०२३ रोजी जाहीर सूचना प्रसिध्द केली जाईलवृत्तपत्रातील सूचनेची प्रथम पुनर्प्रसिद्धी सोमवार १६ ऑक्टोबरलाद्वितीय पुनर्प्रसिद्धी बुधवारी २५ ऑक्टोबरला केली जाईल. अर्ज क्रमांक १८ आणि १९ द्वारे ६ नोव्हेंबर २०२३ पर्यंत दावे आणि हरकती स्वीकारल्या जातील. त्यानंतर सोमवार २० नोव्हेंबरला हस्तलिखिते तयार करून प्रारुप मतदार याद्यांची छपाई केली जाईल. या प्रारुप मतदार याद्या २३ नोव्हेंबरला प्रसिद्ध होतील. त्यावर २३ नोव्हेंबर ते ९ डिसेंबर २०२३ पर्यंत दावे आणि हरकती स्वीकारले जातील. त्यानंतर २५ डिसेंबरपर्यंत दावे आणि हरकती निकाली काढून यादीची छपाई केली जाईल आणि ३० डिसेंबरला अंतिम यादी प्रसिद्ध केली जाईल.

मुंबई शहर जिल्ह्यामध्ये एकूण १० विधानसभा मतदारसंघ असून सदर मतदारसंघाच्या मध्यवर्ती कार्यालयात मतदारसंघाचे अर्ज स्वीकारले जातील.

मागील निवडणुकीत सन २०१८ ला मुंबई पदवीधर मतदारसंघासाठी एकूण १८३५३ इतकी मतदारांची अंतिम मतदार यादी तयार करण्यात आली होती.

पदवीधर मतदारसंघाच्या मतदार यादीमध्ये नाव नोंदणीसाठी ( नमुना १८) हा अर्ज असून त्यासाठी पुढील प्रमाणे अर्हता आवश्यक आहे. जी व्यक्ती भारताची नागरिक आहे आणि त्या मतदारसंघातील सर्वसाधारण रहिवासी आहे आणि तो १ नोव्हेंबर२०२३ पूर्वी किमान ३ वर्ष भारताच्या राज्यक्षेत्रातील विद्यापीठाची एक, तर पदवीधर असेल किंवा त्याच्याशी समतुल्य असलेली अर्हता धारण करीत असेल, अशी प्रत्येक व्यक्ती मतदार यादीमध्ये नाव समाविष्ट करण्यास पात्र आहे.

मागील निवडणुकीत (सन २०१८) मुंबई शिक्षक मतदारसंघासाठी एकूण १८८९ इतकी मतदारांची अंतिम मतदार यादी तयार करण्यात आली होती.

शिक्षक मतदार संघाच्या मतदार यादीमध्ये नाव नोंदणीसाठी (नमूना १९) हा अर्ज असून त्यासाठी पुढीलप्रमाणे अर्हता आवश्यक आहे. अर्हता जी व्यक्ती भारताची नागरिक आहे. सर्व सामान्यपणे ज्या मतदारसंघाची रहिवासी आहे व जिने दिनांक १ नोव्हेंबर२०२३ पूर्वी ६ मागील वर्षामध्ये राज्यातील एखाद्या माध्यमिक शाळेच्या दर्जापेक्षा कमी नसलेल्या कोणत्याही शैक्षणिक संस्थेमध्ये किमान तीन वर्ष अध्यापनाचे काम केले आहे. अशी व्यक्ती मतदार यादीमध्ये नाव समाविष्ट केले जाण्यास पात्र राहील. शैक्षणिक संस्थांची यादी पहिल्या अनुसूचीमध्ये नमूद केलेल्या अधिकाऱ्यांकडे उपलब्ध असेल.

शिक्षक मतदारसंघासाठी मतदार यादीत नाव दाखल करण्यासाठी केलेल्या नमुना १९ मधील अर्जासोबत संबंधित व्यक्तीने दिनांक १ नोव्हेंबर२०२३ पूर्वी लगतच्या सहा वर्षामध्ये एखाद्या माध्यमिक शाळेच्या दर्जापेक्षा कमी नसलेल्या शैक्षणिक संस्थेमध्ये एकूण किमान तीन वर्ष अध्यापनाचे काम केले असल्याबाबत त्या शैक्षणिक संस्था प्रमुखाचे प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.

0000

राजू धोत्रे/विसंअ/

ब्राझीलच्या राजदूतांनी घेतली राज्यपालांची भेट

मुंबई, दि. 27 : ब्राझीलने भारताचे महत्त्व ओळखले असून आपला देश भारताशी विशेषतः महाराष्ट्राशी कृषी क्षेत्रात सहकार्य वाढविण्यास उत्सुक आहे, असे प्रतिपादन ब्राझीलचे भारतातील नवनियुक्त राजदूत केनेथ दा नॉब्रेगा यांनी येथे केले.    

