रविवार, एप्रिल 27, 2025
Home Blog Page 967

कांदळवन क्षेत्रात अतिक्रमण होणार नाही, यासाठी कडक पावले उचलावीत – मंत्री सुधीर मुनगंटीवार

मुंबई, दि. 26 : केंद्र सरकारप्रमाणेच राज्य शासनही पर्यावरण संतुलन आणि संवर्धनासाठी आग्रही आहे. कांदळवनाचे संरक्षण आणि संवर्धन हे महत्त्वाचे आहे. कांदळवन क्षेत्रात अतिक्रमण होणार नाही, यासाठी कडक पावले उचलावीत. तसेच कांदळवनाचे महत्त्व विद्यार्थी आणि सर्व नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कांदळवनांच्या विविध प्रजातींचे उद्यान विकसित करावे. त्यातून जनजागृती करावी. लोप पावत चाललेल्या प्रजाती वाचवण्यासाठी संवर्धन प्रकल्प हाती घ्यावी, असे निर्देश आज वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले.

महाराष्ट्र कांदळवन आणि जैवविविधता संवर्धन प्रतिष्ठान नियामक मंडळाची बैठक वन मंत्री श्री. मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी ते बोलत होते. आमदार मनीषा चौधरी, आमदार योगेश कदम, वन विभागाचे प्रधान सचिव वेणुगोपाळ रेड्डी, मत्स्य व्यवसाय विभागाचे आयुक्त अतुल पाटणे, कांदळवन प्रतिष्ठानचे कार्यकारी संचालक एस. व्ही. रामाराव, सहसचिव (वित्त) विवेक दहिफळे, उपवनसंरक्षक अनिता पाटील, विभागीय वन अधिकारी आदर्श रेड्डी, महाराष्ट्र सागरी मंडळाच्या पर्यावरण अभियंता ज्योती पाटील, संचालक (पर्यावरण) अभय पिंपरकर, सहआयुक्त (मत्स्य) युवराज चौगले, दांडा कोळी मासेमारी व्यावसायिक सहकारी संस्थेचे भिका कोळी याशिवाय, भारतीय तटरक्षक दल, कोकण विभागीय आयुक्तांचे पदाधिकारी उपस्थित होते. तसेच दूरदृश्यसंवाद प्रणालीद्वारे महाराष्ट्र वनबल प्रमुख शैलेश टेंभुर्णीकर, बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे संचालक आदी उपस्थित होते.

मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले की, राज्यात एकूण 20 प्रजाती आहेत. आपल्या राज्यासह देशातील कांदळवन प्रजातींचे उद्यान आपल्या राज्यात असावे. याशिवाय, गोराई, दहिसर येथील कांदळवन पार्कचे काम गतीने करावे. कांदळवनासाठी ऊतीसंवर्धन तंत्राचा वापर करुन त्याच्या जतनासाठी काय करता येईल, याबाबत बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ यांच्या सहकार्याने संशोधन प्रकल्प हाती घ्यावा, अशा सूचना त्यांनी दिल्या.

कांदळवन संशोधनासाठी काम करणाऱ्या विद्यार्थ्यांना परदेशात अभ्यासासाठी शिष्यवृत्ती देण्यात येते. त्यामध्ये अधिक सुलभता आणावी. खाऱ्या पाण्यातील मत्स्य पालनासाठी केंद्रीय खारेपाणी मत्स्यपालन संस्था, चेन्नई यांच्या प्रशिक्षित वर्गाकडून राज्यातील मत्स्य पालकांना राज्यातच प्रशिक्षण देता येईल, अशी व्यवस्था निर्माण करण्याचे निर्देशही मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी दिले.

दलदलीच्या कांदळवन क्षेत्रात कांदळवन रोपवनाचे काम करणाऱ्या मजुरांवर आपत्ती ओढवल्यास त्यांना भरीव मदत द्यावी. कांदळवन क्षेत्रातील बदल तपासण्यासाठी एमआर सॅक यंत्रणेकडून अद्ययावत उपग्रह नकाशे प्राप्त करुन घेऊन कार्यवाही करावी, बहुप्रजातीय मत्स्यबीज ऊबवणी केंद्रासाठी कांदळवन प्रतिष्ठानच्या माध्यमातून कार्यवाही करावी, अशा सूचनाही त्यांनी केल्या.

केंद्र शासनाच्या मिश्टी प्रकल्प आणि अमृत धरोहर योजनेंतर्गत दोन प्रस्ताव पाठविले आहेत. त्याचा पाठपुरावा करावा, असे निर्देशही मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी दिले. कांदळवन क्षेत्र वाढविण्यासाठी यंत्रणेने अधिक प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले.