राजदूत केनेथ दा नॉब्रेगा यांनी बुधवारी (दि. २७) राज्यपाल रमेश बैस यांची राजभवन, मुंबई येथे भेट घेतलीत्यावेळी ते बोलत होते.

भारताशी आर्थिक तसेच व्यापार विषयक सहकार्य वाढविण्याच्या दृष्टीने पुढील वर्षी ब्राझीलचे उपराष्ट्राध्यक्ष तसेच तीन प्रांतांचे गव्हर्नर भारत भेटीवर येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

ब्राझील भारताशी कीटकनाशकेबी-बियाणेजैविक खते या विषयांमध्ये सहकार्य वाढविणार असून ब्राझील हा पारंपरिक डाळी उत्पादन करणारा देश नसल्यामुळे या क्षेत्रात भारताकडून सहकार्य प्राप्त करण्यास उत्सुक असल्याचे त्यांनी सांगितले.

ब्राझील मधील गायी बऱ्याच अंशी भारतीय गोवंशाच्या आहेत व तेथील हवामान त्यांना अनुकूल झाले असल्याचे राजदूतांनी सांगितले.

भारत व ब्राझील जगाचे अन्नदाते: राज्यपाल

ब्राझील कृषी महाशक्ती असून भारत आणि ब्राझील मिळून संपूर्ण जगासाठी अन्नधान्य निर्मिती करू शकतात असे राज्यपाल श्री. बैस यांनी यावेळी सांगितले. महाराष्ट्रात ४ कृषी विद्यापीठे तसेच १ पशुवैद्यकीय विज्ञान विद्यापीठ असून ब्राझील मधील कृषी विद्यापीठांनी महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठांशी सहकार्य प्रस्थापित करावेअशी अपेक्षा राज्यपालांनी व्यक्त केली. या सहकार्याअंतर्गत विद्यार्थी – व शिक्षण आदान – प्रदान तसेच परस्परांच्या देशात विद्यार्थ्यांना एक एक सत्र करण्याची मुभा देता येईल, असे राज्यपालांनी सांगितले.   

फुटबॉलमध्ये देखील राज्याला सहकार्य करावे

ब्राझील म्हटले की बहुतांशी भारतीयांना ब्राझीलच्या महान फुटबॉल खेळाडूंची आठवण होते. भारतात आणि विशेषतः महाराष्ट्रात फुटबॉलची लोकप्रियता वाढत असून या क्षेत्रात देखील ब्राझीलने सहकार्य करावेअशी अपेक्षा राज्यपालांनी यावेळी व्यक्त केली.

बैठकीला ब्राझीलचे भारतातील व्यापार प्रतिनिधी वॅग्नार सिल्व्हा इ एंट्यून्स तसेच कृषी सल्लागार अँजेलो डे केईरोस मॉरिसिओ उपस्थित होते.

००००

                      

Brazilian Ambassador calls on Governor;

wants greater cooperation in agriculture

Mumbai 27 : The newly appointed ambassador of Brazil in India Kenneth H. da Nobrega called on Maharashtra Governor Ramesh Bais at Raj Bhavan Mumbai on Wed (27 Sept).

The Ambassador told the Governor that Brazil is keen to enhance trade and economic partnership with India and foster cooperation in the field of agriculture.

Welcoming the Ambassador to Maharashtra, the Governor said Brazil is the agricultural powerhouse and a major exporter of agricultural products. He said India and Brazil can together feed the entire world.

In this connection the Governor sought increased cooperation between agricultural universities in Maharashtra and Brazil. He said Maharashtra has 4 agricultural universities and one university of veterinary and animal sciences.  He said student – exchange, faculty exchange and sharing of semesters and expertise will help students on both sides.

Head of Trade in the Brazilian Embassy in India Wagner Silva e Antunes and Agricultural Attache Angelo de Queiroz Mauricio were present.

000

ईद-ए-मिलादच्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शुभेच्छा

मुंबई, 27 सप्टेंबर – ईद-ए-मिलादनिमित्त राज्यातील जनतेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. मोहम्मद पैगंबर यांची शांततेची शिकवण अंगीकारणे हेच महत्त्वपूर्ण असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस आपल्या संदेशात म्हणतात, ईद-ए-मिलाद हा सण परस्परांमधील विश्वास आणि प्रेम वाढविणारा आहे. मोहम्मद पैगंबर यांनी सर्व मानव जातीच्या कल्याणाचा संदेश आपल्या आचारातून आणि विचारातून दिला आहे. त्यांनी दाखविलेल्या मार्गावरून जाताना संपूर्ण मानव जातीचा साकल्याने विचार केला पाहिजे. परस्परातील सांमजस्य आणि प्रेम वाढीस लागणे हे सर्वात महत्त्वाचे आहे.

‘वर्षा’ येथील श्री गणेश दर्शनाने भारावले विदेशी पाहुणे…!

मुंबई, दि. २७ :- ‘गणपती बाप्पा मोरयाचा जयघोषाचा निनाद, श्री गणेशांचे उत्सवाच्या निमित्ताने सजलेले रुप आणि आरती-मंत्रोच्चार अशा भारावलेल्या भक्तीपूर्ण वातावरणात विविध देशातील पाहुण्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी प्रतिष्ठापित श्री गणेशांचे मनोभावे दर्शन घेतले. मुंबईतील विविध देशांच्या वाणिज्य दूतावासांचे प्रमुख, वरिष्ठ अधिकारी आदी मान्यवर हे ते विदेशी पाहूणे होते. यात रशियाच्या सेंट पीटसबर्गचे उपप्रांतपाल व्लादिमीर क्याजिनीन यांच्यासह तब्बल ३० हून अधिक देशातील विदेशी पाहुण्यांचा समावेश होता.

अफगणिस्तान, ऑस्ट्रेलिया, बहारीन बेलारूस, फिनलँड, हंगेरी, इस्त्रायल, जपान, कोरिया, मॉरीशस, पोलंड, सिंगापूर, स्पेन, टर्की, बांग्लादेश, ग्रेट-ब्रिटन, चीन, इराण, आर्यलंड, इटली, रशिया, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, थायलंड, संयुक्त अरब अमिरात, व्हिएतनाम, युगांडा, कोलंबिया, केनया, युक्रेन या देशांच्या वाणिज्य दूतावास प्रमुख, वरिष्ठ अधिकारी वर्षा शासकीय निवासस्थानी आवर्जून भेट दिली. श्री गणेश दर्शनानंतर मुख्यमंत्री श्री. शिंदे यांचे स्वागत केले. त्यांच्याशी दिलखुलास संवादही साधला. याच दरम्यान इर्शाळवाडीतील मुलांच्या हस्ते आरतीही करण्यात आली. या मुलांच्या अनुषंगाने माहिती घेतानाच, या विदेशी पाहुण्यांनीही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या संवेदनशीलतेलाही दाद दिली.

श्री गणेशाचे मनोभावे दर्शन घेतानाच या सर्व विदेशी पाहुणे मंडळींनी श्री गणेश पूजाविधीची आवर्जून माहिती घेतली. यानिमित्ताने वर्षा करण्यात आलेले स्वागत आणि भक्तीपूर्ण, उत्साही वातावरण याबाबतही या विदेशी पाहुण्यांनी आनंद आणि समाधानाच्या उत्स्फूर्त प्रतिक्रीयाही व्यक्त केल्या.

000

‘स्वच्छता पंधरवडा’ निमित्त विभागीय आयुक्त कार्यालयात श्रमदान; ‘कचरामुक्त भारत’चे स्वप्न साकार करुया !                             

अमरावती, दि.27 : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण देशात १५ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या दरम्यान ‘स्वच्छता ही सेवाउपक्रम राबविण्यात येणार आहे. या अभियांतर्गत ‘कचरामुक्त भारतबाबत विविध उपक्रमांतून जनजागृती करण्यात येणार आहे. विभागातील सर्व नागरिकांनी या अभियानात स्वयंस्फूर्तीने सहभाग घेत ‘कचरामुक्त भारत’चे स्वप्न साकारण्यासाठी प्रत्यक्ष कृतीतून आपल्या गावाची व परिसराची स्वच्छता करावी, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय यांनी आज येथे केले. याप्रसंगी विभागीय आयुक्तांनी स्वत:च्या दालनाची व परिसराची स्वत: स्वच्छता करीत स्वच्‍छतेचे महत्त्व पटवून दिले.

स्वच्छता पंधरवडा निमित्त विभागीय आयुक्त कार्यालयात मंगळवारी (ता.26 सप्टेंबर) श्रमदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. मनपा आयुक्त देविदास पवार, उपायुक्त संजय पवार, गजेंद्र बावणे, नगरपालिका प्रशासनाच्या सह आयुक्त माधुरी मडावी, सहायक आयुक्त श्यामकांत मस्के, तहसीलदार वैशाली पाथरे, संतोष काकडे यांच्यासह अधिकारी-कर्मचारी यावेळी उपस्थित होते. यावेळी उपस्थित अधिकारी-कर्मचारी यांच्याव्दारे विभागीय आयुक्त कार्यालयातील विभाग तसेच परिसराची प्रत्यक्षरित्या साफ-सफाई व स्वच्छता करण्यात आली.