यावेळी श्री. रामाराव यांनी कांदळवन प्रतिष्ठानमार्फत हाती घेतलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली.

0000

दीपक चव्हाण/विसंअ/

डॉ. चिंतामणराव देशमुख वनउद्यानाचा आराखडा सादर करावा – उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई, दि. 26 : महाराष्ट्राचे सुपुत्र तथा देशाचे माजी अर्थमंत्री डॉ. चिंतामणराव देशमुख (डॉ. सी.डी. देशमुख) यांच्या स्मृतिप्रित्यर्थ रायगड जिल्ह्यातील जामगाव येथे ‘डॉ. चिंतामणराव देशमुख जैव विविधता, वन व वनस्पती उद्यान’ उभारण्यात येणार आहे. डॉ. सी. डी. देशमुख यांच्या कर्तृत्वाला साजेसा वन उद्यानाचा आराखडा सादर करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिले. या प्रस्तावित वनउद्यानाच्या आराखड्याचे वन विभागाच्यावतीने सादरीकरण करण्यात आले.

उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात रायगड जिल्ह्यातील जामगाव (ता. रोहा) येथे डॉ. चिंतामणराव देशमुख जैव विविधता, वन व वनस्पती उद्यान उभारणीसंदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे, खासदार सुनील तटकरे, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर, नियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, महसूल व वन विभागाचे प्रधान सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, उपमुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव आशिष शर्मा, नागपूरचे प्रधान मुख्य वनसंरक्षक शैलेश टेंभुर्णीकर (व्हिसीद्वारे), रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे (व्हिसीद्वारे) मुख्य वनसंरक्षक ठाणे के. प्रदिपा, रोहा-रायगडचे उपवनसंरक्षक अप्पासाहेब निकत आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले की, भारतीय रिझर्व्ह बँकेचे पहिले गव्हर्नर, माजी केंद्रीय अर्थमंत्री, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे अर्थतज्ज्ञ आणि कुशल प्रशासक, वनस्पती शास्त्रज्ञ अशा अनेक आघाड्यांवर चिंतामणराव द्वारकानाथ ऊर्फ सी. डी. देशमुख यांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे. महाराष्ट्राच्या या थोर सुपूत्राच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंतीच्या औचित्याने त्यांच्या नावाने रायगड जिल्ह्यातील जामगाव येथे ‘डॉ. चिंतामणराव देशमुख जैव विविधता, वन व वनस्पती उद्यान’ उभारण्यात येणार आहे. त्यांची स्मृती जतन करण्यासाठी उभारण्यात येणाऱ्या या वनउद्यानाची उभारणी त्यांच्या नावाला आणि कर्तृत्वाला साजेशी करण्यात यावी, त्यासाठी दर्जेदार आराखडा तयार करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री श्री.  पवार यांनी दिले.

*****

वंदना थोरात/विसंअ/

विधानपरिषदेच्या मुंबई, कोकण विभाग पदवीधर तसेच नाशिक आणि मुंबई विभाग शिक्षक मतदारसंघांसाठी मतदार नोंदणीचा कार्यक्रम जाहीर

मुंबई, दि. 26 : विधानपरिषदेच्या मुंबई आणि कोकण विभागाच्या पदवीधर मतदारसंघासाठी तसेच नाशिक आणि मुंबई विभागाच्या शिक्षक मतदारसंघांसाठी मतदार नोंदणी ३० सप्टेंबरपासून सुरू होणार आहे, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी दिली. यासंदर्भात आज मंत्रालयात श्री. देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली सर्व नोंदणीकृत मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक झाली. या बैठकीत श्री. देशपांडे यांनी ही माहिती दिली. या मतदार नोंदणीसाठी १ नोव्हेंबर २०२३ ही अर्हता दिनांक असेल असे श्री. देशपांडे यांनी सांगितले.

या मतदारसंघांची मुदत पुढच्या वर्षी म्हणजेच जुलै २०२४ ला संपणार आहे. शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांसाठी दरवेळी मतदारांची नव्याने मतदार नोंदणी करावी लागते. त्या पार्श्वभूमीवर या मतदारसंघांकरिता येत्या ३० सप्टेंबरपासून मतदार नोंदणीच्या पहिल्या टप्प्याला सुरुवात होईल. हा टप्पा ६ नोव्हेंबरला संपेल. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात २३ नोव्हेंबर ते ९ डिसेंबर २०२३ या कालावधीतही मतदार नोंदणी केली जाणार आहे.