 ‘स्वच्छता ही सेवा २०२३’ची थीम ‘कचरामुक्त भारत’ही आहे. यामध्ये दृश्‍यमान स्वच्छता व सफाईमित्र कल्याण यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.

ग्रामीण भागातील बसस्थानक, पर्यटन स्थळे, ऐतिहासिक वास्तू, वारसा स्थळे, नदी किनारे, सार्वजनिक ठिकाण येथे श्रमदानातून स्वच्छता करावयाची आहे. तसेच सार्वजनिक शौचालय, कचराकुंड्या, कचरा वाहतूक वाहन आदी सर्व स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून दुरुस्ती, रंगकाम, साफसफाई करण्याचे निर्देश आहेत. त्यानुसार जनतेनी आपल्या गावात, शहरात, परिसरात स्वयंस्फुर्तीने पुढाकार घेत स्वच्छता मोहीम राबवावी. तसेच स्वच्छता पंधरवडा व स्वच्छता मोहिमेची व्यापक जनजागृती करावी, असे आवाहन विभागीय आयुक्तांनी यावेळी केले.

प्रारंभी, राष्ट्रपिता महात्मा गांधी व संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. ‘स्वच्छता पंधरवडा’ आयोजनाच्या उद्देशाबाबत श्रीमती मडावी यांनी माहिती दिली. ‘मी स्वच्छतेसाठी दरवर्षी शंभर तास तसेच दर आठवड्याला दोन तास देईल’ अशी स्वच्छतेची शपथ श्रीमत मडावी यांनी उपस्थित अधिकारी-कर्मचाऱ्यांना यावेळी दिली. याप्रसंगी शहरातील स्वच्छता कर्मचाऱ्यांचा विभागीय आयुक्तांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.

अभियानांतर्गत गावांत आयोजिले जाणारे महत्त्वाचे उपक्रम

  • गावांमधील कचरा साचलेल्या ठिकाणांची स्वच्छता
  • कचरा संकलन आणि विलगीकरण शेड/केंद्रांचे बांधकाम
  • पाणवठ्यांजवळील परिसर स्वच्छ ठेवणे आणि त्यांच्या आजूबाजूला वृक्षारोपण करणे
  • कचऱ्याच्या उगमस्थानी कचरा विलगीकरण (सुका आणि ओला) याबाबत सामुदायिक जागरुकता
  • जीईएमद्वारे ट्रायसायकल/ई-कार्ट (बॅटरीवर चालणारे वाहन) यासारखे कचरा संकलन वाहन खरेदी करणे
  • प्लास्टिक सारखा अ-विघटनशील कचरा दारोदारी जाऊन गोळा करणे
  • एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकच्या (एसयुपी) दुष्परिणामांबद्दल ग्रामसभा आयोजित करून आणि एसयुपी वर बंदीचे ठराव पारित करून जनजागृती करणे
  • प्लॅस्टिक कचरा व्यवस्थापनासाठी 4R तत्त्वांचा प्रचार करणे- नकार देणे, कमी करणे, पुन्हा वापरणे आणि पुनर्निर्मिती करणे
  • ओडीएफ प्लस बाबत सरपंच संवाद आयोजित करणे
  • भित्ती चित्र, नुक्कड नाटक, स्वच्छता रथ, समाज माध्यम साहित्य, ग्राम सभा अशा व्यापक कार्यक्रमांच्या माध्यमातून आयपीसी द्वारे जनजागृती करण्यासाठी व्यापक आयईसी आणि मास मिडिया मोहीम राबवणे
  • घोषवाक्य लेखन / “कचरा न टाकण्याची” प्रतिज्ञा घेणे
  • एसएचएस पोर्टलवर एसएचएस उपक्रमांच्या दैनंदिन प्रगतीची अद्ययावत माहिती देणे

विधानपरिषदेच्या मुंबई, कोकण विभाग पदवीधरसह शिक्षक मतदारसंघांसाठी मतदार नोंदणीचा कार्यक्रम जाहीर – उपजिल्हा निवडणूक अधिकारी तेजस समेळ

मुंबईदि. २७ : विधान परिषदेच्या मुंबई आणि कोकण विभागाच्या पदवीधर मतदारसंघासाठी तसेच  शिक्षक मतदारसंघांसाठी मतदार नोंदणी ३० सप्टेंबरपासून सुरू होणार आहेया मतदार नोंदणीसाठी १ नोव्हेंबर २०२३ ही अर्हता दिनांक असेल, अशी माहिती मुंबई उपनगरचे उपजिल्हा निवडणूक अधिकारी तेजस किरण समेळ यांनी दिली.

एक नोव्हेंबर 2023 या अर्हता दिनांक वर आधारित पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या मतदार नोंदणी संदर्भात  आज मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. त्यावेळी श्री.समेळ बोलत होते.