पदवीधर मतदारसंघांसाठी, त्या-त्या मतदारसंघातील सर्वसाधारण रहिवासी असलेले आणि १ नोव्हेंबर २०२३ च्या किमान ३ वर्षे आधी भारतातील मान्यतापात्र विद्यापीठाची पदवी किंवा समकक्ष पदवी प्राप्त पदवीधर व्यक्ती मतदार नोंदणीसाठी पात्र असतील. पदवीधर मतदार नोंदणीसाठी अर्ज क्र. १८ भरून त्यासोबत निवासाचा आणि पदवीचा पुरावा जोडावा लागेल. पदवीचा पुरावा म्हणून पदवी प्रमाणपत्र किंवा गुणपत्रिकाही ग्राह्य धरली जाईल, असेही  श्री. देशपांडे यांनी सांगितले.

शिक्षक मतदारसंघासाठी त्या-त्या मतदारसंघातील सर्वसाधारण निवासी असलेले आणि १ नोव्हेंबर २०२३ पूर्वी लगतच्या सहा वर्षामध्ये किमान तीन वर्षे माध्यमिक शाळेपेक्षा कमी दर्जा नसलेल्या शैक्षणिक संस्थेत शिक्षक म्हणून काम केलेले व्यक्ती मतदार नोंदणीसाठी पात्र असतील. शिक्षक मतदार नोंदणीसाठी अर्ज क्र. १९ भरून, त्यासोबत निवासाचा पुरावा आणि विहित नमुन्यातील शैक्षणिक संस्थेच्या प्रमुखाचे प्रमाणपत्र  द्यावे लागणार आहे.

मतदारांच्या नावात बदल झाले असतील, तर अर्जासोबत राजपत्र, विवाह नोंदणी प्रमाणपत्र किंवा संबंधित कायदेशीर पुरावादेखील जोडावा लागेल. मतदाराने अर्जात आधार क्रमांक नमूद करणे ऐच्छिक असेल आणि आधार क्रमांक दिला नाही म्हणून अर्ज नाकारला जाणार नाही. कोणत्याही परिस्थितीत मतदाराचा आधार तपशील सार्वजनिक केला जाणार नाही, असेही  श्री. देशपांडे यांनी यावेळी स्पष्ट केले.

राजकीय पक्ष देखील मतदार नोंदणीसाठीचे विहीत नमुन्यातील अर्ज स्वतः छापून, त्याचे वितरण करू शकतील. मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्यावतीने पदवीधर आणि शिक्षक मतदारांची अधिकाधिक नोंदणी व्हावी, यासाठी जनजागृती केली जात आहे.  विद्यापीठे, महाविद्यालये, शाळा, विविध संस्था संघटना, शासकीय, निमशासकीय कार्यालय, बँका या ठिकाणी पोहोचून पदवीधरांना नाव नोंदणी करण्यासाठी अर्ज दिले जातील, अशी माहितीही त्यांनी दिली. राजकीय पक्षांनीही मतदार नोंदणी वाढविण्यासाठी त्यांच्यास्तरावर प्रयत्न करावेत असे आवाहनही श्री. देशपांडे यांनी केले.

या मतदार नोंदणीसाठी येत्या शनिवार ३० सप्टेंबर २०२३ रोजी जाहीर सूचना प्रसिध्द केली जाईल, वर्तमानपत्रातील नोटीसची प्रथम पुनर्प्रसिद्धी सोमवार १६ ऑक्टोबरला, द्वितीय पुनर्प्रसिद्धी बुधवारी २५ ऑक्टोबरला केली जाईल. अर्ज क्र. १८ आणि १९ द्वारे ६ नोव्हेंबर २०२३ पर्यंत दावे आणि हरकती स्वीकारल्या जातील. त्यानंतर सोमवार २० नोव्हेंबरला हस्तलिखिते तयार करून प्रारुप मतदार याद्यांची छपाई केली जाईल. या प्रारुप मतदार याद्या २३ नोव्हेंबरला प्रसिद्ध होतील. त्यावर २३ नोव्हेंबर ते ९ डिसेंबर २०२३ पर्यंत दावे आणि हरकती स्वीकारले जातील. त्यानंतर २५ डिसेंबरपर्यंत दावे आणि हरकती निकाली काढून यादीची छपाई केली जाईल आणि ३० डिसेंबरला अंतिम यादी प्रसिद्ध केली जाईल, असे मुख्य निवडणूक अधिकारी श्री. देशपांडे यांनी सांगितले.

यासोबतच, विधानसभा मतदारसंघांच्या मतदार याद्यांच्या संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम – २०२४ अंतर्गत प्रारुप मतदार याद्यांची प्रसिद्धी दि. १७ ऑक्टोबर ऐवजी २७ ऑक्टोबर २०२३ रोजी होणार असल्याची माहिती  श्री. देशपांडे यांनी यावेळी दिली .

राज्याचे सहमुख्य निवडणूक अधिकारी मनोहर पारकर, उपमुख्य निवडणूक अधिकारी शरद दळवी यांच्यासह इतर अधिकारी आणि विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

0000

नीलेश तायडे/विसंअ/

राज्यातील स्काऊट गाइड्स यांनी व्यसनमुक्तीसाठी अभियान राबवावे – राज्यपाल रमेश बैस

मुंबई दि. 26 : राज्यपाल रमेश बैस यांचे आज महाराष्ट्र राज्य भारत स्काऊट आणि गाइड संस्थेचे मुख्य आश्रयदाते म्हणून पदग्रहण झाले.

राजभवन येथे राज्याचे क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री तसेच महाराष्ट्र राज्य भारत स्काऊट आणि गाइडचे अध्यक्ष संजय बनसोडे यांच्या उपस्थितीत झालेल्या पदग्रहण सोहळ्यात स्काऊट-गाइडचे राज्य मुख्य आयुक्त तथा क्रीडा व युवक सेवा आयुक्त डॉ. सुहास दिवसे यांनी राज्यपालांना स्काऊट-गाइड प्रतिज्ञा दिली.

यावेळी मंत्री श्री. बनसोडे यांच्या हस्ते राज्यपालांना स्काऊट स्कार्फ तसेच आश्रयदाते पदक प्रदान करण्यात आले.

स्काऊट स्कार्फ परिधान केल्याने व्यक्तीला नम्रतेची आणि कर्तव्याची जाणीव होते. देशातील ४७ लाख स्काऊट-गाईडपैकी १३ लाख सदस्य एकट्या महाराष्ट्राचे आहेत, ही अभिमानाची बाब असल्याचे नमूद करून राज्यात स्काऊट आणि गाइड्स यांनी युवकांमध्ये व्यसनमुक्तीसाठी अभियान राबवावे, तसेच प्रत्येक स्काऊट व गाइडने एका तरी रोपाची लागवड करावी, असे आवाहन राज्यपालांनी यावेळी केले.

स्काऊट्स व गाइड्सनी स्वच्छ भारत अभियान राबविण्यात तसेच ‘कोविड’ महामारी काळात चांगले काम केल्याचे नमूद करून शाळा महाविद्यालयांनी स्काऊट गाइडचे काम गांभीर्यपूर्वक करावे अशी सूचना राज्यपालांनी यावेळी केली.

आयुक्त डॉ. दिवसे यांनी स्काऊट-गाइड चळवळीचा इतिहास सांगितला. स्काऊट चळवळीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे चारित्र्य घडवले जाते. तसेच विश्वबंधुत्व भावनेचे संवर्धन केले जाते, असे त्यांनी सांगितले. महाराष्ट्र स्काऊटच्या राज्य चिटणीस सारिका बांगडकर यांनी आभार मानले.

००००

Maharashtra Governor takes oath as Patron of Maharashtra Scouts & Guides

Maharashtra Governor Ramesh Bais was formally sworn in as the Patron of the Maharashtra State Bharat Scouts and Guides at an Installation ceremony held at Raj Bhavan, Mumbai on Tue (26 Sept)

The Governor gave the 3 fingers Scout Guide salute and read out the Scout pledge ‘to do his duty to God and India and to help other people’ on this occasion. State President of Maharashtra State Bharat Scouts Guides and Minister of Sports and Youth Welfare Sanjay Bansode was present.

State Chief Commissioner of Maharashtra State Bharat Scouts and Guides Dr Suhas Diwase gave the oath to the Governor, while Minister Sanjay Bansode presented the Insignia and Scarf of the Scouts to the Governor on this occasion.  Office bearers of the Maharashtra State Bharat Scouts and Guides Association were present on the occasion

Speaking on the occasion, the Governor called upon the State Association to launch a de-addiction campaign among the youths of the State. He praised the State Association for its work during the Swachch Bharat Abhiyan and the COVID – 19 pandemic. State Secretary Sarika Bangadkar gave the vote of thanks.