या मतदार नोंदणीसाठी  पुनरीक्षण कार्यक्रमाचे टप्पे पुढीलप्रमाणे आहेत. शनिवार ३० सप्टेंबर २०२३ रोजी जाहीर सूचना प्रसिध्द केली जाईलवृत्तपत्रातील सूचनेची प्रथम पुनर्प्रसिद्धी सोमवार १६ ऑक्टोबरलाद्वितीय पुनर्प्रसिद्धी बुधवारी २५ ऑक्टोबरला केली जाईल. अर्ज क्रमांक १८ आणि १९ द्वारे ६ नोव्हेंबर २०२३ पर्यंत दावे आणि हरकती स्वीकारल्या जातील. त्यानंतर सोमवार २० नोव्हेंबरला हस्तलिखिते तयार करून प्रारुप मतदार याद्यांची छपाई केली जाईल. या प्रारुप मतदार याद्या २३ नोव्हेंबरला प्रसिद्ध होतील. त्यावर २३ नोव्हेंबर ते ९ डिसेंबर २०२३ पर्यंत दावे आणि हरकती स्वीकारले जातील. त्यानंतर २५ डिसेंबरपर्यंत दावे आणि हरकती निकाली काढून यादीची छपाई केली जाईल आणि ३० डिसेंबरला अंतिम यादी प्रसिद्ध केली जाईल,

पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या मतदार याद्या तयार करण्याच्या अनुषंगाने लागणाऱ्या अर्जाचे अनुक्रमे नमुना क्रमांक 18 व नमुना क्रमांक 19 नमुन्यांच्या छपाईच्या आदेश मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य कार्यालय याकडून शासकीय मुद्रणालयमुंबई येथे देण्यात आले असून त्यांच्याकडून ते प्राप्त करून घेऊन सर्व 26 विधानसभा मतदार नोंदणी अधिकारी यांना देण्यात येणार आहेत. तसेच मतदार नोंदणी अधिकारी मतदार नोंदणी अधिनियम 1960 चे कलम 31 (३) अन्वये जाहीर सूचना प्रसिद्ध करतील. भारत निवडणूक आयोगाच्या दिनांक 5 सप्टेंबर 2016 रोजीच्या सूचनेनुसार संबंधित मतदार नोंदणी अधिकारी विहित रीतीने आणि नमुन्यात परिशिष्ट ‘ए’ आणि ‘बी’ मध्ये सार्वजनिक नोटीस जारी करतील आणि प्रकरण परत्वे परिशिष्ट अ किंवा ब नमुन्यात नोटीसीची पुन्हा प्रसिद्ध करतील. पात्र मतदार, राजकीय पक्षांनी या कार्यक्रमाला सहकार्य करावे, असेही श्री.समेळ म्हणाले.

यावेळी इतर अधिकारी आणि विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

000

संध्या गरवारे / विसंअ/

छत्रपती संभाजीनगर विभागातील प्रलंबित पाणीपुरवठा योजना मिशन मोडवर पूर्ण कराव्या – पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील

मुंबई दि. २७ : छत्रपती संभाजीनगर विभागातील महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि जिल्हा परिषद कडील पाणीपुरवठा योजनांची प्रलंबित कामे मिशन मोडवर पूर्ण करण्याचे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले.

छत्रपती संभाजीनगर विभागातील पाणीपुरवठा योजनांच्या कामाबाबतीत आढावा बैठक श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झाली. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारेमहाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव अभिषेक कृष्णा, जलजीवन मिशनचे संचालक अमित सैनी, मुख्य अभियंता मनीषा पलांडेअधिक्षक अभियंता अजय सिंहजलजीवन मिशन आणि जिल्हा परिषदेचे आठ जिल्ह्यातील अधिकारी उपस्थित होते.

मंत्री श्री.पाटील म्हणालेछत्रपती संभाजीनगर विभागातील सर्व जिल्ह्यातील ज्या पाणीपुरवठा योजनाची कामे बंद पडली आहेत, त्याचा आढावा घेऊन ती कामे पुन्हा तात्काळ सुरू करावीत. ज्या कामाचे कार्यादेश दिले आहेत ती कामे पूर्ण होईपर्यंत त्यांचे संपूर्ण संनियंत्रण करावे. तसेच जे ठेकेदार कामे पुर्ण करणार नाहीत त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

घरगुती नळजोडणीची  कामे दर्जेदार व्हावी, याकडे अधिकाऱ्यांनी विशेष लक्ष द्यावे. ‘हर घर जल’ योजनाची कामे पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावे. ‘हर घर जल’ झालेल्या गावांनी एक्सइंस्टाग्राम व फेसबुक या समाज माध्यमाद्वारे प्रसिद्धी द्यावी. छत्रपती संभाजीनगर विभागातील पाणी पुरवठा योजनाना निधीची कमतरता नाही, त्यामुळे कामे जलदगतीने व दर्जेदार करण्याच्या सूचनाही श्री. पाटील यांनी यावेळी दिल्या.

000

दत्तात्रय कोकरे/विसंअ/

इर्शाळवाडीच्या चिमुकल्यांना मुख्यमंत्री निवासस्थानी गणरायाच्या आरतीचा मान

मुंबई, दि. २७ : मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावरील श्री गणेशाच्या आरतीचा मान काल इर्शाळवाडी दुर्घटनेत अनाथ झालेल्या चिमुरड्यांना मिळाला. इर्शाळवाडीतील आदिवासी बांधव काल थेट मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी पोहोचले..त्यांच्याहस्ते गणेशाची आरती झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वत:च्या हाताने बाल गोपाळांना मोदक भरवले आणि त्यांचा सहकुटुंब शाही पाहुणचार केला. चिमुरड्यांनी केलेल्या ‘गणपती बाप्पा मोरया’च्या गजरात वर्षावरील वातावरण भारावून गेले.

काल मंगळवारी संध्याकाळी वर्षा निवासस्थानी विविध देशांचे मुंबईतील वाणिज्यदूत, माध्यमांचे संपादक, प्रतिनिधी यांनी गणेश दर्शन घेतले. सायंकाळच्या आरतीसाठी खास पाहुणे निमंत्रित होते ते म्हणजे इर्शाळवाडीतील बांधव. त्यासाठी मुख्यमंत्री वैद्यकीय कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी समन्वयन केले. यावेळी इर्शाळवाडी दुर्घटनेदरम्यान मदत कार्यात मोलाची कामगिरी बजावणाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. भावनिक बंध जोपासणाऱ्या या क्षणांचे साक्षीदार ठरले विविध देशांचे वाणिज्यदूत.

‘प्रजा हीच राजा..मी सेवेकरी’ या ओळीचा प्रत्यय देणारे संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या कृतीतून सामान्यांचे मुख्यमंत्री असल्याची प्रचिती देतात. गेल्या काही दिवसामध्ये ‘वर्षा’वरील श्री गणरायाचे दर्शन आणि आरतीसाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती लावली आहे. काल दुपारी त्र्यंबकेश्वरमधील आधार आश्रमातील मुलांनी वर्षा निवासस्थानी टाळ-मृदुंगाच्या गजरात आरती केली. त्यानंतर सायंकाळी इर्शाळवाडीतील बांधव सहभागी झाले होते.

मुख्यमंत्री श्री. शिंदे, त्यांच्या पत्नी सौ. लता शिंदे, मुलगा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, स्नुषा सौ. वृषाली आणि नातू रुद्रांश हे या बाळगोपाळांसमवेत रमले. गळ्यात टाळ घालून मुख्यमंत्री ह्या मुलांसोबत आरतीसाठी उभे होते. मुख्यमंत्री प्रत्येक मुलाला बोलावून त्याच्या हातात आरतीचं तबक देत होते. यावेळी इर्शाळवाडीतील ग्रामस्थांसह प्रशासकीय अधिकारी, माध्यम प्रतिनिधी याच्याबरोबरच काही देशांचे वाणिज्यदूत देखील उपस्थित होते. त्यांच्या हाताने देखील आरती करण्यात आली. एका वेगळ्या अनुभवाचे साक्षीदार झाल्याची भावना त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होती.

यावेळी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक अनिल डिग्गीकर, कोकण विभागीय आयुक्त महेंद्र कल्याणकर, रायगड जिल्हाधिकारी योगेश म्हसे, रायगड पोलिस अधीक्षक अशोक घार्गे, नवी मुंबई महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर, पनवेल महापालिका आयुक्त गणेश देशमुख आदिंचा सत्कार करण्यात आला. मुख्यमंत्र्यांनी चिमुकल्यांना स्कूल बॅग आणि शालेय साहित्याचे यावेळी वाटप केले.

२० जुलैला इर्शाळगडाची दुर्घटना घडली होती. त्यानंतर मुख्यमंत्री श्री. शिंदे स्वता पहाटेपासून ते संध्याकाळपर्यंत घटनास्थळावर थांबून मदतकार्यावर लक्ष ठेऊन होते. त्यानंतर महिन्याभराच्या आतच म्हणजे १५ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री पुन्हा एकदा इर्शाळवाडीवासियांच्या भेटीला गेले. त्यांच्या तात्पुरत्या निवासाच्या पाहणीसाठी त्यांनी दौरा केला आणि आता थेट आपल्या निवासस्थानी इर्शाळगडवासियांना बोलावून गणराच्या आरतीचा मान दिला.