0000

राज्यपालांनी घेतले लालबागच्या राजाचे दर्शन

मुंबई, दि. 26 : राज्यपाल रमेश बैस यांनी मुंबईतील प्रसिद्ध सार्वजनिक गणेशोत्सव ‘लालबागच्या राजा’चे दर्शन घेतले. यावेळी मंडळाचे पदाधिकारी सुधीर साळवी यांनी राज्यपालांचे स्वागत केले.

0000

Governor Ramesh Bais visits Lalbaugcha Raja

Maharashtra Governor Ramesh Bais visited Mumbai’s famous Sarvajanik Ganeshotsav ‘Lalbaug-cha Raja’ during the ongoing Ganesh festival in Mumbai on Tue (26 Sept.). Office bearer of the Mandal Sudhir Salvi welcomed the Governor.

महानगरात ७ हजार पंचनामे पूर्ण; साडेतीन हजार कुटुंबीयांना धान्य किट

उर्वरित पंचनामे दोन दिवसात पूर्ण होणार;  साफसफाईला प्राधान्य देत आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन

नागपूर, दि. 26 : शनिवारच्या मुसळधार पावसानंतर प्रशासन स्तरावरून पंचनाम्याला युद्धपातळीवर सुरुवात करण्यात आली आहे. आतापर्यंत 7 हजार 169 पंचनामे पूर्ण झाले असून 3 हजार 370 कुटुंबीयांना धान्य किटचे वाटप करण्यात आले आहे.  जिल्हा आणि महानगर प्रशासनाच्या सहकार्याने येत्या दोन दिवसात पंचनामे पूर्ण करण्यात येणार आहेत. नागरिकांनी आरोग्याची काळजी घेत घर व दुकानांच्या साफसफाईकडे लक्ष देण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

पूरानंतर पंचनाम्याच्या कार्यवाहीसाठी टीम तैनात तयार करण्यात आल्या आहेत. जिल्हा प्रशासन आणि महानगरपालिकेच्या 55 टीम घरोघरी जाऊन पंचनामे पूर्ण करीत आहेत. पंचनामे करणाऱ्या टीम घरी येणार की नाही याविषयी काही नागरिकांमध्ये साशंकता आहे. मात्र, सर्व पूरग्रस्तांच्या पंचनाम्याची कार्यवाही घरी जाऊन करण्यात येणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी निःशंक राहण्याचे आवाहन जिल्हाधिका-यांनी केले आहे.

आतापर्यंत सात हजारांवर पंचनामे पूर्ण झाले आहेत. काही लोक पंचनामे न होण्याच्या भीतीपोटी घराची साफसफाई करीत नसल्याचे आढळून आले आहे. मात्र, पूरग्रस्त भागाचे व्हिडिओ चित्रिकरण करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांनी घरांची साफसफाई पूर्ण करावी. नागरिकांनी पंचनाम्यांची वाट न पाहता साफसफाई करावी, असे जिल्हाधिकारी म्हणाले.

दलालांच्या भुलथापांना बळी पडू नका

नागरिकांनी दलालांच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारचे फॅार्म भरून घेत त्यांना पैसे देऊ नये. जिल्हा प्रशासन किंवा महानगरपालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांमार्फतच केवळ पंचनाम्यांची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करण्यात येत आहे. त्यामुळे दलालांच्या भुलथापांना बळी न पडता जिल्हा प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

जिल्हाधिकाऱ्यांकडून पूरपीडित भागाला भेट

जिल्हाधिकाऱ्यांनी आज पीली नदीच्या पुरामुळे बाधीत झालेल्या कामठी रोडवरील भदंत आनंद कौसल्यायन नगरला भेट देत पूरपीडितांच्या समस्या जाणून घेतल्या. लवकरच पंचनामे पूर्ण करण्यात येणार आहेत. मदतीपासून कुणीही वंचित राहणार याची प्रशासनातर्फे काळजी घेण्यात येईल, असे पूरपीडितांना जिल्हाधिका-यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्र्याकडून आढावा

उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस पूरानंतरच्या संपूर्ण मदत कार्यावर बारकाईने लक्ष ठेवून असून दररोज आढावा घेत आहेत. आजही त्यांनी पंचनामे तसेच मदतीचा आढावा प्रशासनाकडून घेत गरजूंपर्यंत मदत पोहोचविण्याची सूचना प्रशासनास केली. तसेच पंचनाम्याची गती वाढवण्याचे सूचवले आहे.