०००

ईद-ए-मिलादनिमित्त शुक्रवारी सुट्टी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निर्णय

मुंबई, दि. २७ : अनंत चतुर्दशी निमित्त गणेश विसर्जन आणि ईद ए मिलादचा सण एकाच दिवशी म्हणजे उद्या गुरुवार(२८ ता)होणार असून गर्दी आणि मिरवणुकांचे योग्य व्यवस्थापन करणे पोलीस प्रशासनास शक्य व्हावे म्हणून शुक्रवार २९ तारखेस शासकीय सुट्टी जाहीर करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.

ऑल इंडिया खिलाफत कमिटीच्या शिष्टमंडळाने यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन विनंती केली होती. राज्यात शांततेचे वातावरण असावे आणि गर्दी तसेच मिरवणुकांचे नियोजन करता येणे पोलिसांना शक्य व्हावे म्हणून २९ तारखेस सुट्टी देण्याची विनंती त्यांनी केली होती. या शिष्टमंडळात खासदार राहुल शेवाळेआमदार अबू आझमीआमदार रईस शेखनसीम खानआदींचा समावेश होता. 

अनंत चतुर्दशीनिमित्त राज्याच्या विविध भागात गणेश विसर्जन मिरवणुका आणि ईद ए मिलादनिमित्त मिरवणुका काढण्यात येत असतात. दोन्ही सणांमुळे एकाच दिवशी निघणाऱ्या मिरवणुकांमुळे पोलीस यंत्रणांवर ताण येण्याची शक्यता लक्षात घेऊन २९ सप्टेंबरची सुट्टी जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

गणेश विसर्जन मिरवणुका शिस्तबद्धपणे, शांततेत पार पाडाव्यात

अनंत चतुर्दशीनिमित्त गणरायाला आपण मनोभावे निरोप देऊ. विसर्जन मिरवणुकीतही नेहमीप्रमाणे शिस्त पाळावी आणि शांतता, सद्भावनेच्या वातावरणात गणेश विसर्जन पार पाडावे असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी राज्यातील गणेशभक्तांना केले आहे.

गेले दहा दिवस श्री गणेशाच्या आगमनाने मांगल्याचे वातावरण निर्माण झाले. येणाऱ्या काळातही ईद तसेच नवरात्री, दसरा –दिवाळीसारखे सण आहेत. सर्वांनी एकोप्याने आणि भक्तिभावाने हे सण पार पाडावे आणि राज्याची परंपरा अधिक उज्वल करावी असेही मुख्यमंत्री आपल्या संदेशात म्हणतात.

गणेशोत्सवाच्या काळात पोलिसांनी संपूर्ण राज्यात कायदा व सुव्यवस्था व्यवस्थित राहील याची काळजी घेतली तसेच एकूणच गणेश मंडळांनी देखील नियमांचे पालन करून सर्वांचा हा आवडता उत्सव आनंदाने पार पाडला त्याबद्धल मुख्यमंत्र्यांनी समाधान व्यक्त केले.

उत्सव साजरा करतांना आपल्याला स्वच्छतेचे महत्व डोळ्याआड करता येणार नाही. स्वच्छ महाराष्ट्राची मोहीम आपण हाती घेतली आहे. १ ऑक्टोबरला आपण आपली गावे, वॉर्ड कचरामुक्त करणार आहोत. गणेश मंडळांनी देखील विसर्जन आणि त्यानंतर आपल्या आसपासचा परिसर स्वच्छ ठेवण्यास प्रशासनाला मदत करावी आणि चांगला संदेश द्यावा असेही मुख्यमंत्र्यांनी आवाहन केले आहे.

मुख्यमंत्र्यांकडून ईद-ए-मिलादच्या शुभेच्छा

‘ईद-ए-मिलादचे उत्सव पर्व सौहार्द-सलोखा घेऊन येईल. यातून परस्परांतील आदर-प्रेमभाव आणि स्नेह वाढीस लागावा,अशी मनोकामना व्यक्त करत मुख्यमंत्र्यांनी ईद-ए-मिलादच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

‘प्रेषित मोहम्मद पैगंबर यांनी जगाला त्याग आणि प्रेमाचा संदेश दिला. त्यांचे जीवन हाच एक मोठा संदेश आहे. त्यातून प्रेरणा घेऊन आपण परस्पर आदर-प्रेमभाव वाढीस लावण्याचा प्रयत्न करूया,’ असेही आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटले आहे.