तहसिल कार्यालयाशी संपर्क साधा

            जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी सर्व नागरिकांनी मदतीसाठी संयम ठेवण्याचे आवाहन केले आहे. ज्यांच्याकडे कोणतेही कर्मचारी पंचनाम्यासाठी आले नाहीत. आपले घर सुटले असे वाटत असेल त्यांनी सिव्हिल लाईन परिसरातील शहर तहसील कार्यालयामध्ये माहिती देण्याचे आवाहन केले आहे.

****

गणपती विसर्जन व ईद-ए-मिलाद च्या मिरवणुका शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस दक्ष – पालकमंत्री शंभूराज देसाई

ठाणे, दि. 26 (जिमाका) :- ठाणे जिल्ह्यात लागोपाठ येणाऱ्या गणेश विसर्जन मिरवणुका व ईद-ए-मिलाद च्या मिरवणुका शांततेत संपन्न व्हाव्यात, यासाठी पोलीस, महानगरपालिका व जिल्हा प्रशासनाने दक्ष राहण्याच्या सूचना पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी आज येथे दिल्या.

गणेशोत्सव विसर्जन मिरवणूक व ईद-ए-मिलाद च्या मिरवणुकीसंदर्भात ठाणे शहर पोलीस आयुक्तालयात आयोजित पोलीस व महापालिका प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.

यावेळी जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, ठाणे महापालिका आयुक्त अभिजित बांगर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल, ठाणे पोलीस आयुक्त जय जित सिंह, मीरा भाईंदर पोलीस आयुक्त मधुकर पांडे, नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, जिल्हा पोलिस प्रमुख विक्रम देशमाने, पोलीस सहआयुक्त संजय जाधव, पोलीस सहआयुक्त दत्तात्रय कराळे, पोलीस उपायुक्त राजेंद्रकुमार दाभाडे, निवासी उपजिल्हाधिकारी सुदाम परदेशी, उल्हास नगरमहापालिका आयुक्त अजीज शेख, भिवंडी महापालिका आयुक्त अजय वैद्य, सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल जाधव आदींसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री महोदयांनी जिल्ह्यातील पोलीस बंदोबस्त, मनुष्यबळाची उपलब्धता, कायदा व सुव्यवस्थेसंदर्भात केलेल्या उपाययोजना, विसर्जनासाठी कृत्रिम तलाव, विसर्जनस्थळाच्या सुविधा याबद्दल सर्व पोलीस आयुक्तालये व महापालिकांकडून सविस्तर माहिती घेतली.

आढावा बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत माहिती देताना पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले की, गणेशोत्सव विसर्जन मिरवणूक व ईद-ए-मिलाद हे दोन्ही सण एकाच दिवशी आले आहेत. मात्र मुस्लिम बांधवांनी ईद-ए-मिलाद च्या मिरवणुका दुसऱ्या दिवशी काढण्याचा निर्णय घेतला आहे. या दोन्ही मिरवणुका शांततेत व सामंजस्याने पार पाडाव्यात यासाठी जिल्हा प्रशासन, महापालिका प्रशासन व पोलीस प्रशासनाने आवश्यक ती सर्व तयारी केली आहे. जिल्ह्यात गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी 18 हजार पोलिसांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याशिवाय वैद्यकीय पथक, होमगार्ड, स्वयंसेवकही मदतीसाठी आहेत. जिल्ह्यात अनंत चतुर्दशीला सुमारे दोन हजार सार्वजनिक मंडळांच्या गणपतींचे विसर्जन होणार आहे. अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी पहाटे चार वाजेपर्यंत गणेश मुर्तींचे विसर्जन पूर्ण होण्याचा अंदाज आहे. आतापर्यंत दीड दिवस, पाच दिवस व सात दिवसांच्या गणपतींचे विसर्जन जिल्ह्यात शांततेत पार पडले असून कोणताही अनुचित प्रकार घडलेला नाही.

गणेश विसर्जन मिरवणूक व ईद-ए-मिलाद च्या मिरवणुकांमुळे पोलीस दलावर अतिरिक्त ताण पडणार आहे. त्यामुळे उपलब्ध मनुष्यबळाचे योग्य नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यंदा नागरिक मोठ्या प्रमाणात गणेशोत्सवासाठी बाहेर पडले आहेत. त्यांच्या उत्साहात कोणतीही आडकाठी आणू नये. सामान्य नागरिकांना त्रास होणार नाही, याची सर्वोतोपरी काळजी घेण्यास सांगितले आहे. महिला, बालके यांच्यासह सामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सर्व खबरदारी पोलीस विभागाने घेतली आहे, असेही श्री. देसाई यांनी यावेळी सांगितले.
000000

मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयात दरमहा तिसऱ्या सोमवारी महिला लोकशाही दिन 

मुंबई, दि. 26 : समस्याग्रस्त व पीडित महिलांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे,  त्यांच्या हक्कांचे संरक्षण होऊन न्याय मिळावा या दृष्टीने महिलांच्या तक्रारी व अडचणी यांची शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक करण्यासाठी व समाजातील पीडित महिलांना सुलभ मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयामार्फत  जिल्हाधिकारी कार्यालय मुंबई शहर येथे दरमहा तिसऱ्या सोमवारी महिला लोकशाही दिन जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी कार्यालय, मुंबई शहर येथे सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात येणार आहे.

महिला लोकशाही दिनात तक्रार दाखल करण्याकरिता तक्रार अर्जाचा नमुना जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, ११७ बी.डी.डी. चाळ, पहिला मजला, वरळी मुंबई ४०००१८ येथे उपलब्ध आहे. अर्ज विहित नमुन्यात असावा., तक्रार/ निवेदन वैयक्त‍िक स्वरुपाचे असावे.

न्यायप्रविष्ट प्रकरणे, विहित नमुन्यात नसणारे व आवश्यक त्या कागदपत्रांच्या न जोडलेला प्रतीचे अर्ज. सेवा विषयक, आस्थापनाविषयक बाबी, तक्रार/निवेदन वैयक्त‍िक स्वरुपाचे नसेल, तर अशा प्रकारचे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, असे मुंबई शहरचे महिला व बाल विकास अधिकारी शोभा शेलार यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.

०००

संध्या गरवारे/विसंअ/

प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत पाणलोट विकास घटक योजनेसाठी १४३.०४ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध – मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड

मुंबई दि. 26 : प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेतंर्गत पाणलोट विकास घटक 2.0 ही योजना मृद व जलसंधारण विभागामार्फत राबविण्यात येत आहे. या योजनेसाठी पात्र स्वयं सहाय्यता गटांना निधी वितरणासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान यांच्याकडे 143.04 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन  देण्यात आला असल्याची माहिती मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी दिली आहे.

मंत्री श्री .राठोड म्हणाले की, राज्यात केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना – पाणलोट विकास घटक 2.0 ही योजना मृद व जलसंधारण विभागामार्फत राबविण्यात येत आहे. या योजनेचे निधी प्रमाण – केंद्र : राज्य  (60 : 40) असून, योजनेचे प्रकल्पमूल्य रु.1335.56 कोटी इतके आहे. हा प्रकल्प राज्यातील 30 जिल्ह्यांतील 102 तालुक्यातील 1603 गावांमध्ये राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत राज्यातील एकूण 5,65,186 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे.

या योजनेंतर्गत उपजीविका घटकांतर्गत प्रकल्प मूल्याच्या 15 टक्के निधीची तरतूद असून, उपजीविका हा घटक ग्राम विकास विभागाच्या अधिपत्याखालील महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान या यंत्रणेमार्फत त्यांच्या आर्थिक निकषानुसार राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी मृद व जलसंधारण विभागाकडून पात्र स्वयं सहाय्यता गटांना निधी वितरणासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान यांच्याकडे रु.143.04 कोटी एवढा निधी उपलब्ध करुन देण्यास मान्यता देण्यात आली आहे.

उपजीविका घटकांतर्गत प्रत्येक पाणलोट प्रकल्पात फिरता निधी मिळण्यास पात्र स्वयं सहाय्यता गटांना रु. 30 हजार व प्रभाग संघामार्फत समुदाय गुंतवणूक निधी मिळण्यास पात्र स्वयं सहाय्यता गटांना रु.60 हजार याप्रमाणे वितरित करण्यात येणार असून, प्रत्येक प्रकल्प क्षेत्रात प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांच्यामार्फत प्रभाग संघ व स्वयं सहाय्यता गटांना निधी वितरित करण्यात येणार असून पात्र स्वयं सहाय्यता गट व प्रभाग संघ यांना निधी पाणलोट समितीच्या शिफारशीने वितरित करण्यात येईल.

00000

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजनेचा निधी वेळेत वितरित करावा – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

मुंबई, दि. 26 : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजनेचा निधी लाभार्थींना निर्धारित वेळेत वितरित करण्याचे निर्देश महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले.