राज्यातील रखडलेल्या विमानतळांची कामे मार्गी लावण्यासाठी खाजगी कंपनीकडील पाच विमानतळांचा ताबा ‘एमआयडीसी’ने घ्यावा – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

मुंबई, दि. २७ : राज्यातील नांदेड, लातूर, धाराशिव, यवतमाळ आणि बारामती या विमानतळांचे सक्षमीकरण करून विमानसेवा सुरू होण्याच्या दृष्टीने ही पाचही विमानतळे खाजगी कंपनीला भाडेपट्ट्याने चालविण्यास देण्यात आली होती. मात्र, गेल्या १४ वर्षांत या ठिकाणी विमानसेवा सुरु होऊ शकली नसल्याने त्यांचा ताबा महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने घ्यावा. यासाठीची प्रक्रिया तातडीने सुरु करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने विकसित केलेल्या विमानतळांबाबत आज मंत्रालयात बैठक झाली. या बैठकीस उद्योग मंत्री उदय सामंत, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर, सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव (विमान चालन) दीपक कपूर, उपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव आशिष शर्मा, नियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, उद्योग विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे, महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक स्वाती पांडेय, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी विपीन शर्मा आदी उपस्थित होते.

‘एमआयडीसी’ने विकसित केलेल्या विमानतळांच्या सद्यस्थितीचा आढावा घेताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, राज्यातील दळणवळणाचा विकास करतानाच छोट्या शहरांमध्ये विमानसेवा सुरु करण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. महानगरातील विमानतळांवरील भार कमी करण्यासाठी राज्याच्या उर्वरित भागात विमान सेवा सुरु झाली पाहिजे. विमानतळासाठी जागा उपलब्ध असणाऱ्या ठिकाणी पायाभूत सोयीसुविधा उभारल्या पाहिजेत. काही ठिकाणी विमानसेवा सुरू आहेत, त्यांची वारंवारिता वाढविली पाहिजे. काही विमानतळांवर धावपट्ट्या वाढवल्या पाहिजेत, तर काही ठिकाणी नाईट लँडिंगची सुविधा सुरु केली पाहिजे. यामुळे वाहतूक कोंडीसारख्या समस्या कमी होण्यास मदत होईल. तसेच नागरिकांना परवडणाऱ्या दरात विमान प्रवास करता येईल.

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने नांदेड, लातूर, धाराशिव, यवतमाळ आणि बारामती या विमानतळांवर पायाभूत सुविधांची उभारणी सुरु केली होती. या प्रक्रियेला वेग देण्याच्या दृष्टीने आणि विमानतळांच्या सक्षमीकरणासह हवाई सेवा सुरु करण्यासाठी या पाच विमानतळांचे हस्तांतरण खासगी कंपनीकडे करण्यास वर्ष २००९ मध्ये परवानगी देण्यात आली होती. परंतु, आज त्यांची परिस्थिती अत्यंत दयनीय आहे. त्यामुळे ही पाचही विमानतळे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने आपल्या ताब्यात घ्यावीत, असे निर्देशही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

ताज्या बातम्या

दशकपूर्ती महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमाची!

0
राज्यातील नागरिकांना पारदर्शक, गतिमान व कालबद्ध पद्धतीने लोकसेवा देता याव्या यासाठी शासनाने 'महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, 2015' लागू केला आहे. यामुळे शासकीय आणि निमशासकीय...

देशाची आरोग्य व्यवस्था जगात सर्वात सक्षम आणि मोठी – केंद्रीय आरोग्य मंत्री जे.पी.नड्डा

0
छत्रपती संभाजीनगर, दि. २७ (जिमाका): जगात आपल्या देशाची आरोग्य व्यवस्था सर्वात मोठी असून या आरोग्यव्यवस्थेने प्रगती केली आहे. लसीकरण, महिलांचे आरोग्य, बाल आरोग्य तसेच...

सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न करणार – विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे

0
अमरावती, दि. २६: विधान परिषदेचे सभापती पद हे संविधानिक पद आहे. या पदाला समन्वय साधण्याची जबाबदारी आहे. त्यामुळे या समन्वयातूनच येत्या काळात सर्व घटकांना...

महाहौसिंगने परवडणाऱ्या घरांच्या निर्मितीचा वेग वाढवावा – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

0
मुंबई दि. २७: महाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडळ म्हणजेच महाहौसिंगने प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुलांच्या बांधकामांना गती देण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत. त्यांना येणाऱ्या अडचणींवर शासनाच्या स्तरावरून...

पनवेल महानगरपालिकेच्या क्रिकेट प्रशिक्षण केंद्रातून गुणवत्ताधारक खेळाडू घडतील – मंत्री ॲड. आशिष शेलार

0
मुंबई, दि. २७ : पनवेल महापालिकेने उभारलेल्या क्रिकेट प्रशिक्षण केंद्राची व्यवस्था उत्तम आहे. या प्रशिक्षण केंद्रासाठी महापालिकेने दिलीप वेंगसरकर यांची अगदी अचूक निवड केली...