मंत्रालय दालनात झालेल्या आढावा बैठकीत मंत्री आदिती तटकरे बोलत होत्या. यावेळी महिला व बालविकास विभागाचे सचिव अनुपकुमार यादव, सहसचिव श्री.अहिरे, उपसचिव वि.रा.ठाकूर, सहसचिव स्मिता निवतकर, महिला व बालविकास आयुक्तालयाचे उपायुक्त राहुल मोरे उपस्थित होते.

मंत्री कु. तटकरे म्हणाल्या, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना ही शून्य ते १८ वयोगटातील अनाथ, निराधार, निराश्रित, बेघर, संरक्षण व निवाऱ्याची गरज असलेल्या मुला-मुलींना संस्थाबाह्य कौटुंबिक वातावरणात संगोपन व्हावे त्यांना मूलभूत सुविधा मिळाव्यात व त्यांचा विकास व्हावा यासाठी राबविण्यात येते. प्रतिलाभार्थी व संस्थांना देण्यात येणारा निधी वेळेत वितरित करावे तसेच आगामी कालावधीकरिता निधीची मागणी वेळेत सादर करावी, असे आदेश मंत्री कु. तटकरे यांनी दिले.

मंत्री कु. तटकरे म्हणाल्या, ईरशाळवाडी या दरडग्रस्त आपत्तीतील बाधित अनाथ मुलांना आवश्यक ती सर्व मदत व सहाय्य विभागाकडून करावे. अंगणवाडी केंद्रात जाणारी बालके, शाळेत जाणारी बालके, शून्य ते १८ वयोगटातील मुलांची स्थिती तपासून विभागाच्या अनुषंगाने योग्य ती कार्यवाही करावी. यामध्ये पात्र लाभार्थींना बालसंगोपन योजनेचा लाभदेखील वेळेत वितरित करावा. दुर्घटनेतील बालकांना आवश्यकता पाहून वेळोवेळी समुपदेशन देखील करण्यात यावे. महिला व बालविकास विभागांतर्गत विविध समित्यांची स्थापना करून याचा नियमित कामकाज आढावा घेण्याचे निर्देश मंत्री कु. तटकरे यांनी यावेळी दिले.

****

संध्या गरवारे/विसंअ/

ताज्या बातम्या

पनवेल महानगरपालिकेच्या क्रिकेट प्रशिक्षण केंद्रातून गुणवत्ताधारक खेळाडू घडतील – मंत्री ॲड. आशिष शेलार

0
मुंबई, दि. २७ : पनवेल महापालिकेने उभारलेल्या क्रिकेट प्रशिक्षण केंद्राची व्यवस्था उत्तम आहे. या प्रशिक्षण केंद्रासाठी महापालिकेने दिलीप वेंगसरकर यांची अगदी अचूक निवड केली...

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम दशकपूर्तीनिमित्त उद्या मुंबईत सोहळा

0
मुंबई, दि. २७: सामान्य प्रशासन विभाग (प्रशासकीय नावीन्यता, उत्कृष्टता व सुशासन) व महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोग यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५ च्या अंमलबजावणीची...

औद्योगिक विकासाला चालना; सुसज्ज कन्व्हेंशन  सेंटर उभारणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
छत्रपती संभाजीनगर, दि. २७ (विमाका) : औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये सुसज्ज व पुरेशी जागा असलेले औद्योगिक प्रदर्शन व सुविधा केंद्र (इंडस्ट्रियल एक्झिबिशन...

गुणात्मक आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी नवीन मॉडेल तयार करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
शासकीय कर्करोग रुग्णालयातील ट्रू बीम किरणोपचार प्रणालीचे लोकार्पण छत्रपती संभाजीनगर, दि.२७ (विमाका): सार्वजनिक आरोग्य विभाग आणि वैद्यकीय शिक्षण विभागाच्या समन्वयातून आरोग्य सेवेतील त्रिस्तरीय यंत्रणा पुढील...

शासकीय कर्करोग रुग्णालयात ट्रू बीम लिनियर ॲक्सलरेटर प्रणालीचे लोकार्पण

0
छत्रपती संभाजीनगर, दि.२७: छत्रपती संभाजीनगरमधील शासकीय कर्करोग रुग्णालयातील ट्रू बीम युनिट या कर्करोगावरील अतिविशेष उपचार देणाऱ्या अत्याधुनिक यंत्र प्रणालीचे व कर्करोग संस्थेच्या इमारतीच्या विस्तारीत...